29 Apr 2016

सैराट रिव्ह्यू

सुन्नाट
---------

फर्स्ट थिंग फर्स्ट. 'सैराट' पाहणं हा एक भन्नाट अनुभव आहे, यात शंकाच नाही. अलीकडच्या काळातील मराठीमधला हा महत्त्वाचा चित्रपट ठरावा. मराठीत प्रेमकथा फार आल्या नाहीत. मराठीला प्रेमकथा झेपत नाहीत. पण 'सैराट' ही अव्वल दर्जाची प्रेमकथा आहे.  अस्सल या मातीमधली आहे. कथित खालच्या जातीतला तरुण आणि कथित उच्चवर्णीय तरुणी यांच्या प्रेमाची आणि त्यातून येणाऱ्या अपरिहार्य, पण भीषण शेवटाची ही गोष्ट आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळेला त्यातून काही तरी ठोस सांगायचंय. ते त्याला 'फँड्री'मधूनही सांगायचं होतं. ते याही सिनेमातून सांगायचं आहे. ते काय आहे, हे आपल्याला नीट कळतं. त्यामुळं 'सैराट' पाहून झाल्यावर ते सांगणं डोळ्यांमध्ये ठसठशीत भरून राहतं; कान बधीर होतात आणि मेंदू सुन्न होतो.
आपल्या समाजातलं जातिवास्तव ही आजही एक दाहक गोष्ट आहे. या जातिप्रथांमधून आलेल्या दुर्गुणांमुळं चांगली चांगली माणसं भैराट होतात; वेड्यासारखं वागतात. कथित प्रतिष्ठेपायी वाट्टेल ते प्रकार करतात. हे आपल्याला नवं नाही. दोन प्रेमी जीवांची त्यात होणारी होरपळही नवी नाही. एक दुजे के लिए, लव्हस्टोरी, कयामत से कयामत तक या सर्व चित्रपटांतून या प्रकारची प्रेमकहाणी आपण पाहिलेली असते. पण 'सैराट'मध्ये आणि त्यांच्यामध्ये गुणात्मक फरक आहे. 'सैराट' हा त्या प्रेमाच्याही पलीकडं जाऊन काही भाष्य करतो. 'फँड्री'सारखंच. हे भाष्य अर्थातच नागराजच्या स्टाइलनुसार अंगावर येतं. चरचरीत चटका देतं. प्रेक्षकांना सामुदायिक उसासे सोडायला लावतं. पुढं काही सुचतच नाही...
सिनेमा म्हणून 'सैराट'कडं पाहताना काही गोष्टी चटकन जाणवतात. सिनेमा हे किती दिग्दर्शकाचं माध्यम आहे, हे 'सैराट' आपल्याला पुनःपुन्हा दाखवून देतो. इथं दिग्दर्शक अक्षरशः प्रत्येक फ्रेममध्ये दिसत राहतो. कारण सिनेमात सगळेच कलाकार (छाया कदम यांचा काहीसा अपवाद) अगदीच नवखे आहेत. यापैकी कित्येकांनी या सिनेमाच्या निमित्तानं प्रथमच कॅमेराला तोंड दिलं आहे. असं सगळं असूनही आपण तब्बल १७० मिनिटांचा सिनेमा पाहताना एक क्षणही विचलित होत नाही की आपल्याला कंटाळा येत नाही. याचं कारण त्या सर्वांकडून दिग्दर्शकानं त्याला काय पाहिजे ते काढून घेतलंय. दिग्दर्शकाचा लखलखीत ठसा प्रत्येक ठिकाणी दिसत राहतो.
दुसरं म्हणजे या चित्रपटाचं संगीत. अजय-अतुल यांनी या चित्रपटासाठी दिलेलं संगीत आणि पार्श्वसंगीत हा या सिनेमाचा मोठाच प्लस पॉइंट ठरला आहे. त्यांनी हॉलिवूडमधील स्टुडिओत या चित्रपटाची गाणी आणि पार्श्वसंगीत रेकॉर्ड केलंय, हे सर्वांना माहिती आहे. अत्यंत अव्वल दर्जाचं हे पार्श्वसंगीत चित्रपटाला वेगळी उंची नक्कीच प्राप्त करून देतं. सिनेमा पाहत असताना आपण तो 'ऐकत'ही जातो. चित्रपटाचं छायांकनही अप्रतिम दर्जाचं. सुधाकर रेड्डी यांचा कॅमेरा महाराष्ट्राचा ग्रामीण भाग ते हैदराबादमधली झोपडपट्टी हे सर्व फार सुंदर पद्धतीनं दाखवतो. चित्रपटाच्या अनेक फ्रेममध्ये पक्ष्यांचा थवा येत राहतो. हे चित्रणही जमलेलं आणि खूपच बोलकं.
चित्रपटाचे सरळ सरळ दोन भाग पडले आहेत. पहिला भाग नायक-नायिकेच्या प्रेमकथेचा, प्रेम जमण्याचा, चेष्टा-मस्करीचा आणि मित्रांबरोबर केलेल्या धमाल गोष्टींचा आणि उत्तरार्ध त्यांच्या संघर्षाचा. पूर्वार्ध अर्थात खूपच आवडणारा आणि जमलेला. चित्रपटातील सर्व चारही गाणी पूर्वार्धातच होऊन जातात. ही सर्वच गाणी भावमारू आणि प्रेक्षणीय अशी जमली आहेत. सिनेमाचा उत्तरार्ध तुलनेत खूप रखरखीत आहे. नायक-नायिका हैदराबादमध्ये जातात आणि तिथं त्यांचं खरं आयुष्य सुरू होतं. दिग्दर्शकानं हे चित्रणही खूप मनापासून आणि वास्तववादी केलं आहे. पण पूर्वार्धाच्या तुलनेत यात धमाल-मस्ती नसल्यानं प्रेक्षक एकदम काहीसा अस्वस्थ होतो. चित्रपटाची संथ लय त्याला पटकन झेपत नाही. पण सिनेमाची मांडणी म्हणून दिग्दर्शकाची यात काही चूक आहे, असं वाटत नाही. असलीच तर चित्रपटाची एकूण लांबी हीच त्रुटी म्हणावी लागेल. हा सिनेमा आणखी वीस मिनिटांनी सहज ट्रिम करता आला असता. दोन तास पन्नास मिनिटांची ही लांबलचक स्टोरी पूर्वीच्या हिंदी सिनेमांची आठवण करून देते. पण मधेच प्रेक्षकांना अस्वस्थही करते. असो.
आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू या दोन्ही तरुण मुलांनी अप्रतिम काम केलंय. विशेषतः रिंकूनं पाटलांच्या आर्चीचा ठसका फारच जबरदस्त दाखवला आहे. तिचे डोळे अत्यंत बोलके व प्रभावी आहेत. तिचं ग्रामीण बाजाचं बोलणं फार गोड आहे. बुलेट चालवताना, ट्रॅक्टर चालवताना तिनं दाखवलेला अॅटिट्यूड एक नंबर. उत्तरार्धात झोपडीतलं राहणं झेपेनासं झाल्यावर कोलमडलेली अर्चनाही तिनं अगदी तन्मयतेनं साकारली आहे. तिच्या रूपानं मराठीला एक बोलक्या डोळ्यांची प्रभावी अभिनेत्री लाभली आहे, असं म्हणायला हरकत नाही. आकाश ठोसरनंही कोळ्याच्या मुलाचं - परशाचं -  निरागस तारुण्य, काहीसं दबलेपण, काहीसा न्यूनगंड झकास दाखवला आहे. अर्थात यात दिग्दर्शकाचा वाटा मोठा आहे, हे ओघानं आलंच. परशाचे मित्र झालेले प्रदीप (तानाजी गलगुंडे) आणि सल्या (अरबाज शेख) यांचीही कामं फार जोरदार झाली आहेत.
सिनेमाचा शेवट फिल्मी असला, तरी अंगावर येतो. विशेषतः त्या लहान मुलावर कॅमेरा जाताना जो सायलेन्स आहे, त्यामुळं तर हा सर्वच प्रसंग भयंकर अंगावर येतो. पण या दिग्दर्शकाला असा आघात करून प्रेक्षकांना झटका देण्याची सवय आहे. मात्र, पुढच्या सिनेमात हा फंडा कदाचित उपयोगी येणार नाही. असो.
सैराट ही आपल्या ढोंगी, भोंदू, दांभिक जातिव्यवस्थेला मारलेली सणसणीत चपराक आहे. ती खायला थिएटरला जावंच लागेल.

दर्जा - साडेतीन स्टार
---

18 Apr 2016

बॉलिवूडचा ‘लखन’...



हिंदी चित्रपटसृष्टीत दर शुक्रवारी नवी स्वप्नं प्रदर्शित होतात आणि त्यासोबत कदाचित कुठल्या तरी अभिनेता किंवा अभिनेत्रीचं नशीबही. या तारांगणात अनेक तारे लुकलुकत असतात. त्यातले अनेक कधी येतात आणि कधी विझतात तेही कळत नाही. सूर्यासारखं नशीब घेऊन आलेले फार थोडे. अनिल कपूर हे त्यातलं एक लखलखीत नाव. मी अनिल कपूरला बॉलिवूडचा ‘लखन’ म्हणतो. अमिताभ बच्चन हा बॉलिवूडचा ‘राम’ असेल, तर अनिल निखालसपणे ‘लखन’ आहे. जसं लक्ष्मणाशिवाय रामायण अपूर्ण तसंच बॉलिवूडचा इतिहास अनिल कपूरच्या उल्लेखाशिवाय अपूर्णच. एकाच वेळी अत्यंत हँडसम, देखणा, स्वर्गलोकीचा राजकुमार वाटावा आणि त्याच वेळी अत्यंत साधा, गरीब, ‘बॉय नेक्स्ट डोअर’ असाही वाटावा असं काहीसं अजब कॉम्बिनेशन अनिल कपूरच्या व्यक्तिमत्त्वात आहे. अभिनयाच्या सर्व पैलूंमध्ये वाकबगार, कामामध्ये अत्यंत व्यावसायिक आणि महत्त्वाचं म्हणजे चारित्र्यसंपन्न अशा गुणांनी अनिल कपूर समृद्ध आहे. त्यामुळंच तो दीर्घकाळ या मायानगरीत टिकू शकला आणि यश मिळवू शकला. 
 अनिल कपूरचा थिएटरला मी पाहिलेला पहिला सिनेमा म्हणजे बहुतेक ‘साहेब’. मला नक्की आठवत नाही. पण साहेबच असावा. आमच्या जामखेडच्या टूरिंग टॉकीजमध्ये मी तो पाहिला. अलीकडं बालक-पालक सिनेमात ‘साहेबचा रेफरन्स आहे. रवी जाधवच्याही लहानपणच्या काही गोड आठवणी ‘साहेबसोबत जोडल्या असाव्यात, असं मला ते पाहून वाटलं. विशेषतः अनिल कपूर आणि अमृतासिंहच्या जागी ती दोन मुलं स्वतः नाचत आहेत, असं जे दृश्य त्यानं टाकलंय, त्यावरून. असो. हे विषयांतर झालं. मूळ मुद्दा अनिल कपूर हे नाव माझ्या आयुष्यात पहिल्यांदा केव्हा आलं हा... अनिल कपूरचा भोळाभाबडा साहेब खूप भावला. अनिलनं १९८० ते १९८४ च्या दरम्यान काही सिनेमे केले. पण त्यातला मशाल हा सर्वांत लक्षात राहिलेला. यात तो अभिनयसम्राट दिलीपकुमारसमोर तेवढ्याच ताकदीनं उभा राहिला. ‘जिंदगी आ रहा हूँ मैं...’ या किशोरकुमारच्या गाण्यानं (आणि हृदयनाथांच्या संगीतानं) अनिल कपूरच्या बॉलिवूडमधील येण्याची वर्दी सर्वांना मिळाली. पण साहेबमुळं अनिल कपूर खऱ्या अर्थानं सर्वसामान्य रसिकांच्या हृदयात जाऊन पोचला, असं म्हणावं लागेल.
तो काळ बॉलिवूडसाठी एकूण फारच विचित्र होता. देशातलं वातावरणही फार अस्थिर होतं. अमिताभ काहीसा उतरणीला लागला होता. राजेश खन्ना तर केव्हाच गायब झाला होता. व्हिडिओ पार्लरनी गावोगावी धुमाकूळ घालायला सुरुवात केली होती आणि सिनेमाचा धंदा बसवला होता. बॉलिवूड संभ्रमावस्थेत होतं. दाऊद आदी मंडळींचा त्या वेळी बॉलिवूडवर वरचष्मा होता. काळ्या पैशांची चलती होती. राज कपूरनं अभिनय केव्हाच सोडून दिला होता आणि तो सिनेमा चालण्यासाठी ओलेत्या मंदाकिनीवर विसंबून राहू लागला होता. इंदिरा गांधींची क्रूर हत्या झाली होती आणि राजीव गांधींसारखा उमदा पंतप्रधान आपलं अस्तित्व सिद्ध करायला चाचपडत होता. भारतानं वर्ल्ड कप आणि नंतर बेन्सन अँड हेजेस चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सची ट्रॉफी जिंकली असली, तरी नंतर वेस्ट इंडिजकडून वाईट मार खाल्ला होता. शिवाय शारजातल्या भारत-पाक सामन्यांचं दुष्टपर्व त्याच काळात सुरू होतं. दुष्टपर्व म्हणायचं कारण, की त्यावर पुन्हा दाऊद प्रभृतींचं वर्चस्व होतं. सचिन तेंडुलकर, एसटीडी-आयएसडी बूथ आणि मुक्त अर्थव्यवस्था हे फिनॉमिना अजून देशाच्या पटलावर यायचे होते. मोबाइल ही तर परग्रहावरची कल्पना होती. संगीत क्षेत्रातही मेलडी संपून डिस्कोचा जमाना सुरू झाला होता. गरिबांचा अमिताभ (म्हणे) मिथुन चक्रवर्ती ‘डिस्को डान्सर बनून महानगरी तरुणांच्या रिक्त, पोकळ आयुष्यात झिंग आणण्याचा तोकडाच प्रयत्न करीत होता. पण एकूणच बहुतेक क्षेत्रांत मीडिऑक्रसीनं कळस गाठला होता. साधं-सोपं जगणं फार बेगडी, कृत्रिम झालं होतं. महागाईनं तेव्हाही कळस गाठला होता आणि अन्नधान्यातल्या भेसळीसारखे भ्रष्टाचार गाजत होते. 
असल्या वातावरणातून, असल्या विचित्र मानसिकतेतून देशाला बाहेर काढण्यासाठी कुणी तरी मिस्टर इंडिया’च जन्माला यायला हवा होता... जो दिसत तर नाही, पण जगातील सगळी सत्कृत्यं करतो आणि जे जे वाईट, गलिच्छ, घाण आहे, ते ते समूळ नष्ट करतो... जो मुलांचा आवडता आहे आणि जो प्रेयसीबरोबर उत्कट रोमान्स करतो... शेखर कपूर नावाच्या अस्सल भारतीयत्व जपणाऱ्या आणि ओळखणाऱ्या जाणत्या दिग्दर्शकानं हे सगळं हेरलं आणि रजतपटावर आकाराला आला ‘मि. इंडिया...’! या ‘मि. इंडियाचा चेहरा शेखर कपूरला अनिल कपूरमध्ये दिसला हे महत्त्वाचं. यापूर्वी म्हटलं तसं एकाच वेळी अत्यंत देखणा, परिलोकातला वाटावा असा आणि त्याच वेळी साधा, चाळीतला, भोळाभाबडा वाटावा असा चेहरा हे अनिलचं वैशिष्ट्य होतं. शिवाय तो अभिनय करू शकत होता, ही खूपच मोठी गोष्ट ठरली त्याच्या बाजूनं. १९८७ मध्ये ‘मि. इंडिया’ अवतरला आणि अनिल रातोरात सुपरस्टार झाला... तेव्हा आताएवढी माध्यमांची बजबजपुरी नव्हती, पण जी थोडीफार होती, त्यांनी त्याला लगेच अमिताभचा उत्तराधिकारी घोषित करून टाकलं. ही फार मोठी गोष्ट होती. मि. इंडिया बारकाईनं पाहिला, तर भारतातल्या तत्कालीन आर्थिक, सामाजिक वास्तवाचं दारूण दर्शन शेखर कपूरनं घडवलेलं दिसतं. मि. इंडिया भेसळ करणाऱ्या अजित वाच्छानीला बडवतोय आणि खडे असलेलं अन्न त्याला खायला लावतोय,’ या दृश्याला टाळ्या पडायच्या, असा तो काळ होता. अनिल कपूर परफेक्ट मि. इंडिया शोभला. श्रीदेवीसोबत कांटे नही कटते’ म्हणत त्यानं केलेला ओलेता रोमान्सही पब्लिकला भावला आणि मुलांसोबत ‘खिलौना मेरे बच्चों का...’ म्हणत नायिकेसोबत भांडणारा त्याचा अरुणही आवडून गेला.
अनिल कपूरची ताकद सर्वांच्याच लक्षात आली. याच वेळी चंद्रशेखर नार्वेकर उर्फ एन. चंद्रा हा मराठी दिग्दर्शक अंकुश’, ‘प्रतिघात असे हट के आणि व्यवस्थेविरुद्धचा संताप व्यक्त करणारे सिनेमे घेऊन प्रेक्षकांची दाद मिळवत होता. याच एन. चंद्रानं त्याच्या पुढच्या सिनेमासाठी अनिल कपूरला साइन केलं आणि जोडीला होती एक मराठी मुलगी - माधुरी दीक्षित. मध्यमवर्गीय घरातला, नेव्हीत जाण्याचं स्वप्न पाहणारा तरुण व्यवस्थेमधल्या दोषांमुळं गुन्हेगार कसा होतो, असं हे चंद्राच्या आवडीच्या विषयावरचंच कथानक होतं आणि सिनेमाचं नाव होतं - तेजाब. १९८८ मध्ये तेजाब’ झळकला आणि ‘एक दो तीन...’ म्हणत माधुरी एका रात्रीत सुपरस्टार झाली. अनिल कपूरच्या सुपरस्टारपदावर शिक्कामोर्तबच केलं माध्यमांनी! त्याचा महेश देशमुख उर्फ मुन्ना पब्लिकनं डोक्यावर घेतला. मुंबईतल्या अंधाऱ्या रात्री, रुळांवर उभ्या असलेल्या दोन लोकलच्या मध्ये दारूच्या नशेत झिंगत, ‘मैं तो भूल चली बाबूल का देस...’ म्हणत झोकांड्या खाणारा आणि गुंडांनी हल्ला करताच नशेचं सोंग सोडून एकदम कडक आवाजात ‘तुम मेसे मुकुटबिहारी कौन है... म्हणणारा मुन्ना एकदम सुपरहिट झाला. अमिताभच्या जंजीरच्या वेळच्या अँग्री यंग मॅन इमेजशी अनिल कपूरच्या या भूमिकेचं साधर्म्य होतं. तेजाबनंतर या माणसानं कधीच मागं वळून पाहिलं नाही.
सुभाष घई हा तेव्हा इंडस्ट्रीतला नवा शो-मॅन होता. राज कपूर १९८८ मध्ये गेल्यानंतर तर हे बिरुद आपसूक घईंकडं चालत आलं. घईंना संगीताची, कथेची आणि त्यातल्या मसाल्याची नेमकी जाण होती. हा सगळा सुपरहिट मसाला घालून त्यांनी १९८९ मध्ये आणला राम-लखन. जॅकी श्रॉफ राम आणि अनिल लखन! अर्थात वन टू का फोर...’ करणारा अनिलचा राउडी लखनच हिट झाला. सोबत त्याची सुपरहिट जोडीदार - माधुरी होतीच! घईंचा राम-लखन सुपरडुपर हिट झाला. अनिल कपूरची लोकप्रियता कळसाला पोचली. तत्पूर्वी घईंच्याच ‘कर्मामध्येही अनिल कपूर पुन्हा एकदा दिलीपकुमारांसोबत होताच. तेजाबच्या आधी केलेले वो सात दिन’, ‘मेरी जंग’, ‘जाँबाज’ या चित्रपटांतही त्यानं आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. अनिल कपूरचं वैशिष्ट्य म्हणजे कारकिर्दीच्या ऐन शिखरावर असतानाही त्यानं कधी आपलं संतुलन गमावलं नाही. तो तेव्हा फार मीडिया फ्रेंडली नव्हता म्हणे. सुनीता ही अनिल कपूरची पत्नी. हे सर्व सिनेमे येण्याआधीच सुनीताबरोबर अनिलची लग्नगाठ बसली होती. पण सुपरस्टार पद मिळाल्यानंतरही अनिलचं कधीच कुणा नटीसोबत अफेअर असल्याची चर्चासुद्धा ऐकायला मिळाली नाही. आपण बरं आणि आपलं काम बरं, याच वृत्तीनं तो जगला. अनिल कपूरची ही वृत्ती फिल्म इंडस्ट्रीत फारच दुर्मिळ आणि म्हणूनच काबिले तारीफ आहे.
अनिलनं याच काळात के. विश्वनाथ यांचा ईश्वर’ही (१९८९) केला. ईश्वरनं अनिलच्या सर्वांगीण अष्टपैलुत्वावर पुन्हा एक शिक्कामोर्तब झालं. विधू विनोद चोप्राच्या परिंदामध्ये नाना पाटेकरचा अण्णा भाव खाऊन गेला असला, तरी अनिलची भूमिका आणि अस्तित्व विसरणं शक्यच नव्हतं कुणाला... नंतर बॉलिवूडमध्ये खान मंडळींचं साम्राज्य सुरू झालं आणि अनिल यात थोडा मागं पडला... पण १९९२ मध्ये इंद्रकुमारच्या ‘बेटा’नं अनिलला पुन्हा हात दिला. यात माधुरी धक धक गर्ल’ म्हणून तुफान गाजली, तरी अनिल कपूरची साथ महत्त्वाची होती. यानंतर विधू विनोद चोप्राचाच १९४२- ए लव्ह स्टोरी’ (१९९४) आला. सिनेमा फार चालला नाही, तरी त्यातलं एक लडकी को देखा’, ‘कुछ ना कहो...’ ही गाणी सुपरहिट झाली. पंचमदांनी संगीत दिलेला हा शेवटचा चित्रपट. अनिल कपूरचं सुदैव असं, की या अवलिया संगीतकाराची शेवटची मास्टरपीस गाणी त्याच्यावर चित्रित झाली. नंतर १९९७ मध्ये आलेला विरासतही गाजला. पण अनिलच्या करियरला पुन्हा हात दिला तो घईंच्याच ताल’नं... वर्ष होतं १९९९. विश्वसुंदरी ऐश्वर्या रायसोबत रमलेला हा ‘रमता जोगी...’ पब्लिकला जाम आवडला. नंतर माधुरीसोबत २००० मध्ये पुकार आला. पण फार चालला नाही. पण २००१ मध्ये राणी मुखर्जीसोबत आलेल्या नायक या दाक्षिणात्य सिनेमाच्या रिमेकनं अनिल कपूरला चांगला हात दिला. एका दिवसासाठी मुख्यमंत्री होणाऱ्या त्याच्या शिवाजी राव या पात्राची कथा लोकांना खूप आवडली.
पण यानंतर अनिलच्या करियरमध्ये मोठा ब्रेक आला. पुढची चार-पाच वर्षं त्याचा एकही नाव घेण्यासारखा मोठा सिनेमा आला नाही. पण २००५ मध्ये आलेल्या नो एंट्री’नं अनिलची बॉलिवूडमधली रि-एंट्री सुखद केली. अनिल विनोदी भूमिकाही उत्तम करतो, हे पुन्हा सिद्ध झालं. नंतर २००७ मध्ये वेलकममध्येही अनिलनं कॉमेडी केली. २००८ मध्ये आलेल्या डॅनी बोएलच्या स्लमडॉग मिलेनिअर या महत्त्वाकांक्षी सिनेमात अनिल कपूरला महत्त्वाची भूमिका मिळाली. या चित्रपटानंतर तो आंतरराष्ट्रीय जगतात एक मान्यवर अभिनेता म्हणून गणला जाऊ लागला. नंतर टॉम क्रूझच्या मिशन इम्पॉसिबल’मध्येही त्याने एक छोटी भूमिका केली. 
अनिल कपूरचं वैशिष्ट्य म्हणजे एवढ्या प्रदीर्घ कारकिर्दीत तो कधीच वादग्रस्त ठरला नाही. कधीही कुठल्या अफेअरमध्ये, वाईट गोष्टींमध्ये त्याचं नाव आलं नाही. त्यानं कधीही त्याचा विषय सोडून बडबड केली नाही, की कुणाबरोबर भांडण केलं नाही. तो अंतर्मुख स्वभावाचा माणूस आहे. त्याची मुलगी सोनम कपूर नायिका झाली, तरी तो स्वतःही नायकाच्याच भूमिका करतोय... वयाच्या ५६ व्या वर्षीही त्यानं स्वतःला जे काही फिट ठेवलंय, ते नक्कीच कौतुकास्पद आहे. आपलं आयुष्य असावं तर अनिल कपूरसारखं... असं मला अनेकदा वाटतं, यातच त्याच्या यशस्वी आयुष्याचं सार आहे!
---
(पूर्वप्रसिद्धी - साहित्य शिवार, दिवाळी २०१३)
----


17 Apr 2016

या सुट्टीचं करायचं काय?



दर वर्षी उन्हाळ्याची सुट्टी पडली, की माझ्यासारख्या अनेक पालकांना पडणारा एक प्रश्न म्हणजे या सुट्टीचं करायचं काय? माझ्या लहानपणी, म्हणजे साधारण तीसेक वर्षांपूर्वी हा प्रश्न मला पडायचं कारण नव्हतं; पण माझ्या आई-वडिलांना किंवा माझ्या पिढीच्या कुणाच्याच आई-वडिलांनाही हा प्रश्न पडत नसे. तेव्हा सुट्टीचे फंडे अगदी क्लिअर असायचे. एक तर गावात मित्रांबरोबर हुंदडायचं. सकाळ उजाडल्याबरोबर जे घराबाहेर पडायचं ते मधल्या वेळेत जेवायला म्हणून घरी टेकल्यासारखं करायचं की थेट अंधार पडल्यावरच घरी यायचं. किंवा मग नातेवाइकांकडं जायचं. आत्याकडं किंवा मामाकडं हक्कानं पंधरा दिवस राहायला जायचं, हे अगदी गृहीतच धरलं जायचं. आपल्याही घरी या नातेवाइकांनी येणं तेवढंच स्वाभाविक मानलं जायचं. मग सगळ्या बहीण-भावांची किमान दोन ते तीन मुलं धरली, तरी किमान दहा ते पंधरा जणांची वानरसेना तयार व्हायची. मग बाकी कुणाची गरजच नसायची. मग आंबे खाण्यापासून ते डबडा ऐसपैस खेळण्यापर्यंत आणि चांदण्या रात्री अंगतपंगत करण्यापासून ते पॉटमध्ये आइस्क्रीम करण्यापर्यंत सगळे कार्यक्रम सर्वांच्या बरोबरच व्हायचे. याशिवाय एखादा सिनेमा, एखादी सर्कस किंवा बागेत जाऊन भेळ इ. कार्यक्रम व्हायचेच. सुट्टीत हमखास दोन-तीन लग्नकार्यं निघायची. मग त्या कार्यस्थळी गर्दीनं गच्च भरलेल्या एसटीनं लटकत-लोंबकळत जायचं. प्रचंड उन्हाच्या वातावरणात दोन सुखी जीवांना समारंभपूर्वक दुःखात ढकलायचं, गरमागरम जिलेब्या खाऊन आणखीनच घामाघूम व्हायचं... बँडवर नाचून वगैरे त्यांना वाटे लावायचं, नवरी गेली की रडायचं... अशीच सुट्टी जायची. फार साधे-सरळ असे ते दिवस असत. हे दिवस खूप पूर्वीचे नव्हेत. अगदी अलीकडे अलीकडेपर्यंतचे... चांगलेच लक्षात असलेले असे!
मग काळ फारच बदलला. जागतिकीकरणाची लाट आली. देश बदलला. माणसं बदलली. पंधरा-वीस वर्षांत आम्ही जणू चंद्रावर पोचलो. शहरं वाढली. आमची पिढी पुण्या-मुंबईसारख्या शहरांत येऊन वसली. झटत-लढत तगून राहिली. आमच्या जगण्याच्या संघर्षात या सुट्टीकडं बघायला आम्हाला फुरसतच नव्हती. आम्हाला लग्नं करायची होती, घरं घ्यायची होती... चारचाकी गाड्या घ्यायच्या होत्या... हळूहळू हे सगळं झालं... दोघांच्या आयुष्यात तिसरा जीव आला आणि आयुष्य अगदी धन्य वगैरे झालं! आमची पिढी तोपर्यंत बेसावध होती. मग मुलं जसजशी मोठी होऊ लागली, तसतशी ही एप्रिल-मेची सुट्टी पुन्हा आमच्या आयुष्यात आली. तोपर्यंत आम्ही तिला हसत हसत कोलून टाकलं होतं. तिला फार महत्त्वच दिलं नव्हतं. आमच्या नोकरी-धंद्याच्या गणितात तिला कुठंच स्थान नव्हतं. 
 पण आमचं लाडकं मूल मोठं होऊ लागलं, तसं आमच्या एकेक गोष्टी लक्षात येऊ लागल्या. असं लक्षात आलं, की आपलं मूल एकटंच आहे: त्याला भावंड नाही. आणि ही केवळ आपली स्थिती आहे असं नाही तर बहुतांश आमच्या पिढीची हीच स्थिती आहे. बहुतेकांना एकच मूल... जास्तीत जास्त दोन; पण संख्या कमीच. मग असं लक्षात आलं, की आमचं हे एकुलतं एक मूल भलतंच लाडावलेलं आहे. ते एकटं आहे म्हणून; त्याला आम्हाला वेळ देता येत नाही, म्हणून आमच्या मनात एक जो नकळत अपराधभाव तयार झालेला आहे, तो या लाडाला जास्तच खतपाणी घालतोय. मग असं लक्षात आलं, की आपल्या मुलाचं आता एकट्यानं खेळण्याचं वय झालंय. पण त्याला सखी-सोबती कुणीच नाहीत. जे आहेत ते अगदीच औपचारिक. म्हणजे बिल्डिंगमधला मुलगा किंवा एखादा मावस वा चुलतभाऊ. पण हे म्हणजे उभयपक्षी सोयिस्कररीत्या एकत्र आलेले दोन देश नाइलाजानं कसा एखादा करार करतात, तसं असतं. म्हणजे दोघांनाही आपापल्या टर्मवर खेळायचं असतं. हा याच्या घरी राजा असतो, तर तो त्याच्या! मग भांडणं होतात. इवले इवले इगो लगेच आभाळाला जाऊन पोचतात. पोरांची भांडणं मिटतात लगेच; पण पालक एकमेकांवर फुरंगटून बसतात. गॉसिपिंग सुरू करतात...
मग आमच्या असं लक्षात येतं, की आपल्या मुलाला किंवा मुलीला अनेक क्षेत्रांत गती असायला पाहिजे. तो एकाच वेळी डॉक्टर, इंजिनीअर, सीए, वकील, आर्किटेक्ट, जमल्यास क्रिकेटपटू किंवा बिझनेसमन तर झालाच पाहिजे. पण तो अष्टपैलूही असला पाहिजे. त्याला वाद्य वाजवता आलं पाहिजे. तिला कथक आलं पाहिजे. त्याला फाड फाड फ्रेंच आलं पाहिजे, तिला साल्सा आलं पाहिजे. दोघांनाही पोहता तर आलंच पाहिजे; पण बॅडमिंटनमध्येही त्यांनी किमान नॅशनलला खेळलं पाहिजे. मग आमच्या लक्षात येतं, की आपल्याला स्वतःला यातलं काहीच येत नाहीय; पण हरकत नाही. आम्ही खेड्यात वाढलो. मुलं तर शहरांत आहेत ना... त्यांना त्यांच्या नशिबानं सगळं मिळालंय. आम्हाला कुठं काय मिळालं होतं? मग आम्ही गावाकडं दगडानं कशा कैऱ्या पाडायचो याच्या रसभरित कहाण्या (गावातलं सगळं विकून इथं गावाबाहेर घेतलेल्या वन बीएच के फ्लॅटमध्ये) आमच्या बाळराजांना सांगत बसतो. बाळराजांनी शेत कधी पाहिलेलंच नसतं. मग आम्ही कृषी पर्यटन केंद्रात त्याला घेऊन जातो आणि ज्वारीची भाकरी अन् पिठलं कसं भारी लागतं हे तिथल्या दोनशे रुपयांच्या थाळीला (मनातल्या मनात शिव्या देत) सांगू लागतो. 
मग आमच्या लक्षात येतं, की आता आपण शहरात आलो आहोत आणि शहरी माणसांसारखं वागलं पाहिजे. मग आम्ही व्यक्तिमत्त्व विकास शिबिरात आमच्या बाळराजांना किंवा बेबीराणीला एकदाचे ढकलून घरी येतो. पंधरा दिवसांच्या क्रॅशकोर्सनंतर बाळाला काही मिळो न मिळो, आम्हाला त्याची सर्वांगीण प्रगती साधल्याचं एक सर्टिफिकेट चार-पाच हजार रुपये खर्चून नक्कीच मिळणार असतं. शहरी पालक असल्याचे सर्व निकष पूर्ण केल्यानंतर आम्हाला जो आनंद मिळतो, त्याची तुलना कशाचीच होऊ शकत नाही.
मग आमच्या लक्षात येतं, की सुट्टीचा काळ फारच मोठा असतो. या काळात ऑफिसात दीर्घ रजा घेऊन, बायको-मुलांना घेऊन कुठं तरी टूरवर जायची पद्धत शहरांत असते. आपणही शहरीच असल्यानं रीतसर रजा टाकतो. सर्व पर्याय तपासल्यानंतर लक्षात येतं, की या काळात विमानाचं भाडं आपल्याला परवडत नाही. ट्रेनचं बुकिंग दोन महिन्यांपूर्वी करण्याइतपत नियोजन आपल्या अंगी कधीच नसतं. मग आपण आपल्या जवळच्याच, नेहमीच्या लोकप्रिय पर्यटनस्थळी दौरा काढतो. बायकोला एकदाचं फिरवून आणलं, यापलीकडं त्या दौऱ्यानंतर कुठलंही दुसरं समाधान पदरी पडत नाही. एकूण काय, तर सुट्टी अशी आम्हाला खायला उठते.
मग आमच्या लक्षात येतं, की आपण बरंच काही मिस करत आहोत खरं; पण आपले ते पूर्वीचे दिवस तर आता परत येणं शक्य नाही. मग आपल्या मुलांना त्यांच्या पद्धतीप्रमाणं सुट्टी एंजॉय करू दिली पाहिजे. आता आमची मुलं गॅजेटसॅव्ही आहेत. त्यामुळं आम्ही त्यांना सर्व प्रकारचे कम्प्युटर गेम्स उपलब्ध करून देतो. मुलं कटकट न करता शांतपणे खेळत बसतात. शेजारच्या राष्ट्रानंही कंटाळून तह केलेला असतो. दोन्ही पालक सुखानं आपापल्या घरी घोरू लागतात आणि मुलं टॅबची बॅटरी संपवू लागतात...
या सुट्टीचं करायचं तरी काय, असले प्रश्न पडत नाहीत अशा वेळी मग...
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे - १७ एप्रिल २०१६)

---

6 Apr 2016

चड्डी पहन के (फिर) फूल खिला है...


प्रख्यात ब्रिटिश लेखक रुडयार्ड किपलिंग यांच्या 'जंगलबुक' या नीतिकथांच्या संग्रहानं जगभरात अनेकांना मोहिनी घातली आहे. या 'जंगलबुक'ची पुन्हा आठवण येण्याचं कारण म्हणजे वॉल्ट डिस्ने स्टुडिओजचा याच नावाचा भव्य सिनेमा येत्या आठ एप्रिलला भारतात प्रदर्शित होतोय. या निमित्तानं आमच्या पिढीचा दूरदर्शनवरील जंगलबुक या गाजलेल्या मालिकेचा स्मरणगंध ताजा झालाय. 
किपलिंग यांनी १८९४ मध्ये या कथा लिहिल्या. त्यांचा जन्म भारतातला. जन्मानंतर सहा वर्षांनी ते इंग्लंडला गेले. त्यानंतर दहा वर्षांनी पुन्हा भारतात आले आणि इथं साडेसहा वर्षं राहिले. त्या काळात त्यांनी लिहिलेल्या या कथा आहेत. 'मोगली' हा जंगलात 'हरवलेला' माणसाचा मुलगा या सर्व गोष्टींचा नायक असून, त्याला लांडग्याच्या कळपानं लहानाचं मोठं केलेलं आहे. त्याच जंगलात राहणारे भालू हे अस्वल आणि बघिरा हा काळा चित्ता मोगलीचे मित्र आहेत. याच जंगलात राहणारा शेरखान हा ढाण्या वाघ त्यांचा शत्रू, म्हणजेच या गोष्टीतला खलनायक आहे. या सर्व पात्रांच्या सहभागातून 'जंगलबुक'मधील गोष्टी आकार घेतात. 
'जंगलबुक'ची भारतीय मुलांना असलेली ओळख ही प्रामुख्यानं १९९३ मध्ये सादर झालेल्या 'दूरदर्शन'वरच्या मालिकेमुळं आहे. ही मालिका भन्नाट गाजली ती त्याच्या शीर्षकगीतामुळं. प्रख्यात कवी-गीतकार गुलज़ार यांनी हे गीत लिहिलं होतं आणि या गीताचे बोल होते - जंगल जंगल बात चली है, पता चला है... चड्डी पहन के फूल खिला है फूल खिला है... या गाण्याला संगीत दिलं होतं विशाल भारद्वाज यांनी. हे गाणं तेव्हा लहानांसोबतच मोठ्यांच्याही ओठी रुळलं होतं. तेव्हा चड्डीत असणारी मुलं आता फुलपँटमध्ये आली आहेत आणि त्यांची मुलं आता कार्टून बघण्याच्या वयाची झाली आहेत. तेव्हा आता वॉल्ट डिस्ने स्टुडिओजनं 'जंगलबुक'वर आधारित नवा सिनेमा काढला आहे, म्हटल्यावर त्यातल्या अनेकांचा नॉस्टॅल्जिया नक्कीच जागा झाला असेल. हा सिनेमा आठ एप्रिलला, म्हणजे अमेरिकेच्याही आधी आठ दिवस भारतात प्रदर्शित होत आहे, हे विशेष. अमेरिकेत तो १५ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. जोन फॅवरिऊ यानं हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.
'जंगलबुक'वरून प्रेरणा घेऊन अनेक सिनेमे मालिका निघाल्या. अमेरिकेत पहिली मालिका निघाली ती १९६७ मध्ये. भारतात १९९३ मध्ये दाखविण्यात आलेली अॅनिमेशन मालिका मात्र जपानी मालिकेवर आधारित होती. 'जंगल बुक शोनेन मोगली' असं त्या मूळ मालिकेचं नाव होतं आणि ती १९८९ मध्ये तयार करण्यात आली होती. भारतात ही मालिका आल्यानंतर ती अर्थातच हिंदीत डब करण्यात आली. विशाल भारद्वाज-गुलज़ार जोडीनं त्याचं हे गाजलेलं शीर्षकगीत तयार केलं. अमोल, हिया, नेहा, गौतम, विशाल आणि दीप्ती यांनी हे गाणं धम्माल गायलं आहे. शेरखानला तेव्हाही नाना पाटेकरनंच आवाज दिला होता आणि त्यामुळं ही मालिका फारच लोकप्रिय ठरली होती. अन्य आवाज कमलाकर सोनटक्के, दीपा साही, वीरेंद्र सक्सेना, देवाशिष शेडगे, उदय सबनीस, विनोद कुलकर्णी यांनी दिले होते. 
आता जो सिनेमा येतो आहे, तोही हिंदीत डब करण्यात आला आहे. मूळ इंग्लिश सिनेमात इद्रिस एल्बा (शेर खान), बेन किंग्जले (बघिरा), बिल मरे (भालू), स्कार्लेट जॉन्सन (का) आदी नामवंत कलाकारांनी आवाज दिले आहेत; तर हिंदी सिनेमात शेरखानला अर्थातच पुन्हा नाना पाटेकर, बघिराला ओम पुरी, भालूला इरफान खान, तर 'का'ला प्रियांका चोप्रा या नामवंतांनी आवाज दिला आहे. मोगलीची 'आई' असलेल्या रक्षा या मादी लांडग्याला शेफाली शहानं आवाज दिला आहे. 
या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यात खरे कलाकार आणि अॅनिमेशन यांचं मिश्रण आहे. नील सेठी या भारतीय वंशाच्या अमेरिकी मुलानं मोगलीचं काम केलं आहे. यातील प्राण्यांचं काम अर्थातच अॅनिमेशन पद्धतीनं दाखवण्यात आलं आहे. वॉल्ट डिस्नेच्या परंपरेला धरून हा सिनेमा भव्य आणि उत्कृष्ट तांत्रिक दर्जा असणारा आहे, यात शंका नाही. त्यामुळं बालगोपाळांना सुट्टीत ही एक चांगली पर्वणी मिळाली आहे. यातल्या प्रमुख भूमिकेसाठी डिस्ने स्टुडिओनं अक्षरशः जगभरातून हजारो मुलांच्या स्क्रीन टेस्ट घेतल्या. अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, न्यूझीलंड आदी ठिकाणी अनेक मुलांची चाचणी घेण्यात आली. मात्र, अखेर या भूमिकेसाठी नील सेठीची निवड झाली.
किपलिंग यांनी भारतातल्या वास्तव्यात या गोष्टी लिहिलेल्या असल्याने भारतीयांना 'जंगलबुक'विषयी विशेष आस्था आहे. यातली पात्रं, त्यांची नावं भारतीयच आहेत. किपलिंग यांनी त्यांच्या मुलीसाठी या गोष्टी लिहिल्या होत्या, अशी माहिती नंतर पुढं आली. त्यांची ही मुलगी वयाच्या केवळ सहाव्या वर्षी (१८९९ मध्ये) दुर्दैवानं मरण पावली. किपलिंग यांनी १८९५ मध्ये 'द सेकंड जंगल बुक' हे पुस्तक लिहिलं. यात मोगलीच्या आणखी पाच गोष्टींचा समावेश होता. या गोष्टी लहान मुलांना डोळ्यांसमोर ठेवूनच लिहिलेल्या असल्यानं त्यात शेवटी काही तरी बोध दिलेला असतो. या बोधकथा स्वरूपामुळं स्काउट चळवळीचे संस्थापक लॉर्ड बेडन पॉवेल यांनी त्या बाल स्काउटसाठी वाचायला देण्याची परवानगी किपलिंग यांच्याकडं मागितली. त्यानंतर जगभरात ही पुस्तकं स्काउट चळवळीशी जोडली गेली. त्यानंतरही जगभरात या पुस्तकाची अनेक भाषांतरं, रूपांतरं झाली. अगदी आपण दूरदर्शनवर पाहिलेल्या मालिकेतले सगळे भाग मूळ कथानकाबरहुकूम नव्हते. त्यात त्या त्या वेळी अनेक बदलही करण्यात आले आहेत. अर्थात मूळ कथांचा स्वाद कायम ठेवूनच हे बदल होत असल्यानं त्यातली मजा कायमच आहे.
नव्वदच्या दशकात आपल्याकडं दूरदर्शन हे एकमेव चॅनेल होतं आणि अनेक घरांत पहिल्यांदा ब्लॅक अँड व्हाइट टीव्ही आला, तेव्हा लहान असणारी मुलं आता पस्तीस-चाळिशीत आहेत. मीही याच पिढीचा एक भाग. या २५-३० वर्षांच्या काळात जग खूपच वेगानं बदललं. आमचं बालपण समृद्ध करणाऱ्या दूरदर्शनवरच्या ज्या काही क्लासिक मालिका होत्या, त्यात 'जंगलबुक' निश्चितच एक आहे. या नव्या सिनेमाच्या निमित्तानं गुलज़ारसारख्या कलंदर गीतकाराचं 'चड्डी पहन के फूल खिला है' हे तेव्हाचं लोकप्रिय गाणंही यूट्यूबवर पुनःपुन्हा पाहिलं/ऐकलं जातंय. (बाकी या असल्या कल्पना फक्त गुलज़ारनाच सुचू शकतात.) आम्ही मोठे झालो असलो, तरी आमच्या मनात एक मूल दडलेलं आहे आणि तेही चड्डी घालून फुलासारखं उमलतंय, याची जाणीव पुन्हा करून दिल्याबद्दल या नव्या 'जंगलबुक'चंही उत्साहानं स्वागत करायला हवं.
---

(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे; ६ एप्रिल २०१६)
---

5 Apr 2016

स्पाय कॅम सदर (सर्व भाग)

भाग १ (नगर आवृत्ती) - १६ मार्च २०१६
-------------------------------------

लेट्स पार्टी...

इंट्रो

टी-२० क्रिकेट वर्ल्ड कप नामक धम्माल जत्रा, पार्टी, मनोरंजन नगरी, कार्निव्हल, फेस्टिव्हल जे काय म्हणाल, ते कालपासून सुरू झालं. प्राथमिक फेरीतील लिंबू-टिंबूंचे सामने संपले आहेत आणि सगळे बिग डॅडीज पार्टीत जॉइन झाले आहेत. आम्हीही आमचा ‘स्पाय कॅम’ घेऊन या स्पर्धेचा ‘आँखो देखा हाल’ दररोज सादर करणार आहोत... सो... वाजवा!

टी-२० क्रिकेट नामक अलौकिक, अद्भुत, अद्वितीय, अप्रतिम, अभेद्य, अजिंक्य आणि अफाट प्रकार आपल्या आयुष्यात आला, त्याला बघता बघता नऊ वर्षं पूर्ण झाली. या नऊ वर्षांत आपलं शारीरिक वय भले एकेक वर्षांनं वाढत गेलं असेल; पण मानसिक वय मात्र एकेक वर्षानं तरुण झालं आहे. क्रिकेटनं ५० षटकांकडून २० षटकांकडं जशी वाटचाल केली, तशीच आपल्या वयानं (२०च्या पुढं जे काही असेल तिथपासून) २०कडं उलटी वाटचाल सुरू केली. आपल्या विराण, रखरखाटी, उन्हाळी आयुष्यात आपण त्यापूर्वी काय टाइमपास करत होतो, हेच आता आठवत नाही. त्या आंबट आठवणींच्या कोयी चाखण्यात आता आपल्याला रसही नाही. आता तो काळ केव्हाच सरला. आता मनोरंजनाचं महादालन आपल्या करमणुकीसाठी दर उन्हाळ्यात सज्ज असतं. प्रत्येक टी-२० सामन्यात सादर होणाऱ्या प्रोत्साहन कन्यांच्या (अर्थात चीअर लीडर्स) नृत्यानं आपल्यालाही नकळत प्रोत्साहन मिळू लागलं. सामना पाहताना घरीच केल्या जाणाऱ्या आपल्या कथित नृत्यावर नंतर ‘गृह खात्या’कडून बंदी आली असली, तरी मनमोराचा पिसारा मात्र अजूनही फुलारून येतो. त्यातच पहिल्याच टी-२० वर्ल्ड कपमध्ये धोनी ब्रिगेडनं पाकिस्तानला हरवून बाजी मारली आणि आपल्यासाठी तर अलिबाबाची गुहाच उघडली. या प्रकारात दिसणाऱ्या मोहमायेनं भल्याभल्यांना वश केलं. मग आपल्याकडं आयपीएल नामक कामधेनूच सापडली. गेली नऊ वर्षं हा वर्ल्ड कप आणि आयपीएल यातून टी-२० ची धम्माल आपल्याकडं सुरू आहे. यंदा पहिल्यांदाच टी-२० चा वर्ल्ड कप भारतात भरतो आहे. पहिला दक्षिण आफ्रिकेत भरला होता, तो आपण जिंकला. नंतर आपल्याला फार काही बरी कामगिरी बजावता आलेली नाही. गेल्या वेळेला मात्र बांगलादेशात झालेल्या स्पर्धेत आपण पुन्हा फायनलपर्यंत धडक मारली होती; पण तिथं मलिंगाच्या श्रीलंकेनं आपला कचरा केला. यंदा मात्र भारतातच ही स्पर्धा भरत असल्यानं आणि आपली टीम इंडियाही चांगल्याच फॉर्मात असल्यानं आपणच यंदाचे हॉट फेव्हरिट आहोत. अर्थात धोनीनं सांगितलं तसं, या स्पर्धेत कधी काय होईल, हे सांगता येत नाही. हा फॉरमॅटच असा विचित्र आहे, की त्या दिवशी, त्या विशिष्ट क्षणी काय घडेल याचं भाकीत कुणीच करू शकत नाही. आयपीएलसारख्या स्पर्धेतून स्थानिक गुणवान खेळाडूंना संधी मिळाली आणि ते चमकले ते या फॉरमॅटमुळंच. अर्थात वर्ल्ड कपसारख्या स्पर्धेची पातळी वेगळी असते आणि तिथं निखळ दर्जासोबतच आणखीही काही गोष्टींची साथ लागते. हा अगदी तरुण आणि चपळ माणसांचा खेळ आहे. प्राथमिक फेरीतही ओमान किंवा अफगाणिस्तानच्या काही खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आणि त्यांनी टिपलेले झेल पाहून थक्क व्हायला झालं होतं. त्यामुळं बड्या संघांतील खेळाडूंकडून असलेल्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. इथं स्पेशालिस्ट फलंदाज किंवा गोलंदाजापेक्षा हरहुन्नरी किंवा अष्टपैलू खेळाडूला जास्त मागणी असते. इथं खेळाडूला वाट्टेल त्या क्रमांकावर येऊन, दीडशे-दोनशेच्या स्ट्राइक रेटनं फटकेबाजी करता यावी लागते किंवा अशक्य असे सूर मारून चेंडू अडवावा लागतो किंवा झेलावा लागतो. गोलंदाजी करताना केवळ २४ चेंडू टाकायला मिळतात. त्यात किमान दहा चेंडू तुम्ही निर्धाव टाकावेत आणि उरलेल्या चेंडूंवर शक्यतो एकही चौकार वा षटकार जाणार नाही; उलट किमान एक वा दोन बळी मिळवावेत, अशी अपेक्षा असते. अशा रीतीनं केवळ शारीरिकच नव्हे, तर भरपूर मानसिक सक्षमतेची मागणी करणारा हा झटपट क्रिकेटचा प्रकार आहे. इथं पैसा तुफान मिळतो; तुम्ही एका रात्रीत सुपरस्टार होता किंवा कायमचे व्हिलनही होता... भारताला पहिल्या वर्ल्ड कपमध्ये अंतिम सामन्यात विजय मिळवून देणारा जोगिंदर शर्मा आता कुठं आहे, याचा पत्ताही नाही. याउलट जसप्रीत बुमराह हा काही महिन्यांपूर्वी कुणालाच माहिती नसलेला खेळाडू आता आपल्या संघाचा अविभाज्य भाग झाला आहे. या खेळाची गंमत आहे ती हीच.
आता हीच गंमत, हाच थरार पुढील १८ दिवस सुरू राहणार आहे. आपल्या ‘स्पाय कॅम’मधून त्याची मजा लुटू या...
......

भाग १ (अ) - अपडेट - शहर आवृत्ती (पुणे) - १६ मार्च २०१६
---------------------------------------------------

‘किवी’लवाणे... 
------------------
अरारा! पहिल्याच घासाला खडा!! पहिल्याच सामन्यात पराभव!!! नागपुरात ‘किवीं’कडून किवीलवाणा पराभव झालाय. मोठ्या उत्साहानं या स्पर्धेसाठी स्तंभलेखन सुरू केलं आणि धोनीसेनेनं सगळ्या उत्साहावर बोळा फिरवला. पण हरकत नाही. ‘पहिला डाव भुताला...’ असं म्हणून पुढं जायचं. कारण आता पुढली मॅच आहे ती पाकिस्तानबरोबर. तिथं हरून उपयोग नाही. कारण मग स्पर्धेबाहेरच जायची वेळ यायची.
आपल्या पराभवानं जरा वातावरणात उदासी आली असली, तरी ही स्पर्धा यंदा जोरदार रंगणार याची झलकच पहिल्या सामन्यातून मिळाली आहे. याचं कारण हा टी-२० नावाचा प्रकारच भन्नाट आहे. ही अलौकिक, अद्भुत, अद्वितीय, अप्रतिम, अभेद्य, अजिंक्य आणि अफाट चीज आपल्या आयुष्यात आली, त्याला बघता बघता नऊ वर्षं पूर्ण झाली. या नऊ वर्षांत आपलं शारीरिक वय भले एकेक वर्षांनं वाढत गेलं असेल; पण मानसिक वय मात्र एकेक वर्षानं तरुण झालं आहे. आपल्या विराण, रखरखाटी, उन्हाळी आयुष्यात आपण त्यापूर्वी काय टाइमपास करत होतो, हेच आता आठवत नाही. त्या आंबट आठवणींच्या कोयी चाखण्यात आता आपल्याला रसही नाही. आता तो काळ केव्हाच सरला. आता मनोरंजनाचं महादालन आपल्या करमणुकीसाठी दर उन्हाळ्यात सज्ज असतं. प्रत्येक टी-२० सामन्यात सादर होणाऱ्या प्रोत्साहन कन्यांच्या (अर्थात चीअर लीडर्स) नृत्यानं आपल्यालाही नकळत प्रोत्साहन मिळू लागलं. त्यातच पहिल्याच टी-२० वर्ल्ड कपमध्ये धोनी ब्रिगेडनं पाकिस्तानला हरवून बाजी मारली आणि आपल्यासाठी तर अलिबाबाची गुहाच उघडली. या प्रकारात दिसणाऱ्या मोहमायेनं भल्याभल्यांना वश केलं. मग आपल्याकडं आयपीएल नामक कामधेनूच सापडली. गेली नऊ वर्षं हा वर्ल्ड कप आणि आयपीएल यातून टी-२० ची धम्माल आपल्याकडं सुरू आहे. यंदा पहिल्यांदाच टी-२० चा वर्ल्ड कप भारतात भरतो आहे. आपणच यंदाचे हॉट फेव्हरिट आहोत, असा डंका पिटला जातोय. पण पहिल्याच मॅचनं आपलं विमान जमिनीवर आणलंय. धोनीनं पूर्वीच सांगितलं तसं, या स्पर्धेत कधी काय होईल, हे सांगता येत नाही. हा फॉरमॅटच असा विचित्र आहे, की त्या दिवशी, त्या विशिष्ट क्षणी काय घडेल याचं भाकीत कुणीच करू शकत नाही. आयपीएलसारख्या स्पर्धेतून स्थानिक गुणवान खेळाडूंना संधी मिळाली आणि ते चमकले ते या फॉरमॅटमुळंच. अर्थात वर्ल्ड कपसारख्या स्पर्धेची पातळी वेगळी असते आणि तिथं निखळ दर्जासोबतच आणखीही काही गोष्टींची साथ लागते. हा अगदी तरुण आणि चपळ माणसांचा खेळ आहे. इथं पैसा तुफान मिळतो; तुम्ही एका रात्रीत सुपरस्टार होता किंवा कायमचे व्हिलनही होता... भारताला पहिल्या वर्ल्ड कपमध्ये अंतिम सामन्यात विजय मिळवून देणारा जोगिंदर शर्मा आता कुठं आहे, याचा पत्ताही नाही. याउलट जसप्रीत बुमराह हा काही महिन्यांपूर्वी कुणालाच माहिती नसलेला खेळाडू आता आपल्या संघाचा अविभाज्य भाग झाला आहे. या खेळाची गंमत आहे ती हीच.
आता हीच गंमत, हाच थरार पुढील १८ दिवस सुरू राहणार आहे. आपल्या ‘स्पाय कॅम’मधून त्याची मजा लुटू या...
--------------

भाग २ - १७ मार्च २०१६
-------------------------

बिकट वाट... 
----------------


पहिल्याच सामन्यात अनपेक्षितपणे आपण माती खाल्ल्यानं आता हा ग्रुप खऱ्या अर्थानं ‘ग्रुप ऑफ डेथ’ झाला आहे. भारतीय संघाचं हे वैशिष्ट्य फार पूर्वीपासून चालत आलेलं आहे. त्यामुळं त्यात नवीन काही नाही. आता त्या इतिहासात न जाता भविष्यात काय वाढून ठेवलंय ते पाहू. भारताच्या गटात न्यूझीलंड, पाकिस्तान, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया हे देश आहेत. आपण न्यूझीलंड, बांगलादेश आणि पाकिस्तानवर सहज विजय गृहीत धरला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध हरलो तरी गटात किमान दुसऱ्या क्रमांकावर (इथं ऑस्ट्रेलिया सर्व सामन्यांत विजयी होईल, असं गृहीत धरलं आहे...) राहून आपण उपांत्य फेरी गाठली असती. पण आपण त्यापैकी न्यूझीलंडविरुद्ध हरलो. नुसते हरलो नाही तर बऱ्याच फरकाने हरलो. त्यामुळे आपला नेट रन रेट -२.३५ झाला आहे. हे वाईट झालं आहे. कारण या गटात कदाचित नेट रनरेटचा आधार घेऊनच पहिल्या दोन टीम पुढं जातील, असं आत्ताचं चित्र आहे. आता आपल्याला पुढचे तिन्ही सामने जिंकावेच लागतील. यातही पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातल्या सामन्यात पाकिस्ताननं बांगलादेशाला दणदणीत हरवून स्वतःची बाजू आणि नेट रनरेट या दोन्ही गोष्टी भक्कम केल्या आहेत. वाईट गोष्ट म्हणजे आपला पुढचा सामना शनिवारी त्यांच्याचबरोबर आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी आपण पाकिस्तानला नेहमीप्रमाणं सहज (वर्ल्ड कपचा इतिहास) हरवू, असं म्हणत होतो. मात्र, आता आत्मविश्वासाची पातळी उलटीपालटी झालीय. भारताला नुसतं पाकिस्तानला हरवण्याचंच नाही, तर स्पर्धेत टिकून राहण्याचंही टेन्शन असेल. याउलट पाकिस्ताननं बांगलादेशला आरामात हरवल्यानं, त्यांना भारताकडून हरले तरी फार फरक पडणार नाही. याचाच अर्थ पाकिस्तानचा संघ आता आपल्याविरुद्ध अगदी टेन्शन फ्री खेळेल. आणि असा पाकिस्तानचा संघ जास्त धोकादायक असतो. दुसरी गोष्ट म्हणजे कोलकत्यात ज्या इडन गार्डनवर हा सामना होणार आहे, तिथं पाकिस्तानचा ऑलरेडी एक सामना (बांगलादेशाविरुद्ध) खेळून झाला आहे. शिवाय वर्ल्ड कप लढतीतील कोलकात्याचा अनुभव आपला फारच वाईट आहे. (आठवा, १९९६ चा श्रीलंकेविरुद्धचा कुख्यात उपांत्य सामना; किंवा खरं तर कशाला आठवता?) अशा सगळ्या नकारात्मक बाबी घेऊन आपल्याला शनिवारी पाकिस्तानवर विजय मिळवायचा आहे. भारतीय संघ जोरदार कमबॅक करील आणि पाकला हरवून स्पर्धेत टिकून राहील, अशीच आपली इच्छा आहे. तथास्तु!
--------

भाग ३ - १८ मार्च
------------------

शंभर आणि शंभरी... 
--------------------------


ख्रिस गेलनं काल वानखेडे स्टेडियमवर इंग्लिश गोलंदाजांची चटणी करून शंभर धावा केल्या, तेव्हा अनेकांना ‘रात्रीस गेल चाले’ अशी कोटी सुचली आणि ती व्हॉट्सअॅपवर लगेच व्हायरलही झाली. गेल हा रात्रीच काय, पण दिवसाच्या कुठल्याही प्रहराला चालणारा महासमंध आहे. तो भरात असला, तर समोरच्या पार्टीचं काही खरं नाही. त्या अवस्थेत शत्रूवरसुद्धा त्याला गोलंदाजी करण्याची वेळ येऊ नये. त्याची ताकद अफाट आहे. अन्य फलंदाजांना जो फटका मारण्यास बऱ्यापैकी ताकद एकवटावी लागते, तो फटका हा माणूस एका हातानं किरकोळीत मारू शकतो. हा नरराक्षस ‘चतुर्थी’, ‘षष्ठी’, ‘चतुर्थी’, ‘षष्ठी’ करीत गोलंदाजांचा फराळ करीत असतो, तेव्हा त्याचे शंभर कधी होतात हे कळत नाही आणि त्या गोलंदाजांची ‘शंभरी’ कधी भरली, तेही कळत नाही. अर्थात टी-२० सामन्यात शतक झळकावणाऱ्या फलंदाजांचं कौतुक आहेच. कारण हा सगळा मिळून इन-मिन १२० चेंडूंचा खेळ. त्यात एका खेळाडूला जास्तीत जास्त मिळणारे चेंडू ६० ते ८०. अशा स्थितीत प्रतिस्पर्धी संघांतील नामवंत गोलंदाजांना सामोरे जाऊन शतक झळकावणे ही सोपी गोष्ट नाही. त्यातही वर्ल्ड कपसारख्या स्पर्धेत तर नाहीच नाही. टी-२० च्या आंतरराष्ट्रीय सामन्यांना सुरुवात झाली ती २००५ मध्ये. गेल्या ११ वर्षांत सुमारे ५३८ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने झाले. यात आतापर्यंत फक्त १८ फलंदाजांना शतक झळकावता आलं आहे. त्यातही ब्रेंडन मॅकलम आणि ख्रिस गेल या दोघांनी दोनदा शतक ठोकलं आहे. त्यामुळं १८ जणांची एकूण २० शतकं आहेत. भारताच्या खेळाडूंपैकी फक्त रोहित शर्मा आणि सुरेश रैना यांनाच हा पराक्रम गाजवता आला आहे. त्यामुळं शतकाचं महत्त्व आहेच आणि गेलसारख्या खेळाडूच्या शतकाचं महत्त्व त्याच्या संघासाठी किती आहे, हे सांगायला नको. या वर्ल्ड कपमधलं पहिलंवहिलं शतक झळकावण्याचा मान गेलनं मिळवला आहे. आता आणखी किती जण त्याच्या रांगेत स्थान पटकावतात, ते पाहायचं. बिच्चारे गोलंदाज!

----

भाग ४ - १९ मार्च
------------------

मौका ‘५-०’ चा 
-------------------

आज संध्याकाळी भारताचा संघ कोलकत्याच्या त्या भव्य इडन गार्डन स्टेडियमवर किमान ६६ हजार प्रेक्षकांसमोर (लाखभर क्षमता असलेल्या या स्टेडियमचं काम चालू असल्यानं सध्या एवढेच लोक बसतात) मैदानात उतरेल, तेव्हा खरोखर त्यांच्यासाठी ‘करो या मरो’ अशीच स्थिती असणार, यात शंका नाही. समोर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान असेल. यापेक्षा नाट्यमय स्थिती दुसरी कोणती असणार? या संघातील नव्या खेळाडूंसाठी तर हा आयुष्यभर लक्षात राहील, असा अनुभव असेल. आज ते यशस्वी ठरले, त्यातल्या एखाद्याने जोरदार कामगिरी बजावली, तर येणाऱ्या कित्येक वर्षांसाठी तो त्या खेळाडूसाठी अविस्मरणीय क्षण असेल. याचं कारण, भारत-पाकिस्तान एकदिवसीय लढती, विश्वचषकातील लढती आणि आता टी-२० लढती यांचा रोमहर्षक इतिहास त्यामागं आहे. भारतानं वनडे आणि टी-२० या दोन्ही वर्ल्ड कपमध्ये अजूनही पाकिस्तानकडून पराभव पत्करलेला नाही. वन-डे वर्ल्ड कपमध्ये हा स्कोअर ६-० असा आहे, तर टी-२० वर्ल्ड कपमध्ये तो आहे ४-०! या लढतीसाठी दोन्ही संघ विशेष चार्ज्ड अप असतात. अनेक संस्मरणीय घटना आहेत. मग त्या जावेद मियाँदादच्या माकडउड्या असोत, की बंगळूरला आमिर सोहेलची वेंकटेश प्रसादने काढलेली दांडी असो... २००३ मध्ये दक्षिण आफ्रिकेतल्या वर्ल्ड कपमध्ये सचिननं शोएब अख्तरला मारलेला तो अप्पर कट आपण डोळे मिटेपर्यंत विसरू शकणार नाही. शोएब अख्तरचा नक्षा सचिननं जो काही उतरवला होता, त्याला तोड नाही. २००७ च्या टी-२० वर्ल्ड कपची फायनलही अविस्मरणीयच. जोगिंदर शर्माचं ते षटक इतिहासात नोंदलं गेलं. वर्ल्ड कपव्यतिरिक्त अन्य भारत-पाक लढतींच्याही लक्षणीय आठवणी आहेत. मियाँदादचा तो शारजातला कुख्यात षटकार कोण विसरू शकेल? ढाक्यात हृषीकेश कानिटकरने पाकिस्तानविरुद्ध मारलेला विजयी चौकार अजूनही लक्षात आहे. किंवा राजेश चौहाननं कराचीच्या नॅशनल स्टेडियममध्ये मारलेला षटकार अजूनही कानात घुमतोय.
स्पर्धा कुठलीही असो, या लढतींना दोन्ही देशांतील लाखो प्रेक्षकांमुळं जगातला सर्वाधिक टीआरपी मिळतो. सर्वांत चर्चेची घटना असते. कुठलेही माध्यम असो, त्यांना याची दखल घ्यावीच लागते. शिवाय हल्ली एक बरं झालंय. पूर्वी या लढतींमध्ये असलेली कटुता आता नक्कीच कमी झालीय. विशेषतः २०११ च्या मोहालीच्या सामन्यापासून हे जाणवतंय. हल्ली सोशल मीडियामुळं आणि इंटरनेटमुळं दोन्ही देशांतील लोकांमधलं अंतर व्हर्च्युअली का होईना, कमी झालंय. त्यामुळं काही बेसिक फरक सोडले, तर दोन्हीकडचे लोक सारखेच वेडे किंवा सारखेच शहाणे आहेत, हे आपल्या लक्षात येतं. या लढतींमधला फॅनॅटिझम कमी होऊन ती निखळ स्पर्धा झाली, तर आणखी काय हवं? पण दर वेळी काही तरी वाद उकरून काढला जातो आणि मग त्याची चर्चा सुरू होते. या वेळी शाहिद आफ्रिदीच्या वक्तव्यानं तो मान मिळवला. (तसाही तो गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअॅपवरच्या विनोदांचा बकरा झालाच होता.) पण आता हा सगळा इतिहास झालाय.
उद्या दोन्ही संघ जेव्हा समोरासमोर भिडतील, तेव्हा या इतिहासातलं नवं पानं लिहिलं जाईल. दस्तुरखुद्द अमिताभ बच्चन आपलं राष्ट्रगीत गायला उपस्थित राहणार आहेत, म्हणे. हा आपल्या संघासाठी प्रेरणेचा क्षण ठरावा आणि पाकविरुद्धच्या विजयाचा स्कोअर ‘५-०’ असा करण्याचा ‘मौका’ मिळावा, एवढीच इच्छा!
-----

भाग ५ - २० मार्च
-----------------


खरी रंगत सुरू...
---------------


टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा सुरू होऊन आता पाच-सहा दिवस झाले आहेत आणि बहुतेक संघांचा किमान एक, तर काही संघांचे दोन-दोन सामने झाले आहेत. या स्पर्धेत आता खरी रंगत भरू लागली आहे. विशेषतः न्यूझीलंड संघाने दोन सामने जिंकून नेहमीप्रमाणे आक्रमक मजल मारली आहे. विशेष म्हणजे न्यूझीलंडच्या महिला संघानेही पहिले दोन सामने जिंकले आहेत. खरं पाहता जागतिक क्रिकेटमध्ये न्यूझीलंड संघाला कायमच जरा दुय्यम लेखलं जातं. पण वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडची कामगिरी खूपच चांगली आहे. जवळपास प्रत्येक स्पर्धेत त्यांनी उपांत्य फेरी तर गाठलीच आहे. मागील वर्ल्ड कप स्पर्धेत तर त्यांनी सलग आठ सामने जिंकले होते. टी-२० मध्येही हा संघ तरबेज आहे. ब्रेंडन मॅकलम हा टी-२० स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडनं बरेच पराक्रम गाजवले आहेत. पहिल्या सामन्यात त्यांनी भारताला हरवलं आणि धरमशालात पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियालाही धूळ चारली. ऑस्ट्रेलिया आणि भारत हे दोन्ही संघ पहिल्या सामन्यात पराभूत झाल्यानं भारताच्या गटातली चुरस पराकोटीला गेली आहे. भारताप्रमाणंच आता ऑस्ट्रेलियाही आपले उरलेले सर्व सामने जिंकण्याचा प्रयत्न करणार. त्यातच हे दोन्ही संघ पुढील रविवारी एकमेकांशी मोहालीत भिडणार आहेत. तोपर्यंत या गटाचं चित्र स्पष्ट होणार नाही. 
पुरुषांप्रमाणेच महिलांच्या टी-२० वर्ल्ड कपमधील चुरस वाढली असून, शनिवारी दिल्लीत भारतीय महिलांना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून दुर्दैवी पराभवाचा सामना करावा लागला. दिल्लीत पाऊस आल्यानं डकवर्थ-लुईस नियमाचा आधार घेण्यात आला आणि त्यात पाकिस्तान दोन धावांनी पुढं असल्यानं त्यांना विजयी घोषित करण्यात आलं. अर्थात पहिल्या सामन्यात भारतानं बांगलादेशला हरवलेलं असल्यानं गटात अजूनही भारतच अव्वलस्थानी आहे. शनिवारच्या सामन्यात पाकिस्तानच्या महिलांनीही प्रभावित करणारी कामगिरी केली. विशेषतः पाकिस्तानी महिलांचं क्षेत्ररक्षण त्यांच्या पुरुष सहकाऱ्यांपेक्षा पुष्कळच चांगल्या दर्जाचं होतं. भारताकडून वेदा कृष्णमूर्तीनं चांगली टोलेबाजी केली. मात्र, तिला अन्य कुणाची फार साथ मिळाली नाही. आता मंगळवारी भारताचा सामना धरमशाला इथं इंग्लंडच्या महिलांशी होणार आहे. तो सामना जिंकला, तर मिताली राजच्या संघाचं उपांत्य फेरीचं आव्हान पुष्कळसं सोपं झालेलं असेल. एकूणच, दोन्ही स्पर्धांची खरी रंगत आता सुरू झाली आहे, हे नक्की!
----
भाग ६ - २१ मार्च 
--------------
दो धक्के और दो... 
-----------------------

शनिवारी पाऊस पचका करणार की काय, असं वाटत होतं. पण भारत-पाकिस्तान यांच्यातल्या लढतीमधला थरार पावसालाही पाहायचा असावा. त्यामुळं तो थांबला. इडन गार्डनच्या स्टाफनं प्रयत्नांची शर्थ केली; त्यामुळं एका डावातील केवळ दोनच षटकांचा वेळ वाया गेला. साक्षात अमिताभ बच्चन यांच्या धीरगंभीर आवाजात झालेल्या आपल्या राष्ट्रगीतानं तर रोमांच उभे राहिले. सुमारे ७० हजार गुणिले दोन एवढे डोळे त्या वेळी फक्त त्या मैदानाच्या मध्यभागी उभ्या असलेल्या अमिताभवर केंद्रित झाले होते. भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या सामन्याला - आणि त्यात तो वर्ल्ड कपमधला सामना असेल, तर अधिकच - इतर कुठल्याही सामन्याच्या फूटपट्ट्या लावून चालत नाही. त्यामुळं अमुक एवढ्या धावा केल्या, की विजय निश्चित किंवा अमुक एवढे बळी घेतले तर आता पराभवाची भीती नाही, असं काही सांगता येत नाही. खेळाडूंच्या मनावरच्या दबावाचं मोजमाप करणारी कुठलीही यंत्रणा अजून तरी स्टेडियममध्ये उभारण्यात आलेली नाही. नाही तर त्याचेही ग्राफ टोलेजंग इमारतींसारखे उत्तुंगच दिसले असते. त्यामुळं पाकिस्तानला आपण ११८ धावांत रोखलं, तरी आता विजय निश्चित झाला, असं कुणीही मानत नव्हतं. त्यातच २३ धावांवर तीन बळी गेल्यावर तर श्वासच रोखले गेले. सामीची गोलंदाजी अचानक भेदक वाटू लागली. पण युवराजनं त्याची हॅट-ट्रिक टाळली आणि पुन्हा श्वासात श्वास आले. पाकिस्तान आणि भारत यांच्यातला फरक स्पष्ट करणारा एक फलंदाज युवराजच्या समोर भक्कम नांगर टाकून उभा राहिला होता. त्याची देहबोली अत्यंत आक्रमक आणि आत्मविश्वासपूर्ण होती. विराट कोहली हे त्याचं नाव! सध्या आक्रमकता व आत्मविश्वास या शब्दांना समानार्थी शब्द म्हणून ‘विराट कोहली’ हे दोन शब्द वापरायला हरकत नाही, एवढं त्याचं या दोन शब्दांशी अद्वैत जडलंय. विराटनं मग युवराजच्या साथीनं सामन्याची सूत्रं आपल्या हाती घेतली. त्या वेळी चार वेगवान गोलंदाजांना घेऊन खेळण्याचा पाकिस्तानचा निर्णय चुकला, हे स्पष्ट झालं होतं. आफ्रिदी आणि मलिक यांची फिरकीही चालली नाही. एकेरी-दुहेरी धावा काढत, डोकं शांत ठेवत विराट-युवीनं भारताला सुस्थितीत नेऊन ठेवलं. पुढं युवराज गेला, तरी धोनीनं आपल्या उपस्थितीनं आणखी पडझड होऊ दिली नाही. त्याचा शेवटचा षटकार तर खास होता. अर्धशतक पूर्ण झाल्यावर विराटनं स्टँडकडं पाहून कमरेत वाकून अभिवादन केलं. विराटनं स्टँडमध्ये बसलेल्या सचिनला पाहूनच हे अभिवादन केलं होतं. विराटच्या मनात सचिनविषयी काय भावना आहेत, हे सामन्यानंतर त्यानं टीव्हीवरच्या मुलाखतीत सांगितलंदेखील. आपण ज्या हिरोला पाहत मोठे झालो, तो आज आपल्यासाठी चिअरअप करतोय, हे दृश्य पाहणं विराटसाठी किती खास असेल! असे काही क्षण खेळाडूंच्या आयुष्यात स्पेशल असतात, अगदी स्पेशल! खेळाडूच्या अंगभूत गुणवत्तेला भावभावनांचा स्पर्श झाला, तर त्याच्या हातून अलौकिक गोष्टी होऊ शकतात. सचिननं त्याच्या संपूर्ण करिअरमध्ये हे दाखवून दिलं होतं. विराटनं त्या दिशेनं फक्त एक पाऊल टाकलं आहे. पण तेही खूप आश्वासक आहे...
आता भारताला फक्त दोन विजय हवेत. तेव्हा धोनी आणि विराटला सांगू या - दो धक्के और दो...

----

भाग ७ - २२ मार्च
------------------


सूर ‘कॅलिप्सो’चे 
-------------------

वेस्ट इंडिजच्या संघानं काल श्रीलंकेवर सफाईदार विजय मिळवला आणि उपान्त्य फेरीचा मार्ग प्रशस्त केला. वेस्ट इंडिजच्या अवलिया टीमची स्पर्धेतील हजेरी कायमच मजा आणत असते. वेस्ट इंडिज आणि इतर संघांमध्ये एक प्रमुख फरक असा, की इतर सर्व देश त्या त्या देशांच्या क्रिकेट बोर्डांचंच प्रतिनिधित्व करीत असले, तरी शेवटी ते त्या देशाचंही एक प्रकारे प्रतिनिधित्व करीत असतातच. वेस्ट इंडिजचं तसं नाही. कारण वेस्ट इंडिज नावाचा देश नाहीच. अटलांटिक महासागरात उत्तर अमेरिकेच्या जवळ असलेल्या अनेक बेटांचा हा समूह आहे. अँटिग्वा व बर्म्युडा, बार्बाडोस, डॉमिनिका, ग्रेनाडा, गयाना, जमैका, सेंट लुसिया, सेंट व्हिन्सेंट अँड द ग्रेनेडियन्स आणि त्रिनिदाद व टोबॅगो या स्वायत्त राज्यांचा/राष्ट्रांचा त्यात समावेश आहे. एरवी हे सर्व देश ऑलिम्पिकमध्ये वगैरे स्वतंत्र देश म्हणून भाग घेतात. मात्र, क्रिकेटचा त्यांचा स्वतंत्र संघ नाही. पूर्वीपासून वेस्ट इंडिज याच नावाखाली हे देश त्यांची एकत्रित टीम पाठवतात. त्यातही जमैका, त्रिनिदाद यांचं त्यात वर्चस्व आहे. वेस्ट इंडिज बेटांवर क्रिकेट आलं ते अर्थातच ब्रिटिशांमुळं. धिप्पाड शरीर, उंचेपुरे असे वेस्ट इंडियन खेळाडू जगभरात लोकप्रिय आहेत ते त्यांच्या नैसर्गिक गुणवत्तेमुळं. सर गारफिल्ड सोबर्स यांच्यापासून ते ब्रायन लारापर्यंत वेस्ट इंडिज क्रिकेटला फार मोठी परंपरा आहे. ‘कॅलिप्सो’ संगीताच्या तालावर स्टायलिश नृत्य करण्यात तरबेज असलेल्या या खेळाडूंचे जगभरात चाहते आहेत. अलीकडच्या काळात हा संघ सारखा वादात सापडतो. मात्र, एके काळी क्रिकेट विश्वावर त्यांचंच राज्य होतं, हे नाकारून चालणार नाही. टी-२० स्पर्धेत ख्रिस गेलसारख्या खेळाडूची उपस्थिती केवळ रंगत आणते असं नाही, तर त्या खेळाची पातळी उंचावते. वेस्ट इंडिज संघानं एकदिवसीय स्पर्धेचे विजेतेपद दोनदा जिंकले आहे, तर चार वर्षांपूर्वी श्रीलंकेत झालेला टी-२० वर्ल्ड कपही त्यांनी जिंकला आहे. या स्पर्धेत त्यांनी सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून जोरदार सुरुवात केली आहे. त्यामुळे त्या गटातून आता दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि इंग्लंड यांना उपान्त्य फेरी गाठण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी लागणार आहे. वेस्ट इंडिजचा आता मंगळवारी दक्षिण आफ्रिकेसोबत, तर रविवारी अफगाणिस्तानबरोबर सामना होणार आहे. हा संघ उपान्त्य फेरीत आला, तर स्पर्धेची रंगत आणखीनच वाढेल, यात शंका नाही. कारण ज्या दिवशी गेल खेळतो, त्या दिवशी कुठलाच संघ त्याला रोखू शकत नाही!
 ----
भाग ८- २३ मार्च
--------------


ही किरकिर थांबवा...
--------------------------

बांगलादेशला काल ऑस्ट्रेलियानं सहज हरवल्यानं तो देश आता उपान्त्य फेरीच्या स्पर्धेतून जवळपास बाहेर पडला आहे. त्यात आयसीसीनं बांगलादेशचे गोलंदाज टस्किन अहमद आणि अराफत सनी यांना संशयास्पद शैलीवरून निलंबित केल्यानं त्या देशाच्या संतापात भरच पडली आहे. बांगलादेशी क्रिकेट चाहते हे अतिउत्साही आणि अतिरेकी आहेत. याबाबत ते कदाचित आपल्या पूर्वाश्रमीच्या मोठ्या भावाला - पाकिस्तानलाही - मागे टाकतील. या चाहत्यांनी भारताच्या जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विन या गोलंदाजांचीही शैली संशयास्पद असल्यानं त्यांच्यावरही बंदी घालावी, अशी मागणी केली आहे. बांगलादेश हे एक उगवते, तरुण राष्ट्र आहे. जगातील इतर बड्या देशांच्या मांडीला मांडी लावून बसण्याची त्यांची लालसा समजण्यासारखी आहे. पण म्हणून प्रत्येक गोष्टीत भारतासारख्या अतिच मोठ्या देशाला आपल्या बरोबरीला आणून बसवण्याची आणि त्याची टर उडवण्याची त्या देशाची वृत्ती केवळ हास्यास्पद आहे. खरं तर ही किरकिरी वृत्ती आहे! गेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतानं त्यांना उपान्त्यपूर्व फेरीत हरवलं तेव्हा पंचांचा निर्णय विरोधात गेला, म्हणून आयसीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा नाटकीपणा बांगलादेशचे मुस्तफा कमाल यांनी केला होता. त्या देशात तर भारतविरोधाचं काहूर उठलं होतं. नंतर भारताचा संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर गेला, तेव्हा आपला संघ मुस्तफिकूर रेहमानच्या वेगवान गोलंदाजीपुढं नांगी टाकून आला. तेव्हा त्या देशातल्या लोकांनी मुस्तफिकूरच्या कटरनं भारतीय फलंदाजांची डोकी भादरल्याचं भित्तिचित्र प्रदर्शित केलं होतं. त्यानंतर आत्ता आशिया कप स्पर्धेतही आपण त्यांना लीग सामन्यात हरवलं. पण फायनलमध्ये पुन्हा दोन्ही संघ एकमेकांसमोर येणार म्हटल्यावर तेथील लोकांनी टस्किननं हातात धोनीचं कापलेलं मुंडकं धरलं आहे, असं चित्र प्रदर्शित केलं. हे असले प्रकार त्या देशातल्या लोकांची विकृत मानसिकता दर्शवतात. अर्थात फायनलमध्ये भारतानं बांगलादेशला किरकोळीत हरवून त्यांची लायकी दाखवून दिलीच आहे. आता भारतात सुरू असलेल्या टी-२० वर्ल्ड कपमध्येही बांगलादेशचा संघ पहिले दोन्ही सामने हरला आहे. आधी पाकिस्तानकडून आणि काल ऑस्ट्रेलियाकडून. त्यामुळं त्या संघाच्या मर्यादा मुळात स्पष्ट झाल्या आहेत. उद्या (बुधवारी) होळीच्या दिवशी भारतीय संघाकडून बेंगळुरूमध्ये हा संघ पुन्हा एकदा पराभूत होईल, अशीच सध्याची चिन्हे आहेत. त्यामुळे बिथरलेले बांगलादेशी काय वाट्टेल ते उद्योग करत आहेत. त्यांना अनुल्लेखाने मारणे खरे तर योग्य; पण लहान मुलांचा दंगा फार वाढला, तर मोठ्यांचीही सहनशक्ती संपते आणि एखादा धपाटा त्यांच्या पाठीत बसतो. धोनीच्या संघाकडून उद्या बांगलादेशला असाच एक धपाटा बसण्याची शक्यता जास्त आहे. त्यानंतर तरी या ‘शेजाऱ्याच्या कार्ट्याची किरकिर’ कमी होईल, अशी अपेक्षा!
----

भाग ९ - २४ मार्च
----------------

कौतुक अफगाणिस्तानचे 
--------------------


अफगाणिस्तानचा संघ अपेक्षेप्रमाणे स्पर्धेतून बाहेर गेला आहे. त्यांनी त्यांचे तिन्ही सामने गमावले. आता त्यांची शेवटची लढत वेस्ट इंडिजसोबत आहे. पण अफगाणिस्तानच्या संघाचे कौतुक करावे लागेल. आधी पात्रता फेरीतून सुपर १० गटात त्यांनी प्रवेश मिळविला, हीच गोष्ट पुरेशी कौतुकास्पद आहे. एका गटातून बांगलादेश आणि दुसऱ्या गटातून झिम्बाब्वे सुपर १० गटात येतील, असा सर्वसाधारण ठोकताळा होता. मात्र, अफगाणिस्तानने तो अंदाज चुकवून झिम्बाम्बेला हरवले आणि सुपर १० गटात प्रवेश केला. या गटात त्यांचे तिन्ही सामने चांगले झाले. श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या तिन्ही बड्या संघांना त्यांनी चांगली टक्कर दिली. विशेषतः दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांच्या महंमद शहजादने १९ चेंडूंत ४४ धावांची जी झंझावाती खेळी केली, ती पाहता, आफ्रिकेच्या गोलंदाजांच्या पोटात गोळा आला होता. शहजादनं या खेळीत पाच उत्तुंग षटकार मारले होते. त्या सुरुवातीनंतर आफ्रिकेने केलेले २०९ धावांचे आव्हानही अपुरे पडतेय की काय, असे वाटू लागले होते. मात्र, अखेर अनुभवाच्या जोरावर आफ्रिकेने हा सामना एकदाचा जिंकला. त्यापूर्वीही श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात असगर स्तानिकजाई या खेळाडूनं ४७ चेंडूंत ६२ धावांची जोरदार खेळी केली होती. त्याच्या जोरावरच अफगाणिस्तानला दीडशे धावांवर मजल मारता आली होती. महंमद नबी, शफिकउल्लाह, समिउल्लाह शेनवारी हे त्यांचे इतर खेळाडूही चांगले आहेत. कालच्या सामन्यात इंग्लंडलाही त्यांनी कडवी लढत दिली. दहाव्या षटकात इंग्लंडची अवस्था सहा बाद ५७ झाली होती. मात्र, अखेरच्या तीन षटकांत जास्त धावा काढल्यानं इंग्लंडला १४२ धावांपर्यंत मजल मारता आली. अफगाणिस्ताननं प्रत्युत्तरादाखल १२७ धावांपर्यंत मजल मारून दाखविली. गेली कित्येक वर्षं दहशतवाद, यादवी आणि राजकीय अस्थैर्यानं अफगाणिस्तानला ग्रासलं आहे. त्यामुळं त्या संघानं क्रिकेटमध्ये दाखवलेली ही चमक खूपच स्वागतार्ह आहे. दक्षिण आशिया हेच खरं तर आता क्रिकेटचं माहेरघर झालं आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशपाठोपाठ आता अफगाणिस्तान हा या प्रदेशातला पाचवा देश नियमितपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू लागला आहे. या सर्वच देशांमध्ये क्रिकेटची लोकप्रियता अतोनात आहे. पुढच्या एखाद्या वर्ल्ड कपला उपान्त्य फेरीत दक्षिण आशियातलेच चारही संघ दिसले, तर आश्चर्य वाटायला नको. अफगाणिस्तान आणि भारताचे संबंध पूर्वापार मैत्रीचे आणि सलोख्याचे आहेत. अगदी महाभारतकालीन गांधार देशापासून ते आत्ताच्या रवींद्रनाथ टागोरांच्या काबुलीवालापर्यंत आपल्याला अफगाण लोक प्रिय आहेत. त्या देशाची एकूणच घडी बसविण्यात भारताचा मोठा पुढाकार आहे. त्यांच्या क्रिकेट संघालाही लवकरच सर्वत्र लोकप्रियता मिळेल, असं वाटतं. वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धेत अशा संघांचा सहभाग असणं ही गोष्ट एकूण क्रिकेटच्या वाढीसाठी पूरकच ठरेल. आयर्लंडचाही संघ चांगला आहे. त्यामानानं स्कॉटलंड, नेदरलँड, हाँगकाँग किंवा यूएई या देशांची अलीकडं जरा घसरण झाल्यासारखी वाटते. या सर्व देशांत क्रिकेटचा एक किमान दर्जा कायम राहील, यासाठी त्यांना वर्ल्ड कपसारख्या स्पर्धांमध्ये वारंवार सहभागी करून घेणं हाच एक उपाय आहे. त्या दृष्टीनं या वेळची टी-२० स्पर्धेची आखणी योग्य आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध अफगाणिस्तानची लढत बघायला मजा येईल.
----

भाग १० - २५ मार्च
------------------

जो जिता वही सिकंदर
--------------------------


महेंद्रसिंह धोनीच्या राशीतले सर्व उच्चीचे ग्रह त्या शेवटच्या तीन चेंडूंच्या वेळी एकत्र आले असावेत; अन्यथा बांगलादेशचे तीन फलंदाज बाद होऊन भारत केवळ एका धावेने विजयी झालाच नसता! संपू्र्ण सामन्यात बांगलादेशचे नकोनकोसे वर्चस्व होते आणि आपण त्यांच्या हातातले बाहुले होऊन खेळत होतो, असं दिसत होतं. केवळ नशीब म्हणून आपण बचावलो. शेवटी ‘जो जिता वही सिकंदर’ हेच खरं! त्यामुळं आपल्या संघाचं कौतुक तर करायलाच हवं. त्यातही ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंह धोनीवर कौतुकाचा वर्षाव होतो आहे आणि तो अगदी रास्तच आहे. धोनीचं प्रसंगावधान दोन प्रसंगांत दिसलं आणि अगदी काल धावत्या समालोचनातही ज्येष्ठ क्रिकेटपटूंनी तिथल्या तिथं त्याला याबद्दल दाद दिली होती. एक म्हणजे दहाव्या षटकात त्यानं सब्बीर रेहमानला यष्टिचीत केलं तो प्रसंग. तेव्हा बांगलादेशच्या २ बाद ६९ धावा झाल्या होत्या आणि आपल्याला विकेटची नितांत गरज होती. तेव्हा सब्बीर (१५ चेंडूंत २६) जोरातच खेळत होता. धोनीनं त्याला केवळ एखाद्या सेकंदाच्या फरकानं यष्टिचीत केलं. सब्बीरचा दुसरा पाय बाहेर होता आणि एक क्रीझच्या आत होता. मात्र, बॅलन्स साधण्यासाठी त्यानं क्रीझमधला पाय किंचित उचलला आणि परत तिथं ठेवला. त्या मधल्या केवळ एखाद-दुसऱ्या सेकंदात धोनीनं त्याला यष्टिचीत केलं. त्या वेळी धोनी यष्टींकडं नव्हे; तर सब्बीरच्या पायाकडं पाहत होता. विशेष म्हणजे सब्बीरचा तोल गेला आणि त्याचा पाय उचलला गेला त्याच वेळी धोनीनं बरोबर बेल्स उडविल्या. नंतर या विकेटचा क्षण स्लो मोशनमध्ये पाहताना हे अगदी जाणवलं. हे कौशल्य अफाट आहे. केवळ अचाट एकाग्रता आणि आपल्या कामातलं उच्च कौशल्य असल्याशिवाय हे साधत नाही. दुसरा प्रसंग अगदी शेवटच्या चेंडूचा. त्या वेळी बांगलादेशला दोन धावांची गरज होती आणि एक धाव जरी निघाली असती, तरी सामना टाय झाला असता. तेव्हा धोनीनं उजव्या हातातील ग्लोव्ह काढून ठेवला होता. शेवटी त्याच्या हातात चेंडू आला तेव्हा धावत जाऊन त्यानं बेल्स उडविल्या आणि बांगलादेशचा खेळाडू धावबाद झाला आणि आपण केवळ एका धावेनं सामना जिंकला. आपण या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आणि बांगलादेशचा संघ आपल्या डोक्यावर कायमचा न बसण्यासाठी हा विजय फार फार आवश्यक होता. धोनीनं ते करून दाखवलं. हार्दिक पंड्या आणि एरवी सगळ्यांच्या चेष्टेचं लक्ष्य होणारा नेहरा यांचंही काल भरभरून कौतुक झालं. हे सगळं आणखी दोन दिवस चालेल. मग रविवारी मोहालीत पुन्हा एक नवी परीक्षा असेल. त्या परीक्षेतली गणितं किती अवघड आणि किती सोपी, हे उद्या (शुक्रवारी) तिथंच होणाऱ्या पाकिस्तान वि. ऑस्ट्रेलिया या आपल्या गटातल्या आणखी एका महत्त्वाच्या सामन्यावर अवलंबून असेल. ‘जो दुसऱ्यावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला’ ही फार जुनी आणि खरी म्हण आहे. आपण न्यूझीलंडविरुद्धची पहिलीच मॅच का हरलो, या प्रश्नाची उजळणी रविवारी होऊ नये, म्हणजे मिळविली! 
--- 

भाग ११ - २६ मार्च
-----------------------
सोपे व अवघड गणित
------------------

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान या शुक्रवारच्या बहुप्रतीक्षित लढतीचा निकाल अपेक्षेप्रमाणेच लागला. ऑस्ट्रेलियानं आवश्यक असलेला विजय साकार केला, तर पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून बाहेर फेकला गेला. चार सामन्यांत त्यांना फक्त एकच विजय नोंदवता आला, तोही बांगलादेशसारखा. पाकिस्तान संघात गुणवान खेळाडू असले, तरी अनेक क्रीडाबाह्य घडामोडींनी या संघाला कायम ग्रासलेलं असतं. पाकिस्तानसारखा संघ कुठल्याही मोठ्या स्पर्धेत कितीही लवकर बाद होऊ शकतो किंवा तो थेट विजेताही होऊ शकतो. अलीकडं हा बेभरवशीपणा बराचसा वेस्ट इंडिजनं, तर थोडाफार दक्षिण आफ्रिकेनंही उचलला आहे. बाकी ऑस्ट्रेलियासारखा तगडा संघ फार काळ मुख्य वर्तुळापासून दूर राहू शकत नाही. गुणतक्त्यातील आकडेवारी काहीही सांगत असली, तरी ऑस्ट्रेलियाची प्रत्यक्षातील ताकद सगळ्यांनाच माहिती आहे. त्यांनी पाकिस्तानला हरवून आपला नेट रनरेट तर सुधारला आहेच; पण त्याहून लक्षणीय म्हणजे गुणतक्त्यात दुसऱ्या क्रमांकावर झेप घेताना महत्त्वाचे दोन गुण खिशात टाकले आहेत. मुळात आता नेट रनरेटचा फार प्रश्न येणार नाही. रविवारी होणारी ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत ही लढत थेट उपान्त्यपूर्व फेरीची लढत झाली आहे. यात जो जिंकणार, तोच उपान्त्य फेरीत जाणार हे आता अगदी सरळ गणित झाले आहे. त्यामुळे भारतीय संघाने आपल्या उणे नेट रनरेटची चिंता करायची गरज नाही. ऑस्ट्रेलियाला अगदी परवा बांगलादेशला एका धावेनं हरवलं, तसं हरवलं तरी चालणार आहे. हा सामना आता नेट रनरेटच्या गणितापलीकडं गेला ही गोष्ट चांगली झाली. आपल्याला साध्या-सोप्या गोष्टी समजतात. जो जिंकणार त्यानंच पुढं जायला पाहिजे, ही साधी गोष्ट आहे. पण समोर ऑस्ट्रेलियासारखा संघ असेल, तर ही साधी गोष्टच खूप अवघड वाटू लागते. साधं गणितही कूटगणितासारखं क्लिष्ट वाटू लागतं. याचं कारण म्हणजे भारतीय संघानं, विशेषतः भारतीय फलंदाजांनी ही स्पर्धा सुरू झाल्यापासून त्यांच्या लौकिकाला साजेशी कामगिरी मुळीच केलेली नाही. खेळपट्ट्यांना दोष देण्यात अर्थ नाही, कारण समोरचा संघही त्याच खेळपट्टीवर खेळत असतो. आणि जागतिक दर्जाचा, किंवा रँकिंगमध्ये अव्वल स्थानी असलेला संघ अशा सबबी सांगतही नसतो. रोहित शर्माचं अपयश खूपच सलण्यासारखं आहे. धवन मागच्या सामन्यात थोडा फार खेळला. युवराजही चाचपडतोय. धोनी पूर्वीसारखी दे दणादण फलंदाजी आता करत नाही. एखाद्या षटकारातून त्याचा तो जोम दिसतो, पण तो आता वीस चेंडूंत ५० धावा ठोकून काढील, अशी अपेक्षा आता आपणही सोडून दिली आहे. हार्दिक पंड्यानं थोडी फार चमक दाखविली, पण रवींद्र जडेजानं जोरदार फटकेबाजी केली, त्याला जमाना लोटलाय. सुरेश रैना मधेच खेळतो, तर मधेच गंडतो. एकूणच फलंदाजीला सूर गवसलेला नाही. मोहालीच्या खेळपट्टीवर आज ऑस्ट्रेलियानं भरपूर धावा केल्या. भारतालाही रविवारी ऑस्ट्रेलियाला हरवायचं असेल, तर किमान २०० धावा ठोकून काढाव्या लागतील. शिवाय क्षेत्ररक्षणातही जोरदार सुधारणा करावी लागेल. झेल सोडून चालणार नाही. विशेषतः प्रतिस्पर्ध्याच्या प्रत्येक खेळाडूचा अभ्यास करून त्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरायला हव्यात. भारताविरुद्धच्या सामन्यात बांगलादेशनं हा गृहपाठ अचूक केल्याचं जाणवत होतं. ऑस्ट्रेलियाला हरविण्याची ताकद धोनीच्या संघात नक्कीच आहे. बांगलादेशवरच्या विजयामुळं आता सर्वांचं मनोधैर्यही उंचावलेलं असेल. भारत उपान्त्य फेरीत गेलाच तर समोर वेस्ट इंडिजचा संघ असण्याची सर्वाधिक शक्यता आहे. पण त्यासाठी आधी मोहाली सर करावी लागेल. अवघड आहे; पण अशक्य नक्कीच नाही!
----

भाग १२ - २७ मार्च
------------------

नव्या युगाचे नवे हिरो 
-----------------

टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यात येऊन पोचली आहे. यंदाच्या स्पर्धेचं जाणवलेलं एक वैशिष्ट्य म्हणजे मोठं नाव असलेल्या खेळाडूंनी केलेली निराशा आणि नव्या दमाच्या खेळाडूंनी केलेली जोरदार कामगिरी. शनिवारचा पहिला सामना सुरू होण्यापूर्वीची आकडेवारी पाहिली, तर सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक बळी या दोन्ही स्तंभांत रँकिंगमध्ये अव्वल असलेल्या देशांचे खेळाडू नाहीत. सर्वाधिक धावा बांगलादेशच्या तमिम इक्बालच्या नावावर असून, सर्वाधिक बळी अफगाणिस्तानच्या महंमद नबी या खेळाडूने घेतले आहेत. 
एरवी टी-२० स्पर्धा म्हटलं, की ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स, विराट कोहली, शाहीद आफ्रिदी, तिलकरत्ने दिलशान किंवा गोलंदाजांमध्ये मलिंगा, स्टेन, महंमद आमीर, इम्रान ताहिर आदींची नावं घेतली जातात. यंदा यापैकी एक गेल सोडला तर बाकीच्यांनी तशी निराशाच केली आहे. मलिंगा तर यंदाच्या स्पर्धेत सहभागी झाला नाही. बाकी खेळाडूंनीही एखादा अपवाद वगळता, फार काही नाव घेण्याजोगी कामगिरी केलेली नाही. गेलनं पहिल्याच सामन्यात शतक ठोकलं. डिव्हिलियर्सही एकदा खेळला. कोहली आणि दिलशानचंही तेच. एकेकदा चमकले. महंमद आमीर चांगली गोलंदाजी करतो, पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात त्याला मार पडला. तीच गोष्ट अश्विन किंवा ताहिरची. रोहित शर्मासारख्या भारताच्या स्टार खेळाडूला अद्याप फॉर्म गवसलेला नाही. आफ्रिदीही एकदाच नीट खेळला. याउलट अफगाणिस्तानचा शहजाद किंवा बांगलादेशचा महमदुल्लाह, भारताचा बुमराह किंवा पंड्या, पाकिस्तानचा शार्जिल खान (यानं स्पर्धेतील सर्वाधिक चौकार मारले आहेत), ऑस्ट्रेलियाचा अॅडम झम्पा, इंग्लंडचा जो रूट, आफ्रिकेचा डिकॉक आदी नव्या किंवा ज्यांना आत्तापर्यंत फार ग्लॅमर लाभलं नाही अशा खेळाडूंनी लक्षणीय कामगिरी करून दाखविली आहे. बांगलादेशचा सौम्या सरकार हा तर अतिशय चपळ आणि बुद्धिमान क्षेत्ररक्षक आहे. त्यानं सीमेवर घेतलेला तो अशक्यप्राय झेल किंवा भारताविरुद्धच्या सामन्यात सूर मारून घेतलेला झेल ही त्याच्या अफाट क्षेत्ररक्षणाची उदाहरणं बोलकी आहेत.
टी-२० हा स्पर्धा प्रकारच असा आहे. आयपीएलमध्येही दर वर्षी नवनवे खेळाडू पुढं येताना दिसतात. काहींना क्षेत्ररक्षणात विलक्षण गती असते, तर काहींना गोलंदाजीत विविध प्रयोग करण्याची हातोटी असते. त्याचा त्या त्या संघांना निश्चितच उपयोग होताना दिसतो. 
भारत एकाच बाबतीत अत्यंत नशीबवान आहे आणि ती गोष्ट म्हणजे आपल्याला धोनीसारखा कल्पक कर्णधार लाभला आहे. असा कर्णधार असेल, तर संघातल्या एरवी सामान्य गणल्या जाणाऱ्या खेळाडूंनाही स्फुरण चढते आणि ते विलक्षण कामगिरी बजावू शकतात. परवा बांगलादेशविरुद्ध पंड्यानं शेवटचं षटक यशस्वीरीत्या टाकलं, त्यामागं धोनीचा पाठिंबा मोलाचा होता. त्यामुळं आज, रविवारी आपला हा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धही अशीच कामगिरी उंचावून दाखवील, अशी आशा आहे. बघू या!
----

भाग १३ - २८ मार्च
-----------------


दिलवाले काबूलवाले!
------------------------

या टी-२० स्पर्धेत मला सर्वांत आवडलेला संघ आहे तो अफगाणिस्तानचा. संघ नवा आहे, पण खेळाडू सगळे कसलेले वाटतात. या अफगाणी खेळाडूंनी रविवारी नागपुरात झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव करून स्पर्धेतल्या पहिल्या सनसनाटी विजयाची नोंद केली. स्पर्धेच्या प्रगतीच्या दृष्टीने या सामन्याला फारसे महत्त्व नव्हते; कारण वेस्ट इंडिजचा संघ आधीच उपांत्य फेरीत पोचला आहे. पण न्यूझीलंडप्रमाणे चारही सामने जिंकण्याची त्यांची मनीषा अफगाण वीरांनी काही फलद्रुप होऊ दिली नाही. वेस्ट इंडिजकडून ख्रिस गेल खेळत नव्हता, पण तरीही अफगाणिस्तानच्या या विजयाचं महत्त्व कमी होत नाही. शेवटी विजय तो विजयच! हा विजय अफगाणिस्तानच्या क्रिकेटला नक्कीच पोषक ठरणार आहे. सदैव युद्धजन्य परिस्थितीनं गांजलेला, यादवी आणि दहशतवादाच्या छायेखाली वावरणारा, अर्धा-अधिक उद्-ध्वस्त असा हा देश. भारताचा सख्खा-शेजारी. मधल्या टग्या शेजाऱ्यापेक्षा आपल्याशी किती तरी मैत्रीभाव जपणारा. हा देश क्रिकेटमध्ये असा पुढं येत आहे, हे बघून आनंदच होतो. वेस्ट इंडिजनं नागपुरातली लढत गांभीर्यानं घेतली नसेल, तर ती त्यांची मोठी चूक ठरणार आहे. कारण एकदा तुम्ही विजयी व्हायला लागलात, की विजयाची सवय लागते. ही सवय एखादा सामना फार महत्त्व न देता खेळून हरल्यानं तुटण्याची शक्यता असते. वेस्ट इंडिजला उपांत्य फेरीत याची धग जास्त जाणवेल.
तूर्त अफगाणिस्तान संघाचं कौतुक करू या. त्यांचा शहजाद महमुदी हा यष्टिरक्षक व आघाडीचा गोलमटोल फलंदाज म्हणजे एक वल्ली आहे. एक तर तो अत्यंत स्फोटक फलंदाज आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्यानं १९ चेंडूंत ४४ धावा फटकावताना त्याची क्षमता दाखवून दिली होती. आजच्या सामन्यात त्यानं २२ चेंडूंत २४ धावा फटकावल्या. यष्टिरक्षण करताना प्रत्येक विकेट पडली, की तो वेस्ट इंडिजच्या खेळाडूंची नक्कल करून नाचत होता, ते भारी वाटत होतं. त्यांच्या नजीब झदरान या खेळाडूनं ब्रेथवेटचा डीप मिडविकेटला पळत येऊन घेतलेला झेलही अफलातून होता. एकूणच महंमद नबीच्या नेतृत्वाखालील हा संघ अत्यंत चपळतेनं, उत्साहानं मैदानावर वावरताना दिसतो. सामना जिंकल्यानंतर या सर्व खेळाडूंनी ज्या पद्धतीनं सेलिब्रेशन केलं, ते पाहण्यासारखं होतं. त्यांच्यासाठी हा सामना जिंकणं म्हणजे ‘वर्ल्ड कप’ जिंकण्यासारखंच होतं. ते ‘चॅम्पियन्स चॅम्पियन्स’ असं ओरडतच होते. गंमत म्हणजे नंतर ख्रिस गेलही त्यांच्या या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाला. त्यामुळं तर अफगाणिस्तानच्या खेळाडूंना भलताच आनंद झाला आणि गेलबरोबर सेल्फी काढून घेण्यात ते मश्गुल झाले. हे असं दृश्य इतकं मनोहारी होतं! क्रिकेट हा खेळ आपल्याला आवडतो तो अशाच काही क्षणांसाठी! इट्स टु गुड!! 
-----
भाग १४ - २९ मार्च
-----------------------
सचिन २.० 
------------

विराट कोहली म्हणजे ‘सचिन २.०’ (कम्प्युटरच्या भाषेत पुढचं, अपडेटेड व्हर्शन) आहे. दोघांची तुलना करणं अन्याय्य असलं, तरी ती काही बाबतींत होत राहणार! दोघांचा काळ भिन्न आहे, खेळाचं स्वरूप पुष्कळ बदललंय. पण ‘भारतीय संघाचे तारणहार’ ही त्यांची समान भूमिका सध्या तरी दिसतेय. सचिननं एकट्याच्या खांद्यावर कित्येक वर्षं हे ओझं वागवलं. मुंबईत पाच वर्षांपूर्वी भारतानं वर्ल्ड कप जिंकला, तेव्हा विराटनं सचिनला खांद्यावर घेतलं होतं आणि सचिन एवढी वर्षं अपेक्षांचं ओझं वागवत आलाय; आता त्याला आम्हाला खांद्यावर घेऊ द्या, असं सांगितलं होतं. परवा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही अर्धशतक झाल्यानंतर विराटनं सचिनला वाकून अभिवादन केलं होतं. सचिनविषयी बोलताना विराट भावूक होतो, हे अनेकदा दिसलंय. त्यामुळं या दोघांची तुलना करण्याचा प्रश्नच नाही. विराटच्या मनात सचिनविषयी काय भावना आहेत, हे समजल्यानंतर कुणी या फंदात पडूही नये. पण तरीही इथं विराटला ‘सचिन २.०’ असं म्हटलंय ते वेगळ्या संदर्भात...
सचिन आणि विराट हे दोन वेगळ्या पिढ्यांची प्रतिनिधी आहेत. सचिन हा साधारणतः माझ्या पिढीचा, तर विराट हा नंतरच्या! विराटचा जन्म पाच नोव्हेंबर १९८८ चा. म्हणजे सचिननं कसोटी पदार्पण केलं, तेव्हा विराट अवघा एक वर्षाचा होता. नंतर सचिनसोबत खेळण्याचं भाग्य त्याला लाभलं आणि सचिनला खांद्यावर घेऊन मिरवण्याचंही! सचिनचा खेळ पाहतच तो लहानाचा मोठा झाला. विशेष दुर्दैवी बाब म्हणजे दोघांनी आपलं पितृछत्र फार लवकर गमावलं. सचिन अवघा २६ वर्षांचा असताना त्याचे वडील गेले, तर विराट केवळ १८ वर्षांचा असताना त्याचे. सचिनची पिढी वेगळ्या पद्धतीचा संघर्ष करीत मोठी झाली, तर विराटची पिढी ही जागतिकीकरणानंतर बदललेल्या (१९९१ नंतरच्या) भारताची प्रतिनिधी. सचिननं दोन्ही काळ पाहिले आणि त्यातलं चांगलं ते त्यानं घेतलं. सचिनचं यश देशासाठी, इथल्या संघर्षरत तरुणांसाठी फार महत्त्वाचं होतं, तर देशानं जागतिकीकरणाच्या जोरावर जगात महत्त्वाचं स्थान मिळविल्यावर विराटची पिढी मैदानात आली. विराटनं २००८ मध्ये भारताला युवा वर्ल्ड कप जिंकून दिला, तो याच आत्मविश्वासाच्या जोरावर. ही पिढी इंग्रजीत ज्याला ‘ऑफ डिफरंट मेटल’ म्हणतात, तशी वेगळ्या मुशीत घडलेली आहे. यांच्या जगण्यात अभावाचा अभाव आहे. यांना लहानपणापासून सुदैवानं सगळं मिळत गेलं आहे. पण त्यातूनच त्यांच्या अंगी जग जिंकण्याची दुर्दम्य महत्त्वाकांक्षा अवतरली आहे. सचिनला कोहलीनं खांद्यावर घेतलं असलं, तर प्रत्यक्षात सचिनच्या पिढीनं आपल्या बळकट खांद्यांवर या पोरांना उचलून धरलं म्हणून त्यांना हे अफाट यश मिळवता येतं आहे. एका अर्थानं त्या पिढीची उरलेली स्वप्नं ती या मुलांच्या माध्यमातून साकारू पाहते आहे. त्या आधीच्या पिढीनं पेरलेले विजिगिषु डीएनए या पिढीत उतरले आहेतच. शिवाय आजच्या काळाचे अनेक चांगले गुणही जोडीला आहेत. उदा. विराट जिममध्ये किती कष्ट करतो, खाण्या-पिण्याचं पथ्य कसं सांभाळतो हे आशिष नेहरानं एका मुलाखतीत सांगितलंय. अफाट कष्टाशिवाय कुठलंही यश मिळत नाही. विराट आज ते करतोय म्हणूनच तो ‘टॉप’वर आहे. त्याच्या नावाखाली रस्त्यात धिंगाणा घालणाऱ्या तरुणाईनं त्यातले दहा टक्के कष्ट घेतले, तरी भारत फार पुढं जाईल.
-----
भाग १५ - ३० मार्च
-----------------------
काउंटडाउन सुरू...
-------------------------

भारतात सुरू असलेल्या टी-२० क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम चरण आजपासून (बुधवार) सुरू होईल. आज पहिल्या उपांत्य सामना न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात रंगणार आहे. ही स्पर्धा सुरू झाली, तेव्हा या दोन संघांत उपांत्य लढत होईल, असं भाकीत फारसं कुणी केलं नव्हतं. पण न्यूझीलंडचा संघ टी-२० प्रकारात भारीच आहे. भारताविरुद्धचं त्यांचं ५-० हे रेकॉर्ड पुरेसं बोलकं आहे. वन-डे वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंड आणि इंग्लंड या दोन्ही संघांना अद्याप कप मिळविता आलेला नाही. मात्र, टी-२० मध्ये इंग्लंडनं सर्वांना आश्चर्याचा धक्का देत वेस्ट इंडिजमध्ये झालेला कप पटकावला होता. तेव्हा त्यांनी पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाला नमविले होते. न्यूझीलंडला मात्र अनेकदा चांगली कामगिरी करूनही दोन्ही प्रकारांत अद्याप एकदाही कप मिळविता आलेला नाही. इंग्लंडचा संघही अडखळत सुरुवात करून आता चांगला भरात आला आहे. इंग्लंडचा हा संघ त्यांच्या नेहमीच्या संघापेक्षा वेगळा आहे. यात टी-२० साठीचे स्पेशालिस्ट असे खेळाडू दिसतात. जो रूट तर चांगलाच फॉर्मात आहे. बटलरही शेवटच्या षटकांत हाणामारी करू शकतो. कर्णधार इयन मॉर्गनला मात्र अद्याप नेतृत्वगुणांची चमक फारशी दाखवता आलेली नाही. याउलट न्यूझीलंडनं ब्रेंडन मॅकलमकडं नेतृत्व आल्यापासून टी-२० मध्ये कमालीचं प्रावीण्य मिळवलं आहे. आता ब्रेंडन निवृत्त झाला असला, तरी केन विल्यमसनसारखा उमदा खेळाडू या संघाची धुरा आहे. त्यामुळं दिल्लीत होणारी आजची ही लढत उत्कंठावर्धक होईल, यात शंका नाही.
स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, पाकिस्तान हे देश किंवा यापैकी किमान दोन-तीन देश तरी उपांत्य फेरीत दिसतील, असं वाटत होतं. प्रत्यक्षात हे सर्व डेंजरस संघ उपांत्य फेरीच्या आधीच बाद झाले आहेत. वेस्ट इंडिजचा संघही बेभरवशी आहे. भारताचा मुकाबला गुरुवारी त्यांच्याशीच आहे. पण घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा आपल्याला मिळेल, असं वाटतं. तूर्त फायनलमध्ये जाणारा पहिला संघ कोण असेल, हे आज संध्याकाळी निश्चित होईल. काउंटडाउन सुरू...!  
-----

भाग १६ - ३१ मार्च
-----------------------
आक्रमकता की नजाकत?
------------------------------

आजची भारत विरुद्ध वेस्ट इंडिज ही मुंबईत होणारी उपांत्य फेरीची लढत म्हणजे आक्रमकता आणि नजाकत यांच्यातली लढत आहे. दोन्ही गोष्टी आपल्याला आवडतात. दोन्ही काही वेळा छान वाटतात. सध्या तरी वेस्ट इंडिजचा संघ म्हणजे ख्रिस गेल आणि आपला संघ म्हणजे विराट कोहली हेच दोघे डोळ्यांसमोर येतात. आपल्या संघाला अंतिम फेरीत गेलेलं आपल्याला पाहायचं असल्यानं इथं आपण उघड उघड पक्षपाती आहोत. तरीही दोघांचीही तुलना होणारच आहे. दोघेही टी-२० प्रकारातले हिरो आहेत. उत्तम खेळणारे आहेत. दोघांवरही आपापल्या संघांची मदार मोठ्या प्रमाणावर आहे.
तुलना करणं खरं तर गैर; पण सहज पाहू गेल्यास काय दिसतं? गेल म्हणजे मूर्तिमंत आक्रमकता; तर विराट म्हणजे नजाकत. गेल म्हणजे आषाढातला धुव्वांधार बरसणारा पाऊस; तर विराट म्हणजे श्रावणातली हळुवार संततधार! गेल म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक, तर विराट म्हणजे कॅम्पफायरची हवीहवीशी ऊब; गेल म्हणजे घणाघाती घाव, तर विराट म्हणजे कारागिराच्या हातची नाजूक कलाकुसर; गेल म्हणजे राउडी एसयूव्ही, तर विराट म्हणजे आलिशान सेदान! गेल म्हणजे कातळातलं शिल्प, तर विराट म्हणजे मौल्यवान धातू ओतून घडवलेलं! गेल म्हणजे द्रुतलयीतल्या जोरदार ताना, तर विराट म्हणजे मंद्रातला बडा ख्याल! गेल म्हणजे खवळलेला दर्या, तर विराट म्हणजे उत्तुंग उंचीवरून एकसारखा कोसळणारा जबरदस्त धबधबा! गेल म्हणजे मनगटातली ताकद, तर विराट म्हणजे मनगटातलं नजाकतदार सौंदर्य!
दोघांच्या खेळीवर आज सगळ्यांचं लक्ष असणार आहे. गेल हा गेल आहे आणि विराट हा विराट! दोघेही आपापल्या जागी मोठे आहेत. दोघेही प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करतात. पण आज तरी आपल्याला विराट चालावा आणि गेल लवकर जावा, असंच वाटतंय. गेल महाशय, एवढी आजची मॅच जाऊ द्या. नंतर आम्ही तुमचं भरपूर कौतुक करूच. आणि विराटभाऊ, मागच्या सामन्यातून आपण पुढं खेळायला सुरू करतो आहोत, असं समजून तुम्ही मैदानात या! चांगलं खेळतच आहात, ते आजही खेळाच. फायनलसाठी आम्हाला पुन्हा नव्यानं साकडं घालायचं आहे. तूर्त हा वेस्ट इंडिज नावाचा बोळा आपल्या मार्गातून बाजूला काढावा, ही विनंती. सध्या तुमचे सगळे ग्रह फार जोरदार आहेत, असं ऐकून आहे. बघा, तेवढं मग आजच्या मॅचचं!
(ता. क. अर्थात हे दोघंही अजिबात चालणार नाहीत आणि अन्य कुठले तरी दुसरे खेळाडूच आज चमकतील, ही शक्यता आहेच. तर त्यांनाही आधीच नमन करावं, हे बरं! कुणीही चाला, मॅच जिंका म्हणजे झालं!)  
-----
भाग १७ - १ एप्रिल २०१६ - नगर आवृत्ती
--------------------------------------------------
किवींची धाव ‘सेमी’पर्यंतच!
--------------------------------

क्रिकेटमध्ये ‘चोकर्स’ हा शब्दप्रयोग दक्षिण आफ्रिका संघाबाबत वारंवार करण्यात येत असला, तरी न्यूझीलंडच्या संघानंही आपण काही कमी नसल्याचं सिद्ध केलं. कालचा उपांत्य फेरीतील सामना इंग्लंडकडून हरून त्यांनी घरची वाट धरली. वन-डे वर्ल्ड कप आणि टी-२० वर्ल्ड कप या दोन्हींतही हेच चित्र दिसतं. सुरुवातीला कुणाकडूनच खिजगणतीत नसणे, मग साखळी सामन्यांत अप्रतिम कामगिरी करणे आणि नंतर उपांत्य सामन्यात पराभव पत्करून घरी जाणे असा त्यांचा साधारणतः जीवनक्रम दिसतो. आधी वन-डे वर्ल्ड कपचा इतिहास पाहिला, तर इंग्लंडमध्ये १९७५ आणि १९७९ मध्ये झालेल्या पहिल्या दोन्ही वर्ल्ड कप स्पर्धांत हा संघ उपांत्य फेरीपर्यंत पोचला होता. त्यानंतर १९८३ आणि १९८७ मध्ये झालेल्या स्पर्धांमध्ये त्यांना साखळीत बाद व्हावे लागले होते. मात्र, १९९२ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडनं फारच चांगली कामगिरी बजावली होती. एक तर त्या स्पर्धेत त्यांचे सर्व सामने मायदेशात झाले होते. मार्टिन क्रोच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या न्यूझीलंडनं तेव्हा मार्क ग्रेटबॅचला सलामीला पाठवून पहिल्या १५ षटकांत क्षेत्ररक्षण मर्यादेचा लाभ घेऊन जास्तीत जास्त धावा कुटण्याची यशस्वी खेळी केली होती. याशिवाय दीपक पटेलचा ऑफस्पिन मारा पहिल्या षटकापासून सुरू करण्याची कल्पनाही नुकत्याच दिवंगत झालेल्या मार्टिन क्रो याचीच! न्यूझीलंडच्या या स्वप्नवत मार्गक्रमणाला खीळ घातली ती पाकिस्ताननं. तो सामना मला अजूनही आठवतो. इंझमामनं जोरदार खेळी करून तो सामना न्यूझीलंडच्या हातून खेचून घेतला होता. त्यानंतर १९९६ च्या स्पर्धेत उपांत्यपूर्व, तर १९९९ च्या स्पर्धेत न्यूझीलंडनं पुन्हा उपांत्य फेरी गाठली होती आणि तिथंच त्यांचा प्रवास संपला होता. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या २००३ च्या स्पर्धेत ‘सुपर सिक्स’च्या टप्प्यावरच त्यांचं आव्हान संपलं, तर २००७ मध्ये त्यांनी पुन्हा उपांत्य फेरी गाठली. अर्थात आव्हान तिथंच संपलं. भारतात २०११ मध्ये झालेल्या स्पर्धेतही पुन्हा किवींनी उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली आणि तिथं नेहमीप्रमाणं हरले. अखेर गेल्या वर्षी, म्हणजे २०१५ मध्ये त्यांच्याच देशात झालेल्या वर्ल्ड कपमध्ये त्यांनी अंतिम फेरी गाठली; पण मेलबर्नमध्ये झालेल्या फायनलमध्ये ते ऑस्ट्रेलियाकडून फार वाईट रीतीनं हरले. अशा रीतीनं एक अपवाद वगळता, ‘किवींची धाव सेमीपर्यंतच’ हे त्यांनी सातत्यानं सिद्ध केलं आहे.
टी-२० वर्ल्ड कपमध्येही त्यांना उपांत्य फेरीच्या पुढं मजल मारता आलेली नाही. पहिल्या म्हणजे २००७ मध्ये झालेल्या टी-२० वर्ल्ड कपमध्येही त्यांनी उपांत्य फेरी गाठली होती. नंतर झालेल्या २००९, २०१०, २०१२ व २०१४ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धांत तर त्यांना तेवढीही मजल मारता आली नव्हती. सुपर एट किंवा सुपर टेन या फेरीपर्यंतच ते पोचले होते. अखेर सध्या सुरू असलेल्या म्हणजे २०१६च्या वर्ल्ड कपमध्ये त्यांनी पुन्हा उपांत्य फेरी गाठली; पण परत इंग्लंडकडून हरले आणि घरी गेले.
आता सांगा, कोण जास्त मोठे ‘चोकर्स’? दक्षिण आफ्रिका की न्यूझीलंड?  
----- 
भाग १७ (अ) - १ एप्रिल २०१६ - शहर (पुणे) आवृत्ती 
----------------------------------------------------------------
बेटर लक, नेक्स्ट टाइम 
----------------------------


अखेर उपांत्य फेरीत आपण हरलो. वेस्ट इंडिजनं आपल्याला हरवलं. ठीक आहे. तरी मी आपल्या संघाची कामगिरी एकूण चांगलीच झाली, असं म्हणीन. आपल्याला या स्पर्धेतून नवा विराट मिळाला आहे, जो अगदी ‘मि. डिपेंडेबल’ असा म्हणता येईल. बुमराहसारखा चांगला गोलंदाज मिळाला. तो अद्याप शिकतो आहे, पण लवकरच तो आपला आघाडीचा गोलंदाज होऊ शकेल. त्यामुळं आपल्या खेळाडूंना नावं ठेवण्याचा, त्यांची उणीदुणी काढण्याचा मी प्रयत्न करणार नाही. कुणी करूही नये. आपला संघ अंतिम फेरीत जावा, तिथं जिंकावा असं वाटणं ही अगदी स्वाभाविक गोष्ट आहे. आपल्या संघानं विजेतेपद पटकावलं तर कुणाला आनंद होणार नाही? पण शेवटी हा खेळ आहे. इथं प्रत्येक वेळी आपणच जिंकणार असं होणं शक्य नाही. त्यात टी-२० हा प्रकार तर असा आहे, की त्या दिवशी जो कुणी चांगला खेळेल, त्याचा विजय होतो. धोनीनं हे अनेकदा बोलूनही दाखवलं आहे. इथं तुमचा पूर्वेतिहास, पूर्वपुण्याई, खेळाडूचं महानपण, त्याचं ग्लॅमर काही काही उपयोगी पडत नाही. कालच या स्तंभात विराट आणि गेल यांची तुलना करून झाल्यावर शेवटी मी असा ताजा कलम लिहिलाच होता, की हे दोन्ही खेळाडू कदाचित चालणार नाहीत आणि दुसरेच कुणी खेळाडू भरीव कामगिरी करून जातील. त्यातलं अर्धं तरी प्रत्यक्षात घडलं. कोहली खेळला, पण गेलचा दिवस नव्हता; तो लेंडल सिमन्सचा होता. भारताची टी-२० स्पर्धेतील कामगिरी आणि एकूणच या क्रीडा प्रकारातील कामगिरी संमिश्र आहे. धोनीसारखा कल्पक कर्णधार आहे, म्हणून आपण अनेक सामने खेचून आणले आहेत. बांगलादेशविरुद्धचा याच स्पर्धेतील सामना हे त्याचं उत्तम उदाहरण. त्यामुळं विंडीजविरुद्ध धोनी काही तरी डावपेच करून त्यांना रोखण्यात यशस्वी होईल, असं वाटलं होतं. पण तसं घडायचं नव्हतं. या स्पर्धेतील आपल्या एकूण कामगिरीचा आढावा घेतला, तर आपल्या संघानं संमिश्र कामगिरी केली, असं म्हणता येईल. गेल्या वेळच्या वर्ल्ड कपमध्ये आपण फायनलपर्यंत धडक मारली होती आणि तिथं श्रीलंकेकडून हरलो होतो. भारतात होणाऱ्या स्पर्धेत आपल्या संघाला खरं तर चांगली संधी होती. पण आपण नागपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्धची पहिलीच मॅच हरलो. नंतर पाकिस्तानला आणि त्यानंतर बांगलादेशला तर अक्षरशः एका धावेनं हरवून आपण कसेबसे स्पर्धेत टिकून राहिलो. आपण खरे जोरदार खेळलो, ते ऑस्ट्रेलियाविरुद्ध! त्यामुळंच आपल्या अपेक्षा जास्त वाढल्या हे नक्की. पण अखेर आजच्या सामन्याचा निकाल या स्पर्धेतील दोन्ही संघांच्या फॉर्मनुसारच लागला. वेस्ट इंडिजचा संघ आपल्यापेक्षा अधिक चांगलं क्रिकेट खेळला. गेलची विकेट गेल्यानंतरही त्यांनी संयम न सोडता, फलंदाजी केली आणि त्याचं फळ त्यांना मिळालं. भारतानं ऐन वेळी केलेल्या काही चुका आपल्याला भोवल्या. पण खेळात हे चालणारच. ओव्हरऑल, छान करमणूक केल्याबद्दल टीम इंडियाचे आभार मानू या आणि पुढच्या वर्ल्ड कपसाठी त्यांना शुभेच्छा देऊ या.

----

भाग १८ - २ एप्रिल
--------------------

अभिरुचीहीन, सवंग
------------------------

भारत हरल्यानंतर किंवा जिंकल्यानंतर किंवा फॉर दॅट मॅटर, काहीही घडल्यानंतर आपण प्रतिक्रिया द्यायला फार उत्सुक असतो. आता तर जवळपास प्रत्येकाजवळ स्मार्टफोन आहे. इंटरनेट आहे. त्यावर फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप किंवा हाइकसारखी माध्यमे उपलब्ध आहेत. पण त्यावर येणाऱ्या कित्येक कमेंट्स अत्यंत अभिरुचीहीन आणि सवंग असतात. वाईट गोष्ट म्हणजे आला मेसेज की पुढे ढकल, हा एकच उद्योग बहुतेकांकडून होत असल्यानं आपण नक्की काय पुढं पाठवतो आहोत, हेही अनेकांना कळत नाही. पण यामुळं त्या कथित विनोदांचं कदापि समर्थन होऊ शकत नाही. क्रिकेटला एके काळी ‘जंटलमन्स गेम’ म्हटलं जायचं. प्रेक्षकही तसेच असायचे. आता दोन्हींत फरक पडला आहे. अर्थात हेही समर्थन असू शकत नाही. याचं कारण म्हणजे त्या विनोदातून आपण कुठली संस्कृती जोपासत आहोत, हे फार महत्त्वाचं आहे. यातून आपण नकळत काही गोष्टी गृहीत धरतो आहोत की काय, असं वाटू लागलं आहे. या विनोदातून आपण आपली लायकी, प्रत दाखवून देत असतो. महिलांविषयी चुकूनही अनादर व्यक्त होईल, असं काही लिहू-बोलू नये हे आपल्याला लहानपणी शिकवलं जातं. (म्हणजे नक्की शिकवलं जातं ना?) पण याची शंका यावी इतपत आपण महिलांविषयी अत्यंत चीप अशा कमेंट सहज करीत असतो. अनुष्का शर्मा हे एक उदाहरण झालं. एरवी अगदी भल्या, सज्जन म्हणवणाऱ्या माणसांना तिच्यावर काही तरी अश्लाघ्य कमेंट केल्यावाचून राहवलं नाही. हे काय आहे? कशासाठी? खरे सभ्य लोक असे असतात का?
कुणाच्याही शारीरिक व्यंगावर विनोद करू नये, असं आपल्याला शिकवलं जातं. विनोदाचा तो सर्वांत नीच प्रकार आहे. किंबहुना तो विनोदच नाही. अशा कथित विनोदाविषयी आपल्याला घृणा यायला हवी. ते व्यंग काय त्या लोकांनी मागून घेतलं आहे का? आणि आपण तरी मरेपर्यंत असे धडाचे राहणार आहोत, हा माज कुठून आला? तुमच्या घरात अशी एखादी व्यक्ती असेल तर काय करायचे? किंवा अगदी असे व्यंग असलेल्या लोकांनाही ते विनोद वाचून काय वाटत असेल, याचा आपण कधीच का विचार करीत नाही?
वर्णभेद हाही असाच चिंतेचा विषय. लोक कुणाच्याही वर्णावरून, वंशावरून एवढ्या सवंग कमेंट कशा काय पास करू शकतात, खरोखर समजण्यापलीकडचं आहे. काल वेस्ट इंडिजनं आपल्याला हरवलं, तर ‘काळ आला नव्हता, पण काळे आले होते’ असं तुम्ही लिहिता? तरी ही त्यातली बरीच सभ्य अशी कमेंट इथं दिली आहे. तीही वाईटच आहे. कृष्णवर्णीय मुलांचे उघडेनागडे फोटो टाकणं आणि वेस्ट इंडियन मुलं सेलिब्रेट करीत आहेत, अशी धक्कादायक कमेंट करणं ही आपल्यातली माणुसकी पूर्ण संपल्याची खूण आहे, हे या लोकांना समजत नाही का?
यावर कुणी म्हणेल, की एवढं काय त्यात! थोडा वेळ गंमत चालते... पण नाही! गंमत मलाही कळते. या सोशल मीडियावर सगळेच विनोद वाईट असतात, असं नाही. काही अत्यंत कल्पक, बुद्धिमान विनोद असतात. आपल्या संघासाठी प्रॅक्टिसला पुढं दरी असलेला कडा निवडला आहे, असं एक चित्र आज फिरत होतं. ते उत्कृष्ट व्यंगचित्राचा नमुना आहे. अशी किती तरी चांगल्या विनोदाची उदाहरणं आहेत.
पण महिला, शारीरिक व्यंग आणि वर्णभेद या गोष्टी विनोदाचा, टवाळीचा विषय करणं टाळलंच पाहिजे. त्याला पर्याय नाही. याचं कारण म्हणजे मुळात तो विनोद नाही. खरं तर ती आपल्या डोक्यातली विकृती दाखविणारी फारच हिडीस गोष्ट आहे. प्लीज... प्लीज टाळा!

-----

भाग १९ - ३ एप्रिल
------------------

आज इतिहास तर घडणारच... 
 ------------------------------------
आजच्या इंग्लंड वि. वेस्ट इंडिज या फायनलचा काहीही निकाल लागला, तरी एक गोष्ट नक्की. जिंकणाऱ्या संघानं दुसऱ्यांदा टी-२० चा वर्ल्ड कप उंचावलेला असेल आणि अशी कामगिरी करणारा तो पहिलाच संघ ठरेल. वन-डे वर्ल्ड कप स्पर्धेवर ऑस्ट्रेलियाचं - ज्याला इंग्रजीत रिडिक्युलस म्हणतात - तसं वर्चस्व आहे. आत्तापर्यंत झालेल्या ११ वर्ल्ड कप स्पर्धांपैकी तब्बल पाच स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलियानं वर्ल्ड कप पटकावला आहे. त्याखालोखाल वेस्ट इंडिज व भारतानं प्रत्येकी दोनदा, तर पाकिस्तान व श्रीलंकेनं एकेकदा तो जिंकला आहे. याउलट टी-२० स्पर्धेचं तसं नाही. पहिल्यांदा २००७ मध्ये ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत आयसीसीनं भरवली, तेव्हा मुळात भारत या क्रीडा प्रकाराला फारसा अनुकूल नव्हता. पण आश्चर्य म्हणजे महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली पहिला टी-२० वर्ल्ड कप भारतानंच जिंकला; तोही पाकिस्तानला हरवून! मग त्यानंतर मात्र भारतानं आणि थोडक्यात बीसीसीआयनं हा क्रीडा प्रकार आपलासा केला. एवढंच नव्हे, तर २००८ च्या एप्रिल-मेपासून आयपीएल ही टी-२० ची प्रीमियर लीग भरवायला सुरुवात केली. त्यानंतरचा इतिहास आपण जाणतोच. मुद्दा असा, की टी-२० वर्ल्ड कप आतापर्यंत वेगवेगळ्या संघांनी जिंकला आहे. पहिल्यांदा भारतानं जिंकला, मग दुसऱ्या वर्षी म्हणजे २००८ मध्ये इंग्लंडमध्ये झालेला टी-२० वर्ल्ड कप पाकिस्ताननं जिंकला. नंतर २०१० मध्ये वेस्ट इंडिजमध्ये झालेली ही स्पर्धा अनपेक्षितरीत्या इंग्लंडनं जिंकली आणि टी-२० ला नवे वर्ल्ड चॅम्पियन मिळाले. विशेष म्हणजे इंग्लंडनं जिंकलेली ही पहिलीच वर्ल्ड कप ट्रॉफी होती. नंतर २०१२ मध्ये श्रीलंकेनं टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन केलं. त्यात वेस्ट इंडिजनं बाजी मारली. गेल्या वेळच्या म्हणजे २०१४ च्या टी-२० वर्ल्ड कपच्या आयोजनाचा मान बांगलादेशला मिळाला. तेव्हा भारताला फायनलमध्ये हरवून श्रीलंकेनं विजेतेपद पटकावलं होतं. आता पहिल्यांदाच भारतात होत असलेल्या या स्पर्धेत वेस्ट इंडिज आणि इंग्लंड हे दोन्ही माजी विजेते आमने-सामने आले आहेत. त्यामुळे नवा इतिहास आज रचला जाणार हे निश्चित आहे. फक्त तो कोणाच्या बाजूनं हे ठरायचं आहे. वेस्ट इंडिज आणि इंग्लंड या दोन्ही संघांच्या इडन गार्डनवर अंतिम सामना खेळण्याच्या आठवणी कटू आहेत. इंग्लंडनं १९८७ च्या वन-डे वर्ल्ड कपमध्ये अंतिम फेरीत धडक मारली होती. पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलिया त्यांच्यासमोर होता. बोर्डरच्या गोलंदाजीवर माइक गॅटिंगनं रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केला आणि तो झेलबाद झाला. तिथून इंग्लंडच्या डावाला गळती लागली आणि ऑस्ट्रेलियानं सात धावांनी हा सामना जिंकून पहिल्यांदाच वर्ल्ड कप मिळविला. वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात १९९३ मध्ये हिरो कप वन-डे स्पर्धेची फायनल झाली होती. तेव्हा अनिल कुंबळेनं सहा बळी मिळवून भारताचा विजय निश्चित केला होता. थोडक्यात या दोन्ही संघांपैकी जो कुणी आज जिंकेल, तो इडन गार्डनमध्ये फायनलमध्ये पहिल्यांदाच विजेतेपद मिळविणारा आणि टी-२० चं दुसऱ्यांदा विजेतेपद मिळविणारा संघ ठरेल. वास्तविक भारत फायनलला आला असता, तरी हेच म्हणता आलं असतं. पण ते होणे नव्हते. आता त्यासाठी २०२० ची वाट पाहावी लागणार आहे; कारण पुढील टी-२० वर्ल्ड कप आता चार वर्षांनी, इंग्लंडमध्ये, भरणार आहे.
----

भाग २० - ४ एप्रिल 
-------------------
‘टी-२०’ ने काय दिले?
--------------------------


भारतात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या टी-२० क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचं सूप अखेर रविवारी वाजलं. एकूण पाहता, ही स्पर्धा यशस्वी झाली असंच म्हणता येईल. बीसीसीआयसारखे दिग्गज आयोजक असताना आयसीसीला तशी काही काळजी नसतेच. उलट आयपीएलसारखी टी-२० ची जगातली सर्वाधिक यशस्वी लीग चालविणाऱ्या बीसीसीआयला टी-२० वर्ल्ड कप आयोजनाची संधी तशी उशिराच मिळाली, असं म्हटलं पाहिजे. श्रीलंका आणि अगदी बांगलादेशनेही स्वतंत्रपणे भारताच्याही आधी या स्पर्धेचं आयोजन केलं. भारतातही या स्पर्धेच्या सुरुवातीआधी काही कमी अडथळे आले नाहीत. पाकिस्ताननं नेहमीप्रमाणं दौऱ्यावर येताना राजकारण केलं. बीसीसीआयच्या अंतर्गत स्पर्धेचेही फटके बसले. बीसीसीआयचे प्रभावशाली सचिव अनुराग ठाकूर यांनी भारत-पाकिस्तान ही स्पर्धेतील अत्यंत महत्त्वाची लढत आपल्या राज्यात - म्हणजे धरमशाला इथं - नेली होती. मात्र, तेथील मुख्यमंत्र्‍यांनी राजकीय विरोधातून या सामन्याला बंदोबस्त देण्यास असमर्थता दर्शविली. पाकिस्तानातही याचे पडसाद उमटले आणि अखेर ही लढत कोलकात्याला हलवावी लागली. भारतासाठी सुरुवात निराशाजनक ठरली. न्यूझीलंडविरुद्ध नागपूरच्या पहिल्याच सामन्यात शरणागती पत्करावी लागली. भारताच्या लढती जिथं जिथं होत्या, तिथं फिरकीला अनुकूल खेळपट्ट्या बनविण्याचा निर्णय अंगलट येण्याची भीती निर्माण झालीच होती. बांगलादेशविरुद्ध नशिबाने वाचलो आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराट कोहलीने एकहाती विजय मिळवून दिल्यानं आपला संघ उपांत्य फेरीत गेला. मात्र, वानखेडे स्टेडियमवर गोलंदाजीच्या मर्यादा उघड्या पडल्या आणि वेस्ट इंडिजनं आपल्याला सहज हरवलं. वेस्ट इंडिज आणि इंग्लंडसाठी ही स्पर्धा संस्मरणीय ठरली. (वेस्ट इंडिजच्या महिलांनी तर पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकला.) न्यूझीलंडसाठीही ही स्पर्धा चांगली ठरली. पाकिस्तानात दर मोठ्या स्पर्धेनंतर काही ना काही पडझड होत असते. या वेळी त्यांचा कर्णधार शाहिद आफ्रिदी याला पद सोडावे लागले, तर प्रशिक्षक वकार युनूस पदावर ठाम आहेत. आफ्रिदीनंही निवृत्ती घेतलेली नाही. त्याला अद्याप खेळायचं आहे. महेंद्रसिंह धोनीनंही त्याला निवृत्तीबाबतचा प्रश्न विचारणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या पत्रकाराला शेजारी बसवून त्याची फिरकी घेतली आणि निवृत्त होणार नसल्याचं त्याच्या खास शैलीत सांगितलं. तरी भारताला आपल्या फलंदाजीविषयी नक्कीच नव्यानं विचार करावा लागणार आहे. भारताच्या संघाचे संचालक रवी शास्त्री यांचा करार संपला आहे. त्यामुळं भारतीय संघाला आता नवा प्रशिक्षक (कदाचित राहुल द्रविड?) मिळण्याची शक्यता आहे. कुठलीही मोठी स्पर्धा संपल्यावर काही ना काही उलथापालथ घडत असते. जुने जाते, नवे येते. सर्वच संघांच्या बाबतीत हे घडत आहे. या स्पर्धेनं काय दिलं, असा विचार केल्यास, तंत्रशुद्ध फटकेबाजी करूनही दीडशे-दोनशेचा स्ट्राइक रेट राखता येतो, हे या स्पर्धेनं दाखवून दिलं. फलंदाजीतील सौंदर्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी ही खूपच दिलासादायक गोष्ट आहे.
------

भाग २१ - ५ एप्रिल
-----------------------
यू आर चाम्प, मान!
-----------------------

वेस्ट इंडिजच्या संघानं रविवारी रात्री इडन गार्डन्सवर इंग्लंडवर जो विजय मिळविला, तसा फक्त वेस्ट इंडिजचा संघच मिळवू शकतो. शेवटच्या षटकात म्हणजेच सहा चेंडूंत १९ धावा हव्या होत्या. अशा वेळी गोलंदाजी करणाऱ्या संघाला आपल्यालाही विजयाची संधी आहे, असं वाटलं तर त्यात काही गैर नाही. पण समोर वेस्ट इंडिजचा संघ असेल, तर यापुढे शेवटच्या षटकात जिंकायला ३७ धावा हव्या असतील, तरच विरोधी संघ स्वतःला संधी आहे, असं समजेल. कारण जिंकायला सहा चेंडूंत ३६ धावा हव्या असतील, तर त्या वेस्ट इंडिजचा कुठलाही खेळाडू काढू शकेल, यावर आता सर्वांचाच विश्वास बसणार आहे. कार्लोस ब्रेथवेट म्हणजे काही ख्रिस गेल किंवा पोलार्ड नव्हे. फलंदाजी करू शकणारा तो मूळचा गोलंदाजच. पण त्यानं कमाल केली. बेन स्टोक्सच्या पहिल्या चारही चेंडूंवर चार दिशांना षटकार खेचले आणि टी-२० क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद वेस्ट इंडिजला दुसऱ्यांदा मिळवून दिलं. वेस्ट इंडिजच्या संघातला अकराव्या क्रमांकाचा खेळाडूही वाट्टेल त्या चेंडूवर वाट्टेल तिथं षटकार भिरकावू शकेल, असं आता वाटू लागलं आहे. बेन स्टोक्सविषयी सहानुभूती वाटते. पण त्याच्या जागी कुठलाही गोलंदाज असता तरी ब्रेथवेटनं त्याची हीच गत केली असती, यात दुमत नसावं.
वेस्ट इंडिजच्या महिला संघानंही दुपारीच विजेतेपद पटकावलं होतं. रात्री पुरुषांच्या संघानं हीच कामगिरी केली आणि वेस्ट इंडिजची हॅट-ट्रिक पुरी झाली. कारण याच वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्या १९ वर्षांखालील तरुणांनीही त्या गटातलं विजेतेपद मिळवलं आहे. वेस्ट इंडिजच्या क्रिकेटला सध्या सोन्याचे दिवस आले आहेत, हे नक्की! एरवी सदैव वाद-विवादात सापडलेल्या या संघाला या विजयामुळं नवसंजीवनी मिळेल. वेस्ट इंडिजच्या संघानं एके काळी क्रिकेटविश्वावर राज्य केलं होतं. ते दिवस आठवणाऱ्यांना आता वेस्ट इंडिजचं हे वैभव पुनःप्रत्ययाचा आनंद देत असेल, यात शंका नाही. वेस्ट इंडियन खेळाडूंची लोकप्रियता वादातीत आहे. त्यांचा खेळ बहुतांश वेळा नैसर्गिक प्रेरणेतून जन्मलेला असतो. त्यामुळंच त्यात एक उत्स्फूर्तता असते. इंग्लिश किंवा ऑसी खेळाडूंसारखे ते यंत्रवत भासत नाहीत. अर्थात हीच गोष्ट अनेकदा त्रुटीही ठरते. जिथं शिस्तीत काही गोष्टी करणं अपेक्षित असतं, तिथं हा संघ मार खायचा किंवा अजूनही खातो. क्रिकेट बोर्डाबरोबरच्या वादानं मधल्या काळात या संघाची फारच वाताहत झाली. आता मात्र ते पुन्हा सावरत आहेत, असं दिसतं. वेस्ट इंडिजचं क्रिकेट टिकलं पाहिजे, वाढलं पाहिजे, जगलं पाहिजे. याचं कारण ते क्रिकेट उपखंडातील क्रिकेटपेक्षा आणि इंग्लिश-ऑसी क्रिकेटपेक्षा वेगळं आहे. कॅलिप्सो संगीताची लय या खेळाडूंच्या अंगात आहे. सामन्यानंतर हे लोक उन्मादात ‘चॅम्पियन्स, चॅम्पियन्स, वी आर चॅम्पियन्स’ म्हणत जे लयदार नृत्य करतात, ते फारच भारी असतं. या नृत्याला जगभरातून फॅन्स लाभले आहेत. वेस्ट इंडिजनं हा टी-२० वर्ल्ड कप जिंकला हे चांगलं झालं. ते चॅम्पियन्ससारखे खेळले, म्हणून जिंकले. त्यांच्याच उच्चारात त्यांना सांगावंसं वाटतं - यू आर चाम्प, मान! 

(आजच्या भागाबरोबरच हे सदरही आपला निरोप घेत आहे.) 

----