वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत परवा आपण उपांत्य
फेरीचा सामना ऑस्ट्रेलियाकडून हरलो आणि देशभरात जणू सुतकी कळा पसरली.
कालपर्यंत ज्या खेळाडूंना डोक्यावर घेतलं त्यांची लगेच उत्तरपूजा बांधायची
तयारी सुरू झाली. पूर्वीही हे व्हायचं. परंतु आता सोशल नेटवर्क नावाचा
मीडिया लोकांना उपलब्ध झाला आहे. त्यामुळं असल्या वातावरणाचा व्हायरस
क्षणार्धात सर्वत्र पसरतो आणि सगळीकडं त्याचीच चर्चा सुरू होते. भारतीय
उपखंडातील क्रिकेटचं वेड आणि सामना हरल्यानंतर आपल्या खेळाडूंची उडणारी
हुर्यो हा आता जगभरातील लोकांच्या चेष्टेचा विषय झाला आहे. किमान भारतात
तरी असं व्हायला नको. आपण भारतीय उपखंडातील सर्वांत मोठा आणि त्यातल्या
त्यात प्रगत देश आहोत. आपण तरी आता वेड्यासारख्या प्रतिक्रिया देण्याचं
थांबवून, अधिक प्रगल्भ होण्याची गरज आहे. त्यासाठी परवाचा पराभव हाच चांगला
‘मौका’ आहे.
कुठलाही खेळ घ्या. त्यात विजय आणि पराभव
जोडीनंच येतात. खेळाडूसुद्धा माणसंच आहेत. कुणी देव नाहीत. त्यामुळं
त्यांच्याकडूनही चुका होणारच. प्रेक्षकांसाठी महत्त्वाचं म्हणजे हे सारं
लक्षात घेऊन हा पराभवही पचवता यावा लागतो. त्यासाठी खिलाडूवृत्ती लागते. ती
जोपासावी लागते. अचानक रक्तात येत नाही. आपल्या देशात खेळाला किती कमी
महत्त्व दिलं जातं, हे सांगायला नको. शरीर कमावणं, उत्तम प्रकृती राखणं,
आनंदासाठी-छंदासाठी कुठला तरी खेळ खेळणं, त्यातल्या स्पर्धात्मक गोष्टी
टाळून केवळ खेळाचा आनंद लुटणं या गोष्टी आपल्या रक्तातच नाहीत. मोठ्या
शहरांत, विशिष्ट आर्थिक वर्गातच केवळ त्या पाहायला मिळतात. त्यापलीकडं जी
शंभर कोटी जनता खेड्यापाड्यांतून, लहान शहरांतून पसरली आहे,
त्यांच्यापर्यंत की अस्सल क्रीडा संस्कृती कधीच पोचलेली नाही. त्यामुळं
होतं काय, की आपण खेळाकडं वेगळ्या नजरेनं पाहायला लागतो. आपल्या अपेक्षा
बदलतात. त्यात आपण वैयक्तिक भावनांच्या फूटपट्ट्यांनी त्या खेळातलं यशापयश
मोजायला जातो. खेळात जिंकलो, तर आपल्याला आपणच जिंकल्यासारखं वाटतं.
जगण्यातल्या प्रतिकूलतांनी गांजलेल्या माणसाला ही भावना तर फार तीव्रतेनं
पछाडते. असं व्हायला हरकत नाही; पण त्याच वेळी मग देशाच्या खेळातल्या
पराभवानंही हा माणूस स्वतःच खचून जातो. त्या पराभवाला कुणाला तरी जबाबदार
ठरवून स्वतःचं नैराश्य दाबण्याचा प्रयत्न करू लागतो. असं व्हायला नको. खेळ
पाहताना मिळणारा आनंद आणि वैयक्तिक भावभावना यांच्यात अंतर राखायला हवं. एक
प्रकारची तटस्थता अंगी बाणायला हवी. कदाचित त्यामुळं आपला संघ जिंकल्यानं
विनाकारण अंगी येणारा उन्मादही कमी व्हायला मदत होईल. कारण तोही तितकाच
वाईट...
दुसरा मुद्दा सोशल प्लॅटफॉर्मवर व्यक्त
होण्याचा. आपल्या देशात प्रत्येकाला अभिव्यक्त होण्याचा अधिकार आहे आणि
लोकही तो पुरेपूर बजावत असतात. त्याबद्दल काही म्हणायचं नाही. मात्र, टीका
करताना ती विशिष्ट पातळी सोडून नसावी, याचं भान ठेवायला काय हरकत आहे! ते
भान असेल, तर आपण कुठल्याही खेळाडूला त्याच्या पत्नीवरून, मैत्रिणीवरून
किंवा गर्लफ्रेंडवरून टार्गेट करणार नाही. कारण तो पूर्णतः त्यांचा
वैयक्तिक प्रश्न आहे. कुठल्याही स्त्रीवर अश्लाघ्य टीका करणं किंवा
तिच्यावर अनुचित कमेंट करणं यातून आपण आपलीच लायकी दाखवून देत असतो. आपली
संस्कृती काय, ते जगाला दाखवत असतो. तेव्हा सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया
या सोड्यातल्या फसफशीसारख्या असतात, असं समजून त्याकडं दुर्लक्ष करणंच
योग्य. त्याचा आनंद लुटायला नको आणि असे विनोद फॉरवर्डही व्हायला नकोत.
किंबहुना ते जेवढं रोखता येईल तेवढं प्रत्येकानं करावं.
आणखी एक गोष्ट. आपण आपली तुलना पाकिस्तान,
बांगलादेश आणि श्रीलंकेबरोबर करायला नको. विशेषतः भारताच्या संदर्भात
पाकिस्तान आणि बांगलादेश ज्या पद्धतीनं प्रतिक्रिया देतात, तशीच आपण
द्यायला लागलो, तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला? एकमेकांच्या
अपयशानं आनंदित होणं हे बालिशच नव्हे, तर विकृत मनोवृत्तीचं लक्षण आहे.
ज्याला स्वतःला सुधारण्यात, पुढं जाण्यात फार रस नाही, तोच असले उद्योग करू
शकतो. पाकिस्तान आणि बांगलादेशकडं क्रिकेटशिवाय दुसरा राष्ट्रीय अभिमानाचा
विषय नाही. आणि त्यांनी भारतासारख्या बड्या देशाशी स्वतःची तुलना केली तर
त्यातही काही गैर नाही. पण आपण का तसं करतो? सुदैवानं भारताची स्थिती
त्यांच्यासारखी नाही. आपल्याकडं राष्ट्रीय अभिमानाच्या अनेक गोष्टी आहेत.
आपली समृद्ध लोकशाही, आपला अंतराळ कार्यक्रम, आपलं मंगलयान, आपली आयटी
क्षेत्रातील भरारी, आपली तरुणाई अशा अनेक गोष्टी सांगता येतील. त्यामुळं
आपण आपला क्रिकेटमधला अवास्तव रस कमी केला पाहिजे. किमान त्याला राष्ट्रीय
अभिमानाची एकमेव गोष्ट मानणं कटाक्षानं टाळलं पाहिजे.
अर्थात सगळंच चित्र काळंकुट्टं नाही. किंबहुना
आता आपल्या देशात अनेकांना याची जाणीव होताना दिसते आहे. त्यामुळंच
अनेकांनी आपल्या संघाच्या आत्तापर्यंतच्या कामगिरीला सलाम करीत, आमचं
तुमच्यावरचं प्रेम कायम राहील, अशी ग्वाही दिली. एका पराभवामुळं सगळं काही
संपत नसतं, याची जाणीव अनेकांना असल्याचं दिसलं. आपल्या संघाच्या चांगल्या
बाजू बऱ्याच जणांनी दाखवून दिल्या आणि एका दिवसाच्या वाईट कामगिरीबद्दल
त्यांना झोडपून काढणं योग्य नाही, अशी योग्य भूमिका मांडली. असे आवाज
वाढतील, तेव्हा आपल्यातला क्रिकेट रसिक अधिक प्रगल्भ झाला असं म्हणता येईल.
त्या दिशेनं वाटचाल सुरू करण्याचा हाच चांगला ‘मौका’ आहे.
...
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे, २९ मार्च २०१५)
---
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे, २९ मार्च २०१५)
---