6 Jul 2013

फर्स्ट डे फर्स्ट शो - लूटेरा

उत्कट प्रेमाचं रंगलेलं पान
--------------------------------



सध्याच्या आपल्या धावपळीच्या आयुष्यात निवांतपणा कसा हरवून गेला आहे... आपलं प्रेम, राग, भांडणं, ब्रेक-अप हे सगळं कसं झटपट होत असतं... अशा या एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या सुपरफास्ट दशकात कुणी साठ वर्षांपूर्वीच्या शांत, निवांत आणि उत्कट प्रेमाची गोष्ट सांगू लागला तर...? विक्रमादित्य मोटवानी या दिग्दर्शकानं आपल्या लूटेरा या नव्या हिंदी चित्रपटात तेच केलंय... आणि खरं सांगू, धावपळीच्या आयुष्यातून एखाद्या सुशेगाद हिलस्टेशनवर वर्षभर राहायला जावं आणि बाहेर बर्फ भुरभुरत असताना, आपल्या प्रिय व्यक्तीच्या सहवासात सुंदर सुंदर पुस्तकं वाचत बसावं, असा अनुभव हा सिनेमा देतो. खरं प्रेम नक्की कसं असतं, याचा एक हळुवार प्रत्यय आपल्याला कानात गुज सांगावं, तसा देतो. सिनेमा संपल्यावर प्रत्येकाला आपल्या आयुष्यातल्या सर्वांत प्रिय व्यक्तीची आठवण आल्याशिवाय राहत नाही. किंबहुना अशा व्यक्तीच्या हातात हात गुंफून पाहण्याचाच हा सिनेमा आहे. ओ. हेन्रीच्या द लास्ट लीफ या प्रसिद्ध कथेचा आधार या सिनेमाला आहे, हे सांगितल्यानंतर शीर्षकात रंगलेलं पान असं का म्हटलं आहे, हे लक्षात येईल. हे पान म्हणजे या सिनेमाचा प्राण आहे...
सिनेमाचा कालखंड आहे वर सांगितल्याप्रमाणं १९५३ चा. बंगालमधील माणिकपूर या गावातील जमीनदार रॉयचौधरी (वरुण चंदा) यांच्या प्रासादतुल्य हवेलीत कथा सुरू होते. रॉयचौधरी यांची एकुलती एक मुलगी पाखी (सोनाक्षी) तिच्या वडिलांसमवेत राहत असते. तरुण वयातच तिला दम्यासारख्या विकारानं ग्रासलेलं असतं. एक दिवस त्यांच्या हवेलीत पुरातत्त्व संशोधक असलेला तरुण वरुण (रणवीरसिंह) आणि त्याचा एक मित्र (विक्रांत मॅसी) येतात. चौधरीसाहेब त्यांना त्यांच्या इस्टेटीतील एका मंदिर परिसरात संशोधनासाठी खणण्याची परवानगी देतात. हळूहळू वरुण आणि पाखी यांचं प्रेम फुलू लागतं. त्यांचा वाङ्निश्चयही ठरतो.  मात्र, त्याच वेळी वरुणचा खरा चेहरा कळतो आणि एक धक्का देऊन मध्यंतर होतो. मध्यंतरानंतर गोष्ट डलहौसीला शिफ्ट होते. नायिकेचे वडील मरण पावले आहेत. ती आता एकटीच त्यांच्या डलहौसीतील आलिशान घरात राहतेय. वर्षभराचा काळ लोटलाय. आता नायक पुन्हा एकदा डलहौसीत तिच्या समोर येतो, पण सर्वस्वी वेगळ्या रूपात! विश्वासघातासारख्या कठोर प्रहारानं दुभंगलेली त्यांची मनं आणि आत कुठं तरी एकमेकांविषयीचं दडून बसलेलं खरं प्रेम यांची कसोटी आता सुरू होते...
विक्रमादित्यनं ही गोष्ट छान खुलविली आहे. साठ वर्षांपूर्वीचा कालखंड उभा करणं हे साधं काम नव्हे. मात्र, दिग्दर्शकानं सिनेमाचा पूर्वार्ध अतिशय रम्यपणे सादर केलाय. सिनेमाचा वेग या भागात अत्यंत हळूवार आहे. क्वचितप्रसंगी एवढा संथ सिनेमा आपल्याला चुळबूळही करायला भाग पाडतो. परंतु मध्यंतराला मिळणारा किंचित धक्का आणि त्यानंतर काहीसा थ्रिलर असा उत्तरार्ध यामुळं एकूण भट्टी पुन्हा जमून येते. चित्रपटातील हवेलीचं अंतर्गत चित्रिकरण, नायक-नायिकेची वेषभूषा, व्हिंटेज कार, चित्रकला शिकण्याचे प्रसंग या सर्वांतून दिग्दर्शक तो काळ जिवंत करतो. नायकाच्या खऱ्या रूपाविषयी एक सस्पेन्स त्यानं पहिल्यापासून कायम ठेवलाय. त्यामुळं मध्यंतराला बसणारा धक्का फारसा अनपेक्षित नसला, तरी या कथानकातून नायिकेविषयी पुरेपूर सहानुभूती निर्माण करण्यात दिग्दर्शक यशस्वी होतो. हा हळुवारपणा सिनेमातील कथावस्तूची प्रत काय पातळीवरची आहे, याची आपल्याला सातत्यानं जाणीव करून देत राहतो.
उत्तरार्ध काहीसा वेगवान आणि पळापळीचा आहे. तुलनेत नायक-नायिकेच्या पुनर्भेटीतून अपेक्षित असलेल्या प्रेमाच्या नव्या प्रत्ययाचा भाग कमी येतो. मात्र, याची सर्व कसर दिग्दर्शकानं क्लायमॅक्सच्या दृश्यांत भरून काढली आहे. या दृश्यामुळं सिनेमा उंची गाठतो. नायकाच्या मास्टरपीसबरोबरच दिग्दर्शकाच्या कारागिरीलाही आपण तिथं दाद देतो.
सोनाक्षीला तिची लाइफटाइम भूमिका मिळाली आहे. साठच्या दशकातील जमीनदार घराण्यातील अतिश्रीमंत; परंतु एकाकी नायिका पाखी तिनं समरसून साकारली आहे. कोपरापर्यंत लांब ब्लाउज आणि उंची साड्यांमध्ये ती दिसतेही छान. दम्यानं खंगलेली, विश्वासघातानं दुभंगलेली उद्-भवत पाखी तिनं उत्तरार्धात जबरदस्त साकारलीय. रणवीरनंही वरुणची वेगवेगळ्या छटा असलेली भूमिका अगदी जीव ओतून केलीय. उत्तरार्धातील त्याचे लूक अत्यंत प्रभावी. एकाच माणसात कधी कधी दोन टोकाचे स्वभाव असलेली व्यक्तिमत्त्वं वास करून असतात. अशा प्रकारची ही भूमिका रणवीरनं अगदी मेहनतीनं सादर केल्याचं जाणवतं.
संगीतकार अमित त्रिवेदी आणि गीतकार अभिजित भट्टाचार्य ही जोडी सध्या फॉर्मात आहे. त्रिवेदींचं संगीत खास. मोनाली ठाकूरच्या आवाजातलं संवार लूं... मैं संवार लूं हे गाणं यापूर्वीच हिट झालं आहे. ते छानच आहे. याशिवाय बाकी गाणी (मोंटा रे, शिकायतें.. इ.) चांगली जमली आहेत. सिनेमॅटोग्राफर महेंद्र शेट्टी यांच्या कॅमेऱ्यानं डलहौसीतील निसर्ग अप्रतिम टिपलाय.
या झक्कास सिनेमाविषयी तक्रार असलीच तर फक्त एकच. सिनेमाचं नाव एवढं खास नाही. किंबहुना बी ग्रेड मसाला हिंदी सिनेमाचं हे शीर्षक वाटतं. इतक्या काव्यात्म चित्रकादंबरीला तितकंच अभिजात शीर्षक असतं, तर छान वाटलं असतं. (अगदी ‘आखरी पन्ना’ हे भाषांतरित नावही चाललं असतं!) असो.
तेव्हा हा सिनेमा नक्की पाहा. हा गडबडगुंडा सिनेमा नाही. भरपूर, निवांत वेळ काढून जा... आणि आपल्या प्रिय व्यक्तीबरोबरच पाहा... प्रेम उत्कट असलं, की पान कसं रंगतं, याचा पुन्हा प्रत्यय येईल!
---
निर्मिती : बालाजी मोशन पिक्चर्स
दिग्दर्शक : विक्रमादित्य मोटवानी
संगीत : अमित त्रिवेदी
सिनेमॅटोग्राफर : महेंद्र शेट्टी
प्रमुख भूमिका : रणवीरसिंह, सोनाक्षी सिन्हा, वरुण चंदा, विक्रांत मॅसी, अदिल हुसेन, चंदा, दिव्या दत्ता आदी.
दर्जा : ****
---
(पूर्वप्रसिद्धी - मटा, ६ जुलै, पुणे )
---

No comments:

Post a Comment