31 Jul 2019

मन-मितवा - भाग ४ ते ६

मन-मितवा

--------------------

माझ्या स्नेही प्रा. डॉ. वर्षा तोडमल यांच्या विनंतीवरून ‘मनशक्ती’ मासिकात मी फेब्रुवारीपासून ‘मन-मितवा’ या नावाचं एक सदर लिहितो आहे. माझ्या आत्तापर्यंतच्या हलक्याफुलक्या लेखनापेक्षा हे लेखन जरा वेगळं आहे. मनाशी साधलेला संवाद असं त्याचं स्वरूप आहे. यातही गणू गणपुले आहेच. पण लेखनाचा बाज किंचित वेगळा आहे. त्या मासिकात प्रसिद्ध झालेले पहिले तीन भाग पूर्वी ब्लॉगवर प्रसिद्ध केले आहेत. आता भाग ४ ते ६ देत आहे. आपल्याला हे लेखन आवडेल, असा मला विश्वास आहे.

-----

४. सहेला रे...
--------------------

मनाच्या ‘सीसीटीव्ही’ची गंमत कळताच गणूला मजा वाटली. आता मनाच्या सीसीटीव्हीत अधूनमधून पाहायचं त्यानं ठरवून टाकलं. आपल्या मनाच्या गमतीशीर लीला पाहताना त्याला आता नव्यानं काही काही गोष्टी कळू लागल्या. एक तर या सीसीटीव्हीतून काहीच सुटत नाही, हे एक! त्यामुळं आता मनाशी लपाछपी खेळण्यात काहीच अर्थ नव्हता. त्यामुळं आपल्याला जे जे वाटतं, ते मनाला सांगावं आणि त्याच्या मनात काय आहे, त्याला काय वाटतं, हे त्याच्याकडून ऐकावं हेच योग्य, असं गणूनं ठरवून टाकलं. ‘मन क्यूं बहका रे बहका...’ हे गाणं त्यानं आपल्या मेमरीकडून कायमचं डिलीट करून टाकलं. आयुष्यात पुन्हा एकदा शहाण्या, सरळ, पापभीरू माणसासारखं वागायचं, असंही त्यानं पक्कं ठरवलं. काही दिवस आनंदात गेले. मनही खूश होतं. ते स्वत:हून कधी गणूशी बोलत नसे; पण गणूला त्याच्या मूडचा अंदाज येत असे. ‘सीसीटीव्ही’च्या परिणामामुळं आपल्यात हा बदल झालाय, हे गणोबाला कळत होतं. त्यामुळंच त्याच्या मनाचंही बरं चाललं होतं. अधूनमधून फिरकी घेणारं त्याचं मनही अगदी शहाण्या मनासारखं वागू लागलं होतं. विमान एका विशिष्ट उंचीवर गेल्यावर ‘ऑटो-पायलट’ मोडवर टाकतात आणि मग वैमानिक अगदी झोपूही शकतो, तसं गणूनं स्वत:ला व स्वत:च्या मनाला ‘ऑटो-पायलट’ मोडवर टाकून दिलं. पण गंमत अशी, की एखाद्या हायवेवरून कार चालवताना अगदी सरळसोट रस्ता असेल, तर ड्रायव्हरला झोप लागू शकते. कंटाळा येऊ शकतो. त्यामुळं रस्ता कसा ‘वळणदार’ हवा! गणूला ‘ऑटो-पायलट’ मोडवाला सरळसोट रस्ता कालांतरानं बोअर व्हायला लागला होता. आपल्या मनाला हे असलं मिळमिळीत जगणं कंटाळवाणं वाटत नाही का, असा प्रश्न गणूला पडला. फार दिवस मनाशी गप्पा झाल्या नव्हत्या. मग एके दिवशी गणोबांनी बाइक काढली आणि शहराच्या बाहेर हायवेलगत असलेल्या त्या तळ्यापाशी येऊन ते बसले. इथं थोडीफार बाग केली होती; बाक टाकले होते. इथं पर्यटकांची लगबग असतेच. पण तुलनेनं हा भाग जरा शांत होता. त्यात दुपारची वेळ होती. गणूनं आपला नेहमीचा कोपऱ्यातला बाक पकडला आणि तो ‘चिंतन मोड’मध्ये गेला. अशा वेळी त्याला आधी हेडफोनवर किशोरी किंवा कुमार गंधर्व ऐकायची सवय होती. किशोरीताईंचा एखादा राग किंवा कुमारांचं एखादं निर्गुणी भजन ऐकलं, की त्याला शांत शांत वाटत असे. तसं आत्ताही त्यानं मोबाइलमधून कुमारांचं ‘शून्य गढ शहर’ लावलं आणि तो डोळे मिटून ते ऐकायला लागला. कुमारांच्या त्या आवाजातून योग्य तो परिणाम साधला जाऊ लागला. त्याला एकदम शांत शांत वाटू लागलं. आपलं शरीर एकदम हलकं झालं असून, आपण ढगांवरून तरंगत चाललो आहोत, असाही भास त्याला झाला. अशी ‘झीरो ग्रॅव्हिटी’ची अवस्था कायम लाभायला हवी, असं त्याला वाटू लागलं...
मनाशी गप्पा मारायला हीच योग्य वेळ होती. गणूनं डोळे न उघडता, ढगांवरून उडत असल्याचा फील कायम ठेवून मनाला विचारलं, ‘काय मनोबा, बरंय का?’
गणूचं मन गाणं ऐकण्यात गुंगलं होतं. ते जरा दचकलं. म्हणालं, ‘श्शू... शांत बस... ऐकू दे हे...’ 
मग गणू एकदम शांत बसला. पण गाणं संपल्यावर त्याला राहवेना.
‘ऐक ना, ए मन्या,’ गणू मनाला हाक मारत म्हणाला.
‘हं, बोल आता... तुला आली म्हणायची माझी आठवण...’ गणूचं मन उत्तरलं.
‘घ्या... तुमचं हे असं आहे. बोललो तरी तुला प्रॉब्लेम, नाही बोललो तरी प्रॉब्लेम... माझ्यासारख्या गरीब माणसानं करावं तरी काय?’ गणू चिडचिडला.
‘हा हा हा... गणोबा, गंमत केली. एवढं कळतं ना...’ मन खदखदा हसत म्हणालं. गणू आणखी चिडचिडा झाला.
आता संध्याकाळचं ऊन थेट तोंडावर यायला लागलं. त्यामुळं त्याच्या त्रासात भरच पडली. तो एक हात डोळ्यांवर ठेवून म्हणाला, ‘कळते हो, सगळी गंमत कळते. गेली काही वर्षं तुम्ही आमची जी गंमत चालविली आहे ना, ती केवळ थोर आहे हो!’
यावर गणूचं मन म्हणालं, ‘मी कुणाचीही गंमत करायला जात नाही. पण माझ्यापासून लपवून गोष्टी करणाऱ्यांची गंमत मात्र मी बघत बसतो हे नक्की.’
गणू म्हणाला, ‘माहिती आहे. गेले काही दिवस आपण त्यावरच बोलतोय आणि आता माझ्या मते, तो प्रश्न मिटला आहे. आता आपली गाडी फारच सरळ निघाली आहे. मी इकडं-तिकडं कुठंही पाहत नाहीये... मी आणि तू... आपण दोघे एकमेकांना बरे... एवढाच विचार मी केलाय. पण खरं सांग मनोबा, कंटाळा आला की नाही?’
‘सरळसोट जगणं कंटाळवाणं वाटतं, हाच तुमच्या जगण्याचा पेच आहे,’ गणूचं मन गंभीर होत म्हणालं. ‘तुम्हाला सदैव थ्रिल पाहिजे. साध्या गोष्टींना तुम्ही भुलत नाही, तुमचं पोट भरत नाही. तुम्हाला सदैव काही तरी वेगळं पाहिजे. सतत नवं पाहिजे. तुमच्या या घाटदार जगण्याच्या अपेक्षांनी मी केवळ स्तिमित झालो आहे...’ मन चिंतनशील होऊन बोलत राहिलं...
गणू ऐकत राहिला. सरळ जगणं हा पेच वाटतोय का आपल्याला? काय घडलं म्हणजे आपल्याला ‘मज्जा’ येईल? 
गणूला ठरवता येईना. अशा वेळी मनाला शरण जाणं हाच एक उपाय असतो. गणूनं तेच केलं.
‘मग काय करायचं म्हणता महाराजा? हा सरळ जगण्याचा आडवळणी पेच सुटायचा कसा?’
मन म्हणालं, ’सोपं आहे. साधं-सरळ जगून पाहणं हेच एक थ्रिल आहे, असं समजायचं...’
गणू काय ते समजला. त्यानं शांतपणे डोळे मिटले. ‘सहेला रे...’ सुरू झालं... तो आणि त्याचं मन किशोरीच्या स्वरात डुंबून गेलं... समोर सूर्य अस्ताला निघाला होता आणि आसमंत शांत शांत होत होता....

(क्रमश:)

----

५. पर्जन्यसूक्त
-------------------

गणूला पाऊस आवडतो. धुवाँधार कोसळणारा पाऊस सुरू झाला, की हातातली सगळी कामं बाजूला ठेवून त्या अविरत कोसळणाऱ्या जलधारांकडं पाहत बसायला त्याला आवडतं. उन्हाळा हा त्याचा अत्यंत नावडता ऋतू होता. तेव्हा कधी एकदा उन्हाळा संपतो आणि पाऊस येतो असं त्याला होऊन जातं. माणसं शब्दाला जागत नाहीत, वचनं विसरतात, शपथा मोडतात; पण निसर्ग असं कधीही करत नाही. तो त्याच्या ठरलेल्या वेळेला येतोच. कधी तरी प्रतीक्षा करायला लावतो हेही खरं. पण अजिबातच यायचं नाही, असं तो कधीही करत नाही. त्यामुळं मे महिना संपला आणि जून उजाडला, की गणूला पर्जन्यऋतूचे वेध लागतात. अशा धुवाँधार पावसात बाइक काढायची आणि डोंगर-दऱ्यांत हिंडायला जायचं ही गणूची आवडती सवय. हल्ली पावसाळ्यात त्याच्या शहराजवळचं एकही ठिकाण निर्मनुष्य उरत नाही. निसर्गाला कडकडून भेटायला सगळेच आतुर! पण मग शांतता नसेल, तर संवाद व्हायचा कसा? मग गणूनं शोधून शोधून काही ठिकाणं वेचून काढली होती. ती अजून तरी फार कुणाला माहिती नव्हती. आषाढातल्या संततधारेची छान अशी झड लागली, की गणू बाहेर पडायचाच. सचैल भिजत तो गाडीवरून दूर दूर जात राहायचा. मग त्याचं आवडतं ठिकाण आलं, की गाडी उभी करून, तिथल्या एका आंब्याच्या झाडाखाली असलेल्या चौथऱ्यावर तो बसायचा. समोर भाताची शेतं आणि त्यापलीकडं डोंगर... त्यावरून येणारे शुभ्रफेसाळ धबधबे. गणूला समाधी अवस्था प्राप्त व्हायची अशा वेळी! 
....आणि, ‘हीच ती वेळ गणूशी बोलायची,’ असं म्हणून गणूचं मन त्याच्याशी संवाद साधू लागायचं. त्या दिवशीही असंच झालं...
‘काय गणोबा, बरं वाटतंय का?’ मनानं विचारलं.
‘हं...’ गणू उत्तरला. 
‘लागली का समाधी?’
‘हं...’ गणू अशा वेळी एकाक्षरी उत्तरं द्यायचा.
‘का आवडतं रे तुला इथं यायला?’ मन प्रश्न विचारायचं सोडत नव्हतं.
‘हे बघ, मला जरा शांत बसू दे आणि तूही शांत हो बरं...’ गणू वैतागून मनावर ओरडला.
‘हो रे बाबा, बसतो बापडा शांत... पण कधी तरी मला हे सांग. मला तुझ्याकडून ऐकायचंच आहे...’ मनानं आपला हट्ट चालू ठेवला.
‘बरं ऐक...’ गणू शेवटी कंटाळून म्हणाला, ‘मला ना निसर्ग आवडतो. याचं कारण म्हणजे तो आपल्याला देण्यात कधीच कुचराई करत नाही. तो कधीही आपल्याला फसवत नाही. आपल्याला काही मागत नाही. सदैव दात्याच्या भूमिकेत असतो. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे निसर्ग म्हणजे या पृथ्वीतलावरची प्युअरेस्ट, सर्वांत शुद्ध गोष्ट आहे. आता हे पावसाचं पाणीच बघ. वैज्ञानिकदृष्ट्या हे सिद्ध झालेलं आहे, की जमिनीवर पडण्यापूर्वीचं पावसाचं पाणी हे पाण्याचं सर्वांत शुद्ध रूप असतं. माहितीय का? तर मला हे निसर्गाचं प्युअर असणं, शुद्ध असणं फार आवडतं.’
‘व्वा...’ मन कौतुकानं म्हणालं, ‘म्हणजे जे आपल्याला होता येत नाही, ते आपल्याला आवडतं तसंच ना रे हे!’
गणू एक मिनिट विचारात पडला. त्यानं मनाला विचारलं, ‘म्हणजे काय म्हणायचंय तुला?’
‘अरे, साधी गोष्ट आहे. निसर्ग शुद्ध आहे आणि आपण तितके शुद्ध, तितके प्युअर कधीच नसतो. हां, फार तर जन्मल्या जन्मल्या पहिली तीन-चार वर्षं आपण तसे असू. पण नंतर आपण नाना विकारांनी ग्रस्त होतो. आपल्यातली शुद्धता लोप पावते आणि आपण हळूहळू सर्व बाबतींत करप्ट व्हायला लागतो.’
‘हं... खरंय तुझं. म्हणूनच या शुद्धतेची ओढ लागत असावी,’ गणू म्हणाला.  
गणूचं मन म्हणालं, ‘पण आपण लबाड असतो रे. आपल्याला ही शुद्धता आपल्या अंगी बाणवायला नकोच असते. फक्त मनातला अपराधभाव फार वाढला, की असे पावसाचे चार थेंब अंगावर घेतल्यासारखी ती आपल्याला थोडा वेळ हवी असते. मग आपण आपलं समाधान झालं, की अंग खसखसा पुसून कोरडं करतो, तशीही ही शुद्धताही पुन्हा झटकून टाकतो आणि आपल्या मूळच्या मलीन जगण्याकडं वळतो.’
‘पण याला कुणीच अपवाद नाहीय. मीही इतरांसारखाच माणूस आहे. मग माझंही तसंच झालं तर त्यात वेगळं काय घडलं?’ गणू मनाला विचारता झाला.
‘वेगळं काहीच घडत नाही, हेच तर दुखणं आहे ना माझं,’ मन वैतागून म्हणालं. 
‘काय म्हणायचंय काय तुला?’ गणूनं शंकेनं विचारलं.
‘अरे, सगळे जण असाच विचार करतात ना, त्याची गंमत वाटली. मी सर्वसामान्य आहे, इतरांसारखाच आहे असाच विचार सगळ्यांनी केला, तर त्यातून वेगळा विचार करणारा कुणी निपजणारच नाही,’ मन आपला मुद्दा स्पष्ट करीत म्हणालं.
‘अरे, एवढा सुंदर निसर्ग आहे... सुंदर धबधबा कोसळतोय समोर आणि तू हे काय तत्त्वज्ञानाचं व्याख्यान लावलं आहेस?’ गणू त्रस्त होऊन विचारता झाला.
त्यावर मन शांतपणे म्हणालं, ‘नाही, नाही... तू आनंद लूट... तुला ही संधी फार कमी वेळा मिळते, हे मी अनेकदा पाहिलंय. माझं मात्र तसं नाही. तुझ्या भल्यासाठी मला सतत काही तरी विचार करणं भागच आहे.’
गणू थोडासा विचारात पडला अन् म्हणाला, ‘एवढा माझा विचार करतोस? मी मात्र तुझा विचार करत नाही....’
‘असं नाहीय. तू इथं आलास हेही खूप आहे माझ्यासाठी. एक गोष्ट कायम लक्षात ठेव. तू स्वत:साठी म्हणून जो खास वेळ काढतोस ना, तो माझ्यासाठीही असतोच. तेव्हा मी सदैव तुझ्याच सोबत असतो,’ मन हसत बोललं...
‘हं...’ गणू शांतावत उत्तरला.
‘आता एकच गोष्ट कर,’ मन म्हणालं.
‘काय करू सांग,’ गणू म्हणाला.
‘या पावसानं ही जमीन कशी स्वच्छ धुतली गेलीय ना, तसा तूही आतून-बाहेरून शुद्ध हो, निर्मळ हो... बघ जमतंय का?’ मनानं गणूला सुचवलं.
गणू समजून शांतपणे हसला. समाधानानं हसला.
आता समोर पाऊस आणखीन आवेगानं कोसळत होता. धबधबा बेफामपणे खाली झेपावत होता... 
...आणि गणू व त्याचं मन एकाच वेळी समाधी अवस्थेत पोचले होते!

(क्रमश:)

---

६. स्वातंत्र्य *
----------------


ऑगस्ट महिना उजाडला, की गणूला स्वातंत्र्यदिनाचे, तर त्याच्या मनाला श्रावणाचे वेध लागतात. स्वातंत्र्यदिनाचं आणि अर्थातच स्वातंत्र्याचं महत्त्व गणू जाणतो. त्याच्या जन्माच्या वेळी देश स्वतंत्रच होता. त्यामुळं पारतंत्र्य म्हणजे काय, हे त्याला खरं तर माहिती नाही. पण आपल्याला हवं ते करण्याचं स्वातंत्र्य नाही आणि दुसऱ्या कोणाच्या तरी तालावर आपल्याला नाचावं लागेल ही कल्पनाच गणूला सहन होत नव्हती. यथावकाश गणूचं लग्न झालं आणि... मग सगळंच बदललं! गणूला स्वातंत्र्य, पारतंत्र्य आदी सगळ्या संकल्पनांचे अर्थ नीटच समजू लागले. गणूला विवाहोत्तर आयुष्यात जे काही कथित स्वातंत्र्य मिळालं होतं, ते म्हणजे एखाद्या वाघाला प्राणिसंग्रहालयातील मोठ्या पिंजऱ्यात फिरण्याचं स्वातंत्र्य होतं, हे त्याला खूप उशिरा कळलं. गणूचं मन त्याला याबाबतीत नेहमी हसत असे. गणूला त्याच्या विवाहपूर्व काळाची आठवण करून देत चिडवणं हा गणूच्या मनाचा आवडता छंद होता. 
नागपंचमीच्या दिवशी अर्धांगानं केलेली पुरणाची दिंडं रेटून गणू एखाद्या अजगरासारखा दुपारी लोळत होता. बाहेर पावसाची संथ, बारीक धार आणि पुरण खाऊन डोळ्यांवर आलेली सुस्ती अशा वातावरणात गणूचं मन नेहमीच त्याला बेसावध गाठत असे. 
आताही तेच झालं. मन म्हणालं, ‘झालं का मनसोक्त गोडधोडाचं जेवण? माझाही जरा विचार करा...’
गणू म्हणाला, ‘पूर्वी मी तुझाच विचार करून खायचो. तुला जे आवडेल ते आणि तेवढं. मला आता मला दुसरं कुणी तरी सांगतं, की हे खाऊ नका, ते खाऊ नका. गोड कमी खा, वजन कमी करा इत्यादी इत्यादी...’
मन म्हणालं, ‘अरेरे, हे तर पारतंत्र्य झालं. आणि गणोबा, तुमचं पारतंत्र्य म्हणजे आमचं मरणच की!’
गणू उत्तरला, ‘आधी मी मनसोक्त जगलो. त्यामुळं आता निर्बंध सोसावे लागताहेत... आधी तुझा विचार केला, आता मला माझ्या शरीराचा विचार करू दे.’
मन खट्टू होत म्हणालं, ‘तेव्हाही मी तुला म्हटलं नव्हतं, की शरीराला अपाय होईल, असं वाग म्हणून... आता उगाच माझं नाव का घेतोस?‘
गणू म्हणाला, ‘असंच असतं. स्वातंत्र्याची किंमत म्हण हवं तर... वाल्या कोळ्याच्या पापात सहभागी व्हायला त्याचं कुटुंबही तयार झालं नाही. इथंही तसंच आहे. तुला खूश ठेवून मला तोटा होणार असेल, तर तुला खूश ठेवणं अवघड आहे.’
मन विचारात पडलं आणि बोललं, ‘पण मला खूश ठेवून तुला तुझ्या शरीरालाही खूश ठेवता येईलच की.’
गणू म्हणाला, ‘ते कसं काय?’
मन उत्तरलं, ‘तू स्पायडरमॅन सिनेमा पाहिलायेस का? त्यात एक वाक्य आहे बघ. ग्रेट पॉवर कम्स विथ ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी!’
गणू वैतागला, ‘हो माहितीय की! त्याचं काय इथं?’
गणूचं मन हसत म्हणालं, ‘अरे? संबंध नाही कसा? स्वातंत्र्य म्हणजे एक प्रकारची सत्ताच असते की नाही, तुमच्या हाती आलेली? मग स्वातंत्र्य मिळालं, की ते नीट उपभोगण्याची जबाबदारीही येतेच ना... त्यामुळं तुला शरीरासोबत मनालाही खूश ठेवावंच लागणार... आम्ही दोघंही तुझाच भाग आहोत ना!’
गणू हताश होत म्हणाला, ‘हे कुणाला जमेल असं वाटत नाही. शरीराला खूश केलं, की मन नाराज आणि मनाला खूश केलं, की शरीर कुरकुर करणार... अवघड आहे.’
मन म्हणालं, ‘अवघड आहेच. जगात काहीच सोपं नाही. स्वातंत्र्य मिळवणं सोपं नाही आणि मिळवलेलं टिकवणं तर त्याहून नाही.’
गणू म्हणाला, ‘मग यावर उपाय काय? तूच सांग बाबा. पुनश्च शरण येतो.’
मन हसून म्हणालं, ‘मी म्हणजे तूच आहेस. मला शरण येऊ नकोस. स्वत: विचार कर. तुला मिळालेलं स्वातंत्र्य नीट वापरतो आहेस ना? स्वातंत्र्यासोबत येणारी जबाबदारी व्यवस्थित पार पाडतो आहेस ना?’
गणू म्हणाला, ‘खरंय तुझं. आम्हाला स्वातंत्र्य हवं असतं आणि ते कसं वापरायचं याचंही परत स्वातंत्र्य हवं असतं. स्वातंत्र्याच्याही ‘अटी व शर्ती’ असतात हे आम्हाला माहितीच नाही.’
मन सांगू लागलं, ‘अटी व शर्ती असतात, हे बरोबर. पण त्या तुझ्याच चांगल्यासाठी असतात, हे लक्षात ठेव.’
गणू म्हणाला, ‘शब्दांचे फुलोरे खूप छान फुलवता येतात तुला. प्रत्यक्ष जगणं तुझ्या आदर्शवादी शब्दांपेक्षा खूप अवघड आहे, एवढंच लक्षात ठेव. तिथं मला लढावं लागतं.’
मन म्हणालं, ‘तुझ्या प्रत्येक लढाईत मी तुझ्या सोबत आहे, हे कायम लक्षात असू दे. फक्त माझ्यापासून लपवून काही करू नकोस. तुझं स्वातंत्र्य हे माझंही स्वातंत्र्य आहे. त्यामुळं तुझ्या स्वातंत्र्याची जास्त किंमत मलाच आहे.’
गणू म्हणाला, ‘हं, आलं लक्षात. स्वातंत्र्य मला मिळालं असलं, तरी मी त्याचा वापर विचारपूर्वक केला पाहिजे. माझ्या स्वातंत्र्यामुळं दुसऱ्याचं स्वातंत्र्य, उदा. तुझंच - धोक्यात येत नाहीये हेही मी पाहायला पाहिजे.’
मन म्हणालं, ‘बरोब्बर. गणू, तुझं कसं आहे, माहितीय का! तुला सगळं कळतं... पण वळत नाही काहीच.’
गणू हसत म्हणाला, ‘मग तू कशाला आहेस?’
मन म्हणालं, ‘मी आहेच कायम. आत्ताही सांगितलंच की तुला. तुला स्वातंत्र्यदिन आवडतो ना, तसा मला श्रावण आवडतो. हा श्रावण म्हणजे निसर्गाचा फार सुंदर आविष्कार आहे. मस्त पाऊस पडत असतो, सगळी सृष्टी हिरवीगार झालेली असते, आपल्याही चित्तवृत्ती प्रफुल्लित झालेल्या असतात. सगळीकडं सर्जनाचं मोहक वातावरण असतं. मला असं आवडतं. हे सगळं खूप नैसर्गिक आणि म्हणूनच खूप खरं आहे. इथं माणसाच्या जगातल्या फसवणुकीला, दांभिकतेला, छक्क्या-पंजांना जागा नाही.’
गणू वैषम्यानं म्हणाला, ‘माणसाचं आयुष्यही एवढं निर्मळ असतं, तर अजून काय हवं होतं?’
मन हसत म्हणालं, ‘पण प्रयत्न सोडायचे नाहीत. आपल्याला थेट त्या निर्झराच्या पाण्यासारखं व्हायचंय, नितळ अन् पारदर्शक!’
गणू म्हणाला, ‘माझं स्वातंत्र्य आणि तुझा नैसर्गिक सच्चेपणा एकत्र आला तर काय बहार येईल!’
मन म्हणालं, ‘अगदी... कसं बोललास! चल, आता स्वातंत्र्यदिन खऱ्या अर्थानं साजरा करू. बोला, भारतमाता की जय...’

(क्रमश:)

---

(सहावा भाग काही कारणाने अंकात प्रसिद्ध झालेला नाही. तो इथेच वाचायला मिळेल.)

---

27 Jul 2019

मराठी व्याकरण - भाग १ ते ६

मराठी व्याकरण
-------------------

भाग १
--------

सुवाच्य

अक्षर सुवाच्य असावे, असे शिक्षक नेहमी सांगतात. सुवाच्य म्हणजे सहज वाचता येईल असे. यालाच स्वच्छ अक्षर असेही म्हणतात. सु + वाच्य अशी या शब्दाची फोड आहे. वाच्य, वाचन, वाचक हे शब्द एकमेकांशी निगडित आहेत. 'वाच्य' या शब्दाचा मूळ अर्थ बोलण्यास किंवा सांगण्यास योग्य असा आहे. 'सुवाच्य' हा शब्द अनेक जण 'सुवाच्च' असा लिहितात; ती चूक टाळावी. 

---

यच्चयावत

या शब्दाचा अर्थ आहे सर्व, झाडून सगळे. बर्‍याच वेळा हा शब्द 'यच्चावत', 'यच्यावत', 'यच्ययावत' असा निरनिराळ्या पद्धतींनी लिहिलेला आढळतो. या शब्दात 'च'ला 'च' जोडून लिहावा. शब्दाचा उच्चार व्यवस्थित केला की लिहिताना चूक होत नाही.

----

माहात्म्य

माहात्म्य शब्दाचे नाते महात्मा शब्दाशी आहे. महा + आत्मा ही महात्मा शब्दाची फोड आहे. अतिथोर मनाच्या व्यक्तीचे वर्णन करताना आपण हा शब्द वापरतो. माहात्म्य हे भाववाचक नाम आहे. थोरवी हा जसा त्याचा अर्थ आहे, तसेच देवादिकांचा महिमा, प्रताप, वैभव इत्यादी त्याचे अर्थही आहेत. हा शब्द 'महात्म्य' असा लिहिला जाण्याची चूक होऊ शकते; ती टाळावी. यातील जोडाक्षरही नीट ध्यानात घ्यावे.

---

प्रथितयश

विशिष्ट क्षेत्रातील कामगिरीमुळे कीर्ती मिळविलेल्या व्यक्तीचे वर्णन करताना 'प्रथितयश' हे विशेषण वापरले जाते. हा शब्द प्रथित आणि यश या शब्दांपासून बनला आहे. 'प्रथित'चा अर्थ 'जाहीर झालेले' वा 'प्रसिद्ध'. 'प्रथित'चे मधील अक्षर 'थि' आहे; 'ति' नव्हे, हे ध्यानात घ्यावे. 'प्रथित' हा शब्द लक्षात ठेवल्यास, प्रथितयश हा शब्द 'प्रतिथयश' असा लिहिण्याची चूक होणार नाही. 

----

विजिगीषा

विजिगीषा या शब्दाचा अर्थ आहे जिंकण्याची इच्छा. हा मूळ शब्द संस्कृत आहे. मराठीतही तो तसाच वापरला जातो. हा शब्द अनेक वेळा विजीगीषा, विजिगिषा, विजिगीशा अशा अनेक पद्धतीने लिहिलेला आढळतो. या शब्दात 'व' व 'ज'वर पहिली वेलांटी व 'ग'वर दुसरी वेलांटी असते. शिवाय शहामृगातला 'श' न लिहिता षट्कोनातला 'ष' लिहावा. 'विजिगीषू' म्हणजे जिंकण्याची इच्छा बाळगणारा. 

----

भाग २
--------

अनसूया

अनसूया हे नाव तुम्ही ऐकले असेल. अनुसया असाही शब्द ऐकला असेल. अनुसया हा 'अनसूया'चा अपभ्रंश. अनसूया हा शब्द शुद्ध. तो लक्षात राहण्यासाठी त्याची फोड (अन् + असूया) लक्षात घ्यावी. यात न् आणि अ यांचा संधी होऊन न झाला आहे. अन् हा नकारार्थी उपसर्ग. असूया म्हणजे मत्सर. अनसूया म्हणजे निर्मत्सरी, निष्कपटी. अनसूयक या विशेषणाचाही तोच अर्थ आहे.

---

अनिर्वचनीय

अनिर्वचनीय या शब्दाचा अर्थ आहे अवर्णनीय. अनिर्वाच्य असाही शब्द याच अर्थाने वापरतात. एखाद्या गोष्टीचे वर्णन शब्दांत करणे अवघड असते, तेव्हा केवळ अवर्णनीय असे म्हटले जाते. हा शब्द लिहिताना अनिरवचनीय, अनीर्वचनीय, अर्निवचनीय असा चुकीचा लिहिला जाण्याची शक्यता असते. 'न'ला पहिली वेलांटी व रफार 'व'वरच द्यावा.

---

अपर

अपर हा संस्कृतमधून आलेला शब्द आहे. अधिक, दुसरा, नंतरचा इत्यादी अर्थांनी तो वापरला जातो. 'पश्चिमेकडील' असाही त्याचा एक अर्थ आहे. त्यावरूनच अपरांत (कोकण) हा शब्द बनला आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या काही पदांमध्ये अतिरिक्त या अर्थाने 'अपर' हा शब्द वापरला जातो. ( उदाहरणार्थ अपर जिल्हाधिकारी). 'अप्पर' या इंग्रजी शब्दाचा 'अपर'शी काहीही संबंध नाही, हे लक्षात घ्यावे.

---

अरिष्ट

अरिष्ट या संस्कृत शब्दाचे अनेक अर्थ आहेत. आपत्ती या अर्थाने तो मराठीत वापरला जातो. 'अरिष्ट' कोसळणे असा शब्दप्रयोग केला जातो, विशिष्ट प्रक्रियेनंतर जे औषध तयार केले जाते, त्यालाही अरिष्ट असे म्हणतात. या शब्दात 'अ' ऐवजी 'आ' लिहिला जाण्याची चूक संभवते, तसेच 'र'ला चुकून दुसरी वेलांटी दिली जाण्याचीही शक्यता असते. या दोन्ही चुका होणार नाहीत, असे पाहावे.

---

विच्छिन्न

हा संस्कृत शब्द आहे. याचा अर्थ आहे वेगळा केलेला, तोडलेला, मोडलेला. या शब्दात जोडाक्षरांकडे विशेष लक्ष द्यावे. 'च'ला 'छ' आणि 'न' ला 'न' जोडावा. शिवाय दोन्ही अक्षरांना पहिली वेलांटी द्यावी. 'विछिन्न,' 'वीच्छिन्न' असे लिहू नये.

---

अग्रिम

अग्रिम हा शब्द इंग्रजीतील अॅडव्हान्स शब्दाला प्रतिशब्द म्हणून वापरला जातो. अग्रिम हा संस्कृतमधून आलेला शब्द आहे. अग्र या शब्दापासून तो बनला आहे. अग्रच्या अर्थांमध्ये पहिला, पुढे आलेला आदींचा समावेश आहे. 'आधीचा', पहिला, श्रेष्ठ, प्रथम पिकलेला हे अग्रिम शब्दाचे अर्थ आहेत. अग्रिम वेतन म्हणजे आगाऊ दिलेले वेतन. रक्कम या संदर्भातच या शब्दाचा प्रामुख्याने वापर होतो.

---

अजित

अजित म्हणजे अजिंक्य. जित म्हणजे पराभूत; जिंकला गेलेला. त्याच्या उलट अर्थाचा शब्द अजित (अ + जित). विष्णू, शिव, बुद्ध असेही 'अजित'चे अर्थ आहेत. या शब्दात 'ज'वर पहिली वेलांटी आहे. चुकून ती दुसरी लिहिली गेली, तर अर्थ बदलतो. 'अजीत'चा अर्थ 'न कोमेजलेले' असा आहे. अपराजित याही शब्दाचा अर्थ अजिंक्य. 'अपराजित'मध्येही 'ज'वर पहिली वेलांटी आहे.

---

भाग ३
--------

उपाहार

उपाहार (उप + आहार) म्हणजे फराळ. (इंग्रजीत 'रिफ्रेशमेंट'.) उपाहारगृह हा शब्द त्यावरून तयार झाला आहे. त्यात 'उपाहार'ऐवजी 'उपहार' असे चुकीचे लिहिले जाते. येथे 'पा'चा 'प' झाला, की अर्थ बदलतो. उपहार हादेखील सांस्कृत शब्द आहे. त्याचे अनेक अर्थ (भेट, देणगी, आहुती, आरास, आनंद इत्यादी) आहेत. भेट वा देणगी या अर्थाने तो हिंदीत वापरला जातो.

---

आबालवृद्ध

आबालवृद्ध म्हणजे बालांपासून ते वृद्धांपर्यंत; म्हणजेच सर्व वयाची माणसे. हा शब्द अबालवृद्ध असा लिहिण्याची चूक होऊ शकते. मग त्यात अपेक्षित अर्थ उरत नाही. (अबाल हे संस्कृतमधील एक विशेषण आहे. त्याचा अर्थ तरुण; पूर्ण वाढलेला असा आहे.) आबालवृद्ध हा शब्द चुकीचा लिहिला जाऊ नये, यासाठी 'आ' हा उपसर्ग लक्षात ठेवावा. त्याचे जे विविध अर्थ आहेत, त्यांतील पासून आणि पर्यंत हे अर्थ येथे अभिप्रेत आहेत. आपादमस्तक (पायापासून डोक्यापर्यंत), आमूलाग्र (मुळापासून टोकापर्यंत, म्हणजे संपूर्णपणे) हेही शब्द असेच तयार झाले आहेत.

---

अनावृत

आवरण नसलेले, उघडे, जाहीर, प्रकट या अर्थांनी हे विशेषण वापरले जाते. वृ या संस्कृत धातूपासून हा शब्द तयार झाला आहे. वृ चा अर्थ आच्छादणे असा आहे. आवृत म्हणजे आच्छादलेले; आवरण घातलेले. 'आवृत'च्या उलट अर्थाचा शब्द अनावृत. पण 'अनावृत्त' म्हणजे मात्र आवृत्ती नसलेला; पुन्हा न येणारा. अनावृत या शब्दाशी अनावृत्त या शब्दाचा काहीही संबंध नाही.

---

आशीर्वाद

आशीर्वाद देणे म्हणजे दुवा देणे, भले व्हावे अशी इच्छा व्यक्त करणे. आशीर्वाद या शब्दात 'श'वर दुसरी वेलांटी असते. अनेक जण 'श'वर पहिली वेलांटी देऊन 'आशिर्वाद' असे लिहितात. ते चुकीचे आहे, हे लक्षात ठेवावे. तसेच या शब्दातील रफार हा 'वा'वर आहे, 'शी'वर नाही. काही जण चुकून हा शब्द 'आर्शीवाद' किंवा 'आर्शिवाद' असा लिहितात.

---

कोजागरी

आश्विन महिन्यातील पौर्णिमेला 'कोजागरी' म्हणतात. या शब्दाचे मूळ 'को जागर्ति?' ('कोण जागा आहे?') या प्रश्नात आहे. त्या पौर्णिमेच्या रात्री सर्वांना देवी लक्ष्मी हा प्रश्न विचारते, अशी समजूत आहे. जो जागा असतो, त्याला देवी संपत्ती देते, असे म्हणतात. कोजागरी हा शब्द लिहिताना 'ग'ऐवजी 'गि' लिहिला जाण्याची (कोजागिरी) चूक होऊ शकते. ती टाळण्यासाठी 'को जागर्ति?' हा प्रश्न लक्षात ठेवावा.

---

निर्भर्त्सना

एखाद्याची निर्भर्त्सना (निर् + भर्त्सना) करणे, म्हणजे त्याची अतिशय निंदा करणे वा त्याला खूप रागावणे. भर्त्सना या शब्दाचा अर्थ निंदा वा धिक्कार. निर् या शब्दाचे अनेक अर्थ असून त्यांत 'निषेध' हादेखील एक अर्थ आहे. निर्भर्त्सना या शब्दात 'भ'वर आणि 'त्स'वरही रफार आहे, हे लक्षात घ्यावे; म्हणजे 'निर्भत्सना' असा तो चुकीचा लिहिला जाणार नाही.

---

कर्तृत्व

'कर्तृ' या संस्कृत विशेषणाचा अर्थ 'करणारा'. त्यापासून कर्तृत्व हे भाववाचक नाम तयार झाले आहे. कर्तेपणा, सामर्थ्य, कार्य करण्याची क्षमता या अर्थांनी कर्तृत्व हा शब्द वापरला जातो. यातील दुसरे अक्षर नीट लक्षात ठेवा. हा शब्द 'कतुर्त्व' किंवा 'कर्तुत्त्व' किंवा 'कर्तुत्व' किंवा 'कतृत्व' असा लिहिलेला अनेकदा आढळेल; पण हे अपभ्रंश आहेत. 'कर्तृत्व'मध्ये शेवटचे अक्षर 'त्त्व' नसून 'त्व' आहे, हेही ध्यानात घ्या.

---

अधीक्षक

अधीक्षक या शब्दाचा खरा अर्थ देखरेख करणारा. हे सरकारी विभागांतील किंवा खासगी संस्थांमधील एक अधिकारपद आहे. सुपरिंटेंडंट या शब्दाला हा प्रतिशब्द आहे. अधि + ईक्षक अशी याची फोड आहे. ईक्षक म्हणजे पाहणारा. अधि या उपसर्गाचा अर्थ वर, वरच्या बाजूस असा आहे. अधीक्षक या शब्दात 'ध'वर दुसरी वेलांटी आहे, हे लक्षात ठेवावे. (अधिक्षक असे लिहिणे चूक होय.)
---

भाग ४
--------

कोट्यधीश

कोट्यधीश या शब्दाची फोड कोटि + अधीश अशी आहे. 'कोटि' हा संस्कृत शब्द मराठीत कोटी असा लिहिला जातो. त्याचा एक अर्थ शंभर लाख असा आहे. अधीश म्हणजे धनी, मालक. ज्याच्याकडे एक कोटी रुपये वा त्याहून अधिक मालमत्ता आहे, तो कोट्यधीश. हा शब्द 'कोट्याधीश' असा लिहिण्याची चूक होऊ शकते; ती टाळावी. कोट्यवधी (अनेक कोटी) याही शब्दातील जोडाक्षर 'ट्य' असे आहे; 'ट्या' नव्हे.

---

अल्पसंख्याक

ज्यांची संख्या अल्प आहे, म्हणजेच तुलनेने कमी आहे, ते अल्पसंख्याक. हा शब्द अनेकांकडून चुकून अल्पसंख्यांक असा लिहिला जातो. अल्पसंख्याक या शब्दाची फोड अल्प + संख्या + क अशी आहे. या शब्दात फक्त 'स'वर अनुस्वार आहे, हे लक्षात घ्यावे. (अल्प + संख्या + अंक अशी फोड नाही.) बहुसंख्याक हा शब्द 'अल्पसंख्याक'च्या विरुद्ध अर्थी आहे. ज्यांची संख्या तुलनेने अधिक, ते बहुसंख्याक.

---

तत्काळ

तत्काळ म्हणजे ताबडतोब. संस्कृतमधील तत्कालम् या शब्दापासून तत्काळ हा शब्द तयार झाला आहे. तत् + कालम् अशी 'तत्कालम्'ची फोड आहे. तत्काळ हा शब्द अनेक जण चुकून 'तात्काळ' असा लिहितात. या शब्दातील पहिले अक्षर 'ता' नसून 'त' आहे, हे लक्षात राहण्यासाठी 'तत्' हा संस्कृत शब्द लक्षात ठेवावा. 'तत्क्षणी' याही शब्दाचा अर्थही ताबडतोब असाच आहे.

---

दुरवस्था

दुरवस्था म्हणजे वाईट अवस्था. हा शब्द अनेक जण चुकून 'दुरावस्था' असा लिहितात. दुरवस्था या शब्दाची फोड दु: + अवस्था अशी आहे. संधी होताना विसर्ग जाऊन 'र्' येतो. 'र्' आणि 'अ' यांचा संधी होऊन 'र' तयार होतो, ही फोड लक्षात घ्यावी. दुर्दशा (दुः + दशा) हा शब्दही त्याच अर्थाने वापरला जातो. अशाच रीतीने दुरुत्तर (दु: + उत्तर), दुर्गंध (दुः + गंध), दुराचरण (दु: + आचरण) इत्यादी शब्द तयार झाले आहेत.

---

अतीत

अतीत म्हणजे होऊन गेलेले, दूर गेलेले. 'मागे टाकणारे' असाही त्याचा एक अर्थ आहे. कालातीत म्हणजे काळाला मागे टाकणारे; काळापलीकडचे. शब्दातीत म्हणजे शब्दांच्या पलीकडचे. अतीत, कालातीत, शब्दातीत या सर्व शब्दांत 'त'वर दुसरी वेलांटी आहे हे लक्षात घ्यावे. (अतित, कालातित, शब्दातित असे लिहिणे चुकीचे.) 'व्यतीत' याही शब्दाचा अर्थ 'होऊन गेलेले' असा आहे. त्याही शब्दात 'ती' दीर्घ असतो.
---

अनिल

अनिल म्हणजे वारा. 'विष्णू' असाही त्याचा एक अर्थ आहे. मराठीत अनिल हे विशेषनाम म्हणून प्रसिद्ध आहे. उच्चारणात चूक होऊन हा शब्द 'अनील' असा चुकीचा लिहिला जाण्याचीही शक्यता असते. 'अनिल' आणि 'सुनील' ही नावे अनेक जण जोडीसारखी वापरतात; पण 'सुनील'मध्ये 'न'वर दुसरी वेलांटी आहे. 'सुनील'चा संबंध नीलवर्णाशी आहे. 'नील'मध्ये पहिले अक्षर दीर्घच असते.

---

सेंद्रिय

सेंद्रिय हा शब्द 'इंद्रिय' या शब्दापासून तयार झाला आहे. 'स + इंद्रिय' अशी त्याची फोड आहे. इंग्रजी भाषेतील 'ऑरगॅनिक'ला हा प्रतिशब्द आहे. सेंद्रिय खते हा शब्द तुमच्या वाचनात आला असेल. शरीराचा अवयव, ज्ञान प्राप्त करून घेण्याचे वा कर्म करण्याचे साधन हे इंद्रिय या शब्दाचे अर्थ आहेत. इंद्रिय व सेंद्रिय या दोन्ही शब्दांत 'द्र'वर पहिली वेलांटी असते. ('सेंद्रीय' असे लिहिणे चूक.)

---

सक्रिय

सक्रिय म्हणजे क्रियेसहित. 'स + क्रिय' अशी या शब्दाची फोड आहे. 'स' या अव्ययाचा अर्थ 'सहित' असा आहे. व्यक्तीच्या बाबतीत 'सक्रिय' हे विशेषण वापरले जाते, तेव्हा 'क्रियाशील' असा त्याचा अर्थ होतो. 'सक्रिय'मध्ये 'क्र'वर पहिली वेलांटी आहे. चुकून दुसरी वेलांटी दिली जाण्याची शक्यता असते. 'निष्क्रिय' हा 'सक्रिय'च्या विरुद्धार्थी शब्द आहे; मात्र 'संन्यासी' असाही त्याचा एक अर्थ आहे.

---

भाग ५
---------

देदीप्यमान

देदीप्यमान या विशेषणाचा अर्थ आहे तेजस्वी. अनेकदा हा शब्द दैदिप्यमान, दैदीप्यमान, देदिप्यमान अशा चुकीच्या रीतीने लिहिला जाण्याची शक्यता असते. या चुका टाळण्यासाठी या शब्दाच्या बाबतीत दोन गोष्टी लक्षात ठेवणे जरूरीचे आहे. यातील पहिले अक्षर दै नसून दे आहे आणि दुसरे अक्षर दि नसून दी आहे. (पहिल्या 'द'वर एकच मात्रा आणि दुसऱ्या 'द'वर दुसरी वेलांटी.)
---

अहल्या

अहल्या हे नाव पुराण काळापासून प्रसिद्ध आहे. गौतम ऋषींच्या पत्नीचे नाव अहल्या होते. अ + हल्या अशी याची फोड आहे. हल्य या शब्दाचा अर्थ आहे निंद्य. जी निंद्य नाही ती अहल्या. हल्य - हल = नांगर, अ हल्या - न नांगरलेली, अस्पर्श भूमी. (आदिम) हाही एक अर्थ आहे. या शब्दाऐवजी 'अहिल्या' असा चुकीचा शब्द अनेक जण वापरताना दिसतात. तो अपभ्रंश आहे. अहल्या हा शब्द वापरणे योग्य कसे, हे त्याच्या अर्थावरून स्पष्ट होते.

---

अस्थिपंजर

अस्थी म्हणजे हाड. पंजर म्हणजे सापळा. अस्थिपंजर या शब्दाची फोड अस्थि + पंजर अशी होते. हा मूळ शब्द संस्कृत आहे. म्हणून सामासिक शब्दात तो ऱ्हस्वान्तच लिहावा. अस्थीपंजर असे लिहू नये. अस्थिपंजरचा अर्थ हाडांचा सापळा.

---

माणुसकी

'माणूस' हे नाम आहे. या नामाला की हा प्रत्यय लावला असता 'माणुसकी' हे भाववाचक नाम तयार होते. माणूस या शब्दामध्ये जरी 'ण'ला दुसरा उकार असला तरी त्याचे भाववाचक नाम बनताना त्यात 'ण'ला पहिला उकार द्यायला विसरू नये. 'माणूसकी' असे लिहिणे चूक आहे.

---

क्षणभंगुर

'क्षणात नाश पावणारे' हा क्षणभंगुर या विशेषणाचा शब्दश: अर्थ आहे. क्षणिक, अशाश्वत या अर्थांनी हा शब्द रूढ आहे. भंगुर या विशेषणाचा अर्थ भंगणारे, ठिसूळ असा आहे. क्षणभंगुर या शब्दात 'ग'ला पहिला उकार, हे लक्षात असू द्यावे. (क्षणभंगूर असे लिहिणे चूक.) क्षणिक या विशेषणातही 'ण'वर पहिली वेलांटी, हेही लक्षात ठेवावे. (क्षणीक असे लिहिणे चूक.)

---

स्तुतिपाठक

'स्तुति' म्हणजे प्रशंसा, स्तोत्र. स्तुतिपाठक म्हणजे खुशामत करणारा. 'स्तुति' हा मूळ शब्द संस्कृत आहे. यात 'त'ला पहिली वेलांटी व 'स्त'ला पहिला उकार आहे. 'स्तुती' शब्द लिहिताना मात्र 'त' ला दुसरी वेलांटी द्यावी. कारण मराठीत अंत्य अक्षर दीर्घ असते.

---

भाग ६
---------

जाज्वल्य

एखाद्या गोष्टीचा अतिशय, तीव्र अभिमान असेल, तर आपण ‘जाज्वल्य’ अभिमान आहे, असं म्हणतो. हा शब्द अनेकदा ‘जाज्ज्वल्य’ असा चुकीचा लिहिला जातो. या शब्दात एकदाच ज आहे, हे लक्षात ठेवावे. ‘ज्वल्’ हा मूळ संस्कृत धातू असून, त्याचा अर्थ जळणे, पेटणे, दाह होणे असा आहे. एखाद्या शब्दावर जोर देण्यासाठी आपण त्याची मराठीत द्विरुक्ती करतो, तशी संस्कृतमध्येही केली जाते. पण संस्कृतची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे या शब्दात एकदाच ‘ज्व’ येतो.

---

महत्त्व

महत्त्व हा शब्द ‘महत्’ + ‘त्व’ असा तयार झाला आहे. महत् या संस्कृत शब्दाला ‘त्व’ हा प्रत्यय लागला आहे. मूळ ज्या शब्दाला प्रत्यय लागला आहे, त्यात शेवटी त् आहे. त्यातला त् आणि ‘त्व’मधला ‘त’ एकत्र येतात. पहिल्या ‘त्’चा लोप होतो आणि तेथे ‘त्त्व’ येतो. त्यामुळे महत्त्व या शब्दात दोनदा त आहे, हे लक्षात ठेवावे. ‘त्व’ हा प्रत्यय इतर अनेक शब्दांना लागतो. तेथे आधीच्या शब्दात शेवटी त् असेल, तर शेवटी त्त होते; अन्यथा होत नाही. उदा. व्यक्तिमत्त्व हा शब्द व्यक्तमत् + त्व असा असल्याने तो ‘व्यक्तिमत्त्व’ असा लिहिला जातो, ‘तत्त्व’ या शब्दातही + ‘त्व’ असल्याने तो ‘तत्त्व’ असा लिहिणे योग्य; तर अस्तित्व हा शब्द ‘अस्ति’ + त्व असा असल्याने ‘अस्तित्व’ असा लिहिला जातो. व्यक्तित्व या शब्दातही एकदाच ‘त’ येतो.

---

तज्ज्ञ

हा शब्द अनेकदा ‘तज्ञ’ असा चुकीचा लिहिला जातो. या शब्दात ‘ज्’ उच्चारणे आणि लिहिणे आवश्यक आहे. या शब्दाची फोड तद् + ज्ञ = तद् (ज् + ञ) (संस्कृतमध्ये ज्ञ = ज् + ञ) अशी आहे. द् या व्यंजनापुढे ज् हे व्यंजन आल्यास द्-बद्दल ज् होतो. (तद् + जन्य = तज्जन्य). म्हणून तद् + ज + ञ = तज् + ज् + ञ = तज् + ज्ञ = तज्ज्ञ. ‘तद्’ म्हणजे प्रसिद्ध, अनुभवलेले; तर ‘ज्ञ’ म्हणजे ज्ञानी, चतुर, विद्वान. एखाद्या विषयाच्या ज्ञानाचा भरपूर अनुभव असलेल्या व्यक्तीला आपण त्या विषयातील ’तज्ज्ञ’ म्हणतो. मात्र, एखाद्या शब्दाच्या शेवटी ’त’ असल्यास पुढे केवळ ‘ज्ञ’ प्रत्यय लावण्याची पद्धत आहे. उदा. भाषातज्ज्ञ, पण गणितज्ञ किंवा व्याकरणतज्ज्ञ, पण संगीतज्ञ. दोन्हीचा अर्थ एकच!

---

पारंपरिक

पारंपरिक हा शब्द ‘पारंपारिक’ असा लिहिण्याची चूक कायम अनेकांकडून घडते. मात्र, हा शब्द ‘पारंपरिक’ असा लिहिणे योग्य आहे. परंपरा या शब्दाला ‘इक’ प्रत्यय लागल्यावर पहिल्या अक्षरातील स्वराची वृद्धी होते. बाकी इतर अक्षरांत फरक होत नाही. त्यामुळे ‘पारंपरिक’ हेच रूप योग्य ठरते. अन्य उदाहरणे - समाज : सामाजिक, समुदाय - सामुदायिक, शरीर - शारीरिक इ.
---

जन्मशताब्दी

अब्द या संस्कृत शब्दाचा अर्थ वर्ष असा आहे. शत + अब्द यांचा संधी होऊन शताब्द (शंभर वर्षे) हा संस्कृत शब्द तयार होतो. पंचम - पंचमी याप्रमाणे शताब्द या शब्दाचे शताब्दी हे स्त्रीलिंगी रूप होते. जन्मशताब्दी याचा अर्थ ‘जन्मास शंभर वर्षे झाली’ असा होतो. या शब्दातच ‘अब्द’ म्हणजेच वर्ष हा शब्द असल्याने ‘जन्मशताब्दी वर्ष’ असे लिहिणे चूक. ‘पिवळे पितांबर’सारखीच ही द्विरुक्ती होय. ‘सुधीर फडके यांचे हे जन्मशताब्दी वर्ष’ ही वाक्यरचना चुकीची असून, ‘सुधीर फडके यांची ही जन्मशताब्दी’ हे योग्य होय.

----

(स्रोत : मराठीतील विविध व्याकरणविषयक पुस्तके)

#मराठी_व्याकरण
---

20 Jul 2019

बाकीबाब आणि मी - रसग्रहण

सुखानेही असा जीव कासावीस
-----------------------------



बा. भ. बोरकर म्हणजे कोकणी व मराठीतले एक महत्त्वाचे कवी. बोरकरांच्या कविता नादमय, गेय आणि रसरशीत असतात. त्या वाचताना वाचकाला जगण्यावर भरभरून प्रेम करावंसं वाटतं. बोरकरांना शब्द प्रसन्न होते. त्यांची शब्दकळा सुरेख आणि सुरेल होती. स्वत:ला ‘पोएट बोरकर’ म्हणवून घेणारे हे देखणे, रसिले व्यक्तिमत्त्व १९८४ मध्ये काळाच्या पडद्याआड गेले. तेव्हा मी फारच लहान, म्हणजे केवळ ८-९ वर्षांचा होतो. त्यांच्या निधनाची बातमी पेपरमध्ये वाचल्याचं मला आठवतंय. पण बाकी या व्यक्तिमत्त्वाचा खरा परिचय व्हायचा होता. तो खूप नंतर झाला. पु. ल. आणि सुनीताबाईंनी बोरकरांच्या कवितेचा जो कार्यक्रम केला होता, त्याची ऑडिओ क्लिप मी मोबाइलवर ऐकली आणि त्या वेळी खऱ्या अर्थानं या कवीची नीट ओळख झाली, असं म्हणता येईल. 
त्याआधी सलील कुलकर्णीच्या ‘संधीप्रकाशात’ व नंतर ‘क्षण अमृताचे’ या अल्बममध्ये बोरकरांच्या कविता गाणी म्हणून समोर आल्या आणि बोरकर तर आवडू लागलेच; पण सलीलच्या चाली आणि त्यानं केलेली गाणीही खूप भावली. कवितेवर मन:पूत प्रेम करणारा माणूसच अशी गाणी देऊ शकतो. सलील केवळ संगीतकार नाही, तर मुळात तो आधी एक चांगला वाचक, आस्वादक आहे. कवितांचा तर त्याचा व्यासंगच आहे. त्याला अनेक कवींच्या अक्षरश: शेकडो रचना मुखोद्गत आहेत. शब्दांवर विलक्षण प्रेम असल्याशिवाय हे घडू शकत नाही. सलीलची आणि माझी ओळख वीस वर्षांहून अधिक काळ आहे. आता चांगली मैत्रीच आहे. त्याचं कवितेवरचं, शब्दांवरचं प्रेम अतिशय आनंददायक आहे. त्यात मंचीय कार्यक्रम रंगवण्यात सलीलचा हातखंडा आहे. सलीलमध्ये एक खोडकर, मिश्कील मूल दडलंय असं मला नेहमी जाणवतं. त्याच्या डोळ्यांतून ते अनेकदा दिसतं. बोरकरांच्या कवितांना सलीलने लावलेल्या चाली ऐकल्यावर खास बोरकरांवर सलीलनं कार्यक्रम करावा, असं फार वाटायचं. मी त्याला हे बोलूनही दाखवलं होतं. आपण एखादी इच्छा धरावी आणि ती तत्काळ फलद्रूप व्हावी, असं फार क्वचित घडतं. पण बोरकरांच्या कविता आवडणाऱ्या सगळ्या चाहत्यांचं एकत्रित पुण्य फळाला आलं असावं. कारण १९ जुलैला ‘बाकीबाब आणि मी’ असा कार्यक्रम करीत असल्याचं सलीलनं या महिन्याच्या सुरुवातीला जाहीर केलं आणि मला तर अचानक लॉटरी लागल्यासारखा आनंद झाला.
‘देखणी ती पाऊले’ या बोरकरांच्या प्रसिद्ध कवितेच्या वाचनाने कार्यक्रम सुरू झाला. आमचे अण्णा - किरण यज्ञोपवित - यांनी त्यांच्या खर्जातील आवाजात ही कविता सादर केली आणि मैफलीची सुंदर नांदीच झाली. त्यानंतर बोरकरांची आणि आपली पहिली भेट कशी झाली, याचा किस्सा सलीलनं सांगितला आणि त्यांची ‘कशी तुज समजावू’ ही अत्यंत गोड रचनाही ऐकविली. नंतर ‘डाळिंबीच्या डहाळीशी नको वाऱ्यासवे झुलू’ या आनंद मोडकांनी संगीतबद्ध केलेल्या आणि मुकुंद फणसळकर व श्रीकांत पारगावकरांनी गायिलेल्या गाण्याचा (मूळ निर्मिती चंद्रकांत काळे व ‘शब्दवेध’) उल्लेख झाला. ‘नको घुसळू पाण्यात खडीसाखरेचे पाय’ या ओळी तर खल्लासच! नंतर मग सलीलनं पहिल्यांदा बोरकरांची जी कविता स्वरबद्ध केली, त्या ‘तव नयनांचे दल हलले गं’ या अत्यंत गाजलेल्या कवितेची आठवण निघाली. सलीलनं त्याच्या नेहमीच्या ढंगदार शैलीत हे गाणं सादर केलं आणि मैफलीला रंग चढू लागला. 
बोरकरांच्या मधुराभक्तीच्या कवितांचा खास उल्लेख झाला. त्यात सलीलची (आणि माझीही) अत्यंत आवडती अशी ‘माझ्या कानी बाई बाई वाजे अलगूज’ ही कविता आली. ‘सुखानेही असा जीव कासावीस’ ही ओळ याच कवितेतील. ही मैफल जसजशी रंगत गेली तशी रसिकांची अवस्था जवळपास अशीच झाली.
या कार्यक्रमात नेहमीच्या लोकप्रिय रचनांसोबत सलीलनं काही नव्या रचनाही ऐकवल्या. तिकीट काढून येणाऱ्या रसिकांना आपण काही तरी नवंही दिलं पाहिजे, अशा रास्त आग्रहास्तव सलीलनं या तीन रचना अगदी नुकत्याच कंपोझ केल्या. ‘अशी मारशील कुणाला गं’ आणि ‘हरिणी’ या दोन रचनांना आणि वाद्यवृंदाला खास दाद मिळाली. पण मला सगळ्यांत अधिक आवडली ती सलीलनं म्हणून दाखवलेली ‘खेड्यातच त्याची सारी हयात केली’ ही अप्रतिम कविता. कॉलेजच्या काळात पाठ असलेली कविता सलीलनं एवढ्या वर्षांनंतरही जशीच्या तशी म्हणून दाखविली. ही कविता मी पूर्वी वाचली नव्हती किंवा ऐकली नव्हती. नेहमीच्या कविताही सलीलनं त्याच्या खास शैलीत ऐकविल्या. श्रोत्यांशी संवाद साधत, हास्यविनोद करीत मैफल रंगवण्याचं एक तंत्र आहे. सलील त्यात वाकबगार आहे. या वेळी जोडीला किरणच्या खर्जातल्या आवाजात बोरकरांच्या ‘इंटेन्स’ कविता ऐकणं हा एक अनुभव होता. ‘दिसली नसतीस तर...’ ही सुनीताबाईंनी अजरामर केलेली कविता त्यांचा प्रभाव पुसून सादर करणं कठीण काम. पण किरणनं ते केलं. सई टेंभेकर आणि मेघना सरदार या दोघींनीही काही रचना अतिशय समजून गायल्या. आदित्य आठल्ये, डॉ. राजेंद्र दूरकर व रितेश ओहळ या तिघांनीही अत्यंत नेमकी साथसंगत केली. दूरकर तर किती विविध प्रकारची वाद्यं वाजवतात! रितेश यांची गिटारही जबरदस्त!

या कार्यक्रमाचं नेपथ्य उत्तम होतं. दोन्ही बाजूंनी बोरकरांच्या कविता लिहिलेले फलक उभारण्यात आले होते. मागे डिजिटल पडदा होता आणि त्यावर कवितेनुसार प्रतिमा उमटत होत्या. म्हणजे ‘सरीवर सरी आल्या गं’ हे गाणं चालू असताना मागे पावसाच्या सरी व टपोरे थेंब पडताना दिसत होते. वास्तविक हा प्रकार गाण्याच्या आस्वादात अडथळा आणणारा ठरू शकला असता. पण त्या स्क्रीनवरील रंगांचा वापर आणि प्रकाशयोजना एवढी उत्तम होती, की या नेपथ्याने मूळ गाण्यांच्या आस्वादाला अडथळा न आणता, मखराची भूमिका बजावली. एकूण नक्षी सगळीच जमून आली. 
अशा कार्यक्रमाला प्रेक्षकही सुजाण लागतो. सलीलच्या प्रेमापोटी तिथे जमलेले बहुतेक सगळेच खऱ्या अर्थानं रसिक होते. चांगलं वाचणारे, चांगली दाद देणारे होते. त्यामुळं हा केवळ मंचीय आविष्कार न राहता, त्याला मैफलीचं स्वरूप आलं. सलीलनंही निवेदनात हे बोलून दाखवलं. 
खरं तर अशा प्रकारच्या मैफली वारंवार व्हाव्यात. बोरकरांसारखे आनंददायक कवी सर्व मराठी जनांपर्यंत पोचावेत. सलील हे काम करू शकतो. तसं झाल्यास मराठी भाषेची ती फार मोठी सेवा ठरेल. तूर्त बोरकरांच्या सुरेख शब्दकळा आठवत आनंद लुटत राहायचं. 
बोरकरांची मला अतिशय आवडणारी कविता शेवटी शेअर करावीशी वाटते. 

बोरकर लिहितात -

स्वर्ग नको सुरलोक नको मज लोभस हा इहलोक हवा
तृप्ति नको मज मुक्‍ती नको पण येथील हर्ष नि शोक हवा
शोक हवा परि वाल्मिकिच्या परि सद्रव अन् सश्लोक हवा
हर्ष हवा परि स्पर्शमण्यापरि त्यांत नवा आलोक हवा
शंतनुचा मज मोह हवा अन ययातिचा मज देह हवा
पार्थाचा परि स्नेहविकंपित स्वार्थ सदा संदेह हवा
इंद्राचा मज भोग हवा अन चंद्राचा हृद्रोग हवा
योग असो रतिभोग असो अतिजागृत त्यात प्रयोग हवा
आयु हवे आरोग्य हवे यशभाग्य तसा प्रासाद हवा
श्लाघ्य हवे वैराग्य तयास्तव त्यांत विरोध विषाद हवा
तापासह अनुताप हवा मज पापासह अभिशाप हवा
शिळांत पिचतां जळांतुनी मज निळा निळा उःशाप हवा
मार्क्साचा मज अर्थ हवा अन् फ्रॉइडाचा मज काम हवा
या असुरां परि राबविण्या घरिं गांधींचा मज राम हवा
लोभ हवा मज गाधिजमुनिचा अखंड आंतर क्षोभ हवा
पराभवांतहि अदम्य उज्ज्वल प्रतिभेचा प्रक्षोभ हवा
पार्थिव्यांतच वास हवा परि दिव्याचा हव्यास हवा
शास्त्रांचा अभ्यास हवा परि मानव्याचा ध्यास हवा
विश्व हवे सर्वस्व हवे अन् मृत्यू समोर सयंत्र हवा
शरांत परि ही विव्हळतां तनु उरांत अमृतमंत्र हवा
हविभुक सुरमुख मी वैश्वानर नित्य नवा मज ग्रास हवा
हे सुख दुर्लभ वाढविण्या मज चौर्‍यांशीत प्रवास हवा

----