युक्रेनचा ‘विनोद’?
-----------------
‘विनोदवीर झाला अध्यक्ष’ अशा आशयाची शीर्षकं नुकतीच एका देशातल्या सर्व प्रमुख वर्तमानपत्रांत नुकतीच झळकली. हे शीर्षक वाचून काहींना ‘हे तर तीन वर्षांपूर्वीच झालंय,’ असं रास्तपणे वाटू शकेल, तर काहींना आपल्या मायभूमीत पाच वर्षांनी असं घडू शकेल काय, अशी एक आशा वाटू शकेल. पण हे शीर्षक या दोन्ही वाचकांना जे वाटतंय, त्याविषयी नाहीच. ते आहे युक्रेन या देशातलं. होय, युक्रेननं नुकतंच आपला अध्यक्ष म्हणून एका विनोदवीराला निवडून दिलंय. व्लजिमिर झेल्येन्स्की असं त्याचं नाव. युक्रेनी जनतेनं झेल्येन्स्की यांना नुसतं निवडून नव्हे, तर प्रचंड (जवळपास तीन चतुर्थांश) बहुमतानं निवडून दिलंय. त्यामुळं हा जगभर चर्चेचा विषय झालाय.
गेल्या आठवड्यात युक्रेनमध्ये पार पडलेल्या निवडणुकीत झेल्येन्स्की यांनी आत्ताचे अध्यक्ष पेत्रो पोरोशेन्को यांना दणदणीत धोबीपछाड दिला आहे. अवघे ४१ वर्षांचे झेल्येन्स्की युक्रेनमधील लोकप्रिय विनोदवीर आहेत. गेली साडेतीन वर्षे ते ‘सर्व्हंट ऑफ द पीपल’ या नावाच्या एका उपहासात्मक विनोदी मालिकेत काम करीत आहेत. या मालिकेत ते एका शिक्षकाचे काम करतात. या शिक्षकाला भ्रष्टाचाराची चीड असते आणि त्याबद्दल तो सातत्यानं सोशल मीडियावरून आवाज उठवत असतो. त्यावरून त्याला लोकांचा मोठा पाठिंबा मिळत जातो आणि विशेष म्हणजे तो एके दिवशी युक्रेनचा अध्यक्ष होतो. असं या मालिकेचं कथानक झेल्येन्स्की यांच्याबाबत प्रत्यक्षात उतरलं आहे. थोडक्यात, टीव्हीच्या पडद्यावरची गोष्ट वास्तवात घडली आहे. युक्रेनच्या इतिहासात घडलेल्या या अभूतपूर्व गोष्टीकडं त्यामुळंच सगळ्या जगाचं लक्ष वेधलं गेलं आहे. एका विनोदवीराकडं देशानं आपलं नेतृत्व सोपवावं ही गोष्ट अनेकांना अनेक अर्थांनी लक्षणीय वाटते आहे. त्यामागचे राजकीय, सामाजिक संदर्भ तपासले जात आहेत. युक्रेनच्या जनतेचा मानसिकतेचा विचार होतो आहे. आपल्याही देशात असं कधी घडू शकेल का, याबाबत तर्क-वितर्क मांडले जात आहेत.
वास्तविक, आपल्या आवडत्या नायकाला किंवा नायिकेला राजकीय क्षेत्रातही लोकांनी भरभरून पाठिंबा दिल्याची उदाहरणं कमी नाहीत. आपल्याकडे तमिळनाडू व आंध्र प्रदेश या दोन राज्यांचा इतिहासच पुरेसा आहे. अमेरिकेनेही रोनाल्ड रेगन यांच्यासारख्या हॉलिवूडच्या देमारपटांच्या नायकाला देशाच्या अध्यक्षपदी बसवलं आहेच. युक्रेनमध्येही असंच झालंय. झेल्येन्स्की यांच्या ‘सर्व्हंट ऑफ द पीपल’ या मालिकेची लोकप्रियता प्रचंड होती. त्यातच त्या मालिकेतील भ्रष्टाचाराविरुद्ध लढणाऱ्या सामान्य नायकाचं रूप देशातील सर्वसामान्य जनतेला आपलंसं वाटणं स्वाभाविक होतं. त्यांनी या मालिकेच्या नावानं राजकीय पक्ष काढला. त्यातून पुढं त्यांची लोकप्रियता वाढत गेली. पाच वर्षांपूर्वी युक्रेनमधील रशियाच्या बाजूनं झुकलेलं सरकार पडलं आणि पेत्रो पोरोशेन्को अध्यक्ष झाले. पेत्रो पोरोशेन्को यांच्या काळात देशभरात होत असलेल्या कथित भ्रष्टाचारावर ‘सर्व्हंट ऑफ द पीपल’ मालिकेतून तोंडसुख घेतलं जातं. गेल्या साडेतीन वर्षांपासून ही मालिका सुरू आहे आणि तिची लोकप्रियता अबाधित आहे. झेल्येन्स्की यांना या मालिकेतील भूमिकेनंतर अफाट लोकप्रियता मिळाली. त्यानंतर त्यांनी अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याचा गांभीर्यानं विचार सुरू केला. त्यांच्या बाजूनं जनमत होतं. त्यांचे राजकीय दृष्टिकोन किंवा देशासमोरील प्रश्नांबाबत त्यांचं नक्की काय धोरण असेल याबाबत फारसं कुणाला काही माहिती नाही. मात्र, एक सामान्य माणूसच या देशाचं भलं करू शकतो, अशा अर्थाचा त्यांच्या मालिकेतील संदेश आणि (आपल्याकडील ‘नायक’ या चित्रपटाप्रमाणे) एका शिक्षकाचं अचानक देशाचं अध्यक्ष होणं युक्रेनमधील सामान्य जनतेला भावलं. झेल्येन्स्की यांनी या लोकप्रियतेचा फायदा घेतला. त्यांचा प्रचार इतर राजकीय नेत्यांपेक्षा ‘हट के’ होता. त्यांनी जाहीर प्रचारसभा वा भाषणं केलीच नाहीत. त्याउलट सोशल मीडियावर उपहासात्मक, व्यंगात्मक व्हिडिओ टाकले. हे व्हिडिओही लोकप्रिय झाले. ‘नो प्रॉमिसेस, नो डिसअपॉइंटमेंट’ हे त्यांचं वाक्य गाजलं.
अखेर प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी लोकांवर या ‘नायका’चा किती प्रभाव पडला आहे, हे स्पष्ट झालं. युक्रेनमधील जनतेने तब्बल ७३ टक्के मतं झेल्येन्स्की यांच्या झोळीत टाकली. पोरोशेन्को यांनी पराभव मान्य केला. मात्र, युक्रेनच्या जनतेने निवडलेल्या नेत्यासमोर आता पुष्कळ मोठी आव्हानं आहेत, असंही त्यांनी बोलून दाखवलं. आपण राजकारण संन्यास घेणार नसल्याचंही त्यांनी ठणकावून सांगितलं. पोरोशेन्को यांच्या म्हणण्यात अगदीच तथ्य नाही, असं नाही. झेल्येन्स्की यांच्या राजकीय धोरणांविषयी अद्याप कुणालाच काही माहिती नाही. पोरोशेन्को यांच्या म्हणण्यानुसार, झेल्येन्स्की आता लवकरच रशियाच्या कह्यात जातील. युक्रेन व रशिया यांच्यात क्रीमियावरून मोठा संघर्ष आहेच. झेल्येन्स्की यांनी मात्र, आपण ‘शांततेसाठी प्रयत्न करू,’ असं अगदी टिपिकल राजकारणी व्यक्तीसारखं उत्तर दिलंय. झेल्येन्स्की यांच्याबाबतही सगळंच आलबेल आहे, असं नाही. युक्रेनमधील प्रभावशाली, धनाढ्य व सत्तेवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष नियंत्रण ठेवणाऱ्या कुटुंबांपैकी आयहोर कोलोमोइस्की या बड्या धेंडाच्या हातची झेल्येन्स्की हे कळसूत्री बाहुली आहेत, अशी टीका आधीपासूनच होतेय. याचं कारण झेल्येन्स्की यांची ‘सर्व्हंट ऑफ द पीपल’ ही मालिका ज्या ‘वन प्लस वन’ नावाच्या लोकप्रिय वाहिनीवरून प्रसारित होतेय, ती कोलोमोइस्की यांच्या मालकीची आहे. एवढंच नव्हे, तर हे कोलोमोइस्की नामक गृहस्थ बरेच ‘उद्योगी’ आहेत. युक्रेनच्या प्रमुख बँकेला मोठा गंडा घातल्याच्या आरोपावरून त्यांच्याविरुद्ध तिथं अनेक केसेस सुरू आहेत. त्यामुळं कोलोमोइस्की महाशय युक्रेनमधून पळून इस्राईलमध्ये जाऊन बसले आहेत. (आपल्याकडच्या काही लोकांची आठवण झाली ना!) त्यामुळं झेल्येन्स्की निवडून येण्यात कोलोमोइस्की यांचाच हात आहे आणि ते झेल्येन्स्की यांना कळसूत्री बाहुलीसारखं वागवतील, अशीही भीती युक्रेनमधील काही राजकीय निरीक्षक व्यक्त करीत आहेत. झेल्येन्स्की यांनी अर्थातच या आरोपांचा इन्कार केला आहे. ‘कोलोमोइस्की यांच्या घराण्याचा प्रभाव युक्रेनमधील जवळपास सर्वच संस्थांवर आहे. मग देशातील चार कोटी नागरिक त्यांच्या हातातील बाहुले झाले का,’ असा सवाल ते करतात. ते काहीही असलं, तरी या देशाच्या नेतृत्वाचं खरोखर मोठं आव्हान आता झेल्येन्स्की यांना पेलावं लागणार आहे. त्यांच्या सर्वसामान्य माणसाला आपल्याशा वाटणाऱ्या प्रतिमेमुळं लोकांनी त्यांना भरभरून निवडून दिलं आहे. मालिकेत काम करणं आणि देश चालवणं यात नक्की काय फरक असतो, हे आता त्यांच्या लक्षात येईल. ‘झेल्येन्स्की यांच्याकडून आम्हाला योग्य ते सहकार्य मिळेल,’ असे सूचक, गर्भित इशारे रशियाकडून सुरू झाले आहेतच.
झेल्येन्स्की यांची अध्यक्षपदी झालेली निवड सामान्य नागरिकांच्या बदलत्या मानसिकतेची निदर्शक आहे. टिपिकल राजकारणी लोकांना जगभरातील सगळेच सामान्य लोक एवढे कंटाळले आहेत, की जरा बरा पर्याय दिसताच ते फारसा मागचा-पुढचा विचार न करता त्याला भरभरून निवडून देऊ लागले आहेत. आपल्याकडेही २०११ मध्ये अशाच प्रकारचं वातावरण होतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. काही अरबी देशांतही ‘क्रांती’चे वगैरे वारे वाहू लागले होते. त्याचं पुढं काय झालं, हे आपल्याला नीट ठाऊक आहे. आपल्याकडच्या अशा लोकांनी डोक्यावर घेतलेल्या (सामान्यांतून आलेल्या इ.) नेत्यांनी पुढं काय कर्तबगारी गाजविली, हेही आपण पाहिलं आहे. ‘पॉलिटिक्स इज द लास्ट रिसॉर्ट फॉर द स्काउंड्रल्स’ असं जॉर्ज बर्नार्ड शॉनं म्हणून ठेवलंय. मात्र, आता झेल्येन्स्की यांनी ‘पॉलिटिक्स इज आल्सो फॉर गुड मेन’ हे दाखवून दिलं आहे. म्हणजे झेल्येन्स्की तसे असावेत, असा युक्रेनियन जनतेचा समज आहे. तो त्यांचा खरोखरचा समज आहे, की झेल्येन्स्की यांच्या रूपानं राजकारण नावाच्या महान उद्योगानं तेथील जनतेवर केलेला हा भयानक विनोद आहे, हे मात्र येणारा काळच ठरवील.
---
(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, २७ एप्रिल २०१९)
---