अत्रंगी आशिकांची अवली इश्कबाजी
----------------------------------------------------------------------------
‘इश्किया’ या खास उत्तर प्रदेशी,
अवली
ब्लॅक कॉमेडीनंतर आता दिग्दर्शक अभिषेक चौबेनं ‘डेढ इश्किया’
या पुढच्या
भागात ग्राम्य, करकरीत मनोरंजनाचा नवा अवतार सादर केला आहे. पहिल्या
भागातला नवखेपणा जाऊन दिग्दर्शक आणि त्याची पात्रंही या विनोदाला सरावली आहेत आणि प्रेक्षकांना
सराईतपणे अडीच तास गुंगवून ठेवायचं, बहुतांश वेळी हसायला लावण्याचं सामर्थ्य
या कलाकृतीनं कमावलं आहे. पहिल्या भागात विद्या बालनच्या त्या खास ‘अपिला’ची सर
इथं माधुरी दीक्षितला येत नसली, तरी ‘इश्किया’च्या
खेळातले आपण जुने खेळाडू आहोत, हे दाखवणारी जबरदस्त अदाकारी तिच्या बेगम
पारानं सादर केली आहे, यात शंकाच नाही.
या सिनेमाची भाषा जवळपास पूर्णतः उर्दू आहे. (पण
आपल्याकडं बहुतांश ठिकाणी तो इंग्रजी सबटायटल्ससह प्रदर्शित झाला आहे, हे चांगलं
आहे.) गोष्ट साधारण अशी : बब्बन
(अर्शद वारसी) आणि खालू (नसीरुद्दीन शाह) या वेळी एक महागडा हार पळवून पोलिसांच्या
हातावर तुरी देऊन निसटले आहेत. आता ते दोघंही वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या वेषात
महमुदाबादमध्ये दाखल झाले आहेत. तेथील बेगम पारा पतिनिधनानंतर राज्यासाठी नवा नवाब
नेमणार आहेत. तिथं आपले बब्बन आणि खालू पोचल्यानंतर आणि या सगळ्या संस्थानी घोळात ते
कळत-नकळत सामील झाल्यानंतर पुढं उडणारी धमाल म्हणजे हा सिनेमा.
‘डेढ इश्किया’ हा उत्तर प्रदेशी
नवाबांच्या महालांत, उर्दू गजला अन् शेरोशायरीच्या साजशृंगारात,
धूळ
उडवणाऱ्या रखरखीत माळरानात, हवेल्यांतील शह-काटशहात, बंदुका
आणि पिस्तुलांच्या दणदणाटात रंगणाऱ्या अत्रंगी आशिकांच्या अवली इश्कबाजीचा खेळ आहे.
कथेतील पात्रांशी आणि त्यांच्या पर्यावरणाशी समरस होऊ न शकणाऱ्या प्रेक्षकांना न झेपणारा
हा काहीसा अवघड खेळ आहे. मात्र, एकदा त्या सगळ्या माहौलाचं आणि त्यात अदृश्यपणे
वावरणाऱ्या माशुकांच्या दिलाचं ‘मर्म’ एकदा कळलं,
तर मग
माशाल्लाह! क्या बात! हा सगळा खेळ कशासाठी चालला आहे, हे त्या मुखवट्यांआडच्या
चेहऱ्यांचं दर्शन करू शकणाऱ्यांनाच समजू शकेल. तो ‘दर्द-ए-दिल’
इकडेही
भिडण्यासाठी दिग्दर्शकानं वापर केलाय तो बेगम पाराच्या पात्राचा. नवाब नवरा असूनही
त्याच्या प्रेमाला पारख्या झालेल्या बेगमच्या हृदयातील प्रेमासाठीचं ते आसुसलेपण तिच्या
चाळांतून आणि कथकच्या डौलदार नृत्यातून व्यक्त होताना पाहणं आणि ते पाहताना आपणही घायाळ
होणं, हे केवळ ‘इश्किया कलेजा’ असलेल्यांनाच जमावं!
या सगळ्या इश्कबाजीला आवरण आहे ते भुरट्या चोरीचं, फसवणुकीचं... नवाबाच्या
गादीसाठी चाललेल्या हट्टाचं... सत्तास्पर्धेचं! या दोन्ही गोष्टींचं बेमालूम मिश्रण
करून अभिषेक चौबेनं हा ‘डेढ इश्किया’ नामक प्रेमाचा रंगीत
खेळ रंगवलाय.
नसीर आणि माधुरीसारख्या प्रमुख कलाकारांचं केवळ
अस्तित्वही त्या निर्जीव रूपेरी पडद्याला एक प्रसन्नता प्रदान करतं. इथंही या दोघा
दिग्गजांनी निराश केलेलं नाही. माधुरीचं वय अर्थात जाणवतं, पण या सौंदर्यशालिनी,
चारुगात्री
अभिनेत्रीच्या अभिनयातला डौल, ‘ग्रेस’ यत्किंचितही कमी
झालेला नाही, हे नक्की! नसीरुद्दीन शाह यांची प्रत्येक भूमिका
ही अभिनय शिकणाऱ्यांसाठी एकेक वर्कशॉपच असतं. त्या त्या भूमिकेत शिरण्याची या कलाकाराची
हातोटी केवळ लाजवाब आहे. अर्शद वारसी नेहमीच धमाल उडवतो. यातही त्यानं वरकरणी भोळाभाबडा,
पण आतून
बेरकी असलेला बब्बन नेहमीच्याच तोऱ्यात साकारला आहे. विजयराज या अभिनेत्यानं जान महंमद
हे बेगम पाराला पटविण्याचा प्रयत्न करणाऱ्या नवाबाचं पात्र झक्कास साकारलंय. बेगम पारा
आणि तिची सखी-सचिव असं ‘सबकुछ’ असलेल्या मुनियाचं पात्र रंगवलंय हुमा कुरेशीनं.
हे पात्र हुमानं अशा खुबीनं साकारलं आहे, की त्या पात्राच्या बेगम पाराशी असलेल्या
अव्यक्त नात्याच्या सर्व छटा तिनं फार अप्रतिमपणे दाखवल्या आहेत! दोन स्त्रियांची मैत्री
आणि त्यातली ‘सर्व’ गुपितं हा विषय ‘डेढ इश्किया’सारख्या
वरकरणी गुंडांच्या इश्काचा खेळ वाटणाऱ्या कथेत येणं आणि तो तेवढ्याच सामर्थ्यानं प्रेक्षकांपर्यंत
पोचणं ही या कलाकृतीच फारच मोठी जमेची बाजू ठरली आहे. त्यात माधुरीएवढाच, किंबहुना
काकणभर जास्त वाटा आहे तो हुमा कुरेशीचा. तिच्या या जबरदस्त अदाकारीनं नक्कीच या सिनेमाचा
दर्जा वाढवला आहे, यात शंका नाही. माधुरीच्या बेगम पाराविषयी काय बोलावं!
या नृत्यनिपुण अभिनेत्रीला तिच्या अभिनयक्षमतेला पुरेपूर वाव देतील, अशा
भूमिका फार कमी मिळाल्या, यात दुमत नसावं. मात्र, किमान
तिच्या दुसऱ्या इनिंगमध्ये तरी तिनं ही कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न सुरू केल्याचं
जाणवतं आणि त्या दृष्टीनं या सिनेमातली बेगम पारा तिच्या मदतीला शंभर टक्के धावून आली
आहे. पं. बिरजू महाराजांनी नृत्य दिग्दर्शन केलेलं यातील माधुरीचं नृत्य पाहणं म्हणजे
आइसिंग ऑन द केक!
संगीतकार आणि सहपटकथाकार विशाल भारद्वाजचा अर्थातच
या कलाकृतीत मोलाचा वाटा आहे. रेखा भारद्वाजनं माधुरीला दिलेला प्लेबॅक आणि शास्त्रीय
रागदारीवर आधारित गाणी जमून आली आहेत.
तेव्हा नक्की जा... पाहा... आपल्यातला खोडकर प्रेमी,
प्रियकर, प्रेयसी जागा/जागी असेल, तर हा अत्रंगी खेळ तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार
नाही. आणि समजा नाही आवडला किंवा बोअर झाला तर आपल्या आयुष्यात त्या खोडकरपणाची मोठ्ठी
उणीव आहे, असं बिनधोकपणे समजून चाला...
---
निर्मिती : रमण मारू, विशाल भारद्वाज
दिग्दर्शक : अभिषेक चौबे
पटकथा : विशाल भारद्वाज, अभिषेक चौबे
संगीत : विशाल भारद्वाज
गीते : गुलजार
प्रमुख भूमिका : नसीरुद्दीन शाह, माधुरी दीक्षित-नेने, अर्शद
वारसी, हुमा कुरेशी, विजयराज, मनोज पाहवा
कालावधी : दोन तास ३२ मिनिटे
दर्जा : *** १/२
---
---------------------------------------------------------------------------------
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती, ११ जानेवारी २०१४)
------------------------
No comments:
Post a Comment