सम्या आणि गौरीच्या गोष्टी
--------------------------------
सीझन ३
----------
२१
----
सिलेक्टेड प्रेम...
------------------
समीर : हाय गौरी...
गौरी : हाय सम्या....
समीर : सुट्टीतला कंटाळा अजून जात नाहीये...
गौरी : हो ना, सुट्टी पटकन अंगात मुरते.... तापासारखी... त्याउलट कामाचा दिवस अंगी मुरता मुरत नाही...
समीर : मग? काय फलित सुट्टीचं?
गौरी : हेच की, कामाशिवाय आपल्या जगण्यात काही राम नाही. काम करीत राहिलं पाहिजे. जिथं काम तिथं राम!
समीर : अर्थात! भरपूर काम केलं, की मग सुट्टीची खरी मजा... जो कामातही टंगळमंगळ करतो त्याला सुट्टीचं काय कौतुक असणार!
गौरी : म्हणून तर मी मनापासून काम करते, आवडीचं काम करते आणि मग त्यात थोडा बदल हवा, रिफ्रेश व्हायला हवं, म्हणून मग सुट्टी घेते. तीही फार नाही. जास्तीत जास्त एखादा आठवडा...
समीर : पण आपल्या भेटीला बरेच दिवस झाले आता...
गौरी : हा ब्रेक जास्त झाला खरा, पण एखादी व्यक्ती आपल्याला कधी भेटणार याची हुरहुर लागणार असेल ना, तर नंतर होणारी भेट फार म्हणजे फारच गोड असते...
समीर : हो, एवढी गोड की, त्या भेटीनंतर शुगर वगैरे होणारच एखाद्याला... आणि ती भेटही मग अशी काही घट्ट...
गौरी : बास बास... पुढचं वर्णन नको... कळलं...
समीर : बरं बाई... पण मला नेहमी ना एका गोष्टीची गंमत वाटते. माणूस सदैव कशाच्या ना कशाच्या शोधात असतो. त्याला समाधान असं नसतं. आता सुट्टीचंच बघ ना... ज्या सुट्टीसाठी मी एवढी तडफड केली, ती सुट्टी सुरू झाल्यावर काही दिवसांतच मला बोअर व्हायला लागली.
गौरी : याचं कारण आहे सम्या. आपण ना, आपल्याला जे हवं असतं, तेवढंच त्या गोष्टीत बघतो. पण हे पॅकेज असतं. हव्या त्या एका गोष्टीबरोबर नको असलेल्या दहा गोष्टी येतात. तुला सुट्टीतला निवांतपणा किंवा मोकळी संध्याकाळ तेवढी हवी असते. पण मग त्याबरोबर संध्याकाळचं ट्रॅफिक जॅम आणि इतर सर्व मित्र-मैत्रिणी त्यांच्या व्यापात बिझी हे लक्षात आल्यावर तुला बोअर व्हायला लागतं.
समीर : खरंय. आपण फार सिलेक्टेड झालो आहोत सगळ्या बाबतीत...
गौरी : अगदी प्रेमाच्याही बाबतीत. प्रेमही आपल्याला असंच सिलेक्टेड हवं असतं. विशिष्ट वेळी, विशिष्ट व्यक्तीकडून, विशिष्ट पद्धतीचं प्रेम आपल्याला अपेक्षित असतं. एवढं स्वार्थी नको ना व्हायला...
समीर : आता प्रेमावर कुठं घसरलीस एकदम...
गौरी : विषय तिथं येणारच होता... मी आधीच सांगून टाकलं...
समीर (हसत) : छान... आलं लक्षात... सुट्टी संपली... माझा क्लास सुरू झाला...
गौरी (गळ्यात पडत) : असा गोड विद्यार्थी हवाच आहे मला रोज नवे धडे शिकवायला....
समीर : हम तैय्यार है....
---
२२
----
गौरीची 'व्याजोक्ती'
----------------------------
समीर : गौरी, गुंता झालाय सगळा...
गौरी : आता काय झालं?
समीर : माणसं का गुंततात एकमेकांमध्ये? तीही एकाच वेळी अनेकांमध्ये?
गौरी : कुणाचं सांगतोयस? आणि कशासाठी?
समीर : सगळेच गं... आय मीन, एकच एक असं उदाहरण असं नाहीय माझ्यासमोर... पण मी पाहतोय आजूबाजूला...
गौरी : आपलाही अपवाद करायचं कारण नाही. सगळेच अडकलो आहोत.
समीर : पण का? काय गरज याची?
गौरी : माणूस हा फार बिलंदर प्राणी आहे सम्या. जोवर एखादी गोष्ट त्याच्या आवाक्यात नसते ना तोवर ती गोष्ट जणू अस्तित्वातच नसते. पण एकदा का ती वस्तू प्राप्य आहे असं दिसलं की त्याला ती लगेच हवीशी वाटू लागते. या कथित प्रेमाचं आणि भावनिक गुंतवणुकीचं तसंच असतं.
समीर : एवढा उथळ दृष्टिकोन?
गौरी : सगळ्यांचा नसावा. आजकाल काय झालंय, भौतिक समृद्धी भरपूर आली असली तरी भावनेचा दुष्काळ पडलाय. जवळच्यांना समजून घ्यायला वेळ नाही किंवा ते फार गृहीत धरताहेत नात्यांना...
समीर : पण म्हणून थेट दुसऱ्या बँकेत अकाउंट?
गौरी : तुम्हाला तुमच्या खातेदारांत 'इंटरेस्ट' नसेल तर तो जाणारच ना दुसऱ्या बँकेकडं?
समीर : हे अती होतंय हं. गुंतवणूकही आम्हीच करा, इंटरेस्टही आम्हीच दाखवा... खातेदाराला मात्र बँकेची बांधिलकी नको... वा रे वा!
गौरी : एक मिनिट, आम्ही सांगितलं होतं का बँक सुरू करायला? खातेदार येत-जात राहणारच... बँकेनं त्यांच्यात भावनिक गुंतवणूक करू नये. व्याज जर मुद्दलाच्या प्रेमात पडलं तर बँकेचं दिवाळं वाजलंच म्हणून समज.
समीर : म्हणजे आपल्या कोणी कितीही प्रेमात पडलं तरी आपण त्यांच्या प्रेमात पडायचं नाही?
गौरी : अगदी बरोबर! असं केल्यासच तुझ्या संसाराचं 'लोकमङगल' होईल...
समीर : 'लोकमङगल' म्हणजे?
गौरी : म्हणजे जी सहनही होत नाही आणि सोडताही येत नाही, ती - आपली.... - बँक - रे सोन्या!!
----
२३
---
‘रामबाण’
------------
समीर : गौरे, हा घे सुंठवडा... रामजन्म झाला...
गौरी : कुठं उंडारत असतोस रे उन्हातान्हाचा...?
समीर : अगं, रामरायाचा जन्मच भर दुपारी १२ वाजता झाला, त्याला काय करायचं?
गौरी : तू कधीपासून एवढी रामाचा हनुमान झालायस?
समीर : अगं, आपल्या आपटेकाकू भेटल्या होत्या गं रस्त्यात. त्यांनी दिला. मग नाही कसं म्हणायचं? बाकी मी फार देव देव करणाऱ्यातला नाही, हे तुला माहितीय.
गौरी : माझी या विषयावरची मतं तर तुला माहितीच आहेत...
समीर : हो अगदी. पण सुंठवडा खा... प्रकृतीला बरा असतो.
गौरी : बाकी तुझा हा राम मला अगदीच करुण देव वाटतो... खरं तर तो माणसाची सगळी लक्षणं दाखवतो. त्याला तुम्ही उगाच ‘मर्यादापुरुषोत्तम’ वगैरे करून मखरात बसवलाय...
समीर : माणसाची लक्षणं म्हणजे?
गौरी : सीतेसारख्या बायकोला अग्निपरीक्षा करायला लावली, इथंच तो माझ्या डोक्यात गेलाय. आणि दुसरा एक बारीक मुद्दा म्हणजे, वाली-सुग्रीव युद्धात तुमच्या रामभाऊंनी चीटिंग केलंय. सुग्रीवाला गळ्यात हार घालायला लावून, वालीला लपून बाण मारलाय.
समीर : काही तरी कारण घडलं असेल ना! युद्धात सारं काही क्षम्य असतं, असं मानलेलं आहे. दुसरं म्हणजे देव होता तो...
गौरी : देव नव्हता रे उलट. माणूस म्हणशील तर उलट त्याचं हे स्खलनशील असणं पटू शकतं... पण देव म्हणून कसं काय पटवून घ्यायचं?
समीर : आपल्या थोर पूर्वजांनी या कहाण्या मुळात कशा लिहिल्या होत्या आणि त्यात काय काय बदल होत नक्की कोणतं व्हर्जन आत्ता आपण ऐकतोय हे सांगणं शक्य आहे का? त्यामुळं या पुराणकथांमध्ये शंकांना नेहमीच वाव राहणार.
गौरी : मी काहीच म्हणत नाहीय. माझा मुळात यावर विश्वासच नाहीय. तू आणि तुझा राम...आनंदात राहा...
समीर (चिडवत) : आता माझ्यात काही ‘राम राहिलेला नाही’ असं म्हणू नकोस गौरे...
गौरी (हसत) : ते म्हणून कसं चालेल? तुला ‘एकगौरीव्रत’ पाळावंच लागेल सम्या... नाही तर मी बाण काढलाच म्हणून समज... आणि तो एकदम ‘रामबाण’ आहे...
समीर (हसत) : सुंठवडा घ्या सीतामाई...
गौरी (उशी फेकत) : सम्या, तू मेलास आज...
---
२४
---
सोशल आणि प्रायव्हेट...
-------------------------------------
गौरी : सम्या, या बातम्या वाचल्या का? फेसबुक आणि ती कुठली तरी कंपनी... यांनी आपल्या प्रायव्हसीची वाट लावलीय. सगळंच बोंबललंय...
समीर : हे आज ना उद्या होणारच होतं... आपण स्वत:हून सगळं त्यांच्या स्वाधीन केलंय... आपल्याला सगळे अॅप हवेत, सगळ्या सेवा-सुविधा हव्यात, मग ते फुकट थोडंच मिळणार?
गौरी : पॉइंट आहे. पण मला भीती वाटतेय याची...
समीर : भीती वाटण्यासारखंच आहे हे अगं... हे लोक डेटा गोळा करून स्वस्थ बसलेले नाहीत. तो डेटा प्रोसेस करण्याचं काम तिकडं अव्याहत सुरू आहे.
गौरी : आणि ते करून काय करणार?
समीर : हा डेटा म्हणजे त्यांच्यासाठी अलिबाबाची गुहा आहे. आपण कल्पनाही करू शकणार नाही एवढे प्रचंड पैसे मिळवून देणारी...
गौरी : मला तर आपण कळसूत्री बाहुल्या असल्यासारखं वाटतंय रे...
समीर : आपण झालो आहोत नकळत... ‘मार्केट ड्रिव्हन’ झालो आहोत. कुणी तरी आपल्याला खेळवतंय आणि क्षणिक आनंदापायी आपण दीर्घकालीन गुलामगिरीच्या तयारीला लागलो आहोत.
गौरी : ती कृत्रिम बुद्धिमत्ता की काय म्हणतात ती आपल्यावर राज्य करणार तर...
समीर : माहिती नाही, नक्की कशा स्वरूपात हे पुढं अजून वाढेल ते... पण हो, एक गोष्ट नक्की... आपण जोवर हा सोशल मीडिया वापरत आहोत आणि त्यांच्या सर्व अटी-शर्ती डोळे मिटून ‘अॅक्सेप्टेड’ म्हणत आहोत, तोवर आपल्यावर कुणी ना कुणी नकळत राज्य करत राहणार हे नक्की...
गौरी : मी माझ्या स्वत:च्या मनानं विचार न करता, दुसऱ्या कुणाच्या तरी सांगण्यानुसार विचार करते आहे; माझे विचार कुणी तरी नियंत्रित करीत आहे ही किती भयावह कल्पना आहे रे!
समीर : अगदीच... खरं तर ही प्रक्रिया आत्ताही सुरू झालीच आहे. तू पाहा ना! तू कुठं जातेस, काय खातेस, काय पितेस, काय खरेदी करतेस, काय सर्च करतेस या सगळ्यांवर त्यांचं लक्ष आहे बघ... तुला लगेच नोटिफिकेशन येतात बघ...
गौरी : हो, तुम्ही आत्ता हे घेतलंत, आता हे ट्राय करा... तुम्ही आत्ता हे पाहिलं, आता ते नक्की पाहा, तुम्हाला आवडेल... असे मेसेज येत असतात खरं...
समीर : तेच... सोशल मीडिया आपल्यावर राज्य करतोय... पुढेही करणार...
गौरी : गंमत बघ... प्रेमात आपण दुसऱ्याचा एवढा विचार करतो, त्याच्या विचारानं आपलं मन व्यापून जातं... तिथं आपल्याला गुलामगिरीचं फीलिंग येत नाही. पण इथं हे वेगळंच आहे.
समीर : याचं कारण तिथं आपण समजून-उमजून हे करीत असतो. इथं तसं नसतं. इथं उलट तुमच्या नकळत सगळं सुरू असतं... प्रेमाची आणि सोशल मीडियाची तुलना कशी होणार? दोन टोकं आहेत ही...
गौरी : हो रे... म्हणूनच मला आपलं प्रेमच छान वाटतं... आणि ती आपली खरी प्रायव्हेट गोष्ट आहे...
समीर (हसत) : हो ना... मग आता हा संवाद थांबवू या... आणि मुक्यानं संवाद साधू या...
गौरी (हसत) : कोटीबहाद्दरा, ‘लिप सर्व्हिस’ पुरे झाली... आता प्रत्यक्ष काम करू या...
---
२५
----
गंजल्या ओठांस माझ्या...
----------------------------------
गौरी : सम्या, काय रे? काय झालं? डोळ्यांत पाणी?
समीर : काही नाही अगं... आत्ता ते गाणं ऐकत होतो ना, ‘गंजल्या ओठांस माझ्या धार वज्राची मिळू दे...’ ते ऐकता ऐकता एकदम पाणीच आलं डोळ्यांतून... एरवी हे गाणं कधी रडवत नाही. पण आज आलं पाणी... सुरेश भटांचे शब्द, बाळासाहेबांची चाल आणि बुवांचा एकदम मनावर पकड घेणारा घनगंभीर स्वर... सगळंच जमून आलंय...
गौरी : अरे हो! ‘उंबरठा’मधलं ना हे गाणं... मलाही खूप आवडतं... पण खूप दिवसांत ऐकलं नाही...
समीर : ती सुलभा महाजन अशी टांग्यातून चाललेली असते. तो रस्ताही असा एकाकी वगैरे भासतो उगाच... ही सगळी स्वप्नं डोळ्यांत घेऊन निघलीय त्या अनोळखी बदलीच्या गावी... तिचे डोळे पाहा या गाण्यात... स्मिताच करू जाणे हे...
गौरी : किती भरभरून बोलतोयस अरे... पण आज अचानक या गाण्यानं का रडवलं बरं माझ्या राजाला?
समीर : आत कुठं तरी, काही तरी हललं असणार... प्रत्येक कलाकृतीचा आस्वाद घेताना आपण स्वत:शी ती सतत रिलेट करत असतो. हे मुद्दाम होतं असं नाही. पण काही तरी त्यातलं एकदम आपलंसं वाटून जातं... मी जेव्हा विशीत होतो आणि माझ्या आयुष्यात काहीच चांगलं घडत नव्हतं ना, तेव्हा हे गाणं माझ्या सोबतीला होतं.
गौरी : खरं सांगतोस? किती छान...! तू कधी बोलला नाहीस हे मला सम्या?
समीर : अगं, मुद्दाम बोललो नाही असं नाही. कधी कधी काही आठवणी काळाच्या उदरात गडप होऊन जातात. पण काही तरी ट्रिगर मिळाला, की त्या फसफसून वर येतात. आज हे गाणं ऐकताना तसं झालं असावं...
गौरी : अगदी खरंय... प्रत्येक गाण्याशी, त्यातल्या स्वरांशी, सूरांच्या हिंदोळ्याशी, प्रत्येक वाक्याशी, शब्दाशी आपला जीव कसा, कधी गुंतलेला असेल सांगता येत नाही हं...
समीर : यातलं शेवटचं जे कडवं आहे ना, ‘लाभू दे लाचार छाया मोठमोठ्यांना परंतु, तापल्या मातीत माझा घाम मानाने गळू दे’ हे जणू माझ्या आयुष्याचं ब्रीदवाक्य आहे बघ. त्या अडचणीच्या दिवसांत या शब्दांनीच आधार दिला होता. त्यामुळंच अडचणी आल्या, तरी चुकीच्या गोष्टी करण्याकडं कधी मन गेलं नाही.
गौरी : आई ग्ग... सम्या....
समीर : खरंच अगं... आणि हे कधीही तुटू नये...
गौरी (गळ्यात पडत) : मला माहितीय हे डार्लिंग... मला तू खूप खूप खूप आवडतोस यासाठीच... आणि आज रडलास ना माझ्यासमोर... हे असं रडणं, मोकळं होणं मला फार आवडतं. लोक अनेकदा आपल्या या खऱ्या भावना दडपून टाकतात आणि मुखवटे लावून जगतात. पण असं करू नये. हे असं मोकळं रडणं ही तुमच्यातल्या सच्च्या माणूसपणाची खूण असते, असं मला वाटतं बघ. आणि तू तसा आहेस, म्हणूनच मला आवडतोस. लव्ह यू!!
समीर (हसत) : आणि तू सोबत आहेस म्हणूनच माझी मैफल सुनी सुनी नाहीय गौरे...
गौरी (चिडवत) : आणि म्हणूनच मी तुला कधी ‘उंबरठा’ही ओलांडू देत नाही...
---
२६
----
वेदनेचा गाव...
----------------------
गौरी : काय सम्या, काय वाचतोयस एवढं मोबाइलमध्ये डोकं खुपसून?
समीर : अगं, हा एक मेसेज आलाय. त्यात एक खूप छान उल्लेख आहे. पण वाचताना एकदम काटाच आला अंगावर...
गौरी : काय रे मेसेज? वाच ना...
समीर : तुझ्या आनंदात, सुखात मला वाटेकरी नाही होता आलं, तरी चालेल; पण कधी दु:खी झालास तर त्या ओल्या पापण्यांत मला थोडा निवारा असू दे...
गौरी (संशयानं) : तुला कुणी पाठवला हा मेसेज पण?
समीर : अगं फॉरवर्ड आहे. माहिती नाही कुणाचा आहे, पण मला आवडला. पहिली ओवी कुणी लिहिली, पहिली शिवी कुणी दिली हे शोधणं जसं अशक्य आहे, तसंच व्हॉट्सअपवर पहिला मेसेज कोण फॉरवर्ड करतं हे सापडणं कठीण... एरवी मी लगेच डिलीट करत असतो. पण यात मला एकदम काही तरी टोचलं...
गौरी : हं खरंय. आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला मिळतात असं नाही. पण प्रेम उरतंच. मग ते असं व्यक्त होतं. प्रेमाच्या किती या परी असतात... प्रेम लपत नाहीच. प्रेम संपत तर मुळीच नाही. आयुष्य संपतं, सगळे भोग भोगून संपतात, पण तरी प्रेम दशांगुळे उरतंच...
समीर : आपल्याला तरी काही अशा प्रेमाचा अनुभव नाही बुवा. ज्यांना असं प्रेम लाभलं, ते भाग्यवानच म्हणायचे.
गौरी : सम्या, प्रेम ही फक्त घेण्याची गोष्ट नाही रे मुला. ती द्यायचीही गोष्ट आहे. इन फॅक्ट, द्यायचीच जास्त आहे. तू असं प्रेम देऊन तर बघ. तुलाही मग असा अनुभव येईल.
समीर : मला तरी प्रेमाचा हा प्रवास खडतरच जास्त वाटतो. हल्ली कुठे वेळआहे अगं कुणाला कुणासाठी एवढा? जो तो आपापल्या मर्यादेत, मर्यादित वकुबात या प्रेम नावाच्या अथांग भावनेचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो असं वाटतं.
गौरी : एवढं तरी कळतंच ना तुला. अरे, प्रेमाचा प्रवास म्हणजे वेदनेच्या गावाकडं जाणारा प्रवास आहे. पण ही वेदनासुद्धा कशी, गोड आहे. त्यात अनामिक आनंद आहे, हुरहुर आहे, रोमांच आहे.
समीर : पुलंचे पेस्तनकाका म्हणतात, तसं गॉड इज सफरिंग... त्या चालीवर म्हणावंसं वाटतं, की लव्ह इज सफरिंग... त्याची वेदना तर अपार असते, पण ती आपल्यावर कुणी तरी प्रेम करतंय या भावनेची स्निग्धताही सोबत घेऊन येते...
गौरी (हसत) : अगं बाई, छानच विश्लेषण चाललंय की...
समीर : अगं, सहज सुचलं हे एकदम. खरं सांगू का, प्रेम काय किंवा डोळ्यांत काल ते गाणं ऐकताना आलेले अश्रू काय, या सर्व भावना विश्लेषणाच्या पलीकडच्या आहेत. त्या जशा आहेत तशाच जगाव्यात....
गौरी : हो रे राजा, पण कधी कधी या भावनांचं व्यवस्थापन करावं लागतं. ते जमलं पाहिजे.
समीर : उत्कटता आणि व्यवस्थापन या दोन्ही गोष्टी एकमेकांसोबत जात नाहीत, गौरी.... अवघड आहे ते...
गौरी : म्हणूनच मी त्याला वेदनेच्या गावाकडं जाणारा प्रवास म्हणते... सोपा नाहीच. पण एव्हरेस्ट सर करणंही सोपं नसतंच ना...
समीर (हसत) : मला माझीच एक जुनी ओळ आठवली - तुझ्यासोबतच माझ्या ध्येयावरही मला प्रेम करायचं आहे...
---
२७
----
सरबराई अन् एप्रिल फूल
----------------------------------
समीर : आला, आला... वीकएंड आला... नाचू या, गाऊ या, आनंदे खेळू या...
गौरी (वैतागून) : अय, शांत हो, त्रस्त समंधा... हे सरबत पी वाळ्याचं...
समीर (सरबत घेत) : अहा, गौरे, काय चव आहे गं तुझ्या हाताला... एकच नं.
गौरी : हूं... माझ्या हाताला वगैरे काही नाही. विकत आणलंय ते. हल्ली सगळी सरबतं मिळतात बाजारात...
समीर : हो, माहितीय गं... पण तू जेव्हा तुझ्या हातानं साधं लिंबू-सरबतसुद्धा करून देतेस ना तेव्हा ते अमृततुल्य लागतं...
गौरी : मला तू असं आयतं हातात सरबत कधी देशील रे सोन्या?
समीर : देईन गं... या सुट्टीत मी तुझी सगळी सरबताई, आपलं, सरबराई करीन. मग तर झालं?
गौरी : उगाच कोट्या करू नकोस रे... कामं कर माझी एक-दोन...
समीर : अगं, एवढी तापू नकोस बये. आधीच बाहेर काय कमी तापलंय का ऊन? पण एक सांगू, आता खरंच पुढचे दोन महिने डोकं, म्हणजे एकूणच शरीर आणि मन थंड ठेवावं लागणार आहे बघ.
गौरी : हं... शरीराचा थंडावा मिळेलही; मनाच्या गारव्याचं काय करणार महाराज?
समीर : हो गं. खरंय. एकूणच मानसिक ‘ग्लोबल वॉर्मिंग’ सुरू आहे बघ सगळीकडं... जाऊ दे. फार गंभीर चर्चा करण्याचा माझा मूड नाहीय आज. आणि तू पण उगाच डोस देऊ नकोस. मला आत्तापासूनच वीकएंडचे डोहाळे लागलेयत.
गौरी : वा, वा... म्हणजे मी रोज डोस देते काय रे तुला? तू काय कमी आहेस का? कोट्या करतोस आणि मधूनच बोचकारे काढतोसच की...
समीर : ते जाऊ दे. ऐक ना... उद्या आपण रात्री मस्तपैकी वॉकला जाऊ या? आपल्या कोपऱ्यावर तो नवा आइस्क्रीमवाला आहे बघ नवा... तिकडं हल्ली गर्दी असते. त्याच्याकडं जाऊन मस्त आइस्क्रीम खाऊ या?
गौरी : हं... बघू... माझा मूड कसा असेल उद्या, त्यावर आहे.
समीर (वैतागून) : काय गं हे? मी एवढ्या उत्साहानं बोलतोय आणि तू त्यावर गार पाणी ओतते आहेस.
गौरी (हसत) : सम्या, अरे उन्हाळा वाढलाय. म्हणून गार पाणी ओततेय...
समीर : अगं, गार पाण्यावरून आठवलं... एक एप्रिलपासून रोज गार पाण्यानं अंघोळ माझी...
गौरी (चिडवत) : अंघोळच न करता, एप्रिल फूल करू नकोस म्हणजे झालं...
---
२८
----
'विवेक' आणि 'श्रद्धा'
-------------------
गौरी : काय रे सम्या, कुठं होतास एवढे दिवस?
समीर : अगं, काही नाही. वीक-एंडची कामं... आठवडा कसा जातो, तेच कळत नाही. मग शनिवार-रविवार जरा कंटाळाच येतो सगळ्या गोष्टींचा... पण बाकी कामं करायला हेच दोन दिवस असतात.
गौरी : मला वाटलं, कुठं सिद्धिविनायकाच्या किंवा 'दगडूशेठ'च्या लायनीत वगैरे थांबला होतास की काय?
समीर : एवढे दिवस?
गौरी : काही सांगता येत नाही बाबा... देवाच्या दारापुढची रांग दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळं तीन दिवस रांगेत थांबलो होतो, असं उद्या कुणी सांगितलं तर मला आश्चर्य वाटायचं नाही मुळीच.
समीर : देव आणि श्रद्धा हा फारच वैयक्तिक विषय झाला, गौरी. आपण त्यावर न बोललेलं बरं.
गौरी : अरे, हो की! मी कुठं काय म्हणतेय? आणि लोकांचं सोड, तुला मात्र म्हणूच शकते बरं का...
समीर : हे बघ, मी काही नास्तिक नाही. श्रद्धाळू आहे. गणपतीवर तर आहेच श्रद्धा माझी...
गौरी : नुसता श्रद्धाळू नाहीस, तर देवताळा आहेस तू अगदी... मला सगळं माहितीय.
समीर : हे बघ, कर्मकांडांवर माझाही विश्वास नाही. पण गणपतीवर खूप श्रद्धा आहे. मला सणावाराला, किंवा एरवीही गणपतीच्या मंदिरात जाऊन बसायला छान वाटतं. मला तिथं 'सुकून' की काय म्हणतात, तो मिळतो.
गौरी : हे बघ, आपली श्रद्धा आपल्यापाशी असावी. लोकांना त्याचा त्रास होता कामा नये, एवढंच मला म्हणायचंय. आपल्याकडं काय होतं, लोक आपल्या या भावना, श्रद्धा दुसऱ्यांवर लादतात ना, त्याची मला चीड येते. म्हणजे लोकांची गैरसोय करून, रस्ते बंद करून तुम्ही देव-देव कसले करता? मनात पवित्र भावना असली, म्हणजे झालं. पण गणपतीच्या रांगेत नारळ-फुलं घेऊन उभं राहायचं आणि नजर सगळी गर्दीतल्या देखण्या बायकांवर ठेवायची, याला काय अर्थ आहे?
समीर : तुझं म्हणणं शंभर टक्के खरं आहे गौरी. पण विवेक आणि श्रद्धा या गोष्टी एकमेकांसोबत जात नाहीत.
गौरी : न जायला काय झालं? चांगल्या स्वयंपाकात कसं अचूक प्रमाण लागतं सगळं, तसं आयुष्यातही या विवेकाचं आणि श्रद्धेचं स्थान व प्रमाण नेमकं असलं पाहिजे. मग आपोआप सगळं नीट होतं.
समीर : पण हे प्रमाण ठरवायचं कुणी?
गौरी : आपणच. साधी कसोटी आहे. दुसऱ्याला त्रास होऊ नये, असं शिकवतो तो विवेक आणि स्वतःला त्रास होऊ नये, असं शिकवते ती श्रद्धा. एवढं कळलं तरी पुरेसं आहे, माझ्या राजा...
समीर (हसत) : तुम्हाला माझा नमस्कार आहे बाईसाहेब... चला, भक्ताला नेहमीचा प्रसाद द्या...
गौरी (चिडवत) : अरे, उपास आहे ना तुझा... उगाच श्रद्धा दुखवायची रे तुझी...
समीर : एक काम करू. तू तुझ्या विवेकावर श्रद्धा ठेव... मी माझी श्रद्धा विवेकानं वापरतो...
गौरी (हसत) : गुड बॉय... आता प्रसाद द्यावाच लागेल...
----
२९
----
‘हम साथ साथ हैं...’
---------------------------
गौरी : हा हा हा हा... ही ही ही.. हू हू हू... हे हे हे...
समीर : काय गं! बरी आहेस ना... एवढी का हसते आहेस?
गौरी : अरे, काही नाही... हे व्हॉट्सअपवरचे विनोद कमाल असतात काही काही... काय डोकं लावतात बघ ना... आता हे ‘हम साथ साथ है’चं पोस्टर पाठवलंय कुणी तरी... फक्त त्यातला सलमान गायब करून... शिवाय बाकी काळवीट या शब्दावर श्लेष करणारे विनोद यायला सुरुवात झालीच आहे.
समीर : पण ‘वीट’ शब्दावर पुलंनी जी कोटी केली आहे, ती अजरामर आहे.
गौरी : हो रे... एका हातात घरची आणि एका हातात बाजारची... अशा विटा घेऊन हिंडत होतो... एखाद्या गोष्टीचा कंटाळा येण्याला ‘वीट’ येणं का म्हणतात हे त्या दिवशी मला कळलं... हा हा हा... मी मरते दर वेळी ते ऐकून...
समीर : म्हणूनच तो विनोद श्रेष्ठ. एवढ्या वर्षांनंतरही आपल्या लक्षात राहिलाय.. बाकी हे विनोद एका दिवसाचे धनी... दुसऱ्या दिवशी दुसरा विषय आला, की हे विस्मरणात जातात.
गौरी : असू दे ना. काही गोष्टींचं आयुष्य तेवढंच असतं. त्याची मजा तेवढ्यापुरतीच असते. प्रत्येक गोष्ट अजरामर व्हायचा वसा घेऊन बसली तर अवघड व्हायचं. मुंगीचं आयुष्य मुंगीएवढं... कासवाचं कासवाएवढं... दोघंही किती जगले यापेक्षा कसे जगले हे महत्त्वाचं...
समीर : खरंय. आपल्या जगण्याचं प्रयोजन कळलं, की जगणं अर्थपूर्ण होतं. अनेकांना ते मरेपर्यंत कळत नाही.
गौरी : नुसतं प्रयोजन कळून पण उपयोग नसतो रे सम्या. त्या प्रयोजनासाठी वाट्टेल ते कष्ट घेऊन जगण्याची तयारी असावी लागते. परत पुलंच्या भाषेत सांगायचं तर ही ‘खुशीची फकिरी’... आणि ती खरंच अजब असते. एखाद्या रावसाहेबांनाच जमते. सब के बस की बात नहीं!
समीर : हे मान्य आहे. मी फक्त विनोदाच्या दर्जाबद्दल बोलत होतो. विनोद अल्पायुषी असायला हरकत नाही. पण अल्पमती नसावा.
गौरी : हे बघ. जग केवढं, तर ज्याच्या त्याच्या डोक्याएवढं...तू कशाला एवढा लोड घेतो आहेस? हे सलमानवर आज जोक टाकून त्याची खिल्ली उडवणारे लोक उद्या त्याचा सिनेमा रीलीज झाला की बघायला रांगेत सगळ्यांत पुढे असतील की नाही बघ. तत्त्व ही सोपी गोष्ट नाही राजा. ती नुसती बोलायची गोष्ट नसते. पाळता यावी लागते.
समीर : सलमान काय किंवा संजय दत्त काय, ‘या देशाचा कायदा पाळू या’ एवढं एक साधं तत्त्व त्यांनी पाळलं असतं, तरी ही वेळ आली नसती.
गौरी : याबाबत हे सेलिब्रिटी आणि सामान्य लोक यांच्यातही काही फरक नाही. ते मोठे आहेत म्हणून चर्चा होते आणि सामान्य माणसाची होत नाही, एवढंच काय ते!
समीर : खरंय. याबाबत आपलं एकमत झालंय कधी नाही ते...
गौरी (हसत) : हो रे... याबाबत ‘हम साथ साथ है...’
---
३०
---
साई सुट्ट्यो ऽऽ...
---------------------
समीर : काय गं गौरी, काय बघतेयस खाली?
गौरी : अरे, मुलांचा दंगा सुरू झाला बघ सोसायटीतल्या... सुट्ट्या सुरू झाल्या वाटतं...
समीर : हो, एवढा गोंधळ म्हणजे नक्कीच सुट्ट्या लागल्या. आता सोसायटीतल्या ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी सुरू होणार...
गौरी : अरे, नेमकी ती या लोकांच्या दुपारच्या झोपेची वेळ असते आणि ही मुलं दंगा करत बसतात. त्यामुळं सगळ्या आजी-आजोबा मंडळींची चिडचिड होते. हे अगदी समजण्यासारखं आहे. आपल्याकडं आधीच एवढं ध्वनिप्रदूषण आहे, की सगळ्यांची चिडचिड लेव्हल प्रचंड वाढली आहे.
समीर : अगं हो, पण मुलांनी खेळायचं कुठं? जागा तरी आहे का? त्यात हल्ली सिंगल चाइल्ड असतात बहुतेकांचे... त्यांना भावंडं नसतात. एरवी एकटीच आपापल्या घरात असतात ही मुलं... सुट्टीत जरा मित्रांबरोबर धांगडधिंगा करणारच...
गौरी : अरे हो... हा मुलांचा प्रश्न नाहीच. हा त्यांच्या पालकांचा प्रश्न आहे. आता सुट्टीत आई-बाबांना वाटतं, की हा किंवा ही दिवसभर घरी बसून राहू नये. मग एक तर ही मुलं असा दंगा करीत सोसायटीतच फिरतात नाही तर वेगवेगळ्या क्लासना, सुट्टीतल्या शिबिरांना तरी जातात.
समीर : ते मला माहितीय गं... आमच्या लहानपणी...
गौरी (अडवत, चिडवत) : बास... बास... तुझ्या लहानपणीच्या कथा सुरू करू नकोस. हज्जारदा ऐकल्या आहेत. आणि तुझं लहानपण तुझ्याबरोबरच संपलं. आताच्या मुलांसोबत त्याची तुलनाच करू नकोस. उगाच नॉस्टॅल्जिक कढ काढायचे... आमच्या गावाला असं होतं अन् आमच्या वाड्यात तसं होतं... होतं तर होतं! आता नाहीये ना... मग बास...
समीर : अगं, एवढा त्रागा का करतेयस? आपलं बालपण आणि विशेषतः बालपणी घालविलेल्या सुट्ट्या हा प्रत्येकाच्या मनातला एक हळवा कोपरा असतो.
गौरी : मग तो तुमचा कोपरा कोपऱ्यातच ठेवा. आम्हाला आता तुमची ती जुनी टेप ऐकण्यात मुळीच रस नाही. आत्ताच्या मुलांसाठी काही करू शकतोस का? बोल... तू बरा लिहितोस. मग लिही काही तरी या मुलांसाठी... नाही तर त्यांना छान काही तरी वाचून दाखव... किंवा फिरायला ने कुठं तरी...
समीर : थोडक्यात, आपलंच शिबिर सुरू करायचं म्हण की...
गौरी (हसत) : हो, कर सुरू... सगळ्यांत आधी मी येईन तुझ्या शिबिराला...
समीर (चिडवत) : मग दोघांचंच करू या की शिबिर... (डोळा मारत) भरपूर योगासने...
गौरी (उशी फेकत) : तू लवकरच शवासनात जाणार आहेस, सम्या...
---
#सम्याआणिगौरीच्यागोष्टी #सीझन ३
------------