आचरटपणाची ‘नऊ’लाई
-------------------------------
-------------------------------
स्वतःवर हसण्यासाठी मनाचा दिलदारपणा, खेळकरपणा
आणि चांगली विनोदबुद्धी असावी लागते. साजिद खानकडं ती असावी, अशी शंका
घेण्यास वाव ठेवणारी काही अपवादात्मक दृश्यं ‘हमशकल्स’मध्ये आहेत. उदा. एका
दृश्यात वेड्यांच्या जेलचा जेलर सतीश शाह समोर बांधून ठेवलेल्या सैफ आणि
रितेशला सांगतो, की मी तुम्हाला जगातील सर्वांत भयानक टॉर्चर करणार आहे.
मागे हिटलरपासून सद्दाम, गडाफी ते किम जोंगपर्यंत सर्व ‘दुष्ट’ हुकूमशहांचे
फोटो आदर्श म्हणून लावलेले असतात. आणि अचानक समोर येतो एक टीव्ही. मग सतीश
शाह म्हणतो, की आता तुम्हाला पाहावा लागणार आहे साजिद खानचा
‘हिम्मतवाला’... आणि ते हात-पाय-तोंड बांधलेले दोन कैदी जिवाच्या आकांताने
सुटण्याची धडपड करू लागतात... यावर हाइट म्हणजे एंड स्क्रोलला हेच दृश्य
पुन्हा येतं आणि त्यात सतीश शाह म्हणतो, तुम्हाला पाहावा लागणार आहे
(साजिदची बहीण) फराह खानचा ‘तीसमार खान’...
अशा काही दृश्यांमुळे ‘हमशकल्स’ पाहताना नक्कीच
गंमत येते. किशोरकुमार, जिम केरी आणि पीटर सेलर्ससारख्या कॉमेडीतील महान
कलावंतांना हा सिनेमा अर्पण केला आहे, असं साजिद खान सुरुवातीला म्हणतो.
आपल्याला शहाणपण द्यायला देव विसरला आहे, हेही सुरुवातीलाच कबूल करतो.
(प्रेक्षकांनी ही गोष्टही गमतीने घ्यावी, अशीच त्याची स्वाभाविक इच्छा
असणार...) पण पुढे १६० मिनिटे ‘हमशकल्स’च्या नावाखाली तीन तीन जोड्यांचा
धुमाकूळ घालून साजिद खाननं केवळ प्रेक्षकांचाच नाही, तर सुरुवातीला नावं
घेतलेल्या सर्व महान कलावंतांचा घोर अपमानच केलेला आहे. त्यामुळं पुढच्या
सिनेमात त्याला ‘हिम्मतवाला’च्या जागी ‘हमशकल्स’चं नाव घालावं लागणार आहे,
यात शंका नाही.
मॅड कॉमेडी म्हणजे वेचक आणि वेधक पाचकळ विनोद,
छचोरपणा दर्शविणारे कायिक विक्षेप आणि जोडीला तर्कबुद्धी खुंटीला टांगून
ठेवायला लावणारे कथानक अशी काहीशी साजिद खानची समजूत झालेली दिसते. दोन
सारख्या दिसणाऱ्या जोड्या, त्यातील एक शहाणी, हिरो वगैरे आणि दुसरी वेडी,
सहानुभूती मिळवणारी... हे प्रकार आपण शेकडो वेळा पाहिले आहेत. त्यात
साजिदनं नावीन्य काय आणलं, तर आणखी एक जोडी पैदा केली. जोडीला खलनायकाचाही
तिहेरी रोल हवाच. त्यामुळं एकूण नऊ पात्रांच्या माध्यमातून विनोदाचा महापूर
आणून दाखवतो, अशी पैज त्यानं मारलेली दिसते. प्रत्यक्षात झालंय असं, की या
नऊ पात्रांनी आचरटपणाची एवढी चढाओढ लावली आहे, की या सर्व सर्कशीला फार तर
आचरटपणाची ‘नऊ’लाई असं म्हणता येईल. या आचरटपणाचं एकच उदाहरण दिलं तरी
पुरेसं आहे. यात सैफची कंपनी हडप करण्यासाठी त्याचा ‘कंस’मामा आपल्या एका
शास्त्रज्ञ मित्राला काही तरी करायला सांगतो. तर हा शहाणा डॉक्टर एक असं
औषध तयार करतो, की ते पाण्यात घालून प्यायल्यावर माणूस २४ तास कुत्रा
होतो...! पुन्हा ऐका, चक्क कुत्रा होतो!!
आता एवढं सांगितल्यावर साधारणतः या सिनेमातील
विनोदाची जातकुळी आणि एकूण पातळी लक्षात येईल. मॅड कॉमेडी म्हणजे
वेड्यासारखं हसू येईल अशी कॉमेडी! कथेतील पात्रं अनाहूतपणाने किंवा
प्रसंगवशात काही तरी चुकीचं (थोडक्यात वेड्यासारखं) करतात आणि त्यातून जो
काही गोंधळ उडतो अन् पाहणाऱ्याला मजा येते ती दाखवणारी कॉमेडी म्हणजे मॅड
कॉमेडी. मग त्यात विक्षेप आले, तरी ते पात्रांवर गुदरलेल्या प्रसंगामुळे
निर्माण झालेले असावेत. इथं मॅड कॉमेडी म्हणजे वेड्यासारखी किंवा खुद्द
वेड्यानं केलेली कॉमेडी असा काहीसा अर्थ दिग्दर्शकानं घेतलेला दिसतो.
त्यामुळं त्यानं या चक्क वेड लागलेली पात्रंच घेतली आहेत. अशा सिनेमांत
पुरुष पात्रांनी स्त्रियांचं सोंग घेऊन आचरट चाळे केलेच पाहिजेत... अशा
सिनेमांत ‘गे’सदृश पात्रं आणि त्यांच्या ओठांची ती विविक्षित हालचाल आणि
कंबर हलवणं असलंच पाहिजे, ना! नाही तर ‘फाउल’ धरला जाईल. तथाकथित ‘कुत्री’
झाल्यावर सैफ आणि रितेश जे काही करतात, त्याला विनोद म्हणायचं असेल, तर या
विनोदावर प्रेक्षकांनीही तंगडी वर केल्यास साजिदला राग येण्याचं कारण
नाही. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे कथेला प्रेक्षकांशी जोडणारा काही तरी
प्रयोजनात्मक धागा हवा की नको? प्रेक्षकांनी त्या गोष्टीत गुंतून
पडण्यासारखं काही तरी सत्त्व त्यात हवं ना! अगदी मॅड कॉमेडी झाली तरी ती
प्रयोजनानं युक्त असतेच. असावी. साजिदनं ज्या महान कलावंतांची नावं घेतली
आहेत त्यांच्या कलाकृतीतील हा सर्वांत महत्त्वाचा भाग तो विसरला. की
सोयिस्करपणे त्यानं तिकडं डोळेझाक केली?
माणसाच्या जगण्यात त्याच्या वागण्याच्या,
स्वभावाच्या विसंगती भरपूर आढळतात. सर्वांनाच कुठलं तरी एक लक्ष्य गाठायचं
असतं. त्या प्रवासात या विसंगतींमुळं कधी अडचणी निर्माण होतात आणि कधी
त्यातून हास्यनिर्मिती होते. असा विनोद टिपायचा तर मूलतः जगण्याकडं खूप
उदार, सहृदय दृष्टीनं पाहता यायला हवं. विसंगतींची संगती लावता यायला हवी.
ती सुसूत्रपणे कथेत गुंफता यायला हवी आणि या कथेला दर्जेदार विनोदाचं गोड
वेष्टण बांधून ती प्रेक्षकांसमोर सादर करता यायला हवी. हे काम निःसंशय सोपं
नाही. अनेकांना ते जमत नाही. पण मग किमान मोठमोठ्या लोकांची नावं तरी घेऊ
नयेत, एवढंच आमचं म्हणणं!
एका गोष्टीचं श्रेय मात्र साजिदला द्यावं
लागेल. त्यानं सिनेमाची एक विशिष्ट पातळी शेवटपर्यंत राखली आहे. तो वरही
जात नाही आणि (आणखी खाली जाता येत नाही, म्हणून) खालीही जात नाही! असो.
सैफ अली खान आणि रितेश देशमुख या दोघांनीही
आपापल्या परीनं भरपूर अंगमेहनत केली आहे. पण आपल्याला कॉमेडीचा कंटाळा आला
आहे, असं रितेशनंच कुठं तरी मुलाखतीत सांगितलं आहे. (एका अर्थाने प्रेक्षक
आणि तोही सुटला बिचारा!) मात्र, हा कंटाळा त्यानं पडद्यावर येऊ दिलेला
नाही. राम कपूर हे या सिनेमातलं सरप्राइझ पॅकेज आहे. रामनं तिन्ही भूमिका
ज्या पद्धतीनं साकारल्या आहेत, त्याला तोड नाही. विशेषतः शिंक आली की
समोरच्या माणसावर हल्ला करणारा आणि लॉलीपॉप दिला, की शांत होणारा वेडा जॉनी
त्यानं अफलातून रंगवला आहे. हेच पात्र सर्वाधिक हशे वसूल करतं. बिपाशा
बसू, तमन्ना आणि ईशा गुप्ता यांना नायकांच्या जोडीनं वावरण्याचं आणि भरपूर
अंगप्रत्यंगदर्शनाचं काम आहे. ते तिघींनीही चोख बजावलं आहे. विशेषतः
तिघींमधली ‘ज्येष्ठ महिला’ बिपाशाच सर्वांत हॉट दिसते. पण तिची रितेशबरोबर
जोडी काही तरीच! असो.
तेव्हा लाल फ्रॉकमधल्या आणि ‘९६, ८४, ९६’ असे
व्हायटल स्टॅट्स असलेल्या राम कपूरचा दुसऱ्या (पुरुष) राम कपूरबरोबरचा
रोमान्स (विनोद म्हणूनसुद्धा) आवडत असेल, तर ‘हमशकल्स’ फक्त तुमच्यासाठीच
तयार झाला आहे, असं समजून बिनधास्त जा...
--
निर्माते : वाशू भगनानी
दिग्दर्शक : साजिद खान
संगीत : साजिद अली-वाजिद अली, हिमेश रेशमिया
प्रमुख भूमिका : सैफ अली खान, रितेश देशमुख, राम कपूर, बिपाशा बसू, तमन्ना, ईशा गुप्ता, सतीश शाह, चंकी पांडे
दर्जा : **
---
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, २१ जून २०१४)
---