‘हलत्या चित्रां’चा जादूगार
------------------------------
नाशिकजवळील त्र्यंबकेश्वर इथं ३० एप्रिल १८७० रोजी जन्मलेल्या धुंडिराज गोविंद फाळके या माणसानं आपल्या ७३ वर्षांच्या आयुष्यात, सर्वसामान्यांना थक्क करणाऱ्या अनेक गोष्टी केल्या. भारतीय सिनेमा ही त्यांची सर्वांत गाजलेली आणि देशवासीयांना अभिमान वाटावा अशी देणगी! भारतात १९१३ मध्ये त्यांनी तयार केलेला ‘राजा हरिश्चंद्र’ हा पहिला पूर्ण लांबीचा भारतीय चित्रपट मानला जातो. तेव्हापासून ते १९३७ पर्यंत, म्हणजे सुमारे २४ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी तब्बल ९५ चित्रपट व २६ लघुपट तयार केले. ‘सिनेमाचं वेड घेतलेला अफाट माणूस’ अशाच शब्दांत त्यांचं वर्णन करावं लागेल.
वास्तविक त्र्यंबकेश्वरच्या गोविंद फाळके या व्युत्पन्न देशस्थ ब्राह्मणाच्या पोटी जन्मलेला धुंडिराज हा मुलगाही शास्त्रपारंगत होऊन वडिलांचा वारसा पुढं चालवायचा; मात्र दादासाहेबांच्या ललाटी नियतीनं काही वेगळेच भाग्यसंकेत रेखून ठेवले असावेत. कलेची ओढ असलेल्या दादासाहेबांचं सुदैव इतकंच, की त्यांना त्या क्षेत्रात योग्य ते शिक्षण घेता आलं. वयाच्या पंधराव्या वर्षी ते मुंबईत ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’मध्ये दाखल झाले. पाच वर्षांत तिथलं शिक्षण संपवून ते १८९० मध्ये बडोद्याला महाराजा सयाजीराव विद्यापीठातील कला भवनात पुढील शिक्षणासाठी आले. बडोद्यातील वास्तव्यात दादासाहेबांनी शिल्पकला, इंजिनीअरिंग, चित्रकला, रंगकाम आणि फोटोग्राफी आदी विपुल नैपुण्ये प्राप्त केली. त्यानंतर जवळच असलेल्या गोध्रा या शहरात फोटोग्राफर म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. पण फाळकेंचं नशीब काही वेगळंच सांगत होतं. गोध्रात लवकरच प्लेगचा उद्रेक झाला आणि त्यांची पहिली पत्नी व मूल त्या साथीत दगावले. या दुःखद प्रसंगानंतर त्यांनी गोध्रा सोडलंच. लवकरच त्यांची भेट कार्ल हर्ट्झ या जर्मन जादूगाराशी झाली. सिनेमाचा शोध लावणारे ल्युमिए बंधू यांच्याकडं कामाला असलेल्या ४० जादूगारांपैकी हर्ट्झ हे एक होते. फाळकेंना त्यानंतर ‘आर्किऑलॉजी सर्व्हे ऑफ इंडिया’मध्ये नोकरी लागली. पण त्या सरकारी नोकरीत त्यांचं मन रमेना. म्हणून एक दिवस ती नोकरी सोडून त्यांनी प्रिंटिंगचा व्यवसाय सुरू केला. लिथोग्राफी आणि ओलिओग्राफ तंत्रात त्यांनी हुकूमत मिळविली. प्रख्यात चित्रकार राजा रविवर्मा यांच्यासोबत त्यांनी काम केलं. फाळके मुळात हुन्नर असलेलं व्यक्तिमत्त्व होतं. एकाच वेळी त्यांना अनेक गोष्टी शिकायला आवडत. लवकरच त्यांनी स्वतःची प्रिटिंग प्रेस सुरू केली. या व्यवसायामुळं लवकरच त्यांना परदेशी म्हणजे जर्मनीला जाण्याचा योग आला. तिथं आधुनिक युरोपीय तंत्रज्ञान, यंत्रसामग्री आणि अर्थातच कला यांचं अनोखं दर्शन त्यांना घडलं.
परत आल्यानंतर त्यांनी मुंबईत ‘हलत्या चित्रांचा खेळ’ अर्थात ‘द लाइफ ऑफ ख्राइस्ट’ हा मूकपट पाहिला. हा मूकपट त्यांनी वारंवार पाहिला. सिनेमा ज्या यंत्रातून दाखवला जातोय, त्याविषयी त्यांना अतोनात जिज्ञासा निर्माण झाली. आपणही असा सिनेमा का तयार करू नये आणि भारतीय देवदेवतांचं दर्शन का घडवू नये, या विचारानं त्यांना अक्षरशः झपाटून टाकलं. फाळक्यांचा स्वभाव असा होता, की त्यांनी एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला तर ती पूर्ण केल्याशिवाय ते स्वस्थ राहत नसत. त्यांनी मग पाच पौंडाचा एक स्वस्तातला कॅमेरा खरेदी केला आणि वेगवेगळ्या चित्रपटगृहांत जाऊन ते परदेशी सिनेमांचा अभ्यास करू लागले. दिवसातील २० तास ते काम करीत असत. वेड लागल्यासारखं झालं. त्यातून त्यांची तब्येत बिघडली. डोळे जायची वेळ आली. अखेर डॉक्टरांनी तंबी दिल्यावर त्यांनी काही काळ आराम केला. पण सिनेमाचं वेड गेलं नव्हतंच. पत्नी सरस्वती यांचे दागिने गहाण ठेवून त्यांनी सिनेमासाठी लागणारे पैसे उभे केले. घरातल्या अनेक वस्तू विकाव्या लागल्या. सामाजिक बहिष्कार सोसावा लागला. सिनेमाविषयी अनेक गैरसमजुती प्रचलित होत्या. मात्र, दादासाहेबांनी हिंमत सोडली नाही. आपल्या रामायण, महाभारतासारख्या पौराणिक महाकाव्यांत अनेक नाट्यमय प्रसंग आहेत आणि ते सिनेमाद्वारे लोकांना दाखवता येतील, यावर दादासाहेब ठाम होते. त्यांनी ‘राजा हरिश्चंद्र’ ही गोष्ट निवडली. मुंबईत दादर भागात तेव्हा ते राहत होते. त्या बंगल्याच्या आवारात तालमी सुरू झाल्या. त्या काळात तारामतीच्या भूमिकेसाठी स्त्री मिळणं कठीण. या भूमिकेसाठी त्यांनी वेश्यावस्तीतही जाऊन कुणी मिळतंय का याची चाचपणी केली. तेव्हा एका वेश्येने ‘सिनेमा नटी? असलं वाह्यात काम करू आम्ही? आम्ही वेश्या आहोत,’ असं उत्तर दिलं होतं. अखेर साळुंके नावाच्या कलाकाराला दादासाहेबांनी उभं केलं. त्याची मिशी छाटण्याचा प्रसंग आला तेव्हा गहजब झाला. बाप जिवंत असताना मिशी का काढायची, असा प्रश्न उपस्थित झाला. अखेर मोठ्या मिनतवारीनं दादासाहेबांनी सगळ्यांची समजूत काढली. अशा अनेक संकटांना तोंड देत, अखेर दादासाहेबांचा ‘राजा हरिश्चंद्र’ हा पहिला चित्रपट तयार झाला. मुंबईतील कॉरोनेशन थिएटरला तीन मे १९१३ रोजी त्याचा पहिला खेळ झाला. हीच भारतातील चित्रपटयुगाची सुरुवात मानली जाते. (त्यापूर्वी एक वर्ष आधी दादासाहेब तोरणे या गृहस्थांनी ‘पुंडलिक’ हे नाटक चित्रित करून त्याचा सिनेमा याच कॉरोनेशन थिएटरमध्ये दाखवला होता. मात्र, एक तर ते नाटकाचं चित्रण होतं आणि दुसरं म्हणजे त्यासाठी ब्रिटिश सिनेमॅटोग्राफर त्यांनी वापरले होते. त्यामुळं संपूर्णपणे भारतात तयार झालेला पहिला चित्रपट हा मान ‘राजा हरिश्चंद्र’लाच दिला गेला.)
फाळकेंच्या इतर उद्योगांप्रमाणे हाही अपयशी ठरतो की काय, अशी भीती त्यांच्या कुटुंबीयांना वाटत होती. पण तसं झालं नाही. हळूहळू सिनेमाला गर्दी होऊ लागली. बघता बघता ‘राजा हरिश्चंद्र’ पाहण्यासाठी लोकांच्या रांगा लागू लागल्या. त्यानंतर फाळकेंना सिनेमाचा मंत्रच गवसला. त्यांनी अनेक मूकपट तयार केले. त्यात ‘राजा हरिश्चंद्र’नंतर ‘मोहिनी भस्मासुर’ (१९१३), ‘सत्यवान सावित्री’ (१९१४), ‘लंकादहन'’ (१९१७), ‘श्रीकृष्णजन्म’ (१९१८), ‘कालियामर्दन’ (१९१९), ‘बुद्धदेव’ (१९२३), ‘सेतू बंधन’ (१९३२), ‘गंगावतरण’ (१९३७) हे ठळक व गाजलेले मूकपट होत. याशिवाय त्यांनी शैक्षणिक, विनोदी असे अनेक लघुपट, माहितीपट तयार केले. चित्रपट या माध्यमाची शक्तिस्थळे जाणून घेऊन त्याचा अधिकाधिक उपयोग करण्याची त्यांची धडपड होती.
‘राजा हरिश्चंद्र’ यशस्वी झाल्यानंतर दादासाहेबांकडं श्रीमंत व्यापारी, वित्तपुरवठादार, व्यावसायिक यांच्या रांगा लागल्या. सगळ्यांना या नव्या माध्यमातून पैसे कमवायचे होते. सुरुवातीला दादासाहेबांनी पाच व्यावसायिकांसोबत भागीदारीत ‘हिंदुस्थान फिल्म्स’ नावाची कंपनी स्थापन केली. आता भागीदार पैशांची व्यवस्था पाहतील आणि आपण सिनेमाच्या सर्जनशील अंगांकडं लक्ष देऊ शकू, असं त्यांना वाटलं. तंत्रज्ञ, कलाकार यांना प्रशिक्षण देण्यासाठी दादासाहेबांनी मुंबईत एक स्टुडिओही सुरू केला. मात्र, भागीदारांबरोबर वितुष्ट आल्यानं दादासाहेबांनी या कंपनीतून राजीनामा दिला. एवढंच नव्हे, तर चित्रपट क्षेत्रातूनही संन्यास घेण्याची घोषणा त्यांनी केली. त्यानंतर ‘रंगभूमी’ नावाचं नाटक त्यांनी लिहिलं. मात्र, दादासाहेब बाहेर पडल्यानं कंपनीचं दिवाळं निघायची वेळ आली. त्यामुळं भागीदारांनी दादासाहेबांना परत बोलावलं. पण आणखी काही चित्रपट केल्यानंतर दादासाहेब तिथून पुन्हा बाहेर पडलेच.
दादासाहेबांनी स्वतः भरपूर मूकपट तयार केले. मात्र, १९३२ मध्ये बोलपटांचा जमाना सुरू झाला. नव्या तंत्रज्ञानाशी मैत्री करणारे, नव्या कल्पना स्वीकारणारे दादासाहेब बोलपटांच्या झंझावातापुढे मात्र काहीसे गांगरले. त्यांचा ‘सेतू बंधन’ हा १९३२ मध्ये आलेला मूकपट डब करून पुन्हा प्रदर्शित करण्यात आला. मात्र, हे तंत्र काही दादासाहेबांच्या पचनी पडले नाही. ‘गंगावतरण’ या १९३७ मध्ये आलेल्या मूकपटानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीतून निवृत्ती पत्करली आणि ते नाशिकला जाऊन राहिले. तिथंच १६ फेब्रुवारी १९४४ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.
अत्यंत कलंदर, सर्जनशील, द्रष्ट्या अशा या व्यक्तिमत्त्वामुळं भारतात सिनेमाचा जन्म झाला. त्यामुळंच त्यांना ‘भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक’ असं म्हटलं जातं. त्यांच्या सन्मानार्थ केंद्र सरकारने १९६९ मध्ये चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च योगदानाबद्दल दिला जाणारा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ सुरू केला. मुंबईतील गोरेगाव येथील राज्य सरकारच्या चित्रनगरीसही त्यांचंच नाव देण्यात आलं आहे. नाशिक येथेही तेथील महापालिकेने पांडव लेण्यांच्या पायथ्याशी फाळके यांचं उत्कृष्ट स्मारक केलं आहे. दिग्दर्शक परेश मोकाशी यानं २००९ मध्ये दादासाहेबांच्या जीवनावर आधारित ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ हा चित्रपट तयार केला होता. हा सिनेमा त्या वर्षी भारतातर्फे ‘ऑस्कर’लाही पाठविण्यात आला होता.
भारतात जोवर सिनेमा तयार होत राहील, तोवर दादासाहेब फाळके हे नावही कायमच स्मरणात राहील, यात वाद नाही.
---
(काही वर्षांपूर्वी एका वेबसाइटसाठी लिहिलेला लेख)
---