20 Dec 2014

फर्स्ट डे फर्स्ट शो - पीके

राइट नंबर...
----------------
 राजकुमार हिरानी आणि आमिर खान या दिग्दर्शक-अभिनेता जोडगोळीचा, ‘थ्री इडियट्स’ या सुपरडुपर हिट सिनेमानंतरचा पुढचा सिनेमा म्हणून ‘पीके’विषयी कमालीची उत्सुकता होती. या उत्सुकतेला न्याय देणारा आणि या जोडीकडून असलेल्या प्रचंड अपेक्षांना जागणारा हा सिनेमा आहे, हे सर्वप्रथम सांगायला हवं. त्याचबरोबर याच जोडीच्या आधीच्या स्वतंत्र सिनेमांएवढा किंवा अगदी हिरानींच्या मुन्नाभाईच्या सिक्वलएवढा हा सिनेमा ग्रेट नाही, हेही सांगायला हवं. अर्थात कुठलीही तुलना न करता स्वतंत्रपणे विचार केल्यास ‘पीके’ तरीही डिस्टिंग्शन मिळवतोच. याचं कारण राजकुमार हिरानी-अभिजात जोशी या लेखकद्वयाची विषयावर असलेली पकड, प्रसन्न हाताळणीची त्यांची क्षमता आणि आमिरसारखा भूमिकेला शंभर टक्के न्याय देण्यासाठी सदैव झटणारा अभिनेता... या ‘त्रिगुणी’च्या मदतीने ‘पीके’ आपल्याला निराश करत नाही. किंबहुना धर्मासारख्या आपल्या रोजच्या जीवनाशी संबंधित असलेल्या जिव्हाळ्याच्या, श्रद्धेच्या विषयावर एक नवी दृष्टी (‘इनसाइट’) देतो. या सिनेमात मांडले गेलेले विचार नवे आहेत किंवा अगदी फार क्रांतिकारी आहेत असं नाही; पण ते सांगताना सिनेमाच्या माध्यमाच्या सर्व बलस्थानांचा अचूक केला गेलेला वापर आणि गोष्टीला असलेलं रंजनमूल्य या कसोट्या हिरानी-अभिजात अन् आमिर हे त्रिकुट यशस्वीपणे पेलतं. त्यामुळंच ‘पीके’चं नाणं चोख वाजतं. सिनेमातल्याच भाषेत सांगायचं, तर हा राँग नंबर न ठरता परफेक्ट, ‘राइट नंबर’ ठरतो!
राजकुमार हिरानी आणि अभिजात जोशी पहिल्या चित्रपटापासूनच अभ्यासपूर्ण पटकथा लिहिण्यात तरबेज आहेत, हे आपल्याला माहिती आहे. विषयाचा सखोल अभ्यास, गोष्टीचा आरंभ, मध्य व (उत्कंठापूर्ण) शेवट यांचा पक्का हिशेब, सर्वसामान्य प्रेक्षक डोळ्यांसमोर ठेवून केलेली कथावस्तूची मांडणी, विविध प्रदेश-प्रांत यांना आपुलकी वाटेल अशा घटकांची चटकदार फोडणी, गीत-संगीतावर दिलेलं लक्ष आणि कलाकारांकडून खुबीनं काढून घेतलेली आपली पात्रं ही हिरानी-जोशी (व अर्थातच निर्माता विधू विनोद चोप्रा) या मंडळींची खासियत राहिली आहे. आपल्या भूमिकांबाबत भलताच काटेकोर असलेला आमिर त्यांना ‘थ्री इडियट्स’च्या वेळी भेटला आणि त्यांनी इतिहास घडविला. पुढचं पाऊल टाकताना या तिघांनीही ‘धर्म’ हा भलताच संवेदनशील विषय निवडला आहे. धर्मविषयक जाणिवा आणि आपल्या सर्वांच्या श्रद्धा यात कालानुरूप होत गेलेले बदल आणि धर्माच्या नावाखाली राजरोस सुरू असलेली दुकानदारी आपण सर्वच जण रोज पाहत आहोत. धर्माला असलेलं परमपवित्र स्थान आणि त्याच वेळी गरजू लोकांची पिळवणूक करण्यासाठी या श्रद्धेचा होत असलेला गैरवापर आपल्या सभोवती रोज दिसतो आहे. यावर प्रच्छन्न टीका करण्यासाठी हिरानी-जोशी द्वयीनं मार्ग अवलंबिला आहे फँटसीचा. (‘ओह माय गॉड’सारख्या सिनेमांतून हा विषय पूर्वी यशस्वीपणे हाताळला गेला आहे, त्यामुळे हिरानींना पहिलेपणाचा मान नाही...) एका अर्थानं इथं फँटसी आवश्यकच होती, कारण या पृथ्वीतलावरच्या कुठल्याही माणसाला जात व धर्म चिकटलेली आहेच. त्यामुळं या सर्व बाबींवर तटस्थपणे टिप्पणी करायला दिग्दर्शकाला परग्रहावरूनच माणूस (किंवा जो कोणी प्राणी म्हणाल तो) आणावा लागणार, हे उघड होतं. तसा तो त्यांनी इथं आणलाच आहे. त्यामुळं हे ‘एलियन’ प्रकरण या सिनेमाचं मुख्य रहस्य नाहीच. ते सिनेमाच्या सुरुवातीलाच स्पष्ट होतं. मात्र, नंतरच्या मांडणीत आणि प्रसंगांच्या साखळीच्या गुंफणीत सिनेमाचं सगळं यश आहे... आणि अर्थात ‘पीके’ची प्रमुख भूमिका साकारणाऱ्या आमिरच्या अदाकारीतही!
एकदा ही सूत्रधाराची भूमिका आणि त्याची ओळख प्रस्थापित झाली, की पुढचा खेळ रचणं तसं हिरानी-जोशींना सोपं असतं. इथं त्यांनी या ‘पीके’ (आमिर) नामक सूत्रधाराचं अस्तित्व आपल्या नायिकेच्या - जगज्जननी उर्फ जग्गूच्या (अनुष्का शर्मा) - आयुष्याशी जोडलं आहे. बेल्जियममध्ये प्रेमभंग झालेली आपली नायिका आता दिल्लीत परतली आहे. गोष्ट अशी खुबीनं रचली आहे, की जग्गू आणि पीके यांची सातत्यानं भेट होत राहते. तिला ‘पीके’चं वेगळेपण त्वरित जाणवतं. तिच्या पेशामुळं त्याच्यात असलेली ‘स्टोरी’ही दिसते. त्यातून ‘पीके’च्या आत्तापर्यंतच्या अवताराची कथाही फ्लॅशबॅकसारखी उलगडत जाते आणि त्याच वेळी वर्तमानातली त्याची आणि तिची श्रद्धा व धर्माविषयीची अखंड शोधयात्राही सुरू राहते. हे सगळं करताना राजू हिरानी या सगळ्याला सटायरची आणि उपहासगर्भ विनोदाची फोडणी देत राहतात. त्यामुळं सिनेमा पूर्वार्धापर्यंत चांगलाच वेगवान होतो आणि पुढं काय होणार, याची उत्सुकता मनात निर्माण करतो. उत्तरार्धात दिग्दर्शक धर्माविषयीच्या तात्त्विक चर्चेला सुरुवात करण्यासाठी राँग नंबर आणि राइट नंबरची संकल्पना आणतो. (म्हणजे आपल्याला तयार करणारा भगवान हा खरा राइट नंबर आणि त्याच्या नावाखाली दुकानदारी करणारे देवाचे मॅनेजर म्हणजे राँग नंबर...) ही तशी बाळबोध कल्पना आहे आणि तिचं सिनेमात अतिसुलभीकरण केल्यानं सिनेमाचा एकूणच परिणाम उणावण्यात त्याची परिणती होते. सिनेमाच्या शेवटी एक लहानसा ट्विस्ट आणण्याची ट्रिक दिग्दर्शकानं याही ठिकाणी वापरली आहे. मात्र, तीही फार परिणामकारक नाही. असो. 
 आमिरचा अभिनय ही या सिनेमाची अर्थातच फारच जमेची बाजू आहे. या सिनेमाच्या त्या प्रसिद्ध पोस्टरवरील दृश्यापासून ते शेवटच्या त्या सरप्राइज पॅकेज असलेल्या पाहुण्याबरोबर पुन्हा पृथ्वीतलावर येण्यापर्यंत आमिर प्रत्येक दृश्यात भाव खाऊन जातो. हा अभिनेता सदैव काही तरी नवं करण्याच्या शोधात असतो. एलियन म्हणून त्यानं सदैव चेहऱ्यावर दाखवलेला आश्चर्यमुग्ध भाव आणि नंतर भोजपुरी संवादाचा जपलेला अफलातून लहेजा यामुळं आमिर टाळ्या मिळवतोच. पण आता अशा शारीरिक लकबींतून वैविध्य दाखवणाऱ्या भूमिका हे त्याच्यासाठी कितपत आव्हान असेल, याची शंका आहे. त्याच्या आहे त्याच रूपात, पण व्यक्तिरेखेच्या खोल तळाशी बुडी मारून शोधलेलं भावदर्शन दाखवणारी भूमिका त्यानं आता करावी. अनुष्का शर्मा अप्रतिम. तिनं यात उभी केलेली ‘जग्गू’ म्हणजे सहजसुंदर अभिनयाचा एक उत्कृष्ट नमुनाच. बाकी हिरानींच्या टीममधील संजय दत्त, बमन इराणी, सौरभ शुक्ला या मंडळींची इथंही हजेरी आहे आणि त्यांनी आपापल्या भूमिका चांगल्याच केल्या आहेत. सुशांतसिंह राजपूतच्या वाट्याला पाहुण्या कलाकाराचा रोल आहे आणि तो त्यानं व्यवस्थित केला आहे. (त्याला त्याचं बक्षीसही ‘ऑनस्क्रीन’ मिळालं आहे.)
हिरानींच्या या चित्रपटात त्रुटी अर्थातच आहेत. एक तर या सिनेमात अनावश्यक गाणी घुसवली आहेत. ‘भगवान है कहाँ रे तू...’ हे सोनू निगमनं गायलेलं ‘थीम साँग’सदृश गाणं वगळलं तर अन्य गाणी ही केवळ टाकायची म्हणून टाकली आहेत. शिवाय या सिनेमाची लांबीही त्यामुळं अनावश्यकपणे वाढली आहे. दुसरं म्हणजे या सिनेमावर हिंदू धर्मातील गैरप्रकारांवरच अधिक फोकस केल्याचा आरोप येण्याची दाट शक्यता आहे. त्यात या सिनेमात नायिकेवर प्रेम करणारा नायक पाकिस्तानी दाखवला आहे. हे करताना निर्मात्यांच्या डोळ्यांसमोर पाकिस्तानी मार्केट नसेल, असं मानणं म्हणजे फारच बाळबोध होईल. याशिवाय आमिरला भोजपुरी भाषाच बोलायला लावणं किंवा राजस्थान, दिल्लीचा बॅकड्रॉप वापरणं ही प्रत्येक गोष्ट तेथील प्रेक्षकवर्ग डोळ्यांसमोर ठेवून केल्यासारखी झाली आहे.
अर्थात असं असलं, तरी सिनेमा एकूण करमणूक करणारा झाला आहे, हे निश्चित. हिरानी आणि आमिर या मंडळींनी स्वतःचा ‘बार’ उंचावला आहे, ही गोष्ट मुळातच त्यांचं मोठेपण मान्य करणारी आहे. त्यामुळं त्यांच्याकडून अपेक्षाही अधिकच्या असतात. सचिन तेंडुलकरचं उदाहरण याबाबत चपखल ठरेल. त्यामुळं जे काही अपेक्षाभंगासारखं वाटतं आहे, तेही मुळात हा सिनेमा या दोघांचा असल्यामुळं वाटतं आहे, ही गोष्ट मान्य करायला हवी. 
 थोडक्यात, धर्मविषयक आपली संवेदनशील मतं जरा बाजूला ठेवून, जरा तटस्थपणे ही करमणूक अनुभवली, तर अधिकचं काही तरी पदरी पडेल. अन्यथा बाकी मसाला सिनेमे आहेतच...
---
निर्माते : विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी, सिद्धार्थ रॉय कपूर
दिग्दर्शक : राजकुमार हिरानी
पटकथा-संवाद : राजकुमा हिरानी, अभिजात जोशी
सिनेमॅटोग्राफी : सी. के. मुरलीधरन
संगीत : शंतनू मोईत्रा, अजय-अतुल, अंकित तिवारी
गीते : स्वानंद किरकिरे, अमिताभ वर्मा, मनोज मुंतशिर
प्रमुख भूमिका : आमिर खान, अनुष्का शर्मा, सुशांतसिंह राजपूत, बमन इराणी, संजय दत्त, सौरभ शुक्ला, परीक्षित साहनी इ.
दर्जा : *** १/२
---
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, २० डिसेंबर २०१४)
----

15 Dec 2014

अविस्मरणीय असाइनमेंट


जरा याद करो कुर्बानी...
--------------------------- 


प्रास्ताविक

संसदेवर १३ डिसेंबर २००१ ला भीषण दहशतवादी हल्ला झाला, त्याला शनिवारी १३ वर्षं पूर्ण झाली. मी 'सकाळ'मध्ये असताना तेव्हाचे संपादक अनंत दीक्षित यांनी, या घटनेला एक वर्ष पूर्ण झालं तेव्हा, म्हणजे २००२ मध्ये मला या हल्ल्यातील सर्व मृत पोलिस व जवानांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी पाठवलं होतं. मी दिल्लीत आठ दिवस जाऊन या सर्वांच्या भेटी घेतल्या. हरियाणातल्या सोनीपतपासून राजस्थानातल्या 'नीम का थाना'पर्यंत प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांना भेटलो आणि त्या भेटीवर आधारित 'सप्तरंग'मध्ये दोन भागांत 'जरा याद करो कुर्बानी'  असे रिपोर्ताज लिहिले. ही माझी आत्तापर्यंतची एक अविस्मरणीय असाइनमेंट म्हणता येईल. (तेव्हा माझं वय होतं २७...) या दौऱ्याच्या वेळची ही डायरी...

----

मंगळवार, २६ नोव्हेंबर २००२
----------------------------

(पुण्यातून २५ तारखेच्या पहाटे चारला वास्को-निजामुद्दीन एक्स्प्रेसनं निघून...)
सकाळी साडेसहाला '. निजामुद्दीन'ला पोचलो. प्री-पेड रिक्षानं (३५ रु.) आयएनएसला आलो. रफी मार्गावर दिल्ली मेट्रोचं काम चालू असल्यानं एक-दोन वळसे घेऊन यावं लागलं. मग रिक्षावाल्याला १० रु. जादा दिले. आयएनएसमध्ये रिसेप्शन काउंटरला, 'तुमचं बुकिंग बारा वाजता सुरू होईल, तेव्हा या,' असं तिथल्या माणसानं सांगितलं. मग मी लॉबीत गेलो. चहा वगैरे घेतला. मग लगेच आठ वाजताच चार नंबरची रूम मिळाली. मग आवरलं. आंघोळ केली. दाढी केली. ड्रेस बदलला. नाईकांना फोन केला. संसदेसाठीच्या पासाचा अर्ज करून ठेवू, उद्या मिळेल, असं ते म्हणाले. मग मी बागाईतकरांना फोन लावला. पण कुणी उचलला नाही. मग मी यूएनआयच्या कँटीनमध्ये जाऊन उपमा खाऊन आलो. मग येताना नगरला फोन करून इकडं सुखरूप पोचल्याचं कळवलं. नंतर साडेदहाला आयएनएसमधलं सकाळ’चं ऑफिस उघडलं, तेव्हा तिथं गेलो. विवेक नाशिककर भेटले. त्यांना नाईकांनी निरोप दिलाच होता. मग मी माझे फोटो त्यांच्याकडं देऊन ठेवले. नाशिककरांनी अर्ध्या तासात संसदेतून माझा अर्ज आणला. मी तो भरून दिला. मग मी रिक्षानं मंदिरमार्गला गेलो.  
 तिथं मातबरसिंह नेगींचं घर शोधलं. त्यांच्या पत्नी, मुलगा, जावई, मुलगी भेटले. पहिलाच इंटरव्ह्यू चांगला झाला. त्यांचे फोटो वगैर काढले. मग परत आयएनएसला आलो. खाली कँटीनला जेवलो. मग आकाशवाणीच्या स्टॉपवरून ४६० नंबरची बस पकडून बदरपूरला गेलो. तिथं मोलडबंद गावात बिजेंद्रसिंह गुर्जर यांचं घरही लगेच सापडलं. हाही इंटरव्ह्यू चांगला झाला. बिजेंद्रसिंहांची पत्नी, पाच मुलं व सासरे भेटले. त्यांचेही फोटो काढले. त्याच वेळी ‘वीक’चे अजय पणीकर व संजय (फोटोग्राफर) हे तिथं आले. त्यांनीही सुभेदारांचा इंटरव्ह्यू घेतला
  मग त्यांनीच मला ‘आयएनएस’ला त्यांच्या टॅक्सीतून सोडलं. मग रूमवर येऊन जरा आवरलं. मग वर ऑफिसला गेलो. नाईकांना भेटलो. तिथूनच दीक्षितसाहेबांना फोन केला. त्यांच्याशी बोललो. नंतर सुरेखा टांकसाळ बाईंची प्रथमच ओळख झाली. रात्री नाईकांनी मला ‘अशोक यात्री’पाशी सोडलं. तिथं जेवलो. (प्राठा व दाल मखनी!) पावणेनऊला रूमवर आलो. आजचा मजकूर (कच्चा) लिहून काढला. आता झोपतो.
---

बुधवार, २७ नोव्हेंबर २००२
--------------------------

सकाळी पावणेनऊला उठलो. मग आवरलं. आंघोळ केली. साडेनऊला यूएनआयच्या कँटीनला जाऊन इडली-वडा सांबार व चहा हा ब्रेकफास्ट घेतला. मग रूमवर येऊन बॅग घेतली. मग रिक्षानं ‘महाराणा प्रताप अंतर्राज्यीय बस अड्ड्यावर पोचलो. तिथं लगेच सोनीपतची बस मिळाली. एक वाजता सोनीपतला पोचलो. तिथं लगेच राठधाना’ला जायला बस नव्हती. मग सायकलरिक्षा करून सुभाष चौकात गेलो. तिथं तो सायकलरिक्षावाला म्हणाला, की आणखी दुसरीकडंनंच राठधानाला जाणारे टप्पूमिळतील. त्यानं एका ठिकाणी नेऊन घातलं. तिथनं जाम लवकर रिक्षा मिळेना. अखेर एक रिक्षावाला ठरवला. जाऊन-येऊन व तिथं थांबण्याचे ७५ रुपये ठरले. एकदाचा राठधानात पोचलो. शहीद नानकचंदांचं घर शोधून काढलं. त्यांच्या पत्नी गंगादेवी एकट्याच घरात होत्या. मग शेजारच्या एक बाई आल्या. गंगादेवी निरक्षर होत्या
 नानकचंद हे हरिजन होते. त्यामुळं आम्हाला मदत मिळताना जातिभेद केला जातोय,’ असा त्यांचा एकूण सूर दिसला. त्यांना पाच मुलं आहेत. त्यापैकी एकही घरी नव्हता. थोरल्या मुलाला दिल्ली पोलिसांत नोकरी मिळालीय. मग तिथले काही फोटो काढले. त्यांच्या स्मारकाचं कामही रखडलंय. नंतर गंगादेवींच्या शेजारची मुलगी आली. तिनं चहा केला. अखेर अडीचला त्यांचा निरोप घेऊन निघालो. येताना रिक्षावाल्यानं सवारी घेतल्याच. (पण त्या इंजि. कॉलेजच्या मुली असल्यानं माझी हरकत असायचं कारण नव्हतं.) सोनीपतहून दिल्लीला पोचेपर्यंत पाच वाजले. लगेच बलवानाला (ते बवाना आहे, हे नंतर कळलं.) जाण्याचा निर्णय मी घेतला. (अतिउत्साह नडतो, तो असा) दोन-चार जणांनी सांगितल्यावरून नरेलाला आधी जाण्याचं ठरवलं. मग आयएसबीटी ते नरेला हा जवळजवळ पावणेदोन तासांचा प्रवास उभ्यानं, असह्य गर्दीत पार केला. नरेलालाच जाईपर्यंत आठ वाजले होते. अजून पूठकुलाँ दृष्टिक्षेपातही नव्हतं. तरीही लगेच बस मिळाली, म्हणून बवानालाही गेलो. मात्र, तिथं गेल्यावर पूठकुलाँला आणखीन अर्धा तास लागेल, असं कळल्यावर माझा उत्साह संपला. दिल्लीला परत जायला रात्री उशिरा गाड्याही नव्हत्या. मग तिथूनच नाईकांना फोन केला. नंतर पूठकुलाँला उद्या येण्याचं ठरवलं व सरळ दिल्लीची परतीची बस पकडली. ती दहाला आयएसबीटीला पोचली. तिथं ऑम्लेट-पाव खाल्ला. मग बसनं नवी दिल्ली स्टेशनला व तिथून रिक्षानं रात्री ११ ला आयएनएसला पोचलो. आता उद्या पार्लमेंट व पूठकुलाँ दोन्ही करायचं.

---

गुरुवार, २८ नोव्हेंबर २००२
-------------------------

सकाळी आठ वाजता उठलो. तासाभरात आवरलं. मग नाईकांकडं फोन केला. त्यांनी साडेदहाला पास घेऊन पार्लमेंटमध्ये या, असं सांगितलं. मग मी आधी नेहमीप्रमाणं यूएनआयच्या कँटीनला जाऊन उपमा व कॉफी हा ब्रेकफास्ट घेतला. परत आल्यावर ऑफिसात गेलो. विवेक नाशिककर भेटलेच. त्यांनी पास दिला. मग तो घेऊन मी संसद भवनात गेलो. 
पास असल्यानं सहज आत जाऊ शकलो. मला ११ नंबरच्या गेटपाशी शहीद जवानांची नावं लावली होती, ती जागा पाहायची होती. पण तिथं फारच सिक्युरिटी असल्यानं जाता आलं नाही. मग प्रेस गॅलरीत जाऊन बसलो. प्रश्नोत्तराचा तास व शून्य प्रहरातली चर्चा ऐकली. पंतप्रधान राज्यसभेत होते, पण चंद्रशेखर, शरद पवार लोकसभेत पाहायला मिळाले. बाकीही बरेच होते. प्रेस गॅलरीत बागाईतकर होतेच. नंतर नाईकही आले. शून्य प्रहर झाल्यावर एक वाजता संसदेचे उपसंचालक (सुरक्षा) व्ही. पुरुषोत्तम राव यांना भेटलो. त्यांच्याकडून सुरक्षाव्यवस्थेबाबत माहिती घेतली. (नंतर राम नाईकांच्या ऑफिसमध्ये गेलो. तिथं दिलीप गांधी भेटले. मी गेल्या वर्षी हल्ला झाला, तेव्हा त्यांची मुलाखत घेतली होती. त अतिरेक्यांच्या गोळीपासून थोडक्यात बचावले होते.) मग संसद भवनातून बाहेर पडून आयएनएसला आलो. खाली कँटीनला रोटी-सब्जी खाल्ली. मग लगेच बाहेर पडलो. मोरीगेटला गेलो. पण तिथून बवानाला थेट बस नसल्याचं कळलं. मग आझादपूरची बस पकडून तिथं गेलो. तिथून बवानाची बस पकडली. रस्त्यातच पूठकुलाँ गाव अशी पाटी दिसली. मग तिथंच उतरलो. ९७२ नंबरची बस पकडून पूठकुलाँला गेलो. तिथं शहीद ओमप्रकाश (हेडकॉन्स्टेबल) कुणालाच माहिती नव्हते. मी हादरलोच. पण मी सायकलरिक्षानं सुलतानपुरी पोलिस ठाण्यात गेलो. तिथं कळलं, की हे पूठकुलाँ नाही, पूठ खुर्द गाव आहे म्हणून. मग तिथल्या पोलिसानं एक रिक्षा बघून दिली. त्यानं २० मिनिटांत पूठकुलाँला पोचवलं. १०० रुपये घेतले, पण वेळ वाचला हे महत्त्वाचं. 
 तिथं ओमप्रकाश यांचं घर लगेच सापडलं. त्यांचे म्हातारे आई-वडील भेटले. त्यांच्या पत्नी, मुलगा भेटले. भावाच्या घरी गेलो. मग साडेसातला आझादपूरची बस पकडली. तिथं आल्यावर गोल-गप्पे व एक बर्गर खाल्ला. गाजराचं ज्यूस प्यायलो. (हेच रात्रीचं जेवण) मग रिंग रोडची बस पकडली. जरा चुकलो. भलतीकडंच उतरलो. मग सफदरजंगची बस पकडून एम्सला उतरलो. तिथून सरळ रिक्षा करून आयएनएसला आलो. ७० रुपये घेतले. इथं आल्यावर चहा मागविला. मग लिहिलं. आता झोपतो.
---

शुक्रवार, २९ नोव्हेंबर २००२
--------------------------
सकाळी सहाला अटेंडंटनं फोन करून उठवलं. मग उठलो. तासाभरात आवरलं. सात वाजता रिक्षानं नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर आलो. कोसीकलाँचं तिकीट काढलं. पावणेआठला आग्रा पॅसेंजर आली. तिच्यात बसलो. ही गाडी अकराला कोसीकलाँ गावात पोचली. तिथून टप्पू’तून हरीपुरा गावात गेलो. गाव अगदी छोटं होतं. रस्त्यातच घनश्याम गुर्जर यांचा मोठ्ठा बंगला लागला. त्यांचा मुलगा बच्चूसिंह भेटला. घनश्याम यांची पत्नी भेटली. आता त्या बंगल्याशेजारीच घनश्याम यांच्या स्मारकाचं काम सुरू आहे. ते बच्चूसिंहनं दाखवलं. मग चहा घेऊन, फोटो वगैरे काढून तिथून निघालो. टप्पूच्या मागं लटकून कोसीत आलो. तिथं केळी घेतली पाच व खाल्ली. (हेच जेवण!) मग जीपमध्ये बसून पलवलला आलो. तिथून मंडीकौलाला जायचं होतं. एक बस आली. खच्चून भरली होती. शिवाय टपावरही लोक बसले होते. मग त्यात घुसलो. मध्ये तर ती बस पार तिरपी झाली होती. मग कंडक्टरनं वरच्या काही लोकांना खाली उतरवलं. पुढं एका फाट्यावर बस पंक्चर झाली. बरेच लोक खाली उतरले. मीही उतरलो. तेवढ्यात त्या (***) ड्रायव्हरनं लगेच गाडी पुढं ताबडली. मी भयंकर चरफडलो. खूप शिव्या घातल्या. पण इलाज नव्हता. मग जीपच्या साइडपट्टीवर लटकून १५ किलोमीटरवर असलेल्या मंडीकौला गावात गेलो. तिथून अकबरपूरला जायला व परत यायला रिक्षा ठरवली. (७० रु.) रामपाल यांच्या घरी पोचलो. त्यांचे भाऊ होते. त्यांच्याशी बोललो. 
तिथं समोरच रामपाल यांच्या स्मारकाचं व लायब्ररीचं काम सुरू आहे. त्याचे फोटो वगैरे काढले. मग निघालो. मंडीकौलात आल्यावर परत जीप पकडून पलवलला आलो. तिथं स्टँडवर गोल-गप्पे खाल्ले. चहा प्यायलो. मग यूपीची बस पकडून दिल्लीत आलो. बदरपूरजवळ ४६० नंबरची बस दिसली. मग एसटीतून उतरून या बसमध्ये बसलो. ही बस थेट आकाशवाणीला जाते. प्रत्यक्षात त्यानं आकाशवाणीला गाडी नेलीच नाही. जनपथला उतरवलं. तिथून रिक्षा करून आयएनएसला आलो. वर ऑफिसात गेलो. पुण्याला खांडेकरशी बोललो. नाईक नव्हते. मग बाहेर जाऊन नगर/जामखेडला फोन केले. जेवलो व परत रूमवर आलो.
----

शनिवार, ३० नोव्हेंबर २००२
---------------------------

सकाळी आठ वाजता उठलो. काल रात्री अर्धवट राहिलेला मजकूर लिहून पूर्ण केला. मग आवरलं. आंघोळ केली. यूएनआयच्या कँटीनला जाऊन ब्रेकफास्ट केला. (उपमा व कॉफी!) मग आकाशवाणीपासून रिक्षा पकडून 'अंतर्राज्यीय बस अड्डेपर’ गेलो. तिथं नीम का थाना’कडं जाणाऱ्या गाड्यांची राजस्थानच्या काउंटरवर चौकशी केली, तर तिथल्या माणसानं सराई काले खाँ बसस्थानकावरून या गाड्या सुटतात, असं सांगितलं. अकरा वाजून गेले होते. मी कपाळावर हात मारून घेतला. मग निमूटपणे दुसरी रिक्षा करून त्या स्टँडवर गेलो. तिथं पोचेपर्यंत १२ वाजले. तिथं सिकरची बस एक वाजता सुटत असल्याची माहिती मिळाली. मग बिस्किटं खा, चहा पी असा टाइमपास केला. मात्र, एक वाजता बरोबर गाडी निघाली. ‘नीम का थानाला जायला ९० रुपये तिकीट होतं. चार तास लागतील, असं कंडक्टर म्हणाला. प्रत्यक्षात दिल्लीतून ‘गुडगाँवाच्या दिशेनं बाहेर पडेपर्यंतच दोन वाजून गेले होते. त्यात मध्येच एका ढाब्यावर गाडी थांबली. संधी साधून मीही आलू दम’ व तीन गरमागरम रोट्या हाणल्या. नंतर ‘नीम का थानाला पोचेपर्यंत साडेसहा वाजले होते. मग रिक्षा करून जे. पी. यादव यांच्या घरी गेलो. माझ्या अपेक्षेपेक्षा पुष्कळ मोठ्ठं घर होतं त्यांचं. म्हणजे भरपूर नातेवाइक एकत्र राहत होते.
  जे. पीं.’चे आई-वडीलही होते. सुरुवातीला वडील कन्हैयालाल हेच माझ्याशी बोलले. ‘जे. पीं.’चा मेव्हणा राजेश यादव (मिसेस प्रेम यांचा भाऊ) हाही तिथंच राहतो. त्यानंही पुष्कळ माहिती दिली. जे. पीं.’ची मुलं अगदी छोटी. थोरला गौरव (पाच वर्षांचा) फारच गोंडस होता. धाकटी गरिमा तर अवघी पावणेदोन वर्षांची आहे. मला गलबलून आलं. जे. पीं.च्या पत्नीशीही नंतर बोललो. काय बोलणार खरं तर? अवघ्या तिशीच्या या मुलीवर काय प्रसंग आलाय! त्या आता शिक्षिका म्हणून काम करतात. तिथून परत दिल्लीला यायला नऊला बस होती. मला तर ते राहाच, म्हणत होते. पण मी नको म्हटलं. मग गरमागरम (संपूर्ण ‘घीत माखलेल्या) रोट्या व दाल आणि लोणचं, मिरची असं छान जेवण त्यांनी दिलं. राजेशनं बसमध्ये बसवून दिलं. पहाटे तीनला दिल्लीत आलो. रिक्षा करून आयएनएसला आलो.
---

रविवार, १ डिसेंबर २००२
------------------------

सकाळी जरा निवांत म्हणजे आठला उठलो. थोडा वेळ रंगोलीपाह्यली. पण सारखी झोप येत होती. शेवटी साडेनऊला उठलो. मग आवरलं. आंघोळ केली. दाढी केली. मग यूएनआयच्या कँटीनला जाऊन उपमा व चहा हा ब्रेकफास्ट करून आलो. त्यापूर्वी नाईकांच्या घरी फोन केला. कमलेशकुमारींच्या नवऱ्याचा पत्ता दुपारी एकला बागाईतकर ऑफिसात आल्यावर त्यांच्या मदतीनंच शोधता येईल, असं ते म्हणाले. मग नंतर कोपऱ्यावर जाऊन एचटीआणला. मग रूमवर येऊन तो वाचत बसलो. नंतर भटकंतीव ‘आपण यांना हसलात का?’ पाह्यलं. मग वर ऑफिसात गेलो. बागाईतकर लिफ्टमध्येच भेटले. त्यांनी हा पत्ता मिळविण्यासाठी काही फोन केले. पण रविवार असल्यानं संबंधित लोक भेटण्यात अडचणी येत होत्या. मग सव्वादोन वाजता बागाईतकर मला घेऊन प्रेस क्लबच्या रेस्टॉरंटमध्ये गेले. तिथं आम्ही जेवलो. परत ऑफिसला आल्यावर मी 'मल्याळम मनोरमा'च्या ऑफिसमध्ये अजय पणीकर आहे का, ते बघितलं. पण ते ऑफिस बंदच होतं. मग त्याच्या घरी फोन केला. पण तिथंही कुणी उचलला नाही. शेवटी मी चार वाजता नॅशनल म्युझियम पाहायला जायचं ठरवलं. मग रिक्षानं तिथं गेलो. दहा रुपये तिकीट होतं. म्युझियम पाचला बंद होणार होतं. म्हणून खूप घाई झाली. भराभर सगळं पाह्यलं. एवढं काही खास नव्हतं. तिथं गर्दी कमी का, हे त्यामुळं कळलं. येताना मग जनपथवरून चालतच आलो. ऑफिसात आल्यावर पुण्याला मानेला फोन केला. पेंढारकर साडेसातला आहे, असं त्यानं सांगितलं. मग पीटीआयमध्ये अभिजितला (जोशी) फोन केला. तो नव्हता. पण त्याचा मित्र सागर कुलकर्णी होता. त्याच्याकडं निरोप ठेवला. रात्री साडेआठपर्यंत बागाईतकरांनी परत बरेच फोन केले; पण अवधेशकुमारचा पत्ता काही मिळाला नाही. साडेआठला अभिजित आयएनएसमध्ये आला. मग आम्ही दोघं मीना रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवलो. परत आल्यावर ‘पीटीआय’मध्ये जाऊन शिल्पाला भेटलो. मला अवधेशकुमार यांचा पत्ता हवा असल्याचं तिलाही सांगितलं. तिनं प्रयत्न करते, असं सांगितलं. पण अद्यापपर्यंत तिचा फोन आलेला नाही. उद्या बहुतेक त्यांचा फक्त फोन नंबरच मिळेल, असं दिसतंय. उद्या पुण्याला निघायचंय ना!

---

सोमवार, २ डिसेंबर २००२
-------------------------

सकाळी साडेनऊला उठलो. आवरलं. आंघोळ केली. बॅग भरली. तेवढ्यात नाशिककरांचा फोन आला. मग वर गेलो. त्याआधी यूएनआयच्या कँटीनला जाऊन उपमा व चहा हा नेहमीचा ब्रेकफास्ट करून आलो. खाली आयएनएसच्या काउंटरला चेक आउट’ करीत असल्याची कल्पना दिली. बिल तयार करायला सांगितलं. वर गेल्यावर स्टार न्यूज’ पाहत असताना, दिल्लीत आज रिक्षा व टॅक्सीचा संप असल्याचं कळलं. नंतर वरून नाशिककरांचा फोन आल्यावर तिकडं गेलो. त्यांनी (बऱ्याच लटपटी-खटपटी करून, थेट रेल्वे मंत्रालयात जाऊन कुठल्याशा कोट्यातून) तिकीट कन्फर्म झाल्याचं सांगितलं. मग मला पुष्कळ रिलॅक्स वाटलं. बागाईतकरांनी पुण्याला त्यांच्या घरी द्यायला पार्सल ठेवलं होतं. ते घेतलं. मग खाली जाऊन बिल पाहून आलो. ५४४६ रुपये झाले होते. मग वर जाऊन बॅगा घेऊन ऑफिसमध्ये नेऊन ठेवल्या. नंतर खाली जाऊन पैसे भरून आलो. पावती घेतली. वर ऑफिसमध्ये येऊन बसलो. बागाईतकर पार्लमेंटमध्ये कमलेशकुमारी यांच्या नवऱ्याचा पत्ता कळला, तर ऑफिसमध्ये कळवणार होते. पण दीड वाजेपर्यंत त्यांचा फोन आला नाही. मग नाशिककरांनी प्रेसची प्रायव्हेट टॅक्सी बोलावली. निजामुद्दीन स्टेशनपर्यंत सोडायला तो दीडशे रुपये घेणार होता. पण इलाज नव्हता. मग नाईक आल्यावर त्यांचा निरोप घेऊन निघालो. टॅक्सी खाली येऊन थांबली होती. दोन वाजता निजामुद्दीन स्टेशनवर पोचलो. तिथल्या कँटीनला जाऊन जेवलो. अडीचला गाडी फलाटाला लागली. जागेवर जाऊन बसलो. नंतर तिथं एक फॅमिली आली. त्यातल्या मुलीची बर्थ पलीकडे वेगळी आली होती. मग आम्ही जागा बदलून घेतल्या. मी २१ नंबरच्या बर्थवर जाऊन बसलो. समोर एक वयस्कर गृहस्थ होते. ते शिलाँगला एअर फोर्समध्ये असतात. बेळगावला मुलीकडं चालले होते. नंतर मोगाच्या एका डॉक्टरची (तो दावणगिरीला पीजी करीत होता...) व दिल्लीतल्या एका भैय्याची (तो कंपनीच्या कामाला सांगलीला निघाला होता...) ओळख झाली. संध्याकाळी अबर-चबर खाणं झालं. रात्री 'रेल्वे कैटरिंग खानपान सेवा'च्या कृपेनं जेवलो. झाशी सोडल्यावर थोडा वेळ वाचून झोपलो.
---
----------------------