13 Dec 2022

दमण-मुंबई डायरी - उत्तरार्ध

मुंबई मेरी जान...
---------------------


तिसऱ्या दिवशी सकाळी आम्ही दमण सोडलं. तिथल्या एक सोमनाथ मंदिरात आम्हाला जायचं होतं. हे मंदिर वापीच्या बाजूला वाढलेल्या दमण शहरात होतं. वापी आणि दमण हे जोड-शहर आहे, हे त्या भागात गेल्यावर कळलं. मधे फक्त एक कमान आहे. ती ओलांडली, की आपण वापीत - म्हणजेच गुजरातमध्ये - प्रवेश करतो. तिथून अहमदाबाद-मुंबई महामार्गही अगदी जवळ आहे. आम्ही त्या महामार्गावर पोचलो आणि उजवीकडं वळलो. समोर जाणारा रस्ता सिल्व्हासाकडे जाणारा होता. आम्ही तिथंही जाणार होतो. मात्र, तिथलं एक आदिवासी संग्रहालय बंद असल्याचं समजलं आणि एका लायन सफारीबद्दल फार काही चांगले रिव्ह्यू ‘गुगल’वर नव्हते. सिल्व्हासा परिसरात मोठमोठे कारखाने आणि उद्योगधंदे आहेत. महामार्गावरून मुंबईकडं निघाल्यावरही ते दिसलं दोन्ही बाजूंनी... आम्हाला भूक लागली होती. अखेर एक बरं हॉटेल बघून गाडी थांबवली. तिथं भरपूर ट्रक थांबले होते. तो ट्रकवाल्यांचा नेहमीचा अड्डा असणार. आम्ही तिथं जाऊन आलू पराठे ऑर्डर केले. मैद्याच्या पोळीचे, शंकरपाळ्यांसाठी जसे आकार कापतात, तसे कापलेले तुप्पाळ आलू पराठे समोर आल्यावर आम्हाला हसावं की रडावं तेच कळेना. त्यासोबत चक्क फोडणीचं वरण दिलं होतं. मग लक्षात आलं, ट्रकवाल्यांचा हा आवडता आहार असणार. भुकेपोटी खाल्ल्यावर वाटलं, एवढाही काही वाईट नव्हता. चहा मात्र झकास मिळाला. 
तिथून पुढं गाणी ऐकत, गप्पा मारत प्रवास झाला. आता ठाण्याऐवजी आम्हाला सरळ मुंबईत शिरायचं होतं. मी पहिल्यांदाच एवढ्या उत्तरेकडून मुंबईत शिरत होतो. तिथंही तो डोंगराळ भाग लागला. तो ओलांडल्यावर आम्ही एकदम मीरा-भाईंदरमध्ये आलो. उंचच उंच इमारतींनी आपण मुंबईत असल्याचं दाखवून दिलं. तिकडं मेट्रोची कामंही सुरू होती. ट्रॅफिक जॅम लागला हे वेगळं सांगायला नको. रस्त्यात एके ठिकाणी पेट्रोल भरायला थांबलो. पण तिथं कार्ड चालत नव्हतं, म्हणून केवळ पाचशे रुपये रोख देऊन तात्पुरतं पेट्रोल भरलं. नंतर पुढं भरू म्हणत आम्ही थेट मुंबईत आलो. आता पेट्रोल संपलं होतं व तातडीनं भरायचं होतं. मात्र, आम्हाला एकही पेट्रोलपंप दिसेना. अखेर गोरेगावात डाव्या बाजूला पंप मिळाला आणि आम्ही हुश्श केलं. आमचं वेस्ट एंड हॉटेल थेट दक्षिण मुंबईत (बॉम्बे हॉस्पिटलसमोर) होतं. पेट्रोल पंपापासूनही एक तास अंतर दाखवत होतं. मग साईनाथकडं गाडी दिली. हळूहळू अंधेरी, वांद्रे करीत सागरी सेतूमार्गे आम्ही दक्षिण मुंबईत शिरलो. सकाळी निघाल्यापासून बरोबर पाच तासांनी आम्ही आमच्या हॉटेलवर पोचलो होतो.

हॉटेल अगदीच बॉम्बे हॉस्पिटलच्या समोर होतं. हेरिटेज टाइप वाटत होतं. आम्ही रूम ताब्यात घेतल्या आणि जरा आवरून लगेच जेवायला बाहेर पडलो. तसा हेवी ब्रंच झालेला असल्यामुळं फार भूक नव्हतीच. हॉटेल शेजारीच एक लिबर्टी नावाचं उपाहारगृह होतं. तिथं जाऊन पुरी-भाजी, पावभाजी, सँडविच या टाइप प्रत्येकानं काही ना काही खाल्लं. इथून आम्हाला क्रॉफर्ड मार्केटमध्ये जायचं होतं. मी मुंबईत अनेकदा आलो असलो, तरी क्रॉफर्ड मार्केटमध्ये भटकलो नव्हतो. मग आम्ही चौघंही संध्याकाळी साडेचार-पाचपासून तिथं मनमुराद भटकलो. जाताना चालतच गेलो. मेट्रो सिनेमावरून (वासुदेव बळवंत फडके चौक) जाताना ‘२६-११’ची आठवण आली आणि पाठीतून थंड लहर गेली. त्या चौकात वासुदेव बळवंतांचा एक दणकट अर्धपुतळा आहे. हा मी पाहिला नव्हता. चालत निघाल्यानं सगळं बारकाईनं बघता आलं. क्रॉफर्ड मार्केटमध्ये अपेक्षेप्रमाणे तोबा गर्दी होती. मात्र, स्वस्तात मस्त वस्तूंचं आमिषही मोठं होतं. तिथं मनाजोगती खरेदी झाल्यावर आम्हाला चहा घ्यायचा होता. मग तिथं कामत नावाचं एक हॉटेल होतं, तिथं जाऊन झकास चहा घेतला. (हे विठ्ठल कामत नव्हेत, गौतम कामत... हे त्यांचे कुणी आहेत का माहिती नाही...) जाताना एकदम ‘सरदारगृह’ ही पाटी बघितली आणि थबकलो. हे लोकमान्य टिळकांचं मुंबईतलं निवासस्थान. एक ऑगस्ट १९२० रोजी त्यांचं इथंच देहावसान झालं. आत्ता तिथं त्या इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर पुढं आलेल्या छतावर त्यांचा अगदी छोटासा अर्धपुतळा बसवलेला दिसला. तो खालून नीट दिसतही नव्हता. समोरून फोटो काढायला गेलो, तर ‘स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ या ओळी आणि टिळकांची थोडी माहिती तिथं कोरलेली दिसली. तिथं फोटो काढले. त्या रस्त्यालाही ‘लोकमान्य टिळक मार्ग’ असंच नाव आहे. टिळक गेले तेव्हा त्यांची त्या काळातली सर्वांत मोठी अंत्ययात्रा मुंबईत तेव्हा निघाली होती. आचार्य अत्रे यांनी त्यांच्या शैलीत (बहुतेक ‘कऱ्हेचे पाणी’मध्ये) त्या अंत्ययात्रेचं (तेव्हा स्मशानयात्रा असा शब्द रूढ होता) भरपूर भावनिक वर्णन केलेलं आहे. गिरगाव चौपाटीवर तेव्हा टिळकांवर अंत्यसंस्कार झाले होते. आता तिथं त्यांचा पूर्णाकृती पुतळा बसवला आहे. (तो बघितल्यावर मला नेहमी अशोक नायगावकरांची ‘टिळक’ ही भन्नाट कविता आठवते.) मला त्या थोड्या क्षणांत हे सगळं आठवलं. टिळकांचा तो उपेक्षित पुतळा बघून जरा वाईट वाटलं. मनोमन नमस्कार केला आणि पुढं निघालो.
आम्ही तिथून गिरगाव चौपाटीला टॅक्सीनं गेलो. जाताना त्या खूप जुन्या फ्लायओव्हरवरून गेलो. मला कधीचं त्या फ्लायओव्हरवरून जायचं होतं. ते अखेर झालं. चौपाटी नेहमीसारखी होती. तिथं ते लोक बसायला चटया भाड्यानं देतात. तीस रुपयाला एक चटई वगैरे. एक जण असाच मागे लागला. तुम्हाला दोन चटया लागतील, म्हणू लागला. आम्हाला हसू आवरेना. त्या ‘चटई क्षेत्रा’वरून भरपूर जोकही करून झाले. मुंबईतली बिचारी प्रेमपाखरं (जागेअभावी) तिथं येऊन बिलगली होतीच. ते सगळं बघत (किंवा तिकडं दुर्लक्ष करतोय असं दाखवत) आम्ही तिथं बसून राहिलो. वृषाली पहिल्यांदा तिथं आली होती. तिला थोड्या वेळानं त्या उडत्या चटया असह्य व्हायला लागल्या आणि आम्ही शेवटी निघालो मग तिथून... चौपाटी म्हटल्यावर भेळ, पाणीपुरी, कुल्फी हे सगळं रीतीप्रमाणे झालं. आमचं हॉटेल तिथून अगदी जवळ होतं. मग त्या सुंदर रस्त्यावरून सगळी मुंबई बघत चालत जाऊ या, असं ठरलं. मात्र, थोड्याच वेळात आमचा भ्रमनिरास झाला. त्या सुंदर मरीन ड्राइव्ह रस्त्यावर चक्क खोदकाम सुरू होतं. कोस्टल रोडच्या कामासाठी ग्रेड सेपरेटरसारखं प्रचंड खणून ठेवलं होतं. ती खणाखणी बघून फार यातना झाल्या. तरीही तिथूनच शेवटी चालत, मरीन लाइन्स स्टेशन क्रॉस करून महर्षी कर्वे मार्गाला लागलो. जाताना एकदम एक स्मशानभूमी लागली. त्यावर ‘जगन्नाथ शंकरशेट स्मशानभूमी’ असं लिहिलं होतं. थोडं पुढं गेल्यावर एक चर्च लागलं. तिथं भिंतीवर बारीक अक्षरात सोनापूर चर्च असं लिहिलेलं मी वाचलं. मग एकदम डोक्यात प्रकाश पडला. मगाशी दिसलेली ती स्मशानभूमी म्हणजे ‘सोनापूर’च! अत्र्यांच्या पुस्तकात याचाही अनेकदा उल्लेख वाचला होता. (दुसऱ्या दिवशी लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे अंत्यसंस्कार याच स्मशानभूमीत झाल्याचं पेपरमध्ये वाचलं.)
साधारण दीड ते दोन किलोमीटर चालत आम्ही हॉटेलवर पोचलो. मुंबईत एरवी मला प्रचंड आणि सतत घाम येतो. या वेळ डिसेंबरमधल्या थंड वातावरणामुळं एवढं चालूनही मला फारसा घाम आला नाही आणि याचा मला प्रचंड आनंद झाला. कारण या कारणामुळं मी मुंबईत चालत सगळं बघायची इच्छा असूनही ते टाळायचो. आता मात्र मला घाम न आल्यानं फारच बरं वाटलं. मुंबईत चक्क थंडी वाजत होती. आमच्या ऑफिसमध्येही चक्कर मारायची माझी इच्छा होती. तेही अंतर असंच चालत जाण्यासारखं होतं. मी आमचे सहकारी राजीव काळे यांना मेसेजही केला. तेही ऑफिसमध्ये होते आणि आनंदानं ‘ये की’ म्हणाले. रात्रीचं सीएसटी स्टेशन बघण्याचं एक आकर्षण होतं. मात्र, हॉटेलवर गेल्यावर दिवसभराचा थकवा एकदम जाणवला आणि बाहेर पडायचा उत्साह मावळला. मग मी त्यांना येत नसल्याचं कळवून टाकलं.
मी मुंबईत एवढ्या वेळा येऊनही घारापुरी लेणी बघितली नव्हती. किंबहुना आम्हा चौघांपैकी कुणीच बघितली नव्हती. त्यामुळं दुसऱ्या दिवशी सकाळी तिकडं जायचं हे नक्की होतं. मग लवकर उठून खाली खाऊ गल्लीत फक्त चहा घेतला आणि थेट टॅक्सीनं ‘गेट ऑफ इंडिया’ला पोचलो. एवढ्या सकाळी इथं येण्याची माझी ही पहिली वेळ होती. लगेच बोटीची तिकिटं काढली आणि बहुतेक तिकडं जाणाऱ्या पहिल्याच बोटीत आम्ही बसलोही. हा साधारण एका तासाचा प्रवास आहे. घारापुरी बेट मुंबई आणि मुख्य भूभागाच्या (उरण वगैरे) यांच्या मधे असल्याने आपण पूर्वेकडे प्रवास करतो. (अनेक वर्षं माझी समजूत गेट वे ऑफ इंडिया हे पश्चिमेकडे तोंड करून असेल, अशी होती. फार नंतर कळलं, की ते पूर्वेकडे तोंड करून आहे.) हा सगळा समुद्राचा आत घुसलेला भाग आहे आणि हा समुद्र अतिशय प्रदूषित आहे. अतिशय मातकट, पिवळसर पाणी दिसतं. त्यात तो सीगल पक्ष्यांना वेफर्स, कुरकुरे खाऊ घालण्याचा कार्यक्रम बोट निघाल्याबरोबर सुरू झाला. अर्थात आम्हीही उत्साहानं त्यांना एक-दोन कुरकुरे टाकले आणि व्हिडिओही काढले. त्या सर्व समुद्रात प्लास्टिकचा भरपूर कचरा तरंगत असल्याचं दिसलं. सीगल पक्ष्यांना मात्र आता कुरकुरे किंवा वेफर्सची चांगलीच सवय झालेली दिसली. त्या समुद्रात जर खोलवर मोठमोठी मालवाहू जहाजं नांगरलेली दिसतात. ‘टग’ बोटींतून सामान उतरवण्याचं कामही अनेक ठिकाणी सुरू असलेलं दिसतं. जसजसं पुढं जाऊ तसं डाव्या बाजूला शिवडी ते न्हावाशेवा या समुद्री महामार्गाचं काम सुरू असलेलं दिसतं. हा महामार्ग अजून दोनेक वर्षांत तयार होईल आणि पुण्याहून दक्षिण मुंबई आणखी जवळ येईल. जवळपास ४०-५० मिनिटं प्रवास केल्यावर उजव्या बाजूला घारापुरी बेट दिसायला लागलं. माझ्या अपेक्षेपेक्षा हे बेट बरंच मोठं आणि डोंगरासारखं होतं. थोड्याच वेळात आमची बोट तिथल्या जेट्टीला लागली. आमची आजच्या दिवसातली पहिलीच प्रवासी बोट होती. आमच्या बोटीत जवळपास १०० लोक तरी असावेत. ते उतरल्याबरोबर तिथल्या सुस्त जीवनात त्या दिवसाची चहलपहल एकदम सुरू झाली. जेट्टीला लागूनच एक टॉय ट्रेन होती. ती चालण्याचं अंतर बऱ्यापैकी वाचवते. पण तेव्हा ती बंद होती. मग आम्ही चालत पुढं गेलो. अगदी सुरुवातीपासून खाण्याचे स्टॉल, दुकानं यांची रेलचेल दिसली. आम्ही एके ठिकाणी थांबून गरमागरम वडापाव, मॅगी, चहा यांचा आस्वाद घेतला. पुढं घारापुरी ग्रामपंचायतीची पाच-पाच रुपयांची एंट्री फी भरून आत शिरलो. साधारण पर्वतीएवढ्या उंचीवर दगडी पायऱ्यांनी वर जायचं होतं. दोन्ही बाजूंनी सलग दुकानं व हॉटेलं होती. त्यांनी ताडपत्र्या टाकून तो सगळा पायऱ्यांचा मार्ग झाकला होता, हे एक बरं झालं. त्यामुळं ऊन लागत नव्हतं. आम्ही रमत-गमत, आजूबाजूचे स्टॉल बघत वर चढतो. नाही म्हटलं तरी थोडी दमछाक झाली. मात्र, वर पोचल्यावर सगळा शीण नाहीसा झाला. गार वारा आणि मागे बघावं तर दूरवर समुद्रच समुद्र असं ते दृश्य फार छान होतं. 

वर गेल्यावर एंट्री फी भरली. आता तिथं बऱ्यापैकी सौंदर्यीकरणाचं काम सुरू आहे. पहिल्याच लेण्यात ती प्रसिद्ध शिवमुद्रा (तीन चेहऱ्यांची) आहे. हे पहिलंच लेणं अद्भुत आहे. अनेक मूर्तींची मोडतोड झालेली आहे. पोर्तुगीजांनी या पाषाणशिल्पांवर गोळीबाराचा सराव केला, असं एक गाइड सांगताना ऐकलं. फार चीड आली... आता या वास्तूला हेरिटेज वास्तूचा दर्जा मिळाला आहे. तिथं बराच वेळ रेंगाळलो. जपानी, कोरियन पर्यटक बरेच दिसले. तिथं माकडंही बरीच होती. तिथं फिरताना एकूण फार शांत वाटलं. पुढेही काही लेणी होत्या. पण पहिल्या लेण्याची सर कुणाला नव्हती. थोड्या वेळानं खाली उतरलो. पायऱ्या उतरताना लागलेल्या एका हॉटेलातच जेवलो. परत येताना मात्र टॉय ट्रेन मिळाली. पाच रुपयांचं तिकीट काढून जेट्टीवर आलो. लगेच बोट मिळाली. जाताना उत्साहात असलेली सगळी मंडळी येताना मात्र डुलक्या काढत होती. जरा ऊनही वाढलं होतं. समुद्राचा पृष्ठभाग सोनेरी रंगानं चमचमत होता. आता एलिफंटाकडे जाणाऱ्या बऱ्याच बोटी दिसत होत्या. हळूहळू ‘गेट वे ऑफ इंडिया’ दिसू लागलं. तासाभरात आम्ही परत इकडे येऊन पोचलो. 
यानंतर जवळपास भटकंती करायची होती. ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’ला (एनजीएमए) जायचं ठरवलं. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक (रिगल चौक) भव्य आहे. इथं लालबहादूर शास्त्रींचा पुतळा आधीपासून होता. आता बाळासाहेब ठाकरेंचाही पूर्णाकृती पुतळा इथं उभारला आहे. तिसऱ्या आयलंडमध्ये ‘विक्रांत’ या आपल्या पहिल्या विमानवाहू नौकेची भलीमोठी प्रतिकृती ठेवली आहे. तो एक सेल्फी पॉइंटच झाला आहे. ‘एनजीएमए’ बंद होतं. मग म्युझियमवरून जाताना बरीच गर्दी दिसली. कदाचित शाळांची सहल किंवा कुठला तरी कार्यक्रम असावा. त्यामुळं मग म्युझियममध्ये शिरण्याचा मोह टाळला. पुढं ‘जहांगीर’मध्ये मात्र गेलो. तिन्ही प्रदर्शनं बघितली. त्यातलं शहरांवरचं प्रदर्शन मला विशेष आवडलं. तिथं रस्त्यावरच अनेक जण आपली चित्रं लावतात, तेही मला आवडतं. ती चित्रं बघत बराच टाइमपास केला. तिथं रस्त्यावर चहा विकणाऱ्याकडून चहाही घेतला. आता साडेचार वाजत आले होते. मग नरीमन पॉइंटला जायचं ठरवलं. मला खरं तर ‘बेस्ट’ बसनी जायचं होतं. त्यातही डबल डेकरनं! मात्र, त्या रूटवर तशी एकही डबल डेकर नव्हती. मग शेवटी टॅक्सी करून नरीमन पॉइंट गाठला. टॅक्सीवाल्यानं अगदी ‘एनसीपीए’च्या (नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स) वास्तूसमोर सोडलं. एनसीपीएची वास्तू बघताच मला विलक्षण आनंद झाला. कारण हेदेखील बऱ्याच वर्षांचं बघायचं राहिलं होतं. आम्ही अर्थात समोर कठड्यावर जाऊन बसलो. शनिवारची संध्याकाळ असल्यानं थोड्याच वेळात गर्दी वाढली. इथून सूर्यास्ताचा अप्रतिम ‘शो’ बघितला. भेळ खाणं, चहा-कॉफी हे जोडीनं झालंच. त्या गर्दीतही खूप शांत वाटत होतं हे नक्की!
सूर्यास्त झाल्यावर तिथून निघालो. मला ‘एनसीपीए’ आतून बघायचं होतं. मला आठवतंय तसं १९८५ की ८६ मध्ये पु. ल. या संस्थेचे संचालक झाले, तेव्हापासून मला या संस्थेचं नाव माहिती आहे. मात्र, ती बघण्याचा योग आज येत होता. इथल्या टाटा थिएटरचीही खूप ख्याती ऐकली होती. आम्ही शनिवारी गेलो, तेव्हा संध्याकाळी साडेसहा वाजता तिथल्या भाभा थिएटरमध्ये उस्ताद झाकिर हुसेन व सतारवादक नीलाद्रीकुमार यांचा कार्यक्रम होता. सहज ‘बुक माय शो’वर पाहिलं. तर आठशे रुपयांपासून तिकिटं होती. अर्थात ‘सोल्ड आउट’ होती. तरी सहज आत जाऊन थिएटरच्या दारात उभे राहिलो. मुंबईतले ‘हूज हू’ म्हणावेत असे लोक आलिशान गाड्यांमधून येऊ लागले. मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जग्वार अशा सगळ्या गाड्या... कुणी तरी सेलिब्रिटी किंवा ओळखीचं कुणी भेटेल, असं उगाच वाटत होतं. पण तसं काही घडलं नाही. 

हळूहळू पूर्ण अंधार झाला आणि मुंबई उजळू लागली. कितीदाही हे झगमगीत रूप बघितलं तरी कंटाळा येत नाही. मला तर व्हिक्टोरियाची सैर करायचाही मोह झाला होता. पण बऱ्याचशा बग्ग्या आता इलेक्ट्रिक ऑपरेटेड झालेल्या दिसल्या. त्यात काही ती गंमत नाही. आम्हाला डिनर ‘कॅफे माँडेगर’मध्ये करायचं होतं. (तेही एक छोटंसं स्वप्न!) मग पुन्हा टॅक्सी करून तिकडं... तिथं ‘वैशाली’समोर असते तशी रांग होती. पण आम्हाला तिथंच जायचं होतं आणि काहीही घाई नव्हती. मग दहा-पंधरा मिनिटांत आत शिरलो. एकदम आत ‘इनसाइड स्टोरीज’मध्ये जागा मिळाली. तिथली ती चित्रं (मिरांडाची असावीत का?), ते म्युझिक, ते लाल ड्रेसवाले आणि अगदी लागून-लागून असलेल्या खुर्च्यांमधून सराईतपणे सर्व्ह करणारे वेटर असा तो एक भारी माहौल होता. इथं शांतपणे (मुंबईच्या तुलनेत) खाणं-पिणं झालं. मन तृप्त झालं. शांतपणे तिथून निघालो. खरं तर रात्री त्या भागातून आणखी चालत फिरायची माझी इच्छा होती. पण शेवटी आम्ही टॅक्सी करून हॉटेलवर परतलो.
दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी हॉटेल सोडलं. रविवारची सकाळ. तिथंच शेजारी ब्रेकफास्ट केला. मी तिथून जी गाडी सोडली ती तीन तासांत थेट घराच्या पार्किंगमध्येच थांबवली. कधी घरी पोचलो ते कळलंही नाही. मधे टोलव्यतिरिक्त कुठेही थांबलो नाही, थांबावंंसं वाटलंही नाही. घराची ओढ तीव्र असतेच! 
आपल्या अगदी रूटीन, व्यग्र दिनक्रमात थोडा ब्रेक गरजेचाच असतो. आम्ही तो पुरेपूर घेतला. दमणला दोन दिवस अगदी वेगळ्या वातावरणात आणि दक्षिण मुंबईत पहिल्यांदाच हॉटेलमध्ये मुक्काम करून वेगळी मुंबई अनुभवली. लक्षात राहिली ती दमणची असीम शांतता आणि मुंबईतल्या गर्दीतही जपता आलेला आपला खासगीपणा... मुंबई शहर मला आवडतं ते यासाठी! 

(उत्तरार्ध)

----

12 Dec 2022

दमण-मुंबई डायरी - पूर्वार्ध

हा सागरी किनारा...
------------------------


कोव्हिडपूर्वी म्हणजे २०१९ मध्ये आपल्याकडे जो उठत होता, तो हंपीला जात होता. सोशल मीडियावर हंपीवाल्यांचे फोटो बघून मला न्यूनगंड आला आणि मी तशी पोस्टही टाकली. त्या वर्षी मला हंपीला जायला काही जमलं नाही आणि नंतरची दोन वर्षं तर शक्यच नव्हतं. म्हणून यंदाच्या डिसेंबरमध्ये पहिली संधी मिळताच हंपीला जाण्याचं निश्चित करून टाकलं. माझ्यासह धनश्री, माझा आतेभाऊ साईनाथ आणि त्याची बायको वृषाली असे आम्ही चौघं जाणार होतो. अगदी हॉटेल बुकिंग वगैरे पण केलं होतं. मात्र, अचानक सीमाप्रश्न भडकला आणि जरा काळजी वाटायला लागली. आम्ही आमची कार घेऊन जाणार होतो आणि बेळगावात मुक्काम करून पुढं जायचा विचार होता. पण मग एकूण चिघळती परिस्थिती पाहता दोन दिवस आधी हंपीला जाणं जड अंत:करणानं रद्द करून टाकलं. अर्थात रजा होती, त्यामुळं कुठं तरी जायचं हे ठरलं होतंच. मग स्वाभाविक पर्याय आले ते गोवा किंवा कोकण हेच. मात्र, इथली बहुतेक ठिकाणं बघून झाली होती आणि डिसेंबरमध्ये कोकणात एकूणच हॉटेलांपासून सर्वच सेवा महाग मिळतात आणि कदाचित निकृष्टही! म्हणून मग ते पर्याय बाद झाला. अजून बघितलं नाही अशा ठिकाणी जाऊ या यावर आमचं चौघांचं एकमत झालं होतं. मी मनातल्या मनात महाराष्ट्राच्या किनारपट्टीचा नकाशा आणला आणि कोकणातून वर वर जाऊ लागलो. डहाणूच्या परिसरात कुठं तरी जावं असं वाटू लागलं. आणि अचानक डोळ्यांसमोर नाव आलं ते दमणचं. दीव, दमण आणि दादरा-नगर-हवेली हे केंद्रशासित प्रदेश आहेत, एवढंच शाळेत शिकलेलो. त्यापलीकडं दमणविषयी फारशी माहिती नव्हती. तिथं समुद्रकिनारा आहे आणि तिथंही पोर्तुगीजांची राजवट होती, म्हणजे गोव्यासारखंच वातावरण असेल असा एक अंदाज होता. याशिवाय दारूबंदी असलेल्या गुजरातमधले अनेक मद्यप्रेमी लोक खास मद्यपानासाठी दमण आणि सिल्व्हासाला येतात, हे ऐकून माहिती होतं. हंपीच्या तुलनेत (पुण्याहून ५६५ किलोमीटर) दमणचं अंतरही (३१३ किमी) पुष्कळ कमी होतं. मुंबईवरून जावं-यावं लागणार होतं, त्यामुळं मुंबईला जाण्याची संधी मी सोडणं शक्यच नव्हतं. शेवटी दमणला दोन दिवस आणि मुंबईत दोन दिवस राहू या, असं ठरवलं आणि तशी हॉटेलची बुकिंग करून टाकली. 
बुधवारी (७ डिसेंबर) दत्तजयंतीच्या शुभमुहूर्तावर सकाळी आठ वाजता आम्ही दमणच्या दिशेनं प्रस्थान ठेवलं. ‘श्री दत्त’मध्ये ब्रेकफास्ट करणं आलंच. दत्तजयंती आणि ‘श्री दत्त’ आणि मी श्रीपाद यावर माफक विनोदही करून झाले. तिथं झकास थालिपीठं आणि सुंदर दही मिळाल्यानं मजा आली. चहा घेतला आणि गाडी पुढं दामटली. ठाण्यात शिरल्यावर ट्रॅफिक जॅम लागेल हा अंदाज होताच आणि तसंच झालं. एके ठिकाणी मी सुकाणू साईनाथकडं दिलं आणि वाढत्या ठाण्याच्या विस्ताराकडं डोळे विस्फारून बघू लागलो. मी ठाण्यापर्यंत आलो असलो, तरी इथून पुढचा प्रदेश मला नवा होता. कार घेऊन दिवसा प्रवास करण्यामागे तो प्रदेश बघण्याचा उद्देश होताच. मला स्वत:ला रात्री प्रवास करायला आवडत नाही, ते यासाठीच! ठाण्याच्या बाहेर पडल्यावर टोपोग्राफी एकदम बदलते. डोंगर लागतात. जरासे मातकट आणि धूळभरले! मालवाहू ट्रकची संख्या प्रचंड आणि तुलनेनं रस्ता खराब. वसईच्या खाडीपर्यंत हेच सुरू राहिलं. मुंबईकडून येणारा रस्ता आणि ठाण्याहून येणारा रस्ता जिथं एकत्र मिळतात, तिथं फ्लायओव्हरचं काम सुरू आहे. त्यामुळं हे ट्रॅफिक जॅम होत असल्याचं आम्हाला तिथं पोचल्यावर कळलं. हळूहळू गर्दीतून ती खाडी ओलांडून आम्ही मुंबई-अहमदाबाद महामार्गाला लागलो आणि दमणुकीमुळं लगेच आलेल्या पहिल्याच हॉटेलमध्ये जेवायला थांबलो. काठियावाडी असं नाव असलेल्या त्या हॉटेलात गुजराती पद्धतीचं जेवलो. आम्ही अजून महाराष्ट्रातच असलो, तरी गुजरातचा प्रभाव आजूबाजूच्या हॉटेलांवर दिसू लागला होता. अगदी गुजराती पाट्याही इथूनच सुरू झाल्या. मुंबई-अहमदाबाद रस्ता काही ठिकाणी खराब असला, तरी बराचसा चांगला आहे आणि सहा लेनचा आहे. त्यामुळं इथून पुढं साईनाथनं गाडी सुसाट दामटली. महाराष्ट्राची हद्द बरीच पुढपर्यंत आहे. तलासरी हे मोठं गाव या महामार्गावर लागतं. (माझा ओक वाड्यातला एक मित्र या गावचा. त्याची आठवण आली...) त्यानंतर गुजरात-महाराष्ट्र राज्यांच्या चेकपोस्ट. त्यानंतर अच्छाड हे महाराष्ट्राच्या हद्दीतलं शेवटचं गाव. तिथून पुढे अगदी २०-२५ किलोमीटरवर वापी आहे. दमण हे समुद्रकिनाऱ्यावर असल्यानं १६ किलोमीटर आत डावीकडे आहे. थोड्याच वेळात तो फाटा आला. तिथं लगेच एक रेल्वे क्रॉसिंग लागलं. ते ओलांडून पुढं गेल्यावर दमणचा रस्ता लागला. दमण या केंद्रशासित प्रदेशाची हद्द अगदी पाच किलोमीटर अलीकडं सुरू होते. तो फलक आला आणि एकदम खराब रस्ता लागला. केंद्रशासित प्रदेशाची ही परवड बघून जरा धक्काच बसला. मात्र, पुढं सगळीकडं चांगले रस्ते लागले.

दुपारी चारच्या सुमारास, आठ तासांच्या प्रवासानंतर आम्ही आमच्या हॉटेलमध्ये पोचलो. हॉटेलच्या परिसरात अजिबात घरं किंवा वर्दळ नव्हती. हे दमण नव्हतंच. दमणच्या जवळ असणारं परियारी नावाचं गाव होतं. त्या गावात आमचं हॉटेल होतं, हे नंतर आम्हाला कळलंच. जांपोर नावाचा इथला बीच आमच्या हॉटेलपासून अगदीच जवळ होता. मग संध्याकाळी तिथं गेलो. समुद्र पुष्कळच आत गेला होता. पौर्णिमा आणि त्यात ओहोटी... मात्र, एवढा आत गेलेला आणि कमालीचा शांत समुद्र मी पहिल्यांदाच बघत होतो. इथले बीच ‘मडी’ (चिखलयुक्त) आहेत, ही माहिती आधी समजली होतीच. त्यामुळं इथं गर्दीही जरा कमी होती. आमची थोडी निराशाच झाली तो बीच बघून... मात्र, बीचलगत बांधलेला रस्ता आणि तिथं उभारलेले दिव्यांचे खांब अगदी आकर्षक होते. इथं एवढी कमी गर्दी बघून आम्हाला खरं तर कसं तरीच होत होतं. आपल्या इथं प्रत्येक पर्यटनस्थळी एवढी गर्दी असते, की बस! त्या तुलनेत इथं गर्दी होती, पण ती फारच किरकोळ! आमच्याकडं गाडी असल्यानं आम्ही तो परिसर जरा पिंजून काढावा म्हणून निघालो. त्या बीचच्या कडेनं केलेल्या सुंदर रस्त्यानं दोन-अडीच किलोमीटर गेल्यावर आम्हाला ‘नानी दमणकडे’ अशी पाटी दिसली. आम्ही लगेच तिकडं गाडी वळवली. थोड्याच वेळात एकदम मोठं गाव लागलं. पेट्रोलपंप, मोठमोठी दुकानं, शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि जरा रहदारी हे बघितल्यावर जरा जीवात जीव आला. दमणचे दोन भाग आहेत. एक नानी (म्हणजे छोटं) दमण आणि एक मोटी (म्हणजे मोठं) दमण. यात गंमत अशी, की प्रत्यक्षात नानी दमण हे मोठं आहे आणि मोटी दमण लहान. अर्थात मोटी दमणकडं असलेली एक भव्य गोष्ट लवकरच आम्हाला दिसणार होती. आम्ही त्या रस्त्यानं जरा पुढं गेलो तर एक भव्य, दगडी, आडवी भिंत लागली. एखाद्या धरणाची असावी अशी ती महाकाय भिंत कशाची असावी, याचा विचार करू लागलो तोच दिसलं, की हा तर दमणचा प्रसिद्ध सेंट जेरोम किल्ला आहे. आम्ही लगेच गाडी त्या किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत घेतली. समोरच एक रणगाडा ठेवलेला होता. किल्ल्याच्या भिंतीवर तीव्र प्रकाशझोत सोडले होते. सभोवती नीट राखलेली हिरवळ होती. आम्ही तिथं भरपूर फोटो काढून घेतले. किल्ल्याच्या भोवती एक चक्कर टाकली. या किल्ल्याच्या सौंदर्यीकरणाचं काम २०१९ मध्ये झाल्याचा फलक तिथं लावला आहे. किल्ल्याच्या आत दमण नगर परिषदेचं कार्यालय आणि इतर सरकारी कार्यालयं आहेत. अगदी शेवटी गेल्यावर दीपगृहाकडं जाणारा रस्ता दिसला. मात्र, संध्याकाळ झाल्यामुळं तिथला प्रवेश बंद झाला होता. आम्ही तिथून परत फिरलो. पुढं जाऊन डावीकडं वळलो तर दमणगंगेवरचा पूल लागला. या नदीमुळंच दमणचे हे दोन भाग पडले आहेत. समुद्राच्या मुखाजवळचा भाग असल्यानं नदीत भरपूर पाणी होतं. हा पूल ओलांडून पुढं गेल्यावर नानी दमणमध्ये जरा फिरलो. तिथंच एक कुट्टी नावाचं दाक्षिणात्य रेस्टॉरंट होतं. तिथं चांगलं जेवण मिळालं. रात्री रमतगमत हॉटेलवर आलो. तोवर भरपूर गाड्या येऊन पार्क झालेल्या दिसल्या. एकूण परियारीतलं आमचं हे हॉटेल बरंच लोकप्रिय असावं असा अंदाज आला. हॉटेल चांगलंच होतं. रात्री तिथल्या हिरवळीवर गप्पा मारत बसलो. 
दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्याच हॉटेलमधला काँटिनेंटल ब्रेकफास्ट घेतला. बाहेर पडल्यानंतर आधी देवका बीचला जायचं ठरवलं. तो बराच दूर होता. पण तिथं गेल्यावर बरंच नवं काम सुरू असलेला कोस्टल रोड दिसला. पण तो स्पॉट इतका भारी होता, की फोटोशूटला पर्याय नव्हताच. मग रील्स, फोटोशूट असं सारं साग्रसंगीत भर उन्हाचं करून झाल्यावर तिथून जवळच असलेल्या मीरासोल गार्डन या ठिकाणी गेलो. 

आपल्या सारसबागेसारखं, पण जरा छोटं असं हे ठिकाण आहे. एक सुंदर तळं आणि मधोमध रेस्टॉरंट अशी रचना आहे. तिथं बोटिंग, टॉय ट्रेन पण होत्या. आम्ही तिथं पेडल बोटिंग केलं. भर दुपारी त्या तळ्यात हे बोटिंग करणारे आम्हीच (वेडे) होतो. पण २० मिनिटं पेडलिंग करून व्यायामही झाला आणि मजाही आली. मग तिथंही भरपूर फोटो झाले. त्याच कोस्टल रोडवरून येताना समुद्राला भरती आलेली दिसली आणि आमच्याही आनंदाला भरती आली. आता समुद्र बीचच्या पुष्कळ जवळ आला होता. आम्ही एके ठिकाणी गाडी थांबवली आणि तिथं जाऊन एकदाचे पाय भिजवले. नंतर तो रस्ता संपेपर्यंत प्रवास केला आणि डाव्या बाजूला एकदम एक छोटा, गढीसारखा किल्ला दिसला. हा नानी दमण फोर्ट. मग तिथं गाडी लावून आत गेलो. आत एक चर्च आहे. एका शाळेचा काही तरी कार्यक्रम होता, त्याची तयारी सुरू होती. आम्ही त्या किल्ल्याच्या बुरुजांवरून चारी बाजूंनी एक चक्कर मारली. आता उन्ह जाणवत होतं. भूकही लागली होती. मग बाजारपेठेत जरा चौकशी करून एका हॉटेलात गेलो. तिथं गुजराती थाळीची ऑर्डर दिली. भूक लागल्यामुळं आम्ही चौघंही त्या थाळीवर तुटून पडलो. मस्त जेवण झालं. तिथून मग पुन्हा त्या मोठ्या किल्ल्यात दीपगृह बघायला गेलो. चार-सव्वाचार वाजले होते. दीपगृहाच्या इथं जरा गर्दी दिसली. तिथून समोरच नानी दमणचा बीच दिसला. हा बीच अधिक देखणा दिसत होता. तिथं वॉटरस्पोर्ट आणि इतर ॲक्टिव्हिटी पण सुरू असलेल्या दिसल्या. गर्दीही होती. मग तिथून उतरून थेट त्या बीचवरच गेलो. इथल्या बीचवर बारीक वाळू होती. तिथंच बसलो. समोर बरेच लोक वॉटर स्पोर्टचा आनंद लुटत होते. हा बीच जरा इतर बीचसारखा गजबजलेला वाटला. समोरच एक मीरा कॅफे नावाचं हॉटेल होतं. तिथं फार सुंदर चहा मिळाला. मग आम्ही संपूर्ण संध्याकाळ तिथंच रेंगाळलो. अंधार पडल्यावर मग पुन्हा कार काढून त्या संपूर्ण कोस्टल रोडनं आम्ही राहत होतो त्या जांपोर बीचपर्यंत चक्कर मारली.
आता त्या गावाचा आकार-उकार मला जरा समजायला लागला होता. पुन्हा सावकाश गाडी चालवत इकडे आलो. मीरा कॅफेमध्येच निवांत जेवलो. तिथं आमच्याशिवाय कोणीही नव्हतं. नंतर एक-दोन फॅमिली आल्या. एवढी असीम शांतता, समोर सुंदर झगमगता रस्ता, तिथं स्केट करणारे, चित्रं काढणारे लोक... काही क्षण एकदम परदेशात आल्यासारखंच वाटलं. एकदम लक्षात आलं, की आपल्याला हवंय ते हे! शांतता... मायेनं थोपटणाऱ्या आईच्या हातासारखी शांतता... जवळच्या माणसाच्या मिठीच्या ऊबेत मनाला लाभते ती असीम शांतता.... आमचं बोलणं, गप्पा, बडबड एकदम कमी कमी होत गेलं... आम्ही ती शांतता स्वत:त मुरवत स्वस्थ बसून राहिलो. त्या बीचवर रस्त्याच्या कडेने फूटपाथ आणि बसायला कठडे केले आहेत. किती तरी वेळ तिथं बसलो. मागून समुद्रावरून येणारं थंडगार वारं, समोर दीपगृहाचे फिरणारे दिवे आणि आकाशात पौर्णिमेचा पूर्ण चंद्र! अहाहा... ते सगळे क्षण मनाच्या कुपीत अत्तरासारखे घट्ट बंद करून ठेवले.
जेवण झाल्यावर सावकाश हॉटेलकडं निघालो... मन समाधानानं, आनंदानं भरून आलं होतं... दुसऱ्या दिवशी इथं आल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटत होतं.... आता काही बघण्याची असोशी उरली नव्हती की कुठेही घाई-गर्दीत टिकमार्क करत जायचं नव्हतं... दमणनं जे काही द्यायला हवं होतं ते दिलं होतं... 



(पूर्वार्ध)

---

उत्तरार्ध वाचण्यासाठी येथे क्लिक करा...