असीम शांततेकडे...
------------------------
ता. १ डिसेंबर २०२५. मु. पाँडिचेरी.
आजही सकाळपासून पाऊस होता. मग कालच्याप्रमाणेच आजही छत्र्या घेऊन चहा घेऊन आलो. आज आम्हाला ‘ऑरोव्हिल’ इथं जायचं होतं. हे पाँडिचेरीपासून साधारण १०-१२ किलोमीटरवर आणि तमिळनाडूत आहे. योगी अरविंदांच्या सहकारी, शिष्या मदर (मीरा अल्फासा) यांनी या ‘ऑरोव्हिल’ परिसराची स्थापना केली आहे. श्री अरविंदांच्या कर्मयोगातून ‘आतील शांततेकडे’ नेणाऱ्या या परिसराला भेट देण्याची अतीव उत्सुकता होती. इथल्या ‘मातृमंदिर’ या डोमविषयी आणि तिथल्या ध्यानधारणेविषयीही खूप ऐकलं होतं. तिथं प्रवेश करण्यासाठी आधी मेल पाठवून नंबर लावावा लागतो असंही समजलं होतं. त्यानुसार मी पुण्यात असतानाच मेलवरून बुकिंग करून, आजची वेळ घेतली होती. त्या मेलमध्ये सर्वांनी सकाळी ८.१५ वाजता मुख्य गेटवर जमावं, असं म्हटलं होतं. मात्र, आम्हाला आवरून बाहेर पडायला आणि कॅब मिळायला वेळ लागला. पाँडिचेरी ते तमिळनाडू आणि तिथून परत पाँडिचेरी असा दोन राज्यांचा प्रवास असल्यानं इकडचे कॅबवाले तिकडं येत नाहीत आणि तिकडच्या रिक्षा इकडं येत नाहीत, हे नंतर समजलं. आम्हाला भेटलेला कॅबवाला मी तिथंच तुमच्यासाठी थांबू का, असं का विचारत होता तेही नंतर कळलं. असो.
आम्ही साधारण सव्वानऊच्या सुमारास त्या गेटवर पोचलो. पार्किंगला कार आत आणली तर दीडशे रुपये वेगळे चार्जेस द्यावे लागले असते, म्हणून आम्ही आमची कॅब बाहेरच सोडली आणि आत चालत गेलो. आता पाऊस पूर्ण थांबला होता आणि त्या परिसरातलं वातावरण प्रसन्न होतं. आम्ही त्या पायवाटेवरून आत निघालो. एके ठिकाणी तळ्यासारखं बरंच पाणी साठलं होतं. त्यावर छोटा पूल होता. हे काही एका दिवसाच्या पावसानं साठलेलं पाणी वाटत नव्हतं. मातृमंदिर व तो परिसर याचं रूपांतर एका बेटात करण्यात येणार आहे. त्यासाठी संपूर्ण परिसरात गोलाकार चर खणून तलावनिर्मिती करण्यात येत आहे, असं नंतर समजलं. आम्ही आतील माहिती केंद्रावर पोचल्यावर एका मिनीबसमध्ये काही लोक चढत असल्याचं दिसलं. तिथल्या माणसानं माझं बुकिंग आहे, म्हटल्यावर तातडीनं त्या बसकडं एक मॅडम उभ्या होत्या, त्यांच्याकडं पाठवलं. त्यांनी आणखी एका प्रौढ गोऱ्या (परदेशी) इसमाकडं पाठवलं. तो तिथला मुख्य व्यवस्थापक असावा. त्यानं माझ्या मेलमधला क्रमांक पाहून बॅच कन्फर्म केली. ‘तुला उशीर झाला आहे आणि सुरुवातीचा व्हिडिओ बघणं आवश्यक असतं, तेही तुझं बुडालं आहे,’ असं तो म्हणाला. पण तो दयाळू होता. त्यानं मला नंतर व्हिडिओ बघण्याच्या अटीवर बसमध्ये जाऊ दिलं. तुझ्यासोबत कुणी आहे का, असंही त्यानं विचारून घेतलं. मग धनश्री व नीललाही त्यानं माझ्यासोबत येण्याची परवानगी दिली. (त्यांचं वेगळं बुकिंग करणं गरजेचं होतं. ते आम्ही केलं नव्हतं. किंबहुना प्रयत्न करूनही फक्त मलाच कन्फर्मेशन मिळालं होतं. मात्र, त्या दिवशी पावसामुळं म्हणा, किंवा अन्य काही कारणानं म्हणा, लोक कमी आले असावेत, म्हणून आम्हा तिघांनाही त्यानं बसमध्ये बसू दिलं.) असो.
त्या बसमधून साधारण दीड-दोन किलोमीटर आत कच्च्या रस्त्यानं गेल्यावर ‘मातृमंदिर’च्या त्या प्रवेशद्वारापाशी आम्ही पोचलो. पाऊस पडून गेला असल्यानं सगळीकडं चिखल झाला होता. तिथं सगळे जमा झाल्यानंतर आमच्या आधीची बॅच आत जायची वाट पाहत थांबलो. त्यानंतर आमचा नंबर लागला. आमच्या ग्रुपमध्ये ३२-३३ लोक होते. त्यात अर्थात काही मराठी लोकही होते. इथं आता आमच्या बॅग आणि मोबाइल स्विच ऑफ करून जमा करायचे होते. ते जमा केल्यावर आम्ही त्या परिसराच्या मुख्य दारातून आत प्रवेश केला. तिथंच एका झाडाखाली ललित नावाच्या व्यवस्थापकानं आम्हाला पुन्हा सगळी माहिती दिली. सगळे नियम समजावून सांगितले. आवाज होणारी कुठलीही गोष्ट (पैंजण इ.) इथंच काढून ठेवा असं सांगितलं. स्मार्ट वॉचमध्ये कॅमेरा असेल तर तोही काढून ठेवा असं बजावण्यात आलं. त्यानंतर ललितभाऊंनी आम्हाला इथल्या स्थानिक स्वयंसेवकाच्या हवाली केलं. तो आम्हाला घेऊन चालत निघाला. समोरच ‘मातृमंदिरा’चा तो भव्य डोम दिसत होता. ही वास्तुरचना अतिशय आगळीवेगळी आहे. बाहेरून सोनेरी रंग असलेली आणि कमळाच्या पाकळ्यांचा आकार असलेली ती वास्तू एकदम वेगळीच भासत होती. त्या वास्तूशेजारीच एक मोठं वडाचं झाड आहे. ते झाड म्हणजे या सर्व परिसराचा केंद्रबिंदू आहे, असं त्या स्वयंसेवकानं आम्हाला सांगितलं. त्यानंतर त्यानं आम्हाला तिथल्या ॲम्फी थिएटरमध्ये नेलं. या परिसराचा विकास सुरू झाला, तेव्हा पहिल्यांदा इथं विविध देशांतील माती आणून मोठा सोहळा करण्यात आला होता. तो सगळा परिसरच अतीव शांततेनं भारलेला होता. आमच्या ग्रुपमधलेही सगळे लोक अगदी शांतपणे हे सगळं बघत होते. त्या वातावरणाचा परिणाम म्हणून आपोआपच मौन बाळगलं जात होतं किंवा अगदी हळू आवाजात बोललं जात होतं. आता आम्हाला हळूहळू त्या मुख्य डोमकडं नेण्यात आलं. त्या डोममध्ये शिरल्यावर त्याची भव्यता आणखीनच जाणवली. किमान पाच ते सहा मजल्यांएवढा तो उंच असावा. आम्ही शांततेत, शिस्तीत एक रांग करून आत शिरलो. कमळाच्या पाकळ्यांसारखी सभोवती १२ दालने होती, त्यांच्यामधून आत रस्ता होता. तिथं चपला, बूट काढून ठेवायचे होते. आत सगळीकडं कारपेट टाकलेलं होतं. त्या डोमच्या मधोमध खुली जागा होती. तिथं कमळाच्या आकाराच्या जागेत पाणी खळाळत आत जात होतं. तिथं आम्ही गोल करून बसलो. दहा मिनिटं शांत बसल्यावर बाकी कुठलेही आवाज येणं बंद झालं. केवळ त्या पाण्याचा खळाळता आवाज! थोड्या वेळानं तिथल्या स्वयंसेवक महिलांनी हलकेच टाळी वाजवून आम्हाला उठवलं. नंतर आता मुख्य डोममध्ये जायचं होतं. आत गेल्यावर सर्वांना पांढरे मोजे घालायला दिले. पँट असेल तर तीही मोज्यांच्या आत खोचायची होती. तिथून आम्ही पहिल्या फ्लायरनं वर आलो. तिथून वर जायला वर्तुळाकार, सर्पिलाकार रॅम्प होता. इथं त्यांच्यातली एक स्वयंसेविका आम्हाला घेऊन वर निघाली. ती एका विशिष्ट पद्धतीनं पावलं टाकत हळूहळू वर निघाली होती. आम्ही तिच्या मागे चालत होतो. आमच्यातल्या एका प्रौढ माणसाला काय घाई झाली होती, कुणास ठाऊक. तो तिला ओलांडून भरभर वर गेला. तिथं आडवी दोरी लावून रस्ता बंद केला होता. मग ही स्वयंसेविका अतीव हळू गतीनं तिथं पोचली. शेवटच्या टप्प्यात माझ्या मागचा माणूस मला हळूच पुढं सटकण्यासाठी खुणावत असल्यानं मीही तिला ओलांडून पुढं गेलो. मात्र, नंतर वाटलं, की आपलं हे चुकलं. कारण त्या बाईनं असा काही लूक दिला, की मला मेल्याहून मेल्यासारखं झालं. कदाचित ध्यान मंदिरात जाण्याआधी ही आपल्या संयमाची परीक्षा असावी. मी त्यात नापास झालो होतो. मला त्या मागच्या माणसाचा भयंकर राग आला. पण आता चूक होऊन गेली होती.
वर एका गोऱ्या प्रौढानं ती दोरी बाजूला केली आणि मग आम्ही आत शिरलो. आत त्या विशाल डोमच्या मधोमध एक क्रिस्टल बॉल होता. त्यातून प्रकाश येत होता. अगदी काही सिनेमांत दाखवतात तसलं गूढ वातावरण होतं. तिथं मोठमोठे खांब होते. त्यांमधून पांढरीशुभ्र चादर व उशीच्या आकाराचं जाजम अंथरलं होतं. त्यावर एकेकानं बसून घेतलं. इथं साधारण पंधरा मिनिटं ध्यानधारणा करता येणार होती. मी डोळे मिटले. एका विलक्षण, असीम, अलोकिक शांततेचा अनुभव मी घेत होतो. किती काळ गेला, कळलं नाही. एक माणूस मोठ्यानं खोकला. सर्वांचीच तंद्री भंगली. खरं तर या सूचना आधी दिल्या होत्या. मात्र, आपल्याकडं ते नियम मोडणारे, किंवा त्यांना गांभीर्यानं न घेणारे लोक असतातच. तो माणूस दुसऱ्यांदा खोकल्यावर त्या गोऱ्यानं त्याला हळूच दंडाला धरून बाहेर नेलं. आम्ही पुन्हा एकदा ध्यानावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला. आता दुसरं कुणी तरी खोकलं. मग त्या गोऱ्यानं त्या व्यक्तीलाही बाहेर नेलं. त्यानंतर मात्र बरीच शांतता लाभली. आपल्या आयुष्यात आपण किती ‘नॉइज’ला, गोंगाटाला तोंड देतो हे कळून आलं. हा सगळा खटाटोप ‘इनर पीस’साठी, अर्थात आतल्या शांततेसाठी सुरू होता. बाहेर कितीही शांतता असली, तरी मनात खळबळ सुरू असेल तर आपले चित्त एकाग्र होऊ शकत नाही. त्यामुळं मन शांत ठेवणं फार गरजेचं असतं. ते आपल्या एकूण आरोग्यासाठीही महत्त्वाचं असतं. हे सगळं आपल्याला कळत असतं. पण वळत नसतं... असो. त्या शांततेतून बाहेर येण्यासाठी दोनदा लाइट ब्लिंक करण्यात आले. मग आम्ही शांतपणे डोळे उघडले. इशाऱ्यानेच आम्हाला बाहेर जायला सांगण्यात आलं. आम्ही अजिबात आवाज न करता, बाहेर आलो. खालच्या मजल्यावर आलो. ते मोजे काढून ठेवले. तिथून खाली उतरून एकदम बाहेर आलो. तो परिसरही तसा शांतच होता. केवळ पक्ष्यांचे आवाज येत होते. आता आम्ही त्या वडाच्या प्रचंड झाडाखाली टाकलेल्या बाकांखाली जाऊन बसलो. सहज मोजलं तर साधारण २३ खोडं जमिनीत उभी होती, एवढं ते झाड भव्य होतं. खरं तर तिथून निघायला नको वाटत होतं. आज पावसानं कृपा केली होती. थोडा वेळ तर चक्क ऊनही पडलं होतं. आमचं नशीब जोरावर होतं, म्हणून इथं येता आलं. एरवी खूप पाऊस असला, की हे ‘मातृमंदिर’ बंद असतं, असं समजलं.
आता हळूहळू बाहेर पडायची वेळ झाली होती. सगळे त्या एंट्री गेटपाशी जमलो. आपापल्या बॅगा आणि मोबाइल ताब्यात घेतले. साधारण तास-दीड तास आम्ही मोबाइलपासून दूर होतो. मोबाइल सुरू केल्यावर कळलं, की या काळात फार काही घडलेलं नाही. आपल्यावाचून कुणाचंही काहीही अडलेलं नाही. आपण या काळात जे मिळवलं, ते किती तरी अधिक मौल्यवान होतं! असो.
इथून बसनं पुन्हा मुख्य दारापाशी आलो. इथं कॅफे, कँटीन असं सगळं होतं. आम्ही सकाळी नाश्ता न करताच निघालो होतो. आता कडकडून भूक लागली होती. मग तिथं व्यवस्थित खाल्लं. नंतर ते माहिती केंद्र फिरून पाहिलं. तो सकाळी चुकलेला व्हिडिओही पाहिला. त्यात या ‘मातृमंदिरा’ची संकल्पना ते आजपर्यंतचा प्रवास दाखवला होता. एवढं सगळं झाल्यावर आम्ही परत पाँडिचेरीला जायला निघालो. कॅब बुक केली तर त्यानं ॲपवर दाखवलेल्या पैशांपेक्षा दुप्पट पैसे मागितले. आम्ही येताना ३०० रुपयांत आलो होतो. हा आता ६०० रुपये मागत होता. कारण तेच - दुसऱ्या राज्यात जायचंय. तिथून परत यायला काही मिळत नाही वगैरे. रिक्षावाल्यांनीही तेच ऐकवलं. अखेर एकाला ४५० रुपयांत पटवलं. त्यानं निघाल्याबरोबर काही मिनिटांत उजव्या बाजूला एका कच्च्या वाटणाऱ्या रस्त्यावर गाडी घातली. जरा टरकायला झालं. पण मी लोकेशन ऑन ठेवून मॅपवर रस्ता पाहत होतो. अनेकदा हे गावाकडचे रिक्षावाले शॉर्टकट मारत इंधन वाचवत जातात. हाही तसाच होता. कुठल्या कुठल्या इंडस्ट्रियल एरियातून, गल्ली-बोळांतून (बहुतेक पोलिसांना चुकवत) त्यानं रिक्षा पाँडिचेरीत आणली. आम्हाला हॉटेलवर पोचायला दीड वाजला होता. नंतर आम्ही हॉटेलवर आरामच केला.
आता आजच्या ‘टूर गाइड’मध्ये एका पॅराडाइज बीच नावाच्या ठिकाणाला भेट दर्शविली होती. तिथं वॉटर स्पोर्ट वगैरे होते. त्या आयलंडवर बोटीनं प्रवास करून जायचं होतं. वादळी वातावरणात तिकडं जायला नको वाटलं. मग तो विचारच रद्द करून टाकला. आम्ही संध्याकाळी पुन्हा एकदा प्रोमोनेडला चालत गेलो. त्याआधी भारती पार्कमध्ये जाऊ, असं ठरवलं. ते पार्क सुंदर आहेच. तिथं मधोमध ते ‘अयी मेमोरियल’ दिसलं. तिथं माहिती फक्त तमिळ व फ्रेंचमधूनच होती. मग ‘गुगल’वर माहिती वाचली. ‘अयी’ची दंतकथा समजली. ही त्या काळातली एक नर्तकी होती. तिचा एक मोठा महाल होता. राजाचे लोक की खुद्द राजाच तिथून चालला असताना, त्यांना हे कुठलं तरी भव्य मंदिर वाटलं. त्यांनी आत जाऊन नमस्कार केला आणि मग त्यांना कळलं, की हे नर्तकीचं घर आहे. या अपमानानं क्रुद्ध झालेल्या राजानं तो महाल जमीनदोस्त करण्याची आज्ञा सोडली. त्यावर ‘अयी’नं राजाकडं धाव घेतली आणि सांगितलं, की इथं मी एक विहीर खोदून तिचं पाणी सर्वांना (स्पृश्यास्पृश्यता न बाळगता) देईन. त्या गोष्टीला राजानं परवानगी दिली. त्यानंतर ‘अयी’ ही पाणी देणारी स्त्री म्हणून ओळखली जाऊ लागली आणि नंतर तर तिला देवस्वरूप आलं. दुसरी दंतकथा अशी, की कुणी मौलवी वा पीर तिच्या घरावरून चालले होते. त्यांना तहान लागली म्हणून त्यांनी ‘अयी’कडं पाणी मागितलं. मात्र, त्या गावातील ब्राह्मण पुजाऱ्यांनी तिला मौलवीला पाणी देण्यास मनाई केली. त्यानंतर ‘अयी’नं स्वत:चा महाल उद्ध्वस्त करून सर्वांना पाणी देता येईल, अशी विहीर खोदली. वगैरे वगैरे. (मला स्वत:ला पहिली दंतकथा जास्त विश्वासार्ह वाटली. तमिळनाडूतल्या पेरियार प्रणीत ब्राह्मणेतर चळवळीचा इतिहास पाहिला, तर त्या काळात ही दुसरी ‘राजकीय’ दंतकथा जन्माला आली असण्याची शक्यता अधिक!)
‘भारती पार्क’च्या मधोमध जे स्मारक आहे, ते तिसऱ्या की चौथ्या नेपोलियननं बांधलं आहे. ते ‘अयी’च्याच स्मरणार्थ आहे. शिवाय त्या पार्कमध्ये एक कारंजं होतं. तिथंही ‘अयी’चा पाणी देतानाचा पुतळा आहे. तिच्या घागरीतून सतत पाणी पडत असतं. या पार्कमध्ये अतिशय शांत वाटलं. एकूणच पुण्यााबाहेर कुठंही गेलं, की ‘कमी गर्दी’ हे एवढं जाणवतं ना! आपल्याकडं केवढी प्रचंड गर्दी झाली आहे, हे सतत डाचत राहतं. असो.
पार्कमधून पुन्हा प्रोमोनेडवर गेलो. कालच्या तुलनेत आज समुद्र शांत होता आणि पाऊसही अजिबात नव्हता. सर्व दिवे लागले होते. वातावरण फारच सुंदर होतं. समोरच्या जुन्या कस्टम हाऊसवरचा तिरंगा सहा वाजता खाली उतरवण्याचा सोहळा झाला. बिगुल वाजलं, तेव्हा सगळे तिकडं धावले. अगदी समारंभपूर्वक तो ध्वज खाली घेण्यात आला. गांधीजींचा पुतळा व तो परिसर आता छान झगमगत होता. पर्यटकांची थोडी गर्दी होती. तिथंच अगदी समुद्रावर ‘ल कॅफे’ नावाचं रेस्टॉरंट आहे. आम्हाला भूक लागली होतीच. मग तिथं जाऊन, समुद्राची गाज ऐकत पिझ्झा खाल्ला आणि नंतर मस्त लेमोनेड प्यायलं. इथंही छान लायटिंग होतं. चांगले फोटो काढता आले. सात-साडेसातपर्यंत तिथंच टाइमपास केला. मग चालत निघालो. इथं समोरच एक तुळशीबागेसारखं मार्केट होतं. तिथं टाइमपास केला. थोडी खरेदी केली. आज ‘सुरगुरू’त जायचं नव्हतं. कार्तिक नावाचं एक रेस्टॉरंट सतत ‘सर्च’मध्ये येत होतं. तिथं जाऊन बघू, असं ठरवलं. सुदैवानं ते चांगलं, मोठं रेस्टॉरंट होतं. अनेक लोक तिथं जेवत होते. इथंही ऑर्डर घ्यायला महिलाच होत्या. मग डोसा, राइस असं सगळं रीतसर जेवलो. निवांत चालत चालत हॉटेलवर गेलो. आज एवढ्या असीम शांततेचा अनुभव घेतला होता, की त्यामुळं झोपही पटकन व शांत लागली.
---
पाँडिचेरी/चेन्नई/पुणे. ता. २ डिसेंबर २०२५.
आज परतीचा दिवस. सकाळी नऊ वाजताच टॅक्सी बोलावली होती, जाताना जो टॅक्सीवाला आला होता, तोच आता येणार होता. तोही थेट चेन्नईहून. तो पहाटे चार वाजता चेन्नईहून निघून आमच्या हॉटेलला नऊ वाजता येऊन थांबला होता. आम्ही सकाळी जवळच्या ‘सुरगुरू’त जाऊन (हे नूतनीकरणासाठी बंद होतं. कालच सुरू झाल्याचं संध्याकाळी समजलं होतं...) नाश्ता केला. नंतर चेक-आउट केलं. बरोबर साडेनऊला आमचा प्रवास चेन्नईच्या दिशेनं सुरू झाला. जयशंकरला झोप येत होती, हे दिसत होतं. मी त्याला गाडी थांबवून चहा घ्यायला सांगितलं. मग तो थांबला. आता आम्ही ‘कचरा रोड’नं न येता, थुथीकोडी (तुतीकोरीन)-चेन्नई हायवेनं टिंडिवनम, चेंगलपट्टू मार्गे परत निघालो होतो. जयशंकरला घरी जायची घाई झाली होती. त्यामुळं त्यानं सुसाट गाडी सोडली. हा हायवेही उत्तम होता. त्यामुळं त्यानं आम्हाला बारा वाजता चेन्नई एअरपोर्टला सोडलंही. आमचं फ्लाइट ३.४० ला होतं. मग त्याला म्हटलं, इथं बाहेर जो फूड मॉल आहे तिथं सोड. मग तिथं जाऊन खाणं-पिणं असा टाइमपास करत बसलो. बरोबर दीड वाजता त्या बॅटरी-ऑपरेटेड गाडीनं टर्मिनल - १ ला आलो. इथं एस्कलेटर, लिफ्ट असं करत सगळं सामान घेऊन दुसऱ्या मजल्यावर आलो. सिक्युरिटी वगैरे पार पाडून गेटवर येऊन बसलो तरी दोनच वाजले होते. मग पुन्हा टाइमपास. आमचं ‘इंडिगो’चं फ्लाइट थोडं उशिरानं आलं. बराच वेळ ‘सिक्युरिटी’ एवढंच दाखवत होते. वेळही ३.४० ऐवजी ४.०० अशी केली होती. अखेर सगळं मार्गी लागलं. बोर्डिंगही साडेतीन-पावणेचारला सुरू झालं. आमचं विमान साधारण तासभर उशिरा, म्हणजे पावणेपाचला उडालं. ते बरोबर सव्वासहा वाजता पुण्यात लँड झालं. (दुसऱ्या दिवशीपासून ‘इंडिगो’चा जो महागोंधळ सुरू झाला, ते बघितल्यावर मंगळवारी तसे वेळेत पुण्यात पोचणारे आम्ही फारच नशीबवान ठरलो, म्हणायचे.) कॅब करून आठ वाजेपर्यंत घरी पोचलो. पुण्यात लँड होताना हवेतला प्रदूषणाचा जाडसर थर अगदी जाणवला. खाली उतरल्यावर घरी येईपर्यंत रस्त्यावरचा कोलाहल, गोंधळ ऐकून आपण किती शांततेत चार दिवस राहत होतो, हे प्रकर्षानं जाणवलं. असो.
एकूण चार दिवसांची ही छोटेखानी ट्रिप फारच मस्त झाली. ‘मातृमंदिर’मधील ध्यानधारणेचे क्षण हे या ट्रिपमधले सर्वोच्च आनंददायी क्षण म्हणता येतील.
गेल्या तीन-चार वर्षांत आमच्या दक्षिणेकडंच तीन-चार ट्रिप झाल्या. आता उत्तरायण सुरू करायला हवं... बघू या, कधी योग येतो ते!
(समाप्त)
------------------------





No comments:
Post a Comment