बहु असोत सुंदर, संपन्न....
-----------------------------
आजच्या शुक्रवारी, म्हणजे एक मे २०२० रोजी महाराष्ट्र साठी पूर्ण करतोय. साठीसोबत येणारा वाक्प्रचार फार काही चांगला नाही. पण तो व्यक्तीच्या संदर्भात असल्यानं सहज दुर्लक्षिता येईल. महाराष्ट्र हे आपलं एक राज्य असल्यानं त्याची साठी म्हणजे आपणा सर्व महाराष्ट्रवासीयांसाठी सुखाचा, आनंदाचा, जल्लोषाचा क्षण! आत्ता ‘करोना’ साथीमुळं आपल्याला हा जल्लोष एकत्र येऊन करता येत नसला, तरी या महत्त्वाच्या टप्प्याची नोंद करायलाच पाहिजे. महाराष्ट्र राज्याची निर्मिती सहजासहजी झाली नाही. त्यासाठी इथल्या जनतेला मोठं आंदोलन करावं लागलं. एकशे पाच हुतात्म्यांचे बलिदान द्यावे लागले. तो सर्व इतिहास आता नव्या पिढीला कदाचित माहितीही नसेल. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी; मात्र ती मिळविण्यासाठीही इथल्या नेत्यांना रक्ताचं पाणी करावं लागलं. आचार्य अत्रे, एस. एम. जोशी, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे अशा नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा प्राणपणाने लढला. चिंतामणराव देशमुखांसारख्या महाराष्ट्रभक्त नेत्याने आपल्या केंद्रीय अर्थमंत्रिपदावर सहज पाणी सोडले. सेनापती बापट यांच्यासारखा वयोवृद्ध सेनानी या लढ्याच्या अग्रभागी उभा ठाकला. ‘महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, महाराष्ट्राविण राष्ट्रगाडा न चाले’ असे अत्यंत अभिमानास्पद, ज्वलज्जहाल उद्गार त्यांनी काढले आणि मराठी जनतेला स्फुरण चढले. एकदा राज्य स्थापन झाल्यानंतर यशवंतराव चव्हाणांसारख्या दूरदृष्टीच्या नेत्याने या राज्याच्या प्रगतीची मुहूर्तमेढ रोवली. हा सगळा इतिहास इथे पुन्हा सांगण्याचे कारण म्हणजे राज्याच्या साठीनिमित्त या सर्व कालखंडात नक्की काय घडलं, काय घडणं अपेक्षित होतं आणि पुढे काय व्हायला हवं याची किमान चर्चा तरी व्हावी.
महाराष्ट्रात बहुसंख्य जनता मराठी बोलणारी असल्यानं या लेखापुरता तरी मराठी माणसांचाच विचार केला आहे. दोनशे-तीनशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रात आले आणि इथलेच झाले असे सगळे लोक मराठीच आहेत. काहींची मातृभाषा कदाचित मराठी नसेल, पण अनेक वर्षं, अनेक पिढ्या इथं राहिल्यानं ते मराठीच आहेत. महाराष्ट्राचा स्वभाव रांगडा आहे; तिखट आहे, ग्रामीण आहे. (ग्राम्य नव्हे!) शेती करणं, कष्टाने पैसा मिळवणं, तमाशा आदी संगीत मनोरंजन प्रकारात मन रमवणं या त्याच्या आवडत्या गोष्टी आहेत. तीस-चाळीस वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या कुठल्याही गावातलं जीवन कसं होतं, ते आठवून पाहा. पिठलं-खर्डा-भाकरी खाणे, गणपती आणि दिवाळी हे सण मनापासून साजरे करणे, संध्याकाळी गावातल्या देवळात कीर्तनाला जाणे आणि शनिवारी रात्री फडाला जाणे यात ग्रामीण जीवन सामावलं होतं. शहरी जीवनही तसं साचेबद्धच होतं. बँक, एलआयसी किंवा सरकारी कचेरीत सकाळी दहा ते पाच नोकरी करणं, शनिवारी एखादं नाटक बघणं आणि क्वचित कधी तरी हॉटेलांत जाऊन जेवणं यात शहरी मध्यमवर्ग खूश होता. साठच्या दशकात आलेल्या अनेक मराठी चित्रपटांत या दोन्ही जगण्याचं प्रतिबिंब दिसेल. साहित्यातही सापडेल. ग्रामीण महाराष्ट्राचं व्यक्तिचित्र कुणाला हवं असल्यास व्यंकटेश माडगूळकर, द. मा. मिरासदार आणि शंकर पाटील यांच्या साहित्यात तो गवसेल. शहरी महाराष्ट्र व. पु. काळे यांच्यापासून शं. ना. नवऱ्यांपर्यंत अनेकांनी रेखाटला आहे. नैसर्गिक दुष्काळ आणि अभावग्रस्तता इथल्या जनतेच्या पाचवीला पुजली होती. पण तरी लोक असमाधानी नव्हते. अपेक्षा थोड्या होत्या, जगणं साधं-सोपं होतं.
साठच्या दशकात सहकार चळवळीनं ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलला. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात या कारखान्यांच्या सभोवती समृद्धीची बेटं तयार झाली. काही मोजक्या कारखानदारांनी आणलेल्या उद्योगांमुळे छोट्या छोट्या, स्वयंपूर्ण वसाहती उभ्या राहिल्या. या बेटांवरचं जगणं उर्वरित महाराष्ट्रापेक्षा वेगळं झालं. विदर्भ आणि मराठवाडा महाराष्ट्रात सामील झाले असले, तरी त्यांचं भौगोलिक, सांस्कृतिक वेगळेपण कायम होतं. मराठी भाषेच्या दुव्यानं हा सगळा भाग एका धाग्यात सांधला गेला. शिवाय हे राज्य अस्तित्वात येण्याआधीपासून इथं असलेली संतपरंपरा, वारकरी संप्रदाय यामुळं अंतरीचा जिव्हाळा होताच. ग्रामीण महाराष्ट्रात सहकार चळवळ रुजत असतानाच वसंतराव नाईकांसारख्या मुख्यमंत्र्यांनी राज्यात हरितक्रांती, धवलक्रांतीची बीजं रोवली. एके काळचा दुष्काळी, रखरखाटी महाराष्ट्र निदान काही परिसरापुरता तरी हिरवागार झाला, दुधदुभत्यानं न्हाऊ लागला. याच वेळी शहरांमध्ये, विशेषत: मुंबई व पुण्याच्या परिसरात औद्योगिक वसाहती उभ्या राहिल्या. मुंबई अद्यापही गिरण्यांचं शहर होतं. इथल्या कापड गिरण्यांची आणि त्याला जोडून वस्ती असलेल्या लालबाग-परळची एक वेगळीच गिरणगाव संस्कृती त्या अवाढव्य महानगराच्या एका कुशीत सुखानं नांदत होती. मुंबई, पुण्याच्या जोडीनं नागपूर, औरंगाबाद, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर ही शहरंही चांगलीच विस्तारत होती. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतरचा हा दहा-पंधरा वर्षांचा काळ कदाचित सर्वोत्कृष्ट काळ असावा. या काळातलं राज्यातलं सामाजिक, सांस्कृतिक जीवन रसरशीत होतं. साहित्यातही विद्रोही, दलित, स्त्री असे विविध प्रवाह नव्याने एकत्र येत होते. पुलंच्या बहुरूपी प्रयोगांपासून ते विजय तेंडुलकरांच्या बहुस्पर्शी नाट्यप्रयोगांपर्यंत सारं काही घडत होतं. कलाकारांमध्ये, लेखकांमध्ये नवं काही सांगण्याची, करण्याची ऊर्मी होती; तसंच इथल्या सर्वसामान्य जनतेलाही ते जाणून घेण्यात रुची होती. गावोगावी ग्रंथालये होती आणि नवसाक्षरांचं प्रमाणही वाढत होतं. महाराष्ट्र हे सर्वच बाबतींत देशातलं अग्रेसर, क्रमांक एकचं राज्य अशी प्रतिमा होती.
मात्र, लवकरच या सगळ्या प्रगतीला ग्रहण लागलं. भ्रष्टाचाराचा कली भल्याभल्यांच्या अंगात शिरला. समाजकारणापेक्षा सत्तेचं राजकारण वरचढ ठरू लागलं. याच काळात विजय तेंडुलकरांच्या लेखणीतून उतरलेला ‘सामना’ हा चित्रपट आणि ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक यावं, यात आश्चर्य नव्हतं. पुढच्या काळात सर्वच क्षेत्रांत ही कीड पसरू लागली आणि सामाजिक अस्वस्थतेची ठिणगी पडली. गावोगावी नांदत असलेल्या सलोख्याला सुरुंग लागला. पुढच्या काळात देशात सुरू असलेल्या मंडल आयोग वाद, बाबरी मशिदीचं पतन, जातीय दंगली या सगळ्यांचा परिणाम राज्याच्या प्रकृतीवर झालाच. गिरणी कामगार संपानं मुंबईतलं गिरणगाव उद्ध्वस्त झालं. मुंबईत वाढत असलेल्या टोळीयुद्धाला यातले काही बेरोजगार तरुण बळी पडले. तस्करी, काळा बाजार याला ऊत आला. ताप आलेल्या माणसाचं तोंड कडवट व्हावं, तसं राज्याचं तोंड कडू होऊन गेलं.
नंतर १९९१ मध्ये देशानं जागतिकीकरणाच्या रूपानं मोठा बदल पाहिला. महाराष्ट्रही त्याला अपवाद नव्हता. इथली शहरं महानगरं झाली आणि महानगरं लोकांच्या लोंढ्यानं फुटून मरणासन्न झाली. ग्रामीण महाराष्ट्रातून बेरोजगारांचे तांडेच्या तांडे शहरांच्या दिशेनं धावू लागले. ऐंशीच्या दशकात सडलेल्या सामाजिक व्यवस्थेचं बेंड जागतिकीकरणाच्या इंजेक्शननं फुटलं. जखम मात्र वाहतच राहिली. शहरांतलं वातावरण वेगानं बदलत गेलं. कुटुंबकेंद्री व्यवस्था कधी व्यक्तिकेंद्री झाली आणि मूल्याधारित सांस्कृतिक धारणा कधी ईहवादी झाल्या, याचा अनेकांना तपास लागला नाही. कला क्षेत्रापासून ते राजकारणापर्यंत आणि शिक्षणापासून ते साहित्यापर्यंत सर्वत्र सुमारांची सद्दी सुरू झाली. एकविसाव्या शतकात तर वेगानं होत असलेल्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीनं साऱ्या समाजाचीच फरपट चालविली. अनेकांच्या मनात ‘आयडेंटिटी क्रायसिस’ निर्माण झाला. राजकारणातल्या भोंदूपणाने नवनवे तळ गाठले. समाजात द्वेषाची पेरणी झाली. आता तिला महाभयंकर विषारी फळं लगडली आहेत.
हे सगळं असलं, तरी हा महाराष्ट्र इथल्या सर्वसामान्य माणसाच्या शहाण्या समजूतदारपणावर उभा आहे आणि इथून पुढंही उभाच राहील. संत परंपरेचा वारसा आणि छत्रपती शिवरायांच्या लोककल्याणकारी राज्याचा इतिहास इथल्या मातीच्या कणाकणात आहे. सह्याद्रीचे भक्कम कोट आणि गोदा-कृष्णेचे अमृततुल्य पाणी इथल्या माणसाच्या अणुरेणूत मुरले आहे. अशा भूमीवर नांदणारे राज्य आता साठ वर्षांचे होऊ घातले आहे. त्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध होऊ या. आपल्या पूर्वसूरींना यापेक्षा कोणती चांगली भेट असू शकेल?
----