१. काजव्यांचा गाव
---------------------
आतून उजळविणारा...
---------------------------
सुदर्शन रंगमंच इथं नाटक पाहायचा फायदा म्हणजे इथं तुम्ही नाटकाचाच एक भाग होऊन जाता. वास्तविक शुभांगीताई (दामले) मला कित्येक दिवस नाटक पाहायला बोलावताहेत. पण मला संध्याकाळची वेळ जमत नसल्यानं ते राहूनच जात होतं. अखेर तो योग आला. खूप दिवसांनी इथं परवा (रविवारी) एक नाटक पाहिलं आणि हा नाटकातलंच होऊन जाण्याचा अनुभव दीर्घ काळानं घेतला. ‘काजव्यांचा गाव’ हे ते नाटक. प्रदीप वैद्य सर्वेसर्वा असलेलं हे नाटक पाहणं म्हणजे एक ‘आतून उजळवून टाकणारा’ अनुभव आहे.
कोकणातल्या एका छोट्या गावात - जिथं २००८ मध्येही अजून लोडशेडिंगमुळं कंदिलांचा वापर करावा लागतो - तिथं राहणाऱ्या दीक्षित यांच्या घरात घडणारी ही गोष्ट आहे. या दीक्षितांच्या घरातली सर्वांत ज्येष्ठ व्यक्ती असलेल्या आजींच्या सहस्रचंद्रदर्शनाचा घाट तिच्या दोन मुलींनी घातला आहे. यातली एक मुलगी पुण्यात असते, तर एक अमेरिकेत ‘निघून’ गेलेली असते. आजींना दोन मुलं आहेत. एक चिपळुणात राहतो, तर एक आजींसोबत त्या गावातच राहतो व शेती-वाडी करतो. याशिवाय अजून एक अविवाहित मुलगीही तिथंच राहते आहे. आजींची नातवंडंही आहेत. काही तिथंच राहतात, तर एक नात पुण्याहून आली आहे. तिचा मित्रही सोबत आला आहे.
मग नाटकातले प्रसंग उलगडतात जातात तसतसे या वरवर एकसंध, सुखी दिसणाऱ्या कुटुंबातले लहान-मोठे अंधार आपल्याला दिसू लागतात. नाटकात होणाऱ्या फेड-इन, फेड-आउटप्रमाणे आपल्याही मनात या अंधार-प्रकाशाचा खेळ सुरू होतो. नात्यांचं आभासीपण लख्ख दिसू लागतं. कोरड्या हिशेबांसाठीचे रोकडे भाव जाणवू लागतात. एकीकडं लहान मुलांमधला निरागस भाव आणि दुसरीकडं मोठे होऊन व्यावहारिक अन् अलिप्त झालेले सगळे मोठे यांचा हा समांतर प्रवास आपल्यासमोर साकारू लागतो. आपल्या मनाला कधी धडका देत, तर कधी गोंजारत, कधी रागवत, तर कधी मायेनं हे नाटक आपल्या जवळ येतं... जुन्या मित्राशी चांदण्या रात्री हक्कानं गप्पा मारीत बसावं, तसं गुजगोष्टी सांगत बसतं.
मुळात हे नाटक समीपनाट्य या प्रकारातलं आहे. म्हणजे प्रेक्षकांच्या मधेच हे नाटक घडतं. पात्रं आपल्यामधून ये-जा करतात. अशा प्रकारचं नाटक पाहताना एक विलक्षण तद्रूपता लागते. त्यामुळं मोजक्या आणि जाणत्या प्रेक्षकांसमोरच याचे प्रयोग होऊ शकतात. ‘सुदर्शन’ला हे शक्य आहे. तिथल्या रंगमंचाच्या अवकाशाचा योग्य वापर करून घेऊन नाटककार हे नाट्य आपल्या सभोवती रचतो. कलाकारांच्या हालचाली, त्यांच्यातला परस्परांमधला मेळ आणि प्रेक्षकांची भावावस्था यांची उत्कृष्ट एकतानता अशा वेळी अनुभवता येते. कलाकार आपल्या अगदी जवळ येऊन अभिनय करीत असल्यानं त्यांच्या चेहऱ्यावरची रेष अन् रेष, प्रत्येक भाव आपल्याला दिसत राहतात. खरं तर अशा परिस्थितीत अभिनय करणं हे अत्यंत आव्हानात्मक आहे. ते या नाटकातल्या सगळ्याच कलाकारांनी साधलंय, याचं विशेष कौतुक!
विशेष उल्लेख करायचा तो ताई झालेली रूपाली भावे, प्रतिभा झालेली मधुराणी आणि आजी झालेल्या राधिका हंगेकर यांचा. आशिष वझे आणि निखिल मुजुमदारही उत्कृष्ट. रूपाली आणि तिच्या भावाचा एक दीर्घ संवाद खासच! मधुराणीनं ‘प्रतिभा’ खूपच प्रभावीपणे साकारली. शांता झालेल्या सायली सहस्रबुद्धेंनी तिचा त्रागा चांगला दाखविलाय. मुलांमध्ये फिट येणारा गणेश साकारणाऱ्या गंधार साळवेकरनं विशेष दाद मिळविली. श्वेता झालेल्या मुक्ता सोमणकडं भविष्यातली ‘मुक्ता बर्वे’ म्हणून पाहायला हरकत नाही. या मुलीवर लक्ष ठेवायला हवं. कासिम आणि गुरुजी अशी दोन पात्रं साकारणाऱ्या समीर जोशीचा ठसका मस्तच! वसुधा झालेल्या प्रिया नेर्लेकरांचा इंटेन्स अभिनयही भिडला. बाकी सर्व कलाकारांनी पूरक व उत्तम साथ दिली. स्मिता तावरे यांची वेशभूषा व आशिष देशपांडे यांची रंगभूषाही उल्लेखनीय. या सर्वांनाच झी आणि मटा गौरव पुरस्कारांत विविध नामांकनं मिळाली आहेत. त्यामुळं त्यांच्या कर्तृत्वावर जाणकारांचं आधीच शिक्कामोर्तब झालंय.
हे नाटक आहे ते प्रदीप वैद्य यांचं. लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाश व संगीत अशी पंचरंगी कामगिरी त्यांनी यात केलीय. या नाटकावर महेश एलकुंचवारांच्या वाडा नाट्यत्रयीचा प्रभाव जाणवतो. हे ‘वाडा’चं कोकण व्हर्जनही वाटू शकेल. अर्थात त्यानं बिघडत काही नाहीच!
थोडक्यात, एक उत्कट, सच्चा नाट्यानुभव घ्यायचा असेल, तर ‘काजव्यांच्या गावा’ला जाण्याशिवाय पर्याय नाही. नाटकाच्या ‘समीप’ जाण्याची ही एक उत्तम संधी आहे.
(२६ मे २०१९, फेसबुक पोस्ट)
------
२. अडलंय का?
-----------------
हो... अडलंय!
----------------
निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘अडलंय का?’ या नाटकाचे प्रयोग सध्या सुरू आहेत. हे नाटक सर्वांनी आवर्जून बघावं. मराठी रंगभूमीवरचे एक दमदार अभिनेते-दिग्दर्शक, प्रायोगिक नाट्यचळवळीचे आधारस्तंभ अतुल पेठे व त्यांची कन्या पर्ण पेठे हे दोघे यात काम करतात. चार्ल्स लेविन्स्की या नाटककाराच्या ‘दी बेझेटझुंग’ (दी ऑक्युपेशन) या मूळ नाटकाची रंगावृत्ती पेठे पिता-पुत्री आणि निपुणने तयार केली आहे. (भाषांतराचे श्रेय शौनक चांदोरकर यांचे.) सलग दीड ते पावणेदोन तास चालणारा हा दीर्घांकच आहे. एका नाट्य कलावंताचं आणि त्या नाट्यगृहासाठीचं नगरपालिकेचं बजेट कमी करायला आलेल्या एका महिला प्रशासन अधिकाऱ्याचं संभाषण यातूनच हे नाट्य फुलत जातं.
दोनच कलावंत कायम रंगमंचावर असल्यानं प्रेक्षकांना खिळवून ठेवायची सर्व जबाबदारी या दोघांवरच आहे. अतुल पेठे यांनी यातील अभिनेता साकारला आहे, तर महिला अधिकाऱ्याची भूमिका अर्थातच पर्णनं केली आहे. नाटकाचा जवळजवळ पहिला अर्धा भाग अतुल पेठे एक वेगळा, काहीसा कर्कश वाटणारा आवाज लावून बोलतात. (त्यामागचं कारण आपल्याला नंतर कळतं.) पण त्या आवाजात सतत जवळपास एक तास बोलणं हे किती थकवणारं काम आहे! मात्र, पेठे त्यांच्यातल्या अभिनेत्याला पूर्णपणे कामाला लावतात आणि त्याच्याकडून अक्षरश: अंगमेहनत करवून घेतात. दुसऱ्या बाजूनं या अभिनेत्याच्या विविध विक्षेपांनी आधी दचकणारी, घाबरणारी; मात्र एकदा त्याचे हे उद्योग लक्षात आल्यावर ठामपणे त्याला सामोरी जाणारी महिला अधिकारी पर्णनंही तितक्याच तोलामोलानं साकारली आहे.
कलेचं आपल्या (सार्वजनिक) आयुष्यातलं नक्की स्थान काय, या मूलभूत विषयावर नाटकात चिंतन होतं. ते पुष्कळसं सटल आहे. मात्र, तो अंत:प्रवाह आपल्याला सतत जाणवत राहील याची काळजी दिग्दर्शकानं निगुतीनं घेतली आहे. विशेषत: अलीकडच्या दोन वर्षांत करोनाकाळात आपण या कलाप्रकारांना किती प्राधान्याचं स्थान दिलं होतं, हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्या पार्श्वभूमीवर नाट्यगृह राहिलं पाहिजे, चाललं पाहिजे यासाठीचा हा झगडा फारच सूचक वाटतो. नाटक-सिनेमावाचून तुमचं काही अडलंय का? असं विचारणाऱ्यांना ठामपणे ‘हो, अडलंय’ असं सांगणारी ही नाट्यकृती आहे. नाटक-सिनेमाला श्वास मानणाऱ्या आपण सगळ्यांनी ती बघितलीच पाहिजे.
(१७ मे २०२२, फेसबुक पोस्ट)
------