26 Feb 2016

फिल्म रिव्ह्यू - नीरजा

नीरजा, तुला सलाम...
--------------------------


कराची विमानतळावर अपहरण केलेल्या विमानातील क्रूर दहशतवाद्यांचा अत्यंत शौर्याने सामना करून, हौतात्म्य पत्करणाऱ्या नीरजा भानोत या हवाईसुंदरीची प्रेरणादायी कथा नीरजा या नव्या हिंदी सिनेमातून दिग्दर्शक राम माधवानीनं आपल्यासमोर आणली आहे. मूळ घडलेल्या प्रसंगांतच एवढं नाट्य भरलेलं आहे, की ते सगळं पाहताना आपण त्यात गुंतून गेल्याशिवाय राहत नाही. अवघ्या २३ वर्षांच्या या मुलीनं कुठून एवढं धैर्य आणलं असेल? कुठून ती हे सगळं शिकली असेल? चित्रपटाच्या शेवटी नीरजाची आई भाषण करताना तिलाही हे प्रश्न पडल्याचं सांगते, तेव्हा आपल्यालाही भरून येतं.
पाच डिसेंबर १९८६ च्या त्या काळ्या दिवशी हा सगळा प्रकार घडला. मी तेव्हा अकरा वर्षांचा होतो. मला पेपरमध्ये आलेल्या याबाबतच्या बातम्या थोड्याफार आठवतात. एकूणच तो काळ भारतासाठी संघर्षाचाच होता. इंदिरा गांधींची हत्या होऊन दोन वर्षं लोटली होती, राजीव गांधी पाशवी बहुमत घेऊन सत्तेत आले होते, त्यांची मि. क्लीनची इमेज अजून शाबूत होती, पाकिस्तानात जनरल झिया उल हक सत्तेत होते, शारजात मियाँदादनं मारलेला षटकार काट्यासारखा भारतीयांच्या मनात रुतून बसला होता, लव्ह ८६ नावाच्या सिनेमातून गोविंदा नामक नाचरा नट पडद्यावर दाखल झाला होता, गावसकर अजून भारतीय संघात खेळत होता, सचिन तेंडुलकर हे नाव फारसं कुणाला माहिती नव्हतं, हिंदी सिनेमात अमिताभनं निवृत्ती पत्करल्यासारखी झाली होती आणि नव्या सुपरस्टारचा जन्म व्हायचा होता, शरद पवार समाजवादी काँग्रेसचा संसार गुंडाळून पुन्हा काँग्रेसवासी झाले होते आणि पुलं, कुसुमाग्रज ही मंडळी सार्वजनिक जीवनात अद्याप कार्यरत होती... दूरदर्शन या एकमेव चॅनेलवर यह जो है जिंदगी आणि नुक्कडसारख्या मालिका लोकप्रिय होत्या, (रामायण अद्याप पडद्यावर यायचं होतं...), पाँड्स, गोल्डस्पॉट, लक्स, विमल वॉशिंग पावडर आणि निरमा ही आणि असलीच उत्पादनं जोरात होती. व्हीसीआरचा आणि कॅसेटचा तो जमाना होता...
हे सगळं एवढ्या तपशिलानं सांगायचं कारण म्हणजे जागतिकीकरणपूर्व काळातला तो भारत आणि तेव्हाच्या या गोष्टी काळ वेगानं पुढं गेल्यानं आता पाषाणयुगातल्या गोष्टी वाटू लागल्या आहेत. मात्र, तत्कालीन भारतीय समाजमनाचा अभ्यास केल्याखेरीज नीरजाच्या अतुलनीय धैर्यामागची प्रेरणा आणि त्याचं महत्त्व कळणं अवघड आहे. १९६३ मध्ये जन्मलेल्या नीरजाचा लाडका हिरो राजेश खन्ना असावा, यात काही नवल नव्हतं. भानोत कुटुंबातली ही लाडकी लेक म्हणून तिला सर्व जण लाडो म्हणत हे आपल्याला सुरुवातीच्या संवादांतून कळतं. दिसायला सुंदर असलेल्या लाडोनं आई-वडिलांच्या, विशेषतः वडिलांच्या पाठिंब्यावर मॉडेलिंग क्षेत्रात काम केलं होतं. ही बाब तेव्हाच्या मुलींसाठी खरोखर दुर्मिळ होती. नीरजाचं एक अपयशी लग्नही यात दिसतं. दोहासारख्या ठिकाणी टिपिकल नवरा मेंटॅलिटीच्या माणसाबरोबर तिनं काढलेले भयावह दिवसही यात फ्लॅशबॅकमध्ये दिसतात. यातून नीरजाचं व्यक्तिमत्त्व, तेव्हाचा समाज आणि तिच्या कुटुंबीयांची वेगळी जडणघडण कळायला मदत होते. नीरजानं पुढं आकस्मिक समोर ठाकलेल्या संकटाला कशाच्या जीवावर तोंड दिलं याचं थोडं फार आकलन यातून होतं.
नीरजा लग्न मोडून घरी परत आलेली आहे आणि आता ती पॅन अॅम या अमेरिकी कंपनीत एअर होस्टेस म्हणून काम करतेय. तिला हे काम मनापासून आवडतंय. पाच डिसेंबरच्या रात्री निघणाऱ्या मुंबई न्यूयॉर्क व्हाया कराची, फ्रँकफर्ट या विमानात ती प्रथमच हेड पर्सर असणार असते. म्हणून अगदी उत्साहात आदल्या रात्रीची एक पार्टी आटोपून ती मस्त झोपलेली असते. तिचा जुना मित्र तिला एअरपोर्टला सोडायला येतो. एकीकडं हा घटनाक्रम दिसत असतानाच दुसरीकडं कराचीत काही लोकांच्या गुप्त कटासारख्या हालचाली सुरू असलेल्या दिसतात. हे लोक पाकिस्तानी दिसत नाहीत, हेही त्यांच्या भाषेवरून कळतं. एकीकडं नीरजाची तयारी सुरू असते आणि दुसरीकडं त्या दहशतवाद्यांची अपहरणाची तयारी सुरू असते. हे दहशतवादी पॅलेस्टिनी असतात आणि अमेरिकेला धडा शिकवण्यासाठी त्यांच्या देशाच्या कंपनीचं विमान पळवून, त्यांच्या काही साथीदारांची सुटका करवून घ्यायची असा त्यांचा डाव असतो, हे नंतर कळतं.
दिग्दर्शकानं हा सर्व घटनाक्रम अत्यंत इंटेन्स, तीव्रतम पद्धतीनं घेतला आहे. त्यातली ऑथेंटिसिटी जपली आहे. नीरजा आणि तिच्या मित्राचा मुंबईतल्या रस्त्यावरचा एक प्रसंग मध्ये येतो. यात नीरजाचं वधूवेषातील एक पोस्टर (मॉडेल म्हणून) रस्त्यावर झळकलेलं असतं आणि आपली आठवण आली, तर कधीही इथं येऊन उभा राहा, असं ती त्या मित्राला सांगते. पुढं ती विमानतळावर पोचल्यावर पुढच्या सर्व गोष्टी झटपट होतात. नीरजा पहिल्यांदाच हेड पर्सर म्हणून काम करणार असल्यानं अत्यंत उत्साहात असते. प्रवाशांचं हसतमुखानं स्वागत करते. परदेशी पायलट्सना ओळख करून देते. त्यातला एक पायलट हिंदी शिकत असतो आणि मोडक्यातोडक्या हिंदीतून प्रवाशांशी संवाद साधत असतो. हे सर्व नॉर्मल, हसतं-खेळतं वातावरण दाखवून दिग्दर्शकानं पुढं घडणाऱ्या भयावह घटनांसाठी चांगलं नेपथ्य तयार केलं आहे. तिकडं दहशतवादीही विमानतळावरील कर्मचाऱ्यांसारखा वेष करून विमानतळावर व्हॅनमधून घुसतात. सव्वा तासानंतर बरोबर पावणेसहा वाजता नीरजाची फ्लाइट कराची विमानतळावर उतरते. विमान उतरल्यानंतर पाच मिनिटांतच दहशतवादी विमानात घुसतात.
इथून सिनेमातील खरा थरार सुरू होतो. या दहशतवाद्यांपैकी खलील हा एक भडक माथ्याचा असतो. नीरजा सर्वांत आधी पायलट्सना मेसेज करून तिथून पळून जायला मदत करते. त्यानंतर ती अत्यंत प्रसंगावधान दाखवून, कमालीचं धैर्य दाखवून सर्व परिस्थिती हाताळते. दहशतवाद्यांना ती अनेकदा वेडं बनवते. हे सर्व प्रसंग मुळातूनच पाहण्यासारखे आहेत. त्या प्रवाशांत कराची विमानतळावर चढलेला एक रेडिओ इंजिनीअर असतो. त्याच्याबाबतचे सर्वच प्रसंग उत्तम जमलेले आहेत. दहशतवाद्यांची क्रूर वागणूक, प्रवाशांतील लहान मुले, एक गर्भवती स्त्री, एक वृद्धा, परदेशी नागरिक यांची भेदरून गेलेली अवस्था, नीरजाच्या सहकारी हवाई सुंदरींची झालेली करुण अवस्था हे सगळं दिग्दर्शक एकापाठोपाठ एक दाखवत राहतो. नीरजाच्या पूर्वायुष्यात घडलेल्या कठीण प्रसंगांची सांगड आत्ताच्या स्थितीशी घालून, ती आता का एवढी धैर्यानं वागते आहे, याचं उत्तर देण्याचा प्रयत्न दिग्दर्शकानं केलेला जाणवतो.
इथून पुढं सिनेमा संपेपर्यंत प्रत्येक फ्रेम खिळवून ठेवणारी झाली आहे. शेवट अतिशय करुण आहे. तो पाहताना कुठल्याही संवेदनशील माणसाच्या डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहणार नाही. शबाना आझमी यांनी नीरजाच्या मृत्यूनंतर वर्षभरानं, म्हणजे तिच्या २४ व्या वाढदिवशी केलेलं भाषणही अतिशय भावपूर्ण. शबाना आझमी यांच्या अभिनय दर्जाविषयी सांगायला नको. त्यांनी ज्या सहज पद्धतीनं नीरजाची आई होणं साकारलंय ते पाहण्यासारखं आहे. सोनम कपूरचंही कौतुक करायला हवं. तिनं नीरजाची भूमिका अगदी समरसून केलीय. आई-वडिलांची लाडकी लाडो, परदेशात नवऱ्याचा छळ निमूट सोसणारी नववधू ते पाश्चात्य शर्ट-स्कर्ट आणि बॉब केलेले केस अशा वेषभूषेत अत्यंत आत्मविश्वासानं नव्या आयुष्याला सुरुवात करणारी आणि ते करता करता प्रवाशांच्या सेवेसाठी स्वतःच्या प्राणांचंही बलिदान देणारी नीरजा तिनं फारच कन्व्हिन्सिंगली उभी केली आहे.
सिनेमाच्या शेवटी एंड स्क्रोलला येणारी खऱ्या नीरजाची छायाचित्रं पाहताना मन हेलावून जातं. जागतिकीकरणानंतर भारत बदलला. इथली तरुण पिढीही बदलली. सचिन तेंडुलकरच्या रूपानं भारताला नवा आत्मविश्वास लाभला. जगाच्या व्यासपीठावर भारत ताठ मानेनं आता वावरतो आहे. पण हे काही नसतानाच्या भारतात हेच सगळे गुण घेऊन वावरणारी एक तरुण मुलगी होती, हे नीरजानं दाखवून दिलं. त्या काळातल्या तरुण पिढीच्या या कर्तृत्वाची दखल आता पडद्यावर कायमची चित्रबद्ध झाली आहे. नीरजा, तू अनसंग हिरो नव्हतीसच. आताही कधी नसशील. कारण तू आता आमच्या मनातही अजरामर झाली आहेस. तुला आणि तुझ्या त्या सर्व पिढीलाही सलाम!

दर्जा - साडेतीन स्टार
---

16 Feb 2016

थप्पड नं. १

थप्पड नं. १ 
--------------


गोविंदा हा एके काळी अत्यंत लोकप्रिय असलेला अभिनेता. त्याच्या अनेक चित्रपटांची नावं हिरो नं. १, कुली नं. १ वगैरे अशी होती. आता परवा त्याच्याबाबत घडलेल्या प्रसंगाला त्यामुळं ‘थप्पड नं. १’ हे नाव छान शोभून दिसेल. गोविंदानं एका चाहत्याला मारलेल्या थपडीमुळं हा सारा प्रकार घडला; पण ती ही ‘थप्पड नं. १’ नव्हे! या प्रकरणात त्याला सुप्रीम कोर्टाकडून परवा जी बसली आहे, तिला खरी ‘थप्पड नं. १’ म्हणता येईल. संतापाच्या भरात चाहत्याच्या श्रीमुखात भडकावणाऱ्या गोविंदाला कोर्टाने त्याची वैयक्तिक माफी मागायला सांगितली आहे. या प्रकरणात गोविंदाने भरपाई म्हणून पाच लाख रुपये देऊ केले आहेत. या सर्वच प्रकरणात गोविंदाचं हसं झालं आहे आणि सुप्रीम कोर्टापर्यंत आत्मसन्मानाची लढाई नेणाऱ्या संतोष राय या चाहत्याचं कौतुक होत आहे. या प्रकरणामुळं तरी आपल्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांशी कसं वागावं याचे धडे सेलिब्रिटी मंडळी घेतील, अशी आशा आहे.
आपल्या देशात सर्वसामान्य जनतेचं सिनेमा नट-नट्यांविषयी असलेलं प्रेम काही नवं नाही; पण आपल्या देशात असलेली टोकाची आर्थिक विषमता, त्यातून येणारं उच्च वर्तुळात वावणाऱ्या आणि सार्वजनिक जीवनात नावाजलेल्या लोकांविषयीचं सुप्त आकर्षण, व्यक्तिपूजेचं अवास्तव माजवलेलं स्तोम आणि कुठल्याही व्यक्तीच्या आत्मसन्मानाविषयी असलेला अनादर किंवा त्याविषयीची संपूर्ण अनभिज्ञता यामुळं अनेकदा हे संबंध ताणले जातात किंवा त्यात काही तरी बिघाड होऊन बसतो. गोविंदाचं प्रकरण असंच आहे. ही घटना आहे २००८मधली. गोविंदा महाशय तेव्हा उत्तर मुंबईचे खासदार होते. फावल्या वेळेत ते सिनेमेही करीत असत. अशाच एका ‘मनी है तो हनी है’ नामक (गोविंदालाच शोभेल अशा) सिनेमाचं चित्रिकरण मुंबईच्या फिल्मिस्तान स्टुडिओत सुरू होतं. तिथं या संतोष राय नामक माणसाबरोबर त्याची काही तरी बाचाबाची झाली. त्यातून गोविंदानं आपली प्रतिमा, एकूण प्रतिष्ठा, खासदारपदाचा आब वगैरे सगळं विसरून त्या संतोष रायच्या श्रीमुखात भडकावली. तेव्हा तिथं वृत्तवाहिन्यांचे कॅमेरे होते आणि त्यांनी हा प्रकार थेट टिपला असल्यामुळं त्याच्या सत्यतेविषयी काही शंका नाही. किंबहुना गोविंदाच्या वकिलांनी कोर्टात हा व्हिडिओ बनावट असल्याचा दावा केला, तेव्हा ते फूटेज वृत्तवाहिन्यांनी घेतलेलं असल्यानं ते चुकीचं असणार नाही, असं सांगून कोर्टानं त्यांना फटकारलं. एरवी दुसरा कुणी माणूस असता, तर तो गुपचूप गाल चोळत निघून गेला असता; पण गोविंदाभाऊंच्या दुर्दैवानं संतोष राय हा माणूस लढणारा निघाला. त्यानं या प्रकरणात थेट कोर्टात धाव घेतली आणि सुप्रीम कोर्टापर्यंत केस लढविली. वास्तविक, एखादा उमदा माणूस असता, तर त्यानं राग शांत झाल्यावर तिथल्या तिथं त्या माणसाच्या खांद्यावर हात टाकून विषय मिटवला असता. तो माणूसही त्या कलाकाराच्या या वर्तणुकीबद्दलचा राग विसरून गेला असता; मात्र गोविंदा काय किंवा त्याच्यासारखे अन्य सेलिब्रिटी काय, यांचा ‘अहं’ (इगो) सामान्य माणसाच्या आत्मसन्मानापेक्षा मोठा असतो. त्यामुळं गोविंदानंही ही कायदेशीर लढाई प्रतिष्ठेची करून सुप्रीम कोर्टापर्यंत दाद मागितली. अनेक वाट्टेल तसे खोटे दावे केले. संतोष राय हा त्या सेटवर कुणा नवोदित अभिनेत्रीशी गैरवर्तन करीत होता, येथपासून तो थप्पड मारल्याचा व्हिडिओ खोटा आहे, इथपर्यंत अनेक वकिली कारणं त्यानं सादर केली; मात्र त्याचा एकही दावा टिकला नाही. अखेर गोविंदानं पाच लाख रुपये भरपाई आणि विनाशर्त माफीचा प्रस्ताव ठेवला - तोही कोर्टासमोर. तेव्हा सुप्रीम कोर्टानं गोविंदाच्या वकिलांना खडसावून सांगितलं, की आमच्यापाशी माफी मागू नका. त्या माणसाकडे जा आणि त्याची माफी मागा. 
कोर्टाला एवढा थेट आदेश देण्याची वेळ यावी, हा केवढा या उन्मत्त कलाकाराचा मस्तवालपणा! एवढे झाल्यावरही गोविंदाचे वकील कोर्टाला म्हणतात, ‘आमच्या अशिलाचा गैरसमज झाला आणि लेखी माफी पुरेशी आहे, असे आम्हाला वाटले.’ आता काय म्हणावे याला? संतोष राय हा खमक्या माणूस होता म्हणून आणि त्यानं सुप्रीम कोर्टात दहा लाख रुपयांहून अधिक पैसे खर्च केले म्हणून तरी एवढं झालं! एरवी सामान्य माणसाला विचारतो कोण?
गोविंदाच नव्हे, तर अनेक सेलिब्रिटींचं वागणं वाह्यात आणि विचित्र असतं; (सगळेच तसे नसतात. अपवाद असतात, हेही खरं.) पण बहुतांश सेलिब्रिटींच्या डोक्यात हवा गेलेली असते आणि आपण सामान्य माणसांपेक्षा कुणी तरी वेगळे आहोत, असं त्यांना वाटू लागतं. भारतात जेव्हा मोठ्या पडद्यावरचा सिनेमा हीच एक सर्वांत मोठी करमणूक होती, तेव्हाच्या सुपरस्टार मंडळींचे किस्से आपल्याला माहिती आहेत. शम्मी कपूरनं एकदा एका नवोदित अभिनेत्रीचा गुडघा आपल्या बुटाच्या सोलनं लाथा मारून मारून (आणि हे गमती-गमतीत म्हणे) कसा रक्तबंबाळ केला होता, याचा किस्सा शिरीष कणेकर त्यांच्या कार्यक्रमात सांगायचे. बाकीचेही पुष्कळ किस्से आहेत. ते सगळेच जाहीरपणे सांगण्यासारखे नाहीत. काही तरी अत्रंगीपणा केल्याशिवाय आपल्याला सेलिब्रिटी म्हणणार नाहीत किंवा सामान्य माणसापेक्षा आपण वेगळे कुणी तरी आहोत, हे आपणच विचित्र वागून सिद्ध केलं पाहिजे, हीच त्यांची त्यामागची भावना असावी.
आपल्याकडे काही सन्माननीय अपवाद वगळले, तर प्रेक्षकांशी एक माणूस म्हणून वागणारे मोठे कलावंत फार थोडे. आपल्या चाहत्यांचा अपमान करायला प्रत्येक वेळा त्यांना थप्पडच मारायची घटना घडावी लागते, असे नाही. अन्य कित्येक वेळा चाहत्यांचा कळत-नकळत अपमान या सेलिब्रिटींकडून होत असतो. काही जण प्रेक्षकांना रंगमंचावरून दम देतात, काही जण सह्या मागायला आलेल्यांवर ओरडतात, त्यांच्या वह्या भिरकावतात, काही जण प्रेस कॉन्फरन्समध्ये दादागिरी करतात, काही जण उपस्थितांचीच लायकी काढतात. एका मोठ्या दिग्दर्शकाच्या ‘कौटुंबिक’ प्रेस कॉन्फरन्सला जातानाच बहुतेकांची खात्री असते, की आज आपलीच शाळा होणार आहे! कारण कुठलाही मुद्दा काढला, तरी यांचे म्हणणे एकच असते - आमचे बरोबर आहे; तुम्हाला काही कळत नाही.
याउलट अमिताभसारख्या लोकप्रियतेच्या बाबतीत वर्षानुवर्षे सर्वोच्च स्थानी असलेल्या माणसाचं वागणं किती तरी सुसंस्कृत आणि साध्या माणसालाही सुखावणारं असतं. मराठी चित्रपट किंवा नाट्यसृष्टीतले कित्येक कलाकारसुद्धा आपले पाय जमिनीवर ठेवून आहेत आणि त्यांचं ते तसं असणंच त्यांच्याविषयीचा आदर आणखी वाढविणारं असतं; मात्र गोविंदासारख्या उटपटांग नटासारखे किती तरी वाह्यात सेलिब्रिटी सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतरच सरळ होणार असतील, तर त्यांनी यापुढं अशा थपडा खाण्यासाठी सज्जच राहावं हे बरं. याचं साधं कारण म्हणजे आपल्या देशात आता सामान्य माणसाला या कलाकारांविषयी आकर्षण असलं, तरी ते आता आपल्या स्वतःच्या प्रतिष्ठेविषयीही तेवढेच जागरूक झाले आहेत. त्यांचा येता-जाता अपमान करता येणार नाही. ‘थप्पड नं. १’चा हाच धडा आहे.
---
(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, पुणे, १६ फेब्रुवारी २०१६)
---

2 Feb 2016

मुंबई ट्रिप ट्रॅव्हलॉग

पुणे-मुंबई-पुणे
---------------


मुंबईला जाणं फार क्वचित होतं. माझं कुणीही जवळचं नातेवाइक तिथं नाही. अन्य काही फार कामं असतात, असंही नाही. पण तरी जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा मला मुंबईला जायला आवडतं. मी या शहराच्या प्रेमात आहे. जगातले लाखो लोक या शहराच्या प्रेमात आहेत, तसंच! मी कुणी वेगळा नाही. तरी प्रत्येक अनुभव हा खास आपला असतो आणि तो शेअर करायला मला आवडतं, म्हणूनच हा मुंबईवरचा खास ब्लॉग लिहावासा वाटतोय.
या वेळचं निमित्त माझ्या मामेभावामुळं घडलं. ओंकार देशपांडे हे त्याचं नाव. हा माझा सख्खा व एकमेव मामेभाऊ. तो माझ्यापेक्षा बराच, म्हणजे १४ वर्षांनी लहान आहे. पण जेव्हा तुम्ही ४० आणि २६ वर्षांचे असता, तेव्हा मित्रच जास्त असता. तर ओंकार आता माझा मित्रच आहे, असं म्हणायला हरकत नाही. तो आयटीत आहे. गेली दोन वर्षं तो मुंबईत नोकरी करतोय. अर्थातच सिंगल आहे. तो कित्येक दिवस मला मुंबईत बोलवत होता. मुंबईत मनसोक्त फिरायचं माझं स्वप्न त्याला माहिती होतं. म्हणून तो कायमच मला बोलवायचा. अखेर नुकतीच त्याची पुण्याला बदली झाली. तो आता फक्त पंधरा दिवस मुंबईत असणार होता. तेव्हा मात्र मी ३० जानेवारीच्या शनिवारी मुंबईत जायचं निश्चित केलं. माझं एक किरकोळ कामही होतं प्रभादेवीला. पण ते अगदी मस्ट होतं असंही नाही. पण या दोन गोष्टींमुळं मी उचल खाल्ली आणि शनिवारी एक दिवस मुंबईला जायचं ठरवलं. माझी बायको (आणि मुलगा) तिच्या मैत्रिणींबरोबर गेट-टुगेदर करण्यासाठी याच दिवशी साताऱ्यात जाणार होती. त्यामुळं तर माझा निश्चय पक्काच झाला.
मुंबईला जायचं तर ट्रेननं जायला मला आवडतं. ट्रेनचं ऑनलाइन बुकिंग करणं, त्यासाठी रजिस्ट्रेशन करणं या साध्या साध्या गोष्टी मी भयंकर कंटाळ्यामुळं आजतागायत केलेल्या नाहीत. त्यामुळं मित्रवर्य अभिजित पेंढारकरला साकडं घातलं. त्यानं दोन मिनिटांत माझं प्रगती एक्स्प्रेसचं ऑनलाइन तिकीट काढून टाकलं. (प्रगती का, तर सव्वासातची डेक्कन क्वीन गाठायची, म्हणजे वारज्याहून पावणेसातला निघावं लागतं. थंडीत हे व्याप फार होतात.) बुधवारी तिकीट काढलं, तेव्हा ते वेटिंग ५९ होतं. मात्र, शुक्रवारी रात्री आठ वाजता ते कन्फर्म झालं आणि मी हुश्श केलं. सकाळी बाइक घेऊन निघालो. गाडीत पेट्रोल कमी होतं. पण उशीर होईल असं वाटल्यानं मी तशीच गाडी दामटली आणि स्टेशनच्या पार्किंगमध्ये लावून टाकली. पुण्यात रात्री-बेरात्री परत आल्यावर रिक्षावाल्यांचा जाच सहनशक्तीच्या पलीकडे असतो. त्यामुळं स्वतःची बाइक नेणं हा फारच सोयिस्कर पर्याय असतो. त्या पार्किंगचे ५० रुपये गेलेले लय वेळा परवडतात. तर मी बरोबर ७.४० वाजता स्टेशनात होतो. प्रगती एक्स्प्रेस एक नंबरच्याच प्लॅटफॉर्मला थांबेल, अशी माझी अपेक्षा होती. (आणि ती काही चुकीची म्हणता येत नाही.) पण डेक्कन क्वीनचा मान प्रगतीला नसतो, हे माझ्या लगेच लक्षात आलं. तिथं जो डिस्प्ले होता, ज्यावर गाड्या आणि प्लॅटफॉर्म नंबर दिलेले असतात, तिथं प्रगती एक्स्प्रेसचं नाव होतं पण समोर प्लॅटफॉर्मच्या जागी डॅश होता. माझं डोकंच हललं. तेवढ्यात एका माणसानं सांगितलं, की प्रगती पाच नंबरच्या प्लॅटफॉर्मला आहे. मग अक्षरशः पळत गेलो. आपण ज्या जिन्यानं उतरतो त्याच्या विरुद्ध बाजूला नेहमी आपला डबा असतो, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. त्यामुळं मग पुन्हा उलटा चालत डी-६ या माझ्या डब्यात घुसलो.
शनिवार असला, तरी (की त्यामुळेच?) गाडीला 'य' गर्दी होती. मी माझ्या जागेवर बसलो. तीन सीटची ही बाकडी रेल्वेनं एवढी लहान काढली आहेत, की जरा ते बाकडं रुंदीला जास्त असेल, तर तिथं चौथा माणूस बसेल अशी भीती त्यांना वाटत असावी. त्यामुळं तिसऱ्या सीटवर बसणारा जवळपास प्रत्येक माणूस 'सरका जरा' हे वाक्य बोलूनच तिथं बसत होता. अनेक जण तर काटकोनात फिरून मधल्या जागेकडं पाय करून बसतात. माझ्या पलीकडं बसलेले एक सत्तरीतले आजोबा आणि पासष्टीतल्या आजी होत्या. (ते कन्नड की तेलगू भाषिक होते, हे नंतर कळलं.) त्यांच्याकडं 'टाइम्स ऑफ इंडिया' होता. कर्जतनंतर तो माझ्याकडंच असणार आहे, हे मी मनाशी पक्कं बोलून ठेवलं. प्रवास सुरू झाला, की माझा कॅमेरा सुरू होतो. आजूबाजूच्या लोकांकडं पाहणं (म्हणजे त्यांचं निरीक्षण करणं) हा माझा छंद. माझं एक निरीक्षण असं, की मुंबईला जाताना तुमच्या डब्यात एक तरी बुरखाधारी मुस्लिम महिला आणि कुटुंब असतंच. याही वेळी ते होतंच. उलट संख्या जास्तच होती. माझ्या शेजारी मधल्या पॅसेजमध्ये एक राजस्थानी मुलगा आणि दुसरा एक त्याचा मित्र असे उभे होते. ते अखंड बडबडत होते. तो मुलगा मला डिसेंट वाटला. काही तरी उद्योगधंदा शोधण्यासाठी मुंबईला निघाला असावा, असं वाटत होतं. माझे शेजारी आजोबा रिझर्व्ह कॅटॅगरीतले होते. माझ्याशी सोडाच, पण ते एकमेकांशीही फारच क्वचित बोलत होते. तासाभरानंतर गाडीत नाश्ता-नाश्ता, चाय-कॉफीच्या आरोळ्या सुरू झाल्या, तसं आजोबांनी पार्सल आणलेलं चीज सँडविच काढलं. म्हणजे दोन सँडविच होते. एक आपल्या पत्नीला देऊन दुसरं त्यांनी खाल्लं. अगदी शिस्तीत. मी 'इटली-वडा-चटणीय्ये'ची वाट पाहत होतो. (या लोकांमध्ये काही जण इडलीला इटली म्हणतात; तर जे इडली असं म्हणतात, ते मेदूवड्याला मेंदूवडा म्हणतात. दोन्हींचा बरोबर उच्चार केल्यास त्यांचा परवाना रद्द होतो!) मी ज्याच्याकडून घेतली, तो 'इटली'वाला होता. मी दोन्ही मिक्स मागितलं, तर त्यानं तीन 'इटल्या' आणि एक 'मेदूवडा' दिला. हे कॉम्बिनेशन त्यानंच ठरवलं. द्रोणात हे चार पदार्थ टाकून त्यावर बऱ्यापैकी चटणीची आंघोळ घालून तो निघूनसुद्धा गेला. हे खाणं झाल्यावर मग कॉफी हवीच होती. (कारण इथं येणारा चहा डिपवाला होता. तो मला आवडत नाही.) कॉफीपान झाल्यावर आणि गाडी घाट उतरायला लागल्यावर मग एकूणच जरा डब्यात स्थैर्य आलं. व्हॉट्सअपवर माझा व पेंढारकरचा संवाद चालू होता. त्यामुळं पनवेलला गाडी पोचली तेव्हा ती लेट आहे हे कळलं. प्रगतीची ही अधोगती नक्की कुठं झाली, ते मला आठवेना. कारण गाडी निघाली, तेव्हा अगदी वेळेत होती. शिवाय मध्ये घाटात एक-दोन मिनिटं उभी असेल, तेवढंच. मला काही घाई नव्हती हे खरंच. पण गाडी दादरला पोचायच्या वेळेत ठाण्यातच उभी होती. ओंकार दादरला येऊन थांबला होता. दिवा स्टेशनापासून पुढं लोकल दिसायला लागतात. लोकलच्या दारात लटकून मुंबईकर निघालेले असतात. लोकल आणि एक्स्प्रेसची शर्यत सुरू असते. दोन्हीकडचे लोक अगम्य अशा नजरांनी एकमेकांकडं पाहत असतात. हे दृश्य पाहायला मला फार आवडतं. (बाय द वे, माझ्या शेजारचे आजी-आजोबा ठाण्याला उतरल्यामुळं मला विंडो सीट मिळाली होती.) अखेर १०.५४ ची वेळ टळून अर्धा तास झाल्यानंतर प्रगती साडेअकराला दादरला पोचली. ओंकार भेटला. आम्हाला आधी प्रभादेवीला जायचं होतं. आज फक्त बस आणि लोकलनंच फिरायचं हे मी ओंकारला सांगितलं होतं. त्यामुळं लगेच दादर ईस्टकडून वेस्टला आलो आणि केशवसुत उड्डाणपूल ओलांडून आम्ही कबुतरखान्याला आलो. गोखले रोड होता बहुतेक. तिथून प्रभादेवीची बस पकडली. मुंबईची बेस्ट नावाची ही जी काही बससेवा आहे, ती फारच बेस्ट आहे. आम्हाला जिथं जायचं होतं, तिथं जायला आठ रुपये तिकीट होतं. जाताना सचिनची शारदाश्रम शाळा दिसली. चार स्टॉप गेल्यानंतर आमचा स्टॉप आला. आदल्या दिवशी अतिशहाणपणा करून गुगल मॅपवर मी सगळं पाहून ठेवलं होतं. त्यामुळं सयानी रोड अशी पाटी दिसताच आम्ही तडक त्या रस्त्यानं निघालो. (मुंबईचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथं महापालिकेनं रस्त्याला दिलेलं नावच सगळीकडं वापरतात. आणि रस्त्यावर शिस्तीत त्या नावाचा बोर्ड पिनकोडसकट मौजूद असतो.) रवींद्र नाट्य मंदिर चौकाच्या दुसऱ्या बाजूला असू शकतं, हे लक्षात न घेता, आम्ही परळ डेपोपर्यंत चालत गेलो. मग अक्कल विकत घेऊन पुन्हा मागच्या चौकात आलो. (गुगल मॅप वापरण्यापेक्षा तिथल्या दुकानदाराला विचारणं केव्हाही योग्य असतं, हा धडा!)
रवींद्र नाट्य मंदिर दिसलंच. शेजारीच पु. ल. देशपांडे अकादमी होती. तिथं एक प्रदर्शन सुरू होतं. ते पाहिलं. पुण्यातलेच किशोर गुमास्ते यांनी नृत्यमुद्रांच्या छायाचित्राचं प्रदर्शन भरवलं होतं. त्यांच्याशी बोललो. हे गृहस्थ वकील आहेत, पण छंदापोटी त्यांनी हा व्याप केला होता. आणखीही एक अमृता काळे नावाच्या गायिका आल्या होत्या. त्यांचीही ओळख झाली. मग आम्ही वरच्या मजल्यावर गेलो. तिथं फुलांच्या सजावटीचं एक प्रदर्शन भरलं होतं. तेही मस्त होतं. ते पाहून खाली उत्सव नावाचं हॉटेल होतं, तिथं जेवलो. त्या हॉटेलमध्ये अक्षरशः कुणीही नव्हतं. आपण मुंबईत आहोत की कुठं, असा मला क्षणभर प्रश्न पडला. नंतर काही लोक आले. मुंबईकरांची जेवायची वेळ दोननंतर असते, असं ओंकारनं सांगितल्यावर याचा उलगडा झाला. पण तिथं जेवण अप्रतिम चवीचं होतं. हराभरा कबाब मसाला नावाचा एक पदार्थ घेतला होता. भारीच होता. तुडुंब जेवल्यानंतर खरं तर बाहेर पडायचा कंटाळा आला होता. पण आम्हाला मेट्रो आणि मोनोरेलची सैर करायची होती. बाहेर पडल्यानंतर माझा आत्येभाऊ साईनाथ याचा मेसेज आला, की तोही मुंबईलाच यायला निघालाय म्हणून. (माझं एफबीवरचं स्टेटस त्यानं पाहिलं होतं.) मला आनंद झाला. कारण जाताना मला त्याची चांगली कंपनी असणार होती. माझा हा आत्येभाऊ चित्रकार आहे. गायतोंडेंवरच्या पुस्तकाचं प्रकाशन संध्याकाळी मुंबई विद्यापीठात होणार होतं. तिथं तो निघाला होता. मला हा कार्यक्रम आहे, हे माहिती होतं. पण एकट्यानं तिकडं जायचं की नाही, याचा मी विचार करीत होतो. पण आता साईनाथ येतोच आहे, म्हटल्यावर मी सहा वाजता राजाबाई टॉवरला पोचायचं नक्की केलं. पु. ल. अकादमीतून बाहेर पडून आम्ही सिद्धिविनायकाकडं चालत निघालो. जाताना रस्त्यावर एक टपरीवजा हॉटेल दिसलं. तिथं लोक ताटात पोळी-भाजी, वरण-भात असं जेवत होते. आम्ही हॉटेलात आत्ता जेवढे पैसे खर्च केले, त्याच्या एक दशांश रकमेत हे जेवण मिळत होतं. मुंबईचं हेच वैशिष्ट्य आहे आणि ते मला आवडतं. वीर सावरकर मार्गानं उजवीकडं वळून सिद्धिविनायकापाशी पोचलो. पण तिथं बरीच रांग होती. म्हणजे रांग असणार हे आम्ही अपेक्षितच धरलं होतं. पण ही जास्तच मोठी रांग होती. अखेर दारातूनच सिद्धिविनायकाला नमस्कार केला आणि निघालो. दादर स्टेशनला जाण्यासाठी एक बस पकडली. ती बस लांबून जात होती. पण आम्हाला बरंच वाटलं. रानडे रोड, गोखले रोड, केळकर रोड, गडकरी चौक, टिळक पूल असा सगळा कोकणस्थी-सारस्वती मार्गी प्रवास करून आम्ही प्लाझापाशी उतरलो. स्टेशनात गेलो. वेस्टर्न लाइनवर बोरिवली लोकल पकडून अंधेरीला आलो.
 अंधेरी स्टेशनातूनच मेट्रो स्टेशनकडे जायला स्कायवॉक केला आहे. हे सगळं बघायला भारी वाटत होतं. मी दिल्लीत मेट्रोतून बराच फिरलोय. त्यामुळं मेट्रोचं तितकंसं आकर्षण नव्हतं. पण मुंबईतून मेट्रोमधून फिरण्याचं नक्कीच होतं. आम्ही अंधेरी स्टेशनला घाटकोपरचं तिकीट काढलं. पण माझा भाऊ म्हणाला, की आपण इथून वर्सोव्याला जाऊ व तिथून थेट घाटकोपरला जाऊ. आम्हाला प्लास्टिकचे कॉइन मिळाले होते. वर्सोव्याला आपल्याला पकडतील असं मला वाटलं. पण त्या यंत्रणेतला हा दोष माझ्या भावाला माहिती होता. त्यामुळं आम्ही घाटकोपरच्या मेट्रोत न चढता उलट्या, म्हणजे वर्सोव्याला जाणाऱ्या मेट्रोत चढलो. दोनच स्टेशनं गेल्यावर वर्सोवा आलं. मग आम्ही उतरून खाली आलो आणि पुन्हा दुसऱ्या एस्कलेटरनं चढून घाटकोपरला जाणाऱ्या मेट्रोच्या फलाटावर आलो. वास्तविक, वर्सोव्याला बाहेर पडणारा प्रवासी हा थेट स्टेशनच्या बाहेरच पडला पाहिजे. मात्र, तिथं तशी काही व्यवस्था नव्हती. त्यामुळं आम्ही त्याच तिकिटात घाटकोपरला जाणार होतो. (अंबानींना फसवल्याचं किरकोळ समाधान आम्हाला लाभलं.) तेवढ्यात मेट्रो आलीच आणि आम्ही घाटकोपरला निघालो. फारशी गर्दी नव्हती.
आम्ही फोटोबिटो काढून मेट्रो पर्यटन पूर्ण केलं. अंधेरीला मात्र जरा गर्दी झाली. अर्ध्या तासात घाटकोपर आलं. राइड छानच झाली. घाटकोपरला उतरून आम्ही चेंबूरची बस पकडली. तिथं मोनोरेलच्या स्टेशनाखालीच बस थांबली. मग बस सोडून मोनोच्या स्टेशनात गेलो. मेट्रोच्या मानानं हे जरा गरीब प्रकरण वाटलं. (पुलंच्या भाषेत सांगायचं, तर मेट्रो मॅनेजर असेल, तर मोनो लोअर डिव्हिजन क्लार्कच्या इतमामानं राहते...)
 मोनोतून प्रवास करणारे एकूण आमच्यासारखे हौशे-नवशे-गवशेच दिसले. काही शाळेतली पोरं होती. नववी-दहावीतली असावीत. त्यातला एक जण प्लॅटफॉर्मवर शिट्ट्या मारत होता. तो गाडीत बसल्यावरही शिट्ट्या मारत होता, हे पाहून मोनोचा एक सुरक्षारक्षक आला आणि त्यानं त्या पोराला झापला. परत शिट्टी वाजवली, तर खाली उतरवीन, म्हणाला. (पण हे सामाजिक अंगातून वगैरे नसावं, तर ती शिट्टी ऐकून मोनोचा ड्रायव्हर गाडी पुढं काढेल, अशी त्याला वाटणारी भीती असावी, असं आपलं मला वाटून गेलं. थोडक्यात, त्या स्टेशनात शिट्टी मारायचा एक्स्क्लुझिव्ह राइट फक्त मोनोचा होता!) पण ती राइडही मस्त झाली. विशेषतः मोनोरेलला फारच कमी रुंदीचे खांब लागतात. कमी जागा व्यापते. शिवाय टर्न मारताना गाडी कलते, हे भारी वाटतं आतून बघायला. आरसीएफ वगैरे झपाट्यानं मागं टाकून, वळणं-वळणं घेत मोनो वडाळा डेपोला पोचली. इथून पुढं हा मार्ग दादर आणि परळपर्यंत जाणार आहे, म्हणे. तसं झाल्यास मोनोरेलला गर्दी होईल. सध्या तरी फार काही बरं चाललेलं दिसलं नाही. आम्ही वडाळा डेपो स्टेशनला उतरून खाली आलो, तर त्या भागात एकदम शुकशुकाट. मग जरा चालत जाऊन एक टॅक्सीवाला गाठला. तोपर्यंत चार वाजले होते. आम्हाला आता चहाची तल्लफ आली होती. तोपर्यंत ओंकारनं जवळचं स्टेशन वडाळा नसून, गुरू तेगबहादूरनगर हे आहे, हे शोधून काढलं होतं. तिथं सार्वजनिक वाहतुकीचं एकही साधन उपलब्ध नसल्यानं अखेर टॅक्सी करून त्या स्टेशनला जायचं ठरवलं. हा टॅक्सीवालाही कूल होता. आधी तर आम्हाला म्हणाला, जवळच आहे. चालत पण जाऊ शकता. पण आम्ही तरीही त्याच्या गाडीत बसल्यावर त्याला आम्हाला नेण्याशिवाय पर्याय उरला नाही. मात्र, मुंबईत एक आहे. कुठलाही टॅक्सीवाला नाही म्हणत नाही. आमचे २२ रुपये झाले. ते देऊन आम्ही शेजारच्या टपरीवर चहा प्यायला वळलो. तो आमचा टॅक्सीवाला आम्हाला हॉर्न वाजवून बोलावत होता. त्याला वाटलं होतं, की आम्ही स्टेशन कुठंय ते विचारतोय. म्हणून तो आम्हाला सांगत होता, की अजून पुढं जा म्हणून. शेवटी त्याला सांगितलं, की आम्हाला माहिती आहे स्टेशन; आम्ही चहा प्यायला थांबलोय म्हणून. मग तो ओके ओके म्हणाला. मुंबईत ही मदत करायची वृत्ती सर्वत्र दिसते. म्हणूनच मला हे शहर आवडतं.
गुरू तेगबहादूरनगर नावाचं स्टेशन मुंबईत आहे, याचा मला आत्ताच पत्ता लागला होता. प्लॅटफॉर्मवर गेल्यावर सीएसटी इकडं की तिकडं (म्हणजे कुठं उभं राहायचं?), याचं थोडं कन्फ्युजन झालं. मला दिशांचं आणि भूगोलाचं ज्ञान बऱ्यापैकी आहे. शिवाय एकदा एका रस्त्यानं गेलो, की मी तो रस्ता पुन्हा कधीही विसरत नाही. पण त्या स्टेशनच्या विचित्र रचनेमुळं असेल, थोडं कन्फ्युजन झालं खरं. वास्तविक सूर्याकडं पाहून आम्हाला दिशा कळायला हरकत नव्हती. पण ते नंतर लक्षात आलं. जवळच एक पोलिसमामा होते. (हेही मुंबईचं एक वैशिष्ट्य. जागोजागी पोलिस असतातच.) त्यांनी योग्य ती दिशा दाखविली. हार्बर लाइन ही मुंबईतली एक दुर्लक्षित लाइन आहे. इथल्या लोकलही पश्चिम रेल्वेच्या मानाने फारच कळकट असतात. त्या चालू असतात, एवढंच त्यांचं वैशिष्ट्य. गोदीच्या बाजूनं जाणारी ही लोकल आम्हाला पंधरा मिनिटांत छत्रपती शिवाजी टर्मिनसला घेऊन गेली. सीएसटीला आलं, की समोरच्या अंडरग्राउंड मार्केटमध्ये जाऊन काही तरी खरेदी करायचा मला फार मोह होतो. पण तो टाळून आम्ही वरूनच रस्ता क्रॉस केला आणि आझाद मैदानाकडं आलो. आम्हाला मुंबई विद्यापीठात जायचं होतं. राजाबाई टॉवरची खूण माहिती होती. पण आझाद मैदान आणि ओव्हल मैदानात माझी गल्लत झाली. पण तरीही चालतच आम्ही राजाबाई टॉवरला पोचलो. सव्वासहा वाजले होते. मुंबईत या वेळेला किती सुंदर वातावरण असतं, हे जाणवलं. सूर्य पश्चिमेला अस्ताकडे निघाला होता आणि पश्चिमवारा तिथल्या तापलेल्या हवेवर अलगद फुंकर घालत होता. विद्यापीठाच्या आवारातली झाडं, फुलं प्रसन्नपणे डोलत होती. या वातावरणामुळं चालून आलेला थकवा दूर पळाला.
आम्ही अगदी फ्रेश मूडमध्ये त्या देखण्या दीक्षान्त सभागृहात शिरलो. आत्येभावाला शोधण्यात थोडा वेळ गेला. पुढच्या बाजूला उजवीकडं एक दार होतं आणि तिथून बाहेरच्या बाजूला काही लोकांची लगबग सुरू असलेली दिसली. मी तिथं गेलो. तिथं चहापानाची व्यवस्था होती. अर्थात मी आगंतुक असल्यानं चहा काही घेतला नाही. पण कुणी ओळखीचं दिसतंय का, ते पाहत होतो. तेवढ्यात प्रिया जामकर दिसल्या. आम्ही फेसबुकवर फ्रेंड असलो, तरी पहिल्यांदाच भेटत होतो. दोघेही पुण्याचे; पण पहिल्यांदा भेटत होतो मुंबईत! त्या या कार्यक्रमात अभिवाचन करणार होत्या, हे मला माहिती होतं. मग त्यांना शुभेच्छा देऊन मी जागेवर येऊन बसलो.
थोड्याच वेळात गानसरस्वती किशोरीताई आमोणकर आमच्या शेजारून व्यासपीठाकडं जाताना दिसल्या. त्या आल्यानंतर कार्यक्रम लगेचच, पण निर्धारित वेळेपेक्षा दहा-पंधरा मिनिटं उशिरा सुरू झाला. चिन्हचे सतीश नाईक यांनी हा सारा घाट घातला होता. या कार्यक्रमाची एक्स्क्लुझिव्हिटी माझ्या लगेचच लक्षात आली. सतीश नाईक तळमळीनं आणि मनापासून बोलत होते. पण दिवसभराच्या वणवणीमुळं मला चक्क डुलक्या येऊ लागल्या. ओंकारचीही तीच अवस्था झाली असावी. कारण तो बाहेर गेला. येताना दोन कप चहा घेऊन आला. तो चहाचा कप पाहून मला फारच बरं वाटलं. चहा घेतल्यानं मग तरतरी आली. मग कुलगुरू संजय देशमुख बोलले. नंतर प्रिया जामकरांचं अभिवाचन झक्कासच झालं. त्यांनी तीन भाग वाचले. पण प्रत्येक भाग वाचल्यानंतर टाळ्या न पडता, एकदम शेवटी पडल्या. लोकांना एक भाग संपल्याचं कळलंच नाही की काय, असं मला वाटलं. असो. नंतर प्रभाकर कोलते यांचं भाषण झालं. तेही छान बोलले. किशोरीताई फार बोलल्या नाहीत. त्यांचं बोलणं झाल्यावर त्या जायला उठल्याच. मग आम्हीही उठलो. दारात नाईकांच्या लेखाची एक प्रत मिळत होती, ती घेतली आणि बाहेर पडलो. साडेआठ वाजले होते. या वेळेत मी कधीच मुंबईत नव्हतो पूर्वी. मला फोर्टातल्या त्या रस्त्यांवरून रात्री फिरायचंच होतं. मग आम्ही रमतगमत नरीमन पॉइंटकडं निघालो. मंत्रालयावरून आणि मंत्र्यांच्या बंगल्यांवरून मादाम कामा रोडनं एअर इंडियापाशी आलो. सर्व सिनेमांत दाखवतात, त्या कट्ट्यावर बसलो. मजा आली. एवढं साधं सुख; पण मला एवढी वर्षं ते लाभलं नव्हतं. काही गोष्टींचे योग यावे लागतात हेच खरं. आम्ही तिघंही अगदी रिलॅक्स होतो. न बोलता बराच वेळ बसलो. मग तिकडून चौपाटीकडं चालू लागलो. तिकडं एका पानवाल्याकडं आइस पान भारी मिळतं, हे ओंकारनं सांगितलं. मग आम्ही जेवायच्या आधीच ते पान खाल्लं. तोंडात एक मिनिट गारेगार झालं. मस्तच होता तो अनुभव.
मग चालायचा कंटाळा आल्यानं टॅक्सी केली आणि चौपाटीकडं निघालो. या रस्त्यावरून मी पूर्वी गेलो असलो, तरी ते दिवसा. रात्री हा भाग खरा पाहण्यासारखा असतो. दुतर्फा उंची गाड्या लागल्या होत्या. पुढं उजव्या बाजूला तारापोरवाला मत्स्यालय लागलं. (हे पाहायचंय अजून...) मग नंतर काही लॉन्ससदृश ठिकाणं लागली. तिथं बरेच कार्यक्रम/इव्हेंट/पार्टी इ. सुरू होतं. आयोजित करणारे अब्जाधीश असावेत, एवढं निश्चित कळत होतं. एका ठिकाणी जत्राही दिसली. अगदी पाळणे वगैरे होते. आम्ही चौपाटीवर चक्कर मारून आलो, तोपर्यंत साडेनऊ वाजले होते. आता भुका लागल्या होत्या. मग ओंकारच्या फेव्हरिट आयडियल नावाच्या हॉटेलमध्ये गेलो. हॉटेलमधल्या वेटरनं आम्ही काही बोलायच्या आधीच, आज ड्राय डे आहे (३० जानेवारी), तेव्हा बिअर मागू नका, असं सांगून टाकलं. (एवढे मनकवडे वेटर मुंबईतच भेटतात; म्हणूनच मला हे शहर आवडतं.) या हॉटेलमध्ये ज्यूक बॉक्स होता. याविषयीही मी वाचलं पुष्कळ होतं. पण प्रत्यक्ष असा ज्यूक बॉक्स असलेल्या हॉटेलात मी प्रथमच आलो होतो. ओंकार आणि त्याचे मित्र इथं कायम त्यांची गाणी वाजवत बसतात. अर्थात ही सोय फुकट नव्हती. वीस रुपयांचं कॉइन घेऊन ते टाकायचं होतं. मी जास्त शहाणपणा करून टायटॅनिकमधलं माय हार्ट विल गो ऑन हे गाणं सिलेक्ट केलं. पण प्रत्यक्षात भलतंच धांगडधिंगा असलेलं एक गाणं सुरू झालं. मी तिथल्या माणसाला पदोपदी सांगितलं, की हे मला हवं असलेलं गाणं नाही. मात्र, तो ऐकायला तयार नव्हता. हे रिमिक्स आहे, असं म्हणाला. मी कपाळाला हात लावला. ते गाणं इंग्लिश होतं, की अन्य कुठल्या भाषेत हे मला शेवटपर्यंत कळलं नाही. हा ज्यूक बॉक्स माझ्यासाठी झूठ बॉक्स ठरला, अशी कोटी करून मी गप्प बसलो. ओंकारनं मात्र किशोरकुमारचं प्यार दिवाना होता है हे गाणं निवडलं, ते व्यवस्थित लागलं. साईनाथ सर्वांत शहाणा ठरला. त्यानं कुठलंच गाणं निवडलं नाही. आम्ही मेक्सिकन इंचिलाडा बीन्स विथ चीज ऑर्डर केलं. हा पदार्थ त्या दोघांनीही कधी खाल्ला नव्हता. हे माझे दोन्ही भाऊ माझ्यापेक्षा लहान असले, तरी माझ्यापेक्षा पुष्कळच हुशार आहेत. साईनाथ तर जग फिरला आहे. पण त्यांनी न केलेली एक तरी गोष्ट मी केलीय, याचा मला किरकोळ आनंद झाला. इंचिलाडा मस्तच होतं, नंतर व्हेज हैदराबादी बिर्याणी सांगितली. ती मात्र काहीच्या काही होती. मुंबईत कुठल्या हॉटेलमध्ये काय मागवायचं, याचंही एक शास्त्र आहे. ते आम्हाला अवगत नसल्यानं ही फसगत झाली. पण एकूण मज्जाच आली म्हणायची. पुन्हा चौपाटीवर जाऊन काही तरी हादडायचं या मिषानं बाहेर पडलो. मात्र, तिथं जाऊन काहीच खावंसं वाटेना. मग पुन्हा एकदा पानच घेतलं आणि निघालो. बिर्ला मातोश्री सभागृहाच्या जागी ठक्कर्स नावाचं एक सभागृह झालंय, हे बघून मी ठक्क (आपलं... थक्क) झालो. पु. लं. आपले सगळे नाट्यप्रयोग याच ठिकाणी करायचे हे मला माहिती होतं. आता तिथं नाट्यप्रयोग होत असतील, असं मुळीच वाटत नव्हतं. कालाय तस्मै नम:...दुसरं काय! नशीब, पुढं टिळकांचा पुतळा तरी ठेवलाय. नाही तर तिथंच हे लोक एखादा पब किंवा बार काढायचे. दा. भ. (दादासाहेब भडकमकर) मार्ग पोलिस ठाण्याचा बोर्ड पाहिल्यावर हुतात्मा तुकाराम ओंबाळेंची आठवण येणं स्वाभाविकच होतं. तिथं आता ओंबाळेंचा अर्धपुतळाही उभारलाय. त्याला नमन करून पुढं निघालो. फूटओव्हरब्रिजवरून पलीकडं उतरलो. चर्नीरोड स्टेशनात आलो. ओंकारचं बोरिवलीचं आणि आम्हा दोघांचं दादरचं तिकीट काढलं. थोड्यात वेळात लोकल आली.

गाडीत बसल्यावर तिघांचा एक फोटो काढून घेतला. ओंकारला टाटा करून आम्ही दादरला उतरलो. वेस्टवरून ईस्टला आलो आणि चालत शिवनेरीच्या स्टॉपवर आलो. शेवटची बस होती बहुतेक. फार गर्दी नव्हती. ड्रायव्हरला रस्ता माहिती नव्हता. त्यानं मागच्या एका प्रवाशाला जीपीएसवरून रस्ता दाखवायला सांगितलं. साईनाथनंही जीपीएस सुरू केलं आणि आम्ही रस्ता बरोबर आहे का, ते पाहायला लागलो. वडाळा मार्गे यानं गाडी चेंबूरला आणली. पुन्हा उलटी मैत्री पार्ककडं नेली. तिथला कंट्रोलर म्हणालासुद्धा, की इकडून कुठून आणली गाडी? तर आमच्या ड्रायव्हरनं ट्रॅफिक जाम होतं, असं धादांत खोटं कारण सांगितलं. आम्हाला आता झोप यायला लागली होती. मधेच जाग आली, तर गाडी घाटात होती आणि तिथं मात्र खरंच ट्रॅफिक जाम झाला होता. आजूबाजूंनी शेकडो अवजड ट्रक आणि ट्रकच दिसत होते. दोन चाळीस झाले होते. आम्हाला निघून अडीच तास झाले होते. अर्थात आता वेळेचा आम्हाला काही फरक पडत नव्हता. मग मात्र पुन्हा चांगलीच झोप लागली आणि ड्रायव्हर औंध औंध करीत ओरडू लागला, तेव्हा जाग आली. सव्वाचारला गाडी स्टेशनवर आली. आरटीओचा पंप चालू असतो, असं कळलं. मग मी माझी बाइक घेऊन त्या पंपावर गेलो आणि तिथं पहाटे साडेचार वाजता पेट्रोल भरलं. पुढच्या वीस मिनिटांत घरी पोचलो. एवढं दमायला झालं होतं. लगेच झोपावं की नाही! पण पेपर दिसले आणि लक्षात आलं, की आपण पेपरच वाचलेले नाहीत. मग शनिवारचे सगळे पेपर वाचून काढले आणि साडेपाचला झोपलो...
इति पुणे-मुंबई-पुणे अध्याय समाप्ती...
---