ओ काका...
-------------
हल्ली सार्वजनिक ठिकाणी जायचं मी टाळतो. म्हणजे भीतीच वाटते. ‘आली कुठूनशी साद’ की अक्षरशः दचकायला होतं. कुठं तरी खोल लपून बसावंसं वाटतं. ‘कृतान्तकटकामलध्वजजरा दिसो लागली’ आणि शरद तळवलकरांच्या शब्दांत ‘सकाळी उठल्यावर तोंड कुठपर्यंत धुवायचं’ हे कळेनासं झालंय हे प्रमुख कारण तर झालंच; पण बालवयातच (किंवा ‘अबाल’वयात म्हणा...) ‘काकापद’ मिळाल्यानंतर आता अल्पवयात ‘आजोबा’ होण्याची वेळ येते की काय, हेच त्या भीतीमागचं खरं कारण आहे. पण ही भीती केवळ अस्मादिकांनाच आहे, असं समजण्याचं कारण नाही. आज समाजात असे हजारो अकाली काका आणि काकू अस्वस्थपणे आणि उद्विग्न मनानं सर्वत्र संचार करीत आहेत. ‘एखाद्याचा मामा करणं’ हे माहिती होतं; पण ‘एखाद्याचा काका करणं’ हे नवीनच आम्ही ऐकतो आहोत. एक वेळ काका होणंही परडवलं; पण एखादी अविवाहिता, नवयौवना, मृगनयना रसिकमोहिनी अशी सार्वजनिकरीत्या अचानक ‘काकू’ होते, तेव्हा तर धरणी दुभंगून पोटात घेईल तर बरं, असं तिला वाटल्याखेरीज कसं राहील? (येथे सदरहू विचार मनात येणारी तरुणी पुण्यातली असल्यानं धरणीनं दुभंगून ॲक्चुअली तिला असं काकू म्हणणाऱ्याला पोटात घ्यायचं असतं, हा सूक्ष्म पोटभेद जिज्ञासूंनी लक्षात ठेवावा.)
या काकापुराणाचा इतिहास फार प्राचीन आहे. काका हे प्रस्थ
मोठंच आहे. काकास्पर्श झाल्यानं अनेक आत्मे ऐहिक जगात प्रगतीची परमावधी गाठून
राहिले आहेत, हे सर्व मान्यच आहे. तेव्हा काका होण्यासही अस्मादिकांची काडीमात्र
हरकत नाही. पण जेव्हा कुणीही म्हणजे अगदी आपल्यापेक्षा लहान वयाचं माणूस आपल्याला
काका किंवा काकू म्हणतं, तेव्हा मात्र ‘काका (म्हणण्यापासून), मला वाचवा’ असाच
आर्त टाहो फोडावासा वाटतो. अलीकडं हे फारच वाढलं आहे. बसस्टॉप म्हणू नका, मॉल
म्हणू नका, सिनेमा हॉल म्हणू नका... जिथे जिथे ‘ओ काका’चा गजर! वाईट याचं वाटतं, की आपल्याला हे हाकारे
घालणारे सगळे पुतणे किंवा पुतण्या आपल्यापेक्षा किमान वीस वर्षांनी तरी मोठे
असतात. चाळिशीच्या माणसाला दहा वर्षांच्या मुलानं किंवा मुलीनं काका म्हटलं तर
काहीच अडचण नाही हो! पण जेव्हा तिशीतल्या बस कंडक्टरला
पन्नाशीतली सुगृहिणी ‘ओ काका, तिकीट द्या हो’ असं म्हणते, तेव्हा काय करावे!
आणि हे दृश्य अस्मादिकांनी याचि देही याचि डोळा पाहिलेलं आहे. खरं
तर केवळ याच कारणासाठी अनेकांना ही सार्वजनिक कामं करायला नकोशी वाटतात. कधी आपले
‘सार्वजनिक काका’ होतील, याचा नेम नसतो. अनेकदा आपण सार्वजनिक समारंभांत सजून-धजून
उभे असतो. आपलं लग्न होऊन मारे दहा वर्षं उलटली, तरी नव्या नवऱ्याच्या रुबाबात तिथं
व्यासपीठावर उभे असतो. अशा वेळी नेमकी त्या आख्ख्या हॉलचं लक्ष वेधून घेणारी एखादी
नवतरुणी येते आणि तोंडात मारल्यासारखी आपल्याला ‘काका’ म्हणून जाते. कृपया हे
लक्षात घ्या, की आमच्यापेक्षा निम्म्या वयाच्या या मुलीमध्ये आता आम्हाला काडीचाही
‘तसा’ रस नसतो. (आम्ही आमच्या वयाच्या कॅटॅगरीतच लक्ष ठेवून असतो.)
पण तरी आम्हाला सगळ्यांसमोर या कन्येनं काका का म्हणावं? या
मुलीला तिथल्या तिथं मावशीआज्जी म्हटलं तर चालेल का?
असे अनेक मानहानीचे प्रसंग सोसत अस्मादिकांसारखे कित्येक
दुःखी जीव या आसमंतात जगत आहेत. अकारण लादलेल्या काकापणाचं ओझं सहन करीत आहेत. पुरुषांसारखीच
अवस्था अकाली काकूपण सोसायला लागलेल्या आमच्या भगिनींची होत असणार, याविषयी शंका
नाही. या पुण्यनगरीत तर अनेक बालकांना लहानपणीच प्रशिक्षित केले जाते, की
कुठल्याही अनोळखी माणसाला काका व कुठल्याही अनोळखी महिलेस काकू म्हणावयाचे. यावर आमचा
हृदयभेदी सवाल आहे, की पण का? का… का? कुठल्या काकूंनी काढले हे नियम? त्यांना कुणी भाऊ-वडील वगैरे कुणी नव्हते? अहो, तिशीतल्या
तारुण्याच्या हेलपाटणाऱ्या तारूवर आपले उरलेसुरले अवसान शिडागत सांभाळणाऱ्या आमच्यासारख्या
नवप्रौढांना अचानक काकापदाच्या पाताळी ढकलण्याची ही पाताळयंत्री कल्पना कोणत्या काकांच्या
डोक्यातून प्रथम बाहेर आली असेल? काय वाटलं असेल त्या
आत्म्याला, जेव्हा त्यानं एखाद्या पंचविशीतल्या घोडम्या तरुणाच्या वा एखाद्या
तिशीतल्या विवाहितेच्या तोंडून प्रथम ‘काका’ हे संबोधन ऐकले असेल? काही विचार? आपले दिवस भरले एवढा एकच नैराश्यवादी
विचार त्याच्या मनात प्रकट होऊन, त्या चिंतेपायी त्याच्या माथ्यावरचे उरलेसुरले
केसही गळून पडले नसतील काय? त्या परिस्थितीत तो खरोखर काका
म्हणण्यास पात्र होतोही; पण त्याची इच्छा नसताना त्यास या
नव्या नात्याचा दागिना का म्हणून बक्षीस द्यावयाचा?
सार्वजनिक ठिकाणी कोणास काय म्हणायचे याचे आपले पूर्वापार
संकेत आता काय उपयोगाचे आहेत? कुठल्याही दोन
व्यक्तींमध्ये कसलाही बंध निर्माण व्हायला लागला, की उठसूठ त्यास प्रस्थापित
नात्यांच्या मुसक्या बांधून आवळून टाकायचे ही आपल्याकडील रीतच होऊन गेली आहे. बंध
वगैरे सोडा, पण नंतर कधीही संबंध येणार नाही, असे लोक जेव्हा सार्वजनिक ठिकाणी भेटतात
तेव्हाही त्यांना एकमेकांना संबोधण्यासाठी काही अधिक चांगले व उभयपक्षी सन्मान्य
वाटेल, असे संबोधन आपल्याला अजूनही सापडत नाही, यास काय
म्हणावे! काकाला दादा हा एक पर्याय आहे, पण तेच एखाद्या
मुलीने म्हटलं, की पुन्हा चेहरा पंक्चर झालाच म्हणून समजा. तेव्हा दादा, भाऊ, भाई
इ. सर्व पर्याय बादच ठरतात. पूर्वी सिनेमातल्या नायिका नायक पहिल्यांदा भेटला, तर
त्याला ‘अहो मिस्टर, दिसत नाही का?’ असं काही तरी
म्हणायच्या. हल्ली कोण कुणाला मिस्टर वगैरे म्हणणार? त्यामुळं
तोही पर्याय बाद. थोडक्यात, आपल्याकडं असं अधलंमधलं व्यवस्थित संबोधनच नसल्याचा हा
परिणाम आहे. काय करावे?
इथं लक्षात घेण्यासारखा मुद्दा असा, की आपले कितीही वय
झाले, तरी आपण अद्याप तरुणच असल्याचा दावा सगळ्यांचा असतो. स्त्रियांना हे अधिक
लागू आहे. त्यामुळेच स्त्रीचे वय २५ च्या पुढं कधीच वाढत नाही, असं म्हटलं जातं.
पण पुरुषांनाही अगदी असंच वाटतं, हे त्यांना अकाली काका करणाऱ्या समस्त काकवांना
कळायला हवं. आता यावर कुणी असं म्हणेल, की तुम्ही दिसताच काकाछाप... त्याला कोण
काय करणार? तर हा मुद्दा बरोबर आहे. काका दिसू नये,
यासाठी आम्ही पुरुषांनीही प्रयत्न केलेच पाहिजेत. सुटलेलं पोट, अजागळ कपडे आणि
डोईवरचं उडत चाललेलं छप्पर असा अवतार असेल तर स्वर्गातली रंभा वा ऊर्वशीही
तुम्हाला ‘काका’ म्हटल्याशिवाय राहणार नाही. आपल्याकडं एकूणच व्यक्तिमत्त्वाची
जोपासना वगैरे प्रकार पूर्वीपासूनच ऑप्शनला टाकलेले असल्यामुळं पुरुषांकडून काही
होईल, याची शक्यता नाही. पण तरी जमल्यास करून बघा. काका म्हणणारी शेजारची १८
वर्षांची तरुणी अचानक तुम्हाला ‘हाय मि. अमुकतमुक (इथं ज्यानं त्यानं आपापलं नाव
घालावं)’ असं म्हणेलसुद्धा.
हल्ली सोशल मीडियावर वैयक्तिक बोलायची सोय असल्यानं तिथं हे
अवडंबर बऱ्यापैकी गळून पडतं आणि अनौपचारिक आणि कम्फर्टेबल नात्यांचे बंध तयार
होतात. मर्यादा शेवटी सगळीकडंच पाळायची असल्यानं ती सांभाळणाऱ्याला ही नवी नातीही
छान जतन करता येतात आणि त्यातून आनंदनिर्मितीच्या अपरिमित शक्यता तयार होतात. सार्वजनिक
जीवनात हा मोकळेपणा आपल्याकडं यायला अजून काही वर्षं जावी लागतील. तोपर्यंत किमान
उठसूट कुणालाही काका किंवा काकू म्हणू नये, एवढं भान तरी आपल्या आजूबाजूला मोकाट सुटलेल्या
पुतणे-पुतण्यांनी पाळावं ही अपेक्षा गैर ठरू नये.
बरोबर ना काका, बरोबर ना काकू!
---
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स संवाद पुरवणी, पुणे आवृत्ती - दि. २१ ऑगस्ट २०१६)
---