27 Nov 2016

नोटाबंदी प्रहसन

‘हजार’ ख्वाहिशें ऐसी.... 
--------------------------

आमच्या साध्या-सरळ, मध्यमवर्गीय आयुष्यात दिवाळीनंतर अचानक शिमगा हा सण येईल, असे भाकीत कुठल्याही दिवाळी अंकात वाचायला मिळाले नव्हते. आम्ही वट्ट पाचशेची नोट उडवून काही दिवाळी अंक आणले होते. पण मुखपृष्ठावरील एक-दोन बऱ्या ललना सोडल्यास त्या अंकांत आत काहीच नव्हते, या नैराश्याने आम्ही आधीच वैतागलो होतो. अशात आठ नोव्हेंबरच्या निशासमयी ‘मित्रों...’ ही चिरपरिचित हाक कानी आली. व्हॉट्सअॅप आणि फेसबुकामुळे नमोजी बोलणार आहेत, हे आधीच माहिती होतं. आम्ही पेंगुळलेल्या अवस्थेत त्यांचं ते नेहमीचं भाषण ऐकू लागलो. आणि अचानक... त्यांनी बॉम्बगोळाच टाकला! पाचशे अन् हजारच्या नोटा रद्द करून आमच्या आयुष्यात मोठीच ‘(अनर्थ)क्रांती’ घडवून आणली. पाचशे, हजारच्या नोटांच्या गठ्ठ्यांचा बेड करून त्यावर झोपणाऱ्यांपैकी आम्ही नव्हे. आमच्याकडं व्यापार या खेळातल्यादेखील तेवढ्या नोटा कधी नव्हत्या. तर ते असो. पण तरी जात्याच मध्यमवर्गीय असल्यानं आमची रोकड, गुंतवणूक इ. शेळीच्या शेपटासारखी एकदम उघडी पडली. बराच काळ हतबुद्ध अवस्थेत गेल्यानंतर आत्ता या रात्रीच्या वेळी आपण फक्त झोपूच शकतो, एवढा एक विचार ‘मनी’ आला. नंतरच्या तीन तासांत अनेकांच्या आयुष्यात ‘ब्लॅक ट्युसडे’ नामक आत्तापर्यंत कधीही रीलिज न झालेला सिनेमा सुरू झाला होता म्हणे. आमच्याकडं मात्र एकदम घनघोर शांतता नांदत होती.
सकाळी उठल्यावर पेपरांमध्ये आणि सोसायटीमध्ये याची चर्चा सुरू झाल्यावर आम्ही अंदाज घेतला. ज्यांना हजार-पाचशेच्या नोटा लपवून ठेवायची वाईट खोड होती, अशा मंडळींच्या चेहऱ्यावर जे भाव होते, त्याचे वर्णन करण्यास आमच्याकडे शब्द नाहीत. खरं तर विविध भावांचं ते मिश्रण होतं. पण ‘पडेल भाव’ तेव्हा सर्वांत भाव खाऊन जात होता, यात शंका नाही. अशा लोकांनी मध्यरात्रीच एटीएमवर धाव घेऊन उरलीसुरली शंभराची कॅश काढून आणल्याचं कळलं. दुसऱ्या दिवशी बँका तर बंदच होत्या. तिसऱ्या दिवशी अन्य बेसावध मंडळी तिथं पोचली, तेव्हा एटीएमे बंद आणि बँकांसमोर रांगा अशा आगळ्यावेगळ्या दृश्याला त्यांना सामोरं जावं लागलं. पण आमच्या पुण्यातली, विशेषतः पेठांतली धोरणी मंडळी सकाळी व्हॉट्सअॅप बघूनच बाहेर पडत असल्यानं, डबा, छत्री, थर्मास, सतरंजी, पाण्याची बाटली असा सगळा सरंजाम घेऊनच त्यांनी घर सोडलं होतं. काहींच्या घरी तर अर्धांगानं लढाईवर जाण्यापूर्वी ओवाळतात, तसं आपापल्या ‘एजमानां’ना ओवाळलंदेखील होतं म्हणे. तिकडं बँक कर्मचाऱ्यांची अभूतपूर्व धांदल उडाली. त्यांच्या आयुष्यातल्या एका महायुद्धालाच जणू बुधवारी सुरुवात झाली होती. तरी बरं, सरकारनं हा दिवस ग्राहकांसाठी बंदच ठेवला होता. सुट्ट्या घेऊन जे पर्यटनाला वगैरे बाहेर गेले होते, त्यांची अवस्था ‘ना घर का, ना घाट का’ अशी झाली. त्यातले जे शहाणे होते, त्यांनी गुपचूप घरची वाट धरली.
घराघरांतल्या बायकांच्या छुप्या बँका पितळी डब्यांतून, पिगी बँकेतून आणि पलंगांच्या कोपऱ्यातून अलगद बाहेर आल्या. हा काळा पैसा नव्हता, तर आपापल्या ‘काळ्या मण्यां’नी साठवलेला पैसा होता. या पैशांतूनच समांतर अर्थव्यवस्थेलाही समांतर अशी एक तिसरीच अर्थव्यवस्था कित्येक वर्षं चालू होती, तिला अचानक खीळ बसली. बायकांनी अत्यंत नाइलाजानं, जणू ठेवणीतले दागिने काढून द्यावेत तितक्या नाखुशीनं आपल्याकडच्या नोटा बाहेर काढल्या.
बाकी आमच्यासारख्या काही मध्यमवर्गीय माणसांकडं पाचशे-हजारच्या नोटाच नव्हत्या. आपल्याकडं काळा-पांढरा, हिरवा-निळा असा कसलाच पैसा नाही, याचं त्यापूर्वी कधीही एवढं वैषम्य वाटलं नव्हतं. अहो, आमच्याकडं काम करणाऱ्या ताईंकडं पाचशेच्या पंधरा नोटा निघाल्या. वॉचमनकाकांकडं हजाराच्या दहा नोटा निघाल्या. पण आम्ही आमचे सगळे कपडे, सगळे खिसे उलटेसुलटे केले, तरी त्यातून एकही हजार वा पाचशेची नोट बाहेर पडली नाही. आमची म्हणजे भलतीच ‘कॅशलेस इकॉनॉमी’ होती, हे तेव्हा लक्षात आलं.
पण पुन्हा चारचौघांसारखं वागलं नाही, तर आपल्या मध्यमवर्गपणाला बट्टा येईल, या भीतीनं आम्ही हळूच शेजाऱ्यांकडं पाचशेच्या नोटा मागितल्या. त्यांनी आधी आमच्या डोळ्यांत वाकून का पाहिलं ते कळलं नाही. पण नंतर मोठ्या औदार्यानं त्यांनी पाचशेच्या दोन नोटा दिल्या. अर्थातच पुढल्या महिनाभरात शंभरच्या नोटांच्या रूपानं त्या परत करायच्या, या बोलीवरच! या पाचशेच्या नोटा घेऊन आता आम्हाला मिरवता येणार होतं... आम्हीही चार भारतीयांसारखेच गांजलेले आहोत, हे दाखवता येणार होतं. असं करता आलं नसतं तर मात्र आमच्या आयुष्यात ती फार मोठी उणीव राहून गेली असती.
बाहेर पडलो खरा, पण या नोटा कुठं खपवाव्यात काही कळेना. पेट्रोलपंपावर गेलो तर तिथं मारामाऱ्या सुरू होत्या. सरकारी रुग्णालयांत जाण्याची आमच्या बापजाद्यांतही हिंमत नाही. आमचा प्रॉपर्टी टॅक्सही अगदी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच भरून झाला होता. आमच्या या आर्थिक शिस्तीचं नकळत दर्शन घडून ऊर भरून आला. तरीही आव्हान बाकी होतंच. मग आम्ही साक्षात आमच्या बँकेत जाऊन ‘काउंटर अॅटॅक’ करायचं ठरवलं. वर्षानुवर्षं ‘सवाई’ला जात असल्यामुळं ग्रुप करणं, रांग धरणं, सतरंज्या टाकणं, जागा पकडणं, तिरकस टोमणे मारणं, दुसऱ्याला काहीच कळत नाही अशा नजरेनं त्याच्याकडं बघणं, अधूनमधून वा.. वा.. अशी दाद देणं या सगळ्या गोष्टी तिथं श्वासाएवढ्या सहज जमून आल्या. व्हॉट्सअॅपवरचे तीन-चार टुकार जोक सांगून रांगेतल्या लोकांना हसवलंही! तेही गांजलेले असल्यानं कुणी जे काही सांगेल, त्यावर बिचारे हसत होते. अशा तब्बल ५६ मिनिटांच्या प्रतीक्षेनंतर आमचा नंबर आला. आमच्या हातातल्या दोन पाचशेच्या नोटा बघून त्या ब्यांककाकू कुत्सितशा हसल्या आणि त्यांनी मला शंभरच्या नोटा बदलून दिल्या. बँकेतल्या लोकांकडं अपार सहानुभूतीनं पाहत आम्ही तिथून काढता पाय घेतला. खिशात शंभरच्या तब्बल दहा नोटा असल्यानं आम्ही प्राणपणानं त्यांचं रक्षण करीत त्या घरापर्यंत आणल्या. हुश्श!
खरं सांगायचं, तर यानंतर काही आजतागायत बँकेत जाण्याचा प्रसंग आमच्यावर आलेला नाही. कारण खर्च काय करायचा आणि कशाला, हा आमचा बेसिक सवाल असतो. मात्र, विनाकारण रिकाम्या रस्त्यानं फिरणं, बँका व एटीएमसमोरच्या लायनी बघून येणं यात आम्हाला मध्यमवर्गीय कोमट आनंद होतो. आपल्याला त्रास नाही, पण दुसऱ्याला होतोय तर त्याचा आनंद मानू नये, या आई-बापांनी दिलेल्या शिकवणीला आम्ही ३० डिसेंबरपर्यंत स्वतःच ‘स्टे’ दिला आहे. शिवाय वाईटातून चांगलं निघतं त्यात आनंद मानावा असं आम्हाला वाटतं. पाहा ना, उगाचच खरेदी करीत फिरणारे लोक कमी झाले. रस्त्यावरची, बसमधली, एसटी स्टँडवरची, हॉटेलांमधली फालतू गर्दी एकदम कमी झाली. लोक स्वतःच्या घरात जास्त वेळ बसू लागले. बराच दिवस केली नव्हती अशी कामं करू लागले. मुलांचा अभ्यास वगैरे घेऊ लागले. म्हाताऱ्या आई-बापांची चौकशी करू लागले. घरच्या धनिणीला कामात मदत करू लागले. भाजीबिजी आणून देऊ लागले. असा सगळीकडं एकदम सुकाळ माजला! जणू रामराज्य आले...
...पण मध्यमवर्गाचं चांगलं झालेलं कुणाला पाहावतं का सांगा!
...बघता बघता ३० डिसेंबर उजाडला आणि पोटात धस्स झालं. व्हॉट्सअॅपवर मेसेज आला... पंतप्रधान राष्ट्राला संबोधित करणार आहेत. रात्री आठ वाजता टीव्ही लावा...!
---
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे, २७ नोव्हेंबर २०१६)
---
(चित्र - अतुल बेलोकर)
----

24 Nov 2016

माधुरी दीक्षित लेख

सुहास्य तुझे...
--------------



माधुरी दीक्षित. आमच्या उमलत्या तारुण्याला पडलेलं एक मुग्धमधुर स्वप्न! माधुरी दीक्षित म्हणजे मनमोहक, खळाळत्या हास्याचा धबधबा! माधुरी म्हणजे नृत्यनिपुणता, कमनीयता, सौष्ठवता!!! माधुरी म्हणजे माधुरीच... तिच्यासारखी दुसरी कुणीही नाही. 'सुहास्य तुझे मनासी मोहे' हे गाणं केवळ जिच्यासाठीच लिहिलं असावं असं कायम वाटतं ती सुहास्यवदना, कोमलांगी, चारुगात्री माधुरी...
सौंदर्य हे अजर असतं, असं म्हणतात. म्हणजेच ते कधी म्हातारं होत नाही. शिवाय ते सौंदर्य जर पाहणाऱ्याच्या नजरेत असेल, तर खरोखरच ते चिरतरुण राहतं. माधुरी दीक्षितला गेल्या मेमध्ये पन्नासावं वर्षं लागलं आणि येत्या १५ मे २०१७ रोजी ती वयाची पन्नाशी पूर्ण करणार आहे, हे केवळ आकडे झाले. माझ्या लेखी ती कायमच ती १९९० मधली अवखळ, चुलबुली माधुरी असणार आहे. याचं एकमेव कारण म्हणजे ती 'माझ्या' पिढीची तारका होती. प्रत्येक पिढीची 'आपली' अशी एक स्वप्नसुंदरी असते. अगदी मधुबालापासून ते आत्ताच्या दीपिका पदुकोण किंवा विद्या बालनपर्यंत ही यादी सांगता येईल. पण आता चाळिशीत असलेल्या माझ्या पिढीच्या समोर माधुरी अवतरली, हे आमचं भाग्य होय. माधुरी निखालस 'नाइन्टीज'ची नायिका होती. तिचा पहिला सिनेमा 'अबोध' झळकला तो १९८४ मध्ये. तेव्हा ती फक्त १७ वर्षांची होती. त्यानंतरही तिनं काही फुटकळ सिनेमे केले. मात्र, ती रातोरात सुपरस्टार झाली ती १९८८ मध्ये आलेल्या 'तेजाब'मुळं. चंद्रशेखर नार्वेकर उर्फ एन. चंद्रा नावाच्या मराठी माणसानं 'एक दो तीन...'च्या ठेक्यावर माधुरीला हिंदी चित्रपटसृष्टीचा विशाल कॅनव्हास मिळवून दिला. 
माधुरी रूपेरी पडद्यावर राज्य करायला आली तेव्हा इथं निर्विवाद श्रीदेवीचं राज्य होतं. त्यापूर्वीच्या हेमामालिनी, रेखा, झीनत अमान, राखी यांचं राज्य खालसा होत आलं होतं. माधुरीला स्पर्धा होती ती फक्त श्रीदेवीची. श्रीदेवी एक अत्यंत जबरदस्त अभिनेत्री तर होतीच; पण शिवाय ती दाक्षिणात्य, नृत्यनिपुण आणि सौष्ठवपूर्ण होती या तिच्या आणखी काही जमेच्या बाजू होत्या. मि. इंडिया, नगीना आणि नंतर आलेल्या 'चांदनी'नं श्रीदेवीची लोकप्रियता कळसाला पोचली होती. मात्र, प्रेक्षकांनी 'तेजाब'च्या वेळी माधुरीला पडद्यावर पाहिलं आणि त्यांच्या हृदयात कसलीशी कळ उठली. माझ्यासारख्या तेव्हा पौगंडावस्थेत असलेल्या प्रेक्षकांच्या तर नक्कीच! पुढं इंद्रकुमारच्या 'बेटा'नं यालाच शब्दरूप दिलं - 'धक धक करने लगा...' पण ही अवस्था आमची 'तेजाब'पासूनच झाली होती, हे नक्की. माधुरीत काही तरी 'एक्स-फॅक्टर' होता, म्हणूनच तिला प्रेक्षकांनी एवढं नावाजलं. तिचं कोडकौतुक केलं. आता मागं वळून पाहताना असं वाटतं, की तिच्या चेहऱ्यात एक निरागसता होती आणि तिचं ते मुक्त, खळाळतं (हेच विशेषण वापरावं लागतंय दर वेळी, पण खरोखर दुसरा शब्दच नाही...) हास्य म्हणजे त्या निरागसतेला लागलेले 'चार चाँद'च जणू. नटीचं शारीर वर्णन करताना त्यात हमखास लैंगिक सूचन येतं. तेच संदर्भ येतात. माधुरीही त्याला निश्चितच अपवाद नव्हती. पण त्याहीपलीकडं जाऊन तिच्यात काही तरी होतं. किंबहुना तिचं ते सुप्रसिद्ध हास्य पाहताना प्रेक्षकांना केवळ लैंगिक सूचन होत नव्हतं, असं आता वाटतं. कदाचित तो काळ पाहिला, तर असं वाटतं, की समाजातला झपाट्यानं कमी होत चाललेला निरागसपणा तिच्या रूपानं पुन्हा पाहायला मिळत होता. लहानपणी आपण असे निरागस असतो. प्रत्येक गोष्टीला खळखळून हसत दाद देत असतो. मित्रांबरोबर दंगा-मस्ती करीत असतो. पण जसजसे आपण मोठे होत जातो, तसतसं हे हास्य लोप पावत जातं. निरागसता हरवून जाते. आपण बनचुके, बनेल, अट्टल होऊन जातो. पण आपण आपल्या बालपणातला तो निरागस भाव कुठं तरी 'मिस' करीत असतो. आणि मग तो असा माधुरीच्या हास्याच्या रूपानं पुन्हा समोर आला, की त्याला कडकडून भेटावंसं वाटतं. माधुरी म्हणजे त्या हरवलेल्या निरागसपणाचं मूर्तिमंत प्रतीक होती, असं आता वाटतं. 
भारताला स्वातंत्र्य मिळून १९८७ मध्ये ४० वर्षं पूर्ण झाली होती. एखाद्या व्यक्तीच्या वयाची चाळिशी आणि एखाद्या देशाच्या स्वातंत्र्याची चाळिशी यात निश्चितच गुणात्मक फरक आहे. पण गंमत म्हणून देशाला एक व्यक्ती कल्पून तुलना केली, तर आपला देश त्या वेळी नक्कीच चाळिशीतल्या माणसासारखा काहीसा प्रौढ, बनचुका, कोरडा (आणि कोडगाही) झाला होता. स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या दशकात असलेल्या रोमँटिसिझमची पुढं १९६२ च्या चीन युद्धानं आणि नंतर नेहरूंच्या निधनानं राखरांगोळी झाली. सत्तरच्या दशकात हा हनीमून पीरियड संपला होता, तरीही स्वातंत्र्यानंतरचा देश आता वयात येऊ लागला होता. म्हणूनच या दशकात एक गोड स्वप्नाळूपण, भारावलेपण आणि नवनिर्मितीची आस दिसते. याच काळात देशभरात साहित्य, कला, संस्कृतीला बहर आला. अनेक चांगल्या कादंबऱ्या लिहिल्या गेल्या, नाटकं आली, सिनेमे तयार झाले. उत्तम दर्जाचं संगीत तयार झालं. देशभरात मोठ्या प्रमाणात कारखाने, धरणं यांची उभारणी झाली. पुढं देश तिशीत आला, तेव्हा संसारातलं नवेपण संपून षड्रिपूंची लागण सुरू झाली होती. बांगलादेश युद्धाच्या पराक्रमानंतर देशातल्या चैतन्याला जी ओहोटी लागली ती लागलीच. मग १९७२ च्या दुष्काळानं देशाला तडाखा दिला. नंतर रेल्वे संप, नवनिर्माण आंदोलन आणि त्याची परिणती झालेली आणीबाणी... देशाच्या स्वातंत्र्याच्या तिशीत देश जणू पुन्हा पारतंत्र्यात गेला. लायसन्सराज, परमिटराज, बाबूंची खाबूगिरी, रेशनवरच्या भेसळीपासून ते कंत्राटांच्या कमिशनपर्यंत भ्रष्टाचारानं देशावर आपले अक्राळविक्राळ पंजे फैलावले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जन्मलेली मुलं आता तिशीत आली होती. त्यांना स्वातंत्र्याहून अधिक काही तरी देशाकडून हवं होतं. मग या पिढीनं मोठ्या प्रमाणात आंदोलनं, चळवळी सुरू केल्या. देशाला अस्थिर करणाऱ्या शक्तींनीही याच काळात जोर धरला. म्हणून मग पंजाब, आसाम खदखदू लागले. देशानं पुढच्या दहा वर्षांत दोन पंतप्रधान गमावले. ऐंशीनंतर तर देश विलक्षण कात्रीत सापडला. एकीकडं महासत्तांमधल्या शीतयुद्धाचं जगावर पडलेलं सावट आणि दुसरीकडं देशातल्या नवनिर्माणाचा ओसरू लागलेला बहर असा हा दुहेरी पेच होता. त्यामुळं या काळात टीव्ही रंगीत झाला, व्हिडिओ आले, तरी सामान्य नागरिकांच्या दुर्दशेत वाढच होऊ लागली. बेरोजगारी, भ्रष्टाचार, दुष्काळ आणि सार्वजनिक बेशिस्त या मोठ्या अडथळ्यांनीच देशावर राज्य करायला सुरुवात केली. या देशात काहीच चांगलं घडणार नाही का, असा प्रश्न स्वातंत्र्य चळवळ अनुभवलेल्या ज्येष्ठ पिढीला आणि परिस्थितीपुढं हताश, अस्वस्थ झालेल्या नव्या पिढीला पडू लागला होता. (देशात १९९१ मध्ये झालेल्या आर्थिक सुधारणा आणि त्यानंतरची एका परीनं झालेली क्रांती हा काळ अद्याप यायचा होता..) अशा काळात भ्रष्टाचारानं गांजलेल्या, काळ्या बाजारानं त्रस्त झालेल्या (१९८७ मध्ये आलेल्या 'मि. इंडिया'मधला तो शॉट आठवा. भेसळ करणाऱ्या अजित वाच्छानीला 'मि. इंडिया' अनिल कपूर भेसळयुक्त अन्न कोंबून भरवतोय असा तो शॉट एखाद्या चऱ्यासारखा आठवणीत राहिलाय...) सामान्य जनतेला माधुरीच्या हास्यात आपलं हरवलेलं निरागस सौंदर्य सापडलं आणि त्यांनी माधुरीला एकदम सुपरस्टार करून टाकलं. माधुरीच्या निरागस व मुग्धमधुर हास्यानं प्रेक्षकांवर जी 'मोहिनी' घातलीय, ती अद्याप एवढ्या वर्षांनंतरही उतरायला तयार नाही, याचं एकमेव कारण म्हणजे त्या हास्याचा प्रेक्षकांच्या हरपलेल्या निरागसतेशी असलेला हा 'कनेक्ट' होय. 
माधुरी वेगळी होती, ती आणखी एका कारणानं. ती इतर काही नट्यांसारखी बालपणापासून सिनेमासृष्टीत आलेली नव्हती किंवा तिचं शिक्षणही अर्धवट राहिलेलं नव्हतं. तिनं रीतसर बी. एस्सी. मायक्रोबायोलॉजीची पदवी घेतली होती. खरं तर तिला त्याच क्षेत्रात पुढं काही तरी करायचं होतं. पण नियतीला कदाचित ते मंजूर नव्हतं. मध्यमवर्गीय घरातली ही तरुणी केवळ मध्यमवर्गीय आयुष्य कधीच जगणार नव्हती. पुढं तिला भारतातल्याच नव्हे, तर जगभरातल्या रसिकांच्या मनातलं ड्रीमगर्ल स्टेटस मिळणार होतंच. 'तेजाब'नंतर माधुरीनं आमिर खानसह केलेला 'दिल'ही प्रचंड गाजला. ही एक सरधोपट प्रेमकहाणीच होती. पण चॉकलेट हिरो आमिर खान आणि माधुरीची मोहिनी यामुळं इंद्रकुमारला मटकाच लागला. आम्ही माधुरीच्या एवढे प्रेमात होतो, की एक्स्ट्रीम क्लोजअपमध्ये तिच्या चेहऱ्यावर दिसणारी मुरमंही आम्हाला दिसत नव्हती. (आता दिसतात...) 'तेजाब'च्या यशानंतर माधुरी-अनिल कपूर जोडीचे अनेक सिनेमे आले. जीवन एक संघर्ष, किशन-कन्हय्या वगैरे. पण त्यात सर्वाधिक लक्षात राहिला आणि गाजला तो 'शोमन' सुभाष घईंचा 'राम-लखन'... या सिनेमाच्या प्रचंड यशानंतर माधुरी-अनिल कपूर ही तेव्हाची सर्वांत 'हिट अँड हॉट' जोडी ठरली. थोड्यात काळात माधुरी जवळपास सुपरस्टार नायिका झाली. पुढच्याच वर्षी आलेल्या लॉरेन्स डिसूझाच्या 'साजन'नंही प्रचंड यश मिळवलं. सलमान आणि संजय दत्त या दोघा नायकांसमोर लक्षात राहिली ती माधुरीच. तिची नृत्यनिपुणता या चित्रपटात विशेष झळाळून दिसली. अशा माधुरीला १९९१ मध्ये आलेल्या 'प्रहार'मध्ये विनामेकअप कॅमेऱ्यासमोर उभं केलं ते नाना पाटेकरनं. पीटरवर (गौतम जोगळेकर) मनस्वी प्रेम करणारी शर्ली माधुरीनं फार आत्मीयतेनं साकारली. तिच्यातले अभिनयगुण प्रकर्षानं दिसले. विनामेकअपसुद्धा ती अत्यंत सुंदर दिसली आणि नैसर्गिक सौंदर्याला बाह्य सजावटीची गरज नसते, हे सत्य पुन्हा एकदा अधोरेखित झालं. 'दिल'च्या यशानंतर इंद्रकुमारनं माधुरी-अनिल या सुपरहिट जोडीला घेऊन पुढचा सिनेमा आणला - 'बेटा'. या सिनेमानं माधुरीच्या सम्राज्ञीपदावर निर्विवाद शिक्कामोर्तब केलं. आधीच्याच वर्षी यश चोप्रांच्या 'लम्हें'मधून श्रीदेवीनं अप्रतिम भूमिका केली होती. पण माधुरीनं 'बेटा'मधून जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. दोघींच्या या तीव्र स्पर्धेचा पुढच्या दोनच वर्षांत याचा फैसला होणार होता. नंतरच्या वर्षी घईंचा एक सिनेमा आला - 'खलनायक'. संजय दत्त नायक आणि माधुरी नायिका. माधुरी आणि संजयमध्ये काही तरी सुरू असल्याची कुजबुज याच काळातली. १९९३ मध्ये झालेल्या मुंबई बॉम्बस्फोटांत संजय दत्त आरोपी म्हणून सापडला आणि माधुरीनं शहाणपणानं योग्य तो निर्णय घेतला. पुन्हा नंतर त्या दोघांची चर्चा कधीही ऐकू आली नाही. माधुरीची क्रेझ एवढी वाढली, की संजय कपूर आणि तिच्या 'राजा'नामक एका चित्रपटाचं खरं नाव 'रानी' असंच असायला हवं होतं असं लोक म्हणायला लागले. 
पुढचं वर्ष होतं १९९४ आणि याच वर्षानं माधुरीच्या सुपरस्टार पदावर मोहोर उमटवली. सूरज बडजात्यानं 'हम आप के हैं कौन'मधून सलमान आणि माधुरी यांना दिमाखात पेश केलं. लग्नाची व्हिडिओ कॅसेट अशी या सिनेमाची समीक्षकांनी संभावना केली असली, तरी तो त्या वर्षीचा नव्हे, तर हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातला तोपर्यंतचा सर्वाधिक हिट चित्रपट ठरला. तेव्हा २९ वर्षांचा असलेला सलमान आणि २७ वर्षांची माधुरी यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली. घरगुती, कुटुंबात रमणारी, तरीही प्रियकरासाठी क्षणात 'रसिकमोहिनी' होणारी सेन्शुअस निशा माधुरीच्या गात्रागात्रांतून उभी राहिली. भारतीय पुरुषी मानसिकता अचून हेरून सूरज बडजात्यानं 'हम आप के'चं पॅकेज आणलं होतं. ते हिट होणारच होतं. श्रीदेवी हळूहळू फेडआउट होत होती, माधुरी तेव्हा या हिंदी चित्रपटसृष्टीतली एकमेव सुपरस्टार नायिका उरली होती. 
माधुरीनं एवढं प्रचंड यश मिळवलं तरी तिच्या अभिनयक्षमतेविषयी काही समीक्षकांना शंका असायची. माधुरी केवळ सुंदर दिसणं आणि नृत्यनिपुणता याच जोरावर चित्रपटसृष्टीवर राज्य करते आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. हे काही अंशी खरंही होतं. अगदी कस लागेल अशा फार कमी भूमिका माधुरीच्या वाट्याला येत होत्या. त्यांची ही शंका दूर केली ती प्रकाश झा यांच्या १९९७ मध्ये आलेल्या 'मृत्युदंड'ने. या चित्रपटात माधुरीची अभिनयक्षमताही दिसून आली. माधुरीचा झंझावात सुरूच राहिला तो पुढच्या वर्षी आलेल्या यश चोप्रांच्या 'दिल तो पागल है'मुळं. शाहरुख आणि करिश्मा कपूर यांच्या जोडीला असलेली माधुरी हा या चित्रपटाच्या यशाचा महत्त्वाचा 'यूएसपी' होता, यात शंकाच नव्हती. 
यशाची ही चढती कमान आणि अपरंपार यश पदरात असतानाच माधुरीनं सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला तो १९९९ मध्ये लग्न करून! तेव्हा ३२ वर्षांच्या असलेल्या माधुरीनं अमेरिकेतील डॉ. श्रीराम नेने या डॉक्टरशी विवाह केला आणि भारतात एकाच वेळी लाखो हृदयं अक्षरशः विदीर्ण झाली. माधुरीनं हातातले प्रोजेक्ट पूर्ण केले आणि ती अमेरिकेला निघून गेली. मला वाटतं, अनिल कपूरसोबतचा 'पुकार' हा तिचा चित्रपट तिच्या लग्नानंतर प्रदर्शित झाला.  माधुरी बॉलिवूडमधून एखाद्या धूमकेतूसारखी निघून गेली. ती अमेरिकेत स्थायिक झाली, संसारात रमली, तिला दोन मुलं झाली या सगळ्या बातम्या तिचे चाहते उदासपणे वाचत होते, ऐकत होते. पाच वर्षं निघून गेल्यावर अचानक बातमी आली, की संजय लीला भन्साळी शाहरुखला घेऊन 'देवदास' बनवतोय आणि ऐश्वर्या पारो आणि माधुरी 'चंद्रमुखी' करतेय. ही बातमी ऐकताच माधुरीच्या चाहत्यांना अपार आनंद झाला. पुढं भन्साळीनं पडद्यावर आणलेल्या 'देवदास'बद्दल कितीही वाद-प्रवाद झाले, तरी माधुरीच्या 'चंद्रमुखी'नं सर्वांची हृदयं पुन्हा एकदा काबीज केली, यात कुणालाच संशय नव्हता. पं. बिरजू महाराजांच्या नृत्य दिग्दर्शनाखाली 'धाई शाम रोक लई' ही बंदिश स्वतः म्हणत,  अफाट नृत्य करीत तिनं पडद्यावर चंद्रमुखी साक्षात उभी केली. माधुरीच्या या 'कमबॅक'नं ती अद्याप संपलेली नाही, हे सिद्ध केलं. लग्नानंतर नट्यांना कामं मिळत नाहीत, हा समजही तेव्हा हळूहळू दूर होत होता. माधुरीनं त्याचा अचूक फायदा घेतला. पण या सिनेमानंतर ती पुन्हा दीर्घ ब्रेकवर गेली. या वेळी तिच्या दुसऱ्या मुलाचा जन्म झाला. त्यानंतर २००७ मध्ये ती पुन्हा 'आजा नच ले'द्वारे मोठ्या पडद्यावर आली. हा सिनेमा फार चालला नसला, तरी माधुरीच्या अजर सौंदर्याचं आणि थिरकत्या पायांचं कौतुकच झालं. माधुरीनं नंतर भारतात कायमसाठी परत येण्याचा निर्णय घेतला. अगदी दोन वर्षांपूर्वी आलेल्या 'गुलाब गँग'मध्येही तिनं तडफेनं भूमिका साकारली होती. 
माधुरीचं गुणगान गाताना इथं एक सलणारी गोष्ट सांगितलीच पाहिजे. जन्मानं मराठी असलेल्या माधुरीनं मराठी चित्रपटांत वा नाटकांत कधीच काम केलं नाही, ही मराठी रसिकांची खंत आहे. सुयोग नाट्यसंस्थेचे सुधीर भट तिला घेऊन 'लग्नाची बेडी' नाटक पुन्हा रंगमंचावर आणणार आणि माधुरी 'रश्मी' साकारणार, अशी जोरदार चर्चा कित्येक वर्षं ऐकायला येत होती. मात्र, ही कल्पना कधीच वास्तवात उतरली नाही. दुर्गा खोटे, सुलोचनापासून ते स्मिता पाटील, सोनाली कुलकर्णी, ऊर्मिला मातोंडकरपर्यंत सर्व मराठी अभिनेत्रींनी हिंदीबरोबरच मराठीतही (किंवा मराठीसोबत हिंदीतही) उत्तम कामं केली. माधुरी ही मात्र एकमेव अभिनेत्री आहे, की जिनं कधीच मराठी चित्रपट वा नाटकात काम केलं नाही. अगदी पाहुणी कलाकार म्हणून तोंडी लावण्यापुरतंही नाही! मराठी चित्रपट दिग्दर्शक-निर्माते माधुरीच्या बड्या इमेजला टरकून आहेत म्हणावं तर मराठीत अनेक बडे बडे लोक काम करताना दिसतात. माधुरीची स्वतःची कितपत इच्छा आहे, हे कळत नाही. तिची इच्छा असती, तर तिनं एव्हाना नक्कीच मराठीत काम केलं असतं. माधुरी, नाना, सचिन खेडेकर, सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी किंवा अश्विनी भावे या सर्वांना एकत्र आणून महेश मांजरेकर किंवा सचिन कुंडलकर किंवा चंद्रकांत कुलकर्णी यांसारखे बडे दिग्दर्शक एखादा सिनेमा का नाही तयार करत? असा सिनेमा भविष्यात तरी तयार व्हावा, असं वाटतं. 
अर्थात चिरतारुण्याचं वरदान लाभलेल्या या सुंदर, गोड अभिनेत्रीवरचं आमचं प्रेम कायमच राहणार आहे. ती आता पन्नाशीची होईल. यापुढंही ती तिच्या लाजबाव अदांनी आणि त्या मोहक हास्यानं आम्हाला कायम प्रसन्न ठेवील, यात अजिबात शंका नाही.
--- 
(पूर्वप्रसिद्धी : साहित्य शिवार दिवाळी अंक २०१६)

4 Nov 2016

व्हेंटिलेटर रिव्ह्यू

प्रसन्न, ताजा, मोकळा श्वास...
--------------------------------
'श्वास' ते 'व्हेंटिलेटर'... मराठी चित्रपटांचा गेल्या तपातला प्रवास... एक वर्तुळ पूर्ण झालं... काय गंमत आहे पाहा... व्हेंटिलेटर ते श्वास हा खरा जगण्याकडचा प्रवास असतो. पण मराठी सिनेमा श्वास ते व्हेंटिलेटर असा प्रवास करीत 'जगण्या'कडं झेपावतोय.... असो.
फर्स्ट थिंग फर्स्ट. राजेश मापुस्कर दिग्दर्शित 'व्हेंटिलेटर' हा नवा मराठी सिनेमा आपल्याला एक प्रसन्न, ताजा, मोकळा श्वास घेतल्यासारखा निखळ आनंद देतो. खूप दिवसांनी असा स्वच्छ, सुंदर सिनेमा पाहायला मिळालाय. या सिनेमात त्रुटी नाहीतच असं नाही. पण एकूण सिनेमाचा प्रभाव हा पुष्कळच सकारात्मक आणि आनंदीपणाकडं नेणारा आहे.
माणसाच्या जन्म आणि मरणातल्या अगणित क्षणांना आपण जीवन म्हणतो. हे जीवन व्हेंटिलेटर नामक एका यंत्राला बांधलं गेलं, की त्याचा अटळ असा शेवट आला, असंच आपण समजून चालतो. एखाद्याच्या आयुष्यात हा क्षण आला, की त्याच्याशी जोडली गेलेली अगणित आयुष्यं तिथं जमा होतात. त्यांच्याही आयुष्यात मग वेगळ्या पातळ्यांवर उलथापालथी सुरू होतात. हे सगळं शेवटी मग त्या एका श्वासापाशी येऊन थांबतं. हा श्वास कधी थांबवायचा याचा निकाल घेण्याची वेळ ज्या व्यक्तीचा तो श्वास आहे तो सोडून बाकी सर्वांवर येते. इथं मग रक्ताच्या नात्यांची, प्रेमाची, जिव्हाळ्याची, रागाची, लोभाची कसोटी लागते. त्रागा करून चालत नाही. हा सगळा प्रवास अगदी जीवघेणा असतो आणि आपल्यातल्या माणूसपणाला हरघडी आव्हान देणारा असतो.
राजेश मापुस्कर या दिग्दर्शकाला हे नेमकं कळलंय. आपल्याला नक्की काय सांगायचंय याची स्पष्टता दिग्दर्शकाच्या मनात असणं फार महत्त्वाचं असतं. इथं तो प्रश्नच नाही. अर्थात सांगायचं काय हे नुसतं माहिती असून चालत नाही; तर ते नीट सांगण्याची हातोटीही लागते. इथंच दिग्दर्शकाच्या 'दिग्दर्शक' म्हणून असलेल्या कौशल्याचा कस लागतो. चंद्रकांत कुलकर्णी, उमेश कुलकर्णी, सचिन कुंडलकर, मृणाल कुलकर्णी किंवा सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर यांच्या सिनेमांत ही गोष्ट सांगण्याची, बिटवीन द लाइन्स सांगण्याची हातोटी नीट दिसते. राजेशचा हा सिनेमाही अभिमानानं त्यांच्या पंक्तीत स्थान मिळवू शकेल, इतका उजवा झालाय.
गोष्ट तशी साधीच, नेहमीचीच. मुंबईतील गजानन कामेरकर हे गृहस्थ अचानक चक्कर येऊन पडलेयत आणि एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये भरती झाले आहेत. तिथं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलंय आणि प्रकृती गंभीर आहे. अशा वेळी त्यांचे सगळे नातेवाइक तिथं गोळा होतात. कामेरकरांचा मुलगा प्रसन्न (जितेंद्र जोशी) राजकारणात काही तरी धडपड करतोय, पुतण्या राजा (आशुतोष गोवारीकर) प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. इतर काही नातेवाइक श्रीवर्धनवरून यायला निघाले आहेत. प्रत्येकाची काही ना काही तऱ्हा आहे. प्रत्येकाची काही ना काही व्यथा आहे. प्रत्येकाचं काही तरी सांगणं आहे आणि ते सांगण्याची असोशीही आहे.
राजेश मापुस्करचं कौतुक यासाठी, की पात्रांची भाऊगर्दी असूनही त्यानं जवळपास प्रत्येक पात्राला न्याय दिलाय. प्रत्येक पात्र नीट उभं केलंय. त्यांना काही तरी व्यक्तिमत्त्व दिलंय. त्यामुळं लांबीनं अगदी छोटी भूमिका असलेले यातले कलाकारही लक्षात राहतात. कथेतल्या पात्रांचं हे असं नीट मॅपिंग करणं भल्याभल्यांना जमत नाही. फार चांगल्या सिनेेमांतच असं पाहायला मिळतं. राजेशनं पटकथेवर भरपूर काम केल्याचं आणि प्रत्येक दृश्याची नीट सांगड घातल्याचं जाणवतं. त्यामुळं इथं आपल्याला प्रत्येक माणसागणीक एक वेगळा नमुना भेटतो. या नातेवाइकांतील काहींची मांडणी थोडीशी अर्कचित्रात्मक आहे. विशेषतः गावाकडच्या सगळ्या पात्रांना जाणूनबुजून हा बाज देण्यात आला आहे. आणि हे नीट जाणवतं. पण तरीही खटकत नाही. गावाकडची मंडळी मुंबईला यायला निघतात तेव्हाचा सर्वच सिक्वेन्स धमाल जमला आहे. विशेषतः ते वयस्कर आजोबा आणि त्यांच्या लघुशंकेच्या सवयीवर दीर्घ हशे मिळविण्यात आले आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे हे सर्व आता इथं विनोदनिर्मिती करायचीच अशा अहमहमिकेनं केलेलं नाही. ते अगदी स्वाभाविक आणि कथेच्या ओघात आपल्यासमोर येतं. हा बॅलन्स साधणं हे ताकदीच्या दिग्दर्शकाचं काम आहे. राजेशच्या कलाकृतीत ते पूर्णपणे दिसून आलंय. इथं आपले एकसे एक मराठी कलाकारही त्याच्या मदतीला आले आहेत, यात शंका नाही. विशेष उल्लेख करावासा वाटतो, तो सुलभा आर्य, उषा नाडकर्णी, सुकन्या कुलकर्णी-मोने, नम्रता आवटे यांचा. या सर्व अभिनेत्रींनी अगदी थोड्याशा अवकाशातही अभिनयाचा जो वस्तुपाठ समोर ठेवलाय ना, त्याला तोड नाही. शिवाय निखिल रत्नपारखी, विजू खोटे, अभिजित चव्हाण, शशांक शेंडे, नीलेश दिवेकर, भूषण तेलंग, विजय निकम, मनमित पेम या सर्वांनीच दमदार काम केलंय. विशेषतः अश्विनची भूमिका करणाऱ्या संजीव शहांचं काम मला आवडलं. सतीश आळेकरांनी साकारलेले भाऊ पाहण्यासारखे. बमन इराणीची पाहुणा कलाकार म्हणून उपस्थिती आनंददायक! आशुतोष गोवारीकर बऱ्याच दिवसांनी पडद्यावर दर्शन देत असला, तरी त्याचा वावर सहज आहे. मात्र, लोकप्रिय दिग्दर्शकाची भूमिका त्याच्यासाठीच खास तयार केलीय की काय, असं वाटतं. कारण या सर्व खानदानात तोच फक्त वेगळा आहे. अर्थात सिनेमॅटिक लिबर्टी आहेच. या सर्वांत महत्त्वाचा उल्लेख करावासा वाटतो तो जितेंद्र जोशीचा. जितेंद्र हा ताकदीचा अभिनेता आहे, यात शंकाच नाही. या चित्रपटात त्यानं साकारलेला 'प्रसन्न' बघण्यासारखा आहे. या व्यक्तिरेखेचे सर्व कंगोरे अगदी सूक्ष्मपणे त्यानं पकडले आहेत. वडिलांशी कधीही पटलेलं नाही, त्यांनी कायमच आपला राग राग केला या भावनेपासून ते शेवटच्या धक्क्यापर्यंत जितेंद्रनं त्याच्या पात्राचा ग्राफ कसा वरवर नेला आहे, हे प्रत्यक्ष पाहायलाच हवं.
चित्रपटाचं बहुतांश चित्रिकरण हॉस्पिटलमध्ये झालेलं आहे. ते खूप तपशीलवार आणि हळवं आहे. पार्श्वसंगीताचा वापर परिणामकारक आहे. गणपतीच्या दिवसांतलं वातावरण सुरुवातीच्या शीर्षकांच्या वेळी सुंदर टिपलंय.
चित्रपटाच्या सुरुवातीलाच एका दृश्यात प्रियांका (चोप्रा) येते आणि बाप व मुलं यांच्या नात्यावर टिप्पणी करते. हे थोडंसं हेतुतः केल्यासारखं असल्याचं जाणवतं. पण फार खटकत नाही. प्रियांकानं म्हटलेलं प्रमोशनल गाणं एंड स्क्रोलला येतं की काय, असं वाटत होतं. पण सुदैवानं तसं काही नाही.
एकूणच बाप आणि मुलं यांच्या नात्यावर हलकीफुलकी टिप्पणी करणारा, हसत-खेळत मनोरंजन करणारा हा सिनेमा पाहायलाच हवा.
---
दर्जा - चार स्टार
---