29 Nov 2021

अक्षरदान दिवाळी अंक २०२१ - लेख

लेखणी मेकअप करते तेव्हा...
-----------------------------------

चित्रपटकला आणि लेखक किंवा साहित्यिक यांचा संबंध या कलेच्या सुरुवातीपासूनच आहे. चित्रपटकला ही विसाव्या शतकाची देणगी. आधुनिक विज्ञान, तंत्रज्ञानाच्या आविष्कारामुळे ही कला जन्माला आली. लेखन किंवा सर्जनाची प्रक्रिया मात्र त्यापूर्वी किती तरी वर्षांपासून चालत आलेली आहे. तेव्हा चित्रपटात काम करणारे साहित्यिक किंवा लेखक यांचा संबंध किती घनिष्ठ असेल, याची कल्पना आपण करू शकतो. लेखकांनी कथा लिहायची, दिग्दर्शकांनी चांगल्या अभिनेत्यांना घेऊन सिनेमा तयार करायचा अशी सर्वसाधारण पद्धत. अभिनय करता येणे ही अगदीच वेगळी कला आहे. त्यासाठी वेगळी प्रतिभा लागते. तीच गोष्ट लेखनकलेची. मात्र, या दोन्ही कला प्रसन्न असलेले काही थोर कलावंत आपल्याकडे होऊन गेले. त्यामुळे त्यांनी सिनेमा लिहिला पण आणि त्यात काम पण केले. याशिवाय पाहुणे कलाकार म्हणून झळकणारे लेखक, साहित्यिक तर आहेतच.

मराठीत सर्वांत प्रथम नाव आठवतं ते पु. ल. देशपांडे यांचं. पु. ल. अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे प्रतिभावान कलाकार होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला चित्रपट क्षेत्रात आपलं नशीब आजमावलं. 'गुळाचा गणपती' हा सबकुछ पु. ल. चित्रपट होता. यात पुलंचीच कथा होती, पटकथा होती, संगीतही होतं आणि नायकाची भूमिकाही त्यांनी केली होती. याखेरीज पु. ल. आणि त्यांच्या पत्नी सुनीताबाई यांनी नायक-नायिका म्हणून वंदे मातरम् या चित्रपटात सुरुवातीला काम केलं होतं. पुलंनी तर अनेक नाटकांत, चित्रपटांत भूमिका केल्या होत्या. त्यानंतर त्यांनी हे क्षेत्र सोडलं आणि ते लेखक म्हणून अधिक नावारूपाला आले. त्यानंतर दीर्घ काळाने त्यांनी एक होता विदूषक (१९९३) या चित्रपटासाठी पुन्हा पटकथा लेखन केलं होतं.

आचार्य अत्रे हेदेखील असेच बहुरंगी, बहुढंगी व्यक्तिमत्त्व. त्यांनी अनेक नाटके लिहिली, चित्रपट केले. मात्र, त्यांनी स्वतः व्यावसायिक भूमिका कधी केल्या नाहीत. मात्र, श्यामची आई या चित्रपटात त्यांनी चक्क प्रबोधनकार ठाकरे यांना झळकावलं होतं. यात प्रबोधनकार अगदी छोट्या भूमिकेत दिसले होते.

ग. दि. माडगूळकर म्हणजे महाराष्ट्राचे महाकवी. सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक चित्रपटांसाठी पटकथा लेखन, गीतलेखन केलं. अगदी सुरुवातीला मा. विनायक यांच्या ब्रह्मचारी या चित्रपटात त्यांनी एक छोटी भूमिका केली होती. याशिवाय १९४७ मध्ये आलेल्या लोकशाहीर रामजोशी या चित्रपटातही त्यांनी अगदी लहान भूमिका केली होती. मात्र, वऱ्हाडी आणि वाजंत्री या चित्रपटात त्यांना प्रमुख भूमिका करताना रसिकांनी बघितलं, तेव्हा त्यांना सुखद धक्का बसला होता. गदिमांनी यातील कन्नड माणसाच्या विनोदी भूमिकेत धमाल केली होती. पुढचं पाऊल, लाखाची गोष्ट व पेडगावचे शहाणे या चित्रपटांतही गदिमांनी भूमिका केल्या होत्या. वऱ्हाडी आणि वाजंत्री चित्रपटात दिग्दर्शक राजदत्त यांनी शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर, द. मा. मिरासदार या तेव्हाच्या प्रसिद्ध लेखकत्रयीला पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत झळकवलं होतं. द. मा. मिरासदार यांनी अनेक चित्रपटांचं पटकथा लेखन केलं. त्यापैकी 'एक डाव भुताचा' या गाजलेल्या चित्रपटात त्यांनी स्वतः हेडमास्तरची भूमिका केली होती, हे अनेक चित्ररसिकांच्या स्मरणात असेल. 'द. मां.'चे नुकतेच निधन झाले, तेव्हाही या आठवणींना उजाळा मिळाला होता.

वास्तविक, ना. सी. फडके, पु. भा. भावे, वसंत कानेटकर ही सर्वच लेखकमंडळी दिसायला देखणी व रुबाबदार होती. मात्र, त्यांनी त्या काळात चित्रपटात किंवा नाटकात कुठे काम केल्याची नोंद नाही. क्वचित केल्याच असतील, तर हौशी भूमिका एखाद्या प्रयोगात केल्याही असतील. मात्र,  पु. ल. देशपांडे व ग. दि. माडगूळकर हे दोघेही याला सणसणीत अपवाद ठरले. पुढे दादा कोंडके यांनी हा वारसा चालविला. दादा हे रूढार्थाने प्रस्थापित लेखक नसले, तरी शाहीर होते. ते स्वतः उत्तम गीते लिहीत असत. त्यांच्या चित्रपटांतील द्व्यअर्थी संवाद व गाण्यांची नकारात्मक चर्चा खूप झाली. परंतु 'अंजनीच्या सुता...'सारखं अतिशय उत्कृष्ट गीत दादांनी लिहिलं आहे, हे विसरता कामा नये.

त्यानंतर दीर्घकाळ लेखक मंडळींचं दर्शन रूपेरी पडद्यावर झालं नाही. अगदी अलीकडे लेखकांना पडद्यावर झळकवण्याचा मान मिळविला तो सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर यांनी. त्यांच्या नितळ या चित्रपटात त्यांनी थेट विजय तेंडुलकरांना एक छोटी भूमिका दिली होती. तेंडुलकरांनीही नायिकेच्या आजोबांची ही छोटेखानी भूमिका फार सुंदर केली होती. त्याआधी वास्तुपुरुष या चित्रपटात सुमित्राताईंनी महेश एलकुंचवार यांना रूपेरी पडद्यावर पेश केलं होतं. यातील भास्कर या पात्राची मोठेपणीची भूमिका एलकुंचवार यांनी साकारली होती. या चित्रपटाचं कथानक आणि एलकुंचवार यांची वाडा नाट्यत्रयी यांचा जैव संबंध असल्यानं या चित्रपटात एलकुंचवारांचं असणं फारच सूचक व महत्त्वाचं होतं. अवलिया लेखक अनिल अवचट हेदेखील असंच बहुरंगी, बहुढंगी व्यक्तिमत्त्व. त्यांच्या विविध कलागुणांचा वापर त्यांच्या जवळच्या स्नेही असलेल्या सुमित्राताईंनी वास्तुपुरुष चित्रपटात करून घेतला होता. यात चित्रपटाच्या सुरुवातीला येणारं एक स्तोत्र अनिल अवचट यांच्याकडून त्यांनी गाऊन घेतलं. चित्रपटात येणारी बासरी अनिल अवचट यांनीच वाजविली आहे. नंतर एक कप च्या या चित्रपटात सुमित्राताईंनी थेट कमल देसाईंना छोटी भूमिका दिली होती. त्यांना या चित्रपटात आजीच्या भूमिकेत बघणं हा त्यांच्या चाहत्यांसाठी सुखद धक्का होता. सुमित्रा भावे स्वतः समाजशास्त्रज्ञ व लेखिका होत्याच. मात्र, त्यांनी स्वतः भूमिका कुठे केली नाही. अगदी अलीकडं चैतन्य ताम्हाणे यानं त्याच्या 'डिसायपल' या चित्रपटात सुमित्रा भावे यांच्या आवाजाचा निवेदनासाठी चपखल वापर करून घेतला होता. दुर्दैवानं तो सुमित्रा भावे यांचा शेवटचाच चित्रपट ठरला.

लेखक आणि अभिनेता या दोन्ही भूमिकांत रमणारं आणखी एक प्रसिद्ध नाव म्हणजे दिलीप प्रभावळकर. चित्रपटांत ब्रेक मिळण्यापूर्वीपासूनच प्रभावळकर लेखन करीत होते. क्रिकेट हा त्यांच्या आवडीचा विषय. शिवाय मुलांसाठीही त्यांनी विपुल साहित्य लिहिलं आहे. चिमणराव व गुंड्याभाऊ या मालिकेपासून त्यांची अभिनयाची मोठी व प्रदीर्घ कारकीर्द सुरू झाली. मात्र, त्यांचं लेखनही सोबतच सुरू राहिलं. अनुदिनी या वृत्तपत्रीय स्तंभावरून तयार झालेली श्रीयुत गंगाधर टिपरे ही टीव्ही मालिका म्हणजे प्रभावळकरांच्या दोन्ही क्षेत्रांतील हुकुमतीचं दर्जेदार उदाहरण आहे. लेखक व अभिनेते म्हणून दोन्ही क्षेत्रांत त्यांना भरपूर पुरस्कार मिळाले आहेत. 'बोक्या सातबंडे' हा त्यांचा मानसपुत्र आणि त्याच्या करामती यांचा उल्लेख केल्याशिवाय मराठी बालसाहित्याचा इतिहास सांगणं अशक्य आहे.
प्रभावळकरांसारखंच दोन्ही क्षेत्रांत दमदार कामगिरी करणारं अलीकडच्या काळातलं प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व म्हणजे कवी व अभिनेता सौमित्र ऊर्फ किशोर कदम. किशोर हा जेवढा प्रतिभाशाली कवी आहे, तेवढाच तो दमदार अभिनेता आहे. गारवा हा अल्बम गाजल्यानंतर सौमित्रचं नाव सर्व महाराष्ट्राला माहिती झालं. त्यानंतर जोगवा ते अलीकडच्या 'दिठी'पर्यंत अभिनयातही त्याचं नाव दुमदुमतं आहे. किशोरप्रमाणंच असंच एक जोरदार नाव म्हणजे नागराज मंजुळे. नागराज मूळचा कवी. त्याच्या कविता अतिशय संवेदनशील आहेत. चित्रपटात तो नंतर आला. आपल्या चित्रपटात तो पाहुणा कलाकार म्हणून दिसतो. मात्र, दिग्दर्शक म्हणून त्याची कामगिरी अतिशय वरच्या दर्जाची आहे.
याशिवाय अतुल कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी, (थोरली) सोनाली कुलकर्णी, मृणाल कुलकर्णी, हृषीकेश जोशी, किरण यज्ञोपवित ही सर्व मंडळी उत्तम लेखक आहेत. यांच्यावर केवळ अभिनेता किंवा नाटककार म्हणून शिक्का मारणं त्यांच्यावर अन्याय करणारं ठरेल. यातल्या मृणाल कुलकर्णीच्या तर घरातच साहित्याचा वारसा आहे. प्रसिद्ध लेखक गो. नी. दांडेकर हे तिचे आजोबा. आई वीणा देव मराठीतल्या प्रसिद्ध लेखिका. तो वारसा मृणालकडे आपोआपच आला आहे. हृषीकेशदेखील विपुल लिहीत असतो. उत्तम विनोदी नटाप्रमाणेच उत्तम विनोदी लेखक होण्याची मोठी क्षमता त्याच्यात आहे. सोनाली कुलकर्णीही विविध वृत्तपत्रांतून स्तंभांद्वारे लेखन करत असते. हे लोक आधीपासूनच उत्तम लिहिणारे होते आणि नंतर त्यांनी अभिनयाची वाट चोखाळली, असंही म्हणता येईल. अभिराम भडकमकर लेखक, कादंबरीकार, नाटककार म्हणून प्रसिद्ध आहेत. महेश कोठारे यांच्या 'पछाडलेला' या चित्रपटात त्यांनी महत्त्वाची भूमिका केली होती.
हिंदी चित्रपटसृष्टीचा विचार करता, मीनाकुमारीपासून ते दीप्ती नवलपर्यंत अनेक अभिनेत्रींची उदाहरणे सांगता येतील. मीनाकुमारी उत्तम शायरा होत्याच. त्यांच्या लिखाणात एक खोल 'दर्द' आहे. मीनाकुमारी यांना चित्रपटाच्या पडद्यावरही 'ट्रॅजेडी क्वीन' म्हणूनच ओळखलं गेलं. त्या चित्रपटसृष्टीत फार काळ रमल्या नसत्या, तर एक उत्तम लेखिका, शायरा, गझलकार म्हणूनही प्रसिद्ध झाल्याच असत्या, यात वाद नाही. दीप्ती नवलही उत्तम लेखिका, कवयित्री आहे. तिच्या सर्व भूमिकांप्रमाणेच तिची ही लेखिका म्हणून भूमिकाही तिच्या चाहत्यांना आवडते. अगदी अलीकडच्या काळातलं, जरा उलटं उदाहरण द्यायचं तर ट्विंकल खन्नाचं देता येईल. अभिनेत्री म्हणून अपयशी कारकिर्दीनंतर ट्विंकलनं लेखनाकडं लक्ष वळवलं. आज ती इंग्लिशमधील उत्तम विनोदी लेखन करणारी यशस्वी लेखिका म्हणून गणली जाते. तिचं पुस्तकही प्रसिद्ध झालं आहे.
प्रसिद्ध लेखक-गीतकार, दिग्दर्शक गुलजार यांना घेऊन बासू भट्टाचार्य यांनी सत्तरच्या दशकात 'असमाप्त कविता' नावाचा चित्रपट करायला घेतला होता. यात गुलजार यांची नायिका शर्मिला टागोर असणार होती. गुलजार यांना यात एका प्रकाशकाची भूमिका करायची होती. मात्र, काही रिळं शूटिंग झाल्यावर हा चित्रपट डब्यात गेला आणि नायक म्हणून पदार्पण करण्याचं गुलजार यांचं स्वप्न अधुरंच राहिलं. शीर्षकाप्रमाणेच हा सिनेमाही 'असमाप्त'च ठरला. मात्र, बासू भट्टाचार्य यांनी नंतर १९७७ मध्ये 'गृहप्रवेश' या चित्रपटाच्या वेळी गुलजार यांना पडद्यावर झळकावलंच. याखेरीज एन. चंद्रा यांच्या 'वजूद' नावाच्या चित्रपटातही गुलजार यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती.
अलीकडच्या काळातील ठळक नाव म्हणजे पीयूष मिश्रा. पीयूष मिश्रा हे नाटकातलं बहुरंगी-बहुढंगी व्यक्तिमत्त्व. गीतकार म्हणून नाव कमावल्यानंतर पीयूष मिश्रांनी अनेक चित्रपटांतून लहान-मोठ्या भूमिका केल्या. त्यांचा चेहरा आता सिनेरसिकांना चांगलाच परिचित आहे. गुलाल, तेरे बिन लादेन, गँग्ज ऑफ वासेपूर या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका लक्षात राहिल्या आहेत. असेच आणखी एक महत्त्वाचे नाव म्हणजे इंदूरचे मूळ मराठी स्वानंद किरकिरे. प्रसिद्ध गीतकार असलेल्या स्वानंद किरकिरेंनी पडद्यावरही अनेक भूमिका केल्या आहेत. अगदी अलीकडे आलेल्या चुंबक नावाच्या मराठी चित्रपटात त्यांची प्रमुख भूमिका होती. याशिवाय 'भाई : व्यक्ती आणि वल्ली' या चित्रपटात त्यांनी कुमार गंधर्वांची छोटीशी भूमिका केली होती.
याखेरीज अनेक लेखक, साहित्यिकांना कधी गमतीत, तर कधी गांभीर्याने कॅमेऱ्यासमोर उभं राहण्याचं धैर्य दाखवलं आहे. त्यातले काही चित्रपट डब्यात गेले असतील, तर काही विस्मरणात गेले असतील. या लेखातही सर्वांचा आढावा घेणं अशक्य आहे. काही नावं विस्मृतीत गेलेली असू शकतात, तर काही नोंदी नोंदवायच्या राहून गेलेल्या असतील. मात्र, यापैकी काही प्रतिभाशाली मंडळींचं स्मरण यानिमित्तानं करता आलं, यामुळं माझ्यासाठी तरी ही आनंदाची स्मरणयात्रा ठरली आहे, यात वाद नाही.

----


(पूर्वप्रसिद्धी : अक्षरदान दिवाळी अंक २०२१)


---


28 Nov 2021

समतोल दिवाळी अंक २०२१ - लेख

 स्पर्श ‘रूपेरी’
----------------


स्पर्श... एका व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीला होणारा स्पर्श! किती काय काय दडलेलं असतं या स्पर्शात! एक तर जिवंतपणाची भावना... शिवाय प्रेम, अधिकार, वासना, माया, ममता, लोभ, तिरस्कार... किती तरी भावना एका स्पर्शात गुंतलेल्या असू शकतात... माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. त्याला माणसांच्या सहवासात राहायला आवडतं. कळप करून राहणारे प्राणी असतात, त्याच समूहापैकी मानव हा एक प्राणी आहे. माणसाचा मेंदू अर्थातच इतर कुणाहीपेक्षा अधिक प्रगत असल्याने त्याच्या भावभावना आणि त्यांचं प्रदर्शन यांच्याही परी अनेक! माणसाच्या पाच ज्ञानेंद्रियांपैकी त्वचा हे अर्थातच स्पर्शाचं पहिलं आणि सर्वांत प्रभावी इंद्रिय! स्पर्शाची जाण प्रथम होते ती त्वचेला... त्यानंतरचे स्पर्शाचे लाभार्थी इंद्रिय म्हणजे डोळे! त्यानंतर जीभ, मग कान व नाक! कुणी स्पर्श केलाय हे डोळ्यांना दिसतं आणि मग आपला मेंदू तसा प्रतिसाद देतो. स्पर्शाची जाणीव अतिशय तीव्र असते. स्पर्शाप्रती आपलं शरीर विलक्षण संवेदनशील असतं आणि इथेच स्पर्श आणि त्यासंबंधीचे सर्व आचार-विचार यांचे नियम येतात. माणसानं समाज म्हणून जसजशी प्रगती केली तसतसे जगण्याचे, आहाराविहाराचे नियम तयार केले. अनावश्यक स्पर्श टाळण्याकडे या नियमांचा कल असणं स्वाभाविक होतं. तसं झालं नसतं, तर वासनेचा स्पर्श कायमच इतर स्पर्शांवर वरचढ ठरण्याची भीती तत्कालीन समाजाला वाटत होती. (खरं तर माणसाची नैसर्गिक आदिम प्रेरणा जोवर जिवंत आहे, तोवर ही भीती राहणारच!) मात्र, याचा तोटा असा झाला, की अनावश्यक स्पर्श टाळण्याच्या नादात आवश्यक स्पर्शही दूर सारले गेले. स्पर्शात असलेली निखळ मायेची, ममतेची भावना हरपली आणि माणसं चांगल्या स्पर्शालाही पारखी झाली.
चित्रपट ही तशी आधुनिक आणि तंत्रज्ञानाधारित कला. एकोणिसावे शतक संपताना पॅरिसमध्ये ल्युमिए बंधूंनी पहिल्या चलतचित्रांचं सादरीकरण केलं आणि सिनेमा आपल्या आयुष्यात आला. विसाव्या शतकात या कलेचा पूर्ण विकास झाला आणि आता तर आपल्या जगण्यातून सिनेमा आपण वजा करूच शकत नाही.
भारतात चित्रपटसृष्टीची सुरुवात दादासाहेब फाळके यांच्या ‘राजा हरिश्चंद्र’ या मूकपटाद्वारे १९१३ मध्ये झाली. तेव्हा चित्रपटात स्त्री-पुरुष स्पर्शाची दृश्यं दाखवणं जवळपास अशक्य होतं, याचं कारण मुळात चित्रपटांत महिलांनी काम करणं हेच निषिद्ध मानलं जात होतं. दादासाहेब अगदी वेश्यांकडेही गेले. मात्र, ‘आम्ही वेश्या आहोत, सिनेमात काम करण्यासारखं हलकं काम आम्ही करणार नाही,’ असे बाणेदार उत्तर तेव्हाच्या वेश्यांनी त्यांना दिलं होतं. त्यानंतर साळुंके नावाच्या एका पुरुष कलाकारालाच मिशी उतरवून ‘तारामती’ची भूमिका देण्यात आली होती, हा इतिहास आता बहुतेकांना माहिती आहे. सुरुवातीचे मूकपटही बहुतेक पौराणिक कथांवर आधारित होते आणि ते अगदीच समजण्यासारखं होतं. त्यानंतर मात्र स्टंटपटांचा एक काळ आला. वाडिया मूव्हिटोनने ‘फिअरलेस नादिया’ला घेऊन अनेक स्टंटपट त्या काळात आणले. मेरी ॲन इव्हान्स असं नाव असलेल्या, मूळ ऑस्ट्रेलियन असलेल्या या नटीचा ‘हंटरवाली’ हा चित्रपट १९३५ मध्ये प्रदर्शित झाला आणि तुफान हिट झाला. ही विभागणी अगदी सरळ होती. कुणी कुठलं काम करायचं आणि कुणी नाही याचे संकेत ठरले होते. अर्थात लवकरच म्हणजे १९३१ मध्ये ‘आलमआरा’ हा पहिला बोलपट आला आणि त्यानंतर सिनेमा बोलू लागल्यानंतरचं चित्र झपाट्यानं बदललं. पहिलं चुंबन दृश्यही याच काळात चित्रित झालं. ते होतं हिमांशू रॉय आणि देविकाराणी यांच्यात! सिनेमाचं नाव होतं ‘कर्मा’. तेव्हाच्या पद्धतीनुसार थेट प्रणयी चुंबन न दाखविता, नायक साप चावून बेशुद्ध पडला आहे आणि नायिका त्याला शुद्धीवर आणण्यासाठी तोंडाने श्वास देते आहे, अशा पद्धतीनं हे दृश्य चित्रित करण्यात आलं होतं. तरीही होतं ते चुंबनच आणि ते दृश्य तब्बल चार मिनिटांचं होतं. देविकाराणी यांना भारतीय चित्रपटांची ‘फर्स्ट लेडी’ म्हटलं जायचं आणि हिमांशू रॉय हे त्यांचे खऱ्या आयुष्यातले पतीच होते, हा तपशीलही तसा महत्त्वाचाच!
मा. विनायक यांनी ‘ब्रह्मचारी’ या १९३८ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटात मीनाक्षी शिरोडकर या अभिनेत्रीला बिकिनीत पेश करून मराठी चित्रपटसृष्टीत एकच खळबळ उडवून दिली होती. ‘यमुनाजळी खेळू खेळ कन्हैया का लाजता?’ हे त्यांचं गाणं तेव्हा सुपरहिट ठरलं. यात नायक-नायिका एकमेकांना थेट स्पर्श करीत नसले, तरी मुळात नायिकेला बिकिनीत दाखविणे हीच मराठी चित्रपटांसाठी एक क्रांती होती. (त्यानंतर मराठी चित्रपटात नायिका बिकिनीवर दिसण्यासाठी थेट २०१२ हे वर्ष उजाडावं लागलं. ‘नो एंट्री’ या सिनेमाच्या मराठी रिमेकमध्ये सई ताम्हणकर बिकिनीत झळकली होती. यावरून मा. विनायक यांनी १९३८ मध्ये केलेल्या धाडसाची पातळी लक्षात यावी.) स्वातंत्र्यपूर्व काळात स्टुडिओ पद्धत कायम होती, तरी वेगवेगळे विषय पडद्यावर येऊ लागले होते. अशोककुमारचा ‘किस्मत’ (१९४२) हा या प्रकारच्या चित्रपटांमधला ‘माइलस्टोन’ म्हणावा लागेल. यात पहिल्यांदाच नायक हा न-नायक (अँटिहिरो) दाखविण्यात आला होता. हिंदी चित्रपटसृष्टी बदलत चालली होती. मोकळ्या स्पर्शांना आत्मसात करत होती, याचंच हे द्योतक होतं.

त्यानंतर थोड्याच अवधीत भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि आपल्या चित्रपटसृष्टीतही बदलांचं मोकळं वारं वाहू लागलं. राज कपूरने हिंदी चित्रपटसृष्टीतील नायक-नायिकांच्या प्रेमाला एक आक्रमक परिमाण दिलं. नायकाच्या एका हातात व्हायोलिन आणि एका हातावर रेललेली नायिका हे ‘बरसात’मधलं दृश्य पुढं ‘आरके स्टुडिओ’चा बॅनर बनलं. ‘आवारा’तल्या ‘दमभर जो उधर मूँह फेरे ओ चंदा...’सारख्या गाण्यात दिसणारा थेट आव्हान देणारा प्रणय प्रेक्षकांनी तत्पूर्वी फार क्वचित मोठ्या पडद्यावर पाहिला होता. तत्कालीन भारतीय समाजमानस पाहिलं, तर नायक-नायिकेच्या अशा जवळिकीची, स्पर्शाची दृश्यं चित्रपटांतूनच पाहायला मिळण्यासारखी स्थिती होती. देशातील बहुसंख्य जनता गरिबीत जगत होती आणि अनेकांना दोन वेळच्या खाण्याचीही भ्रांत होती. तेव्हाही महानगरांमधून छोट्याशा घरांतून लोक राहत असत आणि प्रणयासाठी वेगळी जागा मिळणं किंवा तेवढा निवांतपणा मिळणं हे दुरापास्तच होतं. ग्रामीण भागातील अडचणी आणखीन निराळ्या होत्या. स्त्रियांनी ‘चूल आणि मूल’ एवढ्यापुरतंच मर्यादित राहावं, अशीच एकूण समाजधारणा होती. अशा वेळी तेव्हाच्या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या फँटसीला स्पर्श केला. चित्रपट म्हणजे रूपेरी पडद्यावरची विलक्षण सुंदर, स्वप्नील दुनिया ठरली. प्रत्यक्ष आयुष्यात जे जे करणं शक्य नाही, ते ते चित्रपटाच्या नायक-नायिकेच्या रूपाने अनुभवण्याचं सुख प्रेक्षकांना लाभलं. प्रणयातील स्पर्शाबाबत समाज पूर्वीपासूनच फार कठोर होता. अगदी आजही हे चित्र बदललेलं नाही. समाजातील दांभिकता अशा वेळी अगदी लख्ख उठून दिसते. ते काहीही असलं, तरी चित्रपटांनी बदलत्या काळानुसार, धाडसीपणा दाखवीत स्पर्श या संकल्पनेबाबत असलेली एक अदृश्य नकारात्मकता तोडून टाकली. चित्रपटांचा प्रवास समाजाच्या धारणांशी समांतर होत असला, तरी फँटसीबाबत (मग ती कुठलीही असो!) हा रथ थोडा दशांगुळे वर चालतो. प्रेक्षकांनाही तेच हवं असतं. 

स्पर्शाबाबत अगदी वेगळा विचार करणारे काही चांगले चित्रपट आले. सई परांजपे यांचा ‘स्पर्श’ हा हिंदी चित्रपट तर त्याच्या नावापासूनच या विषयाशी जोडला गेला आहे. अंध मुलांच्या शाळेचा प्रिन्सिपॉल असलेला अंध नायक, त्याची अंध शाळा, तिथल्या मुलांचं भावविश्व आणि या जगात ‘डोळस’ नायिकेचं आगमन होणं... हा सर्व प्रवास सई यांनी फार तरलतेनं दाखवला आहे. अंध व्यक्तीला स्पर्शाचं किती महत्त्व असतं, हे सांगायला नको. हा चित्रपट त्या स्पर्शाची महती सांगत असतानाच ‘डोळस’ व्यक्तींनाही आणखी डोळस बनवतो, यात शंका नाही. उत्कृष्ट संवाद, नसीरुद्दीन शाह व शबाना आझमी यांचा अप्रतिम अभिनय आणि सई यांचं संवेदनशील दिग्दर्शन यामुळं आजही हा चित्रपट अनेक रसिकांच्या मन:पटलावर कोरला गेला आहे. यातली अनेक दृश्यं डोळ्यांत पाणी आणतात. एखाद्या व्यक्तीकडं एखादं ज्ञानेंद्रिय नसेल, तर त्याची अन्य ज्ञानेंद्रियं अत्यंत तीक्ष्ण आणि तीव्र होतात. या चित्रपटात अंध व्यक्तींच्या आयुष्यातले असे अनेक क्षण कमालीच्या तरलतेनं दाखविले आहेत. नसीरुद्दीन आणि शबाना यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर ते सर्व प्रसंग अगदी जिवंत, रसरशीत केले आहेत.
‘कोशिश’सारख्या चित्रपटात जया भादुरी आणि संजीवकुमार यांनी मूकबधिर दाम्पत्याची भूमिका कमालीच्या प्रभावीपणे रंगविली होती. त्यातही स्पर्शाची महती कित्येक प्रसंगांत दिसून येते. ‘खामोशी - द म्युझिकल’ आणि ‘ब्लॅक’ यासारख्या चित्रपटांतून दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी अनुक्रमे मूक-बधीर माता-पित्यांची मुलगी आणि अंध व मूक मुलगी व तिचे शिक्षक यांची कथा प्रत्ययकारकरीत्या सांगितली होती. या चित्रपटांत स्पर्शाचं महत्त्व अगदी अनन्यसाधारणपणे आपल्यासमोर येतं. ही काही सहज आठवणारी आपल्याकडची ठळक उदाहरणं. चित्रपटांमधला स्पर्श या कलाकृतींमधून अगदी प्रगल्भ आणि संवेदनशीलतेनं मांडल्याचं सहज दिसून येतं.
हिंदी चित्रपटसृष्टीत स्पर्शाच्या बाबतीत मोकळेपणा आला, त्याला आणखी एक महत्त्वाचं कारण असावं असं मला वाटतं. हिंदी चित्रपटसृष्टीवर पहिल्यापासून पंजाबी मंडळींचं प्राबल्य राहिलेलं आहे. पंजाबी मंडळी स्वभावानं मोकळीढाकळी असतात. दोन द्यावेत, दोन घ्यावेत असा एकूण त्या मातीचाच गुण दिसतो. शरीरानं काबाडकष्ट करावेत, मजबूत खावं-प्यावं आणि जगणं साजरं करत राहावं अशी एकूण वृत्ती दिसते. त्यामुळं तिथं स्पर्शाबाबत कुठलेही अवडंबर नाही. एखादी तरुण नात आपल्या आजोबांना येऊन बिलगू शकते, तर एखादा रसिक जिजाजी सहज आपल्या ‘साली’ला गमतीत मिठी मारू शकतो. पंजाबी किंवा एकूणच उत्तर भारतीय संस्कृतीत असलेला हा मोकळेपणा हिंदी चित्रपटसृष्टीतील स्पर्शाबाबत फार मोलाचा ठरला. त्यामुळे हिंदी सिनेमांत एखादा नायक (भले तिशीचा दिसत असला, तरी) ‘माँ, मैं बीए पास हो गया हूँ’ म्हणत धावत येऊन आपल्या ‘माँ’ला सहज बिलगू शकायचा. तुलनेनं मराठी संस्कृतीत, आणि पर्यायाने मराठी सिनेमात हे बसत नाही. कल्पना करा, रमेश देव किंवा रवींद्र महाजनी किंवा अरुण सरनाईक किंवा कुलदीप पवार पळत येऊन, दुर्गा खोटे किंवा सुमती गुप्ते किंवा शांता जोग यांना येऊन ‘आई, आई... मी बीए पास झालो’ म्हणत मिठी मारताहेत... शक्यच नाही हे आपल्याकडे!
मा. विनायक यांनी १९३८ मध्ये नायिकेला बिकिनी परिधान करायला लावली असली, तरी मराठीत नायक-नायिकांनी शारीर जवळीक साधण्याचं प्रमाण पुढच्या काळात जवळपास शून्यवत होतं. फार तर एखादी अवघडलेली मिठी... चुंबन वगैरे गोष्ट तर लांबच राहिली. ते दाखवण्यासाठी दोन गुलाबाची किंवा चक्क झेंडूची फुलं एकमेकांवर आपटायची. किंवा नायक-नायिका एकमेकांच्या तोंडाजवळ येत येत एकदम कॅमेऱ्याच्या फ्रेममधून वर, खाली, डावीकडे, उजवीकडे असे कुठेही ‘फेड आउट’ व्हायचे. जी काही फेडाफेडी असेल, ती प्रेक्षकांच्या डोळ्यांआड! साधारण ऐंशीच्या दशकापर्यंत हे असंच होतं. मराठी नायकांची (आणि त्यांचीच का? नायिकांचीही) या काळात पडद्यावर झालेली कुचंबणा अगदीच कारुण्याची झालर वगैरे लेवून आलेली होती. वास्तविक, सूर्यकांत, चंद्रकांत, रमेश देव, श्रीकांत मोघे, अरुण सरनाईक किंवा रवींद्र महाजनी हे सर्वच नायक रूपाने देखणे होते. उंचेपुरे होते. मात्र, त्यांना पडद्यावर फार शारीर जवळीक साधून, नायिकेशी प्रणय करताना दाखवणं कुठल्याही मराठी दिग्दर्शकाला तेव्हा तरी जमलं नाही. मराठी चित्रपटांत व्यवस्थित चुंबनदृश्य यायला एकविसावं शतक उजाडावं लागलं. माझ्या आठवणीनुसार, २०१० मध्ये आलेल्या ‘जोगवा’ या चित्रपटात मुक्ता बर्वे आणि उपेंद्र लिमये यांचं चुंबनदृश्य होतं. त्यानंतर ‘डबलसीट’ या चित्रपटातही अंकुश चौधरीसोबत मुक्ता बर्वेचं एक चुंबनदृश्य आलं. हल्लीच्या काळात चुंबनदृश्यांना प्रेक्षक सरावले असले, तरी मराठी चित्रपटांत अशी दृश्यं पाहायला प्रेक्षक आजही जरा दचकतात हेच खरं. किंबहुना पूर्वी मराठी चित्रपटांना ‘ए’ (फक्त प्रौढांसाठी) हे प्रमाणपत्र फार क्वचित असायचं. ‘पुणे ५२’ या चित्रपटाला तसं सर्टिफिकेट होतं आणि त्याला साजेशी बोल्ड दृश्यंही त्या चित्रपटात होती. त्यानंतर तसे इतरही काही मराठी चित्रपट झळकले.
हिंदी काय, इंग्रजी काय किंवा मराठी काय; कुठल्याही चित्रपटांत शारीर जवळिकीची, निकट स्पर्शाची दृश्यं साकारणं हे संबंधित अभिनेत्यांसाठी तसं कठीणच काम असणार! तीव्र प्रखर उजेड देणारे लाइट्स, कॅमेरे, साउंड आणि इतर अनेक तंत्रज्ञ मंडळींच्या उपस्थितीत चुंबनदृश्य किंवा प्रणयदृश्य देणं, ते भाव नजरेत आणणं हे सराईत अभिनेत्यांनाच जमू शकतं. शिवाय तो ‘अभिनय’च असतो. सामान्य प्रेक्षकांना त्या क्षणापुरता त्या नायकाचा कितीही ‘हेवा’ वाटला, तरी प्रत्यक्ष नायकाला तो प्रसंग साकारणं तितकंच सुखद किंवा सहज असतंच असं नाही. नायिकांची अवस्थाही काही यापेक्षा वेगळी नसणार!
अलीकडे ओटीटी माध्यम आल्यापासून तर सेन्सॉर नसल्याने या स्पर्शाला काही धरबंधच राहिलेला नाही. ‘जे खपतं, तेच विकायचं’ या तत्त्वानुसार, लैंगिक भावना चेतविल्या जातील, अशा भडक दृश्यांची रेलचेल बहुतेक वेबसीरीजमध्ये असते. त्यातील काही दृश्ये मुद्दाम आधी सोशल मीडियावर लीक केली जातात. प्रेक्षकांची प्रतिक्रिया आजमावली जाते आणि मग ती सीरीज ‘गाजविली’ जाते. अर्थात ओटीटीवरचे स्पर्श हा स्वतंत्र लेखाचाच विषय होईल. या लेखापुरता केवळ चित्रपटांचा विचार केला तरी पूर्वीपेक्षा या रूपेरी स्पर्शांत खूप जास्त सहजता, मोकळेपणा आला आहे हे मान्य करायला पाहिजे. विशेषत: एकविसाव्या शतकात जन्मलेल्या पिढीसाठी ‘स्पर्श’ ही कुठलीही कलंकित किंवा अवांछित चीज नसून, ती एक अगदी सहज घडणारी शारीर क्रिया आहे. मनाचा हा नितळपणा दुर्दैवानं आधीच्या पिढ्यांमध्ये नव्हता. त्यासाठी तेच जबाबदार होते, असंही नाही. तेव्हाचे संस्कारच तशा पद्धतीनं घडण करणारे होते. आताच्या पिढीमध्ये ते अवघडलेपण नाही, तसंच स्पर्शाविषयीची अनावश्यक, फाजील, छुपी अशी कुठलीही धारणाही नाही. तेच प्रतिबिंब आजच्या चित्रपटांत उमटतंय, यात आश्चर्य नाही. स्पर्श या निखळ आनंददायक भावनेचा आविष्कार तसाच होत असल्याचं पाहून चित्रपटांचा पडदाही अधिक ‘रूपेरी’ व देखणा दिसू लागला आहे.
टच वूड!

---

(पूर्वप्रसिद्धी : समतोल दिवाळी अंक २०२१)

---