28 May 2019

मन-मितवा - तीन भाग

मन-मितवा
--------------

माझ्या स्नेही प्रा. डॉ. वर्षा तोडमल यांच्या विनंतीवरून ‘मनशक्ती’ मासिकात मी फेब्रुवारीपासून ‘मन-मितवा’ या नावाचं एक सदर लिहितो आहे. माझ्या आत्तापर्यंतच्या हलक्याफुलक्या लेखनापेक्षा हे लेखन जरा वेगळं आहे. मनाशी साधलेला संवाद असं त्याचं स्वरूप आहे. यातही गणू गणपुले आहेच. पण लेखनाचा बाज किंचित वेगळा आहे. त्या मासिकात प्रसिद्ध झालेले पहिले तीन भाग इथं देत आहे... आपल्याला हे लेखन आवडेल, असा मला विश्वास आहे....

---------


१. मन क्यूं बहका रे बहका...
---------------------------------


गणू गणपुले हा सामान्य, मध्यमवयीन, मध्यमवर्गीय इसम असला, तरी त्याचं मन सामान्य, मध्यमवयीन व मध्यमवर्गीय नव्हतं. त्यामुळं त्याच्या मनाला असामान्य गोष्टींची स्वप्नं पडत. त्याच्या मनाला वयाचंही बंधन नसल्यानं ते सदैव सोळा ते अठरा याच वयोगटात बागडे. गणू मध्यमवर्गीय असला, तरी त्याचं मन उच्चवर्गीय होतं. थोडक्यात, श्रीमंतच होतं म्हणा ना! अर्थात मनाची ही स्थिती सर्व काळ अशीच राहत नसे. त्यामुळं कधी कधी ते अगदी दरिद्री असल्यासारखं वागे आणि गणूला त्याची भयंकर लाज वाटे. 
आपलं स्वत:चं मन आपल्या ताब्यात असू नये, या गोष्टीची गणूला आत्यंतिक खंत वाटत असे. पण त्यानं आजूबाजूला पाहिलं असता, कुणाचंच मन त्यांचं ऐकत नसल्याचं त्याला आढळून आलं. बहुतेकांना त्यांच्या मनासारखं शिकता आलं नव्हतं. मनासारखी नोकरी मिळाली नव्हती. नंतर मनासारखी छोकरीही लाभली नव्हती. त्यामुळं त्या सर्वांना म्हणे, मन मारूनच जगावं लागत होतं. त्यामुळं या मारून टाकलेल्या मनानं आता त्यांच्याविरुद्ध बंड पुकारलं होतं. अशा या बंड पुकारलेल्या मनाला उद्देशूनच समर्थांनी ‘अचपळ मन माझे नावरे आवरिता’ असं म्हटलं होतं की काय, असं गणूला वाटून गेलं. 
साध्या रोजच्या जगण्यात गणूचं मन त्याचं ऐकेनासं झालं, की गणूला त्रास होतो. उदाहरणार्थ, दर वर्षीप्रमाणे यंदाही एक जानेवारीला त्यानं चालायला जायचा संकल्प केला. पण दोन दिवसांतच त्याच्या मनानं गणूच्या इच्छेप्रमाणं चालायला नकार दिला आणि गणूचा संकल्प तिसऱ्या दिवशी मोडला. एवढ्या थंडीचं पहाटे उठू नये, असं गणूचं मन सतत आक्रंदत होतं. मग गणूला त्याचं ऐकण्याशिवाय काही पर्यायच उरला नाही. गणूला फार गोड खाऊ नये, असं त्याला डॉक्टरनी सांगितलं होतं. नसत्या व्याधी मागं लागण्यापेक्षा आत्ताच आहार नियंत्रित करावा, असा सल्ला त्याला मिळाला होता. पण कुठल्याही लग्नात, पार्टीत किंवा कुठल्याही सणाच्या दिवशी गणूचं मन थाऱ्यावर राहत नसे. जिलेबी, श्रीखंड, पुरणपोळी किंवा गुळपोळीचे ‘मोह मोह के धागे’ त्याच्या मनात अडकून बसत असत. मग त्याचं मन डॉक्टरी सल्ला धुडकावून सरळ समोर येईल तो पदार्थ खाण्याच्या मागं लागे. 
गणूच्या आयुष्यात तसे फार मोह नव्हते. अर्थात गेल्या पाच-सात वर्षांत स्मार्टफोन नावाची वस्तू हातात आल्यापासून त्याच्याही आयुष्यात बदल झालेच होते. आपल्यासमोर मोहाची गुहाच उघडली आहे, असे भास त्याला वेळोवेळी होत होते. गणूनं स्मार्टफोन घेतला, तेव्हा त्याचं मन दात विचकत भयाण हसलं होतं. गणूला आपल्या मनाचं तसं ते भयंकर हसणं अजिबात आवडलं नव्हतं. पण हळूहळू त्याला आपल्या मनाचे इरादे समजत गेले. गणू पूर्वी निदान मनाशी किमान काही तह करण्याच्या स्थितीत तरी असायचा. आता मनानं त्याच्यावर जो काही ‘स्मार्ट सर्जिकल स्ट्राइक’ केला होता, त्यानंतर गणू पुरता कोलमडला होता. हात मागे बांधून तो मनाला शरण गेला होता. पण गणूचं मन एवढं उदार नव्हतं. त्यानं गणूची शरणागती स्वीकारली नाही. मनाचे नवे डावपेच पाहून गणू भयंकर खचला. आता आपलं काही खरं नाही, याची त्याला खात्री पटली. पण आपल्या मनाशी हे बोलण्यास तो घाबरू लागला. आपण घाबरलोय हे मनाला कळलं, तर मन आणखीनच चेकाळेल, हे त्याला माहिती होतं. मग गणूनं हळू हळू मनाशी असलेला संवाद बंद करून टाकला. आता कित्येक दिवस झाले, तो आपल्या मनाशी बोललेलाच नाही. मनाचं काय चाललेलं असतं, हे गणूला कळत नाही. पण गणूचं काय चाललंय याची त्याच्या मनाला सगळी खबरबात असते. त्यामुळं गणूची अवस्था फार बिकट झालीय. 
गणूचं मन वेगळ्या दुनियेत वावरतंय आणि खुद्द गणू वेगळ्या दुनियेत. पूर्वी असं नव्हतं. दोघेही चांगले मित्र होते. हातात हात घालून सगळीकडं फिरायचे. गणूला काही दुखलं, तर मनाला कळायचं. मनाला बरं नसलं, तरी गणूला समजायचं. दोघं एकमेकांना सांभाळून असायचे. पण गणूच्या साध्यासुध्या आयुष्यात आभासी विश्वानं प्रवेश केला आणि सगळं बिनसलं. गणूचं आता वेगळं विश्व आहे. ते खरं आहे की खोटं आहे, याची गणूला फिकीर नाही. पण तिथं गणूला तरंगल्यासारखं वाटतं. कुठलीही नशा न करता, त्याला तिथं ‘हाय’ होता येतं. आधी गणूला याची मजा वाटली. पण नंतर त्याच्या लक्षात आलं, की आपल्याला या आभासी जगाचीच नशा चढलीय. आभासी जगात वावरायला आधी गणूचं मन तयार नव्हतं. पण गणू त्याचं बोट मागं सोडून केव्हा पुढं आला, त्याचं त्यालाही कळलं नाही. आता मनाचा पत्ता सापडत नाही, पण मनाला गणूची सगळी खबर असल्यानं ते मात्र गणूला सोडत नाहीय. आता त्याचं मन त्याच्यावरच सूड उगवतंय. हे दुष्टचक्र भेदण्यासाठी गणू धडपडतोय... अनेक डॉक्टर केले, हकीम केले, वैद्य केले. पण उतारा नाही. अखेर गणू पुन्हा मनाला शरण गेला आणि विचारता झाला, बाबा रे, मी काय करू, म्हणजे तू माझं ऐकशील? 
मन म्हणालं, सोपं आहे. तू माझं ऐक. मग मी तुझं ऐकीन...
आणि गणू त्याच्या मनाचं ऐकू लागला...
हीच ती कहाणी...

(क्रमश:)

(फेब्रुवारी २०१९)

---

२. मनाचं मन...
-----------------------

गणू आपलं ऐकायला तयार झाला, हे कळल्यावर मनाला पुष्कळ बरं वाटलं. तसं ते गणूला चांगलं ओळखत होतंच. गणू आपल्याला शरण का आलाय, हेही त्याला नीट कळलं होतं. गणू गणपुलेसारख्या सर्वसामान्य, मध्यमवर्गीय इसमाला मनाचं हे असलं बंड परवडणारं नव्हतं, हेही त्याच्या मनाला व्यवस्थित माहिती होतं. गणूची ती रडकुंडीला आलेली मुद्रा पाहून मनाला खदखदून हसू आलं. 
ते म्हणालं, ‘अरे मित्रा, असा चेहरा पाडून का बसला आहेस? काय होतंय?’
गणू उत्तरला, ‘तू माझ्याशी बोलत नाहीस. तुझे काही तरी निराळेच उद्योग चाललेले असतात. त्यामुळं मला अस्वस्थ व्हायला होतं. तू पूर्वीसारखा का वागत नाहीस?’
मन म्हणालं, ‘याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा! जे प्रश्न मी तुला विचारायला हवेत, ते तूच मला विचारतोयस? धन्य आहेस. अरे, तुला ठाऊक आहे का तू माझ्याशी शेवटचं कधी बोललास? माझी विचारपूस केलीस? आठव जरा...’
गणोबा सांगते झाले, ‘तू माझ्यातच आहेस. मी जे काही करतो ते सगळं तुला माहिती असतं. मग तुझी कशाला विचारपूस करायची? तुला परत तुला वेगळं रिपोर्टिंग कशाला करायचं रे?’
मन म्हणालं, ‘वा रे वा! मी तुझ्यात असलो, तरी तू अनेकदा मला अंधारात ठेवून, चुकवून गोष्टी करीत असतोस. तेव्हा तुला वाटत असतं, की मला काही कळत नाही. पण माझा प्रॉब्लेम हा आहे, की मला तू करत असलेली प्रत्येक गोष्ट समजते, दिसते. तुझे विचार कळतात. तुला आता नेमकं काय सुचतंय, तेही कळतं.’
गणू म्हणाला, ‘अच्च्छा? मग प्रॉब्लेम काय आहे? सगळं तर तुला ठाऊक असतंच ना...’ 
मन म्हणालं, ‘अरे माझ्या मित्रा, मला चुकवून तू ज्या काही गोष्टी करतोस ना, त्या मला माहिती नाहीत असं तुला वाटत असतं; पण प्रत्यक्षात त्या मला कळत असतात. पण ते तुला कळत नाही, या गोष्टीचा मला त्रास होतोय.’
गण गणपुले आता सर्द झाला. त्याला मन काय बोलतंय तेच कळेना. तो म्हणाला, ‘एक मिनिट, एक मिनिट! तू काय बोलतोयस? मी तुला लपवून काय करतो? तुला माहिती नाही, असं मला का वाटेल? आणि तुला हे माहिती नाही असंही मला का वाटेल? आणि उगाच असं वाटून तू त्रास का करवून घेतोयस?’
मन म्हणालं, ‘गणोबा, शब्दांचे खेळ करायला तुम्हाला छान जमतं हो. पण त्यानं माझा प्रॉब्लेम सुटणार नाहीय. तू अजूनही हे मान्य करत नाहीयेस, की मला माहिती नाही असं समजून अनेक गोष्टी तू करत असतोस... त्या करणं बंद केलंस ना, की मग माझं काही म्हणणं नाही.’
गणोबा म्हणाले, ‘माझं असं म्हणणं आहे, की तूच मला हे करायला भाग पाडतोस. तुला एकाही गोष्टीचा मोह सोडवत नाही. तुला जगातल्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. तू त्याचे खेळ सुरू करतोस आणि त्रास मला होतो... मला एखादी गोष्ट करू नये, असं वाटत असतं आणि तू नेमका तिकडंच धाव घेतोस. मी प्रयत्नपूर्वक एखाद्या गोष्टीपासून स्वत:ला लांब ठेवायचा प्रयत्न करतो आणि तू अगदी मोका साधल्यासारखा तिथंच तडमडतोस. म्हणजे आज एखादा सिनेमा न पाहता, त्या वेळेत जरा कामाच्या चार गोष्टी करू, तर तू हट्टानं तिकडंच धाव घेणार. मग माझी कामं बोंबलणार... अस्सा राग येतो तुझा अशा वेळी...’
मन म्हणालं, ‘हे पाहा गणूभाऊ, मला मन मारून जगायला आवडत नाही. मला हव्या त्या गोष्टी मला करू द्या की!’
मनाचं हे उत्तर ऐकून गणोबा थक्क झाले. मनाला मन असतं? काहीही! हे आपलं मन आता काहीही बडबडतंय.
गणू म्हणाला, ‘अरे, तू माझं मन आहेस. तुला परत वेगळं कसलं आलंय मन? काहीही बोलतोस आपलं!’
मन म्हणालं, ‘मला वाटलंच होतं, तू हे बोलणार. कारण तू माझ्या मनाचा कधीच विचार केलेला नाहीस. तुझ्या मनालाही एक मन आहे, हे तुला कधीच कळलेलं नाही. तू माझं मन दुखावलं नसतंस तर आज ही वेळ आली नसती...’
गणू म्हणाला, ‘बरं बाबा, काय म्हणतंय तुझं मन? सांग एकदा घडाघडा...’
मन म्हणालं, ‘माझं मन म्हणतंय, की गणू बिघडला. आपल्याशी बोलत नाही. मग आपणही त्याच्याशी कट्टी करून टाकू. उगाच स्वत:ला त्रास करून घेण्यापेक्षा न बोललेलंच बरं. काय चुकलं आमचं यात?’
गणू म्हणाला, ‘आमचं?’
मन उत्तरलं, ‘अरे, मी आणि माझं मन रे. आम्ही बोलत असतो बाबा एकमेकांशी. तुझ्यासारखं नाही...’
गणू वैतागून बोलला, ‘परत परत आपण तिथंच येतोय. तुला माझ्याशी अशी कट्टी करता येणार नाही. उगाच काही तरी काढू नकोस...’
मन म्हणालं, ‘तेच म्हणतोय. चल बट्टी कर परत. मग माझंही मन खूश होईल. तुझ्याशी परत बोलायला मिळेल... कसलं भारी ना!’
मनाच्या या बोलण्यापुढं गणू निरुत्तर झाला... पण मनातल्या मनात खूशही झाला... 
आणि या वेळी त्याच्या मनाला आणि मनाच्या मनालाही ते कळलंच... मग तिघेही खूश झाले...!!!

(क्रमश:)

(मार्च २०१९)

----

३. सीसीटीव्ही...
-----------------------


आपल्या मनालाही मन आहे, या बातमीनं गणू गणपुले आधी आश्चर्यचकित व नंतर आनंदित झाला. आता गणू, त्याचं मन व त्याच्या मनाचं मन तिघंही एकमेकांशी नीट बोलू लागले. गणूचं मन आणि त्याच्या मनाचं मन यांची चांगलीच दोस्ती होती. अगदी घट्ट मित्र होते ते दोघं... गणूला ते जाणवलंच त्यांच्या बोलण्यातून! त्या तुलनेत आपण आणि आपलं मन एकमेकांपासून लांब गेलो आहोत, हेही त्याला नीटच जाणवलं. 
(इथं गणू आता फ्लॅशबॅकमध्ये...) वास्तविक गणूचं मन व त्याची एके काळी छान मैत्री होती. किंबहुना, गणू आपल्या मनाचंच फक्त ऐकत असे. मनाला आवडेल तेच करीत असे. गणूचं मन तसं उत्साही होतं. त्याच्यामुळं गणूलाही वेगवेगळ्या गोष्टी करायला मजा यायची. आयुष्यात अगदी सुरुवातीला आई-वडिलांच्या, नंतर शिक्षकांच्या, नंतर मित्रांच्या सांगण्यावरून गणू तसं वागायचा प्रयत्न करायचा. पण त्यात त्याला फारशी गंमत वाटत नसे. नंतर कधी तरी त्याला त्याच्या मनाची ओळख पटली. गणूचं मन म्हणजे उत्साहाचा धबधबाच. त्या मनाच्या ठायी नीरसता अशी नव्हतीच. एखाद्या कोकरासारखं ते सतत उड्या मारीत राहायचं. एखाद्या भुंग्याच्या आविर्भावात ते सतत या गोष्टीवरून त्या गोष्टीवर उडू पाहायचं. एखाद्या जादूगारासारखं ते आपल्या पोतडीतून काही ना काही तरी गमतीच्या गोष्टी बाहेर काढायचं. मनानं सांगायचं, की आज आपल्याला सिनेमा पाहायचाय, गाणं ऐकायचंय, भटकायला जायचंय, क्रिकेट मॅच पाहायचीय, पुस्तक वाचायचंय, आवडता पदार्थ करून पाहायचाय... आणि गणूनं ते लगेच अमलात आणलंच म्हणून समजा. मनानं सांगितलेलं ऐकलं, की आपलं सगळं छान छान होतं, यावर गणूचा पूर्ण विश्वास होता. कधी कधी गणूच्या मनासारखं व्हायचं नाही. तेव्हा जरा त्याचं मन खट्टू व्हायचं. आपल्या मनाला आवडत नसलेल्या गोष्टी कराव्या लागल्या, की गणूचीही स्वाभाविक चीडचीड व्हायची. त्यातून गणू व त्याच्या मनाचं नातं मस्त घट्ट झालं होतं. पुढं पुढं काही तरी बिनसलं आणि गणू मनाला टाळू लागला. काही गोष्टी मनाला सांगेनासा झाला. मनानं आधी वाट पाहिली. पण तरीही गणूनं बोलणं जवळपास टाकलंच म्हटल्यावर मनही निराश झालं. त्याला गणूचं हे वागणं सहन झालं नाही. गणूच्या मनानं स्वत:लाच शिक्षा द्यायचं ठरवलं. त्यानं गणूशी संवाद पूर्णपणे थांबविला. ही गणूच्या मनानं स्वत:ला केलेली शिक्षा असली, तरी गणूला किती तरी त्याचा पत्ताच नव्हता. गणूचं मन फक्त आपल्या मनाशी बोलत राहिलं. दोघेही गणूच्या वागण्यानं अगदी हिरमुसून गेले. त्यांची रयाच गेली. गणोबांना मात्र याचा काही पत्ताच नव्हता. ते आपल्या मनाला काही कळत नाही, अशा समजुतीतून मनाला फसवीत गोष्टी करीत राहिले. त्यांचं मन दु:खी-कष्टी झालं. गणूला ताळ्यावर आणण्यासाठी काय करावं, हे त्याला कळेना. 
मग एके दिवशी गणूसोबत जात असताना मनाला समोर ‘सीसीटीव्ही’ दिसला. त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. मनानं गणूला हाक मारली. बरेच दिवस बोलणं नसल्यानं गणूला आधी ऐकूच आलं नाही. मग कुणी तरी खूप लांबून हाक मारतंय, असा भास गणूला झाला. आपण एखाद्या विहिरीच्या तळाशी असताना वरून कुणी हाक मारली, तर ती कशी ऐकू येईल, तसा तो आवाज लांबून आल्यासारखा वाटला. आजूबाजूला कुणीही नव्हतं. बऱ्याच वेळानं मग गणूच्या लक्षात आलं, की आपलं मन आपल्याला हाक मारतंय! गणू मग निवांत तिथल्या बाकावर बसला. समोर जिकडं-तिकडं सीसीटीव्हीचे कॅमेरे रोखलेले होते. त्या कॅमेऱ्यांच्या कैदेत असताना कुठलीही वावगी हालचाल करणं गणूला शक्य नव्हतं. त्यामुळं त्रासिक मुद्रा करून त्यानं अखेर मनाला विचारलं, ‘काय हवंय?’ 
‘सीसीटीव्ही...’ मन उत्तरलं.
‘क्काय?’ गणोबा अजूनच वैतागून विचारते झाले.
‘हो... मी बरोबर बोलतोय. मला सीसीटीव्ही हवाय... ’ गणूचं मन म्हणालं.
‘कशाला?’ गणू त्रासून म्हणाला.
‘तुझ्यावर लक्ष ठेवायला...’ मन उत्तरलं. 
‘मी काय केलंय?’ गणूनं उलटा प्रश्न केला. पण त्याच्या विचारण्यात जोर नव्हता. आपण काय केलंय हे त्याला माहिती होतंच.
’तुला माहितीय तू चोरी केलीयस...’ मन शांतपणे, पण ठाम स्वरात म्हणालं.
‘क... कसली चोरी?’ आता गणूचा स्वर भयकंपित झाला.
‘विश्वासाची चोरी...’ मन पुन्हा एकदा शांतपणे म्हणालं - ‘तू माझा विश्वास चोरला आहेस...’ 
‘छे... छे... काहीही काय...’ गणू आता जवळपास रडकुंडीस आला.
‘हे बघ, मला कुठल्याही सीसीटीव्हीची गरज नाही. मी तुला केवळ माझी आठवण करून देण्यासाठी मगाशी सीसीटीव्हीचा विषय काढला. तुला माहिती असेलच, की मीच तुझा सीसीटीव्ही आहे. मला तू काय करतोस, ते सगळं कळतं, दिसतं, समजतं... मी दर वेळी बोलत नाही याचा अर्थ मला ते जाणवतच नाही असा घेऊ नकोस...’ गणूचं मन आता आपलं मन मोकळं करू लागलं.... ‘तुझा आविर्भाव, आवेश, आवेग हे सगळं मला माहितीय. वास्तविक तू मला अंधारात ठेवून काहीही करू शकत नाहीस. पण तुला वाटतं, की तू तसं करू शकतोस. पण ते किती चुकीचं आहे, हे आता तुझ्या लक्षात आलं असेल...’
‘हो, मला मान्य आहे... मी आता तुला न विचारता काहीही करणार नाही,’ गणोबा उत्तरले. 
‘ठीक आहे. माझा अजूनही तुझ्यावर विश्वास आहे...’ मन म्हणालं....
‘धन्यवाद मित्रा,’ गणूच्या आवाजात कृतज्ञता होती. 
‘आता रडका चेहरा करू नकोस. समोर सीसीटीव्ही कॅमेरा आहे. त्याच्याकडे बघून जरा हस...’ मन म्हणालं...
मनाच्या या वाक्यावर गणू मनमुराद हसला... तेव्हा गणूचं मन आणि मनाचं मन तिघंही छान हसले!

(क्रमश:)


(एप्रिल २०१९)

----

27 May 2019

जगणं मस्त मजेचं... मे २०१९

जगणं मस्त मजेचं...
---------------------


रसिकहो नमस्कार,
‘जगणं मस्त मजेचं’ ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून दर शनिवारी सकाळी पावणेनऊ वाजता (आणि दुसऱ्या दिवशी, रविवारी सकाळी सव्वानऊ वाजता ‘विविधभारती’वर) प्रसारित होणारी लोकप्रिय कौटुंबिक श्रुतिका मालिका..! या मालिकेसाठी लिखाण करण्याची संधी मला गौरी लागू आणि आकाशवाणी पुणे केंद्राचे संचालक गोपाळ औटी यांनी दिली. मी यानिमित्ताने श्रुतिका प्रथमच लिहिली. पुण्यात राहणाऱ्या, कुणाल व रेणू या आधुनिक, आजच्या काळात जगणाऱ्या दांपत्याच्या आयुष्यावर ही काल्पनिक श्रुतिका लिहायची होती. हे काम मला आवडलं... कुणाल इंजिनीअर, तर रेणू मराठीची प्राध्यापिका असते...
मी या मालिकेसाठी गेल्या वर्षी सप्टेंबर व ऑक्टोबर हे दोन महिने लेखन केलं. आता या वर्षी मे व जून हे दोन महिने मी या मालिकेसाठी स्क्रिप्ट लिहीत आहे. या मालिकेसाठी लिहिलेले स्क्रिप्ट मी इथं शेअर करतो आहे. अर्थात या स्क्रिप्टचं वाचन करणारे अमित वझे (कुणाल), रूपाली भावे-वैद्य (रेणू), आरती पाठक (सई), दीप्ती भोगले (दिघेकाकू), गोंधळेकरकाका (बाळाजी देशपांडे), देशमुख सर (संजय डोळे), पूर्वा बाम (सायली), प्रतुल पवार (प्रकाश) यांच्यामुळं ही श्रुतिका खऱ्या अर्थानं श्रवणीय झाली. नुकताच १२ मे रोजी या श्रुतिकेचा पन्नासावा भाग ‘आकाशवाणी’त रेकॉर्ड झाला आणि तेव्हा रेकॉर्डिंगला उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली. 
आकाशवाणीसाठी लिहावं ही माझी खूप जुनी इच्छा होती. गेल्या दोन-तीन वर्षांत तशा काही संधी मिळाल्या, तरी श्रुतिका हा प्रकार लिहायला मिळेल, असं वाटलं नव्हतं. ‘जगणं मस्त मजेचं’ या मालिकेच्या निमित्तानं माझी ही इच्छाही पूर्ण झाली, याचा मनापासून आनंद आहे. 

(* हे स्क्रिप्ट आणि प्रत्यक्षात सादर झालेले भाग यात थोडेफार बदल आहेत. कधी कलाकारांनी इम्प्रोव्हायझेशन केलं आहे, तर कधी काही भाग एडिट झाला आहे. पण एकूण इफेक्ट अर्थातच खूप चांगला आला आहे.)

-----

जगणं मस्त मजेचं : ४ मे २०१९
------------------------------------------

(कुणाल गुणगुणतो आहे, 'तुम को देखा, तो ये खयाल आया, जिंदगी धूप तुम घना साया...')

कुणाल - बरं का रेणू, तुम घना साया...
रेणू (हसत) - व्वा, व्वा... आज एकदम रोमँटिक मूडमध्ये स्वारी... काय रे?
कुणाल - अगं, रोमँटिक मूड कसला? इथं सकाळी आठ-नऊ वाजताच घामाच्या धारा लागताहेत... तो एसी सुरू कर बाई... बाहेर एवढी कडक 'धूप' आहे म्हणून मी या 'एसी'ला 'घना साया' म्हणतोय... कळलं का? तुला नाही काही...
रेणू - हा हा हा... ते मला माहितीच आहे. तू माझ्यासाठी गाणं म्हटलास त्याला आता कित्येक युगं लोटली असतील. आणि बाय द वे, ही तुझी 'घना साया' आहे ना, तिनं या वेळी किती बिल आणलंय बघ... साडेचार हजार रुपये.... कुणाल, या महिन्यात हे बिल मी भरणार नाहीय बरं का... तू भर...
कुणाल - अगं हो हो हो, आधीच बाहेर ऊन आणि तू एवढी का तापतीयेस बये? परत एसी वाढवावा लागेल आणि परत बिलाच्या नावानं तू ओरडणार...
रेणू - हो रे... साराची फी किती असते माहितीय ना महाराज? ती कोण भरतं? जरा लक्षात असू द्या... (फुरंगटून) मला माझा बँक बॅलन्स कमी झालेला मुळीच आवडत नाही... कळलं का?
कुणाल (हसत) - ओहोहो, मी म्हणजे काय रिझर्व्ह बँक आहे का गं? अगं ए, राहू दे. मी भरीन ते बिल... आम्हाला हा एप्रिल-मे महिनाच जरा बरा जातो. इन्क्रिमेंट मिळतं ना... नाही तर दहा महिने नुसती... (कळलं ना, अशा आविर्भावात हसतो....)
रेणू - मग ऐका कुणाल महाराज... यंदाच्या आपल्या ट्रिपचा सगळा खर्च तू करायचास...
कुणाल - ट्रिप? अरे वा... मस्त... कधी चाललीयेस? कोण येतंय तुझ्यासोबत? जाऊन ये... फोनबिन कर हो...
रेणू - ए ए ए, कमऑन माणसा, तू आम्हाला ट्रिपला नेण्याचं आश्वासन दिलंयस गेल्या वर्षी... गेल्या वर्षी आपण कुठंही गेलो नव्हतो... लक्षात आहे ना... राजकारणी माणसांसारखं करू नकोस... आत्ताच ती इलेक्शन संपलीय आपल्याकडची आणि मला त्या विषयावर मुळीच बोलायचं नाहीय...
कुणाल - ए रेणू, तुझं बोट बघू... शाई गेली का गं?
रेणू - कुणाल, अरे मी काय बोलतीये, तू काय बोलतोयस? शाईचा काय संबंध?
कुणाल - मागच्या रविवारी पार्टीला जाताना तू ती शाई घालवण्याचा प्रयत्न करीत होतीस ना, ते आठवलं मला... (हसतो)
रेणू - असू दे रे... आमच्या मैत्रिणींच्या ग्रुपवर लगेच याचे पन्नास उपाय आले होते. ती शाई कशी घालवता येईल याचे... पण तू एक लक्षात ठेव, ती शाई जाईल, पण तू गेल्या वर्षी आम्हाला केलेलं प्रॉमिस काही माझ्या डोक्यातून जायचं नाही हां...
कुणाल - हो गं बाई, तुम्हा बायकांच्या नको तेवढ्या तीव्र स्मरणशक्तीसमोर लोटांगणच आहे माझं... किती लाख जीबीचं मेमरीकार्ड आहे गं तुझं?
रेणू - आम्हाला राहतंच लक्षात, पण तू विसरायचं नाटक करतोयस हेही माझ्या लक्षात आलंय. ते काही नाही, यंदा आम्हाला ट्रिपला जायचंच आहे.  
कुणाल - रेणू, आपण भरपूर फिरलोय गं... तू नाव घे एखाद्या ठिकाणाचं आणि स्वतःलाच विचारून बघ, की आपण तिथं गेलोय की नाही ते? काश्मीर, कन्याकुमारी, गोवा, कुलू-मनाली, म्हैसूर-बँगलोर, हैदराबाद-रामोजी, अहमदाबाद-बडोदा, इंदूर-उज्जैन, कोणार्क-पुरी, कलकत्ता-शांतिनिकेतन, उटी, दार्जिलिंग, ताडोबा, बांधवगड, रणथंबोर...
रेणू - ही सगळी ठिकाणं ना, हो झालीयत ना, स्वप्नात सगळं बघून झालंय माझं... नाही तर तुझं ते काय, यूट्यूबवर बघू म्हणे... घरातल्या घरात बसून विश्वदर्शन... छट्... काय तरी एकेक नाद तुझे...
कुणाल - होय गं... सॉरी हं रेणू, दर वर्षी आपण यातल्या एका तरी ठिकाणी जाऊ म्हणतो आणि राहूनच जातं बघ. पण ना यंदा यातलं एक तरी ठिकाण नक्की बघू...
रेणू - काही नाही. दर वर्षी मोठमोठ्या गप्पा आणि शेवटी जातो कुठं? तर महाबळेश्वरला.... काय ती गर्दी तिथली? काटा आला बघ आत्ताही... जगात सगळे लोक महाबळेश्वरलाच का तडमडतात यार? असं नसतं म्हणावं रे त्यांना कधीच...
कुणाल - तू तरी कशाला जातेस मग? तू जा ना दुसरीकडं... चाफळला जा... खिद्रापूरला जा... अजून ते हे आपलं... ते बघून ये....
रेणू - अहाहा, अहाहा... काय त्या रोमँटिक कल्पना रे तुझ्या आउटिंगच्या? कहर आहेस....
कुणाल - हो यार रेणू... मला मान्य आहे, की आपलं हे नियोजन थोडं गंडलंच आहे. नीट प्लॅन करून, सुट्ट्या टाकून, व्यवस्थित फिरायला जायला पाहिजे. मान्य आहे...
रेणू - अरे लोक बघ. दर वर्षी कुठं कुठं फिरून येतात.... भारत सोड, जगभरात जातात. आपण गेली पाच वर्षं नुसतीच चर्चा करतोय... तुझं कामानिमित्त तरी कुठं कुठं जाणं होतं रे... आमचं काय?
कुणाल - मान्य, मान्य, मान्य रेणू... सपशेल शरणागती... यंदा काय वाट्टेल ते झालं तरी आपण ट्रिपला जायचंच. कुठं जायचं बोल... सारासाठी रामोजी फिल्म सिटीला जावं, असं वाटतंय...
रेणू - मला ते काही माहिती नाही. तू बघ, ठरव आणि आम्हाला घेऊन जा... पुढच्या आठवड्यात माझं पेपर चेकिंगचं काम पण संपेल... मग आपल्याला मस्तपैकी जाता येईल कुठं तरी... ठरलं तर मग... ठरलंच...

(तेवढ्यात बेल वाजते. गोंधळेकरकाका येतात...)

रेणू - या गोंधळेकरकाका, या... काय म्हणताय?
गोंधळेकरकाका - ऐकलं मी दारातून थोडं... काय म्हणत होती ही रेणू? काय ठरलं? कुठं निघाला आहात? 
कुणाल - काही नाही हो काका. दर वेळचंच! आम्हाला एकत्र वेळ मिळत नाही. मग ट्रिपचं आम्ही नुसतं ठरवतो आणि प्रत्यक्ष काही जाणं होत नाही. त्यावरून ही रेणू धुसफुसत होती... 
गोंधळेकरकाका - पण कुणाल, हे काही बरोबर नाही. तू तिला घेऊन जा ना छानपैकी कुठं तरी... आम्ही पण जाणार आहोत यंदा फिरायला... मग बघ.
रेणू - काका, सही! कुठं चालला आहात? 
गोंधळेकरकाका - अगं, तुझ्या काकूचा एक ग्रुप आहे. त्या ग्रुपतर्फे हे सगळे लोक निघाले आहेत कोकणात... मलाही घेतलंय काकूंनी बरोबर... असावी सोबत म्हणून.... (हसतात)
कुणाल - व्वा काका... मस्त वाटलं हे ऐकून... तुमचा उत्साह बघून खरंच हेवा वाटतो. आम्हाला द्या की थोडी एनर्जी तुमच्यातली...
रेणू - हो काका, खरंच... कुठून आणता हा उत्साह?
गोंधळेकरकाका - हे बघ रेणू, उत्साह म्हणजे मनाची एक अवस्था आहे. जे मन शांत, स्थिर व कुठल्याही विकारानं ग्रस्त नसतं ना, अशा मनात उत्साह आपोआप वस्तीला येतो.
कुणाल - बाप रे... काका, तुम्ही तर सुविचाराचा बॉम्बच टाकलात... (हसतो)
रेणू - ए कुणाल, काय रे सारखी चेष्टा... पण ते म्हणताहेत ती किती खरंय ना... मन उत्साही पाहिजे बघ मुळात...
गोंधळेकरकाका - हे बघा, मन आणि शरीर या दोन्हींमध्ये उत्कृष्ट समन्वय असतो. दोघंही एकमेकांवर अवलंबून असतात. मन निरोगी व स्वच्छ असेल, तर शरीरही मनाला चांगला प्रतिसाद देतं. आणि शरीर चपळ, तंदुरुस्त आणि फिट असेल, तर मनालाही आपोआप उत्साह येतो. तजेला येतो.... 
कुणाल - हे सगळं ऐकायला खरंच मस्त वाटतं हो काका... पण पंधरा-पंधरा तास, डेडलाइनच्या प्रेशरखाली काम करून, आमचं शरीर व मन या दोन्हींचं भजं होतं अक्षरशः भजं...
गोंधळेकरकाका - कुणाल, ही जीवनशैली निवडली कुणी? तुम्हीच ना... अरे, मग त्यात दुरुस्ती करा ना... 
रेणू - अहो, अनेकदा तर याला आज कुठला वार आहे याचीही शुद्ध नसते....
कुणाल - ए रेणू, हे अति होतंय हं... मला नीट माहितीय, आज संडे आहे....
रेणू (हसते) - संडे? आज? रिअली?
कुणाल - नाही, नाही... शनिवार आहे. 
गोंधळेकरकाका - अरे बाबा, गोंधळेकर मी आहे, तू नाहीस. असा गोंधळ करू नकोस रे मुला... आज शनिवारच आहे. पण तुझा मेंदू खरंच थकलेला दिसतोय...
रेणू - काका, त्याला ना, खरंच एका ब्रेकची गरज आहे. त्याला आणि मलाही... साराला पण... आमच्या सगळ्या कुटुंबालाच...
गोंधळेकरकाका - रेणू, तुमच्यासारखीच अनेक कुटुंबं आज मला आजूबाजूला खूप दिसतात. रोजीरोटीचं रोजचं कर्तव्य आणि जगण्यातला एक असह्य ताण घेऊन तुम्हाला वावरावं लागतंय... त्यातून तुम्हाला बाहेर पडायला हवं...
रेणू - म्हणूनच ट्रिप... 
गोंधळेकरकाका - ऐक जरा... आम्ही आता ज्या ट्रिपला चाललोय ना, तिथं सगळी आमच्यासारखी ज्येष्ठ नागरिक मंडळीच आहेत. सगळे पेन्शनर... पण तब्येती सुदैवानं सगळ्यांच्या बऱ्या आहेत अजून... मुलं आपापल्या व्यापात... आणि ते ठीकच आहे. पण आम्ही आता कुणावर अवलंबून नाही. आमचं आम्ही एंजॉय करायला शिकलोय. कोकणातल्या या ट्रिपचं सगळं नियोजन आमचे जोशीकाका व शिंदेकाका करताहेत. काय उत्साह आहे रे बाबा दोघांना... अगदी त्या ट्रॅव्हल कंपन्या करतात ना तसं वेळापत्रक तयार केलंय त्यांनी.... अगदी 'डिपार्चर शार्प फाइव्ह थर्टी इन द मॉर्निंग'पासून...
कुणाल - आयला, भारी आहे हं ही तुमची गँग...
रेणू - गँग काय रे...
कुणाल - अगं खरंच... मला कधी कधी असं वाटतं ना, रेणू, की मुळात आपल्यावरचा ताण बघता आपण गोंधळेकरकाकांएवढे जगू तरी की नाही?
रेणू - ए, काहीही काय बोलतोयस अरे...
कुणाल - अगं, अगदी सीरियसली बोलतोय मी... बघ तू पण विचार करून...
गोंधळेकरकाका - अगं, कुणाल म्हणतोय त्यात अगदीच तथ्य नाही असं नाही बरं का रेणू... पण मी तुम्हाला सांगू का, तुमची आत्ताची जीवनशैलीच अशी आहे की तुम्हाला सदैव अशीच भीती वाटणारच आहे.
कुणाल - काका, खरंच आम्हाला ही जीवनशैली निवडायचा चॉइस होता का हो? विचार केला, तर लक्षात येतं, की नव्हताच! आम्ही आपले फरपटत गेलोय या जीवनशैलीच्या मागे... फार कमी लोकांना जमतं असं प्रवाहात वाहून न जाता वेगळा मार्ग निवडायचं... आम्ही सर्वसामान्य माणसं...
गोंधळेकरकाका - अरे, आपण सगळेच सर्वसामान्य, साधी माणसं आहोत. आपल्या काही आयुष्याकडून फार अपेक्षा नसतात. चांगलं खावं-प्यावं, कुटुंब वाढवावं, आपण जे काम करतो, ते नीट व प्रामाणिकपणे करावं, तिथं चांगलं स्थान मिळवावं, मित्र व आप्तांसोबत काव्य-शास्त्र-विनोदात वेळ घालवावा आणि शांतपणे कुणाला त्रास न देता एके दिवशी या जगातून हळूच एक्झिट घ्यावी... बास! अजून काय हवं असतं माणसाला...
रेणू - काका, आता हे तुमचे विचार खरोखर जुन्या पिढीचे वाटायला लागले आहेत बरं का! हल्ली एवढ्यावर थांबत नाही. अपेक्षा खूप असतात. पैसे हवेत, अजून पैसे हवेत... कार हवी, अजून भारी कार हवी... फ्लॅट हवा, मग अजून मोठा हवा, मग बंगला हवा, मग फार्म हाउस हवं... मग नोकर-चाकर हवेत... त्यासाठी मग अजून पैसा हवा...
गोंधळेकरकाका - आहेत बरं का, अशी कुटुंबं, असे लोक आहेत. आजूबाजूला दिसताहेत. खरंय तुझं रेणू... पण मी काय म्हणतो, तुम्ही दोघं तसे नाही आहात. तुम्हाला निदान जाणीव तरी आहे, की आपल्या जीवनशैलीत काही तरी चुकतंय... बरं, ते जाऊ द्या... फार गंभीर झाली का चर्चा उगाच?
रेणू - नाही हो काका, छान बोलताय तुम्ही...
गोंधळेकरकाका - पण ना, फार गंभीर होऊन, लांबट चेहरा करूनही बसू नये माणसानं... कसं हसत-खेळत, मजेत जगावं...
कुणाल - आता कसं बोललात काका... मी तर किती हसत-खेळत असतो माहितीच आहे तुम्हाला...
रेणू - अगदी अगदी... जरा नाचरेपणा कमी करा आता, वय बघा आपलं, असं सांगावं लागतं तुला कुणाल...
गोंधळेकरकाका - बरं, या गडबडीत मूळ मुद्दा विसरून जायचा... ज्यासाठी आलो होतो, तेच विसरायचो आणि मग काकूची बोलणी खावी लागायची...
रेणू - काय हो काका?
गोंधळेकरकाका - अगं, येत्या बुधवारी अक्षय्य तृतीया आहे. आमच्याकडं जेवायला या संध्याकाळी दोघं मेहुण म्हणून... बुधवारी तुम्हाला सुट्टी नसते हे माहितीये. म्हणून मुद्दाम संध्याकाळी बोलावलं आहे. आणि अक्षय तृतीया म्हणजे ऑफिशियली आंबे आणि आमरस खायला सुरुवात करण्याचा मुहूर्त... काकूचा नैवेद्य असतो आमरसाचा... या नक्की...
कुणाल - वॉव काका... आमरस... येणार येणार, नक्की येणार.... दुपारी जेवतच नाही मी... 'ते आम्रफल अहा'... अहाहा, अहाहा!
रेणू - ओ महाराज, आपल्याला आमरस जरा जपून खायचा आहे, लक्षात आहे ना?
कुणाल - हे बघा काका, हे असं आहे. लगेच विरजण घालायला ही तयार पुढे... बाय द वे, आम्ही आंबे खायला आधीच सुरुवात केलीय हं काका... अहो, परवाच मित्राकडं गेलो होतो... तिथंही आमरस ओरपलाय...
रेणू - बघितलंत ना काका, हे असं आहे...
गोंधळेकरकाका - रेणू, अगं खाऊ दे गं त्याला... तो दुसऱ्या दिवशी दुप्पट व्यायाम करायला जाईल. करशील ना रे बाबा...
रेणू - आणि हो, अक्षय तृतीयेला बायकोला सोन्याचा एक तरी दागिना करावा म्हणतात, हो ना काका?
कुणाल - काय म्हणालीस? अगं, कानात अचानक दडे गेलेयत गं माझ्या... काही ऐकूच येत नाहीय...
रेणू - हो रे... आता बरोबर दडे बसतीलच तुझ्या कानात... ते काही नाही... तुला मेसेज करून ठेवते.... तो तर पाहशीलच!
गोंधळेकरकाका - त्यापेक्षा त्याच्या कानात सांगून बघ रेणू... आणि हो, मी निघतो... (हसतात) मग तुम्ही खुशाल करत बसा कानगोष्टी... गुजगोष्टी...
रेणू - इश्श, काय हे काका...
कुणाल - काका, तुम्ही भारी आहात हं... जमलेलं आहे...

(सगळे हसतात...)

----

जगणं मस्त मजेचं... ११-५ 
------------------------------------

रेणू (गुणगुणते) - पानी पानी रे, खारे पानी रे, नैनों में भर जा... नींदे खाली कर जा...
कुणाल (डोळे चोळत) - गुड मॉर्निंग बायको... अहाहा, काय सुंदर गाणं म्हणत होतीस! किती वर्षांनी ऐकतोय मी हे... जबरदस्त... माहौल बन गया... ‘माचिस’ ना गं? येस... गुलजारचे शब्द आणि लताचा आवाज... खलास... यू मेड माय डे, रेणू... यू मेड माय डे! आज चहा माझ्याकडून तुला...
रेणू - गुड मॉर्निंग, उठा कुणाल महाराज... चहा नाही, आता दुपारच्या जेवणाची वेळ होईल थोड्या वेळानी... बघ जरा घड्याळ...
कुणाल - ओह माय गॉड! अगं, उठलंच पाहिजे. तो नील्याचा भाऊ येणार आहे नाही का आज?
रेणू - नील्याचा भाऊ? कोण रे?
कुणाल - अगं, सख्खा नाही, चुलत की मावस असा कुठला तरी भाऊ आहे बाई... तो तिकडचा आहे बार्शीचा की तिकडचा कुठला तरी... तो येणार होता आज...
रेणू (फणकाऱ्याने) - आपल्याकडं? आणि तू मला हे सांगायचं नाहीस? सुट्टीच्या दिवशी तरी नको रे असं कुणाला बोलवत जाऊस... आणि तेही मला न सांगता... सारा काल नाइट-आउटला जाते म्हटली सायलीकडं तेव्हा मला अगदी हुश्श झालं होतं... म्हटलं आज सकाळी लवकर आवरून निवांत पेपर तपासत बसते. पण तुझं ना, काही तरी निघतंच... धिस इज नॉट डन हां कुणाल... आता तू कोण तो मित्र येणार आहे त्याला घेऊन बाहेर जा हॉटेलात... मला नाही माहिती... मी नाही काही करणार...
कुणाल - अगं हो हो हो, ऐकून तर घेशील की नाही? मी काही तुला त्रास पडू देणार नाहीय. हे बघ, मी ती आपली स्पेशलवाली मिसळ ऑर्डर करणार आहे घरीच. मस्तपैकी सोलकढी हाणायची नंतर... ब्रंचचा प्रोग्राम आखलाय मी मॅडम! आहात कुठं?
रेणू - मी आहे की इथंच! कुठं जाणारे... तुमच्या सेवेत सदैव हजर....
कुणाल - ए रेणू, आता उगाच नखरे करू नकोस हां... तुझं तू आवर आणि बस पेपर तपासत... तो नील्याचा भाऊ ही माझी जबाबदारी... कळलं ना?
रेणू - असं म्हणतोस आणि स्वतः गप्पा मारत बसतोस लोकांसोबत... शेवटी तुमचं चहा-पाणी मलाच बघावं लागतं... आणि कधी येणार होता तो माणूस?
कुणाल (जीभ चावत) - आत्ता...
रेणू - आत्ता?
कुणाल - हो, म्हणजे सकाळी नऊ-साडेनऊला येतो म्हणाला होता... आता सव्वानऊ वाजलेयत... मेलो... मी पळतो... ब्रश करतो...
रेणू - तू कहर आहेस हं कुणाल... आज अगदी हद्द केलीस... आपल्या सोसायटीत पाण्याचा प्रॉब्लेम सुरू झालाय माहितीय ना... लवकर उठून आवरत जा बाबा... 
कुणाल - अगं हो... परवाच मी नोटीस वाचली खाली. आता आपल्याकडंही ही अघोषित पाणीकपात सुरू झालीच आहे. निवडणूक संपली... आता पाणी जाणार, वीज जाणार... हे मी मतदान झाल्या झाल्याच म्हटलं होतं. बघ तू... गेले दहा-पंधरा बरोब्बर हेच सुरू झालंय...
रेणू - अरे हो... अजून जवळपास महिना-दीड महिना काढायचाय. आणि पाणी वाचवायलाच पाहिजे की रे... त्यात चुकीचं काय आहे?
कुणाल - मी वाचवू का पाणी आज? आंघोळीला दांडी मारतो... तुझ्याकडची ती गोळी दे ना मला... रेणू, प्लीज...
रेणू - ए, मी नाही हं असला घाणेरडेपणा करत. माझी झालीय सकाळीच... तुला काय हवं ते कर... 

(तेवढ्यात बेल वाजते.)

कुणाल - देवा, आला वाटतं हा नील्याचा भाऊ....

(दार उघडतो...)

प्रकाश - नमस्कार कुणालभाऊ. मी प्रकाश... नीलेशचा मावसभाऊ... त्यानं फोन केला होता ना तुम्हाला? मी भेटायला येणार आज म्हणून....
कुणाल - अरे ये ये मित्रा... काय नाव म्हणालास? प्रकाश नाही का? हो अरे, नील्या बोलला होता मला तू येणारेस म्हणून. ये... ये बस... पाणी आणतो थांब... रेणू....

(रेणू थंडगार पाण्याचा ग्लास आणते.)

प्रकाश - नमस्कार वहिनी. थँक्यू हां....
कुणाल - अरे, पी ना... असा ग्लासकडं काय बघतोस?
प्रकाश - भाऊ, हा थंडगार पाण्याचा ग्लास बघूनच डोळे निवले बघा. शहरात तुम्हाला हे सुख आहे बघा... आमच्या गावाकडं पाणी डोळ्यांना दिसणं अवघड झालंय.
कुणाल - अरे काही नाहीय असं... हे बघ. आम्ही आत्ताच बोलत होतो. आमच्या सोसायटीत पण पाणीकपात लागू झालीच आहे. पाणी सगळीकडंच कमी आहे बाबा...
प्रकाश - तसं नाही भाऊ. तुमच्या शहराच्या उशाला चार-चार धरणं आहेत आणि तुम्हाला मायंदाळ पाणी मिळतंय बघा. आता उगं थोडं दिवस कमी भेटत असंन... पन तसं बघितलं तर सुखीच आहे तुमी... आमच्या गावाला टँकर सुरू झालेयत. कधी येतो, कधी नाही... आमच्या बाया दोन-दोन मैल जातायत पान्याला... लहान पोरं, तरणी पोरं... बाइकच्या मागं बारकी टिपाडं लावून पाण्याच्या खेपा घालतेत.
रेणू - कुठून आणता तुम्ही हे पाणी?
प्रकाश - काय सांगू वहिनी? आमच्या गावच्या वरच्या अंगाला एक तलाव आहे. तो जानेवारीतच आटला. मग ग्रामपंचायतीनं टँकर सुरू केला. ते पानी बी पुरत नाही. मग लांबच्या एका विहिरीवरून आणावं लागतं.
कुणाल - बार्शीला ग्रामपंचायत आहे? मोठं गाव आहे ना ते?
प्रकाश - नाही नाही. तुमचं बरोबर आहे. मी बार्शीला नाही राहत. तिथून पुढं २२ किलोमीटरवर आहे आमचं गाव. सगळी दुष्काळी पट्टा. पाणी नाही. त्यामुळं शेती पावसावरच. सध्या शेतात काहीच नाही. कडबा पण नाही. माणसाचं जाऊ द्या. जनावराचे लई हाल बघा. बार्शीच्या बाजारात जाऊन मी कडबा आणतोय. पण किती दिवस जातील सांगता येत नाही. नाही तर मग जनावरांच्या छावणीत न्यायची बैलं...
रेणू - बाप रे!
कुणाल - परिस्थिती अवघड आहे खरी... पण मित्रा, आपण सगळेच याला जबाबदार आहोत नाही का! पाणी आणि निसर्ग या विषयात आपण फार चुका करून ठेवल्या आहेत.
प्रकाश - अहो, ही परिस्थिती आजची नाही. गेली कित्येक वर्षं असंच हाय. माझे वडील हेच सांगत होते, आजोबा हेच सांगत होते आणि पणजोबा बी हेच सांगत होते. दुष्काळ आमच्या पाचवीलाच पुजलाय म्हणा ना...
कुणाल - तुमचा हा सगळा भाग पर्जन्यछायेचा प्रदेश आहे. तिथं पाऊस कमीच पडतो. पण माणसानं पर्यायी उपाययोजना करायला नकोत का?
रेणू - मुळात पाणी नसेल, तर माणसं आणि जनावरं जगणार कशी रे, कुणाल? आणि काय उपाययोजना म्हणतोस तू?
कुणाल - अगं, जलसंधारण... पाणी अडवा, पाणी जिरवा... वृक्षतोड टाळा... निसर्गाचा समतोल ढासळू देऊ नका. आपल्याकडचे पर्यावरणतज्ज्ञ गेली कित्येक वर्षं घसा फोडून हे सांगताहेत. उपाय आहेत की! आपण ऐकतोय का...
प्रकाश - आमच्याकडं एवढा दुष्काळी पट्टा असून, साखर कारखाने किती? तर राज्यात सर्वाधिक साखर कारखाने आमच्या जिल्ह्यात... आता हाय का? ऊस हे पीक कसं? सगळ्यांत जास्त पाणी पिणारं... आमच्या जिल्ह्याच्या डोईवर शंभर टीएमसीचं धरण बांधून ठेवलंय सरकारनं... पण कधी बी ते चुकून-माकून भरलं, तर सहा महिन्यांत खाली केल्याशिवाय राहत नाही आम्ही... आहे की नाही!
रेणू - काय? शंभर टीएमसी पाणी सहा महिन्यांत संपवता? अरे, जातं कुठं मग हे?
प्रकाश - तेवढं विचारू नका बघा. (विषण्ण हसतो.)
कुणाल - ही लूट आहे राव. निसर्ग आपल्याला देतो, पण आपल्यालाच ते नीट जपून ठेवता येत नाही. काय म्हणावं या कर्माला?प्रकाश - माणसाचं कर्म आहे ते... दैव देतं आणि कर्म नेतं म्हणतात ना, त्यातली गत आहे बघा निव्वळ... आता आमच्या घराण्याच्या किती पिढ्या या गावात राहताहेत... एवढी वर्षं अडचण सोसली, पण गाव नाही सोडलं कधी... पण आता...
कुणाल - हो. मी ऐकलंय. गावंच्या गावं आता शहरांकडं स्थलांतर करताहेत... 
प्रकाश - अहो, करणार काय? शेवटी पोटाला खायला तर लागतंच. सगळा रोखीचा खर्च. खेड्यांत पण आता लोक फार व्यवहारी झाले आहेत. पूर्वी उधार-उसनवारीवर भागायचं. आता काही जमत नाही. त्यांचं पण बरोबरच आहे म्हणा. सगळीकडंच व्यवहार आहे म्हटल्यावर कोण कुणाला फुकट मदत करतंय?
रेणू - बायकांचे तर काय हाल होत असतील...
प्रकाश - खरंय वहिनी. आमच्या सख्ख्या थोरल्या वहिनीला परवा सनस्ट्रोक झाला. उन्हात राबत होत्या शेतात. जनावरांना घास काढायला. सकाळी काही खाल्लं पण नव्हतं. आली ना चक्कर.... चार दिवस अॅडमिट होती बार्शीच्या सरकारी दवाखान्यात... काय सांगायचं?
रेणू - तुझं झालंय का रे लग्न?
प्रकाश - नाही हो... अहो, आमच्या गावात मुलगी देत नाहीत लोक. पाणी नाही म्हणून. मीच नाही, तर अजून कित्येक पोरं अशीच आहेत बिनलग्नाची. मग पार लांबून लांबून ओळखी-पाळखीतनं पोरी आणतेत आणि लग्न लावून देतेत. पोरीच्या बापालाच आपण पैसा द्यायचा.
रेणू - आँ? हे फारच अवघड आहे.
प्रकाश - तुम्ही या एकदा गावाकडं. सगळं दाखवतो. अहो, फार अवघड आहे परिस्थिती सगळी. शहरात आल्याशिवाय पर्याय नाही.
कुणाल - आणि मग शहरांत माणसांचे लोंढेच्या लोंढे येऊन आदळतात आणि शहरांची पण वाट लागते. अरे, आपल्याकडं नियोजन नाही. त्यामुळं शहरांमध्ये तरी कुठं इन्फ्रास्ट्रक्चर आहे? जे आहे ते इंग्रजांच्या काळातलं.... आता पार कोलमडून गेलेलं... थोडा पाऊस झाला तरी आमची शहरं अक्षरशः बंद पडतात.
प्रकाश - अहो, पण शहरात निदान हाताला काम तरी आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे इथं जो तो आपल्या कामाशी काम ठेवून असतोय बघा. दुसऱ्याकडं बघायला कुणाला वेळच नाही. आमच्या गावात तसं नाही. कुणाच्या घरी काय बी झालं, तरी ही चर्चा गावभर. आता मी इकडं आलोय ना, याची बी चर्चा सुरू झालीच असंल. वेळ फार आहे हो तिथं लोकांकडं... तरी आता ते मोबाइल आल्यानी परिस्थिती बदललीय. लोकांकडं एक वेळ बांधलेला संडास नसंल, पण फोर जी वाला मोबाइल असतोय. आणि सगळे आपले बघत बसत्यात दुपारच्याला ते व्हिडिओ...
कुणाल - व्वा, व्वा... म्हणजे खऱ्या अर्थानं जागतिकीकरणानं आणि तंत्रज्ञानानं हा शहरी-ग्रामीण भेद मिटवून टाकलाय म्हणा की... सपाटीकरण झालंय सगळं...
प्रकाश - नाही तर काय... अहो, मी बी. एस्सी. झालोय. यूपीएससीच्या तयारीत नंतर तीन-चार वर्षं घालविली. पण काय उपयोग नाही. आमच्या अण्णांनी सांगितलं, आता सरळ पुणं गाठायचं आणि काही तरी कामधंदा बघायचा. मला बी कंटाळा आला भाऊ. मग नीलेशभाऊ म्हटला, की तुमच्याकडं पाठवतो... मग आलो तुमच्याकडं... आता तुम्हीच बघा काही तरी...
कुणाल - हो रे नक्की. तुझा सीव्ही देऊन ठेव. मी बघतो काही तरी. 
रेणू - कुणालमहाराज, लवकर अंघोळ करून घ्या. पाणी जायच्या आत...
प्रकाश - तुमच्याकडं पण आहेच का पाण्याची बोंब... आता पुण्याला तरी किती पुरणार म्हणा पाणी. लोकच एवढेच झालेयत इथं बी... कठीणच आहे.
कुणाल - म्हणून पाणी वाचवायला पाहिजे.
प्रकाश - खरंय. सगळंच चित्र वाईट आहे असं बी नाही बरं का भाऊ. आमच्याकडं आता त्ये पाणी फाउंडेशनवाल्यांनी काम सुरू केलंय. लोक आता त्यात भाग घेतेत. जलसंधारणाची कामं करतेत. आमच्यासारखे पोरं पण तिकडं जाऊन चार कुदळी मारून आलो. आता जलयुक्त शिवार पण चांगली स्कीम होती. पण पाऊसच पडंना त्याला काय करावं!
रेणू - पण करताय हे चांगलंय. हे सगळे दीर्घकालीन उपाय आहेत. हळूहळूच होतील. मग काही काळानं त्याचा परिणाम दिसेल. सारखं नकारात्मक विचार करून पण उपयोग नाही ना...
प्रकाश - खरंय. मी तर आमच्या गावातल्या पोरांची एक संस्थाच स्थापन केलीय. आता सामाजिक कामात आम्हाला भाग घ्यायचाय. नीलेशभाऊच्या कंपनीनं मदत करायचं आश्वासन दिलंय. त्यांची ती काय स्कीम असती, सीएसआर का काय ते...
रेणू - अरे वा... मग हे तर चांगलंच आहे. 
कुणाल - हो, मी या सगळ्याकडे फार आशेनं पाहतो. ही सगळी महाराष्ट्रातली गावं आपलीच आहेत. तिथले लोक आपलेच आहेत. आपलेच भाऊबंद, नातेवाइक, मित्र आहेत. उगाच शहरी आणि ग्रामीण अशी दरी निर्माण करायचं कारण नाही. दोघांनाही एकमेकांची गरज आहे आणि दोघांचीही एकमेकांना चांगली मदत होऊ शकते. नाही का?
प्रकाश - खरंय भाऊ. आमच्या गावात पूर्वी व्यसनाचं प्रमाण फार होतं. आता ते बरंच कमी झालंय. सोलापूरची एक एनजीओ आमच्याकडं काम करते. दारूचं प्रमाण बरंच कमी झालंय. आमच्या संस्थेनं पण गुटखाबंदीचं आवाहन केलंय. बघू. आपलीच पोरं आहेत. रिस्पॉन्स देतील, असं वाटतंय. 
कुणाल - देतील रे. आपण काम करत राहायचं. सुदैवानं आपल्या महाराष्ट्राला सामाजिक कामाची, सामाजिक संस्थांची मोठी परंपरा आहे. महात्मा गांधी तर महाराष्ट्राला ‘कार्यकर्त्यांचं मोहोळ’ म्हणायचे. आपण आपल्यातली ही विधायक शक्ती विसरत चाललो आहोत की काय, असं वाटतं अनेकदा. पण प्रकाश, तुझ्यासारखी मुलं गावाकडं हे जे काम करताय ना, ते अगदी भारी आहे रे...
रेणू - आणि आम्ही आहोत तुमच्या पाठीशी. काहीही मदत लागली तर सांगा... 
प्रकाश - धन्यवाद वहिनी. भाऊ, तुम्ही फक्त माझ्या जॉबचं पाहा. एवढा दुष्काळ मार्गी लागू द्या. मला पण शहरात फार दिवस राहायचंच नाही. मी तिकडं परत जाणार आहे काही काळानी...
कुणाल - मग आम्ही येऊ एकदा तुमच्या गावी.
प्रकाश - हुरडा खायला या. फक्त आता चांगला पाऊस पडू दे, अशी भगवंताकडं प्रार्थना करतो. म्हणजे हुरडा पार्टी जमेल.
कुणाल व रेणू - तथास्तु... तसंच होणार... मग सगळेच पार्टी करू....

(सगळे हसतात...)

---

जगणं मस्त मजेचं... १८-५
------------------------------------

(सकाळी नऊची वेळ... कुणाल घाईत...)

कुणाल - रेणू, चल हं पटकन... मी गाडी काढतो तोपर्यंत पार्किंगमधून...
रेणू - अरे हो, तू हो पुढं... मी आलेच सायलीला घेऊन...
कुणाल - अरेच्चा, सायली पण आहे नाही का आपल्याबरोबर? चल, मग तू पटकन... 

(कार इंजिन स्टार्ट केल्याचा आवाज... मग हॉर्नचा आवाज...)

कुणाल - चला, चला, पटकन...
रेणू - हो रे... सायलीच्या आईशी जरा बोलत होते... बाजारातून येताना तिचं पण काही सामान आणायचंय. ते सांगत होती...
कुणाल - हो, पण आता चला लवकर. नाही तर सिनेमा बुडेल आपला. आणि मला पहिल्या फ्रेमपासून पाहायचा असतो तुला माहितीय...
रेणू - माहितीय महाराज, चला आता...
सायली - काका, फास्ट मार जरा... वेळेत पोचायला पाहिजे.
कुणाल - क्या बात है सायली. तू खरं ओळखलंस बघ मला. नाही तर ही रेणू.... सारखी आपली स्पीड कंट्रोल करायला सांगत असते मला... (हसतो)
रेणू - मी बरोबरच सांगत असते. सायली, आपण पोचू गं वेळेत. तू उगाच त्याला निमित्त पुरवू नकोस फास्ट चालवायला...
कुणाल - अगं, आपल्या शहरातल्या या गर्दीत मला कितीही इच्छा झाली, तरी आपण ४०-५० च्या वरच्या स्पीडनं गाडी चालवू शकणार आहोत का? मला लाख 'फॉर्म्युला वन'मध्ये चालविल्यासारखी कार चालवायची असेल. पण इथं रस्त्यावर उतरलो, की माझा ट्रकवाला होतो की नाही... तोही सोळा चाकंवाला ट्रकवाला... 
सायली - मावशी, फास्ट कार चालवता येणं हेच कूल असतं बरं का... आमचा बाबा तर १४० च्या स्पीडनं चालवतो गाडी एक्स्प्रेस-वेवर...
रेणू - ए बाई, इथं बोलतेयस ते ठीक आहे. बाकी कुठं बोलू नकोस. एवढ्या स्पीडनं कार चालवणं हा गुन्हा आहे माहितीय का तुला?
कुणाल - खरंय बरं का सायली. मी बोलतोच निखिलशी एकदा... 
सायली - काका, तू बोलच बाबाशी... पण आत्ता फास्ट चालव ना गाडी... आपली सिनेमाची स्टार्ट मिस नाही झाली पाहिजे.
रेणू - अगं हो हो... डोण्ट वरी. काका नीट आणि वेळेत नेईल आपल्याला... हो ना रे कुणाल?
कुणाल - येस्स... अगदी राष्ट्रगीताला आपण पोचतो की नाही पाहा थिएटरमध्ये... बाय द वे, सायली, तू आता दहावीत गेलीस ना गं?
सायली (फुरंगटून) -  ए नाही रे काका... नववीत गेलेय आत्ताशी... मी एवढी मोठी आहे का?
कुणाल (हसतो) - अगं, एवढी मोठी म्हणजे काय? आत्ता पुढच्या वर्षी तर जाशीलच ना दहावीत? मग?
रेणू - आमचं पात्र तर अजून केवढंसं आहे... कधी मोठं व्हायचं? देवा!
सायली - पात्र? म्हणजे काय गं मावशी?
रेणू (हसते) - अगं, साराला म्हटले मी पात्र... मराठीत असं म्हणायची पद्धत आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, काय कॅरेक्टर आहेत एकेक.... तसं मराठीत 'पात्र' म्हणतात...
सायली - अगं, पण 'पात्र' म्हणजे एलिजिबल ना? आमच्या मराठीच्या टीचरनी हा अर्थ सांगितला होता आम्हाला...
रेणू - अगदी बरोबर... मराठीत एकाच शब्दाचे अनेक अर्थ होतात. पात्र म्हणजे कॅरेक्टर पण आणि पात्र म्हणजे एलिजिबल पण... अजूनही एक अर्थ आहे 'पात्र'चा? माहितीय?
सायली - नाही गं मावशी... 
रेणू - अगं, पात्र म्हणजे भांडंसुद्धा. 

(तेवढ्यात ब्रेक दाबल्याचा आवाज येतो...)

कुणाल (वैतागून) - हे बघितलं का पात्र? कशी गाडी चालवतात राव लोक? डावीकडून येऊन मला आडवं जाऊन हा उजवीकडं वळतोय मूर्ख... अशांना तातडीनं वाहन चालवण्यासाठी अपात्र ठरवलं पाहिजे...
रेणू - खरंच रे... ट्रॅफिक सेन्स नावाचा काही प्रकारच राहिलेला नाही लोकांना... सीरियसली...
सायली - आमच्या शाळेसमोर परवा असाच एक माणूस वेडपटासारखा येऊन धडकला आमच्या मुलींच्या ग्रुपला... त्या पूर्वाला एवढं लागलं ना...
कुणाल - काय सांगतेयस? मग तुमच्या शाळेच्या सिक्युरिटीनं पकडला की नाही त्या गाढवाला?
सायली - अरे, मुलींनीच त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. पण तो पळून गेला. पण इशितानं त्याच्या बाइकचा नंबर लक्षात ठेवला. ती नंबर्समध्ये एक्स्पर्ट आहे अरे एकदम...
कुणाल - ग्रेट! नंबर महत्त्वाचा. पूर्ण नंबर असेल तर पोलिस पाच मिनिटांत शोधून काढतात त्या ड्रायव्हरला...
सायली - राइट... आमच्या टीचरनी तो नंबर दिला पोलिसांना. पोलिसांनी लगेच पकडलं त्याला. पूर्वाच्या बाबांनी कम्प्लेंट दिलीय. आता त्या माणसाला चांगली शिक्षा होईल.
रेणू - पण सायली, तुम्ही पण काळजी घ्या हं... हल्ली मुलांना फार सवय असते. घोळका करून रस्त्याच्या मधोमध उभे राहतात. आपल्याच तंद्रीत असतात. काय बोलत असता देव जाणे...
सायली - अगं मावशी. ते आमचं सिक्रेट असतं. वर्गात सारखे एकापाठोपाठ एक लेक्चर असतात. आम्हाला बोलायलाच मिळत नाही. होमवर्क पण एवढा असतो ना! मग शाळा सुटल्यापासून ते बसमध्ये जाईपर्यंत आमच्याकडं जो वेळ असतो, तेव्हाच आम्ही बोलतो.
कुणाल - हल्ली या आठवी-नववीच्या मुलांकडं सर्रास मोबाइल दिसतात. तेही साधे नाही. स्मार्टफोन! आणि मग ही पोरं, तिथं रस्त्यात सेल्फ्या काढत बसतात. काय गं सायली, खरं ना?
सायली - अरे काका, हो! सेल्फी काही रोज काढत नाही. आमच्या ग्रुपमध्ये कुणाचा बर्थडे असला, किंवा काही स्पेशल ऑकेजन असलं ना, तरच आम्ही सेल्फी काढतो.
रेणू - अगं, केवढ्याशा गं तुम्ही मुली... तुम्हाला कशाला हवेत सेल्फी अन् बिल्फी?
सायली - काय गं मावशी! कसली बोअर आहेस... सेल्फी काढून 'इन्स्टा'वर अपलोड करणं ही सगळ्यांत बेश्टेश्ट आणि कूल थिंग आहे, यू नो...
कुणाल - आईशप्पथ... सायली, तू आणि तुझ्या मैत्रिणी महान आहात... नाही नाही, कूल महान आहात... (हसतो) पण काय गं, तुला पण दिलाय का स्मार्टफोन निखिलनी?
सायली (वैतागून) - नाही ना... माझ्याकडं हा साधा, बटणाचा, विदाउट इंटरनेट फोन आहे. मला तर तो बाहेर काढायची पण इतकी लाज वाटते ना...
रेणू - अगं, पण तुझ्या आई-बाबांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे. तुम्हाला आत्ता काही गरज नाहीय त्या स्मार्टफोनची. पुढं मोठं झाल्यावर सगळं मिळणारच आहे की...
सायली - मावशी, तू सेम आईसारखं बोलतेयस. तुम्ही दोघीही बोअर आहात.

(कुणाल हॉर्न वाजवतो...)

कुणाल - हे बघा, आणखी एक काशिनाथराव गेले आडवे...
रेणू (आश्चर्याने) - काशिनाथराव? तू ओळखतोस त्याला...?
कुणाल (मोठ्यांदा हसतो) - अगं काय गं रेणू, तुला ही आमची भाषा माहिती नाही का? मध्ये मध्ये तडमडणारे लोक असतात ना, ते काशिनाथ असतात. म्हणजे मी त्यांना तसं म्हणतो. कळलं का? बाप रे! हा सिग्नल लागला की संपलो... खूप जॅम दिसतंय समोर... अवघड आहे.
सायली - काका, पोचू ना रे वेळेत आपण? मला स्टार्ट मिस नाहीय करायची....
कुणाल - सायली बेटा, आपण ना अॅक्चुअली, तुमच्या त्या डोरेमॉनसारखं स्वतःच एक हेलिकॉप्टर होऊन हवेतून उडत जायला पाहिजे होतं... तरच आपण वेळेत पोचू असं वाटतंय.
सायली - काका, तुला डोरेमॉन माहितीय? कसला कूल आहेस तू...
रेणू - अगं बाई, सारामुळं आम्हाला त्या डोरेमॉन आणि नोबिताचं सगळं खानदान पाठ झालंय.
सायली - भारी ना! डोरेमॉनसारखे ते हेलिकॉप्टर पंख हवेत आपल्याला. डोक्यावर पंखा सुरू आणि आपण हवेत... झूम... कसलं कूल...
कुणाल - रेणू, ऐकतीयस ना! सायलीची पिढी सतत कूल, बोअर, भारी आणि बेश्टेश्ट असलंच बोलतीये. यांची ही कोड लँग्वेज असल्यासारखीच आहे. आपल्याला ही समजली पाहिजे गं...
रेणू - अरे तुला काय वाटतंय? सारामुळं आपल्याला येत्या काही वर्षांत हे सगळं माहिती होणारच आहे. या नव्या पिढीची भाषा, त्यांचे विचार, त्यांचं राहणीमान, त्यांचे अॅटिट्यूड, त्यांचे स्वभाव सगळं सगळं आपल्याला माहिती असणारच आहे. निदान मला तरी नक्कीच!
कुणाल - हो गं... माहिती पाहिजेच. सायली, तू माझ्याशी गप्पा मारायला येत जा...
सायली - येईन की काका... कसलं कूल ना... कॉफी विथ कुणाल काका.... हा हा हा...
कुणाल - देवा... म्हणजे तुला रोज कॉफी द्यावी लागणार की काय मला, सायली? करू करू. रोज धमाल करू.
रेणू - सध्या सुट्ट्या आहेत. आत्ता तर नक्कीच धमाल करू. येत जा की गं सायली साराबरोबर खेळायला... अर्थात ती लहान आहे म्हणा. तुला लगेच बोअर वगैरे होईल, नाही का?
सायली - नाही गं मावशी. डोण्ट वरी. मी येईन आणि खेळवीन साराला... आमच्याकडं माझा मावसभाऊ चिन्मय येत असतो. त्याला पण मी खेळवत असते.
कुणाल - अजून काय काय करतेस सायली? खरं तर तुला एवढीशी बघितलीय... आता केवढी मोठी झालीस... हिचा जन्म झाला तेव्हा आपण हिला बघायला गेलो होतो हॉस्पिटलमध्ये, आठवतंय का रेणू?
रेणू - तर! जाई तर रडायलाच लागली मला बघून... तिला एवढा आनंद झाला होता!
सायली - हो? सही यार... तुम्ही कसले कूल आहात. बेबी झालं तर रडता वगैरे...
कुणाल (खाकरतो) - अहम्, अहम्.... चला, विषय बदला... फार तपशील नकोयत...
रेणू (हसते) - काय रे, घाबरलास की काय?
कुणाल - सीरियसली अगं... आता आपण असंच बोलत राहिलो, तर सायलीकडून या विषयावरचं ‘ग्यान’ ऐकायची वेळ यायची...
सायली (वैतागून) - काका, तू बोअर आहेस. आत्ता अगदी बाबासारखं बोललास. आय डिसलाइक...
रेणू - बघ कुणाल, सायलीचा एक लाइक मिळवायची संधी तू घालवलीस... तिनं तुला डिसलाइक केलंय...
कुणाल - देवा... कठीण आहे. आपलं कसं झालंय माहिती का रेणू? आपली सँडविच पिढी झालीय.... म्हणजे आपण आपल्या आई-वडिलांचीही बोलणी खाल्ली आणि आता ही पुढची पिढीही आपल्यालाच बोलणार... आपण कधी आणि कुणाला बोलायचं?
रेणू (हसते) - अरे, असं काही नसतं. प्रत्येक पिढीला वाटतं, की आपल्याच पिढीनं फार त्रास सोसलाय. आणि असं ही पिढी, ती पिढी, किंवा ‘आमच्या वेळी असं नव्हतं’ टाइप कुणी बोलायला लागलं ना, की ती व्यक्ती म्हातारी झालीय असंच मी म्हणते.
सायली - काका, तू म्हातारा झालायस...
कुणाल - ए, काहीही काय, मी तुझ्याएवढाच आहे गं सायली... (हसतो) आणि रेणू, मी म्हातारा वगैरे झालेलो नाहीय मुळीच. पण मला खरंच असं वाटतं, की आपल्या आधीच्या पिढीनंही आपल्यावर हुकूमत गाजवली आणि आपण आता ती चूक टाळायची म्हणून आपल्या पुढच्या पिढीला मोकळीक देतोय. अर्थात हा आपला चॉइस आहे. पण परिणाम मात्र असा झालाय, की  दोन्हींकडून आपलं सँडविच झालंय. वादच नाही.
रेणू - एवढा विचार नाही करायचा रे. ही सायली बघ, तिच्या लेखी गोष्टी एक तर ‘कूल’ असतात, नाही तर ‘बोअर’ असतात. आपल्याला असं जमलं पाहिजे. ही पिढी एवढी ‘सॉर्टेड’ आहे ना, तसं जमलं पाहिजे बघ कुणाल.
कुणाल - हे काही आपल्याला जमलं नाही. आपल्याला सगळ्यांतलं चांगलं तेवढं हवं असायचं. पण मग फरफट व्हायची. सगळं हवं, या नादात पूर्ण काहीच गवसलं नाही.
सायली - ए काका, तुम्ही फारच फिलॉसॉफिकल झालात रे. बोअर होतं मग मला. अजून किती लांब आहे रे मल्टिप्लेक्स? तोवर गाणी लाव ना मस्त अरिजितची....
रेणू - बघ, आवडनिवड कसं सगळं फायनल झालेलं आहे.
कुणाल - आलोच हं सायली बेटा आपण... आता गाणी वगैरे नको. आता डायरेक्ट पार्किंगमधून वर जाऊ. पाच मिनिटांत सिनेमा सुरू होईल बघ.
सायली - येय्ये... कसलं ग्रेट! हा सिनेमा अजून आमच्या ग्रुपमध्ये कुणीच बघितलेला नाहीय. तुमच्यामुळं मी आता शायनिंग मारून दाखवीन त्यांच्यासमोर... कूल...
कुणाल - अहाहा... लई भारी काम झालेलं आहे. म्हणजे आता तरी आम्ही कूल आहोत ना गं सायली...
सायली - काका, अरे, खरंच तुम्ही दोघं कूल आहात. मला त्यामुळंच आवडता. नाही तर मी आई-बाबा सोडून कुणाबरोबर तरी जाते का बाहेर? मावशीला माहितीय. कधीच जात नाही. पण तुमच्यासोबत मला मस्त वाटतं. 
रेणू - थँक्यू गं सायली. अगं, तुझ्याकडून आम्ही कूल असल्याचं सर्टिफिकेट मिळणं हे फार महत्त्वाचं वाटतं. नाही तर आम्हाला वाटतं, की आपण आता या नव्या पिढीसमोर अगदीच जुने झालोय की काय...
कुणाल - पूर्वीच्या पिढ्यांना लवकर म्हातारपण येत नसे असं म्हणतात. आता चाळिशीतच आपण वयोवृद्ध झाल्याचा फील येतो मला तर...
सायली - काय रे काका... काहीही बोलतोस! तू तर जेव्हा तो गॉगल घालतोस ना, तेव्हा वरुण धवनपेक्षा भारी दिसतोस. खरंच...
कुणाल - आईशप्पथ... सायली, तू कसली गोड आहेस गं... चल, इंटरव्हलला तुला माझ्याकडून काय हवं ते घे...
रेणू - स्मार्ट आहे ती... त्यासाठीच तिनं माझं कौतुक न करता तुझं केलं... 
सायली - काय गं मावशी? तू पण भारीच आहेस...
रेणू - अगं, मी त्याला असंच चिडवत होतेस. मला माहितीय तू मनापासून म्हणालीस ते. चिल...
कुणाल - व्वा, व्वा... आणि मंडळी, पार्किंग मिळालेलं आहे. मोठं काम झालेलं आहे... आता सिनेमा...
सायली - सहीच...
रेणू - चला, आता तीन तास बडबड बंद... फक्त सिनेमा पाहायचा, काय!
सायली व कुणाल - येस्स मॅम...

(हसतात...)

----

जगणं मस्त मजेचं... २५-५
-------------------------------

रेणू - कुणाल, अरे बास कर.... किती वेळ तो टीव्ही पाहणार आहेस?
कुणाल - रेणू, रेणू... अगं असं काय करतेयस? हा आपल्या देशाचा प्रश्न आहे... लोकशाहीचा प्रश्न आहे.... 
रेणू - अरे हो, पण गेले तीन दिवस सतत तेच ते बघून मला कंटाळा आलाय रे... आणि तू असा ते सतत बघत राहिल्यानं परिस्थिती बदलणारे का? मला तर राजकारण या नावाचाच तिटकारा आलाय अगदी...
कुणाल - असं नाही रेणू. अगं, आपल्या देशाची सत्ता आपण कुणाकडं द्यायची याचा हा महत्त्वाचा निकाल असतो. त्याकडं आपण गांभीर्यानं बघायला नको का? मला तर प्रत्येक घटना, घडामोडी जाणून घेण्यात इंटरेस्ट असतो.
रेणू - हो रे. पण सगळीकडं तेच तेच... मला खरंच बोअर झालंय. आणि तुला माहितीय ना, आज सई येणार आहे खूप दिवसांनी... आम्ही शॉपिंगला जाणार आहोत. 
कुणाल - आणि मी काय करू?
रेणू (हसते) - तू बघ ना राजकीय बातम्या, तुझ्या त्या चर्चा आणि मतमतांतरं... 
कुणाल - ए रेणू, मुळीच नाही हं... मी पण येणार तुमच्याबरोबर...
रेणू - यायचं तर चल बाबा. आमच्या शॉपिंग बॅगा उचलायला मदत तरी होईल. 
कुणाल - आणि तुम्हाला ड्रायव्हर पण मिळेल ना आयता... चालेल ना?
रेणू - एक मिनिट. अरे हे बघ. सईचाच मेसेज. ती पोचतेय पाच मिनिटांत... तू आवर ना अरे...
कुणाल - अगं, आज मी खरं जिमला जाणार होतो. या बातम्यांच्या पायी गेले तीन-चार दिवस सगळंच शेड्यूल गंडलंय गं माझं... श्या...
रेणू - नाही नाही. असं कसं? बघ ना, अजून बघ टीव्ही. डोळे बघ जरा आरशात. कसले तांबारलेयत... सई आली तर तिला वाटेल, की सकाळी सकाळीच...
कुणाल - बास, बास हं... चेष्टा पुरे झाली. मी चाललोय आवरायला. 
रेणू - जा आता...
(स्वतःशीच बोलते) किती पसारा करून ठेवलाय यानं हॉलमध्ये. आई गं... चहाचा कपसुद्धा तसाच... सोफ्यावर टॉवेल... मला ना, सुट्टी असूनही काही उपयोग नाही. सगळं घर आवरण्यातच केवढा वेळ जातो. पार्लरला जायचंही राहून गेलंय... सईनं हा अवतार बघितला तर काय म्हणेल? शी... वैताग आहे नुसता...

(तेवढ्यात बेल वाजते...)

रेणू - आले, आले.... (दार उघडते.) ये गं सई, ये. अगं, तुझीच वाट बघत होतो आम्ही.
सई - अगं, काय अवतार झालाय तुझा? आवरत होतीस का? आणि कुणालमहाराज कुठं आहेत? त्यानं अजून आवरलं नसेलच...
रेणू - काही विचारू नकोस बघ सई. सकाळपासून आमच्या घरीही तो रणसंग्रामच सुरू आहे...
सई - अगं, आमच्या घरीही तेच. खाली सोसायटीतही तेच... फेसबुक, व्हॉट्सअपवरही तेच... सतत राजकारण आणि राजकारण! मला तर हिमालयात पळून जावंसं वाटायला लागलंय...

(कुणाल डोकं पुसत येतो...)

कुणाल - मलाही घेऊन जा... (रेणूच्या अंगावर पाणी उडवतो...) हे असं छान छान गार वाटेल तुम्हाला... हा हा हा...
रेणू (वैतागून) - कुणाल, अरे काय हे? पाणी कसलं उडवतोयस?
सई - वा, वा... काय रोमँटिक दृश्य आहे!
रेणू - अगं, कसलं रोमँटिक आणि कसलं काय? सकाळी सकाळी हा लोळत टीव्ही पाहत बसणार आणि मी सगळं घर आवरणार...
कुणाल - ए रेणू, एरवी मी मदत करत नाही का गं? आज जरा एक्स्क्युज मी हं...
रेणू - तू शनिवारचं ब्रेकफास्टचं बघणार असंही ठरलं होतं आपलं महाराज. त्याचं काय झालं?
कुणाल - अगं, आज सई आलीय ना... बाहेरून ऑर्डर करतो ना... बोला, काय हवंय? साउथ इंडियन की मिसळ वगैरे?
सई - कुणाल, अरे, आम्हा दोघींना जरा बाहेर जायचंय... कळलं ना.... एक्स्क्युज अस हं...
कुणाल - अहो सईबाई, मी पण येणार आहे म्हटलं तुमच्यासोबत. बॅगा उचलायला आणि ड्रायव्हर म्हणून...
सई - अरे, काहीही काय? चल की असाच. मजा करू...
कुणाल - अगं, रेणू सोबत असताना मी मजा करू शकतो, असं वाटतंय का तुला?
रेणू - कुणाल, बास हं आता... आवरा लगेच... खरंच, निघू या...
कुणाल - बाय द वे, हिमालयावरून आठवलं. सई, अगं तू हिमालयात जाऊन आलीस ना? कसा काय झाला प्रवास तुला?
सई - अरे, फारच मस्त... हिमालय हे वेगळंच प्रकरण आहे. प्रेमप्रकरण म्हटलंस तरी चालेल. त्या भव्य आणि शुभ्र सौंदर्याच्या प्रेमात पडताच तुम्ही! माझी ही दुसरी वेळ होती. मागच्या वेळी आम्ही हिमाचलात गेलो होतो. या वेळी थेट काश्मीरमध्ये...
रेणू - सही यार! ए, मी अजून गेलेले नाहीय काश्मीरला. मला जायचंच आहे. कुणाल, ऐक नीट. मला जायचंच आहे.
कुणाल - अगं हो. आपल्याला जायचंच आहे. 
सई - आता पर्यटकांनी गजबजणारी सगळीच ठिकाणं तशी कमर्शियल झालीयत. पण जरा वेगळा हिमालय पाहायला मिळाला तर प्रयत्न करा. 
कुणाल - वर काश्मीरपासून ते थेट इकडं सिक्कीम, अरुणाचल प्रदेशापर्यंत सगळीकडं तो धवलगिरी पसरलाय. त्या रौद्रभीषण दर्शनानं हबकून जायला होतं सुरुवातीला...
सई - बरोबर आहे. आधी आपल्याला अनोळखी असतो ना तो... म्हणून तसं वाटतं. पण हळूहळू आपण त्याच्या अंगा-खांद्यावर खेळायचं. त्याच्या दोस्ती करायची... मला तर नंतर नंतर शुभ्र वस्त्रं परिधान केलेले, लांब पांढरी दाढी असणारे, उभं गंध लावणारे एखादे धीर-गंभीर आजोबा आपल्या अगदी लहानग्या नातीला मांडीवर खेळवताहेत, असं फीलिंग यायला लागलं.
रेणू - आई गं...!! किती गोड...! मला आता अजिबात राहवत नाहीये, बरं का कुणाल!
कुणाल - काय? काय म्हणायचंय नक्की तुला?
रेणू - गप रे... तसलं नाही. हिमालयाला सईनं दिलेली उपमा ऐकून मला आत्ताच्या आत्ता तिथं जावंसं वाटतंय, असा अर्थ होता त्याचा...
कुणाल - हुश्श! मग असं नीट सांग ना बाई... मी इथं केवढा घाबरलो होतो.
सई - ए... बास... निघायचंय ना? 
रेणू - अगं, उपम्यावरून आठवलं. मी ब्रेकफास्टला उपमा केलाय. तो खाऊनच जाऊ.
कुणाल - अरे देवा... ब्रेकफास्ट घरीच आहे वाटतं. मला वाटलं, की 'खादाडेश्वर'ला आज देणं लागतोय आपण...
सई - त्याचं तर आपण गेल्या जन्मापासूनचं देणं लागतोय बहुतेक. 'रिण फिटता फिटेना' अशी अवस्था झालीय... (हसते)
रेणू - ते काहीही असलं, तरी आज ब्रेकफास्ट घरीच. तू हलला आहेस का जागेवरून कुणाल? मग वेळ किती गेला सकाळी, कळतंय का?
कुणाल - अगं हो हो... मी सपशेल माफीनामा लिहून देतो. पण आता खरंच घ्या खायला. सई, तू हिमालयाबद्दल छान सांगत होतीस. ते सांग ना पुढं...
सई - अरे हो. म्हणजे ते 'साद देती हिमशिखरे' आहे ना, ते अगदी खरं वाटतं. त्या भव्य गिरीशिखरांमध्ये काय जादू आहे ते कळत नाही. 
कुणाल - अगं, भव्यता हीच जादू. काय होतं, की आपला निसर्ग केवढा अफाट आणि अचाट आहे हे आपल्याला तिथं गेल्यावर कळतं. हजारो किलोमीटर लांबीची बर्फाच्छादित जमीन, तिथल्या त्या शुभ्र, खळाळत्या नद्या, वेगवेगळ्या प्रकारची झाडं, जंगल आणि स्वच्छ हवा... बास! अजून काय पाहिजे...
सई - हे तर झालंच. पण यापलीकडं काही तरी आत्मिक कनेक्शन असावंसं वाटतं. म्हणजे ते सांगता येत नाही. पण आहे काही तरी ओढ लावणारं...
रेणू - तुम्ही आता मला फार त्रास देताय हं हे सांगून... मी अजून हे अनुभवलेलं नाही याची आता फार खंत वाटतेय...
कुणाल - रेणू, ठरलं... पुढच्या एप्रिल-मे महिन्यात आपण जाऊ या हिमालयात.
सई - अगं, जगभरातून लोक येतात. कुणी ट्रेकिंगला येतात, कुणी गिर्यारोहण करायला येतात, कुणी देवदर्शनाला येतात, कुणी मनाची शांती शोधायला येतात, तर कुणी नुसतेच पर्यटनाला येतात.
कुणाल - नुसतं करायचं म्हणून पर्यटन करायला माझा विरोध आहे. अनेक लोक ना, केवळ बाकीचे लोक जाऊन आले म्हणून एखाद्या ठिकाणी जातात. याला मी 'टिकिंग द बॉक्सेस' म्हणतो. म्हणजे, हं चला, सिंगापूर झालं, दुबई झालं, युरोप झालं... ऑस्ट्रेलिया झालं... जपान झालं... किंवा भारतात फिरताना काश्मीर झालं, कन्याकुमारी झालं, गोवा झालं. उटी झालं, दार्जिलिंग झालं... असं एकेक ठिकाण नुसतं 'टिक्' करतात. त्याला काय अर्थ आहे? एखाद्या ठिकाणी जायचं म्हणजे त्या भागाची नीट माहिती करून घ्यायला हवी, तिथं जरा वेळ घालवायला हवा, स्थानिक लोकांशी संवाद साधायला हवा, स्थानिक पदार्थ चाखायला हवेत.
रेणू - अरे, तू म्हणतोस ते फार आदर्श देशाटन झालं. ते करून 'मनुजा चातुर्य' आल्याशिवाय राहणार नाहीच. पण सगळ्यांनाच कुठं जमतं असं? एक तर असं पर्यटन करण्यासाठी भरपूर पैसे लागतात. दुसरं म्हणजे वेळ लागतो. आपल्याकडं या दोन्ही गोष्टी एकत्र आणि मुबलक क्वचितच असतात. म्हणजे पैसे असले, तर वेळ नसतो आणि वेळ असला, तर कदाचित पैसे नसतात किंवा मग तब्येत साथ देत नाही.
सई - खरंय. त्यामुळं ना, जेव्हा शक्य होईल तेव्हा सरळ बॅग उचलावी आणि बाहेर चालू पडावं.
रेणू - हे असं बोलणं सोपंय गं. पण आपल्यासारख्या संसारी माणसांना सगळं सोडून असं एकदम खरंच बाहेर पडता येतं का? त्यातही बाईला असं बाहेर पडता येतं का गं खरंच? नाहीच. म्हणजे फार फार अवघड... मग अशा वेळी या 'कंडक्टेड टूर' घ्यायच्या आणि निदान ती ठिकाणं बघून यायची. 
कुणाल - म्हणजे नुसताच भोज्या शिवून यायचा. याला म्हणतात दुधाची तहान ताकावर! माझ्या लेखी याला खरंच काही अर्थ नाही रेणू...
रेणू - अरे, निदान तेवढं तरी... आपण तेवढं तरी करू शकतोय का बघ...
सई - आणि अजून एक सांगते. सारा अजून लहान आहे ना, तोवर तुमचं फिरून होईल. नंतर मग ती मोठी झाली की मग तिच्या शाळेनुसार, सुट्ट्यांनुसार तुम्हाला सगळं वेळापत्रक बसवावं लागेल. मग खरंच फिरणं होणार नाही.
कुणाल - पण मी काय म्हणतो रेणू, ती अचानक एके दिवशी बॅग उचलून बाहेर पडायची आयडिया कसली भारी आहे ना! रोमँटिक आहे अगदी...
रेणू - झालं. याचा रोमँटिसिझम ऐका. चाळिशी आली तरी येळकोट जात नाही आपला...
कुणाल - ओ मॅडम, ओ मॅडम... चाळिशीला हल्ली आयुष्य सुरू होतं म्हणतात बरं का! 'फॉर्टी इज न्यू ट्वेंटी' असं म्हणतात ते काही खोटं नाही. आणि येळकोट जात नाही काय? काहीही हं रेणू...
रेणू (हसते) - किती राग येतो रे तुला हल्ली... त्यातही वयाचा विषय काढला की जास्तच... एकूणच तुझं खरंच वय झालंय, असाच निष्कर्ष निघतो बरं का यातून! 
कुणाल - थोडक्यात, सगळा संसार सोडून हिमालयात जाण्याची माझी वेळ झालीय तर...
रेणू - अजिबात नाही. तुला एकट्याला तर मी मुळीच हिमालयात जाऊ द्यायची नाही. मी पण येणार. 
कुणाल - व्वा, व्वा रेणू... मला एकदम 'हुस्न पहाडों का' गाणं आठवलं... 
सई - छान... नेमकं तेच आठवलं का? (हसते) रेणू म्हणते, ते खरंय अगदी. येळकोट जात नाहीच आपला, नाही का महाराज!
कुणाल (पोझ घेऊन) - मी आता त्या माया, मत्सर, लोभ, राग, द्वेष या सगळ्यांच्या पलीकडं गेलोय रेणू... विरक्त विरक्त भाव मनी जागृत होऊ लागले आहेत.
रेणू - अजिबात जमायचं नाही. विरक्त भाव वगैरे सांगून तू आमच्याबरोबर शॉपिंगला यायचं टाळू शकत नाहीस. बॅगा उचलायच्याच आहेत आणि ड्रायव्हिंगही करायचंय. 
कुणाल - अरेरे, सामान्य संसारी माणसाचा पाश तुटायचा नाहीच का? हिमालय आमच्या नशिबी नाहीच का? किमान बाहेर गेल्यावर आइस्क्रीम तरी खायला घाला. तेवढंच जरा गारेगार फीलिंग येईल.
सई - चला, शेवटी हिमालयाकडून पुन्हा सह्याद्रीकडे आला विषय...
कुणाल - अगं, प्रश्नच नाही. शेवटी सगळं जग फिरलो, तरी आपलं गाव, आपलं शहर, आपला जिल्हा, आपलं राज्य व मग आपला देश सगळ्यांना प्रिय असतोच. मला तर कुठंही बाहेर गेलो, तरी आठ दिवसांच्या वर करमत नाही. परत कधी घरी येतो असं होऊन जातं.
सई - घर ही गोष्ट आपल्याला बांधून ठेवते हे खरंच. पण हिमालयात गेल्यावर अनेकांना आता इथंच राहावं, असं वाटतं हेही खरंय बरं का!
रेणू - ते तुमची आध्यात्मिक पातळी किती आहे त्यावर ठरत असेल. आपण अजून फार मटेरिअलिस्टिक लोक आहोत. अजून ऐहिक सगळं भोगून व्हायचंय. मग विरक्तीची ओढ लागणार कशी?
कुणाल - असं काही नाही. प्रत्येकाला वेगवेगळ्या टप्प्यावर हे फीलिंग येऊ शकतं. मला तरी आत्ता नुसतं पर्यटन करायचीच इच्छा आहे. एकदम संन्यासी नाही व्हायचंय मला... (हसतो)
रेणू - आणि मी तुला होऊ देईन असं वाटतं का?
सई - अरे, तसं नाही मला म्हणायचं. कधी तरी माणसाला काही काही ठिकाणी गेल्यावर ज्याला आपण दैवी, किंवा इंग्लिशमध्ये डिव्हाइन म्हणतो ना, तसा अनुभव येतो. पुन्हा हे मी सांगून उपयोग नाही. तो अनुभव ज्याचा त्याने प्रत्यक्ष जाऊनच घ्यावा. 
रेणू - ठरलंच आहे आता माझं... म्हणजे आमचं! पुढच्या वर्षी हिमालयात जायचंच...
सई - पण आत्ता आपल्याला शॉपिंगला जायचंय... 
कुणाल - हे बघा, मी पुढच्या वर्षी हिमालयात जाईन. नंतर कुणाला तिथं यती वगैरे आढळला तर तो मीच आहे, असं समजा.
रेणू - ए कुणाल, आम्हाला आत्ता यतीची नाही, एका ड्रायव्हरची गरज आहे. निघतोयस ना...
 
(सगळे हसतात...)

---