29 Jan 2017

राहुल द्रविडवरील लेख

द्रविड, वुई हेट यू!
----------------


राहुल द्रविड नामक रसायन नक्की कशानं बनलं आहे, याचा उलगडा होत नाही. अगदीच वाया गेलेला, वेडा मनुष्य आहे हा! क्रिकेट या, या देशातल्या सर्वांत लोकप्रिय खेळात सर्वोच्च लोकप्रियता मिळूनही हा माणूस जमिनीवरचे पाय सोडायला तयार नाही. काही तरीच वागतो, बोलतो. शांत राहून कार्यरत वगैरे राहतो. आता परवाचीच घटना पाहा. बेंगळुरू विद्यापीठानं त्याला सन्माननीय डॉक्टरेट पदवी देण्याचं ठरवलं. तर हे महाशय त्याला नम्रपणे नकार देते झाले. एवढ्यावरच थांबले नाहीत, तर क्रीडा क्षेत्रात काही तरी भरीव संशोधन करून ही पदवी मिळवीन, असंही सांगते झाले. काय हे! हा म्हणजे कहर झाला. आयती पदवी कुणी देत असेल, तर ती घ्यावी एवढी साधी गोष्ट या माणसाला समजत नाही, याला काय म्हणावे! अशा सन्माननीय इ. पदव्या मिळविण्यासाठी आपल्या देशात लोक काय काय प्रकार करतात, हे राहुलला माहिती नाही, असं म्हणणंही चुकीचं ठरेल. 
आता अन्य कुणा माणसाला, उदा. एखाद्या शिक्षणमहर्षी वा सहकारमहर्षी राजकारण्याला अशी पदवी दिली जाणार आहे, अशी कल्पना करू. लगेच उंची हॉटेलमध्ये स्वतंत्र पत्रकार परिषद झाली असती. सर्व माध्यमांमध्ये ही बातमी व्यवस्थित छापून आली असती. वृत्तवाहिन्यांवर मुलाखत आली असती. त्या शिक्षणमहर्षीच्या वा सहकारमहर्षीच्या संस्थांमध्ये रोषणाई करण्यात आली असती. मिठाई वाटली गेली असती. गावभर त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे गोडवे गाणारे फलक लावण्यात आले असते. अरे राहुलदेवा, हे शिक्षणमहर्षी वा सहकारमहर्षी तरी खूप मोठे झाले... साधा गल्लीतला (एरवी एका झापडीत खाली पडेल असा) आमचा गॉगलधारी, सुवर्णसाखळीधारी युवा कार्यकर्ता एकोणीस किंवा तेवीस वर्षांचा झाला तरी आख्ख्या पेठेला माहिती पडेल एवढे त्याचे फ्लेक्स लागतात. 'माहौल' का म्हणतात, तो केला जातो. भले आमचं हे 'युवकांचे आशास्थान' किंवा 'आळीचे हृदयस्थान' फर्स्ट इयर फेल असले म्हणून काय झाले! आपल्या देशात काहीही लायकी नसताना स्वतःचा फुकाचा डंका करून घेण्याची अशी दिव्य परंपरा असताना हे द्रविड महोदय मात्र आपल्या गाववाल्यांना त्यांचा फ्लेक्स लावण्याची संधी देत नाहीत, हे काही बरोबर नाही. 
स्थानिक राजकारण्यांशी संधान साधून बेंगळुरूजवळील अब्जावधी किमतीची शेतजमीन अल्प मोबदल्यात पदरात पाडून घ्यावी, खासगी क्रिकेट कोचिंग अकादमी काढावी, खोऱ्यानं पैसे ओढावेत, परदेशांतल्या नामांकित गॉगल, घड्याळं इ. कंपन्यांबरोबर लाखो डॉलरचे करार करावेत, वर्षांतून सहा महिने परदेशांत सुट्टी घालवावी, एनआरआय स्टेटस पदरात पाडून घ्यावं, परदेशी बँकांत मजबूत पैसा साठवावा आणि पुढल्या ४२ द्रविडी पिढ्यांचं कल्याण साधावं एवढा साधा विचार या राहुल द्रविड नामक गृहस्थाला करता येत नाही, म्हणजे बघा. गेलं ना आयुष्य वाया! त्याऐवजी हे महाशय काही तरी अभ्यास वगैरे करतात खेळाचा... वरिष्ठ संघाचं प्रशिक्षकपद नाकारून ज्युनिअर संघाचं प्रशिक्षकपद मागून घेतात... पुढची पिढी घडवताहेत म्हणे... कुठं तरी ऑस्ट्रेलियात ब्रॅडमन व्याख्यानाच्या वार्षिक समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून जातात आणि काही तरी अभ्यासपूर्ण वगैरे बोलतात... एकूण सगळा वेडेपणाच की...
निवृत्त झाल्यावर कुणी तरी विचारलं, की तुला आता कुठल्या गोष्टीचा आनंद वाटेल? तर हा बाबा म्हणाला, की मला माझ्या मुलाला शाळेत सोडता येईल आणि परत घेऊन येता येईल... त्याच्या शाळेच्या रिपोर्ट डेला पालक म्हणून जाता येईल, याचा मला आनंद आहे! शेवटी मिडलक्लास ती मिडलक्लासच मानसिकता! कधी सुधारणार हा?
कुठलं ट्विटर हँडल नाही, करोडो फॉलोअर्स नाहीत, वादग्रस्त वक्तव्य नाही, पेज थ्रीवर उपस्थिती नाही, राजकारणी डावपेच नाहीत, किंवा गेला बाजार मस्त टीआरपी देणार एखादं लफडंसुद्धा नाही. अरेरे... कसं व्हायचं या गृहस्थाचं! 
यापूर्वी २०१४ मध्ये गुलबर्गा विद्यापीठानं असंच १२ जणांना सन्माननीय डॉक्टरेट देण्याचं घोषित केलं होतं. तेव्हाही हे महाशय तिकडं फिरकले नाहीत. डॉक्टरेट ही पदवी किती मेहनत करून कमवावी लागते, याची या माणसाला जरासुद्धा कल्पना नसावी; अन्यथा दोनदोनदा ती नाकारण्याचं औद्धत्य त्यानं दाखवलंच नसतं. इथं साधं दहावी किंवा बारावी पास होतानासुद्धा आम्ही आई-बापांवर उपकार केल्यासारखे अभ्यास करायचो. नंतर विद्यापीठातून जेमतेम पदवी मिळवितानाही आमच्या संयमाची कसोटी लागली होती. तेव्हाही आमच्या अविकसित राष्ट्राला उपकृत केल्याच्या थाटात आम्ही तिसरा वर्ग मिळवून ती पदवी (एकदाची) पदरात पाडून घेतली होती. आणि इथं जगातील सर्वोच्च सुखं पायाशी लोळण घेत असताना हा राहुल शरद द्रविड नामक मध्यमवर्गीय मराठी माणसाचा मुलगा म्हणतो, की मी अभ्यास करून डॉक्टरेट मिळवीन? हे खरंच कठीण झालं!
आता काही अभ्यासू, स्कॉलर लोकांना असा अभ्यास वगैरे करायचा छंदच असतो म्हणा. हे द्रविड महाशय त्यातलेच एक. अगदी क्रिकेट खेळतानाही सचिन तेंडुलकरसारख्या प्रखर सूर्यासमोर स्वतःला सिद्ध वगैरे करायचं काहीही नडलं नव्हतं. पण यांनी करून दाखवलं, तेही शांतपणे. नील आर्मस्ट्राँगनं चंद्रावर प्रथम पाऊल ठेवलं आणि बझ ऑल्ड्रिननं दुसरं... पण सगळं जग नाव घेतं ते आर्मस्ट्राँगचंच. द्रविडच्या भाळी ऑल्ड्रिनचं प्राक्तन होतं. तो कायम सचिनच्या छायेत राहिला, पण सूर्यासमोर सदैव चमकण्याची जिद्द घेऊन! वेडी माणसंच असले उद्योग करत बसतात. पुढंही आपल्या संघाला गरज म्हणून हे महोदय हातात ग्लोव्हज घेऊन चक्क यष्टिरक्षणाला उभे राहिले. घाम काढणारं हे काम करून पुन्हा आपल्या बॅटिंगच्या वेळी संघाला खंबीर आधार हवा म्हणून यांनी स्वतःची 'भिंत' भक्कमपणे उभी केली. अत्यंत कर्तव्यबुद्धीनं, शांतचित्तानं! 
द्रविडच्या या असल्या वागण्यानं एक फार मोठा धोका निर्माण झालाय. सोशल मीडियावर तर त्याच्या कौतुकाचा महापूर सुरू झालाच आहे; पण या देशातल्या तरुण मुलांना किंवा खेळाडूंना लोक आता द्रविडच्या आदर्शाचं उदाहरण द्यायला लागले आहेत. भारतीय संघातले तरुण खेळाडू तर कायमच त्याचं गुणगान करतात. अगदी परदेशांतले नवोदित फलंदाजही 'आम्ही जे काही आहोत ते द्रविड सरांमुळंच' असं बोलतात. या एका माणसामुळं या देशाची सगळी 'शिस्त' बिघडायला लागली आहे.
राहुलदेवा, कशाला रे हा 'द्राविडी' प्राणायाम? आम्ही देशवासी चांगले सुखात होतो. आयते पदव्या मिळवीत होतो, यशाचे शॉर्टकट शोधत होतो, हळूच नियम मोडून लोकांना तत्त्वज्ञान ऐकवीत होतो, एवढुंस्सं केलं तर हे एवढं करून सांगत होतो... तू या सगळ्यांवर बोळा फिरवलास...!
आणि तरीही आम्हाला परत परत तुझ्या प्रेमात पाड, डोळ्यांत पाणी आण...
जा, वुई हेट यू...!
---

(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स संवाद पुरवणी, पुणे आवृत्ती - २९ जानेवारी २०१७)

---

12 Jan 2017

चपराक दिवाळी अंक लेख

सिनेमा : एक 'पाहणे'
--------------------


सिनेमासारखा सिनेमा... सगळे पाहतातच की. मग उगाच 'पाहणे'ला अवतरण कशाला? 
या लेखाचं शीर्षक वाचून असा प्रश्न नक्कीच काहींना पडला असेल. पण ते खरं नाही. आपण सिनेमा पाहतो म्हणजे नक्की काय पाहतो? आपल्याला खरोखर त्यात काय पाहायचं असतं? दिग्दर्शकाला 'दिग्दर्शक'च का म्हणतात? निर्माता, समन्वयक, संपादक आदी का म्हणत नाहीत? सिनेमा म्हणजे नक्की काय? सिनेमाला 'चित्रपट' का म्हणतात? 
पण आपल्याला क्वचितच हे प्रश्न पडतात. कारण सिनेमा पाहणं ही गोष्टच मुळी फार काही गांभीर्यानं घेण्याची आहे, असं आपल्या देशात बहुसंख्यांना वाटत नाही. आमचे गुरुजी आणि प्रसिद्ध चित्रपट अभ्यासक समर नखाते सर म्हणतात तसं, तुमच्या डोळ्यांसमोर सेकंदाला २४ स्लाइड्स जातात. त्या आपण फक्त बघतो. पण त्या आपल्याला खरोखर 'दिसतात' का? नुसतं पाहणे आणि नजर किंवा दृष्टी यात फरक आहे, तो काय आहे?
वास्तविक सिनेमा ही काही अमूर्त चित्रकला किंवा शास्त्रीय संगीतासारखी कळायला अवघड अशी कला नव्हे. मुळात ही एक यंत्राधिष्ठित कला आहे. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस सिनेमाचा शोध लागला, तो यंत्रविद्येतील प्रगतीमुळे. भौतिकशास्त्रावर आधारित हा सर्व छायाप्रकाशाचा खेळ चालतो. त्यामुळं या कलेची निर्मिती एका माणसाला शक्य नाही. तिथं टीमवर्कच लागतं. तरीही सिनेमा हा शेवटी दिग्दर्शकाचा म्हणून ओळखला जातो. याचं कारण या सर्व प्रक्रियेचं दिशादर्शन तो करीत असतो. अंतिमतः पडद्यावर काय दिसायला हवं आहे, हे केवळ त्यालाच माहिती असतं. मग तो स्वतःच अनेक भूमिकाही बजावू शकतो. तो अभिनेताही असू शकतो. कथा-पटकथाकार तर अनेकदा तोच असतो. संगीतकारही असू शकतो. संकलकही असू शकतो आणि छायाचित्रकारही असू शकतो. 
सिनेमा आधी दिग्दर्शकाच्या किंवा कथा/पटकथाकाराच्या डोक्यात तयार होतो. तो तयार होताना अर्थातच अनेक भव्य-दिव्य कल्पना त्यांच्या डोक्यात असतात. पण त्या प्रत्यक्षात येताना त्यातल्या पुष्कळशा गोष्टी कागदावरच राहतात आणि वेगळंच काही तरी करावं लागतं. अनेकदा तडजोड करावी लागते. आपल्याला हवी तशी फ्रेम मिळविण्यासाठी तासंतास किंवा दिवसेंदिवस वाट पाहत बसावं लागतं. सूर्यप्रकाश, वारा आदी गोष्टींसाठी निसर्गावर अवलंबून राहावं लागतं. आपला सिनेमा पडद्यावर कसा दिसणार आहे, हे दिग्दर्शकाला त्याच्या मनाच्या पडद्यावर दिसत असतं. या 'सिनेमा'ला कुठलाच खर्च नसल्यानं तो फारच भव्य-दिव्य आणि 'जगात भारी' असा असतो. पण प्रत्यक्षात येताना त्याला वास्तवाच्या कठोर परीक्षेला तोंड द्यावं लागतं. एवढं करूनही आपल्यासमोर जो सिनेमा येतो, तो दिग्दर्शकाच्या मनाप्रमाणे १०० टक्के बनलेला नसतोच. तरीही आपल्याला अनेक सिनेमे आवडतात. त्यातल्या अनेक अफलातून कल्पना आवडतात. अभिनय आवडतो किंवा संगीत आवडतं. किंवा कधी तरी एकूणच सर्व परिणाम आवडतो. 
सिनेमा म्हणजे १०० ते २०० मिनिटांत तुमच्यासमोर सादर केलेला एक खेळ असतो. हा खेळ पडद्यावर साकार होण्यासाठी शेकडो माणसं झटत असतात. एका सिनेमाच्या मागं किमान तीनशे ते कमाल कितीही हजार लोकांचे कष्ट असू शकतात. यात सेटवरच्या बॉयपासून ते दिग्दर्शकापर्यंत अनेक घटकांचा समावेश असतो. पूर्वी यासाठी स्टुडिओ नावाचं एक स्वतंत्र संस्थानच असायचं. या स्टुडिओच्या दिवसांविषयी वाचलं, की कळतं, हा संसार कसा उभा राहतो ते! या स्टुडिओत सुतारकामापासून ते रंगकामापर्यंत जवळपास बारा बलुतेदारांची प्रत्येक कामं करणारे विभाग असत. स्टुडिओची मालक कंपनीच या सर्वांच्या जेवणा-खाण्याचा आणि राहण्याचा खर्च करीत असे. आजच्या तुलनेत काम निवांत आणि तब्येतीत चालत असे. त्यामुळंच त्या स्टुडिओ काळातल्या अनेक कलाकृती अत्यंत दर्जेदार आणि दीर्घकाळ परिणाम करणाऱ्या अशा झाल्या आहेत.
सिनेमा तयार होण्याची प्रक्रिया बहुतेकांना माहिती आहे. आधी कथा तयार होते. मग त्यावरून प्रत्यक्ष पडद्यावर ती कशी दिसेल याची गोष्ट - म्हणजेच पटकथा - तयार केली जाते. मग कलाकार, लोकेशन आदींची निवड, मग गाण्यांची निवड, गाण्यांचं ध्वनिमुद्रण, मग प्रत्यक्ष चित्रिकरण, मग 'रशेस' पाहून पुन्हा काही गरजेचं असलेलं चित्रिकरण, मग संकलन, मग डबिंग, मग ध्वनी आरेखन, मग स्पेशल इफेक्ट्स किंवा फिल्म प्रोसेसिंगसारखे इतर तांत्रिक संस्कार (हल्ली थेट डिजिटल कॉपी निघते...), मग सेन्सॉर आणि मग अंतिम प्रत... असा सगळा पारंपरिक प्रवास असतो. आता यात काही गोष्टी मागे-पुढे होत असतात. अलीकडं सगळं काम कम्प्युटराइज्ड झाल्यापासून रेकॉर्डिंगपासून ते स्पेशल इफेक्ट्सपर्यंतची पुष्कळ कामं सहजसोपी झाली आहेत. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळं सिनेमा बनवणं सोपं झालं आहे. अर्थात ते महागही आहेच पुष्कळ! मुद्दा असा, की कुठलाही सिनेमा असो... त्याला किमान एवढी प्रक्रिया तर करावी लागतेच. खर्चही होतोच. शिवाय वर म्हटल्याप्रमाणं किमान तीन-चारशे लोक त्यात थेटपणे गुंतलेले असतात. तरीही फायनल प्रॉडक्ट नीट होत नाही. आपण सिनेमाला नावं ठेवतो. असं का होतं? सिनेमा बनण्याच्या वरच्या प्रक्रियेत अनेक ठिकाणी घोळ होऊ शकतात. अनेक गोष्टी बिघडू शकतात. त्यामुळं फायनल प्रॉडक्ट वाईट प्रतीचं निघू शकतं. मग चांगला सिनेमा बनण्यासाठी काय आवश्यक असतं? किंवा आपण काय पाहावं?
एक तर कथा आणि पटकथा. मुळात आजही चांगली 'गोष्ट'च विकली जाते किंवा अपील होते. एक वेळ सिनेमाची तांत्रिक बाजू चांगली नसेल पण कथा चांगली असेल तरीही तो सिनेमा पाहिला जातो. चांगली गोष्ट म्हणजे काय? बहुसंख्य प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या हास्य, शृंगार, वीर, करुण, रौद्र आदी नवरसांची किंवा यापैकी काहींची निश्चित व सकारात्मक निष्पत्ती ज्यातून होते ती चांगली गोष्ट होय. सत्य, प्रेम, वात्सल्य, माणुसकी यासारख्या चिरंतन मानवी मूल्यांचं, किंवा विचारांचं भरण-पोषण करणारी किंवा यांतील दोषदिग्दर्शन करणारी ती चांगली गोष्ट. किंवा मग लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना भावणारी म्हणजे फँटसी किंवा परिकथा. अर्थात नुसती गोष्ट चांगली असून चालत नाही, तर ती चांगली मांडावीही लागते. मग त्यात नाट्य आलं. प्रेक्षकाला गुंतवून ठेवील, अशी प्रसंगरचना आली; संघर्ष आला; कठोर परीक्षा आली. या साऱ्यांतून मार्ग काढीत शेवटी चिरंतन मूल्यांच्या विजयाकडे कथावस्तूचा झालेला प्रवास आला. अर्थात ही फारच ढोबळ रचना झाली. जगात नाटकाचे मूळ सातच प्लॉट आहेत, असं म्हणतात. कुठल्याही नाट्यकृतीत किंवा चित्रकृतीत हेच सात प्लॉट आलटून-पालटून दाखविले जातात. अर्थात ही पुन्हा पारंपरिक समजूत झाली. सिनेमा हे माध्यम नव्या कलाकारांना व दिग्दर्शकांना कायमच वेगळ्या वाटा शोधून काढण्याचं आव्हान देत आलंय. हे आव्हान स्वीकारून वेगळी कलाकृती सादर करणारेही अनेक दिग्दर्शक आहेत. अर्थात असं म्हणतानाही 'वेगळी कलाकृती' हीदेखील एक मळलेली वाटच होतेय की काय, असंही वाटण्यासारखी परिस्थिती आहे. कारण शेवटी प्रेक्षकांना काय आवडेल, यावर इथं सगळं यशापयश अवलंबून असतं. त्यामुळे कित्येक प्रयोग अनेकदा प्रयोगाच्या पातळीवरच राहतात. 
दुसरी गोष्ट महत्त्वाची ती म्हणजे अर्थातच दिग्दर्शन. याचं कारण दिग्दर्शक हाच सिनेमाचा सर्वेसर्वा असतो. त्यानं हे सुकाणू नीट हाकलंय की नाही, हे शेवटी सिनेमा पाहिल्यावरच कळतं. सिनेमाची कथा, तिचा प्रवास, त्यातल्या पात्रांची प्रस्थापना, त्यांच्या विकसनाचा आलेख हे सगळं शेवटी दिग्दर्शक ठरवीत असतो. सिनेमातली एकही फ्रेम निरर्थक असता कामा नये, एकही दृश्य-संवाद अवाजवी नको हे सगळं त्यानं ठरवायचं असतं. शेवटी कलाकृती चांगली झाली, तरी त्यालाच वाहव्वा मिळणार असते आणि वाईट झाली तरी त्याचं खापर त्याच्याच डोक्यावर फुटणार असतं. हुशार आणि कल्पक दिग्दर्शक या माध्यमाचा जास्तीत जास्त उपयोग करून आपला आशय प्रेक्षकापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यांनी टिपलेल्या एकेका दृश्यामुळे अनेक प्रसंगांची उंची वाढते. अनेकदा न बोलता, सूचकपणे तो कित्येक गोष्टी सांगून जात असतो. खरं तर फार न बोलता केवळ दृश्यांच्या आणि चित्रचौकटींच्या माध्यमातूनच आपल्याला काय सांगायचंय ते सांगण्याचं हे माध्यम आहे. चित्रपटांच्या इतिहासात अशाच प्रतिभाशाली दिग्दर्शकांना वरचं स्थान मिळाल्याचं पाहायला मिळेल.
तिसरी गोष्ट येते ती प्रत्यक्ष पडद्यावर व्यक्त होणाऱ्या गोष्टींची. यात प्रामुख्यानं अभिनय आणि कॅमेरा यांचा समावेश होतो. गोष्ट खूप चांगली असली आणि दिग्दर्शकही फार कल्पक वगैरे असला, तरी त्याच्या प्रमुख पात्रांना ते अभिनयाद्वारे पोचवता येत नसेल, तर हा सारा खटाटोप व्यर्थ होतो. दिग्दर्शकानं अनेकदा काही 'बिटवीन द लाइन्स' सोडलेल्या असतात. चांगला कलाकार आपल्या समर्थ अभिनयाद्वारे त्या जागा भरून दाखवतो आणि प्रेक्षकांना एक उच्च दर्जाची, अभिजात कलाकृती पाहिल्याचा आनंद मिळतो. एका अर्थानं कलाकार हा दिग्दर्शकाच्या कलाकृतीचं सगुण साकार रूप असतो. तीच गोष्ट कॅमेऱ्याची. कॅमेरा हाही दिग्दर्शकाचा डोळाच असतो. कॅमेऱ्याला जर ते सगळं दाखवता आलं नाही, तर काहीच उपयोग होत नाही. अनेक प्रतिभावंत कॅमेरामन आपल्या बुद्धिचातुर्यानं कथेतील अनेक प्रसंग उठावदार करतात. त्यांनी केलेली प्रकाशयोजना, विशिष्ट अँगल किंवा नैसर्गिक वा कृत्रिम छाया-प्रकाशाचा खेळ यामुळं कथेतील कित्येक प्रसंग उंचीवर गेलेले आपल्याला दिसतात.
याशिवाय संगीत आणि पार्श्वसंगीत हाही एक महत्त्वाचा घटक आहेच. पार्श्वसंगीत चित्रपटाच्या कथेला नेपथ्यासारखं सदैव सोबत करीत असतं. एखादा प्रसंग उठावदार होण्याकरिता किंवा त्याचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी पार्श्वसंगीताचा प्रभावी वापर केलेला दिसून येतो. त्याव्यतिरिक्त संकलन हाही सिनेमातला अत्यंत महत्त्वाचा, पण काहीसा दुर्लक्षित घटक. उत्कृष्ट संकलन असलेला चित्रपट पसरट किंवा अकारण लांबलेल्या चित्रपटापेक्षा केव्हाही प्रभावी ठरतो, हे सांगायला नकोच. अनेक उत्कृष्ट दिग्दर्शक हे मुळात उत्कृष्ट संकलक असलेले पाहायला मिळतात. याचं कारण काय ठेवायचं आणि काय कापून टाकायचं याचं त्यांना नेमकं भान असतं. अन्यथा स्वतःच चित्रित केलेल्या प्रत्येक फ्रेमच्या प्रेमात पडलेला दिग्दर्शक अंतिमतः त्या कलाकृतीचं वाटोळं करण्यास कारणीभूत ठरू शकतो. शिवाय प्रेक्षक असा विस्कळित, विसविशीत मांडणी असणारा चित्रपट नाकारतात, यात शंकाच नाही. 
आपण सर्वसामान्य प्रेक्षक म्हणून जेव्हा सिनेमाला जातो, तेव्हा अर्थातच अशी विभागणी करून सिनेमाला गुण देत नाही किंवा त्यावरून आपली पसंती-नापसंती ठरवीत नाही. सामान्य प्रेक्षकाला सिनेमा आवडतो तो त्याचा एकूण प्रभाव लक्षात घेऊनच; किंवा आवडत नाही तेही एकंदर प्रभाव उणा असतो म्हणूनच! समीक्षकाला मात्र असं करता येत नाही. सिनेमा का आवडला हे त्याला संदर्भांसह स्पष्ट करावं लागतं. कुठले घटक प्रभावी ठरले हे सोदाहरण सांगावं लागतं. एखादा सिनेमा का वाईट आहे (किंवा कमी प्रभावी आहे असं म्हणू या), हे सांगतानाही त्याला सकारण स्पष्टीकारण द्यावं लागतं. म्हणजे त्यानं तसं ते द्यावं अशी अपेक्षा असते. आपल्याकडं चित्रसाक्षरता एकूणच कमी आहे. पण यासाठी प्रेक्षकाला दोष देण्याचं कारण नाही. खाऊन-पिऊन सुखी असलेला समाजच अशा अवांतर ज्ञानार्जनाकडं वळतो, हे मान्यच करायला हवं. आपल्याकडं एवढे दिवस मूलभूत गरजांचा लढा सुरू होता आणि अजूनही आहेच. अशा स्थितीत चित्रसाक्षरतेची अपेक्षा समस्त समाजाकडं करणं जरा अवाजवीच. पण आपल्या देशात आता पुष्कळ सुधारणा होताहेत. जनतेचा आर्थिक स्तरही उंचावतोय. महानगरी जीवन पुष्कळ सुसह्य होतंय. अशा स्थितीत जास्तीत जास्त लोकांनी चित्रसाक्षरता अंगी बाणवली तर त्याचा परिणाम अंतिमतः आपल्याला अधिक चांगल्या कलाकृती मिळण्यातच होणार आहे. शेवटी हे दिग्दर्शक किंवा कलाकार समाजातूनच येतात. त्यांना जसं शिक्षण मिळेल, त्यांचं जसं आकलन असेल, ते आणि तसंच त्यांच्या कलाकृतीत किंवा अभिव्यक्तीत उतरताना दिसतं. त्यामुळंच आपल्याकडं फिल्म सोसायट्यांची चळवळ जोरात वाढणं गरजेचं आहे. महानगरांपुरते मर्यादित असलेले फिल्म क्लब छोट्या गावांमध्येही सुरू झाले पाहिजेत. सुदैवानं आज स्मार्टफोन आणि वायफायसारख्या तंत्रज्ञानामुळं आपल्याला घरबसल्या जगातले हवे ते सिनेमे पाहायला मिळू शकतात. पुण्यात तर फिल्म इन्स्टिट्यूट आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय या दोन उत्कृष्ट चित्रपटविषयक संस्था हाकेच्या अंतरावर उभ्या आहेत. तिथं कायमच काही ना काही अभ्यासक्रम, उपक्रम सुरू असतात. त्या दृष्टीनं पुणेकर भाग्यवान आहेत. अलीकडं आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवही मुंबई-पुण्यापलीकडे अन्य महत्त्वाच्या शहरांत पाय रोवू लागले आहेत. या महोत्सवांमधून जगभरातले ताजे, उत्कृष्ट चित्रपट आपल्याकडच्या तरुणांना पाहायला मिळत आहेत. गेल्या दशकभरात असे अनेक ग्रामीण मराठी तरुण पुढं येऊन स्वतःची चित्रनिर्मिती करतानाचं सुखद चित्र आपल्याला दिसतं आहे. 
अर्थात प्रेक्षक म्हणूनही आपण अधिक प्रगल्भ होणं गरजेचं आहे. अनेक ठिकाणी सिनेमा पाहायला कसं बसावं हेही लोकांना शिकवण्याची गरज आहे असं वाटतं. खुर्च्यांवर पाय ठेवणं, समोरच्याला लाथा मारणं, पॉपकॉर्न किंवा अन्य प्लास्टिकच्या पॅकबंद पिशव्यांचा आवाज करीत खाणं, मोबाइलवर बडबडणं असले प्रकार सुज्ञ आणि जाणकार प्रेक्षकाला संताप आणतात. अनेक जण त्यामुळं आपल्या थिएटरांत सिनेमा पाहायला जायचंच टाळतात. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या प्रेक्षागृहात जाताना तांत्रिक कारणांमुळं चपला, बूट बाहेर काढून जावं लागतं. पण मला ते फार आवडतं. त्यामुळं आपण एखाद्या मंदिरात जात आहोत, असा काहीसा पवित्र भाव माझ्या मनी दाटतो. सिनेमा पाहतानाही सत्यनारायणाच्या पूजेला बसल्यासारखं पूर्ण एकाग्र होऊन, एखादं पवित्र कार्य करीत असल्याच्या भावनेनं पाहिला पाहिजे. सिनेमा तयार करताना काय कष्ट पडतात हे पाहायचं असेल, तर एक दिवस कुठलंही शूटिंग पाहावं. मग एवढ्या कष्टानं तयार झालेला सिनेमा पाहताना आपणही पूर्ण लक्ष एकाग्र करून तो पाहून त्याला प्रेक्षक म्हणून न्याय द्यायला नको काय? 
असं झाल्यास आपल्याला आपोआपच सिनेमा कळायला लागेल आणि आपण तो 'पाहिला' असं नीट सांगता येईल.
---

(पूर्वप्रसिद्धी - साहित्य चपराक दिवाळी १६)
---

9 Jan 2017

धोनी निवृत्तीवरचा लेख

निष्काम कर्मयोगी 
---------------------
एमएस ऊर्फ एमएसडी ऊर्फ कॅप्टन कूल ऊर्फ माही ऊर्फ महेंद्रसिंह धोनी आता पुन्हा मैदानात कधीच कर्णधाराच्या भूमिकेत दिसणार नाही. चार जानेवारीच्या संध्याकाळी आपण वन-डे व टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होत असल्याचं जाहीर करून, धोनीनं पुन्हा एक धक्कादायक घोषणा केली. कसोटी संघाचं कर्णधारपदही त्यानं असंच सहज सोडलं होतं. आपल्या नेतृत्वगुणांसाठी ओळखला जाणारा माही आता मैदानावर फक्त खेळाडूच्या भूमिकेत दिसणार आहे. नेतृत्वगुणांसाठी ज्याला सर्व जगानं नावाजलं, त्यानं नेतृत्वाची कवचकुंडलं अशी सहज काढून ठेवावीत, हा वेगळ्या पातळीवरचा निष्काम कर्मयोगच आहे. माहीनं हा निर्णय घ्यावा, यात काहीच आश्चर्य नाही; कारण पहिल्यापासूनच तो असे धक्कादायक वाटणारे, पण त्याच्यासाठी योग्य असलेले निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध आहे.
धोनीच्या या निर्णयावर उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. त्यानं केलं ते बरोबरच केलं, असं म्हणणाऱ्यांची संख्या अधिक आहे. याचं कारणही स्पष्ट आहे. कसोटी संघाचं कर्णधारपद विराट कोहलीकडं आल्यापासून तो आणि आपला एकूणच सर्व संघ अभूतपूर्व फॉर्ममध्ये आहे. कोहलीनं स्वतःचे नेतृत्वगुण सिद्ध करून दाखवले आहेत. नेतृत्व करण्याचा ताण त्याच्या वैयक्तिक कामगिरीवर पडत नाही, हेही दिसून आलंय. याउलट धोनी गेले तीन-चार महिने संघात नाहीय. संघाची घडी नीट बसली आहे आणि त्याला नव्याने या वातावरणाशी जुळवून घेऊन संघाचं नेतृत्व करावं लागणार होतं. या परिस्थितीत विराटकडंच तिन्ही प्रकारांतलं नेतृत्व असावं, असं वाटणाऱ्यांची संख्या वाढू लागली होती. धोनीनं आता बाजूला व्हावं, असं त्याला कदाचित सुचवलंही गेलं असतं. पण त्यापूर्वीच त्यानं हा निर्णय घेतला आणि पुन्हा एकदा आपल्यातल्या अचूक निर्णयक्षमतेचा प्रत्यय दिला.
धोनी कर्णधार झाला तो विपरीत परिस्थितीत. दहा वर्षांपूर्वी भारत वेस्ट इंडिजमध्ये वर्ल्ड कपमध्ये दारूण पद्धतीनं हरून बाहेर पडला होता. राहुल द्रविडकडून कर्णधारपद काढून घेण्यात आलं आणि ते धोनीकडं देण्यात आलं. याचं कारण त्याच वर्षी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये माहीनं भारतीय संघाला विजय मिळवून दिला. तोही अंतिम सामन्यात पाकिस्तानला हरवून! वन-डे वर्ल्ड कपमधला पराभव विसरायला लावणारा हा विजय होता. धोनीचे नेतृत्वगुण या स्पर्धेत विशेषत्वानं दिसले होते. जोगिंदर शर्माला अखेरचं षटक देण्याचा निर्णय त्याचाच होता. आज जोगिंदर शर्माचं नावही कुठं दिसत नाही की तो खेळाडूही कुठंय ते माहिती नाही. मात्र, त्या क्षणापुरता त्याला अचूक वापरून घेण्याची धोनीची हातोटी फारच वेगळी आणि सर्वांना स्तिमित करणारी होती. तेव्हा तर भारतीय संघात सचिन, सेहवाग, राहुल, गांगुली, लक्ष्मण आणि कुंबळे असे दिग्गज खेळाडू होते. मात्र, ‘कॅप्टन कूल’ असं बिरुद मिरवणाऱ्या धोनीनं या सगळ्यांना समर्थपणे हाताळलं. त्याच वेळी वन-डे आणि टी-२० मध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, अश्विन, युवराजसिंह, अजिंक्य रहाणे यासारख्या अनेक खेळाडूंना मोठं केलं. या सर्वांच्या क्षमतेचं त्याचं आकलन जबरदस्त होतं. वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात स्वतःला युवराजच्या जागी चौथ्या क्रमांकावर बढती देण्याचा त्याचा निर्णयही असाच जबरदस्त मास्टरस्ट्रोक होता. गंभीर मैदानात होता आणि मुरलीधरन एका बाजूने गोलंदाजी करीत होता. युवराजही डावखुरा असल्यानं दोघेही डावरे फलंदाज मैदानात आले असते आणि मुरलीचा सामना करणं त्यांना कठीण केलं असतं. आणि त्या स्थितीत आणखी एक विकेट पडली असती, तर भारतावरचं दडपण वाढलं असतं. पण माहीनं स्वतः मैदानात उतरून श्रीलंकेच्या डावपेचांना सुरुंग लावला. गेल्या वर्ल्ड कपमध्ये मुरलीनं त्याला शून्यावर यष्टिचीत केलं होतं. मग या वेळी मुरलीसमोर या पठ्ठ्यानं एकदाही क्रीझ सोडली नाही. 
भारताला कसोटी, वन-डे आणि टी- २० या तिन्ही प्रकारांत सर्वोच्च स्थान मिळवून देणारा हा एकमेवाद्वितीय कर्णधार. पण विजय मिळाल्यानंतरची त्याची प्रतिक्रिया पाहण्यासारखी असायची. अशा वेळी तो निष्काम कर्मयोगी भासायचा. ‘विजय मिळवून देण्याची जबाबदारी माझी, आता तुम्ही सगळे जल्लोष करा,’ अशी त्याची देहबोली असायची. आतापर्यंतच्या सर्व मोठ्या विजयांच्या चित्रफिती पाहा. धोनी सर्वांपासून अलिप्त कुठे तरी कोपऱ्यात उभा असलेला दिसतो. अगदी २०११ चा वर्ल्ड कप जिंकला, तेव्हाही सचिनसह विराट, हरभजन आदी सर्व खेळाडू भावूक झाले होते. पण माही अगदी स्थिरचित्त होता. हाच तो निष्काम कर्मयोग! धोनी भारतासारख्या जगातल्या लोकप्रिय संघाचा कर्णधार होता. जग फिरला. अनेक लोक त्याला भेटले असतील, अनेक मोह समोर आले असतील. मात्र, या सर्व गोष्टी त्यानं शांतचित्तानं हाताळल्या. त्याच्या मैदानातील वर्तणुकीत कधीही आगाऊपणा दिसला नाही. कुठल्याही खेळाडूसोबत त्याचा मैदानात वाद झालेला आठवत नाही. यष्टिरक्षक खरं तर स्लेजिंग करण्यात पटाईत असतात. मात्र, धोनीनं पद्धतीनं स्लेजिंग कधीच केलं नाही. फलंदाज क्रीझबाहेर गेला आणि चेंडू मागं त्याच्या ग्लोव्हजमध्ये आला, तर मात्र तो फलंदाज वाचायचा नाही! 
माहीच्या या नेतृत्वगुणांमुळेच तो भारताचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार झाला, यात वाद नाही. काही काही खेळाडू धोनीचे म्हणून ओळखले जायचे, किंवा अजूनही ओळखले जातात. अश्विन, जडेजा, रैनापासून ते अलीकडच्या बुमराह किंवा हार्दिक पंड्यापर्यंत अनेक खेळाडूंवर ते धोनीच्या मर्जीतले खेळाडू असल्याचा शिक्का बसला आहे. याउलट गंभीर किंवा रहाणे त्याच्या फार मर्जीतले नसल्यानेच त्यांचे संघात स्थान कायम नसायचे, असेही बोलले जाई. गांगुली, द्रविड वा लक्ष्मण यांना धोनीने एकेक करून कशी निवृत्ती घ्यायला लावली, याच्याही चर्चा ऐकू येतात. मात्र, धोनीनं स्वतःच्या नेतृत्वगुणांच्या जोरावर या सगळ्या नकारात्मक चर्चा बंद करायला भाग पाडल्या आणि संघाला शिखरावर नेलं...
यशाच्या शिखरावर असताना, योग्य वेळी थांबायचं भान असणं हेही मोठ्या खेळाडूचंच लक्षण मानलं जातं. सुनील गावसकरच्या निवृत्तीचा दाखला त्यासाठी दिला जातो. धोनीनं पुन्हा एकदा त्याच्या या निर्णयानं तो मोठा खेळाडू असल्याचं दाखवून दिलं आहे. आता तो कर्णधार नसला, तरी मैदानावर असणारच आहे. त्याचा तो प्रसिद्ध हेलिकॉप्टर शॉट आता तो आणखी सहजतेनं मारू शकेल...
---
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती - ६ जानेवारी २०१७)
---

8 Jan 2017

ती सध्या काय करते - रिव्ह्यू

उसासे अन् उमाळे
----------------------

आपलं पहिलं प्रेम ही म्हटली तर फारच वैयक्तिक आणि हृदयाच्या कप्प्यात जपून वगैरे ठेवलेली गोष्ट.  आपण आयुष्यात जिच्यावर पहिलं प्रेम केलं, तीच पुढं आयुष्यभर आपल्या सोबत राहण्याची शक्यता नसतेच. फारच थोड्यांना हे भाग्य लाभतं. त्यामुळं हे पहिलं प्रेम असं कायम मनात किंवा हृदयाच्या कप्प्यात जपूनच ठेवून द्यावं लागतं. बहुतेकांचा हाच अनुभव असतो. त्यामुळं सतीश राजवाडे दिग्दर्शित 'ती सध्या काय करते' हा नवा मराठी चित्रपट पाहताना अशा बहुतेक सर्वांना आपलीच गोष्ट चालली आहे की काय असं वाटतं आणि सिनेमा कसाही असला तरी त्या प्रतिपाद्य विषयामुळं त्या कलाकृतीविषयी आपसूक प्रेम निर्माण होतं. एक सकारात्मक भावना तयार होते.
त्या दृष्टीनं सतीशनं निवडलेला विषय अगदी हुकमी आहे. अर्थात त्याचा अर्थ सिनेमा वाईट आहे, असा नाही. सिनेमाही नक्कीच बघणेबल आहे. किमान एकदा बघावा एवढा तरी निश्चितच. याचं कारण सिनेमाचं कास्टिंग. अंकुश चौधरी, तेजश्री प्रधान आणि कुमारवयातले अभिनय बेर्डे व आर्या आंबेकर या चौघांनी चांगलं काम केल्यामुळं सिनेमा आणखीनच सुसह्य होतो. याशिवाय प्रेम या विषयावरची सतीशची हुकूमत. या दिग्दर्शकानं यापूर्वीही प्रेम या विषयाचे निरनिराळे पैलू आपल्याला उलगडून दाखविले आहेत. त्यामुळंच उलट त्याचा सिनेमा म्हटल्यावर एक विशिष्ट अपेक्षा तयार होते आणि एका अर्थानं ही त्या दिग्दर्शकाला मिळालेली पावतीच असते. सतीश या सिनेमाद्वारे त्या अपेक्षांना उतरला असला, तरी स्वतः एक दिग्दर्शक म्हणून तो आणखी पुढं गेला आहे का, किंवा त्यानं या सिनेमातून प्रेम या संकल्पनेच्या आणखी काही मिती शोधण्याची शक्यता व्यक्त केली आहे का, असं विचारल्यास त्याचं उत्तर मात्र नकारार्थी येतं.
या सिनेमाचा हिरो आता बहुदा पस्तीस ते चाळिशीमधला आहे. याचं कारण कॉलनीत व्हीसीआर आणून 'मैंने प्यार किया' सिनेमा पाहिला जात होता, तेव्हा आपला बालहिरो साधारण दहा वर्षांचा असावा. हा सिनेमा आणि यापुढेही सिनेमात येणारे अजय देवगणच्या 'फूल और काँटे'चे उल्लेख किंवा 'साजन'मधली गाणी पाहिल्यास हा हिरो नक्कीच १९८०-८१ च्या आसपास जन्मलेला असावा, जो आत्ता स्वाभाविकपणे पस्तिशी ओलांडलेला आहे. ज्याचं लग्न होऊन आता सात वर्षं झालीयत आणि आयुष्यात तसा तो सेटल झालाय....
इथं एक महत्त्वाची गोष्ट मला नोंदवायचीय. साधारणतः १९७५ ते १९८५ या काळात जन्मलेली पिढी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण पिढी आहे. या गोष्टीचा नायकही त्याच काळात जन्मलेला आहे, म्हणून हा उल्लेख करणं गरजेचं वाटतं. तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबत वेगानं बदललेलं जग अगदी पहिल्यांदा याच पिढीनं अंगावर घेतलं. त्यापूर्वीचं तुलनेनं शांत आयुष्यही याच पिढीनं बालपणी अनुभवलंय. यामुळं मोबाइलपूर्व आणि मोबाइलोत्तर अशा दोन युगांची साक्षीदार असलेली ही 'युनिक' पिढी आहे. या पिढीनं लहानपणी प्रेम तर केलं, मात्र आजच्या पिढीएवढी कदाचित ती स्मार्ट नसल्यानं ते प्रेम व्यक्त करायचं मात्र राहून गेलं. माझ्या पिढीत तर अनेकांच्या - अगदी माझ्यासकट अनेकांच्या - बाबतीत हे निश्चितच घडून गेलंय यात वाद नाही. आणि गंमत म्हणजे आता तंत्रज्ञानाची आणि संवादांची अत्याधुनिक साधने हातात असताना या पिढीला पुन्हा नव्यानं तरुण व्हावंसं वाटतंय. मुळात आत्ताही ते जास्तीत जास्त चाळिशीचे म्हणजे तसे तरुणच आहेत. आता त्यांना पुन्हा त्या काळातल्या मित्रांना (विशेषतः मैत्रिणींना) भेटावंसं वाटतंय. अगदी स्वाभाविक असं हे आकर्षण आहे. यातलं तंत्रज्ञानाच्या प्रगतीचं नेपथ्य वगळलं तर मग या गोष्टीतली महत्त्वाची गंमतच संपते. अगदी सहजपणे वैयक्तिक संपर्क ही या माध्यमांची ताकद आहे आणि त्यामुळं या पिढीच्या जुन्या प्रेमांना अगदी सहज धुमारे फुटू लागले आहेत. ही गंमत सतीशनं या गोष्टीत आणलेली नाही. म्हणजे तो फोकस नसेलही, पण किमान ती बॅकड्रॉपला तरी दिसायला हवी होती.
हल्लीच्या काळात स्मार्टफोन बाळगणाऱ्या कुठल्याही दोन व्यक्तींना वन टु वन संपर्क शक्य झाल्यानं संवादाच्या, प्रेमात पडण्याच्या (जोडीनं अर्थातच विवाहबाह्य संबंधांच्या) किती तरी शक्यता निर्माण झाल्या आहेत. प्रेम या संकल्पनेला यामुळं किती तरी नव्या मिती जोडल्या गेल्या आहेत. मुळात अशा या नात्यांना रूढार्थानं प्रेम तरी म्हणावं का, असाही प्रश्न पडतो. पण ते जे काही असतं, ते आहेच. आणि अगदी आपल्या आजूबाजूला आहे. अनुरागची गोष्ट सांगताना दिग्दर्शक आजच्या काळातली गोष्टही सांगत असल्यानं या मितीचा संदर्भ यायला हवा होता, असं वाटलं. ज्याला कुठलंही नाव देता येणार नाही, अशा किती तरी प्रकारच्या नात्यांची निर्मिती या आभासी संपर्क साधनांमुळं शक्य झाली आहे. अनुरागसारख्या माणसाला या सगळ्यांची कल्पनाच नसेल, असं वाटत नाही. नायिका तन्वीही या सगळ्यांशी परिचित आहे. मग त्यांच्या नात्याकडं पारंपरिक पद्धतीनंच पाहण्याचा अट्टाहास दिग्दर्शकानं का केला असेल, असाही प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. असो.

बाकी त्यानं जे मांडलंय किंवा दाखवलंय त्याविषयी बोलायचं तर चित्रपटात तीन फ्लॅशबॅक आहेत... किंवा असं म्हणू या, की नायक तीन वेगवेगळ्या वयोगटांत दिसतो. अगदी चौथी-पाचवीच्या वयात, मग कॉलेजच्या वयात आणि मग थेट आत्ताचा... आजचा! तर या तिन्ही काळांची गुंफण दिग्दर्शकानं चांगली केली आहे. त्या त्या काळाची वैशिष्ट्यं दर्शवणाऱ्या छोट्या-मोठ्या गोष्टी (उदा. व्हीसीआर, जीन्स पँट किंवा मारुतीचं जुनं मॉडेल इ.) नीट दाखवल्या आहेत. तपशिलांची काळजी घेतली आहे. कलादिग्दर्शनही नेमकं आहे. विशेषतः नायिकेच्या वेषभूषेच्या बाबतीत तर हा बदल अधिक प्रकर्षानं दिसतो. काळानुसार बदललेली मध्यमवर्गीय कुटुंबं आणि त्यांच्या घरांमधले बदल सतीशनं फार नेमकेपणानं टिपले आहेत.
अर्थात ही सगळी उत्तम नेपथ्यरचना झाली. या पार्श्वभूमीवर घडणारी गोष्ट काय सांगते? किंवा हे कथानक आपल्याला काय गोष्ट सांगतं? तर सांगायचं म्हणजे या कथानकात तसं फार नाट्य नाहीच. लहानपणी जिच्यावर प्रेम केलं ती अशी अचानक पुन्हा येतेय म्हटल्यावर मुळात हेच एक नाट्य ठरायला हवं. पण सिनेमात नेमकं तेच नीट घडलेलं दाखवलेलं नाही. यात आपला नायक मित्राकडून नायिका पुन्हा भारतात आलीय हे कळल्यावर तिच्या घरचा पत्ता मागतो आणि मग हळूच चोरट्या प्रेमवीरासारखा तिच्या घराभोवती घिरट्या घालतो. तो हे असं का वागतो, हे माझ्या तरी आकलनापलीकडंचं आहे. लहानपणी किंवा कुमारवयातही त्यांची जी घट्ट मैत्री दाखवली आहे, ती पाहता त्याचं हे वागणं काही झेपत नाही. आता त्यांचं भांडण होऊन ती निघून गेलेली असते हे दाखवलं असलं, तरी एवढ्या वर्षांनंतर आणि एवढी मॅच्युरिटी आल्यानंतर तरी तो तिला भेटायला का घाबरतो? शिवाय ते बागेत पहिल्यांदा भेटतात तो प्रसंग तर मला हास्यास्पदच वाटला. वास्तविक हा प्रसंग किती तरी अधिक संवेदनशील किंवा तरल असा दाखवायला हवा होता. त्या प्रसंगात ते दोघं ज्या पद्धतीनं भेटतात किंवा बोलतात त्यावरून त्यांच्यात लहानपणी एवढं घट्ट प्रेम असावं असं काही वाटत नाही. नंतर एकदा ते एका हॉटेलमध्ये भेटतात तेव्हाही ती फार तुटक वागते आणि निघून जाते. तिच्या त्या तुटक वागण्याला सिनेमात एक स्पष्टीकरण दिलं असलं, तरी मला ते फारच त्रोटक किंवा लंगडं वाटलं. मात्र, याची सगळी कसर दिग्दर्शकानं शेवटच्या त्यांच्या त्या गच्चीवरच्या भेटीत भरून काढली आहे. इथं त्या नायक-नायिकेच्या समजूतदारपणाची आणि मॅच्युरिटीची (विशेषतः नायिकेच्या) ओळख पटते आणि 'हां, हे असंच हवं' असं जे आपल्याला वाटतं, तो क्षण आनंदाचा आहे.
मनस्विनी लता रवींद्र या आजच्या आघाडीच्या पटकथा लेखिकेनंच या चित्रपटाची पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. पटकथाकार स्त्री आणि दिग्दर्शक पुरुष असल्यानं नायक-नायिका या दोघांच्याही मनोवस्थेचा विचार व्यवस्थित झाला आहे आणि ही या चित्रपटाची एक महत्त्वाची जमेची बाजू आहे.
अभिनयात अंकुश चौधरीसाठी आता अशा भूमिका हातखंडा आहेत. त्याचा वावर सहज आहे. भावना चेहऱ्यावर प्रकट करण्यात तो कमी पडत नाही. तेजश्री प्रधाननंही चांगलं काम केलंय. ती दिसते छान. मात्र, क्वचित काही वेळा कृत्रिम वाटते.

खास कौतुक करावंसं वाटतं ते अभिनय बेर्डेचं. लक्ष्मीकांत बेर्डेंचा हा मुलगा पहिल्याच चित्रपटात तरुण अनुरागच्या भूमिकेत अगदी आश्वासक कामगिरी करून केला आहे. अभिनयच्या रक्तातच अभिनय आहे, हे अगदी जाणवतं. त्याचा चेहरा बोलका आहे. शब्दफेकीवर आणि देहबोलीवर अजून मेहनत घेतली तर तो पुढील काळात एक उत्तम अभिनेता होऊ शकतो, यात वाद नाही. आर्या आंबेकरनं माझ्या माहितीनुसार प्रथमच एवढी मोठी भूमिका केली असावी. तिनं कुमारवयीन तन्वीचं काम समरसून केलं आहे. तन्वीची व्यक्तिरेखा तिनं नीट समजून घेऊन काम केल्याचं जाणवतं.
लहान अनुरागच्या भूमिकेत सतीशचा मुलगा हृदित्य राजवाडे यानं छान काम केलं आहे. लहान तत्वीची भूमिका निर्मोही अग्निहोत्री या अतिशय गोड मुलीनं केली आहे. बाकी सुकन्या आणि संजय मोने, तुषार दळवी, अनुराधा राजाध्यक्ष, प्रसाद बर्वे हेे सगळे कलाकार उत्तमच.
संगीतात हृदयात वाजे समथिंग हे गाणं यापूर्वीच हिट झालं आहे. बाकी गाणीही सिनेमात ऐकायला छान वाटतात. पण ती लक्षात राहत नाहीत. किमान माझ्या तरी लक्षात राहत नाहीत.
असो. तेव्हा एकदा हा सिनेमा पाहायला हरकत नाही. कमी अपेक्षा ठेवून गेलात तर अधिक आनंद मिळेल.
---
दर्जा - तीन स्टार
----

1 Jan 2017

मटा मेट्रो लेख

मेट्रो आली रे अंगणी... 
-------------------------
आज एक जानेवारी. इंग्रजी नववर्षाचा पहिला दिवस... थोडक्यात स्वप्नरंजन करण्याचा दिवस! मागच्या वर्षात (किंवा खरं तर मागील कित्येक वर्षांत) जे आपण करू शकलो नाही, ते आता या वर्षात करणार, असा केवळ फुकाचा आणखी एक संकल्प करण्याचा हा दिवस... पण चालायचंच! आदल्या रात्री अनेकांना 'अंतराळी'ची सफर घडत असल्यानं इंग्रजी कालगणनेनुसार मध्यरात्रीच्या बारा वाजताच उगवणाऱ्या या दिवसाची सुरुवातच झोपेत होते आणि त्या झोपेत हवं तेवढं स्वप्नरंजन करण्यास पूर्ण वाव असतो. त्यामुळं स्वप्नं बघायला काहीच हरकत नाही. आणि मुळात आपल्याला पुण्यात फुकट कुठलीही गोष्ट करायला कधीच ना नसते! स्वप्न हा प्रकार यातच मोडतो.
आपल्या पुण्यनगरीत गेली काही वर्षं असंच एक स्वप्न आपल्याला वाकुल्या दाखवत पुढच्या वर्षांची ‘तारीख पे तारीख’ देत आलंय. हे स्वप्न पुणेकरांना पडलेलं नाही. राजकीय मंडळींनी त्यांच्या स्वप्नात बेकायदेशीरपणे घुसखोरी करून या स्वप्नाचा ट्रेलर त्यांना दाखवला आहे. हे म्हणजे अल्पना किंवा श्रीकृष्ण थिएटरमध्ये (उफ्फ... गेले ते दिन गेले!) मधेच सुरू होणाऱ्या चावट सिनेमांसारखं झालं... पुणेकरांना न मिळता मिळालेल्या या स्वप्नाचं नाव आहे - मेट्रो! वास्तविक मेट्रोपेक्षा किती तरी अजब-गजब गोष्टी पुण्यनगरीत आजही सुखेनैव नांदत आहेत. झेड ब्रिज (जो दिवसा झेड आणि रात्री एक्स ब्रिज असतो!), चितळ्यांची बाकरवडी, कॅम्पातले वेफर्स/सँडविच, गुडलकचा बनमस्का-चाय, वेताळ टेकडी, हडपसरचा वर सिग्नल असलेला जगप्रसिद्ध वाय उड्डाणपूल, सवाई गंधर्व, दिवसा दुचाकींना बंद असलेला आणि रात्री उघडणारा लकडी ऊर्फ संभाजी पूल.. आदी किती तरी आकर्षणं या महान शहरात कित्येक वर्षं वास्तव्यास आहेत. तरीदेखील येथील चिमुकले रस्ते वाढत्या दुचाकी आणि चारचाकींना सामावून घेण्यास फारच अपुरे पडू लागले हे पाहून आणि दिल्लीत झपाट्यानं वाढलेल्या मेट्रोचा पसारा पाहून इथल्या कारभारी मंडळींना मेट्रो आपल्याही गल्लीत धावावी असं वाटू लागलं. त्यात त्यांचं काय चुकलं! जनतेची सेवा करण्यास एवढा आतुर वर्ग पाहायला मिळणं अवघडच. तेव्हा आमच्याकडं या मंडळींनी आधी मेट्रो आणली ती चर्चेत!
पुण्यात आधी मुळात एखादी नवी गोष्ट येऊन रुजणं कठीण. त्यातही एकदा का एखाद्या विषयाला तोंड फुटलं, की वाद-चर्चेला अंत नाही. वाद-चर्चा ही गोष्टही मोफत असल्यानं आणि ती केल्यानं आपल्या खिशातली दमडीही जात नसल्यानं मोठ्या अहमहमिकेनं ती करायला आमची कधीच ना नसते. आम्ही रविवारी सकाळी रांगेत नंबर लावून, शक्यतो मित्राच्या पैशानं मिसळ चापीत मेट्रोवर अनेक तास चिंतन केलंय. मेट्रोमॅन म्हणविल्या जाणाऱ्या श्रीधरनसाहेबांनाही मेट्रो नियोजनातल्या दोन गोष्टी सुनवायला आम्ही कमी केलेलं नाही. कारण प्रश्न मेट्रोचा नसून तत्त्वाचा आहे! कलेसाठी कला की जीवनासाठी कला, सकच्छ की विकच्छ असले वाद फारच जुने झाले. आम्ही ते केवळ पुस्तकातच वाचले. मात्र, ‘जमिनीवरून की भुयारी’ हा अलीकडचा गाजलेला मोठा वाद होय. आम्ही पुणेकर असल्यानं आमच्या खांद्यांवरचा भाग जसा जास्त प्रगत झालाय, तसंच पुणे हे ऐतिहासिक नगर असल्यानं इथं जमिनीखालीही वरच्याएवढीच संस्कृती नांदतेय यावर आमचा गाढ विश्वास होता. मेट्रो जमिनीखालून गेली, की आमचे पेशवेकालीन हौद फुटून मेट्रोतल्या प्रवाशांवर जलाभिषेक होईल की काय, अशी भीती आमच्या एका पेठीय मित्रानं उपस्थित केली होती, ती अगदीच गैर म्हणता येणार नाही. (या मित्राचं सर्व आयुष्य शनिपार केंद्र धरून दीड किलोमीटरच्या त्रिज्येत गेलंय ते सोडा.) मात्र, रविवारच्या सकाळी तुळशीबागेतल्या फेमस मिसळ दुकानातलं टेबल अडवून त्यानं हा मर्मभेदी सवाल केला होता, हे आमच्या अद्याप ध्यानात आहे. शनिवारवाड्याच्या खाली खणलं तर अद्याप पेशव्यांचे दप्तर आणि सोन्या-मोत्यांचे रांजण सापडतील, यावर दुसऱ्या एका मित्रानं अशीच काकडी खिचडीची पैज लावली होती. तिथून मेट्रो जाताना प्लास्टिक कॉइनऐवजी हे सोन्याचे होन सरकवता येतील, असाही त्याचा युक्तिवाद होता. तर ते असो.
आम्हाला स्वतःला जिने चढायचा कंटाळा असल्यानं मेट्रो भुयारी असावी, असंच वाटायचं. मंडईत भाजी घ्यावी, सरकत्या जिन्यातून खाली मेट्रोचं स्टेशन गाठावं, जाताना वाटेत बसलेल्या बायकांकडून आलं-लिंबं-मिरच्या पिशवीत टाकाव्यात, मासिक पासचं कुपन स्वॅप मारावं आणि टुणकन उडी मारून मेट्रोत चढावं असं आमचं स्वप्न होतं... ‘पुढील स्थानक शनिवारवाडा... नेक्स्ट स्टेशन शनिवारवाडा... अगला स्टेशन शनिवारवाडा...’ हा त्या उद्-घोषमंजिरीचा नाजुक स्वर कानी साठवावा, तुळशीबागेतून घरी निघालेल्या आज्यांचा सीरियल-किलर संवाद ऐकावा, मधल्या दांड्याला धरून (मधल्या आळीचं नाव सार्थकी करणाऱ्या) अप्पासाहेब-भाऊसाहेब-अण्णासाहेबांनी राहुल गांधींना दिलेला लग्नाचा सल्ला ऐकावा, शिवाजीनगरला उतरून ‘ब्लू लाइन’वरून सरकत्या जिन्यानं ‘रेडलाइन’ला यावं आणि रामवाडीकडून येणाऱ्या आमच्या वनाझच्या मेट्रोत बसून आयडियल कॉलनी स्टेशन गाठून, घरी जावं एवढं आमचं साधं स्वप्न होतं. मात्र, भुयारी की जमिनीवरून या वादानं आमच्या पिढीचं तारुण्य पोखरलं. एवढ्या काळात जमीन पोखरून काढली असती, तर एखादी ब्लू लाइन किंवा रेड लाइन तयार होऊन धावायलाही लागली असती.
असो. आता बरंच भवती न भवती होऊन अखेर मेट्रोची कुदळ आमच्या गावात मारण्यात आली आहे. साक्षात पंतप्रधानांनी येऊन भूमिपूजन केल्यानं पुढल्या चार-पाच वर्षांत मेट्रो शहरातून धावत आहे, असं दृश्य दिसून आमचे डोळे पाणावले आहेत. मेट्रो स्टेशन परिसरातील पाट्याही आम्हाला दिसू लागल्या आहेत. ‘मेट्रोतील एसी स्वयंनियंत्रित असतो. तो कमी वा जास्त करण्यासाठी कुठलेही बटण दाबू नये’, ‘दरवाजे डाव्या बाजूलाच उघडतील; तुम्ही उजवे असलात तरी इथे डावीकडेच वळा, अन्यथा डोके आपटेल’, ‘मेट्रोतील उद्-घोषणा रेकॉर्डेड असते; तरी बोलणारी कुठे तरी दिसेल या आशेने ज्येष्ठांनी उगाच माना फिरवू नयेत, स्पाँडिलायसिस वाढेल’, ‘येरवडा स्टेशनच्या नावावरून जुने पीजे करू नयेत; लोक तुम्हालाच वेडं समजतील’, ‘आपल्या मताची पिंक टाका, पण पान खाऊन थुंकू नका’ या आणि अशा अनेक पाट्यांनी मेट्रोच्या भिंती रंगतील. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ‘मेट्रो दुपारी एक ते चार बंद राहील... चौकशी करू नये, अपमान करण्यात येईल’ ही पाटी स्टेशनच्या नावाइतकीच ठळक अक्षरात सगळीकडे लावलेली दिसेल. 
मेट्रो आली, की आमच्या चिमुकल्या शहरात सगळीकडं आनंदीआनंद पसरेल. आपले शहर आंतरराष्ट्रीय झाले, या आनंदानं नवपुणेकरही खूश होतील. मेट्रोमुळं बालगंधर्ववरून घरी जाताना रिक्षेवाल्यांशी वाद घालायचे टळले म्हणून जुने पुणेकरही आनंदात असतील. शिवाय घरोघरी तरुण मुले मेट्रो स्टेशनपर्यंत जाण्यासाठी बाइकचा हट्ट करतील, त्यामुळे दुचाकी उत्पादकही हसत शीळ घालतील.
पाच वर्षांनंतरचं चित्र आम्हाला लख्ख दिसतंय. एक जानेवारी २०२२... आम्ही शिवाजीनगर मेट्रो जंक्शनला उभे आहोत. स्टेशन वाय-फाय असल्यानं आणि आमच्याकडं सेव्हन-जी फोन असल्यानं आमच्या मोबाइलमध्ये थेट महापालिका चॅनेल लाइव्ह दिसते. महापालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे. आता पालिकेत नवा प्रस्ताव आला आहे.... आत्ता बांधलेले दोन्ही मेट्रोचे मार्ग काढून बीआरटी मेट्रो करायची... एक माननीय तावातावानं विषय मांडत होते - सध्या नदीकाठानं मेट्रो जाते, पण नदीच्या पृष्ठभागावरची बरीचशी जागा वाया जाते... तेव्हा तिथं मेट्रोची बीआरटी करा... दोन बाजूंनी मेट्रो जातील, मध्ये पीएमपी बसचा ट्रॅक टाका... आणि खाली नदीत फास्ट क्रूझ सर्व्हिस द्या... क्रूझमधला माणूस रोप-वेनं बसमध्ये बसेल... बसमधून उतरला, की त्याचं मेट्रोत पाऊल पडेल... तेवढ्यात दुसरे माननीय म्हणाले - अहो, पण क्रूझ चालवण्याएवढे नदीत पाणीच नाही, त्याचं काय करायचं? त्यावर पहिले माननीय म्हणाले - माझी मिनरल वॉटरची फॅक्टरी आहे. टेंडरं काढा... पाहिजे तेवढं मिनरल वॉटर नदीत ओतू...
आणि अचानक पालिका सभेत पूर आला... सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटलं होतं...
----
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे, संवाद, १ जानेवारी २०१७)
-----