31 Oct 2019

मनशक्ती दिवाळी २०१९ - कथा

स्वप्न
------

डोंगर. उंचच उंच डोंगरांची रांग... हिरवागार निसर्ग आणि जणू हिरवाईचा शालू नेसलेली धरती... मधूनच आपलं विमान उडतंय. खरं तर ते विमान पण नाहीय. आपल्यालाच पंख फुटलेयत. खालचा भव्य पसारा डोळ्यांत मावत नाहीय. शेतं, त्यातून पळणाऱ्या चिमुकल्या नद्या, छोटी छोटी गावं, त्यातून जाणारे लहानशा रेषेसारखे रस्ते... मेंदूतून एकापाठोपाठ एक घोषणा होताहेत - समुद्रसपाटीपासून आपण आत्ता २५ हजार फुटांवर आहोत. बाहेरचं तापमान उणे १२ अंश सेल्सिअस आहे... वगैरे. पण या घोषणा नुसत्याच ऐकू येताहेत. शरीराला कसलीच जाण नाही. हां, थोडीशी थंडी वाजतेय जरूर; पण अंगावरचं पांघरूण ओढलं, की मस्त ऊबदार वाटतं. हलकीशी गुंगीही येतेय... एरवी रोजच्या जगण्यातले असह्य ताण पाठीवर घेऊन-वाहून अक्षरशः बाक आलाय अंगाला... आता हे ओझं वाटत नाहीय. एकदम हलकं हलकं वाटतंय... या उंचीचं एक अनाम आकर्षण वाटत आलेलं आहे. भीती नाही वाटत कधी. उलट अजून उंच उंच जावंसं वाटतं. इतकं उंच, की तिथून पृथ्वीची ती निळीशार सुंदर कडा दिसली पाहिजे. मग असंच अजून थोडं वर... अजून थोडं... पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची कक्षा भेदून एकदम पार निघून जावं... ते 'व्हॉयेजर' की असंच कुठलं तरी यान सोडलं होतं ना, तसं! दूर दूर निघून जावं सगळ्या गुरुत्वाकर्षणांच्या कक्षा ओलांडून... चंद्र, मंगळ, गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून... सगळ्यांना टाटा-बाय बाय करत, अजून दूर... आपल्या आकाशगंगेच्याही पार... काय असेल तिथं? कुठलं विश्व नांदत असेल? आपलं वय काय असेल तिथं? तिथून चुकूनमाकून परत आलोच पृथ्वीवर, तर काय दिसेल? शतकं ओलांडली असतील का पृथ्वीनं? की सगळं आहे तसंच असेल? लेक ओळखेल का आपल्याला??

...

टर्रर्रर्रर्र... टिण टिण टिण.... टर्रर्रर्रर्र.... टिण टिण टिण....

कानाचे पडदे भेदून जाणारा तो कर्णकर्णश आवाज आला आणि प्रियंवदा खाडकन जागी झाली. तिनं आजूबाजूला पाहिलं. बेडरूममध्ये एसीचा हलका आवाज येत होता. खिडकीतून उन्हाची तिरीप येत होती. तिनं घड्याळात पाहिलं. सव्वासात वाजले होते. ती स्वप्नातून आता मात्र पूर्ण जागी झाली. इतका वेळ त्या उंचच उंच डोंगरांवरून विहरताना तिचं भान हरपलं होतं. पण आता ती वास्तव जगात आली होती. तिला सकाळी करायच्या शंभर गोष्टींची यादी डोळ्यांसमोर आली. दूध तापवायचं, सगळ्यांचा चहा करायचा, मुलीचा-नवऱ्याचा आणि स्वतःचा डबा करायचा... पळत कॅब गाठायची. दीड तास प्रवास करून ऑफिस गाठायचं... तिथं मान मोडेपर्यंत काम करायचं, दीड-दोनला कसं तरी घाईत सँडविच-कॉफी नामक लंच संपवायचं, पुन्हा मीटिंग, मग प्रेझेंटेशन्स, मग मीटिंग... पुन्हा कॅब, पुन्हा दीड-दोन तास प्रवास... घरी यायचं. यंत्रवत जेवण करायचं. मुलीशी थोडं-फार बोलायचं! नवऱ्याशी दोन ठरलेली वाक्यं बोलायची आणि पुन्हा आपल्या बेडरूममधल्या ऊबदार दुलईत शिरून झोपायचं... दिवसभर एवढा शीण झालेला असतो, की मग कधी झोप लागते ते कळतच नाही.

...


समुद्र. निळाशार अथांग समुद्र. वर मोठमोठी जहाजं संथगतीनं मार्गक्रमण करताहेत. आपण त्या स्कुबा डायव्हरसारखा पोशाख करून आपल्या जहाजाच्या डेकवरून थेट समुद्रात उडी मारतोय... खोल खोल समुद्रात शिरतोय... वर अफाट, अथांग पाण्याचा पसारा आणि त्याखालच्या अलौकिक दुनियेत आपण! किती तरी प्रकारचे मासे... रंगीबिरंगी... याशिवाय बाकी किती तरी चित्र-विचित्र प्राणी. आत्तापर्यंत डिस्कव्हरी किंवा नॅशनल जिओग्राफिक चॅनेलवरच बघितलेले. पाणसर्प, ऑक्टोपस, कासवं आणि नावं माहिती नसलेले किती तरी! याशिवाय प्रवाळांची ती अद्भुत सृष्टी. केवढे त्यांचे रंग आणि केवढे त्यांचे आकार! आपण संथपणे पाण्यात विहरतोय. इथं कुणीही कुणाला त्रास देत नाहीय. जो तो आपल्या विश्वात मग्न. इथली शांतताही एकदम अजब. त्या शांततेचाही आवाज ऐकू येतो. तो आवाज स्वर्गीय असतो. आपल्या रोजच्या जगण्यातले सगळे कर्कश कोलाहल इथं पूर्णपणे विसरायला होतं. या शांततेचा डोह विलक्षण आकर्षक आहे. पण हे 'फेटल अॅट्रॅक्शन' आहे. या डोहाला थांग नाही. त्यात उडी मारली, की गडप व्हायचं. कुठं, कसं माहिती नाही. पण त्या अज्ञाताची भीती वाटते. एकीकडं विलक्षण ओढही वाटते. पूर्वी उंचीवर गेलं, की आपल्याला असं व्हायचं. एकदम त्या कड्यावरून खाली झोकून द्यावंसं वाटायचं. का, ते माहिती नाही. कुठं तरी खोलवर आत दडून बसलेली त्या अज्ञाताची ओढ त्या क्षणी एकदम अनावर व्हायची. कितीदा तरी पाय मागं घेतले. पण पुढच्या वेळी पाऊल मागं पडेलच याची शाश्वती नाही. आताही त्या समुद्रात सात-आठ किलोमीटर खोल उतरल्यावर तिथंही एक आणखी खोल दरी दिसतेय. गर्ता म्हणतात हिला! आता हिची ओढ का लागावी? माणूस खूप दुःखात असला, की दुःखाच्या गर्तेत लोटला असं म्हणतो आपण... ती हीच का? पण ही तर विलक्षण देखणी आहे. तिथं आत आत काय असेल, याची ओढ लागलीय केव्हाची. समुद्राच्या प्रचंड पाण्याचा दाब डोक्यावर आणि त्यात ही मनाची आणखी खोल खोल जाण्याची वेडी घालमेल... काय करावं? मारावीच का उडी? मागं सरकून अंदाज घ्यावा... एक-दोन-तीन म्हणावं आणि घ्यावी सरळ उडी. काय होईल ते होईल. बघू या... एक... दोन...

...

टर्रर्रर्रर्र... टिण टिण टिण.... टर्रर्रर्रर्र.... टिण टिण टिण....

प्रियंवदाला पुन्हा खाडकन जाग आली. कुठून तरी उंचावरून आपण दाणकन गादीवर आपटलो आहोत, असं तिला वाटून गेलं. बेडरूममध्ये सगळीकडं निळा प्रकाश पसरला होता. आपण अजूनही समुद्राच्या तळाशी आहोत की काय, असं प्रियंवदाला क्षणभर वाटलं. पण तो बेडरूममधल्या निळ्या एलईडीचा प्रकाश होता. उन्हाची तिरीप डोकावतच होती. घड्याळात सात वीस झाले होते. कालच्यापेक्षा पाच मिनिटं उशीर. पुन्हा कालचाच सगळा क्रम... फक्त आज नवरा सकाळीच टूरला निघून गेला होता, म्हणून त्याचा डबा नव्हता, इतकंच! मुलीला शाळेत निघायला उशीर झाला. तिची खूपच पळापळ झाली. कसंबसं आवरलं. कालच्या मीटिंगच्या नोट्स काढायच्या होत्या. कॅबमध्ये ते काम करू म्हणून ती तशीच निघाली. ब्रेकफास्ट राहिलाच. पुन्हा ऑफिस, चहा, प्रचंड काम, काम, क्लाएंटस्, फोन, आरडाओरडा, काहींची बेशिस्त, मग चिडचिड... तसाच घाईत दुपारचा बर्गर-कॉफीचा लंचब्रेक, पुन्हा मीटिंग, काम, क्लाएंट्स, मीटिंग, काम... कधी तरी ऑफिस संपलं. पुन्हा कॅबचा दीड-दोन प्रवास. ऑफिसमधल्या मैत्रिणींसोबत थोडा टीपी, थोडं गॉसिप. गालावर हलकेच उमटलेली स्मितरेषा... आज नवरा घरी नव्हता. लेकीचा अभ्यास घ्यायचा, काही तरी खायचं आणि झोपायचं. तासाभरात संपणारं काम... ती पुन्हा बेडरूममधल्या त्या निळाईत शिरली... हलकेच डोळे कधी मिटले कळलं नाही.

...

मग एके दिवशी ती हिमालयात विहरून आली. तिथल्या पांढऱ्याशुभ्र रंगानं तिला वेड लावलं. फार पूर्वी कधी तरी ती आई-वडिलांसोबत मसुरीला आली होती; पण मनसोक्त बर्फ खेळायला मिळालाच नव्हता. किती तरी चित्रपटांतून तिनं नायक-नायिका ते बर्फाचे गोळे एकमेकांना मारतात, ते बघितलं होतं. तिला एकदा तरी तसं करायचं होतं. बाकी हिमालयाची भव्यता पाहून तिला पुन्हा एकदा ते सर्वस्व झोकून देऊन समर्पित व्हायचं फीलिंग आलं. लोकांना हिमालयाची पुनःपुन्हा ओढ का लागते, हे तिला समजावून घ्यायचं होतं. तिला चालत, ट्रेक करत तो सगळा भूभाग पालथा घालायचा होता. तिला त्या शुभ्र वर्णात हरवून जायचं होतं. सांताक्लॉजसारखी पांढरी दाढी असणारे किंवा आपल्या ऋषी-मुनींसारखे दिसणारे एखादे प्रेमळ आजोबा त्यांच्या मांडीवर खेळायला बोलवत आहेत, असं तिला वाटे. तिला त्या डोंगरांवरून घसरत यायचं होतं, स्कीइंग करायचं होतं. गोंडोलात बसायचं होतं. तिनं बेडरूममधल्या एसीचं टेंपरेचर दहावर खाली आणलं. एकदम हुडहुडी भरून आली. तिनं दोन जाड रजया अंगावर घेतल्या आणि ती ‘हिमालयाच्या सफरी’वर निघाली. इथंही तिला पंख फुटले. एव्हरेस्ट, कांचनजुंगा, ल्होत्से अशा सर्व शिखरांच्या वरून ती उडत निघाली. मानसरोवरापर्यंत पोचली. तिथल्या थंडगार पाण्याचा हलकासा शिपका तिनं तोंडावर मारला... आणि....

... 

टर्रर्रर्रर्र... टिण टिण टिण.... टर्रर्रर्रर्र.... टिण टिण टिण....

तिला जाग आली!

....

असे खूप दिवस गेले, खूप रात्री गेल्या. प्रियंवदाची स्वप्नं अफाट होती, अचाट होती. जवळपास रोज रात्री तिनं स्वप्नात तिच्या जवळपास सगळ्या इच्छा पूर्ण केल्या. कधी तरी तिच्या आईच्या कुशीत शिरावंसं वाटायचं. तेव्हा ती पाय पोटाजवळ घेऊन गर्भावस्थेतल्या बाळासारखी झोपून राहायची. पण तिच्या आईचा गर्भ आपोआप तिच्या सभोवती साकारायचा आणि तिला ऊब द्यायचा. हजारो रक्तपेशींचा रक्तवर्ण तिच्या सभोवती तयार व्हायचा. कधी तिला तिचं गाव आठवायचं. गावातलं शेत, तिथली विहीर आठवायची. फ्रॉकमध्ये वेचलेल्या चिंचा, बोरं आठवायची. कधी तिला कॉलेजात असताना सह्याद्रीत तुफान पावसात केलेली भटकंती आठवायची. हे सगळं ती पुनःपुन्हा जगायची. रोज रात्री...

आणि एक दिवस...

टर्रर्रर्रर्र... टिण टिण टिण.... टर्रर्रर्रर्र.... टिण टिण टिण....

गजर झाला. वाजतच राहिला. तिला जाग आलीच नाही...

...

आणि लांब तिकडं, आकाशगंगेच्या पलीकडं, कुणी तरी दोन्ही हातांची ओंजळ करून कुणाला तरी अलगद हातात घेत होतं...
हे मात्र स्वप्न होतं की नव्हतं, याचं रहस्य त्या गूढगर्भ ब्रह्मांडालाच ठाऊक होतं!

---

14 Oct 2019

वाचन प्रेरणा दिन - मटा लेख

वाचन आणि ‘प्रज्वलित मन’
--------------------------


डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रेरणेतून १५ ऑक्टोबर हा आता ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. पुस्तक वाचनातून आपल्याला नक्की काय मिळू शकतं आणि वाचन केलं नाही तर आपण काय गमावू शकतो याचा यानिमित्त घेतलेला वेध...

----

आपण दूर कुठं तरी डोंगराच्या माथ्यावर, गर्द जंगलाच्या मध्यावर, नितळ पाण्याच्या लाटेवर, अनाघ्रात-अनवट वाटेवर, विलक्षण शांततेच्या कुशीत असावं; स्वत:च स्वत:मध्ये असण्याच्या या आगळ्या प्रवासाची अनुभूती घेत स्वत:मधल्या अजूनही न सापडलेल्या गोष्टींचा शोध घेत राहावं; एकाच वेळी बाह्य जगाशी हळूहळू संपर्क तोडत असताना, आतल्या संवादाची ऊर्मी वाढवत जावं... कुठे तरी ती तार झंकारावी आणि एका अलौकिक आनंदानं अंतर्मन लख्ख उजळून निघावं...
खरं सांगू का? हे एक स्वप्न आहे, स्वप्न! हे असलं स्वप्न आपण कित्येकदा पाहिलं असेल, वाचलंही असेल. पण प्रत्यक्षात आपल्या बाबतीत यातली एकही गोष्ट घडत नाही, हीच वस्तुस्थिती! रोजच्या ट्रॅफिक जॅममधून, प्रचाराच्या कर्ण्यांच्या कर्णकर्कश आवाजातून, सततच्या कलहाच्या उच्चरवातून जिथं आपला बाह्य आवाज आपल्याला ऐकू येत नाही, तिथं अंतर्मनाचा वगैरे आवाज कुठून ऐकू यायला! तेव्हा जवळपास अप्राप्य अशा या स्वप्नाची भरपाई करणार तरी कोण? अशा वेळी एकच करावं. आपल्या उशाशी असलेलं आपलं आवडतं पुस्तक घ्यावं आणि त्यात डोकं घालून हरवून जावं... वाचनानं मला काय दिलं, असा प्रश्न कुणी विचारला, तर हेच उत्तर आपोआप समोर येईल. केवळ स्वप्नांमध्येच आपण जगू शकतो, अशा अलौकिक आनंदाची अनुभूती आपल्याला वाचन देतं. 
वाचन म्हणजे पुस्तकाचं वाचन. छापील शब्दांचं वाचन. हे वाचन आपल्याला आयुष्यभराचं मैत्र देतं. ते शब्द लिहिणाऱ्या व्यक्तीच्या एकूण जगण्याच्या आकलनाचा काही वाटाही आपल्याला देतं. लेखकाच्या भावविश्वाचा भाग होण्याची संधी देतं. आपल्या स्वत:च्या भावविश्वाची निर्मिती करण्याची प्रेरणा देतं. या सगळ्या प्रक्रियेतून आपल्या जगण्यावर निश्चित परिणाम घडवतं.... आणि हा परिणाम सकारात्मकच असतो, हे नक्की! खूप लहानपणापासून वाचनाची आवड असलेली व्यक्ती आणि अजिबात वाचनाची आवड नसलेली व्यक्ती यांची जडणघडण सरळच वेगळ्या पद्धतीनं होते. अर्थात आपण काय वाचतो, हेही यासाठी महत्त्वाचं आहे. चांगली पुस्तकं वाचली पाहिजेत, असं आपण म्हणतो, तेव्हा त्यातल्या आशयाचा, विचारांचा मुद्दा येतो. आपण ज्या पद्धतीचा आशय वाचतो, जो विचार वाचतो त्याचाच पगडा पुढंही आपल्या आयुष्यावर दीर्घकाळ राहतो. पुस्तकं वाचणं आणि सतत वाचत राहणं ही पुस्तकप्रेमी माणसासाठी आयुष्यभर चालणारी प्रक्रिया असल्यानं आपण काय वाचत राहिलं पाहिजे आणि काय सोडलं पाहिजे याविषयी त्याची समजही वाढत जाते. विशेष म्हणजे पुस्तकं वाचूनच त्याची ही समज वाढते. पुस्तक वाचन आपल्याला समृद्ध करतं ते अशा रीतीने! 
लहानपणीच या वाचनाची गोडी लागली, की आपोआप काही गुण आपल्या अंगी येऊ लागतात. एका जागी शांतपणे एखादी गोष्ट मन लावून करीत बसणे हाही आजच्या काळात तसा मोठाच गुण म्हणायचा. पुस्तकं वाचणाऱ्या माणसात सहजच हा गुण रुजतो. फार तर तो वाचनाच्या जागा बदलेल; पण त्यापलीकडे त्याच्या हातून वावगे काही घडायचे नाही. वाचन करणाऱ्या माणसाची स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती वर्धिष्णू होऊ लागते. वाचनातील एखादी गोष्ट समजली नाही, तर ती समजेपर्यंत चैन पडत नाही. त्यामुळं नव्या गोष्टी समजतात, हे ओघानं आलंच. वाचनातून नवरसांचा परिपोष होत असल्यानं आपलं भावनिक कुपोषण होत नाही. जगात किती प्रकारचे लोक किती वेगवेगळ्या प्रकाराने आपल्या जगण्यातल्या भावभावना व्यक्त करतात, हे पाहूनच आपण थक्क होतो. आपल्या परिघापलीकडचं जग पाहण्याची दिव्य दृष्टी केवळ वाचनातूनच आपल्याला लाभू शकते. वाचनामुळं लक्ष एकाग्र करण्याची सवय अंगी जडते. पुस्तकात संपूर्णपणे लक्ष केंद्रित केल्याशिवाय आपण त्या लेखनाचा आनंद घेऊ शकत नाही, हे स्पष्टच आहे. आजच्या काळात आपली लक्ष केंद्रित करण्याची क्षमता दिवसेंदिवस चिंताजनकरीत्या कमी होत चालली असताना, पुस्तक वाचनातून आपण ती क्षमता इतरांपेक्षा अधिक राखू शकतो, हा मोठाच फायदा आहे. भाषेच्या दृष्टीने पुस्तक वाचनाचा फायदा तर फारच मोठा आहे. छापील अक्षरे म्हणजे कुठल्याही भाषेतील अचूक, प्रमाण अशी अक्षरे! आपण सतत उत्तम दर्जाची छापील अक्षरे पाहत राहिलो, त्या अक्षरांपासून तयार झालेले अचूक शब्द वाचत राहिलो, त्या शब्दांच्या समूहाद्वारे तयार झालेले अर्थपूर्ण वाक्य समजून घेत राहिलो, त्या वाक्यांच्या समुच्चयातून तयार झालेला लेख पाहत, मेंदूत मुरवत वाचत राहिलो तर आपल्या मेंदूमध्ये त्या प्रमाण, अचूक शब्दांची ‘छायास्मृती’ (फोटो मेमरी) तयार होते. त्यामुळं नंतर कधीही चुकीचे किंवा अप्रमाणित शब्द वाचले, की ते खटकायला लागतात. अचूक शब्दांचा मेंदूचा हा आग्रह आपल्याला उत्तम भाषाज्ञानाकडं घेऊन जातो. प्रत्येकानं त्यासाठी व्याकरणाचा अभ्यास करायला पाहिजे, असं नाही. केवळ उत्तम दर्जाची पुस्तकं वाचली, तरी पुष्कळ काम होऊ शकेल. पुस्तकं राहिली, तर भाषा राहील आणि भाषा टिकली तर त्या भाषेतली पुस्तकं येतील, असं हे गणित आहे. त्यामुळं वाचनाची आवड आपल्या भाषेच्या संवर्धनासाठी उपयुक्त आहे, हे वेगळं सांगायची आवश्यकता नाही. छापील शब्दांचं हे प्रेम आपल्याला माणूस म्हणून उन्नत करीत राहतं; जगभरात आपल्याहून किती तरी थोर माणसं होऊन गेली आहेत आणि आपल्याला अजून भरपूर काही शिकायचंय या भावनेतून आपल्याला विनम्र ठेवतं. आजच्या सभोवतालात हे विशेषच महत्त्वाचं!
वाचनाचे हे फायदे तर झालेच; पण वाचनाच्या या सवयीचा सर्वांत मोठा व महत्त्वाचा परिणाम होतो तो आपल्या मनावर. जन्मल्यापासून आपला पिंड संस्कृती, परंपरा, रुढी, प्रथा, रिवाज अशा वेगवेगळ्या गोष्टींमधून घडत असतो. आपल्याला कसं घडवायचं याचे निर्णय आपल्याला पुरेशी समज यायच्या आधी आपल्या वतीनं दुसरंच कोणी तरी घेत असतं. आपले आई-वडील हे त्यातले प्रमुख; पण बहुतांश वेळा किमान त्यांचा हेतू तरी स्वच्छ असतो किंवा भाबडा तरी असतो. मात्र, समाज नावाचा मोठा गाडा चालविणारे वेगळेच कुणी असतात. त्यांची इथे वा तिथे सत्ता असते. ती दर वेळी राजकीय असतेच असं नाही. ती सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे धार्मिक असू शकते; नव्हे, असतेच! ही सत्ता राखणारे आपल्या सोयीने आपल्याला घडवत असतात. त्यासाठी त्यांच्या सोयीच्या गोष्टींची बाळगुटी आपल्याला लहानपणापासून चाटविली जाते. आपण पुस्तकं वाचली नाहीत किंवा जगात कोणी काय म्हणून ठेवलंय, काय विचार केला आहे हे जाणून घेतलं नाही, तर याच बाळगुटीचं बाळसं आपल्या अंगावर चढतं आणि आपण या सत्ताधीशांना हवे तसे नागरिक म्हणून आपसूक घडत राहतो. वाचनामुळं आपल्या मेंदूला विचार करायची शिस्त लागू शकते आणि हीच आपल्या व्यक्तिमत्त्वाला वेगळं करणारी ताकदही असू शकते. विचार करणाऱ्या मेंदूला प्रश्न पडू लागतात; विचारायला अवघड असे प्रश्न पडू शकतात. प्रश्न विचारणारे मेंदू जास्त संख्येनं तयार होणं ही कोणत्याही सत्ताधीशासाठी धोक्याची घंटा असते. अर्थात, हे ज्ञानही आपल्याला पुस्तकं वाचूनच मिळू शकतं. 
मेंढ्यांचा कळप असतो आणि वाघ जंगलात एकटा, सार्वभौम सत्ताधीश म्हणून राज्य करतो. आपल्याला कळप म्हणून जगायचंय की प्रश्न विचारणारा सार्वभौम, विचारी माणूस व्हायचंय हे आपल्या पुस्तक वाचनाच्या आवडीवरून ठरू शकतं. निर्णय आपल्याच हाती!
---
(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स संवाद पुरवणी, पुणे आवृत्ती; १३ ऑक्टोबर २०१९)