सिनेमा : एक 'पाहणे'
--------------------
सिनेमासारखा सिनेमा... सगळे पाहतातच की. मग उगाच 'पाहणे'ला अवतरण कशाला?
या
लेखाचं शीर्षक वाचून असा प्रश्न नक्कीच काहींना पडला असेल. पण ते खरं
नाही. आपण सिनेमा पाहतो म्हणजे नक्की काय पाहतो? आपल्याला खरोखर त्यात काय
पाहायचं असतं? दिग्दर्शकाला 'दिग्दर्शक'च का म्हणतात? निर्माता, समन्वयक,
संपादक आदी का म्हणत नाहीत? सिनेमा म्हणजे नक्की काय? सिनेमाला 'चित्रपट'
का म्हणतात?
पण
आपल्याला क्वचितच हे प्रश्न पडतात. कारण सिनेमा पाहणं ही गोष्टच मुळी फार
काही गांभीर्यानं घेण्याची आहे, असं आपल्या देशात बहुसंख्यांना वाटत नाही.
आमचे गुरुजी आणि प्रसिद्ध चित्रपट अभ्यासक समर नखाते सर म्हणतात तसं,
तुमच्या डोळ्यांसमोर सेकंदाला २४ स्लाइड्स जातात. त्या आपण फक्त बघतो. पण
त्या आपल्याला खरोखर 'दिसतात' का? नुसतं पाहणे आणि नजर किंवा दृष्टी यात
फरक आहे, तो काय आहे?
वास्तविक
सिनेमा ही काही अमूर्त चित्रकला किंवा शास्त्रीय संगीतासारखी कळायला अवघड
अशी कला नव्हे. मुळात ही एक यंत्राधिष्ठित कला आहे. एकोणिसाव्या शतकाच्या
अखेरीस सिनेमाचा शोध लागला, तो यंत्रविद्येतील प्रगतीमुळे. भौतिकशास्त्रावर
आधारित हा सर्व छायाप्रकाशाचा खेळ चालतो. त्यामुळं या कलेची निर्मिती एका
माणसाला शक्य नाही. तिथं टीमवर्कच लागतं. तरीही सिनेमा हा शेवटी
दिग्दर्शकाचा म्हणून ओळखला जातो. याचं कारण या सर्व प्रक्रियेचं दिशादर्शन
तो करीत असतो. अंतिमतः पडद्यावर काय दिसायला हवं आहे, हे केवळ त्यालाच
माहिती असतं. मग तो स्वतःच अनेक भूमिकाही बजावू शकतो. तो अभिनेताही असू
शकतो. कथा-पटकथाकार तर अनेकदा तोच असतो. संगीतकारही असू शकतो. संकलकही असू
शकतो आणि छायाचित्रकारही असू शकतो.
सिनेमा
आधी दिग्दर्शकाच्या किंवा कथा/पटकथाकाराच्या डोक्यात तयार होतो. तो तयार
होताना अर्थातच अनेक भव्य-दिव्य कल्पना त्यांच्या डोक्यात असतात. पण त्या
प्रत्यक्षात येताना त्यातल्या पुष्कळशा गोष्टी कागदावरच राहतात आणि वेगळंच
काही तरी करावं लागतं. अनेकदा तडजोड करावी लागते. आपल्याला हवी तशी फ्रेम
मिळविण्यासाठी तासंतास किंवा दिवसेंदिवस वाट पाहत बसावं लागतं.
सूर्यप्रकाश, वारा आदी गोष्टींसाठी निसर्गावर अवलंबून राहावं लागतं. आपला
सिनेमा पडद्यावर कसा दिसणार आहे, हे दिग्दर्शकाला त्याच्या मनाच्या
पडद्यावर दिसत असतं. या 'सिनेमा'ला कुठलाच खर्च नसल्यानं तो फारच
भव्य-दिव्य आणि 'जगात भारी' असा असतो. पण प्रत्यक्षात येताना त्याला
वास्तवाच्या कठोर परीक्षेला तोंड द्यावं लागतं. एवढं करूनही आपल्यासमोर जो
सिनेमा येतो, तो दिग्दर्शकाच्या मनाप्रमाणे १०० टक्के बनलेला नसतोच. तरीही
आपल्याला अनेक सिनेमे आवडतात. त्यातल्या अनेक अफलातून कल्पना आवडतात. अभिनय
आवडतो किंवा संगीत आवडतं. किंवा कधी तरी एकूणच सर्व परिणाम आवडतो.
सिनेमा
म्हणजे १०० ते २०० मिनिटांत तुमच्यासमोर सादर केलेला एक खेळ असतो. हा खेळ
पडद्यावर साकार होण्यासाठी शेकडो माणसं झटत असतात. एका सिनेमाच्या मागं
किमान तीनशे ते कमाल कितीही हजार लोकांचे कष्ट असू शकतात. यात सेटवरच्या
बॉयपासून ते दिग्दर्शकापर्यंत अनेक घटकांचा समावेश असतो. पूर्वी यासाठी
स्टुडिओ नावाचं एक स्वतंत्र संस्थानच असायचं. या स्टुडिओच्या दिवसांविषयी
वाचलं, की कळतं, हा संसार कसा उभा राहतो ते! या स्टुडिओत सुतारकामापासून ते
रंगकामापर्यंत जवळपास बारा बलुतेदारांची प्रत्येक कामं करणारे विभाग असत.
स्टुडिओची मालक कंपनीच या सर्वांच्या जेवणा-खाण्याचा आणि राहण्याचा खर्च
करीत असे. आजच्या तुलनेत काम निवांत आणि तब्येतीत चालत असे. त्यामुळंच त्या
स्टुडिओ काळातल्या अनेक कलाकृती अत्यंत दर्जेदार आणि दीर्घकाळ परिणाम
करणाऱ्या अशा झाल्या आहेत.
सिनेमा
तयार होण्याची प्रक्रिया बहुतेकांना माहिती आहे. आधी कथा तयार होते. मग
त्यावरून प्रत्यक्ष पडद्यावर ती कशी दिसेल याची गोष्ट - म्हणजेच पटकथा -
तयार केली जाते. मग कलाकार, लोकेशन आदींची निवड, मग गाण्यांची निवड,
गाण्यांचं ध्वनिमुद्रण, मग प्रत्यक्ष चित्रिकरण, मग 'रशेस' पाहून पुन्हा
काही गरजेचं असलेलं चित्रिकरण, मग संकलन, मग डबिंग, मग ध्वनी आरेखन, मग
स्पेशल इफेक्ट्स किंवा फिल्म प्रोसेसिंगसारखे इतर तांत्रिक संस्कार (हल्ली
थेट डिजिटल कॉपी निघते...), मग सेन्सॉर आणि मग अंतिम प्रत... असा सगळा
पारंपरिक प्रवास असतो. आता यात काही गोष्टी मागे-पुढे होत असतात. अलीकडं
सगळं काम कम्प्युटराइज्ड झाल्यापासून रेकॉर्डिंगपासून ते स्पेशल
इफेक्ट्सपर्यंतची पुष्कळ कामं सहजसोपी झाली आहेत. तंत्रज्ञानाच्या
प्रगतीमुळं सिनेमा बनवणं सोपं झालं आहे. अर्थात ते महागही आहेच पुष्कळ!
मुद्दा असा, की कुठलाही सिनेमा असो... त्याला किमान एवढी प्रक्रिया तर
करावी लागतेच. खर्चही होतोच. शिवाय वर म्हटल्याप्रमाणं किमान तीन-चारशे लोक
त्यात थेटपणे गुंतलेले असतात. तरीही फायनल प्रॉडक्ट नीट होत नाही. आपण
सिनेमाला नावं ठेवतो. असं का होतं? सिनेमा बनण्याच्या वरच्या प्रक्रियेत
अनेक ठिकाणी घोळ होऊ शकतात. अनेक गोष्टी बिघडू शकतात. त्यामुळं फायनल
प्रॉडक्ट वाईट प्रतीचं निघू शकतं. मग चांगला सिनेमा बनण्यासाठी काय आवश्यक
असतं? किंवा आपण काय पाहावं?
एक
तर कथा आणि पटकथा. मुळात आजही चांगली 'गोष्ट'च विकली जाते किंवा अपील
होते. एक वेळ सिनेमाची तांत्रिक बाजू चांगली नसेल पण कथा चांगली असेल तरीही
तो सिनेमा पाहिला जातो. चांगली गोष्ट म्हणजे काय? बहुसंख्य प्रेक्षकांना
खिळवून ठेवणाऱ्या हास्य, शृंगार, वीर, करुण, रौद्र आदी नवरसांची किंवा
यापैकी काहींची निश्चित व सकारात्मक निष्पत्ती ज्यातून होते ती चांगली
गोष्ट होय. सत्य, प्रेम, वात्सल्य, माणुसकी यासारख्या चिरंतन मानवी
मूल्यांचं, किंवा विचारांचं भरण-पोषण करणारी किंवा यांतील दोषदिग्दर्शन
करणारी ती चांगली गोष्ट. किंवा मग लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना
भावणारी म्हणजे फँटसी किंवा परिकथा. अर्थात नुसती गोष्ट चांगली असून चालत
नाही, तर ती चांगली मांडावीही लागते. मग त्यात नाट्य आलं. प्रेक्षकाला
गुंतवून ठेवील, अशी प्रसंगरचना आली; संघर्ष आला; कठोर परीक्षा आली. या
साऱ्यांतून मार्ग काढीत शेवटी चिरंतन मूल्यांच्या विजयाकडे कथावस्तूचा
झालेला प्रवास आला. अर्थात ही फारच ढोबळ रचना झाली. जगात नाटकाचे मूळ सातच
प्लॉट आहेत, असं म्हणतात. कुठल्याही नाट्यकृतीत किंवा चित्रकृतीत हेच सात
प्लॉट आलटून-पालटून दाखविले जातात. अर्थात ही पुन्हा पारंपरिक समजूत झाली.
सिनेमा हे माध्यम नव्या कलाकारांना व दिग्दर्शकांना कायमच वेगळ्या वाटा
शोधून काढण्याचं आव्हान देत आलंय. हे आव्हान स्वीकारून वेगळी कलाकृती सादर
करणारेही अनेक दिग्दर्शक आहेत. अर्थात असं म्हणतानाही 'वेगळी कलाकृती'
हीदेखील एक मळलेली वाटच होतेय की काय, असंही वाटण्यासारखी परिस्थिती आहे.
कारण शेवटी प्रेक्षकांना काय आवडेल, यावर इथं सगळं यशापयश अवलंबून असतं.
त्यामुळे कित्येक प्रयोग अनेकदा प्रयोगाच्या पातळीवरच राहतात.
दुसरी
गोष्ट महत्त्वाची ती म्हणजे अर्थातच दिग्दर्शन. याचं कारण दिग्दर्शक हाच
सिनेमाचा सर्वेसर्वा असतो. त्यानं हे सुकाणू नीट हाकलंय की नाही, हे शेवटी
सिनेमा पाहिल्यावरच कळतं. सिनेमाची कथा, तिचा प्रवास, त्यातल्या पात्रांची
प्रस्थापना, त्यांच्या विकसनाचा आलेख हे सगळं शेवटी दिग्दर्शक ठरवीत असतो.
सिनेमातली एकही फ्रेम निरर्थक असता कामा नये, एकही दृश्य-संवाद अवाजवी नको
हे सगळं त्यानं ठरवायचं असतं. शेवटी कलाकृती चांगली झाली, तरी त्यालाच
वाहव्वा मिळणार असते आणि वाईट झाली तरी त्याचं खापर त्याच्याच डोक्यावर
फुटणार असतं. हुशार आणि कल्पक दिग्दर्शक या माध्यमाचा जास्तीत जास्त उपयोग
करून आपला आशय प्रेक्षकापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यांनी
टिपलेल्या एकेका दृश्यामुळे अनेक प्रसंगांची उंची वाढते. अनेकदा न बोलता,
सूचकपणे तो कित्येक गोष्टी सांगून जात असतो. खरं तर फार न बोलता केवळ
दृश्यांच्या आणि चित्रचौकटींच्या माध्यमातूनच आपल्याला काय सांगायचंय ते
सांगण्याचं हे माध्यम आहे. चित्रपटांच्या इतिहासात अशाच प्रतिभाशाली
दिग्दर्शकांना वरचं स्थान मिळाल्याचं पाहायला मिळेल.
तिसरी
गोष्ट येते ती प्रत्यक्ष पडद्यावर व्यक्त होणाऱ्या गोष्टींची. यात
प्रामुख्यानं अभिनय आणि कॅमेरा यांचा समावेश होतो. गोष्ट खूप चांगली असली
आणि दिग्दर्शकही फार कल्पक वगैरे असला, तरी त्याच्या प्रमुख पात्रांना ते
अभिनयाद्वारे पोचवता येत नसेल, तर हा सारा खटाटोप व्यर्थ होतो.
दिग्दर्शकानं अनेकदा काही 'बिटवीन द लाइन्स' सोडलेल्या असतात. चांगला
कलाकार आपल्या समर्थ अभिनयाद्वारे त्या जागा भरून दाखवतो आणि प्रेक्षकांना
एक उच्च दर्जाची, अभिजात कलाकृती पाहिल्याचा आनंद मिळतो. एका अर्थानं
कलाकार हा दिग्दर्शकाच्या कलाकृतीचं सगुण साकार रूप असतो. तीच गोष्ट
कॅमेऱ्याची. कॅमेरा हाही दिग्दर्शकाचा डोळाच असतो. कॅमेऱ्याला जर ते सगळं
दाखवता आलं नाही, तर काहीच उपयोग होत नाही. अनेक प्रतिभावंत कॅमेरामन
आपल्या बुद्धिचातुर्यानं कथेतील अनेक प्रसंग उठावदार करतात. त्यांनी केलेली
प्रकाशयोजना, विशिष्ट अँगल किंवा नैसर्गिक वा कृत्रिम छाया-प्रकाशाचा खेळ
यामुळं कथेतील कित्येक प्रसंग उंचीवर गेलेले आपल्याला दिसतात.
याशिवाय
संगीत आणि पार्श्वसंगीत हाही एक महत्त्वाचा घटक आहेच. पार्श्वसंगीत
चित्रपटाच्या कथेला नेपथ्यासारखं सदैव सोबत करीत असतं. एखादा प्रसंग
उठावदार होण्याकरिता किंवा त्याचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी
पार्श्वसंगीताचा प्रभावी वापर केलेला दिसून येतो. त्याव्यतिरिक्त संकलन
हाही सिनेमातला अत्यंत महत्त्वाचा, पण काहीसा दुर्लक्षित घटक. उत्कृष्ट
संकलन असलेला चित्रपट पसरट किंवा अकारण लांबलेल्या चित्रपटापेक्षा केव्हाही
प्रभावी ठरतो, हे सांगायला नकोच. अनेक उत्कृष्ट दिग्दर्शक हे मुळात
उत्कृष्ट संकलक असलेले पाहायला मिळतात. याचं कारण काय ठेवायचं आणि काय
कापून टाकायचं याचं त्यांना नेमकं भान असतं. अन्यथा स्वतःच चित्रित
केलेल्या प्रत्येक फ्रेमच्या प्रेमात पडलेला दिग्दर्शक अंतिमतः त्या
कलाकृतीचं वाटोळं करण्यास कारणीभूत ठरू शकतो. शिवाय प्रेक्षक असा विस्कळित,
विसविशीत मांडणी असणारा चित्रपट नाकारतात, यात शंकाच नाही.
आपण
सर्वसामान्य प्रेक्षक म्हणून जेव्हा सिनेमाला जातो, तेव्हा अर्थातच अशी
विभागणी करून सिनेमाला गुण देत नाही किंवा त्यावरून आपली पसंती-नापसंती
ठरवीत नाही. सामान्य प्रेक्षकाला सिनेमा आवडतो तो त्याचा एकूण प्रभाव
लक्षात घेऊनच; किंवा आवडत नाही तेही एकंदर प्रभाव उणा असतो म्हणूनच!
समीक्षकाला मात्र असं करता येत नाही. सिनेमा का आवडला हे त्याला संदर्भांसह
स्पष्ट करावं लागतं. कुठले घटक प्रभावी ठरले हे सोदाहरण सांगावं लागतं.
एखादा सिनेमा का वाईट आहे (किंवा कमी प्रभावी आहे असं म्हणू या), हे
सांगतानाही त्याला सकारण स्पष्टीकारण द्यावं लागतं. म्हणजे त्यानं तसं ते
द्यावं अशी अपेक्षा असते. आपल्याकडं चित्रसाक्षरता एकूणच कमी आहे. पण
यासाठी प्रेक्षकाला दोष देण्याचं कारण नाही. खाऊन-पिऊन सुखी असलेला समाजच
अशा अवांतर ज्ञानार्जनाकडं वळतो, हे मान्यच करायला हवं. आपल्याकडं एवढे
दिवस मूलभूत गरजांचा लढा सुरू होता आणि अजूनही आहेच. अशा स्थितीत
चित्रसाक्षरतेची अपेक्षा समस्त समाजाकडं करणं जरा अवाजवीच. पण आपल्या देशात
आता पुष्कळ सुधारणा होताहेत. जनतेचा आर्थिक स्तरही उंचावतोय. महानगरी जीवन
पुष्कळ सुसह्य होतंय. अशा स्थितीत जास्तीत जास्त लोकांनी चित्रसाक्षरता
अंगी बाणवली तर त्याचा परिणाम अंतिमतः आपल्याला अधिक चांगल्या कलाकृती
मिळण्यातच होणार आहे. शेवटी हे दिग्दर्शक किंवा कलाकार समाजातूनच येतात.
त्यांना जसं शिक्षण मिळेल, त्यांचं जसं आकलन असेल, ते आणि तसंच त्यांच्या
कलाकृतीत किंवा अभिव्यक्तीत उतरताना दिसतं. त्यामुळंच आपल्याकडं फिल्म
सोसायट्यांची चळवळ जोरात वाढणं गरजेचं आहे. महानगरांपुरते मर्यादित असलेले
फिल्म क्लब छोट्या गावांमध्येही सुरू झाले पाहिजेत. सुदैवानं आज स्मार्टफोन
आणि वायफायसारख्या तंत्रज्ञानामुळं आपल्याला घरबसल्या जगातले हवे ते
सिनेमे पाहायला मिळू शकतात. पुण्यात तर फिल्म इन्स्टिट्यूट आणि राष्ट्रीय
चित्रपट संग्रहालय या दोन उत्कृष्ट चित्रपटविषयक संस्था हाकेच्या अंतरावर
उभ्या आहेत. तिथं कायमच काही ना काही अभ्यासक्रम, उपक्रम सुरू असतात. त्या
दृष्टीनं पुणेकर भाग्यवान आहेत. अलीकडं आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवही
मुंबई-पुण्यापलीकडे अन्य महत्त्वाच्या शहरांत पाय रोवू लागले आहेत. या
महोत्सवांमधून जगभरातले ताजे, उत्कृष्ट चित्रपट आपल्याकडच्या तरुणांना
पाहायला मिळत आहेत. गेल्या दशकभरात असे अनेक ग्रामीण मराठी तरुण पुढं येऊन
स्वतःची चित्रनिर्मिती करतानाचं सुखद चित्र आपल्याला दिसतं आहे.
अर्थात
प्रेक्षक म्हणूनही आपण अधिक प्रगल्भ होणं गरजेचं आहे. अनेक ठिकाणी सिनेमा
पाहायला कसं बसावं हेही लोकांना शिकवण्याची गरज आहे असं वाटतं. खुर्च्यांवर
पाय ठेवणं, समोरच्याला लाथा मारणं, पॉपकॉर्न किंवा अन्य प्लास्टिकच्या
पॅकबंद पिशव्यांचा आवाज करीत खाणं, मोबाइलवर बडबडणं असले प्रकार सुज्ञ आणि
जाणकार प्रेक्षकाला संताप आणतात. अनेक जण त्यामुळं आपल्या थिएटरांत सिनेमा
पाहायला जायचंच टाळतात. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या प्रेक्षागृहात
जाताना तांत्रिक कारणांमुळं चपला, बूट बाहेर काढून जावं लागतं. पण मला ते
फार आवडतं. त्यामुळं आपण एखाद्या मंदिरात जात आहोत, असा काहीसा पवित्र भाव
माझ्या मनी दाटतो. सिनेमा पाहतानाही सत्यनारायणाच्या पूजेला बसल्यासारखं
पूर्ण एकाग्र होऊन, एखादं पवित्र कार्य करीत असल्याच्या भावनेनं पाहिला
पाहिजे. सिनेमा तयार करताना काय कष्ट पडतात हे पाहायचं असेल, तर एक दिवस
कुठलंही शूटिंग पाहावं. मग एवढ्या कष्टानं तयार झालेला सिनेमा पाहताना
आपणही पूर्ण लक्ष एकाग्र करून तो पाहून त्याला प्रेक्षक म्हणून न्याय
द्यायला नको काय?
असं झाल्यास आपल्याला आपोआपच सिनेमा कळायला लागेल आणि आपण तो 'पाहिला' असं नीट सांगता येईल.
---
(पूर्वप्रसिद्धी - साहित्य चपराक दिवाळी १६)
---