19 Dec 2020

बिंगोस्कोप - भाग १३ ते १५

बिंगोस्कोप
---------------

स्वाती यादवाडकर या मैत्रिणीनं दोन-तीन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘बिंगोकिड्स’ या लहान मुलांच्या पाक्षिकात मी ‘बिंगोस्कोप’ या सदरात जगभरातील काही उत्तम चित्रपटांची ओळख मुलांना करून दिली. ही रूढार्थाने परीक्षणं नाहीत. साधारण दहा ते १४ वर्षे वयोगटातल्या मुलांसाठी, त्यांना समजेल अशा साध्या-सोप्या भाषेत सिनेमांचा परिचय करून देण्याचा हा प्रयत्न आहे. एकूण २१ सिनेमांवर मी या सदरात लिहिलं आहे. हे लिखाण इथं एकत्रित राहील म्हणून तीन-तीन परिचय एकत्र करून एक ब्लॉग अशा रीतीनं प्रसिद्ध करीत आहे. हा पाचवा भाग...

----

१३. साउंड ऑफ म्युझिक
-----------------------------

जगण्याचं सुरेल गाणं
-------------------------

मित्रांनो, आपल्याला गाणी ऐकायला, म्हणायला, गुणगुणायला आवडतात ना? संगीत आवडत नाही, सूर आवडत नाहीत अशी माणसं फारशी नसतात. आपल्याला सगळ्यांनाच संगीत आवडतं. गाणी आवडतात. पण कल्पना करा, हे संगीत, हे सूर, ही गाणी आपल्या आयुष्यात नसती तर? आयुष्य किती नीरस झालं असतं, ना! अगदी गद्य, रुक्ष अशा त्या ‘बोअर’ जगण्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. मात्र, अशा काही नीरस लोकांच्या जगण्यात संगीताचे सूर भरण्याची एक कथा म्हणजेच ‘साउंड ऑफ म्युझिक’ हा अत्यंत गाजलेला इंग्लिश चित्रपट. सुमारे ५३ वर्षांपूर्वी आलेला हा चित्रपट जगभरात अतिशय नावाजला गेला. त्यातल्या संगीताचं, गाण्याचं, ज्यूली अँड्र्यूज या प्रमुख अभिनेत्रीचं सगळीकडं खूप कौतुक झालं. यातली ‘डो रे मी’, ‘साउंड ऑफ म्युझिक’, ‘आय ॲम सिक्स्टीन, गोइंग ऑन सेव्हन्टीन’ आदी गाणी प्रचंड गाजली. अजूनही ती ऐकली जातात.

मारिया (ज्यूली) आणि निवृत्त नौदल अधिकारी कॅप्टन जॉर्ज व्हॉन ट्रॅप (ख्रिस्तोफर प्लमर) यांची ही कथा आहे. ही कथा साल्सबर्ग (ऑस्ट्रिया) येथे सन १९३८ मध्ये घडते. मारिया नन म्हणून काम करण्यासाठी जाते. मात्र, तिची संगीताची आवड, पर्वतांविषयीचं प्रेम, एकूणच खळाळत्या उत्साहानं जगणं आणि काहीशी बेशिस्त, स्वैर जीवनशैली यामुळं ती हे शिक्षण पूर्ण करू शकणार नाही, असं तिच्या शिक्षिकेला वाटतं. ती तिला कॅप्टन ट्रॅप यांच्याकडं पाठवते. त्यांच्या सात मुलांची आया म्हणून तिला काम करायचं असतं. या मुलांना आई नसते. कॅप्टनसाहेबांच्या कडक शिस्तीखाली ही सगळी मुलं अतिशय दबलेली असतात. कॅप्टनसाहेब व्हिएन्नाला जातात, तेव्हा मारिया या मुलांना गायला, मोकळेपणाने जगायला शिकवते. ते परत येतात, तेव्हा त्यांना मुलांचं हे वागणं बिलकुल रुचत नाही. मात्र, हळूहळू त्यांच्यात बदल होत जातो. तेही अनेक वर्षांनी गायला लागतात. नंतर या मुलांना प्रसिद्ध अशा साल्सबर्ग फेस्टिव्हलमध्ये गाण्याच्या स्पर्धेत पाठवावं, अशी टूम निघते. मात्र, कॅप्टनसाहेब त्यास नकार देतात. पुढे अशा काही गोष्टी घडत जातात, की संगीतच या कुटुंबाला एकत्र आणते. त्या गोष्टींचा आनंद प्रत्यक्ष सिनेमा पाहताना लुटणेच योग्य.
रॉबर्ट वाइज या दिग्दर्शकानं काही सत्य घटनांवरून हा सिनेमा तयार केला आहे. मारिया व्हॉन ट्रॅप यांच्या ‘द स्टोरी ऑफ द ट्रॅप फॅमिली सिंगर्स’ या नावाच्या पुस्तकावरून ‘साउंड ऑफ म्युझिक’ नावाची संगीतिका १९५९ मध्ये रंगमंचावर आली होती. ऑस्कर हॅमरस्टाइन II यांनी यातली गीते लिहिली होती, तर रिचर्ड रॉजर्स यांनी त्या संगीतिकेचं संगीत दिग्दर्शन केलं होतं. नंतर रॉबर्ट वाइज यांनी हा चित्रपट तयार केला, तेव्हा त्या चित्रपटाचं संगीतही रॉजर्स यांनीच दिलं. हा चित्रपट अमेरिकेत २ मार्च १९६५ रोजी फारसा गाजावाजा न होता, मर्यादित स्वरूपात प्रदर्शित झाला होता. मात्र, लवकरच या चित्रपटानं तुफान लोकप्रियता मिळविली आणि अवघ्या चार आठवड्यांत तो त्या वर्षातला सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. पुढील वर्षभरातच या चित्रपटाने उत्पन्नाचे आणखी विक्रम मोडले आणि (‘गॉन विथ द विंड’ला मागे टाकून) तो सार्वकालिक सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. हा विक्रम या चित्रपटाच्या नावावर पुढील पाच वर्षे राहिला. या चित्रपटातील मारियाच्या भूमिकेमुळं ज्यूली अँड्रयूज ही अभिनेत्री अजरामर झाली. या चित्रपटामुळे आपल्या चित्रकर्मींनाही प्रेरणा मिळाली. प्रख्यात गीतकार-दिग्दर्शक गुलजार यांनी या चित्रपटावरून काहीसा बेतलेला ‘परिचय’ हा चित्रपट १९७२ मध्ये तयार केला होता.
पुढे तर ‘साउंड ऑफ म्युझिक’ हा चित्रपट म्हणजे एक दंतकथा ठरला. या चित्रपटाने त्या वर्षी पाच ऑस्कर पुरस्कार पटकावले. त्यात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट चित्रपट या पुरस्कारांचा समावेश होता. जगभरातील लोकांनी हा सिनेमा डोक्यावर घेतला. याचं कारण म्हणजे हा चित्रपट सांगत असलेली संगीताची भाषा सर्वांना समजणारी होती. सूरांनी साधल्या जाणाऱ्या संवादाला भाषेचं बंधन नसतंच. शिवाय या चित्रपटातून केवळ संगीताची महती सांगितली आहे असं नाही. किंबहुना कुठलंही आनंददायी जगणं सुरेलच असतं, असा मंत्र हा सिनेमा आपल्याला देतो. या सिनेमात दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीचा काळ आहे. या महायुद्धामुळे युरोपातील अनेक देशांची मोठी होरपळ झाली. माणसामाणसांत द्वेष असू नये, प्रेमानं-एकोप्यानं सर्वांनी गाणं गात, गुणगुणत, हसत जगावं, असा साधासोपा संदेश देणारा हा सिनेमा युद्धाच्या क्रौर्याच्या पार्श्वभूमीवर त्या काळी सर्वांना अत्यंत आवडावा, यात आश्चर्य नव्हतं. या सिनेमाने सांगितलेली मानवी मूल्यं चिरंतन आहेत. त्यामुळंच आजही हा सिनेमा पाहताना कंटाळा येत नाही. तुम्ही तो अजून पाहिला नसेल, तर नक्की पाहा. तब्बल तीन तास सूरांच्या सहवासात हरवून जा...

----

साउंड ऑफ म्युझिक (अमेरिका/इंग्लिश/१९६५/रंगीत/१७४ मिनिटे)

निर्माते : रॉबर्ट वाइज, दिग्दर्शक : रॉबर्ट वाइज, कथा : मारिया व्हॉन ट्रॅप, पटकथा : अर्नेस्ट लेहमन
प्रमुख भूमिका : ज्यूली अँड्र्यूज, ख्रिस्तोफर प्लमर, एलिनॉर पार्कर, पेगी वूड
संगीत : रिचर्ड रॉजर्स, ऑस्कर हॅमरस्टाइन II
सिनेमॅटोग्राफी : टेड डी मॅक्कॉर्ड
संकलन : विल्यम रेनॉल्ड्स

---

१४. एलिझाबेथ एकादशी
-----------------------------

गजर मूल्यांचा...
------------------

मुलांनो, २०१४ मध्ये बालदिनाच्या म्हणजेच १४ नोव्हेंबरच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला ‘एलिझाबेथ एकादशी’ या गमतीशीर नावाचा मराठी सिनेमा तुम्ही पाहिला आहे का? नसेल, तर नक्की पाहा. लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवून, त्यांच्या भावविश्वाची सुंदर गुंफण असलेले फार मोजके सिनेमे मराठीत तयार झाले आहेत. त्यापैकी हा एक महत्त्वाचा चित्रपट आहे. या सिनेमाच्या गमतीशीर नावाचा उलगडा पटकन होत नाही. सिनेमाचं पोस्टर पाहिल्यावर लक्षात येतं, की त्यात एक मस्त, वेगळ्या डिझाइनची सायकल दिसते आहे. या सायकलचंच नाव ‘एलिझाबेथ’ असतं. आता सायकलला असं वेगळंच नाव का असतं, ते सिनेमा पाहिल्यावरच कळेल. शिवाय ‘एकादशी’ का म्हटलंय, तर ही कथा पंढरपूरमध्ये घडते आणि तिथं आषाढी एकादशीच्या दिवशी जी मोठी यात्रा भरते, तिला या कथेत महत्त्व आहे. 

दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी ही अत्यंत साधी, सरळ, हृदयस्पर्शी गोष्ट अत्यंत सुंदररीत्या सांगितली आहे. ज्ञानेश व मुक्ता ही दोन मुलं आपल्या आई व आजीसोबत पंढरपूरमध्ये राहत असतात. (या मुलांची नावं संत ज्ञानेश्वर व मुक्ताबाई यांच्यावरून प्रेरित आहेत, हे आपल्या लक्षात आलंच असेल.) या मुलांच्या वडिलांचं निधन झालेलं असतं आणि आई मशिनवर स्वेटर तयार करून संसार चालवत असते. ज्ञानेश शाळेत अतिशय हुशार असतो, पण त्याच्याकडे फीसाठीही पैसे नसतात. त्याचे शिक्षकच त्याच्या फीचे पैसे भरत असतात. कर्ज फेडता न आल्याने त्याच्या आईचे मशिनही बँकेचे लोक घेऊन जातात. आता ते सोडवून आणण्यासाठी आईकडं एकच उपाय असतो. तो म्हणजे ज्ञानेशची सायकल - ‘एलिझाबेथ’ विकणे. ही सायकल ज्ञानेशच्या विज्ञाननिष्ठ वडिलांनी त्याला खास तयार करून दिलेली असते. त्यामुळे त्याला ती मुळीच विकण्याची इच्छा नसते. मग ही सायकल वाचवण्यासाठी ही भावंडं आणि त्यांचे मित्र काय युक्ती करतात, याची ही कथा आहे.
परेशची पत्नी व मूळची पंढरपूर निवासी असलेल्या मधुगंधा कुलकर्णी यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. त्यांच्या अस्सल अनुभवांची जोड असल्यानं हा चित्रपट अगदी वास्तववादी झाला आहे. पंढरपूरमधील जुने वाडे, गल्ल्या, यात्रेच्या आधी त्या गावात सुरू होणारी लगबग, वारकऱ्यांचे आगमन, तीर्थक्षेत्र असलेल्या गावाची अर्थव्यवस्था अशा अनेक गोष्टी कळत-नकळत सिनेमात दिसत राहतात. अत्यंत साध्या-साध्या, पण हृदयाला भिडणाऱ्या प्रसंगांतून चित्रपट पुढं सरकत राहतो. परेशच्या या सिनेमावर इराणी सिनेमाचा प्रभाव अगदी स्पष्ट दिसतो. साध्या माणसांचं साधंच जगणं त्यातल्या हळव्या-नाजूक क्षणांसह टिपणं ही इराणी दिग्दर्शकांची खासियत! परेशही या सिनेमात हे साधतो. शिवाय कथानकाला इथल्या अस्सल मातीची जोड असल्यानं हा सिनेमा वेगळीच उंची गाठतो. 
या चित्रपटात ज्ञानेशच्या कुटुंबाच्या माध्यमातून दिग्दर्शक या मातीत रुजलेल्या संस्कारांची, नीतिमूल्यांची शिकवण देतो. तीही कुठलाही आविर्भाव न आणता! त्यामुळंच हा चित्रपट मनाला भिडतो. या चित्रपटात श्रीरंग महाजन या मुलानं ज्ञानेशची, तर सायली भंडारकवठेकर या मुलीनं मुक्ताची भूमिका केली आहे. या दोन मुलांनी फारच सुंदर काम केलं आहे. मुलांच्या आईच्या भूमिकेत नंदिता धुरी, तर आजीच्या भूमिकेत वनमाला किणीकर यांनीही फार समजून-उमजून काम केलंय. मुळात हे सगळे अभिनय करताहेत, असं कुठंच वाटत नाही. आपण पंढरपुरातील एखाद्या घरातील प्रसंग पाहतो आहोत, असंच वाटतं. या चित्रपटातून पंढरपूरचं सामाजिक दर्शन तर घडतंच, पण त्यानिमित्तानं महाराष्ट्राचं, इथल्या मराठी समाजाचं एक हृद्य चित्रण पाहायला मिळतं. या कारणासाठी हा सिनेमा नक्की बघा.
यात ‘दगड दगड’ असं एक गाणं स्वत: दिग्दर्शकानंच लिहिलं आहे. त्याला दिवंगत संगीतकार आनंद मोडक यांनी संगीत दिलंय. शरयू दातेनं गायलेलं हे गाणंही मस्त जमलं आहे. याशिवाय ज्ञानेश घरी पाहुणे म्हणून आलेल्या वारकऱ्यांसमोर कीर्तन करतो, तो प्रसंगही खूप रंगला आहे. या चित्रपटात पुष्कर लोणारकर या मुलानं ज्ञानेशच्या मित्राच्या, म्हणजे गण्याच्या भूमिकेत धमाल केली आहे. यातले मुलांचे सगळेच प्रसंग खूप गमतीदार, हसवणारे, तर प्रसंगी डोळ्यांत पाणी आणणारे झाले आहेत.
या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तर महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा ‘संत तुकाराम’ पुरस्कारही मिळाला. या चित्रपटाला मोठी लोकप्रियताही लाभली. असा हा चित्रपट तुम्ही अद्याप पाहिला नसल्यास मित्र-मैत्रिणींसह जरूर पाहा.

----

एलिझाबेथ एकादशी (भारत/मराठी/२०१४/रंगीत/९० मिनिटे)

निर्माते : निखिल साने, नितीन केणी, मधुगंधा कुलकर्णी
दिग्दर्शक : परेश मोकाशी, कथा : मधुगंधा कुलकर्णी, पटकथा : परेश मोकाशी
संगीत : आनंद मोडक, सिनेमॅटोग्राफर : अमोल गोळे, संकलन : अभिजित देशपांडे
प्रमुख भूमिका : नंदिता धुरी, श्रीरंग महाजन, सायली भंडारकवठेकर, वनमाला किणीकर, पुष्कर लोणारकर

---

१५. मकडी

--------------

भयाचं गमतीदार जाळं!
---------------------------

मुलांनो, तुम्ही कोळ्याचं जाळं कधी पाहिलं आहे का? एखाद्या कसबी कारागिरासारखं विणलेलं हे भक्कम जाळं म्हणजे कोळ्याच्या भक्ष्याचं साक्षात मरणच! कुणी त्या जाळ्यात अडकला, तर त्याची सुटका नाहीच. कधी संधी मिळाली तर त्या छोट्याशा कीटकानं बारकाईनं विणलेलं हे जाळं जरूर पाहा. याशिवाय ‘स्पायडरमॅन’ तर तुम्हाला माहिती आहेच. स्पायडर म्हणजे कोळीच! हिंदीत या कोळ्याला ‘मकडी’ असं म्हणतात. विशाल भारद्वाज या प्रतिभावंत दिग्दर्शकानं दिग्दर्शित केलेला याच नावाचा हिंदी सिनेमा तुम्ही पाहिला आहे का? नसेल तर नक्की पाहा. लहान मुलांना आवडणाऱ्या सर्व गोष्टी यात आहेत. परीची, राक्षसाची, भुताची किंवा पडक्या वाड्यातील रहस्याची गोष्ट आपल्याला वाचायला आवडते. हा चित्रपटही अशाच अद्‘भुत’रम्य दुनियेची सैर घडवितो.

उत्तर भारतातल्या एका छोट्या गावात ही गोष्ट घडते. यात चुन्नी आणि मुन्नी नावाच्या दोन जुळ्या बहिणी आहेत. चुन्नी ही अत्यंत खोडकर, तर मुन्नी ही तिची बहीण गरीब. चुन्नी जुळेपणाचा फायदा घेऊन गावकऱ्यांची नेहमी गंमत करीत असते. ‘मुघले आझम’ या गमतीशीर नावाचा त्यांचा एक छोटा मित्रही असतो. याच गावात एक जुना ओसाड महालवजा वाडा असतो. या वाड्यात ‘मकडी’ नावाची गूढ स्त्री राहत असते. ही ‘मकडी’ जादूगार असून, तिच्या तावडीत कुणी सापडलं, तर ती त्या व्यक्तीचं रूपांतर कुठल्याही प्राण्यात किंवा पक्ष्यात करते, असा समज गावकऱ्यांमध्ये असतो. त्यामुळं त्या वाड्याकडं लहान मुलंच काय, मोठ्यांनाही फिरकायला खूप भीती वाटत असते. या गावात राहणाऱ्या कल्लू नावाच्या खाटकाशी चुन्नी-मुन्नी व मुघले आझम या तिघांचंही मुळीच पटत नसतं. एकदा चुन्नी नेहमीप्रमाणे कल्लूची काही तरी खोडी काढते. कल्लू तिच्या मागे धावतो. मात्र, तो गडबडीत चुकून मुन्नीलाच चुन्नी समजतो आणि तिचा पाठलाग करायला लागतो. घाबरलेली मुन्नी चुकून त्या ‘मकडी’च्या वाड्यात शिरते. चुन्नीला जेव्हा हे कळतं, तेव्हा ती तिला शोधायला त्या वाड्याकडे धावते. मुन्नीला आपण कोंबडी केलं, असं ‘मकडी’ तिला सांगते. चुन्नीला जेव्हा त्या लाल कापडाखाली खरोखर एक कोंबडी दिसते, तेव्हा तिला जबरदस्त धक्का बसतो. ती ‘मकडी’च्या पाया पडून, रडून तिला आपल्या गरीब बहिणीला परत माणूस करण्याची विनंती करते. मात्र, ‘मकडी’ त्याला नकार देते. अखेर ती चुन्नीपुढं एक अट ठेवते. चुन्नीनं तिला शंभर कोंबड्या आणून दिल्या, तरच ती मुन्नीला परत माणूस करणार असते. आता चुन्नीपुढं ‘मकडी’साठी शंभर कोंबड्या गोळा करायचं आव्हान उभं राहतं... पुढं चुन्नी काय करते, मुन्नी खरंच कोंबडी झालेली असते का, ‘मकडी’ नक्की कोण असते या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायला ‘मकडी’ चित्रपट पाहायलाच हवा.

विशाल भारद्वाज या संगीतकार-दिग्दर्शकानं या चित्रपटाद्वारे आपण उत्कृष्ट बालचित्रपट देऊ शकतो, हे सिद्ध केलं. या चित्रपटाचं आकर्षण होतं ते ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी यात साकारलेली ‘मकडी’ची प्रमुख भूमिका. आझमी यांच्या कारकिर्दीतील उत्कृष्ट भूमिकांपैकी ही एक भूमिका म्हणता येईल. त्यांना या भूमिकेसाठी चेटकिणीची जी वेषभूषा केली आहे, तीही बारकाईने पाहा. श्वेता बसू प्रसाद या चुणचुणीत मुलीनं यातल्या चुन्नी व मुन्नीची भूमिका अगदी झकास रंगविली आहे. तिला या भूमिकेसाठी २००३ चा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. मकरंद देशपांडे या रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंतानं यातील कल्लू खाटकाची भूमिका केली आहे. या चित्रपटातील ‘मकडी’चा जुनाट भयावह वाडा आणि तिची एंट्री पाहताना लहान मुलं हमखास दचकतात. उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी आणि पार्श्वसंगीत हेही या चित्रपटाचं वैशिष्ट्य होय.
‘मकडी’ चित्रपट २२ नोव्हेंबर २००२ रोजी भारतात सर्वत्र प्रदर्शित झाला. त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. शिकागो आंतरराष्ट्रीय बालचित्रपट महोत्सवात या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे दुसरे पारितोषिक मिळाले. याशिवाय प्रतिष्ठेच्या कान्स चित्रपट महोत्सवातही हा चित्रपट दाखविला गेला. या संपूर्ण चित्रपटाचं चित्रिकरण अलिबागजवळ वाघोली नावाच्या गावात व गोव्यात करण्यात आलं आहे. सिनेमा संपल्यावर येणारं ‘छुट्टी है छुट्टी’ हे गाणं खूप लोकप्रिय आहे. अनेक स्नेहसंमेलनांमध्ये तुम्ही ते ऐकलंही असेल.
विशाल भारद्वाज या दिग्दर्शकाचा हा उत्कृष्ट बालचित्रपट तुम्ही नक्की पाहा आणि मोठे झाल्यावर या दिग्दर्शकाच्या अन्य महत्त्वाच्या कलाकृतीही आवर्जून पाहा. 

---

मकडी (भारत/हिंदी/२००२/रंगीत/९० मिनिटे)

निर्माता : विशाल भारद्वाज, दिग्दर्शक : विशाल भारद्वाज
कथा : अब्बास टायरवाला, विशाल भारद्वाज, पटकथा : विशाल भारद्वाज, संगीत : विशाल भारद्वाज
गीते : गुलजार, सिनेमॅटोग्राफर : हेमंत चतुर्वेदी, संकलन : आरिफ शेख
प्रमुख भूमिका : शबाना आझमी, श्वेता बसू प्रसाद, मकरंद देशपांडे, आलाप माजगावकर, दयाशंकर पांडे

---

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

----

10 Dec 2020

बिंगोस्कोप - भाग १० ते १२

बिंगोस्कोप

--------------

स्वाती यादवाडकर या मैत्रिणीनं दोनेक वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘बिंगोकिड्स’ या लहान मुलांच्या पाक्षिकात मी ‘बिंगोस्कोप’ या सदरात जगभरातील काही उत्तम चित्रपटांची ओळख मुलांना करून दिली. ही रूढार्थाने परीक्षणं नाहीत. साधारण दहा ते १४ वर्षे वयोगटातल्या मुलांसाठी, त्यांना समजेल अशा साध्या-सोप्या भाषेत सिनेमांचा परिचय करून देण्याचा हा प्रयत्न आहे. एकूण २१ सिनेमांवर मी या सदरात लिहिलं आहे. हे लिखाण इथं एकत्रित राहील म्हणून तीन-तीन परिचय एकत्र करून एक ब्लॉग अशा रीतीनं प्रसिद्ध करीत आहे. हा चौथा भाग...

----

१०. स्वदेस

-------------

यह जो बंधन है कभी टूट नहीं सकता...

----------------------------------------------

बालदोस्तांनो, १५ ऑगस्ट हा आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्यदिन! याच दिवशी १९४७ मध्ये आपला देश ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून मुक्त झाला. यंदा आपला देश स्वतंत्र झाला, त्याला ७१ वर्षे होतील. आपल्या देशावर, आपल्या स्वातंत्र्यलढ्यावर किंवा स्वातंत्र्यसैनिकांच्या आयुष्यावर अनेक सिनेमे आले. ते आपल्यापैकी अनेकांनी पाहिले असतील किंवा यंदाच्या १५ ऑगस्टला वेगवेगळ्या चॅनेलवर पाहायलाही मिळतील. पण आपण मात्र या वेळी देशप्रेमावरच्याच, पण थोड्या वेगळ्या सिनेमाची ओळख करून घेणार आहोत. हा सिनेमा आहे आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘स्वदेस’!

स्वातंत्र्यानंतर काही वर्षांतच भारतातील उच्चशिक्षित तरुण अमेरिका किंवा युरोपात जाऊन स्थायिक होण्याचं प्रमाण वाढलं. या देशाच्या प्रगतीत योगदान देण्याऐवजी या प्रशिक्षित मनुष्यबळाचा फायदा परदेशांनाच जास्त होत होता. ‘स्वदेस’ चित्रपटाचा नायक मोहन भार्गव (शाहरुख खान) हा मात्र अपवाद ठरतो. मोहन अमेरिकेत ‘नासा’मध्ये काम करीत असतो. तो त्याच्या आजीला अमेरिकेला घेऊन जाण्यासाठी भारतात येतो. मात्र, आजीच्या गावाची परिस्थिती पाहून तो भारतातच राहण्याचा निर्णय घेतो आणि गावाच्या प्रगतीसाठी सर्वांना एक करतो, असं हे कथानक आहे. हा चित्रपट २००४ मध्ये आला. एकविसाव्या शतकातही भारतातील खेड्यांची स्थिती फारशी चांगली नाही आणि तिथे पिण्याचे पाणी, वीज, चांगले रस्ते, शाळा अशा अनेक मूलभूत स्वरूपाच्या सेवासुविधाही उपलब्ध नाहीत, याची विदारक जाणीव हा सिनेमा आपल्याला करून देतो. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरनं यात उत्तर प्रदेशातील चरणपूर नामक काल्पनिक खेड्याची व तेथे राहणाऱ्या साध्या-सुध्या लोकांची गोष्ट अतिशय प्रभावीपणे सांगितली आहे.
ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रख्यात कन्नड साहित्यिक शिवराम कारंथ यांनी लिहिलेल्या ‘चिगुरिदा कनासू’ या कन्नड चित्रपटावरून ‘स्वदेस’ बेतलेला आहे. अरविंद पिल्ललामरी आणि रावी कुचिमानची या एनआरआय दांपत्याच्या सत्य जीवनावर कारंथ यांनी हा चित्रपट लिहिला होता. हे दांपत्यही परदेशातील चांगली नोकरी सोडून भारतात परतले आहे आणि त्यांनी दुर्गम भागांतील शाळांमध्ये वीज पोचविण्यासाठी पायाभूत स्वरूपाचे काम केले आहे. हा चित्रपट तयार करण्यापूर्वी दिग्दर्शक गोवारीकर यांनी अरविंद व रावी या दांपत्यासोबत काही काळ घालविला. यासोबतच नर्मदा खोऱ्यातील बिळगाव या गावालाही गोवारीकर यांनी भेट दिली. या गावाने श्रमदानातून स्वयंपूर्ण ऊर्जानिर्मितीचा आदर्श घालून दिला आहे.
या चित्रपटात सुपरस्टार शाहरुख खानने मोहन भार्गव या तरुण, देशप्रेमी शास्त्रज्ञाची भूमिका अत्यंत तन्मयतेनं केली आहे. नायिकेची भूमिका गीता जोशी यांनी, तर मोहनच्या आजीची भूमिका किशोरी बल्लाळ यांनी केली आहे. या चित्रपटाला संगीत ए. आर. रेहमान यांनी दिले आहे, तर यातील गीते प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी लिहिली आहेत. यातलं ‘ये जो देस है मेरा, स्वदेस है मेरा, ये जो बंधन है जो कभी टूट नही सकता’ हे शीर्षकगीत स्वत: रेहमाननं गायलं असून, ते अतिशय गाजलं. याशिवाय ‘ये तारा वो तारा हर तारा’ आणि ‘यूँ ही चला चल राही’ ही गाणीही लोकप्रिय ठरली.
या चित्रपटाचं बरंचसं चित्रिकरण वाई (जि. सातारा) तालुक्यातील मेणवली या गावी झालं. पुण्यातल्या एका पुस्तकाच्या दुकानातही या चित्रपटाचा काही भाग चित्रित करण्यात आला आहे. तेव्हा यंदाच्या १५ ऑगस्टला ‘स्वदेस’ नक्की पाहा. आपला देश अधिक चांगला समजून घेण्यासाठी त्याची नक्कीच मदत होईल.

---

स्वदेस, हिंदी/भारत/रंगीत/२००४

दिग्दर्शक : आशुतोष गोवारीकर, संगीत : ए. आर. रेहमान

प्रमुख भूमिका : शाहरुख खान, गीता जोशी, किशोरी बल्लाळ

---

११. गांधी

------------

'महात्मा' माणूस...

-----------------------

मित्र हो, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी, म्हणजेच दीडशेव्या जयंती वर्षाला दोन ऑक्टोबर २०१८ रोजी सुरुवात होत आहे, हे तुम्ही जाणताच. महात्मा गांधींचं आयुष्य आणि त्यांचं व्यक्तिमत्त्व एवढं प्रेरक होतं, की विसाव्या शतकाच्या पूर्वार्धावर त्यांचा अमीट असा ठसा उमटला आहे. गांधीजी गेले, तेव्हा विख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन म्हणाले होते, 'असा एका महात्मा या भूतलावर होऊन गेला, यावर पुढच्या पिढ्यांचा कदाचित विश्वास बसणार नाही.' अशा या थोर व्यक्तिमत्त्वाचा जीवनपट दाखवणारे अनेक चित्रपट येऊन गेले. त्यातला सर रिचर्ड अटनबरो दिग्दर्शित 'गांधी' हा चित्रपट सर्वांत महत्त्वाचा मानला जातो. सर रिचर्ड ॲटनबरो हे ब्रिटिश अभिनेते व दिग्दर्शक. त्यांनी महात्मा गांधींवरील चित्रपटाचा भव्य प्रकल्प हाती घेतला आणि अनेक वर्षं त्यावर काम करून तो १९८२ मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट आपल्यापैकी अनेकांनी 'दूरदर्शन'वर पाहिला असेल. नसेल पाहिला तर तो अवश्य पाहा. 

या चित्रपटातून आपल्याला महात्मा गांधींचे जीवन तर उमगतेच; त्या जोडीला तत्कालीन भारत, तेव्हाचा समाज, इतर राजकीय नेते, स्वातंत्र्यलढा या सगळ्यांविषयी बरीच माहिती समजते. महात्मा गांधी सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेत काम करीत होते. तेथेही इंग्रजी राजवट होती. एकदा रेल्वेतून प्रथम वर्गातून प्रवास करीत असताना गांधींना तेथील गोऱ्या लोकांनी खाली उतरवले होते. हा वर्णद्वेष गांधीजींच्या मनावर खोल घाव करून गेला. त्यांनी दक्षिण आफ्रिकेत वर्णद्वेषाच्या विरोधात लढा उभारला. 'गांधी' चित्रपटाची सुरुवात या प्रसंगापासून होते. (अगदी सुरुवातीला त्यांच्या हत्येचा प्रसंग येतो. मात्र, कथानकाची सुरुवात आफ्रिकेतील प्रसंगाने होते.) नंतर आफ्रिकेतून त्यांचे भारतात झालेले आगमन, टिळकांनंतर गांधीजींकडं आलेली काँग्रेसची धुरा, जालियनवालाबाग हत्याकांड, असहकार आंदोलन, चले जाव चळवळ, स्वातंत्र्यप्राप्ती आणि त्यानंतर गांधीजींची झालेली भीषण हत्या... हे सर्व कथानक या सिनेमात तपशीलवार येतं. प्रख्यात ब्रिटिश अभिनेते बेन किंग्जले यांनी यात महात्मा गांधींची भूमिका साकारली आहे. मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना यात महात्मा गांधींच्या पत्नीची, म्हणजेच कस्तुरबा गांधींची भूमिका करण्याची संधी मिळाली. रोशन सेठ यांनी पंडित नेहरूंची भूमिका केली होती. सईद जाफरी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांची, तर अलेक पदमसी यांनी महंमद अली जीना यांची भूमिका साकारली आहे. डॉ. श्रीराम लागू यात महात्मा गांधींचे गुरू नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या छोट्याशा भूमिकेत दिसतात.
या सिनेमात अनेक भव्य समूहदृश्ये आहेत. जालियनवालाबाग हत्याकांडाचे दृश्य अंगावर काटा आणते. महात्मा गांधींच्या भूमिकेत बेन किंग्जले यांनी खरोखर कमाल केली आहे. महात्मा गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वाचा त्यांनी केलेला सखोल अभ्यास त्यांची ही भूमिका पाहताना जाणवत राहतो. मूळ कोल्हापूरच्या भानू अथय्या यांनी या चित्रपटाची वेषभूषा केली होती. त्यांना या चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळविणाऱ्या त्या पहिल्याच मराठी व्यक्ती ठरल्या. हा चित्रपटाला ऑस्कर पुरस्कारांमध्ये एकूण ११ गटांत नामांकन मिळालं होतं. त्यापैकी आठ पुरस्कार या चित्रपटाला मिळाले. सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट पटकथा आदींचा समावेश होता.
या चित्रपटाच्या निर्मितीची कथाही रंजक आहे. सुमारे १८ वर्षे हा प्रकल्प ॲटनबरो यांच्या डोक्यात होता. मात्र, या ना त्या कारणाने तो रखडला. अखेर १९८० मध्ये या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू झाले आणि ते १९८१ मध्ये संपले. या चित्रपटात गांधीजींच्या अंत्ययात्रेचे दृश्य चित्रित करण्यासाठी तीन लाख ‘एक्स्ट्रा’ कलाकार बोलावण्यात आले होते. एखाद्या चित्रपटात समूह दृश्यासाठी एवढे लोक वापरण्याचा हा विक्रम आहे. हा चित्रपट भारतात हिंदी भाषेत डब करून प्रदर्शित करण्यात आला होता.
तेव्हा असा हा महत्त्वाचा चित्रपट तुम्ही आत्तापर्यंत पाहिला नसेल तर नक्की पाहा.

---

गांधी, ब्रिटन/भारत, १९८२, इंग्रजी, रंगीत, १९१ मिनिटे

दिग्दर्शक : सर रिचर्ड ॲटनबरो, निर्माते : सर रिचर्ड ॲटनबरो

पटकथा : जॉन ब्रिली, संगीत : पं. रविशंकर, जॉर्ज फेंटन

प्रमुख भूमिका : बेन किंग्जले, रोहिणी हट्टंगडी, रोशन सेठ, पीटर हर्लो, एडवर्ड फॉक्स, सईद जाफरी

---


१२. इक्बाल

-------------

आशाएँ खिली दिल में...

---------------------------

मुलांनो, तुम्हाला क्रिकेट आवडतं ना? आपल्या भारतात हा एक अत्यंत लोकप्रिय खेळ आहे. सचिन तेंडुलकर तर अनेकांचा आवडता क्रीडापटू आहे. आपल्याकडं पूर्वीपासून क्रिकेट लोकप्रिय खेळ होताच; पण सचिनच्या आगमनानंतर तो अगदी खेड्यापाड्यांपर्यंत, कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यापर्यंत पोचला. अगदी स्वयंपाकघरापर्यंत पोचला! आपल्या देशातील हजारो छोट्या गावांमधून वाढणाऱ्या अनेक लहान मुलांना 'सचिन' होण्याची स्वप्नं पडू लागली. अनेक पालक आपल्या मुलांना क्रिकेट शिकण्यासाठी कोचिंगला नेऊ लागले. अर्थात, सचिन तेंडुलकर होणं एवढं सोपं नाहीच; पण नुसता क्रिकेटपटू होणंही वाटतं तेवढं सोपं नाही. त्यासाठी कठोर मेहनत, बुद्धिमत्ता, प्रतिभा आणि जोडीला चांगलं नशीब लागतं. एवढं सगळं तुमच्याजवळ असेल तर तुम्हाला कधी तरी देशासाठी खेळण्याची संधी मिळेल. मग तिथं आपली चमक दाखवून मोठा क्रिकेटपटू होणं ही नंतरची गोष्ट! आज आपण ज्या सिनेमाची माहिती घेणार आहोत तो 'इक्बाल' हा सिनेमाही अशाच एका क्रिकेटवेड्या मुलाची कथा सांगतो. आणि विशेष म्हणजे 'इक्बाल' हा मुलगा मूकबधीर आहे. त्याला ऐकू येत नाही आणि म्हणून बोलताही येत नाही. पण तरी हा मुलगा जिद्दीने यावर मात करून भारतीय संघात स्थान कसं मिळवतो याची ही प्रेरणादायी गोष्ट आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक नागेश कुकनूर यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. श्रेयस तळपदे यानं यात शीर्षक भूमिका केली आहे. इक्बालला लहानपणापासूनच क्रिकेटचं वेड असतं. मात्र, त्यानं क्रिकेटचा नाद सोडून आपल्याला शेतीत मदत करावी, असं त्याच्या वडिलांना वाटत असतं. इक्बालची बहीण खदिजा (श्वेता प्रसाद) ही मात्र त्याला मदत करत असते. ती त्याला भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार असलेल्या आणि आता कोच असलेल्या गुरुजींकडं (गिरीश कार्नाड) घेऊन जाते. ते इक्बालची वेगवान गोलंदाजीतील गुणवत्ता बघून त्याला अकॅडमीत घेतातही. मात्र, कमल नावाच्या दुसऱ्या एका मुलाच्या वडिलांच्या भीतीवरून ते त्याला अकॅडमीतून हाकलून देतात. त्यानंतर इक्बालला भेटतात मोहित (नसीरुद्दीन शाह) हे एक वल्ली खेळाडू. मोहित एक महान क्रिकेटपटू असतात. मात्र, आत्ता त्यांना दारूच्या व्ससनानं घेरून टाकलेलं असतं. त्यांच्या विक्षिप्त स्वभावाला तोंड देत, इक्बाल त्यांच्याकडून वेगवान गोलंदाजीचे धडे गिरवतो. अखेर त्याला आंध्र प्रदेश संघाकडून रणजी स्पर्धेत खेळायला मिळतं. तिथं तो चांगली कामगिरी करतो. आता राष्ट्रीय निवड समितीच्या सदस्यांसमोर त्याला चांगली कामगिरी करायची असते. तेव्हा गुरुजी त्याला वाईट खेळून, कमलला संधी मिळण्यासाठी लाच देण्याचा प्रयत्न करतात. इक्बालच्या वडिलांची शेती गहाण पडलेली असते. त्यामुळे त्याला पैशांची गरज असते. म्हणून तो नाइलाजास्तव गुरुजींचा प्रस्ताव स्वीकारतो. मात्र, त्याच वेळी त्याला अचानक एक स्पोर्ट एजंट त्याला चांगल्या पैशांची ऑफर देऊ करतो. त्यानंतर इक्बाल गुरुजींचं न ऐकता, आपली गुणवत्ता दाखवतो आणि आपल्या संघाला सामना जिंकून देतो. तिथं आलेले निवड समिती सदस्य कपिल देव (पाहुणे कलाकार) त्याच्या कामगिरीमुळे खूश होतात. चित्रपटाच्या अखेरीस इक्बाल भारताच्या राष्ट्रीय संघाची निळी जर्सी घालून आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळण्यासाठी सज्ज होतानाचं दृश्य येतं.
एकदा एखाद्या गोष्टीचं वेड घेतलं, तर कितीही अडचणी आल्या तरी आपण त्यावर मात करू शकतो, हे या सिनेमात फार प्रभावीपणे दाखवण्यात आलं आहे. भारतातल्या मुलांचं क्रिकेटचं वेड लक्षात घेता, या सिनेमातला संघर्ष अनेकांना आपला स्वतःचा वाटू शकतो. दिग्दर्शक नागेश कुकनूरने ग्रामीण भागातल्या आणि सुविधांचा अभाव असलेल्या, गरीब मुलांच्या स्वप्नांची कथा यातून सुंदर पद्धतीनं दाखविली आहे. श्रेयस तळपदेनं यातली 'इक्बाल'ची भूमिका अत्यंत कष्टानं साकारली आहे. त्यासाठी त्यानं मूकबधीर मुलांचा अभ्यास तर केलाच; शिवाय वेगवान गोलंदाजी कशी करतात हेही तो शिकला. गिरीश कार्नाड, नसीरुद्दीन शाह, प्रतीक्षा लोणकर, यतीन कार्येकर, श्वेता प्रसाद आदींनी आपापल्या भूमिका उत्तम रीतीनं केल्या आहेत. सन २००५ मध्ये आलेल्या या चित्रपटाला 'इतर सामाजिक विषयांवरील' सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला होता. यातलं 'आशाएँ खिली दिल में' हे केकेनं गायलेलं गाणं खूप गाजलं होतं.
पुढील वर्षी क्रिकेटचा वनडे वर्ल्ड कप आहे. आताही क्रिकेटचा सीझन सुरू झालाच आहे. तुम्ही हा सिनेमा अद्याप पाहिला नसेल तर दिवाळीच्या सुट्टीत जरूर पाहा.

----

इक्बाल (भारत/हिंदी/२००५/रंगीत/१३२ मिनिटे)

निर्माते : सुभाष घई, दिग्दर्शक : नागेश कुकनूर

कथा-पटकथा : नागेश कुकनूर, सिनेमॅटोग्राफी : सुदीप चॅटर्जी, संकलन - संजीब दत्ता,

संगीत : हिमेश रेशमिया, सुखविंदरसिंग, सलीम-सुलेमान

प्रमुख भूमिका : श्रेयस तळपदे, नसीरुद्दीन शाह, गिरीश कार्नाड, श्वेता प्रसाद, प्रतीक्षा लोणकर

---

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

---

5 Dec 2020

बिंगोस्कोप - भाग ७ ते ९

 बिंगोस्कोप

-------------

स्वाती यादवाडकर या मैत्रिणीनं दोनेक वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘बिंगोकिड्स’ या लहान मुलांच्या पाक्षिकात मी ‘बिंगोस्कोप’ या सदरात जगभरातील काही उत्तम चित्रपटांची ओळख मुलांना करून दिली. ही रूढार्थाने परीक्षणं नाहीत. साधारण दहा ते १४ वर्षे वयोगटातल्या मुलांसाठी, त्यांना समजेल अशा साध्या-सोप्या भाषेत सिनेमांचा परिचय करून देण्याचा हा प्रयत्न आहे. एकूण २१ सिनेमांवर मी या सदरात लिहिलं आहे. हे लिखाण इथं एकत्रित राहील म्हणून तीन-तीन परिचय एकत्र करून एक ब्लॉग अशा रीतीनं प्रसिद्ध करीत आहे. हा तिसरा भाग...

----


७. दहावी फ

-------------

‘फ’ची पोरं हुश्शार...

-------------------------

बालमित्रहो, या सुट्टीत तुम्ही आवर्जून पाहिलाच पाहिजे असा एक मराठी चित्रपट म्हणजे ‘दहावी फ’. सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या प्रसिद्ध दिग्दर्शकद्वयीनं दिग्दर्शित केलेला हा चित्रपट २००२ मध्ये प्रदर्शित झाला होता. तेव्हाही या चित्रपटाने सर्वांची वाहवा मिळविली होती. चित्रपटाचं नाव आहे ‘दहावी फ’, त्यामुळं या नावावरूनच हा सिनेमा कशाविषयी आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेलच. बरोबर... इयत्ता दहावीच्या ‘फ’ तुकडीत शिकणाऱ्या मुलांची ही गोष्ट आहे. पुण्यातील एका शाळेत प्रत्यक्ष घडलेल्या एका घटनेवरून सुमित्रा भावे यांना हा चित्रपट सुचला. 

या सिनेमाची गोष्ट अगदी प्रेरणादायी आहे. आपल्याकडं शाळांमधल्या तुकड्या कशा ठरतात, हे तुम्हाला माहिती आहे. ‘अ’ तुकडी ही हुशार मुलांची, ‘ब’ ही त्याहून कमी हुशार... असं करत करत ‘फ’ तुकडी म्हणजे अगदी ढ मुलांची असंच समीकरण रूढ आहे. पुण्यातल्या एका शाळेत अशाच तुकड्या असतात. या तुकडीतील मुलं गरीब घरांतील, कष्ट करून शिकणारी अशीच असतात. सहामाही परीक्षेत त्यातली तीनच मुलं सर्व विषयांत पास होतात. त्यात अ तुकडीतील एक मुलगा फ तुकडीतील मुलाला चिडवतो. त्यावरून त्यांची मारामारी होते. या मारामारीत दोष ‘फ’च्या मुलांचाच असणार, या समजुतीने मुख्याध्यापक त्यांना दंड ठोठावतात. या अन्यायामुळं ही मुलं आणखीनच चिडतात आणि शाळेचं नुकसान करायचं ठरवतात. रात्री ही मुलं एकत्र येऊन शाळेची तोडफोड करतात. या प्रकारानंतर तर शाळेचे मुख्याध्यापक या प्रकाराची पोलिसांत तक्रार करायची, असा निर्णय घेतात आणि या मुलांना शाळेतून निलंबितही करतात.
या मुलांचे लाडके गणिताचे देशमुख सर मात्र या प्रकारामुळं अत्यंत अस्वस्थ होतात. ते या मुलांना विश्वासात घेतात. ही मुलं मुळात वाईट नाहीत; परिस्थितीमुळं ती तशी वागत आहेत याबद्दल त्यांना खात्री असते. ते या मुलांशी बोलून एक निर्णय घेतात. शाळेचं झालेलं नुकसान भरून देण्याचा निर्णय! हा निर्णय सोपा नसतो. त्यासाठी २५ हजार रुपये उभे करायचे असतात. मुलांची आर्थिक परिस्थिती मुळीच तशी नसते. मात्र, ही मुलं काम करून, कष्ट करून हे पैसे कमावण्याचा निर्णय घेतात. त्यानंतर पुढं काय होतं, मुलांना त्यात यश येतं का आदी गोष्टी प्रत्यक्ष सिनेमातच पाहायला हव्यात.
कुणीही विद्यार्थी मुळात वाईट किंवा ढ नसतो. त्याच्या आजूबाजूची परिस्थिती त्याला तसं घडविण्यास कारणीभूत असते. आपण चांगलं वागायचं ठरवलं, तर सगळे आपल्याला मदत करतात आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आपला आत्मविश्वास परत मिळतो, असा चांगला संदेश हा सिनेमा देतो. सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर हे दिग्दर्शक पुण्यातलेच असल्यामुळं त्यांनी पुण्यातल्याच रावसाहेब पटवर्धन विद्यालयात या चित्रपटाचं सर्व चित्रिकरण केलं. या चित्रपटात अनेक हळवे, संवेदनशील प्रसंग आहेत. देशमुख सर मुलांना आपल्या कॉलेजमधली आठवण सांगतात, तो प्रसंग किंवा सिद्धार्थची आई देशमुख सरांसह बोलते तो प्रसंग असे किती तरी प्रसंग आपल्यावर ठसतात.
अतुल कुलकर्णी यांनी यातील गणेश देशमुख सरांची भूमिका केली आहे. याबरोबरच ज्योती सुभाष, मिलिंद गुणाजी, राजेश मोरे आदी कलाकारांनीही यात उत्कृष्ट भूमिका केल्या आहेत. वृषसेन दाभोळकर, सिद्धार्थ दफ्तरदार, निमिष काठाळे आदी मुलांनी प्रथमच या चित्रपटात काम केलं होतं. श्रीरंग उमराणी यांचं संगीत होतं.
शालेय जीवनावर आधारित असा हा चित्रपट रसिकांनीही चांगलाच उचलून धरला. या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपटाचा राज्य पुरस्कारही प्राप्त झाला आहे. तेव्हा तुम्हीही तो नक्की पाहा.

---

दहावी फ, भारत, २००२

दिग्दर्शक : सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर

प्रमुख भूमिका : अतुल कुलकर्णी, ज्योती सुभाष, मिलिंद गुणाजी, राजेश मोरे, वृषसेन दाभोळकर, निमिष काठाळे

----

८. हॅलो

---------

हरवण्याची व गवसण्याची गोष्ट

-------------------------------------

बालमित्रांनो, तुमची अतिशय आवडती, लाडकी अशी एखादी तरी वस्तू असेलच ना... तुमची बाहुली म्हणा, किंवा खेळणं म्हणा, क्रिकेट बॅट म्हणा किंवा रॅकेट म्हणा... समजा, तुमची ही लाडकी वस्तू हरवली तर? तुम्ही खूप अस्वस्थ व्हाल... रडाल, ओरडाल, हात-पाय आपटाल... आपण आत्ता ज्या चित्रपटाची माहिती घेणार आहोत, त्या ‘हॅलो’ नावाच्या हिंदी चित्रपटाची नायिका पण अगदी असंच करते आहे. ही नायिका आहे साशा नावाची एक सात वर्षांची छोटी मुलगी. तिचा ‘हॅलो’ नावाचा अत्यंत गोड, लाडका कुत्रा हरवलाय आणि आता ती त्याचा शोध घ्यायला निघालीय... या शोधाचीच गोष्ट म्हणजे ‘हॅलो’ हा सिनेमा. 

प्रसिद्ध कॅमेरामन संतोष सिवन यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा १९९६ मध्ये प्रदर्शित झाला होता. तुम्ही हा सिनेमा पाहिला नसेल तर नक्की पाहा. संपूर्ण सिनेमा अत्यंत गमतीशीर पद्धतीनं चित्रित केला आहे. दिग्दर्शक स्वत: कॅमेरामन असल्यानं त्यानं या छायाचित्रणाच्या खूप गमती-जमती केल्या आहेत. संपूर्ण सिनेमा हा साशाच्या नजरेतून घडताना दिसतो. त्यामुळं त्या छोट्या मुलीच्या उंचीएवढा किंवा तिच्या ‘आय-लेव्हल’लाच अनेक वेळा कॅमेरा लावलेला दिसतो. लहान मुलांना अनेकदा खाली वाकून पायांमधून उलटं पाहण्याची किंवा मान तिरकी करून पाहण्याची सवय असते. तर असेच अनेक गमतीशीर अँगल या चित्रपटात सिवन यांनी वापरलेले आहेत.
साशाला आई नसते. तिच्या वडिलांचं तिच्यावर खूप प्रेम असतं, पण तरीही तिला आईविना खूप एकटं वाटत असतं. सुट्टीत इतर मुलं खेळत असतात, तेव्हा बिचारी साशा एकटीच घरात बसलेली असते. मग तिच्या घरातले नोकर तुला देवाकडून भेट (वलय - ज्याला इंग्रजीत Halo म्हणतात) मिळणार आहे, असं सांगतात. त्यानंतर साशाला रस्त्यावरील एक गोड, छोटा कुत्रा दिसतो. हाच आपल्याला भेटणार असलेला देवदूत आहे, अशा समजुतीतून साशा त्या कुत्र्याला जवळ घेते. ती त्याचं नावही ‘हॅलो’ असंच ठेवते. हा ‘हॅलो’ तिचा जीव की प्राण होतो. तिचे वडीलही काही म्हणत नाहीत. साशा आणि तिचा ‘हॅलो’ छान राहू लागतात. मात्र, एके दिवशी तो गायब होतो. साशाला अत्यंत दु:ख होतं. तिला काय करावं तेच समजत नाही. मग या कुत्र्याच्या शोधासाठी ती घराबाहेर पडते. त्यानंतर मुंबईतील वेगवेगळ्या चित्र-विचित्र लोकांसोबत तिची भेट होते. त्यात एका वृत्तपत्राचे संपादक असतात, मुंबईचे पोलिस कमिशनर असतात, गुंड-पुंड असतात आणि रस्त्यावरची वांड मुलंही असतात. या सगळ्यांना भेटून साशा आपली अडचण सांगते. कुत्र्याला शोधण्यासाठी मदत करायची विनंती करते. पण तिला वेगवेगळे अनुभव येतात. शेवटी काय होतं, तिला ‘हॅलो’ सापडतो का हे सगळं प्रत्यक्ष पडद्यावरच पाहण्यात गंमत आहे. तो शेवट पाहताना आपले डोळे पाणावल्याशिवाय राहत नाहीत, एवढं मात्र नक्की!
साशाची भूमिका बेनाफ दादाचंदजी नावाच्या अतिशय गोड, निरागस मुलीनं केली आहे. बेनाफच्या अभिनयामुळं आपण या सिनेमात गुंतत जातो. मुलांनो, तुम्हाला प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी माहिती असतील ना? तर या संतोषींनी या सिनेमात साशाच्या बाबांची भूमिका केली आहे. आहे ना गंमत? याशिवाय मुकेश ऋषी, टिनू आनंद, विजू खोटे आदी अनेक नामवंत कलाकारांनीही यात वेगवेगळ्या, विचित्र, पण गमतीशीर वेषभूषा असलेल्या भूमिका केल्या आहेत. तेव्हा हा चित्रपट तुम्ही नक्की पाहा आणि आपल्या मित्रांनाही पाहायला सांगा... पाहिल्यावर आम्हालाही कळवा तुम्हाला तो कसा वाटला ते!

---

हॅलो, भारत, १९९६

दिग्दर्शक : संतोष सिवन

प्रमुख भूमिका : बेनाफ दादाचंदजी, राजकुमार संतोषी, टिनू आनंद, विजू खोटे, मुकेश ऋषी

---

९. पेले : बर्थ ऑफ ए लीजंड

----------------------------------

महान फुटबॉलपटू घडताना...

-----------------------------------

बालमित्रांनो, शाळा सुरू झाल्या आणि त्याबरोबरच वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धाही सुरू झाली. सध्या ही स्पर्धा रशियात सुरू आहे. अजून अभ्यासाची फारशी घाई नाही, त्यामुळं फुटबॉल स्पर्धा एंजॉय करायला हरकत नाही. होय ना! फुटबॉल हा जगभरातला सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे, हे तुम्हाला  माहिती आहेच. आपल्या भारतातही फुटबॉलचे चाहते खूप वाढले आहेत. रात्र रात्र जागून सामने पाहणारे कित्येक फुटबॉलप्रेमी तुम्हाला आपल्या आजूबाजूला दिसतील. तुम्हीही फुटबॉलप्रेमी आहात का? असाल तर तुम्हाला पेले हे नाव नक्कीच ठाऊक असेल. ब्राझीलच्या या महान खेळाडूवर दोन वर्षांपूर्वी 'पेले : बर्थ ऑफ ए लीजंड' हा इंग्रजी चित्रपट आला होता. एखाद्या खेळाडूची जडणघडण कशी होते, त्याच्यासमोर कोणत्या अडचणी असतात, त्यावर  तो कसा मात करतो, महान खेळाडू होण्याकडे एखाद्याची वाटचाल कशी सुरू होते, हे जाणून घ्यायचं असेल, तर हा चित्रपट नक्की पाहा.

ब्राझीलमधील एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या एडसन अरांतेस दो नशिमेंतो असं नाव असलेल्या या मुलाचं रूपांतर 'पेले' नामक दंतकथेत कसं झालं, याची कहाणी हा चित्रपट सांगतो. पेलेचे वडील डॉनडिन्हो फुटबॉलपटू होते. त्यांनी पेलेचं नाव प्रख्यात अमेरिकी संशोधक थॉमस अल्वा एडिसन याच्यावरून एडिसन असं ठेवलं होतं. मात्र, नंतर ते त्याला 'एडसन' असंच म्हणू लागले. पुढं मात्र एडसनला सगळं जग 'पेले' म्हणूनच ओळखू लागलं. 'पेले' या नावाला पोर्तुगीज भाषेत तसा काहीही अर्थ नाही. लहानपणी पेलेच्या एका आवडत्या फुटबॉलपटूचं नाव बिले असं होतं. मात्र, ते नाव तो 'पेले' असं उच्चारायचा. त्यावरून एडसनलाच सगळे जण पेले असं म्हणू लागले.
जेफ झिंबालिस्ट या अमेरिकी दिग्दर्शकानं 'पेले' हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. सिनेमाच्या नावाप्रमाणे यात पेलेच्या जीवनाचा अगदी सुरुवातीचा, संघर्षाचा काळ दाखविला आहे. वयाच्या दहाव्या वर्षापासून ते सतराव्या वर्षापर्यंतचा पेलेचा प्रवास हा चित्रपट घडवतो. त्यासाठी दिग्दर्शकाने दोन कलाकारांची निवड केली आहे. दहा वर्षांच्या पेलेची भूमिका लिओनार्दो लिमा कार्व्होलो या मुलानं केली आहे, तर केविन डी पाऊला या कलाकारानं मोठ्या पेलेची, म्हणजे मुख्य भूमिका केली आहे.
पेले दहा वर्षांचा असताना, म्हणजे १९५० च्या फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत उरुग्वेनं ब्राझीलला अंतिम सामन्यात हरवून विश्वकरंडक पटकावला होता. अवघा ब्राझील देश व अर्थात पेलेही दु:खात बुडाला होता. या पराभवामुळेच पेलेच्या मनात कुठं तरी विश्वकरंडक देशासाठी मिळवायचाच, अशी ठिणगी पडली होती. दिग्दर्शकाच्या मते, एका अर्थानं ब्राझीलच्या राष्ट्रीयत्वाच्या दृढ भावनेचा आणि पेलेचा उदय एकाच वेळी होत होता. पेले आणि त्याचे वडील यांचं नातं या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. सेऊ जॉर्ज या अभिनेत्याने पेलेच्या वडिलांची भूमिका साकारली होती.
आपल्यासाठी या चित्रपटाचं भारतीय कनेक्शन म्हणजे या चित्रपटाला संगीत दिलं होतं ए.आर. रेहमान यांनी. या चित्रपटाचं संपूर्ण चित्रिकरण रिओ डी जानिरोसह ब्राझीलमधील विविध ठिकाणी झालं. दिग्दर्शकानं २०१३ मध्ये चित्रिकरण सुरू केलं, तेव्हा २०१४ च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या वेळी तो प्रदर्शित होईल, असा अंदाज होता. मात्र, चित्रपटाचं काम रखडल्यानं तो मे २०१६ मध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटात काही त्रुटी नक्कीच आहेत. समीक्षक व प्रेक्षकांनीही या चित्रपटाचं संमिश्र स्वागत केलं. मात्र, एका महान फुटबॉलपटूचं लहानपण आणि तेथून त्याचा 'लीजंड' म्हणजे एक जिवंत दंतकथा होण्याकडं झालेला प्रवास अनुभवण्यासाठी एकदा हा सिनेमा पाहायला हवा.

---

पेले : बर्थ ऑफ ए लीजंड, अमेरिका, २०१६

दिग्दर्शक : जेफ झिंबालिस्ट

प्रमुख भूमिका : केविन डी पाऊला, लिओनार्दो लिमा कार्व्होलो, सेऊ जॉर्ज, मरियाना नन्स

---

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

---

1 Dec 2020

बिंगोस्कोप - भाग ४ ते ६

बिंगोस्कोप
-------------


स्वाती यादवाडकर या मैत्रिणीनं दोनेक वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘बिंगोकिड्स’ या लहान मुलांच्या पाक्षिकात मी ‘बिंगोस्कोप’ या सदरात जगभरातील काही उत्तम चित्रपटांची ओळख मुलांना करून दिली. ही रूढार्थाने परीक्षणं नाहीत. साधारण दहा ते १४ वर्षे वयोगटातल्या मुलांसाठी, त्यांना समजेल अशा साध्या-सोप्या भाषेत सिनेमांचा परिचय करून देण्याचा हा प्रयत्न आहे. एकूण २१ सिनेमांवर मी या सदरात लिहिलं आहे. हे लिखाण इथं एकत्रित राहील म्हणून तीन-तीन परिचय एकत्र करून एक ब्लॉग अशा रीतीनं प्रसिद्ध करीत आहे. हा दुसरा भाग...

----

४. द किड

-------------

खूप काही बोलणारी मूक कहाणी

----------------------------------------

मुलांनो, चार्ली चॅप्लिनचे सिनेमे पाहायला तुम्हाला खूप आवडतात ना! तसं असेल तर तुम्ही त्यांचा 'द किड' हा सिनेमा नक्कीच पाहिला असेल. नसेल तर आवर्जून पाहाच. विनोद आणि करुणा यांचा अनोखा संगम असलेले चित्रपट तयार करण्यासाठी चार्ली चॅप्लिन प्रसिद्ध होते. त्यांनी तयार केलेला 'द किड' हा पहिलाच पूर्ण लांबीचा चित्रपट. तो प्रदर्शित झाला फेब्रुवारी १९२१ मध्ये. त्या काळात सिनेमा अद्याप 'बोलू' लागला नव्हता. त्यामुळे सगळे चित्रपट हे मूकपटच असत. 

आपण ज्या 'द किड' सिनेमाविषयी बोलतोय, त्यात एका अनाथ मुलाची कथा दाखविण्यात आली आहे. आपल्या चित्रपटाचा नायक म्हणजे एक गरीब, फाटका, भणंग माणूस आहे. नायकाचं हे काम स्वतः चॅप्लिन यांनीच केलं आहे, हे सांगायला नकोच. तर या नायकाला अगदी नुकतेच जन्मलेले हे छोटे बाळ दिसते. त्याची आई त्याला सोडून गेलेली असते. अशा छोट्या बाळाचं काय करायचं असा प्रश्न चार्लीला पडतो. सुरुवातीला तो दुसऱ्या एका बाईच्या ताब्यात हे मूल देण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला ते जमत नाही. पोलिस संशयानं पाहू लागल्यावर तो अखेर या बाळाला घेऊन घरी जातो. लहान मुलाला कसं सांभाळतात हे त्याला मुळीच माहिती नसतं. त्यामुळं त्याची चांगलीच तारांबळ उडते. पण तो मोठ्या प्रेमानं या मुलाला सांभाळतो.
चित्रपटात यानंतरचा कथाभाग तो छोटा मुलगा पाच वर्षांचा झाल्यावर सुरू होतो. चार्लीनं या मुलाचं नाव जॉन असं ठेवलेलं असतं. अत्यंत गरिबीमुळं दोघंही कशीबशी रोजची रोजीरोटी मिळवत असतात. जॉन दगड मारून घरांच्या काचा फोडत असतो आणि नंतर चार्ली साळसूदपणे तिथं जाऊन ती काच दुरुस्त करीत असतो. दरम्यानच्या काळात जॉनची आई एक श्रीमंत गायिका झालेली असते. ती आणि जॉन एकदा एकमेकांसमोरून जातातही; पण अर्थातच एकमेकांना ओळखत नाहीत. काही काळानंतर जॉन आजारी पडतो, तेव्हा चार्लीला डॉक्टरला बोलवावं लागतं. तो डॉक्टर हा मुलगा चार्लीचा नाही, हे ओळखून पोलिसांना कळवतो. त्यानंतर अनाथाश्रमाचे दोन लोक जॉनला घेऊन जायला येतात. पण चार्ली मोठ्या हिकमतीने पाठलाग करून जॉनला परत मिळवतो. त्यानंतर मात्र अशा काही घटना घडतात, की चार्ली आणि जॉनची ताटातूट अटळ ठरते. शेवटी काय होतं, हे पडद्यावरच पाहणं इष्ट...
चार्लीचा हा पहिलाच सिनेमा असला, तरी पुढं त्याची ओळख बनलेल्या 'आसू आणि हसू' यांच्या मिश्रणाचा हा पहिलाच सिनेमा ठरला. कमालीच्या विपरीत परिस्थितीतही चेहऱ्यावरचं हास्य कायम ठेवून आल्या स्थितीला तोंड देणारा त्याचा सर्वसामान्य, भेदरट, बावळट; पण प्रामाणिक सामान्य माणूस प्रेक्षकांना अत्यंत भावला. या चित्रपटाने १९२१ मध्ये अमेरिकेत दुसऱ्या क्रमांकाची कमाई केली. चार्ली आणि जॉनचं काम करणारा जॅकी कूगन हा छोटा मुलगा यांना जागतिक प्रसिद्धी मिळाली. हा सिनेमा तयार करण्यापूर्वी चार्लीच्या स्वतःच्या आयुष्यात काही दुःखद घटना घडल्या होत्या. त्याचा प्रभाव या सिनेमावर आहे. याशिवाय चार्लीच्या बालपणीच्या काही वाईट आठवणीही या सिनेमात नकळत गुंफल्या गेल्या आहेत. चार्ली चॅप्लिन यांनी यातल्या ट्रॅम्पचं म्हणजेच भणंग, भटक्या माणसाचं व्यक्तिचित्र खूप अप्रतिम रंगवलं आहे. या सिनेमात शेवटी एक स्वप्नदृश्य आहे. त्यात माणसांना पंख असतात. हे सुंदर दृश्य चॅप्लिन यांनी ज्या पद्धतीनं चित्रित केलंय, ते मुळातूनच पाहण्यासारखं आहे. हा चित्रपट करताना त्यांनी स्वतःचं समाधान होईपर्यंत अनेकदा पुनःपुन्हा चित्रिकरण केलं. त्याचा चांगला परिणाम चित्रपट पाहताना जाणवतो.
या चित्रपटाला अनेक मान-सन्मान मिळाले. जागतिक चित्रपटांच्या इतिहासात हा एक महत्त्वाचा चित्रपट मानला जातो. तो पाहायला हवाच. 

---

५. मदर इंडिया

------------------

कणखर आणि धीरोदात्त...

-------------------------------

बालमित्रांनो, मार्च महिन्याच्या आठ तारखेला दर वर्षी जागतिक महिला दिन साजरा केला जातो, हे तुम्हाला माहिती असेलच. स्त्रीशक्तीला वंदन करण्याचा, तिचा आदर करण्याचा, तिच्याविषयी जाणून घेण्याचा हा खास दिवस. या दिवसानिमित्त स्त्रीशक्तीची गाथा म्हणून आपल्याकडे गाजलेल्या, क्लासिक अशा 'मदर इंडिया' या हिंदी चित्रपटाची ओळख करून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल, असं वाटतं.

'मदर इंडिया' हा चित्रपट मेहबूब खान यांनी दिग्दर्शित केला आहे. तो २५ ऑक्टोबर १९५७ रोजी भारतात सर्वत्र प्रदर्शित झाला. यात नर्गिस, सुनील दत्त, राजेंद्रकुमार, कन्हैयालाल आणि राजकुमार या कलाकारांच्या प्रमुख भूमिका होत्या. मेहबूब खान हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक बडे दिग्दर्शक मानले जातात. त्यांनी १९४० मध्ये 'औरत' नावाचा हिंदी चित्रपट तयार केला होता. 'मदर इंडिया' हा याच चित्रपटाचा रिमेक होता. 'मदर इंडिया' हा चित्रपट म्हणजे भारतीय स्त्रीच्या कणखरपणाचे, धीरोदात्तपणाचे आणि संघर्षाचे एक उदाहरण आहे. राधा (नर्गिस) या शेतकरी महिलेची ही कहाणी आहे. भारतात त्या काळात जवळपास ८० टक्के लोकांची उपजीविका शेतीवर चालत होती. मात्र, दुष्काळ आणि सावकारी या दोन संकटांना तोंड देताना शेतकरी हतबल होत असे. या परिस्थितीत आजही फारसा फरक पडलेला नाही. राधाच्या कुटुंबावर असंच एका सावकाराचं कर्ज असतं. त्यात अपघातात अपंग झालेला तिचा पती एक दिवस घर सोडून परागंदा होतो. मात्र, राधा हिंमत न हरता, स्वतःच्या मुलांना लहानाचे मोठे करते, शेती सांभाळते, दुष्काळाला तोंड देते आणि सावकाराच्या दुष्टपणाशीही दोन हात करते. मुलं मोठी होतात. राधा पारंपरिक भारतीय नीतिमूल्यांचा आदर करणारी स्त्री असते. पुढे असे काही प्रसंग घडतात, की तिला तिच्या स्वतःच्या मुलाबरोबरही संघर्ष करावा लागतो. मात्र, नीतिमूल्यांसाठी ती स्वतःच्या मुलालाही गोळी घालायला मागे पाहत नाही.
त्या काळात 'मदर इंडिया'ला प्रचंड लोकप्रियता मिळाली. हा चित्रपट भारतातर्फे ऑस्कर पुरस्कारांसाठी पाठविलेला गेलेला पहिला चित्रपट होय. त्याला सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपट श्रेणीत नामांकनही मिळालं. मात्र, पुरस्कार अवघ्या एका मताने हुकला. असं असलं, तरी आजतागायत या सिनेमाची लोकप्रियता कमी झालेली नाही. नर्गिस या अभिनेत्रीच्या कारकिर्दीतील ही सर्वोत्तम भूमिका मानता येईल. तिच्यावर तर अनेक पुरस्कारांचा वर्षाव झाला. याच चित्रपटाच्या सेटवर आग लागली असताना, सुनील दत्त यांनी नर्गिसचे प्राण वाचविले. त्यानंतर नर्गिस सुनील दत्त यांच्या प्रेमात पडली व नंतर त्या दोघांचा विवाह झाला.
हा चित्रपट १७२ मिनिटांचा आहे, म्हणजे जवळपास तीन तासांचा. यात राधाचा संपूर्ण जीवनप्रवास चित्रित करण्यात आला आहे. त्या काळात सर्वच चित्रपटांमध्ये संगीत महत्त्वाचे असे. 'मदर इंडिया'ला प्रख्यात संगीतकार नौशाद यांनी संगीत दिलं आहे. चित्रपटात एकूण १२ गाणी असून, सगळीच प्रचंड लोकप्रिय झाली. 'गाडीवाले', 'दुनिया में हम आए है तो जीना ही पडेगा', 'नगरी नगरी द्वारे द्वारे', 'दुखभरे दिन बीते रे भय्या' आदी गाणी अगदी आजही लोकप्रिय आहेत. लता मंगेशकर, महंमद रफी, मन्ना डे, शमशाद बेगम आदी दिग्गज गायकांनी ही गाणी गायिली आहेत.
प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाने लोकप्रियतेेचे अनेक उच्चांक मोडले. तेव्हाचा हा एक खर्चीक सिनेमा मानला जात होता. मात्र, आजही तो सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत स्थान टिकवून आहे. भारतीय सिनेमा समजून घ्यायचा असेल, तर 'मदर इंडिया' पाहण्याशिवाय पर्याय नाही. हा सिनेमा पाहताना भारतीय समाजमनाचे, इथल्या स्त्रीचे, तिच्या संघर्षाचे स्तिमित करणारे दर्शन दिग्दर्शक आपल्याला घडवतो आणि आपण केवळ थक्क होऊन जातो. हा अनुभव घेण्यासाठी आणि स्त्रीच्या शक्तीला सलाम करण्यासाठी 'मदर इंडिया' नक्की पाहा.

---

६. चिल्ड्रन ऑफ हेवन
---------------------------

निरागस बालपणाची हळवी गोष्ट
--------------------------------------

बालमित्रांनो, लवकरच तुमच्या परीक्षा संपतील आणि तुम्हाला सुट्ट्या लागतील. सुट्टीमध्ये तुम्ही 'बिंगोकिड्स'च्या पहिल्या अंकापासून आत्तापर्यंत 'बिंगोस्कोप'मध्ये माहिती दिलेले सर्व सिनेमे एकेक करून नक्की पाहा. त्यातही 'चिल्ड्रन ऑफ हेवन' हा सिनेमा जर तुम्ही आत्तापर्यंत पाहिला नसेल, तर आधी पाहा. 
प्रख्यात इराणी दिग्दर्शक माजिद माजिदी यांनी १९९७ मध्ये तयार केलेला हा चित्रपट लहान मुलांच्या भावविश्वाचं खूप प्रभावीपणे दर्शन घडवतो. हा सिनेमा पाहताना आपल्याला कळतं, की जगात अनेक देश असले, भाषा वेगळ्या असल्या, वर्ण किंवा वंश भिन्न असले, जाति-धर्म निराळे असले, तरी माणूस म्हणून सगळ्यांची भावना एकसारखीच असते. त्यातही लहान मुलांचं जग तर सगळीकडं समानच असतं. आपलं कुटुंब, आपले आई-बाबा, आपली भावंडं यांच्याविषयीचं प्रेम सगळ्या जगात 'सेम टु सेम' असतं. 
हा सिनेमा जगभर गाजला. गेल्या वीस वर्षांपासून तो जगभरातील अनेक महोत्सवांत दाखविला गेला आहे. या चित्रपटाला १९९८ च्या ऑस्कर सोहळ्यात सर्वोत्कृष्ट परभाषा चित्रपट विभागात नामांकन मिळालं होतं. 
या सिनेमाची कथा अगदी साधी आहे. किंबहुना अगदी साधी कथा, रोजच्या जगण्यातलं वास्तव साधेपणानं मांडणं हे इराणी चित्रपटांचं वैशिष्ट्यच आहे. अली आणि झायरा या बहीण-भावांची ही गोष्ट आहे. इराणची राजधानी असलेल्या तेहरान या भल्यामोठ्या शहराच्या दक्षिण भागात अलीचं कुटुंब राहत असतं. परिस्थिती गरिबीची असते. वडील मोलमजुरी करीत असतात. आई आजारी असते. घराचं भाडं पाच महिन्यांपासून थकलेलं असतं. किराणाची उधारी राहिलेली असते. अशा परिस्थितीत अली आपल्या बहिणीचे फाटके गुलाबी बूट दुरुस्त करून घरी जाताना आपल्याला दिसतो. तो एका ठिकाणी बटाटे घेत असताना एक माणूस ते बूट उचलून रद्दीच्या पिशवीत टाकतो. बहिणीचे बूट गेल्यानं अलीला अतिशय वाईट वाटतं. तो त्याच्या आई-वडिलांना हे सांगू शकत नसतो. वडील आधीच वैतागलेले असतात. आई आजारी असते. त्यामुळं तो बहिणीला बूट गेल्याचं सांगतो. नवे बूट आणण्याची ऐपत नसते आणि शाळेत तर बूट घातल्याशिवाय जाणं शक्यच नसतं. अखेर झायरा एक तोडगा काढते. तिची सकाळची शाळा झाल्यावर ती तिचे बूट अलीला देईल आणि अली तेच बूट घालून त्याच्या शाळेत जाईल, अशी योजना ठरते. अली शाळेत हुशार असतो, पण या धावपळीत त्याला उशीर होऊ लागतो. एकदा तर मुख्याध्यापक त्याला वडिलांना घेऊन यायला सांगतात, पण शिक्षकांनी रदबदली केल्यामुळं अली वाचतो. तिकडं झायराला तिचे बूट रोया नावाच्या एका मुलीच्या पायात दिसतात. तिला आश्चर्य वाटतं. ती शाळा संपल्यावर हळूच तिच्या मागे मागे तिच्या घरापर्यंत जाते. तिचे वडील कचरा उचलणारे व अंध असतात हे तिच्या लक्षात येतं.
नंतर अलीला शाळेत एक स्पर्धा जाहीर झाल्याचं समजतं. त्या धावण्याच्या शर्यतीत तिसरं बक्षीस बुटांच्या जोडीचं असतं. या स्पर्धेत भाग घेऊन तिसरा नंबर मिळवायचा असं अली ठरवतो. पुढं काय होतं, ते तुम्ही या सिनेमातच पाहा.
हा सिनेमा पाहताना दिग्दर्शक माजिदी यांच्या दृष्टिकोनाचं आपल्याला कौतुक वाटतं. त्यांनी हा सिनेमा त्या दोन लहान मुलांच्या नजरेतूनच आपल्याला दाखवला आहे. आपल्याला आपलं बालपण आठवतं. अनेकदा डोळ्यांत पाणी येतं आणि हेच या चित्रपटाचं यश आहे. 
आमीर फारोख हाशेमियाँ याने अलीची, तर बहार सिद्दिकीनं झायराची भूमिका खूप छान केली आहे. प्रसिद्ध इराणी अभिनेते रेजा नाझी यांनी त्यांच्या वडिलांचे काम केले आहे.
या चित्रपटातील या दोन मुलांची अनेक दृश्यं हेलावून टाकणारी आहेत. माजिदी यांनी तेहरान शहरातच या चित्रपटाचं संपूर्ण चित्रीकरण केलं आहे. चित्रीकरण वास्तववादी व्हावं, यासाठी अनेकदा ते ऐन गर्दीच्या ठिकाणी, रस्त्यांत चित्रीकरण करीत असत. 
या चित्रपटाने इराणी चित्रपटांना जागतिक नावलौकिक मिळवून दिला. या चित्रपटाच्या रूपानं प्रथमच इराणी चित्रपटाला ऑस्करमध्ये नामांकन मिळालं. तिथं त्याला पुरस्कार मिळू शकला नसला, तरी जगभराच्या अनेक महोत्सवांतून या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव झाला आहे.
असा हा चित्रपट तुम्ही येत्या सुट्टीत आपल्या मित्र-मैत्रिणींसह नक्की पाहा आणि आम्हालाही कळवा.

---


---

28 Nov 2020

बिंगोस्कोप - भाग १ ते ३

बिंगोस्कोप
-------------

स्वाती यादवाडकर या मैत्रिणीनं दोनेक वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘बिंगोकिड्स’ या लहान मुलांच्या पाक्षिकात मी ‘बिंगोस्कोप’ या सदरात जगभरातील काही उत्तम चित्रपटांची ओळख मुलांना करून दिली. ही रूढार्थाने परीक्षणं नाहीत. साधारण दहा ते १४ वर्षे वयोगटातल्या मुलांसाठी, त्यांना समजेल अशा साध्या-सोप्या भाषेत सिनेमांचा परिचय करून देण्याचा हा प्रयत्न आहे. एकूण २१ सिनेमांवर मी या सदरात लिहिलं आहे. हे लिखाण इथं एकत्रित राहील म्हणून तीन-तीन परिचय एकत्र करून एक ब्लॉग अशा रीतीनं प्रसिद्ध करीत आहे.

----

बालमित्र हो, आपल्याला सिनेमा पाहायला आवडतं. तंत्रज्ञानावर आधारित या कलेनं विसाव्या शतकात क्रांती घडवून आणली. आपल्या 'बिंगोस्कोप' या सदरातून आपण जगभरातील काही निवडक, नामवंत सिनेमांची ओळख करून घेणार आहोत. हे सिनेमे तुम्ही पाहिले असतील तर उत्तमच; पण पाहिले नसतील तर आवर्जून पाहावेत यासाठीच हा खटाटोप...

------

१. बायसिकल थिव्ह्ज

-------------------------

'चोरी'ची अजरामर गोष्ट....

---------------------------------

इटलीचे प्रख्यात दिग्दर्शक व्हित्तोरिओ डी'सिका यांचा 'बायसिकल थिव्ह्ज' (अमेरिकेत हा चित्रपट 'द बायसिकल थिफ' म्हणून ओळखला जातो.. पण मूळ इटालियन शीर्षकात 'चोर' हा शब्द अनेकवचनी आहे...) हा सिनेमा जगातल्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक गणला जातो. हा चित्रपट १९४८ मध्ये प्रदर्शित झाला. तेव्हापासून आजतागायत तो जगभरातील चित्रकर्मींना प्रेरणा देत आला आहे. इटलीमध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळात या सिनेमाची कथा घडते. कथानक अगदी साधे आहे. मात्र, माणसातल्या आदिम जीवनप्रेरणेचे आणि मूल्यांचे उत्तुंग दर्शन हा सिनेमा घडवीत असल्याने त्याची अभिजात कलाकृतींमध्ये नोंद होते. 

इटलीची राजधानी असलेल्या रोम शहराच्या जवळच्या वस्तीत या सिनेमाची गोष्ट आकारास येते. काळ आहे दुसऱ्या महायुद्धानंतरचा. दुसऱ्या महायुद्धाचे भीषण परिणाम संपूर्ण युरोपावर झाले. अशा या अस्थिर, अस्वस्थ काळात हा सिनेमा आकारास येतो. या चित्रपटाचा नायक अंतानिओ (लँबार्तो मॅग्गिओरानी) हा एक गरीब, बेरोजगार गृहस्थ आहे. पत्नी मारिया (लिआनेला कॅरेल), सात वर्षांचा मुलगा ब्रुनो (एंझो स्टैओला) आणि आणखी एक छोटं बाळ असं त्याचं कुटुंब आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी तो काम शोधतो आहे. अखेर अंतानिओला तेथील सरकारी रोजगार केंद्रातून एक काम मिळते. हे काम असते भिंतींवर पोस्टर चिकटविण्याचे. फक्त एकच अडचण असते. ज्या व्यक्तीकडे सायकल असेल, त्यालाच हे काम मिळणार असते. अंतानिओ आपल्या पत्नीच्या कानावर ही गोष्ट घालतो. अंतानिओची सायकल गहाण ठेवलेली असते. मग त्याची पत्नी घरातल्या चादरींचा ढीग घेऊन जाते आणि त्या विकून पतीची सायकल सोडवून आणते. अंतानिओ पत्नी व मुलासह ही सायकल घेऊन आनंदात घरी येतो. दुसऱ्या दिवशी आपल्या मुलाला घेऊन तो कामावर निघतो. मात्र, एका शिडीवर चढून पोस्टर चिकटवत असताना एक चोर त्याची सायकल घेऊन पळून जातो. अंतानिओ जीव खाऊन त्याचा पाठलाग करतो, पण चोर सापडत नाही. त्यानंतर सुरू होते एक शोधयात्रा... अंतानिओ आणि ब्रुनो दोघेही सायकलच्या शोधात सगळं शहर पालथं घालतात. वेगवेगळ्या ठिकाणी जातात. तिथं त्यांना भेटणारी माणसं, इटलीमधलं तेव्हाचं सामाजिक वातावरण, गरिबी, आर्थिक विषमता यांचं एक विषण्ण करणारं दर्शन आपल्याला होतं. चित्रपटाचा शेवटही खूप चटका लावणारा आहे. तो शेवट तुम्ही प्रत्यक्ष सिनेमातच पाहावा, असं मी सुचवीन.
हा सिनेमा निघाला त्याला आता जवळपास ७० वर्षं होतील. मात्र, आजही तो पाहावासा वाटतो किंवा भावतो याचं कारण कुटुंबसंस्था, नातेसंबंध, प्रेम आणि त्यासंबंधीचे माणसाचे विचार आजही तसेच आहेत. यातला नायक गरीब आहे, पण तो आपल्या कुटुंबासाठी कष्ट करून त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करतो. त्या मार्गात त्याला येणारे अडथळे आणि अपेक्षाभंग आपल्याला पाहवत नाहीत. याचं कारण आपल्याही आयुष्यात आपण अनेकदा अशा परिस्थितीला तोंड देत असतो. एखाद्या साध्या गोष्टीत असा वैश्विक विचार असेल, तर ती गोष्ट जगातल्या प्रत्येक माणसाला भावते. हा सिनेमाही त्याला अपवाद नाही. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे डी'सिका यांच्या या सिनेमात कमालीचा साधेपणा आणि सच्चेपणा आहे. हा सिनेमा आपल्याला भिडतो, त्यामागं त्याची ही हाताळणी आहे.
या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे डी'सिका यांनी प्रमुख कलाकारांच्या भूमिकेत तेव्हाचे कुठलेही नावाजलेले अभिनेते, अभिनेत्री घेतले नाहीत. प्रमुख भूमिका करणारे लँबार्तो मॅग्गिओरानी या सिनेमात काम करण्यापूर्वी एका कारखान्यात साधे कामगार होते. (गंमत म्हणजे या सिनेमात काम केल्यामुळं त्यांच्या मालकानं त्यांना पुन्हा कामावर घेतलं नाही. मग त्यांना अभिनय क्षेत्रच निवडावं लागलं.) मारियाचं काम करणारी लिआनेला कॅरेल हीदेखील एक सामान्य स्त्री होती. तिनं यापूर्वी कधीही कॅमेराला तोंड दिलं नव्हतं. तीच गोष्ट लहानग्या ब्रुनोचं काम करणाऱ्या एंझो या मुलाची. त्यानं तर या भूमिकेत कमाल केली आहे. त्याच्या डोळ्यांतले भाव (आणि विशेषतः शेवटचं दृश्य) काळजात घर करून जातात.
हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर इटलीत त्यावर टीका झाली. इटलीतील जीवनाचे नकारात्मक चित्र त्यात रंगविले आहे, असे तेथील लोकांना वाटले. मात्र, जगभरात या सिनेमाचे खूप चांगले स्वागत झाले आणि आज तो सिनेमाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा चित्रपट मानला जातो, यातच त्याचं यश आहे.

---

२. श्यामची आई

---------------------

मातृप्रेमाची महन्मंगल गाथा...

-----------------------------------

पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ सानेगुरुजी यांनी लिहिलेल्या 'श्यामची आई' या पुस्तकावरून आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी १९५३ मध्ये याच शीर्षकाचा मराठी चित्रपट निर्माण केला. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वोत्कृष्ट चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णकमळ देण्यास १९५४ मध्ये सुरुवात झाली, तेव्हा हा पुरस्कार पहिल्यांदा जिंकणारा चित्रपट म्हणजे 'श्यामची आई'.

सानेगुरुजी यांनी नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात असताना कैद्यांना आपली गोष्ट सांगितली. नंतर त्यांनी पाच दिवसांत ही संपूर्ण गोष्ट लिहून पूर्ण केली. त्यातून 'श्यामची आई' हे पुस्तक तयार झाले. या पुस्तकात ४२ प्रकरणे असून, पहिली रात्र, दुसरी रात्र अशा शीर्षकांनी यातील गोष्टी येतात. ही स्वतः सानेगुरुजींचीच गोष्ट असून, पुस्तकातील श्याम म्हणजे स्वतः सानेगुरुजीच होत. सानेगुरुजींनी त्यांच्या आईची कथा यात अत्यंत हळव्या, प्रेमळ मनाने सांगितली आहे. आई आणि मुलाचे नाते त्यांनी फार वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे.
आचार्य अत्रे यांच्यावर सानेगुरुजींचा प्रभाव होता. सानेगुरुजींच्या निधनानंतर त्यांचे हे अजरामर लेखन सिनेमाच्या पडद्यावर आणण्याचा निर्धार अत्रे यांनी केला. ते झपाट्याने कामाला लागले. दोन वर्षांत त्यांनी हा सिनेमा पूर्ण केला आणि मार्च १९५३ मध्ये हा सिनेमा महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. हा सिनेमाही लोकांना अतिशय आवडला. अभिनेत्री वनमाला यांनी श्यामच्या आईचे - यशोदाचे काम केले होते. माधव वझे या मुलाने श्यामचे, तर शंकर कुलकर्णी यांनी श्यामच्या वडिलांचे, म्हणजे सदूभाऊंचे काम केले होते. बाबूराव पेंढारकर, सुमती गुप्ते, दामुअण्णा जोशी, बापूराव माने या तेव्हाच्या लोकप्रिय कलाकारांनीही यात भूमिका केल्या होत्या. प्रख्यात गीतकार प्रा. वसंत बापट यांनी या सिनेमातील बारक्याची भूमिका केली होती, तर दुर्वांची आजी ही गाजलेली भूमिका सौ. सरस्वती बोडस यांनी केली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनीही या सिनेमात पुराणिकबुवांची एक छोटीशी भूमिका केली आहे.
या चित्रपटाला त्या काळातील प्रसिद्ध संगीतकार वसंत देसाई यांनी संगीत दिले आहे. यातील 'भरजरी गं पितांबर दिला फाडून, द्रौपदीशी बंधू शोभे नारायण' हे आशा भोसले यांनी गायिलेले गाणे आजही तितकेच लोकप्रिय आहे. याशिवाय ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी तेव्हा, त्यांच्या कुमारवयात गायिलेले यातील 'छडी लागे छमछम' हे गाणेही अत्यंत गाजले.
यातील एका दृश्यात श्याम अंघोळ झाल्यानंतर पायाला घाण लागेल, म्हणून जमिनीवर पाय ठेवायला तयार नसतो, असं दृश्य आहे. तेव्हा श्यामची आई त्याला म्हणते, 'श्याम, पायाला घाण लागू नये, म्हणून जपतोस तसाच मनाला घाण लागू नये म्हणूनही जप हो...' हे आणि यासारखे चित्रपटातील अनेक संवाद आजही लोकांना मुखोद्गत आहेत.
'श्यामची आई' हे पुस्तक कधीही वाचले नाही, असे एकही मराठी घर नसेल. त्याचप्रमाणे 'श्यामची आई' हा चित्रपटानेही अनेक पिढ्यांवर गारूड केले आहे. या चित्रपटात छोट्या श्यामची भूमिका करणारे माधव वझे आज प्रसिद्ध नाट्यकर्मी, नाट्यसमीक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत. 'महाराष्ट्रीय कलोपासक' या संस्थेने त्यांना अभिनयाचे शिक्षण दिले होते. सिनेमाच्या नामावलीत तसा उल्लेख करण्यात आला आहे. या सिनेमाची सुरुवात होते तेव्हा सानेगुरुजींचा पुतळा दिसतो आणि मागे गाय-वासरांचे हंबरणे ऐकू येते. या सूचक दृश्यापासून सिनेमा जो पकड घेतो, तो शेवटर्यंत... अत्यंत भावनात्मक असा हा सिनेमा पाहताना अनेक माणसे अक्षरशः घळघळा रडतात, असा अनुभव आहे.
महाराष्ट्रातील प्रत्येक मुलाने पाहिलाच पाहिजे, असा हा महत्त्वाचा चित्रपट आहे.

----

३. बूट-पॉलिश

-----------------

मुठ्ठी में है तकदीर हमारी...

-----------------------------------

भारताला स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा देशात गरीब जनतेचं प्रमाण खूप होतं. अनेक लोकांना काम नसे. दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत असे. काही लोकांना नाइलाज म्हणून भीक मागून पोट भरावं लागे. अशाही स्थितीत स्वाभिमान बाळगून कष्टानं आपली रोजीरोटी कमावण्याचं त्यांचं स्वप्न असे. 'बूट-पॉलिश' या १९५४ मध्ये आलेल्या हिंदी चित्रपटात अत्यंत विपरीत परिस्थितीत सापडलेल्या दोन लहान मुलांची हृदयद्रावक, पण तितकीच प्रेरणादायक कथा सांगण्यात आली आहे.

प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक राज कपूर यांनी आपल्या आरके स्टुडिओद्वारे या सिनेमाची निर्मिती केली, तर प्रकाश अरोरा यांनी दिग्दर्शन केलं आहे.
बेलू आणि भोला या दोन अनाथ मुलांची ही करुण कहाणी आहे. बेलूचं काम बेबी नाझ हिनं, तर भोलाचं काम रतनकुमार या बालकलाकारानं केलं आहे. या चित्रपटात या दोन मुलांची एक दुष्ट काकू आणि शेजारचे एक अपंग, पण प्रेमळ असे जॉनचाचा अशी आणखी दोन महत्त्वाची पात्रे आहेत. जॉनचाचांचे काम हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चरित्र अभिनेते डेव्हिड यांनी केलं आहे.
आई मरण पावल्यानंतर एक सामाजिक कार्यकर्ता बेलू आणि भोलाला त्याच्या काकूकडं आणून सोडतो. मात्र, ही काकू दुष्ट असते. ती या मुलांना छळते आणि भीक मागायला लावते. जॉनचाचांचं पहिल्यापासून या मुलांशी मेतकूट जमलेलं असतं. ते या मुलांना स्वाभिमानाचे धडे देतात आणि भीक न मागण्याबद्दल सांगतात. भोला मोठा असल्यानं त्याला ते पटतं. बेलूही त्याला साथ देते. दोघंही पैसे वाचवून बूट-पॉलिशचं सामान विकत घेतात आणि भोला रेल्वे स्टेशनांवर लोकांचे बूट पॉलिश करून देऊ लागतो. काकूला हे समजताच ती दोघांना मारहाण करते आणि घराबाहेर हाकलून देते. दरम्यान, जॉनचाचांनाही दारू विकत असल्याबद्दल पोलिस अटक करतात. जॉनचाचांचा आसरा गेल्यामुळं मुलं रस्त्यावर येतात. दरम्यान पावसाळा सुरू होतो आणि भोलाला बूट पॉलिशचं काम मिळेनासं होतं. दोघांनाही प्रचंड भूक लागते, तेव्हा एक जण भोलाला भिकारी समजून एक नाणं फेकतो. बेलू ते नाणं घेते, तेव्हा भोला तिला मारतो आणि भीक न मागण्याबद्दल खडसावतो. रेल्वे स्टेशनवर काही तरी काम करून भोला पैसे मिळवतो आणि बेलूसाठी खायला आणतो, तेव्हाच पोलिस येतात आणि पळापळीत बेलू आणि भोलाची ताटातूट होते. बेलू एका रेल्वेगाडीत चढते. तिथं एक दाम्पत्याच्या नजरेस ती पडते. त्यांना मूल-बाळ नसल्यानं ते बेलूला दत्तक घेतात. इकडं भोलाला अटक होते. सुटल्यानंतर भोला बेलूला शोधण्याचा खूप प्रयत्न करतो, पण ती सापडत नाही. तिकडं बेलूलाही रोज भोलाची आठवण येत असते. त्यानंतर काय होतं, हे बहीण-भाऊ एकमेकांना भेटतात का, जॉनचाचांचं काय होतं, हे प्रत्यक्ष सिनेमातच पाहायला हवं.
या चित्रपटात दोन्ही बालकलाकारांची कामं महत्त्वाची आहेत. मुलीच्या भूमिकेसाठी राज कपूर यांनी मुंबईतील १२ शाळांना भेटी दिल्या होत्या. त्यानंतर बेबी नाझला हे काम मिळालं. रतनकुमार यानंही भोलाचं काम खूपच सुंदर केलं आहे. या चित्रपटाला तेव्हा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला, तर डेव्हिड यांना सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. चित्रपटाला शंकर-जयकिशन यांचं संगीत असून, यातील आठही गाणी श्रवणीय आहेत. पण तरी यातलं आशा भोसले व महंमद रफी यांनी गायिलेलं 'नन्हे-मुन्हे बच्चे तेरी मुठ्ठी में क्या है, मुठ्ठी में है तकदीर हमारी' हे गाणं आजही लोकप्रिय आहे.
गरिबी असली, तरी स्वाभिमानानं जगायला शिकवणारा हा प्रेरणादायक सिनेमा प्रत्येक मुलानं पाहायलाच हवा.

---

(क्रमश:)

-----
पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

----

18 Nov 2020

द क्राउन - चौथा सीझन

तिघींचे तीन ऋतू
-------------------


‘द क्राउन’ ही ‘नेटफ्लिक्स’वरची सर्वांत महाग, भव्य अशी निर्मिती असलेली वेबसीरीज मी पहिल्या सीझनपासून पाहतो आहे. ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांच्या जीवनप्रवासावर ही मालिका आधारित आहे. चार दिवसांपूर्वी या मालिकेचा चौथा सीझन आला. राणीच्या राज्यरोहणाचा थोडा आधीचा काळ इथपासून ते १९७९ या वर्षापर्यंत तीन सीझनमध्ये या वेबसीरीजचा प्रवास झाला होता. विन्स्टन चर्चिलपासून हॅरॉल्ड विल्सनपर्यंत सर्व पंतप्रधान यात येऊन जातात. या चौथ्या सीझनचं वैशिष्ट्य म्हणजे यात ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान मार्गारेट थॅचर आणि प्रिन्सेस डायना यांची एंट्री आहे. थोडक्यात, हा संपूर्ण सीझन या शक्तिशाली, जगभरातील माध्यमांचे लक्ष वेधून घेणाऱ्या आणि वादग्रस्त अशा तीन महिलांचा आहे. त्यामुळंच हा संपूर्ण सीझन अत्यंत उत्कंठावर्धक आणि खिळवून ठेवणारा असा झाला आहे. एकूणच ही सर्व सीरीज उत्तम आहेच; त्यातही हा चौथा ऋतू विशेष प्रेक्षणीय ठरला आहे, यात वाद नाही. 

जगभरात सत्ता गाजविणारी घराणी आणि त्या घराण्यांचे अंतर्गत ताणतणाव किंवा वादविवाद हे विषय कायमच सर्वांना आकर्षून घेणारे असतात. त्यात सत्ता गाजवणारी जर बाई असेल, तर विशेषच! ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ सुमारे १९५२ पासून राजगादीवर विराजमान आहेत. म्हणजेच आज सुमारे ६८ वर्षं त्या ब्रिटनच्या महाराणी आहेत. सध्या त्यांचं वय ९३ आहे आणि अजूनही त्या उत्तम हिंडत्या-फिरत्या तब्येतीच्या आहेत. अशा या राणीचं आयुष्य म्हणजे खंडकाव्याचा, महाकादंबरीचाच विषय! नुसत्या त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटना एकासमोर एक ठेवायच्या झाल्या, तरी केवढा मोठा पट तयार होईल. एलिझाबेथ यांनी राणीपदाचा मुकुट मस्तकी धारण केला, तेव्हा भारतात पं. नेहरू पंतप्रधान होते. भारताला स्वातंत्र्य मिळून अवघी पाच वर्षं झाली होती आणि जगभर ब्रिटिश साम्राज्याचा डंका अद्याप जोरात वाजतच होता. एवढी एक गोष्ट लक्षात घेतली तरी या राणीनं केवढा मोठा काळ त्या पदावर राहून बघितला आहे, हे लक्षात येतं. ब्रिटनमध्ये राणीचं पद हे जरी नामधारी असलं, तरी मान मोठा आहे. काही घटनादत्त जबाबदाऱ्या आहेत. एलिझाबेथ यांनी सुरुवातीपासून काही एका निष्ठेने, जबाबदारीने हे पद निभावले आहे. ‘क्राउन’च्या पहिल्या तिन्ही सीझनमधून हा सर्व काळाचा प्रवास अगदी चित्रमयरीत्या आपल्यासमोर येतो. या मालिकेची भव्य निर्मिती, तपशिलातली अचूकता टिपण्यासाठी केलेला अभ्यास, वेषभूषा, रंगभूषा, कलादिग्दर्शन आणि दिग्दर्शन हे सर्वच अव्वल दर्जाचं आहे.
या राजघराण्याविषयी जगभरात, विशेषत: ब्रिटनमध्ये जनसामान्यांत प्रचंड कुतूहल आहे, कौतुकही आहे, रागही आहे. प्रेम आहे, तसंच द्वेषही आहे. ब्रिटिश माध्यमे तर हात धुऊन या घराण्याच्या मागे लागलेली असतात. तिथली टॅब्लाइड वृत्तपत्रं आणि त्यांचे छायाचित्रकार यांचा ससेमिरा कायमच राजघराण्यातल्या व्यक्तींच्या मागे लागलेला असतो. अशा परिस्थितीत १९७९ मध्ये मार्गारेट थॅचर पंतप्रधानपदी आल्या आणि त्याच सुमारास प्रिन्स चार्ल्सच्या आयुष्यात डायना आली. इथून पुढचा ११ वर्षांचा काळ या तिन्ही महिलांच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा, धगधगता कालखंड होता. ‘क्राउन’चा चौथा ऋतू आपल्याला हाच काळ तपशिलात दाखवतो. माहिती नसलेल्या अनेक गोष्टी सांगतो आणि या तिघींच्याही आयुष्याचा परस्परांवर कसा परिणाम झाला होता, याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं एखाद्या रंजक कादंबरीप्रमाणे हा सीझन रंगला आहे. राणी आणि थॅचरबाई यांच्यातील कथित वादात बळीचा बकरा बनवण्यात आलेले राणीचे प्रेस सेक्रेटरी मायकेल शिया एक उत्कंठावर्धक कादंबरी टाइप करून संपवतात, असं एक सूचक दृश्य या सीझनमध्ये आहे, ते पुरेसं बोलकं आहे.

मार्गारेट थॅचर सत्तेवर आल्या आणि अल्पावधीतच त्यांनी ब्रिटनला ‘पूर्वीच्या वैभवाकडे’ नेण्यासाठी आर्थिक सुधारणांची जोरदार मोहीम सुरू केली. जुने कामगार कायदे रद्दबातल केले. सरकारी खर्चांना कात्री लावण्याचा मोठा आग्रह धरला. यातून त्यांच्याविरुद्ध काही क्षेत्रांतून नाराजीही तयार होत होती. ‘मॅगी’ एकाच वेळी अत्यंत लोकप्रियही होती आणि ‘मार्गारेट थॅचर मिल्क स्नॅचर’ अशा घोषणाही त्यांच्याविरुद्ध दिल्या जात होत्या. राणी एलिझाबेथ आणि थॅचर एकाच वयाच्या. त्यातही थॅचर सहा महिन्यांनी मोठ्या! थॅचर एकदा राणीशी बोलताना फार सूचकपणे याचा उल्लेख करतात. किंबहुना राणी आणि थॅचर यांचे ‘पर्सनल ऑडियन्स’चे (एकांतातील भेट) सर्वच प्रसंग अतिशय बहारदार झाले आहेत. दोघींचे स्वभावविशेष त्यात विशेष खुलले आहेत. आता यात दिग्दर्शकाने उघडच ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ घेतलेली दिसते. मात्र, प्रसंग रंगविण्यासाठी हे धारदार संवाद फार उपयुक्त ठरले आहेत. राणीसमोर येताच पाय किंचित वाकून ‘युअर मॅजेस्टी’ म्हणणं आणि नंतर त्याच राणीला आपल्या खास शैलीत, पण राणीचा सन्मान राखून ‘सुनावणं’ ही कसरत थॅचरबाईंनी कशी साधली असेल, याचा प्रत्यय या सर्व दृश्यांत येतो. ऑलिव्हिया कोलमन (राणी एलिझाबेथ) आणि गिलियन अँडरसन (थॅचर) या दोन्ही अभिनेत्रींना या सर्व प्रसंगांसाठी दाद द्यावीशी वाटते. अल्पावधीतच फॉकलंड बेटांचं युद्ध होतं आणि अर्जेंटिनाविरुद्धचं हे युद्ध थॅचर यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटन जिंकतं. या घटनेनंतर थॅचर यांच्या लोकप्रियतेत अमाप वाढ होते. एका रशियन पत्रकाराकडून त्यांना ‘आयर्न लेडी’ अशी उपाधी मिळते. 

या सर्व घटनाक्रमाला समांतर अशी एक घडामोड प्रिन्स चार्ल्स याच्या जीवनात घडत असते. त्याच्या आयुष्यात ‘डायना’ नावाचं वादळ येतं. कॅमिला पार्कर बोल्सच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या चार्ल्सला अल्लड, टीनएज अशा डायनाचं सौंदर्य मोहित करतं. त्यांचं एकमेकांत गुंतणं आणि प्रेमात पडणं हे एवढ्या वेगात होतं, की रा णीला हे समजल्यानंतर त्यांच्या विवाहाचाच घाट घातला जातो. चार्ल्स आणि डायना एकमेकांना नीट ओळखण्यापूर्वीच विवाहबंधनात अडकतातही. या घाईघाईत केलेल्या विवाहातच पुढील स्फोटक घटनाक्रमांची बीजं दडलेली असतात. डायनाची भूमिका करणारी अभिनेत्री इमा कोरिन प्रथमदर्शनी अगदी डायनासारखी वाटली नाही. मात्र, तिचा मेकअप आणि वेषभूषा एवढी तंतोतंत आहे, की नंतर ती ‘डायना’ आहे, याबाबत आपण कन्व्हिन्स होतोच! 
मार्गारेट थॅचर यांच्या सत्ताकाळात सामान्य जनतेमध्ये असलेल्या असंतोषाचा फटका थेट राणीला कसा बसतो, हे सांगणारा ‘फेगन’ नावाचा एक स्वतंत्र भागच यात आहे. यात फेगन नावाचा एक नोकरी गेलेला सामान्य ब्रिटिश माणूस थेट बकिंगहॅम पॅलेसमध्ये राणीच्या शयनकक्षातच घुसखोरी करतो. एकदा नव्हे तर दोनदा! याशिवाय थॅचर यांचा मुलगा मार्क थॅचर कार रेसमध्ये भाग घेण्यासाठी गेला असताना अल्जिरियाच्या जवळ ‘हरवतो’ (व नंतर सापडतो) आणि नंतर काही वर्षांनी प्रिन्स चार्ल्स एका हिमप्रपातातून वाचतो या दोन्ही घटना बारकाईनं दाखवण्यात आल्या आहेत. या दोन्ही महिलांमधील ‘आई’ या वेळी तीव्रतेनं दिसते. थॅचरबाई आपल्या कॅबिनेटमधील निवडक मंत्र्यांना घरी जेवायला बोलावतात आणि स्वत: स्वयंपाक करून त्यांना व नवऱ्याला-मुलांना जेवायला वाढतात. पुढं चार्ल्स डायना यांच्यातली दरी विकोपाला जाते, तेव्हा चार्ल्सला त्याच्या चुकांबद्दल खडे बोल सुनावणारी राणीमधली ‘आई’च लखलखीतपणे दिसते. थॅचर यांच्याबरोबर वाद असले, तरी शेवटी त्या राजीनामा द्यायला येतात, तेव्हा त्यांना ब्रिटनचा सर्वोच्च सन्मान स्वत:च्या हाताने त्यांच्या कोटवर लावणाऱ्या राणीची एक हळवी, संवेदनशील बाजूही दिसते. 

डायनाचं यातलं व्यक्तिचित्र तर अनेक अर्थांनी बघण्यासारखं आहे. राजघराण्यात लग्न झाल्यानंतरच्या भागाचं नावच ‘फेअरी टेल’ असं आहे. डायना आणि चार्ल्सचं लग्न ही जगातल्या अनेकांसाठी एक परिकथाच होती. तेव्हा आताएवढा मीडिया सर्वव्यापी नव्हता, तरी सर्व जगात त्यांचा शाही विवाह सोहळा चर्चिला गेला होता. त्यानंतरचे काही दिवस डायनासाठी खरोखर स्वप्नवत होते. मात्र, नंतर राजघराण्यातल्या रीतीरिवाजांच्या, रुढी-परंपरांच्या चौकटी तिला बेड्यांसारख्या जाचू लागल्या. कुणासमोर कसं वागायचं, कसं बोलायचं, कुठं उभं राहायचं, कुठले शब्द उच्चारायचे, कुणाला कसा मान द्यायचा (आणि कुणाला द्यायचा नाही हेही), कुठल्या प्रसंगी कुठले कपडे घालायचे, कुठली पादत्राणे घालायची याचं एक ट्रेनिंगच तिला देण्यात येतं. लग्न झालं तेव्हा तर सर्व सोहळ्याची रीतसर रंगीत तालीम करण्यात येते. सेंट पॉल कॅथेड्रलमध्ये झालेला हा शाही सोहळा म्हणजे एक पर्वणीच होती. डायना तेव्हा अवघी २० वर्षांची होती. ती चार्ल्सच्या आकंठ प्रेमात होती आणि तिला त्याच्यापुढे बाकी काही दिसत नव्हतं. मात्र, विवाह झाल्यानंतर तिला राजघराण्यात आपला विवाह झालाय म्हणजे नक्की काय, याचा अंदाज आला. मनस्वी स्वभावाची डायना पॅलेसच्या सोनेरी पिंजऱ्यात सुखानं नांदणं शक्यच नव्हतं. चौथ्या सीझनच्या प्रत्येक भागात डायनाची ही तडफड, चिडचिड समोर येत राहते. ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडचा दोघांचा दौरा, त्यात छोट्या विल्यमला सर्वत्र सोबत ठेवण्याचा तिचा आग्रह, नंतर न्यूयॉर्कचा राजेशाही दौरा एकटीनं करणं या आणि अशा अनेक प्रसंगांत तिची आणि चार्ल्सचं दुभंग नातं दिसत राहतं. 

‘द क्राउन’चा हा चौथा सीझन म्हणजे अशा रीतीनं या तीन वेगवेगळ्या महिलांचे तीन वेगवेगळे ऋतू दाखवणारा कोलाज झाला आहे. भव्य, श्रीमंत निर्मितीला उत्तम अभिनय व तपशीलवार चित्रणाची जोड मिळाल्यानं हा कोलाज खास रंगतदार झाला आहे. मुळात जगभरातल्या महिलांना आपली वाटेल, अपील होईल अशीच ही तिघींची गोष्ट आहे. खरं तर, राजेशाही असो वा सामान्य माणूस; एकदा सुखाची किंवा दु:खाची तार जुळली की सगळ्या भावना, सगळी नाती, सगळी माणसं आपलीच वाटायला लागतात. हाडामासांची, चुकणारी, रडणारी, चिडणारी साधी-सरळ माणसं... ‘द क्राउन’मधली माणसंही आपलीच आहेत, असं वाटू लागतं आणि हेच या तिघींच्या जबरदस्त चित्रणाचं यश आहे.

----

(ओटीटी - नेटफ्लिस, दर्जा - चार स्टार)

----




19 Oct 2020

डीडीएलजेवरील ‘मटा’ लेख

एका ‘स्वप्ना’ची पंचविशी 
----------------------------- 


‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा यशराज फिल्म्सचा चित्रपट प्रदर्शित झाला, त्याला येत्या २० ऑक्टोबर रोजी २५ वर्षं पूर्ण होतील. ‘यशराज फिल्म्स’ला २५ वर्षं पूर्ण झाल्याच्या मुहूर्तावर १९९५ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आज यशराज फिल्म्सचा सुवर्णमहोत्सव आणि ‘डीडीएलजे’चा चक्क रौप्यमहोत्सव साजरा होतोय. केवढा काळ बदलला! काही पिढ्या बदलल्या... मात्र, ‘डीडीएलजे’ची जादू कायम राहिली आहे. एखादा चित्रपट जन्मताना सर्व शुभयोग एकत्र यावेत, तसं ‘डीडीएलजे’चं झालं असावं. हा सिनेमा म्हणजे एक दंतकथा ठरला. हिंदी चित्रपटसृष्टीतला सर्वाधिक काळ चाललेला चित्रपट हे त्याचं बिरुद तर ध्रुवताऱ्यासारखं अढळ राहील, असं वाटतंय. एकाच चित्रपटगृहात सर्वाधिक काळ चाललेला हाच चित्रपट! हिंदीतला सर्वाधिक यशस्वी रोमँटिक चित्रपट हाच! लोकप्रियतेचे उच्चांक गाठून नवनवे माइलस्टोन तयार केले ते याच चित्रपटानं...! या चित्रपटातील संवाद, गाणी, एकेक दृश्य प्रचंड गाजलं. पुढं अनेक वेळा त्याची कॉपी झाली. ‘राज’ आणि ‘सिमरन’ ही भारतीय प्रेमकथांमधली ‘सर्वनामं’ झाली. विशेषनामांचं सर्वनाम होणं यापेक्षा लोकप्रियतेचा आणखी कोणता मोठा पुरस्कार असेल! सुरुवातीला हा चित्रपट नाकारणाऱ्या शाहरुखच्या करिअरमधला हा सर्वांत यशस्वी सिनेमा ठरला. या चित्रपटानं त्याच्या सुपरस्टारपदावर शिक्कामोर्तब झालं. काजोलला या चित्रपटानं अव्वल श्रेणीतल्या नायिकांमध्ये कायमचं स्थान दिलं.
‘डीडीएलजे’ प्रदर्शित झाला १९९५ मध्ये... म्हणजे मागच्या शतकात! हा सिनेमा प्रदर्शित होण्याच्या फक्त दोन महिने आधीच भारतात पहिला मोबाइल कॉल केला गेला होता. एका मोठ्या क्रांतीची ती सुरुवात होती. त्या अर्थानं ‘डीडीएलजे’ हा मोबाइलपूर्व काळातला शेवटचा मोठा सुपरडुपर हिट चित्रपट. चित्रपटाचं निम्मं कथानक परदेशात घडत असलं, तरी त्यात मोबाइल नाही. भारतानं आर्थिक उदारीकरणाचं धोरण स्वीकारून अवघी चारच वर्षं झाली होती. मधल्या दोन वर्षांत देशात जातीय दंगली, बॉम्बस्फोट आदी घटनांनी वातावरण पूर्ण बिघडलं होतं. अशा वेळी मोठ्या रुपेरी पडद्यावरचं मनोरंजन हा इथल्या सर्वसामान्य माणसांसाठी एक महत्त्वाचा भाग होता. यशराज फिल्म्स म्हणजे वर्षानुवर्षं लोकप्रिय चित्रपट देणारी फॅक्टरीच झाली होती. या वेळी यश चोप्रांचा मुलगा आदित्य दिग्दर्शनात उतरला होता. त्याची ही पहिलीच फिल्म असणार होती. आदित्यच्या डोक्यात या चित्रपटाचा प्लॉट पक्का होता. परदेशात राहूनही ‘भारतीय संस्कार’ जपणारं पंजाबी कुटुंब आणि ‘बॉय मीट्स गर्ल’ फॉर्म्युला! शाहरुख वगळता चित्रपटाचं सगळं कास्टिंगही तयार होतं. शाहरुखची बहीण त्याच काळात खूप आजारी होती. त्यामुळं शाहरुख वेगळ्या मन:स्थितीत होता. सुरुवातीला तर त्यानं राजचा रोल खूप ‘गर्लिश’ आहे, म्हणून नाकारलाच होता. अखेर त्यानं ही भूमिका स्वीकारली आणि ‘डीडीएलजे’ नावाच्या इतिहासाला सुरुवात झाली...
आज २५ वर्षांनंतर हा चित्रपट पाहिला तर काही ठिकाणी हसू येतं. अमरीश पुरीचा ‘भारतीय संस्कारां’चा आग्रह आणि त्यावर त्याच्या मुलींची व अगदी आईचीही प्रतिक्रिया बघण्यासारखी आहे. याउलट मुलाचं अपयश सेलिब्रेट करणारा अनुपम खेरचा बाप हा जास्त ‘आज’चा (तेव्हा काळाच्या पुढचा) वाटतो. चित्रपटाची लांबी तब्बल तीन तास १० मिनिटांची! तीही तेव्हाच्या सिंगल स्क्रीनला साजेशीच. पहिला चित्रपट तयार करताना आदित्यनं कोणतीही कसूर बाकी ठेवली नव्हती. परदेशांतली लोकेशन्स, उत्कृष्ट छायाचित्रण, सर्वोत्कृष्ट कलाकार, सुपरहिट संगीत आणि विनोदापासून ते मारामारीपर्यंत सर्व मसाल्याचं योग्य मिश्रण... सगळी भेळ उत्कृष्टपणे जमून आली होती. हा चित्रपट वेगवेगळ्या अर्थांनी ‘माइलस्टोन’ ठरला. मात्र, माझ्या मते तो एवढा हिट होण्याचं कारण म्हणजे विसाव्या शतकातल्या शेवटचा दशकात आलेला हा चित्रपट दोन्ही पिढ्यांना धरून ठेवणारा कदाचित शेवटचाच चित्रपट होता. एका अर्थानं यश चोप्रांच्याही पिढीला आवडेल आणि आदित्यच्याही पिढीला आवडेल असा हा शेवटचाच ब्लॉकबस्टर! त्यानंतरही फॅमिली ड्रामा आणि प्रेमकथा आल्याच; पण एवढं उत्तुंग यश कुठलाही दुसरा सिनेमा मिळवू शकला नाही. पुढच्या पाच वर्षांत आपण एकविसाव्या शतकात प्रवेश करणार होतो. जग बदलणार होतं, सिनेमाही बदलणार होताच! ‘डीडीएलजे’ त्याआधीच्या काळातला सिनेमा होता. आपल्याला जुन्या काळाशी जोडून घेणारा एक धागा सदैव हवाच असतो. ‘डीडीएलजे’नं माझ्या पिढीला कायमस्वरूपी हा धागा पुरवला. एकाच वेळी परदेशांतलं लोकेशन, तिथली धमाल आणि सोबत ‘कधीही हात न सोडणारे’ भारतीय संस्कार हा ‘कॉम्बो पॅक’ अफलातूनच होता. नायिकेला ‘जरासा झूम लू मैं’ म्हणत परदेशांतल्या रस्त्यांवर बागडण्याचं स्वातंत्र्यही होतं... आणि ‘परक्या पुरुषा’सोबत रात्री नकळत ‘तसलं’ काही तर घडलं नाहीय ना, या विचारानं रडण्याचा ‘संस्कारी’ हक्कही अबाधित होता. भारतीय मानसिकतेला काय आवडतं, काय झेपतं, याचा अचूक अंदाज आदित्य चोप्राला होता. मुख्य प्रवाहातल्या सिनेमाला झेपेल एवढीच ‘बंडखोरी’ करायची हे तर यशाचं आदिसूत्र! या चित्रपटातही सिमरनला तिची आई सांगते - बेटा, सपने मत देखो ऐसा कौन कहता है? बस, उनके पूरे होने की शर्त मत रखो! आता हे फारच थोर तत्त्वज्ञान झालं. आज २५ वर्षांनी त्याकडं बघताना गंमत वाटते, पण १९९५ मध्ये ते किती अचूक होतं, हे या चित्रपटाच्या अफाट यशानं सिद्ध केलंच. 
एका व्यापक अर्थानं बघायचं तर ‘डीडीएलजे’ हे एक भव्य आणि हवंहवंसं वाटणारं स्वप्न होतं. काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंतच्या भारतीय तरुणाईला मोहवून टाकणारं स्वप्न! आई-वडील, पालक यांच्या मनाविरुद्ध, त्यांना दुखवून नव्हे, तर त्यांचं मन जिंकून आयुष्यातली उद्दिष्टं, ध्येयं साध्य करण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या माझ्या पिढीला ‘राज’ आवडला नसता तरच नवल! एकविसाव्या शतकात भारतीय तरुणाईकडं वेगवेगळ्या कारणांनी जग जिंकण्याचा आत्मविश्वास आला आणि त्यांच्या महत्त्वाकांक्षांना सगुण साकार रूप मिळण्यासाठी बहुतांश वेळेला ‘बंडखोरी’ आवश्यक ठरली. एकविसावं शतक सुरू होताना झळकलेला फरहान अख्तरचा ‘दिल चाहता है’ हा चित्रपट याचं प्रमाण होता. या तरुणाईला आता ‘आपल्या टर्मवर’ जगायचं होतं. पालक आणि त्यांच्यातले संबंध दुभंग तरी होते किंवा भावशून्य तरी! पाचच वर्षात एका शतकाचा फरक पडायचा होता, तो हा असा! या पार्श्वभूमीवर ‘डीडीएलजे’नं भारतीय मानसिकतेला सदैव कुरवाळायला आवडत असलेला ‘लाडाकोडा’चा, ‘संस्कारा’चा, ‘फील गुड’चा भाव पुरवला. भारतीय समाजमनाला हवी असणारी, आवडणारी ही ‘हेही हवं आणि तेही हवं’वाली स्वप्नाळू (आणि काहीशी चतुर) मेजवानी आदित्य चोप्रानं अगदी नीट पुरवली. ही पंजाबी डिश सगळ्यांना आवडण्यासारखीच होती. ‘जो जे वांछिल तो ते लाहो’ असं सगळं काही होतं त्यात! ‘जा, सिमरन, जी ले अपनी जिंदगी’ म्हणणारा कर्तव्यकठोर, पण प्रेमळ बाप होता, ‘हे हे हे सेन्योरिटा’ करत फ्लर्ट करणारा आगाऊ; पण तरीही हवाहवासा वाटणारा हिरो होता, ‘बडे बडे देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती हैं’ असंही म्हणणारा हिरो होता, ‘अपने देस की मिट्टी’ होती, ‘सरसों का साग और मकई दी रोटी’ होती... टिपिकल पंजाबी लग्न होतं, तिथल्या ‘सोणी कुड्या’ होत्या, प्रेमळ आज्जी होती... काय नव्हतं ते विचारा! 
 मुंबईत ‘मराठा मंदिर’ला मॅटिनीला वर्षानुवर्षं ‘डीडीएलजे’ सुरू राहिला... सध्या ‘करोना’नं त्याला खीळ बसली असली, तरी पुन्हा सगळं सुरळीत झाल्यावर ‘डीडीएलजे’ पुन्हा पहिल्याच दिमाखात सुरू राहील. ‘मेरे ख्याबों में जो आए...’ म्हणत लतादीदींचा तो चिरतरुण सूर कानी पडत राहील... ‘जरा सा झूम लूँ मैं...’ म्हणत आशाबाईंचा अवखळ सूर मनाला आनंद देत राहील... ‘तुझे देखा तो ये जाना सनम...’ म्हणत मोहरीच्या शेतावरून विहरत, लहरत येणारा कुमार सानूचा तो सानुनासिक आवाज थिएटर दुमदुमवत राहील... अमरीश पुरींचा दमदार आवाज अस्सल ‘पंजाबी माती’चा सुगंध घेऊन येईल... हिमानी शिवपुरी, सतीश शहाच्या गमतीजमती आठवत राहतील... मंदिरा बेदी, करण जोहर यांचं रूपेरी पडद्यावरचं हे पदार्पण केवढं अविस्मरणीय ठरलं हे आठवून त्यांनाही आश्चर्य वाटत राहील... शेवटी ‘डीडीएलजे’ हे आपल्या सगळ्या भारतीयांचं रुपेरी स्वप्न आहे.... जोवर भारतीय सिनेमा आहे आणि इथला शेवटचा प्रेक्षक आहे तोवर ‘डीडीएलजे’ नावाचं हे स्वप्नही आपल्या डोळ्यांत राहीलच!

(‘महाराष्ट्र टाइम्स’च्या संवाद पुरवणीत १८ ऑक्टोबर २०२० रोजी प्रसिद्ध झालेल्या संपादित लेखाचा मूळ तर्जुमा)

-----

9 Oct 2020

वॉकिंग अनुभव - लेख

चालायची गोष्ट
-----------------

दहा-बारा दिवसांपूर्वी ऑफिसमधे ‘११ दिवसांत ५० किलोमीटर चालायचं’ असा ‘बूट’ निघाला. उत्साही मंडळींनी लगेच व्हॉट्सअप ग्रुप स्थापन केला. रीतसर ‘गुगल फिट’ ॲप डाउनलोड केलं आणि दुसऱ्याच दिवसापासून, म्हणजे ३० सप्टेंबरपासून चालायला सुरुवात करायची, असं ठरवण्यात आलं. एकूण ११ दिवस होते. मी स्वत:साठी रोज पाच किलोमीटर चालायचं, असं बंधन घालून घेतलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठून, आवरून आमच्या इथे खाली असलेल्या जॉगिंग / वॉकिंग ट्रॅकवर दाखल झालो. मी नांदेड सिटीत राहायला आल्यापासून इथं गेली चार वर्षं सातत्यानं चालतोय. पावसाळ्यात अपवाद होतो. पण तरीही वर्षातले किमान २५० दिवस तरी मी चालत असेन. यंदा मात्र करोनामुळं सर्व जगणंच विस्कळित झालं. तरी जूनमध्ये वॉकिंगला परवानगी मिळाल्यानंतर मी चालायला सुरुवात केली होती. मात्र, पुन्हा पावसामुळं त्यात खंड पडला. मी एक ऑक्टोबरपासून तसाही चालायला सुरुवात करणार होतोच; पण ऑफिसमधल्या या चॅलेंजमुळं मला जरा अधिक उत्साह आला, यात शंका नाही. माझ्याकडं गेल्या वर्षी ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेले शूज होते, पण त्यातलं स्पंज जरा निघालं होतं आणि तिथं टोचायला लागलं. मग सरळ सँडल घालून चालायचं ठरवलं. मी रात्रपाळी करून रात्री एक-दीडला झोपत असल्यामुळं अगदी सकाळी उठून चालायला मला जमत नाही. मग ‘जब जागो तब सवेरा’ या न्यायाने मी उठल्यानंतर आवरून, पेपर वाचून वगैरे नऊ किंवा साडेनऊ वाजता चालायला जातो. पूर्वी एफएमवर गाणी ऐकत चालायचो. पण परवा लता मंगेशकरांच्या गाण्यांची एक लिस्ट सापडली. मग रोज तीच गाणी ऐकत चॅलेंज पूर्ण केलं. आमच्या खाली क्लब हाउस आहे आणि भोवती छान झाडी आणि सभोवती आयताकृती ट्रॅक आहे. त्यावर पेव्हर ब्लॉक बसवले आहेत. बाहेरच्या बाजूनं झाडांचं कुंपण आहे. आतील बाजूनंही लॉन आहे. उत्तम निगा राखली जाते. सकाळी अनेक उत्साही लोक इथं फिरत असतात. मात्र, मी खाली येतो तेव्हा ही संख्या कमी झालेली असते. मला मग हा ट्रॅक जवळपास मोकळा मिळतो. दोन्ही बाजूंनी इमारती असल्यानं ट्रॅकवर दहा वाजताही सावली असते. साडेदहानंतर हळूहळू ऊन या ट्रॅकवर यायला लागतं. तोवर चालणं संपवायचं... नंतर क्लब हाउससमोर झाडीत दगडी बाक टाकले आहेत, तिथं विश्रांती घ्यायची. गार हवा खायची आणि वर यायचं असा हा क्रम!
डेडलाइन घेऊन मी पहिल्यांदाच चालत होतो. मला आमच्या इथल्या ट्रॅकची लांबी-रुंदी माहिती होती. मी साधारण २०० मीटरचा एक लूप घेतला. संपूर्ण ट्रॅकवर फिरण्याऐवजी एल आकारात एकाच बाजूनं मी फिरत होतो. या लूपच्या पाच फेऱ्या झाल्या, की एक किलोमीटर होतो. सुरुवातीला मी अतिउत्साहानं थोड्या थोड्या वेळानं ॲपमधल्या घड्याळाकडं नजर टाकून किती मिनिटांत किती अंतर झालं हे बघायचो. मग लक्षात आलं, की असं केल्यानं आपोआप आपल्या चालण्यात एक अडथळा येतो. हा अडथळा त्या ॲपमध्ये पॉझसारखा नोंदवला जातो आणि एकूण चालण्याचा वेग कमी होऊन वेळ वाढतो. मग मी असा निश्चय केला, की एक गाणं पूर्ण ऐकून झाल्यावरच ॲपमध्ये डोकवायचं. ही युक्ती चांगली लागू पडली. एक तर गाणं नीट लक्ष केंद्रित करून ऐकता यायला लागलं आणि दुसरीकडं सतत ॲपमध्ये डोकवायची सवय सुटली. लता मंगेशकरांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या ग्रुपमधून आलेली गाणी माझ्या लिस्टमध्ये होती. ‘नैना बरसे रिमझिम रिमझिम’पासून ते ‘कशी काळनागिणी सखे गं वैरीण झाली नदी’पर्यंत साधारण आठ ते दहा गाणी व्हायची. मला पाच किलोमीटर अंतर चालायला साधारण ४० ते ४५ मिनिटं लागली. (हा वेग खूप चांगला आहे, असं मला नंतर सहकाऱ्यांकडून कळलं.) खरं तर मी मुद्दाम, जीव तोडून वेगानं चालत नव्हतोच. पण अगदी बागेत चालल्यासारखंही चालत नव्हतो. ‘ब्रिस्क वॉक’ मला माहिती होता. तसंच मी चालत होतो. शिवाय पाच वर्षं चालण्याची सवय होती. ती अधूनमधून खंडित झाली असली तरी मुळात शरीराला सवय होती. अगदी पूर्वी म्हणजे वयाच्या १३ व्या वर्षापासून ते २४ व्या वर्षापर्यंत खूपच खूप सायकलिंग केलं होतं. त्यामुळं माझे पाय तसे बऱ्यापैकी मजबूत आणि चालायला सक्षम आहेत. त्यामुळं आपण सरासरी नऊ मिनिटांत एक किलोमीटर चाललो, याचं फार आश्चर्य वाटलं नाही. नंतर मात्र, हे अंतर रोज तेवढ्याच वेळात पूर्ण होतंय ना, हे पाहायची खोड लागली. अर्थात एखादा अपवाद वगळता कधीही ४५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागला नाही. चालताना सतत ॲपमध्ये बघायचं नसल्यामुळं मी गाण्यांवर अंतराचे ठोकताळे बांधू लागलो. ‘सोलह बरस की बाली उमर को सलाम’ किंवा ‘सावर रे सावर रे’ ही गाणी एवढी मोठी आहेत, की ती ऐकता ऐकता जवळपास एक किलोमीटर अंतर कापलं जायचं. ते गाणं संपल्यानंतर ॲपमध्ये डोकावलं, की अंतर एकदम वाढलेलं दिसायचं. नंतर नंतर मला गाण्यांचा क्रम आणि कुठलं गाणं संपल्यावर साधारण किती अंतर कापलं गेलं असेल याचाही अंदाज यायला लागला. तो बहुतेकदा बरोबर यायचा. ब्रिस्क वॉक केल्यानं अंगातून घाम पाझरायला सुरुवात व्हायची. टी-शर्ट वरून खाली असा ओला होत जायचा. घामाची रेषा शर्टवर कुठं आल्यावर किती किलोमीटर झाले असतील, याचाही अंदाज बांधायला मी सुरुवात केली. तोही बरोबर यायला लागला. साधारणत: पहिले दोन किलोमीटर अंतर झाल्यावर घाम यायला सुरुवात व्हायची. आधी कपाळावरून भिवयांवर सतत पाणी येत राहतं. मग ते झटकत झटकत चालायचं. नंतर टी-शर्ट ओला व्हायला सुरुवात व्हायची. सुरुवातीला नऊ मिनिटांत एक किलोमीटर पूर्ण झाला नाही, तर मला थोडं वाईट वाटायचं. मग दुसऱ्या लूपला मी वेग काहीसा वाढवायचो. स्वत:समोर काल्पनिक टास्क ठेवायचो. उदा. हे शेवटचे २०० मीटर मी आता दीड मिनिटांत कापले तर नीलला ‘नासा’वाले त्यांच्या टीममध्ये प्रवेश देणार आहेत किंवा मी आज शेवटचा लूप साडेआठ मिनिटांच्या आत पूर्ण केला तर ब्रिटनची राणी मला राजेपद बहाल करणार आहे वगैरे. 

गाण्यांची मजा असते. मी ही ठरावीक गाणी रोज ऐकल्यानं मला त्यातले चढ-उतार, कडवी, म्युझिक पीसेस, खटके-मुरके अगदी पाठ झाले. वास्तविक ही गाणी मी यापूर्वीही अनेकदा ऐकली आहेत. पण आत्ता चालताना ऐकताना विशेष आनंद मिळाला. ‘सोलह बरस की बाली उमर को सलाम’ हे गाणं ऐकताना मी थेट पाच किंवा सहा वर्षांचा होऊन जायचो. जामखेडला आमच्या गावी टुरिंग टॉकीज होती. तिथं सिनेमा सुरू व्हायच्या आधी गाणी लावायचे. माझ्या लहानपणच्या आठवणी १९८१ पासून सुरू होतात. हे गाणं ऐकलं, की मी जामखेडमध्ये पोचतो. माझ्या घरात मी आहे आणि दूरवरून लाउडस्पीकरवरून हे (किंवा ‘एक दुजे के लिए’मधली इतर गाणी) गाणं लागलं आहे, हेच दृश्य डोळ्यांसमोर तरळतं. क्वचित कधी तरी टॉकीजमध्ये जाऊन हे गाणं ऐकलं, की मग तर तेच सूर कानात राहायचे. अनुप जलोटानं गायलेल्या त्या सुरुवातीच्या दोन ओळी आणि नंतर दीदींची जबरस्त तान... अंगावर काटाच येतो. दर वेळी येतो. सोबत लहानपणात घेऊन जाणारा तो स्वरमेळ! हीच गोष्ट ‘बरसात’च्या गाण्यांची. आमच्याकडं ‘बरसात’ आणि ‘श्री ४२०’ची कॅसेट होती. ती मी आमच्या टेपरेकॉर्डरवर लावून सतत ऐकत असे. शक्यतो वरचं कव्हर उघडं ठेवून कॅसेट आत घालायची आणि दोन्ही हात हनुवटीवर ठेवून त्या इकडून तिकडं फिरत जाणाऱ्या तपकिरी टेपकडं आणि मागच्या स्पीकरमधून येणाऱ्या आवाजाकडं एकटक पाहत राहायचं हा माझा छंद होता. ‘हवा में उडता जाए मोरा लाल दुपट्टा मलमल का’ आणि ‘जिया बेकरार है’ ही दोन गाणी आत्ताच्या माझ्या प्ले-लिस्टमध्ये आली आणि काय सांगू! पुन्हा एकदा लहानपणच जागं झालं. चालताना ही गाणं ऐकणं म्हणजे पर्वणीच होती. माझं शरीर आपोआप हलकं हलकं होत जात असे आणि चालण्याचा वेग त्या गाण्याची लय पकडत असे. या सूरांना आपलं शरीर असाच प्रतिसाद देत असतं. ‘सोलह बरस की...’मधली ती अशक्य तान ऐकून अंगावर काटा यायचा आणि पोटात उचंबळून यायचं. ‘हवा में उडता जाए’मधल्या ‘फरफर फरफर उडे चुनरियाँ’ ऐकताना पावलं आपोआप वेगात पडायची. ‘घुंगरू बाजे छुन्नुक छुन्नुक चाल हुई मस्तानी’ ऐकताना मागं वाजणारे घुंगरू ऐकून चालता चालता आपण हवेत उडतोय की काय, असं वाटायला लागायचं. ‘जाने क्या बात है...’मध्ये दीदी ‘बडी लंबी रात है’ हे वाक्य होता होईल तेवढं लांबवून म्हणतात. तेव्हा आपोआप पावलांची गती मंद व्हायची. ‘सावर रे सावर रे’ ऐकताना ‘उंच उंच झुला’च्या वेगासोबत आपलाही वेग वाढायचा. अशा या सगळ्या गमती-जमतींमुळं चालणं आनंददायी झालं.
मी चालताना अगदी अधोमुख होऊन चालतो. याचं कारण आमच्या इथं ट्रॅकवर बरेच जीवजंतू विहरत असतात. बारीक मुंग्या, मुंगळे, इतर काही कीटक असतात. यांच्यावर चुकूनही पाय पडू नये याची दक्षता मी घेत असतो. त्यासाठी सदैव खाली बघून चालावं लागतं. कधी कधी मानेला किंचित रग लागते, पण मी हे कटाक्षानं पाळतोच. कधी तरी कुणी कुत्र्यांना खेळायला तिथं लॉनवर घेऊन येतात. लांबून त्यांना बघितलं, की माझी दिशा बदललीच म्हणून समजा. क्वचित भटकी कुत्रीही येऊन बसतात. पण मी त्यांना घाबरत नाही. वळसा घालून जातो. मात्र, ही पाळीव, आडदांड कुत्री लॉनवर मोकळी सुटली, की मला धडकीच भरते.
चालून झालं, की ॲपवरचे आकडे आणि तिथल्या गमतीशीर प्रतिक्रिया वाचायला मजा येते. नाइस वर्क, श्रीपाद किंवा अनस्टॉपेबल, यू डिझर्व्ह ए ब्रेक वगैरे वाचून हसायचं, स्क्रीनशॉट काढायचा आणि ग्रुपवर टाकून द्यायचा. मग गार सावलीत पाच मिनिटं बसायचं...
अशी ही माझी चालण्याची गोष्ट... ही वाचून तुम्हालाही चालायला प्रेरणा मिळाली तर आनंदच आहे. ‘चालायचंच’ म्हणून सोडून देऊ नका फक्त!

---

30 Sept 2020

व्यंगचित्रांवरील लेख

वक्ररेषेच्या मिषाने...

----------------------

माणसाला वाचायच्या आधी पाहायला येतं. म्हणजेच एखादा लेख वाचण्यापूर्वीच तो एखादं चित्र पाहू शकतो आणि त्याचा अर्थही जाणू शकतो. त्या अर्थानं व्यंगचित्रकला ही लेखनाच्याही आधीची कला आहे, असं म्हणावं लागेल. शिवाय हजार शब्दांचा लेख जे काम करू शकणार नाही, ते एक व्यंगचित्र करू शकतं. 

लहानपणी वृत्तपत्रांत पहिल्या पानावर येणाऱ्या पॉकेट कार्टूनच्या माध्यमातून व्यंगचित्रांची आपली पहिली ओळख होते. कित्येकदा पानावरची मुख्य बातमी कोणती हे वाचण्यापूर्वी आपण अनेकदा हे कार्टून पाहतो आणि मगच इतरत्र वळतो. याचं कारण म्हणजे आपल्या रोजच्या जगण्याशी संबंधित एखादा मुद्दा त्यात हलक्याफुलक्या रीतीनं मांडलेला असतो. आदल्या दिवशी घडलेल्या एखाद्या घटनेवर काही टिप्पणी असते. ती वाचून आणि ते व्यंगचित्र पाहून आपल्या चेहऱ्यावर हलकेच हसू उमटतं. दिवसाची सुरुवात प्रसन्न होते, सकारात्मक होते. व्यंगचित्रातून अगदी मोजक्या शब्दांत फार मोठी प्रतिक्रिया व्यक्त केलेली असते. अनेकदा ती सर्वसामान्य माणसाच्या मनातलंच काही तरी सांगणारी असते आणि त्यामुळंच ती प्रत्ययकारक ठरते. 

व्यंगचित्राची कला म्हणजे विसंगती टिपण्याची कला! यासाठी फार उच्च दर्जाची बुद्धिमत्ता लागते. अवतीभोवती काय चाललंय, याचं भान असावं लागतं. विसंगती टिपायची म्हणजे आधी संगती माहिती असावी लागते. घरातील गृहिणी जसं धान्य निवडून त्यातले खडे फेकून देते, तसंच व्यंगचित्रकाराला समाजातलं जे जे काही टोचणारं, बोचणारं आहे, ते चित्राद्वारे मांडून ते दूर करण्याचं आवाहन समाजाला करावं लागतं. ही प्रक्रिया आपोआप होते. चित्र पाहताना आपल्या अबोध मनात त्यातली विसंगती ठसत जाते आणि प्रत्यक्ष जगण्यात अशी विसंगती न ठेवण्याकडं आपला कल वाढतो. 

व्यंगचित्रकाराची चित्रकला आणि शब्दांवर सारखीच हुकूमत असावी लागते. व्यंगचित्रात चित्र श्रेष्ठ की त्यासोबत लिहिलेले संवाद जास्त श्रेष्ठ, असा वाद कधी कधी उपस्थित केला जातो. माझ्या मते, त्यातलं चित्र हेच श्रेष्ठ! याचं कारण या प्रकाराचं नावच मुळी व्यंग'चित्र' असं आहे; व्यंग'शब्द' किंवा व्यंग'वाक्य' नाही! म्हणजे व्यंगचित्रात शब्द नसतील, तर चालतं. एकही शब्द नसलेलं व्यंगचित्र असू शकतं आणि ते अनेकदा असतंही... आणि ते सर्वश्रेष्ठही असू शकतं. पण चित्र नसेल आणि केवळ संवाद किंवा एखादं विनोदी वाक्य असेल, तर त्याला आपण व्यंगचित्र म्हणू शकणार नाही. तो केवळ शाब्दिक विनोद झाला. अनेक व्यंगचित्रकार शाब्दिक कोट्या किंवा शब्दांच्या कसरतीवर भर देताना दिसतात. पण ती दुय्यम गोष्ट आहे, हे वाचकांनीही सदैव लक्षात ठेवलं पाहिजे. एकही शब्द सोबत नसेल, तरी ते व्यंगचित्र तुमच्याशी बोललं पाहिजे. जगातील सर्वोत्तम व्यंगचित्रकारांची उदाहरणं घेतली तर ती केवळ चित्रांतूनच अधिक बोलतात, हे आपल्या लक्षात येईल. अर्थात आपल्याकडं बोलक्या व्यंगचित्रांची परंपरा आहे. तीही चांगलीच असतात. पण शब्दांना चांगल्या रेषांची जोड मिळणं मात्र आवश्यक असतं. खरं तर हे सूर आणि ताल यांच्यासारखं आहे. दोन्हींच्या मिलाफातून अजोड संगीत तयार होतं. तसं चित्र आणि शब्द यांच्या संयोगातून एक दर्जेदार व्यंगचित्र तयार होऊ शकतं, असं म्हणायला हरकत नाही.

आपल्याकडं दिवाळी अंकांमध्ये व्यंगचित्रं देण्याची परंपरा आहे. माझ्या माहितीनुसार, अगदी पहिल्या दिवाळी अंकातही व्यंगचित्र होतंच. त्यामुळं व्यंगचित्रांना दिवाळी अंकांत हक्काची जागा असते. व्यंगचित्रांच्या उपस्थितीमुळं दिवाळी अंकांचा दर्जा उंचावण्यास मदतच झाली आहे. 'आवाज'सारख्या दिवाळी अंकातल्या 'त्या खिडक्या' हे एके काळी फार आकर्षण होतं. त्या 'खिडकीच्या आड' दडलंय काय, हे पाहण्याची उत्सुकता असे. अनेक घरांत तर हा अंक जणू काही प्रौढांसाठीच असल्यासारखा चोरून वाचला जाई. सूचक व चावट लैंगिक संदर्भ असल्यानं ते तसं होत असावं. (आजच्या पिढीला ती चित्रं दाखवली तर कदाचित त्यांच्या दृष्टीनं ती बालिश ठरतील. तर ते असो.) आमच्या लहानपणी मात्र गोल, घाटदार आणि सौष्ठवपूर्ण सौंदर्यवती स्त्रिया पाहण्याची ती नामी संधी असायची. व्यंगचित्रकारही फार प्रेमानं त्या बायकांच्या पडलेल्या पदराचे आणि आतल्या ऐवजाचे चित्र रंगवीत असत. हा व्यंगचित्रांचा एक प्रकार झाला. बाकी आत पानोपानी समोर येणाऱ्या इतर विनोदी व्यंगचित्रांचं वाचन करणं हाही निश्चितच आनंदाचा भाग असायचा. या व्यंगचित्रांना कुठलेही विषय वर्ज्य नसत. साधारणतः महागाई, संसारी माणसांचे व्याप-ताप, नट-नट्या आणि राजकारण हे तर हातखंडा विषय! एखादे शहर, तिथल्या लोकांचे स्वभाव, सवयी हेही व्यंगचित्रांचे विषय असतात. पुण्यातल्या मिठाईच्या एका प्रसिद्ध दुकानाविषयी एका दिवाळी अंकात पाहिलेलं व्यंगचित्र अद्याप माझ्या स्मरणात आहे. हे दुकान दुपारी एक ते चार बंद असण्याबद्दल फेमस आहे. तेव्हा व्यंगचित्रकारानं थोडं नाव बदलून या दुकानाचं चित्र काढलं. समोर फायर ब्रिगेडचा माणूस आग विझवायला आत चालला आहे, असं दाखवलं. घड्याळात दुपारचा एक वाजलेला दिसतो आहे आणि दुकानाचे मालक दारात उभे राहून त्या फायर ब्रिगेडच्या माणसावर खेकसत आहेत - 'आग विझवायची एवढी हौस होती तर एकच्या आत यायचं!' हा अर्थातच अतिशयोक्ती अलंकार वापरून केलेला विनोद होता. पण तो कायमचा लक्षात राहिलाय तो व्यंगचित्रकारानं या घटनेतलं व्यंग नेमकं हेरल्यामुळं. 

भारतात व्यंगचित्रं म्हटलं, की काही नावं हमखास ओठांवर येतात. शंकर, आर. के. लक्ष्मण, बाळासाहेब ठाकरे, मारिओ मिरांडा यांच्यापासून ते मराठीत शि. द. फडणीस, वसंत सरवटे, मंगेश तेंडुलकर, खलील खान, विवेक मेहेत्रे, हरिश्चंद्र लचके, प्रभाकर झळके, चारुहास पंडित, प्रभाकर वाडेकर, विकास सबनीस आणि प्रशांत कुलकर्णींपर्यंत अनेक नावं आठवतात. पुलंच्या पुस्तकांत वसंत सरवटेंची व्यंगचित्रं असत. अपूर्वाई, पूर्वरंग, व्यक्ती आणि वल्ली, असामी असा मी आणि विशेषतः बटाट्याची चाळ या पुस्तकांत सरवटेंनी काढलेली चित्रं अफलातून आहेत. पुलंचा विनोद आणि सरवट्यांची चित्रं एखाद्या उत्तम चित्रात मिसळून आलेल्या रंगांप्रमाणे यात एकमेकांत सामावून गेली आहेत हे लक्षात येईल. गंमत म्हणजे ती व्यक्तिचित्रणं वाचून आपल्या डोळ्यांसमोर जशी व्यक्ती उभी राहील, साधारण त्याच्या अगदी जवळ जाणारं व्यंगचित्र सरवट्यांनी काढलेलं आपल्याला दिसून येतं. हा तादात्म्यभाव अपूर्व आहे. बटाट्याच्या चाळीची सरवट्यांनी काढलेली चित्रं तर अक्षर वाङ्मय म्हणून मिरवावीत एवढी अप्रतिम आहेत. लेखकाला कदाचित शब्दांच्या जंजाळातून जे सांगता येत नाही, ते व्यंगचित्रकार आपल्या रेषांनी दाखवू शकतो. लेखकाची प्रतिमासृष्टी शब्दांनी आकार घेते, तर व्यंगचित्रकाराची रेषांनी, एवढाच काय तो फरक! मात्र, जेव्हा या दोन्हींमध्ये संकल्पनाचं अद्वैत होतं, तेव्हा वाचकालाही परमानंद होतो. पुलंचे लेख आणि सरवटेंची चित्रं यांनी आपल्याला हा आनंद अपरंपार दिला आहे.

बाळासाहेब ठाकरे यांनी काढलेली राजकीय व्यंगचित्रं नंतरच्या काळात संग्रहाच्या रूपानं आम्हाला पाहायला मिळाली. बाळासाहेबांची रेष जबरदस्त होती. इंदिरा गांधींच्या राजवटीत नऊ राज्यांत काँग्रेस सरकारांचा पाडाव झाला आणि तिथं विरोधी पक्षांचे मुख्यमंत्री आले, तेव्हा बाळासाहेबांनी काढलेलं 'नाकी नऊ आले' हे व्यंगचित्र आजही अनेकांच्या स्मरणात असेल. यात इंदिराजींचं मूळचंच लांब नाक आणखी मोठ्ठं करून दाखवलं होतं आणि त्या नाकावर हे नऊ मुख्यमंत्री बसलेले दाखवले होते. उत्तम व्यंगचित्र कल्पना आणि शाब्दिक कोटी यांचा अचाट संगम या व्यंगचित्रात झाला होता आणि म्हणूनच ते आज जवळपास ५० वर्षांनीही लोकांच्या लक्षात राहिलंय.

वृत्तपत्रांतील कार्टून स्ट्रिप हा प्रकार पाश्चात्त्य देशांत आणि अमेरिकेत लोकप्रिय आहे. आपल्याकडं मराठीत तो जास्त रुजवला आणि लोकप्रिय केला तो चारुहास पंडित आणि प्रभाकर वाडेकर यांनी. 'सकाळ'मध्ये प्रसिद्ध होणारा 'चिंटू' तमाम मराठी वाचकांमध्ये लोकप्रिय झाला. 'चिंटू'च्या लोकप्रियतेनं अगदी लवकरच कळस गाठला. पुलं गेल्यानंतरचा निःशब्द 'चिंटू' आजही लोकांच्या लक्षात आहे. मराठीतील सर्वाधिक लोकप्रिय आणि ऐतिहासिक यश मिळविणारी कार्टून स्ट्रिप म्हणूनच 'चिंटू'चा उल्लेख करावा लागेल. मराठी मध्यमवर्गीय लोकांची मानसिकता, वृत्तपत्राचा वाचकवर्ग, त्यांच्या आवडी-निवडी, त्यांच्या जगण्यातले प्रसंग यांचा एवढा जबरदस्त अभ्यास आणि निरीक्षण पंडित-वाडेकर जोडीनं केलं होतं, की हा 'चिंटू' एकदाही म्हणजे एकदाही कधी फसला नाही. प्रत्येक वेळी तो आनंदच देत गेला. यशाचं एवढं सातत्य राखणं ही कमालीची कौतुकास्पद गोष्ट आहे. मराठी वाचकांसाठी 'चिंटू' हा आता केवळ एक कार्टून स्ट्रिपमधला मुलगा नाही, तर त्याहीपलीकडे जाऊन घरातल्या एखाद्या सदस्यासारखा झाला आहे. केवळ चिंटूच नव्हे, तर यात पंडित-वाडेकर जोडीनं तयार केलेल्या सगळ्याच व्यक्तिरेखा फारच ठसठशीत लक्षात राहिल्या आहेत. चिंटू मालिकेवरून पुढं चित्रपटही तयार झाले. मराठीत तरी ही अभूतपूर्व गोष्ट होती. एक तर चारुहास पंडितांची रेष फारच गोड आहे. अशीच गोड रेष शि. द. फडणीसांचीही आहे. ठसठशीत आणि सामान्य प्रेक्षकांना एकदम अपील होईल, अशी ही सुंदर रेष आहे. त्यामुळंच फडणीसांची 'हसरी गॅलरी' काय, किंवा पंडित-वाडेकरांचा 'चिंटू' काय, मराठी घरांत आणि मनांत अढळ स्थान मिळवून आहेत.

वृत्तपत्रांत पान १ वर येणाऱ्या पॉकेट कार्टूनच्या बाबतीत आर. के. लक्ष्मण यांचं स्थान भारतीय व्यंगचित्रांच्या इतिहासात तरी ध्रुवताऱ्यासारखं आहे, असंच म्हणावं लागेल. आर. के. लक्ष्मण यांनी साकारलेला आणि सदैव अबोल असणारा 'कॉमन मॅन' ही आता एक जिवंत दंतकथा झाली आहे. लक्ष्मण यांच्या या 'कॉमन मॅन'नं पन्नास वर्षांहून अधिक काळ भारतीयांची सकाळ हसरी केली. केवळ हसरी केली असं म्हणता येणार नाही. प्रसंगी उद्विग्न केलं, असहाय केलं, हताश केलं, चीड आणली, संताप आणला, रडू आणलं... थोडक्यात, आमच्या सर्व भावभावना लक्ष्मण यांनी त्यांच्या या छोट्याशा चित्रातून मांडल्या. उत्कृष्ट व्यंगचित्रकार कसा असावा, याचं लक्ष्मण हे जितंजागतं उदाहरण होते. लक्ष्मण यांच्यानंतर ठाकरे कुटुंबाची व्यंगचित्रकला रसिकांना भावली. खुद्द बाळासाहेब आणि नंतर राज ठाकरे यांच्या व्यंगचित्रांनी मराठी जनांना दीर्घकाळ भुरळ घातली. बाळासाहेबांनी तर व्यंगचित्रांना वाहिलेलं 'मार्मिक' हे नियतकालिकच सुरू केलं. माझ्या माहितीनुसार, ते मराठीतलं पहिलं आणि एवढा दीर्घकाळ सुरू असलेलं एकमेव व्यंगचित्र नियतकालिक होय. 'मार्मिक'मध्ये प्रामुख्यानं राजकीय व्यंगचित्रं असतात. मात्र, तसा कुठलाही विषय या नियतकालिकाला वर्ज्य नाही. बाळासाहेबांप्रमाणंच राज ठाकरे यांचीही रेष ताकदवान, पण लयबद्ध आहे. तिच्या एका फटकाऱ्यात अनेकांना घायाळ करण्याचं सामर्थ्य आहे. अर्थात बाळासाहेबांप्रमाणंच राजही पूर्णवेळ राजकारणात उतरल्यानं त्यांच्यातील व्यंगचित्रकारावर तसा अन्यायच झाला आहे. मात्र, या राजकारणाच्या धकाधकीतही ते मधूनच एखादं व्यंगचित्र काढतात, तेव्हा त्यांच्यातला कलाकारही सुखावत असणार.

अलीकडच्या काळात 'लोकसत्ता'त येणारी प्रशांत कुलकर्णी यांची व्यंगचित्रं अतिशय बोलकी आणि परिणामकारक वाटतात. प्रशांत कुलकर्णी यांची राजकीय, सामाजिक समज उत्तम आणि रेषांचं भान पक्कं आहे. त्यामुळं त्यांनी हाताळलेले विषय हमखास चेहऱ्यावर हसू फुलवतात. विकास सबनीस हेही माझे आवडते व्यंगचित्रकार होते. सध्या ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये नुकतीच सुरू झालेली तंबी दुराई यांची ‘असं बोललात!’ ही नवी व्यंगचित्रमालिकाही वाचकांचं लक्ष वेधून घेते आहे. मराठीत अनेक नियतकालिकांमध्ये अनेक वर्षं दिसणारं आणखी एक नाव म्हणजे खलील खान. खलील खान यांचीही व्यंगचित्रं जबरदस्त असतात. त्यांचा तो 'ट्रेडमार्क' छोटा कुत्राही अफलातून आहे. याशिवाय महाराष्ट्रात अनेक नामवंत व्यंगचित्रकार आज चांगलं काम करीत आहेत. त्या सर्वांचाच नामोल्लेख माझ्या अज्ञानामुळं इथं करणं शक्य नाही. तरीही हे सर्वच कलाकार आपल्या कलेच्या माध्यमातून आपल्य सर्वांना हसवताहेत आणि आपलं मनोरंजन करताहेत, यात शंकाच नाही. 

स्वतःच्या चुकांवर किंवा व्यंगांवर किंवा विसंगतीवर हसणारा समाज हा सांस्कृतिकदृष्ट्या प्रगल्भ असतो, असं म्हणतात. याचं कारण आपल्या चुका किंवा विसंगती समजायलाही एक बौद्धिक कुवत लागते. ब्रिटिश समाजाचं उदाहरण याबाबत एक आदर्श उदाहरण म्हणता येईल. एरवी रुक्ष असलेल्या साहेबाला स्वतःवर हसणं जमतं. मराठी समाजात हेच काम आपले व्यंगचित्रकार करीत आहेत. ते नसते, तर आपल्या सामाजिक जीवनातलं ते एक फार व्यंग ठरलं असतं, यात वाद नाही. 

---

(एका नियतकालिकासाठी दिवाळी अंकासाठी दोन-तीन वर्षांपूर्वी लिहिलेला, पण प्रसिद्ध न झालेला हा लेख आहे.)

(वि. सू. - व्याकरणदृष्ट्या व्यंग्यचित्र हा शब्द बरोबर आहे. पण व्यंगचित्र हा शब्द रूढ आहे. म्हणून या लेखात तो तसाच वापरला आहे.)

------