26 May 2021

दिठी - रिव्ह्यू

 पल्याडचं दाखवणारी...
----------------------------

सुमित्रा भावेंचा ‘दिठी’ हा नवा मराठी सिनेमा म्हणजे साध्या डोळ्यांना दिसतं, त्याही पल्याडचं दाखवणारी ‘दिठी’ (दृष्टी) देणारा सिनेमा आहे. सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर असं जोडीनं नाव नसलेला आणि दिग्दर्शक म्हणून सुमित्रा भावे यांचं एकटीचंच नाव असलेला हा पहिला (आणि दुर्दैवानं शेवटचा) चित्रपट. हा सिनेमा दोन वर्षांपूर्वी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) कोथरूडच्या सिटीप्राइडमध्ये एक नंबरच्या स्क्रीनमध्ये पाहिला होता. माझे आवडते लेखक दि. बा. मोकाशी यांच्या ‘आता आमोद सुनासिं आले...’ या कथेवर हा सिनेमा आधारित आहे,  हे कळल्यामुळं तेव्हा आवर्जून रांगेत उभं राहून सिनेमा पाहिला होता. पाहिल्यानंतरच ते रांगेत उभे राहण्याचे कष्ट भरून पावले, हे कळलं होतं. तेव्हापासून तो कधी प्रदर्शित होतोय, याची वाट पाहत होतो. सध्या थिएटर्स बंदच असल्यानं अखेर ‘दिठी’ आता ‘सोनी लिव्ह’वर प्रदर्शित झाला आहे. मी पाहिला त्याला बरेच दिवस झाले होते. म्हणून आज परत एकदा पाहिला आणि मग लिहायचं ठरवलं. सिनेमा संपल्यावर दोन गोष्टींसाठी डोळ्यांत पाणी जमा झालं. एक तर त्यातल्या आशयामुळं सिनेमाला मिळालेली डोळ्यांची ती खास दाद होती. दृष्टीपलीकडचं दाखविणाऱ्या या सिनेमाला नेहमी अलीकडचं दाखवणाऱ्या डोळ्यांनी अशी दाद द्यावी, हे मला विलक्षण वाटलं. दुसरं कारण म्हणजे हे असं दृष्टीपलीकडचं दाखविणाऱ्या सुमित्रा भावे आपल्यात नाहीत, याची अचानक झालेली ऐहिक जाणीव. आपण काय गमावलंय हे लक्षात येऊन पोटात खड्डाच पडला. पण परत मनाला समजवायला हा सिनेमाच धावून आला. आपल्याकडं डोळे आहेत, पण ‘दृष्टी’ सुमित्रामावशीच्या ‘दिठी’नं दिली आहे की... 
आपल्या साध्या-सरळ जगण्यातले तितकेच साधे-सरळ पेच सोडवण्यासाठी संतसाहित्याने फार मोठा आधार दिला आहे. ज्ञानेश्वर माउलींच्या ‘अमृतानुभवा’तील नवव्या प्रकरणातील...

आतां आमोद सुनांस जाले। श्रुतीसि श्रवण रिघाले।

आरिसे उठिले। लोचनेंसी।।

आपलेंनि समीरपणे। वेल्हावती विंजणे।

कीं माथेंचि चांफेपणें। बहकताती।।

जिव्हा लोधली रासे। कमळ सूर्यपणे विकासे।

चकोरचि जैसे। चंद्रमा जालें ।।

फुलेंचि जालीं भ्रमर। तरुणीची जाली नर।

जाले आपुलें शेजार। निद्राळुची ।।

चूतांकुर जाले कोकीळ। आंगचि जाले मलयनिळ।

रस जाले सकळ। रसनावंत ।।

तैसे भोग्य आणि भोक्ता। दिसे आणि देखता ।

हे सारले अद्वैता। अफुटामाजी ।।

यातील पहिल्या ओळीचा आधार घेऊन मोकाशींनी कथा लिहिली आहे. आमोद म्हणजे सुवास आणि सुनांस म्हणजे नाक. जेव्हा सुवासच नाक होतो आणि स्वत:ला भोगू शकतो, तेव्हाची अद्वैताची अवस्था म्हणजे अमृतानुभव. पुढीस सर्व दृष्टान्त याच धर्तीवरचे आहेत. मोकाशींच्या कथेतील केंबळं गावातील रामजी लोहाराचा तरुण मुलगा भोवऱ्यात बुडून मरण पावला आहे. पाच-सहा दिवस झाले, पाऊस हटायला तयार नाही. रामजी गेली तीस वर्षं पंढरीची नियमित वारी करणारा वारकरी आहे. विठ्ठलाचा भक्त आहे. विठ्ठलाची एवढी भक्ती करूनही तरुण मुलगा अचानक देवानं का ओढून नेला, या असीम दु:खात रामजी बुडाला आहे. गावात संतू वाण्याकडे रोज होणाऱ्या पोथीवाचनालाही जाण्याचा उत्साह त्याला नाही. सून बाळंत झाली आणि तिला मुलगी झाली, म्हणून तो तिच्यावरही राग धरून आहे. गावातल्या शिवा नेमाणेची गाय सगुणा व्यायला झाली आहे. शिवा आणि त्याची बायको तुळसा यांना सगुणेची तगमग पाहवत नाहीय. अशा अडल्या गाईला मोकळं करणारी एकच व्यक्ती गावात असते - ती म्हणजे रामजी. मात्र, मुलगा गेल्याच्या दु:खात बुडालेल्या रामजीला कसं बोलवणार? अखेर तुळसा धीर धरून रामजीला बोलावायला जाते... गाय अडली आहे, म्हटल्यावर रामजी सगळं दु:ख विसरून शिवाच्या घरी धाव घेतो... वि-सर्जनाच्या क्षणापासून ते सर्जनाच्या क्षणापर्यंतचा प्रवास पूर्ण होतो आणि रामजीला आपल्या दु:खावर एकदम उतारा सापडतो... त्याच्या या प्रवासाची कथा म्हणजे हा चित्रपट.

मोकाशींची कथाच मुळात खूप चित्रदर्शी आहे. सुमित्रा भावेंना त्या कथेचा आत्मा गवसला आहे. त्यांनाही या कथेत जे दिसतं, त्याच्यापलीकडचं दिसलं आहे. माणसाचं आयुष्य, त्याची सुख-दु:खं, त्यातलं आपलं अडकत जाणं आणि एका दिव्य साक्षात्काराच्या क्षणी त्या सर्व मोहमायेतून सुटका करणारं पल्याडचं काही तरी गवसणं हे सर्व त्यांनी फार नेमकेपणानं या सिनेमात आणलं आहे. या सिनेमातला धुवाँधार पाऊस, फुसांडत वाहणारी नदी आणि ओलागच्च आसमंत ही एक मिती आहे. यात वावरणारी गावातली साध्या पांढऱ्या कपड्यांतली, देवभोळी माणसं, चिखलात फसणारी चप्पल नदीत फेकून देणारी माणसं, टपरीवर विडी ओढत पावसाच्या गप्पा मारणारी माणसं, घरांत कंदिलाच्या प्रकाशात नित्यकर्मं करत राहणारी माणसं ही दुसरी मिती आहे. तिसरी मिती आहे ती शिवाच्या बायकोला दिसणाऱ्या शंकर-पार्वतीच्या व सुग्रास अन्नाच्या स्वप्नाची, गाईच्या पोटात ढुशा देणाऱ्या वासराची अमूर्त आणि रामजीचं मन व्यापून काळ्याभोर आभाळागत उरणाऱ्या ऐहिक दु:खाची अगोचर मिती! कॅमेरा पॅन होत होत मुख्य वस्तूवर स्थिर व्हावा, तसं सुमित्रा भावे आपल्याला पहिल्या मितीकडून तिसऱ्या मितीकडून नेतात. या मितीत आपल्याला रामजीप्रमाणेच ‘आमोद सुनांस जाले’ या अद्वैताचा अमृतानुभव येतो. सपाट पडद्यावर दिसणाऱ्या चित्रांतून असा त्रिमिती अनुभव द्यायला सुमित्रा भावेंसारखे ‘ज्ञात्याचे पाहणे’ असावे लागते. आपल्या क्षणभंगुर आयुष्यातल्या तितक्याच क्षणभंगुर दु:खांचा आपण किती सोस करतो! कितीही देव देव केला तरी पोटच्या मुलाच्या मरणाचं दु:ख कसं पेलणार? मग मोकाशी आणि सुमित्रा भावे आपल्या कथेतून व कलाकृतीतून याचं उत्तर देतात - ते म्हणजे विसर्जनाला, विलयाला उत्तर असतं ते फक्त नव्या सर्जनाचं... कुठल्याही परिस्थितीत माणसाच्या हातांनी हे सर्जन सोडता कामा नये. रामजी जेव्हा त्याला येत असलेलं सर्वोत्कृष्ट काम पुन्हा करतो, त्याच क्षणी त्याच्यातल्या अपार दु:खाचा विलय होतो. तिथं सर्जन जन्माला येतं... माणूस फारच लेचापेचा, स्खलनशील प्राणी खरा; मात्र त्याच्या ठायी असलेल्या बुद्धीचं सामर्थ्यही तेवढंच अचाट, अफाट! माउलींनी ज्ञाता आणि ज्ञेय (जाणणारा व जे जाणायचे आहे ती गोष्ट) यातल्या अद्वैतासाठी जशी रूपकं वापरली, तशीच रूपकं मोकाशींनी आपल्या कथेत वापरली. सुमित्रा भावे यांनीही आपल्या कलाकृतीत ही रूपकं वापरली. वर म्हटल्याप्रमाणे तिन्ही मितींत त्यांनी ही कथा फिरविली आणि प्रेक्षकांनाही हा ‘आमोद सुनांस जाले’ अनुभव दिला. अगदी पोथी वाचण्याचा प्रसंग संतू वाण्याच्या घरात वरच्या माळ्यावर घडतो, या छोट्या प्रसंगातूनही या रूपकांचं दर्शन होतं. 

धनंजय कुलकर्णी यांच्या छायाचित्रणाचा यात मोठा वाटा आहे. यातलं केंबळं गाव त्यांनी अगदी जिवंत केलं आहे. सासवड व आळंदीची वारीची सर्व दृश्यं उच्च आध्यात्मिक अनुभूती देणारी. पार्थ उमराणी यांचं संगीत नेमकं व अपेक्षित परिणाम साधणारं. या कलाकृतीच्या यशात महत्त्वाचा वाटा अर्थातच कलाकारांचा. किशोर कदम, मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, उत्तरा बावकर, गिरीश कुलकर्णी, शशांक शेंडे, अमृता सुभाष, अंजली पाटील या सर्वच कलाकारांनी उत्कृष्ट कामं केली आहेत. मात्र, खास उल्लेख करावा लागेल तो रामजी झालेल्या किशोर कदम यांचा. केवळ डोळ्यांतून त्यांनी रामजीचं आभाळाएवढं दु:ख उभं केलं आहे. पोथी म्हणताना, सुनेशी बोलताना, गाईला धीर देताना अशा सर्व प्रसंगांत हा माणूस त्या पात्राशी कमालीचा तादात्म्य पावतो. या भूमिकेत ते अगदी चपखल बसले आहेत. उत्तरा बावकर छोट्या भूमिकेतही छाप पाडतात. शेवटचा अभंग खासच!

‘दिठी’ का बघायचा तर आपल्याला साध्या डोळ्यांनी जे दिसतं, त्यापेक्षा वेगळं काही जाणवतं का हे चाचपून बघण्यासाठी! त्यासाठी आपण आणि इतर यातला भेद नष्ट व्हायला पाहिजे. आपल्या आत डोकावून बघता आलं पाहिजे. आपलं दु:ख मोठं असं म्हणत बसण्यापेक्षा ते दु:ख निवारण करणारं काही सर्जन आपल्या हातून होतंय का हे तपासता आलं पाहिजे. जेव्हा आपले डोळेच आपली ‘दृष्टी’ होतील, तेव्हा हे सगळं दिसेल. मग ‘मीपण’ गळून पडेल आणि त्या अफाट, अथांग, उत्तुंग अशा गोष्टीशी अद्वैत साधता येईल.

---

ओटीटी - सोनी लिव्ह

दर्जा - चार स्टार


----


8 May 2021

द डिसायपल - रिव्ह्यू

कणसुराची सुरेल मैफल
----------------------------- 

चैतन्य ताम्हाणे या तरुण दिग्दर्शकाचा ‘कोर्ट’नंतर आलेला ‘द डिसायपल’ हा नवा चित्रपट म्हणजे एका कणसुराची सुरेल मैफल आहे. आयुष्यात सगळ्यांचेच तंबोरे सुरेल लागतात, असं नाही. प्रत्येकाला आपल्या जगण्याची मैफल रंगवता येतेच असं नाही. किंबहुना असं रंगलेल्या मैफलीसारखं जीवन लाभणारे फार थोडे. बाकीच्यांच्या आयुष्यात कमअस्सलतेचे, कमकुवतपणाचे, कचखाऊपणाचे कणसूरच अधिक! या कणसुरांना सुरेल जगात स्थान नाही. त्यांचं गाणं कोणी गात नाही. चैतन्यचं कौतुक अशासाठी, की त्यानं या कणसुराचं गाणं गायलं. त्याला भरल्या मैफलीत स्थान दिलं. शास्त्रीय संगीत हा तसा मोठा विषय. या विषयाची पार्श्वभूमी असलेला एकही मराठी चित्रपट अद्यापपर्यंत आलेला मला तरी आठवत नाही. चैतन्यनं हे आव्हान पेललंय. अर्थात त्याचा हा चित्रपट केवळ शास्त्रीय संगीतापुरता मर्यादित राहत नाही, तर कोणत्याही कलेला किंवा जगण्यातल्या कुठल्याही प्रांताला लागू होईल, अशा व्यापक अर्थापर्यंत पोचतो. कला, साधना, गुरु-शिष्य परंपरा, माणसाची स्खलनशील वृत्ती या सर्वांवर नेमकेपणानं बोट ठेवतो आणि प्रत्येक प्रेक्षकाला अंतर्मुख होण्यास भाग पाडतो.
शरद नेरुळकर (आदित्य मोडक) या तरुणाची कथा ‘द डिसायपल’ आपल्याला सांगतो. शरद आपले गुरू पं. विनायक प्रधान (पं. अरुण द्रविड) यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे गिरवतो आहे. त्यालाही मोठा गायक व्हायचंय, मैफली गाजवायच्या आहेत. त्याचे वडील शास्त्रीय गायक होते. मात्र, त्यांना त्यांच्या आयुष्यात फार यश मिळवता आलेलं नाही. शरद जेव्हा या प्रवासाला सुरुवात करतो तेव्हा हळूहळू त्यालाही त्याची मर्यादा समजत जाते. एका अर्थानं त्याला झालेला हा साक्षात्कार आहे. त्याला निराळ्या अर्थाने आलेली ही ‘उपज’ आहे. आपल्याला काय येत नाही, हेही अनेकदा लोकांना कळत नाही. आपल्याला काय जमत नाही आणि आपण आयुष्यात काय होऊ शकत नाही, याचं वेळेवर भान येणं हेही एका अर्थानं यशस्वी आयुष्याचं गमक आहे.याचं कारण हे भान आल्यानंतर माणूस आपल्याला ज्या गोष्टी येतात, जमतात त्या करण्याच्या मागे लागतो. लौकिकार्थाने यशस्वी होतो. तरीही आयुष्यभर एक टोचणी लागून राहतेच. पुलंच्या लेखात एक प्रख्यात गायक वृद्धापकाळी गाताना म्हणतात - मला ती जागा दिसते आहे; पण आता तिच्यापर्यंत पोचता येत नाही. या सिनेमातल्या नायकाला कधीच त्या जागेपर्यंत जाता येत नाही, हाच काय तो फरक! आपण तिथं जाऊ शकत नाही, हे समजण्यापर्यंतचा त्याचा एका तपाचा प्रवास म्हणजे हा चित्रपट!
या चित्रपटाची मांडणी मोठी वेधक आहे. चैतन्यला चित्रभाषेची केवळ उत्तम जाणच नाही, तर त्याची तिच्यावर मांड आहे. ‘कोर्ट’मध्येही त्यानं वैशिष्ट्यपूर्ण कॅमेरावर्क दाखवलं होतं. ‘द डिसायपल’ त्या तुलनेत एवढा गुंतागुंतीचा नसला, तरी यातल्या नायकाचे पेच आहेतच. पहिल्या सिनेमात समाजविषयक भाष्य होतं, तर ते इथं एका व्यक्तीपुरतं मर्यादित आहे. अर्थात, गोष्ट एका व्यक्तीची असली, तरी त्यातला आशय वैश्विकच असेल, याची काळजी दिग्दर्शक घेतो. यातलं त्याचं कॅमेरावर्कही पाहण्यासारखं आहे. इथेही ‘कोर्ट’सारखे लाँग शॉट आहेत. पण ते प्रामुख्यानं मैफलीच्या दृश्यांचे आहेत. इतर वेळी चौकटीतले तपशील अधोरेखित करण्यावर त्याचा भर आहे. त्याच्या गुरूंचं चाळीतलं घर, नायकाचं घर, नाट्यगृहं किंवा सार्वजनिक संस्थांची छोटी सभागृहं, हॉटेल्स, दुकानं हे सगळं कथेच्या ओघात दिसत राहतं. त्याहून सर्वांत महत्त्वाचं पात्र आहे ते मुंबई शहर व इथले रात्रीतले एकांडे रस्ते! नायक आपल्या मोटारसायकलवरून हे शहर हिंडत असतो आणि त्याच वेळी त्याच्या गुरूंच्या गुरू माई उर्फ सिंधूताई जाधव यांनी दिलेली व्याख्यानं तो इअरफोनवरून ऐकत असतो. माईंचे हे संगीतविषयक विचार हा या सगळ्या चित्रपटाचा गाभा आहे. सुमित्रा भावे यांच्या आवाजात आपल्याला ती ऐकायला येतात. या आवाजासाठी सुमित्रा भावेंचा आवाज वापरणं हा दिग्दर्शकाचा ‘मास्टरस्ट्रोक’ आहे. आयुष्यभर एखाद्या विषयाला वाहून घेतलेल्या, साधना केलेल्या व्यक्तीचा आवाज याहून निराळा असणार नाही, असं आपल्याला तो आवाज ऐकताना जाणवतं. सुमित्रा भावेंच्या किंचित कातर आवाजात समजावणीचा समंजस सूर आहे. तो आवाज या चित्रपटाचा मध्यवर्ती टोन सेट करतो.

कथानकाच्या दृष्टीने चित्रपटाचे सरळ दोन भाग आहेत. साधारण २००६ च्या आसपास, जेव्हा नायक २४ वर्षांचा असतो, तेव्हा घडणाऱ्या घटना आणि मग थेट २०१८ मध्ये नायक ३६ वर्षांचा झाला असतानाचा दुसरा काळ समोर येतो. या बारा वर्षांत आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात भौतिक बदल खूप झाले. बटनवाल्या मोबाइलपासून ते स्मार्टफोनपर्यंत आणि छोट्या सभागृहातील मैफलींपासून ते रिअॅलिटी शोपर्यंतचे हे सगळ‌े बदल दिग्दर्शकानं फार चाणाक्षपणे टिपले आहेत. अगदी शरद रात्री मुंबईत रस्त्याने फिरत असताना पार्श्वभूमीवर दिसणाऱ्या इमारतीही उत्तुंग व चकचकीत झाल्या आहेत. निऑन साइन्समधून आवाहन करणाऱ्या जाहिरातीही बदलल्या आहेत. रिअॅलिटी शोमधून देशभर लोकप्रिय झालेल्या एका बंगाली गायिकेची यशोगाथाही नायकाला व आपल्याला समांतर दिसते आहे. क्लासमध्ये मुलाला कॉलेजच्या बँडमध्ये गायला परवानगी मागायला येणाऱ्या गुजराती बाईचा प्रसंगही उत्तरार्धात येतो. या सगळ्यांत शरदही बदलतो. अगदी स्वत:चं फोटोशूट करून वेबसाइट तयार करतो. त्याची मैफल ऐकायला येणाऱ्या आणि पहिल्या रांगेत बसून स्मार्टफोनवर मेसेज चेक करणारे ‘शो अॅरेंजर’ही  दिसतात. शरदही आता यू-ट्यूबवर आपल्या मित्र-मैत्रिणींचे व्हिडिओ बघतो. ते लौकिकार्थाने यशस्वी झालेले दिसतात. अगदी परदेशातही मैत्रिणीच्या मैफली झालेल्या दिसतात. हा सर्व बदल एकाच दृश्यात आपल्याला सहज दिसतो. या सर्व काळात होत चाललेलं संगीत क्षेत्राचं बाजारीकरण, श्रोत्यांची विशिष्ट अपेक्षा, ‘सगळ्यांना भावगीतंच ऐकायची असतात,’ हा सीडी विकतानाचा संवाद, पूर्वी चांगलं वाजविणाऱ्या आणि आता ‘प्लेइंग टु द गॅलरी’ वाजविणाऱ्या सतारवादकाची मैफल (‘कानातून रक्त येईल!’ ही शरदच्या मित्राची प्रतिक्रिया धमाल आहे!) असे सगळे प्रसंग येत राहतात. पूर्वार्धात शरदचे वडील त्यांच्या दोन मित्रांसह ‘तीन तासांवर असलेल्या’ एका शहरात रेल्वेने एक मैफल ऐकायला चालले आहेत. तेव्हाचे त्यांचे संवाद भारी आहेत. मुंबईहून पुण्याला सवाई गंधर्व महोत्सव ऐकायला येणारे हे श्रोते असणार, यात शंका नाही. चित्रपटात हे सरोदवादन एका धरणाच्या काठी निसर्गरम्य ठिकाणी होतं, हा भाग वेगळा. पण श्रोत्यांची सर्व चर्चा ‘सवाई’च्या श्रोत्यांची आठवण करून देते. अशा सर्व गोष्टींवर हा चित्रपट जाता जाता प्रभावी भाष्य करतो. शरदच्या तरुणपणी घडलेला, पण चित्रपटाच्या उत्तरार्धात येणारा एका अतरंगी समीक्षकासोबतचा प्रसंग पण असाच प्रभावी आहे. या सर्व बदलांत एकच गोष्ट बदललेली नसते, ती म्हणजे त्याच्या गुरुजींचं घर. हे फारच सूचक व प्रतीकात्मक आहे. बाकी शरदच्या धारणांना हादरा देणारे असे प्रसंग किंवा घटना घडत असतात, त्यावर शरद त्याच्या परीने उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो. बारा वर्षांनंतर त्याला ‘हे आपल्याला जमणे नाही,’ याचा साक्षात्कार होतो. त्यानंतर तो काय निर्णय घेतो, हे चित्रपटातच पाहायला हवे.

यात आदित्य मोडक या तरुणानं नायक शरद नेरुळकरची भूमिका समजून केली आहे. सीए असलेला आदित्य स्वत: शास्त्रीय गायक आहे. त्याचा रूपेरी पडद्यावरचा हा पहिलाच वावर असावा. या भूमिकेत अनुस्यूत असलेलं एक अवघडलेपण, वैफल्य ही भावना दाखवण्यासाठी आदित्यच्या नवखेपणाचाही उपयोग झाला असावा. त्याचे गुरू पं. विनायक प्रधान यांची भूमिका ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. अरुण द्रविड यांनी केली आहे. तेही स्वत: गायक असल्यानं गाण्याच्या मैफलींचे सर्व प्रसंग जिवंत झाले आहेत. शरदच्या वडिलांच्या छोट्याशा भूमिकेत किरण यज्ञोपवित आणि राजन जोशी या समीक्षकाच्या भूमिकेत प्रसाद वनारसे लक्षात राहतात. अन्य कास्टिंगही उत्तम. चित्रपटातली लोकेशन्स अभ्यासण्यासारखी आहेत. सर्व मैफलींचं चित्रिकरण अगदी ऑथेंटिक आहे.

गेल्या काही वर्षांत आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात वैयक्तिक सुख-समृद्धी खूप आली. पण आपण त्यासाठी कशाची किंमत मोजली, हे बरेचदा आपल्या लक्षात येत नाही. आता सगळं काही झटपट हवंय आपल्याला! एका प्रसंगात शरदचे गुरुजी त्याला म्हणतात, ‘कसली घाई आहे? कुठे पोचायचं आहे?’ हे ऐकताना हे आपल्यालाच उद्देशून म्हटलंय की काय, असं वाटत राहतं. आपण फार जीव तोडून कशाच्या तरी मागे लागलो आहोत आणि त्यासाठी फार महत्त्वाचं, शाश्वत असं काही तरी गमावत चाललो आहोत, असं चित्र आहे. सध्याच्या करोनाकाळात तर या वेगवान व कथित भौतिक प्रगतीचं वैयर्थ पदोपदी जाणवतं आहे. अशा वेळी शाश्वत, दीर्घकाळ टिकणारं काय आहे हे सांगणारा आणि त्याच वेळी तिथं पोचण्यापर्यंतची आपली मर्यादा जाणवून देणारा असा हा चित्रपट आहे. चुकवू नका!

----

ओटीटी : नेटफ्लिक्स 

दर्जा : चार स्टार 

----