16 Oct 2016

दिवाळी लेख

दिवाळी... 
------------
दिवाळी आल्याचं निसर्गाला बरोबर कसं काय कळतं? कसा हलकेच हवेत गारवा येतो? चोरपावलांनी हळूच मागे येऊन डोळे झाकत मिठी घालणाऱ्या सखीसारखी थंडी बरोबर पहाटे कशी आपल्या दुलईत शिरते? दसऱ्याच्या आधी नदीवर धुऊन वाळवलेल्या गोधडीसारखी सगळी झाडं-पानं-फुलं एकदम अशी सुस्नात आणि हिरवी-स्वच्छ कशी काय दिसायला लागतात? निसर्गात आधी दिवाळी येते आणि मग ती हळूच आपल्या तना-मनांत उतरते, हे खरं. आपले सगळे सण-समारंभ असेच निसर्गाशी जैव नातं जोडून आहेत. म्हणूनच तर चार महिने दंगा घालणारा पाऊस हलके हलके एक्झिट घेतो आणि मग सगळा भवताल हळुवारपणे थंडीच्या आधीन होतो. या वातावरणातल्या बदलाची पण मजा असते. एखादी मैफल रंगत रंगत जावी, तसा तो आस्ते आस्ते आपल्यात भिनतो. एकदा या बदलाची चाहूल लागली, की मग घरही हसू लागतं. दसऱ्यानिमित्त घरातली जळमटं निघालेलीच असतात. कोपरा न् कोपरा लख्ख उजळलेला असतो. पंख्यावरची, कपाटांवरची धूळ झटकलेली असते. पाऊस संपून गेल्यावर जशी वातावरणातील धूळ खाली बसते आणि अगदी दूरवरचा आसमंतही व्यवस्थित न्याहाळता येतो, तसं घरातला प्रत्येक इंच न् इंच स्वच्छ आणि सुंदर दिसायला लागतो. दसऱ्यानिमित्त दारावर, गॅलरीत लावलेले हार आणि तिथल्या झेंडूचा दरवळ कायम असतो. हार सुकले तरी लवकर काढावेसे वाटत नाहीत. उत्सवी वातावरण असं सगळीकडं भरून राहिलेलं असतं. तेच मग अलवारपणे मनातही उतरतं. मेंदूत कसल्याशा अचाट संदेशांची देवाणघेवाण सुरू होते... मनातली दिवाळी सुरू होते ती तिथंच...
एकदा का मन सज्ज झालं, की मग सणही रंगू लागतो... आपण माणसं मूलतः सामाजिक प्राणी असल्यानं आपल्याला कळपात, घोळक्यात राहायला आवडतं. आपले सण-उत्सवही असेच गर्दीच्या साक्षीनं रंगतात. मग मनातल्या उत्सवाला भौतिक सुखांचं मखर हवंसं वाटू लागतं. दिवाळीनिमित्त बाजार फुललेलाच असतो. मग ही सुखाची साधनं दिमाखात घरात येतात. कधी जुनी जातात अन् नवी येतात... कधी एकदम नवीनच येतात... त्यांच्या अस्तित्वानं घराचा गाभारा भरायला लागतो. प्रसन्नतेचा अनाहत नाद मग ऐकू येऊ लागतो. काही तरी सुखद भावना रोमरोमांतून फुलून येते. सगळं जग कसं सुंदर आहे, असं वाटायला लागतं. मनातले सगळे विकार काही काळापुरते का होईना, कुलूपबंद होतात. अष्टसात्त्विक भाव प्रकटतात. चेहरा सौम्य होतो, वक्ररेषा हसऱ्या होतात... शरीर असा प्रतिसाद देऊ लागतं आणि मग या मोठ्या सणाची जाणीव जागृत होते... 
हे सगळं पाहिलं, की दिवाळीला सर्व सणांची महाराणी का म्हणत असतील, ते लक्षात येतं. चांगला आठवडाभर चालणारा सण. प्रत्येक दिवसाचं वेगळं महत्त्व. आणि वर्षानुवर्षं दिवाळीची प्रतीकंही ठरलेली... तीपण किती अर्थपूर्ण! घरासमोर टांगलेला आकाशकंदील, पणत्यांची रांग, फुलबाज्या, भुईनळे, भुईचक्रं ही सगळी उजेडाची प्रतीकं! आसमंताबरोबरच मनातला काळोखही मिटवून टाकणारी; जगायला सदैव बळ देणारी, आशादायक अशी! तो तीनदा हातातून निसटून खाली पडणारा मोती साबण म्हणजे स्वच्छतेचं प्रतीक... तनाप्रमाणंच त्याला आपलं मनही स्वच्छ करता आलं असतं तर, असं कित्येकदा वाटून जातं. सुवासिक उटणं म्हणजे या दिवसांतल्या निरामय आरोग्याचं प्रतीक! पत्नीसाठी पाडवा, तर बहिणीसाठी भाऊबीज... कुटुंबाच्या समृद्धीसाठी लक्ष्मीपूजन आणि धनत्रयोदशी... सर्व कुटुंबाच्या एकोप्याचा जणू संदेश देणारी वसुबारस... दिवाळीतला प्रत्येक दिवस असा आपापला अर्थ आणि सांगावा घेऊन येत असतो. त्यांचा अर्थ आपण नीट समजून घेतला तर दिवाळीचा झगमगाट आणखी वाढलाच म्हणून समजा. दिवाळी आपल्या सोबत अनेक प्रकारचे आनंद घेऊन येते. दिवाळीचा फराळ हा त्यातला एक जिव्हातृप्ती करणारा आनंद! कितीही नाही असं ठरवलं तरी ज्याचा मनमुराद आस्वाद घेतल्याशिवाय समाधान वाटत नाही, असं हे खाणं! यासोबतच खास आपल्या प्रांतात मिळणारा दिवाळीचा आनंद म्हणजे दिवाळी अंक. हे आपलं खास वैशिष्ट्य. चकल्या आणि चिवड्याचे बकाणे भरत भरत दिवाळी अंकातल्या साहित्याचा आनंद लुटणं हे आपल्यासाठी परमसुखाचं निधान! एकही दिवाळी अंक कधी घेतला नाही, असं मराठी घर असेल असं वाटत नाही. आपल्या जगण्याचा अविभाज्य भागच झालाय आता तो...
पूर्वी दिवाळीनिमित्त नातेवाइक एकमेकांकडे जायचे... दुसऱ्या गावाला जाता यायचं. आता हे प्रमाण निदान शहरांत तरी कमी झालंय. त्याऐवजी लोक आता पर्यटनस्थळी दिवाळी साजरी करतात. शहरातल्या गजबजाटापासून, कोलाहलापासून दूर जावंसं वाटणं आणि निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यावरच 'दिवाळी' वाटणं, हेही स्वाभाविकच आहे. विशेषतः आर्थिक संपन्नता आल्यानंतर सणाचे आणि एकूणच सेलिब्रेशनचे निकष बदलतात, हे खरं. पूर्वी बारा महिने गोडधोड खायला मिळायची सोय नव्हती, ऐपतही नव्हती. म्हणून दिवाळीत मिळणाऱ्या गोडाधोडाचं अप्रूप असे. तीच गोष्ट कपड्यांची किंवा अन्य खरेदीची! आता बारा महिने शॉपिंग सुरूच असतं आणि गोड-धोडाचं तर बोलूच नका. आपण पूर्वी निदान काही तरी निमित्त काढून सेलिब्रेशन करायचो. आता निमित्ताचीही गरज उरली नाही. याचं कारण आपली वाढलेली व्यवधानं आणि त्याच्या व्यस्त प्रमाणात मिळणारा मोकळा वेळ. त्यामुळं जेव्हा कामातून सुट्टी मिळेल किंवा रजा मिळेल तीच आपली दिवाळी आणि तोच आपला दसरा असतो. किंबहुना आता शहरांत तरी हीच मानसिकता वाढू पाहतेय. आणि त्यात गैर काही नाही. असं असलं, तरी दिवाळीचा माहौल हे सगळं विसरायला लावतो आणि दिवाळीचं म्हणून खास असं वेगळं सेलिब्रेशन आपण करतोच करतो... 
 याचं कारण दिवाळीचं स्वरूप बदललं असेलही; पण तिचा अंतरात्मा तोच आहे. तिचं सांगणं तेच आहे. दिवाळी बदलत चाललीय असं, मला वाटतं, गेल्या शंभर वर्षांपासून लोक बोलत असतील. पण दर वेळा तो आकाशकंदील आणून घरासमोर आपल्या आनंदाची जणू प्रकाशमय गुढी उभारण्याची ती ऊर्मी कायमच असते. हा सण प्रकाशाचा आहे, त्यामुळं अखंड ऊर्जादायी आहे. वर्षभरात आपल्या मनात साठलेलं नैराश्य, मळभ दूर करून नव्या उत्साहानं जगण्याला सामोरं जाण्याची प्रेरणा हा सण देतो. दिवाळीच्या वेळी घराबाहेर, उंबऱ्याच्या कोपऱ्यात शांतपणे तेवत असलेली पणती जणू काही आपलंच इंधन बनते. तिचा तो इवलासा प्रकाशही आपल्याला आतून उजळवून टाकतो. आपल्या देशातला एकही भाग किंवा कोपरा असा नसेल, की तिथं दिवाळी साजरी होत नाही. सगळ्या देशवासीयांना उल्हसित करणारा हा भलताच ऊबदार सण आहे. दिवाळी आवडते, ती या अशा कारणांसाठी... निसर्गही तिच्या स्वागतासाठी कसा तयार होऊन उभा असतो. आपल्या चिमुकल्या जगण्याला प्रकाशाचा अर्थ देणारा हा सण आणि आपल्याला भौतिक सुखांच्या मखरातून काढून सृष्टीच्या कुशीत जोजवू पाहणारा निसर्ग... दोघेही भव्य आणि उदात्त! दोघांचंही सांगणं तसंच - जगणं समृद्ध करणारं! निसर्गापासून दूर जाऊ नका आणि आतला विवेकाचा प्रकाश सदैव प्रज्वलित राहू द्या, एवढ्या दोन गोष्टी कधीच विसरायच्या नाहीत. मग आयुष्यभर दिवाळीच दिवाळी! 
---

(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, पुणे; संवाद पुरवणी; १६ ऑक्टोबर २०१६) 
----

11 Oct 2016

अमिताभ @ ७५

मोठा ‘माणूस’ 
----------------



अमिताभ बच्चनच्या वागण्या-बोलण्यात, वावरण्यात एक खानदानी आदब दिसते. अलाहाबादच्या श्रीवास्तवांचे संस्कार लख्ख दिसतात. पिता थोर कवी आणि साहित्यिक असल्याचा सर्वाधिक परिणाम अमिताभच्या व्यक्तिमत्त्वावर झालेला स्पष्ट कळून येतो. अमिताभ अभिनेता म्हणून किती श्रेष्ठ आहे किंवा महान आहे, यावर कदाचित एक वेळ चर्चा होऊ शकेल. मात्र, तो एक उत्तम ‘माणूस’ आहे, याबद्दल दुमत होण्याची शक्यता नाही. आजच्या काळात हे माणूसपण दिवसेंदिवस दुर्मीळ होत चाललेलं असताना अमिताभसारख्या बुजुर्ग कलाकाराचं आपल्या आसपास असणं हे किती सुखावह आणि आश्वासक आहे!
अमिताभच्या तरुणपणी जेव्हा तो ‘अँग्री यंग मॅन’ साकारत होता, तेव्हा त्याला प्रत्यक्ष पाहण्याचं भाग्य आम्हाला लाभलं नाही. आम्ही कळत्या वयाचे झालो, तेव्हा अमिताभच्या कारकि‍र्दीचा पूर्वार्ध संपून गेला होता. त्याचं पडद्यापलीकडचं अस्तित्व तेव्हा फार काही जाणवायचं नाही. त्या काळात माध्यमेही मर्यादित होती. शिवाय अमिताभ तेव्हा काही फार मीडिया-फ्रेंडली नव्हता, म्हणे. ते काही असो... अमिताभमधलं हे सुसंस्कृत माणूसपण भावलं ते त्याच्या उतारवयात! दुसऱ्या इनिंगमध्ये म्हणजे साधारणतः ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये अमिताभला आपण पाहिलं, तेव्हा मात्र त्याच्यातला हा गुणविशेष सर्वांच्याच प्रकर्षानं लक्षात आला. एक तर तेव्हा तो जवळपास ५६-५७ वर्षांचा झाला होता. या वयात येणारी एक गोड परिपक्वता त्याच्या अंगात ठायी ठायी भिनली होती. या कार्यक्रमातला त्याचा वावर बघण्यासारखा होता. अमिताभ तेव्हा ऑलरेडी ‘महानायक’ पदाला पोचला होता. सामान्य लोकांना थेट त्याच्याशी संवाद साधण्याची मिळालेली संधी आणि स्वतःच्या प्रतिमेची जाणीव असूनही अमिताभचं त्या सर्वसामान्य लोकांशी वागणं खूप सहज होतं. अमिताभच्या वागण्या-बोलण्यातली नम्रता, आदब कमालीची मोहवणारी होती. थोडं यश मिळालं, की माणसं बहकल्यासारखी वागतात. डोक्यात हवा गेल्यासारखी उडायला लागतात. अमिताभसारखं उत्तुंग यश तर फारच थोड्यांना मिळतं. या पार्श्वभूमीवर त्याचं हे सार्वजनिक कार्यक्रमातलं वागणं खूपच आपुलकीचं आणि संस्कारशील होतं. कुणी म्हणेल, अशा कार्यक्रमांत मोठे लोक मुद्दाम तसे वागतात-बोलतात. हे काही अंशी खरंही आहे. मात्र, अमिताभच्या वागण्यात-बोलण्यात कुठेही हा बेतीवपणा दिसला नाही. तो सुसंस्कृतपणा त्याच्या रक्तातच होता; असला पाहिजे. सर्वसामान्य लोकांशी, विशेषतः महिलांशी बोलताना, त्यांना त्या खुर्चीवर बसवताना, त्यांच्याशी हास्य-विनोद करताना अमिताभ कुठंही अभिनय करत होता वा त्याचा हा सगळा बेतीव सभ्यपणा होता, असं कुठंही वाटलं नाही. किंबहुना अशा कार्यक्रमात यजमानानं कसं वागावं-बोलावं याचा वस्तुपाठच त्यानं घालून दिला. अमिताभच्या या आदबशीर वागण्यानं घरातल्या एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीविषयी वाटतो तसा आदर त्याच्याविषयी सर्वांना वाटू लागला हे निश्चित. 
अमिताभच्या आयुष्याकडं नीट पाहिलं, तर लक्षात येतं, की एखाद्या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याप्रमाणेच त्याच्याही आयुष्यात अनेक चढ-उतार आले. सुख-दुःखाचे प्रसंग आले, आशा-निराशेचे क्षण आले. अमिताभचं कुटुंब म्हणजे अलाहाबादमधलं एक प्रतिष्ठित कुटुंब. वडिलांची कीर्ती केवळ त्या शहरातच नव्हे, तर देशभरात पसरलेली. शिवाय इंदिरा गांधी आणि एकूणच नेहरू-गांधी घराण्याशी अत्यंत जवळचे संबंध. राजीव गांधी आणि अमिताभ हे बालमित्र. अशा वेळी अमिताभचं आयुष्य सर्वसामान्यांसारखं असणार नव्हतं, हे उघडच होतं. पण एका वेगळ्या पातळीवर अमिताभलाही संघर्ष टळला नाहीच. त्याचं आयुष्य यशापयशाच्या रोलरकोस्टर राइडसारखं भासतं. त्याला सुरुवातीला रेडिओवर मिळालेला नकार, नंतर लंबूटांगा नट म्हणून होणारी हेटाळणी, मग एकदम मोठं यश, सुपरस्टारची बिरुदावली, मग प्रेमाचा त्रिकोण, नंतर अचानक झालेला जीवघेणा अपघात, नंतर राजकारणात प्रवेश, तिथली अपयशी खेळी, मग पुन्हा खासदारकीचा राजीनामा, नंतर चित्रपटसृष्टीत पुनरागमन, चुकीच्या चित्रपटांची निवड, मग पुन्हा काही चित्रपटांना यश, मग दीर्घकाळ विश्रांती, मग कंपनीची दिवाळखोरी, मग पुन्हा त्यातून सावरण्यासाठी राजकीय मित्रांची मदत, नंतर पुन्हा सेकंड इनिंग, ‘कौन बनेगा करोडपती’चं तुफान यश आणि त्यात एक से बढकर एक चांगल्या भूमिका साकारण्याची संधी...
अमिताभच्या या सर्व प्रवासात सर्वसामान्यांना आपल्याही आयुष्याशी असलेलं साम्य जाणवतं. अमिताभकडं असलेलं वलय आणि पैसा यांची तुलना सामान्यांशी होत नसली तरी हे साम्य त्यांना जाणवतं, हे विशेष! याचं कारण अमिताभनं स्वतः कधी आपल्या या स्थानाचा आणि वलयाचा सामान्यांसमोर गवगवा केलेला नाही आणि हेच त्याच्या ‘मोठा माणूस’ असण्याचं गमक आहे.
---

(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती : ११ ऑक्टोबर २०१६*)

(* अमिताभच्या पंचाहत्तराव्या वर्षातील पदार्पणानिमित्त केलेल्या विशेष पानातील लेख.)
---

6 Oct 2016

ओम पुरीवरचा लेख

ओम, पुरे!
---------
राजकारण, सिनेमा आणि क्रिकेट या तीन विषयांवर बोलायला भारतात कुणालाही तज्ज्ञ असायची गरज असत नाही; कारण सगळेच जण या तीन विषयांत ‘तज्ज्ञ’ असतात, असं नेहमी गमतीनं बोललं जातं. भारतीयांचं या तिन्ही विषयांविषयीचं अतिरेकी प्रेम आणि नको तेवढा उत्साह लक्षात घेता, ते सार्थही आहे. पण कधी कधी मात्र अति होतं आणि सर्वत्र संतापाची लाट पसरते. सध्या पाकिस्तानबरोबर आपला देश एका गंभीर तणावातून जात आहे. अशा वातावरणात देशवासीयांकडून मर्यादशील वक्तव्यांची अपेक्षा करणं गैर नाही. पण तसं झालं तर अजून काय पाहिजे? सध्या ओम पुरीपासून ते सलमान खानपर्यंत सगळे सिनेमा कलाकार जे काही बडबडत सुटले आहेत, ते पाहता ‘ओम, पुरे!’ असंच म्हणायची वेळ आली आहे, हे निश्चित.
कलाकारांना, त्यातही हिंदी सिनेमांत काम करणाऱ्या कलाकारांना आपल्या देशात एक विशेष ‘स्टेटस’ आहे. म्हणजे सरकारनं किंवा लोकांनी त्यांना हे ‘स्टेटस’ दिलंय असं नाही; तर त्या लोकांनीच स्वतःला ते बहाल केलंय. त्यांना असं वाटतं, की ते सुपरस्टार किंवा लोकप्रिय कलाकार आहेत, त्यामुळं त्यांना या देशात प्रत्येक गोष्टीत मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. नुसता अधिकार आहे असं नाही; तर लोकांनी ते ऐकलं पाहिजे. याचं कारण त्यांना जवळपास प्रत्येक गोष्टीतलं सगळं काही कळतं.
ओम पुरी हे हिंदी चित्रपटसृष्टीतले नामांकित कलाकार. कलात्मक आणि समांतर सिनेमांमधला एक महत्त्वाचा चेहरा. आपल्याकडे नॉर्मल कलाकारांपेक्षा समांतर कलाकारांना आणखीनच एक अतिविशेष ‘स्टेटस’ आहे. आपल्या देशात कलात्मक आणि समांतर सिनेमांची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या या कलाकारांचं योगदान निश्चितच श्रेष्ठ दर्जाचं आहे, यात वाद नाही. पण असं केल्यानंतर आपल्याला जगातल्या प्रत्येक घटनेवर भाष्य करण्याचा जन्मसिद्ध अधिकार मिळतो, असा समज त्यांच्यात कुठून वाढीस लागतो, हे अनाकलनीय आहे. ओम पुरीही त्याला अपवाद नाहीत. म्हणूनच परवा ते दूरचित्रवाणीवरील चर्चेत बरळले. हो, ते जे काही बोलले त्याला आणि त्यांच्या त्या अवस्थेतील बडबडीला आपल्याकडे ‘बरळणे’ हाच एक चपखल शब्द आहे. सध्याच्या तणावाच्या स्थितीत पाकिस्तानच्या कलाकारांनी भारताविरुद्ध सुरू असलेल्या दहशतवादाचा किमान निषेध तरी करायला पाहिजे की नको, असा साधा प्रश्न होता. त्यावर ओम पुरी यांनी अद्वातद्वा प्रत्युत्तरं तर दिलीच; पण कहर म्हणजे ‘त्या जवानांना कुणी आर्मी जॉइन करायला सांगितली होती?’ असं अत्यंत बेमुर्वत व अश्लाघ्य वक्तव्य करून सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. ओम पुरी हे वक्तव्य करताना नक्कीच मद्याच्या अमलाखाली असावेत, असा संशय घ्यायला जागा आहे. त्यामुळं त्या या बेताल वक्तव्याकडं दुर्लक्ष करायला हवं, असं कुणी म्हणेल. पण तसं असतं तर ओम पुरी यांनी कदाचित दुसऱ्या दिवशी माफी मागितली असती वा दिलगिरी व्यक्त केली असती. तशी त्यांनी ती दुसऱ्या दिवशी मागितलीही; पण दुसऱ्या दिवशी दुसऱ्या एका वाहिनीवर बोलताना त्यांच्यातला उर्मटपणा कायमच राहिला. याही वेळी ते मद्यप्राशन करूनच बोलत असावेत, असं वाटण्याजोगी परिस्थिती दिसत होती. एके काळी उत्तमोत्तम भूमिका करून देशभरातल्या रसिकांची वाहव्वा मिळवणाऱ्या या कलाकाराची अवस्था बघवत नव्हती. त्यांना स्वतःचं एक वाक्यही नीट बोलता येत नव्हतं की त्याचं समर्थन नीट करता येत नव्हतं. ‘मला आर्मीच्या कोर्टात न्या; मला फाशी द्या,’ असं काय वाट्टेल ती बडबड ते करीत होते. एका मोठ्या कलाकाराचं हे जाहीर अधःपतन अक्षरशः केविलवाणं आणि त्यांच्यासाठी लाजीरवाणं होतं. कलाकाराला त्यांची प्रतिमा बनवायला आयुष्य खर्च करावं लागतं, पण तीच प्रतिमा नष्ट होण्यास केवळ एक मिनिटही पुरेसं ठरतं, असं जे म्हणतात त्याचा शब्दशः प्रत्यय आला.
ओम पुरी काय किंवा सलमान खान काय, किंवा पाकिस्तानचा वा तिथल्या कलाकारांचा अष्टौप्रहर पुळका येणारे महेश भट किंवा शाहरुख खानसारखे लोक काय... हे नक्की कुठल्या जगात वावरतात, असा प्रश्न पडतो. सामान्य माणसाशी, त्यांच्या भावभावनांशी यांचा कुठलाही कनेक्ट राहिलेला नाही, हे वारंवार दिसून येतं. हस्तिदंती मनोऱ्यात राहून, स्वप्रतिमेशी अखंड प्रेमालाप करणारे हे सगळे तकलादू लोक... यांना सामान्य माणसाच्या सुख-दुःखाशी काय घेणं-देणं आहे? वास्तविक ओम पुरी हा कलाकार असा नाही. त्यांनी अनेक समांतर वा कलात्मक सिनेमांत सामान्य माणसांचीच कथा आणि व्यथा मांडली आहे. ‘अर्धसत्य’पासून ‘धूप’पर्यंत अनेक उदाहरणं सांगता येतील. मग असं असताना त्यांच्या प्रत्यक्ष जगण्यात या पडद्यावरच्या संवेदनशीलतेचा थोडा तरी अंश का येऊ नये? याचं कारण कदाचित सामान्य माणसाच्या देशप्रेमात कुठलाही व्यवहार दडलेला नसतो आणि या कलाकारांची प्रत्येक कृती त्यांचं व्यावहारिक यश आणि प्रतिमा यांचा सौदा केल्याशिवाय घडतच नाही, यात असावं. प्रत्येकाचे कुठे ना कुठे ‘स्टेक्स’ वा हितसंबंध गुंतलेले असतात. असं असेल तर यांनी किमान गप्प बसून तरी हे हितसंबंध सांभाळत बसावं. तर तसंही नाही. ‘आपणच कसे शहाणे आणि तुम्ही सगळे गाढव’ हे सांगण्याची यांची अहमहमिका लागलेली असते. मग स्वतःच्या बेताल आणि खोट्या वक्तव्यांची समर्थनं करण्यासाठी यांना कलास्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य असल्या बेगडी भावनांचा आधार घ्यावा लागतो.
कलाकारांचं स्वातंत्र्य किंवा लोकशाहीनं दिलेलं भाषण स्वातंत्र्य आहेच ना! ते सगळेच जण मान्य करतात. पण लोकशाहीनं दिलेले हे सर्व हक्क नेहमी ‘कंडिशण्ड’ असतात. याला सदैव अटी व शर्ती लागू असतात. या अटी व शर्ती अर्थातच लोकशाहीपूरक खुल्या वातावरणाच्या आणि सर्वांना समान न्यायाच्या असतात. भारत आणि पाकिस्तान यांच्यातले सध्याचे अत्यंत तणावाचे संबंध लक्षात घेता, इथं सर्वसामान्य वातावरणातले एरवीचे नियम लागू होत नाहीत, हे लक्षात घेतलं पाहिजे. इथं आपला देश आणि त्याचे हितसंबंध हेच सर्वोच्च प्राधान्याचे असले पाहिजेत; तुमचे भाषण स्वातंत्र्य वगैरे नंतर! 
 ओम पुरी आणि सलमान यांना एकाच मापात मोजायचं एरवी कारण नाही. पण पाकिस्तानसारख्या संवेदनशील विषयावर बोलून आणि पाकिस्तानी कलाकारांविषयी अकारण सहानुभूती दाखवून ओम पुरींनी इथल्या नागरिकांची मनं दुखावली आहेत यात शंका नाही. हे लोक असं बोलू धजतात, याचं कारण आपल्याकडे आपल्या या अशा उथळ आणि सवंग विधानांचीही तळी उचलणारे कुणी ना कुणी भगत भेटतील याची त्यांना असलेली खात्री! या देशात असा एक कथित मानवतावादी, डावीकडं झुकलेला, इंटुक कंपू आहेच आहे आणि तो अशा वेळी अहमहमिकेनं पाकिस्तानच्या बाजूला उभा राहतो हे कित्येकदा बघण्यात आलेलं आहे. या सर्वांना फक्त आठच दिवस सियाचिनच्या युद्धभूमीवर लढायलाही नको; नुसतं राहायला पाठवा... मग किती पाकप्रेम शिल्लक उरतंय हेच आम्हाला बघायचं आहे. मुळात काय आहे, हे लोक इकडं मुंबईत आपल्या वातानुकूलित घरांमध्ये, ऐश्वर्यात लोळत असतात (आणि हा पैसाही इथल्या जनतेनंच यांचे सिनेमे डोक्यावर घेऊन यांच्या खिशात ओतलेला असतो) आणि त्यांना सीमेवर आपले जवान तुमच्यासाठी काय हाल सोसत उभे आहेत, याची काडीमात्रही कल्पना नसते. त्यामुळेच त्यांच्या तोंडून अशी भाषा निघू शकते.
यावर या मंडळींचे सिनेमे बहिष्कृत करा, वगैरे टूम निघेल. पण त्यालाही काही अर्थ नाही. याचं कारण मूळ मानसिकतेत आहे. ती जोवर हे लोक बदलत नाहीत, तोवर काहीच बदलणार नाही.
एके काळी हिंदी सिनेमांतल्या कलाकारांच्या समाजभानाविषयी आदरानं बोललं जायचं. बलराज सहानी, सुनील दत्त यांच्यापासून ते अलीकडच्या नाना पाटेकर व मकरंद अनासपुरेपर्यंत अनेक कलाकारांनी हे समाजभान जपलं आहे आणि इथल्या रसिकांनीही त्यांना कायमच पाठिंबा दिलाय. ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत गोखले कित्येक वर्षं लष्करासाठी (माझ्या माहितीनुसार) किमान एक लाख रुपये दर वर्षी स्वउत्पन्नातील देत असत. त्याचा गवगवाही ते अजिबात करत नसत. चंद्रकांत गोखलेंची हीच परंपरा त्यांचे चिरंजीव विक्रम गोखले यांनीही पुढं चालविली आहे, असं कळतं. या दोन्ही कलाकारांची सैन्याप्रतीची ही सक्रिय आदरभावना आपल्याला त्यांच्यासमोर नतमस्तक करणारी आहे. ओम पुरींसारख्या ज्येष्ठ कलाकाराकडूनही तशीच अपेक्षा होती. मात्र, त्यांनी ती पार धुळीला मिळविली. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावतो! तो सोकावू नये यासाठी भविष्यात असा वेडेपणा आणि बेताल बडबड कुणी कलाकारानं करू नये, एवढीच इच्छा आपण व्यक्त करू शकतो. तोपर्यंत ‘ओम, पुरे!’ 
---
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती; ६ ऑक्टोबर २०१६)

2 Oct 2016

एम. एस. धोनी - ॲन अनटोल्ड स्टोरी

प्रेरणादायी, पण अपुरा...
----------------------------------------------------

'एम. एस. धोनी - ॲ
न अनटोल्ड स्टोरी' आज बघितला. मला आवडला. म्हणजे एकदा बघण्यासारखा नक्की आहे. सुशांतसिंह राजपूतनं धोनीचं काम मस्तच केलंय. तो संपूर्ण सिनेमाभर धोनीच वाटतो, हे त्याचं यश आहे. रांचीसारख्या छोट्या गावातून येऊन भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि त्यातही सर्वाधिक यशस्वी कर्णधार हा धोनीचा प्रवास खूपच प्रेरणादायक आहे. नीरज पांडेसारखा दिग्दर्शक असल्यानं हा प्रवास रोचक पद्धतीनं पाहायला मिळेल, अशा अपेक्षेनं आपण सिनेमा पाहायला सुरुवात करतो. सिनेमा खूपच मोठा आहे. तीन तास दहा मिनिटांचा... त्यामानाने त्यात नाट्यमयता कमी आहे. पूर्वार्धात धोनीचं पूर्वायुष्य आलं आहे. (जी खरंच आपल्याला माहिती नसलेली, म्हणजेच अनटोल्ड स्टोरी आहे..) ही सगळी गोष्ट एकरेषीय पद्धतीनं साकारते. पण त्यात आपल्याला माहिती नसलेल्या अनेक गोष्टी असल्यानं त्यातील रंजकता टिकून राहते. धोनी शाळेत असतानाचं त्याचं फुटबॉलप्रेम, क्रिकेटकडे अपघातानं वळणं इथपासून ते खरगपूर स्टेशनवर टीसी म्हणून त्यानं केलेली नोकरी हा सगळा भाग पूर्वार्धात चांगला जमला आहे. विशेषतः धोनी हा 'यारों का यार' आहे आणि त्याचे सर्व मित्र आणि त्यांनी धोनीच्या उत्कर्षासाठी केलेला आटापिटा हा सर्वच भाग खूपच सुंदररीत्या समोर येतो. विशेषतः धोनीला कलकत्ता विमानतळावर रात्रीतून जीप करून सोडायला जाणारे मित्र आणि त्यांची तगमग डोळ्यांत पाणी आणते. हेलिकॉप्टर शॉट धोनी एका मित्राकडून अचानक कसा शिकतो, हेही रंजक आहे. धोनीचे शालेय व नंतर प्रथम दर्जा सामने यात सविस्तर दाखवले आहेत आणि ते सगळे तपशिलाची गरज भागवणारे आणि धोनीच्या करिअरची पायाभरणी कशी झाली, हे नीट दाखवणारे झाले आहेत.
उत्तरार्ध धोनीच्या सगळी क्रिकेट करिअरची चढती भाजणी मांडणारा आहे. हा भाग बऱ्यापैकी निराश करतो. धोनीसारख्या छोट्या गावातून आलेला तरुण भारतीय संघात तेव्हा असलेल्या दिग्गजांशी कसा वागतो, कसा बोलतो, संघ उभारणी कशी करतो, त्याच्याविरुद्ध सुरू असलेल्या राजकारणाचा मुकाबला कसा करतो, तो स्वतः इतरांविरुद्ध कसं राजकारण करतो, त्याच्या बाजूनं कोण असतं, विरोधात कोण असतं, हे सगळं यात आपल्याला पाहायला मिळेल, असं वाटतं. पण तसं ते काहीच होत नाही. कारण आपल्याकडं बायोपिक काढण्यासाठी वास्तवाचा कठोर सामना करण्याचं धैर्य ना त्या कथानायकाकडं असतं, ना दिग्दर्शकाकडं! बीसीसीआयचा यातला उल्लेख तर एवढा गुडीगुडी आहे, की हसू येतं. गांगुली, द्रविड, सेहवाग, कुंबळे आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ज्याचं पोस्टर लहानपणी धोनीनं हट्टानं विकत घेतलेलं असतं, तो सचिन तेंडुलकर... या सर्वांसोबत खेळण्याची, एवढंच नव्हे, तर त्यांचा समावेश असलेल्या टीमचं नेतृत्व करण्याची संधी धोनीला मिळाली. तेव्हा त्याला काय वाटलं, तो या सगळ्यांशी कसा वागला-बोलला हे पाहण्यात प्रेक्षकांना रस होता. केवढं नाट्य आहे या घटनेत! पण या सगळ्या घटना नुकत्याच घडून गेल्यामुळं आणि खुद्द धोनीही वन-डेत का होईना, पण अजून खेळत असल्यानं त्या सर्वांवर काहीही भाष्य करायला त्यांची छाती झाली नसावी. नाही म्हणायला एका व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये धोनी वरिष्ठ खेळाडूंच्या फिल्डिंगविषयीची आपली मतं स्पष्ट सांगतो आणि आपल्याला हवी तशी टीम मिळत नसेल, तर नेतृत्वही नको असं सांगतो एवढा एक प्रसंग यात आला आहे. २००७ च्या वर्ल्ड कपनंतर भारतीय संघाची दारूण स्थिती असताना आणि द्रविडनं कर्णधारपद सोडल्यानंतर आता कुणाला कर्णधार करायचं, यावर खल सुरू असताना सचिननं आपलं मत धोनीच्या पारड्यात टाकलं आणि तसं शरद पवारांना सांगितलं, हे खुद्द पवारांनी अनेक वेळा जाहीररीत्या सांगितलं आहे. मग हा एवढा महत्त्वाचा प्रसंग या सिनेमात का नाही? गांगुली, द्रविड, लक्ष्मण, कुंबळे आणि सचिन या पाच पांडवांविषयी धोनीची मतं काय होती, हे सर्वांनाच ठाऊक आहे. धोनीनं पद्धतशीरपणे एकेकाला संघातून दूर केलं. ज्या गांगुलीनं धोनीला संघात घेतलं आणि कायमच त्याची पाठराखण केली, त्या गांगुलीलाही धोनीनं सोडलं नाही. हा सर्व इतिहास माध्यमांतून नुकताच चर्चिला गेल्यानं सर्वांना माहिती आहे. यात सांगोवांगीच्या काही गोष्टी नसतीलच असं नाही. पण जर त्या तशा असतील, तर स्वतःच्या बायोपिकच्या निमित्तानं त्या वादाला उत्तर देण्याचा प्रयत्न करणं धोनीला शक्य होतं. मात्र, या सिनेमात त्यावरही मौन बाळगण्यात आलं आहे. किंबहुना एक युवराज सोडला, तर अन्य कुठल्याही खेळाडूचं दर्शन का घडविलेलं नाही, हे अनाकलनीय आहे. बाकी प्रत्यक्ष सामन्यांचं चित्रण आणि धोनीच्या जागी सुशांतचा चेहरा चिकटवण्याचं कसब अनेकदा अति झालेलं आहे.
 धोनीच्या आयुष्यात साक्षीच्या आधी आलेल्या प्रियांका नावाच्या तरुणीचा एपिसोड जेवढा मजेशीर आहे, तेवढाच या प्रकरणाचा अंत धक्कादायक. साक्षी आणि माहीची ओळख होते, तो प्रसंगही मजेशीर आहे. नंतर माही तिला भेटण्यासाठी औरंगाबादला येतो आणि तिच्या आणि तिच्या एका मैत्रिणीसह रिक्षानं फिरतो हा भागही मस्त जमलाय. विशेषतः औरंगाबादमधलं सर्व चित्रिकरण पाहून औरंगाबादकर खूश होतील. सिनेमाचा क्लायमॅक्स अर्थातच मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर २०११ मध्ये झालेला वर्ल्ड कपचा अंतिम सामना आणि त्यात धोनीनं षटकार मारून भारताला मिळवून दिलेला अविस्मरणीय विजय हाच आहे. किंबहुना याच दृश्यापासून चित्रपटाची सुरुवात होते आणि शेवटही इथंच येऊन होतो...
धोनीच्या वडलांची भूमिका अनुपम खेरनं छान केली आहे. धोनीच्या बॅनर्जी नावाच्या प्रशिक्षकांची भूमिका राजेश शर्मानं झक्कास केली आहे. (क्रीडा चित्रपटांत राजेश शर्माचा चेहरा आता जणू मस्ट झाला आहे.) धोनीच्या बहिणीच्या भूमिकेत भूमिका चावलानं बऱ्याच दिवसांनी दर्शन दिलं आहे. धोनीच्या आयुष्यात आलेल्या प्रियांका आणि साक्षी या दोन तरुणींच्या भूमिका अनुक्रमे दिशा पटणी आणि किआरा अडवानी यांनी चांगल्या केल्या आहेत. किआरा अडवानी विशेष छान.
चित्रपटातील गाणीही चांगली आहेत, पण ती लक्षात मात्र राहिली नाहीत.
क्रीडापटूंवर बायोपिक बनवणं सोपं नाही. विशेषतः तो खेळाडू अद्याप खेळत असेल तर खूपच. पण तरीही नीरज पांडे दिग्दर्शक असल्यामुळं अपेक्षा उंचावतात. हे सर्व लक्षात घेता, हा सिनेमा वन टाइम वॉच ठरतो. धोनीसारख्या खेळाडूचं आयुष्य नक्कीच प्रेरणादायी आहे. पण सिनेमा ते सगळं आयुष्य दाखवत नाही आणि इथंच तो अपुरा वाटतो.
---
दर्जा - तीन स्टार
---