‘अंजनाद्री’पासून तुंगभद्रेपर्यंत....
---------------------------------------
हंपीत पहिल्याच दिवशी पाहिलेल्या अद्वितीय शिल्पसौंदर्याची स्वप्नं पाहतच रविवारची रात्र सरली. आज सोमवार (२७ नोव्हेंबर) म्हणजे आमचा हंपीतला दुसरा आणि शेवटचा दिवस होता. आजही लवकर उठून आवरलं. साडेआठपर्यंत ब्रेकफास्ट करून आम्ही मंजूबाबाची वाट पाहायला लागलो. हंपीत दक्षिण हंपी आणि उत्तर हंपी किंवा नदीच्या अलीकडील आणि पलीकडील असे दोन भाग आहेत, हे आम्हाला माहिती होतं. आदल्या दिवशी आम्ही दक्षिण किंवा नदीच्या अलीकडचं हंपी पाहिलं होतं. आता आम्हाला उत्तरेला म्हणजे तुंगभद्रेच्या पलीकडे जायचं होतं. मंजूबाबा साधारण नऊ वाजता हॉटेलवर आला. आम्ही लगेच निघालो. पहिला टप्पा होता अंजनाद्री. इथं हनुमानाचा जन्म झाला, असा स्थानिकांचा दावा आहे. (असाच दावा नाशिकजवळील अंजनेरी पर्वताबाबतही केला जातो.) हा सर्व परिसर विरुपाक्ष मंदिर केंद्रस्थानी धरल्यास १२-१३ किलोमीटरच्या परिघात असावा, असा माझा समज होता. प्रत्यक्षात अंजनाद्री आमच्या हॉटेलपासून तब्बल ३२ किलोमीटर दूर होतं. आम्ही बराच काळ रिक्षातून प्रवास करत होतो म्हटल्यावर मी मंजूला विचारलं, तेव्हा त्यानं हे अंतर सांगितलं.
आम्ही साधारण दहा वाजता अंजनाद्री पर्वताच्या पायथ्याशी पोचलो. एखाद्या देवस्थानाजवळ असतात तशी इथंही दोन्ही बाजूंना दुकानं, खाण्याचे स्टॉल आदी होतं. साधारण पर्वतीच्या दीडपट आकाराची ती टेकडी होती. एकूण ५७५ पायऱ्या होत्या. वर चढून जायचं की नाही, याचा आम्ही विचारच केला नाही. जायचंच हे ठरलं होतं. स्वत:ला आव्हान देण्याचा एक प्रकार करून पाहू, असाही जरा एक विचार होता. सकाळची आल्हाददायक वेळ होती. सुदैवानं ऊन नव्हतं. ढग आले होते. आम्हीही इतरांप्रमाणे ‘जय श्रीराम’ म्हणून त्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. सुरुवातीला उत्साहाने शंभर पायऱ्या चढल्यावर मात्र दम लागला. इथं या पायऱ्या उंच होत्या. मात्र, त्या मार्गावर बऱ्याच ठिकाणी शेड घातलेली होती आणि मधे मधे बसायला बाकही होते. आम्ही थोडं थांबत, थोडं बसत हळू हळू ती टेकडी चढून वर गेलो. नंतरच्या टप्प्यात तर ढग दूर होऊन सूर्य तळपू लागल्यानं घामाघूम व्हायला झालं. मात्र, शेवटचा टप्पा पार केल्यावर स्वत:च स्वत:ला शाबासकी दिली. आपण स्वत:ला अनेकदा कमी लेखतो. मात्र, प्रत्यक्षात वेळ आल्यावर आपण किती तरी मोठ्या गोष्टी सहज करू शकतो. याचाच हा एक छोटा नमुना होता. मी व धनश्री सर्वांत आधी पोचलो. थोड्या वेळानं साई व वृषाली आले. इथं अनेक स्थानिक भाविक हा पर्वत अनवाणी चढताना पाहिले. खाली एक चप्पल स्टँड दिसलाही होता. मात्र, आम्हाला स्पोर्ट शूज घातल्याशिवाय इथं चढणं अवघड वाटलं होतं. आम्हाला वर येतानाही अनेक स्थानिक मंडळी शूज का घातले आहेत, असं खुणेनं विचारत होती. मात्र, आम्ही इतर काही पर्यटक आमच्यासारखेच शूज घालून उतरतानाही पाहत होतो. तेव्हा अनवाणी चालणं हे ऐच्छिक असावं, अशी आपली आम्ही सोयीस्कर समजूत घालून घेतली आणि तसेच वर चालत राहिलो. वर देवळाच्या शेजारी शूज अर्थातच काढून ठेवले. इथं माकडं भरपूर आहेत. देवळाच्या थोड्याशा सावलीखेरीज तिथं सावली कुठंही नव्हती. आम्ही तिथंच थोडा वेळ टेकलो. जरा काही तरी खावं, म्हणून जवळची राजगिरा वडी काढून खाल्ली. वृषालीनं ती लगेच न खाता हातातच ठेवली होती. त्यामुळं एक माकडाचं पिल्लू टुणकन उडी मारून तिच्या पायावरच येऊन बसलं. त्याबरोबर आम्ही सगळेच दचकलो आणि थोडासा आरडाओरडा झाला. अर्थात मी लगेच तिला सांगितलं, की हातातली वडी देऊन टाक. तिनं ती वडी त्या पिल्लाला दिल्याबरोबर ते लगेच उडी मारून तिथून पसार झालं. नंतर पुन्हा आम्ही उतरेपर्यंत एकही खाण्याचा पदार्थ सॅकमधून बाहेर काढला नाही. नंतर मंदिरात गेलो. शेजारी नारळाच्या तुकड्यांचा ढीग पडला होता. समोर एक मोठी घंटा टांगली होती. त्यापुढे संरक्षण म्हणून लावलेल्या जाळीला अनेक नवसाचे कापडाचे तुकडे बांधलेले दिसत होते. त्यापलीकडे मोठी दरी होती. तिथं भन्नाट वारा येत होता. खाली तुंगभद्रेचं विशाल पात्र (सध्या जरा रोडावलेलं) आणि हिरवीगार भातशेती, त्यात डुलणारे माड असं देखणं निसर्गचित्र दिसत होतं. मी किती तरी वेळ तिथं उभं राहून ते न्याहाळत होतो. समोरचे डोंगर आपल्यासारखे नव्हते. तिथं सगळीकडं फक्त मोठमोठ्या शिळाच पडलेल्या दिसत होत्या. लहानग्या हनुमानानेच बालपणी खेळ म्हणून खेळून ही सगळी रचना केली आहे, हे मंजूबाबानं आम्हाला येतायेताच सांगितलं होतं. आम्हीही त्यावर भक्तिभावाने माना डोलावल्या होत्या. मला त्या सगळ्या परिसराचीच भौगोलिक रचना (टोपोग्राफी) अतिशय विलक्षण, वेगळी वाटत होती. आम्ही मारुतीरायाचं दर्शन घेऊन बाहेर आलो. मला ‘भीमरूपी महारुद्रा’ सगळ्यांनी एकत्र म्हणावंसं वाटू लागलं. सलीलनं केलेलं या स्तोत्राचं नवं गाणंही आठवलं. नंतर त्या टेकाडावर मंदिराच्या विरुद्ध बाजूला केलेल्या पॉइंटवर जाऊन फोटोसेशन केलं. अजून थोडं वर चढून गेलं, की त्या सगळ्या शिळा दिसत होत्या. तिथंही जाऊन आलो. आता ऊन वाढलं होतं. आम्ही आता उतरायला लागलो. उतरणं तुलनेनं सोपंच होतं. वर येताना धनश्रीला एक जर्मन तरुणी भेटली होती. इतरही काही परदेशी पाहुणे दिसत होते. आम्ही उतरताना अनेक लोक वर येताना दिसत होते. मात्र, आता उन्हामुळं त्यांची बऱ्यापैकी दमछाक होतानाही दिसत होती. आम्ही टणाटण उड्या मारत आता उतरत होतो. वीस-एक मिनिटांत आम्ही खाली आलोही.
मंजूला फोन लावला. तो दोन मिनिटांत आला. तोवर आम्ही उसाचा रस घेऊन जीव शांत केला. मंजू आल्यावर आता पुढचा टप्पा होता तुंगभद्रेत कोराईकल राइडचा. कोराईकल म्हणजे त्या बांबूच्या टोपल्या. एका टोपलीत साधारण पाच ते सहा लोक बसू शकतात. याला खालून डांबर लावलेलं असतं. या गोल टोपलीतून नदीत चक्कर मारतात. ही राइड हंपीत आल्यावर अगदी ‘मस्ट’ असते. मंजूबाबा आम्हाला एका ठिकाणी घेऊन गेला. समोर तुंगभद्रेचं दर्शन झालं. तिथं दगडांमुळं आपोआप एक नैसर्गिक बांध तयार झाला होता आणि पाणी त्यावरून खळाळत, धबधब्यासारखं उड्या मारत पुढं चाललं होतं. आम्ही कोराईकल राइडवाल्याकडं चौकशी केली, तर त्यानं २०-२५ मिनिटांच्या राइडचे प्रत्येकी ७५० रुपये सांगितले. हे पैसे जास्त होते आणि आम्हाला मान्य नव्हते. तेवढ्यात तिथं एक गोरा आला. आम्ही त्याच्याशी गप्पा मारायला लागलो. तो जर्मनीहून आला होता. आमचं हे बोलणं ऐकून त्या कोराईकलवाल्याला वाटलं, की आम्ही त्याच्याबरोबर ‘डील’ करतोय. एकूण आम्हाला त्याचा रागच आला आणि आम्ही तिथली राइड न घेता परत निघायचं ठरवलं. तो गोराही माघारी निघाला.
मंजूला जरा वाईट वाटलं असावं. अर्थात आम्ही त्याच्या भावनेचा आत्ता विचार करत नव्हतो. आता जेवायची वेळ झाली होती. मग मंजू आम्हाला जेवायला एका झोपडीटाइप ‘व्हाइट सँड’ नावाच्या रिसॉर्ट कम हॉटेलात घेऊन गेला. इथं आधीच काही गोरे तरुण-तरुणी येऊन पत्ते खेळत बसले होते. इथला पोरगा चांगला होता. हे हॉटेलही वेगळं होतं. इथं आपल्या बैठकीसारखी मांडी घालून बसायची व्यवस्था होती. तिथं काही वाद्यंही ठेवली होती. त्या पोरानं आम्ही सांगितलेली ऑर्डर घेतली. सूप, पिझ्झा, पास्ता असं सगळं कॉन्टिनेंटल फूड खाल्लं. एकूण मजा आली. लंच झाल्यावर मंजू आम्हाला अजून एका ठिकाणी घेऊन गेला. आम्ही आता कुठं चाललोय, हे माहिती नव्हतं. थोड्याच वेळात एका टेकाडावर आम्ही पोचलो, तर डाव्या बाजूला धरणासारखी छोटीशी भिंत लागली. हा सनापूर तलाव होता. इथंही कोराईकल राइड मिळते. हा तलाव अतिशय सुंदर होता. चारही बाजूंनी डोंगर आणि मधोमध बशीसारख्या आकारात हा तलाव होता आणि तोही दोन भागांत होता. मधल्या चिंचोळ्या पट्टीवर गाड्या पार्क केल्या होत्या. आम्हीही तिथं पोचलो. मगाशी आमची राइड न झाल्यानं मंजू आम्हाला इथं घेऊन आला होता. इथल्या राइडवाल्याने एक हजार रुपये सांगितले. आम्ही आनंदानं तयार झालो. चौघांनाही त्यानं त्या टोपलीत बसवलं. आधी लाइफ जॅकेट्स दिली. आधी जरा धाकधूक वाटत होती. आमचा नावाडी म्हणजे एक वयस्कर काका होते. ते फारसे बोलत नव्हते. यांचा मालक किनाऱ्यावर उभा राहून प्रत्येक ग्राहकाशी डील करत होता. आमच्या आधी एक फॅमिली राइड सुरू करून तलावाच्या आत गेली होती. मग आम्हीही निघालो. ही टोपली दोन-अडीच फूट एवढीच खोल असल्यानं आपण जवळपास पाण्याला समांतर तरंगत असतो. पाणी अगदीच जवळ असतं. त्यामुळं सुरुवातीला मला तरी जरा टरकायला झालं. मात्र, लगेच व्हिडिओ, फोटो आदी गोष्टींत मी गुंतवून घेतलं. जरा आत गेल्यावर त्या दुसऱ्या राइडच्या लोकांना त्या नावाड्यानं जोरजोरात गोल गोल फिरवायला सुरुवात केली. आम्हाला ते बघून एकाच वेळी मजा आणि थोडी भीतीही वाटली. थोड्याच वेळात आम्ही दोन्ही टोपल्या एकमेकांच्या जवळ आलो. त्या टोपलीतली फॅमिलीही मराठीच होती. मग मोबाइलची देवाणघेवाण झाली आणि एकमेकांचे व्हिडिओ वगैरे काढणं झालं. एकूण धमाल अनुभव होता. साधारण अर्ध्या तासात आम्ही बाहेर आलो. अगदी बाहेर पडताना त्या टोपल्यांच्या मालकानं आमचे मोबाइल घेऊन पुन्हा सगळ्यांचे फोटो काढून दिले. बाहेर पडल्यावर आम्ही मंजूला धन्यवाद दिले.
इथून आम्ही पंपा सरोवर बघायला गेलो. हे सरोवर सनापूर तलावासारखंच मोठं असेल असं मला वाटलं होतं. प्रत्यक्षात ते अगदीच छोटं आणि सर्व बाजूंनी दगडांनी बारवेसारखं बांधलेलं निघालं. इथं वर एक मंदिर होतं. मी एकटाच तिथं गेलो. लक्ष्मीचं आणि आणखी एका देवतेच्या मूर्ती होत्या. मी लांबूनच नमस्कार करून निघालो. वर ‘शबरीची गुहा’ आहे, असं काही जण बोलताना ऐकलं. मात्र, तशी कुठलीही माहिती तिथं लिहिलेली नव्हती. त्यामुळं मी तिकडं वर गेलो नाही. याही ठिकाणी भरपूर वानरं होती. इथं थोडा वेळ रेंगाळून आम्ही पुढं निघालो. आता आम्ही हंपीत जाऊन काल राहिलेली दोन मंदिरं (हजारीराम व भूमिगत शिवमंदिर) बघणार होतो. जाताना मंजूबाबा आम्हाला अनेगुंदी गावात घेऊन गेला. या गावात कृष्णदेवरायांचे वंशज अजूनही राहतात. तिथला टाउन हॉल, कृष्णदेवरायांच्या वंशजांचा भलामोठा वाडा हे सगळं बाहेरूनच बघितलं. त्या गावाच्या चौकात कृष्णदेवरायांचा पूर्णाकृती पुतळा आहे. तिथं थांबून मी त्या पुतळ्याचा फोटो काढला.
यानंतर आम्ही पुन्हा हंपीकडं निघालो. अंतर बरंच होतं. पण हा रस्ता सुंदर होता. तुंगभद्रेवरचा मोठा पूल ओलांडून आम्ही ‘अलीकडं’ (म्हणजे दक्षिणेला) आलो. दोन्ही बाजूंनी भातशेती, नारळाची झाडं यामुळं कोकणाचा भास होत होता, तर काही ठिकाणी ज्वारी किंवा उसामुळं देशावर असल्याचा भास होत होता. थोडक्यात, हंपी परिसरात कोकण व देशाचं उत्कृष्ट मिश्रण पाहायला मिळत होतं. शिवाय वातावरण उत्तर भारतातल्यासारखं थंडगार, आल्हाददायक! आम्ही पुन्हा ३०-३२ किलोमीटरचा प्रवास करून हंपीत शिरलो. या वेळी सुरुवातीला पान-सुपारी बाजार नावाचा एक भाग बघितला. तिथून समोरच ‘हजारीरामा’चं मंदिर आहे. नावाप्रमाणे इथं रामायणातील अक्षरश: हजारो प्रसंग कोरले आहेत, म्हणून हा ‘हजारीराम’. आशुतोष बापटांच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे, ‘हजारी’ हे फारसी नाव या मंदिराला नंतर पडलं असावं. शिवाय हे मंदिर म्हणजे राजघराण्याच्या खासगी प्रॉपर्टीचा भाग होतं. त्यामुळं ते दीर्घकाळ चांगलंही राहिलं होतं. आम्ही गेलो तेव्हा संध्याकाळचं सुंदर पिवळंधमक ऊन त्या मंदिरावर पडलं होतं. त्यामुळं त्या शिळांना अक्षरश: सुवर्णाचं लेणं चढवल्यासारखं वाटत होतं. तिथं कोणी तरी ड्रोननं त्या मंदिराचं चित्रीकरण करत होतं. त्या कर्कश आवाजानं मात्र आमचा रसभंग झाला. मंदिर मात्र फारच सुंदर होतं. मंदिराशेजारी भरपूर हिरवळ राखली आहे. आम्ही तिथं जरा वेळ शांत बसलो. सूर्य हळूहळू कलायला लागला होता. आता आम्हाला अजून एक-दोन ठिकाणं बघायची होती. त्यामुळं ‘हजारीरामा’ला ‘राम राम’ करून आम्ही तिथून बाहेर पडलो. बाहेर एक पुस्तकविक्रेता होता. आमचं मराठी ऐकून तोही मोडक्या-तोडक्या मराठीत आम्हाला पुस्तक घेण्याचा आग्रह करू लागला. माझ्या एका भाचीसाठी हंपीची माहिती देणारं एक इंग्लिश माहितीपुस्तक घेतलं. तिथून निघालो.
मंजूबाबानं आता आम्हाला त्या भूमिगत शिव मंदिराकडं नेलं. काल आम्ही हे विरुपाक्ष मंदिराकडं जाताना पाहिलं होतं. आज तिथं आत गेलो, तर फार कुणी नव्हतं. मंदिर जमिनीच्या पातळीच्या खाली असल्यानं आणि हळूहळू सूर्य मावळतीकडं निघाल्यानं तिथं जरा अंधारच होता. तरी मी आत आत जात गाभाऱ्यापर्यंत गेलो. तिथं नंदी तेवढा दिसला. पण आजूबाजूला पाणी होतं. त्यापलीकडचा गाभारा दिसलाच नाही. तिथूनच माघारी फिरलो. मंदिर सुंदर होतं यात वाद नाही; पण त्या वातावरणामुळं आणि निर्मनुष्य असल्यानं उगाच काही तरी गूढ वगैरे वाटत होतं. आम्ही लगेच तिथून बाहेर पडलो. आता मंजूबाबा आम्हाला कृष्ण मंदिरात घेऊन गेला. हाही एक अप्रतिम असा शिल्पसमूह आहे. आम्ही गेलो, तेव्हा तिथं कुणीही नव्हतं. आम्ही शांतपणे ते सगळं मंदिर फिरून पाहिलं. या मंदिरासमोरच ‘कृष्ण बाजार’ आहे. इथून मंजू आम्हाला हेमकूट टेकडीकडं घेऊन निघाला. तिथं त्या टेकाडाच्या चढावरच एक गणपतीची मोठी पाषाणमूर्ती आहे. मला नगरच्या विशाल गणपतीची किंवा वाईच्या ढोल्या गणपतीची आठवण झाली. साधारण तेवढ्याच उंचीचा हा गणपती होता. त्याला नमस्कार करून आम्ही टेकडी चढायला सुरुवात केली. हेमकूट टेकडीवरून सगळं हंपी दिसतं. शिवाय हा ‘सनसेट पॉइंट’ही आहे. नेमका त्या दिवशी सूर्य ढगांत लपला होता. त्यामुळं सूर्यास्त असा दिसलाच नाही. वरून हंपीचा सगळा नजारा मात्र अप्रतिम दिसत होता. उजव्या बाजूला विरुपाक्ष मंदिराचे गोपुर दिसत होते. आता तिथला वरचा तो पिवळाधमक दिवाही प्रकाशमान झाला होता. सहा वाजून गेले होते. तिथला सुरक्षारक्षक सगळ्या लोकांना खाली हाकलायला आला. सूर्यास्तानंतर इथली सगळी ठिकाणं पर्यटकांना बंद होतात. आम्हाला खरं तर तिथं थोडा वेळ रेंगाळायचं होतं. पण तो गार्ड आल्यामुळं मी व धनश्री लगेच खाली यायला निघालो. साई व वृषाली थोड्या वेळानं खाली आले. त्यांना तो तुंगभद्रेच्या काठी भेटलेला जर्मनीचा गोरा पुन्हा भेटला होता. म्हणून मग ते रेंगाळत त्याच्याशी गप्पा मारत आले होते.
आता आमचं ‘साइट सीइंग’ असं संपलं होतं. उगाच हुरहुर वाटत होती. मंजूबाबा आता आम्हाला घेऊन तडक हॉटेलकडं निघाला. त्यानं पावणेसातला बरोबर आमच्या हॉटेलवर आणून सोडलं. आम्ही त्याचे पैसे दिले. दोन दिवस त्यानं चांगलं ‘गाइड’ केलं, म्हणून त्याचे आभार मानले.
आज आम्हाला संध्याकाळी होस्पेट शहरात जरा चक्कर मारायची होती. म्हणून थोडं आवरून आम्ही कार काढून बाहेर पडलो. होस्पेट शहरात दोनच प्रमुख रस्ते दिसले. त्यातला एक बसस्टँडला काटकोनात असलेला रस्ता बराच मोठा होता. इथं मोठमोठ्या ब्रँडच्या शो-रूम दिसत होत्या. ‘शानबाग’ नावाचं मोठं हॉटेल दिसलं. पलीकडंच त्यांचं रेस्टॉरंटही होतं. शानबाग, पै, कामत, कार्नाड ही सगळी चित्रापूर सारस्वत मंडळी. मूळची कारवारकडची. यांचं इकडं व्यवसायांपासून सगळीकडं मोठं प्रस्थ दिसतं. आम्ही त्या हॉटेलमध्ये शिरलो. तिथं ‘नॉर्थ इंडियन’ खाण्याचा विभाग पहिल्या मजल्यावर होता. मग तिकडं गेलो. तिथला वेटर जरा बडबड्या होता. त्याच्याशी गप्पा मारत जेवलो. जेवण चांगलं होतं. दिवसभर आमची दमछाक बरीच झाली होती. त्यामुळं आम्ही व्यवस्थित जेवलो. मी नंतर डाळिंबाचं ज्यूस घेतलं. तेही भारी होतं.
तिथून निघालो. शहरात आणखी एक फेरफटका मारून आम्ही हॉटेलवर परतलो.
विजापूरचा गोल घुमट
येताना विजापूर (आता विजयपुरा), सोलापूरमार्गे पुण्याला जाऊ, असं आम्ही ठरवलं. वेगळा भाग बघायला मिळेल, हा उद्देश. मग मंगळवारी सकाळी लवकर आवरून साडेसहा वाजताच होस्पेट सोडलं. होस्पेट ते विजापूर रस्ता चौपदरी व उत्कृष्ट आहे. सकाळी सातच्या सुमारास आम्हाला रस्त्यावर एकदम धुकं लागलं. ते आठ-दहा किलोमीटरपर्यंत होतं. मग पुन्हा विरलं आणि नंतर काही अंतरावर पुन्हा लागलं. रात्री तिथं पाऊस पडून गेला असावा. पण असं रस्त्यात मध्येच सुरू होणारं आणि संपणारं धुकं मी तरी पहिल्यांदाच पाहिलं. आम्ही मधे इलकल नावाच्या गावात थांबून ब्रेकफास्ट केला. पुढं रस्त्यात डाव्या हाताला मोठं अलमट्टी धरण लागतं. बरोबर दहा वाजता विजापुरात पोचलो. आम्हाला इथला गोल घुमट बघायचा होता. विजापूर हे आडवं पसरलेलं शहर आहे.
तिथून सोलापूर ९८ किलोमीटरवर आहे. पुढे भीमा नदी लागते. तीच महाराष्ट्र-कर्नाटक सीमा आहे. ती ओलांडून आम्ही महाराष्ट्रात प्रवेश केला. सोलापुरात आता बायपास झाल्यानं शहरात प्रवेश करावा लागतच नाही. आम्ही सोलापूर ओलांडून पुढं आल्यावर डाव्या बाजूला एका हॉटेलात थांबून जेवलो. इथून पुढं कार मी चालवायला घेतली. थोड्या अंतरावर गेल्यानंतर मुसळधार पाऊस सुरू झाला. हा पाऊस साधारण १५-२० किलोमीटरच्या पट्ट्यात होता. पुढं पुन्हा ऊन. यवतला पाच वाजता चहाला थांबलो. इथून पुढं पुन्हा साईनं कार घेतली. पुण्यातलं ट्रॅफिक झेलत साडेसात वाजता घरी सुखरूप पोचलो.
हंपीची आमची ही सहल चांगली झाली. मात्र, आमचं केवळ हंपीच बघणं झालं. बदामी, पट्टदकल, ऐहोळे वगैरे राहिलं. त्यामुळं पुन्हा एकदा तिकडं जावंच लागणार. हंपीला थंडीच्या सीझनमध्येच जावं. तिथं चालण्याची तयारी ठेवावी. ‘पाय असतील तर हंपी पाहावे, डोळे असतील तर कनकपुरी आणि पैसे असतील तर तिरुपती बालाजी’ अशी एक म्हणच तिकडं आहे. तेव्हा भरपूर चालावे लागते. शक्यतो स्थानिक गाइड घ्यावा. नाही तर फार काही माहिती समजत नाही. शिवाय जेवण्यापासून ते खरेदीपर्यंत अनेक ठिकाणी हे स्थानिक लोक आपल्याला मदत करतात. हंपीला जायचं असेल, तर आता सोलापूर-विजापूर मार्गेच जावे. रस्ता सर्वत्र उत्तम आहे. या मार्गे ५४० रुपये टोल (वन वे) लागतो, तर बेळगाव मार्गे हाच टोल (वन वे) तब्बल ११२५ रुपये एवढा लागतो. स्वत:चं वाहन न्यायचं असेल तरी उत्तम; मात्र, शक्यतो दोन चांगले ड्रायव्हर असावेत. एकूण अंतर पुण्याहून ५६५ किलोमीटर आहे आणि दोन ते तीन ब्रेक (साधारण दोन ते अडीच तासांचे) धरले तर बारा ते साडेबारा तास सहज लागतात. सकाळी लवकर प्रवास सुरू करणे उत्तम.
हंपी हे युनेस्कोने जाहीर केलेले वारसा स्थळ आहे. ते आवर्जून पाहायला हवे. आपल्या देशाचा वैभवशाली सुवर्णकाळ तिथल्या पाषाणांत कालातीत, शिल्पांकित झाला आहे. त्याचं दर्शन घेणं हा शब्दश: ‘श्रीमंत’ करणारा अनुभव आहे, यात वाद नाही.
(समाप्त)
--------------------