आत्माहीन सौंदर्य...
------------------------
------------------------
माणसानं नियमांच्या आणि शिस्तीच्या चौकटीत
हरवून न जाता, जगण्याचा मनमुराद आनंद लुटला पाहिजे; आखीवरेखीव पण
चाकोरीबद्ध आयुष्याच्या सीमारेषा लंघून विविधरंगी जगाची मौज अनुभवली
पाहिजे, या तत्त्वज्ञानाला भारतातील मध्यमवर्गीयांच्या हृदयात अगदी नाजूक,
खास स्थान आहे. स्वाभाविकच आहे. जी गोष्ट आपल्याला करायला जमत नाही,
त्याबद्दल माणसाला एक सुप्त आकर्षण मनात असतंच. मध्यमवर्गीयांना हे
तत्त्वज्ञान शिकवणारा एक सिनेमा ‘मध्यमवर्गीय सिनेमांचे मास्तर’ हृषीकेश
मुखर्जी यांनी १९८० मध्ये दिग्दर्शित केला होता. त्याचं नाव ‘खूबसुरत’.
तेव्हाची चुलबुली, हॉट, ‘युवा दिलों की धडकन’ रेखा हिच्या सहजसुंदर
अभिनयानं आणि दीना पाठक यांनी रंगवलेल्या करड्या शिस्तीच्या गृहिणीशी
होणाऱ्या तिच्या संघर्षातून कौटुंबिक जगण्याविषयीचं ‘खूबसुरत’ तत्त्वज्ञान
त्या सिनेमानं प्रेक्षकांच्या हाती ठेवलं होतं. अशा या कुटुंब नावाच्या
संस्थेविषयी जिव्हाळा असल्याचा दावा करणाऱ्या वॉल्ट डिस्ने फिल्म कंपनीनं
जेव्हा भारतात पहिल्यांदा सिनेमा काढायचं ठरवलं, तेव्हा त्यांना या
गाजलेल्या सिनेमाचा रिमेक करावासा वाटणं अगदी स्वाभाविक होतं. दिग्दर्शक
शशांक घोष यांनी रेखाच्या जागी सोनम कपूर आणि दीना पाठक यांच्या जागी
त्यांचीच कन्या रत्ना पाठक-शाह यांना घेऊन काढलेला ‘खूबसुरत’ मात्र नेमका
याच तत्त्वज्ञानात कमी पडतो. म्हणजे सिनेमाच्या बाह्य सौंदर्याचे सगळे नियम
आणि शिस्त त्यानं पाळले आहेत; पण त्यांच्या आहारी जाऊन, सिनेमा पाहणाऱ्या
प्रेक्षकाला त्या गोष्टीची आंतरिक मौज सांगणारा आत्मा मात्र या सिनेमानं
गमावला आहे. त्यामुळंच पूर्वार्धात काहीशा अपेक्षा उंचावणारा हा सिनेमा
उत्तरार्धात भलताच कंटाळवाणा आणि एकसुरीपणाकडं झुकला आहे. किंबहुना तो कधी
एकदाचा संपतो, असं आपल्याला होऊन जातं आणि हे नव्या ‘खूबसुरत’चं मोठंच अपयश
आहे.
जुन्या ‘खूबसुरत’चा हा अगदी ‘फ्रेम टु फ्रेम’
रिमेक नाही आणि त्या सिनेमाचं फक्त मर्म या नव्या सिनेमानं घेतलं आहे, असं
वरकरणी दिसतं. त्यामुळंच आजच्या काळानुरूप सिनेमात बदलही भरपूर करण्यात आले
आहेत. पुण्यातली साधी मध्यमवर्गीय कुटुंबप्रमुख असलेली निर्मला गुप्ता ही
कडक गृहिणी इथं थेट राजस्थानातील संभलगड संस्थानाची महाराणी झाली आहे. तिथं
अशोककुमार यांनी साकारलेला प्रेमळ, पण पत्नीच्या धाकात राहणारा
कुटुंबप्रमुख हे त्या सिनेमातलं एक महत्त्वाचं पात्र होतं. इथं त्या
पात्राला तुलनेत दुय्यम स्थान आहे. तिथं नायिकेचं मंजू हे नाव इथल्या
नायिकेच्या आईला मिळालं आहे, तर राणीसांचं कुटुंबही काळानुसार कमी झालं
आहे. याउलट मंजूच्या घरचा नोकर अश्रफी इथंही कायम राहिला आहे, पण दुय्यम
रूपातच. त्या सिनेमातल्या मंजूला आई नसतेच, तर इथं आई व वडील दोन्ही आहेत व
आई जास्त प्रभावी आहे. अर्थात हे सर्व बदल करायलाही हरकत नाही. पण हे सर्व
तसे बाह्य, किंवा कॉस्मेटिक बदल आहेत. कुटुंबप्रमुख आईच्या दराऱ्याखाली व
शिस्तीखाली दबल्या गेलेल्या कुटुंबांत बाहेरून एक ‘हॅपी गो लकी’ मुलगी येते
आणि सर्व सदस्यांना आपापल्या जगण्याचा सूर पुन्हा मिळवून देते, आयुष्य
‘खूबसुरत’ आहे, हे सांगते, हे त्या कथेचं मध्यवर्ती मर्म! तेच नव्या
‘खूबसुरत’मध्ये दबल्यासारखं झालं आहे. सिनेमानं धारण केलेलं नवं पर्यावरणही
या मध्यवर्ती सूत्राला पूरक नाहीय. शिवाय कुटुंब व त्यांतील नातेसंबंध
काहीसे बाजूला पडून, या नव्या सिनेमानं उत्तरार्धात पकडलेला प्रेमकथेचा
ट्रॅक हाही त्या मर्मावर घाव घालणाराच ठरला आहे.
या नव्या सिनेमाची नायिका डॉ. मृणालिनी
चक्रवर्ती उर्फ मिली (सोनम कपूर) आयपीएलच्या खेळाडूंना तंदुरुस्त ठेवण्याचं
काम करत असते. ती संभलगडच्या राजघराण्यात फिजिओथेरपिस्ट म्हणून जाते तीच
मुळी राजघराण्याच्या आमंत्रणावरून. शेखरसिंह राजेसाहेबांचे (आमिर रझा
हुसेन) पाय गुडघ्यापासून खाली पांगळे झाले आहेत, ते दुरुस्त करण्याचं काम
मिलीवर आलं आहे. इथं त्या आघाताचीही एक वेगळी कहाणी आहे. राणीसाहेबांचा
(रत्ना पाठक-शाह) दरारा सुरुवातीलाच जाणवतो, परंतु नंतर त्या दराऱ्यामागचं
सूत्र मात्र हरवत जातं. युवराज विक्रमसिंह राठोड (फवाद खान) आणि मिलीची
सुरुवातीला चकमक उडते आणि नंतर हळूहळू त्यांची गाडी योग्य त्या
(प्रेमाच्या) ट्रॅकवर जातेच. पण हा सगळा प्रवास साकारताना मिलीला त्या
घरातील शिस्तीखाली दबलेलं वातावरण हलकं करण्यासाठीचं प्रयोजन देण्यात
दिग्दर्शक कमी पडला आहे. म्हणजे नव्या काळातील मुलगी म्हणून तिचं आधुनिक
रूप दाखवण्याच्या नादात ती मुळात एक फिजिओ डॉक्टर आहे, याचाच दिग्दर्शकाला
विसर पडलाय की काय, असं वाटतं. मिलीच्या आईचं पात्रही काहीसं डोईजड झालं
आहे. एकुणात, यातल्या एका वेगळ्या जीवनशैलीतल्या मुलीमुळं एका बंदिस्त
कुटुंबात होणारा कायापालट हा प्रवास काहीसा बाजूला राहतो आणि
नायक-नायिकेच्या प्रेमकहाणीलाच अधिक महत्त्व येतं. त्यातच नायिकेचं अपहरण
होण्याचा एक प्रसंग तर सिनेमात अक्षरशः ठिगळ चिकटवल्यासारखा येतो. तो मूळ
कथानकाशी किंवा प्रवाहाशी मुळीच ‘इन सिंक’ नाही. उत्तरार्धातही सूरजगडच्या
राजाकडं या दोघांचं जाणं, तिथं राजेसाहेबांसह तिघांनीही टल्ली होऊन पडणं,
नंतर मिलीच्या आई-वडिलांचं संभलगडला येणं वगैरे भाग अति ताणल्यासारखा झाला
आहे. शिवाय विक्रमच्या प्रेयसीचा - किआराचा - एक मुंबईतला ट्रॅक आहे. तोही
फार अर्धवट आणि ठिगळ लावल्यासारखा आला आहे. थोडक्यात, सिनेमाच्या पटकथेत
आणि संकलनातही बरीच गडबड झाली आहे. विशेषतः उत्तरार्ध सांधता सांधता
दिग्दर्शकाची बरीच पंचाईत झालेली दिसून येते. त्यामुळंच प्रेक्षकही जांभया
देऊ लागतो आणि शेवटाची वाट पाहू लागतो.
अभिनयात सोनम कपूरनं बाजी मारली आहे. ती
भारतातली सर्वश्रेष्ठ फॅशन आयकॉन आहे, यात शंकाच नाही. तिची ही भूमिका
तिच्या या प्रतिमेला साजेशी आहे. तिनं खूप मनापासून एंजॉय केलेली मिली
आपल्यालाही भावते. पण तिला कथेकडून नीट सपोर्ट मिळालेला नाही. पाकिस्तानी
अभिनेता फवाद खानही खूप अवघडल्यासारखा वावरला आहे. त्याच्या भूमिकेतही तसंच
काहीसं अपेक्षित असलं, तरी जिथं खुलायला हवं तिथंही हे पात्र खुलताना दिसत
नाही. एकूणच अत्यंत अनकम्फर्टेबल असा वावर फवादला पदार्पणात फार काही
टाळ्या मिळवून देऊ शकणार नाही. रत्ना पाठक-शाह यांनी राणीसांचा तोरा
ठसक्यात दाखवला आहे. पण विशेष म्हणजे ही भूमिकाही अर्धीकच्चीच वाटते.
त्याउलट किरण खेर यांनी मंजूच्या भूमिकेत धमाल उडवली आहे. पण त्याही कधी
कधी पात्राच्या बाहेर घेऊन लाफ्टर घेतायत की काय, असं वाटतं. असो.
सिनेमाला स्नेहा खानवलकर यांचं संगीत आहे.
‘एंजन की सिट्टी’ आणि ‘मेरी माँ का फोन’ ही गाणी मस्त जमली आहेत. बाकीची
गाणीही चांगली आहेत, पण लक्षात राहत नाहीत.
तेव्हा ‘ब्यूटी विदाउट सोल’ म्हणजे काय, याचा
अनुभव घ्यायचा असेल, तर ‘खूबसुरत’ नक्की पाहा; अन्यथा जुन्या खूबसूरतची
डीव्हीडी केव्हाही चांगली.
---
निर्माता : वॉल्ट डिस्ने, अनिल कपूर फिल्म कंपनी, सिद्धार्थ रॉय कपूर
दिग्दर्शक : शशांक घोष
कथा : इंदिरा बिश्त
संगीत : स्नेहा खानवलकर
प्रमुख भूमिका : सोनम कपूर, फवाद खान, रत्ना पाठक-शाह, किरण खेर, आमिर रझा हुसेन, प्रसन्नजित चॅटर्जी
कालावधी : दोन तास दहा मिनिटे
दर्जा : **
---
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे, २० सप्टेंबर २०१४)
----