31 Jan 2024

अनलॉक दिवाळी अंक २३ - लेख

‘खेळ’ श्रद्धांचा, रुढी-परंपरांचा
------------------------------------


कुठलीही गोष्ट जेव्हा दीर्घकाळ सुरू असते, तेव्हा त्यात काही ना काही परंपरा तयार होत असतात. काही रुढी तयार होतात. क्रीडा क्षेत्रही याला अपवाद नाही. क्रिकेट हा आपल्या भारतातला सर्वाधिक लोकप्रिय खेळ. क्रिकेटमध्येही अशा अनेक रुढी-परंपरा तयार झाल्या आहेत. क्रिकेटचा जन्म इंग्लंडमधला. तेथील लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड म्हणजे क्रिकेटची पंढरी असे मानले जाते. इथले रीतीरिवाज पूर्वी अतिशय कडक मानले जायचे. मेरिलिबोन क्रिकेट क्लब (एमसीसी) या उच्चभ्रूंच्या क्लबकडे या मैदानाची मालकी होती. लॉर्ड्स मैदान अतिशय देखणे आहे. इंग्रजांची शिस्त आणि नीटनीटकेपणा इथे जागोजागी दिसतो. इथल्या संग्रहालयात त्यांनी अनेक गोष्टी जपून ठेवल्या आहेत. पूर्वी कसोटी क्रिकेट फक्त इंग्लंड व ऑस्ट्रेलिया या दोन देशांतच खेळले जायचे. या दोन देशांतील करंडकाला ‘ॲशेस’ असे नाव का पडले, यामागेही एक कथा आहे. सन १८८२ मध्ये लंडनच्या ओव्हल मैदानात ऑस्ट्रेलियाकडून इंग्लंड संघाचा कसोटीत दारूण पराभव झाला. त्यामुळे इंग्लिश क्रिकेट रसिक संतप्त झाले. वृत्तपत्रांतून कडक टीका झाली. त्यात एका समीक्षकाने असे लिहिले, ‘इंग्लिश क्रिकेट आज ओव्हल मैदान येथे मरण पावले. तेथे दहनविधी करण्यात येणार असून, रक्षा (ॲशेस) ऑस्ट्रेलियाला नेली जाईल.’ तेव्हापासून ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला ‘ॲशेस’ असे नाव पडले. लॉर्ड्सवरील संग्रहालयात त्या १८८२ च्या बातमीचे कात्रण आजही जपून ठेवण्यात आले आहे.

इथे प्रत्येक गोष्ट कुणी कशी करायची याचे नियम क्लबने घालून दिले होते. अनेक वर्षे महिलांना या क्लबचे सदस्यत्व मिळत नसे. आता या गोष्टी पुष्कळशा बदलल्या आहेत. लॉर्ड्स मैदानात एक घंटा असून, प्रत्येक सामना सुरू होण्यापूर्वी ही घंटा (बेल) वाजविण्यात येते. ही बेल वाजविण्याचा मान फार मोजक्या लोकांना मिळतो. त्यामुळे हा बहुमान समजला जातो. मध्यंतरी ऑगस्ट महिन्यात मी लंडनला गेलो, तेव्हा हे लॉर्ड्स मैदान अगदी आवर्जून पाहिले. तेव्हा तेथे सामना सुरू नव्हता. खरे तर सामना सुरू असताना हे मैदान पाहणे ही निराळीच गंमत आहे. आम्ही गेलो, तेव्हा तेथील माइक नावाच्या गाइडने खूप आत्मीयतेने लॉर्ड्सची माहिती दिली. लॉर्डसमधील खेळाडूंची ड्रेसिंग रूम, स्थानिक टीमची (इंग्लंडची) ड्रेसिंग रूम, सदस्यांना व खेळाडूंना बसण्याची व्यवस्था असलेली लाँग रूम हे सगळेच अतिशय सुंदर आणि बघण्यासारखे आहे. नामवंत खेळाडूंची उत्तम पेंटिंग्ज तिथं लावण्यात आली आहेत. लॉर्ड्सच्या मैदानाचे वैशिष्ट्य म्हणजे या मैदानाला एका बाजूने उतार आहे. आणि हा उतार किती असावा? तर एका बाजूचे मैदान दुसऱ्या बाजूपेक्षा तब्बल आठ फुटांनी उंचावर आहे. या मैदानावर खेळणे त्यामुळे सोपे नाही. दोन्ही ड्रेसिंग रूममध्ये या मैदानावर शतके केलेल्या फलंदाजांची, तसेच डावात पाच किंवा अधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांची नावे लिहिली आहेत. विनू मंकड यांचे नाव फलंदाज व गोलंदाज या दोन्ही यादींत आहेत. आपल्या दिलीप वेंगसरकरांनी लॉर्ड्सवर तीन शतके ठोकली आहेत. त्यांचे व कपिल देव यांचे मोठे तैलचित्र लाँगरूममध्ये लावले आहे. सचिन तेंडुलकरला मात्र लॉर्ड्सवर शतक ठोकता आले नाही. त्याच्या या मैदानावरील सर्वोच्च धावा आहेत ३७. या उतारामुळे आपल्याला नेहमीच्या पद्धतीने खेळता येत नाही, असे सचिन सांगतो.
या लॉर्ड्सच्या मैदानात एक झाड होते. स्टेडियम व मैदान तयार करताना ते झाड तसेच ठेवण्यात आले होते. मी लॉर्ड्सला भेट दिली तेव्हा मला ते झाड तिथे दिसले नाही. तिथल्या एका स्थानिक माणसाला (तो भारतीयच होता) त्याबद्दल विचारले. मात्र, त्यालाही फारशी माहिती नव्हती. भारताचा महान खेळाडू व माजी कर्णधार सुनील गावसकर याला ‘एमसीसी’ने सन्माननीय सदस्यत्व देऊ केले होते. मात्र, विशिष्ट पद्धतीचा पेहराव करायचा, विशिष्ट शूज घालायचे वगैरे एमसीसीच्या अटी गावसकरांना जाचक वाटल्या आणि त्यांनी हे सन्माननीय सदस्यत्व चक्क नाकारले म्हणे. 

मैदानावरच्या रुढी-परंपरांप्रमाणेच खेळाडू आणि अंपायर यांच्याही काही परंपरा किंवा काही श्रद्धा किंवा अंधश्रद्धा आहेत. डेव्हिड शेफर्ड हे क्रिकेटमधील प्रसिद्ध इंग्लिश अंपायर. मैदानात कुठल्याही संघाचा स्कोअर १११ झाला, की ते उडी मारायचे किंवा एक पाय उभा करायचे. १११, २२२ किंवा ३३३ अशा धावसंख्येला ‘नील्सन’ असे म्हणतात. १११ ही धावसंख्या फलंदाजासाठी अशुभ मानायची पद्धत आहे. शेफर्ड त्यांच्या या कृतीमुळे जगभरातील प्रेक्षकांचं लक्ष वेधून घ्यायचे. १११ हा आकडा बेल्सशिवाय उभ्या असलेल्या स्टंपसारखा दिसतो. बेल्स उडाल्या म्हणजे फलंदाज बाद! त्यामुळे १११ हा आकडा अशुभ, असे मानतात. लॉर्ड नेल्सन याच्यावरून या संख्येला ‘नेल्सन’ आकडा म्हणण्याची पद्धत पडली. नेल्सनच्या तीन नाविक विजयांचा आणि ‘वन आय, वन आर्म अँड वन लेग’ या प्रसिद्ध उद्गाराचा संदर्भ या धावसंख्येशी जोडला जातो. हा आकडा खरोखर फलंदाजांसाठी अशुभ आहे का, याची पाहणी काही वर्षांपूर्वी एका क्रीडा नियतकालिकाने केली. तेव्हा लक्षात आलं, की सर्वाधिक फलंदाज शून्य या धावसंख्येवर बाद झाले आहेत. १११ ही धावसंख्या वाटते तेवढी अशुभ नाही. मात्र, पंच डेव्हिड शेफर्ड यांच्या पाय उचलण्याच्या कृतीमुळे त्यांच्यावर हटकून कॅमेरा जायचा आणि स्टेडियममधील प्रेक्षक त्यांच्या नावाचा गजर करायचे. शेफर्ड यांच्याप्रमाणे इतर अनेक पंचांच्या लकबी प्रसिद्ध आहेत. वेस्ट इंडिजचे पंच स्टीव बकनर अतिशय कोरड्या चेहऱ्याने वावरायचे. इंग्लंडचे डिकी बर्ड हे जुन्या जमान्यातील लोकप्रिय पंच होते. त्यांचे निर्णय सहसा चुकायचे नाहीत. अलीकडे न्यूझीलंडचे पंच बिली बौडेन त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण लकबींसाठी प्रसिद्ध होते. चौकार, षटकार देण्याची त्यांची विशिष्ट पद्धत होती. षटकार देताना ते हळूहळू हात उंचावत आकाशाकडे न्यायचे. चौकार देताना कमरेत वाकून जोरजोरात हात आडवा हलवायचे. ऑस्ट्रेलियाचे पंच पॉल राफेल हे अत्यंत उमद्या व्यक्तिमत्त्वाचे व हुशार अंपायर होते. त्यांचेही निर्णय सहसा चुकायचे नाहीत. पाकिस्तानी पंच शकूर राणा यांच्यावर भारतात खूप टीका व्हायची. पूर्वी भारत पाकिस्तानात सामने खेळायचा जायचा, तेव्हा शकूर राणा आपल्या फलंदाजांना कायम चुकीचे बाद द्यायचे. आपले खेळाडू म्हणायचे, की आम्ही पाकिस्तानात गेलो, की मैदानात अकरा नव्हे, तर तेरा खेळाडूंविरुद्ध (११ खेळाडू अधिक दोन पंच) खेळतो. या शकूर राणांचा एक किस्सा प्रसिद्ध आहे. एकदा पहिल्याच कसोटीत पाकिस्तानच्या गोलंदाजाचा (बहुतेक इम्रान) चेंडू सुनील गावसकर यांच्या पायाला लागला. चेंडू पायाला लागायचा अवकाश, शकूर राणांचे बोट लगेच वर गेले. (तेव्हा थर्ड अंपायर, रिव्ह्यू वगैरे प्रकार नव्हते.) गावसकर वैतागले. मात्र, बाद दिल्याने पॅव्हेलियनमध्ये परतावेच लागले. नंतर गावसकर यांनी त्यांचे आघाडीचे जोडीदार चेतन चौहान यांना असे सांगितले, की पायाला लागलेला हा अखेरचा चेंडू! त्यानंतर त्या आख्ख्या मालिकेत गावसकर यांनी एकाही गोलंदाजाचा एकही चेंडू पायाला लागू दिला नाही. त्यामुळे पायचीत देण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. यात गावसकर यांच्या फलंदाजीच्या महान तंत्राचीही कमाल दिसते. पाकिस्तानातलाच आणि गावसकर यांचा अजून एक किस्सा आहे. एकदा भारतीय संघ पाकिस्तानात गेला असताना लाहोर येथे कसोटी सामन्यापूर्वी प्रसिद्ध गायिका नूरजहाँ तिथे आल्या. त्यांची भारतीय खेळाडूंशी ओळख करून देताना तिथल्या व्यवस्थापकाने सांगितले, ये सुनील गवास्कर है... हिंदुस्थान के कप्तान. इन को तो आप जानतीही होंगी. त्यावर काहीशा आढ्यतेने नूरजहाँ म्हणाल्या, ‘हम तो सिर्फ इम्रान खान को जानते है!’ त्यानंतर तो व्यवस्थापक गावसकरांकडे वळून म्हणाला, ‘और यह है मल्लिका-ए-तरन्नुम नूरजहाँ... इन को तो आप जानतेही होंगें’... अतिशय हजरजबाबी म्हणून प्रसिद्ध असलेले गावसकर ही संधी कशाला सोडतील? त्यांनी त्या फुलटॉसवर थेट षटकार लगावला. ते म्हणाले, ‘हम तो सिर्फ लता मंगेशकर को जानते है!’

याव्यतिरिक्त क्रिकेट खेळाडूंच्याही अनेक श्रद्धा असतात. मैदानात उतरताना विशिष्ट (उजवे) पाऊल मैदानात आधी टाकणे, सूर्याकडे पाहणे, विशिष्ट रंगाचे पॅड, ग्लोव्हज किंवा हेल्मेट घालणे असे प्रकार सर्वच खेळाडू करताना दिसतात. सचिन तेंडुलकर शतक झाल्यानंतर आकाशाकडे पाहत असे. त्यामागचे कारण असे, की १९९९ चा क्रिकेट वर्ल्ड कप इंग्लंडमध्ये भरला असताना, सचिनच्या वडिलांचे - रमेश तेंडुलकर यांचे - मुंबईत निधन झाले. सचिन तातडीने मुंबईला परतला. वडिलांचे अंत्यसंस्कार झाल्यावर तो तातडीने वर्ल्ड कपचे सामने खेळण्यासाठी इंग्लंडला परतला. त्यानंतरची भारताची पुढची मॅच केनियाविरुद्ध होती. सचिनने त्या सामन्यात शतक झळकावले आणि त्यानंतर आकाशाकडे पाहिले. सचिनने आपल्या वडिलांना दिलेली ती आदरांजली होती. सर्व प्रेक्षकांना याची कल्पना असल्याने तेव्हा सचिनचे चाहते अंत:करणापासून हलले होते. त्यानंतर प्रत्येक शतकानंतर सचिन आकाशाकडे पाहून अभिवादन करू लागला. नागपूरमध्ये सामना असेल तर सचिन आवर्जून तेथील प्रसिद्ध टेकडी गणपतीचे दर्शन घ्यायला जायचाच.
सुनील गावसकर यांनी त्यांच्या वेस्ट इंडिज दौऱ्याची एक अशीच गमतीशीर आठवण सांगितली आहे. वेस्ट इंडिजचे तत्कालीन कर्णधार गॅरी सोबर्स यांना असे वाटत असे, की मैदानात उतरण्यापूर्वी त्यांनी सुनील गावसकर यांना स्पर्श केला तर त्यांच्या धावा चांगल्या होतात. भारताचे तत्कालीन कर्णधार अजित वाडेकर यांना हे कळले. त्यानंतर पुढच्या सामन्याच्या वेळी सोबर्स गावसकरांना शोधत भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये आले, तेव्हा वाडेकर यांनी गावसकरांना चक्क बाथरूममध्ये कोंडून ठेवले. गावसकर दिसत नाही म्हटल्यावर नाइलाजाने सोबर्स मैदानात गेले. त्या डावात आपल्या गोलंदाजाने त्यांना शून्यावर बाद केले आणि आपण ती ऐतिहासिक कसोटी जिंकली.
प्रेक्षक म्हणून आपल्याही काही श्रद्धा असतात, तर काही अंधश्रद्धा असतात. विशेषत: क्रिकेट हा आपला ‘धर्म’ असल्याने प्रत्येक सामना हा जणू धर्मयुद्ध असल्यासारखाच खेळला जात असतो. त्यातही समोर पाकिस्तानचा संघ असेल तर विचारायलाच नको. संपूर्ण घर, चाळ, वाडी-वस्ती, बिल्डिंग सामूहिकरीत्या सामना बघत असते. अशा वेळी एका विशिष्ट जागी बसलं तर तिथून उठायचं नाही, कारण कधी तरी कुणी तरी जागा सोडली आणि इकडे विकेट गेली असं घडलेलं असतं. मग काय वाट्टेल ते झालं, तरी त्या व्यक्तीला त्या जागेवरून उठू दिलं जात नाही. असे अनेक गमतीशीर प्रकार आपण लहानपणी आणि अगदी आताही अनुभवले आहेत.
अलीकडे आयपीएलसारख्या टी-२० स्पर्धा सुरू झाल्यापासून क्रिकेट बरेच रंगीत-संगीत झाले आहे. आयपीएलच्या निमित्ताने खेळ म्हणजे जल्लोष किंवा सेलिब्रेशन हे समीकरण व्यापारी हेतूने प्रेक्षकांत रुजविण्यात आले. पूर्वी अतिशय स्वस्तात क्रिकेट सामने पाहता यायचे. आता मात्र हा काही हजारो रुपयांचा मामला झाला. ‘चीअर लीडर्स’ हा प्रकार आयपीएलमुळे क्रिकेटमध्ये आला. प्रत्येक षटकारानंतर किंवा एखाद्या विकेटनंतर नाचणाऱ्या मुली बघून सुरुवातीला अस्सल क्रिकेटप्रेमी मंडळींनी नाके मुरडली. आता मात्र हे सगळे प्रकार रूढ झाले आहेत. एकदा सगळा माहौलच जल्लोषाचा म्हटल्यावर खेळाडूही मागे कशाला राहतील? वेगळ्या प्रकारची केशभूषा, हातावर किंवा मानेवर टॅटू असे प्रकार खेळाडूंची लोकप्रियता ठरवू लागले. माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी नव्याने संघात आला तेव्हा त्याचे केस बरेच वाढलेले होते. पाकिस्तानमध्ये खेळायला गेला असताना तेव्हाचे पाकिस्तानचे अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी त्याला बक्षीस समारंभात जाहीरपणे सांगितले होते, की तुझे केस चांगले आहेत. कापू नकोस. कालांतराने धोनीने त्याचे ते केस कापले तो भाग वेगळा!
अनेक खेळाडू वेगवेगळ्या प्रकारे सेलिब्रेशन करतात. पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी बळी मिळाल्यानंतर दोन हात आडवे फैलावून आणि पाय लांब फाकवून आनंद व्यक्त करायचा. वेस्ट इंडिजचा गोलंदाज शेल्डन कॉट्रेल विकेट मिळाल्यावर दोन-तीन पावलं संचलन केल्यासारखं करतो आणि कडक सॅल्यूट ठोकतो. हा गोलंदाज तिथल्या लष्करात कामाला आहे म्हणून तो असे करतो. भारताचा नवा उगवता तारा शुभमन गिल शतक केल्यानंतर इंग्लिश पद्धतीने कमरेत झुकून अभिवादन करतो, तर ‘सर’ रवींद्र जडेजा तलवारीसारखी बॅट फिरवून आनंद व्यक्त करतो.
क्रिकेटप्रमाणेच टेनिसमध्ये अशाच अनेक प्रथा-परंपरा पाहायला मिळतात. त्यात अर्थात पुन्हा विंबल्डन, म्हणजे ब्रिटिश लोक आघाडीवर, हे सांगायला नकोच. इथे सामना खेळणाऱ्या खेळाडूला पांढरा पोशाखच घालावा लागतो. हा नियम स्पर्धा सुरू झाल्यापासून म्हणजे १८७७ पासून अस्तित्वात आहे, तो आजतागायत. याखेरीज सर्व अंपायर, लाइनमन, बॉल बॉइज यांनी हिरवा ड्रेस घालायचा हा नियम २००६ पर्यंत होता. तो नंतर बदलण्यात आला. आता हे सर्व जण नेव्ही ब्लू व क्रीम रंगाचे ड्रेस घालतात. स्ट्रॉबेरी आणि क्रीम हे विंबल्डनचं दुसरं वैशिष्ट्य किंवा प्रथा म्हणा. खेळ सुरू असताना प्रेक्षकांनी स्ट्रॉबेरी व क्रीम खात त्याचा आनंद लुटायचा, ही प्रथा साधारणत: १९५३ मध्ये सुरू झाली. मात्र, काहींच्या म्हणण्यानुसार, ही प्रथा स्पर्धा सुरू झाल्यापासून म्हणजे १८७७ पासून आहे. हळूहळू स्ट्रॉबेरी व क्रीम हा विंबल्डनचा अविभाज्य घटक झाला. दर वर्षी विंबल्डनला २८ हजार किलो स्ट्रॉबेरी आणि सात हजार लिटर आइस्क्रीम फस्त केलं जातं.
इंग्लंडचे राजघराणे आणि विंबल्डनचे अतूट नाते आहे. हे राजघराणे विंबल्डन स्पर्धा भरविणाऱ्या ‘ऑल इंग्लंड क्लब’चे प्रमुख आश्रयदाते आहे. त्यामुळे दर वर्षी राजघराण्यातील कुणी ना कुणी तरी ही स्पर्धा बघायला येतेच. त्यांच्यासाठी सेंटर कोर्ट येथे ‘रॉयल बॉक्स’ आहे. पूर्वी सर्व खेळाडूंना या राजघराण्यातील मंडळींना अभिवादन करावं लागे. त्यातही महिला खेळाडूंना विशिष्ट पद्धतीने एक पाय वाकवून अभिवादन करावं लागे. मात्र, २००३ पासून ‘ड्युक ऑफ केंट’ (जे ऑल इंग्लंड क्लबचे तेव्हा अध्यक्ष होते) यांनी ही प्रथा थांबविली. आता फक्त राणी (आता राजा) किंवा राजपुत्र उपस्थित असतील तर त्यांनाच अभिवादन करावे लागते. लेडी डायना अनेक वर्षे विंबल्डनचे सामने पाहायला येत असे.
बक्षीस विजेत्यांना जी रक्कम दिली जात असे, त्यात पूर्वी पुरुषांना अधिक रक्कम मिळे आणि महिलांना तुलनेने कमी. मात्र, विंबल्डनने २००७ पासून यातही बदल केला आणि दोघांनाही समान रक्कम द्यायला सुरुवात केली. मात्र, त्यावरही काही रसिकांनी आक्षेप घेतला. महिलांचे सामने तीन सेटचे असतात, तर पुरुषांचे पाच सेटचे. त्यामुळे पुरुष अधिक मेहनत करतात, असे या आक्षेप घेणाऱ्यांचे म्हणणे आहे.
विंबल्डनच्या कोर्टवर कुठल्याही प्रायोजकांच्या किंवा तत्सम जाहिराती लावण्यास पूर्ण बंदी आहे. याशिवाय विंबल्डन स्पर्धा सुरू असतानाच्या पंधरवड्यात जो मधला रविवार असतो, तो सुट्टीचा असतो. त्या रविवारी एकही सामना होत नाही, ही इथली प्रथा आहे. मात्र, १९९१, १९९७ आणि २००४ मध्ये पावसामुळे या ‘सुट्टीच्या रविवारी’ सामने खेळवावे लागले. तेव्हा क्लबने ते रविवार ‘जनतेचा रविवार’ असे घोषित करून, अनारक्षित खुर्च्यांवर, स्वस्त तिकिटे उपलब्ध करून अनेकांना सेंटर कोर्टवर बसायचे भाग्य मिळवून दिले. या रविवारनंतर येणारा सोमवार हा विंबल्डन स्पर्धेचा सर्वांत महत्त्वाचा दिवस - टेनिस निर्वाण - म्हणून ओळखला जातो. या दिवशी पुढच्या फेरीत आलेले १६ पुरुष व १६ महिला उपांत्यपूर्व फेरीत जाण्यासाठी या एकाच दिवशी आपापले सामने खेळतात. विंबल्डनचे सामने बघणे हा एक वेगळाच आनंद आहे. भारतात साधारण १९८७-८८ मध्ये विंबल्डनचे सामने ‘दूरदर्शन’वर लाइव्ह दाखवायला सुरुवात झाली. हाच बोरिस बेकर, स्टेफी ग्राफ आदी खेळाडूंच्या उदयाचा काळ होता. भारतात टेनिस लोकप्रिय होण्यामागे ‘दूरदर्शन’ने सुरू केलेल्या या थेट प्रक्षेपणाचा मोठा वाटा आहे. त्यानंतर माझ्या पिढीच्या विद्यार्थ्यांच्या वह्यांवर कपिल, गावसकर, रवी शास्त्री यांच्या जोडीने स्टेफी ग्राफ, स्टीफन एडबर्ग, जॉन मॅकेन्रो, इव्हान लेंडल, मॅट्स विलँडर किंवा बोरिस बेकर यांचेही फोटो झळकू लागले.
क्रीडा क्षेत्राशी आपलं असं अतूट नातं आहे. त्यामुळे खेळाच्या मैदानावरील अनेक रुढी-परंपरा आणि श्रद्धा-अंधश्रद्धांसह आपण त्या त्या खेळावर मनापासून प्रेम करतो, नाही का!

----

(पूर्वप्रसिद्धी : अनलॉक दिवाळी अंक, २०२३)

----

29 Jan 2024

दृष्टी-श्रुती दिवाळी अंक २३ - लेख

मुकुंद, तू मीच आहेस!
--------------------------

मिलिंद बोकील यांची ‘शाळा’ ही कादंबरी मी वाचली तेव्हा मी त्या कादंबरीच्या प्रेमातच पडलो. नंतर मी अनेकदा ही कादंबरी वाचली. ‘शाळेत गेलेल्या सर्वांसाठी’ अशी या कादंबरीची अर्पणपत्रिका आहे. खरोखर, शाळेत गेलेल्या सगळ्यांसाठीच ही कादंबरी आहे आणि शाळेतल्या त्या दिवसांची अनुभूती ज्यांच्या मनात श्रावणसरींसारखी आजही बरसत असते त्या सगळ्यांनाच या कादंबरीच्या प्रेमात पडल्याशिवाय गत्यंतर नाही. मी अनेकदा विचार करतो, की या कादंबरीतलं आपल्याला नक्की काय आवडलं? त्या कोवळ्या वयातलं ‘प्रेम’? वयात येण्याची जाणीव आणि त्यासोबत उमलत असलेल्या कित्येक मुग्ध-मधुर भावनांची पुनर्भेट? आपल्यातल्या हरवलेल्या निरागसपणाची टोचणारी भावना? मग वाटतं, की हे सगळंच... आणि त्याशिवाय असं बरंच काही, जे शब्दांत कदाचित कधीच सांगता येणार नाही. 

यातला नायक म्हणजे मुकुंद जोशी. इयत्ता नववी. कादंबरीचा काळ म्हणजे नववीचं संपूर्ण वर्ष. गाव (थेट उल्लेख नसला तरी) डोंबिवली. या मुकुंदाची आणि त्याच्या वर्गात असलेल्या शिरोडकरची ही ‘प्रेम’कथा... इंग्रजीत ज्याला ‘काफ लव्ह’ म्हणतात, त्या वयातल्या पहिल्या-वहिल्या आकर्षणाची ही गोड गोष्ट!
कादंबरीतील मुकुंदा भेटल्यावर असं वाटलंच नाही, की याला आपण पहिल्यांदाच भेटतोय. मुकुंद जोशी राहत होतास ते शहर, ते पर्यावरण, तो भोवताल किती तरी वेगळा होता. त्याच्या नववी-दहावीत असण्याचा काळही वेगळा होता. आणीबाणीचे संदर्भ पुस्तकात येतात. माझ्या त्या वयाच्या जवळपास पंधरा-सोळा वर्षं पूर्वीचा... आणि कादंबरीतून मुकुंदाची भेट झाली तीही बरोबर माझ्या दहावीच्या काळानंतर पंधरा-सोळा वर्षांनंतर...म्हणजे मधे साधारणत: तीस वर्षांचा काळ गेला होता.. मात्र, आपण एकच काळ जगलो आहोत, असं वाटण्याइतका हा नायक जवळचा वाटला... मला खात्री आहे, माझ्यासारख्या अनेक वाचकांना असंच वाटलं असेल. मुकुंदाचं नववीतल्या वयातलं भावविश्व आपल्याला मनापासून आवडतं. याचं कारण माझ्यासारख्या लाखो मध्यमवर्गीय मराठी मुलांचं भावविश्व तसंच होतं. काळ कितीही बदलला तरी पौगंडावस्थेतल्या त्या भावना कुठल्याही काळात त्याच असतात. त्या वयात प्रत्येकाची आपली आपली अशी कुणी तरी ‘शिरोडकर’ असतेच. त्या कोवळ्या वयातलं ते प्रेम... त्याला ‘प्रेम’ तरी कसं म्हणावं? त्या वयातलं ते खास आकर्षण... पण बोकील सांगतात, ती गोष्ट केवळ त्या आकर्षणापुरती मर्यादित नव्हती. त्यात त्या काळाचा सगळा पटच सामावला आहे. चाळीतलं जोशींचं घर, मंत्रालयात लोकलनं नोकरीला जाणारे मुकुंदाचे बाबा, त्याची सुगृहिणी अशी साधीसुधी टिपिकल आई, त्याची मोठी बहीण - जिचा उल्लेख तो कायम अंबाबाई असाच करतो आणि ते खूप आवडतं -, याशिवाय त्याचा लाडका नरूमामा हे सगळेच आवडू लागतात. सगळ्यांत भारी म्हणजे यातले मुकुंदाचे सगळे मित्र. फावड्या, चित्र्या, सुऱ्या... नकळत त्यातून लेखक दाखवत असलेला त्यांच्या आर्थिक परिस्थितीतला फरक, गावातलं सांस्कृतिक-सामाजिक वातावरण आणि या सगळ्यांच्या पार्श्वभूमीला सूचकपणे असलेली आणीबाणीची किनार... हा काळ आपणही नायकासोबत अनेकदा जगतो. त्याच्यासोबत त्या शेताडीतील वाट चालतो, भाताचा सुगंध छाती भरून घेतो, वर्गात त्याच्याच शेजारी बसून बेंद्रीणबाईंची टवाळी करतो, दूरवरचे सोनारपाड्याचे ते जांभळे डोंगर बघतो, त्याच्यासोबत गावातल्या गणपती मंदिरात येतो आणि प्रदक्षिणाही घालतो, त्याच्यासोबत संध्याकाळच्या क्लासला येतो आणि त्या दाटीवाटीत कोपऱ्यात बसून त्याच्याकडे पाहत राहतो, तो शिरोडकरकडं पाहताना मी त्या दोघांनाही पाहतो... मी स्काउटच्या कॅम्पलाही येतो, मीही गाणी म्हणतो... मी केटी आणि विजयच्या बैठकीतही डोकावतो, मी संध्याकाळी मुकुंदाच्या बाबांसोबत बुद्धिबळ खेळणाऱ्या निकमकाकांच्या मधे बसून त्यांचा खेळ बघत राहतो... मी घराघरातून येणाऱ्या कुकरच्या शिट्ट्यांचे आवाज आणि चाळीत आलेल्या पहिल्या टीव्हीचा आवाज मुकुदांच्याच जोडीने अनुभवतो....
खरं तर माझं जगणं मुकुंदापेक्षा किती तरी वेगळं होतं. यातला नायक मुंबईच्या सान्निध्यात वाढतो, मी एका लहान तालुक्याच्या गावाला... त्याचं टिपिकल चौकोनी कुटुंब होतं, आमचं एकत्र कुटुंब... पण तरीही मग तो एवढा जवळचा का वाटतो? त्या काळात त्याच्यासारखं आपण जगायला हवं होतं, असं तीव्रतेनं का वाटतं? मला वाटतं, त्या वयात असलेलं निरागस मन आपण नंतर हरवून बसलो आहोत. मुकुंदाला भेटलं, की माझं ते निरागस मन पुन्हा मला धावत भेटायला येतं... मग मी अजून विचार करतो आणि माझ्या लक्षात येतं, अरे, मीच मुकुंद आहे! मग आपण तर आपल्याला आवडतोच...

मला यातले अनेक प्रसंग आवडतात. अनेकदा तर आपल्याच आयुष्याचं चित्र लेखक उभं करतो आहे की काय, असंही वाटतं. वर्गात गाण्याच्या भेंड्या सुरू असताना, शिरोडकरनं फळ्यावर लिहिलेलं गाणं मुकुंदानं ओळखणं आणि नंतर ती नाराज झाल्याचं लक्षात आल्यावर पुढच्या वेळी मुद्दाम ते न ओळखणं आणि मग तिनं समजुतीनं याच्याकडं पाहणं हे फार खास आहे. शिवाय ते गणपती मंदिरात पहिल्यांदा भेटतात, तो प्रसंगही लेखकानं इतका उत्कट आणि सुंदर रंगवला आहे की बस! यानंतर स्काउटच्या शिबिराला ते जातात तेव्हाचा प्रसंग आणि नंतर मुकुंदा थेट तिच्या घरी जातो, तो प्रसंग! या प्रत्येक प्रसंगात लेखकानं मुकुंदाची त्या वयातली शारीर जाणीव, त्याला शिरोडकरविषयी वाटत असलेलं ‘ते काही तरी’, त्याची धडधड, आजूबाजूच्या लोकांची-कुटुंबाची सतत धास्ती घेत जगण्याची वृत्ती हे सगळं फार नेमकेपणानं टिपलं आहे. मंदिरातला प्रसंग आणि ती तिच्या बहिणीला घेऊन येते त्यानंतर मुकुंदाची उडालेली धांदल लेखक फार प्रेमानं चितारतो. या गणपती मंदिरातलं एकूण वातावरण, तिथं रोज येणारे त्या गावातले भाविक, सतत ‘तू इथं काय करतोयस?’ असं विचारणारी आणि गावातल्या प्रत्येक मुलाला ओळखणारी मोठी माणसं, तिथला फुलवाला, देवळातल्या बायका असं सगळं चित्र लेखक तपशीलवार उभं करतो. एका अर्थानं नंतर घडणाऱ्या फार गोड अशा प्रेमप्रसंगासाठी एक कॅनव्हास तयार करतो. नायक मुकुंदाला शिरोडकर तिथं भेटायला येईल की नाही, याची खात्री नसते. मात्र, ती यावी अशी मनोमन प्रार्थना तो करत असतो. त्यासाठी ‘ती येणार नाही, ती येणार नाही’ असं मुद्दाम उलटं घोकत असतो. अखेर ठरलेली वेळ उलटून गेल्यावर काही वेळानं ‘ती’ येते. तिला पाहून मुकुंदा हरखतो. तिच्यासोबत तिची लहान बहीणही असते. ते पाहून तो जरा नाराजही होतो. या प्रसंगाला मुकुंदाचा जो काही शारीरिक प्रतिसाद असतो, तो सगळा लेखक कमालीच्या आत्मीयतेनं आणि प्रेमानं रंगवतो. अखेर अगदी थोडा वेळ त्यांची भेट होते. काही तरी जुजबीच ते बोलतात आणि ती लगबगीनं तिथून निघून जाते. मुकुंदा एवढ्यावरही खूश असतो. ती आली याचंच त्याला विशेष वाटत असतं. मुकुंदासारखीच भावना असणारे त्या वयातले किती तरी मुलं जसं वागतील, जसा प्रतिसाद देतील, जसं व्यक्त होतील अगदी तसंच या कादंबरीचा नायक करतो. म्हणूनच तो अधिकाधिक आपला वाटतो.
कादंबरी या वाङ्मय प्रकाराची सारी वैशिष्ट्यं लेखक यात वापरतो. म्हटलं तर काल्पनिक, म्हटलं तर स्पष्टच आत्मकथनात्मक असं निवेदन लेखकानं यात वापरलं आहे. याचा फायदा म्हणजे वाचकांच्या कल्पनाशक्तीला पूर्ण वाव मिळतो. लेखक या कादंबरीतलं पर्यावरण अशा खुबीनं रंगवतो, की ते सगळं आपल्याला तर दिसतंच; शिवाय आपल्या वैयक्तिक अनुभवविश्वाची जोड त्याला देऊन आपण आपली वेगळी ‘शाळा’ मनात भरवू लागतो. आपल्याला आपल्या ’त्या‘ वयातले अनुभव आठवू लागतात. लेखकानं ते अशा कौशल्यानं वर्णिले आहेत, की प्रत्येक वाचकाला त्यात आपल्या स्वत:च्या ‘गाळलेल्या जागा’ तिथे भरता येतील.
संपूर्ण कादंबरी अशा रीतीनं आपल्याला आपल्या ‘काफ लव्ह’ची आठवण करून देते; शिवाय आपल्याला पुन्हा एकदा त्या कोवळ्या प्रेमाच्या प्रेमात पाडते. त्या वयातल्या आपल्या आठवणी आयुष्यभर कधीही न विसरता येण्यासारख्याच असतात. ‘शाळा’ आपल्याला पुन्हा त्या दिवसांत नेते आणि स्मरणरंजनाचं सुख मिळवून देते.
एका अर्थानं हा मुकुंदा आणि त्याची ती ‘शाळा’ म्हणजे माझं, काळाच्या शिळेत आणि पुस्तकांच्या पानांत कोरून ठेवलेलं पौगंड आहे... आणि म्हणूनच मला ती फार फार प्रिय आहे!

---

(पूर्वप्रसिद्धी : दृष्टी-श्रुती डिजिटल दिवाळी अंक २०२३)

---