30 Dec 2018

बडोदा : नाता‌‌‌ळ ट्रिप

स्टॅच्यू ऑफ युनिटी, नर्मदामय्या आणि नीलकंठधाम...
----------------------------------------------------------------


यंदा कधी नव्हे ते नाताळमध्ये रजा मिळाली. मुलगा व पत्नीसह कुठं तरी फिरायला जायचं होतं चार दिवस! मग पुस्तक प्रकाशन झालं, की बडोद्याला जाऊ असं ठरलं. सरदार वल्लभाई पटेल यांचा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ या नावाचा भव्य पुतळा पाहायचंही डोक्यात होतं. धनश्रीची बहीण मधुरा बडोद्यात राहते. ते दिवाळीला पुण्यात आले, तेव्हा आम्ही नाताळच्या सुट्टीत चार दिवस येऊ, अशी कल्पना त्यांना दिली होती. मी याच वर्षी फेब्रुवारीत बडोद्याला साहित्य संमेलनाला गेलो होतो, तेव्हा एक दिवस तिच्या घरी जाऊन आलो होतो. आता धनश्री व नीललाही हे सुंदर शहर दाखवावं, असं मलाच फार वाटत होतं. दिवाळीत भेटला, तेव्हा नीलेश (माझा साडू) म्हणाला, की मुंबईहून डबल डेकर ट्रेननं या! मला असं काही तरी वेगळं कुणी सांगितलं, की ती गोष्ट करायचीच हे मी पक्कं ठरवून टाकतो. पुणे-मुंबई दरम्यान धावणारी सिंहगड एक्स्प्रेस ही अशी डबल डेकर ट्रेन होती, असं मी ऐकलं होतं. पण त्या ट्रेननं मी कधीच प्रवास केला नव्हता. त्यामुळं बडोद्याला जायचं तर या ट्रेननंच जायचं असं मी ठरवून टाकलं. 
ठरल्याप्रमाणे नाताळ व अंगारकी चतुर्थीच्या दिवशी, म्हणजेच २५ डिसेंबर २०१८ रोजी आम्ही बडोद्याला प्रस्थान ठेवलं. एवढ्या थंडीचं पहाटे उठून पावणेसातला घराबाहेर पडलो. आम्हाला ७.५० ची प्रगती एक्स्प्रेस गाठायची होती. मग ‘उबर’ची कॅब बुक केली. सात वाजता बरोबर निघालो. बाजीराव रोडनं जाताना लक्ष्मी रोडच्या लगत, नूमविच्या दिशेनं वळलेली भली-मोठी रांग दिसली. ‘दगडूशेठ’च्या दर्शनासाठीची ही रांग असणार, हे लक्षात आलं आणि मी थक्क झालो. मी त्या रांगेतल्या भाविकांनाच नमस्कार केला. एवढ्या भाविकांचं सकाळी सकाळी दर्शन झालं, म्हणजे आता आपला प्रवास सुरळीत होणार, याची खात्रीच पटली. 
वेळेत स्टेशनला पोचलो. मुख्य प्रवेशद्वारातच ट्रॅफिक जॅम होतं. त्यामुळं अलीकडंच उतरून चालत जावं लागलं. ‘डेक्कन क्वीन’चा मान ‘प्रगती’ला नाही, हे माहिती होतंच. त्यामुळं ती पाच नंबरच्या फलाटावरून सुटणार असल्याचं बोर्डावर पाहून आश्चर्य वाटलं नाही. निमूटपणे तो फूटओव्हर ब्रिज चढून त्या फलाटावर गेलो. गाडी लागली होतीच. सुदैवानं या वेळी गाडीचे सगळे कोच रिनोव्हेट केलेले दिसले. नवा गुलाबी, चॉकलेटी असा रंग बाहेरून दिला होता. आतून हिरव्या हिरव्या फुलांचं बारीक डिझाइन होतं. गाडीत अपेक्षेप्रमाणं आमची रिझर्व्ह सीट्स एका रांगेत नव्हतीच. मग गाडीत सगळेच लोक अॅडजस्ट करतात, तसं कुणी कुणी अॅडजस्ट करून एकदाचे आम्ही एका सलग बाकड्यावर आलो. या सीट्सविषयी माझी नेहमीची तक्रार आहे, की त्यावर तीन मोठी माणसं नीट बसू शकत नाहीत. जरा ऐसपैस असं बसता येतच नाही. पण आमच्यासोबत नील असल्यानं आम्ही फार अडचण न येता मावू शकलो. गाडी अपेक्षेप्रमाणे थोडी लेट दादरला पोचली. तिथं हॉटेलमध्ये खाऊन, जरा बाजारात भटकून आम्ही टॅक्सीनं मुंबई सेंट्रलला आलो. अहमदाबादवरून आलेली डबल डेकर एक नंबरच्या फलाटाला लागली होती. आम्ही पावणेदोनलाच त्या ट्रेनमध्ये जाऊन बसलो. आमचे सीट्स वरच्या डेकला आले होते. त्यामुळं नीलला ते सगळं फारच भारी वाटत होतं. आणि अर्थात मलाही! मग लगेच त्या ट्रेनमधल्या सुख-सुविधांचा व्हिडिओ काढून झाला. ट्रेन सगळी एसी असल्यानं प्रवास सुखाचा झाला. खायची-प्यायची शब्दश: ‘रेल’चेल होती. बडोद्यात ही ट्रेन वेळेत, म्हणजे संध्याकाळी ७.३३ ला पोचली. आमचे यजमान नीलेश व मधुरा आम्हाला न्यायला स्टेशनला आले होते. त्यामुळं त्यांच्या घरी अगदी सुखानं पोचलो.

झू आणि म्युझियम...

दुसऱ्या दिवशी आम्ही बडोद्यातलं झू आणि तिथंच असलेलं ‘बडोदा म्युझियम अँड पिक्चर गॅलरी’ पाहिलं. कुठल्याही शहरातलं प्राणिसंग्रहालय पाहायला मला आवडतंच. सयाजीबागेतलं ‘झू’ही चांगलं आहे, असं ऐकलं होतं आणि फेब्रुवारीतल्या ट्रिपमध्ये तेच पाहायचं राहिलं होतं. मग आम्ही सकाळी आधी तिथं गेलो. सयाजीबागेचा परिसर प्रशस्त आणि चांगला आहे. पण तिथल्या प्राणिसंग्रहालयाच्या नूतनीकरणाचं काम सुरू होतं. त्यामुळं एकूणच त्या भागाला जरा अवकळाच आली होती. शाळांच्या सहली धपाधप येत होत्या. प्राणिसंग्रहालयात फार माकडं नव्हती. त्याची सगळी कसर या सहलीतली मुलं भरून काढत होती. ‘झू’मध्ये बिबटे बरेच होते. सिंह-सिंहिणीची एक जोडी होती. सिंहीण म्याडम झोपल्या होत्या. पोरांचा गलका ऐकूनही त्यांच्या झोपेवर कसलाही परिणाम झाला नाही. सिंहमहाराजांनी आळस देण्याचेच दोन-चार प्रकार करून दाखवले व ते आमच्याकडं चक्क पाठ करून झोपी गेले. कुठल्याही राजाला शोभेल असंच त्यांचं हे वर्तन होतं. 
पुन्हा पुढच्या पिंजऱ्यांत बिबट्यांचीच वस्ती होती. अर्थात प्रत्येकाची वेगळी तऱ्हा होती. एक फारच देखणा होता. रुबाबात पुढच्या पायावर पाय टाकून बसला होता. अनेक मुलांचा चित्ता व बिबट्या यात गोंधळ होत होता. पुढं एक पाणघोडाही होता. आम्ही आलेले बघून तो पाण्यातून निघून कोपऱ्यातल्या पिंजऱ्यात निघून गेला. अप्पलपोट्या कुठला! पिवळ्या (रॉयल बेंगॉल) वाघाचा वेगळा विभाग होता. तिथंच एक सगळे केस झडलेलं म्हातारं अस्वलही होतं. दोन पिवळे वाघ (त्यातही एक वाघीण असावी) मात्र अत्यंत रुबाबदार आणि देखणे होते. त्या वाघाला बघून सगळे पैसे वसूल झाले. त्या एवढ्याशा पिंजऱ्यात ते अत्यंत देखणं जनावर अगदी अस्वस्थपणे फेऱ्या घालत होतं. अशा प्राण्यांना पिंजऱ्यांत ठेवता कामा नयेच, असं परत एकदा वाटून गेलं. 
प्राणिसंग्रहालयाच्याच तिकिटात पक्ष्यांचं वेगळं संग्रहालयही पाहायची सोय होती. तिकडं जाता जाता दोन मगरीही पाहायला मिळाल्या. (बडोद्याच्या विश्वामित्री नदीत अनेक मगरी आहेत. त्यातल्या किती तरी आम्ही नंतर पुलावरून पाहिल्या.) या पक्षिसंग्रहालयाच्या दारातच एक कावळा होता. तो पाहिल्यावर ‘हा बघा पहिला पक्षी’ असा काही तरी विनोद मी केला. तो त्या गेटकीपरनं ऐकला. ते मराठीच गृहस्थ होते. (बडोद्यात फ्रिक्वेंटली मराठी कानावर पडतं.) ते लगेच म्हणाले, ‘हा तर सगळ्यांचा बाप आहे!’ त्यांच्या या उत्स्फूर्त कमेंटला दाद देऊन आम्ही पुढं गेलो. या पक्ष्यांच्या संग्रहालयात मात्र अगणित देशी-विदेशी पक्षी होते. तिथं थोडा वेळ रेंगाळून मग आम्ही म्युझियमकडं वळलो.
या संग्रहालयात उत्तमोत्तम चित्रं तर आहेतच, पण मला आवडला तो वाद्यांचा विभाग. याशिवाय तळमजल्यावर असलेला देवमाशाचा ७० फुटी अजस्र सांगाडा हेही या संग्रहालयाचं  वैशिष्ट्य. 
संध्याकाळी मग आम्ही बडोद्याचा प्रसिद्ध लक्ष्मीविलास पॅलेस पाहायला गेलो. हा पॅलेस मी गेल्या वेळी पाहिला होता. पण धनश्री व नीलला दाखवायचा होता. म्हणून मग २२५ रुपयांचं तिकीट काढून परत गेलो. इथं मराठीतून गाइडचं निवेदन इअरफोनद्वारे ऐकायची सोय आहे. पण अनेकदा ते निवेदन मधेच बंद पडायचं किंवा पुढं-मागं व्हायचं. मग ते नीट सेट करून द्यायचं, हा मला एक उद्योगच झाला. हा भव्य पॅलेस पाहून झाल्यावर फोटो सेशन झालं. संध्याकाळी शॉपिंग झालंच!

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’कडे


दुसऱ्या दिवशी आम्हाला ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पाहायला, म्हणजेच सरदार पटेलांचा तो भव्य पुतळा पाहायला जायचं होतं. मात्र, आमच्या यजमानांना ऐन वेळी येणं जमत नसल्यानं त्यांनी सरळ आमच्या हाती त्यांच्या कारची किल्ली ठेवली व ‘तुम्ही तरी जाऊन या,’ असं सांगितलं. मग त्यांचा मुलगा ईशान आणि आम्ही तिघं भल्या पहाटे साडेसहाला त्यांची कार घेऊन ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या दिशेनं निघालो. डभोई मार्गे रस्ता होता, हे माहिती होतं. मग गुगलताईंच्या मदतीनं मार्गस्थ झालो. अजून रस्त्यावर अंधार होता. बडोद्याच्या बाहेर पडायला फार वेळ लागला नाही. आपण साधारण आग्नेय दिशेला जाणार हे माहिती होतं. गुजरातमधल्या रस्त्यांचं अनेकांनी कौतुक केलंय. त्यामुळं पुन्हा ते अधोरेखित करत नाही. राज्य रस्ता असला, तरी चौपदरी आणि खड्डेविरहित रस्ता असल्यानं आम्ही दीड तासातच ९४ किलोमीटर अंतर कापून ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोचलो. तिथून आम्ही थेट आत गाडी दामटली. मात्र, पहिल्याच ‘सिक्युरिटी चेक’ला कळलं, की गाडी मागेच मुख्य प्रवेशद्वारावर पार्क करायची व तिथून ‘हॉप ऑन हॉप ऑफ’ बसनी पुतळ्यापर्यंत जायचं. मग गाडी पार्क केली आणि तिकीट खिडकीकडं निघालो. तिथंच डावीकडं महात्मा गांधी व सरदार पटेल यांचे अर्धपुतळे होते. टिपिकल सरकारी वाटेल, असं पाच-सहा खिडक्या असलेलं ते ‘पर्यटक सूचना केंद्र’ होतं. इथं सगळ्या पाट्या गुजराती व इंग्रजीत होत्या. खिडक्या उघडायला वेळ होता. मात्र, आधी जे ऐकलं होतं, की रोज इथं ३० हजार, ३५ हजार लोक येतायेत वगैरे तेवढी काही गर्दी निदान सकाळच्या त्या वेळी तरी नव्हती. आम्ही सगळे मिळून शंभर ते दीडशे लोक त्या पाच-सहा खिडक्यांच्या समोर उभे असू. तीन प्रकारची तिकिटं होती. पहिलं तिकीट १२० रुपये प्रौढांना व ६० रुपये लहान मुलांना. यात फक्त पुतळ्याच्या पायांपर्यंत व खाली जे संग्रहालय आहे तिथपर्यंत जाता येतं. दुसरं तिकीट ३५० रुपये प्रौढांना व २०० रुपये लहानांना! यात सरदार पटेलांच्या ‘हृदयस्थानी’ म्हणजे साधारण १३५ मीटर उंचीवर एक व्ह्यूइंग गॅलरी आहे, तिथपर्यंत जाता येतं. या पुतळ्याच्या पायाशी दोन लिफ्ट आहेत. त्यातून वरपर्यंत जाता येतं. तिसरं तिकीट आहे एक्स्प्रेस तिकीट. याचा दर आहे एक हजार रुपये. (यात लहान-मोठे अशी वर्गवारी दिसली नाही. सरसकट प्रति व्यक्ती एक हजार रुपये असावं.) यात कुठल्याही रांगेत न थांबता सगळीकडं थेट प्रवेश मिळायची सोय आहे. आम्हाला वेळ होता, त्यामुळं आम्ही ३५० रुपयांचं तिकीट काढलं. याशिवाय प्रतिमाणशी ३० रुपये बसचं तिकीट मोजावं लागलं. यातही पूर्ण व अर्धं तिकीट असा प्रकार नव्हता, तर सरसकट ३० रुपये आकारले जात होते. (गमतीचा भाग म्हणजे कॅश पैसे देणाऱ्यांसाठी चार दोन-तीन खिडक्या होत्या, तर कार्ड पेमेंटची एकच खिडकी होती.) आम्ही तिकिटं हाती पडताच बसकडं धावलो. पहिली बस भरली होती. पण त्यात नेमक्या चार जागा होत्या. मग आम्ही तीच बस पकडून पुतळ्याकडं निघालो. मगाशी कार घेऊन पुढं आल्यानं पुतळ्याचं दर्शन लांबून झालंच होतं. आता बसमधून तो पुतळा नीट दिसायला लागला. पुतळा अत्यंत उंच असल्यानं लांबूनही दिसत होता. आतमध्ये साधारण पाच किलोमीटर अंतर गेल्यावर बसनं आम्हाला पुतळ्यापाशी सोडलं. त्या पुतळ्याची भव्यता आता जाणवू लागली होती. नर्मदेच्या पात्रात आत भराव घालून त्यावर हा टोलेजंग पुतळा उभारण्यात आला आहे. डाव्या बाजूला सरदार सरोवराची भिंत आहे आणि हा पुतळा धरणाकडं तोंड करून उभा आहे. पाया, त्यावरची मोठी इमारत आणि त्यावर उभा पुतळा अशी एकूण उंची तब्बल १८२ मीटर आहे. ही उंची ९३ मीटर उंचीच्या ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’च्या जवळपास दुप्पट आहे. बसनं जिथून आत सोडलं, तिथून पुतळ्याकडे जायच्या मुख्य रस्त्यापर्यंत भरपूर मोकळी जागा, बसायला बाक वगैरे सुविधा केल्या आहेत. संध्याकाळी तिथं छान वाटत असणार. एक साउंड अँड लाइट (की लेझर?) शोदेखील असतो. तो आम्हाला अर्थातच पाहायला मिळाला नाही. आम्ही पुतळ्याच्या दिशेने जाऊ लागलो, तसतसा वाढत्या गर्दीचा अंदाज यायला लागला. मग पुन्हा एकदा रीतसर तपासणी झाली. खाण्याचे पदार्थ इथून पुढं आत नेऊ देत नाहीत. आमच्याकडंची खाण्याची पिशवी तिकीट काउंटरला ठेवावी लागली. पाण्याची बाटली नेऊ देतात. इथून पुढं पुतळ्यापर्यंत सर्वत्र सरकते जिने आहेत. पुतळ्याच्या खाली म्युझियम आहे. मात्र, आम्हाला व्ह्यूइंग गॅलरीत जायचं होतं. इथंही शालेय सहलींचा सुळसुळाट होताच. त्या मुलांच्या मधून वाट काढत आम्ही वरपर्यंत गेलो. लिफ्टपाशी थोडी रांग होती. दोन बाजूला दोन लिफ्ट होत्या. आमच्याआधी १४-१५ जण गेल्यानंतर आम्हीच लिफ्टसमोर येऊन थांबलो. पुढच्याच खेपेला आमचा नंबर लागला. आमच्याशेजारी एक्स्प्रेस तिकीट काढलेलं एकच कुटुंब होतं. आम्ही त्यांच्या बरोबरीनं आत शिरलो. 
अवघ्या काही सेकंदांत ती लिफ्ट ४५ व्या मजल्यावर असलेल्या त्या व्ह्यूइंग गॅलरीपर्यंत पोचली. आम्ही बाहेर शिरलो. दोन्ही बाजूंनी जाळ्यांमधून समोरचं विहंगम दृश्य दिसत होतं. सरदार सरोवराची भिंत व समोर वाहणारी नर्मदा मय्या दिसत होती. ती गॅलरीची जागाही बऱ्यापैकी प्रशस्त होती. साधारण दोनशे लोक मावू शकतील एवढी! (तिथं टॉयलेट्सचीही सुविधा होती.) आम्ही भरपूर फोटो काढले. व्हिडिओ शूट केला आणि खाली उतरलो. खाली आल्यावर बेसमेंटमध्ये असलेलं म्युझियम पाहिलं. तिथं सरदार पटेल यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची प्रतिकृती व त्यांच्या फक्त चेहऱ्याचा वेगळा पुतळा उभारण्यात आला आहे. हा चेहरा मुख्य पुतळ्याच्या चेहऱ्याच्या एक पंचमांश आकाराचा आहे. तिथं सेल्फीसाठी झुंबड उडाली होती. सरदार पटेल यांचं जीवनकार्य सांगणारे मोठमोठे भित्तीफलक सगळीकडं लावले आहेत. एका छोट्या थिएटरमध्ये त्यांच्यावरील फिल्म दाखवली जात होती. जागोजागी वॉशरूमच्या सुविधा होत्या. आम्ही हे सगळं पाहून वर पुन्हा त्यांच्या पायांजवळच्या भागात गेलो. इथंही सहलीला आलेली अनेक मुलं बसली होती. पुतळ्याच्या उजव्या बाजूला नर्मदा नदीचं पात्र दिसत होतं. धरणात पाणी अडवल्यानं नदीच्या पात्रात फार पाणी नव्हतंच. नर्मदामय्या आणि मागं असलेली सरदार सरोवराची ती भिंत पाहिल्यावर मेधा पाटकर, त्यांचा संघर्ष, सातपुड्यातले आदिवासी आणि धरणग्रस्तांची सगळी कैफियत आठवल्याशिवाय राहिली नाही. मी पत्रकारितेत आल्यापासून, म्हणजे गेल्या २०-२२ वर्षांपासून या आंदोलनाच्या बातम्या पाहत आलो आहे. अनेकदा एजन्सीवरच्या बातम्या भाषांतरित केल्या आहेत. त्या आंदोलनाविषयी येणारे सगळे लेख, वार्तांकन नेहमीच वाचत आलो आहे. आज सरदार पटेलांच्या त्या भव्य पुतळ्याखाली उभं राहताना मन दोलायमान झालं. एकीकडं एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं वाटेल असं पर्यटन स्थळ उभारल्याबद्दल आपल्या सरकारचं कौतुक करावं, की आदिवासींच्या जमिनी घेऊन त्यावर उभारलेल्या या धरणाच्या निर्मितीबद्दल खेद व्यक्त करावा, हे कळेनासं झालं. 
आम्ही थोड्याच वेळात हे ठिकाण सोडलं व बसमध्ये येऊन बसलो. या बस इतर काही पॉइंट दाखवून मग पुन्हा पहिल्या ठिकाणी येतात. त्यामुळं आम्हाला अजून पुढं जावं लागलं. त्यापैकी ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ इथं एक चांगलं फुलांचं उद्यान विकसित केलं जातंय. पुढं धरणाच्या भिंतीजवळ असलेल्या एका पॉइंटपाशी आम्ही गेलो, तेव्हा मात्र कंटाळा आला. इथं मी एकट्यानंच वर जाऊन तो पॉइंट पाहून आलो. इथं महाराष्ट्राकडं जाणारी, ‘धुळे १ & २’ अशी फिकट पाटी असलेली विजेची लाइन दिसली. धरणाची ती अजस्र भिंत पाहून पुन्हा नर्मदा धरणग्रस्तांचेच चेहरे दिसायला लागले. परतलो. आता मात्र आम्हाला थेट पार्किंगकडं जायचं होतं. मग तशी एक बस बघूनच बसलो आणि पुन्हा जिथं कार लावली होती, तिथपर्यंत आलो.
आता परतीचा प्रवास सुरू केला. नीलकंठ धाम हे एक नर्मदेच्या काठचं अप्रतिम ठिकाण आहे आणि तिथं स्वामीनारायण मंदिर आहे, असं नीलेशनं सांगितलं होतं. आम्हाला भूकही लागली होती. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या जवळ खाण्याच्या फारशा सोयी नव्हत्या. नीलकंठ धामला बरा कॅफेटेरिया आहे, असं कळलं होतं. मग पुन्हा जीपीएस लावून तिकडं मोर्चा वळवला. भर दुपारी दीड वाजता आम्ही तिथं पोचलो. आधी पोटपूजा केली. नंतर हे मंदिर तीनपर्यंत बंद असतं, असं कळलं. तोपर्यंत थांबायला वेळ नव्हता. मग सरळ तिथून निघालो आणि दीड तासात बडोद्याला घरी येऊन पोचलो. 
संध्याकाळी नीलेश आम्हाला बडोद्यातली फेमस राजस्थानी पाणीपुरी खायला घेऊन गेला. ती पाणीपुरी ‘आरओ’ पाण्यात करतात म्हणे. पण एका प्लेटमध्ये आठ पुऱ्या देतात आणि ते पाणीही मस्त, खमंग होतं. शेजारीच ‘लाइव्ह ढोकळा’ हे दुकान होतं. इथं आपल्यासमोर गरम ढोकळा (पातळ, पाटवडीसारखा) काढून देतात. त्याबरोबरची चटणी मस्त होती. इथं दोन प्लेट हादडून मग आम्ही निघालो... नंतर शॉपिंगही झालंच!
दुसऱ्या दिवशी सकाळी ७.४८ ची डबल डेकर ट्रेन पकडायची होती. बडोद्यात जुगनू नावाचं अॅप आहे. त्यावरून रिक्षा मागवता येते. तशी रिक्षा मागवून आम्ही सकाळी स्टेशनला निघालो. वेळेत पोचलो. ट्रेनही वेळेत आली. नाश्त्याला छान पोहे मिळाले. या वेळी आमच्या सीट्स वरही नाही आणि खालीही नाही अशा दाराच्या समोर जी तीन ओ‌ळी असतात, त्यात आल्या होत्या. त्यामुळं वैताग आला. अर्थात एसी ट्रेन असल्यानं प्रवासात बाकी त्रास काही झाला नाही. शिवाय ट्रेन वेळेत मुंबई सेंट्रलला पोचली. 
तिथून आम्हाला चेंबूरला एका लग्नस्थळी जायचं होतं. मुंबईच्या टॅक्सीवाल्यांचा माझा आतापर्यंतचा अनुभव चांगला होता. या वेळी मात्र सगळ्यांनी त्या लौकिकाला बट्टा लावायचं ठरवलेलं दिसलं. एक तर आम्हाला घाई होती, म्हणूनन आम्ही रांग सोडून भलत्याच टॅक्सीवाल्याला विचारलं, हे चुकलंच. त्याला वाटलं, आम्ही नवी पाखरं! त्यानं गाडीत सामान टाकलं आणि पाचशे रुपये द्या म्हणाला. मग मी त्याला पुणेरी प्लस पत्रकारी असा डबल हिसका दाखवल्यावर त्यानं गुपचूप टॅक्सी थांबविली आणि सामान काढून दिलं. ‘उबर’चाही अनुभव वाईट आला. एक तर नेटवर्कच येईना. मग दोघांनी आमची ट्रिप कॅन्सल केली, तर आम्ही एकाची. शेवटी एक जण आला. तो एक मध्यमवर्गीय दक्षिण भारतीय टॅक्सीवाला होता. त्यानं मात्र आम्हाला इमानेइतबारे इष्टस्थळी नेऊन पोचवलं. पाचशे रुपयांच्या निम्मेही पैसे लागले नाहीत. लग्नात सगळे जिवाभावाचे लोक भेटले. त्यांनी पुण्याहून बस आणली होती. त्या बसमधूनच रात्री साडेआठला घरापर्यंत पोचलो आणि चार दिवसांची छोटीशी ट्रिप ‘सुफळ संपूर्ण’ झाली...

----








18 Dec 2018

नूतन - मोहनगरी दिवाळी अंक लेख

मुक्त-स्वच्छंद 'बंदिनी'
---------------------



ती... मूर्तिमंत सोज्वळ सौंदर्य... अस्सल भारतीय, खानदानी, कुलीन चेहरा! तिच्या चेहऱ्यावर तेज होतं... तिच्या टपोऱ्या काळ्याभोर डोळ्यांत सुंदर स्वप्नांची सैर करायचं शालीन आवाहन होतं... तिच्या हास्यात नैराश्य पळवून लावणारी आश्वासक मोहकता होती... भारतीय स्त्रीला सहसा न लाभणारी चांगली उंची तिला लाभली होतीच; पण आपल्या सहज, नैसर्गिक अभिनयाद्वारे तिनं चित्रपटसृष्टीत गाठलेली उंची अधिक उत्तुंग होती... 
ही अभिनेत्री म्हणजे नूतन! नूतन कुमारसेन समर्थ! नुसती आडनावाने नव्हे, तर खऱ्या अर्थानं समर्थ स्त्री... समर्थ, सोज्वळ, सात्त्विक आणि सुंदर! भारतीय चित्रपटसृष्टीला लाभलेल्या काही अप्रतिम अभिनेत्रींपैकी एक म्हणजे नूतन. नूतन भारतीय स्त्रीचं साक्षात प्रतीक होती. तशीच दुसरी अभिनेत्री म्हणजे वहिदा रेहमान! एक मराठी, तर दुसरी दाक्षिणात्य- तमिळी, पण हैदराबादमध्ये वाढलेली! एक हिंदू, तर दुसरी मुस्लिम... पण दोघींच्याही चेहऱ्यांत ते भारतीय स्त्रीचं देखणं रूप होतं. दोघींमध्येही आसेतुहिमाचल भारतवर्षाला भावणारं 'अपील' होतं. देशाच्या गंगा-जमनी परंपरेचं हे एक प्रतीकच जणू! 
या दोघींपैकी नूतननं केलेल्या सामाजिक चित्रपटांचा विचार इथं आपण करणार आहोत. कुठलीही कलाकृती सुरुवातीला त्या काळाचं 'प्रॉडक्ट' असते. पुढं त्या कलाकृतीला कालातीत असण्याचा दर्जा मिळणार की ती काळाच्या उदरात गडप होणार हेही काळच ठरवतो. तेव्हा बहुतांश कलाकृती जन्माला येताना त्यांच्यावर त्या काळाचा प्रभाव, परिणाम, शिक्का असतोच असतो. सिनेमासारख्या सामाजिक कलेच्या बाबतीत तर हे आणखीनच खरं ठरतं. नूतननं केलेल्या सामाजिक चित्रपटांचा विचार करताना त्या काळातल्या समाजजीवनाचा, सामाजिक परिस्थितीचा आणि एकूणच कलाव्यवहाराचा मागोवा घेणं अप्रस्तुत ठरणार नाही.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अवघ्या भारतवर्षात एक चैतन्याचं, उत्साहाचं, आत्मविश्वासाचं सळसळतं वातावरण होतं. पंडित जवाहरलाल नेहरूंसारखा आंतरराष्ट्रीय दर्जाचा मुत्सद्दी देशाला पंतप्रधान म्हणून लाभला होता. वेगवेगळ्या क्षेत्रांत भरीव काही तरी करून दाखविण्याचं स्वप्न त्यांनी इथल्या तरुणाईच्या डोळ्यांत पेरलं होतं. विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक सुधारणा, पायाभूत सुविधा, खेळ, कला या क्षेत्रांत नवनवे प्रयोग होते. कलाकारांसाठी तर 'नवनवोन्मेषशालिनी' वातावरण होतं. फाळणीनंतरच्या भारतात राहिलेल्या ३३ कोटी लोकांसाठी ती एका नव्या जन्माचीच सुरुवात होती. भारतात स्वातंत्र्यापूर्वी सामाजिक सुधारणांमध्ये बंगाल आणि महाराष्ट्र ही दोन राज्ये अग्रेसर होती. बंगालचे सुपुत्र बिमल रॉय आणि महाराष्ट्रकन्या नूतन यांनी पुढं जे 'एक से एक' चित्रपट दिले, त्याची मुळं या दोन्ही राज्यांच्या पुरोगामी परंपरेमध्ये होती. स्वातंत्र्यापूर्वीही 'अछूत कन्या'सारख्या सिनेमांद्वारे 'बॉम्बे टॉकीज'चे हिमांशू रॉय यांनी अशा सामाजिक सुधारणांना चालना देणाऱ्या सिनेमांची निर्मिती केलीच होती. मात्र, स्वातंत्र्योत्तर काळातील दशकात या प्रक्रियेला खऱ्या अर्थानं वेग आला. राज कपूर, मेहबूब खान, सत्यजित राय, बिमल रॉय, बी. आर. चोप्रा, व्ही. शांताराम आदी प्रमुख दिग्दर्शकांनी यात प्रामुख्यानं पुढाकार घेतला. या बहुतेकांवर नेहरू प्रणीत समाजवादी विचारसरणीचा जबरदस्त प्रभाव दिसून येतो. राज कपूरवर चार्ली चॅप्लिनच्या शैलीचा पगडा होता, तर बंगाली दिग्दर्शकांवर बंगाली क्लासिक कादंबऱ्यांचा... यातूनच मग आवारा, श्री ४२०, दो बिघा जमीन, बूट पॉलिश, देवदास, पथेर पांचाली, सीमा, सुजाता, नया दौर, बंदिनी, दो आँखे बारह हाथ अशा चित्रपटांची निर्मिती झाली. यातले बहुतेक चित्रपट १९५१ ते १९६० या दशकात आले, हे लक्षात घेण्यासारखं आहे. तत्कालीन सामाजिक जीवनाचं दर्शन या चित्रपटांमध्ये घडतं. आत्यंतिक गरिबी, स्त्रीला कस्पटासमान मिळणारी वागणूक, जमीनदारी व त्यातून येणारी मस्तवाल सरंजामशाही, जातिभेद, स्पृश्यास्पृश्यता अशा अनेक नकारात्मक रुढी-प्रथांनी तेव्हाचा समाज ग्रस्त होता. मुळात या काही चुकीच्या गोष्टी आहेत, याचीही जाणीव नव्हती. महाराष्ट्र व बंगालमध्ये अनेक समाजसुधारकांनी या प्रथांना कडाडून विरोध चालविला होता. जनजागृती होत होती. मात्र, ब्रिटिश राजवटीमुळं या सर्व प्रयत्नांना मर्यादा येत होत्या. स्वातंत्र्यानंतर या मर्यादा संपल्या. नेहरूंसारखा द्रष्टा नेता पंतप्रधानपदी आल्यानंतर त्यांनी पुढील काळात या सुधारणांना सर्व माध्यमांतून अप्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या वेग दिला. समाजातील बहुतेक सर्व घटकांनी त्यांना यात पाठिंबा दिला. एवढंच नव्हे, तर सक्रिय सहभागही घेतला. यात अर्थात लेखक, कादंबरीकार व चित्रपट दिग्दर्शकही आले. या दिग्दर्शकांना आपल्या कलाकृतींसाठी उत्तम कथा हवी होती, उत्तम अभिनेते-अभिनेत्री हव्या होत्या, उत्तम संगीत हवं होतं आणि उत्तम गीतकारही हवे होते! आपलं (आणि या दिग्दर्शकांचंही) भाग्य असं, की त्यांना नूतन मिळाली! 
नूतनचा जन्म ४ जून १९३६ चा. तिची आई अभिनेत्री शोभना समर्थ आणि पिता संगीतकार-दिग्दर्शक कुमारसेन समर्थ. नूतन उच्चभ्रू सीकेपी समाजात जन्मली. लाडाकोडात वाढली. जिला गरिबी माहिती नाही, अशा या अभिनेत्रीनं पुढच्या काळात वंचित, पददलित, असहाय अबला स्त्रियांच्या अनेक भूमिका केल्या. त्यासाठी तिला अनेक पुरस्कार मिळाले. नूतनच्या अभिनय सामर्थ्याचीच ही पावती होय. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार पाच वेळा मिळविण्याचा विक्रम तिच्या नावावर तीस वर्षं होता. (पुढं तिचीच भाची काजोलनं त्याची बरोबरी केली.) नूतननं १९५० मध्ये 'हमारी बेटी' या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं आणि पुढची चार दशकं तिनं आपल्या दमदार अस्तित्वानं ही चित्रपटसृष्टी गाजवत ठेवली. वास्तविक तिचा पहिला चित्रपट तिच्या आईनंच दिग्दर्शित केला होता. मात्र, या चित्रपटात व पुढच्या काही चित्रपटांतही यश न आल्यानं शोभना समर्थ यांनी तिला स्वित्झर्लंडला पाठवून दिलं होतं. ते एक वर्ष आपल्या आयुष्यातलं एक संस्मरणीय वर्ष होतं, असं नूतन सांगत असे. त्यापूर्वी १९५२ मध्ये तिला 'मिस इंडिया' स्पर्धेत यश मिळालं होतं, पण चित्रपटसृष्टीत म्हणावा तसा ब्रेक मिळत नव्हता. तो तिला मिळाला १९५५ मध्ये आलेल्या अमिया चक्रवर्तींच्या 'सीमा'मुळं...

यशास 'सीमा' नुरली...

श्रीमंतीत, लाडाकोडात वाढलेल्या नूतनला या चित्रपटात साकारावी लागली 'गौरी' या अनाथ तरुणीची भूमिका. स्वतः नूतन त्या वेळी अवघी १८-१९ वर्षांची होती. काका-काकूंच्या घरी राहत असलेली, चुलीवर स्वयंपाक करणारी, श्रीमंत मालकांकडं घरकाम करणारी, तिथल्या दुष्ट नोकराच्या कारस्थानांना बळी पडणारी, पोलिसांकडून चोरीचा खोटा आळ आल्यावर संतापणारी, नंतर महिला अनाथाश्रमात दाखल झाल्यावरही अखंड धगधगत राहणारी गौरी नूतननं अशी काही कमाल उभी केली आहे, की बस्स! 
प्रेम नावाच्या भावनेलाच पारखी झालेली ही मुलगी मग अनाथाश्रमाचे संचालक अशोकबाबू (बलराज साहनी) आणि तिथंच काम करीत असलेली पुतली (क्या बात है! - शुभा खोटे यांचा पहिला चित्रपट...) यांच्या सान्निध्यानं हळूहळू कशी बदलत जाते, याची ही कथा! 'बात बात पे रुठो ना, अपने आप को लुटो ना' या हसरत जयपुरींच्या शब्दांवर, शंकर-जयकिशनच्या संगीतावर व लताच्या गोड गळ्यावर अगदी नैसर्गिक अभिनय करणारी नूतन पाहतच राहावीशी वाटते. 'तू प्यार का सागर है' या गाण्याच्या वेळी खोलीत बंद केल्यानं धुमसत असलेली नूतन केवळ लाजवाब! 'सुनो छोटी सी गुडिया की लंबी कहानी' म्हणत नूतननं तिच्या पुढच्या कारकिर्दीच्या दीर्घ यशाच्या कहाणीचं सूतोवाच जणू केलं होतं. या चित्रपटानं नूतनच्या अभिनयक्षमतेवर शिक्कामोर्तब केलं. सुरुवातीला मुलांसोबत गाणारी, नंतर काकूनं घराबाहेर काढल्यावर असहायपणे तिची विनवणी करणारी, नंतर तिला फसविणाऱ्या बांकेलालला (सी. एस. दुबे) छडीनं फोडून काढणारी, पुतलीला जीव लावणारी, बाबूजींच्या प्रेमानं विरघळणारी, मनातलं प्रेम सांगता न येणारी आणि शेवटी आश्रमाबाहेर पडलेल्या आजारी बाबूजींना परत आणण्यासाठी धाव घेणारी... गौरीची ही प्रत्येक रूपं नूतननं एवढ्या लहान वयातही विलक्षण प्रत्ययकारकरीत्या दाखविली. या चित्रपटामध्ये एक दृश्य आहे. घरातून काकूनं बाहेर काढल्यानंतर भर पावसात महात्मा गांधींच्या शिल्पाखाली पावसात भिजताना अश्रूंना मोकळी वाट करून देणारी गौरी दिसते. महात्मा गांधींची हत्या होऊन तेव्हा सहा-सात वर्षंच झाली होती. देश बापूजींच्या आठवणींनी तळमळत होता. दिग्दर्शक अमिया चक्रवर्तींनी या भावनेचा उपयोग या दृश्यात करून घेतला आहे. (त्या दशकातील बहुतेक सिनेमांत या ना त्या रूपानं महात्मा गांधींचा संदर्भ येताना दिसतो, हे लक्षात घेण्यासारखं आहे.) याखेरीज चित्रपटात तत्कालीन सामाजिक परिस्थितीचं उत्तम प्रतिबिंब पडलेलं दिसतं. समाजात असलेली मोठी वर्गीय दरी, स्त्रियांकडं पाहण्याचा बदलत असलेला दृष्टिकोन आणि महिला अनाथाश्रमासारख्या नव्या संस्थांची वाढलेली गरज हे सगळं यात अधोरेखित असतं. यात तेव्हाची कमी गर्दी असलेली मुंबई दिसते. पुतलीचा म्हणजेच शुभा खोटेंचा सायकलीवरून चोरट्याच्या पाठलागाचा एक बराच मोठा, मसाला चित्रपटांना शोभेल असा सीन आहे. पण या सगळ्यांपलीकडं लक्षात राहतात ते बलराज साहनीसारख्या ताकदीच्या अभिनेत्यानं साकारलेले धीर-गंभीर, प्रगल्भ असे बाबूजी आणि त्यांच्यासमोर तेवढ्याच तडफेनं उभी राहिलेली अवघी १९ वर्षांची कोवळी नूतन! 
'सीमा'नं नूतनसाठी व्यावसायिक यशाची कवाडं खुली केली. या चित्रपटासाठी तिला 'फिल्मफेअर'चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला... आता यशाला 'सीमा' नुरली...!

सु-जात अन् 'सुजाता'

प्रख्यात दिग्दर्शक बिमल रॉय यांनी १९५९ मध्ये 'सुजाता' या चित्रपटाद्वारे अस्पृश्यतेच्या विषयाला स्पर्श केला. नूतननं यात साकारलेली 'सुजाता' ही कथित अस्पृश्य तरुणी सर्वांची मनं जिंकून गेली. या चित्रपटासाठी नूतनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. भारताला स्वातंत्र्य मिळून एक दशक उलटून गेलं, तरी देशात स्पृश्यास्पृश्यतेची लज्जास्पद प्रथा अनेक ठिकाणी पाळली जात होती. बंगालसारखे पुरोगामी राज्यही याला अपवाद नव्हते. सुबोध घोष यांनी या प्रथेच्या विरोधात 'सुजाता' याच नावाची एक लघुकथा लिहिली होती. बिमल रॉय यांना त्या कथेवरून या चित्रपटाची प्रेरणा मिळाली. नायिका म्हणून त्यांनी तोवर चित्रपटसृष्टीत बऱ्यापैकी प्रस्थापित झालेल्या नूतनला घेतलं आणि तिनं या भूमिकेचं सोनं केलं. 
उपेंद्रनाथ चौधरी (तरुण बोस) आणि चारू चौधरी (सुलोचना) या गर्भश्रीमंत ब्राह्मण जमीनदार दांपत्याला एक मुलगी असते. तिच्या वाढदिवसाच्या दिवशीच गावकरी एका अनाथ बालिकेला त्यांच्याकडं घेऊन येतात. त्या कथित अस्पृश्य (सिनेमातला उल्लेख - 'नीच जात की') मुलीच्या आई-वडिलांनी तिला सोडून दिलेलं असतं. उपेनबाबूंना ही बला नको असते. आधी ते गावकऱ्यांना झिडकारतात. मात्र, नंतर नाइलाजानं त्या मुलीला घरात ठेवून घेतात. हीच मुलगी 'सुजाता'... त्यांच्याच घरात लहानाची मोठी होते. उपेनबाबू आणि चारू रमा (शशिकला) या स्वतःच्या मुलीसोबतच सुजातालाही वाढवतात. मात्र, तिची ओळख कायम 'हमारी बेटी जैसी' अशीच करून देत असतात. रमाची आत्या (ललिता पवार) तिचं लग्न अधीर (सुनील दत्त) या आपल्या नातवासोबत लावून देण्याच्या खटपटीत असते. मात्र, उपेनबाबूंच्या घरी येणारा अधीर सुजाताच्या प्रेमात पडतो. सुजाताला हे कळल्यावर ती आपण 'अस्पृश्य' असल्याचं सांगून त्याच्या प्रेमाला नकार देते. दुसरीकडं आत्या सुजाताचं लग्न एका जरठ, तोतऱ्या पात्रासोबत लावून देण्याचा घाट घालते. हे अधीरला कळल्यानंतर तो आपलं सुजातावर प्रेम असल्याचं सांगून आपण तिच्याशीच लग्न करणार असल्याचं ठामपणे सांगतो. हे ऐकून रमाची आई चारू संतापते. रागाच्या भरात ती जिन्यावरून कोसळते. तिला रक्त देण्याची वेळ येते तेव्हा फक्त सुजाताचा ब्लड ग्रुप तिच्याशी जुळतो. सुजाताचं रक्त आपल्या शरीरात आल्यानं आपला जीव वाचला हे कळल्यावर चारूचे डोळे उघडतात. त्यानंतर सुजाताचं अधीरसोबत लग्न होतं!
आज हा चित्रपट पाहताना आपण तत्कालीन सामाजिक परिस्थिती पाहून हादरून जातो. आज जातीचा उघड उल्लेख करणंही इष्ट मानलं जात नाही. आपण आजच्या काळात कुठलीही जात-पात सामाजिक स्तरावर मानत नाही, पाळत नाही. तसं करणं हा कायद्यानंही गुन्हा आहे. मात्र, या चित्रपटात कथित 'अस्पृश्य' लोकांना तेव्हाचे कथित उच्चवर्णीय काय पद्धतीची वागणूक देत असत, हे पाहून मस्तक भणभणून जातं. सुजाताच्या दुःखाची तर आपण कल्पनाही करू शकत नाही. अर्थात बिमलदांच्या परंपरेनुसार त्यांनी या चित्रपटाद्वारे अस्पृश्यतेच्या रुढीवर आसूडच ओढले आहेत. याही चित्रपटात नायकाच्या तोंडून महात्मा गांधींच्या तत्त्वज्ञानाविषयी ऐकायला मिळतं. नायकाच्या घरात रवींद्रनाथ, नेताजी आणि गांधीजींच्या तसबिरी असतात. नायक उच्चभ्रू आणि श्रीमंत असतो. नायिकेच्या पालकांच्या घरीही उच्चभ्रू वातावरण असतं. मात्र, तरीही तिच्या नशिबी दर वेळी वेगळी वागणूक येते. तिला 'अछूत' किंवा 'नीच जात' म्हणताना कुणालाही काही वावगं वाटत नाही. फक्त नायक तिचा एक माणूस विचार करतो. त्याच्याच तोंडून शेवटी पुरोगामी विचार ऐकायला मिळतात आणि दिग्दर्शकाला या चित्रपटातून द्यायचा संदेश योग्य रीतीने पोचतो. 
या चित्रपटाला बिमलदांचे लाडके संगीतकार सचिनदेव बर्मन यांचंच संगीत होतं. 'सुनो मेरे बंधू रे, सुनो मेरे मितवा' हे सचिनदांच्याच आवाजातलं यातलं गाणं आजही लोकप्रिय आहे. तलत मेहमूदच्या तलम आवाजातलं 'जलते हैं जिस के लिए तेरी आँखों के दिए' हे अप्रतिम टेलिफोनिक गाणं याच चित्रपटातलं... 'काली घटा छाए मोरा जिया तरसाए' हे आशा भोसलेंचं एव्हरग्रीन गाणंही यात पाहायला मिळतं. या गाण्यातला नूतनचा हसरा चेहरा आणि अप्रतिम मुद्राभिनय डोळ्यांसमोर हटता हटत नाही. (आणखी एक योगायोग म्हणजे या चित्रपटातील चारही मुख्य अभिनेत्री - नूतन, सुलोचना, ललिता पवार व शशिकला - मराठी आहेत.)
नूतननं यात साकारलेली 'सुजाता' म्हणजे तत्कालीन पददलित स्त्रीच्या जीवनाचा आरसाच! वास्तविक नूतन अतिशय श्रीमंतीत लहानाची मोठी झालेली. आई मोठी अभिनेत्री, वडील दिग्दर्शक. गरिबी तिला कधीच माहिती नाही. मात्र, 'सीमा' असो वा 'सुजाता', समाजातल्या तेव्हाच्या खालच्या स्तरातल्या नायिकांच्या भूमिका तिनं फार समरसून केल्या. त्यांचं जगणं तिनं कसं समजून घेतलं असेल, या बायकांच्या जीवनाविषयी तिनं कसं जाणून घेतलं असेल, याचं कुतूहल वाटतं. केवळ अभिनयाच्या जोरावर ही गोष्ट साध्य होईल, असं वाटत नाही. त्यासाठी मुळातच अंतःकरणात संवेदनशीलतेचा झरा खळाळत वाहता असावा लागतो. नूतनकडं ही संवेदनशीलता होती, यात शंका नाही. त्यामुळंच ती प्रातिनिधिक भारतीय स्त्री रूपेरी पडद्यावर रेखाटू शकली. जात, धर्म, वर्ण, वर्ग आदी भेद सोडून तमाम भारतीय स्त्रियांना ती आपलीशी वाटली, यातच तिचं खरं यश आहे.


नच ‘बंदिनी’, मी मुक्ता...

नूतननं नौदलात लेफ्टनंट कमांडर असलेल्या रजनीश बहल यांच्याशी ११ ऑक्टोबर १९५९ रोजी लग्न केलं. तिचा एकुलता एक मुलगा मोहनीश याचा जन्म १९६१ मध्ये झाला. त्यानंतर तिनं चित्रपटांत काम करणं जवळपास थांबवलंच होतं. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. बिमल रॉय यांना चारुचंद्र चक्रवर्ती उर्फ ‘जरासंध’ यांच्या ‘तामसी’ या कादंबरीवर चित्रपट करायचा होता. चारुचंद्र चक्रवर्ती बंगालमधील कारागृह अधीक्षक होते आणि त्यांनी आपल्या अनुभवांवर आधारित अनेक काल्पनिक कादंबऱ्या लिहिल्या. त्यापैकी ‘तामसी’वर चित्रपट करायचं बिमल रॉय यांनी ठरवलं. यातल्या कल्याणीच्या भूमिकेसाठी त्यांनी आधी वैजयंतीमालाला विचारलं. वैजयंतीमालानं बिमल रॉय यांच्या ‘देवदास’ व ‘मधुमती’मध्ये आधी काम केलं होतं. त्यामुळं कल्याणीच्या भूमिकेसाठी त्यांच्या मनात पहिलं नाव तिचंच आलं. मात्र, वैजयंतीमाला त्या वेळी अन्य चित्रपटांत व्यग्र असल्यानं तिनं हा चित्रपट नाकारला. मग बिमल रॉय यांच्या मनात नाव आलं ते नूतनचंच! नूतननंही आधी त्यांच्याकडे ‘सुजाता’मध्ये काम केलंच होतं. मात्र, लग्नानंतर तिनं चित्रपटांत काम करणं थांबवलं होतं. पण बिमल रॉय यांच्या आग्रहावरून तिनं ‘बंदिनी’ स्वीकारला आणि पुढं अक्षरशः इतिहास घडला! हा चित्रपट बिमल रॉय यांचा शेवटचाच चित्रपट ठरला आणि त्यांच्या कारकिर्दीतला तो सर्वोत्कृष्ट चित्रपट मानला जातो. नूतनच्या कारकिर्दीतही ‘कल्याणी’ ही भूमिका तिच्या सर्वांत उत्कृष्ट भूमिकांपैकी एक मानली जाते.
बंदिनी चित्रपट आला, तो १९६३ मध्ये. त्यातली कथा पुन्हा त्या काळाच्याही आधी तीस वर्षांपूर्वीची, म्हणजे १९३४ मधली. देश पारतंत्र्यात होता. चित्रपटाची कथानायिका कल्याणी तुरुंगात खुनाच्या आरोपाखाली असते. हा खून तिनंच केलेला असतो का, का केलेला असतो, या प्रश्नांची उत्तरं फ्लॅशबॅकमध्ये मिळतात. तुरुंगात येणारा तरुण डॉक्टर देवेन (धर्मेंद्र) कल्याणीच्या प्रेमात पडतो. मात्र, कल्याणीच्या भूतकाळामुळं तिला हे प्रेम स्वीकारणं कठीण जातं आणि ती देवेनपासून लांब राहायला लागते. कल्याणी ही बंगालमधील एका खेड्यात राहणाऱ्या देशभक्त पोस्टमास्तरची (राजा परांजपे) मुलगी असते. या पोस्टमास्तरांनी स्वातंत्र्यसैनिक बिकाश (अशोककुमार) याला आश्रय दिलेला असतो. बिकाश भूमिगत होऊन पोस्टमास्तरांच्या घरी राहत असताना त्याचं व कल्याणीचं प्रेम जमतं. पुढं बिकाशला ते गाव सोडून जावं लागतं, तेव्हा तो कल्याणीला पुन्हा येऊन, लग्न करून घेऊन जाण्याचं वचन देतो. मात्र, तो काही परत येत नाही. कल्याणी व तिच्या वडिलांना समाजाकडून क्रूर वागणूक मिळते. त्यानंतर कल्याणी शहरात जाण्याच निर्णय घेते. तिथं तिच्या मैत्रिणीकडं ती जाते. मात्र, तिथूनही तिला जावं लागतं. अखेर एका महिलेची केअरटेकर म्हणून तिला काम मिळतं. ही महिला बिकाशची पत्नी आहे, हे कळल्यावर कल्याणी कोलमडते... पुढं अशा काही घटना घडत जातात, की त्यामुळं कल्याणीला 'बंदिनी' व्हावं लागतं...
बिमल रॉय यांच्या या चित्रपटात प्रथमच भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील तत्कालीन ग्रामीण स्त्रियांच्या योगदानाचं चित्रण दिसून येतं. स्त्री वेगवेगळ्या रूपांत 'बंदिनी' म्हणून कसं जीवन जगत होती, याचं प्रतीकात्मक दर्शन ते यातून घडवतात. बिमल रॉय यांनी स्त्रीप्रधान चित्रपट तयार केले आणि त्यापैकी 'बंदिनी' हा मास्टरपीस मानला जातो तो त्यातल्या वास्तववादी चित्रणामुळं... या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी आणि संगीत अत्युच्च दर्जाचं होतं. सिनेमॅटोग्राफर कमल बोस यांनी 'बंदिनी'ची विविध रूपं कृष्णधवल रंगांत विलक्षण प्रत्ययकारकरीत्या टिपली आहेत. सचिनदेव बर्मन यांनी या चित्रपटाला संगीत दिलंय. 'मेरे साजन हैं उस पार' हे स्वतः सचिनदांनी गायलेलं गाणं अतिशय गाजलं. प्रख्यात गीतकार गुलजार यांचं पहिलं चित्रपटगीत 'मोरा गोरा अंग लइ ले' (लता मंगेशकर) याच चित्रपटातील! 
धर्मेंद्र आणि अशोककुमार या दोघांनीही यातल्या भूमिका फार चांगल्या पद्धतीनं निभावल्या आहेत. पण या सर्वांहून प्रभावी ठरली ती नूतनची 'कल्याणी'. भारतीय स्त्रीची 'हृदयी पान्हा, नयनी पाणी' ही 'जन्मोजन्मीची कहाणी' नूतननं उभ्या केलेल्या कल्याणीच्या माध्यमातून आपल्यासमोर सगुण साकार होते. दुःख आणि वेदनेचा सागर पोटात घेऊन चेहऱ्यावर हास्य उमलवत ठेवणाऱ्या कल्याणीच्या दर्शनानं प्रेक्षक म्हणून आपण अवाक होतो. आयुष्यात पराकोटीचा अपेक्षाभंग, मानहानी, कडवटपणा सोसून पुन्हा या सगळ्यांवर मात करून आपल्या प्रेमासाठी सर्वस्व अर्पण करायला निघालेली भारतीय नारी नूतनच्या रूपात इथं भेटते. भारतीय स्त्रीची 'बंदिनी' म्हणून असलेली अशी विविध रूपं बिमलदांनी फार सुंदर पद्धतीनं या चित्रपटात मांडली आहेत. त्यामुळंच त्यांचा हा चित्रपट 'ऑल टाइम क्लासिक' मानला जातो. 

सरस्वतीचंद्र व मैं तुलसी तेरे आंगन की...

'बंदिनी'नंतर नूतनच्या लक्षात राहणाऱ्या दोन महत्त्वाच्या सामाजिक भूमिका होत्या त्या 'सरस्वतीचंद्र' (१९६८) आणि 'मैं तुलसी तेरे आंगन की' (१९७८) या दोन चित्रपटांमधल्या. 'सरस्वतीचंद्र' ही प्रसिद्ध गुजराती लेखक गोवर्धनराम त्रिपाठी यांनी लिहिलेली कादंबरी. एकोणिसाव्या शतकातील सरंजामशाहीचा काळ यात आहे. गोविंद सरैय्या दिग्दर्शित हा चित्रपट हिंदीमधला शेवटचा कृष्णधवल चित्रपट ठरला. मनीष नावाच्या कलाकाराने यात नायकाची भूमिका केली होती. त्याचं नामोनिशाणही आज कुठं शिल्लक नाही. लक्षात राहते ती 'मैं तो भूल चली बाबूल का देस, पिया का घर प्यार लगें' या गाण्यावर गरबा खेळणारी सुंदर नूतन. नूतनचं वैशिष्ट्य म्हणजे ती भारतातल्या कुठल्याही प्रांतातील स्त्री वाटू शकायची. तिच्या अभिनय कौशल्याचाही त्यात भाग होता, याद वाद नाही. 'सरस्वतीचंद्र'मधली सगळीच गाणी खूप गाजली. कल्याणजी-आनंदजी यांच्या कारकिर्दीतला हा एक महत्त्वाचा चित्रपट. 'चंदन सा बदन' हे मुकेश यांचं अजरामर गीत याच चित्रपटातलं... या चित्रपटात रमेश देव यांचीही महत्त्वाची भूमिका होती. या चित्रपटाच्या यशामुळं नूतन नायिका म्हणून एकटीच्या जोरावर हिट चित्रपट देऊ शकते, हे सिद्ध झालं. 


मैं तुलसी तेरे आंगन की...

'मैं तुलसी तेरे आंगन की' हा १९७८ मध्ये आलेला चित्रपट. या चित्रपटातील संयुक्ता चौहानच्या करारी भूमिकेनं नूतनला तिच्या कारकिर्दीतला पाचवा व अखेरचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला. प्रख्यात दिग्दर्शक राज खोसला यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. चंद्रकांत काकोडकर यांच्या 'अशी तुझी प्रीत' या कादंबरीवर हा चित्रपट आधारित होता. त्यामुळं राज भारती, डॉ. राही मासूम रझा, सूरज सनीम यांच्यासह चंद्रकांत काकोडकर व ग. रा. कामत यांनी या चित्रपटाचं लेखन केलं होतं. नूतनसोबत या चित्रपटात विनोद खन्ना, आशा पारेख, विजय आनंद, देव मुखर्जी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत आणि लता मंगेशकरांनी गायलेलं शीर्षकगीत खूप गाजलं. चित्रपटाची कथा काकोडकरांच्या कादंबरीवर आधारित म्हणजे टिपिकल कौटुंबिक मसाला टाइप होती. मात्र, नूतननं संयुक्ता चौहानच्या भूमिकेत जीव ओतून काम केलं. त्यामुळं वयाच्या ४२ व्या वर्षीही तिला मुख्य अभिनेत्री म्हणून फिल्मफेअर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. हा पुरस्कार मिळविणारी ती सर्वांत वयस्कर अभिनेत्री ठरली. या चित्रपटासाठी नूतनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री व सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री या दोन्ही गटांत नामांकन मिळालं होतं. आशा पारेखलाही याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचं नामांकन मिळालं होतं. मात्र, सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार रीना रॉयला 'अपनापन' चित्रपटासाठी देण्यात आला. गंमत म्हणजे आपली भूमिका सहायक अभिनेत्रीची नसून, मुख्य अभिनेत्रीची आहे, असे सांगून रीनानं तो पुरस्कार चक्क नाकारला होता. 'मैं तुलसी तेरे आंगन की' त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला. 

'अनाडी' ते 'कर्मा'

नूतननं इतरही काही महत्त्वाच्या सामाजिक चित्रपटांतील भूमिका केल्या. 'अनाडी' हा हृषीकेश मुखर्जींचा सिनेमा नूतनच्या हिट चित्रपटांपैकी एक. यातली तिची श्रीमंत आरती सोहनलालची भूमिका गाजली. यात राज कपूर तिचा नायक होता. यातली शंकर-जयकिशन यांची गाणी अप्रतिम होती. 'वो चांद खिला' किंवा 'बन के पंछी' ही नूतनवर चित्रित झालेली गाणी रसिकांच्या आजही लक्षात आहेत. राज कपूरसोबतचाच 'छलिया' (१९६०) हा मनमोहन देसाई दिग्दर्शित चित्रपट नूतनच्या सामाजिक चित्रपटांपैकी आणखी एक. यात फाळणीच्या पार्श्वभूमीवर वेगळ्या झालेल्या जोडप्याची कहाणी होती. नूतननं यातली शांतीची भूमिका नेहमीप्रमाणे जीव ओतून केली होती. मनमोहन देसाईंचा हा पहिला चित्रपट. त्यांच्या 'लॉस्ट अँड फाउंड' फॉर्म्युल्याची सुरुवात याच चित्रपटापासून झाली, असं म्हणायला हरकत नाही. 'बाजे पायल छुम छुम', 'डम डम डिगा डिगा', 'छलिया मेरा नाम' ही यातली गाणी गाजली. या चित्रपटासाठी संगीतकार कल्याणजी-आनंदजी यांचे सहायक होते लक्ष्मीकांत-प्यारेलाल... 
देवआनंदसोबत नूतनची जोडी चांगलीच जमली होती. 'पेइंग गेस्ट' आणि 'तेरे घर के सामने' हे त्यातले ठळक गाजलेले चित्रपट. 'तेरे घर के सामने' या चित्रपटातील शीर्षक गीतात मद्याच्या प्याल्यात हसताना दिसणारी नूतन विसरणं शक्य नाही.
इतर वैशिष्ट्यपूर्ण भूमिकांमध्ये नूतननं 'सौदागर' (१९७३) या चित्रपटात अमिताभ बच्चनची नायिका म्हणून काम केलं होतं. नव्वदच्या दशकात नूतन चरित्र भूमिका करू लागली. त्यापैकी 'मेरी जंग' (१९८५) आणि 'नाम' व 'कर्मा' (१९८६) विशेष गाजले. 'कर्मा'चं वैशिष्ट्य म्हणजे नूतननं प्रथमच दिलीपकुमार यांच्यासोबत काम केलं. वास्तविक तरुणपणी या जोडीनं काही चित्रपट करायला हवे होते, असं रसिकांना वाटल्यावाचून राहत नाही.

अत्यंत संवेदनशील, देखण्या अशा या अभिनेत्रीचा कर्करोगामुळं १९९१ मध्ये वयाच्या अवघ्या पंचावन्नाव्या वर्षी अकाली अंत झाला. नूतन आज असती, तर ८२ वर्षांची असती. आजच्या पिढीतल्या शाहरुख, आमीर, अक्षय किंवा रणबीर कपूरसारख्या नव्या अभिनेत्यांसोबतही ती त्याच तडफेनं काम करत राहिली असती कदाचित... आणि त्यांची आजी म्हणूनही ती सर्वांत सुंदरच दिसली असती!
नूतनला एकदा पाहणारा माणूस तिला विसरणं अशक्य. आपल्याजवळ तर तिच्या असंख्य चित्रचौकटींचा खजिना आहे. त्यातली एखादी देखणी फ्रेम पाहताना मन भरून येतं.... डोळे झरू लागतात... ही भावना प्रेमाची असते, कृतज्ञतेची असते! अशा वेळी शांत मनाने मग मोकळ्या हवेत यावं... बाहेर आकाश चांदण्यांनी लगडलेलं असतं... 'वो चाँद खिला वो तारे हसें, ये रात अजब मतवाली है' आठवतं अन् मन कुठल्याशा अनाम भावनेनं उजळून, तेजाळून निघतं... तेव्हा आकाशात एक चांदणी जरा जास्तच तेजानं लखलखत असते...!

---

(पूर्वप्रसिद्धी : मोहनगरी दिवाळी अंक २०१८)
---

16 Dec 2018

अक्षरधारा दिवाळी अंक २०१८ लेख


वास्तुस्त्री
----------


सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर हे माझे आवडते दिग्दर्शक आहेत. त्यांच्या सगळ्याच कलाकृती मला आवडतात. अत्यंत संवेदनशीलतेनं हाताळलेले विषय हे त्यांच्या सर्व सिनेमांचं वैशिष्ट्य. त्यातही काही सिनेमे आपल्या काळजाच्या जवळचे असतात. 'वास्तुपुरुष' हा त्यापैकीच एक. या जोडीचाही हा आवडता सिनेमा आहे, असं त्यांनी मला अनेकदा सांगितलं आहे. हा सिनेमा २००२ मध्ये प्रथम प्रदर्शित झाला, तेव्हाच मी पहिल्यांदा पाहिला होता. तेव्हा या सिनेमाचा माझ्या मनावर काही खूप खोल परिणाम वगैरे झाल्याचं मला आठवत नाही. मात्र, नंतर काही वर्षांनी एकदा मला सिनेमांच्या सीडीच्या दुकानात या सिनेमाची डीव्हीडी दिसली आणि मी ती लगेच घेऊन घरी आलो. त्यानंतर मी कित्येकदा हा सिनेमा घरी पाहिला. तो सर्व सिनेमा माझा जवळपास पाठच झाला. प्रत्येक वेळी हा सिनेमा पाहताना अधिकाधिक आवडत गेला. कदाचित मी पण तोपर्यंत वयानं थोडा फार वाढलो होतो. सिनेमा पाहताना त्यातला खोल आशय दर वेळी नव्यानं उलगडत गेला आणि आता हा सिनेमा माझ्या 'ऑल टाइम फेवरिट'च्या यादीत जाऊन बसला आहे. एखादी सुंदर कादंबरी वाचत असतानाची एकतानता हा सिनेमा बघताना साधता येते. शास्त्रीय संगीताची एखादी सुरेल मैफल ऐकतानाची तल्लीनता हा सिनेमा बघताना लाभते. नव्यानं एखादी गोष्ट आपण शिकलो किंवा आपल्याला समजली तर त्या वेळी होणारा आनंद ही कलाकृती जवळपास प्रत्येक वेळी आपल्याला देते. दर वेळी हा सिनेमा पाहताना डोळे अखंड झरतात आणि मला परत 'थोडा बरा माणूस' करून जातात. एखाद्या समाजातील स्थित्यंतर टिपतानाचे एवढे प्रत्ययकारी दर्शन मराठी साहित्यात, नाटकांत, सिनेमात फार कमी वेळा दिसले आहे. सुमित्रा भावे स्वतः समाजशास्त्रज्ञ असल्यानं त्यांच्या कलाकृतींमध्ये केवळ कल्पनारंजन नसतं, तर त्या विषयाचा सखोल अभ्यास आणि त्यातून येणारी वैचारिक प्रगल्भता सदैव दिसत राहते.
महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रात खेड्यापाड्यांतून ब्राह्मणांची घरे जाळली गेली. गांधीजींचा खून एका माथेफिरू, पण जातीने ब्राह्मण असलेल्या व्यक्तीनं केला, याचा अपरिहार्य त्रास तेव्हा सर्व जातीला झाला. एक आख्खी पिढी यात होरपळून निघाली. देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं. गावागावांमध्ये तोवर असलेली बारा बलुतेदारी पद्धत आणि जातीची उतरंड याला धक्के बसायला सुरुवात झाली होती. तेव्हाची सामाजिक परिस्थिती पाहता ते योग्यही होतं. तोवर खेड्यापाड्यांत ब्राह्मण, मराठा याच कथित उच्चवर्णीयांचं राज्य होतं. शिवशाही, पेशवाईच्या काळापासून मिळालेली वतनं, जमिनी आणि वंशपरंपरागत (अनुक्रमे) क्षात्रबुद्धी तैलबुद्धीचा भलाबुरा वापर करून हाती ठेवलेली गावगाड्याची सत्ता याच्या जोरावर मराठा ब्राह्मणांनी तेव्हा आपलं सगळीकडं वर्चस्व राखलं होतं. मात्र, महात्मा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या होरपळीनं बरेचसे ब्राह्मण खेड्यांतून कायमचे विस्थापित झाले. समाजजीवनाची पूर्वापार चालत आलेली चौकट मोडली. इतर जातींनी स्वातंत्र्यानंतर मिळालेल्या लोकशाही हक्कांचा (रास्त) उपयोग करून, ब्राह्मणी वर्चस्वाला सुरुंग लावला. ब्राह्मण समाजानं तोवर इतर समाजांवर केलेल्या कथित अनिर्बंध सत्ताबाजीची अशी शिक्षा काळानंच जणू दिली! याच काळात म्हणजे सन १९३९ मध्ये आलेल्या कुळ कायद्यानं कथित उच्चवर्णीयांच्या सत्तेला हादरे दिलेच होते. नंतर १९४८ मध्ये आलेला सुधारित कुळ कायदा आणि नंतर १९५७ मध्ये प्रत्यक्ष कुळांना जमिनीचे कायदेशीर मालक म्हणून जाहीर करणारा नवा कायदा यामुळं तर खेड्यांतील ब्राह्मणांचं कथित वर्चस्व पूर्णपणे लयाला गेलं. हे जे काही घडलं, ते देशाच्या लोकशाहीच्या तत्त्वांना धरूनच झालं आणि विशिष्ट समाजांचं जातिवर्चस्व संपुष्टात येण्यासाठी ते योग्यही होतं. (पुढं जाती संपल्या नाहीतच; उलट अधिक तीव्र आणि क्रूर झाल्या अन् नवा जातीयवाद निर्माण झाला, हा इतिहास आहे. पण तो या लेखाचा विषय नव्हे.)
आता हे सर्व होत असताना खेड्यांमधील ब्राह्मण समाज या सर्व बदलांना कसा सामोरा गेला, हा 'वास्तुपुरुष' चित्रपटाचा विषय आहे. यातला भास्कर हा कोल्हापूरजवळच्या नांदगाव नावाच्या खेड्यात राहणारा, जमीनदार ब्राह्मण कुटुंबातला तरुण मुलगा यंदा मॅट्रिकला आहे आणि या परीक्षेत उत्तम गुण मिळवून त्याला डॉक्टर व्हायला शहरात जायचं आहे. त्याचं घर म्हणजे मोठा वाडा आणि शेती वगैरे असली, तरी ती आता केवळ 'बडा घर पोकळ वासा' अशीच उरली आहे. भास्करचे वडील नारायण देशपांडे स्वातंत्र्यसैनिक आहेत, गांधीवादी आहेत. त्यांची स्वतःची अशी तत्त्वं आहेत. घरात एक ना नात्याची ना गोत्याची, अशी एक म्हातारी बाईआज्जी आहे. तिला या घरानं पूर्वीपासून आपली म्हणून सांभाळलं आहे. भास्करचा माधवकाका आणि त्याचा मोठा भाऊ निशिकांत याच घरात राहतात. काकाची पत्नी बाळंतपणात गेल्यापासून तो फक्त जोर-बैठका काढणं आणि वाड्यातल्या गुप्तधनाचा शोध घेणं याच कामात अडकला आहे. त्याला गाण्या-बजावण्याचा छंद आहे आणि एका 'सुंदरी'कडं त्याचं जाणं-येणंही आहे. भास्करचा मोठा भाऊ जातीनं मराठा असलेल्या कृष्णा नावाच्या एका नर्स मुलीच्या प्रेमात पडला होता, पण त्याला घरातून तीव्र विरोध झाल्यामुळं तो प्रेमभंग होऊन घरात बसलाय. तो एके काळी कविता वगैरे करायचा. पण आता नुसता बसून आहे. याच घरात गोटूराम नावाचा एक हरकाम्या ब्राह्मण नोकरही आहे... 
...आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे या घरात 'सरस्वती' आहे. भास्करची आई, घरातली कर्ती बाई...! ही 'सरस्वती' हे देशपांड्यांचं सगळं घर तोलून धरते आहे. एका अर्थानं तीच या घरातली एकमेव 'कर्ती' व्यक्ती आहे. ही जशी भास्करची गोष्ट आहे, तशीच ती 'सरस्वती'चीही गोष्ट आहे, असं मला कायम वाटत आलेलं आहे. ही सरस्वती म्हणजे या घराची खरी वास्तु'पुरुष' नव्हे; तर 'वास्तुस्त्री' आहे, असं म्हणायला हवं. या घरानं पूर्वापार कथित 'खालच्या जाती'च्या लोकांवर जो अन्याय केलाय, त्यामुळं या वास्तूला शाप लागलाय आणि भास्करनं डॉक्टर होऊन गोरगरिबांची सेवा केल्याशिवाय या 'वास्तुपुरुषा'ची शांत होणार नाही, असं सरस्वतीचं म्हणणं आहे. ही सरस्वती काळाचं भान असलेली आहे. आता आपल्या घरातल्या 'कर्त्या' पुरुषांचे बसून खाण्याचे दिवस संपले, हे तिला माहिती आहे. तिच्या प्रत्येक कृतीतून, संवादातून हे दिग्दर्शकानं जाणवून दिलं आहे. सरस्वती हुशार आहे. 'कसायला दिलेली मळईची (सुपीक) जमीन नाथा सोडतोय होय,' असं ती म्हणते, तेव्हा तिचं व्यावहारिक शहाणपणही दिसतं. नंतर वेळ पडते, तेव्हा घरात सुतक असतानाही ती बैलगाडी करून शेतात जाते आणि नाथाकडून आपल्या हिश्श्याचे पैसे घेऊन येते, तेव्हाही तिचं हे व्यावहारिक भान लख्खपणे दिसतं. आपल्या अपत्याच्या संरक्षणासाठी आई काहीही करू शकते, हे प्राणिमात्रांमधलं अगदी 'बेसिक इन्स्टिंक्ट'ही तिच्यात दिसतं; तसंच बदलत्या काळानुसार टिकून राहण्याचं काही विशिष्ट प्राणिमात्रांचं 'सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट'ही तिच्यात ठासून भरलेलं दिसतं. आणि या मूलभूत प्रवृत्तींच्याही वर आहे तिच्यातलं माणूसपण... घरातले कर्ते पुरुष आता काही कामाचे नाहीत आणि आता एकमेव भरोसा धाकट्या भास्करवर आहे आणि त्याला काहीही करून डॉक्टर करायचंच आहे, या निश्चयानं भारलेलं तिचं माणूसपण... मुलगा चांगल्या मार्कांनी मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यावर ती भडाभडा जे नवऱ्याला बोलते - 'पोरगं आपल्या परीनं करतंय हो, त्याला द्या की म्हणावं एखादी नादारी, सरकार गरिबांसाठीच आहे ना, मग करा ना त्याला मदत, चांगलं शिकून, मोठा होऊन फेडेल की तो सगळ्यांचं रीण' असं म्हणताना ती जेव्हा फुटून रडते, तेव्हा आपलेही डोळे झरल्याशिवाय राहत नाहीत. याचं कारण तिच्या माणूसपणात असलेलं तिच्यातलं ठळक 'स्त्रीपण'... हे 'स्त्रीपण' हीच तिची ताकद आहे. या स्त्रीपणाच्या सर्व क्षमता सरस्वतीमध्ये अगदी भरभरून आहेत. ती योग्य वेळी त्यांचा नेमका वापर करते आणि आपलं सगळं खानदान वाचवते.
मराठी चित्रपटांत एवढं ताकदीचं स्त्री-पात्र अलीकडच्या काळात पाहिल्याचं मला तरी आठवत नाही. याचं कारण या पात्राची जन्मदात्री, लेखिका-दिग्दर्शिका स्वतः एक स्त्री आहे. शिवाय समाज अभ्यासक आहे. तेव्हा सरस्वतीच्या जन्मामागे असा मोठा सामाजिक पट उभा आहे. म्हणूनच सुमित्रा भावेंच्या लेखणीतून साकारलेल्या सर्वोत्तम पात्रांपैकी एक म्हणजे ही सरस्वती, असं मला वाटतं
या चित्रपटांत तिचं पहिलं दर्शन होतं ते ती भास्कर घरी आल्यानंतर वाड्यातल्या आडातून पाणी शेंदताना! चोपून नेसलेली नऊवारी साडी, मोजकीच सौभाग्यलेणी, ठळक कुंकू, गौर वर्ण आणि चेहऱ्यावरचा एका करारी, स्वाभिमानी बाईचा ठसठशीत भाव! पहिल्याच दृश्यात दिग्दर्शिका तिचं हे अगदी महत्त्वाचं पात्र अगदी तिला हवं तसं प्रेक्षकांच्या मनात प्रस्थापित करते. या चित्रपटातला संघर्ष ठळक करणारं पहिलंच दृश्य आहे ते घरातली सगळी मंडळी जेवायला बसली आहेत तेव्हाचं. तेव्हा चुलीवर भाकऱ्या करीत असलेली आणि या घरातल्या या चौघाही पुरुषांशी 'ऑथॉरेटिव्ह' भाषेत संवाद साधणारी सरस्वती मुळातूनच पडद्यावर पाहावी. फार मोजक्या संवादांतून आणि दृश्यांतून दिग्दर्शकद्वय सरस्वतीच्या जगण्याचा सगळा आलेख उभा करतात. मुळात 'वास्तुपुरुष' असं नाव असलेल्या या सिनेमात सगळं दर्शन घडतं ते तेव्हाच्या पुरुषांच्या एका पिढीच्या स्खलनाचं, कर्मदरिद्रीपणाचं, स्थितिशीलतेचं... या गर्तेतून तेव्हाच्या पुरुषांना बाहेर काढणारी असते ती सरस्वतीसारखी खंबीर, खमकी स्त्री - वास्तु'स्त्री' ती
'वास्तुपुरुष'मधल्या प्रसंगांची रचना पाहिली, की सरस्वतीचं भास्करच्या मागं भक्कमपणे उभं असणं प्रत्ययाला येतं. घरात बाईआज्जी खोकत असताना, इतर पुरुषमंडळी ढाराढूर झोपलेली तरी असतात किंवा गुप्तधनासाठी खणत तरी असतात. तेव्हा अभ्यासाला बसलेल्या भास्करला सरस्वतीच 'भास्कर, बाईंना पाणी दे' असं सांगते. हा प्रसंग अगदी छोटा आहे. पण त्या जुन्या, थकत चाललेल्या वाड्याचा सगळा भार फक्त ही बाई आपल्या खांद्यावर वाहते आहे, हे अगदी स्पष्ट होतं. आपल्या मोठ्या मुलाचं प्रेमप्रकरण तिला मान्य असतं. इतर जातीतली मुलगी सून म्हणून स्वीकारण्याचा मोठेपणा तिच्या अंगात असतो. मात्र, नवऱ्याच्या (सामाजिक विरोधाला बळी पडून होणाऱ्या) विरोधामुळं तिला मुलाचं लग्न करता येत नाही. याची खंत ती शेवटपर्यंत बोलून दाखवते. तेव्हा गप्प बसलेली सरस्वती धाकट्या मुलाच्या डॉक्टर होण्यातला कोणताही अडथळा सहन करायला तयार होत नाही. त्यासाठी ती तेव्हाची रुढी झुगारून नवऱ्याशी अद्वातद्वा भांडते. त्याच्या एके काळच्या स्वातंत्र्यलढ्यातल्या सहकाऱ्याशी आता मंत्री झालेल्या वसंतरावाशी बोलायला लावते. त्याच्या ओळखीतून काही शिष्यवृत्ती मिळतेय का, यासाठी अखंड धडपड करीत राहते. याचं कारण मुलाला मुंबईला पाठवायचं म्हणजे रोख पैसे उचलून द्यावे लागणार. आणि या 'ओसाडगावच्या इनामदारां'कडं काहीही नसतं. पुढं बाईआज्जी जातात तेव्हा त्यांचे तेरावे घालण्यासाठी (पुन्हा सामाजिक दबावापोटी नवऱ्याचा दीराचा आग्रह म्हणून) नाथाकडून भास्करसाठी मागून आणलेले शेतीच्या उत्पन्नातले पैसे देताना तिचा झालेला तळतळाट पाहून आपल्याच आतड्याला पीळ पडतो. या बाईआज्जी आजारी असताना शेवटी कृष्णाला नर्स म्हणून घरी बोलावण्याचा मोठेपणाही ती दाखवते. घरात भास्कर सोडून पुरुषमाणूस नसताना आजीचे अंतिम संस्कार करण्याबाबतचे सगळे निर्णय तीच गावकऱ्यांना देते. त्या प्रसंगाला सरस्वती ज्या धीरोदात्तपणे सामोरी जाते, ते पाहण्यासारखं आहे. नाथाकडून आणलेले पैसे आजीच्या तेराव्याला खर्च झाले म्हणताना, शेवटचा पर्याय म्हणून स्वतःच्या बांगड्या मोडून भास्करला पैसे आणून देणारी सरस्वती पाहिली, की नतमस्तक व्हावंसं वाटतं. दीर गुप्तधनाची माहिती असलेला जुना मोडीतला कागद दाखवतो, तेव्हा सरस्वती सांगते - 'भाऊजी, तुमच्या या गुप्तधनावर माझा नाही हो विश्वास. आपले पूर्वज त्या वेळी जे जगले ते जगले. आपण आज जगतोय. आपण आपल्या कष्टानं, ज्ञानानं जे काही धन मिळवू तेवढं खरं आपलं. कशाला त्या धनाची आस लावून घेताय? अहो, आपला भास्कर डॉक्टर होईल, गोरगरिबांची सेवा करील आणि स्वतःसाठीही चार पैसे मिळवील. तेव्हाच या वास्तुपुरुषांची शांत होईल.' 
देशस्थ नवरा तिच्या बडबडीला कंटाळून 'तुझ्यात हा कोकणी तोंडाळपणा देशावर कुठून गं आला?' असं म्हणतो, तेव्हा ती शांतपणे 'होय हो, नाही मी बोलत आता' असं म्हणते. तेव्हाच्या पद्धतीप्रमाणं नवऱ्याला प्रतिवाद करणारी, सोवळ्यातला स्वयंपाक करताना चुकून ओवळं झालं की पुन्हा अंघोळ करून स्वयंपाकाला लागणारी ही सरस्वती नंतर मुलासाठी वेळ पडताच नवऱ्याला 'जा, तिकडंच काळं करा' असं म्हणण्याइतपत कठोर होते. घरातले सगळे सणवार निगुतीनं करणारी, भास्करची 'सोपाना कांबळे'सोबत असलेली मैत्री सहजी स्वीकारणारी, सोपानावरही प्रेम करणारी अशी ही सरस्वती म्हणजे काळानुरूप स्वतःला बदलणारी, हुशार मराठी स्त्री आहे
सरस्वती या पात्राचं वैशिष्ट्य म्हणजे ती 'सेल्फमेड', स्वयंसिद्ध आहे. तिनं घरातली परिस्थिती नीट जोखली आहे. तिला आजूबाजूला बदलणाऱ्या समाजाचं, काळाचं नेमकं भान आहे. अभ्यासात हुशार असलेल्या मुलाला डॉक्टर करणं म्हणजे एकप्रकारे गावाच्या त्या पिढीजात व्यवस्थेतून बाहेर काढणं आहे आणि त्याला या सगळ्या गर्तेतून बाहेर काढल्यासच त्याला भवितव्य आहे, हे ओळखणारी द्रष्टी नजर तिच्याकडं आहे
त्या काळातल्या खेड्यांत वस्तीला असलेल्या, बहुसंख्य जमीनदार घरांतला इतिहास तपासला असता, अशा अनेक 'सरस्वतीं'मुळं ती घरं तरली, वाढली असंच लक्षात येईल. या हजारो 'सरस्वतीं'नी तेव्हाचे संसार स्वतःच्या भक्कम खांद्यांवर तोलून धरले असतील, पुढे नेले असतील. या कर्तबगार स्त्रियांची बखर कुणी लिहिली नाही, त्यांच्या त्यागाची नोंद कुठल्या ऐतिहासिक दस्तावेजानं घेतली नाही, त्यांच्या कौतुकाचं गाणं कुणी गायिलं नाही, की त्यांना देव्हाऱ्यात बसवून त्यांची 'मातृपूजा' कुणी केली नाही. सुमित्रा भावेंनी 'वास्तुपुरुष'मधल्या 'सरस्वती'च्या रूपानं या सगळ्यांची कसर भरून काढली आहे. एक प्रकारे या सगळ्या बायकांच्या ऋणातून थोडं फार उतराई होण्याचा प्रयत्न त्यांनी यात केला आहे. आणि हा प्रयत्न एवढा प्रभावी आहे, की या सरस्वतीचं आपल्या मनावरचं गारूड लवकर उतरणं शक्य नाही
ही भूमिका साकारणाऱ्या उत्तरा बावकर यांची खरोखर कमाल म्हणावी लागेल. या 'सरस्वती'ची भूमिका त्या खरोखर जगल्या आहेत. या भूमिकेत त्यांच्याशिवाय दुसऱ्या कुठल्याही अभिनेत्रीची कल्पनाच करता येऊ नये, एवढ्या प्रभावीपणे त्यांनी ही भूमिका केली आहे. खरंच, प्रत्येकानं प्रत्यक्ष हा सिनेमा पाहूनच बावकर यांच्या भूमिकेचं मोजमाप करावं. शब्दांनी त्यांच्या भूमिकेचं वर्णन करणं जवळपास अशक्य आहे.
एकूणच या सिनेमाची सर्वच पात्रयोजना जमली होती. सिद्धार्थ दफ्तरदारनं तरुण भास्करची भूमिका फार सुंदर केलीय. पण मोठ्या भास्करच्या भूमिकेत महेश एलकुंचवार यांना घेणं, हा सुमित्रा भावेंचा 'मास्टरस्ट्रोक' म्हणावा लागेल. याचं कारण मराठी साहित्यात व्यंकटेश माडगूळकरांनंतर ब्राह्मण समाजाच्या सामाजिक बदलांची ठळक आणि वैशिष्ट्यपूर्ण नोंद कुणी घेतली असेल, तर ती महेश एलकुंचवारांनी! त्यांची वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी आणि युगान्त ही विदर्भातल्या धरणगावकर देशपांड्यांची कहाणी सांगणारी त्रिनाट्यधारा आणि 'वास्तुपुरुष' यांच्यात मला कायमच एक जैव संबंध असल्याचं वाटतं. त्यामुळं या सिनेमात एलकुंचवारांचं असणं हा या कलाकृतीचाही सन्मानच आहे. भास्करच्या वडिलांची भूमिका सदाशिव अमरापूरकर यांनी फारच जबरदस्त केली आहे. अमरापूरकरांच्या सर्वोत्तम भूमिकांमध्ये ही भूमिका गणावी लागेल. रवींद्र मंकणी, अतुल कुलकर्णी आणि रेणुका दफ्तरदार यांनीही त्यांची कामं फार नेटकी सुंदर केलीयत
पण या सगळ्यांच्या वर दशांगुळे उरते ती भास्करची आई - सरस्वती. खऱ्या अर्थानं वास्तु'स्त्री'... सुमित्रा भावेंनी हा सिनेमा तयार करून महाराष्ट्रातल्या भास्करसारख्याच कित्येक घरांची वास्तु'स्त्री' शांत केली आहे, असंच म्हणावंसं वाटतं. या कलाकृतीच्या आणि तुमच्या ऋणातून मुक्त होणे नाही...!! 

---

(पूर्वप्रसिद्धी : अक्षरधारा दिवाळी अंक २०१८)

---