27 Feb 2024

आपले छंद दिवाळी अंक २३ - लेख

नातं रूपेरी पडद्याशी...
---------------------------


रूपेरी पडद्यावर रंगणारी अनेक नाती आपण पाहतोच; पण ती पाहत असताना त्या रूपेरी पडद्याशीच आपले वेगळे भावबंध तयार होतात. आपल्या आयुष्यातील कधीही पूर्ण न होणारी रंगीत स्वप्नं दाखवणारा सिनेमा आणि हे सगळं जिथं घडतं ते सिनेमा थिएटर यांच्याशी आपलं अनोखं नातं जडतं. हे नातं मात्र ‘फिल्मी’ किंवा खोटं खोटं नसतं, कारण त्याला आपल्या संवेदनांची, भावभावनांची, मनोज्ञ आठवणींची पटकथा जोडलेली असते...

....

आपल्या आयुष्यात जन्माला आल्यापासून आपण वेगवेगळ्या नात्यांमध्ये बांधले जातो ते थेट शेवटचा श्वास घेईपर्यंत! हे नातं जसं जैविक असतं, तसंच भावनिक किंवा अशारीरही असतं. ते एखाद्या व्यक्तीसोबत असतं, तसंच एखाद्या वास्तूशी, स्थळाशी, पुस्तकाशी, कलाकृतीशी, एखाद्या वस्तूशी... इतकंच काय, आठवणींसोबतही असू शकतं. नात्यांचंही एखाद्या व्यक्तीसारखंच असतं. नात्याला जन्म असतो, तसाच मृत्यूही असतो. नात्याचीही वाढ होते, विकास होतो आणि नातं आजारीही पडू शकतं. नात्याची गंमत ही, ती ते निर्माण करणाऱ्याच्या आठवणीत ते कायम राहतंच! एकोणिसाव्या शतकात सिनेमाच्या कलेचा उदय झाला आणि त्यासोबतच जन्म झाला सिनेमा दाखविणाऱ्या वास्तूचा - सिनेमा थिएटरचा! या सिनेमा थिएटरशी नातं जडलं नाही, असा माणूस आपल्या भारतात सापडणं कठीण. अगदी कितीही विपरीत परिस्थितीत राहणारा असो, पण प्रत्येकाने कधी ना कधी सिनेमा थिएटरमध्ये सिनेमा बघितलेलाच असतो. एखाद्या ठिकाणी आपण वारंवार जातो, तेव्हा आपलं त्या वास्तूसोबतही नातं जडतं. उदाहरणार्थ, आपल्या घराप्रमाणेच आपली शाळा, आपला वर्ग, आपलं आवडीचं हॉटेल, तिथली आपली आवडती जागा, आपलं कॉलेज, आपली बाइक, आपली नेहमीची बस किंवा लोकल, तिथली आपली नेहमी बसायची जागा, आपलं दुकान, आपलं मंदिर किंवा प्रार्थनास्थळ, आपलं आवडतं पर्यटनस्थळ... अशा अक्षरश: कुठल्याही वस्तूसोबत आपलं नातं जडत असतं. सिनेमा थिएटरसोबत माझं असंच नातं जडलं. या लेखाच्या निमित्तानं या खास नात्याला उजाळा देण्याचा हा प्रयत्न.
मी पहिल्यांदा कोणतं थिएटर बघितलं असेल, तर ती होती आमच्या गावातली टुरिंग टॉकीज. तो साधारण १९८० चा काळ होता. आमच्या तालुक्याचं ठिकाण असलेल्या गावी एकच टुरिंग टॉकीज असल्यानं जो कुठला सिनेमा तिथं लागेल तो बघण्याशिवाय दुसरा पर्याय नसायचा. त्या टॉकीजचं नाव एका आठवड्याला ‘दत्त’ असं असायचं, तर एका आठवड्याला ‘श्री दत्त’ किंवा असंच काही तरी! त्या टॉकीजचा परवाना ‘टुरिंग टॉकीज’चा असल्यामुळं त्याला हे प्रकार करावे लागायचे. याचं कारण एकाच ठिकाणी व्यवसाय करण्याचा मुळी तो परवानाच नव्हता. त्यानं गावोगावी फिरून (टुरिंग) सिनेमा दाखवणं अपेक्षित असायचं. अर्थात हे झालं कागदोपत्री. प्रत्यक्षात ती टॉकीज एकाच जागी स्थिर असायची. ते ओपन थिएटर असल्यानं तिथं फक्त रात्री एकच खेळ व्हायचा. साधारण साडेनऊच्या सुमारास सिनेमा सुरू होत असे आणि बाराच्या आसपास संपत असे. नऊ वाजल्यापासून तिथल्या लाउडस्पीकरवर सिनेमाची गाणी (तेव्हा जो कुठला नवा असेल तो) वाजविली जात. माझ्या पहिल्या-वहिल्या आठवणींनुसार, तेव्हा ‘एक दुजे के लिए’ नुकताच प्रदर्शित झाला होता. त्याची गाणी तेव्हा तुफान गाजत होती. त्यामुळं त्या टॉकीजवर कायम हीच गाणी लागलेली असत. ‘सोलह बरस की बाली उमर को सलाम...’ हे लतादीदींचं गाणं ऐकलं, की आजही मला त्या गावातल्या थिएटरची आठवण येते. गाव अगदी लहान. त्यामुळं आठ-साडेआठनंतर सगळीकडं सामसूम होत असे. त्यामुळं ही लाउडस्पीकरवर लावलेली गाणी दूरपर्यंत ऐकू येत. अगदी आमच्या घरातही स्वच्छ ऐकू येत. साधारण नऊ वाजून २५ मिनिटांनी तो टॉकीजवाला सिनेमातली गाणी संपवून सनई लावत असे. ही एक प्रकारची तिसरी बेल असायची. गावातून कुठूनही पाच मिनिटांत थिएटर गाठता येत असे. त्यामुळं सनई सुरू झाली, की लोक कपडे वगैरे करून थिएटरकडे चालायला लागत. मला कुठल्याही परिस्थितीत सिनेमाची सुरुवात चुकवायची नसे. त्यामुळं सिनेमाची गाणी वाजत असतानाच तिथं जायचा माझा हट्ट असे. गाव लहान असलं, तरी तिथंही ‘रात्रीचं जग’ होतंच. सिनेमाच्या जवळच एक-दोन बार होते. काही हॉटेलं होती. समोरच बस स्टँड होतं. त्यामुळं पानटपऱ्या असायच्याच. एरवी त्या रात्रीच्या वेळी नुसतं तिकडं फिरकायला आम्हाला परवानगी नव्हती आणि आमची तेवढी हिंमतही नव्हती. मात्र, सिनेमाला जाताना आपल्याच गावातलं हे पेट्रोमॅक्सच्या बत्तीच्या प्रकाशातलं वेगळं जग थोडा वेळ तरी बघायला मिळे. दिवसा कधीही न दिसणारी माणसं तिथं दिसत. आणि दिवसा दिसणारी माणसं चुकूनमाकून दिसलीच तरी ती त्या पिवळसर प्रकाशात वेगळीच कुणी तरी भासत. पुढं आम्ही प्रवेश करणार असलेल्या आभासी जगाचा हा ट्रेलरच असायचा जणू! माझे वडील एसटीत असल्यानं ‘एसटी साहेबां’ची मुलं म्हणून आम्हाला तिथं भाव असायचा. माझ्या माहितीप्रमाणे, तेव्हा दोन रुपये तिकीट असायचं. आम्ही कधीही रांगेत वगैरे उभं राहून ही तिकिटं काढली नाहीत. आम्हाला थेट आत प्रवेश मिळायचा. आत वाळूवर खाली बसूनच सिनेमा बघायचा. एका बाजूला बायका आणि एका बाजूला गडीमाणसं. मध्ये अगदी दोन-अडीच फूट उंचीची छोटीशी भिंत घातली होती. बायकांची संख्या मुळात फारशी नसायचीच. त्या आल्या, तरी ग्रुपने यायच्या. एकटी-दुकटी बाई तिथं दिसणं कठीण. सगळे गावातलेच लोक असल्याने ओळखीचं कुणी ना कुणी असायचंच. त्यामुळं एकट्यानं कधी तिथं जाण्याची शामत नव्हती. शिवाय ‘कुटुंबासोबत पाहण्याचे’ सिनेमेच बघायला आम्हाला तिथं नेलं जात असे, हे उघड आहे. आम्ही एसटी साहेबांचं कुटुंब म्हणून आम्हाला सगळ्यांत शेवटी बाकडी टाकली जात. त्या बाकांच्या बरोबर मागे प्रोजेक्टर रूम होती. मला त्या खोलीच्या आत जायची भयंकर उत्सुकता असे. मी अनेकदा त्या दारात जाऊन आत डोकावून बघतही असे. पुढं बाकांवर त्या रिळांचा ‘टर्रर्रर्र’ असा बारीक आवाजही सतत येत असे. अनेकदा रिळं बदलावी लागत. मग त्या वेळी दोन मिनिटांसाठी सिनेमा थांबे. तेवढ्यात बाहेर जाऊन बिड्या मारून येणारे लोक होते. सिनेमाला रीतसर मध्यंतर होई. मात्र, आम्हाला बाहेर जाऊन तिथलं काही खायची परवानगी नसे. अगदी चहाही नाही. त्यामुळं तिथं बाहेर नक्की काय विकत, याचा मला आजतागायत पत्ता नाही. ही ओपन एअर टॉकीज असल्यानं वारा आला, की पडदा वर-खाली हाले. त्यामुळं निळू फुले, अशोक सराफ, अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा आदी मंडळी ब्रेकडान्स केल्यासारखी हलत-बोलत. मात्र, सिनेमा बघण्याच्या आनंदापुढं त्याचं काही वाटत नसे. पडद्याच्या मागं मोठा लाउडस्पीकर लावलेला असे. मी तिथंही जाऊन वाकून वाकून, आवाज कुठून येतो हे बघत बसे.
कालांतराने गावात अजून एक टॉकीज झाली. ती ज्या माणसाने सुरू केली, त्याने स्वत:चंच नाव तिला दिलं होतं. त्यामुळं ही टॉकीज ‘अरोरा टॉकीज’ म्हणूनच ओळखली जात असे. ही जरा घरापासून लांब होती. मात्र, इथं पक्क्या भिंती होत्या. वर ओपन असलं, तरी पडदा मोठा होता आणि खुर्च्यांच्या दोन रांगाही होत्या. तिकीट आता जरा वाढलं होतं. इथं पाच रुपये घ्यायचे. तरी काही चांगले सिनेमे आले तर आम्ही नक्की जायचो. एकदा एक कुठला तरी चांगला सिनेमा आला, म्हणून बघायला गेलो, तर ऐन वेळी ‘रॉकी’ हा संजय दत्तचा पहिला सिनेमा बघावा लागल्याच्या दुःखद आठवणीही याच थिएटरमधल्या. ‘अनोखा बंधन’ हा शबाना आझमी अभिनित, त्या दोन छोट्या मुलांचा आणि त्यांच्या लाडक्या बोकडाचा सिनेमाही इथंच बघितल्याचं आठवतंय. त्यानंतर लवकरच व्हिडिओचा जमाना सुरू झाला आणि टॉकीजचं महत्त्व कमी व्हायला लागलं. मुळात तेव्हा मोठ्या शहरात प्रदर्शित झालेले सिनेमे गावात लगेच येत नसत. दोन-तीन महिन्यांनी ते लागत. त्याउलट व्हिडिओ पार्लरवाले लगेचच नवा सिनेमा दाखवत. (आता लक्षात येतंय, की त्यांच्याकडे पायरेटेड कॉपी असणार...) हे व्हिडिओ पार्लर गावात मध्यवर्ती ठिकाणी, एखाद्या छोट्या हॉलमध्ये असत. तिथे दुपारीही सिनेमा बघता येई. तोवर आम्हाला फक्त रात्री साडेनऊचाच सिनेमा बघायची सवय होती. एक रंगीत टीव्ही आणि एक व्हीसीआर या भांडवलावर तेव्हा अनेकांनी व्हिडिओ पार्लर सुरू केले होते. या पार्लरमध्ये सिनेमाला एक रुपया तिकीट असे. तेव्हा थिएटरला दोन ते पाच रुपये लागत असताना एक रुपयात सिनेमा बघायला मिळणं ही मोठीच गोष्ट होती. मी ‘मरते दम तक’ नावाचा, राजकुमारचा एक सिनेमा अशा व्हिडिओ पार्लरमध्ये, सुट्टीत आमच्याकडं आलेल्या माझ्या लहान आत्येभावासोबत बघितला होता. याच पार्लरमध्ये मी ‘शोले’ पहिल्यांदा बघितला. लहान पडदा असला तरी त्या सिनेमाचा मोठा प्रभाव पडल्याचं मला आजही चांगलं आठवतं. विशेषत: त्या सिनेमाचं पार्श्वसंगीत विशेष लक्षात राहिलं होतं. नंतर आमच्या गावात बंदिस्त थिएटर झालं. चार चार खेळ व्हायला लागले. मात्र, तोवर मी गाव सोडलेलं असल्यानं तिथं जाण्याचा योग काही आलाच नाही.
पुढं आठवीत गेल्यानंतर मी कुटुंबासह नगरमध्ये आलो. हे जिल्ह्याचं ठिकाण. त्यामुळं इथं बंदिस्त थिएटर्स होती. तेव्हा नगरमध्ये सहा थिएटर होती. पूर्वी ‘बालशिवाजी’ हा सिनेमा बघायला आम्हाला गावावरून इथं आणण्यात आलं होतं. तेव्हा अप्सरा नावाच्या थिएटरमध्ये हा सिनेमा बघितल्याचं आठवतं. नंतर या टॉकीजचं नाव शिवम प्लाझा असं झालं. तेव्हा नगरमध्ये आशा, चित्रा, छाया, दीपाली, अप्सरा (शिवम प्लाझा) आणि महेश अशी सहा थिएटर होती. यात सगळ्यांत नवं झालेलं होतं ते महेश थिएटर. हे माझं सर्वांत आवडतं थिएटर होतं. तेव्हा नगरमध्येच काय, पुण्यातही एवढं भव्य थिएटर मी तोवर बघितलं नव्हतं. जवळपास आठशे ते नऊशे लोकांची क्षमता असलेलं हे थिएटर सुंदर बांधलं होतं. याची बाल्कनी अतिशय मोठी होती. एका रांगेत जवळपास ३५-४० खुर्च्या होत्या आणि एकूण बाल्कनीतच ३००-४०० लोक बसू शकत. वर उत्कृष्ट फॉल सीलिंग होतं आणि त्यात पिवळसर दिवे बसवले होते. प्रत्येक वेळी सिनेमा सुरू होताना मरून रंगाचा मखमली पडदा वर जात असे. ७० एमएमचा भव्य पडदा होता. या थिएटरला तेव्हा १५ व २० रुपये तिकीट होतं. मी अनेकदा मॅटिनी शो बघायला एकटा जात असे. आमच्या घरापासून सायकलवरून इथं यायचं आणि एकट्यानं मॅटिनीचा शो बघायचा, असं मी अनेकदा केलं. विशेषत: अमिताभचे बहुतेक सर्व सिनेमे री-रनसाठी इथं मॅटिनीला लागायचे. जंजीर, दीवार, शोले, अमर अकबर अँथनी, मुकद्दर का सिकंदर, त्रिशूल असे सर्व महत्त्वाचे सिनेमे मला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाले, ते केवळ महेश थिएटरमुळे. अलीकडे कोव्हिडमध्ये बहुतांश सिंगल स्क्रीन थिएटर बंद पडली, त्यात हे सुंदर थिएटरही बंद पडल्याचं कळलं तेव्हा मला अतोनात दु:ख झालं.
नगरमध्ये ‘आशा’ हे मध्यवर्ती भागातलं एक चांगलं थिएटर होतं. आकारानं लहान असलं, तरी शहराच्या मध्यवर्ती भागात असल्यानं तिथं कायम गर्दी असायची. या टॉकीजला कायम ब्लॅकनं तिकिटं विकली जायची. तिकीट खिडकीसमोर त्यांनी एक बंदिस्त आणि एकामागे एक असं एकच माणूस उभं राहू शकेल, असा कॉरिडॉर बांधला होता. प्रचंड गर्दी असली, की तिथं शिरायला भीती वाटायची. शिवाय आत उभं राहिलं तरी तिकीट मिळेल याची कुठलीही खात्री नसायची. सुरुवातीला ब्लॅकवाल्याचीच मुलं उभी असायची. त्यांना तिकिटं दिली, की तो माणूस बुकिंग विंडो बंद करून टाकायचा. तेव्हा राम-लखन, चांदनी, किशन-कन्हैया असे एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे मी या थिएटरला बघितले. मात्र, दहा रुपयांचं तिकीट थेट ४० रुपयांना ब्लॅकमध्ये मिळायचं. मी एखादेवेळी घेतलंही असेल; मात्र, शक्यतो घरी परत जाण्याकडं माझा कल असायचा. नंतर गर्दी ओसरल्यावर मग जाऊन मी तो सिनेमा बघत असे. ‘माहेरची साडी’ हा सिनेमा याच थिएटरला विक्रमी चालला होता. नंतर मणिरत्नमचा गाजलेला ‘बॉम्बे’ही मी इथंच बघितला. आमच्या शाळेसमोर ‘चित्रा’ नावाची टॉकीज होती. इथं मी ‘तेजाब’, सचिन व अशोक सराफचा ‘भुताचा भाऊ’ यांसह अनेक सिनेमे बघितले. मात्र, या टॉकीजलगतच्या गल्लीत (तिला चित्रा गल्ली असंच म्हणत) वेश्यावस्ती होती. त्यामुळं शाळेतून आमच्यावर अनेक शिक्षकांची कडक नजर असे. शाळा चुकवून कोणी त्या थिएटरला जात नाही ना, हे बघितलं जाई. चित्रा टॉकीज अगदी छोटी होती आणि तिथं तीन रुपये खाली आणि चार रुपये बाल्कनी असे तिकीट दर असायचे. तिथंही भरपूर मारामारी व्हायची आणि ब्लॅकचा धंदा चालायचा. नगरच्या प्रसिद्ध अशा चितळे रोडवर अगदी मध्यवर्ती भागात छाया टॉकीज होती. खरं म्हणजे ते एक गोडाउन होतं. त्या टॉकीजला बाल्कनी अशी नव्हतीच. दोन रांगा मागे जरा उंचीवर होत्या. लगेच एक लाकडी कठडा आणि समोर ड्रेस सर्कल. या टॉकीजमध्ये मी फारसा कधी गेलो नाही. पूर्वीचं हे बागडे थिएटर आणि तिथं नाटकं वगैरे होत, असं नंतर कळलं. मात्र, मी नगरमध्ये होतो तेव्हा तिथं ही छाया टॉकीजच होती.
नगरच्या झेंडीगेट भागात दीपाली टॉकीज होती. भव्यतेच्या बाबतीत महेशच्या खालोखाल मला ही दीपाली टॉकीज आवडायची. दहावीची परीक्षा दुपारी दोन वाजता संपल्यावर घरी न जाता, मित्रांसोबत या टॉकीजला येऊन आम्ही संजय दत्तचा ‘फतेह’ नावाचा अतिटुकार सिनेमा बघितला होता. मुळात सिनेमा कोणता, याच्याशी आम्हाला देणं-घेणं नव्हतंच. दहावीची परीक्षा संपली याचा आनंद आम्हाला साजरा करायचा होता. याच टॉकीजला मी ‘मैंने प्यार किया’ आणि ‘हम आप के हैं कौन?’ हे दोन सुपरडुपर हिट सिनेमे बघितले. त्या काळात या टॉकीजलाही कायम तिकिटं ब्लॅक व्हायची. या टॉकीजचं पूर्वीचं नाव सरोष टॉकीज असं होतं. तिथल्या कँटीनला सरोष कँटीन म्हणूनच ओळखलं जायचं. पुण्यात ‘लकी’ किंवा ‘गुडलक’ किंवा ‘नाझ’विषयी हळवं होऊन बोलणारे खवय्ये आहेत, तसेच एके काळी नगरमध्ये ‘सरोष कँटीन’ची आणि तिथल्या इराणी पदार्थांची क्रेझ होती म्हणे. मला मात्र कधी तिथल्या कँटीनला जाण्याचा आणि काही खाण्याचा योग काही आला नाही.
मी दहावी झाल्यानंतर नगर सोडलं आणि १९९१ मध्ये डिप्लोमा इंजिनीअरिंगसाठी पुण्यात आलो. पुण्यात आल्यावर विविध थिएटर्सचं अनोखं आणि विशाल जग माझ्यासाठी खुलं झालं. खरं तर पुण्यात राहायला येण्यापूर्वीच मी पुण्यातली काही थिएटर बघितली होती. याचं कारण आत्याकडे मे महिन्याच्या सुट्टीत येणं व्हायचं. तेव्हा मोठ्या आत्येभावासोबत अनेक सिनेमे पाहिले. तेव्हा पुण्यात मंगला, राहुल, अलंकार, नीलायम, अलका, प्रभात आणि लक्ष्मीनारायण ही सर्वांत प्रमुख आणि मोठी चित्रपटगृहे होती. सुट्ट्यांमधल्या सिनेमांची सर्वांत ठळक आठवण ‘अलंकार’ला बघितलेल्या श्रीदेवीच्या ‘नगीना’ या सिनेमाची आहे. यासोबतच ‘मंगला’ला तेव्हा अतिशय चर्चेत असलेल्या ‘छोटा चेतन’ या पहिल्या थ्री-डी सिनेमाचीही आठवण अगदी ठळक आहे. पहिल्यांदाच तो गॉगल घालून तो सिनेमा बघितला होता. त्यातला तो पुढ्यात येणारा आइस्क्रीमचा कोन, त्या भगतानं उगारलेला त्रिशूळ थेट अंगावर येणं असले अचाट प्रकार बघून १२ वर्षांचा मी भलताच थक्क झालो होतो. त्याही आधी काही वर्षांपूर्वी ‘अष्टविनायक’ हा चित्रपट ‘प्रभात’ला मी कुटुंबीयांसोबत बघितल्याची आठवण माझी आई सांगते. मला मात्र या सिनेमाची कुठलीही आठवण नाही. पुढं ‘प्रभात’ या चित्रपटगृहाशी आपलं फार जवळचं आणि जिव्हाळ्याचं नातं जडणार आहे हे तेव्हा कुठं ठाऊक होतं?
त्याआधी १९९१ मध्ये गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेतला, तेव्हा आम्हाला सर्वांत जवळचं थिएटर म्हणजे ‘राहुल - ७० एमएम’. पुण्यातलं पहिलं ७० एमएम थिएटर. आमच्या कॉलेजपासून गणेशखिंड रोडने कृषी महाविद्यालयाच्या चौकापर्यंत उतार होता. सायकलला दोन-चार पायडल मारली, की थेट त्या चौकापर्यंत सायकल जायची. आम्ही अनेकदा ‘राहुल’ला जायचो. तेव्हा तिथं फक्त इंग्लिश सिनेमे असायचे. त्यातले अनेक ‘फक्त प्रौढांसाठी’ असायचे. आम्ही १६-१७ वर्षांची मुलं अगदीच लहान दिसायचो. त्यामुळं डोअरकीपर आम्हाला सोडायचा नाही. कधी चुकून सोडलंच तर तो सिनेमा बघायचा. नाही तर तिकिटं कुणाला तरी विकून पुढच्या थिएटरला निघायचं, असा कार्यक्रम असायचा. एकदा आम्ही ‘अलका’ला ‘घोस्ट’ सिनेमा बघायला गेलो. तिथल्या डोअरकीपरला मला आणि माझ्या मित्राला आत सोडलं नाही. तेव्हापासून तो सिनेमा बघायचा जो राहिला तो राहिलाच. अगदी अलीकडं ‘ओटीटी’वर बघितला, तेव्हा खूप दिवसांचं ऋण फिटल्याची भावना मनात आली. पुढं खरेखुरे ‘ॲडल्ट’ झाल्यावर ‘राहुल’ आणि ‘अलका’च्या भरपूर वाऱ्या केल्या, हे सांगणे न लगे!

पुढं १९९७ मध्ये मी ‘सकाळ’मध्ये रुजू झालो, तेव्हा आमच्या ऑफिसपासून सर्वांत जवळचं थिएटर होतं ते म्हणजे प्रभात! तिथं कायम मराठी सिनेमे लागायचे. ‘मराठी सिनेमांचं माहेरघर’ असा उल्लेख तेव्हा महाराष्ट्रात दोन थिएटरच्या बाबतीत केला जात असे. एक म्हणजे ‘प्रभात’ आणि दुसरं म्हणजे दादरचं शांतारामांचं ‘प्लाझा’! (या प्लाझात एखादा सिनेमा बघायची माझी इच्छा आजही अपुरीच आहे...) असो. तर त्या उमेदवारीच्या काळात मी ‘प्रभात’ला जवळपास येतील ते सर्व सिनेमे पाहिले. पुढे ‘सकाळ’मध्ये मी चित्रपट परीक्षणं लिहू लागल्यावर तर ‘प्रभात’ला दर आठवड्याला जाणं हे अपरिहार्य झालं. माझ्या जर्नालिझमच्या वर्षात आम्हाला एक प्रोजेक्ट होता. त्यात वेगळ्या, हट के क्षेत्रातील व्यक्तीची मुलाखत घ्यायची होती. मी ‘प्रभात’चे तेव्हाचे डोअरकीपर मेहेंदळेकाका यांची मुलाखत घेतली. ‘प्रभातनगरीचा द्वारपाल’ असं त्याचं शीर्षक होतं, हे मला आजही आठवतं. आमच्या त्या ‘वृत्तविद्या’ या विद्यार्थी वृत्तपत्राचा अंकही मी काकांना आवर्जून नेऊन दिला होता. तेव्हापासून ‘प्रभात’मधल्या या काकांशी आणि नंतर इतर स्टाफशीही चांगली गट्टी जमली. भिडेकाका हे मॅनेजर होते. ते एरवी अतिशय कडक होते. गैर वागणाऱ्यांना, बायका-मुलींची छेड काढणाऱ्या आगाऊ मुलांना ते काठीनेही मारायला कमी करायचे नाहीत. मात्र, माझे आणि त्यांचे संबंध अतिशय स्नेहाचे होते. मला नंतर ‘प्रभात’मध्ये कायमच घरचा सदस्य असल्यासारखी वागणूक मिळाली. तेथील वाघकाका यांच्याशीही स्नेह जमला. ‘प्रभात’चे मालक विवेक दामले यांच्याशी नंतर ओळख झाल्यानंतर तर मी कायम त्यांच्याकडे गप्पा मारायला जात असे. सिनेमाच्या वेळेआधी किमान एक तास आधी मी तिथं जाऊन दामलेंशी गप्पा मारत असे. त्यांच्या तीन पिढ्या प्रभात स्टुडिओच्या काळापासून या व्यवसायात असल्याने त्यांच्याकडे किश्श्यांची कमतरता अजिबात नसे. चित्रपटसृष्टीतल्या नानाविध गमतीजमती त्यांच्या तोंडून ऐकून मी अगदी हरखून जात असे. त्यांच्याकडे चहा व्हायचाच. मध्यंतरातही ऑफिसमध्ये या सगळ्यांसोबत बसूनच चहा व्हायचा. सिनेमा संपल्यावर मग तो कसा होता, प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा मिळेल, यावर चर्चा व्हायची आणि मग मी ऑफिसला जायचो. अनेकदा रविवारी माझं परीक्षण आल्यावर (जर त्यात सिनेमाचं कौतुक असेल तर) रविवारच्या खेळांना गर्दी वाढलेली असे. स्वत: दामले किंवा भिडेकाका मला हे सांगत. मी जवळपास ११ वर्षं आधी ‘सकाळ’ व नंतर ‘मटा’त सिनेमा परीक्षणं लिहिली. त्या दहा-अकरा वर्षांत मी तीनशेहून अधिक सिनेमांवर लिहिलं. त्यात ‘प्रभात’मध्ये किती सिनेमे पाहिले असतील, याची गणतीच नाही. ‘बिनधास्त’ हा सिनेमा प्रदर्शित झाला, तेव्हा तो मला इतका आवडला, की वेगवेगळ्या १४ लोकांसोबत मी १४ वेळा तो सिनेमा त्या काळात पाहिला. दहा वर्षांपूर्वी ‘प्रभात’ने चित्रपट पुरस्कार देण्याची घोषणा केली. दोन वर्षं मोठा समारंभ करून त्यांनी हे पुरस्कार दिलेही. त्या काळात त्या चित्रपट पुरस्कार निवड समितीवर मी दोन वर्षं काम केलं. तो अनुभव फार समृद्ध करणारा होता. पुढं हे पुरस्कार बंद झाले, तरी दामलेंशी वैयक्तिक स्नेह कायम राहिला. मात्र, नंतर त्यांनी हे थिएटर मूळ मालकांना - इंदूरचे किबे यांना - करारानुसार परत केलं. (‘प्रभात’चं मूळ नाव किबे लक्ष्मी थिएटर. आता पुन्हा हेच नाव प्रचलित झाले आहे.) काय योगायोग असेल तो असेल. मात्र, मालकी बदलल्यापासून मी एकदाही पुन्हा त्या थिएटरला गेलोच नाही. मुद्दाम ठरवून असं नाही, पण नाहीच जाणं झालं. माझे आणि त्या थिएटरचे ऋणानुबंध असे अचानक संपुष्टात आले.

चाफळकर बंधूंनी पुण्यात पहिलं मल्टिप्लेस २००१ मध्ये ‘सातारा रोड सिटीप्राइड’च्या रूपात उभं केलं आणि थिएटरच्या दुनियेत एक नवं पर्व सुरू झालं. एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीच देशभर भराभर मल्टिप्लेसची उभारणी होत गेली. मी सातारा रोड सिटीप्राइडला २००१ मध्ये ‘लगान’ बघितला आणि त्या अनुभवाने अगदी भारावून गेलो. नंतर त्यांनी २००६ मध्ये कोथरूडमध्ये ‘सिटीप्राइड’ उभारलं आणि माझी फार मोठी सोय झाली. मी तेव्हा वारज्यात राहत असल्यानं मला हे नवं चकाचक मल्टिप्लेक्स जवळ पण पडत असे. थोड्याच काळात ‘प्रभात’प्रमाणे इथल्याही सगळ्या स्टाफशी चांगली ओळख झाली. चाफळकरांप्रमाणेच इथं आधी हितेश गायकवाड नावाचे मॅनेजर होते, त्यांच्याशी मैत्री झाली. नंतर सुगत थोरात आले. अनिल तपस्वी, राजेश गायकवाड, अंबरीश आदी सर्व स्टाफशी खूप चांगली दोस्ती झाली आणि ती आजही कायम आहे. मी ‘प्रभात’ आणि ‘कोथरूड सिटीप्राइड’ या दोन्ही चित्रपटगृहांना माझं दुसरं घरच मानतो. पुढं २०१७ मध्ये मनस्विनी प्रभुणेनं तिच्या समदा प्रकाशनातर्फे माझ्या चित्रपटविषयक लेखनाचं ‘यक्षनगरी’ हे पुस्तक प्रकाशित केलं, तेव्हा मी ते याच दोन चित्रपटगृहांना अर्पण केलं आहे. ‘कोथरूड सिटीप्राइड’मध्ये नंतर आशियाई चित्रपट महोत्सव, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव असे अनेक चित्रपट महोत्सवही भरू लागले. तेव्हाचा माहौल हा केवळ अनुभवण्यासारखाच असायचा. या महोत्सवांनी चित्रपटगृहांत सिनेमा पाहण्याचा आनंद नव्यानं उपभोगता आला, असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. जागतिक पातळीवरचा, अन्य देशांतील सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहता आला तो केवळ अशा महोत्सवांमुळंच!
मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांनी भारतात सिनेमा क्षेत्रात एक नवी क्रांतीच केली, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. सिनेमा पाहण्याचा भव्य अनुभव तिथल्या आधुनिक तंत्रज्ञानामुळं प्रेक्षकांना घेता आला. उत्तम दर्जाची ध्वनिव्यवस्था, उत्कृष्ट दर्जाचे पडदे, अत्याधुनिक प्रक्षेपण यंत्रणा, वातानुकूलित यंत्रणा, आरामदायी आसनव्यवस्था यामुळं मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा पाहणं हा एक सुखद अनुभव ठरू लागला. तिथली अवाढव्य यंत्रणा, स्वच्छ वॉशरूम आदी व्यवस्था यामुळं तिथले महागामोलाचे खाद्यपदार्थही प्रेक्षकांनी (‘कुरकुर’ करत) स्वीकारले. भारतातील प्रचंड प्रेक्षकसंख्या आणि मल्टिप्लेक्सचे वाढते स्क्रीन यामुळं चित्रपट धंद्याची यशाची गणितंही बदलून गेली. पूर्वी सिंगल स्क्रीनमध्ये रौप्यमहोत्सव, सुवर्णमहोत्सव साजरा करूनही न होणारी कमाई मल्टिप्लेक्समधल्या प्रचंड मोठ्या संख्येनं असलेल्या खेळांमुळे अवघ्या आठवडाभरात करता येऊ लागली. अर्थात, मल्टिप्लेक्सच्या भव्यपणामुळं प्रेक्षकाचा एखाद्या वास्तूशी जो वैयक्तिक ‘कनेक्ट’ होतो, तो होईलच असं काही सांगता येत नाही. एखाद्या मॉलमध्ये आपण जातो, दुकानं न्याहाळतो तशा पद्धतीनं येणारा प्रेक्षकही वाढला. माझ्याबाबत मात्र असं काही झालं नाही. ‘कोथरूड सिटीप्राइड’शी वैयक्तिक स्नेहबंध तयार झाला. तिथल्या वास्तूत घरासारखं वाटतं. ही माझी एकट्याची नाही तर तिथं नेहमी येणाऱ्या अनेकांची भावना असेल, यात काही शंका नाही.
हे सर्व चित्र २०२० च्या मार्चपर्यंत कायम होतं. मात्र, तेव्हा ‘कोव्हिड’ नावाच्या जागतिक साथरोगानं सर्व जगाला विळखा घातला आणि आपलं सगळ्यांचंच जगणं पूर्वीसारखं राहिलं नाही. करोनाकाळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या क्षेत्रांमध्ये मनोरंजन आणि चित्रपटसृष्टी होती. अनेक एकपडदा चित्रपटगृहं दीर्घकाळ बंद राहिल्यानं कायमची बंद पडली. लॉकडाउनच्या काळात ‘ओटीटी’ माध्यमाची चांगलीच भरभराट झाली. घरबसल्या मनोरंजनाची ही पर्वणीच होती. सिनेमाप्रेमींना लवकरच त्याची चटक लागली. चित्रपटगृहांचे वाढलेले तिकीटदर, मोठ्या शहरांत वाहतूक कोंडीची, पार्किंगची समस्या आणि चार जणांच्या कुटुंबाला येणारा एक हजार रुपयांहून अधिकचा खर्च यामुळं अनेक जणांनी चित्रपटगृहांकडं पाठ फिरवली. आता तीन वर्षांनी सगळं जगणं पूर्वपदावर आलं असताना मल्टिप्लेक्सही पुन्हा गर्दीनं ओसंडून वाहत आहेत. एकपडदा थिएटर्स मात्र या साथरोगाचे बळी ठरले. आता काही मोजकीच एकपडदा चित्रपटगृहं सुरू आहेत. मात्र, ती आहेत तोवर सिनेमाप्रेमींच्या डोळ्यांतली ती नवा सिनेमा पाहण्याची उत्सुकता, ती चमक कायम राहील. सिनेमा थिएटर्सनी दिलेल्या आठवणी आणि त्यामुळं त्यांच्याशी तयार झालेलं अतूट नातंही शेवटच्या श्वासापर्यंत असंच कायम राहील...

---

(पूर्वप्रसिद्धी : आपले छंद दिवाळी अंक २०२३)

----

26 Feb 2024

ग्राहकहित दिवाळी अंक २३ - लेख

यक्ष
-----


भारतीय चित्रपटसृष्टीतील दिलीपकुमार, राज कपूर व देव आनंद या प्रख्यात नायकत्रयीतील देव आनंदची जन्मशताब्दी नुकतीच २६ सप्टेंबरला झाली. याचाच अर्थ देव आनंद हयात असता तर तो त्या दिवशी शंभर वर्षांचा झाला असता. पण मग असं वाटलं, की देव आनंद केवळ शरीरानं आपल्यातून गेला आहे. एरवी तो आपल्या अवतीभवती आहेच. त्याच्या त्या देखण्या रूपानं, केसांच्या कोंबड्याच्या स्टाइलनं, तिरकं तिरकं धावण्याच्या शैलीनं, थोडासा तुटलेला दात दाखवत नायिकेला प्रेमात पाडणाऱ्या स्मितहास्याच्या रूपानं, त्याच्या त्या विशिष्ट टोपीच्या रूपानं, त्या स्वेटरच्या रूपानं - देव आनंद आपल्यात आहेच.
उण्यापुऱ्या शंभर-सव्वाशे वर्षांचा इतिहास असलेल्या चित्रपटसृष्टीवर तब्बल सहा दशकं आपल्या अस्तित्वाची ठसठशीत मोहोर उमटवणारा हा माणूस म्हणजे ‘यक्ष’ होता - आणि ‘यक्ष’ अजरामर असतात. आणि हो, ‘नंदा प्रधान’मध्ये पु. ल. देशपांडे म्हणाले, तसं ‘यक्षांना शापही असतात.’ देव आनंदलाही ते होते. त्याला चिरतरुण राहण्याच्या एका झपाटलेपणाचा शाप होता. त्यामुळं तो आयुष्यभर २५ वर्षांचाच राहिला. आपणही आपल्या भावासारखे उत्तम चित्रपट दिग्दर्शन करू शकतो, असं त्याला वाटायचं. हा आत्मविश्वास अजब होता. त्यामुळं वयाच्या उत्तरार्धात देव आनंदचा नवा सिनेमा ही एक हास्यास्पद, टर उडविली जाणारी गोष्ट ठरली. मात्र, ‘देवसाब’ना त्याचं काही वाटायचं नाही. मुळात भूतकाळात रमणारा हा माणूसच नव्हता. सतत पुढच्या काळाचा आणि प्रसंगी काळाच्या पुढचा विचार करायचा. स्वत:चे प्रदर्शित झालेले सिनेमेही हा माणूस पाहायचा नाही. त्याच वेळी आपण मात्र त्याच्या ‘अभी ना जाओ छोडकर’, ‘खोया खोया चांद’, ‘ये दिल ना होता बेचारा’, ‘होठों पे ऐसी बात’, ‘तेरा मेरा प्यार अमर’, ‘हैं अपना दिल तो आवारा’, ‘उपरवाला जान कर अंजान है’, ‘दिल का भंवर करे पुकार’ या आणि अशाच कित्येक कृष्णधवल गाण्यांत हरवून गेलेलो असतो.
बारा वर्षांपूर्वी देव आनंद शरीराने आपल्यातून गेला... एका रविवारी सकाळीच तो गेल्याचा एसेमेस मोबाइलवर आला आणि पहिला विचार मनात आला, की अरेरे, अकाली गेला...! ८८ हे काय वय होतं त्याचं जाण्याचं? देव आनंद किमान पावणेदोनशे वर्षं जगेल, अशी खात्री होती. ८८ हे आपल्यासारख्या सामान्यजनांसाठी वृद्धत्वाचं वय असेल... पण देव आनंद नावाच्या अजब रसायनासाठी नाही. तो वरचा देव या भूलोकीच्या देवाला घडविताना त्यात वृद्धत्व घालायला विसरला असावा. त्यामुळंच देव आनंद लौकिकार्थानं, वयाच्या हिशेबानं वाढला असेल, पण मनानं तो पंचविशीच्या पुढं कधीच गेला नाही. म्हणून तर तो गेला त्याच वर्षी त्याचा 'हम दोनो' पन्नास वर्षांनी रंगीत होऊन झळकला होता आणि त्याच वेळी 'चार्जशीट' हा त्याचा नवा-कोरा सिनेमाही रिलीज झाला होता. त्यातही 'हम दोनो'च अधिक चालला हे वेगळं सांगायला नको. देव आनंदसाठी जसं त्याचं वय पंचविशीला गोठलं होतं, तसं प्रेक्षकांसाठीही तोच 'हर फिक्र को धुएं में उडाता चला गया' म्हणणारा देवच आठवणींत कायमचा ‘फ्रीज’ झाला होता. स्वतः देव आनंदला याची फिकीर नव्हती. 'हर फिक्र को धुएं में उडाता चला गया' हेच त्याचं जीवनविषयक तत्त्वज्ञान होतं. एखाद्या माणसाला एखाद्या गोष्टीची किती पराकोटीची पॅशन असावी, याचं देव हे जितंजागतं उदाहरण होतं. देव सिनेमासाठी होता आणि सिनेमा देवसाठी... दोघांनीही परस्परांची साथ शेवटपर्यंत सोडली नाही. त्यामुळंच त्याच्या नव्या सिनेमांच्या पोस्टरवर नातीपेक्षा लहान वयाच्या नायिकांना कवेत घेऊन उभा राहिलेला देव कधीही खटकला नाही.
देव आनंद ही काय चीज होती? एव्हरग्रीन, चॉकलेट हिरो, बॉलिवूडचा ग्रेगरी पेक (खरं तर ग्रेगरीला हॉलिवूडचा देव आनंद का म्हणू नये?), समस्त महिलांच्या हृदयाची धडकन अशा विविध नामाभिधानांनी ओळखलं जाणारं हे प्रकरण नक्की काय होतं? पन्नासच्या दशकानं हिंदी चित्रपटसृष्टीला दिलेल्या तीन महानायकांपैकी देव एक होता, हे तर निर्विवाद! पुण्यात प्रभात स्टुडिओत उमेदवारी करणारा आणि 'लकी'त चाय-बनमस्का खायला येणारा, सडपातळ बांध्याचा देव आनंद नावाचा हा देखणा युवक पुढं समस्त चित्रसृष्टीवर साठ वर्षांहून अधिक काळ राज्य करतो याचं रहस्य काय? एक तर देव आनंदचं पडद्यावरचं व्यक्तिमत्त्व सदाबहार, प्रसन्न असायचं. त्याचा अभिनय अगदी महान दर्जाचा होता, असं नाही, पण स्वतःला छान प्रेझेंट करायला त्याला जमायचं. शिवाय तो देखणा होताच. साठच्या दशकात त्यानं केलेल्या सिनेमांमुळं रोमँटिक हिरो हे बिरुद त्याला आपोआपच येऊन चिकटलं. त्याचं ते हातवारे करीत गाणी म्हणणं, त्याचा तो केसांचा कोंबडा, मिश्कीलपणे नायिकेच्या मागे गोंडा घोळणं या सगळ्यांतून देवचा नायक साकारायचा. जेव्हा सिनेमा हे एकमेव मनोरंजनाचं साधन होतं, त्या काळात भारतातल्या तमाम महिलांच्या हृदयस्थानी हे महाशय का विराजमान झाले असतील, याचा सहजच तर्क बांधता येतो. देव आनंदनं प्रेक्षकांना रोमँटिकपणा म्हणजे काय, हे शिकवलं... व्यवस्थित टापटीप राहणं, उत्कृष्ट फर्डं इंग्रजी बोलणं आणि सुंदर स्त्रीवर मनसोक्त प्रेम करणं या गोष्टी (तत्कालीन) भारतीय तरुणाई कुणाकडून शिकली असेल, तर फक्त 'देवसाब'कडून...
... कारण देव आनंद नट असला, तरी शिकलेला होता. इंग्रजी साहित्याचा पदवीधर होता. त्याला गीत-संगीताची उत्तम समज होती. त्याचे भाऊ चेतन आनंद आणि विजय आनंदही तसेच बुद्धिमान होते. पन्नास-साठच्या दशकातल्या, स्वातंत्र्यानंतर स्वतःच्या पायावर धडपड करून उभ्या राहणाऱ्या, तरुण रक्तानं सळसळणाऱ्या भारताचं देव आनंद हे प्रतीक होतं. 'गाइड'सारख्या अभिजात साहित्यकृतीवर या बंधूंनी तयार केलेला सिनेमाही याची साक्ष आहे. पडद्यावर अतिविक्षिप्त किंवा वाह्यात प्रकार त्यांनी कधी केले नाहीत. पुढं 'हरे रामा हरे कृष्णा'सारखा सिनेमा दिग्दर्शित केल्यावर देवला आपण मोठे दिग्दर्शक आहोत, याचा 'साक्षात्कार' झाला. त्यानंतर आतापर्यंतचा त्याचा प्रवास केवळ थक्क होऊन पाहत राहण्यासारखा होता. मला देव आनंदला प्रत्यक्ष बघण्याची संधी एकदाच मिळाली. साधारण १६-१७ वर्षांपूर्वी तो पुणे आंतरराष्ट्रीय महोत्सवात आला होता, तेव्हा पत्रकार परिषदेत त्याच्या नातवांच्या वयाच्या पत्रकार पोरा-पोरींसमोर त्यानं केलेली तुफान बॅटिंग लक्षात राहिलीय. त्याचे नवे सिनेमे, त्याच्या पत्रकार परिषदा, त्या सिनेमांचं प्रदर्शित होऊन पडणं हे सगळं पब्लिकच्याही अंगवळणी पडलं होतं. दर वेळेला एवढी अफाट एनर्जी कुठून आणतो हा माणूस, असा एकच प्रश्न पडायचा.
देव आनंदचा जन्म २६ सप्टेंबर १९२३ चा. तत्कालीन ‘ब्रिटिश इंडिया’मधील पंजाब प्रांतातील शकरगड (जि. गुरुदासपूर) येथे जन्मलेल्या देवचं जन्मनाव होतं धरमदेव. देवचे वडील पिशोरीलाल आनंद गुरुदासपूर जिल्हा न्यायालयातील नावाजलेले वकील होते. पिशोरीलाल यांना चार मुलगे झाले, त्यातील देव तिसरा. देवची बहीण शीलकांता कपूर म्हणजे प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूरची आई. देवचे थोरले भाऊ म्हणजे मनमोहन आनंद (हेही वकीलच होते), चेतन आनंद आणि धाकटा विजय आनंद. देव आनंदचं मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण डलहौसी येथील सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूलमध्ये झालं. त्यानंतर तो धरमशाला येथे कॉलेज शिक्षणासाठी गेला. नंतर तो लाहोरला गेला आणि तेथील गव्हर्न्मेंट कॉलेजमधून त्याने इंग्रजी साहित्य हा विषय घेऊन बी. ए. केलं.
पदवी मिळविल्यानंतर लगेचच तो मुंबईला आला. सुरुवातीला त्याने चर्चगेट येथील मिलिटरी सेन्सॉर ऑफिस येथे नोकरी केली. तेव्हा त्याला ६५ रुपये पगार मिळायचा. त्यानंतर त्याने आणखी एका अकाउंटिंग फर्ममध्ये ८५ रुपये पगारावर नोकरी गेली. देवचा मोठा भाऊ चेतन आनंद तेव्हा ‘इंडियन पीपल थिएटर्स असोसिएशन’मध्ये (इप्टा) जात असे. त्याच्यासोबत देव सिनेमे पाहत असे. अशोककुमारचा ‘किस्मत’ हा चित्रपट तेव्हा जोरात चालला होता. तो बघून देवच्या मनात अभिनेता होण्याची ऊर्मी निर्माण झाली.
प्रभात फिल्म कंपनीचे बाबूराव पै यांनी देव आनंदला पहिला ‘ब्रेक’ दिला. देव पहिल्यांदा त्यांच्या कार्यालयात धडकला, तेव्हा देवचा चेहरा, त्याचं हास्य व आत्मविश्वास बघून पै खूप प्रभावित झाले. त्यांच्यामुळेच प्रभात फिल्म कंपनीच्या ‘हम एक है’ (१९४६) या चित्रपटात त्याला नायकाची भूमिका मिळाली. हिंदू-मुस्लिम एकतेवर आधारित या चित्रपटात देवने हिंदू तरुणाची भूमिका केली होती आणि कमला कोटणीस त्याची नायिका होती. या चित्रपटाचं पुण्यात चित्रीकरण सुरू असताना देवची मैत्री गुरुदत्तशी झाली. त्या दोघांनी असं ठरवलं होतं, की ज्याला चित्रपटसृष्टीत आधी मोठं काम मिळेल, त्याने दुसऱ्याला मदत करायची. त्यानुसार देवने जेव्हा ‘बाजी’ (१९५१) चित्रपट तयार करायचं ठरवलं, तेव्हा त्याचं दिग्दर्शन गुरुदत्तकडं दिलं.
याच काळात देव आनंदला सुरैयासोबत काही सिनेमे करायला मिळाले. त्या दोघांची जोडी जमली. इतकंच नव्हे, तर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. देव तुलनेने नवखा होता, तर सुरैया तेव्हाही मोठी स्टार होती. ‘विद्या’, ‘जीत’, ‘शायर’, ‘अफसर’, ‘निली’, ‘सनम’ अशा काही सिनेमांत दोघे एकत्र झळकले. सुरैयाचं नाव कायम आधी पडद्यावर येई. ‘विद्या’ चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी ‘किनारे किनारे चले जाएंगे’ या गाण्याचं चित्रीकरण सुरू असताना, सुरैयाची बोट उलटली व ती पाण्यात पडली. देवनं तिला वाचवलं. या घटनेनंतर ती त्याच्या प्रेमात पडली. सुरैयाची आजी या दोघांवर लक्ष ठेवून असायची. ‘जीत’ चित्रपटाच्या सेटवर या दोघांनी प्रत्यक्ष लग्न करायचंही ठरवलं होतं. दोघं एकमेकांना पत्रं पाठवायचे. मात्र, नियतीच्या मनात निराळंच काही होतं. देवनं सुरैयाला तेव्हाच्या तीन हजार रुपये किमतीची हिऱ्याची अंगठीही दिली होती. मात्र, सुरैयाच्या आजीनं या लग्नाला विरोध केला. सुरैयाचं कुटुंब मुस्लिम होतं, तर देव हिंदू! अखेर लग्न काही झालेच नाही. सुरैया अखेरपर्यंत अविवाहित राहिली. त्या दोघांनीही एकत्र काम करणं थांबवलं आणि एका प्रेमकहाणीचा करुण अंत झाला.
देवला पहिला मोठा ब्रेक अशोककुमार यांनी दिला. बॉम्बे टॉकीजची निर्मिती असलेल्या ‘जिद्दी’ (१९४८) या चित्रपटात त्यांनी देवला नायक म्हणून घेतलं. हा चित्रपट जोरदार चालला. यात देवची नायिका होती कामिनी कौशल. पुढच्याच वर्षी देवनं ‘नवकेतन’ ही स्वत:ची निर्मिती संस्था काढली आणि तो स्वत: चित्रपट काढू लागला. गुरुदत्तनं दिग्दर्शित केलेला ‘बाजी’ हा क्राइम थ्रिलर चित्रपट जोरदार चालला. यात देवच्या नायिका होत्या गीता बाली आणि कल्पना कार्तिक. कल्पना कार्तिकचं मूळ नाव होतं मोनासिंह. या दोघांनी नंतर ‘आँधियाँ’, ‘टॅक्सी ड्रायव्हर’, ‘हाउस नं. ४४’ व ‘नौ दो ग्यारह’ हे चित्रपट सोबत केले. ‘टॅक्सी ड्रायव्हर’च्या चित्रीकरणाच्या वेळी कल्पना व देव प्रेमात पडले व देवनं तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला.
यानंतर कल्पना कार्तिकनं आपल्या अभिनय कारकिर्दीला पूर्णविराम दिला. देवची घोडदौड सुरूच होती. ‘मुनीमजी’, ‘फंटूश’, ‘सीआयडी’, ‘पेइंग गेस्ट’ असे त्याचे चित्रपट आले आणि जोरदार हिट झाले. देवची एक स्टाइल आता प्रस्थापित झाली होती. देखणा-रुबाबदार चेहरा, मान तिरकी करत बोलण्याची लकब, भरभर भरभर चालण्याची अनोखी अदा आणि त्याचं ते ‘मिलियन डॉलर’ हास्य याच्या जोरावर त्यानं त्या काळातल्या तमाम प्रेक्षकवर्गावर, विशेषत: महिलांवर गारूड केलं.
याच काळात देवची जोडी वहिदा रेहमानबरोबर जमली. वहिदाला चित्रपटसृष्टीत आणले ते गुरुदत्तनं. ती देव आनंदच्या राज खोसला दिग्दर्शित ‘सीआयडी’मध्ये पहिल्यांदा झळकली. त्यानंतर ‘सोलहवां साल’ (१९५८), काला बाजार (१९६०) आणि ‘बात एक रात की’ (१९६२) या यशस्वी चित्रपटांत या दोघांची जोडी दिसली. मधल्या काळात देवनं दिलीपकुमारसोबत ‘इन्सानियत’ (१९५५) हा सुपरहिट चित्रपट दिला. मधुबाला व नलिनी जयवंतसोबतचा ‘काला पानी’ (१९५८) हा सिनेमाही जोरदार चालला. याच चित्रपटासाठी देवला पहिल्यांदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं ‘फिल्म फेअर’ ॲवॉर्ड मिळालं. या सर्व काळात देवनं आपल्या भूमिकांत वैविध्य आणण्याचा प्रयत्न केला. त्यानं ‘जाल’, ‘दुश्मन’, ‘काला बाजार’ अशा सिनेमांत नकारात्मक छटा असलेल्या भमिका केल्या, तर ‘पॉकेटमार’, ‘काला पानी’, ‘शराबी’, ‘बंबई का बाबू’ अशा सिनेमांत काहीशा दु:खी छटा असलेल्या भूमिकाही केल्या. मात्र, रोमँटिक हिरो हीच त्याची प्रतिमा सर्वाधिक प्रबळ ठरली व चाहत्यांमध्ये ठसली. त्यातही वहिदा रेहमान, नूतन, साधना, कल्पना कार्तिक, गीताबाली या नायिकांसोबत त्याची जोडी विशेष जमली. नूतनसोबत ‘दिल का भंवर करे पुकार...’ या गाण्यात कुतुबमिनारच्या पायऱ्या उतरतानाचा देव आनंद (आणि नूतनही) विसरणं अशक्य! तीच गोष्ट ‘तेरा मेरा प्यार अमर...’ गाण्यातल्या साधना आणि देवची.

साठचं दशक देवसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार होतं. त्याची कारकीर्द याच दशकात चढत्या भाजणीनं सर्वोच्च शिखरावर जाणार होती. सन १९६१ मध्ये त्याचा ‘हम दोनो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटानं तुफान यश मिळवलं. एस. डी. बर्मन हे ‘नवकेतन’चे ठरलेले संगीतकार होते. जयदेव हे त्यांचे सहायक. मात्र, या चित्रपटासाठी देवनं एस. डी. बर्मन यांची परवानगी घेऊन जयदेव यांना स्वतंत्रपणे संगीत द्यायला सांगितलं. त्याचा हा निर्णय किती योग्य ठरला, हे नंतर काळानं सिद्ध केलंच. आजही ‘हम दोनो’ची सर्व गाणी तितकीच लोकप्रिय आहेत. ‘अभी ना जाओ छोडकर...’ हे हिंदी चित्रपट संगीतातील महत्त्वाच्या युगुलगीतांपैकी एक मानलं जातं. या चित्रपटात साधना व नंदा या त्याच्या नायिका होत्या. देवची यात दुहेरी भूमिका होती. हा चित्रपट ५० वर्षांनी, म्हणजे २०११ मध्ये रंगीत अवतारात पुन्हा थिएटमध्ये प्रदर्शित झाला होता आणि तेव्हाही त्याला बऱ्यापैकी प्रतिसाद लाभला होता. (मी स्वत: तेव्हा हा चित्रपट प्रथमच मोठ्या पडद्यावर पाहिला.) यानंतर ‘तेरे घर के सामने’, ‘मंझिल’ नूतनसोबत, ‘किनारे किनारे’ मीनाकुमारीसोबत, ‘माया’ माला सिन्हासोबत, ‘असली नकली’ साधनासोबत, ‘जब प्यार किसी से होता है’ आणि ‘महल’ आशा पारेखसोबत आणि ‘तीन देवियाँ’ कल्पना, सिमी गरेवाल व नंदासोबत असे देवचे एकापाठोपाठ एक ब्लॉकबस्टर चित्रपट प्रदर्शित झाले आणि बॉलिवूडचा रोमँटिक नायक अशी त्याची नाममुद्रा आणखी ठळकपणे सिद्ध करून गेले.

‘गाइड’ नावाची दंतकथा

याच दशकात, १९६५ मध्ये देव आनंदच्या कारकिर्दीतला कदाचित सर्वांत महत्त्वाचा चित्रपट ‘गाइड’ प्रदर्शित झाला. हा त्याचा पहिला रंगीत चित्रपट. या चित्रपटाने इतिहास घडवला. प्रसिद्ध लेखक आर. के. नारायण यांच्या याच नावाच्या कादंबरीवरून हा चित्रपट तयार करण्यात आला. इंग्रजी साहित्याचा अभ्यासक असलेल्या देवला ही कादंबरी भावली. ती रूपेरी पडद्यावर आणायची हे त्याचं स्वप्न होतं. ‘गाइड’च्या निर्मितीच्या अनेक कथा, दंतकथा प्रचलित आहेत. यातील ‘रोझी’ची भूमिका वहिदा रेहमानच करणार, यावर देव ठाम होता. दिग्दर्शन आधी चेतन आनंद करणार होता, मात्र त्यानं नायिकेच्या भूमिकेसाठी प्रिया राजवंश (त्याची प्रेयसी) असावी, असा हट्ट धरला. त्याबरोबर देवनं चेतन आनंदचाच पत्ता कट केला. त्यानंतर त्याने राज खोसला यांना विचारलं. मात्र, राज खोसला आणि वहिदा रेहमान यांचं फार बरं नव्हतं. त्यामुळं त्यांनीही नायिकेबाबत नाराजी व्यक्त केली, असं सांगतात. अखेर वहिदानंही ‘मी या प्रोजेक्टमधून बाजूला होते, तुमच्या दिग्दर्शकाला मी चालणार नाही,’ असं सांगून पाहिलं. मात्र, देव वहिदालाच ती भूमिका देण्यावर ठाम होता. त्यामुळं राज खोसलाही गेले आणि तिथं मग विजय आनंद आला. विजय आनंद ऊर्फ ‘गोल्डी’नं ‘गाइड’चं सोनं केलं. पुढचा सगळा इतिहास आहे. राजू गाइड ही भूमिका देव आनंदच्या कारकिर्दीतील अजरामर भूमिका ठरली. या चित्रपटापूर्वी नृत्यनिपुण वहिदाला तिची नृत्यकला दाखविण्याची संधी देणाऱ्या फारशा भूमिका मिळाल्या नव्हत्या. त्यामुळे तिनं देवला अशी अट घातली होती म्हणे, की माझं एकही नृत्य कापायचं नाही; तरच मी ही भूमिका करीन. देवनं अर्थातच ही अट मान्य केली आणि वहिदाचं नृत्यनैपुण्य सर्वांसमोर आलं. देवला हा चित्रपट हिंदीसोबतच इंग्लिशमध्येही तयार करायचा होता. त्यासाठी त्यानं हॉलिवूड प्रॉडक्शनसोबत काम केलं. नोबेल पारितोषिक विजेत्या प्रख्यात लेखिका पर्ल बक यांना त्याने इंग्लिश चित्रपटासाठी लेखन करायला सांगितलं होतं. खुद्द आर. के. नारायण यांना ‘गाइड’ चित्रपट फारसा भावला नव्हता, असं म्हणतात. ते काही का असेना, भारतीय प्रेक्षकांनी हा सिनेमा डोक्यावर घेतला, यात शंका नाही. मुळात ‘गाइड’मधील राजू आणि रोझीचं प्रेम त्या काळाच्या पुढचं होतं. असा काळाच्या पुढचा चित्रपट काढण्याचं आणि (भारतीय जनमानसाची नाडी ओळखून) त्यातल्या प्रेमाला वासनेचा स्पर्श होऊ न देता ते उदात्त वाटेल याची काळजी घेण्याचं काम देव व विजय आनंद या बंधूंनी यशस्वीपणे केलं, हे निश्चित.
विजय आनंदनेच दिग्दर्शित केलेला ‘ज्वेल थीफ’ हा पुढचा क्राइम थ्रिलरदेखील जोरदार हिट झाला. यात देवची नायिका नृत्यनिपुण वैजयंतीमाला होती. यातलं ‘होठों पे ऐसी बात’ हे गाणं आजही गणेशोत्सवातलं रोषणाईसाठीचं लाडकं गाणं आहे. यानंतर देव व विजय आनंद यांनी ‘जॉनी मेरा नाम’च्या (१९७०) रूपाने आणखी एक ब्लॉकबस्टर सिनेमा दिला. या वेळी देवचं वय होतं ४७, तर त्याच्याहून तब्बल २५ वर्षांनी लहान असलेली, २२ वर्षीय हेमामालिनी त्याची नायिका होती. या सिनेमाला मिळालेल्या तुडुंब यशामुळं हेमामालिनी मोठी स्टार म्हणून ओळखली जाऊ लागली.

दिग्दर्शनात पदार्पण

साठचं दशक अशा रीतीनं देवला त्याच्या कारकिर्दीच्या शिखरावर घेऊन गेलं. आता देवला स्वत:ला चित्रपट दिग्दर्शित करण्याची इच्छा निर्माण झाली. ‘प्रेमपुजारी’द्वारे देव दिग्दर्शनातही उतरला. जहिदा या अभिनेत्रीचं या चित्रपटाद्वारे पदार्पण झालं होतं. दुसरी नायिका अर्थात वहिदा रेहमान होती. मात्र, हा सिनेमा फ्लॉप ठरला. देवला दिग्दर्शक म्हणून खरं यश मिळवून दिलं ते ‘हरे रामा हरे कृष्णा’ (१९७१) या चित्रपटाने. हिप्पी संस्कृतीवर आधारित या चित्रपटाचं बहुतांश चित्रीकरण नेपाळमध्ये झालं होतं. या चित्रपटाद्वारे देव आनंदनं झीनत अमानला रूपेरी पडद्यावर झळकवलं. झीनत रातोरात सुपरस्टार झाली. यातलं आशा भोसलेंनी गायलेलं ‘दम मारो दम’ हे गाणंही तुफान गाजलं. या चित्रपटादरम्यान देव आनंद कोवळ्या, पण मादक अशा झीनतच्या प्रेमात पडला होता. त्याबाबत तेव्हाच्या फिल्मी मासिकांतून भरपूर गॉसिप प्रसिद्ध व्हायचं. पुढं राज कपूरच्या पार्टीत देवनं झीनतला पाहिलं आणि नंतर त्यानं तिचा विषय डोक्यातून काढून टाकला, असं सांगतात. राज कपूरनं नंतर तिला ‘सत्यम शिवम सुंदरम’मध्ये झळकवलं, हे सर्वविदीत आहे.
याच काळात राज कपूर आणि दिलीपकुमार हे देवचे दोन्ही सुपरस्टार सहकलाकार नायक म्हणून काहीसे उतरणीला लागले होते. देव आनंदचेही ‘सोलो हिरो’ म्हणून काही चित्रपट फ्लॉप झाले. मात्र, तो तरीही त्याच्याहून वयाने कमी असलेल्या शर्मिला टागोर, योगिता बाली, राखी, परवीन बाबी आदी नायिकांसोबत काम करत राहिला आणि त्यातले काही सिनेमे चाललेही! विशेषत: १९७८ मध्ये आलेला ‘देस-परदेस’ जोरदार चालला. या वेळी देवचं वय होतं फक्त ५५ आणि त्याची नायिका होती अवघ्या २१ वर्षांची टीना मुनीम!
याच वेळी देशात आणीबाणीचा काळ होता. तेव्हा देवनं उघडपणे आणीबाणीच्या विरोधात भूमिका घेतली होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विरोधात १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत त्यानं प्रचार केला होता. नंतर त्याने चक्क ‘नॅशनल पार्टी ऑफ इंडिया’ नावाचा राजकीय पक्षही स्थापन केला होता. तो कालांतरानं अर्थातच त्यानं गुंडाळून टाकला. देव आनंद हा माणूस असाच होता. मनस्वी!
‘देस-परदेस’च्या यशानंतरच तेव्हाच्या माध्यमांनी देवला ‘एव्हरग्रीन’ हे बिरुद दिलं. या सिनेमाच्या यशामुळं बासू चटर्जींनी त्याला ‘मनपसंद’मध्ये भूमिका दिली. (‘सुमन सुधा’ हे लता मंगेशकर यांच्या आवाजातलं सुंदर गाणं याच चित्रपटातलं!) याच यशाच्या लाटेवर त्याचे पुढचे दोन चित्रपट ‘लूटमार’ आणि ‘स्वामीदादा’ (१९८२) हेही हिट ठरले.
याच काळात देवनं त्याचा मुलगा सुनील आनंद याला नायक म्हणून घेऊन, ‘आनंद और आनंद’ हा ‘क्रेमर व्हर्सेस क्रेमर’ या लोकप्रिय हॉलिवूड सिनेमावर आधारित चित्रपट काढला. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर असा काही कोसळला, की सुनील आनंदनं त्यानंतर चित्रपटात कधीही काम न करण्याचा सुज्ञ निर्णय घेतला.
देव आनंदनं आता साठी ओलांडली होती. तरीही त्याचे ‘हम नौजवान’ आणि ‘लष्कर’सारखे चित्रपट चांगले चालले. विशेषत: ‘लष्कर’मधल्या (१९८९) प्रोफेसर आनंद या त्याच्या भूमिकेचं समीक्षकांनीही कौतुक केलं होतं. यानंतर नव्वदच्या दशकात त्यानं ‘प्यार का तराना’, ‘गँगस्टर’, ‘रिटर्न ऑफ ज्वेल थीफ’, ‘अमन के फरिश्ते’, ‘सौ करोड’, ‘सेन्सॉर’ आदी अनेक चित्रपट काढले, पण ते सगळे फ्लॉप ठरले. दिग्दर्शक देव आनंदचा अवतार कधीच समाप्त झाला होता. कायम होता तो देव आनंदचा उत्साह!
असं म्हणतात, की देव आनंदचं ऑफिस अतिशय साधंसुधं होतं. त्याचं स्वत:चं राहणीमान मात्र स्टायलिश होतं. तो ब्रिटिश पद्धतीचे शिष्टाचार पाळणारा ‘सभ्य गृहस्थ’ होता. त्याच्या सहनायिका त्याच्याविषयी नेहमी आदरयुक्त प्रेमानं बोलायच्या. देवच्या सहवासात आम्हाला एकदम निर्धास्त, ‘कम्फर्टेबल’ वाटायचं असं त्या म्हणायच्या. देव आनंदनं आपल्या वागण्या-बोलण्यातली ही आदब, ही ‘ग्रेस’ कायम जपली. देव आनंद हा हिंदी चित्रपटसृष्टीतला पहिला ‘फॅशन आयकॉन’ होता. त्याचे स्कार्फ, मफलर, जर्किन; एवढंच काय, त्याची सिगारेट हीदेखील फॅशन म्हणून प्रचलित व्हायची. त्याच्यासारखा केसाचा कोंबडा काढून फिरण्याची तेव्हाच्या तरुणाईत क्रेझ असे. 

त्याला मुंबईविषयी अतोनात प्रेम होतं. मुंबई शहर कालांतराने बकाल होत गेलं. ती अवस्था बघून देव कायम व्यथित व्हायचा. त्यानं १९५० च्या दशकातील ब्रिटिशांच्या प्रभावाखालची आखीव-रेखीव, कमी गर्दीची, टुमदार इमारतींची, चांगली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेली, उच्च अभिरुची जपणारी, उत्तमोत्तम स्टुडिओ असणारी, भारतात दुर्मीळ असलेलं ‘वर्क कल्चर’ असलेली मुंबई अनुभवली होती. नंतर नंतर तो बरेचदा परदेशातच असायचा. विशेषत: लंडनमध्ये. त्यानं अखेरचा श्वास घेतला तोही लंडनमध्येच - ३ डिसेंबर २०११ रोजी.
देव आनंद नावाची रसिली, रम्य, रोचक कथा आता ‘दंतकथा’ म्हणूनच उरली आहे. बघता बघता त्याला जाऊन आता १२ वर्षं होत आली. मात्र, मन तरी असंच म्हणतंय, की देव आनंदचं शरीर फक्त गेलं... पण यक्ष कधी मरतात का?

----

(पूर्वप्रसिद्धी : ग्राहकहित दिवाळी अंक, २०२३)

---