25 Jan 2014

फर्स्ट डे फर्स्ट शो - जय हो


हिंसक, बटबटीत ‘आम’रस...
----------------------------------- 


सलमान खानचा ‘जय हो’ हा नवा सिनेमा सर्वसामान्य माणसात असलेल्या सुप्त ताकदीची महती (‘आम आदमी सोया हुआ शेर है... उंगली मत कर; वरना चीरफाड देगा’ या भेदक शब्दांत) सांगतो. एखाद्यानं आपल्याला मदत केली, तर त्याला ‘थँक्यू’ न म्हणता आपणही आणखी तीन जणांना मदत करावी, असा चांगला सल्ला देतो. भ्रष्ट अन् बाहुबली राजकारणी लोकांविषयी सामान्यांच्या मनात असलेली तिडीक स्पष्टपणे मांडतो....
कौतुकाची ही तीन वाक्यं सोडली, तर सोहेल खान दिग्दर्शित हा नवा सिनेमा म्हणजे ‘आम आदमी’च्या नावाखाली मांडलेली एक हिंसक अन् बटबटीत करमणूक आहे. हल्ली खऱ्या आमरसाऐवजी फ्लेवर घातलेला खोटा आमरस खाण्याचीच फॅशन आहे. त्या हिशेबाने हा ‘आम’रसही दोन-अडीचशे कोटींचा गल्ला गोळा करणार, यात शंका नाही. अर्थात सिनेमाचा दर्जा आणि त्याचं बॉक्स ऑफिस कलेक्शन यांच्यातच फारसा संबंध न उरल्यानं त्याविषयी न बोललेलं बरं...
आपल्या भावाच्या सध्याच्या ‘लार्जर दॅन लाइफ’ इमेजचा पुरेपूर वापर करण्यासाठीच सोहेल खाननं हा सिनेमा निर्माण केलाय, हे पहिल्या फ्रेमपासून जाणवतं. मात्र, तब्बल १४५ मिनिटांचा हा खेळ दिग्दर्शकानं अकारण खूपच ताणला आहे आणि नायकाच्या सर्व कलागुणांना वाव देण्याच्या नादात कुठल्या कुठं वाहवत नेला आहे! जय अग्निहोत्री (सलमान) (सिनेमात भगिनीप्रेमाचं अलोट दर्शन घडविणाऱ्या सलमाननं सिनेमातलं आडनावही आपल्या खऱ्या बहिणीचं - अलविरा खान अग्निहोत्रीचंच - घेतलं आहे...) नामक तरुणाच्या आयुष्यावरचा हा सिनेमा सादर करताना सोहेलनं यात काय दाखवलेलं नाही? सर्वसामान्यांना पिडणारा राजकारणी गृहमंत्री, त्याचा मस्तवाल मुलगा व जावई, अतिशहाणी मुलगी, काळे गॉगल घालून मिरवणारे भ्रष्ट पोलिस, परीक्षेत यश मिळविण्याच्या जिद्दीनं दोन्ही हात नसतानाही लढणारी व नंतर आत्महत्या करणारी तरुणी, नायकाची गुजराती प्रेयसी, तिची उडाणटप्पू आई (आणि त्यांचे ‘गंदे’ विनोद), नायकाची गोग्गोड आई, तिच्याशी भांडून लग्न करून गेलेली थोरली ताई, ताईंचे (किडनीदाते असे) अतिप्रेमळ यजमान, त्यांचा अत्यंत आगाऊ (आणि पुलंच्या भाषेत ज्या कार्ट्याच्या उगाचच कानफटात मारावीशी वाटते, असा) चोंबडा ‘उंदीरमामा’ मुलगा, नायकाचा एक डॉक्टर आणि एक पोलिस मित्र (क्लायमॅक्सला दोघे उपयोगी पडणार असतात), एक विनाकारण सच्छील रिक्षावाला, एक नाहक बेवडा (अपना खोपडी), एक सज्जनसा (चक्क) मुख्यमंत्री... आणि हो, नायक पूर्वाश्रमीचा मिलिटरी मॅन असल्यानं वेळेला त्याच्या मदतीला थेट रणगाडा घेऊन धावणारा त्याचा साहेब... आणि यंव आणि त्यंव...
‘स्टॅलिन’ या ए. आर. मुरुगदॉसच्या तेलगू सिनेमावरून (जो मुळात अर्थातच हॉलिवूडचा रिमेक होता...) घेतलेली ही सगळी भेळ कालवून, रांधून कितीही वाईट डिश बनवली तरी ती किमान प्रेझेंटेबल होते, यात वाद नाही. तद्वतच ‘जय हो’ आपण एका विशिष्ट क्षणानंतर एंजॉय करायला लागतोही! पण सद्सद्विवेकबुद्धी ही चीज अशी आहे, की ती कुशनच्या सीटमध्ये बरोबर मध्यभागी लपलेल्या स्प्रिंगच्या खिळ्यासारखी आपल्याला सदैव टोचणीही लावते, की नाही, नाही... हे काय चाललंय? मी का पाहतोय हे? मध्यंतरापर्यंत तरी नक्कीच सोहेल आपल्याला या दोन विचारांच्या ‘सी-सॉ’वर बसवून झुलव झुलव झुलवतो.. मध्यंतरानंतर गृहमंत्री दशरथ सिंह (डॅनी) यांचं आगमन होतं आणि सिनेमाही तिथूनच सुरू होतो. मात्र, हा उत्तरार्ध एवढा टोकाचा हिंसक आणि अंगावर येणारा आहे, की बस्स...
दिलीप शुक्ला यांनी लिहिलेली पटकथा बरीच विस्कळित आणि नको त्या तडजोडी करून लिहिलेली दिसते. सिनेमा लांबीला बराच झाला असावा आणि नंतर वेडावाकडा कापला असावा, अशी शंका येते. कारण सुरुवातीच्या काही प्रसंगांची संगती लागत नाही. विशेषतः सलमान तबू आणि डेसी शाहला घेऊन वंडरलँडमध्ये जातो, तेव्हा तिथं आलेले गुंड आधीच्या प्रसंगाचा संदर्भ देतात. पण ते आधी कुठंच दिसलेले नसतात. (अर्थात यातले बव्हंशी गुंड सारखेच दिसतात, तेव्हा हा दृष्टिभ्रमही असू शकेल. असो.) शिवाय पूर्वार्धात एक पंडितजी, नायकाची आई, नायकाची प्रेयसी, तिची आई आणि नायकाचा चोंबडा उंदीरमामा भाचा यांच्या बाष्कळ विनोदांनी एवढा कहर केला आहे, की हा सगळा भाग कॉमेडी सर्कसचा एपिसोड म्हणून सहज खपून जाईल. विनोदाचा मारा असह्य होऊ नये, म्हणून मध्येच सलमानच्या विविध फायटिंग दृश्यांची योजना केली आहे. सुरुवातीलाच ब्रूना अब्दुल्लाच्या अपहरणाचा प्रसंग येतो तेव्हा जी ही मारामारी सुरू होते, ती थेट शेवटच्या रिळाला सल्लूभायचा शर्ट फाडूनच थांबते. दर वेळेला खांब फोडून नरसिंह बाहेर येतो, तसा शर्ट फाडून उघडा सल्लू बाहेर येणं हा आता त्याचा पेटंट शॉट झाला आहे. (अर्थात पब्लिकही याच क्षणाची वाट पाहत असतं, हे खरं आहे.) समोरचं गिऱ्हाइक फक्त दर वेळेला बदलतं. गेल्या वेळी प्रकाश राज होता, या वेळी हरून काझीची बारी आहे. असो.
अभिनयात म्हणण्यापेक्षा अॅक्शन दृश्यांत सलमान बाजी मारतो. (सलमान मारामारीत करताना गुंडांना चावतो... हो, चक्क चावतो! शिवाय तो हिंस्त्र प्राण्यासारखा वस्सकन अंगावर येतो, हे तर ‘सिंघम’मधलं कॉपी केलंय. हे दोन मुद्दे मायनसमध्ये जातात.)
  त्याची नायिका म्हणून डेसी शाह ही नवी अभिनेत्री आहे. या कोरिओग्राफर मुलीला नायिका म्हणून घेण्याची वेळ सलमानवर का आली, हा मोठ्या संशोधनाचा विषय आहे. तिचं नशीब थोर, बाकी काय... ते ‘नैना’वालं एक गाणं, त्याची ती विविक्षित चाल आणि त्याचं तेच ते टिपिकल शूटिंग (उदा. एक हॉटेल, एक स्टुडिओ, एक निसर्गदृश्य, एक कार, एक मिठी) हेही आता अनेकांना पाठ झालं आहे. तसं ते यातही आहे. पुढच्या वेळी कुणीही प्रेक्षक सलमानच्या या नैना गाण्याचं शूटिंग करून देऊ शकेल, एवढं ते पठडीबाज झालं आहे. प्रमुख खलनायकाच्या भूमिकेत डॅनी असले, तरी त्यांना फारच मर्यादित वाव आहे. इथंही ‘कुत्ता’वाला एक प्रसंग त्यांच्या वाट्याला आलाय खरा; पण यापेक्षा ‘घातक’मधला कातिया आणि त्याचा अमरीश पुरीबरोबरचा सीन किती तरी पटींनी सरस होता. असो. त्याच्या आगाऊ मुलीच्या म्हणजे कविता पाटीलच्या भूमिकेत सना खान जोरदार काम करून गेलीय. बाकी मुकुल देव, हरून काझी वगैरे मंडळी इमाने-इतबारे नायकाचा मार खाण्याचं काम पार पाडतात. तबूचं अनेक दिवसांनी झालेलं दर्शन सुखावह आहे. नादिरा बब्बर आणि रेशम टिपणीसही आपापल्या भूमिकांत छान. महेश मांजरेकर आणि ‘नुक्कड’फेम खोपडीचा अर्थात समीर खक्करचा एक ट्रॅक आहे. तोही इमोशनल आणि चांगला वठलाय. (एवढ्या वर्षांनंतरही समीर खक्करने खोपडीच्याच स्टाइलमध्ये हा रोल केलाय, हे पाहून बरंही वाटलं आणि वाईटही!) भ्रष्ट पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आदित्य पांचोलीला वाया घालवलंय. मुख्यमंत्र्याच्या भूमिकेत मोहनीश बहल ओके ओके. मिलिटरी बॉसच्या रोलमध्ये सुनील शेट्टी दर्शन देऊन जातो. त्याची एकूण इमेज पाहता, तो शेवटी रणगाडा घेऊन नायकाच्या मदतीला येतो, हेही ठीकच म्हणायचं! दोन्ही हात नसलेल्या तरुणीची भूमिका स्वीकारून जेनेलिया देशमुखनं खरं तर धाडस केलं आहे; पण तिनं हा रोल का केला, असंही वाटून गेलं.
यात ‘थँक्यू’ न म्हणता तीन जणांना मदत करा, या संदेशाचाही एवढा भडीमार केला आहे, की शेवटी आवरा म्हणायची वेळ येते. अर्थात सिनेमा संपताना एक गोष्ट एकदम लक्षात येते, की अरेच्चा, आपण कायमच तीन जणांना मदत करीत आलोय... ते तिघं म्हणजे सलमान, अरबाझ आणि सोहेल खान...!
अरे, थँक्यू म्हणा... थँक्यू!!!
---
निर्माता : सुनील लुल्ला, सोहेल खान
दिग्दर्शक : सोहेल खान
कथा : ए. आर. मुरुगदॉस
पटकथा : दिलीप शुक्ला
संगीत : साजिद-वाजिद, देवीश्री प्रसाद, अमल मलिक
प्रमुख भूमिका : सलमान खान, तबू, डॅनी, सुनील शेट्टी, मुकुल देव, महेश मांजरेकर, मोहनीश बहल, आदित्य पांचोली, डेसी शाह, रेशम टिपणीस, जेनेलिया देशमुख, नादिरा बब्बर, महेश ठाकूर, अश्मित पटेल, शरद कपूर, यश टोंक, हरून काझी, सना खान आदी.
दर्जा - ***
 -----------------
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, २५ जानेवारी २०१४)
----
-------------------------------------------------------------

11 Jan 2014

फर्स्ट डे फर्स्ट शो - डेढ इश्किया


अत्रंगी आशिकांची अवली इश्कबाजी
----------------------------------------------------------------------------

 इश्कियाया खास उत्तर प्रदेशी, अवली ब्लॅक कॉमेडीनंतर आता दिग्दर्शक अभिषेक चौबेनं डेढ इश्कियाया पुढच्या भागात ग्राम्य, करकरीत मनोरंजनाचा नवा अवतार सादर केला आहे. पहिल्या भागातला नवखेपणा जाऊन दिग्दर्शक आणि त्याची पात्रंही या विनोदाला सरावली आहेत आणि प्रेक्षकांना सराईतपणे अडीच तास गुंगवून ठेवायचं, बहुतांश वेळी हसायला लावण्याचं सामर्थ्य या कलाकृतीनं कमावलं आहे. पहिल्या भागात विद्या बालनच्या त्या खास अपिलाची सर इथं माधुरी दीक्षितला येत नसली, तरी इश्कियाच्या खेळातले आपण जुने खेळाडू आहोत, हे दाखवणारी जबरदस्त अदाकारी तिच्या बेगम पारानं सादर केली आहे, यात शंकाच नाही.
या सिनेमाची भाषा जवळपास पूर्णतः उर्दू आहे. (पण आपल्याकडं बहुतांश ठिकाणी तो इंग्रजी सबटायटल्ससह प्रदर्शित झाला आहे, हे चांगलं आहे.) गोष्ट साधारण अशी : बब्बन (अर्शद वारसी) आणि खालू (नसीरुद्दीन शाह) या वेळी एक महागडा हार पळवून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटले आहेत. आता ते दोघंही वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या वेषात महमुदाबादमध्ये दाखल झाले आहेत. तेथील बेगम पारा पतिनिधनानंतर राज्यासाठी नवा नवाब नेमणार आहेत. तिथं आपले बब्बन आणि खालू पोचल्यानंतर आणि या सगळ्या संस्थानी घोळात ते कळत-नकळत सामील झाल्यानंतर पुढं उडणारी धमाल म्हणजे हा सिनेमा.
डेढ इश्कियाहा उत्तर प्रदेशी नवाबांच्या महालांत, उर्दू गजला अन् शेरोशायरीच्या साजशृंगारात, धूळ उडवणाऱ्या रखरखीत माळरानात, हवेल्यांतील शह-काटशहात, बंदुका आणि पिस्तुलांच्या दणदणाटात रंगणाऱ्या अत्रंगी आशिकांच्या अवली इश्कबाजीचा खेळ आहे. कथेतील पात्रांशी आणि त्यांच्या पर्यावरणाशी समरस होऊ न शकणाऱ्या प्रेक्षकांना न झेपणारा हा काहीसा अवघड खेळ आहे. मात्र, एकदा त्या सगळ्या माहौलाचं आणि त्यात अदृश्यपणे वावरणाऱ्या माशुकांच्या दिलाचं मर्मएकदा कळलं, तर मग माशाल्लाह! क्या बात! हा सगळा खेळ कशासाठी चालला आहे, हे त्या मुखवट्यांआडच्या चेहऱ्यांचं दर्शन करू शकणाऱ्यांनाच समजू शकेल. तो दर्द-ए-दिलइकडेही भिडण्यासाठी दिग्दर्शकानं वापर केलाय तो बेगम पाराच्या पात्राचा. नवाब नवरा असूनही त्याच्या प्रेमाला पारख्या झालेल्या बेगमच्या हृदयातील प्रेमासाठीचं ते आसुसलेपण तिच्या चाळांतून आणि कथकच्या डौलदार नृत्यातून व्यक्त होताना पाहणं आणि ते पाहताना आपणही घायाळ होणं, हे केवळ इश्किया कलेजाअसलेल्यांनाच जमावं! या सगळ्या इश्कबाजीला आवरण आहे ते भुरट्या चोरीचं, फसवणुकीचं... नवाबाच्या गादीसाठी चाललेल्या हट्टाचं... सत्तास्पर्धेचं! या दोन्ही गोष्टींचं बेमालूम मिश्रण करून अभिषेक चौबेनं हा डेढ इश्कियानामक प्रेमाचा रंगीत खेळ रंगवलाय. 



नसीर आणि माधुरीसारख्या प्रमुख कलाकारांचं केवळ अस्तित्वही त्या निर्जीव रूपेरी पडद्याला एक प्रसन्नता प्रदान करतं. इथंही या दोघा दिग्गजांनी निराश केलेलं नाही. माधुरीचं वय अर्थात जाणवतं, पण या सौंदर्यशालिनी, चारुगात्री अभिनेत्रीच्या अभिनयातला डौल, ‘ग्रेसयत्किंचितही कमी झालेला नाही, हे नक्की! नसीरुद्दीन शाह यांची प्रत्येक भूमिका ही अभिनय शिकणाऱ्यांसाठी एकेक वर्कशॉपच असतं. त्या त्या भूमिकेत शिरण्याची या कलाकाराची हातोटी केवळ लाजवाब आहे. अर्शद वारसी नेहमीच धमाल उडवतो. यातही त्यानं वरकरणी भोळाभाबडा, पण आतून बेरकी असलेला बब्बन नेहमीच्याच तोऱ्यात साकारला आहे. विजयराज या अभिनेत्यानं जान महंमद हे बेगम पाराला पटविण्याचा प्रयत्न करणाऱ्या नवाबाचं पात्र झक्कास साकारलंय. बेगम पारा आणि तिची सखी-सचिव असं सबकुछअसलेल्या मुनियाचं पात्र रंगवलंय हुमा कुरेशीनं. हे पात्र हुमानं अशा खुबीनं साकारलं आहे, की त्या पात्राच्या बेगम पाराशी असलेल्या अव्यक्त नात्याच्या सर्व छटा तिनं फार अप्रतिमपणे दाखवल्या आहेत! दोन स्त्रियांची मैत्री आणि त्यातली सर्वगुपितं हा विषय डेढ इश्कियासारख्या वरकरणी गुंडांच्या इश्काचा खेळ वाटणाऱ्या कथेत येणं आणि तो तेवढ्याच सामर्थ्यानं प्रेक्षकांपर्यंत पोचणं ही या कलाकृतीच फारच मोठी जमेची बाजू ठरली आहे. त्यात माधुरीएवढाच, किंबहुना काकणभर जास्त वाटा आहे तो हुमा कुरेशीचा. तिच्या या जबरदस्त अदाकारीनं नक्कीच या सिनेमाचा दर्जा वाढवला आहे, यात शंका नाही. माधुरीच्या बेगम पाराविषयी काय बोलावं! या नृत्यनिपुण अभिनेत्रीला तिच्या अभिनयक्षमतेला पुरेपूर वाव देतील, अशा भूमिका फार कमी मिळाल्या, यात दुमत नसावं. मात्र, किमान तिच्या दुसऱ्या इनिंगमध्ये तरी तिनं ही कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न सुरू केल्याचं जाणवतं आणि त्या दृष्टीनं या सिनेमातली बेगम पारा तिच्या मदतीला शंभर टक्के धावून आली आहे. पं. बिरजू महाराजांनी नृत्य दिग्दर्शन केलेलं यातील माधुरीचं नृत्य पाहणं म्हणजे आइसिंग ऑन द केक! 

संगीतकार आणि सहपटकथाकार विशाल भारद्वाजचा अर्थातच या कलाकृतीत मोलाचा वाटा आहे. रेखा भारद्वाजनं माधुरीला दिलेला प्लेबॅक आणि शास्त्रीय रागदारीवर आधारित गाणी जमून आली आहेत.
तेव्हा नक्की जा... पाहा... आपल्यातला खोडकर प्रेमी, प्रियकर, प्रेयसी जागा/जागी असेल, तर हा अत्रंगी खेळ तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही. आणि समजा नाही आवडला किंवा बोअर झाला तर आपल्या आयुष्यात त्या खोडकरपणाची मोठ्ठी उणीव आहे, असं बिनधोकपणे समजून चाला...

---
निर्मिती : रमण मारू, विशाल भारद्वाज
दिग्दर्शक : अभिषेक चौबे
पटकथा : विशाल भारद्वाज, अभिषेक चौबे
संगीत : विशाल भारद्वाज
गीते : गुलजार
प्रमुख भूमिका : नसीरुद्दीन शाह, माधुरी दीक्षित-नेने, अर्शद वारसी, हुमा कुरेशी, विजयराज, मनोज पाहवा
कालावधी : दोन तास ३२ मिनिटे
दर्जा : *** /
---

 ---------------------------------------------------------------------------------
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती, ११ जानेवारी २०१४)
------------------------