27 Apr 2019

मटा - युक्रेन लेख

युक्रेनचा ‘विनोद’?
-----------------

‘विनोदवीर झाला अध्यक्ष’ अशा आशयाची शीर्षकं नुकतीच एका देशातल्या सर्व प्रमुख वर्तमानपत्रांत नुकतीच झळकली. हे शीर्षक वाचून काहींना ‘हे तर तीन वर्षांपूर्वीच झालंय,’ असं रास्तपणे वाटू शकेल, तर काहींना आपल्या मायभूमीत पाच वर्षांनी असं घडू शकेल काय, अशी एक आशा वाटू शकेल. पण हे शीर्षक या दोन्ही वाचकांना जे वाटतंय, त्याविषयी नाहीच. ते आहे युक्रेन या देशातलं. होय, युक्रेननं नुकतंच आपला अध्यक्ष म्हणून एका विनोदवीराला निवडून दिलंय. व्लजिमिर झेल्येन्स्की असं त्याचं नाव. युक्रेनी जनतेनं झेल्येन्स्की यांना नुसतं निवडून नव्हे, तर प्रचंड (जवळपास तीन चतुर्थांश) बहुमतानं निवडून दिलंय. त्यामुळं हा जगभर चर्चेचा विषय झालाय. 
गेल्या आठवड्यात युक्रेनमध्ये पार पडलेल्या निवडणुकीत झेल्येन्स्की यांनी आत्ताचे अध्यक्ष पेत्रो पोरोशेन्को यांना दणदणीत धोबीपछाड दिला आहे. अवघे ४१ वर्षांचे झेल्येन्स्की युक्रेनमधील लोकप्रिय विनोदवीर आहेत. गेली साडेतीन वर्षे ते ‘सर्व्हंट ऑफ द पीपल’ या नावाच्या एका उपहासात्मक विनोदी मालिकेत काम करीत आहेत. या मालिकेत ते एका शिक्षकाचे काम करतात. या शिक्षकाला भ्रष्टाचाराची चीड असते आणि त्याबद्दल तो सातत्यानं सोशल मीडियावरून आवाज उठवत असतो. त्यावरून त्याला लोकांचा मोठा पाठिंबा मिळत जातो आणि विशेष म्हणजे तो एके दिवशी युक्रेनचा अध्यक्ष होतो. असं या मालिकेचं कथानक झेल्येन्स्की यांच्याबाबत प्रत्यक्षात उतरलं आहे. थोडक्यात, टीव्हीच्या पडद्यावरची गोष्ट वास्तवात घडली आहे. युक्रेनच्या इतिहासात घडलेल्या या अभूतपूर्व गोष्टीकडं त्यामुळंच सगळ्या जगाचं लक्ष वेधलं गेलं आहे. एका विनोदवीराकडं देशानं आपलं नेतृत्व सोपवावं ही गोष्ट अनेकांना अनेक अर्थांनी लक्षणीय वाटते आहे. त्यामागचे राजकीय, सामाजिक संदर्भ तपासले जात आहेत. युक्रेनच्या जनतेचा मानसिकतेचा विचार होतो आहे. आपल्याही देशात असं कधी घडू शकेल का, याबाबत तर्क-वितर्क मांडले जात आहेत.
वास्तविक, आपल्या आवडत्या नायकाला किंवा नायिकेला राजकीय क्षेत्रातही लोकांनी भरभरून पाठिंबा दिल्याची उदाहरणं कमी नाहीत. आपल्याकडे तमिळनाडू व आंध्र प्रदेश या दोन राज्यांचा इतिहासच पुरेसा आहे. अमेरिकेनेही रोनाल्ड रेगन यांच्यासारख्या हॉलिवूडच्या देमारपटांच्या नायकाला देशाच्या अध्यक्षपदी बसवलं आहेच. युक्रेनमध्येही असंच झालंय. झेल्येन्स्की यांच्या ‘सर्व्हंट ऑफ द पीपल’ या मालिकेची लोकप्रियता प्रचंड होती. त्यातच त्या मालिकेतील भ्रष्टाचाराविरुद्ध लढणाऱ्या सामान्य नायकाचं रूप देशातील सर्वसामान्य जनतेला आपलंसं वाटणं स्वाभाविक होतं. त्यांनी या मालिकेच्या नावानं राजकीय पक्ष काढला. त्यातून पुढं त्यांची लोकप्रियता वाढत गेली. पाच वर्षांपूर्वी युक्रेनमधील रशियाच्या बाजूनं झुकलेलं सरकार पडलं आणि पेत्रो पोरोशेन्को अध्यक्ष झाले. पेत्रो पोरोशेन्को यांच्या काळात देशभरात होत असलेल्या कथित भ्रष्टाचारावर ‘सर्व्हंट ऑफ द पीपल’ मालिकेतून तोंडसुख घेतलं जातं. गेल्या साडेतीन वर्षांपासून ही मालिका सुरू आहे आणि तिची लोकप्रियता अबाधित आहे. झेल्येन्स्की यांना या मालिकेतील भूमिकेनंतर अफाट लोकप्रियता मिळाली. त्यानंतर त्यांनी अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याचा गांभीर्यानं विचार सुरू केला. त्यांच्या बाजूनं जनमत होतं. त्यांचे राजकीय दृष्टिकोन किंवा देशासमोरील प्रश्नांबाबत त्यांचं नक्की काय धोरण असेल याबाबत फारसं कुणाला काही माहिती नाही. मात्र, एक सामान्य माणूसच या देशाचं भलं करू शकतो, अशा अर्थाचा त्यांच्या मालिकेतील संदेश आणि (आपल्याकडील ‘नायक’ या चित्रपटाप्रमाणे) एका शिक्षकाचं अचानक देशाचं अध्यक्ष होणं युक्रेनमधील सामान्य जनतेला भावलं. झेल्येन्स्की यांनी या लोकप्रियतेचा फायदा घेतला. त्यांचा प्रचार इतर राजकीय नेत्यांपेक्षा ‘हट के’ होता. त्यांनी जाहीर प्रचारसभा वा भाषणं केलीच नाहीत. त्याउलट सोशल मीडियावर उपहासात्मक, व्यंगात्मक व्हिडिओ टाकले. हे व्हिडिओही लोकप्रिय झाले. ‘नो प्रॉमिसेस, नो डिसअपॉइंटमेंट’ हे त्यांचं वाक्य गाजलं.
अखेर प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी लोकांवर या ‘नायका’चा किती प्रभाव पडला आहे, हे स्पष्ट झालं. युक्रेनमधील जनतेने तब्बल ७३ टक्के मतं झेल्येन्स्की यांच्या झोळीत टाकली. पोरोशेन्को यांनी पराभव मान्य केला. मात्र, युक्रेनच्या जनतेने निवडलेल्या नेत्यासमोर आता पुष्कळ मोठी आव्हानं आहेत, असंही त्यांनी बोलून दाखवलं. आपण राजकारण संन्यास घेणार नसल्याचंही त्यांनी ठणकावून सांगितलं. पोरोशेन्को यांच्या म्हणण्यात अगदीच तथ्य नाही, असं नाही. झेल्येन्स्की यांच्या राजकीय धोरणांविषयी अद्याप कुणालाच काही माहिती नाही. पोरोशेन्को यांच्या म्हणण्यानुसार, झेल्येन्स्की आता लवकरच रशियाच्या कह्यात जातील. युक्रेन व रशिया यांच्यात क्रीमियावरून मोठा संघर्ष आहेच. झेल्येन्स्की यांनी मात्र, आपण ‘शांततेसाठी प्रयत्न करू,’ असं अगदी टिपिकल राजकारणी व्यक्तीसारखं उत्तर दिलंय. झेल्येन्स्की यांच्याबाबतही सगळंच आलबेल आहे, असं नाही. युक्रेनमधील प्रभावशाली, धनाढ्य व सत्तेवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष नियंत्रण ठेवणाऱ्या कुटुंबांपैकी आयहोर कोलोमोइस्की या बड्या धेंडाच्या हातची झेल्येन्स्की हे कळसूत्री बाहुली आहेत, अशी टीका आधीपासूनच होतेय. याचं कारण झेल्येन्स्की यांची ‘सर्व्हंट ऑफ द पीपल’ ही मालिका ज्या ‘वन प्लस वन’ नावाच्या लोकप्रिय वाहिनीवरून प्रसारित होतेय, ती कोलोमोइस्की यांच्या मालकीची आहे. एवढंच नव्हे, तर हे कोलोमोइस्की नामक गृहस्थ बरेच ‘उद्योगी’ आहेत. युक्रेनच्या प्रमुख बँकेला मोठा गंडा घातल्याच्या आरोपावरून त्यांच्याविरुद्ध तिथं अनेक केसेस सुरू आहेत. त्यामुळं कोलोमोइस्की महाशय युक्रेनमधून पळून इस्राईलमध्ये जाऊन बसले आहेत. (आपल्याकडच्या काही लोकांची आठवण झाली ना!) त्यामुळं झेल्येन्स्की निवडून येण्यात कोलोमोइस्की यांचाच हात आहे आणि ते झेल्येन्स्की यांना कळसूत्री बाहुलीसारखं वागवतील, अशीही भीती युक्रेनमधील काही राजकीय निरीक्षक व्यक्त करीत आहेत. झेल्येन्स्की यांनी अर्थातच या आरोपांचा इन्कार केला आहे. ‘कोलोमोइस्की यांच्या घराण्याचा प्रभाव युक्रेनमधील जवळपास सर्वच संस्थांवर आहे. मग देशातील चार कोटी नागरिक त्यांच्या हातातील बाहुले झाले का,’ असा सवाल ते करतात. ते काहीही असलं, तरी या देशाच्या नेतृत्वाचं खरोखर मोठं आव्हान आता झेल्येन्स्की यांना पेलावं लागणार आहे. त्यांच्या सर्वसामान्य माणसाला आपल्याशा वाटणाऱ्या प्रतिमेमुळं लोकांनी त्यांना भरभरून निवडून दिलं आहे. मालिकेत काम करणं आणि देश चालवणं यात नक्की काय फरक असतो, हे आता त्यांच्या लक्षात येईल. ‘झेल्येन्स्की यांच्याकडून आम्हाला योग्य ते सहकार्य मिळेल,’ असे सूचक, गर्भित इशारे रशियाकडून सुरू झाले आहेतच. 

झेल्येन्स्की यांची अध्यक्षपदी झालेली निवड सामान्य नागरिकांच्या बदलत्या मानसिकतेची निदर्शक आहे. टिपिकल राजकारणी लोकांना जगभरातील सगळेच सामान्य लोक एवढे कंटाळले आहेत, की जरा बरा पर्याय दिसताच ते फारसा मागचा-पुढचा विचार न करता त्याला भरभरून निवडून देऊ लागले आहेत. आपल्याकडेही २०११ मध्ये अशाच प्रकारचं वातावरण होतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. काही अरबी देशांतही ‘क्रांती’चे वगैरे वारे वाहू लागले होते. त्याचं पुढं काय झालं, हे आपल्याला नीट ठाऊक आहे. आपल्याकडच्या अशा लोकांनी डोक्यावर घेतलेल्या (सामान्यांतून आलेल्या इ.) नेत्यांनी पुढं काय कर्तबगारी गाजविली, हेही आपण पाहिलं आहे. ‘पॉलिटिक्स इज द लास्ट रिसॉर्ट फॉर द स्काउंड्रल्स’ असं जॉर्ज बर्नार्ड शॉनं म्हणून ठेवलंय. मात्र, आता झेल्येन्स्की यांनी ‘पॉलिटिक्स इज आल्सो फॉर गुड मेन’ हे दाखवून दिलं आहे. म्हणजे झेल्येन्स्की तसे असावेत, असा युक्रेनियन जनतेचा समज आहे. तो त्यांचा खरोखरचा समज आहे, की झेल्येन्स्की यांच्या रूपानं राजकारण नावाच्या महान उद्योगानं तेथील जनतेवर केलेला हा भयानक विनोद आहे, हे मात्र येणारा काळच ठरवील.

---

(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, २७ एप्रिल २०१९)

---

12 Apr 2019

रिव्ह्यू - वेडिंगचा शिनेमा

निखळ नात्यांचं सुरेल गाणं....
-------------------------------------------------------


हल्लीच्या काळात साधं-सरळ, सहज-सोपं, नितळ-निखळ असं काही पाहायला मिळत नाही असं आपण सारखं बोलत असतो. दिवसेंदिवस नानाविध विकारांनी आपली मनं ग्रस्त झालेली दिसताहेत आणि त्यामुळे आपणही त्रस्त झालो आहोत. रणरणत्या उन्हात एखादं झाड दिसावं आणि तिथं सावलीला बसल्यावर शेजारी थंडगार पाण्याचा वाहता झरा दिसावा, असे सुखद अनुभव आताशा दुर्मीळच झाले आहेत.
अशा वेळी आपल्याला अशी साफसुथरी, नितळ-निखळ कलाकृती बघायला मिळाली, तर कसं वाटेल? त्या उन्हातल्या झाडाच्या सावलीत बसल्यासारखं व झऱ्याचं पाणी प्यायल्यासारखं फीलिंग येईल, हे नक्की! प्रसिद्ध संगीतकार-गायक डॉ. सलील कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेला ‘वेडिंगचा शिनेमा’ हा नवा मराठी सिनेमा आपल्याला अगदी असाच अनुभव देतो. आपल्याला प्रिय असणारे व हल्ली दुर्मीळ झालेले असे सुखद अनुभव देणारी कुठलीही कलाकृती आपल्याला भावतेच. ‘वेडिंगचा शिनेमा’ ही हलकीफुलकी कॉमेडी आपल्याला अगदी याच कारणासाठी आवडते. मनापासून हसवते आणि हे करता करता किंचित अंतर्मुखही करते. पदार्पण करणाऱ्या दिग्दर्शकाकडून यापेक्षा अधिक काय हवे?
हिंदी सिनेमाच्या सुवर्णयुगात हृषीकेश मुखर्जी यांनी मध्यमवर्गीय संवेदना केंद्रस्थानी ठेवून, हलक्या-फुलक्या शैलीत त्याचं जगणं मांडणाऱ्या अनेक कलाकृती दिल्या. त्या त्यांच्या या अंगभूत गुणांमुळं अत्यंत लोकप्रियही झाल्या. सलीलचा चित्रपट पाहताना हृषीदांच्या चित्रपटांची आठवण झाली. मराठी चित्रपटांना विनोदाची उत्तम परंपरा आहे. (वाईट इनोदी सिनेमांचीही आहे. पण ते जाऊ द्या...) त्यात उत्तमोत्तम साहित्यिकांनी लिहिलेल्या सिनेमांपासून अत्युत्तम अभिनेत्यांनी साकारलेल्या भूमिकांपर्यंत सगळ्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. सलीलचा ‘वेडिंगचा शिनेमा’ हा याच वाटेवरचा सिनेमा आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या चित्रपटाचं लेखन जमून आलं आहे. आपल्याला काय दाखवायचंय यापेक्षा काय दाखवायचं नाहीय हे दिग्दर्शकाच्या डोक्यात स्पष्ट असल्याशिवाय हे घडत नाही. सलीलच्या गेल्या वीस वर्षांतील सांगीतिक कारकिर्दीमधून, अप्रत्यक्षपणे घडत गेलेला त्याच्यातला दिग्दर्शक पुष्कळ प्रगल्भ झाल्यावरच त्यानं सिनेमासारख्या मोठ्या निर्मितीला हात घातल्याचं जाणवतं.
हा सिनेमा नावाप्रमाणं लग्नाच्या व लग्नाआधीच्या गमतीजमती सांगणारा आहे. हल्ली लग्नाआधी शूट करण्याचं फॅड आहे. त्या वेडाचा उपयोग या चित्रपटात करण्यात आला आहे. अर्थात हा सिनेमा फक्त त्या लग्नाचा किंवा त्याआधीच्या प्री-वेडिंग शूटच्या गमतीजमतीचा नाहीच. या सिनेमाची नायिका आहे ती ऊर्वी (मुक्ता बर्वे). तिला गंभीर, सामाजिक आशयाचे वगैरे चित्रपट तयार करायचे आहेत. ते तिचं अगदी जेन्युइन स्वप्न आहे. तिचा एक बॉयफ्रेंडही आहे. (सिनेमाच्या अगदी शेवटी येणारा हा बॉयफ्रेंड म्हणजे एक सरप्राइज आहे.) त्याच्याशी असलेल्या नात्याचं पुढं नक्की काय करायचं, याबाबतही ती कन्फ्युज्ड आहे. अशा स्थितीत तिला सासवडला हे प्री-वेड शूट करण्याचं काम मिळतं. अगदी नाइलाजानं व पैसे मिळतील म्हणून ती हे काम स्वीकारते.
कट टु सासवड. प्रकाश शहाणे (शिवराज वायचळ) हा सासवडमध्ये मोबाइलचं दुकान चालवणारा, एक साधा-सरळ मुलगा आहे. मुंबईहून इंटर्नशिपसाठी आलेल्या परी प्रधान (ऋचा इनामदार) या मुलीच्या तो प्रेमात पडतो. दोघं लग्नही करायचं ठरवतात. त्याच्याआधी प्री-वेडिंग शूट करायचं ठरतं. मग ऊर्वी सासवडला येते. तिच्यासोबत मदन (भाऊ कदम) हा ‘डीओपी’ आणि जंबो (त्यागराज खाडिलकर) हा कोरिओग्राफरही येतात. प्रकाशचे वडील (शिवाजी साटम), आई (अलका कुबल), बहीण (प्राजक्ता हणमघर), भाऊ (संकर्षण कऱ्हाडे) अशा सगळ्या गोतावळ्याशी ऊर्वीची गाठ पडते. मग हे लग्नाआधीचं शूटिंग करता करता प्रत्येकाचा स्वत:चा असा एक प्रवास सुरू होतो. त्यात राग-लोभ, प्रेम-भांडण, रुसवे-फुगवे, समज-गैरसमज अशी सगळी परिचयाची स्टेशनं घेत गाडी मुक्कामी पोचते.
हा प्रवासच गमतीशीर आहे. हा प्रकाश आणि ऋचाच्या नात्याचा प्रवास आहे, तसा तो ऊर्वीच्याही बदलत जाणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा प्रवास आहे. तो प्रकाशच्या आई-वडिलांमधल्या समंजस नात्याचा आहे, तसा ऋचाच्या आई-वडिलांच्या नात्यातील अवघडलेपणाचाही आहे. ऋचाची आई (अश्विनी काळसेकर) ही करिअरला प्राधान्य देणारी डॉक्टर. ऋचा आणि तिच्या आई-वडिलांचं शूटिंग करायला ऊर्वी जाते, तेव्हा आपल्या मुलीला वेळ देऊ न शकलेल्या आईचं कोसळलेपण अश्विनी काळसेकरांनी त्या दृश्यात अप्रतिम दाखवलंय. दिग्दर्शकाच्या लेखणीतून साकारलेली अशी काही दृश्ये या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे.
दिग्दर्शकच संगीतकारही असल्यानं यातली गाणीही धमाल आहेत. यातल्या देवीच्या गाण्यावर मुक्तानं केलेलं नृत्य ठसकेबाज आणि लक्षात राहणारं आहे. बोल पक्या बोल आणि उगीचच ही दोन्ही गाणीही मस्त जमून आली आहेत.
चित्रपट जमून येण्यातला सगळ्यांत महत्त्वाचा भाग म्हणजे कलाकारांची अचूक निवड. या चित्रपटातील सर्वच कलाकार त्या त्या भूमिकांमध्ये फिट बसले आहेत. मुक्ता बर्वे कुठल्याही भूमिकेत ज्या सहजतेनं वावरते, ते थक्क करणारं असतं. ती इथल्या ऊर्वीच्या भूमिकेतही अशीच चपखल बसली आहे. शिवराज वायचळ या अभिनेत्यानं प्रकाश फार सहज उभा केला आहे. ऋचा इनामदार ही नवी अभिनेत्री परीच्या भूमिकेत छान शोभलीय. अलका कुबल यांना दीर्घकाळानं त्याच्या प्रतिमेला न शोभणारी अशी भूमिका मिळाली आहे आणि ती त्यांनी चोख केलीय. शिवाजी साटम नेहमीच सहज अभिनय करतात. इथले मुलाचे बाबा साकारणं त्यांच्यासाठी सहज-सोपंच होतं. तीच गोष्ट सुनील बर्वे यांची. त्यांनी ऋचाचे बाबा फार गोड साकारले आहेत. या चित्रपटात चार जणांनी धमाल केलीय. ते म्हणजे प्रवीण तरडे, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हणमघर आणि अर्थातच भाऊ कदम. या चौघांनी आपापल्या भूमिकांत जी जान ओतलीय त्यामुळं या चित्रपटाचा पुष्कळ भाग आपल्याला हसवत ठेवतो. प्राजक्ता हणमघरनं आणलेला नणंदेचा गावरान ठसका त्यातही विशेष उल्लेखनीय!
असा हा हसत-खेळत, सहकुटुंब पाहता येणारा प्रसन्न सिनेमा चुकवून चालणार नाही. कारण अशी निखळ व नितळ करमणूकही दुर्मीळ होत चाललीय....
सलील व टीमचं या चांगल्या कलाकृतीसाठी अभिनंदन.
----

दर्जा : साडेतीन स्टार
---

2 Apr 2019

मटा संवाद लेख : ३१ मार्च १९

मायाजाल : सीझन १
--------------------

आपल्याकडे जालमालिका (वेबसीरीज) येऊन स्थिरावल्या, त्याला आता काही-एक काळ झाला. या मालिकांच्या आशयामधील नावीन्य व कुतूहल अद्याप टिकून आहे. या मालिकांना मिळणारा प्रेक्षकवर्ग दिवसेंदिवस वाढतो आहे. भविष्यात आणखी वाढणार आहे आणि त्यामुळं कदाचित या ‘ओटीटी’ (ओव्हर द टॉप - म्हणजे इंटरनेटवरून थेट उपलब्ध होणाऱ्या) सेवेचे नियमन करण्याचीही वेळ येणार आहे. या मालिकांच्याच भाषेत सांगायचं, तर त्यांचा पहिला सीझन संपत आला आहे आणि या मालिकांमुळं आपल्या सभोवतालावर होत असलेल्या बऱ्या-वाईट परिणामांची चर्चा करायलाही हीच योग्य वेळ आहे, असं वाटतं.
नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन या दोन बलाढ्य अमेरिकी कंपन्यांसोबत आता भारतीय कंपन्याही ‘ओटीटी’ सेवेत उतरल्या आहेत. ज्यांच्याकडे उत्तम दर्जाचा, क्षमतेचा मोबाइल आहे आणि (जिओकृपेने) अविरत, मुबलक व स्वस्त डेटा उपलब्ध आहे, अशांच्या मोबाइलमध्ये आता अशी किमान चार-पाच अॅप असतातच. नुकत्याच एका पाहणीद्वारे असं सिद्ध झालंय, की भारतात मिळणारा डेटा जगात सर्वांत स्वस्त आहे. चांगल्या प्रतीच्या मोबाइलची किंमतही आता दहा हजारांच्या घरात आली आहे. त्यामुळे नेटफ्लिक्स, अॅमेझॉन, आल्ट बालाजी, हॉटस्टार, वूट, झी-५ अशा अॅपना मोबाइल स्क्रीनवर पानाची पंगत लाभली आहे. कधीही टिचकी मारावी आणि हवी ती मालिका पाहायला सुरुवात करावी, एवढं हे सोपं झालंय. एखाद्या आधीच जाहिरातींतून गाजवत ठेवलेल्या जालमालिकेचे भाग संबंधित अॅपवर पडले रे पडले, की ‘बिंज वॉचिंग’ (लागोपाठ सगळे भाग पाहणे) करणारे लोक काही कमी नाहीत.
या मालिकांतून आपल्यापर्यंत येणाऱ्या कंटेंटला सध्या तरी कुठलीही सेन्सॉरशिप नाही. त्याऐवजी मालिका सुरू होतानाच संबंधित ‌‌व अपेक्षित प्रेक्षकवर्गाचा वयोगट आणि त्यात हिंसाचार, नग्नता आहे असे सूचित करणारे इशारे येत असतात. या जालमालिकांमधून सध्या आपल्यापर्यंत काय येत आहे? भारतासारख्या विशाल, खंडप्राय देशात सर्व भाषा, प्रदेश, संस्कृती ओलांडून खपणाऱ्या दोनच गोष्टी आहेत - माणसांचे लैंगिक व्यवहार आणि त्याची मूलभूत गुन्हेगारी प्रवृत्ती. या मालिका तयार करणारे लोक हुशार आहेत. त्यांचा प्रेक्षकवर्गाचा अभ्यास आधीच नीट झालेला असतो. कुठलीही रिस्क न घेता, त्यांनी सेक्स आणि क्राइम या दोन गोष्टी विकायला सुरुवात केली आहे. आणि अपेक्षेप्रमाणेच, त्या जोरदार खपताहेत. बहुतेक मालिकांचा ‘यूएसपी’ हाच दिसतो आहे. भारतांतील चित्रपटांत (अगदी ‘प्रौढां’साठीच्या) न दिसणारी नग्नता, लैंगिक दृश्ये आणि भयानक अंगावर येणारा, किळसवाणा हिंसाचार असा सगळा मसाला या मालिकांमध्ये खच्चून भरलेला दिसतो. वास्तविक हा भाग वगळला तरीही यातल्या काही मालिका उत्तम आहेत आणि त्यांना चांगला प्रेक्षकवर्गही मिळेल. मात्र, तरीही त्यात मालिकांमध्ये या गोष्टी एखाद्या खाद्यपदार्थावर सजावटीसाठी वरून कोथिंबीर किंवा खोबरं टाकतात, तशा भुरभुरलेल्या दिसतात. काही मालिकांमध्ये हे खोबरं जास्त आणि मूळ भाजी कमी असाही प्रकार दिसतो. त्यांना जसा मिळायला हवा, तसाच प्रतिसाद मिळतो आहे.
महत्त्वाचे म्हणजे आता या मालिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांची गुंतवणूक होत आहे. मोठमोठ्या प्रॉडक्शन कंपन्या यात उतरल्या आहेत, अनेक नामवंत व बडे दिग्दर्शक या माध्यमात काम करू लागले आहेत. दिग्दर्शकाला जे आणि जसं दाखवायचंय ते आणि तसं दाखवायचं स्वातंत्र्य त्याला इथं मनमुराद उपभोगता येत आहे. त्यामुळं एखाद्याकडं जर खणखणीत आशय असेल, तर त्याला तो इथं जोरदार वाजवता येणार आहे आणि प्रेक्षकही त्याला तसाच प्रतिसाद देतील, याची जवळपास खात्री आहे. त्यामुळं आत्ता नाही तरी निदान भविष्यात तरी इथं चांगला कंटेंट येईल आणि तोच टिकेल, असं वाटतं. याचं कारण मुळात हे भविष्यातलं महत्त्वाचं माध्यम असणार आहे; किंबहुना आत्ताच ते बऱ्यापैकी महत्त्वाचं माध्यम झालंही आहे. त्यामुळं इथल्या प्रत्येक गोष्टीची चर्चा होणार, टीकाटिप्पणी होणार, बरी-वाईट मतं मांडली जाणार!
यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मनोरंजनाचे प्रतल आता वैयक्तिक होते आहे. सिनेमा किंवा नाटक यासारख्या माध्यमांतून सामूहिक आस्वादनाचा आनंद आपण एवढे दिवस घेत होतो. आता पुस्तकवाचनासारखा हा आनंदही वैयक्तिक पातळीवर येणार आहे. सामूहिक आस्वादनासाठीच्या कला राहतीलच; पण एकट्याला आपल्या मोबाइलमध्ये कधीही, कुठेही आपल्या सोयीने पाहता येणाऱ्या या जालमालिकांना पसंती वाढत जाणार आहे. पुढच्या पाच वर्षांत किंवा त्याहूनही कमी कालावधीत मनोरंजन क्षेत्राचे सर्व आयामच बदलवून टाकण्याची ताकद या माध्यमात आहे. आताच काही काही चित्रपट फक्त या ‘ओटीटी’ सेवेवरच थेट प्रदर्शित होत आहेत. थिएटरमध्ये जा, भरपूर पैसे मोजा, पॉपकॉर्नलाही पैसे द्या, येता-जाता ट्रॅफिक जॅममध्ये अडका, पेट्रोल-पार्किंगला पैसे घालवा यापेक्षा घरच्या घरी, बेडरूममध्ये, गादीवर लोळत, एसीमध्ये बसून हवी ती मालिका, पॉज करत करत किंवा सलग अशी कशीही बघता येत असेल, तर कुणीही सहजच हा दुसरा पर्याय स्वीकारल्याशिवाय राहणार नाही. भारतात आजही कुठल्याही गोष्टीला मोजावी लागणारी किंमत हे अनेक गोष्टी ठरविण्यामागचं मुख्य कारण असू शकतं. सुरुवातीला अगदी फुकट असलेल्या या सेवांना आता पैसे मोजावे लागत आहेत. मात्र, तरीही ते एका वेळेला घरातील चार जणांनी सिनेमाला जाण्यात होणाऱ्या खर्चापेक्षा किती तरी कमी आहे. किंबहुना, तेवढ्या किमतीत एखाद्या सेवेची वर्षभराची वर्गणी भरणं शक्य आहे. 
हे आभासी मनोरंजन एवढं वैयक्तिक झाल्याचे फायदे म्हणजे प्रत्येकाला शांतपणे आपल्याला जे हवं ते पाहता येईल. एकाच घरात जेवढी डोकी, तेवढे स्वभाव आणि आवडी-निवडी. मात्र, इथं प्रत्येकाला हवं ते पाहण्याचं स्वातंत्र्य असल्यानं त्यावरून वाद-विवाद, कटकटी होणार नाहीत. ज्याला जे हवे ते त्याने निवडून पाहावे, अशी स्थिती असेल. त्यामुळे एकाच घरात तीन जण आपापल्या मोबाइलमध्ये डोके आणि कानात इअरफोन खुपसून, तीन वेगवेगळ्या कार्यक्रमांचा आस्वाद घेताहेत, असंही दृश्य दिसेल. खरं तर आत्ताच ते दिसतं आहे.
याची दुसरी बाजू म्हणजे मनोरंजन वैयक्तिक पातळीवर उतरल्याने सामूहिक आस्वादनाची आपली आवड, इच्छा व क्षमता कमी होणार काय, असा प्रश्न उपस्थित होतो. आनंद असो वा दु:ख, कुठल्याही भावनेचं ‘शेअरिंग’ ही माणसाची मूलभूत गरज असते. कलेचा सामूहिक आस्वाद घेताना आपोआप हे शेअरिंग होत असतं. पूर्वी सिनेमा थिएटरांवर आवडत्या गाण्यावर पडणारा नाण्यांचा पाऊस किंवा तमाशा पाहताना उडणारी शेले-पागोटी म्हणजे या शेअरिंगचंच एक उदाहरण होतं. अनेक कलावंतांना आजही थिएटर करावंसं वाटतं, महत्त्वाचं वाटतं याचं एक कारण म्हणजे समोरून मिळणारी जिवंत दाद! सामूहिक आस्वादनाच्या प्रक्रियेत प्रेक्षकांची कलाकारांसोबत किंवा सिनेमासारखी कला असेल, तर अन्य प्रेक्षकांसोबत होणारी ही जिवंत देवाणघेवाण फार महत्त्वाची आहे. जालमालिकांचा वैयक्तिक आस्वाद घेताना त्या आनंदाची ओढ माणसाला कायम वाटत राहील का, असा प्रश्न पडतो. 
याखेरीज अनेकदा या मालिकांचं ‘बिंज वॉचिंग’ करण्याचं व्यसन लागू शकतं. एकाच प्रकारच्या आभासी जगात, त्यातही गुन्हेगारी स्वरूपाच्या, सतत दीर्घकाळ मेंदू वावरत राहिला तर त्या माणसाच्या मानसिकतेवर त्या दृश्यांचा, घटनांचा परिणाम होणारच नाही, असं कुणीही ठामपणे म्हणू शकणार नाही. आधीच विकेंद्रित झालेल्या कुटुंबात आता प्रत्येक व्यक्ती असं स्वतंत्र बेट करून जगू लागली, तर ते या कुटुंबव्यवस्थेच्या पायालाच धक्का लागल्यासारखे होईल. कुणी म्हणेल, की आपण टीव्हीवरही पूर्वी मालिका पाहतच होतो. तेव्हाही अशाच चर्चा व्हायच्या. हे खरं असलं, तरी त्या मालिका सगळं कुटुंब एकत्र बघत असे. आता तेवढ्यापुरतंही एकत्र येण्याची गरज उरलेली नाही. शिवाय जालमालिकांतून येणारा आशय हा किती तरी भडक आणि तीव्र स्वरूपाचा असू शकतो, हा महत्त्वाचा फरक आहे.
एका अर्थानं मनोरंजनाची व्याप्ती पुन्हा मोठ्या पडद्याकडून (अति)छोट्या पडद्याकडे अशी पसरते आहे. ही व्याप्ती केवळ भौतिक नाही, तर मनोरंजनाचे हे ‘मायाजाल’ तुमच्या-आमच्या मनाचाही ताबा घेणार आहे. एकीकडे कृत्रिम बुद्धिमत्तेने आपल्या आहार-विहारावर सत्ता गाजवायला सुरुवात केली आहेच; दुसरीकडे या मायाजालाच्या प्रभावामुळे आपल्या मनातल्या विचारांवरही कदाचित आपलं नियंत्रण राहणार नाही. या चक्रात योग्य त्या आशयाची निवड करणं हे आव्हानात्मक काम होऊन बसणार आहे. ‘मायाजाला’चा आनंद लुटताना या आव्हानाचंही भान ठेवू या!
---

(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती : ३१ मार्च २०१०९)

---