30 Sept 2024

प्रतापराव पवार - गौरवांक लेख

कुटुंबप्रमुख
--------------

मी सकाळ संस्थेत रुजू झालो १९९७ मध्ये. प्रतापराव पवार सरांना ‘सकाळ’मध्ये बहुसंख्य लोक ‘पीजीपी सर’ किंवा नुसतं ‘पीजीपी’ या नावानं ओळखतात, हे मला तिथं गेल्यावरच कळलं. ‘सकाळ’मध्ये दर मंगळवारी सकाळी ११ वाजता संपादकीय विभागाची साप्ताहिक बैठक व्हायची. या मीटिंगला पीजीपी सर यायचे. मात्र, आम्हा नवोदितांना त्या मीटिंगला प्रवेश नसायचा. त्यामुळं पीजीपी सरांची थेट भेट व्हायचा काही प्रश्नच आला नाही. तो आला एक जानेवारीला. एक जानेवारी हा ‘सकाळ’चा वर्धापनदिन. तेव्हा या दिवशी ‘सकाळ’ला सुट्टी असायची. ‘सकाळ’च्या प्रांगणात मोठा मांडव घालून तिथं संध्याकाळी स्नेहीजनांचा, वाचकांचा मोठा मेळावा भरायचा. हा मेळावा संध्याकाळी असायचा. मात्र, सकाळी ऑफिसमधील सर्व कर्मचाऱ्यांना जेवण असायचं. अगदी लग्नात असतात तशा रीतसर पंगती बसायच्या. पीजीपी सर एरवी कायम कोट-टाय अशा फॉर्मल वेशात असायचे. मात्र, या दिवशी ते झब्बा घालून यायचे. ते आणि त्यांच्या पत्नी भारतीताई असे दोघे मिळून पंगतीत बसलेल्या कर्मचाऱ्यांना जिलेबीचा आग्रह करायचे. ‘कुटुंबप्रमुख’ हे त्यांचं रूप अशा वेळी फार ठळकपणे जाणवायचं.
पीजीजी सर तिसऱ्या मजल्यावर बसायचे. ‘सकाळ’मध्ये एक ऐतिहासिक, जुनी अशी लिफ्ट होती. अनेक कर्मचारी पहिल्या मजल्यावर जायलाही ही लिफ्ट वापरायचे. स्वत: प्रतापराव मात्र कधीही ही लिफ्ट वापरायचे नाहीत. कायम जिना चढून वर चालत जायचे. अशा वेळी जिन्यात अचानक ते कधी समोर आले तर आम्ही आपले जिन्यातील भिंतीला टेकून, अंग चोरून उभं राहायचो. नजरानजर झाली तर हसायचो. तेही हलके हसून पुढं जात. आम्हा ज्युनिअर कर्मचाऱ्यांना त्यांनी व्यक्तिश: ओळखण्याचा प्रश्नच नव्हता. पुढं मंगळवारच्या मीटिंगला बसायची परवानगी मिळाली, तशी पीजीपी सरांची थेट भेट होण्याची संधी वाढली. त्या मीटिंगमध्येही ते बरोबर अकराला एक मिनिट कमी असताना हजर व्हायचे. त्यांच्या त्या काटेकोर वेळ पाळण्याची सर्व कर्मचाऱ्यांना दहशतच होती. त्यामुळं अनेक जण साडेदहा वाजताच ऑफिसमध्ये येऊन बसत. स्वत: पीजीपी त्या मीटिंगमध्ये फारसं बोलत नसत. इतकंच काय, मुख्य खुर्चीतही ते बसत नसत. तो मान संपादकांचा. शिवाय मीटिंगच्या अगदी शेवटी बोलण्याचा मानही संपादकांचा. हा संकेत पीजीपींनी कधीही मोडलेला मी पाहिला नाही. संपादकांच्या आधी ते क्वचित कधी तरी बोलायचे. त्यांचं बोलणं अतिशय मृदू आहे. आवाज अतिशय हळू. अगदी हळूवारपणे ते काही गोष्टी सांगत. त्यात गेल्या आठवड्यात तुमचं काय चुकलं वगैरे असा जाब विचारण्याचा आविर्भाव तर कधीही नसे. (ते काम संपादकांचं…) पीजीपी त्यांच्या उद्योग-व्यवसायानिमित्त जगभर फिरत. मग संपादकीय मीटिंगमध्ये ते आपले असे काही खास अनुभव शेअर करत. परदेशांत काय सुरू आहे, जग कुठं चाललं आहे, आपण नवं काय शिकलं पाहिजे असे आणि असेच त्यांच्या बोलण्याचे विषय असायचे. जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञान ‘सकाळ’मध्ये असलं पाहिजे, याबाबत ते अतिशय आग्रही होते. ’सकाळ’मधील कर्मचाऱ्यांनी जग हिंडलं पाहिजे, नवनव्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत यावर त्यांचा कटाक्ष होता. त्यांनी कित्येक संपादकीय कर्मचाऱ्यांना परदेशांत पाठवलं आहे. किंबहुना, त्यांच्यामुळे माझ्यासकट अनेकांचा पहिला परदेश दौरा झाला आहे. काही काही कर्मचाऱ्यांना तर ते वैयक्तिक त्यांच्या खिशातून डॉलर किंवा संबंधित देशाचं चलन खर्च करण्यासाठी देत असत. ‘कुटुंबप्रमुख’ हे त्यांचं रूप अशा वेळी लखलखीतपणे उठून दिसायचं.
संपादकीय कामकाजात त्यांचा हस्तक्षेप अजिबात नसे. पूर्वी अनेकांचा असा समज होता किंवा आहे, की पवार कुटुंबाची मालकी असल्यामुळं अगदी रोजची हेडलाइन पण काय असावी, हे खुद्द शरद पवार फोन करून इथं सांगतात. मी ‘सकाळ’मथ्ये १३ वर्षं होतो. या संपूर्ण कार्यकाळात शरद पवार केवळ एकदा आमच्या ऑफिसमध्ये आले. शरद पवार तर सोडाच, पण पीजीपी सरांचाही आमच्या डेस्कवर क्वचित फोन यायचा. जे काही त्यांना सांगायचं असेल ते थेट संपादकांना ते सांगत असतील. मात्र, क्वचित कधी तरी आजची हेडलाइन विचारायला किंवा अन्य कुठली माहिती कन्फर्म करायला त्यांचा फोन आला, की आमची पळापळ होत असे. टेलिफोन ऑपरेटर आधीच सांगत असे, की पीजीपी सरांचा फोन आहे. त्यामुळं डेस्कवरचा सर्वांत सीनियर सहकारीच त्यांच्याशी बोले. माझ्या आठवणीत मी एकदाच त्यांचा फोन घेतला होता. मात्र, ते एवढ्या हळू आवाजात बोलत, की ते काय बोलताहेत हे समजण्यासाठी अक्षरश: प्राण कानात आणावे लागत.
पीजीपींकडं आठवणींचा भरपूर खजिना होता. त्यांनी पुढं ‘सकाळ’मध्ये सदर लिहून त्या आठवणी शब्दबद्ध केल्या, हे अतिशय चांगलं झालं. त्यातल्या बऱ्याचशा आठवणी आम्ही मंगळवारच्या मीटिंगमध्ये आधीच ऐकलेल्या होत्या. मी ‘सकाळ’ सोडून आता १३ वर्षं होऊन गेली. मात्र, एक जानेवारीला मी आवर्जून तिथं स्नेहमेळाव्याला जातो. सगळे जुने सहकारी भेटतात. एक-दोन वर्षांपूर्वी मी पीजीपी सरांसोबत तिथं आवर्जून फोटो काढून घेतला. अगदी अलीकडं, म्हणजे जून महिन्यात राजीव साबडे सरांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी पीजीपी सरांना भेटण्याचा योग आला. मध्ये बराच काळ गेला होता. त्यांनी माझी ओळख ठेवण्याचा प्रश्नच येत नव्हता. मीच पुढं होऊन त्यांना सांगितलं. त्यावर ‘साहजिक आहे. मी तुमच्या विभागात फारसा येतच नसे,’ असं त्यांच्या नेहमीच्या हळुवार स्वरांत सांगितलं.
पीजीपी सरांसारखा संस्थाप्रमुख, कुटुंबप्रमुख नशिबानंच मिळतो. माझ्या नशिबात हा योग होता, याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो. पीजीपी सरांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप शुभेच्छा. जीवेत् शरद: शतम्!

----

('आमचे पीजीपी' या 'सकाळ'च्या माजी कर्मचाऱ्यांनी लिहिलेल्या लेखांवर आधारित पुस्तकात हा लेख समाविष्ट आहे. हे पुस्तक १३ ऑक्टोबर २४ रोजी पुण्यात प्रकाशित झाले. पुस्तकाची संकल्पना - प्रभाकर भोसले, संपादन - नयना निर्गुण)

----

9 Sept 2024

मटा - आइन्स्टाइन लेख ८-९-२४

आइन्स्टाइन आणि आपण...
----------------------------------

आपल्या सभोवतीच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं ही प्रख्यात शास्त्रज्ञ प्रा. अल्बर्ट आइन्स्टाइनच्या ‘सापेक्षतावादाच्या सिद्धान्ता’त सापडतात, असं कुणी सांगितलं तर आपण कदाचित चटकन विश्वास ठेवणार नाही. पण खरोखरच ते तसं आहे आणि हे सतत सिद्ध होताना दिसतं आहे. कसं ते पाहू या. आइन्स्टाइनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धान्तात अनेक बाबी अंतर्भूत आहेत. त्यात ‘काळ हा सापेक्ष असतो,’ अशी एक संकल्पना आहे. (शास्त्रीय भाषेत या संकल्पना अधिक नेमक्या, व्यापक आणि सुस्पष्ट असतात. इथं त्या केवळ एका विचाराच्या आधारासाठी घेतल्या आहेत. त्यामुळे ही त्याची व्याख्या नसून, ढोबळ मांडणी आहे.) काळ सापेक्ष असतो, हे तर खरंच. ‘निरीक्षक कोणत्या चौकटीतून काळाकडं पाहतो, त्यावर त्या काळाची गती असते किंवा त्याला जाणवते,’ असा त्याचा साधारण अर्थ. आपल्याला तर अगदी रोजच्या उदाहरणांवरूनही हे सहज जाणवेल. उदा. आपण आपल्या आवडत्या व्यक्तीची वाट पाहत असू तर काळ खूप हळूहळू सरकतो आहे, असे वाटेल. याउलट आपण आपली आवडती मालिका बघत असू किंवा गाणं ऐकत असू तर ती गोष्ट पटकन संपली, असं आपल्याला वाटतं. इतकंच कशाला, सुट्टीचा दिवस भर्रकन निघून जातो आणि कामावर असताना वेळ निघता निघत नाही, असाही बहुसंख्यांचा अनुभव असेलच. काळ मोजण्याच्या काहीएक पद्धती आपण निश्चित केल्या असल्या, तरी ब्रह्मांडाच्या अनंत पोकळीतील प्रवासात या सगळ्या पद्धती बाद ठरतात. अनेक साय-फाय चित्रपटांत आपण हे पाहिलं आहे. तर ते असो. मुद्दा काळाच्या सापेक्षतेचा आहे आणि तो आपल्याला मान्यच आहे.
आपल्या आजूबाजूला असलेली माणसं, समाज, व्यक्तिसमूह ही काळाच्या वेगवेगळ्या मितींमध्ये वावरत असतात आणि आपल्यासमोर जे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत, ते त्यामुळे झाले आहेत. या दोन मितींमधली माणसं किंवा समुदाय एकमेकांसमोर आले, तरी त्यांना एकमेकांना ओळखता येत नाही किंवा त्यांचं बोलणं एकमेकांना ऐकू जात नाही. मध्यंतरी ‘डार्क’ नावाची एक जर्मन वेबसीरीज ‘नेटफ्लिक्स’वर आली होती. त्यात काळाच्या गुंतागुंतीचा हा वेधक प्रवास दाखविण्यात आला होता. त्यात काही माणसं ३३ वर्षं पुढं किंवा मागं जात असतात. ही फँटसी असली, तरी आपल्या आजूबाजूलाही नीट पाहिलं तर काळाच्या एका वेगळ्या टप्प्यावर जगणारी माणसं आपल्याला सहज दिसतील. सोप्या भाषेत सांगायचं, तर आपल्यातील काही जण मध्ययुगीन काळात जगत आहेत, काही एकोणिसाव्या शतकात, काही जण विसाव्या शतकात, तर काही बाविसाव्या! आणखी एक साधं उदाहरण पाहू. आपण रस्त्याने चालत असताना सिग्नलला उभे असतो. शेजारी काही जण जोरात पुढे निघून जातात. आपल्याला त्यांचा राग येतो. मात्र, ही माणसं अजून मध्ययुगातच जगत असल्यानं त्यांना सिग्नल ही संकल्पनाच माहिती नसते. मग ते कसे थांबणार त्या विचित्र दिसणाऱ्या तीन रंगीत दिव्यांना पाहून? त्यामुळे यापुढे आपण त्यांच्यावर न रागावता, ‘वेगळ्या काल-मितीत जगणारी माणसं पाहिली,’ याचा आनंद मानला पाहिजे. आपल्या पुणे शहरात सध्या कोयता गँगने धुमाकूळ घातला आहे. हीसुद्धा पंधराव्या शतकात जगणारी माणसं आहेत, हे आपल्या लक्षात येईल. शिवकाळाआधी आपल्या प्रदेशात पेंढाऱ्यांनी धुमाकूळ घातला होता. आपल्या शहरात सपासप माणसं कापणारी, त्यांचं मुंडकं उडवणारी, शेतातलं पीक कापावं तशी माणसं उडवत जाणारी ही  टोळी त्याच काळातील आहे. ‘डार्क’ मालिकेत वेगळ्या काळात जगणारी माणसं एकमेकांसमोर येतात खरी; मात्र ती एकमेकांना पाहू शकत नाहीत. त्यांच्या मधोमध काळ  नावाची काचेची जाडजूड भिंत असते. त्याचप्रमाणे तुम्ही या टोळीला काही सांगायला गेलात, तर त्यांना तुमचं बोलणं ऐकूच येणार नाही; कारण तुम्ही एकविसाव्या शतकात आहात आणि ते पंधराव्या...
याउलट काही माणसं बाविसाव्या शतकात राहतात. पुण्यात पोर्श कार चालविणारे अद्भुत बालक हे बाविसाव्या शतकातच वावरत होते. तेव्हा हवेतून विमानासारख्या उडणाऱ्या कार येणार आहेत, हे आपल्याला साय-फाय चित्रपट पाहून आता माहितीच झालं आहे. हे बालक त्याच काळात कार चालवीत होते. दुर्दैवाने शंभर वर्षं मागे असणारे दोघे त्याच्या त्या ‘उडत्या’ कारसमोर आले, त्याला ते काळाच्या पुढचे बालक तरी काय करणार? पुण्या-मुंबईतील (किंबहुना देशातील कुठल्याही महानगरातील) काही विशिष्ट बार, पब आदी ठिकाणी गेल्यास एकाच वेळी बाविसाव्या शतकातील आणि पाषाणयुगातील माणसांचे दर्शन होते. पाषाणयुगात माणसे जेमतेम लाज झाकायला वस्त्रं किंवा झाडांची पानं गुंडाळायला शिकली होती. इथंही तितपतच वस्त्रं अंगी असलेले मनुष्यविशेष आपल्याला पाहायला मिळतील. या ठिकाणी येताना ही मंडळी बाविसाव्या शतकातील उपरोल्लेखित ‘उडत्या कार’ने आलेली असतात, हे सांगायला नकोच. थोडक्यात, दोन विभिन्न युगांचे एकाच वेळी दर्शन घेण्याचा, मदहोश करणारा योग त्या विलक्षण जागी साधता येतो.

आणखी एक मुद्दा. काळ हा नेहमी पुरोगामी, पुढे जाणारा (प्रगतिशील अशा अर्थाने) असतो, असा सर्वसाधारण समज आहे. मात्र, तोही खरा नाही. इथे ख्रिस्तोफर नोलनच्या ‘TENET’ या चित्रपटाची आठवण येणं स्वाभाविक आहे. यात काळ पुढेही जात असतो आणि मागेही जात असतो. हीदेखील फँटसीच आहे. (चित्रपटाच्या नावापासून ही सुरुवात आहे. हे नाव रोमन लिपीत उलटसुलट कसेही वाचले तरी सारखेच वाचले जाते.) मात्र, आपल्या आजूबाजूला पाहिलं तर काळ हा कायम प्रगतिशील नसून, तो अधोगतीशील किंवा मागे जाणाराही असतो, हे आपल्याला सहज पटेल. उदा. आज पन्नास किंवा साठ या वयोगटातील किंवा त्याहून अधिक वयाची आणि दीर्घकाळ पुण्यात राहणारी माणसं काय बोलतात, हे ऐकू या. ‘आमच्या वेळी पुणं असं नव्हतं,’ हा अगदी सामायिक असा उद्गार! (यात ‘आमच्या वेळी पुणं अधिक चांगलं होतं,’ हेच अध्याहृत असतं.) आपल्या आजूबाजूची अनेक मध्यम आकाराची शहरं, तालुक्याची गावं किंवा त्याहून अधिक लहान अशी खेडी यांचं आपण गेली ३०-४० वर्षं तरी निरीक्षण करत आलो आहोत. आपली काय भावना आहे या शहरांबद्दल, गावांबद्दल? ती पूर्वी आजपेक्षा चांगली होती, हीच ती सर्वसाधारण भावना आहे, यात दुमत नसावं. सत्तर ते नव्वदच्या दशकात प्रगतिशील होत गेलेली अनेक गावं, जिल्ह्यांची मुख्यालयं असलेली टुमदार शहरं पुढंपुढं मुडदूस व्हावा, तशी कुपोषित होत गेली, आक्रसत गेली हे आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलं आहे. तिथं बागा होत्या, स्वच्छ बसस्थानकं होती, चिमुकली का होईना, नाट्यगृहं होती. आता सगळं कसं भकास झालेलं दिसतं! खेडी तर बघवत नाहीत. मग काळ हा सदैव ‘प्रोग्रेसिव्ह कसा? तो ‘रिग्रेसिव्ह’ही असतो. थोडक्यात, सापेक्ष असतो. आइन्स्टाइनच्या मूलभूत मांडणीवर पुन्हा शिक्कामोर्तब...

थोडक्यात, आता यापुढं आपण कळकळीनं, तळमळीनं काही तरी सांगतोय आणि एखाद्या व्यक्तीला, समाजाला किंवा समुदायाला ते ऐकूच जात नाहीय असं वाटलं तर लक्षात घ्या - ती काळाची जाडजूड काचेची भिंत मध्ये उभी आहे! काळाची मितीच वेगळी असल्यानं आपण कितीही ओरडून सांगितलं, तरी ते ऐकू जाणार नाहीय. मग यावर उपाय काय? शिक्षणाचा, नागरी सुविधांचा, हक्कांचा आणि नागरिकशास्त्रातील काही मूलभूत कर्तव्यांचा प्रसार होणं हाच यावरचा उपाय. पूर्वी जिल्हा परिषदेच्या शाळेत गरीब व श्रीमंतांची मुलं एकाच गणवेशात, एकाच वर्गात शेजारी शेजारी बसायची. आपल्या घटनाकारांनी, राज्यकर्त्यांनी, धोरणकर्त्यांनी फार समजुतीनं दोघांचा काळ असा एकत्र आणला होता. पुढं सगळं विस्कटत गेलं आणि आपण वेगवेगळ्या काळाच्या मितींत फेकले गेलो. गणपती ही बुद्धीची देवता; ती सध्या आपल्या घरी वास्तव्याला आली आहे. काळाच्या या मिती तोडून पुन्हा सगळे एकाच काळात येऊ देत, हीच त्या विघ्नहर्त्याच्या चरणी प्रार्थना!


(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती - ८ सप्टेंबर २०२४)

(इमेजेस - मेटा एआयवरून)

---