31 Mar 2021

ग्राहकहित दिवाळी अंक २०२० लेख

 ‘श्वासा’ला ग्रहण...

----------------------


यंदाचं हे २०२० हे वर्ष उजाडलं, तेव्हा पुढचं संपूर्ण वर्ष ‘न भूतो न भविष्यति’ अशा एका साथरोगाच्या मुकाबल्यात आपल्याला घालवावं लागणार आहे आणि त्यामुळं संपूर्ण जगात उलथापालथ होणार आहे, असं आपल्याला कुणी सांगितलं असतं, तर विश्वास बसला नसता. पण आता आपण प्रत्यक्षात ही ‘न भूतो...’ अशी अवस्था जगतो आहोत. ‘करोनाव्हायरस डिसीझ १९’ किंवा ‘कोव्हिड १९’ नावाच्या या आजारानं आपलं सगळं जगणंच बदलवून टाकलं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांवर त्याचा वेगवेगळा परिणाम झालाय. प्रामुख्यानं चित्रपट, मालिका व नाटक या क्षेत्रांवर त्याचा काय परिणाम झाला व पुढे काय वाढून ठेवलंय, याचा थोडक्यात आढावा या लेखाच्या माध्यमातून घेण्याचा हा प्रयत्न आहे.

करोनाच्या साथरोगाचा चित्रपट, नाटक आणि मालिका या सगळ्यांना सर्वाधिक फटका बसला. या तिन्ही गोष्टी वास्तविक आपल्याला अत्यंत प्रिय! अगदी आपल्या श्वासाइतक्या महत्त्वाच्या! मात्र, करोनामुळं त्याच्यावरच घाव बसला. गर्दीची ठिकाणं टाळायची असल्यामुळं चित्रपटगृहं बंद करावी लागली. नाट्यगृहांचीही तीच अवस्था झाली. मालिकांचं चित्रीकरण बंद पडलं. या तिन्ही क्षेत्रांत काम करणाऱ्या अनेक मंडळींवर बेरोजगार व्हायची वेळ आली. मुंबईसारख्या मायानगरीचं चलनवलन पूर्ण ठप्प झालं. मुंबईत रोज काम करून पैसे मिळविणारी लाखो मंडळी आहेत. हे सगळे, एका फटक्यात काम गेल्यानं, अक्षरश: हतबल झाले. शूटिंगचं काम थंडावलं. चित्रनगरी एकदम शांत झाली. एवढी अवाढव्य, अव्याहत सुरू असलेली मोहनगरी एकदम निपचित झाली. करोनापूर्व काळात मुंबई अशी एकदम बंद होईल, असं कुणी सांगितलं असतं, तर त्यावर कुणीही विश्वास ठेवला नसता. मात्र, करोना या साध्या डोळ्यांनी न दिसणाऱ्या छोट्याशा विषाणूनं हा ‘पराक्रम’ करून दाखवला. अर्थात सर्व जगावरच संकट आल्यामुळं कलाकारांनीही धीरानंच घेतलं. काम गेलं असलं, तरी इतर क्षेत्रांतील मंडळींचीही तीच अवस्था होती. त्यामुळं केवळ आपल्याच क्षेत्रावर हे संकट आलंय अशी भावना कुणाच्या मनात आली नाही. लॉकडाउनचा पहिला टप्पा सगळ्या देशानंच अत्यंत काटेकोरपणे पार पाडला. मात्र, हे प्रकरण काही तीन-चार आठवड्यांत संपणारं नाही, हे लवकरच सगळ्यांच्या लक्षात आलं. मात्र, हातावर हात ठेवून तरी किती काळ बसणार? अनेकांनी मग रोजगारासाठी दुसरा मार्ग स्वीकारला. कुणी रिक्षा चालविली, कुणी भाजी विकली, तर कुणी कॅब चालविली! 

मखमली पडदा रुसला...

नाटकासारख्या जिवंत कलेचे या करोनाकाळात सर्वाधिक हाल झाले. समोर प्रेक्षकांच्या जिवंत प्रतिसादावर चालणारी ही रसरशीत कला! मराठी माणसाचं नाट्यवेड नव्यानं सांगायला नकोच. मात्र, एका ठिकाणी गर्दी करायची नाही, या करोनाच्या मूलभूत नियमाचा फार मोठा दणका नाट्य क्षेत्राला बसला आणि नाटकं बंदच झाली. नाट्यप्रयोग बंद पडले आणि पुण्या-मुंबईसह राज्यभरातील मोठमोठी नाट्यगृहं अचानक सुनसान झाली. नाटक हाच श्वास असलेल्या अनेक कलावंतांना गुदमरल्यासारखं झालं. एकीकडे करोना आणि दुसरीकडं ही नाटकबंदी! दोन्हीकडून ‘श्वास’ कोंडू लागला. राज्यात बॅकस्टेजला काम करणारे हजारो कामगार आहेत. त्यांच्यावर त्यांची कुटुंबं अवलंबून आहेत. या कामगारांचे करोनाकाळात मोठे हाल झाले. मात्र, नाट्य परिषद आणि तत्सम संस्थांनी संस्थात्मक, तसेच वैयक्तिक पातळीवर मोठी मदत गोळा केली आणि कृतज्ञतेचा भाव म्हणून या कामगारांना ते पैसे दिले. मात्र, ती मदत तरी किती दिवस पुरणार? नाटक पुन्हा सुरू होणं हेच या कामगारांसाठी आवश्यक ठरलंय. या कामगारांप्रमाणेच छोट्या छोट्या भूमिका करणाऱ्या अनेक कलावंतांचीही अडचण झाली आहे. अनेकांसाठी पैसे तर महत्त्वाचे असतातच; पण रंगभूमीवर सतत वावर असणं हीदेखील काही जणांसाठी नशा असते. मात्र, प्रयोग बंद झाल्यानं अशा कलावंतांची विलक्षण मानसिक कोंडी झालीय.

या काळात काही कलावंतांनी वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. वैभव मांगले हा लोकप्रिय अभिनेता! तो उत्तम गातो, हे आपल्याला माहिती आहेच. पण लॉकडाउनच्या काळात त्याला स्वत:मधील चित्रकाराचा शोध लागला. आपल्या कोकणातील गावी जाऊन वैभवनं झपाटल्यासारखी चित्रं काढली. ती सगळी चित्रं कुठल्याही उत्तम दर्जाच्या चित्रकाराएवढीच उत्कृष्ट होती. तो केवळ चित्रं काढून थांबला नाही, तर त्यानं यातल्या काही चित्रांची विक्री करून ते पैसे बॅकस्टेज कलाकारांच्या मदतीसाठी दिले. वैभवचा हा गुण या काळामुळंच लखलखीतपणे समोर आला. दुसरा एक लोकप्रिय कलाकार हृषीकेश जोशी याने दिग्दर्शित केलेला ‘नेटक’ हा असाच एक प्रयोग होता. यात एक ऑनलाइन नाटक सादर करण्यात आलं. पाच वेगळ्या ठिकाणी असलेल्या पाच अभिनेत्रींनी हे नाटक सादर केलं. या प्रयोगाला अंगभूत मर्यादा होत्या व तंत्रज्ञानावर बऱ्याच गोष्टी अवलंबून होत्या. मात्र, तरीही नाटकवेड्या रसिकांनी या प्रयोगाचंही उत्स्फूर्त स्वागत केलं. मराठी माणसाचं नाटकवेड यातून लखलखीतपणे समोर आलं. प्रायोगिक नाटकवाल्यांचेही प्रयोग या काळात बंद पडले. पुण्यात सुदर्शन, ज्योत्स्ना भोळे नाट्यगृह या ठिकाणी चालणारे समीप रंगमंचावरचे प्रयोग बंद पडल्यानं नाट्यरसिक हळहळले. हे प्रयोग पुन्हा कधी सुरू होणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. नाटक ही काही जीवनाश्यक बाब नाही, अशी सरकारची बहुतेक समजूत असल्याने करोनाकाळात या कलेकडे, तिच्या पुनरुज्जीवनाकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नसावा. मात्र, माणसाला जगण्यासाठी कलाही तितकीच महत्त्वाची असते; अन्यथा माणसाचं जगणं आणि अन्य जनावरांचं जगणं यात फरक तो काय राहिला? आपल्याकडे नाटकाचं स्थान आपल्या सांस्कृतिक भावविश्वात फार मोठं आहे. मराठी माणूस नाटक केवळ बघत नाही, तर तो ते ‘जगतो’. नाटकातली पात्रं त्याच्या जगण्यातली अविभाज्य भाग होऊन जातात. मग ती गडकऱ्यांची सिंधू असो की पुलंची ‘फुलराणी’; कानेटकरांचा ‘लाल्या’ असो, की तात्यासाहेबांचे ‘अप्पासाहेब बेलवलकर... नटसम्राट’! या सगळ्या व्यक्तिरेखांनी मराठी मनांवर राज्य केलंय. प्रायोगिक नाटकांतून पुढं व्यावसायिक नाटकांत आलेल्या आणि नंतर चित्रपटसृष्टीत गेलेल्या कलावंतांना फार मान मिळतो. याचं कारण तो किंवा ती ‘थिएटर’ करून आलेले आहेत हेच असतं! गेल्या सहा महिन्यांत मराठी माणसाची नाटकं बघायला न मिळाल्यानं जी सांस्कृतिक उपासमार झालीय ती केवळ दुर्दैवी आहे. नाटकाची ती तिसरी घंटा लवकरच वाजो आणि मराठी प्रेक्षकांना त्यांची आवडीची नाटकं नाट्यगृहांत पुन्हा पाहायला मिळोत, एवढंच आपण म्हणू शकतो.

मालिकांचं जग गोठलं...

टीव्हीवर येणाऱ्या दैनंदिन मालिका हाही आपल्या बऱ्याच प्रेक्षकांच्या रोजच्या जगण्याचा अगदी अविभाज्य भाग झाला आहे. करोनाकाळात आलेल्या लॉकडाउननं या मालिकांवरही संक्रांत आणली. शूटिंगच बंद झाल्यामुळं काही दिवसांतच या मालिकांचं प्रक्षेपणही थांबलं. महत्त्वाच्या वाहिन्यांना आपले जुनेच कार्यक्रम पुन्हा दाखवण्याची वेळ आली. मालिकेचा एक भाग साधारणत: चार-पाच दिवस आधी चित्रित करतात. त्यामुळे अचानक लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर अनेकांकडं पुढील दीर्घकाळ पुरतील एवढे मालिकेचे भाग तयार नव्हतेच. मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलावंतांना प्रतिदिन कामाचे पैसे मिळतात. शूटिंग थांबल्यामुळे सगळ्यांचं हे उत्पन्नही थांबलं. लॉकडाउनचा पूर्ण काळ, म्हणजे जवळपास तीन महिन्यांहून अधिक काळ मालिकांचं चित्रीकरण बंद होतं. त्यामुळं प्रेक्षकांना हा संपूर्ण काळ जुन्या मालिका किंवा चालू मालिकांचे जुनेच भाग पाहावे लागले आणि दुसरीकडं मालिकेशी संबंधित बहुतेकांचं रोजचं उत्पन्न बुडालं. रोजच्या कामावर पोट अवलंबून असणाऱ्या अनेक कामगारांचे यामुळं अतिशय हाल झाले. अनेकांचं काम गेलं. जूनमध्ये लॉकडाउन हळूहळू शिथिल झाल्यानंतर मालिकांच्या चित्रीकरणाला परवानगी मिळाली. मात्र, अनेक नियम, अटी, शर्ती व बंधने घालून! एका दृश्यात अधिक व्यक्ती दिसू नयेत याची काळजी घ्यावी लागली. चित्रीकरणाच्या ठिकाणीही मर्यादितच स्टाफला परवानगी देण्यात आली. एखाद्या सेटवर पूर्वी दोन मेकअपमन असतील, तर तिथं आता एकाच मेकअपमनला परवानगी मिळू लागली. स्वाभाविकच एकाचं काम गेलं. असं अनेक बाबतींत झालं. विशेषत: तंत्रज्ञांना मिळणारी कामं घटत गेली.

मधल्या काळात जुन्या लोकप्रिय कार्यक्रमांचा, मालिकांचा रतीब या वाहिन्यांवरून सुरू झाला. नाट्य क्षेत्रात जसे ‘नेटक’सारखे प्रयोग झाले, तसे मालिकांमध्येही काही प्रयोग झाले. ‘सोनी मराठी’वर ‘आठशे खिडक्या नऊशे दारं’सारखी संपूर्णपणे घरी चित्रित केलेली मालिका ‘लॉकडाउन स्पेशल’ म्हणून सादर झाली. इतरही काही छोटे-मोठे प्रयोग झाले; पण ते ‘प्रयोग’ या पातळीवरच मर्यादित राहिले. अर्थात, लॉकडाउनच्या काळात बिघडलेल्या मानसिक स्वास्थ्यावर या प्रयोगांची फुंकरही सुखावह ठरली, ही बाब अलाहिदा! 

करोनापूर्व काळात बहुतेक मालिकांचं चित्रिकरण मुंबईतच - गोरेगावच्या चित्रनगरीत - होत असे. करोनानंतरच्या काळात मात्र मुंबईतील निर्बंध पाहून काही निर्मात्यांनी मुंबईबाहेर शूटिंग युनिट हलवलं आणि बाहेर चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. काही जण गुजरातमध्ये गेले, तर काहींनी कोल्हापूर, सातारा परिसरात तळ ठोकला. अशाच एका मालिकेचं सातारा परिसरात चित्रीकरण सुरू असताना तेथे काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता यांना करोनाचा संसर्ग झाला आणि त्यातच काही दिवसांत त्यांचा मृत्यू झाला. ही बातमी सर्वांसाठीच फार धक्कादायक होती. विशेषत: मालिकांचे चित्रीकरण पुन्हा पूर्वीसारखे सुरू होणार, अशा अपेक्षेत असलेल्या इंडस्ट्रीला या बातमीने मोठाच धक्का बसला. यानंतर निर्बंध काही प्रमाणात पुन्हा कडक झाले. आता पुन्हा ही स्थिती पूर्वपदावर येण्यास किती काळ लागेल, हे सांगणं कठीण होऊन बसलं आहे. सुमारे तीन महिन्यांचं उत्पन्न बुडाल्यानं मालिकांचं बजेटही घटविण्यात आलं आहे. बड्या वाहिन्या किंवा निर्माता संस्था पाठीशी असलेल्या मालिकांची फार हानी झालेली नाही; मात्र असा आधार ज्यांच्यापाशी नाही अशा मालिकांचं बजेट कोलमडलं आहे आणि तेथे काम करणाऱ्या सर्वांनाच मोठा आर्थिक फटका बसला आहे, यात वाद नाही. मालिकांचं बजेट घसरल्यानं या इंडस्ट्रीशी संबंधित सर्वच घटकांना आता आर्थिकदृष्ट्या त्याचा फटका बसणार आहे. विशेषत: दिग्दर्शक, लेखक आदी असंघटित मंडळींना याची मोठी झळ बसते आहे. त्या तुलनेत तंत्रज्ञ आदी मंडळी संघटित असल्यानं त्यांच्या हितांचं थोडं फार संरक्षण होण्यात मदत झालेली दिसते. अर्थात एकूणच आर्थिक झळ मात्र या व्यवसायातील सर्वच घटकांना बसली, ही वस्तुस्थिती उरतेच. 

मालिकांमध्ये अनेक लहान-मोठे कलाकार काम करत असतात. मोठा व्याप असतो. विशेषत: मराठीपेक्षाही हिंदी मालिकांचा पसारा व बजेट मोठं असतं. यापैकी बहुतांश मालिकांचं काम मुंबईतच चालत असल्यानं स्थानिक तंत्रज्ञ व कलाकारांना तिथं काम मिळतंच. करोनामुळं या सर्व घटकांवर प्रतिकूल परिणाम झाला. अनेकांचं काम गेलं. याखेरीज मालिकांमध्ये आज केलेल्या कामाचे पैसे तीन महिन्यांनी देण्याची पद्धत आहे. यातही काही ठिकाणी चोख व्यावसायिकता दिसते, तर काही ठिकाणी ढिला कारभार पाहायला मिळतो. त्यामुळं आपले हक्काचे पैसे मिळविण्यासाठी अनेकांना उगाचच रक्त आटवावं लागतं, असा अनुभव आहे. करोनाकाळात तीन महिने पूर्णपणे थांबलेलं काम आणि तीन महिने उशिरा मिळणारे पैसे यांचा एकत्रित परिणाम मोठा आहे. त्यामुळं मालिकांचं चित्रीकरण जून व जुलैत पुन्हा पूर्वीसारखं सुरू झालं, तेव्हा या इंडस्ट्रीतील अनेकांना अगदी हायसं वाटलं. मात्र, बजेट आणि प्रायोजक कमी झाल्यानं पैशांची आवक पूर्वीसारखी राहिलेली नाही, असंही चित्र आहे. ते सुधारायला अर्थातच काही काळ जावा लागेल. त्यानंतर मात्र या मालिका परत पूर्वीसारख्या जोरदार सुरू होतील; याचं कारण या मालिकांचा प्रेक्षकवर्ग मोठा आहे. मालिकांचं अर्थकारण मोठं आहे. त्यामुळं ही इंडस्ट्री पुन्हा जोमानं सुरू होईल, अशी सर्वांनाच अपेक्षा आहे. प्रायोगिक रंगभूमी किंवा व्यावसायिक रंगभूमीवरून ज्यांना चित्रपटाच्या मोठ्या पडद्यावर जायचं आहे, अशा बहुतेक लहान-मोठ्या कलाकारांना मधली पायरी म्हणून मालिकांमध्ये काम करण्याचा फायदा होतो. याशिवाय पैसे चांगले मिळत असल्यानं उपजीविकेचा मोठा प्रश्न मिटतो. शिवाय मालिका हिंदीतील आणि चांगला टीआरपी मिळविणारी असेल तर देशभरात, कदाचित जगभरात तुमचा चेहरा प्रेक्षकांच्या ओळखीचा होतो. (अर्थात फक्त चेहराच; कारण अनेक मालिकांमध्ये कलाकाराचं नावच दिलं जात नाही. तो एक वेगळाच मुद्दा आहे. असो.) त्यामुळे मालिकांमध्ये काम करण्यासाठी कलाकारांमध्ये, तर मालिकेचे तांत्रिक काम मिळविण्यासाठी तंत्रज्ञांमध्ये मोठी चुरस असते. या इंडस्ट्रीवरही हजारो लोक अवलंबून आहेत. लॉकडाउनचा फटका मोठा असला, तरी ‘शो मस्ट गो ऑन’ या न्यायाने मालिका पुन्हा एकदा बहरू लागतील, यात शंका नसावी.

रूपेरी पडदा मूक झाला...

करोनाचा सर्वाधिक फटका नाटके व मालिकांसोबतच बसला तो चित्रपटांना! लॉकडाउन सुरू झाल्यानंतर सार्वजनिक वर्दळीची जी ठिकाणे सर्वांत प्रथम बंद झाली त्यात चित्रपटगृहांचा समावेश होता. करोनाचा संसर्गजन्य आजार भीतीदायक वेगाने पसरत असताना मॉल व मल्टिप्लेक्स सुरू राहणार नव्हतेच. त्यामुळे लॉकडाउनच्या काळात चित्रपटगृहे बंद राहणार, हे सर्वांनीच मनोमन मान्य केलं होतं. वास्तविक मार्चच्या शेवटच्या आठवड्यात दहावीच्या परीक्षा संपल्या. यानंतर येणारा काळ म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी. फिल्म इंडस्ट्रीसाठी वर्षातला सर्वांत मोठा सीझन! नेमका हा सीझन सुरू होतानाच करोनानं घाला घातला आणि चित्रपटगृहांना टाळं लागलं. आता सहा महिन्यांहून अधिक काळ ही फिल्म इंडस्ट्री ठप्प झाली आहे. हिंदी चित्रपटसृष्टी ही जगातील काही बड्या फिल्म इंडस्ट्रींपैकी एक आहे. भारतात दर वर्षी सरासरी दीड ते दोन हजार चित्रपट तयार होतात. त्यांचे वार्षिक उत्पन्न (बॉक्स ऑफिस) साधारण साडेतीन हजार कोटी रुपये एवढं असतं. या इंडस्ट्रीचा एकूण आकार साधारणत: २० हजार कोटी रुपयांचा आहे. त्यातील बहुतांश महसूल आणि उत्पन्न मुंबई शहरातून मिळतं. भारतात साधारणपणे साडेसहा हजार सिंगल स्क्रीन थिएटर आहेत, तर तब्बल २१०० मल्टिप्लेक्स आहेत. या मल्टिप्लेक्समध्ये सरासरी तीन स्क्रीन धरले, तर जवळपास साडेसहा हजार स्क्रीन केवळ मल्टिप्लेक्समध्ये आहेत. देशभरात चित्रपटांचा जो व्यवसाय होतो, त्यातले जवळपास ४५ टक्के उत्पन्न हिंदी चित्रपटांमधून मिळते, तर तेलगू व तमिळ चित्रपट तब्बल ३५ टक्के एवढा वाटा उचलतात. बाकी सर्व भाषांतील चित्रपट मिळून उर्वरित २० टक्के व्यवसाय मिळवतात. या वर्षी मार्च महिन्याच्या मध्यात ही चित्रपटगृहं बंद पडली आणि हे सर्व आर्थिक चक्र ठप्प झालं.

मुंबईत चित्रपटसृष्टीशी निगडित अनेक लहान-मोठे व्यवसाय आहेत. या व्यवसायांची संख्या शंभरहून अधिक आहे. उदा. विग तयार करणारे आणि पुरवणारे लोक किंवा सेटसाठी कपडे शिवणारे व पुरवणारे शिंपी. चित्रपटांसाठी सेट आदी तयार करणारे सुतार किंवा प्लंबर, इलेक्ट्रिशन आणि यासारखे साधारण शंभरहून अधिक व्यवसाय हिंदी चित्रपटसृष्टीशी निगडित आहेत. मुंबईत तर हजारो जण यात काम करतात आणि रोजी-रोटी कमावतात. यातले अनेक जण वर्षानुवर्षं केवळ चित्रपटांसाठीच काम करतात. त्यांना मागणीच एवढी असते, की अन्य कोणासाठी व्यवसाय करण्याची वेळच त्यांच्यावर येत नाही. अशा हजारो लोकांचं उत्पन्न मार्चमध्ये क्षणार्धात थांबलं. एकपडदा चित्रपटगृहांची अवस्था आधीच बिकट होती. करोनानं आता जणू काही त्यांच्या अस्तित्वावरच घाला घातला. आता हे चक्र पुन्हा कधी सुरू होईल; झाले तरी सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये लोक येणार का, असे अनेक मुद्दे आहेत. विशेषत: महानगरांमध्ये मल्टिप्लेक्समध्येच चित्रपट पाहायची सवय लागलेला प्रेक्षक सिंगल स्क्रीन थिएटरकडे पुन्हा येईल की नाही, अशी भीती आहे. याखेरीज मधल्या काळात अनेक प्रेक्षकांना मोबाइलमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमे बघायची सवय लागली आहे. घरबसल्या हवे ते सिनेमे बघण्याची सोय सहज उपलब्ध असताना, ट्रॅफिक जॅममधून मल्टिप्लेक्सला जाणं, तेथील पार्किंगचा प्रश्न, पार्किंगला मोजावे लागणारं अवाजवी शुल्क, मल्टिप्लेक्सला असलेले जादा तिकीटदर, तेथील खाण्याच्या वस्तूंचे असलेले अवास्तव दर या सगळ्यांना कंटाळा येऊन सिनेमाप्रेमी प्रेक्षक स्वत:च्या घरी एकटा आपल्या मोबाइलवर, आपल्या वेळेनुसार, आपल्या आवडीनुसार सिनेमे पाहू शकतो. हा फार मोठा धोका चित्रपटसृष्टीसमोर तयार झाला आहे. यावर पर्याय म्हणून ओटीटीवरही नव्या रिलीज झालेल्या चित्रपटाला वेगळं शुल्क घ्यायचं, अशी संकल्पना समोर येत आहे. तसं झालं, तर लोक पुन्हा त्याही पर्यायाचा विचार करतील. भारतीय प्रेक्षकांची मानसिकता कमी खर्चात (किंवा शक्यतो फुकट) काय मिळेल ते बघण्याची आहे. त्यामुळे मोफत किंवा अगदी माफक किमतीत सेवा देऊ शकणारे बलाढ्य प्लेअर्सच या खेळात टिकतील, यात शंका नाही. 

अर्थात काही बडे चित्रपट असे असतील, की ते मोठ्या पडद्यावर पाहण्याशिवाय पर्यायच असणार नाही. तेव्हा प्रेक्षक पुन्हा चित्रपटगृहांवर गर्दी करतीलच. पुढील काळात तिकीटदर मात्र वाढलेले असतील, हे सांगायला नकोच. त्यामुळे थिएटरमध्ये जाणं किंवा न जाणं ही पुन्हा प्रेक्षकांसाठी निवडीची संधी देणारी बाब असेल. सिंगल स्क्रीनमधला दंगा, पिटातलं ते वातावरण हे मात्र आता कदाचित ग्रामीण किंवा निमशहरी भागांतच बघायला मिळेल.

नाटक, मालिका आणि चित्रपट या तिन्ही गोष्टी वरकरणी जीवनावश्यक नसल्या, तरी आपण फार काळ त्यापासून दूर राहू शकत नाही. तसं झालं तर आपलं सांस्कृतिक संचित आटत जातं, हे आपल्या लक्षात येईल. आपल्याला जगण्यासाठी केवळ निरोगी श्वासच लागतो, असं नाही तर आपलं सांस्कृतिक भरणपोषण करणाऱ्या ललितकलाही लागतात. त्यांच्या आस्वादनाने आपण माणूस म्हणून जगण्याची एक वेगळी पातळी गाठू शकतो. आपल्या साध्याशा आयुष्यात विलक्षण आनंद निर्माण करण्याची ताकद या कलांमध्ये आहे. त्यामुळं त्या लवकरात लवकर पूर्ववत सुरू होवोत आणि आपल्याला पूर्वीप्रमाणेच त्याचा भरभरून आनंद लुटायला मिळो, अशीच प्रत्येक रसिकाची इच्छा आहे.

----

(पूर्वप्रसिद्धी : ग्राहकहित दिवाळी अंक, २०२०)

----


26 Mar 2021

मटा लॉकडाउन वर्षपूर्ती लेख

अज्ञाताच्या वळणावर...

----------------------------



आपल्या देशात लॉकडाउन सुरू झाला, त्याला आज (२५ मार्च) बरोबर एक वर्ष पूर्ण झालं. ‘कोव्हिड-१९’ किंवा करोना नावाच्या विषाणूनं आपल्या जगण्यात प्रवेश करून सगळा खेळच बिघडवून टाकला. या एका वर्षात आपल्या आयुष्यात ‘न भूतो...’ असे बदल घडून आले. ‘...न भविष्यति’ असं मुद्दाम म्हटलं नाही, कारण भविष्याच्या पोटात काय वाढून ठेवलं आहे, हे आपल्याला माहिती नाही. त्या अर्थानं एका अज्ञाताच्या वळणावर आपण सारे उभे आहोत. संपूर्ण मानवजातीच्या अस्तित्वाला मुळापासून हादरे देणाऱ्या ज्या काही गोष्टी हजारो वर्षांपासून घडत आल्या आहेत, त्यातली ही एक असू शकेल का, हेही आपल्याला माहिती नाही. तसं असेल तर मात्र आपण आपल्या मानवजमातीच्या इतिहासातल्या एका महत्त्वाच्या टप्प्याचे साक्षीदार आपोआपच होत आहोत. आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या उलथापालथीकडे या व्यापक परिप्रेक्ष्यातून पाहिलं, तर सगळं जगणं कवेत घेणं कदाचित सुलभ होऊ शकेल. आपल्या जगण्याचा फेरविचार करता येईल. आपल्या गरजांकडे, वाढीकडे, अपेक्षांकडे आणि आकांक्षांकडे नव्याने पाहता येईल.

गेल्या वर्षी करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउनचा, अर्थात टाळेबंदीचा निर्णय घेण्यात आला. त्या निर्णयाच्या योग्यायोग्यतेची चर्चा होत राहील. मात्र, त्या वेळी हे संकट सर्वांसाठीच नवीन असल्याने जे जे उपाय केले गेले, ते ‘हे करून तर पाहू’ अशा दृष्टीनेच केले गेले. व्यापक जनहितासाठी काही गैरसोयी सहन करण्याची तयारी सर्वांनीच ठेवली. मात्र, अशा प्रकारची परिस्थिती जगाने यापूर्वी कधीही अनुभवली नसल्याने, अशा निर्णयांतून येणारी अपरिहार्य होरपळ बऱ्याच मोठ्या जनसमुदायाच्या वाट्याला आली. या सगळ्यांतून ज्यांच्या जगण्यावर काहीच प्रतिकूल परिणाम झाला नाही, असे फारच थोडे. ते भाग्यवान! मात्र, बहुसंख्यांना या ना त्या प्रकारे या भीषण संकटाची झळ बसली. ‘आयुष्यात सगळं काही सुरळीतच चालणार आहे,’ या आपल्या मनात नकळत तयार झालेल्या गृहीतकालाच धक्का बसला. त्याची जागा ‘आज, आत्ता, उद्या काहीही होऊ शकतं’ या भावनेने घेतली. अशी भावना सातत्याने मनात राहणं म्हणजे दीर्घकाळाच्या नैराश्याला आश्रय! गेल्या वर्षभरात जगभरात अनेकांना अशा नैराश्याचा सामना करावा लागला. रोजीरोटीचं साधन हरपल्यामुळं खूप जणांना सैरभैर व्हायला झालं. करोनामुळं आपल्या जवळच्या आप्तांचा थेट मृत्यूच बघावा लागलेल्यांच्या दु:खाची तर गणनाच नाही. सर्वांत जास्त हाल तर हातावर पोट असलेल्या लाखो श्रमिकांचे झाले.

लॉकडाउननंतर भारतातलं फाळणीनंतरचं कदाचित सर्वांत मोठं असं स्थलांतर घडून आलं. मनात इच्छा नसताना करावं लागणारं स्थलांतर वेदनादायक असतं. भारतातल्या मोठ्या महानगरांमधून असे अनेक अभागी जीव आपापल्या गावांकडं निघाले. रस्ते बंद होते, वाहने नव्हती. अशा वेळी अगदी दुचाकी गाड्यांवरून, सायकलवरून आणि ज्यांच्याकडे ही वाहनेही नव्हती ते तर चालत चालत हजारो किलोमीटर दूर असलेल्या आपल्या गावांकडे निघाले. या स्थलांतराची वृत्तवाहिन्यांवरून पाहिलेली दृश्ये काळजाला पीळ पाडणारी होती. ज्या शहरांवर आपण अवलंबून होतो, त्यांनी अचानक आपल्याला दूर लोटल्याने एक प्रकारे अनाथ झाल्याची भावना या श्रमिकांच्या चेहऱ्यावर दाटली होती. सगळेच जण संकटात होते. एरवी मदतीला धावून येणाऱ्या हातांनाही इथे मागे सरावे लागले होते. तरीही अनेक स्वयंसेवी संस्थांनी, माणसांनी आपल्यातली माणुसकी शाबूत असल्याचे दाखवून, या श्रमिकांना होता होईल ती मदत केली. मात्र, ती फारच अपुरी होती. स्थलांतरितांच्या वेदनांना अंत नव्हता. 



शहरांमध्ये जे राहिले आणि ज्यांना रोजीरोटी उपलब्ध होती, त्यांचेही हाल सुरूच होते. लहान हॉटेल चालविणारे, छोट्या खाणावळी किंवा मेस चालविणारे, केशकर्तनालय चालविणारे, पर्यटन व्यावसायिक, शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे अशा अनेकांचे धंदे या लॉकडाउनमुळं बंद पडले. अनेकांना रोजच्या जेवणासाठी दुसऱ्यांकडे मदतीचा हात पसरावा लागला. अनेकांनी नवे उद्योग-व्यवसाय सुरू केले. केस कापणाऱ्या कारागिरांनी रस्त्यावर बसून कलिंगड विकले. कुणी घरोघरी अन्नपदार्थ पोचविण्याचे काम सुरू केले. ज्याला जसे जमेल तसे त्याने हात-पाय हलवले आणि जीव तगविला. प्रत्येक प्राणिमात्रांत ‘सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट’ असतंच. मनुष्यप्राणी सर्वांत हुशार; त्यामुळे त्याच्यात तर ते असतंच. त्यामुळं आपण सगळेच तगून राहिलो. ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी मागच्या वर्षी ‘हे वर्ष फक्त तगून राहण्याचे आहे,’ असे रास्तपणे म्हटले होते, ते त्यामुळेच! अर्थात आपल्या जगण्याच्या गुणवत्तेवर त्याचा मोठा परिणाम झाला. अनेकांच्या धारणा बदलल्या, अनेकांच्या मूल्यव्यवस्थेला तडे गेले, अनेकांना आपले प्राधान्यक्रम तपासून पाहावेसे वाटले, तर अनेक नातेसंबंधांत वितुष्ट आले किंवा दुरावा तरी आला. दुसरीकडे, संकटांमुळे माणूस जोडलाही गेला. सामान्य माणसातले असामान्यत्व कित्येकदा दिसून आले. जिथे आपले दूर गेले, तिथे ओळखपाळख नसलेलेही मदतीला धावून आले. प्लाझ्मादान करण्यापासून ते करोना झालेल्या कुटुंबीयांना अन्नधान्य पोचविण्यापर्यंत अनेक हात मदतीसाठी पुढे आले. जगण्यावरची श्रद्धा दृढ व्हावी, असे क्षण अनेकांच्या वाट्याला आले. विशेषत: डॉक्टर, नर्स, आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी यांना हे क्षण अधिक लाभले. त्यांच्या अविश्रांत कष्टांमुळे कित्येक जीव जगले, वाचले! 

मध्यमवर्गीय घरांमध्ये अनेकांना पूर्वीचे दिवस पुन्हा जगता आले. सर्व कुटुंब संध्याकाळच्या जेवणासाठी एकत्र आले आहे, हे दृश्यही अनेक घरांत दिसून आले. ‘वर्क फ्रॉम होम’ हा नव्या जगण्याचा मंत्र झाला. शाळेतील विद्यार्थ्यांच्या आयुष्यात (मूळ अभ्यासक्रमात नसलेला) ‘ऑनलाइन शिक्षण’ नावाचा नवाच धडा आला. विद्यार्थ्यांसोबतच पालकांची आणि शिक्षकांचीही कसोटी या काळाने बघितली. ती ‘परीक्षा’ अजूनही सुरू आहे आणि कदाचित आता नव्या जगण्याचा तो अविभाज्य भागच असू शकेल. माणसाला माणसाची सोबत किती महत्त्वाची आहे, हे या काळात बहुतेकांना नव्याने उमगलं. लॉकडाउनमुळे आपली अतिवेगवान जीवनशैली एकदम थांबल्याने अनेकांना आरोग्याच्या दृष्टीने फायदा झाला. कामासाठी दूर अंतरापर्यंत प्रवास करून जाण्याचे कष्ट टळले. त्यामुळे अनेकांची तब्येत सुधारली. अनेकांनी घरकामांत मदत करायला सुरुवात केली. आपल्या  धावपळीच्या, ताणाच्या जगण्यात आपण काय गमावत होतो, हेही अनेकांना कळून चुकलं.

आज लॉकडाउनला एक वर्ष पूर्ण होत असताना, दुर्दैवाने आपण पुन्हा गेल्या वर्षी जिथं होतो तिथंच उभे आहोत. साथीने पुन्हा नव्याने तोंड वर काढले आहे. लसी आल्या असल्या तरी सर्वांना लस मिळेपर्यंत बराच काळ जाईल. त्यामुळे ही साथ आणि ही सगळी बंधनं किती काळ पुढं चालणार आहेत, हे कुणीच सांगू शकत नाही. आपण गेल्या वर्षी या साथीला जेवढं गांभीर्यानं घेतलं, तेवढं आता घेत नाही आहोत, हे स्पष्टच दिसतं आहे. याचे परिणाम काय होणार आहेत, हे सांगता येत नाही. अज्ञाताच्या या वळणावर, सगळं काही अनिश्चित, धूसर दिसत असताना एक गोष्ट मात्र शाश्वत आहे - माणसाचं जगण्यावरचं चिवट प्रेम! आपल्याला जगायचं आहे आणि चांगल्या दर्जाचं आयुष्य जगायचं आहे, ही माणसाची मूलभूत प्रेरणाच त्याला या संकटातून तारून नेईल, हे नक्की!

---


(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती; २५ मार्च २०२१)

---

गेल्या वर्षी लिहिलेला लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा...

----