प्रेमाच्या जगाकडं नेणारा महामार्ग
---------------------------------------------------------------
माणसाचं आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे. आपलं रोजचं जगणं म्हणजे या प्रवासाचा रस्ता.
कुणाच्या नशिबात सुंदर, गुळगुळीत महामार्ग येतो, तर कुणाच्या नशिबी नुसते खाचखळगे. प्रत्येकाचं नशीब सारखं नसतं, त्यामुळं प्रत्येकाच्या आयुष्याचा रस्ताही सारखा नसतो. माणसाच्या आयुष्यातले
सुखाचे क्षण म्हणजे या रस्त्यावरची हिरवाई. त्याचं दुःख म्हणजे या रस्त्यावरचे कठीण
चढणीचे अवघड घाट. इतर प्राणी आणि माणूस यांच्यातलं एक वैशिष्ट्य म्हणजे तहान,
भूक, झोप, मैथुन,
उत्सर्जन या मूलभूत गरजा भागल्या, की माणसाचा माणूसपणाकडचा
प्रवास सुरू होतो. माणूस विचार करू शकतो, हसू शकतो, रडू शकतो, भावना व्यक्त करू शकतो. माणसाच्या माणूसपणाकडच्या
प्रवासात या सर्व अभिव्यक्तींचे मुक्काम कधी ना कधी तरी येतात. यातही माणसाला अनिवार
ओढ असते ती प्रेमाची, मायेची. कुठलीही अपेक्षा न ठेवता केल्या
जाणाऱ्या निर्व्याज, मनःपूत प्रेमाची. ही साधी अपेक्षाही अनेकदा
पूर्ण होत नाही आणि या प्रेमाऐवजी वाट्याला येते ती फसवणूक... शिवाय शोषण आणि दमन.
वरकरणी नशिबानं सर्व काही बहाल केलंय, पण तरीही हाती काहीच गवसत
नाही आणि दुसरीकडं फाटक्या दिसणाऱ्या नशिबाच्या खाली अनिवार प्रेमाचा खळाळता झरा. अशी
दोन नशिबं चुकून एखाद्या चौकात भेटली आणि त्यांनी बरोबर प्रवास करायचा, असं ठरवलं तर...?
...तर इम्तियाज अली दिग्दर्शित 'हायवे' हा सिनेमा तयार होतो.
हो, हायवे या आपल्या नव्या हिंदी सिनेमात अलीनं हेच तर सांगितलंय.
अपहरणाची गोष्ट आणि रोड मूव्हीचा मसाला घालून त्यानं हा दोन आयुष्यांचा प्रवास नितांतसुंदर
मांडलाय. माणूस ज्याचा निरंतर शोध घेतो आहे अशा काही मूलभूत मूल्यांचा वेध दिग्दर्शक
घेऊ पाहतोय. मांडणीतला सहजपणा आणि आशयातला प्रामाणिकपणा यामुळं हायवेची ही सफर रमणीय
ठरते. हे नुसतं मनोरंजन नाही, तर मनाचं तेल-पाणी आहे. गोष्टीतल्या पात्रांसोबत आपणही
आपल्या जगण्यातल्या 'हे सारं कशासाठी?' या सनातन प्रश्नाचा शोध घेऊ लागतो, आपलं
जगणं पुन्हा तपासायला घेतो हे या कलाकृतीचं यश.
दोन दिवसांवर लग्न असलेली दिल्लीतील उच्चभ्रू घरातली तरुणी
वीरा त्रिपाठी (अलिया भट) होणाऱ्या नवऱ्यासोबत घराबाहेर पडते आणि पहाटे तीनच्या सुमारास
दिल्लीच्या बाहेर असलेल्या पेट्रोलपंपावर काही गुंड तिचं अपहरण करतात. गोळीबारातून
वाचण्यासाठी तिला ओलीस ठेवणं हा त्यांचा उद्देश असतो. महावीर भाटी (रणदीप हुडा) हा
नामचीन गुंड त्या टोळीत असतो. वीरा एका बड्या बापाची मुलगी आहे आणि तिला पळवणं आपल्याला
महागात पडेल, असा सल्ला भाटीचे इतर गुंड साथीदार त्याला देतात. मात्र, तो कुणालाही
न जुमानता वीराला घेऊन टेम्पोमधून सुसाट निघतो. दिल्ली, हरियाणा, राजस्थान, पंजाब, हिमाचल
प्रदेश या राज्यांतून तो फिरत राहतो. दोघांच्या या प्रवासात अशा काही गोष्टी घडतात, की वीराला
हे अपहरण दुःखद न वाटता, आपली चौकटीतल्या जगण्यातून झालेली सुटकाच वाटते. महावीरच्याही
आयुष्यात पूर्वी काही घटना घडून गेलेल्या असतात. दोघांच्याही नशिबानं त्यांच्या जगण्यातलं
साधंसं सुख ओरबाडून घेतलेलं असतं. अनोळखी रस्त्यांवरून फिरत असताना दोघांनाही एकमेकांविषयी
सहानुभूती वाटणं आणि मूलतः आपण नशिबाची एकाच प्रकारची शिकार आहोत, हे जाणवणं
हा या सिनेमाचा हायपॉइंट आहे. किंबहुना तोच सिनेमा आहे.
वीराचं लहानपणी झालेलं लैंगिक शोषण आणि महावीरनं पाहिलेलं
त्याच्या पित्याकडून आईचं झालेलं वेगळ्या प्रकारचं शोषण या समान धाग्यानं वीरा आणि
महावीर जोडले जातात. हा धागा दिग्दर्शकानं कमालीच्या संयमानं आणि अलवारपणानं जोडला
आहे. महावीरची आई म्हणत असलेली लोरी वीरानं म्हणणं आणि त्याच्या आईसारखाच ड्रेस तिच्या
अंगात असणं, त्यानंतर टेम्पोत झोपलेल्या महावीरला वीरानं आईच्या मायेनं थोपटणं
हे सगळं एवढ्या सहजपणानं दिग्दर्शकानं सूचित केलं आहे, की त्याला
द्यावी तेवढी दाद कमीच. वास्तविक भाटीसारखा गुंड आणि त्याची टोळी वीरासारख्या सुंदर
तरुणीला पळवते, तेव्हा सर्वप्रथम ती टोळी तिचं काय करील, याचा
कोणीही सहज अंदाज करू शकेल. या सिनेमातही सुरुवातीला तसंच वाटतं. मात्र, तसं काही
न घडता, नंतर थेट महावीरच्या आईचा संदर्भ येणं आणि त्याअनुषंगानं त्याची
तिच्याकडं पाहण्याची दृष्टी बदलणं इथपर्यंतचा प्रवास खरं तर खूपच न पटण्यासारखा वाटू
शकतो. मात्र, या सिनेमात आपल्याला तसं वाटत नाही, हे दिग्दर्शकाचं
यश आहे. दोघांच्या बालपणाचा संदर्भ देऊन दिग्दर्शकानं त्यांच्या जगण्यातल्या हरवलेल्या
वाटा सूचित केल्या आहेत. या वाटा दोघांनाही हायवेच्या प्रवासात मिळतात. माणसाची सगळी
धडपड ही शेवटी सुखाच्या, मायेच्या, आपुलकीच्या त्या चार-दोन क्षणांसाठी
चाललेली असते, हे दिग्दर्शक फार सहजपणे सांगून जातो.
या सिनेमाला गती नाही, असं अनेक
जणांनी लिहिलंय. मला स्वतःला तसं काही जाणवलं नाही. कारण दुसऱ्या भागातला दोन्ही प्रमुख
पात्रांचा स्वतःकडं सुरू झालेला प्रवास आहे. तो उलगडत जाताना पाहणं हा एक आनंददायक
अनुभव आहे. हिमालयाच्या कुशीत गेलं, की माणसाला स्वतःचा शोध लागतो, असा आपल्याकडं
फार जुना, पारंपरिक समज आहे. हिमालयाची अनुभूती घेतलेल्यांना तो पटलाही
आहे. दिग्दर्शकानं आपल्या पात्रांनाही शेवटी याच देवभूमीत आणलं आहे. वीराचं हळूहळू
ओपन-अप होणं आणि महावीरचंही अगदी हळूहळू, पण निश्चितपणे मोकळं होणं इथं दिसतं.
त्या दृष्टीनं वीराचा इंग्लिश गाण्यावरच्या डान्सचा सिक्वेन्स पाहण्यासारखा आहे. महावीर
आणि वीरा शेवटी बसच्या टपावर बसून प्रवास करतात, हेही
खूपच सूचक. शेवटी दोघांना ते एक मातीचं घर मिळणं, तिथं
वीरानं लुटुपुटीचा संसार सुरू करणं, शेवटी महावीरच्या अंगावर जाऊन झोपणं... हे सगळं खूप हृदयस्पर्शी
झालंय. त्यामुळं आपली प्रमुख पात्रं एक स्त्री आणि एक पुरुष आहेत आणि त्यांच्यात लैंगिकतेच्या
अनुषंगानं काही घडतं आहे, असं कुठंही जाणवत नाही. आपल्या पात्रांना त्या मूलभूत
भावनेच्या पार नेऊन, त्यांचा प्रेमासारख्या अंतिम सत्याचा शोध सुरू झाल्याचं
दाखवणं यातून दिग्दर्शक हायवेला वेगळ्या उंचीवर नेतो.
अलिया भट आणि रणदीप हुडा या दोघांच्याही अभिनयानं हाय-वे
जमला आहे. अलियानं लैंगिक शोषणानं दबलेली, अपहरण
झाल्यावर घाबरलेली, पण हळूहळू खुललेली वीरा झकास साकारली आहे. या भूमिकेसाठी
आवश्यक असलेला अल्लडपणा तिच्याकडं पुरेपूर आहे. काही वेळेला तिचे उच्चार मात्र खटकतात.
क्वचित ती तोतरं बोलतेय की काय, असंही वाटतं. पण ते तसं नसेल तर बरं. रणदीप हुडानं महावीरची
भूमिका अगदी जिवंत केलीय. भूमिकेत शिरणं म्हणतात, तसं तो
या पात्रात घुसला आहे. बाकी नामवंत कलाकार कुणीही नसले, तरी या
दोघांनीही ही प्रेमाची गोष्ट मस्त तोलून धरलीय.
ए. आर. रेहमानचं त्या त्या राज्याच्या लोकसंगीताच्या बाजानं
जाणारं अप्रतिम संगीत, रसूल पोकुट्टीसारख्या मास्टरचं अफलातून साउंड डिझायनिंग
आणि प्रत्येक रस्त्याचा नूर टिपत जाणारी अनिल मेहतांची अव्वल दर्जाची सिनेमॅटोग्राफी
यामुळं सिनेमाचा परिणाम कित्येक पटींनी वाढला आहे.
तेव्हा ही सफर चुकवू नका. कम ऑन बोर्ड द टेम्पो...
---
निर्मिती - यूटीव्ही मोशन पिक्चर्स
दिग्दर्शक - इम्प्तियाज अली
संगीत - ए. आर. रेहमान
ध्वनी आरेखन - रसूल पोकुट्टी
सिनेमॅटोग्राफी - अनिल मेहता
प्रमुख कलाकार - अलिया भट, रणदीप
हुडा
दर्जा - ****
---