जीपीपीचे दिवस...
----------------------
दर वर्षी १५ सप्टेंबरला इंजिनीअर्स डे साजरा होतो. हा दिवस उजाडला, की माझ्या काळजात उगाच धडधडतं. पुण्यातल्या गणेशखिंड रोडवरची गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निकची भव्य इमारत दिसू लागते. त्या दगडी इमारतीचे लांबच लांब कॉरिडॉर आणि त्यात हरवून गेलेला गावाकडचा एक १६ वर्षांचा कावराबावरा मुलगाही दिसू लागतो... डिप्लोमा इंजिनीअरिंगला जाऊनही इंजिनीअर न झालेल्या त्या मुलाची, अर्थात माझीच ही कथा आहे... कथेचा काळ आहे १९९१ ते १९९५...
मी १९९१ मध्ये दहावी झालो. बरे मार्क होते. तेव्हा ८५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्यांनी एक तर सायन्सला जायचं किंवा डिप्लोमा इंजिनीअरिंगला जायचं, अशी प्रथा रूढ होती. मला ८७.२८ टक्के पडले होते. त्यामुळं मी पुण्यात गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निकला येणार, हे जणू विधिलिखितच होतं. तसा मी पुण्यात आलो. माझा जन्म या शहरातला नसला, तरी फार लहानपणापासून मी आत्याकडं पुण्यात येत होतो. त्यामुळं पुणेकर मुलांसारखीच माझीही सुट्टी सारसबाग, पेशवे उद्यान, फुलराणी, शनिवारवाड्यावरची भेळ इ. इ. या प्रकारेच जायची. त्यामुळं पुणं नवीन नव्हतंच. तेव्हा संधी मिळताच इथं यायचं, याची जणू मनात खूणगाठच बांधली होती. त्याप्रमाणे आलो. जुलैतले पुण्यातले ओलेते दिवस खरं तर फार रोमँटिक... मात्र, त्या भव्य कॉलेजात पाऊल टाकताच माझी छाती जी दडपून गेली, ती शेवटपर्यंत! त्यामुळं हा पाऊस, ती ओली झाडं, चिंब दगडी भिंती यांची आणि समोरच्या लेक्चरमधलं आपल्याला काहीही कळत नाहीय, ही भीती यांची एक विचित्र सांगड माझ्या मनात बसली आहे. पुढे किती तरी वर्षं मी जुलै-ऑगस्टचा पाऊस एंजॉय करू शकलो नव्हतो. मराठी माध्यमात शिकलेला मी, इथं पहिल्या दिवसापासून इंग्लिश मीडियममध्ये चालणारा इंजिनीअरिंगच्या अभ्यासक्रम शिकताना पूर्ण बावचळून गेलो होतो. लेक्चरमधलं काही कळत नसलं, तरी आमचं वर्कशॉप मला आवडायचं. घरच्यांनी उत्साहात सायंटिफिक कॅल्क्युलेटर, मिनी ड्राफ्टर आदी आयुधं अप्पा बळवंत चौकातून आणून दिली होती. घरून पाचशे रुपये महिना पॉकेटमनी मिळायचा. होस्टेलच्या शेजारीच मेस होती. तिला अडीचशे की २६० रुपये महिन्याचे भरावे लागायचे. जेवण अर्थात अत्यंत बेचव! पण त्यामुळंच पुण्यातली हॉटेलं पालथी घालायची संधी मिळाली ती तेव्हापासून! तेव्हा युनिव्हर्सिटी चौकात फाउंटन होतं. (त्याला कारंजं नाही, तर ‘फाउंटन’ असंच म्हणायचं असतं.) आम्ही संध्याकाळी विरंगुळा म्हणून फाउंटनला जाऊन बसायचो. मेसचा कंटाळा आला, की तिथंच काही तरी खायचो. संध्याकाळी एक काकू तिथं पोळी-भाजी विकायला यायच्या. रस्त्यावरच टेबल टाकून पोळी, एक भाजी, सोबत एखादी कोशिंबीर आणि कांदा-टोमॅटो त्या द्यायच्या. किंमत पाच रुपये! आम्हाला अगदीच परवडायचं. मी आणि माझा मित्र सुमंत बऱ्याचदा मेसला दांडी मारून ही पोळी-भाजी खायचो आणि फाउंटनवर बसून राह्यचो. पलीकडे पाषाण रोडला चौपाटी होती. तिथं संध्याकाळी तुफान गर्दी व्हायची. ‘मिलाप’ नावाची पावभाजी फार फेमस होती. अगदी वेटिंग असायचं त्याच्याकडं. आम्हाला ती वीस रुपयांची पावभाजी महाग वाटायची पण तेव्हा! कधी तरी खायचो. अंडाभुर्जी पहिल्यांदा खाल्ली ती इथंच!
फाउंटनचा कंटाळा आला, की चतु:शृंगीला जाऊन बसायचो... ती मागेच होती अगदी आमच्या. फिरोदियांच्या बंगल्यावरून एक गल्ली थेट चतु:शृंगीच्या समोर निघते. पूर्वी सेनापती बापट रोड अगदी लहान होता. मला आठवतं तसं तेव्हा दुभाजकही नव्हता. (बहुतेक १९९४ च्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या वेळी पुणे शहरात ज्या भरपूर सुधारणा झाल्या, तेव्हा हा रस्ता रुंद करून दुभाजक बसविण्यात आला.) युनिव्हर्सिटी रोड मात्र मोठा आणि दुभाजक असलेला होता. महत्त्वाचं म्हणजे मला आवडायचे ते सोडियम व्हेपरचे दिवे त्यात मधोमध बसवलेले असायचे. सोडियम व्हेपरचे दिवे ज्या गावातल्या रस्त्यांच्या मधोमध आहेत, तेच खरं ‘शहर’ अशी माझी ठाम समजूत आहे. (आताचे पांढरे दिवे मला ॲनिमिक वाटतात. त्या सोडियम व्हेपरच्या पिवळ्याधमक दिव्यांमध्ये शहर गाभाऱ्यातल्या देवीसारखं तेजस्वी आणि ओजस्वी दिसायचं! असो.) चतु:शृंगीवरून सोडियम व्हेपरमध्ये लखलखणारं पुणं स्वर्गीय भासायचं. गर्दीतही एकांताची साधना व्हायची ती इथंच!
गणेशखिंड रोडवर रेंजहिल्स कॉर्नरला एका झाडाखाली पार आणि सार्वजनिक वाचनालय होतं. मी कित्येकदा ‘टीपी’ म्हणून तिथं जाऊन ज्येष्ठ नागरिकांच्या जोडीनं पेपर वाचत बसत असे. तिथंच एक सार्वजनिक टेलिफोन बूथ होता. त्यात एक रुपया टाकून फोन करता येत असे. एकदा मी आगाऊपणा करून थेट पु. लं.ना तिथून फोन लावला होता. हातात एक रुपयाची चार-पाच नाणी होती. सुनीताबाईंंनीच फोन उचलला. ‘भाईकाका आहेत का?’ मी विचारलं. त्यावर त्या ‘कोण बोलतंय?’ असं म्हणाल्या. मी नाव-गाव सांगितलं. पुढच्या मिनिटाला पु. ल. फोनवर आले. मी त्या रस्त्यावरच्या गोंगाटात साक्षात पुलंशी बोलत होतो. माझे सगळे प्राण कानात आले होते. पु. ल. म्हणाले, ‘काय नाव तुझं?’ मी पुन्हा नाव सांगितलं. ‘शिकतोय,’ असं सांगितलं. तुमचं सगळं साहित्य मला आवडतं, हेही सांगितलं. त्यावर ‘जे वाचलं त्यापैकी काय आवडलं?’ असंही त्यांनी विचारलं. मी ‘सगळंच’ असं म्हटल्यावर ते मंदसे हसले. पुढं काय बोलावं ते न समजून, काही निरोपाचं जुजबी बोलून मी फोन ठेवून दिला. रेंजहिल्स कॉर्नरचा तो पार आणि तो फोन अर्थातच आता तिथं नाही. पण माझ्या मनात तिथं पुलंच्या आठवणींची स्मृतिशिला कायमची कोरली गेली आहे.
मला गाड्यांचे नंबर बघायचा आणि त्यात काही तरी सिक्वेन्स शोधण्याचा नाद होता. मी त्या पारावर बसून येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांचे नंबर बघत असे. तेव्हा एमएच -१२, एमएच - १४ असे क्रमांक देण्याची पद्धत नुकतीच सुरू झाली होती. त्यापूर्वी ‘एमएई’, ‘एमटीएफ’ वगैरे अशा सीरियल असत. पुण्यात वाहनांची नोंदणी तुफान होत असल्यानं पुण्याची सीरियल एमएच १२ - ‘पी’पर्यंत गेली होती. नगरला तेव्हा ‘बी’ किंवा ‘सी’च सीरियल चालू होती. मी ‘पी’ सीरियलवाल्या गाड्यांकडं डोळे विस्फारून पाहत असे. भारतानं १९९१ मध्ये जागतिकीकरण स्वीकारलं होतं. त्याचे दृश्य बदल तेव्हा अजून दिसायचे होते आणि ते कळायचं माझं वयही नव्हतं. अगदी किंचित, धीम्या गतीनं जग बदलत होतं. तेव्हाचं पुणं तुलनेनं खरोखर आटोक्यात होतं आणि फार फार सुंदर होतं. सिमला ऑफिस चौकातून विद्यापीठाकडं जायला निघालं, की दोन्ही बाजूंनी वड, पिंपळ अशा मोठ्या झाडांची दाट रांग होती. ॲग्रीकल्चर कॉलेज चौकापर्यंत तर दुभाजकही नव्हता. तो त्यापुढे सुरू व्हायचा. तो रस्ताही विद्यापीठ चौकापर्यंत अगदी मर्यादित रहदारीचा आणि त्यापुढे तर अगदी शांत शांत असायचा.
‘बी-२८’ हा माझा होस्टेलचा पत्ता होता. इथंच मला शान्ताबाई शेळके आणि वसंत कानेटकरांचं पत्र आलेलं. (म्हणजे आधी मी त्यांना पत्रं पाठवली होती, त्यांची उत्तरं!) होस्टेलच्या खाली एका लाकडी फ्रेममध्ये कापडी पट्ट्यांमध्ये पत्रं लावलेली असत. अनेक मुलं रोज तिथं आपलं पत्र आलंय का हे बघायला घिरट्या घालत. मला बहुतांश कॉलेज बोअरच होत असे. मग मी तिथंच खाली पडलेले पेपर वाचत तासन्-तास बसत असे. आपल्याला दुसऱ्या कुणाची गरज नाही; आपण आपला जीव स्वत: रमवू शकतो, हा फार महत्त्वाचा शोध मला तिथंच लागला. तिथून जवळपास ‘नार्सिसस’ होण्यापर्यंत माझी मजल गेली, त्यात त्या भयाण होस्टेली वातावरणाचा फार मोठा वाटा होता. होस्टेलवर माझ्यावर रॅगिंग वगैरे झालं नाही. मी अगदीच गरीब, सोवळा नव्हतो. गावाकडच्या अत्यंत गावरान अन् सणसणीत शिव्या तोंडी असायच्या. तब्येतीनंही अगदी बारकुडा वगैरे नव्हतो. माझ्याहून बारीक दिसणारी अनेक मुलं असायची. त्यामुळं माझ्या वाट्याला कुणी फारसं जायचं नाही. रूम-पार्टनरही चांगले होते. नीलेश नगरकर आणि महेश जाधव हे माझे फर्स्ट इयरचे पार्टनर. पैकी नीलेशशी मैत्री कायम टिकली. अगदी आजही!
वर्गातली लेक्चरं मला बोअर व्हायची. म्हणजे काही कळायचंच नाही. आपण इथं काय करतोय असं वाटायचं. त्यातल्या त्यात वर्कशॉपमध्ये प्रॅक्टिकल असायची, ती मला आवडायची. लेथ मशिनवर जॉब करणं पहिल्या वर्षी सक्तीचं होतं. मी मन लावून ते करायचो. कारपेंटरी, लोहारकाम हेही केलं. इलेक्ट्रिकलची प्रॅक्टिकल वेगळीकडं असायची. का कोण जाणे, पण इलेक्ट्रिकलला चांगल्या पोरी असायच्या. आमची मेकॅनिकल ब्रँच होती. आमच्या वर्गात केवळ दोन की तीन मुली होत्या. बाकी काही बोलायलाच नको. त्यामुळं आमचं लक्ष कॉमन प्रॅक्टिकलकडं असायचं. आम्ही गावाकडची पोरं नुसतेच त्या गोऱ्यागोमट्या पोरींकडं बघत बसायचो. डे-ड्रीमिंग की काय म्हणतात, ते हेच असावं. त्यात त्या मुली इलेक्ट्रिकलच्या असल्यानं ‘दिवास्वप्न’ हे म्हणणं शब्दश: खरं ठरायचं. तेव्हा मुलग्यांमध्ये होस्टेलची पोरं आणि सिटीतली पोरं अशी एक अघोषित फाळणी ठरलेलीच असायची. या स्मार्ट पोरी सिटीतल्या पोरांना घोळात घेऊन त्यांच्याकडून प्रॅक्टिकलमधले स्वत:चे जॉब करवून घ्यायच्या. ती पोरंही वर्कशॉपमध्ये शब्दश: रंधा मारत बसलेली असायची. आमच्या कँटीनमध्ये एक मुलगा व एक मुलगी सोबत चहा घेत बसले असले, तरी आम्ही त्यांच्याकडे टक लावून बघत बसायचो. तेव्हा एक रुपयाला चहा आणि एक रुपयाला वडापाव मिळायचा. आमच्या कँटीनमधला वडापाव बरा असायचा. आम्ही अनेकदा तो खायचो. पण एकदाही एकाही मुलीला चहासाठी विचारण्याची हिंमत झाली नाही. माझीच नव्हे, तर माझ्यासारख्या गावावरून आलेल्या कोणत्याच मुलाची... बहुदा आम्ही त्या वातावरणानंच निम्मेअर्धे दडपून गेलो होतो.
आम्हाला शिकवायला जे सर होते किंवा ज्या मॅडम होत्या ते मात्र सगळेच्या सगळे भारी होते. त्यातल्या एक मॅडम तर अत्यंत देखण्या होत्या. बॉबकटवाल्या, गोऱ्या अशा! त्यात ‘स्लीव्हलेस’ घालून शिकवायला यायच्या. त्यामुळं ‘स्लीपलेस इन जीपीपी’ अशी माझी (आणि बऱ्याच पोरांची) अवस्था व्हायची, यात शंका नाही. खरं तर आम्ही सेकंड इयरला गेल्यावर या मॅडमची मुलगी आमच्याच कॉलेजात फर्स्ट इयरला आली. पण त्या दोघींत मॅडमच उजव्या होत्या, याबाबत पोरांचं एकमत होतं.
असलं सगळं असल्यावर पहिल्या वर्षी जे व्हायचं तेच झालं. दांडी उडाली. फेल! सपशेल फेल... पुन्हा घरी नगरला जायची लाज वाटायला लागली. पुण्यातच राहिलो. ‘उद्यान प्रासाद’जवळ तेव्हा भिडे क्लासेस फेमस होते. डिप्लोमाची सगळी पोरं तिकडंच जायची. मग मीही तो क्लास लावला. होस्टेल मिळायचा प्रश्नच नव्हता. मग आळंदी रोडवर आत्याच्या फ्लॅटमध्ये राहायला गेलो. सदाशिव पेठ ते आळंदी रोड सायकलवर जायचो. एकटाच त्या फ्लॅटमध्ये भुतासारखा राहायचो. आता कल्पना करूनही अंगावर काटा येतो. पण तेव्हा नापास झाल्याचा गिल्ट फार होता. पहिल्या वर्षीचे पेपर सुटले आणि दुसरं वर्ष सुरू झालं. तोवर बाबरी मशीद पडली होती आणि मुंबईतल्या दंगली आणि १२ मार्चचे बॉम्बस्फोट घडून गेले होते. आमचं दुसरं वर्ष सुरू झालं आणि त्या गणपतीत लातूरचा महाभयंकर भूकंप झाला. तेव्हा ‘संध्यानंद’ पेपर नवीन सुरू झाला होता. दुपारी तो पेपर आला आणि ‘लातूर भूकंपात पाच हजार ठार’ वगैरे हेडलाइन वाचून आम्ही नेहमीप्रमाणे ‘संध्यानंद’ला हसलो. मात्र, संध्याकाळी रेडिओच्या बातम्या ऐकल्या आणि मृतांची संख्या याहूनही किती तरी जास्त असल्याचं कळल्यावर ‘संध्यानंद’च्या बातमीचं महत्त्व कळलं.
पहिल्या वर्षी फिजिक्सला उमराणी सर होते. सर्व शिक्षकांत हे माझे सर्वांत आवडते होते. ते केवळ पुस्तकी शिकवायचे नाहीत. आजूबाजूचं काय काय सांगायचे. मुलांनी चांगलं वाचावं, चांगलं पाहावं, चांगलं ऐकावं याकडं त्यांचा कटाक्ष असे. चांगले इंग्लिश सिनेमे पाहा, असं आवर्जून सांगणारे मला भेटलेले हे पहिलेच सर! अगदी ‘फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट’चं उदाहरण देताना ‘पीसीएच’मध्ये (डेक्कनवरचं तेव्हाचं प्रसिद्ध पूना कॉफी हाउस) असे नळाखाली हात धरल्यावर सुरू होणारे नळ आहेत, ते जाऊन पाहा, असं आवर्जून सांगत. मला ते ऐकून फार उत्सुकता वाटलेली; पण एकदाही तिथं जाण्याची हिंमत झाली नाही.
मॉडेल कॉलनीत तेव्हा शारंगपाणी सरांचा गणिताचा क्लास होता. मी संध्याकाळी तिथं जाऊन बसायचो. क्लास लावूनही इंजिनीअरिंगचं इंग्लिशमधलं गणित काही केल्या सुटलं नाहीच. इंटिग्रेशन आणि डेरिव्हेशननं फार डोकं खाल्लं. काहीच जमायचं नाही. पण हे सर गप्पीष्ट होते. वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारायचे. निवृत्त झालेले, आजोबा टाइप असे ते होते. म्हणून आवडायचे. मी त्यांच्या गप्पा ऐकायलाच जायचो तिथं.
तेव्हा ई-स्क्वेअर मल्टिप्लेक्स नव्हतं. आम्हाला सर्वांत जवळ होतं ते राहुल ७० एमएम. (हे नाव असं एकत्रच उच्चारायचं!) ‘राहुल’ची फार शान होती तेव्हा. आम्ही सायकलवरून तिथं जायचो. गणेशखिंड रोडवर सगळा उतारच असायचा. चार पायडल मारले, की सायकल ‘राहुल’च्या दारात! तेव्हा अनेक लोक सायकली वापरायचे. त्यामुळे बहुतेक थिएटरमध्ये आत रीतसर सायकल स्टँड असत. तिथं सायकल लावायची. तेव्हा पार्किंगला एक रुपया घ्यायचे. आम्ही १६-१७ वर्षांची मुलं... कधी आत सोडायचे, कधी नाही! पण चुकून आत सोडलंच तर मज्जाच असे आमची... ‘प्रौढ शिक्षणा’चे खरे धडे गिरवले ते तिथं! अर्थात नेहमी तिथंच सिनेमा पाहायचो असं नाही. कधी ‘अलका’ला, तर कधी ‘प्रभात’ला ‘माहेरची साडी’ही बघायचो. ‘डेक्कन’वर आता आर डेक्कन मॉल उभा आहे तिथं पूर्वी डेक्कन टॉकीज होती. अगदीच साधी. वर बहुतेक सिमेंटचे पत्रे असावेत. छोटीशी बाल्कनी होती. तिथं मॅटिनीला कायम ‘घायल’ लागलेला असायचा. आम्हा पोरांना ती पर्वणीच. आम्ही कित्येकदा सायकली काढून तिथं ‘घायल’ला जाऊन बसायचो. सात किंवा दहा रुपये तिकीट असायचं. बाल्कनीत झुरळं फिरायची. पण चिडलेल्या सनीसमोर आम्हाला त्याची फिकीर नसायची. अनेक प्रेमीयुगुलांचंही हे हक्काचं ठिकाण होतं.
पहिल्या वर्षाची अजून एक आठवण आहे. तेव्हा म्हणजे १९९२ च्या सुरुवातीला पुणे महापालिकेच्या निवडणुका होत्या. निवडणुकीसाठी मतदानाचं वय नुकतंच १८ करण्यात आलं होतं. आमच्या मॉडेल कॉलनीचा तेव्हा ११० नंबरचा प्रभाग होता. महापौरपद भूषविलेले काँग्रेसचे एक माननीय त्यांचा नेहमीचा वॉर्ड महिला राखीव झाल्यानं या वॉर्डातून उभे होते. ते एकदा होस्टेलवर आले आणि त्यांनी सर्व मुलांना मतदान करण्यासाठी येण्याचं आवाहन केलं म्हणे. (कारण ते आले तेव्हा मी होस्टेलला नव्हतो.) आमच्यातली फर्स्ट व सेकंड इयरची बरीचशी म्हणजे ९० टक्के मुलं दहावीनंतर आली होती आणि त्या सर्वांचं वय १८ पेक्षा कमीच होतं. मात्र, गंमत म्हणजे या माननीयांनी सर्व पोरांची नावं मतदारयादीत घातली आणि बऱ्याच मुलांनीही अल्पवयातच मतदान केलंही! मी मात्र नावही नोंदवलं नाही आणि अर्थात मतदानालाही गेलो नाही.
आमचं जीपीपीचं ग्राउंड चांगलं मोठं होतं. आमच्या ए आणि बी या होस्टेलच्या समोरच हे मैदान होतं. आमच्या कॉलेजची बरीचशी मुलं या मैदानावर क्रिकेट खेळत. आमच्या वर्गात बोडस नावाचा मुलगा होता. त्याचं पहिलं नाव विसरलो. तो अप्रतिम ऑफ स्पिन टाकायचा. तो माझा मित्र होता. त्याच्यामुळंच एकदा मलाही मैदानात उतरण्याची संधी मिळाली. तोवर मी गावाकडं भरपूर क्रिकेट खेळलो असलो, तरी प्रॉपर पॅड बांधून, इनर गार्ड लावून बॅटिंगला उतरण्याची ही पहिलीच वेळ होती. मी फार भाव मारून घेतला. बॅटिंगला उभा राहिलो आणि पहिलाच चेंडू सूं सूं... करीत कानाजवळून गेला तेव्हा खरं क्रिकेट कळलं. मी कशाबशा तीन-चार धावा केल्या आणि आउट झालो एवढंच आठवतंय. त्यानंतर पुन्हा मला टाइमपास म्हणूनदेखील संघात घेण्याचं धाडस बोडसला झालं नसावं.
खेळाचं मैदान गाजवू शकलो नसलो, तरी गॅदरिंगच्या वेळी झालेली क्विझ कॉम्पिटिशन मी गाजवली. माझं ‘जीके’ उत्तम होतं आणि त्या जोरावर मी पहिल्यांदाच मेकॅनिकलला विजेतेपद मिळवून दिलं. या प्रसंगानंतर वर्गात माझा भाव वधारला. पहिल्या वर्षाला आमच्या गॅदरिंगला प्रमुख पाहुणे म्हणून द. मा. मिरासदार आले होते. त्यांच्या हस्ते मला आणि फाटकला क्विझचं पहिलं बक्षीस मिळालं. जीपीपीमधल्या हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या सुखद आठवणींमधला हा एक प्रमुख क्षण होता. त्याच गॅदरिंगला थर्ड इयर इलेक्ट्रिकलच्या संदीप खरे नावाच्या मुलानं स्वत: पेटी वाजवत, स्वत:च लिहिलेली आणि संगीत दिलेली ‘मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यांत’ ही भन्नाट कविता ऐकवली होती, तेव्हा आम्ही पोरं वेडेच व्हायचे बाकी राहिलो होतो. नंतरच्या वर्षी राजा गोसावी प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. (किंवा उलटही असेल. आता आठवत नाही.) असो.
दुसऱ्या वर्षीही नापास झालो आणि घरी आलो. त्या काळात नगरला ‘लोकसत्ता’त प्रूफरीडर म्हणून काम मिळालं आणि आयुष्याला कलाटणी मिळाल्यासारखं झालं. त्या एका वर्षात आपल्याला काय येतंय आणि आपण काय केलं पाहिजे, याचं नेमकं आकलन झालं. तरीही थर्ड इयर सुरू झाल्यावर पुन्हा कॉलेजला आलो आणि शिकायला लागलो. आता पुन्हा नवी बॅच सोबत होती. माझ्याबरोबरची सगळी मुलं पास होऊन पुढं निघून गेली होती. पहिल्या दोन महिन्यांतच जबरदस्त फ्रस्टेशन आलं. त्यात पाऊस सुरू झाला. त्या ओल्याचिंब वातावरणात दगडी इमारती पुन्हा अक्राळविक्राळ हसत, खदाखदा फेर धरून नाचू लागल्या. दुसऱ्या दिवशी मशिन डिझाइनची टेस्ट होती. त्या मॅडम भलत्याच कडक होत्या. त्यांच्या धाकाने तर आणखीन गळून गेल्यासारखं झालं. बाहेर वेड्यासारखा पाऊस कोसळत होता. एका क्षणी मनानं ठरवलं, की बास्स! आता नाही हे शिकायचं... हे आपल्याला येणार नाही, जमणार नाही. त्यापेक्षा पेपरमध्ये काम करायचं. जिथं काम करण्यात आनंद मिळतो तेच काम करायचं. कुठून बळ आलं, कुणास ठाऊक! सरळ गादी गुंडाळली, सामान बांधलं, बादली घेतली, सायकल घेतली आणि रिक्षा करून शिवाजीनगरला आलो. तिथून एसटीनं थेट घरी! घरच्यांना धक्काच बसला. मी किमान थर्ड इयर पूर्ण करून पदविका पदरात पाडून घ्यावी, असं त्यांचं रास्त म्हणणं होतं. मात्र, मी माझ्या निर्णयावर ठाम होतो. दुसऱ्या दिवशी जाऊन ‘लोकसत्ता’च्या ऑफिसमध्ये हजर झालो आणि सांगितलं, मला काम द्या... सगळं सोडून आलोय.
त्या दिवसापासून मी आजतागायत ‘जीपीपी’च्या आवारात पाऊलही ठेवलेलं नाही. माझं टीसी अजूनही तिथंच आहे. त्या कॉलेजपाशी काही तरी सोडून यायला हवं ना, म्हणून ते ट्रान्स्फर सर्टिफिकेट तिथंच ठेवलंय. आज २५हून जास्त वर्षं होऊन गेली. त्या कॉलेजच्या आवारात पाऊल ठेवलं नसलं तरी काय झालं! तिथं मी आयुष्यातली महत्त्वाची अशी चार वर्षं काढली आहेत. वय वर्षं १६ ते २०! ती कशी विसरणार? आणि त्या दिवसांनी मला काहीच दिलं नाही, असं म्हणणं तर फार मोठा अपराधच ठरेल. पुढच्या सगळ्या दिशा आणि मार्ग अचूक आले, याचं श्रेय या पहिल्याच चुकलेल्या वळणाला नको का द्यायला?
-----
(पूर्वप्रसिद्धी : साहित्य चपराक दिवाळी अंक २०२१)
---