थ्री चीअर्स फॉर ‘लूजर्स’
---------------------------
यश म्हणजे नक्की काय? एखाद्या प्रवेश परीक्षेत नंबर लागणे? दहा लाख मुलांमध्ये पहिला नंबर मिळविणे? जन्मल्यापासून शक्य त्या सर्व स्पर्धांमध्ये धावून दर वेळी पहिला क्रमांक मिळविण्याचे अशक्यप्राय काम करीत राहणे? यशस्वी होणं कशाला म्हणायचं? आणि मुळात हे यश मिळवायचं ते कशाची किंमत मोजून? आयुष्य महत्त्वाचं की आयुष्यातलं कथित ध्येय? आयुष्यच नसेल तर या सगळ्याला काय अर्थ?
अशा काही मूलभूत प्रश्नांना हात घालणारा, आजच्या पिढीसोबत पालक पिढीच्याही संघर्षाचं दर्शन घडविणारा ‘छिछोरे’ (शब्दश: अर्थ पोकळ, अर्थहीन) हा नवा हिंदी चित्रपट म्हणजे आजच्या स्पर्धेच्या युगात धाव धाव धावणाऱ्या सगळ्या पालकांच्या डोळ्यांत घातलेलं झणझणीत अंजनच म्हणावं लागेल. नीतेश तिवारी दिग्दर्शित हा चित्रपट आपल्याला आवडतो, याचं कारण आज चाळिशीत असलेल्या पिढीच्या तारुण्याचंही तो दर्शन घडवतो आणि आज या पिढीला त्यांच्या मुलांच्या पिढीबाबत पडत असलेल्या प्रश्नांनाही तो हात घालतो.
SPOILER ALERT
या चित्रपटाचे सरळ दोन भाग आहेत. एक आहे तो आजच्या काळातला आणि दुसरा आहे तो फ्लॅशबॅकमधला. आपला नायक अनिरुद्ध पाठक (सुशांतसिंह राजपूत) आणि माया (श्रद्धा कपूर) या जोडप्याचा मुलगा राघव जेईईमध्ये नंबर येईल की नाही, या चिंतेत आहे. त्याच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला आहे आणि राघव वडिलांकडे राहतो आहे. प्रचंड ताणात असलेल्या राघवची मन:स्थिती वडिलांच्या लक्षात येत नाही. जीईईत नंबर न आल्यानं अत्यंत घाबरलेला राघव आत्महत्येचा प्रयत्न करतो आणि त्याच्या आई-वडिलांचे डोळे खाडकन उघडतात. आपल्या मुलाला आपण सदैव ‘लूजर’ होण्याचा ताण देत होतो, हे त्यांच्या लक्षात येतं. राघव रुग्णालयात मृत्युशय्येवर पडलेला असतो आणि त्याच्या वडिलांना त्यांचं तरुणपण आठवतं. त्या कॉलेजमधले एकेक अवली मित्र आठवतात आणि ही सगळी गोष्ट मुलाला सांगण्याचं ते ठरवतात. तिथून फ्लॅशबॅक सुरू होतो. अनिरुद्ध ऊर्फ अनीच्या कॉलेजच्या दिवसांची धमाल गोष्ट सुरू होते. इथले त्याचे ‘सेक्सा’, ‘अॅसिड’, ‘मम्मी’, ‘बेवडा’ अशा अत्रंगी नावाचे मित्र आणि डेरेक हा आणखी एक मित्र त्याला आठवतात. त्याच्या सांगण्यावरून ते थेट हॉस्पिटलमध्येच येतात आणि मित्राच्या अल्बमच्या माध्यमातून त्यांच्या कॉलेज दिवसांच्या धमाल आठवणींत रमतात. या आठवणी सांगण्याचा मुख्य उद्देश काय असतो, हे आपल्या लक्षात येतंच.
अनी आणि त्याचे हे मित्र कॉलेजमध्ये ‘लूजर्स’ म्हणून प्रसिद्ध असतात. त्यांच्या ‘एच - ४’ या बदनाम होस्टेलची आणि तिथल्या एक से एक मित्रांची ओळख आपल्याला व्हायला लागते. दिग्दर्शकानं या फ्लॅशबॅकमध्ये टिपलेलं ‘नाइन्टीज’चं वातावरण आज चाळिशीत असलेल्या माझ्यासारख्या अनेकांना नॉस्टॅल्जिक करणारं आहे. हाच सिनेमातला सगळ्यांत धमाल आणि हास्यस्फोटक भाग आहे. होस्टेलवरचं रॅगिंग, एकेका मित्राची होत जाणारी ‘ओळख’, इतर होस्टेलबरोबर असलेली दुश्मनी आणि सगळ्यांत शेवटी स्पोर्ट चॅम्पियनशिप जिंकण्यासाठी केलेली प्रचंड धडपड... हा सगळाच भाग जमून आला आहे. या सर्व ‘लूजर्स’ची होणारी मैत्री आणि त्यातून त्यांनी स्पर्धा जिंकण्यासाठी प्राणपणाने केलेली मेहनत, त्यांच्या आवडत्या गोष्टींचा त्याग या सगळ्या गोष्टी पाहायला मजा येते. हा भाग पाहताना अनेकांना आपल्या कॉलेजच्या दिवसांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. कॉलेजमध्ये, मित्रांमध्ये बोलली जाणारी टपोरी भाषा यात ऐकायला मिळतेच; पण सेन्सॉरमुळे आता काही ठिकाणी, काही शिव्यांचा ‘बीप’चं जे बूच बसलंय ते आता हास्यास्पद वाटतं. वेबसीरीज पाहायला चटावलेल्या माझ्यासारख्या प्रेक्षकाला त्या शिव्या सहजी ओळखी येतातच. पण इथं त्यांचं ‘म्यूट’ होणं रसभंग करणारं वाटतं. अर्थात चित्रपटाचं हे एवढंच आकर्षण नाहीय.
चिल्लर पार्टी, भूतनाथ रिटर्न्स, दंगल यासारखे यशस्वी चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शक नीतेश तिवारीला, आपल्याला या सिनेमातून काय सांगायचंय हे नेमकं ठाऊक आहे. आजच्या पिढीवरचे ताण आणि त्यातून येणारी एकारलेली मानसिकता या सगळ्यांवर दिग्दर्शक भाष्य करू इच्छितो. आता कॉलेजवयीन मुलाचा पालक झालेला अनिरुद्ध एकदा म्हणतो, ‘जीईईला दहा लाख मुलं बसतात. त्यातले दहा हजार यशस्वी होतात. उरलेल्या नऊ लाख नव्वद हजार मुलांचं काय? आपण त्यांना तुम्ही परीक्षेत अयशस्वी झाल्यानंतर काय करायचं असतं, हे कधी सांगतच नाही. त्यामुळं त्या मुलांना वाटू लागतं, की आपण या परीक्षेत अयशस्वी झालो, म्हणजे आयुष्यातच अयशस्वी झालो. तसं नसतं हे त्यांना कोण सांगणार?’ अनिरुद्धच्या या सवालावर या चित्रपटाचा सगळा फोकस आहे. खुद्द अनिरुद्धनं त्याच्या कॉलेजमधल्या दिवसांत त्यांनी नक्की काय केलं होतं, हे मुलाला आधी कधी सांगितलेलं नसतं. मुलगा जेव्हा रुग्णालयात मृत्युशय्येवर पडतो तेव्हाच त्याला मुलाला हे सांगावंसं वाटतं. त्याचं आणि मायाचं नातं का तुटलं, हे चित्रपटात नीटसं समजत नाही. मात्र, त्याचं सतत कामात असणं दिग्दर्शकानं सूचित केलंंय.
आपण आयुष्यात नक्की काय करायचंय, आपले प्राधान्यक्रम कोणते, पैसा किती आणि कसा मिळवायचा, कुटुंबाचं स्थान/महत्त्व किती या सगळ्यांचाच पुन्हा विचार करायला लावणारा हा चित्रपट आहे.
या चित्रपटात सुशांतसिंह राजपूतनं अनिरुद्धची मुख्य भूमिका केली आहे. प्रौढ पालक झालेला अनिरुद्ध आणि कॉलेजमधला टपोरी अनी ही दोन्ही रूपं त्यानं चांगली दाखविली. श्रद्धा कपूर ही एकमेव अभिनेत्री या चित्रपटात आहे. (अगदी कॉलेजमध्येही तिला एकही मैत्रीण वगैरे दाखववलेली नाही. इंजिनीअरिंग कॉलेजमधला मुलींचा तुटवडा हा संदर्भ एकदा येतो.) तिनंही मायाचं काम व्यवस्थित केलंय. मात्र, ती कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलाची आई वाटत नाही, हेही खरं. सगळ्यांत धमाल आणली आहे, ती अनीच्या अवली मित्रांची कामं करणाऱ्या कलाकारांनी. वरुण शर्मा (सेक्सा), तुषार पांडे (मम्मी), नवीन पोलिशेट्टी (अॅसिड), सहर्षकुमार शुक्ला (बेवडा), ताहीर राज भसीन (डेरेक) हे सगळे कलाकार धमाल काम करतात. व्हिलन रॅगीचं काम प्रतीक बब्बरनं केलंय.
इतर छोट्या-मोठ्या भूमिकांतले कलाकारही लक्षात राहतात. उदा. होस्टेलच्या क्लार्कची भूमिका करणारा सानंद वर्मा.
उत्तरार्धात चित्रपट ठरावीक वळणं घेत अपेक्षित शेवट गाठतो. शिवाय लांबी थोडी कमी असती, तरी चाललं असतं, असं वाटतं. नव्वदच्या दशकातले इतर काही रेफरन्स (उदा. क्रिकेट, गाणी, सिनेमे) पटकथेत आली असती तरी अजून मजा आली असती, असंही वाटून गेलं. पण तरीही हा सिनेमा मनोरंजनाची एक विशिष्ट पातळी कायम राखतो. कंटाळा येत नाही, हे महत्त्वाचं. चित्रपटाला संगीत प्रीतमचं आहे. गाणी सिनेमात ऐकायला बरी वाटली, पण नंतर लक्षात राहिली नाहीत. एंड स्क्रोलला येणारं गाणं व त्यात दोन्ही पिढ्यांतली पात्रं एकत्र नाचतात, ही कल्पना छान होती.
तेव्हा आजच्या वेगवान स्पर्धेच्या काळात आपल्या मुलांबाबत नक्की कोणते निर्णय घ्यायचे, लादायचे हे ठरविण्यापूर्वी मुलांसह एकदा हा चित्रपट जरूर पाहा. कदाचित आपल्यात बदल झालेला असेल.
---
दर्जा - साडेतीन स्टार