3 Feb 2026

पुण्यभूषण दिवाळी अंक २५ - लेख

चटकदार चवीची लज्जतदार भेळ
---------------------------------------

भेळ आवडत नाही असा माणूस भेटणं कठीण. लहान-थोर, स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत अशा सर्व भेदांपलीकडे जाऊन भेळ बहुतेक सर्वांना आवडतेच. करायला म्हटलं तर सोपी. तिची एकच एक अशी काही स्टँडर्ड रेसिपी नाही. त्यामुळं कुणालाही करायला सोपी वाटणारी. ती तयार करायला लागणारे सगळे घटकही मिळणं अवघड नाही. संध्याकाळचं चटक-मटक खाणं म्हणजे भेळ हे आजही अनेकांसाठी अभेद्य असं समीकरण आहे. भेळेत दोन मुख्य प्रकार. एक म्हणजे सुकी व दुसरा म्हणजे ओली. ओल्या भेळेला जरा तरी जामानिमा असतो. त्या मानाने सुकी भेळ अगदी कधीही, कुठेही तयार होऊ शकेल अशी. चुरमुरे, फरसाण, शेंगदाणे, बारीक शेव, कांदा, तळलेली वा कच्ची मिरची, असल्यास टोमॅटो व कोथिंबीर आणि वरून थोडंसं तिखट-मीठ घातलं की झाली सुकी भेळ तयार. ही शक्यतो वर्तमानपत्राच्या मोठ्या कागदावर ढीग करून खायची. शिवाय शक्यतो एकट्याने न खाता, समूहाने खायची. पूर्वी तर अनेक सार्वजनिक कार्यक्रमांनंतर कार्यकर्ते मंडळींचा हाच आहार असायचा. त्याला भत्ता असं म्हटलं जात असे. भेळभत्ता असा मूळ शब्द. नंतर त्याचं लघुरूप ‘भत्ता’ हेच प्रचलित झालं. राजकीय सभा, गणेशोत्सव, बैठका अशा कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी उपस्थित सर्वांना एकत्र खायला देण्यासारखा (व अर्थात परवडणारा) हाच पदार्थ असल्यानं तो अतिशय लोकप्रिय आहे. अगदी लहान-मोठ्या सहली, गेटटुगेदर, ऑफिसमधल्या अचानक ठरणाऱ्या पार्ट्या आणि दुपारच्या वेळेला मुलांना खायला काय द्यावे या विवंचनेत असणाऱ्या आया या सर्व ठिकाणी उपयुक्त ठरते ती ही सुकी भेळ किंवा भत्ता. महाराष्ट्रातल्या विविध शहरांत-गावांत या भत्त्याची वेगवेगळी रूपं पाहायला मिळतात. डाव्या आघाडीच्या किंवा कामगार संघटनांच्या बैठकांत अशा भत्त्यात ‘लेनिन मिक्श्चर’ हा प्रकार लोकप्रिय होता. याचं मूळ आंध्र प्रदेशात आहे. विजयवाडा येथून हे ‘लेनिन मिक्श्चर’ प्रसिद्ध झालं. भत्त्यासारखाच प्रकार, पण आंध्रात यात तळलेले दाणे, मसाले असं बंरच काय काय मिक्स करतात. सत्तरच्या दशकात मुंबईत गिरणी कामगार, त्यांच्या बैठका, कामगार संघटना, डाव्यांच्या संघटना यांतून हा प्रकार अधिक बघायला मिळे. निवडक मराठी साहित्यिकांच्या लेखनात याचा उल्लेख आढळतो. महाराष्ट्रात नाशिक, सांगली-मिरज, पंढरपूर आदी ठिकाणचे अनुक्रमे चिवडा, भडंग व मुरमुरे राज्यभर प्रसिद्ध असल्याने तेथील भेळेत स्वाभाविकच या पदार्थांचा मुबलक वापर व्हायला लागला. किंबहुना त्या त्या शहराची ती खासियत ठरली.
ओली भेळ हा जास्त करून बागेत जाऊन खाण्याचा प्रकार. रेसिपी सुक्या भेळेसारखीच, फक्त यात चिंचेचे, पुदिन्याचे, मिरचीचे असे मिश्र पाणी घालून ती भेळ ओली केली जाते. हे घटक कसे मिळून येतात आणि ते पाणी काय चवीचं तयार होतं, यावर त्या त्या भेळेची चव ठरते. मुंबईतील चौपाटीवरची भेळ सर्व राज्यात सर्वाधिक प्रसिद्ध आहे. पु. ल. देशपांडे यांनी म्हटल्याप्रमाणे, अशा ठिकाणी खाताना स्वच्छतेचे इंद्रिय आवरावे लागते. किंबहुना भे‌ळवाल्याच्या कळकटपणाच्या चढत्या श्रेणीत भेळेची चव रंगते. मुंबईत या भेळेसोबत पुरी दिली जाते. त्या पुरीनेच ती भेळ खाणे अपेक्षित असते.
मुंबईत जशी चौपाटी तशी पुण्यात सारसबाग, शनिवारवाडा आणि कमिशनर ऑफिस येथील ‘चौपाट्या’ पूर्वीपासून प्रसिद्ध होत्या. महाराष्ट्रात इतरत्र जी भेळ मिळते त्यात प्रामुख्याने फरसाण हा बेस असतो. पुणेरी भेळेचे वैशिष्ट्य म्हणजे येथे चुरमुरे हा बेस असतो. त्यामुळ‌े पुण्याबाहेरच्या भेळी काहीशा तिखट आणि झणझणीत असतात. मात्र, पुण्यातील भेळ चवीला चटकदार असली, तरी न बाधणारी, सौम्य अशी असते. मुरमुऱ्यांसोबत पापडी, भावनगरी शेव, एक नंबर (बारीक) शेव, गाठी, खारेदाणे, तिखट बुंदी, काळे मीठ, मिरचीचा ठेचा, चिंच-खजुराची चटणी, वर कांदा-टोमॅटो हे सगळं मिश्रण मोठ्या पातेल्यात एकजीव करायचं, त्यावर पुन्हा बारीक शेव, कोथिंबीर, कांदा, ग्राहकाने मागितल्यास पुन्हा थोडी चिंचेची चटणी, सीझन असेल तर कैरीच्या फोडी अशी साधारण भेळ तयार करण्याची इथली पद्धत.
मी ३०-३५ वर्षांपूर्वी पुण्यात आलो, तेव्हा सर्वांत प्रथम सारसबागेसमोरच भेळ खाल्ली होती. त्यानंतर पुण्यातच वास्तव्य झालं. त्यानंतर अनेकदा, अनेक ठिकाणची भेळ खाल्ली. ‘सकाळ’मध्ये काम करताना शनिवारवाड्यासमोरची चौपाटी हा आमचा रात्रीच्या जेवणाऐवजीचा हक्काचा पर्याय असायचा. तेव्हा शनिवारवाड्यासमोर मोकळं मैदान होतं. आता समोर दगडी भिंत घातली आहे, ती नव्हती. तिथं रस्त्याच्या कडेलाच ओळीनं भेळेच्या, आइस्क्रीमच्या, खाऊच्या गाड्या लागलेल्या असत. जवळपास राहणारी पुणेकर मंडळी तिथं रात्री फिरायला येत. आम्हाला काम संपवून बाहेर पडायला अनेकदा उशीर होई. तोवर हॉटेलं बंद होत आलेली असत आणि खरं सांगायचं तर रोज हॉटेलमध्ये जाऊन खाणं परवडायचंही नाही. मग शनिवारवाड्यासमोरची ही चौपाटी मदतीला यायची. मी व माझे सहकारी चालत तिथं जात असू आणि तेव्हा पाच की दहा रुपयांना मिळणाऱ्या भेळेत रात्रीचं जेवण भागवत असू. तिथल्या भेळेच्या गाड्यांची नावं आता फार लक्षात नाहीत. पण एक ‘नवरत्न’ नावाची भेळ बऱ्यापैकी प्रसिद्ध होती. अर्थात तेव्हा भूक भागवणं हाच मुख्य हेतू असल्यानं भेळ किती चवीष्ट आहे की नाही वगैरे फारसं बघितलं जायचं नाही. मात्र, या सर्व भेळेच्या गाड्यांवर तेव्हाही भरभरून गर्दी व्हायची. एक पथ्य मात्र आम्ही आवर्जून पाळायचो. ते म्हणजे गणपतीच्या काळात बाहेर, रस्त्यावर ही भेळ खायची नाही! (किंवा खरं तर काहीच खायचं नाही.) त्या काळात त्या भेळेची चव पार बिघडलेली असायची. (मला वाटतं, फक्त गणपतीच्या काळात पुण्यात येऊन ही असली भेळ खाऊन मगच बाहेरचे लोक पुण्यात चांगली भेळ मिळत नाही, असं म्हणत असावेत.)
शनिवारवाड्याप्रमाणेच स्वारगेट बस स्टँडवर अगदी मध्यरात्रीही एक भेळेचा गाडा सुरू असायचा. स्थानकाच्या अगदी आत, स्वारगेट डेपोच्या बाजूला तो गाडा उभा असायचा. आम्ही कित्येकदा ऑफिस संपवून रात्री दीड-दोन वाजता तिथं जाऊन भेळ खाल्ली आहे. त्या भेळेच्या गाड्याचं नाव मात्र आता विसरलो. त्या भेळेची चव व त्यासोबत सहकाऱ्यांसोबत विविध विषयांवर झोडलेल्या मनसोक्त गप्पा मात्र आजही लक्षात आहेत. पूर्वी शिवाजीनगर रेल्वेस्थानकाजवळची झटका भेळ प्रसिद्ध होती. ही मी कधी चाखली नाही, मात्र ती खूप प्रसिद्ध होती, असं ऐकलं आहे. हे मालक म्हणे भेळ तयार करताना मानेला झटका द्यायचे म्हणून ते नाव! (हे असं नाव ठेवणं पुण्याच्या तेव्हाच्या प्रकृतीला अगदी साजेसंच...) सिटीपोस्टाजवळची अण्णांची भेळ अशीच प्रसिद्ध होती. इथं उकडलेला बटाटा घालून भेळ मिळायची. नेहमीच्या ग्राहकांशी वर गप्पांची मैफलही इथं रंगायची. अपोलो टॉकीजजवळच्या ‘इंटरव्हल’ या भेळेविषयीही फक्त ऐकलं आहे. कधी जाण्याचा योग आला नाही. तिथं प्रत्येक टेबलावर चिंचेच्या पाण्याचा तांब्या व तिखट चटणीची वाटी ठेवलेली असते म्हणे. शौकिनांनी आपल्याला हवी तशी चव तयार करून घ्यावी. लाल भडंग भेळ ही त्यांची खासियत. जंगली महाराज रस्त्यावरून झेड ब्रिजकडं वळताना आता तिथं दोन्ही बाजूंना मोठी खाऊ गल्ली विकसित झाली आहे. पूर्वी तिथं अगदी मोजक्या भेळेच्या गाड्या असायच्या. तिथली सांगली भडंग भेळ खूप प्रसिद्ध आहे. याशिवाय आर डेक्कन मॉलच्या खाली यशवंत कच्छी दाबेलीच्या शेजारी सोनाक्षी या नावाचा भेळेचा गाडा लागतो. त्यांचीही भेळ, पाणीपुरी, शेवपुरी असं सगळं चांगलं असतं.
याशिवाय तेव्हाचे आमच्या आवडीचे आणखी एक ठिकाण होते ते म्हणजे फरासखान्यासमोरचे ‘रामचंद्र भगवंत घाटगे चिवडेवाले’ यांच्याकडची कोरडी भेळ. खरं तर तो चिवडाच. मात्र, त्यात सुक्या भेळेतील सर्व घटक असायचे. अनिल अवचट यांनी या चिवडेवाल्यांवर लेख लिहिल्यामुळे ते खूपच प्रसिद्ध झाले. पायजमा, पांढरा शर्ट, गांधी टोपी अशा वेषातील ते घाटगेकाका मला आजही आठवतात. कुणी जादा लिंबू किंवा मिरची मागितली, की ते जरा वैतागायचे. ‘आम्ही करून दिलेलं मिश्रण सर्वोत्तम असून, तुम्ही ती चव बिघडवू नका,’ असंच त्यांचं सांगणं असायचं. त्यांचे नेहमीचे ग्राहक त्यामुळे कधीही जादा लिंबू, कांदा वा मिरची मागायचे नाहीत. अतिशय अप्रतिम असा हा चिवडा असायचा. इथंच अगदी जवळ जोगेश्वरीच्या बोळातील प्रवीण भेळही अतिशय जुनी व प्रसिद्ध आहे.
पूर्वी चौपाटीव्यतिरिक्त पुण्यात निव्वळ भेळेची म्हणून काही दुकानं अतिशय प्रसिद्ध होती. गुप्ता भेळ, मंडईजवळची लता भेळ, पासोड्या विठोबाजवळची नानाची भेळ, सोन्या मारुती चौकातील मारुती भेळ, लोखंडी तालमीसमोरचा (बहुतेक गजानन) भेळवाला, पुष्करिणी भेळ हे मध्य वस्तीतले असेच प्रसिद्ध भेळवाले. यांच्या पुणेरीपणाचे किस्सेही बहुतेकांना माहिती आहेत. लोखंडे तालमीचा गणपती बसतो, तिथं अगदी समोर एका अगदी चिंचोळ्या जागेत हे भेळवाले उभे राहायचे. तिरक्या भिंतीमुळे त्रिकोणी आकार तयार झाला होता तिथं. संध्याकाळी पाच वाजता तिथलं शटर वर करून ते भेळेचं दुकान सुरू करायचे. त्यांच्या भेळेची ख्याती बऱ्यापैकी होती. त्यामुळं लोक उभे राहून,  वाट बघून ती भेळ खात असत. त्या दुकानाचं नाव बहुतेक गजानन भेळ असावं. आता मला नीटसं लक्षात नाही; मात्र लक्षात आहे तो अतिशय भरभर चालणारा त्यांचा हात. अगदी थोड्या वेळात त्या भल्यामोठ्या स्टीलच्या भांड्यात ते भेळ तयार करत असत. ग्राहकांच्या गर्दीमुळे तो एकटा माणूस अनेकदा वैतागून जाई आणि लोकांवर ओरडे. मात्र, लोक तरीही तो ओरडा ऐकून घेऊनही ती भेळ खायला तिथं थांबत.

अशीच दुसरी प्रसिद्ध पुणेरी भेळ म्हणजे सदाशिव पेठेतली पुष्करिणी भेळ. कुमठेकर रोडवरील बिझीलँड बिल्डिंगमधील ही भेळ अतिशय लोकप्रिय आहे. प्रभाकर वासुदेव मेंगणे यांनी १९२५ मध्ये या भेळेची सुरुवात केली. म्हणजेच सध्या या भेळेच्या दुकानाची जन्मशताब्दी सुरू आहे. सुरुवातीला बाजीराव रोडवर ‘बँक ऑफ महाराष्ट्र’जवळ हे दुकान होतं. तिथं पूर्वी एक पुष्करिणी (हौद) असल्यामुळं दुकानाचं नावही त्यांनी ‘पुष्करिणी’ असंच ठेवलं. नंतर १९३५ मध्ये ते आताच्या जागेत गेलं व अजूनही ते तिथंच आहे. मुरमुरे, शेव, चिवडा वा फरसाण आणि चटणी हे कुठल्याही भेळ‌ेचं मूलभूत साहित्य. ‘पुष्करिणी’मध्ये हे सर्व घटक तर असतातच; शिवाय इथं लाल तिखट आणि चिंच व गुळाची चटणीही वापरली जाते. त्यामुळंच इतर भेळेपेक्षा ही भेळ अधिक चटकदार लागते. इथं एका वेळी खूप जास्त भेळ करून ठेवायची पद्धत नाही. सर्व घटकांचा कुरकुरीतपणा, ताजेपणा कायम राहावा, हाच त्यामागचा हेतू असतो. (त्यामुळं इथं वेटिंग असतं कायम!) ‘पुष्करिणी’त फरसाण, चिवडा व इतर सर्व पदार्थ स्थानिक बाजारपेठेतून व विश्वासाच्या पुरवठादारांकडूनच घेतले जातात. शेव व शेंगदाणे ताजे मिळावेत यासाठी रोज सकाळी दुकानातच शेव तळली जाते व शेंगदाणे भाजले जातात.
प्रभाकर मेंगणे यांचे नातू नित्यानंद सध्या दुकान सांभाळतात. ते आणि आणखी एक व्यवस्थापक एवढे दोघेच जण दुकानात असतात. आजूबाजूला लक्ष्मी रोड, शनिवार, मंडई, तुळशीबाग इथं खरेदी करून झाली, की बहुतेक पुणेकर इथली भेळ खायला येतातच. साधारण संध्याकाळी साडेचार वाजता दुकान उघडतं. भेळ संपेपर्यंत म्हणजे साधारण आठ-साडेआठपर्यंत ते सुरू राहतं. वेटिंग असलं, तरी सर्वांना ताजी व दर्जेदार भेळ देण्याकडं मालकांचा कटाक्ष असतो. इथल्या पाट्या हाही अनेकदा चर्चेचा विषय असतो. एकूण, अस्सल पुणेरी परंपरेतील अशी ही भेळ आहे. 

बिबवेवाडीत सुरू झालेली कल्याण भेळ म्हणजे लहान गोष्टींपासून सुरुवात करून यशाचे शिखर कसे गाठता येते याचे उत्तम उदाहरण आहे. रमेशभाऊ कोंढरे यांनी १९७४ मध्ये सुरू केलेल्या ‘कल्याण भे‌ळ’ या अन्न उद्योगाचा प्रसार आता अनेक शाखा आणि परदेशांत भेळ निर्यात करण्यापर्यंत झाला आहे. गरिबीमुळे रमेशभाऊ व त्यांचे वडील मार्केट यार्डात हमाल म्हणून काम करत असत. गरिबीमुळं चौथ्या इयत्तेतच रमेशभाऊंचं शिक्षण थांबलं. गुळाच्या ढेपा पोत्यात भरण्यापासून ते भाजी विकण्यापर्यंत सर्व व्यवसाय त्यांचं कुटुंब करत होतं. त्याच सुमारास, म्हणजे १९७४ मध्ये रमेशभाऊंच्या आईने बिबवेवाडीतील कल्याण सोसायटीच्या बाहेर शाळेतील मुलांना भेळ करून द्यायला सुरुवात केली. भेळेतील चटणी करण्याची त्यांची स्वत:ची एक खास पद्धत होती. यामुळं त्यांची भेळ मुलांमध्ये अल्पावधीत लोकप्रिय झाली. हळूहळू रमेशभाऊंनी ग्राहकांच्या प्रतिसादावरून अंदाज घेत नवनव्या डिशेस सुरू केल्या आणि या व्यवसायाचा विस्तार केला. अगदी सुरुवातीला भेळेची छोटी गाडी होती. तिथपासून आताच्या भव्य दुकानापर्यंत या भेळेच्या उद्योगाचा विस्तार कोंढरे कुटुंबीयांनी केला आहे. पुण्यात आता आठ शाखा आणि तब्बल ३८ देशांना निर्यात एवढा या व्यवसायाचा व्याप आता वाढला आहे. 

कल्याण भेळेप्रमाणेच पुण्यातील भेळेचा आणखी एक प्रसिद्ध ब्रँड म्हणजे गणेश भेळ. दिनेश गुडमेवार व त्यांचे बंधू हे या ब्रँडचे संचालक आहेत. ते मूळचे नांदेडचे. लहानपणी ते पुण्यात त्यांच्या मामाकडे येत असत. नंतर ते शाळा सोडून मामाकडेच आले व त्यांना लहान-मोठ्या कामांत मदत करू लागले. त्यांनी १९७८ मध्ये पुण्यात भेळेची एक लहान गाडी सुरू केली. त्यानंतर सुमारे २० वर्षे त्यांनी या गाडीवरूनच भेळविक्रीचा व्यवसाय केला. त्यानंतर १९९८ मध्ये कर्वेनगरमध्ये त्यांच्या वडिलांनी पहिल्यांदा गणेश भेळ या नावाने दुकान सुरू केले. त्यानंतर दोनच वर्षांत एकाची तीन दुकाने झाली. आता पुण्यात त्यांची एकूण १३ दुकाने आहेत. त्यांनी भेळेच्या व्यवसायाला कॉर्पोरेट रूप दिले. अनेक फ्रँचायझी, यंत्रांवर निर्मिती, निर्यात अशा सर्व आघाड्यांवर गणेश भेळ हा ब्रँड आता नावलौकिक टिकवून आहे. भेळेप्रमाणेच इथं चाटचे सर्व पदार्थ मिळतात आणि त्या प्रत्येक पदार्थाचं ब्रँडिंग करण्यात ‘गणेश भेळ’चे मालक यशस्वी झाले आहेत. इथल्या पदार्थांचा दर्जा आवर्जून जपला जातो. इथले कामगार अगदी पंचतारांकित हॉटेलमध्ये असतात त्याप्रमाणे केस बांधून वगैरे डिश सर्व्ह करत असतात. बहुतेक घटक पदार्थ आता कारखान्यांत यंत्रांद्वारे तयार केले जातात. पाणीपुरीसारखा पदार्थ आरोग्यदायीच असावा, यासाठी तिथं मिनरल वॉटर वापरलं जातं. हे सर्व असताना इथले पदार्थ थोडेसे महाग वाटू शकतील. मात्र, चांगल्या दर्जासाठी दाम मोजणारे ग्राहक आपल्याकडे आता विपुल आहेत. त्यांना या भेळ‌ेच्या ब्रँडचे पदार्थ निश्चितच आवडतात.
गणेश भेळेप्रमाणेच आणखी एक लोकप्रिय नाव म्हणजे कैलास भेळ. यांचं मूळ ठिकाण खरं तर पुण्यात नाही. पुण्याहून साताऱ्याला जाताना खेड शिवापूर हे गाव लागतं. इथं खूप वर्षांपासून कैलास भेळ विकली जाते. आता या महामार्गावर तुम्हाला अनेक ‘कैलास भेळ’ दिसतील. अगदी एखाद्या लहान मॉलसारखी वाटतील, एवढी भव्य भेळेची दुकानं आता तिथं तयार झाली आहेत. किसन मिठारे, कैलास मिठारे, सुभाष मिठारे व अशोक मिठारे यांनी १९७५ मध्ये शिवापूरमध्ये भेळेचं लहानसं दुकान सुरू केलं. इथल्या स्वादिष्ट, चटकदार भेळेमुळं लवकरच कैलास भेळ हे नाव पुणे-सातारा महामार्गानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांत लोकप्रिय झालं. सध्याच्या ‘कैलास भेळ’ या ब्रँडचे मालक शिवराज मिठारे यांनी हा व्यवसाय नव्या उंचीवर नेला. पुण्याबाहेरही हा ब्रँड लोकप्रिय झाला पाहिजे, या विचाराने त्यांनी व्यवसायाचा मोठ्या प्रमाणावर विस्तार केला. आज या भेळेचे आकर्षक वेष्टन परदेशांतही निर्यात केले जाते. पुणे-सातारा महामार्गावर वरवे येथे ‘कैलास भेळ’चे मोठे विक्री केंद्र व उपाहारगृह दिसेल. आता तिथं केवळ भेळच नव्हे, तर एखाद्या उपाहारगृहात मिळतात, ते सर्व पदार्थ दिले जातात. त्यातही पिठलं-भाकरी हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. एका छोट्या दुकानापासून सुरू होऊन एका मोठ्या कंपनीपर्यंतचा हा ‘कैलास’चा पदार्थ प्रेरणादायीच आहे. मराठी माणूस व्यवसायात दिसत नाही किंवा मागे पडतो, या समजुतींना छेद देणारेच हे सर्व भेळ उद्योजक आहेत, असे म्हणता येईल.
शिवाजीनगर भागातील गुप्ता भेळ हीदेखील पुण्यातील एक प्रसिद्ध भेळ. आता सुमारे ८३ वर्षांपासून ही भेळ पुणेकरांच्या सेवेत आहे. आता गुप्तांची तिसरी पिढी या व्यवसायात आहे. सुरुवातीला अगदी छोट्या फेरीवाल्या गाड्यापासून सुरुवात झालेल्या या भेळ व्यवसायाने आता चांगलेच मूळ धरले आहे. गुप्ता भेळ येथे साधारणपणे तीन प्रकारच्या भेळ मिळतात. पहिल्या प्रकारात साधी, सुकी भेळ मिळते. यात फरसाण, मुरमुरे एवढंच असतं. दुसरी म्हणजे ओली भेळ. यात चिंचेचं पाणी, कांदा, लाल तिखट टाकून ओली भेळ तयार केली जाते. तिसरी म्हणजे मटकी भेळ. यात मटकीमुळं भेळेचा स्वाद वाढतो. गुप्ता बंधू भेळेसाठी लागणारे फरसाण स्वत: कारखान्यात तयार करतात. शेवेचे वेगवेगळे प्रकारही तयार केले जातात. छत्रपती शिवाजीमहाराज रस्त्यावर असलेलं हे दुकान सकाळी आठ वाजता सुरू होते. ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू असतं. मग पुन्हा चारनंतर सुरू होतं आणि संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू राहतं. उत्तम दर्जामुळं अगदी लांबून लांबून ही भेळ खाण्यासाठी लोक येतात, असा गुप्ता बंधूंचा अनुभव आहे.
मुंढवा (केशवनगर) येथील जय गणेश भेळ हा ब्रँडही अतिशय लोकप्रिय आहे. संजय माने यांनी नोकरी सोडून पूर्ण वेळ भेळेचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. गेल्या १८ वर्षांपासून त्यांनी हा व्यवसाय यशस्वीपणे उभारला आहे. सुरुवातीला केवळ भेळ व पाणीपुरी होती. कालानंतराने त्यांनी मटकी भेळ, रगडापुरी, दहीपुरी असे पदार्थही विक्रीसाठी ठेवले. मोठ्या ब्रँडची मोठी दुकाने आसपास होती. स्पर्धाही खूप होती. मात्र, चिकाटी, मेहनत, स्पर्धेत टिकण्यासाठी केलेला अभ्यास या सर्व गुणांमुळे माने यांचा हा ब्रँड चांगला यशस्वी झाला आहे.
पुण्यातील बहुतेक बागांजवळ भेळेची दुकाने आहेतच. छत्रपती संभाजी उद्यान हे जंगली महाराज रस्त्यावरचं आणि पुण्यातलं एक महत्त्वाचं उद्यान. या उद्यानात असलेल्या ‘पूनम भेळ’ या प्रसिद्ध दुकानाचे सध्या अमृतमहोत्सवी वर्ष सुरू आहे. खरं तर अलीकडच्या काळात संभाजी उद्यानाची रया गेल्यासारखी स्थिती आहे. जंगली महाराज रस्त्यावर आणि एकूणच पुण्यात फूड जॉइंट्स वाढल्यामुळे संभाजी उद्यानातील अनेक फूड स्टॉल एक तर कमी झाले आहेत किंवा तिथे येणाऱ्यांची संख्या तरी घटली आहे. मात्र, पूनम भेळ अद्यापही पूर्वीच्याच थाटात ग्राहकांना सेवा देत आहे. फावडे कुटुंबाच्या मालकीच्या या दुकानाची जबाबदारी आता तिसऱ्या पिढीकडे आली आहे. पुण्याचे तत्कालीन मनपा आयुक्त स. गो. बर्वे यांनी नाशिकहून बोलावून घेतल्याने फावडे कुटुंब पुण्यात आले, असे परशुराम फावडे सांगतात. फावडे यांचे आजोबा बाबूराव फावडे नाशिकमध्ये चिवडा विक्रीचा व्यवसाय करत असत. हा चिवडा अतिशय आवडल्याने बर्वे यांनी फावडे कुटुंबास पुण्यात व्यवसाय करण्यास बोलावले. तेव्हा छत्रपती संभाजी उद्यान नव्याने विकसित करण्यात आले होते. येथे फावडे कुटुंबास दुकानाचा परवाना देण्यात आला आणि एक जुलै १९५१ पासून तेथे बाबूराव फावडे यांनी चिवडाविक्री सुरू केली. त्या काळात एक आणा, दोन आणे अशी त्या चिवड्याची किंमत असायची. पुढे व्यवसायाचा व्याप वाढल्यावर परशुराम यांचे वडील मधुकर यांनी ‘किर्लोस्कर ऑइल इंजिन्स’मधली नोकरी सोडून, या व्यवसायात उडी घेतली. त्यांनी चिवडाविक्रीसोबतच भेळ व पाणीपुरी यांचीही विक्री सुरू केली. आता परशुराम व त्यांचे बंधू वासुदेव हा व्यवसाय सांभाळतात. संभाजी उद्यानाची वेळ मर्यादित केल्याने, तसेच तेथील आकर्षणे घटल्याने व्यवसायावर परिणाम झाल्याची खंत परशुराम फावडे बोलून दाखवतात. त्यांचा स्वभाव गप्पीष्ट, बोलका. बोलता बोलता सढळ हाताने दोन पाणीपुरी प्लेटमध्ये अधिक घालतील. पाणीपुरीतही उगाचच खारी बुंदी, शेव वगैरे जादा गोष्टी टाकण्यावर त्यांचा विश्वास नाही. फक्त पाणीपुरीचं ते खास तयार केलेलं पाणी घालूनच पुरी खायला पाहिजे असा त्यांचा कटाक्ष. तशीच पाणीपुरी आवडते म्हटल्यावर खुलून दोन पुऱ्या प्लेटमध्ये अधिक टाकतात. वर थोडी भेळ ऑफिसमध्ये खायला बांधून देऊ का, असंही म्हणतात. याचे कुठलेही जादा पैसे वगैरे नाहीत. वर्षानुवर्षे बांधून ठेवलेले ग्राहक का बांधून राहतात, याचं गुपित फावडे यांच्याकडं बघितलं की सहज उलगडतं.
पुण्यातल्या सर्व भेळ दुकानांचं आद्यपीठ म्हणता येईल अशी जागा म्हणजे सारसबाग चौपाटी. या परिसरातील समाधान भेळ, संतोष भेळ ही भेळेची दुकानं लोकप्रिय आहेत. समाधान भेळ पर्वती पायथ्याच्या रस्त्याला, दांडेकर पुलाकडे जाताना लागणारं प्रसिद्ध दुकान. हे दुकान ५५ वर्षांहून अधिक काळ सुरू आहे. मामा भेळवाले यांची ही भेळ मटकी भेळेसाठी प्रसिद्ध आहे. मुरमुरे, पापडी, शेव, बुंदी, खारे शेंगदाणे, भरपूर कांदा आणि अर्थातच भरपूर मटकी घालून ही भेळ केली जाते. ही मटकी हळद, मीठ घालून चांगली उकडलेली असते. यात वरून घातला जाणारा मसालाही ‘समाधान स्पेशल कांदा-लसूण मसाला’ असतो. सोबत उकडलेली मिरची असतेच. ठेचाही आवडीनुसार मिळतो. लिंबू पिळून, हाताने ही भेळ खाताना उत्तम चवीचा आनंद मिळतो, असं अनेक ग्राहक सांगतात. भांबरकर कुटुंबीयांच्या मालकीचे हे दुकान १९७० पासून सुरू आहे. इथल्या भेळेतलं फरसाण मालक स्वत:च तयार करतात. त्याच्या दर्जाकडे विशेष लक्ष देतात. पुण्यात सनसिटीजवळ यांची दुसरी शाखाही आहे.
सारसबाग चौपाटी परिसरातली आणखी एक प्रसिद्ध भेळ म्हणजे संतोष भेळ. किसनराव पवार यांच्या मालकीचे हे दुकान १९७८ पासून सारसबाग परिसरात आहे. आता संतोष हॉल (सिंहगड रोड), महर्षीनगर इथेही संतोष भेळेच्या शाखा सुरू झाल्या आहेत. कल्पना भेळ ही टिळक रोडवरची आणखी एक प्रसिद्ध व जुनी भेळ. ही भेळ १९४८ पासून पुणेकरांच्या सेवेत आहे. या भेळेची एक शाखा सहकारनगर परिसरातही आहे. टिळक रोडवर या भेळेच्या गाडीवर सत्तरच्या दशकात ‘दाढीवाल्या काकां’ची भेळ खाल्ली नाही, असे पुणेकर सापडणे कठीण. (याच गाडीशेजारी असलेल्या ‘उत्तम चाट भांडार’ या गाडीवर मिळणाऱ्या पाणीपुरीची चव चाखली नसेल असे पुणेकरही क्वचितच असतील. विशेषत: या गाडीवर ज्या आजी (त्यांचं नाव बहुतेक बेबीताई) असायच्या, त्यांच्याच हातची पाणीपुरी विशेष चवीची लागायची, असं अनेक पुणेकर छातीवर हात ठेवून सांगतील. हातची म्हणण्यापेक्षा चमच्याची, कारण या आजी पुरी कधीही हाताने पाण्यात बुचकळून द्यायच्या नाहीत. त्याऐवजी चमच्याने ते पाणी पुरीत भरून द्यायच्या. असो. हे जरा विषयांतर झालं.)
पुणे शहरात गल्लीबोळांत अक्षरश: शेकड्यानी भेळेच्या गाड्या किंवा दुकानं आहेत. स्थानिक लोकांत ते चांगलेच लोकप्रियही आहेत. गेल्या काही वर्षांत, विशेषत: सन २००० नंतर पुणे शहर अवाढव्य पसरलं आहे. निगडीपासून ते कात्रजपर्यंत आणि यवतपासून ते वाघोलीपर्यंत शहर प्रचंड वेगानं विस्तारलं आहे. निगडी प्राधिकरणातला एक चौक तर ‘भेळ चौक’ म्हणूनच प्रसिद्ध आहे. या सर्व ठिकाणच्या भेळेच्या दुकानांची दखल घ्यायची किंवा तिथली भेळ चाखायची तर आयुष्य पुरणार नाही. याशिवाय पुणे जिल्ह्याचा विचार केला तर भेळेच्या दुकानांची संख्या काही हजारांत निश्चितपणे जाईल. नगरहून येताना लोणीकंदजवळील सोमेश्वर मटकी भेळ, सरदवाडीची प्रसिद्ध भेळ, नाशिककडे जाताना चाकण-खेड दरम्यान भामा नदीवरचा पूल ओलांडल्यावर लागणारी तिथल्या स्थानिक भेळेची प्रसिद्ध दुकानं अशी किती तरी उदाहरणं सांगता येतील. पुण्यापासून मुंबई, सातारा, सोलापूर, नगर व नाशिक या सर्व महामार्गांवर आता भेळ व चाट पदार्थ देणारी मोठमोठी दुकाने उभारली गेली आहेत. ती सर्व वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनी परिपूर्ण व त्यामुळं लोकप्रियही आहेत. या सर्वांचा आढावा या एकाच लेखात घेणं खरोखर अवघड आहे आणि एका व्यक्तीची ती मर्यादाही आहे. (त्यामुळं या लेखात काही प्रसिद्ध किंवा आपल्या आवडीच्या भेळेचे उल्लेख राहून गेले असतील, हे अगदी शक्य आहे.)
थोडक्यात, भेळ ही अशी आपल्या नेहमीच्या अळणी जगण्याला खमंग, चटकदार, लज्जतदार बनवणारी एक नामी चीज आहे. आपलं आयुष्य या भेळेतल्या चविष्ट घटकांसारखंच रुचकर आणि उत्तम व्हायला हवं, एवढी शिकवण तर भेळ आपल्याला देतेच!

इति भेळपुराण संपूर्णम्...

---

(पूर्वप्रसिद्धी : पुण्यभूषण दिवाळी अंक २-०२५)

---


2 Feb 2026

मटा पुणे दिवाळी अंक २५ - कथा

रघू अन् रायगडचा थरार
-----------------------------

यंदाच्या दिवाळीत ताडोबा अभयारण्यात जायचं, म्हणून रघू खूश होता. खरं तर त्याच्या शाळेचीच सहल जाणार होती. मात्र, नंतर ती बदलून रायगडावर नेण्याचं ठरलं. रघूला रायगडलाही जायचं होतं आणि ताडोब्यालाही! मात्र, रघूच्या वडिलांनी शाळेच्या सहलीतून रायगडला जा, असं सांगितलं. ताडोबा अभयारण्याला पुढच्या वर्षी नक्की जाऊ, म्हणून रघूच्या बाबांनी त्याची समजूत काढली. त्या दिवशी रघू ताडोब्यातील वाघांची स्वप्नं रंगवतच झोपी गेला... मात्र, स्वप्नात कधी इंटरव्हल झाला ते रघूला कळलंच नाही. न बघितलेल्या ताडोबाची फिल्म जरा जरा ब्लर होत फेड आउट झाली आणि एकदम सह्याद्रीचा एक उंच डोंगर तिथं हळूहळू प्रकट होऊ लागला... आधी निळं आकाश, मग जमीन, त्यावर हिरवेगार डोंगर... ती माची... आणि एकदम त्याला दिसला तो - रायगड. हो, राजांचा गड... हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला रायगड. दुर्गांचा दुर्ग, उत्तुंग, बेलाग असा रायगड... रघू एकदम जागा झाला... त्याला नुकतीच झालेली ती सहल आता पुन्हा आठवू लागली...
...त्यांची रायगडची सहल अगदी थरारक झाली होती. रघू पहिल्यांदाच रायगडला गेला होता. त्याला व त्याच्या ग्रुपला खरं तर पायऱ्या चढून गडावर जायचं होतं. मात्र, देशमुख सरांनी डोळे वटारल्यावर सगळी मुलं गप्पच बसली. अर्थात रोप-वेनं जाण्याचा थरारही मस्तच होता. विशेषत: अगदी शेवटी दहा-वीस मीटर अंतर राहिलं असताना ती छोटीशी ट्रॉली आता समोरच्या कातळाला धडकतेच की काय, असं वाटून रघूच्या छातीत धस्स झालं होतं. मात्र, एकदम एक झोका बसला आणि ती ट्रॉली एकदम झुमकन वरच्या डेकवर पोचली होती. सगळा गड हिंडून बघताना रघूला फारच भारी वाटलं होतं. त्याला चौथीत, म्हणजे आधीच्याच वर्षी इतिहासाला ‘शिवछत्रपती’ हेच पुस्तक होतं. त्या पुस्तकावरचं राजा रविवर्मांनी काढलेलं महाराजांचं चित्र रघू कितीदा तरी निरखून पाही. महाराजांकडं नुसतं बघितलं, की रघूला एकदम वेगळं असं, काही तरी ग्रेट वाटत असे. त्याच्या हडकुळ्या दंडात एकदम हत्तीचं बळ आलंय की काय, असं वाटे. हे असं आपल्यालाच होतं, की बाकी मित्रांनाही होतं हे त्याला कळत नव्हतं. एकदा धीर करून त्यानं त्याचा खास मित्र सदूला विचारलं होतं. सदूलाही तसंच होतं, हे कळल्यावर रघूला हुश्श झालं होतं. रायगडावर दिवस कसा गेला, ते कळलंच नव्हतं. महाराजांच्या सिंहासनावर बसलेल्या पुतळ्याकडं बघून रघूचा आख्खा वर्ग थक्क झाला होता. नंतर सर्वांनी ‘छत्रपती शिवाजीमहाराज की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’च्या घोषणांनी तो परिसर दणाणून सोडला होता. आजूबाजूला आलेले इतर पर्यटकही या पोरांकडं कौतुकानं बघत होते. पुढं होळीच्या माळावर, बाजारपेठेत, गंगासागर तलावावर, जगदीश्वर मंदिरात... सगळीकडं मुलांचा हा जयघोष कायम राहिला. सगळ्यांना आता टकमक टोक बघायची उत्सुकता लागली होती. बरीच मजल, दरमजल करत मुलं तिथं पोचली, तेव्हा त्या टोकावरून महाराष्ट्राच्या सह्याद्रीचं ते भव्य दर्शन बघून सगळ्यांचेच डोळे तृप्त झाले. किती फोटो काढावेत अन् किती नाही, असं मुलांना होऊन गेलं. रघूनं त्याच्या बाबांचा खास कॅमेरा आणला होता. त्यातून तो भराभर फोटो काढत होता. फोटो काढण्यात तो एवढा गुंगून गेला, की शेवटी त्याच्या मित्रानं - सदूनं त्याला ढोसून हलवलं आणि त्या तंद्रीतून जागं केलं. बाकीची मुलं जरा पुढं निघाली होती. देशमुख सरांनी लांबूनच हाक मारली. हे दोघं दिसताच तेही जरा निवांत झाले आणि पुढं चालू लागले.


‘आपण इथं हरवलो तर...’ सदू एकदम म्हणाला.
त्यावर रघू एक क्षण दचकला, पण नंतर त्याला हसू आलं. त्यानं सभोवती पाहिलं. दुपारचे अडीच-तीन वाजले होते. गडावर ऊन होतं, पण गार वारंही सुटलं होतं. त्यामुळं एकूण छान वाटत होतं. मुळात ही महाराजांची राजधानी, त्यामुळं इथं कसलं भय वाटतच नाहीय, असं त्याला एकदम लक्षात आलं. मगाशी सरांनी हिरकणीची कथाही सांगितली होती. ती कथा खरी आहे, की दंतकथा आहे हा वाद सोडून द्या; त्या गोष्टीतलं मर्म लक्षात घ्या, असंही सरांनी सांगितलं होतं.
‘सदू, एक तर सर दर तासाने सर्व मुलांचा काउंट घेतात. शिवाय आपल्याला घेतल्याशिवाय ते कसे परत जातील? शिवाय आपल्याकडं हे बटणाचे का होईना, मोबाइल आहेत, त्यामुळं आपण इथं हरवण्याची शक्यता मुळीच नाही. कळलं का?’ रघू सदूकडं पाहत हसत म्हणाला. त्यावर सदू जरासा खट्टूच झाल्यासारखा वाटला. जणू काही, इथं आपण हरवायला हवं, असंच त्याला वाटत होतं की काय, कोण जाणे!
रघू मात्र इतिहासात हरवला होता. राजांच्या काळातल्या एकेक गोष्टी त्याला आठवत होत्या. इतिहासाचं पुस्तक, पुण्यात नुकतीच पाहिलेली ‘शिवसृष्टी’, त्याच्या बाबांनी आणलेली इतर काही पुस्तकं, यूट्यूबवरची काही भाषणं असं सगळं ऐकून रघूला महाराजांच्या एकूण कार्यकर्तृत्वाविषयी प्रचंड कुतूहल निर्माण झालं होतं. त्या इतिहासातल्या सगळ्याच गोष्टी त्याला कळल्या होत्या, असं नव्हे. मात्र, इतिहास शिकवायला देशमुख सरांसारखे फार चांगले शिक्षक लाभल्यामुळं त्याला पुस्तकापलीकडल्या बऱ्याच गोष्टीही समजत होत्या. शिवरायांकडून घेण्यासारखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजांचं प्रसंगावधान, हे रघूच्या मनावर फार बिंबलं होतं. अनेक संकटांवर मात करण्याची ताकद महाराजांना त्यांच्या या प्रसंगावधानानं व अष्टौप्रहर जागृत असण्याच्या वृत्तीनंच दिली होती, यात शंका नाही असंच रघूला मनोमन वाटत होतं.
आता गड उतरायची वेळ झाली होती. रोप-वे संध्याकाळी विशिष्ट वेळी बंद होत असल्यानं सर सर्वांना लवकर निघायची घाई करत होते. गडावरून खाली उतरणारी शेवटची टीम रघूच्या शाळेची होती. रघूला उतरायची घाई नव्हती. त्याला गडावर जास्तीत जास्त काळ थांबायचं होतं. त्यामुळं तो व सदू रांगेत सर्वांत मागे थांबले. आठ-आठच्या तुकडीनं मुलं दोन्ही पाळण्यांत बसून खाली जात होती. देशमुख सरांना पुढील व्यवस्था करायची होती, म्हणून ते दुसऱ्या की तिसऱ्या बॅचबरोबरच खाली उतरले. शेवटच्या तुकडीत आणि शेवटच्या पाळण्यात फक्त रघू व सदू उरले. त्यामुळं त्यात त्या दोघांनाच बसवण्यात आलं. अगदी थोडं पुढं असलेल्या दुसऱ्या पाळण्यात शाळेतली इतर सात-आठ मुलं बसली होती. रोप-वेतून ते दोन्ही पाळणे आता हळूहळू खाली उतरू लागले. भन्नाट वारा वाहत होता. त्यामुळं ते पाळणे थोडेसे हलत होते. निम्म्या अंतरावर गेल्यावर ते पाळणे अचानक थांबले. थोडा वेळ मुलं तशीच स्वस्थ बसली. रोप-वे असा मधेच थांबणं नॉर्मल आहे का नाही, याची त्या मुलांना काही कल्पना नव्हती. रघू आजूबाजूला पाहत होता. मागे रायगडाचा भक्कम, बुलंद असा कठीण कडा आणि समोर लांबवर पसरलेले सह्याद्रीचे भव्यदिव्य डोंगर, लांबवर तळात दिसणारी रायगडवाडी आणि रोप-वेचं चिमुकलं बोर्डिंग स्टेशन आणि या सगळ्यांत मध्येच अंतराळात तरंगत असलेल्या त्या दोन ट्रॉल्या...
थोडा वेळ गेला... आणखी थोडा वेळ गेला... दोन्ही पाळणे तसेच हवेत स्थिर लटकत होते आणि त्यात ही नऊ-दहा लहान मुलं! आता मात्र सदूला थोडी भीती वाटू लागली. पाळणा हळूहळू खाली जाताना सभोवती पाहताना काही वाटत नव्हतं. मात्र, आता त्या एका जागी स्थिर थांबलेल्या पाळण्यातून खाली नजर जरी तरी गरगरून चक्कर येईल, असं वाटू लागलं. मुलांकडं त्यांच्या सॅक होत्या. मात्र, सगळा खाऊ गडावरच संपला होता. खाली उतरलं, की मुलांना थोड्या वेळात लगेच जेवायचंच होतं. रघूच्या सॅकमध्ये अगदी दोन बिस्किटं आणि थोडं पाणी उरलं होतं. रघूनं ते बघून घेतलं. ‘सदू, तुला पाणी हवंय का?’ रघूनं काळजीनं विचारलं. सदू पटकन ‘हो’ म्हणाला आणि त्यानं ते उरलंसुरलं पाणीही पिऊन टाकलं. आता त्यांच्याकडं पाणी नव्हतं. किती वेळ गेलाय हे कळत नव्हतं. मुलांकडं घड्याळं होती, बटणाचा मोबाइलही होता. मात्र, तो काढून बघण्याचं कुणाला सुचेल तर ना! आधी सुरू असलेला दंगा एकदम गप्प झाला होता. आता काही काही मुलांना रडू येण्याच्या बेतात होतं. रघूला भीती वाटत नव्हती, मात्र थोडी काळजी वाटू लागली होती. ‘आपण महाराजांच्या गडावर आहोत, आपल्याला काही होणार नाही,’ असं त्याला मनोमन वाटत होतं. मगाशी गडावर सांगितल्या गेलेल्या महाराजांच्या एकेक गोष्टी, त्यांचं प्रसंगावधान तो आठवू लागला. त्याला एकदम आठवलं, की आपल्याकडं मोबाइल आहे. त्यानं पटकन खिशातून मोबाइल काढला आणि तो देशमुख सरांना फोन करू लागला. पण... अरे देवा! तिथं मोबाइलला रेंजच नव्हती. खूप वेळ प्रयत्न करूनही फोन लागेना. शिवाय त्याची बॅटरीही संपत चालली होती. आता काय करावं? खालच्या ट्रॉलीत कुणाकडं मोबाइल आहे का, हे विचारावं म्हणून तो मागं वळला आणि त्यानं जरा ओरडून विचारलं, ‘ए राजा, दिन्या, पार्थ... कुणाकडं मोबाइल आहे का रे?’ मात्र, तिथं वारा एवढा जोरात वाहत होता, की खाली काहीच ऐकू जाईना. शिवाय रघू अचानक उठून मागं वळल्यानं त्यांची ट्रॉली एकदम हलली आणि जोरदार हलायला लागली. ते बघून सदूनं दोन्ही दांड्यांना हात घट्ट धरले आणि तो रडायलाच लागला. ते बघून रघूही थोडा घाबरला; पण क्षणभरच! नंतर लगेच सावरून त्यानं पुढचा विचार करायला सुरुवात केली. प्रसंगावधान, प्रसंगावधान... त्याच्या डोक्यात तेच शब्द घुमत होते. त्यानं सॅकमध्ये हात घातला. त्याच्या हातात एक टिश्यू पेपर लागला. त्याच्याकडं पेन होतंच. मग त्यानं त्या टिश्यू पेपरवर ‘तुमच्यापैकी कुणाकडे मोबाइल आहे का?’  असं लिहून तो कागद बोळा करून, खालच्या ट्रॉलीत फेकायचा प्रयत्न केला. पण वारा एवढा जोरात होता, की तो बोळा कुठल्या कुठं भिरकावला गेला. रघूला आता अगदी हताश वाटलं. खरं तर खालच्या ट्रॉलीतील मुलांनी स्वत: डोकं चालवून सरांना फोन लावला असेलच की... मग ती पोरं काहीच बोलत नाहीयेत... नुसतीच घाबरली आहेत... आता काय करावं... रघूच्या मनात विचारचक्र सुरू झालं. त्यानं सॅकमध्ये पुन्हा हात घातला. त्याला लहान चेंडूसारखं काही तरी लागलं. बघतो तर काय, बेसनाचा लाडू! त्याच्या आईनं डब्यात दिलेला. रघूला अतिशय आनंद झाला... त्यानं पुन्हा एक टिश्यू पेपर घेतला, त्यावर वरचा मेसेज पुन्हा लिहिला आणि त्यात लाडू ठेवून तो अगदी अलगद खालच्या ट्रॉलीत फेकला... सदैवानं वारा जरा पडला होता. त्यामुळं तो लाडू व ती चिठ्ठी अगदी नेमकी खालच्या ट्रॉलीत पडली. मुलांनी ती उचलून वाचली. त्यातल्या राजानं मोठमोठ्यानं हातवारे करून काही तरी सांगायला सुरुवात केली. मात्र, परत जोरात वाहायला लागलेल्या वाऱ्यामुळं काहीच ऐकू येईना. शेवटी हातवारे करून राजानं काही तरी सांगितलं. ते बघून रघूला एवढंच समजलं, की त्यांनी सरांना लगेचच फोन केला होता. पण सरांचं बोलणं यांना ऐकूच आलं नाही. मात्र, सरांना ही मुलं अडकून पडल्याचं अर्थातच माहिती होतं. आता हे ऐकून रघूला काय करावं ते सुचेना. त्यानं सरळ ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. सदूनं रडणं थांबवून त्याच्या आवाजात आवाज मिसळला. ती गर्जना मात्र खालच्या मुलांना ऐकू गेली आणि त्यांनीही तशाच घोषणा द्यायला सुरुवात केली. तिसऱ्या घोषणेनंतर ट्रॉली एकदम हलली. मुलं परत घाबरली... त्यांनी समोरचा दांडा घट्ट धरला. मात्र, काही सेकंदांतच त्यांना कळलं, की ट्रॉली खाली खाली जाऊ लागलीय... मुलांना एकदम आनंद झाला. त्यांनी आणखी मोठ्या आवाजात घोषणा द्यायला सुरुवात केली. अवघ्या पाच ते सात मिनिटांत मुलं खालच्या बोर्डिंग स्टेशनला पोचलीसुद्धा. खाली गेल्यावर समोरच उभ्या असलेल्या देशमुख सरांनी सर्व मुलांना जवळ घेतलं. सरही रडवेले झाले होते. सदूसह काही काही मुलं तर रडायलाच लागली होती. रघूला मात्र प्रश्न पडला होता, की ट्रॉली मध्येच का थांबली? त्यानं लगेच सरांकडं धाव घेऊन त्यांना तसं विचारलंही. त्यावर सर म्हणाले, की हा रोप-वे अतिशय सुरक्षित आहे. तो एरवी कधीही बंद पडत नाही किंवा कधी काही तांत्रिक अडचण आली, तर अगदी पाच मिनिटांत तो पुन्हा सुरू होतो. आताही तो पाच ते दहा मिनिटांत परत सुरू झाला...
रघूला हे ऐकून आश्चर्य वाटलं. म्हणजे? आपण केवळ दहा मिनिटं अडकून पडलो होतो? आणि तरीही आपल्याला ते असं मधेच हवेत लटकल्यावर किती काय काय वाटून गेलं! सगळ्यांना किती भीती वाटली!
आणि महाराज... त्यांच्या आयुष्यात तर एकाहून एक जीवावरची संकटं आली. मात्र, त्यांनी कधीही हार मानली नाही किंवा त्यांना कधीही कसली भीती वाटली नाही. प्रसंगावधान आणि कूटनीतीमुळं ते सर्व संकटांतून बाहेर पडले. मग ती आग्र्याहून सुटका असो किंवा पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटणं असो. हे आठवून रघूचं मन भरून आलं. त्यानं पुन्हा एकदा रायगडाच्या त्या भव्य विस्ताराकडं पाहिलं आणि मनोमन हात जोडले.
खालच्या ट्रॉलीतले मित्र भेटले आणि त्यांची थट्टामस्करी सुरू झाली. दिन्या एकदम म्हणाला, ‘रघू, थँक्यू रे... बेसनाचा लाडू फार छान होता...’ सगळे हसले. देशमुख सरही हसून म्हणाले, ‘अहो अंतराळवीर, चला... बस वाट बघतेय आणि तिकडं पुण्यातही आपलं घर आपली वाट बघतंय... चला...’
रघू आणि सदू बसमध्ये बसले. बस भन्नाट वेगात पुण्याकडं निघाली. खिडकीतून येणाऱ्या गार वाऱ्यामुळं रघूला झोप लागली. झोपेत त्याला पुन्हा स्वप्न पडलं. स्वप्नात तो ताडोबा अभयारण्यात पोचला होता... एका पाणवठ्यावर तो उभा होता. आजूबाजूला कोणीही नव्हतं. त्यानं सहज मागं पाहिलं तर दहा फूट अंतरावर झाडाच्या खोडाआडून एक भलामोठा वाघ - हा बहुतेक ‘छोटा मटका’ होता - त्याच्याकडंच रोखून बघत होता... आता? रघू काय करणार?
‘प्रसंगावधान, प्रसंगावधान...’ रघू किंचाळत ओरडत उठला. सदू त्याच्याकडं आश्चर्यानं बघत होता. ‘काय झालं रे?’ त्यानं काळजीनं विचारलं.
रघूनं आजूबाजूला पाहिलं. तो बसमध्येच होता. वाघबिघ कुणी नव्हतं. आता बाहेर अंधार पडला होता... रायगड किल्ला मागे पडला होता आणि रघू मनातल्या मनात हसत होता... म्हणत होता, ‘महाराज, तु्म्ही असेच सतत मनात राहायला येत जा...’

---

(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, पुणे दिवाळी अंक २०२५)

----

29 Jan 2026

मनशक्ती बालकुमार दिवाळी २५ - लेख

चौसष्ट घरांची ‘राणी’
------------------------


माणसाला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी विविध गुणांची आवश्यकता असते. त्या माणसाचे वैयक्तिक कष्ट, इप्सित ध्येय साध्य करण्याची तीव्र इच्छा, त्यासाठी संघर्ष करण्याची तयारी, ध्येयाकडे जाण्याचे योग्य नियोजन, कार्यसाधनेतील एकाग्रता या सर्व गोष्टींचे एकत्रित फळ म्हणून आपल्याला यश मिळते. आपल्याला यशस्वी होण्यासाठी जगातील अनेक यशस्वी लोकांच्या कथा प्रेरणा देत असतात. या लोकांचा यशाकडे झालेला प्रवास, त्या मार्गात आलेल्या अडथळ्यांवर त्यांनी कशी मात केली याचे अनुभव, यश मिळविण्यासाठी घेतलेली मेहनत या सर्व बाबी आपल्यालाही तसेच यश मिळविण्यासाठी प्रोत्साहित करत असतात. क्रीडा क्षेत्रात आपल्याला अशा अनेक यशोगाथा ऐकायला मिळतात. अगदी भारतापुरते बोलायचे झाले तर ‘हॉकीचे जादूगार’ मेजर ध्यानचंद यांच्यापासून ते महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यापर्यंत अनेक खेळाडूंची उदाहरणे देता येतील. क्रिकेटमध्येच सुनील गावसकर किंवा अगदी अलीकडच्या काळातील एम. एस. धोनी, विराट कोहली वा रोहित शर्मा, या सर्वांनी प्रचंड चिकाटीने, मेहनतीने त्यांच्या क्षेत्रात उत्तुंग यश मिळविल्याचे दिसते. बॅडमिंटनमध्ये प्रकाश पदुकोण यांच्यापासून साईना नेहवाल, पी. व्ही. सिंधूपर्यंत पुष्कळ अशीच उदाहरणे सांगता येतील. मैदानी स्पर्धांमध्येही मिल्खासिंग, पी. टी. उषा यांच्यापासून ते नीरज चोप्रापर्यंत अनेक खेळाडूंनी आपल्या खेळाद्वारे देशाची प्रतिष्ठा उंचावली आहे. या सर्व खेळाडूंच्या यशात एक गोष्ट समान दिसेल - ती म्हणजे त्यांची अविचल, अढळ कार्यसाधना!


या लेखात बुद्धिबळात सर्वोच्च यश मिळविणारी मराठमोळी मुलगी दिव्या देशमुख हिच्या कार्यसाधनेविषयी जाणून घेऊ या. बुद्धिबळ हा खेळ आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. या खेळाच्या नावाप्रमाणेच यात बुद्धीचा कस लागतो. या खेळाचा उगम प्राचीन भारतातच झाला असं म्हणतात. त्यामुळे आपला भारत देश हेच या अद्भुत खेळाचे जन्मस्थान आहे, असं मानायला हरकत नाही. पूर्वी त्याला ‘चतुरंग’ असं नाव होतं. साधारण सहाव्या शतकापर्यंत मागे या खेळाचा इतिहास सांगता येऊ शकतो. तत्कालीन हिंदुस्थानातील सैनिकांनी हा खेळ देशाबाहेर नेला. त्यानंतर पर्शिया (आताचा इराण) देशात तो ‘शतरंज’ या नावाने खेळला जाऊ लागला आणि तिथूनच त्याचा जगभर प्रसार झाला असं मानण्यात येतं.
आधुनिक काळातही बुद्धिबळ या खेळात भारत आता एक महाशक्ती म्हणून उदयास येत आहे. एके काळी सोविएत महासंघाचा या खेळात दबदबा होता. याशिवया युरोपीय देशांतील अनेक खेळाडूही नावलौकिक राखून होते. भारतात अलीकडच्या काळात विश्वनाथन आनंद या खेळाडूपासून आधुनिक भारतीय बुद्धिबळाच्या वर्चस्वाचे पर्व सुरू झाले, असे मानले जाते. विश्वनाथन आनंद हा भारताचा पहिला ग्रँडमास्टर. त्याने १९८८ मध्ये हा मान मिळवला. आधुनिक बुद्धिबळात ‘ग्रँडमास्टर’ हा सर्वांत मोठा किताब मानला जातो. त्यासाठी काही विशिष्ट ‘एलो’ गुणांचा टप्पा पार करावा लागतो. सहसा २६०० ते २८०० गुणांपर्यंत जाणारे मोजके खेळाडूच ‘ग्रँडमास्टर’ होऊ शकतात. आतापर्यंत फारच थोड्या खेळाडूंना हा टप्पा गाठता आला आहे. त्यापैकी विश्वनाथन आनंद उर्फ ‘विशी’ हा एक. विशीच्या या उत्तुंग यशामुळे भारतातील बुद्धिबळ खेळाडूंना मोठी प्रेरणा मिळाली. आनंद याच्यानंतर आतापर्यंत भारताचे केवळ ८८ खेळाडू ग्रँडमास्टर किताब मिळवू शकले आहेत, यावरून ‘ग्रँडमास्टर’ होणे किती कठीण असेल, याचा अंदाज येईल.
अगदी अलीकडे म्हणजे या वर्षी जुलै महिन्यात भारताची ८८ वी ग्रँडमास्टर होण्याचा मान नागपूरच्या दिव्या देशमुखने मिळवला. दिव्याची भव्य कामगिरी ही, की तिने महिलांची बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धा जिंकून थेट ‘ग्रँडमास्टर’ किताबाला गवसणी घातली. गेल्या २८ जुलैला तिने महिलांच्या या विश्वचषक स्पर्धेत भारताच्याच कोनेरू हम्पीचा टायब्रेकरमध्ये पराभव केला आणि विश्वविजेतेपदावर स्वत:चे नाव कोरले. (त्यानंतर ऑगस्टमध्ये भारताचा रोहित कृष्णा ८९वा ‘ग्रँडमास्टर’ झाला आहे.) दिव्याच्या आधी कोनेरू हम्पी, आर. वैशाली व हरिका द्रोणावली या केवळ तीन भारतीय महिलांनाच ग्रँडमास्टर किताब मिळविता आला आहे, यावरूनही दिव्याच्या कामगिरीचे मोठेपण लक्षात येईल.
दिव्या अवघी १९ वर्षांची आहे. तिचा जन्म नऊ डिसेंबर २००५ रोजी नागपुरात एका मराठी कुटुंबात झाला. तिचे वडील जितेंद्र व आई नम्रता हे दोघेही डॉक्टर आहेत. नागपुरातील भवन्स भगवानदास पुरोहित विद्यामंदिरात तिचं शालेय शिक्षण झालं. दिव्या अगदी लहान वयापासून, म्हणजे पाचव्या वर्षापासून बुद्धिबळ खेळते आहे. तिची आई डॉ. नम्रता यांनी सांगितल्याप्रमाणे, तिला आधी बुद्धिबळात रस नव्हता. तिची मोठी बहीण बॅडमिंटन खेळायला जायची, म्हणून दिव्याही बॅडमिंटन खेळायला जायचा हट्ट करायची. मात्र, लहानग्या दिव्याला बॅडमिंटनची रॅकेट पेलवत नसे. त्यामुळं तिला शेजारीच असलेल्या बुद्धिबळ अॅकॅडमीत घालण्यात आलं. मात्र, तिला तिथं बुद्धिबळाची गोडी लागली आणि लवकरच ती या खेळात अगदी पारंगत झाली. बुद्धिबळ हा अतिशय एकाग्र होऊन, लक्ष केंद्रित करून खेळायचा खेळ आहे. अगदी लहान असल्यानं दिव्याला तसं एकाग्र होऊन खेळणं स्वाभाविकच जमायचं नाही. मात्र, तिच्या पालकांनी तिला खूप प्रोत्साहन दिलं. न कंटाळता, न थकता, ते तिच्याकडून सराव करून घ्यायचे. त्यामुळं दिव्या खूप लवकर बुद्धिबळ खेळात तयार झाली. तिला अवघ्या आठव्या वर्षी, म्हणजे २०१३ मध्ये ‘फिडे’कडून (बुद्धिबळ खेळाची आंतरराष्ट्रीय संघटना) मास्टर पदवी मिळाली. मग २०१८ मध्ये ती महिला आंतरराष्ट्रीय मास्टर झाली. त्यानंतर ती भारताकडून अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागली. सन २०२० मध्ये फिडे ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक मिळविणाऱ्या भारतीय संघात ती होती. नंतर २०२२ मध्ये तिने राष्ट्रीय महिला बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावलं. यानंतर दिव्यानं मागं वळून बघितलं नाही. तिच्या या खेळातली घोडदौड जोरात सुरू झाली. तिने २०२३ मध्ये आशियाई महिला बुद्धिबळ स्पर्धा जिंकली. त्यानंतर भारतातील महिलांच्या जलद बुद्धिबळ स्पर्धेतही तिने बाजी मारली. या स्पर्धेत तर तिला सर्वांत कमी मानांकन होते. तरीही तिने हरिका द्रोणावली, वंतिका अगरवाल, कोनेरू हम्पी, सविता श्री बी., इरिना क्रुश अशा नामवंत खेळाडूंचा पराभव केला होता. जून २०२४ मध्ये ती वीस वर्षांखालील गटातील वर्ल्ड चॅम्पियन झाली. सौम्या स्वामीनाथन, हरिका द्रोणावली व कोनेरू हम्पी यांच्यानंतर अशी कामगिरी करणारी ती चौथी भारतीय महिला ठरली. अंतिम फेरीत तिनं बल्गेरियाच्या तृतीय मानांकित बेलोस्वावा क्रस्टेव्हा हिला पाच तासांहून अधिक चाललेल्या मॅरेथॉन लढतीत पराभूत केलं होतं. यानंतर ४५ व्या चेस ऑलिम्पियाडमध्ये भारताला सांघिक सुवर्णपदक मिळवून देताना तिनं चमकदार विजय मिळवला होता. याच स्पर्धेत तिनं वैयक्तिक सुवर्णपदकाचीही कमाई केली होती.
यंदा जॉर्जिया देशात बाटुमी या शहरात झालेल्या जागतिक विजेतेपद स्पर्धेत दिव्याला १५ वे मानांकन देण्यात आले होते. तिने चौथ्या फेरीत द्वितीय मानांकित झू जिनेर हिचा पराभव केला. उपउपांत्य फेरीत तिने भारताच्याच हरिका द्रोणावलीला हरवलं. उपांत्य लढतीत तिने चीनच्या तान झोंगयी हिच्यावर मात केली आणि अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. अंतिम फेरीत वर उल्लेख आला आहे त्याप्रमाणे भारताच्याच कोनेरू हम्पीला हरवून ती विश्वविजेती ठरली. एवढ्या लहान वयात कुशाग्र बुद्धीच्या दिव्याने बुद्धिबळ या खेळात मोठी चमक दाखवली आहे.
दिव्याच्या या यशामध्ये तिच्या जिद्दीचा, कार्यसाधनेचा अर्थातच मोठा वाटा आहे. एखादा माणूस यशस्वी झाला, असं आपण केव्हा म्हणतो? एखाद्या क्षेत्रात सर्वोच्च स्थान, पुरस्कार वा किताब मिळणं ही या यशाची एक पोचपावती असते. त्या स्थानापर्यंत जाण्यासाठी अनेक अडथळे असतात. कष्ट असतात. कुठलंही यश सहजासहजी मिळतच नाही. दिव्यानेही बुद्धिबळासारख्या सर्वोच्च बुद्धिमत्तेची आवश्यकता असलेल्या खेळात अशाच कष्टाने, साधनेने यश मिळविले आहे. त्यामागे तिच्या पालकांची मेहनत तर आहेच; पण स्वत: दिव्यानेही विलक्षण जिद्दीने आणि कठोर मेहनतीने हे यश प्राप्त केले आहे, यात शंका नाही. दिव्याने बुद्धिबळात लक्ष केंद्रित करायचे ठरवल्यावर तिच्या नियमित अभ्यासाकडेही दुर्लक्ष केले नाही. मुळातच ती एक हुशार विद्यार्थिनी असल्याने दहावी व बारावी या बोर्ड परीक्षाही ती चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली आहे. अनेकदा तर स्पर्धेच्या काळात, दोन सामन्यांच्या दरम्यान तिने शाळेचा अभ्यास केला आहे. वास्तविक त्या सामन्याचेही एक निराळे दडपण तिच्यावर असणारच. मात्र, तिने बुद्धिबळ व शाळेचा अभ्यास या दोन्हींकडे नीट लक्ष दिले व दोन्हींवर अन्याय होऊ दिला नाही. सध्या मात्र ती विविध स्पर्धांमध्ये एवढी व्यग्र आहे, की पुढचे शिक्षण दूरस्थ पद्धतीने घेण्याचा निर्णय तिने घेतला आहे.

कुठल्याही खेळात खेळाडूंच्या शारीरिक व मानसिक सक्षमतेची कसोटी लागते. बुद्धिब‌ळासारख्या खेळात तर खेळाडूंच्या मानसिक सक्षमतेची जणू परीक्षाच पाहिली जाते. मानसिक कणखरणा नसेल तर कुणीही खेळाडू बुद्धिबळात टिकूच शकणार नाही. त्यातही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळायचे असेल, तर अत्यंत उच्च दर्जाची मानसिक तयारी करावी लागते. याशिवाय नियमित सरावही महत्त्वाचा असतो. समोरचा प्रतिस्पर्धी कोण आहे, कसा आहे, त्याचं आधीचं रेकॉर्ड कसं आहे हे सर्व बघावं लागतं. अतिशय आधुनिक अशा संगणकांवर बुद्धिबळाचे अनेक डाव तयार केले जातात. आतापर्यंत विविध स्पर्धांत खेळले गेलेले डावही संगणकावर अभ्यासता येतात. किंबहुना, संगणकही बुद्धिबळ ‘खेळतो’, हे आता सर्वज्ञात आहे. संगणकाबरोबर बुद्धिबळ खेळून त्याला हरवून दाखवणं ही फारच उच्च कोटीची कामगिरी मानली जाते. याचे कारण जगातील सर्वोत्तम खेळाडूंच्या उत्तमोत्तम डावांचा, चालींचा, डावपेचांचा अभ्यास करून संगणकाच्या खेळाचा ‘प्रोग्राम’ तयार केला जातो. संगणकाच्या सर्व चाली अशा गणिती पद्धतीने व अचूक तयार केलेल्या असल्याने, त्या ओळखून, त्याला कोड्यात पाडता येईल अशा प्रतिचाली रचणे, तसा विचार करू शकणे हे अत्यंत अव्वल बुद्धिमत्ता असलेले खेळाडूच करू शकतात. दिव्या ही अशा प्रकारची खेळाडू आहे. बऱ्याच खेळाडूंना जन्मत:च काही विशिष्ट कौशल्यांची (उदा. वेगात आकडेमोड करता येणे) देणगी असते. बुद्धिबळ खेळू शकणाऱ्या खेळाडूंचा मेंदूही अशा काही विशिष्ट, दैवदत्त कौशल्यांनी युक्त असतो. त्याचा त्यांना खेळताना फायदा होत असला, तरी अनेकदा समोरचे खेळाडूही तसेच व तितकेच तयारीचे असल्याने, वैयक्तिक कठोर मेहनत व प्रचंड पूर्वतयारी यांना पर्यायच नसतो. दिव्याचे भव्य यश म्हणजे अशाच अत्यंत कठीण व्रताचे फळ आहे, असेच म्हणावे लागेल.
दिव्याची ही कहाणी वाचल्यावर असं वाटतं, की आपण कुणीही आपल्या आयुष्यात दिव्यासारखं भव्य यश मिळवू शकतो. मात्र, त्यासाठी कुठल्या तरी एका क्षेत्राची अतिशय मनापासून आवड असायला हवी आणि त्या क्षेत्रातील सर्वोत्तम स्थान मिळविण्यासाठी अफाट मेहनत करायची तयारीही हवी. कार्यमग्नतेचा ध्यास आणि कार्यसाधनेची आस घेऊन आयुष्यात पुढं जाण्याची जिद्द हवी. अशा जिद्दीने कष्ट केल्यास यश आपल्या पायाशी नक्की लोळण घेईल, यात अजिबात शंका नाही.

---

(पूर्वप्रसिद्धी : मनशक्ती बालकुमार दिवाळी अंक, २०२५)

---

27 Jan 2026

समदा दिवाळी अंक २५ - लेख

स्वप्नांचं ‘टेकऑफ’...
-------------------------

आपल्या आयुष्यात स्वप्न हा प्रकारच नसता तर आयुष्य भलतंच नीरस झालं असतं. आपण स्वप्न पाहू शकतो, म्हणून आजचा दिवस काढू शकतो. एखादं स्वप्न पाहणं, कुठलं तरी उद्दिष्ट ठेवणं, जिद्दीनं ते पूर्ण करणं हा सगळा प्रवास म्हणजेच खरं तर आपलं आयुष्य असतं, असंही म्हणायला हरकत नाही.
आता इथं स्वप्न याचे दोन अर्थ संभवतात. एक आपल्याला झोपेत पडतं ते आणि दुसरं म्हणजे आपण एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतो, ती पूर्ण व्हावी म्हणून धडपडतो ते... पण या दोन्हींचा एकमेकींशी अन्योन्य संबंध आहे. कसा? आपण झोपेत पडणारं स्वप्न पाहायला कधीपासून सुरुवात करतो बरं? आपण अगदी तान्हं बाळ असतानाही आपल्याला तसं स्वप्न पडत असणार. आता ते काही आपल्याला आठवणार नाही; पण अनेक लहान बाळं झोपेतल्या झोपेत खुदकन हसताना दिसतात, तेव्हा ती काय बघत असतील? कसला विचार करत असतील? काय दिसत असेल त्यांना? माहिती नाही. पण खूप लहानपणापासून आपण स्वप्नं पाहतो, हे नक्की. स्वप्न म्हणजे अबोध मनाच्या राज्यातला प्रदेश. आपल्या अबोध मनात जे काही विचार चालू असतात किंवा जे काही आपल्याला वाटत असतं, तेच स्वप्नांच्या रूपात दिसतं म्हणे. आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचं आहे किंवा एखादं पद हवं आहे किंवा बढती हवी आहे किंवा बंगला-गाडी-घोडा असं जे जे काही भौतिक हवं आहे ते ते आपल्याला स्वप्नात कधी ना कधी तरी दिसतं. त्यामुळंच आपल्या भाषेत स्वप्न याचा एक अर्थ मनातील इच्छा, आकांक्षा किंवा नुसतीच आशा असा आहे.
त्यामुळं अशा स्वप्नांविषयी बोलायचं तर ते काही अशा एखाद्या लेखात मावायचं नाही. अशी किती तरी स्वप्नं पाहिली! स्वप्नं पाहण्यावर अजून तरी कुणाची बंदी नाही. त्यामुळं हवी तेवढी स्वप्नं पाहावीत. ती पूर्ण होतील किंवा न होतील; किंबहुना बरीचशी तर नाहीच होणार. मग काय करायचं? काही नाही; स्वप्नं पाहत राहायचं. एक ना एक एखादं तरी स्वप्न पूर्ण होतंच, असा माझा अनुभव आहे.
यातल्या काही महत्त्वाच्या स्वप्नांचे, स्वप्नपूर्तीचे अनुभव सांगायलाच हवेत. यातलं पहिलं सर्वांत महत्त्वाचं माझं स्वप्नहोतं ते ड्रायव्हर व्हायचं! हो, ड्रायव्हर... तोही एसटीचा ड्रायव्हर! (बहुतेक मुलग्यांचं हे स्वप्न असतंच!) त्या वेळी सार्वजनिक प्रवासी वाहनांतूनच बहुसंख्य मध्यमवर्गीय लोक प्रवास करायचे. त्यामुळं एसटीचा प्रवास नित्याचाच. अनेक लहान मुलांना ड्रायव्हरच्या मागची सीट हवी असे. त्यात मीही आलो. ड्रायव्हरच्या मागची आडवी सहा जणांची सीट ड्रायव्हरकडं पाठ करून असे. तिथं बसणाऱ्यांना स्वाभाविकच पुढचं काही दिसायचं नाही. त्यामुळं अनेक मुलं या सीटवर उलट तोंड करून, ड्रायव्हरच्या मागची जाळी धरून समोरच्या काचेतून पुढला रस्ता पाहत असत. मीही तसंच करत असे. अधूनमधून ड्रायव्हरचंही निरीक्षण करणं सुरू असे. एवढी मोठी गाडी चालवणारा, घाटात ते स्टिअरिंग गरगर फिरवणारा, मनात येईल तेव्हा तो हॉर्न वाजवणारा ड्रायव्हर म्हणजे त्या सहा चाकांवरच्या फिरत्या देखाव्याचा अनभिषिक्त राजाच असे. पूर्वी दिवाळी किंवा सुट्टीच्या काळात एसट्यांना प्रचंड गर्दी असे. आरक्षण करून प्रवास करणं वगैरे गोष्टी गावाकडच्या लोकांच्या अंगवळणी पडल्या नव्हत्या. एसटी आली की घुसायचं आणि मिळेल त्या मार्गाने (अगदी ‘संकटकालीन खिडकी’तूनही) सीट पटकवायची हेच एकमेव ध्येय असायचं. अशा वेळी संपूर्ण गाडीत ज्या दोनच सीट्सना कुणी हात लावायचं नाही त्या म्हणजे ड्रायव्हर व कंडक्टरच्या सीट्स. त्यातही एखादा कनवाळू कंडक्टर असेल तर तो सगळ्या गाडीची तिकिटं फाडून होईपर्यंत आपल्या जागेवर एखाद्या वृद्ध व्यक्तीला बसायला देतही असे. पण ड्रायव्हरच्या सीटवर कोण बसणार? त्यामुळं सगळी गाडी खचाखच भरली, अगदी पुढच्या बॉनेटवर व शेजारच्या लाकडी पेटीवरही प्रवासी बसले, की ऐटीत येऊन स्टिअरिंगसमोरच्या सीटवर बसणारा, गळ्यातला गमछा सारखा करून घाम पुसणारा, कुणाचा तरी डबा शेजारी ठेवून घेणारा, ओळखीच्या एखाद्या पोराला उजव्या हाताला दारात अगदी कोंबून बसवणारा आणि निघण्यापूर्वी त्या खिडकीतून बाहेर पचकन पानाचा तोबरा थुंकणारा तो अफाट चक्रधर केवळ हेव्याचा विषय असे. त्या संपूर्ण गाडीवर सत्ता गाजवणारा तो सत्ताधीश वाटे. ड्रायव्हिंग सीटचा आणि सत्तेचा असा जवळचा संबंध आहे. ‘ड्रायव्हिंग सीटवर असणे’ वगैरे वाक्प्रचार त्यातूनच रूढ झाले असावेत.
एकदा तुम्हाला ड्रायव्हरची ही महती कळली, की मग ड्रायव्हर होणं हे मुख्य स्वप्न राहतं. कुठलं वाहन ते दुय्यम ठरतं. त्यामुळंच मग भविष्यात ट्रक, टॅक्सी, रेल्वे, आगबोट किंवा विमान (अगदी स्पेस शटलही) यापैकी कुठलंही वाहन चालवणाऱ्या ‘ड्रायव्हर’विषयी असूया, हेवा, त्याच वेळी आत्मीयता, जिव्हाळा अशा सगळ्याच भावना दाटून यायला लागल्या. पु. ल. देशपांडेंनी त्यांना ‘रेल्वे इंजिनचा ड्रायव्हर’ व्हायचं होतं, यावर एक लेख लिहिला आहे. माझ्या आयुष्यात रेल्वे तेवढी आली नाही. मात्र, विमानाच्या ‘ड्रायव्हर’विषयी, अर्थात वैमानिकाविषयी पुढं पुष्कळ आकर्षण निर्माण झालं. हे ‘सीरियस अफेअर’ होतं. अगदी आजही, मला मी वैमानिक व्हायला हवं होतं, असंच वाटतं. बाकी कुठल्याही क्षेत्रापेक्षा या क्षेत्रानं मला फार वेगानं आपल्याकडं खेचून घेतलं. आयुष्यात पहिला खराखुरा विमानप्रवास घडायला वयाची ३१ वर्षं उलटून जावी लागली. पुढं तो अगदी सातत्यानं नाही, तरी बऱ्यापैकी घडला. अगदी परदेश प्रवासही झाले. मात्र, पहिल्या विमान प्रवासाच्या वेळी टिकलेलं वैमानिक या जमातीविषयीचं आकर्षण किंवा प्रेम आजही कायम आहे. इथं एक गोष्ट सांगायला पाहिजे. मला उंचीची कधी भीती वाटली नाही. त्यामुळंच पहिल्यांदा विमान प्रवास करताना खरोखर कुठलीही भीती वाटली नाही; उलट ती उंचावरून दिसणारी दृश्यं छान एंजॉय केली. याउलट मला समुद्राची भीती वाटते. किंवा एकूणच पाण्याची! (पोहता येत नसल्यामुळं असेल...) पण पंचमहाभूतांपैकी एकाची तरी अशी भीती वाटतेच. तर, मुद्दा असा, की उंचीची भीती वाटत नसल्याने विमान चालवता यावं किंवा उंच आकाशात भराऱ्या माराव्यात, या स्वप्नाला बळच मिळत गेलं.
आजकालच्या मुलांमध्ये अनेक गोष्टी अत्यंत स्पष्ट असतात. आपल्याला पुढं काय व्हायचंय वगैरे हा त्यांचा फोकस अगदी लहान वयातच विकसित झालेला असतो. मी ज्या काळातून, शिक्षण व्यवस्थेतून आणि ग्रामीण भागातून आलो, तिथं दुर्दैवानं अशी स्वप्नं पाहण्याची मुभाच नव्हती. ‘हे आपल्यासाठी नाही,’ हे मनात अगदी आपोआप ठसून जात असे. त्यामुळं लहानपणापासून हे स्वप्न पाहण्याचा, त्याचा पाठपुरावा करण्याचा किंवा ते पूर्ण व्हावं म्हणून धडपड करण्याचा प्रश्नच आला नाही. अर्थात या सबबी नाहीत. तशी संधी मिळाली असती तरी केलं असतं का, हा प्रश्न आहेच. मात्र, आज अगदी तीव्रतेनं वाटतं, की आता सध्या मी ज्या पत्रकारितेच्या पेशात आहे (आणि तो मला आवडतो) त्यात नसतो, तर नक्कीच वैमानिक व्हायला आवडलं असतं. आता हे स्वप्न पूर्ण होणं अशक्यच. मग ते स्वप्न हीच आवड किंवा छंद म्हणून जोपासणं हा दुसरा पर्याय. मी आता तेच करतो. मी यूट्यूबवर किंवा इतर कुठल्याही समाजमाध्यमावर विमानांचे, वैमानिकांचे, विमानतळांचे व्हिडिओ पाहतो. सुदैवानं वैमानिकांच्या आयुष्यात घडणारी प्रत्येक रोचक घटना कुणी ना कुणी तरी चित्रित करून ठेवली आहे. वैमानिकांचे अनेक ग्रुप आहेत. अनेक पेजेस आहेत. तिथं या संदर्भातील माहिती सातत्याने लिहिली जाते. जगातल्या विविध विमानतळांवर टेकऑफ आणि लँडिंगचे अक्षरश: हजारो व्हिडिओ आज आंतरजालात उपलब्ध आहेत. कितीही वेळा हे व्हिडिओ पाहिले तरी मन भरत नाही. जगभरात आज विमानतळांची संख्या मोठी आहे आणि ती दिवसेंदिवस वाढते आहे. आता केवळ अमेरिका, युरोप या खंडांतच नव्हे, तर विकसनशील देशांतही विमानतळांची उभारणी होत आहे. जगभरातील महानगरांत तर एकाहून अधिक विमानतळ आहेत. ही बलाढ्य विमानतळं म्हणजे एक स्वतंत्र विश्वच आहे. विमानाचे उड्डाण आणि लँडिंग ही मोठी गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया अतिशय काटेकोरपणे, बिनचूक पार पाडावी लागते. त्यासाठी मोठी यंत्रणा काम करत असते. विमानतळावरचं लॉजिस्टिक्स आणि त्याचं व्यवस्थापन हाही एक अवाढव्य प्रकार असतो. एअर ट्रॅफिक कंट्रोल, ग्राउंड स्टाफ आणि प्रत्यक्ष विमानातील वैमानिक या तिघांच्या समन्वयातून एक उड्डाण यशस्वी होते. अशी अक्षरश: हजारो उड्डाणं दररोज होत असतात. यात अगदी सेकंदासेकंदाच्या हिशेबाने कामं चाललेली असतात. एक बारीकशी चूक अनेक प्रवाशांच्या जिवाशी खेळ ठरू शकते. (नुकत्याच अहमदाबादमध्ये झालेल्या ‘एअर इंडिया’च्या विमानाच्या दुर्दैवी अपघाताची आठवण या संदर्भात आल्याशिवाय राहत नाही.) एखादी गोष्ट जेवढी अधिक गुंतागुंतीची, तेवढी ती पार पाडण्यासाठी अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेच्या माणसांची गरज लागते. अशा अनेक लोकांचा समूह एकत्र येऊन आपल्या बुद्धिसामर्थ्यावर व इतर विकसित कौशल्याच्या आधारावर विमानोड्डाणासारखं काम यशस्वी करून दाखवतो, तेव्हा मला त्या गोष्टीचं तीव्र आकर्षण वाटत राहतं.

विमानाचं उड्डाण ही मला आजही एक अद्भुत गोष्ट वाटते. आपणही पक्ष्यासारखं आकाशात तरंगत राहावं, हे माणसाचं कधीपासून स्वप्न होतं कोण जाणे. अमेरिकेच्या राइट बंधूंनी अखेर ते पूर्ण केलं, तो अगदी ताजा इतिहास. जेमतेम सव्वाशे-दीडशे वर्षांचा. मानवजातीच्या अस्तित्वाच्या कालखंडाशी तुलना केली तर ही प्रगती जेमतेम काही सेकंदांपूर्वी झालीय, असंच म्हणावं लागेल. प्रत्येक वेळी विमान आकाशाच्या अथांग पोकळीकडं झेप घेतं, तेव्हा माणसाच्या विजिगीषु वृत्तीला, त्याच्या प्रज्ञेला, त्याच्या जिद्दीला व अनंत ध्येयासक्तीला सलाम करावासा वाटतो. अगदी लहानपणी कधी आकाशातून उडणारं विमान पाहिलं, किंवा विमानाचा नुसता आवाज आला, तरी मी ते बघायला धावायचो. अगदी आजही, अनेकदा विमान प्रवास झाले असले तरीही, विमानाचा आवाज ऐकला की नजर आकाशाकडं जातेच. सुदैवानं पुण्यात मी जिथं राहतो, तिथून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची (एनडीए) धावपट्टी अगदी जवळ आहे. एनडीएचं एक छोटं, दोन सीटर विमान जवळपास रोज सॉर्टीसाठी उड्डाण करतं. तेव्हा ते अगदी कमी उंचीवरून आमच्या घरावरून उडत जातं. ते मी न चुकता पाहतो. ते एवढ्या खालून जातं, की अनेकदा त्याच्या पंखांवर रोमन लिपीतून लिहिलेली NDA ही आद्याक्षरंही वाचता येतात. याच एनडीएच्या प्रांगणात वर्षातून दोन वेळा दीक्षान्त समारंभ होतात, तेव्हा सूर्यकिरण नामक पथकातील खास विमानांची प्रात्यक्षिकं होतात. ती बघताना डोळ्यांचं पारणं फिटतं. वैमानिकाच्या कॉकपिटमध्ये एकदा तरी बसून बघण्याचं माझं स्वप्न आहे. ते मात्र अद्याप पूर्ण झालेलं नाही. त्यामुळंच तर मी कित्येकदा वैमानिकांच्या कॉकपिटमध्ये लावलेल्या कॅमेऱ्यांतून चित्रित झालेले कित्येक टेकऑफ आणि लँडिंग पाहत असतो. अनेकदा पुष्कळ प्रवासीही विमानाच्या खिडकीतून दिसणारी कित्येक सुंदर दृश्यं टिपतात. तशी दृश्यं तुम्हाला एरवी स्वप्नातही बघायला मिळणं कठीण. उत्तर ध्रुवाच्या प्रदेशावरून विमान जात असतानाचं दृश्य, हिमालयाच्या शुभ्र पर्वतरांगांवरून जाताना दिसणारं दृश्य, एका विमानातून शेजारून चाललेल्या दुसऱ्या विमानाचं दृश्य, विमानाच्या खिडकीतून दिसणारे अथांग महासागर, ढगांचे कधी गोजिरवाणे, तर कधी भयावह दिसणारे अवाढव्य आकार, सूर्योदय, सूर्यास्त, वाळवंट, मोठमोठ्या नद्या... अक्षरश: डोळ्यांचे पारणे फिडणारी अशी कित्येक दृश्यं अशा व्हिडिओंतून आपल्याला बघायला मिळतात. मला ते व्हिडिओ बघण्याचा अजिबात कंटाळा येत नाही. एकदा आपण तसे व्हिडिओ बघायला लागलो, की संबंधित समाजमाध्यमाद्वारे त्याच प्रकारचे आणखी व्हिडिओ आपल्यासमोर आणले जातात. त्यातून आणखी वेगळे व्हिडिओ, वेगळी दृश्यं, कित्येक चित्तथरारक दृश्यचौकटी बघायला मिळतात.
वैमानिक होण्याचं स्वप्न पूर्ण झालं नसलं तरी विमान प्रवासाचं स्वप्न मात्र पूर्ण झालं. मी माझ्या आयुष्यात पहिला विमान प्रवास केला तो वयाच्या ३१ व्या वर्षी. मुंबई ते बेंगळुरू असा तो प्रवास होता. विमानानं टेकऑफसाठी रनवेवर धावायला सुरुवात केली तेव्हा पोटात थोडा खड्डा पडल्यासारखं झालं. पण ते काही क्षणच. शरीराला एवढ्या प्रचंड वेगाची सवयच नव्हती. मात्र, पुढं मला काहीच त्रास झाला नाही व तो प्रवास अगदी एंजॉय केला. आभाळातून धरती कशी दिसते, ढगांचे पुंजके कसे विहरतात, लँडिंगच्या वेळी अगदी लहान लहान दिसणाऱ्या इमारती, घरं, शेतं हळूहळू मूळ रूपात कशी दिसू लागतात हे सगळं मी लहान मुलाच्या डोळ्यांनी अनुभवलं. लवकरच परदेश प्रवास करायचाही योग आला. आमच्या ऑफिसतर्फे थायलंड एका बिझनेस टूरवर जायला मिळालं. तो प्रवासही मोठा होता. समुद्रावरून होता. तो एक वेगळाच अनुभव होता. शिवाय एकट्याने केलेलाही तो पहिलाच परदेश प्रवास होता. आपण कधी विमानात बसू, परदेशात जाऊ असं मला लहानपणी कधीही वाटलं नव्हतं. मात्र, सुदैवानं आपल्या देशात अनेकांची ही (आता छोटी छोटी म्हणता येतील, अशी) स्वप्नं जशी पूर्ण झाली, तशी ती माझीही झाली. त्यानंतर एकदा सिंगापूरची सहल झाली. त्या वेळी ‘बोइंग ए ३८०’ या महाकाय, डबलडेकर जंबोजेटमध्ये बसण्याचंही स्वप्न पूर्ण झालं. मात्र माझं खरं स्वप्न होतं ते लंडनला जाण्याचं. पुलंचं ‘अपूर्वाई’ वाचल्यापासून मला लंडन शहराला भेट देण्याची ओढ लागली होती. अमेरिका किंवा इतर कुठल्याही देशापेक्षा मला लंडनला जावंसं वाटत होतं. का ते माहिती नाही. मात्र, हे स्वप्न पूर्ण होण्याची कुठलीही शक्यता दिसत नव्हती. अखेर काही वर्षांपूर्वी तशी संधी मिळाली व मी कुटुंबासह फक्त लंडन व पॅरिस या दोनच शहरांना भेट देणारी छोटेखानी (पण तरीही बरीच खर्चीक) सहल बुक केली. मात्र, हाय रे दुर्दैवा! त्या वेळी कोव्हिडची साथ सुरू झाल्याने ती ट्रिपच बारगळली. लंडनचं स्वप्न अधुरंच राहिलं. मात्र, माझी इच्छाशक्ती तीव्र होती. त्यामुळं अखेर २०२३ च्या ऑगस्टमध्ये लंडनवारी करता आली. प्रवासी कंपनीकडून टूर न घेता, आम्ही आमची आमची ही सहल केली. लंडनमध्ये माझा मेव्हणा राहत असल्यानं तिथं राहण्याचा प्रश्न नव्हता. उलट या आठ दिवसांत मनाजोगतं शहर भटकता आलं. खूप वर्षांपासूनचं एक स्वप्न पूर्ण झालं.
जगातील किमान दहा मोठी शहरं बघायची असंही एक स्वप्न आहे. त्यातली निदान दोन ते तीन बघून झाली आहेत. इतरही होतील, अशी आशा आहे. याशिवाय इतर लहान-मोठ्या स्वप्नांचीही ‘बकेट लिस्ट’ बरीच मोठी आहे. सगळीच स्वप्नं पूर्ण होत नाहीत हे माहिती आहे. मात्र, पूर्ण होणार नाहीत म्हणून ती स्वप्नात बघण्याचं सुख का गमवायचं, नाही का?

---

(पूर्वप्रसिद्धी : समदा दिवाळी अंक, २०२५. संपादक - मनस्विनी प्रभुणे-नायक)

---