16 Nov 2022

रोहन मैफल - ‘पेन’गोष्टी - भाग ७ व ८

भाग ७
--------

साहित्यानंद वर्धिष्णू होवो...
--------------------------------

आगामी ९६ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्ध्याला होणार आहे, यावर साहित्य महामंडळानं अखेर शिक्कामोर्तब केलं. साहित्य महामंडळाचं मुख्यालय आता मुंबईकडं आलं आहे आणि आता पुढली तीन वर्षं उषा तांबे मॅडम यांच्याकडं मराठी साहित्याचं कुलमुखत्यारपत्र असणार आहे. साधारणत: ज्या विभागीय साहित्य परिषदेकडं महामंडळाचं अध्यक्षपद असतं, ती परिषद आपल्या भौगोलिक कार्यक्षेत्रात साहित्य संमेलन भरविण्यासाठी आग्रही असते आणि ते रास्तही आहे. त्या हिशेबानं आता मुंबई-ठाणे किंवा कोकणात संमेलन व्हायला हवं होतं. मात्र, तसं न होता, ते एकदम विदर्भात गेलं. याचं कारण विदर्भ साहित्य संघाची शताब्दी होय. विदर्भ साहित्य संघ ही केवळ नागपूर किंवा विदर्भच नव्हे, तर अखिल महाराष्ट्रातील एक प्रमुख आणि जुनी अशी साहित्य संस्था होय. अशा संस्थेची शताब्दी असताना त्यानिमित्ताने आम्हाला संमेलन भरवू द्यावं, अशी आग्रही मागणी वि. सा. संघानं महामंडळाकडं केली होती. महामंडळाचं मुख्यालय मराठवाड्याकडं, म्हणजेच कौतिकराव ठाले पाटलांकडं असतानाच ही मागणी आली होती आणि महामंडळानं या मागणीला तत्त्वत: होकारही दिला होता. त्यानुसार आता हे संमेलन वर्ध्याला (किंवा वैदर्भीय मंडळींच्या भाषेत वर्धेला) होणार आहे. कौतिकरावांना उदगीरला त्यांच्या कार्यकाळातलं अखेरचं संमेलन घेता यावं, म्हणून साहित्य महामंडळाचं मुख्यालय एक महिना अतिरिक्त काळासाठी मराठवाड्याकडं राहिलं. तांबे मॅडमनी तिथंही समजूतदारपणा दाखवला. आता महामंडळानं आधीच्या कार्यकाळात दिलेला शब्द पाळून तांबे मॅडमनी आपला समजूतदारपणा द्विगुणित केला आहे. आता विदर्भ साहित्य संघाचं आदरातिथ्य अनुभवण्याची संधी संपूर्ण राज्यभरातील साहित्यरसिकांना मिळणार आहे.
वर्धा म्हटलं, की आम्हाला आणि (बहुतेक विदर्भेतर रहिवाशांना) सेवाग्राम आठवतं. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या पावनस्पर्शानं पुनीत झालेल्या या भूमीत होणाऱ्या साहित्य संमेलनाचं अध्यक्ष कोण असणार, याबाबत आता उत्सुकता आहे. विदर्भ साहित्य संघाच्या मनात (आणि अर्थात तांबेबाईंच्या) कोण आहे, यावर सगळं अवलंबून आहे. हे संमेलन जानेवारीत ठेवलंय, ते एक बरं झालं. विदर्भात जाण्यासाठी हिवाळा हाच योग्य ऋतू आहे. विदर्भातलं आदरातिथ्य जोरदार असलं, तरी वर्धा हा सेवाग्राममुळं (तहहयात) दारूबंदी असलेला जिल्हा आहे, याचंही भान साहित्यरसिकांनी ठेवलेलं बरं! अर्थात, साहित्यिक असोत वा साधे रसिक; मैफल रंगवायची तर ते कशीही रंगवू शकतात यात वाद नाही. मात्र, अट्टल रसिकांचे जरा हालच होतील, हे खरं! एकूण मजा येणार आहे.
वर्ध्याला होणारं साहित्य संमेलन हे ९६ वं असणार आहे. याचा अर्थ ९७ व ९८ वं साहित्य संमेलनही मुंबईकडे महामंडळाचं मुख्यालय असताना होईल. त्यानंतरची तीन वर्षं हे मुख्यालया पुण्याकडं असणार आहे. म्हणजेच ९९, १०० व १०१ अशी तीन अत्यंत महत्त्वाची व मानाची संमेलनं भरविण्याचा मान पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेला मिळणार आहे. कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांच्या डोक्यात हे सगळं असणारच. पुण्याच्या ‘मसाप’च्या ऐतिहासिक माधवराव पटवर्धन सभागृहाचं नूतनीकरण करण्याचं काम त्यांनी हाती घेतलं आहे. ते काम जवळपास पूर्ण झालं असून, मसापचा हा नवा हॉल अत्याधुनिक स्वरूपात रसिकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही वर्षांत हे काम होणं आवश्यक होतं, ते अखेर झालं आहे. ‘मसाप’च्या त्या ऐतिहासिक सभागृहानं किती तरी साहित्यिक कार्यक्रम बघितले. किती तरी वाद-चर्चा झडल्या. तिथल्या भिंतींवर टांगलेले आतापर्यंतच्या सर्व संमेलनाध्यक्षांचे फोटो त्याचे कायमचे साक्षीदार आहेत. मात्र, त्या छोट्या हॉलची प्रेक्षकसंख्या अगदीच मर्यादित असायची. (जवळपास रोज संध्याकाळी होणाऱ्या कार्यक्रमांना तेवढीही गर्दी नसायची तो भाग वेगळा!) मात्र, काहीही असो, पुण्यातल्या साहित्य रसिकांच्या मनात या वास्तूचं आणि या सभागृहाचं स्थान कायमच प्रेमाचं राहील, यात शंका नाही. आता तो सर्व इतिहास झाला. इमारतीच्या नूतनीकरणासोबतच आणखी काय काय आणि कशाकशाचं नूतनीकरण प्रा. जोशी आणि त्यांची कार्यकारिणी करते हे बघायचं.
‘मसाप’तर्फे दोन वर्षं करोनामुळं लांबणीवर पडलेले साहित्य पुरस्कार मागच्या आठवड्यात पुण्यात समारंभपूर्वक देण्यात आले. ज्येष्ठ हिंदी साहित्यिक अशोक वाजपेयी यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आलं होतं. ‘व्यवस्थेला प्रश्न विचारणे हे साहित्यिकांचे काम’ अशा अर्थाचे भाषण वाजपेयी यांनी या वेळी केलं.  आपले संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांनीही आपल्या भाषणातून नेमके असेच विचार मांडले होते. वाजपेयी यांनी जवळपास तेच मुद्दे पुन्हा अधोरेखित केले. या सोहळ्यात ज्येष्ठ विज्ञान लेखक निरंजन घाटे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला, हा सर्वांत छान क्षण होता. घाटे गेली कित्येक वर्षं निरलसपणे आणि निष्ठेनं विपुल लेखन करीत आले आहेत. त्यांच्याइतका बहुप्रसवा लेखक अलीकडच्या काळात सापडणं कठीण. त्यांच्या साहित्यसेवेचा यथोचित गौरव झाला, अशीच भावना उपस्थित रसिकांची होती. बाकी मसापचे इतर वार्षिक पुरस्कार दोन वर्षांचे मिळून देण्यात आल्यानं आता साहित्यशारदेचा दरबार पुन्हा गजबजल्यासारखा वाटतो आहे. मसापतर्फे २० ते २५ प्रकारचे विविध पुरस्कार वेगवेगळ्या साहित्य प्रकारांतील सर्वोत्कृष्ट साहित्यासाठी दिले जातात. हे पुरस्कार मानाचे असले तरी पुरस्कारार्थींना अधिक रक्कम मिळायला हवी. त्यासाठी रसिक दात्यांनी पुरस्कर्ते म्हणून पुढं यायची आवश्यकता आहे. तसं झालं तर पुरस्कार घेणाऱ्या साहित्यिकांनाही हुरूप येईल.
करोनाकाळानं जवळपास दोन वर्षं थंडावलेल्या साहित्य व्यवहारानं आता पुन्हा जोर धरला आहे. गेल्या आठवड्यात लोकप्रिय लेखिका सुधा मूर्ती याही पुण्यात होत्या. त्यांच्या कार्यक्रमाला लोटलेली तुफान गर्दी ‘चांगल्या साहित्याला व चांगल्या लेखकाला मरण नाही आणि पर्यायही नाही,‘ हेच पुन:पुन्हा अधोरेखित करत होती. हा साहित्यानंद वर्धिष्णू होवो, हीच वर्ध्याच्या संमेलन घोषणेप्रसंगी ईश्वराकडे प्रार्थना!

(२९ मे २०२२)

---

भाग ८
---------

कलेचा आस्वाद कसा घ्यावा?
-----------------------------------

पुण्यात वेगवेगळ्या प्रकारचे वर्ग कायम सुरू असतात. जपानी केशरचनेपासून ते आफ्रिकन वेषभूषेपर्यंत, काश्मिरी खाद्यपदार्थांपासून ते केेरळच्या आरोग्यप्रसाधनापर्यंत आणि गच्चीतल्या बागेपासून ते घोड्यांच्या पागेपर्यंत सगळ्या गोष्टींचे ‘क्लास’ इथं घेतले जातात. मात्र, सध्या ‘कलेचा आस्वाद कसा घ्यावा?’ हा वर्ग घेण्याची नितांत आवश्यकता आहे.
ग्रंथालयांत पुस्तकांची काळजी कशी घ्यावी, याबाबत हजारेक सूचना लिहिलेल्या असतात. तरीही पुस्तकांचे कोपरे दुमडणं, पुस्तकांची पानं फाडणं, मजकुरावर खुणा करणं, लेखकाला वाह्यात सूचना करणं असले प्रकार सुरूच असतात. तीच प्रथा सिनेमा आणि नाटकं बघतानाही बहुसंख्य प्रेक्षकांनी जारी ठेवली आहे. पॉपकॉर्नसह इतर अनेक आवाज करणारे पदार्थ खाणं, समोरच्या खुर्चीवर पाय ठेवणं, ते नाही जमलं तर समोरच्या खुर्चीला खटक खटक पाय मारणं, सोबत आलेल्या माणसासोबत अखंड गप्पा मारणं, मोबाइल काढून सतत मेसेज चेक करणं किंवा आलेला प्रत्येक फोन घेऊन मोठ्या आवाजात बोलणं... एक ना दोन! हे सर्व प्रकार करताना आपण काही चुकीचं करतो आहोत, याची कसलीही जाणीव या निरागस जीवांना नसते.
हल्ली हा अनुभव वारंवार यायला लागला आहे. नाट्यगृहांत, चित्रपटगृहांत, शास्त्रीय संगीताच्या मैफलीत किंवा अगदी चित्रप्रदर्शनांतही! आपल्याला एकाग्रपणे कुठल्याही कलाकृतीचा आस्वाद घेताच येणार नाही, याबद्दल प्रेक्षकांची आता खात्री पटत चालली आहे. महत्त्वाचं कारण अर्थातच आपल्या हातात आलेला मोबाइल नावाचा उपद्रव. वेळी-अवेळी वाजणाऱ्या मोबाइलच्या रिंगमुळे या सर्व ठिकाणी आपल्याला त्रास होऊ लागला आहे. प्रत्येक कार्यक्रमाच्या आधी मोबाइल ‘सायलेंट मोड’वर टाकण्याची सूचना दिली जाते. मात्र, ती काही जणांना समजत तरी नाही किंवा ते दुर्लक्ष तरी करतात. असे लोक थोडेच असतात हे खरंय; पण त्यांच्यामुळं होणारा उपद्रव मात्र सगळ्यांना सहन करावा लागतो. नाटक किंवा कुठलीही कलाकृती सादर होत असताना, प्रेक्षक म्हणून आपण काही मूलभूत नियम पाळले पाहिजेत, याबाबत काही दुमत नसावं. आम्ही तिकीट काढून नाटक बघतो, त्यामुळे आम्ही वाट्टेल तसे वागू, या सबबीला तर अर्थच नाही. आपण अनेक सेवांसाठी पैसे मोजतो. ते पैसे त्या सेवांसाठी असतात; त्या बदल्यात आपण केवळ ती विशिष्ट सेवा विकत घेतलेली असते. सेवा देणारे लोक आपले नोकर होत नाहीत, ही गोष्ट अशा सबबी सांगणाऱ्यांनी ध्यानात ठेवायला हवी. ‘विमानाचं तिकीट काढलंय, पैसे मोजलेत म्हणून आता जरा पाच मिनिटं खिडकी उघडू द्या,’ असं म्हणून चालेल काय? किंवा हॉटेलमध्ये पैसे मोजले, म्हणून आपण तिथल्या प्लेट उचलून घरी आणत नाही. नाटकाचं तिकीट काढलंय, याचा अर्थ ती कलाकृती बघण्यासाठी मोजलेले ते दाम आहेत. त्या बदल्यात एक चोख कलाकृती सादर करण्याचं काम कलाकारांचं आहे. त्यामुळं कलाकारानं त्याच्या इतर वैयक्तिक अडचणी काहीही असल्या, तरी रंगमंचावर पाऊल ठेवल्यापासून ते पडदा पडेपर्यंत आपल्या भूमिकेत शिरून काम केलंच पाहिजे, ही अपेक्षा जेवढी रास्त, तेवढीच प्रेक्षकांनी त्या कलाकृतीचा सामुदायिक आस्वाद घेता येण्यासाठी केलेल्या नियमांचं पालन करण्याची अपेक्षाही योग्यच!
जेव्हा या अपेक्षांना काही कारणांनी तडे जायला सुरुवात होते, तेव्हा खरी अडचण येते. जेव्हा या अपेक्षा उभयपक्षी मान्य असतात आणि दोघांकडूनही त्या व्यवस्थित पाळल्या जातात, तोवर सगळं छानच चाललेलं असतं. मात्र, हल्ली मोबाइलच्या अतिरेकी वापरामुळं या अपेक्षा पूर्ण होणं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय. मोबाइल वापरणाऱ्या अनेक लोकांना तो वापरण्याच्या सभ्य पद्धती अजिबात माहिती नसतात. मुळात एखादी व्यक्ती नियम पाळते म्हटलं, की सगळेच नियम पाळते आणि नियम तोडणारे सगळीकडेच नियम तोडतात. समोरच्या खुर्चीवर पाय टाकून बसणे किंवा मागून लाथा मारणे इथपासून ते मध्यंतरात चहा-वड्याच्या स्टॉलवर ढकलाढकली करणे, अगदी स्वच्छतागृहातही किळस येईल अशा पद्धतीने वागणे अशा गोष्टी करणारे लोकच मोबाइल वाजविणाऱ्यांमध्ये आघाडीवर दिसतात. याशिवाय पुण्यात तरी नाटकाला येणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त असते. त्यांना मोबाइल नीट ‘सायलेंट मोड’वर टाकता येत नाही. फोन वाजला, की तो घेतलाच पाहिजे अशा मानसिकतेची ही पिढी आहे. नाटक सुरू असताना अचानक फोन वाजला, की त्यांची होणारी धांदल बघायची. वास्तविक, मोबाइल ‘स्विच ऑफ’ करणे किंवा ‘सायलेंट मोड’वर टाकणे हे फारच सोपं काम आहे. ही पिढी आपल्या नातवांकडूनही ते सहज शिकू शकते. या लोकांकडून मुद्दाम हे घडत नाही, हे जेवढं खरं, तेवढंच हे घडू नये यासाठी ते प्रयत्नही करत नाहीत, हेही तितकंच खरं!
फिल्म फेस्टिव्हलमध्ये जागतिक दर्जाचे चित्रपट बघणं हा एक आनंददायक अनुभव असतो. तिथं येणारा प्रेक्षक पुष्कळसा सुज्ञ असतो. मात्र, एरवी नेहमीच्या मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा बघायला गेलं, की आपल्यासमोर आज काय वाढून ठेवलंय, या भीतीनं पोटात गोळाच येतो. एखादा टाइमपास, करमणुकीचा सिनेमा असेल तर एक वेळ हा दंगा खपूनही जातो. मात्र, एखादा गंभीर, इन्टेन्स सिनेमा बघताना आजूबाजूला होणारे हे भयावह आवाज प्रचंड रसभंग करतात. तरुण पिढीच्या मुलांना काही बोलायची सोय नाही. ते फटकन उलट उत्तरं देतात. ‘थिएटर खरीद लिया क्या?’ असा केवळ अॅटिट्यूड नसतो, तर तसा प्रश्न ते थेट आपल्याला करतातही!
रसभंगाचे हे काहीसे फिजिकल प्रकार झाले. काही मानसिक त्रास देणारेही प्रकार आहेत. उदा. एखादा चर्चेतला सिनेमा आपण पाहत असतो. त्यात काही उत्कट दृश्यं असतात. रूढार्थानं ती सहजतेनं पाहायला मिळणारी दृश्यं नसतात. ती पाहत असताना अचानक कुठून तरी हशा ऐकू येतो... किंवा अगदीच अनाठायी अशी टिप्पणी ऐकू येते... आपण त्या दृश्यात गुंगून गेलो असताना या हशामुळं वा त्या बोलण्यामुळं आपला रसभंग होतो; मूडच जातो. कलाकाराला अपेक्षित असलेल्या ठिकाणी दाद न मिळणं किंवा नको त्या ठिकाणी चुकीची दाद वा प्रतिक्रिया येणं असं हल्ली वारंवार घडताना दिसतं. कशामुळं होतं हे? कुठलाही कलाकार त्याची कलाकृती तयार करतो ती लोकांनी पाहावी, समजून घ्यावी, त्याचा आनंद लुटावा यासाठी! त्याचं त्या कलाकृतीच्या माध्यमातून काही तरी एक सांगणं असतं. पण ते पुष्कळदा लोकांपर्यंत पोचतच नाही की काय, अशी शंका येते. हल्ली समाजमाध्यमांनी भावनांचं सपाटीकरण केलंय म्हणून असं होतंय, की एकूणच तरल भावनांच्या जोपासनेचा अभाव दिसतोय? काही तरी चुकतं आहे हे नक्की...
कला सादर करणारा कलाकार आणि तिचा आस्वाद घेणारा प्रेक्षक एकाच प्रतलात असायला हवेत. अर्थात ही आदर्श परिस्थिती झाली. दर वेळी असं होत नाही. त्यामुळं कलाकार एका विशिष्ट संवेदनशीलतेतून काही सांगू पाहत असेल आणि प्रेक्षक त्या विशिष्ट संवेदनशीलतेतून ती कलाकृती पाहत नसेल, तर गोंधळ होतो. प्रेक्षकाची अपेक्षा काही वेगळीच असते आणि त्याला कदाचित समोर काही वेगळंच दिसत असतं. त्यातून प्रतिक्रियेची प्रक्रिया विस्कटायला सुरुवात होते. विशेषतः सामूहिक आस्वादनाच्या जागांवर हे वारंवार घडताना दिसतं. चित्रपटगृहात सिनेमा पाहताना आपण एकटे पाहत नाही. आपल्यासोबत अनेक लोक तो पाहत असतात. त्यातल्या बहुतांश जणांच्या संवेदनेची तार सिनेमाशी जुळलेली दिसते आणि नेमक्या अशाच वेळी दोन-तीन बेसूर तारा छेडल्या जातात. तो कणसूर त्रासदायक असतो.
याचा जरा विचार केल्यावर असं लक्षात येतं, की प्रेक्षक किंवा आस्वादक म्हणून आपल्या भावभावना फारच ढोबळ, भडक व बटबटीत झाल्या आहेत. आनंद, दुःख, प्रेम, विरह, माया, द्वेष, संताप, सूड आदी ढोबळ आणि ठळक भावनाच तेवढ्या कलाकृतीतून ग्रहण केल्या जातात. त्यातही हिंसा, सूड, संताप आदी भावनांच्या प्रदर्शनाला मिळणारी दाद किंवा प्रतिसाद पाहण्याजोगा असतो. या ठळक भावनांच्या अधे-मधे काही तरल भावना लपलेल्या असतात. त्या शब्दांनी सांगता येत नाहीत; अनुभवाव्याच लागतात. या भावनांना साद देण्यासारखी परिस्थिती काही कलाकृती निश्चितच निर्माण करतात. आपल्यामध्ये मात्र त्या तरल भावनांचा कदाचित नीट परिपोष न झाल्याने आपण त्या कलाकृतीला जसा हवा तसा प्रतिसाद देऊ शकत नाही. करुणा किंवा सह-अनुभूती (सहानुभूती नव्हे!) या भावनांची त्रुटी विशेषत्वाने जाणवते. आपल्याकडच्या चित्रपटांत एकूणच थेट लैंगिक दृश्यं दाखवण्याचं प्रमाण कमी आहे. हल्ली मात्र ‘प्रौढांसाठी’ असे प्रमाणपत्र दिलेल्या बऱ्याच सिनेमांत अशी थेट लैंगिक दृश्यं दाखविली जातात. (या दृश्यांची कथानकातील गरज वा उपयुक्तता हा निराळ्या चर्चेचा विषय आहे.) अशा दृश्यांची आखणीदेखील त्या दृश्यात सहभागी असलेल्या स्त्री पात्रांच्या त्या वेळी असलेल्या भावना दर्शविण्यासाठी केल्याचं दिसून येतं. मात्र, हे समजून न घेणारा मोठा प्रेक्षकवर्ग अशा दृश्यांकडं निराळ्या नजरेनं पाहतो. त्या नजरेत दिग्दर्शकाला अपेक्षित असलेली पात्राविषयीची ‘सह-अनुभूती’ कुठे दिसत नाही.
आपल्याकडे एकूणच दृश्यसंस्कारांच्या बाबतीत आनंदीआनंद असल्यानं ही परिस्थिती निर्माण होते. एखादं चित्र कसं पाहावं, हे आम्हाला कुणी शिकवत नाही. आम्हाला वाचता येतं; पण लेखकाला त्या दोन वाक्यांच्या मध्ये काय म्हणायचंय हे समजत नाही. आम्हाला सिनेमा किंवा नाटकातील दृश्यांमागची प्रकाशयोजना, नेपथ्यरचना किंवा त्या दृश्याची भूमिती समजत नाही. एखाद्या कलाकृतीमधील अमूर्तता कळणं ही आपण रसिक म्हणून किंवा आस्वादक म्हणून जरा वरची इयत्ता गाठल्याचं लक्षण आहे. आपण त्या दृष्टीनं किती प्रयत्न करतो ही स्वतःला विचारून पाहण्याची गोष्ट आहे. कुठलीही सूक्ष्म, अमूर्त किंवा तरल भावना जाणण्याचा प्रयत्नच न करणं किंवा त्या गोष्टी हसून, चेष्टेवारी नेऊन सोडून देणं हे सध्या सर्रास होताना दिसतंय. अनेकांना तर लेखनातील उपहासही समजत नाही, असं आढळून येतं. त्यामुळं आस्वादकाकडून विशिष्ट गुणवत्तेची अपेक्षा करणाऱ्या कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी आपण समाज म्हणून कितपत सक्षम आहोत, असा प्रश्न अनेकदा पडतो.
आपल्या आजूबाजूचं जग फार वेगानं बदलतं आहे. नवी पिढी फार वेगानं सगळे बदल स्वीकारते आहे. अशा जगात वावरताना आणि त्या जगानुसार स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करताना आपण अनेकदा आपल्या हळुवार भावभावनांची नीट जोपासना करायला विसरतो. आयुष्यातले छोटे छोटे आनंददायक क्षण टिपायला, त्यातला आनंद लुटायला विसरून जातो. त्यातून भावनांचं प्रकटीकरण हळूहळू बंद होऊन जातं. टिपकागदासारखं मन गंजून जातं आणि जुन्या दरवाजाच्या बिजागरीसारखं सदैव कुरकुरू लागतं. अशी बधीर मनं घेऊन आपण समाज म्हणून वावरू पाहतो आहोत. त्यामुळं आपली सौंदर्यदृष्टी लोप पावली अन् जगण्यातली विसंगती खटकेनाशी झाली आहे. मग हा मुद्दा फक्त आस्वादनाच्या फरकापुरता मर्यादित राहत नाही, तर एकूणच आपल्या आयुष्याचा परीघ मर्यादित करण्याचा होऊन जातो.
दाद देऊन शुद्ध व्हावं, असं म्हटलं जातं. दाद देण्याचं महत्त्व असं मोठं आहे. कलेचा नीट आस्वाद घेता आला, की खुल्या मनानं आणि नेमक्या जागी दाद देता येते. ती त्या कलाकाराला आनंद देऊन जातेच; पण माणूस म्हणून आपल्यालाही समृद्ध करीत असते. असा आस्वाद सर्वांना घेता येवो आणि सगळे कणसूर लोप पावून जगण्याचा तंबोरा नीट सुरांत लागो, एवढीच साधी अपेक्षा!


(२२ मार्च २०२२)

---

रोहन मैफल - ‘पेन’गोष्टी - भाग ५ व ६

भाग ५
--------

वऱ्हाड निघालंय उदगीरला...
-----------------------------------


उदयगिरीचा कवतिकगंधित ‘धूप’ तुला दाविला...
स्वीकारावी माफी आता, न येता या संमेलनाला...

कुठूनसं हे गाणं ऐकू येऊ लागलं आणि अस्मादिकांची अगदी समाधी लागली. गार पाण्याचे हबकारे तोंडावर बसल्यावर लक्षात आलं, की हे स्वप्नातलं गाणं आहे. जाग आली तर कुमार गंधर्व आपलं ‘मलयगिरीचा चंदनगंधित धूप तुला दाविला...’ गात होते. तरीही त्यातल्या ‘धूप’मुळं हिंदीतल्या ‘धूप’ची आठवण आली आणि तेवढ्या सकाळीही घाम फुटला. मग लक्षात आलं, आपण स्वप्नात उदगीरला जाऊन आलो. कशासाठी हा प्रश्नच उद्भवत नाही - साहित्य संमेलनासाठीच!
बघा ना! वैशाखासम भासणाऱ्या आणि भाजणाऱ्या, चैत्रातल्या रणरणत्या उन्हात मराठवाड्याच्या दक्षिणेस, तेलंगण व कर्नाटकाच्या हद्दीत उदयगिरी, अर्थात उदगीर नगरीत मराठी सारस्वतांचा मेळा भरतो आहे. येत्या वीकान्तास तीन दिवस मराठी साहित्य संमेलनाचा नुसता गल्बला माजणार आहे. आमचे ‘साहित्यसुलतान’ कवतिकराव ठाले पाटलांच्या मराठवाडी आग्रहामुळं अखेर हे संमेलन मराठवाड्याच्या, म्हणजेच संतांच्या पवित्र भूमीत घेण्याचं ठरलं. मार्च किंवा एप्रिलमध्ये हे संमेलन होणार म्हणजे होणारच, असं ठाले पाटलांनी एवढ्या निक्षून सांगितलं, की शेजारच्या तेलंगण व कर्नाटक या राज्यांनीही घाबरून तिकडंही मराठी साहित्य संमेलनांचा फड लावलाय, म्हणे! आमच्या कवतिकरावांचं थोडंसं ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’मधल्या बबन्यासारखं आहे. तो कसं, ‘विंग्रजीत पत्र लिहायचं म्हणजे जे मनामंदी येईल ते ठोकून द्यायचं दनादना... हाय काय...’ या तत्त्वाला जागून सगळ्या गोष्टी फाडफाड करत असतो, तसं आमचे कवतिकरावही कुणाचीही अजिबात भीडभाड न बाळगता, ‘जे मनामंदी येईल ते’ फाडफाड बोलून टाकत असतात.
ते काहीही असलं, तरी साहित्य संमेलन हा प्रकार आपल्याला आवडतो. आता उदगीरला जायला जमेल की नाही, हे काही माहिती नाही. मात्र, ग्रामीण महाराष्ट्रात होणारी सगळीच्या सगळी संमेलनं तुडुंब गर्दीची आणि यशस्वी झाली आहेत, यात शंका नाही. अर्थात नगर, परभणी, सातारा, परळी इथल्या संमेलनांच्या वेळी बडे बडे साहित्यिकही हजेरी लावायला होते. आता तेवढं मोठं नाव असलेले साहित्यिकच उरलेले नाहीत, असं वाटू लागलंय. म्हणजे बघा, नगरच्या संमेलनात साक्षात विंदा करंदीकर साध्या झब्बा-पायजम्यात आणि खांद्याला शबनम लावून ग्रंथदिंडीत चाललेले बघितले आहेत. त्यामानानं गेल्या २५ वर्षांत साहित्य संमेलनांचे अध्यक्ष आणि तेथे येणारे लोकप्रिय साहित्यिक यांचं प्रमाण घटतच गेलेलं दिसतंय. ते डोंबिवलीतलं ‘अक्षय’ संमेलन तर अगदीच पडलं होतं. त्याआधी पिंपरीत झालेलं ‘पीडीपी’ संमेलन मात्र जोरदार झालं होतं. करोनाकाळानंतर अगदी आत्ता, डिसेंबरात नाशिकमध्ये झालेल्या संमेलनातही  साहित्यप्रेमींचा उत्साह परतून आल्याचं दिसलं होतं. त्याच उत्साहाच्या जोरावर कवतिकरावांनी उदगीरच्या या ‘हॉट’ संमेलनाचा घाट घातलेला दिसतो.
हे संमेलन आमच्या ना. य. डोळे सरांच्या महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात रंगणार आहे, हे ऐकून आनंद जाहला. बाकी एवढ्या उन्हात तिथं जायचं कसं, या विचारानं महाराष्ट्रदेशीच्या अनेक बिऱ्हाडांतल्या ‘व्यंकटभाऊजी’ आणि ‘वहिनीं’मध्ये ‘काय हुईल, कस्सं हुईल...’ असे विचार डोक्यात ‘बुंगा’यला सुरुवात झालीय, अशी वार्ता कानी आहे. उदगीरमध्ये राहायची व्यवस्था काय, पाण्याचं काय, काही लोक लातूर किंवा नांदेडमध्ये राहणार अशी चर्चा आहे त्यात आपलं तर नाव नसेल ना, अशा एक ना दोन अनेक शंकांचा भुंगा बहुतेकांच्या डोक्यात पिंगा घालू लागला आहे. संमेलनाध्यक्ष मा. भारतराव सासणे सरांची अवस्था ‘काशिनाथ’सारखी झाली असणार, याविषयी आपल्या मनात मुळीच शंका नाही. एवढं सगळं संमेलनाचं वऱ्हाड त्यांनाच घेऊन जायचंय. त्यात संमेलनाचे ‘जानराव’ हे थेट राष्ट्रपतीच असल्यानं या संमेलनात खऱ्या अर्थानं ‘जान’ आली आहे, हे नाकारून चालणार नाही. कवतिकरावांचा उत्साह काही सांगता येत नाही. उदगीरच्या रस्त्यांवर ग्रंथदिंडीत त्यांनी कोत्तापल्ले-सासणे यांना फुगडी घालायला लावतीलच ते! गेली काही वर्षं उद्घाटनाला मा. शरदचंद्रजी पवारसाहेब नसतील, तर तो ‘फाउल’ धरला जातो. त्यामुळं साहेब आहेतच. गोव्याचे ज्ञानपीठ विजेते साहित्यिक दामोदर मावजो हेदेखील उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीवरून गोमंतकात वादाच्या गजाली झडायला सुरुवात झालीच आहे. मात्र, काही झालं तरी कवतिकरावांनी मावजोंना ‘आवजो’ म्हणत हिरवा कंदील दिल्यानं ते येणारच आहेत.
संमेलनाची कार्यक्रमपत्रिका आणि त्यातल्या परिसंवादाचे विषय बघितले, तर गेल्या काही वर्षांत बहुतेक वेळा यातले परिसंवाद किंवा त्यातले विषय ऐकून झाले आहेत, हे लक्षात येईलच. दुसऱ्या दिवशी राजन गवस यांची मुलाखत होणार आहे. विनोद शिरसाठ यांच्या ‘साधने’मुळं ती ‘दणकट’ होईल, यात शंका नसावी. तरुण कादंबरीकारांशी संवादाचा एक कार्यक्रम आहे, तो ऐकण्याजोगा वाटतो आहे. त्यात प्रवीण बांदेकर, रमेश इंगळे उत्रादकर, मोनिका गजेंद्रगडकर, आसाराम लोमटे, प्रसाद कुमठेकर आणि युवा साहित्य अकादमी विजेते प्रणव सखदेव यांच्यासोबत गप्पा रंगणार आहेत.
रविवारचा तिसरा दिवस राष्ट्रपतींच्या उपस्थितीमुळे विशेष ठरेल. यापूर्वी सांगलीच्या संमेलनात तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आल्या होत्या. (त्यामुळे मावळते संमेलनाध्यक्ष अरुण साधू यांना भाषणास वेळ न दिल्याने ते सूत्रे प्रदान करण्यासाठी तिथे गेलेच नव्हते. यंदा नारळीकर सरांना न येण्यासाठी हे एक चांगलं कारण आहे खरं!) असोच.
बाकी संमेलन सुरू व्हायच्या आधी दोन दिवस उदगीरमध्ये खरा दणका होईल तो अजय-अतुल यांच्या संगीत रजनीचा. संमेलनाची सुरुवात खऱ्या अर्थानं ‘झिंगाट’ होणार आहे. दुसऱ्या दिवशी एका वाहिनीवरील लोकप्रिय हास्य कार्यक्रमातली ‘नेहमीची यशस्वी’ मंडळी येणार असल्यानं उदगीरमधली त्यांची चाहते मंडळी खूश होतील. बाकी काही नसलं, तरी संमेलन ‘वाजलं’ पाहिजे, यात कुणाच्या मनात शंका नसावी.
हे संमेलन पार पडलं, की मे महिन्यात साहित्य महामंडळाचं कार्यालय मुंबईकडं जाईल. मराठवाड्याचं ‘कवतिक’ संपेल आणि पश्चिम दिशेवर ‘उषा’काल सुरू होईल. तोवर आपण ‘बुंग ऽऽऽ’ म्हणत संमेलनाच्या उत्तरपूजेची वाट बघायची...

(१४ एप्रिल २०२२)

---

भाग ६
--------

उत्सव बहु थोर होत...
--------------------------

उदगीरचे ‘हॉट हॉट’ संमेलन संपले तरी साहित्यजगतातील उत्साह आणि उत्सवाचे वातावरण अजूनही वाफाळते, गरमागरम आहे. शिवाय सध्या पुण्यापासून ते ठाण्यापर्यंत आणि चांद्यापासून ते बांद्यापर्यंत सगळा महाराष्ट्रच वेगवेगळ्या कारणांनी तप्त झाला असल्याने, साहित्य क्षेत्र तरी त्याला कसे अपवाद ठरणार! त्यामुळेच सध्या सगळीकडे पुस्तक प्रकाशनांचे पेंडिंग सोहळे पार पाडताना दिसत आहेत. पुस्तकांची नवनवी दालने सुरू होत आहेत, (काही महत्त्वाची नियतकालिके बंद पडली तरी) नवी मासिके सुरू होत आहेत, पुस्तकांची प्रदर्शने भरत आहेत... असे एकूण ‘उत्सव बहु थोर होत’ पद्धतीचे वातावरण सगळीकडे दिसते आहे.
वास्तविक मे महिना म्हणजे सुट्टीचा महिना. या काळात शाळांना सुट्टी पडली रे पडली, की प्रवासाला निघायचे असा पूर्वीचा खाक्या असायचा. गेली दोन वर्षे कोव्हिडकाळामुळे हे सगळे वेळापत्रक बिनसले. यंदा मात्र सगळी परिस्थिती पूर्वपदावर येताना दिसते आहे. त्यामुळेच दोन वर्षांपासून थांबून राहिलेल्या अनेक पुस्तकांचे प्रकाशन दणक्यात होताना दिसत आहे. विशेष म्हणजे पूर्वी पुण्यात पुस्तक प्रकाशनांसाठी काही ठरावीक ठिकाणे असायची. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा माधवराव पटवर्धन हॉल, पत्रकार भवनाचे सभागृह, एस. एम. जोशी सभागृह ही ती ठरलेली ठिकाणे. ही ठिकाणे आजही लोकप्रिय आहेत, यात वाद नाही. शहराच्या मध्यवर्ती भागात आणि सर्वांना यायला-जायला सोयीची अशी ही ठिकाणे आहेत, हे त्या लोकप्रियतेमागचे कारण आहे. अर्थात आता अनेक जण वेगवेगळी, नवी, चांगली ठिकाणे शोधत आहेत. चित्रपटविषयक कार्यक्रमांना राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे (एनएफएआय) ऑडिटोरियम कायमच लाभत असते. या जोडीला आता गोखले इन्स्टिट्यूटचा ज्ञानवृक्ष आणि परिसर, भांडारकर इन्स्टिट्यूटचे नवे झालेले अँफी थिएटर, कर्वे स्त्री-शिक्षण संस्थेत झालेले रमा-पुरुषोत्तम सभागृह व तिथले सुंदर अँफी थिएटर, पी. एन. गाडगीळ समूहातर्फे खडकवासल्याच्या पुढे कुडजे गावात लवकरच सुरू होत असलेले ‘झपूर्झा’ हे कला संकुल, मयूर कॉलनीतील शाकुंतल सभागृह अशा किती तरी नव्या जागांनी पुण्यातील सांस्कृतिक विश्वाला हाकारे घालायला सुरुवात केली आहे. यापैकी काही ठिकाणी तर नियमित सांस्कृतिक कार्यक्रम होतही आहेत. शहरात अशी नवनवी सांस्कृतिक घडामोडींची केंद्रे होत राहणे फार महत्त्वाचे आहे. शहरात असलेली गर्द झाडी, वनराई यांना ‘शहराची फुप्फुसे’ असे म्हटले जाते. या नव्या सांस्कृतिक केंद्रांना ‘शहराच्या मानसिक पोषणाची केंद्रे’ असे म्हटले पाहिजे.
मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद यासारख्या मोठ्या शहरांत अशी सांस्कृतिक केंद्रे असतात व तिथे कायम काही ना काही कार्यक्रम होत असतात. त्यामुळे त्या शहरांतील सांस्कृतिक जीवन बहरलेले दिसते. याउलट अवस्था ग्रामीण महाराष्ट्राची आहे. बऱ्याच तालुक्यांच्या ठिकाणी चांगली ग्रंथालये आहेत. मात्र, नवी पुस्तके घ्यायची म्हटले, तर त्यांना शहराचीच वाट धरावी लागते. ऑनलाइन पुस्तकविक्रीच्या ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत, त्यांच्याकडे आपल्याला हवी ती पुस्तके उपलब्ध असतातच, असे नाही. आता मुंबई व पुण्यातल्या मोठ्या प्रकाशकांनी (त्यात ‘रोहन प्रकाशन’ही अर्थातच आले!) आता स्वत:च्या वेबसाइटवरून थेट पुस्तके ऑलाइन उपलब्ध करून, ग्रामीण वाचकांची मोठीच सोय केली आहे, यात शंका नाही.
साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुस्तकांच्या जगात जी हालचाल होते, ती यासाठी महत्त्वाची आहे. किती कोटींची उलाढाल झाली किंवा मागील संमेलनापेक्षा कमी झाली की जास्त, हे मुद्दे महत्त्वाचे असले तरी केवळ तेवढेच मुद्दे महत्त्वाचे नाहीत. ग्रामीण भागात संमेलन झाले, की त्या परिसरातल्या अनेक वाचकांची पुढील वर्ष-दोन वर्षांसाठीची तरी पुस्तकांची भूक मिटते. संमेलनात पुस्तकांच्या दालनांसमोर आजही गर्दी नक्कीच होते. पुढच्या पिढीतील अनेक संभाव्य वाचक तिथे येत असतात. साहित्यिकांना बघत असतात. पुस्तक दालनांमधून हिंडत असतात. त्यांच्यासाठी ही संमेलने म्हणजे एक पेरणी असते. या मुलांनी तिथे यावे, पुस्तके बघावीत, हाताळावीत यासाठी प्रकाशकांपासून ते आयोजकांपर्यंत सारेच उत्सुक असतात. पुढच्या पिढीचा हा प्रतिसाद फार महत्त्वाचा असतो. अनेकदा तर असे वाटते, की अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने यापुढची सर्व संमेलने तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्हा केंद्र असलेल्या, पण तुलनेने लहान शहर असलेल्या ठिकाणीच भरवावीत. मोठ्या शहरांमध्ये साहित्य संमेलनांना मिळणारा प्रतिसाद व या निमशहरी भागांत मिळणारा प्रतिसाद यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. तेव्हा या गोष्टीचा खरोखर विचार व्हायला हवा.
आत्ताच्या काळात पुस्तकांचे महत्त्व खरे तर नव्याने सांगायला नको. सध्या समाजमाध्यमांचा वाढता प्रभाव आपण बघतो आहोत. या माध्यमांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे आपल्या मनावर कब्जा करायला सुरुवात केलीच आहे. आपण नकळत दुसऱ्याच्या इशाऱ्यावर नाचणारे रोबो तर होत नाही ना, अशी भीती अनेकदा मनात येते. अशा वेळी पुस्तकांचा फार आधार वाटतो. पुस्तके न बोलता, आपल्याला बरेच काही शिकवत असतात. सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे, आपली विवेकबुद्धी शाबूत ठेवायला मदत करतात. आपली जी काही बरी-वाईट मते असतील, ती तर्काच्या कसोटीवर घासून-पुसून, तावून-सुलाखून घेण्याची संधी देतात. यासाठी पुस्तके हवीत, पुस्तक प्रकाशनेही हवीत आणि त्यासाठीचे उत्सवही हवेत... आपल्याला माणूस म्हणून जरा अधिक उन्नत व्हायचे असेल, तर या उत्सवाला पर्याय नाही!

(१५ मे २०२२)

---