21 Dec 2013

फर्स्ट डे फर्स्ट शो धूम-३

फक्त आमिर & आमिर...
-------------------------




'धूम' मालिकेतल्या तिसऱ्या भागात खलनायकाची भूमिका आमिर खान साकारणार आहे, ही बातमी ज्या दिवशी फुटली त्याच दिवशी हा टोटली आमिर खानचा सिनेमा असणार, हे नक्की होतं. (कारण कथित नायक-नायकाची जोडी अभिषेक बच्चन आणि उदय चोप्रा हीच ठरलेली आहे. ती राष्ट्रीय तरुण बेरोजगार योजना की काय... त्याअंतर्गत!) पण सिनेमा प्रत्यक्षात बघितल्यावर त्यात थोडी भर घालून म्हणावंसं वाटतं - की हा फक्त आमिर आणि आमिरचा सिनेमा आहे! आमिर खान हाच सिनेमाचा महानायक आहे. सिनेमा सुरू झाल्यानंतर साधारण दहाव्या मिनिटाला आमिरचं पडद्यावर दर्शन होतं आणि ते शेवटच्या फ्रेमपर्यंत कायम राहतं. आमिरच्या याआधीच्या सिनेमांप्रमाणे याही सिनेमात त्यानं संपूर्ण फोकस आपल्यावर राहील, याची काळजी घेतली आहे. त्याच्या सव्वापाच फूट उंचीच्या देहात संपूर्ण पडदा व्यापण्याची क्षमता आहे. त्या अर्थानं आमिरच्या चाहत्यांना हा सिनेमा म्हणजे त्याच्याकडून आणखी एक ट्रिट आहे. पण...
हा 'पण...' अनेक गोष्टींत लागू आहे. आमिर खान त्याच्या सिनेमाच्या पटकथेवर (पुष्कळ ढवळाढवळ करून) काम करतो, असं ऐकलं होतं. पण 'धूम-३'ची पटकथा अत्यंत विस्कळित आणि अस्ताव्यत आहे, हे आमिरच्या लक्षात आलं नाही? 'धूम-३'सारख्या अॅक्शन सिनेमाला ज्या किंचित रहस्याची डूब देऊन हा सारा डोलारा उभा केला आहे, ते किती कमकुवत आहे, याची कल्पना या बुद्धिमान नटाला आली नसावी? आमिर स्वतःच्या व्यक्तिरेखे(खां)वर भरपूर मेहनत घेतो, स्वतःच्या लूकवर खूप काम करतो, प्रत्येक फ्रेममधील त्याचं अस्तित्व नीट चाचपून घेतो, हे सर्वांनाच माहिती आहे. इथंही त्यानं ते केलंच आहे आणि त्याबद्दल त्याला सलाम... पण बाकीचं काय? बहुदा बाकीच्या पात्रांची मांडणी, उभारणी आणि त्यांचा कथेतला प्रवास, कथेतील ट्विट्स अँड टर्न्स आदी सर्वच बाबी त्यानं दिग्दर्शकावर सोडून दिल्या असाव्यात. अर्थात त्या दिग्दर्शकानंच पाहणं अपेक्षित असतं. पण आमिर खानचा सिनेमा अशा सर्वच बाबींना अपवाद असतो, म्हणून ही तक्रार. कारण आमिर खान या नावाचं वलय आणि त्याच्याकडून असणाऱ्या अपेक्षा वेगळ्या असतात. नाही तर अन्य खानांमध्ये आणि त्याच्यात फरक तो काय राहिला?
एकापेक्षा एक अतर्क्य आणि प्रेक्षकांच्या किमान बुद्धीलाही आव्हान देणाऱ्या प्रसंगमालिकांनीच हा सिनेमा सुरू होतो आणि काळजाचा ठोका क्षणभर चुकतो. विशेषतः जय (अभिषेक बच्चन) आणि अली (उदय चोप्रा) यांची एंट्री ज्या गावठी आणि बी ग्रेडच्या दृश्यानं (इथं दिग्दर्शकाला कॉमेडी अपेक्षित असावी...) होते, तिथं तर सिनेमा पूर्ण हातातून गेला, असंच वाटून जातं. पण सुदैवानं नायकाच्या संघर्षाला प्रारंभ होतो आणि सिनेमा पुन्हा ट्रॅकवर येतो. शिकागोत नव्वद सालात द ग्रेट इंडियन सर्कस चालविणारा इक्बाल खान (जॅकी श्रॉफ) आणि कर्जफेड केली नाही म्हणून त्यावर जप्ती आणणारी वेस्टर्न बँक ऑफ शिकागो यांच्यातील संघर्षात इक्बालचा बळी गेलेला त्याचा मुलगा साहिर (सिद्धार्थ निगम) पाहतो. हाच मुलगा मोठा साहिर (आमिर) होऊन बँकेला धडा शिकवण्याच्या मागे लागतो. आता इथं (सब)नायक-नायक जोडी भारतातून येण्यासाठी काही तरी निमित्त हवं. मग त्यासाठी महानायक सगळीकडं कोळशानं हिंदीतून बँक की ऐसी की तैसी वगैरे लिहून ठेवत असतो... (आता अमेरिकेत ढिगानं असलेले कोणीही भारतीय हे काय लिहिलंय हे सांगू शकलं असतं. पण मग जय आणि अली तिथं येणार कसे? असो.) इथून पुढं मग बाइक्सची थरारक धूम, पाठलाग वगैरे साग्रसंगीत पार पडतं. (ही दृश्यं चांगलीच आहेत, पण आता तो दर्जा या सिनेमात अपेक्षितच आहे...) मग मध्यंतराला गोष्टीतला तो (किंचित) ट्विस्ट येतो. वास्तविक हिंदी सिनेमे पाहणारा कोणीही माणूस हे रहस्य लगेचच ओळखील. पण तरीही इथं ते सांगत नाही.
मग उत्तरार्धात या किंचित रहस्यानं निर्माण झालेला गुंता सोडवण्याचा जय आणि अली यांचा प्रवास आणि महानायकाचं त्यांना चकवा देत पळणं हा भाग बऱ्यापैकी खिळवून ठेवतो. त्यात काही उपकथानकासारखाही भाग येतो. अरे हो, या सिनेमाला एक नायिकाही आहे हं अलिया (कतरिना) नावाची. महानायकासमोर पाच मिनिटांचा (अक्षरशः 'स्टनिंग' असा) डान्स करून ती त्याच्या सर्कसमध्ये दाखल होते आणि महानायकाला नायिका हवी, ही महत्त्वाची गरज पूर्ण करते. मग पुढं त्यांचं प्रेमप्रकरण वगैरे. पण तो भाग थोडा किंचित रहस्याशी संबंधित असल्यानं सविस्तर सांगता येत नाही. तर हे सगळं होतं आणि अपेक्षेप्रमाणं सबनायकांच्या हातून मार खाऊन मरण्यापेक्षा महानायक वेगळा मार्ग निवडतो, हे सांगायला नको. वेगानं खाली जाऊन महानायकाला अंतिमतः मोठी उंची प्राप्त होते, हे ओघानं आलंच!
या सिनेमाला खाली नेणारी, पण अंतिमतः मोठी उंची प्राप्त अजिबात न करून देणारी आणखी एक गोष्ट म्हणजे त्याची लांबी. सुमारे तीन तासांचा हा सिनेमा असून, एवढ्या लांबीची मुळीच गरज नव्हती. मात्र, विस्कळित पटकथेवर त्याचा सगळा दोष जातो. तरीही यात आयटेम साँग नाही, ते एक बरंय.
प्रीतम यांचं संगीत ठीक आहे. मलंग मलंग हे गाणं आणि त्याचं चित्रिकरण अप्रतिम आहे, यात वाद नाही. आमिर, कतरिना यांनी नृत्य आणि सर्कशीतले बरेच कायिक प्रकार लीलया केले आहेत आणि डमी न वापरता त्यांनी हे केलं असेल, तर त्यांचे खास कौतुक. अभिषेक बच्चन आणि उदय चोप्रा त्यांची कामं नेहमीच्या सफाईनं करतात. मात्र, दुर्दैवानं आमिरसमोर त्यांना अजिबातच स्कोप नाही. सुरुवातीला छोट्या भूमिकेत जग्गूदादा उत्तम.
तेव्हा आमिरचे चाहते असाल, तर नक्की पाहा. कतरिनाचे असाल, तर अं... ओके. बघा. अभिषेक बच्चन आणि उदय चोप्राचे कुणी आहेत काय?
---

निर्मिती : यशराज फिल्म्स
दिग्दर्शक : विजय कृष्ण आचार्य
संगीत : प्रीतम
सिनेमॅटोग्राफी : सुदीप चटर्जी
प्रमुख भूमिका : आमिर खान, अभिषेक बच्चन, उदय चोप्रा, कतरिना कैफ, जॅकी श्रॉफ
दर्जा : ***१/२
---
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे, २१ डिसेंबर २०१३)


17 Dec 2013

'जंबिया मधाचा...'


कौशिकी चक्रवर्तीचं गाणं ऐकताना अडचण एकच येते. ती म्हणजे डोळे बंद करून तिचं गाणं ऐकता येत नाही. म्हणजे तसं करायला गेलो, तर कान आणि डोळे यांच्यात भांडणच सुरू होतं! पण हे देखणं स्वरशिल्प अनुभवताना एका गोष्टीत मात्र स्वतःचंच एकमत होतं, ते म्हणजे ऐंद्रिय अनुभूतीच्याही पार नेणारं काही तरी आपण ऐकत आहोत... परवा सवाई गंधर्व महोत्सवाच्या स्वरमंचावर कौशिकीचं गाणं ऐकताना माझं मन नकळत भूतकाळात गेलं. स्वतः कौशिकीनंही तिच्या या मंचावरच्या पहिल्या हजेरीचा अनुभव सांगितला. त्या वेळी चहा प्यायला बाहेर न गेलेल्यांपैकी मी एक होतो आणि तेव्हाचं तिचं ते गाणं ऐकून मी तेव्हाच तिचा फॅन झालो होतो....
कौशिकीचा जन्म १९८० चा. म्हणजे सवाई गंधर्व महोत्सवात ती पहिल्यांदा गायिली तेव्हा, तर तिनं तिशीही ओलांडली नव्हती. तेव्हाच तिचं गाणं ऐकतानाच लक्षात आलं होतं, की हे प्रकरण काही तरी निराळं आहे... मला शास्त्रीय संगीतातलं खूप कळतं, असं अजिबात नाही. व्याकरण तर नाहीच कळत... पण तरीही कौशिकीचं गाणं आवडतं. ते गाणं समजतं. याचं कारण कौशिकीचं गाणं हे आजच्या तरुणाईचं गाणं आहे. भारतातल्या नव्या पिढीची सर्व लक्षणं तिच्या गाण्यात दिसतात. लहानपणापासून झालेले गाण्याचे संस्कार, आत्मविश्वास, जग जिंकण्याची दुर्दम्य आकांक्षा आणि त्यासाठी वाट्टेल तेवढी मेहनत घेण्याची तयारी ही या पिढीची सहज दिसणारी लक्षणं आहेत. विश्वनाथन आनंद, सचिन तेंडुलकर यांच्यापासून प्रेरणा घेणारी ही पिढी आहे. तिच्या गाण्यात तिच्या व्यक्तिमत्त्वातला अवघा गोडवा उतरतो आणि आणि तो ऐकणाऱ्याला वेडं करतो. आपल्याकडं असलेल्या गुणांची, बलस्थानांची नेमकी जाणीव असणं हेही या पिढीचं लक्षण आहे. कौशिकीलाही ती आहे. मैफली कशा जिंकायच्या, याचं एक शास्त्र आहे. ते तिनं पुरेपूर अंगीकारलं आहे. अनेक मोठमोठे गायक विनम्र भावाचं प्रदर्शन करतात. कौशिकीही तसंच बोलते. मात्र, तिचं हे बोलणं मनापासूनचं वाटतं. ते खोटं, कृत्रिम वाटत नाही. तिच्या गाण्यासारखाच तिच्या व्यक्तिमत्त्वातला तो लखलखीत पारदर्शीपणा बावनकशी सोन्यासारखा अस्सल आहे.
तिचे पिता आणि गुरू पं. अजय चक्रवर्ती यांनी कौशिकीवर आणि तिच्या गाण्यावर घेतलेली मेहनत जाणवते. अर्थात गाताना ती एवढ्या सहजतेनं गाते, की शास्त्रीय संगीत गाणं खूप सोपं आहे, असं वाटावं. आणि असं वाटायला लावणं यातच तिचं यश आहे. सूरांवरची तिची हुकमी पकड कळतेच. शिवाय पल्लेदार ताना, मुरके, खटके, हरकती आदी शास्त्रीय संगीतातल्या अनेक गोष्टी ती लीलया करते. कधी तरी वरचा सूर लावताना तिचा आवाज किंचित किनरा होतो. पण हा दोष न वाटता, ती तो इतक्या आकर्षक पद्धतीनं सादर करते, की बस्स... मला खरोखर त्यातल्या तांत्रिक बाबी कळत नाहीत. शास्त्रीय संगीताच्या समीक्षकांच्या दृष्टीने तिचं गाणं कसं आहे, हे मी सांगू शकत नाही. मात्र, सूरांचं नातं ऐकणाऱ्याच्या हृदयाशी असतं, एवढं मला कळतं. कौशिकीच्या गाण्यातल्या काही जागा अशा असतात, की बोरकरांच्या भाषेत तो 'जंबिया मधाचा... कलिजा चिरत' जातो... त्या ताना ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात... आपलं संपूर्ण शरीर त्या सूरांवर डोलत असतं. हृदयात कसलीशी तीव्र स्पंदनांची कारंजी उसळत असतात आणि वाटत असतं, की हे सूर असेच कानी पडत राहावेत...
कौशिकीसाठी हजारोंच्या संख्येनं त्या मंडपात उपस्थित राहिलेल्या अनेक रसिकांचीही हीच भावना असणार. अगदी थोड्या कालावधीत या गायिकेनं आपली सर्वांगसुंदर स्वरमुद्रा सर्वांच्या हृदयावर उमटवली आहे. म्हणून तर तिचं गाणं संपल्यावर आता काही ऐकूच नये, असा सार्वत्रिक भाव तिथं उमटला. तिचं गाणं संपल्यानंतर रसिकांनी किती तरी वेळ टाळ्यांचा कडकडाट करून आणि उभं राहून तिला जी दाद दिली, ती पुरेशी बोलकी होती. कौशिकीचं गाणं पुणेकरांना मनापासून भावलं आहे आणि ही गायिका त्यांच्या गळ्यातली ताइत बनली आहे, हे सिद्ध करायला आता आणखी कुठल्याही पुराव्यांची गरज नाही. भारतात शास्त्रीय संगीताला किती उज्ज्वल भवितव्य आहे आणि पुढची पिढी किती समर्थपणे ही परंपरा पुढं घेऊन चालली आहे, हे पाहायला पं. भीमसेन जोशी त्या सभामंडपात हवे होते... अर्थात अण्णांचा आणि त्यांच्या सर्व पूर्वसूरींचा आत्मा त्या वेळी नक्कीच तिथं असणार आणि त्यांनी या गुणवती गायिकेवर आशीर्वादांच्या सूरांच्या लडीवर लडी उधळल्या असणार, असं वाटावं एवढं त्या वातावरणात भारावलेपण आलं होतं.
काही काही गोष्टी समीक्षेच्या किंवा रुक्ष गणिती मोजपट्टीच्या हिशेबापलीकडं असतात... कौशिकीनं शेवटी गायिलेल्या त्या एका याद पिया की आये...वर दिल आणि जान दोन्ही कुर्बान...
पुढची कित्येक वर्षं तिनं आपलं आयुष्य असंच सुरेल करावं, एवढंच त्या जगन्नियंत्याकडं मागणं...





9 Dec 2013

आणखी काही कविता...

आणखी काही कविता
---------------------

४. तू..
------

तू एक सुंदर स्वप्न आहेस,

तू हळूवारपणे गालावर फिरणारं मोरपीस आहेस,

तू शिशिरातील पानगळीवर मात करणारी वसंत आहेस,

तू एक बहर आहेस,

तू तृषार्त चातकाची टपटप रिमझिम आहेस,

तू भेगाळलेल्या वसुंधरेची बरसात आहेस,

तू थंडीवर मात करणारी ऊब आहेस,

तू पहाटेचं कोवळं दंव आहेस,

तू रिकाम्या मनाच्या गाभाऱ्यातील निःशब्द शिल्प आहेस,

तू विराण वाळंवटातील हिरवंगार 'ओअॅसिस' आहेस,

तू ओसाड, पडीक माळरानावरली कोवळी हिरवळ आहेस,

तू अमावस्येच्या रातीची शांत, निश्चल समई आहेस,

तू एक नंदादीप आहेस,

तू आकाशतारकांच्या अंगणातली ध्रुव आहेस,

तू अफाट दर्यावरल्या छोट्याशा नावेची दीपस्तंभ आहेस,

तू खरं तर एक जिवंत भास आहेस,

छे! तू तर माझी आला-गेला श्वास आहेस!!!

- आनंदीनंदन

(१९ ऑक्टोबर १९९३, पुणे)
---

५. प्रवास
---------

अंधारलेल्या संध्याकाळची साथ धरून,
क्षणिक वावटळीने दूरदूर जाणाऱ्या,
क्षणात् मान टाकणाऱ्या
पिवळ्या पानांकडे हेव्याने पाहून,
मी रस्त्याने अडखळत जात असतो,
तेव्हा तुझ्याच सोबतीतल्या दिवसांच्या
आठवणींचा प्रकाश वाट दाखवीत असतो,

फार फार दिवसांपूर्वी मी लहान होतो,
लहान कसला, इवल्याशा रोपट्याचे
इवलेसे पान होतो,
बालपण सरले, 'तारुण्य' म्हणजे काय
ते कळण्याच्या आतच प्रौढत्वाने ग्रासले,
तेव्हा तुझीच साथ ह्या कु़डीत
प्राण फुंकत होती,
अंधारातल्या घोर चकव्याला
नवे आव्हान देत होती,

परिस्थितीच्या वादळात दोघेही
पुरते होतो वाट चुकलेले,
तुझ्या केवळ अस्तित्वानेच नवचैतन्य
मिळाले लढण्याचे, मुळातच नसलेले
अचानक तू सोडून गेलीस,
जगायचे कसे हेच मग मी
विसरून गेलो,

अशा या एकांड्या रस्त्याने
अडखळत पाऊल टाकताना,
माझीच सावली मला भिववते आहे,
तुझ्या त्या अवचित जाण्याची
गूढ महती मला पटवते आहे!!!

- आनंदीनंदन

(३ नोव्हेंबर १९९३, बुधवार, रात्री ९.४० वा., पुणे)
----

६. राजकारणी
--------------

राजकारणात तसे ते हुशार होते,
सत्तेचे अनेक पत्ते यशस्वीपणे
त्यांनी मांडले होते,

हुकमाचे एक्के नेहमीच त्यांच्या हाती असत,
अक्कलहुशारीमुळे समोरच्याच्या मनावरही ते लगेच ठसत!

सरकारे उलथवणे डाव्या हाताचा मळ होता,
पंतप्रधानपदासाठी कायमच टाकलेला गळ होता,

कधी डावे, कधी उजवे सारेच त्यांचे मित्र होते,
कधी संत, कधी चोर, सगळेच चित्र स्वच्छ होते,

दिवसाउजेडी गरीब, असहाय्य जनतेची
त्यांच्या दारी रांग असे,
दिवस सरताच, निशेच्या संगतीने,
वारुणिच्या रंगतीने सभा त्यांची रंगत असे

खाकी अर्धी चड्डीवाल्यांवरही त्यांचा जीव होता,
हिरव्या निशाणावरही त्यांचा तेवढाच जीव होता,
खरा जीव त्यांचा होता काळ्या गॉगलवाल्यांवर,
कारण ते होते तेच त्यांच्यामुळे; अन्यथा केव्हाच वर,

राजकारण ही त्यांची हौस होती,
फावल्या वेळेची करमणूक होती,
खरी लालसा तिजोरी भरण्याची होती,
त्यासाठीच त्यांच्या देहाची धडपड होती,

कॉन्टेसा, मारुती, अम्बेसिडर सगळ्या वापरून
जुन्या झाल्या होत्या,
मर्सिडीज, टोयोटा, रोल्स रॉइस यांच्या
ऑर्डरी बुक केल्या होत्या,

सामान्यांच्या झोपडपट्टीत पायी ते फिरत होते,
पायांना घाण लागू नये म्हणून,
'दाऊद'चे बूट सजग होते,

त्यांची देहयष्टी पहिल्यापासूनच स्थूल असणार,
भरपूर लागतं 'खायला', कोण काय करणार?
इवल्याशा त्या पोटासाठीच तर सारी धडपड आहे,
जीवाच्या कराराने जगणाऱ्यांची केविलवाणी ती तडफड आहे!!!

- आनंदीनंदन

(३ नोव्हेंबर १९९३, बुधवार, रात्री ९.५५ वा., पुणे)
----

७. आम्ही
----------

चुकणं माहीतच नाही आम्हाला,
आम्ही म्हणजे विश्वाचे सारथी,
सर्व जगाच्या बुद्धीचे भांडार,
बृहस्पतीचेही बाप आम्ही,
चुकणं माहीतच नाही आम्हाला,
आम्ही जन्माला आलो तेच मुळी
जगाच्या चुका सुधारायला,
सर्व काही ठाकठीक होण्यासाठी,
करड्या नजरेचा अंकुश फिरवायला,
भलेही करू आम्ही दशसहस्र अपराध,
पण, चुकणं माहीतच नाही आम्हाला,
जननियंत्याने करून ठेवलेत प्रचंड घोटाळे,
तेच निस्तरण्याचे आमचे काम मोठे,
अनेक कचराकुंड्या कराव्या लागतात साफ,
ह्या बाबतीतही आम्ही आहोत आळश्यांचे बाप,
पण शेवटी कामं करणारे अर्थात् आम्हीच,
कारण, चुकणं माहीतच नाही आम्हाला!!!

(१९ ऑक्टोबर १९९३, पुणे)
----

८. दोष कुणाचा?
----------------

चंदेरी रातीचा गोडवा मोठा,
अलगद अलगद गाणे येई ओठा,
जरी बसले सभोवती सगळे,
का मज होते असे ते न कळे,
प्रतिमा फक्त तुझीच पाहती डोळे,
अन्य साऱ्यांचे भानच जणू गळे,
क्षणी भिडती नयनांना नयन आपुले,
उरी घायाळ करीसी; आम्ही बापुडे
धडधड माझी वाढता वाढे उरीची,
का पडतोस फंदी या; काळजी मनीची,
तुझे ते शरसंधान साहवेना मज जरी,
मनी उमटते चित्र प्रणयी भरजरी,
तशातच तुझे ते उठणे अवचित,
अन् येणे माझ्याकडे; मी भयचकित,
स्पर्शाची कल्पना तुझ्या, मला उभारी देई,
आणि अचानक; तू मजसमोरून निघूनी जातसे,
डोक्यात प्रकाश पडे मग; अरे, हिच्या डोळ्यांत दोष असे!!!

- आनंदीनंदन

(१९ ऑक्टोबर १९९३, पुणे)
---

काही कविता...

सोळा-अठराच्या वयात तशा बहुतेकांना कविता होतातच.
मलाही झाल्या.
त्यातल्याच या काही... बीस साल बाद...
(टोपणनावानं लिहिण्याची सवय तेव्हापासून... तेव्हाचं अस्मादिक कवींचं होतं आनंदीनंदन..)
---
काही कविता...
-------------

१. ध्येय
---------
मंतरलेले ते दिवस गेले,
आठवणींचे फक्त निर्माल्य उरले,
जीवनातील गेला आनंद सगळा,
आता फक्त मोजणे घटका नि पळा,
आत्मविश्वासाचा हरवला वारू,
जीवनाचे हे भरकटले तारू,
जीवनपथावर लोकांची रहदारी भारी,
आपल्याबरोबर आपली सावली तेवढीच खरी,
बावरून गेलोय मी पुरता इथे,
साथीदारही न उरती संगतीला जिथे,
आता फक्त चालणे एकट्याचे आहे,
सामर्थ्य समोरचा अंधार पेलण्याचे आहे,
त्यासाठी धाडस हवे आहे आता फक्त,
त्यासाठी हवे आहे उसळते गरम रक्त,
तारुण्यातच गरम रक्ताचे उसळणे
पुरते थंडावले आहे,
जीवनातील अनपेक्षित वादळांशी
झेप-झुंजा घेऊन ते थकले आहे,
पुन्हा करायची आहे नवी सुरुवात,
जिद्द आहे परिस्थितीवर करण्याची मात,
त्यासाठी पुरता नाहीये तुझ्या आठवणींचा निवारा,
तर मग प्रत्यक्षच हवीय तुझ्या
सोबतीची जलधारा,
येशील का माझ्याबरोबर हातात हात घेऊन,
समोरच्या दूर डोंगरावरील शिखर
खुणावतेय अजून,
बरोबर! तिथंच तर मला जायचं आहे,
तुझ्याबरोबरच माझ्या ध्येयावरही प्रेम करायचं आहे!!!

- आनंदीनंदन

(१ नोव्हेंबर १९९३, सोमवार, रात्री ११.१५ वा., पुणे)
---

२. शब्दप्रेम
-----------

अर्थहीन शब्दांचे गाढवओझे घेऊन
का आम्ही करतो आहोत प्रवास आमच्या ध्येयाचा,
शब्दांच्या, महाशब्दांच्या थोर कुबड्या
घेऊन मिळणार आहे का आम्हाला
आमचं ध्येय?
शब्दांत खूप सामर्थ्य आहे... माहीत आहे
'शब्द हाचि देव...' तुकोबाच म्हणून गेले आहेत,
पण शब्दांच्या जंजाळात आपले
पाय अडकवून कायमची आपली वाटचाल
नाही का थांबवत आपण?
आम्ही सारे असेच,
शब्दांचे इमले बांधू, शब्दसागरात पोहू,
शब्दांच्या साम्राज्याचे सम्राट बनू,
पण करणार नाही प्रत्यक्ष कृती काहीच!
'शब्द' हे 'कृती'चे सर्वांत मोठे शत्रू आहेत का?
'शब्द' हे मायावी राक्षसच आहेत जणू!
'कृती'च्या राजकुमारीला त्यांनी बंदिस्त
करून टाकलं आहे आपल्या मोहजालात,
आम्ही तरी कसले करंटे!
आम्हाला राजकुमारीची सुटका नकोच आहे,
त्यासाठी हवं तर आम्ही मायावी राक्षसांचे
पाय चेपू, गुणगान गाऊ,
पण इच्छा हीच, त्यांनी राजकुमारीला सोडू नये,
तिकडं इंग्लंड-अमेरिकेत राजकुमारीचं राज्य चालू आहे,
आम्ही मात्र मायावी राक्षसांचेच आयुष्यभराचे दास,
का आम्ही आहोत याबाबतीत इतके उदास?

- आनंदीनंदन

(१ नोव्हेंबर १९९३, सोमवार, रात्री ११.२५ वा., पुणे)
----

३. मन
-------
मन मोठी विचित्र गोष्ट आहे,
म्हटला तर आरसा आहे,
म्हटलं तर हवी ती गोष्ट लपवायची
चांगली गुप्त पेटी आहे,
जेव्हा आपण क्वचित कधी तरी
एखादी चांगली गोष्ट करतो,
मनाचा आरसा लगेच चारचौघांत
तेच ते सांगण्यासाठी 'रिफ्लेक्ट' होतो,
जेव्हा म्हणजे बऱ्याचदा आपण
अशा गोष्टी करतो,
की तेव्हा ह्या आरशाने न चमकणेच
चांगले असते,
आटोकाट प्रयत्न करतो आपण,
आपले दोन्ही तळवे आरशावर
झाकून तो पुरता झाकेल याची
काळजी घेत,
पण काही आगाऊ प्रकाशकिरण
निसटतातच त्यातून,
आणि धडकतात समोरच्याच्या आरशावर,
तो विचारतो, 'काय रे, अस्वस्थ
दिसतोयस? काय झालं?'
काय सांगणार कप्पाळ?
प्रकाशकिरण सगळे, ऐकत नाहीत आपलं,
तेव्हा वाटतं,
आरसा नसावंच मन,
असावी ती छानशी, लोखंडाची गुप्त पेटी,
की ज्यात आपण
अशा गोष्टी टाकतो, की ज्या
आयुष्यभर विसरणं आपल्याला
मुळीच नसतं शक्य!!

- आनंदीनंदन
(१ नोव्हेंबर १९९३, सोमवार, रात्री ११.३० वा., पुणे
----