22 Jun 2015

सिडनी आकाशवाणीसाठी...

भारत डायरी (पहिला भाग)
--------------------------------

मंडळी नमस्कार,

आषाढी पौर्णिमा हा दिवस 'गुरुपौर्णिमा' म्हणून आपण साजरा करतो. 'गुरुःब्रह्मा गुरुःविष्णू' ही शिकवण देणाऱ्या आपल्या संस्कृतीनंच गुरूचं महत्त्व अधोरेखित केलंय. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूला वंदन करावं, त्याच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करावी, ही आपली पद्धत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांनीही या परंपरेचं पालन केलं. आपले एके काळचे गुरू शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर सात वर्षांपूर्वीच्या एका खटल्यात कारवाई करावी, असे आदेश लिहिलेल्या कागदावर त्यांनी याच दिवशी सही केली. एकूण मग पुढचे पंधरा दिवस या प्रकरणानं महाराष्ट्रात, देशात जे रान पेटवलं तिचा अपरिहार्य फायदा बाळासाहेबांची लोकप्रियता वाढण्यात झाला. गेल्या काही दिवसांत भारतातल्या खऱ्या-खोट्या सगळ्याच वाघांवर संक्रांत आली आहे की काय, असं वाटण्याजोगी परिस्थिती होती. नंदनकानन हे ओरिसातलं प्राणिसंग्रहालय असो, की 'मातोश्री' हा बाळासाहेबांचा बंगला असो; वाघांचं काही खरं नाही, असंच चित्र दिसत होतं. मात्र, छगनरावांच्या सहीच्या एका फटकाऱ्यानिशी पांढऱ्या वाघांत नसलं, तरी शिवसेनेच्या वाघाच्या भुजांमधलं बळ वाढलं. शिवसेनेला एक प्रकारे जीवदानच मिळालं. मरगळलेले सैनिक आळस झटकून उठले. चक्क मुंबईतल्या रस्त्यांवर उतरले. ठाकऱ्यांना अटक होण्याआधीच त्यांना अटक झाली तर काय होईल, याचं प्रात्यक्षिकच या सैनिकांनी घडवलं. आता तुम्हीच सांगा, भुजबळ यांनी आपल्या एके काळच्या गुरूला ही 'दक्षिणा'च दिली की नाही?
वृत्तपत्रांनी मात्र विनाकारण भुजबळांनाच टीकेचं लक्ष्य केलं. अविवेकी निर्णय, अवेळी आणि अनाठायी पाऊल वगैरे वगैरे अग्रलेख लिहून छगनरावांवर टीका केली. ठाकऱ्यांच्या 'सामना' या मुखपत्रातूनही 'लखोबा'वर जहरी टीका होऊ लागली. भुजबळांना ठाकऱ्यांचा सूड घ्यायचा आहे वगैरे भाषा बोलली जाऊ लागली. ठाकरे यांना अटक होऊ नये, म्हणून केंद्रातील वाजपेयी सरकारवर दबाव आणण्यासाठी शिवसेनेच्या मनोहर जोशी, बाळासाहेब विखे-पाटील आणि सुरेश प्रभू या तिन्ही मंत्र्यांनी राजीनामे दिले. ते वाजपेयींनी काही स्वीकारले नाहीत. भुजबळांनी मुंबईत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्राकडे मदत मागितली. केंद्रानं जादा निमलष्करी दले देण्यास चक्क नकार दिला. मग भुजबळ वैतागले आणि त्यांनी महाराष्ट्रातील केंद्र सरकारच्या मालकीच्या संस्थांचा बंदोबस्त काढण्याची धमकीच दिली.
अखेर या प्रकरणाचा कळसाध्याय काय होणार, यामुळं अवघा महाराष्ट्र चिंताक्रांत जाहला. मात्र, फार काही घडलंच नाही. गेल्या मंगळवारी ठाकरेंविरुद्धची ती केसच मुंबईच्या भोईवाडा न्यायालयानं काढून टाकली. हर हर! ज्यासाठी केला एवढा अट्टाहास, अगा ते घडलेचि नाही, असं म्हणायची पाळी भुजबळांवर आली. ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी सगळीकडं जल्लोष केला. मंगळवारी सकाळच्या घटना या दृष्टीनं पाहण्यासारख्या होत्या. ठाकरे भोईवाडा न्यायालयाकडं स्वतःहून निघाले, असं शिवसेनेतर्फे घोषित करण्यात आलं. खरं तर त्यांना सावरकर रोडवरील महापौर बंगल्यात नेऊन तांत्रिक अटक करण्यात आली आणि मग न्यायमूर्तींपुढं उभं करण्यात आलं. न्यायमूर्ती बी. पी. कांबळे यांनी हा खटलाच कालबाह्य झाल्यामुळं रद्द करून टाकला अन् बाळासाहेब निर्दोष सुटले.
भुजबळांची 'गुरुदक्षिणा' अशा रीतीनं फळाला आली. महाराष्ट्रातील वृत्तपत्रांना गेले तीन आठवडे दुसरा विषयच नव्हता. ठाकरे यांची अटक हा जणू राज्यापुढचा एकमेव महत्त्वाचा विषय आहे, अशी रीतीनं सगळीकडं याच विषयाची चर्चा होत होती. मंगळवारी ठाकरे निर्दोष सुटले अन् ही चर्चा एकदम थांबली. लोक आता दुसऱ्या विषयाकडं वळले. या सगळ्या घटनांतून समाजाचं एक वैशिष्ट्य अलीकडं ठळकपणे जाणवू लागलं आहे, की लोकांना चर्चेसाठी काही तरी एक निमित्त लागतं; एखादा विषय लागतो. दोन महिन्यांपूर्वी मॅच फिक्सिंगची चर्चा होती. ते वारं गेलं अन् ठाकरेंच्या अटकेची चर्चा सुरू झाली. पूर्वी हृतिक रोशनची चर्चा चाले; मग ती जागा अभिषेक बच्चननं घेतली. आता तोही जुना झाला आणि 'कौन बनेगा करोडपती' या 'स्टार प्लस'वरील चमत्कृतीपूर्ण मालिकेची चर्चा सुरू झाली. असं लोकांना सारखं काही तरी चघळायला लागतं. पूर्वी असं नव्हतं. म्हणजे लोक चर्चा करीत नव्हते, असं नाही. पण त्यात चार जाणती माणसं सगळ्यांना समजावून सांगायची. बाकीचेही त्यांचं ऐकायचे. आता माहिती युगाचा परिणाम म्हणून की काय, सगळ्यांना सगळंच माहिती असतं. त्यामुळं जो तो तावातावानं आपलं म्हणणं मांडत असतो. दुसऱ्याचं ऐकून घेण्याची वृत्तीच नष्ट होत चाललीये. लोक अधिकाधिक असहिष्णू तचर बनत नाहीयेत ना, अशी शंका येते.
अलीकडंच मॅच फिक्सिंगचं प्रकरण ठाकरेंच्या अटकेच्या गदारोळातही पुन्हा असंच चर्चेला आलं. इन्कम टॅक्सवाल्यांनी देशभर ९३ ठिकाणी या क्रिकेटपटूंच्या घरोघर आणि संबंधित कार्यालयांवर छापे घातले. त्यातून दालमियाही सुटले नाहीत. कपिलदेव, अजहरुद्दीन, जडेजा, अजय शर्मा, सिद्धू आदी क्रिकेटपटूंनी अक्षरशः थक्क करणारी संपत्ती जमा केल्याचं या छाप्यांतून उघडकीला आलं. अजहरचा वांद्र्यातील हिल रोडवरचा दुमजली फ्लॅट म्हणजे अगदी राजमहाल भासावा, एवढा भारी होता म्हणे. महागडी चित्रे, उंची वस्त्रे, परदेशी बनावटीच्या मोटारी असा एकंदर अजहरभाईंचा नूर आहे. अजहरची पत्नी संगीता बिजलानी हिच्या फ्लॅटवरही छापे पडले. आपले क्रिकेटपटू केव्हाच 'करोडपती' बनले आहेत, हे सर्वसामान्य जनतेनं यावरून ओळखलं. अर्थात या क्रिकेटपटूंना त्यासाठी 'कौन बनेगा करोडपती'मधील प्रश्नांची उत्तरं देण्याचे कष्टही घ्यावे लागलेले नाहीत. सर्वसामान्यांना करोडपती बनायचं असेल, तर मात्र 'जनरल नॉलेज'ची कसून तयारी करायला हवी. स्टार प्लसवर गेले काही आठवडे सुरू असलेली 'कौन बनेगा करोडपती' ही मालिका सध्या सर्वत्र चर्चेचा मुख्य विषय बनली आहे. अमिताभ बच्चन सूत्रसंचालकाच्या रूपानं प्रथमच छोट्या पडद्यावर आला आहे, हेही या मालिकेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणता येईल. सध्या 'स्टार प्लस'वाले भलतेच खूश असतील. त्यांनी या मालिकेच्या निर्मितीसाटी खर्चलेले पैसे दामदुपटीनं वसूल होतील, अशी चित्रं आहेत. 'हू वाँट्स टु बी अ मिलेनिअर' या पाश्चात्त्य मालिकेची कल्पना केंद्रस्थानी ठेवून 'स्टार प्लस'ने करोडपतीची निर्मिती केली आहे. जनरल नॉलेज या सदराखाली मोडणारे प्रश्न या मालिकेत विचारतात. प्रत्येक प्रश्नाला एक हजारपासून ते एक कोटीपर्यंतची बक्षिसं! फुकटात करोडपती बनण्याचं स्वप्न हे या मालिकेच्या यशाचं मुख्य कारण. गेले काही महिने स्टार प्लस वाहिनी तोट्यात चालली होती. 'झी' व 'सोनी' या प्रतिस्पर्धी वाहिन्यांनी जाहिरातीच्या वार्षिक उत्पन्नात 'स्टार प्लस'ला फार मागे टाकलं होतं. आता या मालिकेमुळं 'स्टार प्लस'चं भवितव्य पुन्हा उजळलं आहे, यात शंका नाही. फुकटात एक कोटी रुपये मिळवून देण्याचं स्वप्न कुठल्या मध्यमवर्गीयाला पडत नाही? भारतातल्या तीस कोटी मध्यमवर्गीयांचा हा 'वीक पॉइंट' अचूक हेरून, 'स्टार प्लस'नं हा जुगाराचा डाव मांडला आहे. या मालिकेत भाग घेण्यासाठी एक फोन करावा लागतो. भारतातल्या प्रमुख शहरांतील हे फोन क्रमांक दररोजच्या लाखो फोन कॉल्समुळे कायम 'एंगेज' मिळतात. दूरध्वनी खात्याचा त्यामुळं मोठाच फायदा झाला आहे. या मालिकेमुळं 'स्टार प्लस'ला १३३ भागांनंतर सुमारे १२०० ते दीड हजार कोटी रुपये मिळतील, असा अंदाज आहे. याशिवाय अमिताभची डबघाईला आलेली 'एबीसीएल'ही पुन्हा उभारी धरेल, अशी चिन्हं आहेत.
या मालिकेमुळं सध्या एक चर्चा सर्वत्र सुरू आहे - ज्ञानाला, माहितीला असं पैशांत तोलावं का? अमूक प्रश्नाच्या उत्तराची किंमत अमुक एक हजार हे ऐकायलाही कसंसंच वाटतं. या मालिकेचं समर्थन करणाऱ्यांच्या मते, जुगार काय आपल्याकडं महाभारत काळापासून चालत आलेला आहे. तेव्हा या मालिकेमुळं लोकांचं जनरल नॉलेज वाढत असेल, तर वाईट काय? आणि खरंच, या मालिकेमुळं स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांना एकदम भाव आलाय. अनेक दैनिकांनी, साप्ताहिकांनी आपल्या अंकांमधून असे जनरल नॉलेजचे प्रश्न वाचकांना विचारायला सुरवात केलीये.
लोकांचं सामान्यज्ञान वाढत असेल त्यानिमित्तानं, तर चांगलंच आहे. पण 'फुकटच्या पैशांचं' असं आमिष दाखवत राहिलं, तर श्रमांबद्दल वाटणारा आदर कमी होईल, त्याचं काय? 'मानवतेचे मंदिर माझे... श्रमिक हो, घ्या इथे विश्रांती' असं सुधीर फडके यांचं प्रसिद्ध गीत आहे. उद्या 'करोडपती'च्या माध्यमातून लोक खरंच असे 'फुकटात' श्रीमंत व्हायला लागले, तर 'श्रमिक हो, घ्या इथे चिरविश्रांती' असं गायची वेळ यायची!

(२८-७-२०००)
---

सिडनी आकाशवाणीसाठी...

भारत डायरी (शेवटचा भाग)
---------------------------------

मंडळी नमस्कार,

आकाशवाणी सिडनीसाठी, मी - श्रीपाद ब्रह्मे - पुण्याहून भारत डायरी सादर करीत आहे.
मंडळी, भारत डायरीचा हा शेवटचा भाग. गेली साडेसहा वर्षं या डायरीच्या माध्यमातून आकाशवाणी सिडनीच्या श्रोत्यांशी मी संवाद साधू शकलो, याचं सर्व श्रेय आकाशवाणी सिडनीच्या संयोजकांनाच आहे. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी भारतातील राजकीय घडामोडींवर टीकाटिप्पणी करणारी ही डायरी मला खूप समृद्ध करून गेली. ही डायरी सादर करायची म्हणून स्वतःला अपडेट ठेवणं, वेगवेगळी माहिती संकलित करणं आणि मग सिडनीहून डॉ. सावरीकर किंवा विजय जोशींचा फोन आला, की ती सादर करणं यात मला खूप आनंद मिळाला. सिडनीत स्थायिक झालेल्या मराठी जनांना मातृभूमीतल्या घटना-घडामोडी सांगून त्यांना अपडेट करता आलं, याचं समाधान काही निराळंच आहे!
ही डायरी सादर करण्यासाठी माझ्याकडं आली याचं सगळं श्रेय उज्ज्वला बर्वे यांना! त्यांनी माझं नाव सुचवलं नसतं, तर आपल्याला भेटण्याची संधी मला मिळाली नसती. २८ जुलै २००० रोजी भारत डायरीचा पहिला भाग रेकॉर्ड झाला आणि त्यानंतर आत्तापर्यंत ती दर महिन्याला अव्याहतपणे सुरू राहिली. अपवाद दोनच. तेही याच वर्षी आलेले. अन्यथा २००० पासून सलग ६७ महिने ही डायरी एकदाही खंड न पडता ध्वनिमुद्रित झाली, याचं श्रेय आकाशवाणी सिडनीच्या संयोजकांनी पाळलेल्या शिस्तीलाच आहे.
आतापर्यंत एकूण ७५ भाग पूर्ण झाले आणि हा शेवटचा, ७६ वा भाग आज प्रसारित होतोय. अर्थात प्रत्येक गोष्टीला शेवट हा असतोच. त्याच न्यायानं आणि नव्या वर्षात काही नव्या कार्यक्रमांना स्थान देण्यासाठी ही डायरी आता थांबते आहे. अर्थात निरोप घेण्यापूर्वी या वेळची डायरी मी सादर करतो आहे.
मंडळी, डिसेंबरमधील आपली डायरी म्हणजे संपूर्ण वर्षाचा आढावा घेणारी डायरी. यंदाचं २००६ हे वर्ष आता मावळतीकडं निघालं आहे. हे वर्ष भारताच्या राजकीय इतिहासात महत्त्वाचं ठरणार आहे. भारत आणि अमेरिकेतील ऐतिहासिक आण्विक कराराची पायाभरणी या वर्षानं केली आहे. एक मार्चला अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश भारताच्या दौऱ्यावर आले आणि त्यांच्या या भेटीनं भारत-अमेरिका संबंधांची परिमाणंच बदलली. वर्ष संपता संपता बुश यांनी अमेरिकी काँग्रेसनं संमत केलेल्या या संदर्भातल्या विधेयकावर स्वाक्षरीही केलीय.
प्रतिस्पर्धा कमकुवत असल्यामुळं केंद्रातील काँग्रेस आघाडीचं सरकार दिवसेंदिवस भक्कम होत चाललंय. डॉ. मनमोहनसिंग यांच्यासारखा सोज्वळ चेहरा पंतप्रधान म्हणून या सरकारला लाभला आहे; तर सोनिया गांधीही आपण मुरब्बी राजकारणी असल्याचं अधिकाधिक सिद्ध करीत चालल्या आहेत. वर्षभरात केरळमधली काँग्रेसची सत्ता गेली; पण त्या बदल्यात झारखंडमधलं भाजपचं सरकार घालवून तिथं मधू कोडा नामक अपक्षाला मुख्यमंत्रिपदावर बसविण्यात काँग्रेसनं यश मिळवलं. काँग्रेसला आता उत्तर प्रदेशातली मुलायमसिंह यादवांची सत्ता काट्यासारखी सलते आहे. येत्या फेब्रुवारीत तिथं विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. तेव्हा काँग्रेस राहुल गांधींना प्रचारात उतरवणार, हे नक्की.
आर्थिक आघाडीवर केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची शिस्त या सरकारला पूरकच ठरते आहे. देशातील सेवा क्षेत्र मोठ्या प्रमाणावर फोफावत असून, ते अधिकाधिक कराच्या जाळ्याखाली आणण्याचा प्रयत्न चिदंबरम करीत आहेत. मराठी माणसांच्या दृष्टीनं या वर्षातील कटू घटना म्हणजे साताऱ्याच्या युनायटेड वेस्टर्न बँकेचं आयडीबीआय बँकेत झालेलं विलीनीकरण. पुण्यातली सुवर्ण सहकारी बँक, सांगली बँक या सहकारी क्षेत्रातल्या बँकाही विलीनीकरणाच्या मार्गावर आहेत. असो.
काँग्रेसचं असं बरं चाललेलं असताना, विरोधकांच्या, विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं हे वर्ष काळंकुट्ट म्हणावं एवढं वाईट गेलं. प्रमोद महाजन यांची त्यांच्या धाकट्या भावानंच गोळ्या घालून केलेली हत्या हा भाजपवर या वर्षात झालेला वज्राघात होता. २२ एप्रिल रोजी सकाळी महाजन यांच्या वरळीतील फ्लॅटमध्ये येऊन प्रवीण महाजनने त्यांच्यावर जवळून तीन गोळ्या झाडल्या. त्यानंतर हिंदुजा रुग्णालयात तीन मेपपर्यंत महाजन जन्म-मृत्यूची झुंज देत होते. अखेर नियतीचा विजय झाला आणि हा उमदा राजकारणी अकालीच आपल्यातून निघून गेला. महाजन यांच्या अशा मृत्यूमुळं भाजपला संघटना पातळीवर मोठा धक्का बसला. अर्थात भाजपचं नष्टचर्य एवढ्यावर संपलं नाही. महाजन यांचा मुलगा राहुल आणि त्यांचा स्वीय सचिव विवेक मैत्रा यांना अमली पदार्थांचं अतिसेवन केल्याच्या प्रकारातून दोन जून रोजी अपोलो रुग्णालयात दाखल करावं लागलं. या घटनेत मैत्रांचा मृत्यू झाला, तर राहुल मात्र बचावला. पुढचे काही दिवस या वादातच सापडल्यामुळं त्याच्या राजकीय भवितव्याला पूर्णविराम मिळाला. अगदी अलीकडं पत्नी श्वेता हिला कथित मारहाण केल्याच्या प्रकारातून तो चर्चेत राहिला. एकूणच भाजपच्या राशीत सध्या सर्व अनिष्ट ग्रहांची दाटी झाल्याचं दिसतं आहे.
वाजपेयी आणि अडवानी दोघंही आता मावळतीकडं निघाले आहेत. महाजन यांच्यानंतर राजनाथसिंह, सुषमा स्वराज, अरुण जेटली, नरेंद्र मोदी आदी नेत्यांवर भाजपची भिस्त आहे. अर्थात यापैकी कुणालाही सोनिया गांधींएवढा देशव्यापी करिष्मा नाही. प्रत्येकालाच आपलं कर्तृत्व काळाच्या कसोटीवर सिद्ध करावं लागेल.
भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचीही अवस्था फारशी निराळी नाहीय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आता पूर्णपणे निवृत्त जीवन व्यतीत करीत आहेत. राज ठाकरे यांनी गेल्या वर्षाच्या शेवटीच बंडाचं निशाण फडकावलं होतं. त्या राज ठाकरेंनी या वर्षी नऊ मार्चला महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नावाचा नवा राजकीय पक्ष स्थापन केला. त्यांच्या पक्षाची अवस्था रांगत्या मुलासारखी असली, तरी हा पक्ष राज्याच्या सत्ता-समीकरणांत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, यात शंकाच नाही. किंबहुना येत्या एक फेब्रुवारी रोजी होऊ घातलेल्या मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आदी महापालिकांच्या निवडणुकांत राज ठाकरेंच्या पक्षाची खरी कसोटी लागणार आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात नारायण राणे यांनी या वर्षावर आपली मुद्रा उमटवली, असं म्हणावं लागेल. त्यांनी आपल्या समर्थक आमदारांना राजीनामे द्यायला लावले आणि एक श्रीवर्धनचा अपवाद वगळता, सगळीकडं त्यांना पुन्हा काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आणलं. अगदी अलीकडं चिमूर आणि दर्यापूर या विदर्भातल्या मतदारसंघांतही विजयश्री खेचून आणून, राणे यांनी आपला प्रभाव केवळ कोकण किंवा मुंबईपुरता नाही, हे सिद्ध केलं. राणे यांच्या वाढत्या वर्चस्वाची दखल सोनिया गांधींनीही घेतली आहे. राणेंची मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा कधीच लपून राहिलेली नाही. त्यामुळं काँग्रेसच्या एका गोटात अस्वस्थता आहे. अर्थात राणेंनीही हळूहळू काँग्रेसी शैलीचं राजकारण आत्मसात करायला सुरवात केलीय. राज ठाकरे आणि नारायण राणे ही महाराष्ट्रातल्या राजकारणातली भविष्यातली दोन महत्त्वाची नावं आहेत.
शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी याच वर्षी संसदीय राजकारणात पदार्पण केलं. ज्येष्ठ गांधीवादी नेते आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भारदे यांचं नोव्हेंबर महिन्यात निधन झालं. त्यांच्या निधनानं महाराष्ट्रातल्या राजकारणातला संतपरंपरेशी नातं सांगणारा एक दुवा संपला.
साहित्य क्षेत्रात तर मराठीसाठी हे वर्ष संस्मरणीय ठरलं. विंदा करंदीकरांना आठ जानेवारीला साहित्य क्षेत्रातला देशातला सर्वोच्च असा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला. ‘विंदां’च्या कवितांवर भरभरून प्रेम करणाऱ्या मराठी मनाला त्यामुळं अत्यंत आनंद झाला. दहा ऑगस्टला विंदांना राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार दिल्लीत प्रदान करण्यात आला. वर्ष संपता संपता आशा बगे यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झालाय. जानेवारीत सोलापुरात पार पडलेलं साहित्य संमेलन वाचकांच्या प्रचंड प्रतिसादामुळं गाजलं. विश्वास पाटील यांची बहुचर्चित ‘संभाजी’ कादंबरी या वर्षी प्रसिद्ध झाली. पुढील वर्षी फेब्रुवारीत नागपुरात होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अरुण साधू यांची निवड झालीय. साधू हे लोकप्रिय लेखक तर आहेतच; पण कृतिशील पत्रकार, चिंतनशील समाजशास्त्रज्ञ आणि व्यासंगी अभ्यासक आहेत. त्यांच्या निवडीमुळं मराठी साहित्यरसिकांना निश्चितच आनंद झालेला आहे.
मनोरंजनाच्या क्षेत्रात बोलायचं झालं, तर यंदा ‘रंग दे बसंती‘, ‘फना’, ‘क्रिश’, ‘कभी अलविदा ना कहना’ असे काही सुपरहिट चित्रपट बॉलिवूडनं दिले. पण सगळ्यांत भाव खाऊन गेला तो संजय दत्तचा ‘लगे रहो मुन्नाभाई’. या चित्रपटानं देशात ‘महात्मा गांधी’ ही एक ‘इन थिंग’ करून टाकली. ‘गांधीगिरी’ हा शब्द ज्याच्या त्याच्या मुखी घोळू लागला. अर्थात संजय दत्तला वैयक्तिक आयुष्यात त्याचा फार उपयोग झाला नाही; कारण मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात विशेष ‘टाडा’ न्यायालयानं त्याला शस्त्रं हाताळल्याप्रकरणी दोषी ठरवलंय. आता शिक्षा कधी सुनावली जाते, याची प्रतीक्षा आहे. या वर्षाच्या सुरवातीला १७ फेब्रुवारीला चिंकारा शिकार प्रकरणी सलमान खानलाही एक वर्ष कारावासाची शिक्षा न्यायालयानं ठोठावली. अर्थात त्याला जामीन मिळाला आहे. या वर्षात उस्ताद बिस्मिल्ला खाँ, संगीतकार नौशाद, अभिनेत्री नादिरा, कन्नड सुपरस्टार राजकुमार, ज्येष्ठ दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जी हे नामवंत कलावंत हे जग सोडून गेले.
अर्थात असं असलं तरी ‘शो मस्ट गो ऑन’ या तत्त्वावर जगरहाटी चालतच राहते. ऋतूमागून ऋतू येतात, जातात. एक पिढी जाते, दुसरी येते. एक चक्र अव्याहत सुरू असतं. दक्षिण कोरियाचा प्रसिद्ध दिग्दर्शक किम की डूक याच्या ‘स्प्रिंग, समर, फॉल, विंटर अँड स्प्रिंग अगेन’ या अप्रतिम चित्रपटात दाखवलेल्याप्रमाणे काळाचं हे चक्र पूर्ण झालं, की पुन्हा वसंत फुलतच असतो.
मला हे सगळं विस्तारानं सांगावंसं वाटतंय, ते यामुळंच, की जरी गेल्या साडेसहा वर्षांपासून सुरू असलेली ही भारत डायरी आज संपत असली, तरी कुठल्या ना कुठल्या रूपात ती तुम्हाला भेटत राहील. तुम्हीही तिची आठवण ठेवा. नवं वर्ष येतंय. ते आपल्या सर्वांच्या जीवनात यशाचा वसंत ऋतू घेऊन येवो, अशी शुभेच्छा देतो. आकाशवाणी सिडनीच्या सर्व उपक्रमांनाही मनापासून सुयश चिंतितो. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार मानतो आणि निरोप घेतो. नमस्कार. जय हिंद!

(२३-१२-२००६)
----

16 Jun 2015

दिल धडकने दो - रिव्ह्यू



नाव आहे चाललेली...
-------------------------

झोया अख्तर दिग्दर्शित दिल धडकने दो हा नवा हिंदी चित्रपट मला दोन कारणांसाठी आवडला. काही काही कलाकृती जन्मताच अभिजातपणाचं कोंदण घेऊन आलेल्या असतात. झोयाचा चित्रपट याच वर्गात मोडणारा आहे. कारण तो पाहताना एखाद्या कसलेल्या गायकाकडून विलंबित ख्याल ऐकत गुंगून जाण्याचा फील येतो. अत्यंत तब्येतीत बनवलेला हा चित्रपट आहे. त्यामुळं त्याच्या दोन तास ५० मिनिटं या आजच्या मानानं फारच दीर्घ वाटणाऱ्या कालावधीचीही पर्वा झोयानं केलेली नाही. विशेष म्हणजे एवढा मोठा सिनेमा पाहताना आपल्याला मुळीच कंटाळा येत नाही. हे निखालस पटकथेवर आणि चित्रपटाच्या प्रत्येक दृश्यावर घेतलेल्या मेहनतीचं यश आहे, यात शंका नाही. दुसरं कारण म्हणजे या सिनेमाचं परफेक्ट कास्टिंग. म्हणजे यातल्या प्रत्येक भूमिकेत काम करणारे कलावंत त्या त्या भूमिकेत एवढे चपखल बसले आहेत, की त्या जागी दुसऱ्या कुणाचा विचारही आपल्या मनात येत नाही. सिनेमा तयार करताना प्रचंड पूर्वतयारी लागते. तो आधी दिग्दर्शकाच्या मनात तयार व्हावा लागतो, असं म्हणतात. झोयानं (आणि तिच्यासह कथा-पटकथा लिहिणारी, दुसरी अत्यंत अत्यंत गुणवान दिग्दर्शिका रीमा कागती हिनं) यातली फ्रेम न् फ्रेम आधी मनात पाहिली असणार. त्यानंतर ती प्रत्यक्षात उतरवताना त्यांना सर्व कलाकारांची उत्कृष्ट साथ लाभली आहे. त्यामुळंच हा एक मस्ट वॉच सिनेमा ठरला आहे.
दिग्दर्शकाला आपल्या कलाकृतीतून जे काही सांगायचं आहे, त्यासाठी तो माध्यम म्हणून एखादी गोष्ट निवडतो. त्यात रंजक प्रसंग निर्माण करून ती पाहणाऱ्याला इंटरेस्टिंग वाटेल अशी तयार करतो. तयार करणाऱ्याला जे काही सांगायचंय ते पाहणाऱ्यापर्यंत जसंच्या तसं पोचलं, की ती कलाकृती यशस्वी झाली असं मानता येईल. हे जसंच्या तसं पोचणं हीच प्रक्रिया खूप अवघड असते. प्रेक्षकांच्या मानसिकतेचा लसावि काढून त्याच्या जवळ जाईल, अशी कलाकृती तयार करणं फारच कठीण. झोयानं हे साधलं, याचं एकमेव कारण ती स्वतः उत्तम क्राफ्ट्सवुमन आहे. दिल धडकने दो या चित्रपटाच्या माध्यमातून ती आपल्याला नेहमीचीच गोष्ट सांगते. पंजाबातल्या अतिश्रीमंत मेहरा कुटुंबाची ही कथा आहे. भारतातल्या कुटुंबसंस्थेची, पालकांची, मुलांची आणि त्यांच्या एकमेकांत गुंतलेल्या नात्यांची आणि त्यांच्या ओढाताणीची ही गोष्ट आहे. वरकरणी पाहता, यात विशेष काही वाटत नाही. पण या साध्याच गोष्टील विशेष बनवते ती झोयाची हाताळणी. एखादी दीर्घ कादंबरी वाचताना लेखक ज्या प्रकारे पात्रांची रचना करतो, प्रत्येक पात्राला स्थापित होण्याचा अवकाश देतो, त्यांची अन्य पात्रांशी असलेली वेगवेगळ्या स्तरांवरच्या नातेसंबंधांची वीण बांधतो त्याच पद्धतीनं झोया आपली कलाकृती सादर करते. 
 इथं विलंबित लय असल्यानं प्रत्येक पात्र आपल्या मनात व्यवस्थित प्रस्थापित होतं. त्याच्या भावभावना, त्याचा स्वभाव, त्याचे विविध कंगोरे आपल्याला नीटच समजतात. कादंबरीत लेखकाचं निवेदन सूत्रधाराचं काम करतं किंवा मैफलीत गायक स्वतःच ती भूमिका बजावत असतो, तद्वत झोयानं इथं मेहरा कुटुंबातील प्लूटो या कुत्र्यालाच ही सूत्रधाराची भूमिका दिली आहे. यामुळं कथेतील निवेदनाचं आणि सांधेजोडणीचं महत्त्वाचं काम प्लूटोनं पार पाडलं आहे. प्लूटोला आवाज आहे आमीर खानचा. आमीरचं असं आवाजाच्या रूपानं या चित्रपटात असणं त्याच्या गुणवत्तेला आणखी चार चाँद लावतं, यात शंकाच नाही. चित्रपटाचे संवाद फरहान अख्तरनं लिहिले असले, तरी प्लूटोचे सर्व संवाद जावेद अख्तर यांनी लिहिले आहेत. अत्यंत चुरचुरीत आणि मिश्कील असं हे भाष्य मुळातूनच ऐकायला हवं.
मेहरांची कंपनी अडचणीत असतानाच ते लग्नाच्या तिसाव्या वाढदिवसाचं निमित्त काढून इस्तंबूलमध्ये क्रूझवरची ट्रिप आयोजित करतात. त्यानंतरचा सगळा सिनेमा हा जवळपास त्या क्रूझवर घडतो. एका अर्थानं मेहरांच्या आयुष्याचीच ही प्रतीकात्मक नौका आणि त्यातला त्यांचा प्रवास सुरू आहे. त्यांच्या तरुण मुलांच्या - आयेशा आणि कबीरच्या - जीवनात काही उलथापालथी घडताहेत. मेहरांना आपला बिझनेस वाचविण्यासाठी मुलाचं लग्न हा उपाय दिसतोय. मुलगी स्वतः यशस्वी उद्योजक असली, तरी तिच्या उद्योगपती नवऱ्यासह ती खूश नाही. कबीरलाही आई-वडिलांनी बिझनेस मॅरेज असल्यासारखं त्याचं एका उद्योगपतीच्या मुलीबरोबर ठरवलेलं लग्न मान्य नाही. तो क्रूझवरच्या एका नर्तिकेच्या प्रेमात पडला आहे. मुलीचा आधीचा प्रियकरही त्याच वेळी बोटीवर येतो. आतापर्यंत वरकरणी हसत-खेळत चाललेल्या मेहरांच्या घराला हादरे बसू लागतात. आयुष्याच्या नौका हिंदकाळू लागतात... अखेर नातेसंबंधांचं महत्त्व आणि पालक-मुलांच्या नात्यांवर मिश्कील, पण बोचरं भाष्य करून सिनेमा शेवटाला येतो.
 झोयानं अत्यंत प्रेमानं यातली प्रत्येक फ्रेम सजवली आहे. उत्तरार्धात क्वचित काही प्रसंगी सिनेमा रेंगाळल्यासारखा वाटतोही. पण लगेच तो पूर्ववत ट्रॅकवर येतो. यातल्या प्रमुख भूमिका तर सोडाच, पण लहानातल्या लहान भूमिकेत काम करणारे कलाकारही प्रेक्षकांच्या मनात एस्टॅब्लिश होतील, याची काळजी दिग्दर्शिकेनं घेतली आहे. कुठलाही अनावश्यक फाफटपसारा नसतानाही हा सिनेमा एवढा मोठा झालाय, याचं कारण प्रत्येक प्रमुख व्यक्तिरेखा आणि तिचे अन्य व्यक्तिरेखांशी असलेले संबंध दिग्दर्शिकेनं आपल्यासमोर अगदी सविस्तर रेखाटले आहेत. त्यामुळं आपण काही वेळानंतर त्या व्यक्तिरेखेच्या जागी आपणच आहोत, असं कल्पून तिच्या बाजूनं विचार करायला लागतो. प्रेक्षकांना असं गोष्टीत खेचून नेल्यानंच ही कलाकृती आपल्या मनाची पकड घेते.

भूमिकेतील कलाकारांची निवड याविषयी वर सांगितलंच आहे. अनिल कपूर आणि शेफाली शहा या दोघांनीही मेहरा दाम्पत्याच्या भूमिकेत खासच रंग भरले आहेत. अनिल कपूर मला व्यक्तिशः आवडतोच. हा कलाकार कुठल्याही भूमिकेत अगदी ग्रेसफुली काम करतो. त्याचा स्क्रीन प्रेझेन्स जबरदस्त आहे. याबाबत त्याची तुलनाच करायची तर ती फक्त अमिताभशी करता येईल. कमल मेहराची ही भूमिका त्याच्या वयालाही अगदी साजेशीच आहे आणि ती त्यानं फारच तडफेनं सादर केली आहे. शेफाली शहानं साकारलेली नीलम मेहरा पाहण्यासारखी आहे. पतीकडून अपमान झाल्यावर ती केकचा तोबरा भरून स्फुंदते, तो प्रसंग तिनं फारच अप्रतिम केला आहे. रणवीरसिंह आणि प्रियांका चोप्रा बहीण-भावाच्या भूमिकेत आहेत. दोघांनीही मजा आणली आहे. विशेषतः रणवीरचा कबीर झकासच. फरहान अख्तर, राहुल बोस यांनीही त्यांच्या भूमिकांत जीव ओतला आहे. प्रियांका चोप्रानं आयेशाची तगमग चांगली दाखवली आहे. अनुष्का शर्माला मात्र फार वाव नाही. बॉम्बे वेल्वेटची आठवण व्हावी, असं एक गाणं तिच्या वाट्याला आलं आहे.
हा सिनेमा पाहताना मला सारखी आरती प्रभूंच्या ‘दुःख ना आनंदही, अंत ना आरंभही, नाव आहे चाललेली... कालही अन् आजही’ या कवितेची आठवण येत होती. एका मोठ्या नावेवरचा हा प्रवास जवळपास तेवढाच फिलॉसॉफिकल आणि आत्ममग्न व्हायला लावणारा आहे, हे निश्चित. जोडीला तो मनोरंजकही आहे, हे आइसिंग ऑन द केक!
---
दर्जा - चार स्टार
----



11 Jun 2015

हवाहवासा गोवा...


गोव्यात जायला मला नेहमीच आवडतं. खूप वेळा गेलोय असं नाही. पण जेव्हा जेव्हा गेलोय तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी गोव्याच्या अधिकच प्रेमात पडत गेलोय. पहिल्यांदा गोव्याला गेलो ते लग्नानंतर. हनीमूनला. त्यानंतर इफ्फी कव्हर करायला एकदा गेलो. त्या वेळी अर्थातच एकटा होतो. नंतर लग्नाला दहा वर्षं झाली, म्हणून पुन्हा त्याच हॉटेलात, त्याच ठिकाणी गेलो. या वेळी आमच्या दोघांसोबत मुलाचीही भर पडली होती आणि दोन मित्रही त्यांची कुटुंबं घेऊन सहभागी झाले होते. त्यामुळं या ट्रिपला खूपच धमाल आली. या तिन्ही सहलींच्या वेळी गोव्यात गेल्यावर पाहतात ती सर्व पर्यटनस्थळं, म्हणजे मंगेशीच्या मंदिरापासून ते दोना पावलापर्यंत आणि फोर्ट आग्वादपासून अंजुना बीचपर्यंत (बोट क्रूझसह) करून झाली होती. त्यामुळं या वेळी गोव्याला जायचं ठरवलं ते दोन-तीन दिवस सुशेगाद राहण्यासाठी... इथं माझा नगरचा मित्र उपेंद्र कुलकर्णी याची पत्नी अदिती मदतीला आली. हे उत्साही, झकास जोडपं गोव्यालाच राहत होतं. अदितीनं वारी नावाची एक ट्रॅव्हल कंपनी सुरू केलीय आणि उपेंद्र गोव्यात कळंगुटला 'अझ्युरी बाय स्प्री हॉटेल्स' या हॉटेल चेनमध्ये सीनियर एरिया मॅनेजर आहे. मग काय...! याच हॉटेलात राहण्याची सोय अदितीच्या मदतीनं झाली आणि आम्ही - म्हणजे मी, बायको धनश्री व मुलगा नील - गोव्याला रवाना झालो. गोवा म्हटलं, की पावलो ट्रॅव्हल्स हेच नाव डोळ्यांसमोर येतं. आता अनेक कंपन्यांच्या बस जात असल्या तरी आम्ही सोयीच्या वेळेला पावलो बसचंच बुकिंग केलं. स्लीपर कोचनं सात जूनला रात्री निघून सकाळी म्हापशाला पोचलो. जून महिन्यात मी पहिल्यांदाच गोव्यात येत होतो. यापूर्वी गोव्याला येणं झालं होतं ते फेब्रुवारी, मार्च आणि नोव्हेंबर महिन्यांमध्ये. जूनमधला गोवा जसा अपेक्षित होता तसाच दिसला. ढगाळ हवामान, नुकताच पाऊस पडून गेलेला.
गोव्याचे सुपुत्र पोएट बा. भ. बोरकर यांच्या शब्दांप्रमाणे सृष्टीला अगदी पाचवा म्हैना... सुरू झाला नसला, तरी तिचं नवं-कोरं गर्भारपण जाणवत होतं. (गोवा म्हटलं, की कुणाला वारुणी आठवते, तर कुणाला तरुणी आठवते... मलाही या दोन्ही गोष्टी आठवत असल्या, तरी जोडीला बाकीबाब यांची ही सुंदर शब्दकळाही आठवते आणि त्या निसर्गरम्य गोव्याच्याच प्रेमात अधिक पडायला होतं...) तबियत खूश करणारा हा मोसम पाहूनच गोव्याच्या पुन्हा नव्यानं प्रेमात पडलो. हवा कुंद होती, धुंद होती. हिरव्यागर्द धरतीला काळ्याभोर आभाळाचं मखर होतं. आम्ही रिक्षा करून हॉटेलला पोचलो. हे हॉटेलही आम्हाला आवडलं. जुनीच इमारत असणार. पण रिनोव्हेट केलेली होती. पांढऱ्या रंगानं रंगवलेली ही इमारत गोव्यातल्या अनेक जुन्या इमारती किंवा चर्चच्या रंगसंगतीशी साधर्म्य राखून होती. मागच्या बाजूला छोटासा तलाव होता आणि त्यामागं शेती. त्याहीमागं डोंगर. एकूण जागा अप्रतिम होती, यात वाद नाही. हॉटेलच्या ट्रीट नावाच्या रेस्तराँमध्ये ब्रेकफास्ट केला आणि मग बाहेर पडलो. उपेंद्रची भेट झाली होती आणि मी त्याला या वेळी नेहमीची पर्यटनस्थळं बघणार नसल्याचं सांगितलं होतं. मग त्यानं पणजीतलं सायन्स पार्क (खास करून नीलला) पाहण्याजोगं आहे, असं सांगितलं. आम्हाला वेळच वेळ होता. बाइक घेऊन फिरण्याचा पर्याय पावसाच्या शक्यतेमुळं बाद ठरला. मग तिथल्या स्थानिक बसमधून आम्ही पणजीला निघालो. ही बस सरळ कळंगुटवरून पणजीला न येता, आतल्या बाजूनं छोटी छोटी गावं घेत पणजीत येते. आम्हाला अनायसे त्या सुंदर भागाचं बसल्या जागी दर्शन झालं. एरवी ही कंट्रीसाइड पाहायला मुद्दाम जाणं झालं नसतं. पण बसमधून गेल्यानं ते साधलं. पणजी आल्यावर आम्ही बसमधून उतरून रिक्षा करून सायन्स पार्कमध्ये गेलो. दोन वर्षांपूर्वी आलो होतो, तेव्हाच दोना पावलाच्या रस्त्यावर असलेलं हे पार्क पाहिलं होतं. पण तिथं लगेच जायला मिळेल असं वाटलं नव्हतं. त्या मानानं लवकर योग आला.
हे सायन्स पार्क चांगलं आहे. नीलला मजा आली. आम्ही तिथं एक थ्री डी शो पाहिला. पिंपरीत असलेल्या सायन्स पार्कसारखंच, पण थोडं छोटं असं हे गोव्याचं सायन्स पार्क आहे. रिक्षावाला गोव्याचा असल्यानं आम्हाला परत नेण्यासाठी तासभर थांबला होता. जाताना नवं भाडं शोधण्यापेक्षा आम्हाला नेणं त्याला सोयिस्कर वाटत होतं. पण तो थांबला ते बरं झालं. कारण आम्ही रिक्षात बसलो आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यात त्या रस्त्याचं काम चालू होतं आणि समोर एक शाळा सुटली होती. त्यामुळं मस्त ट्रॅफिक जॅम झालं. ते पाहत, शेजारी उधाणलेला समुद्र पाहत टाइमपास झाला. अखेर पंधरा-वीस मिनिटांनी आम्ही तिथून बाहेर पडू शकलो. मीरामार बीच ते मांडवीच्या पुलापर्यंत असलेला हा दयानंद बांदोडकर रस्ता (यालाच बुलेवार्ड म्हणतात...) मला फारच आवडतो. आठ वर्षांपूर्वी फिल्म फेस्टिव्हलला आलो होतो, तेव्हाच मी या रस्त्याच्या प्रेमात पडलो होतो. या रस्त्यानं आम्ही आयनॉक्सला आलो. तिथं दिल धडकने दो बघण्याचा विचार होता, पण ऐन वेळी तो रद्द केला. मग सकाळी मनस्विनीनं (प्रभुणे) सुचवल्याप्रमाणं पणजीतल्या कॅफे भोसलेमध्ये जेवायला गेलो. तिथं बन्स (केळ्याची पुरी) हा प्रकार खाल्ला. मला आवडला. मनस्विनीनं सांगितल्याप्रमाणं या पुरीसोबत मिरची खातात. ती काही आम्हाला मिळाली नाही. पण जेवण छान होतं. भोसलेंना धन्यवाद देऊन बाहेर पडलो. दुपारची वेळ होती. बायकोला शॉपिंग करायची होती. पण पणजीत दुपारी काय वातावरण असतं, हे तिनं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आणि आम्ही निमूटपणे स्टँडचा रस्ता धरला. सुशेगाद म्हणजे काय, हे आम्हाला नीटच कळलं होतं. (बाकी पणजीला का नावं ठेवा... पुण्यात तरी दुपारी एक ते चार काय वेगळं वातावरण असतं...!)
संध्याकाळ हॉटेलमध्येच साग्रसंगीत घालवल्यानंतर खऱ्या अर्थानं गोवा अंगात भिनायला सुरुवात झाली होती. रात्री बाहेर पडणारा पाऊस आणि हॉटेलच्या रूमचा हवाहवासा ऊबदारपणा... गोव्याच्या हवेतच एवढी झिंग असताना लोक पुन्हा वेगळी दारू का पितात, कळत नाही. अर्थात कळतंय पण वळत नाही असंही अनेकांचं होत असणार म्हणा! असो. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही उपेंद्रनं सुचवल्याप्रमाणं पर्वरीला गोवा म्युझियम पाहायला गेलो.
नेहमीप्रमाणं रिक्षावाल्यांना हे ठिकाण माहिती नव्हतं. पण गुगलच्या मदतीनं पत्ता शोधला आणि रिक्षेवाल्याला दाखवला. मग त्याच्या लक्षात आलं. आम्हाला तर कसलं म्युझियम आहे, काय आहे काहीही ठाऊक नव्हतं. पण पर्वरीच्या सुंदर भागातून पुढं खाली गेल्यावर हे छोटेखानी म्युझियम लागलं. म्युझियम सरकारी नव्हतं, तर खासगीच होतं. एकाच इमारतीत तीन मजल्यांवर हे हाऊसेस ऑफ गोवा म्युझियम होतं. गोव्याच्या स्थापत्यशैलीचे विविध नमुने तिथं होते. जुन्या वास्तूंमध्ये स्तंभ, कड्या इ. नमुने तिथं ठेवले होते. देवघर होतं. घरातलं एक छोटेखानी चर्चही होतं. इंडो-पोर्तुगीज स्थापत्याचे नमुने दाखवणारी भरपूर चित्रं होती. गोव्यातल्या घरांचं वेगळेपण चटकन लक्षात येत होतं. एक वेगळं प्रदर्शन बघितल्याचं समाधान लाभलं. शेजारीच (गोव्यातले विख्यात चित्रकार) मारिओ मिरांडांची गॅलरी होती. आमच्या म्युझियमच्या तिकिटांवर तिथं मिरांडांची पाच
कार्डं गिफ्ट मिळाली. मिरांडांची अफलातून चित्रं पाहिली.
अचानक गुप्तधन गवसावं तसा आम्हाला हा स्पॉट गवसला. त्या म्युझियमच्या मागं वेगळ्याच शैलीत बांधलेल्या दोन-तीन इमारती होत्या. ती एक शाळा आहे हे कळल्यावर तर मला तिथं शिकणाऱ्या पोरांचा फारच हेवा वाटला. तिथून परत येताना लक्षात राहिली ती मिरांडांची लयदार रेषांची करामत आणि गोव्यातली विविध घरं दाखवणारं ते छोटेखानी संग्रहालय... वेगळं काही तरी पाहण्याची इच्छा असलेल्यांनी नक्की पाहावं असंच हे ठिकाण.
संध्याकाळ कळंगुटच्या त्या प्रसिद्ध बीचवर गेली. समुद्र उधाणलेलाच होता. लाल बावटा लागला होता. पण उत्साही पर्यटक लाटांवर झोकून देत होते. सगळीकडं सळसळतं चैतन्य पसरलं होतं. समोर अथांग सागर पसरला होता.... त्यालाही वारंवार उचंबळून येत होतं आणि मलाही... लाटा येत होत्या अन् जात होत्या. मी आणि नील वाळूत घट्ट पाय रोवून उभे होतो. पण जाणारी लाट पायांखालची वाळू काढून नेत होती.... लाट खिदळत होती अन् आम्ही हिंदकळत होतो...  भोवती गर्दी होती, पण तरीही एक अनामिक एकलेपण मनात भरून राहिलं... क्षणभरच! दुसऱ्याच क्षणाला मुलाचा हात हातात आला आणि मी पुन्हा या जगात आलो. थोड्या वेळानं आम्ही तिघंही त्या बीचवरून निघालो, पण पुन्हा अर्ध्या तासानं परत बीचवर आलो... सूर्यास्त होऊन गेला होता... समोरची क्षितिजरेषा केशरी-लालसर रंगाऐवजी जांभळट-करडी होऊ लागली होती... दशदशांनी अंधार चालून आला. समोर दूरवर दोन मोठ्ठी गलबतं आणि त्यावरचे दिवे दिसू लागले. हे दृश्य पाठ सोडवेना. अखेर अगदीच नाइलाजानं तिथून निघालो. कुठल्याशा वेगळ्याच जगात पाच मिनिटं का होईना, घेऊन जाणारा तो सागरकिनारा आता मागं राहिला होता. आम्ही माणसांत आलो होतो...
गोवा आवडतो तो अशाच काही निसटत्या, पण अननभूत क्षणांसाठी...


----------------------------