ट्रॅप्ड - एक सिनेमा - दोन रिव्ह्यू
-----------------------------
'ट्रॅप्ड'
हा सिनेमा मी काल पाहिला. या सिनेमाचा कुठलाच रिव्ह्यू मी आधी वाचला
नव्हता. (तो मी एरवीही कधीच वाचत नाही.) पण तरी सिनेमा चांगला आहे, अशी
चर्चा कानावर होती. विक्रमादित्य मोटवानी आणि राजकुमार राव या नावांचंही
आकर्षण होतं. या दोघांचीही आधीची कामं पाहिली होती. या सगळ्यांमुळं माझी
अपेक्षा कदाचित वाढली असावी. त्यामुळं सिनेमा पाहून झाल्यावर मला तो फार
काही ग्रेट वगैरे वाटला नाही आणि त्याला पाचपैकी तीन(च) स्टार द्यावेसे
वाटले. नंतर मुग्धा गोडबोले-रानडेनं माझ्या पोस्टवर टाकलेली कमेंट वाचून
वाटलं, की खरंच आपल्याला हा सिनेमा आवडलाय की नाही? फार अपेक्षा ठेवून न
जाता, कोरी पाटी ठेवून गेलो असतो, तर कदाचित आपलं मत वेगळं असतं. मग
डोक्यात विचार आला, की या सिनेमाचे दोन रिव्ह्यू लिहू या. एक चांगली बाजू
दाखवणारा आणि एक वाईट... दोन्ही मीच लिहिणार अर्थात... सम्या आणि गौरीच्या
गोष्टींसारखाच हाही एक प्रयोग...
----
----
पहिला रिव्ह्यू (चांगला)
------------------------
------------------------
महानगरी घुसमटीचं प्रभावी दर्शन
------------------------------ -----------------------
------------------------------
विक्रमादित्य
मोटवानीचा 'ट्रॅप्ड' हा नवा सिनेमा म्हणजे महानगरी घुसमटीचं प्रभावी दर्शन
आहे. राजकुमार रावची प्रभावी भूमिका आणि अव्वल दर्जाचं ध्वनिआरेखन यामुळं
'ट्रॅप्ड' बघणं हा एक अनुभव ठरतो. विक्रमादित्यचे उडान आणि लुटेरा हे
दोन्ही सिनेमे त्याच्याविषयी अपेक्षा वाढविणारे आहेत. तीच गोष्ट राजकुमार
रावची. गेल्या काही काळात या अभिनेत्यानं वेगवेगळे प्रयोग करीत स्वतःला
सिद्ध केलं आहे. ट्रॅप्ड हा नवा हिंदी चित्रपट म्हणजे या दोघांचाही एक नवा
प्रयोगच आहे. याचं कारण म्हणजे या सिनेमाची कथा. एक तरुण मुंबईत एका एकाकी
इमारतीत पस्तिसाव्या मजल्यावर अडकून पडतो. तिथून बाहेर पडण्याचे सर्व
प्रयत्न तो करतो, मात्र तब्बल सात दिवस तो तिथंच कोंडून राहतो. अखेर पुढं
त्याचं काय होतं, तो तिथून बाहेर पडतो का, मुळात तो तिथं अडकतोच कसा या
सगळ्या प्रश्नांची उत्तरं 'ट्रॅप्ड'मध्ये मिळतात. या सिनेमात बहुतांश भागात
फक्त नायक शौर्य (राजकुमार राव) आपल्याला दिसतो. त्यासोबत दिसते ती त्याची
सुटण्याची धडपड...
इथं
दिग्दर्शकानं एक सिच्युएशन तयार केली आहे आणि आपला कथानायक त्यावर रिअॅक्ट
होतोय. त्याच्या आयुष्यात अचानक हा संघर्ष निर्माण झालाय. आपल्याही
आयुष्यात कित्येकदा काहीच कल्पना नसताना एखादं संकट समोर येऊन ठाकतं आणि
आपल्या अंगात मग अचानक त्या संकटाशी लढण्याची ताकद निर्माण होते. माणसाची
जीवनेच्छा ही फार आदिम आणि चिवट गोष्ट आहे. जगण्यासाठी माणूस काहीही करू
शकतो. कितीही टोकाची परिस्थिती निर्माण झाली, तरी त्यावर मात करू शकतो.
आपल्याला कित्येकदा आपल्यात ही क्षमता किती प्रमाणात आहे, याचा अंदाज नसतो.
पण अचानक संकट निर्माण झाल्यावर आपल्यालाच आपल्यातील या तीव्र जीवनेच्छेचा
शोध लागतो. तो एक दिव्य क्षण असतो. आपण आपल्याला नव्यानं शोधलेलं असतं.
'ट्रॅप्ड'च्या नायकाचं नेमकं तेच होतं. त्याचा हा शोध अत्यंत त्रासदायक
आहे, वेदनादायी आहे... त्याच्यासोबत तो प्रेक्षक म्हणून आपल्यालाही सोसावा
लागतो. पण दिग्दर्शकालाही हेच अपेक्षित आहे. म्हणूनच त्या रिकाम्या, उंच
फ्लॅटमध्ये आपणही नायकासोबत घुसमटत राहतो, दबून जातो, किंचाळतो, ओरडतो,
दमून झोपतो, स्वतःलाच दोष देत राहतो आणि अगदी प्रचंड एकटं एकटं वाटून
घेतो...
त्या
अर्थानं विक्रमादित्यची ही कलाकृती फारच प्रतीकात्मक आहे. महानगरी
आयुष्यात याचं प्रत्यंतर आपल्याला वारंवार येत असतं. आजूबाजूला एवढी गर्दी
असते, तरी आपण एकाकी असतो. फार एकाकी... इंग्रजीतला 'लोनली' हा शब्द
त्यासाठी अचूक आहे. 'अलोन' नव्हे, 'लोनली'! एकटे नव्हे, एकाकी!! तर काही
प्रसंगपरत्वे आपलं हे एकाकीपण अचानक आपल्यावर येऊन आदळतं आणि मग त्याचा
सामना करण्यावाचून आपल्याला पर्यायच राहत नाही. अशा वेळी फार द्विधा अवस्था
होते. आपल्याला हा आहे, तो आहे, असं जे आपल्याला वाटत असतं आयुष्यभर, त्या
लोकांचा, त्या नात्यांचा अशा संकटसमयी काहीच उपयोग नसतो, हे एक उमगतं आणि
दुसरं म्हणजे अशा संकटांच्या वेळी शेवटी आपण एकटेच असू तर या सगळ्या
नात्यांचं करायचं काय, या विचारानं येणारं वैफल्य... या दोन्ही मानवी
भावनांना ही कलाकृती फार आतून साद घालते.
'ट्रॅप्ड'मध्ये
काही त्रुटी निश्चितच आहेत. विशेषतः पटकथेतील अनेक छिद्रं जाणवतात.
सुटकेसाठी केले जाणारे प्रयत्न पाहता, काही तर्कशुद्ध प्रश्नांची उत्तरं
मिळत नाहीत. मात्र, दिग्दर्शकाला यातली प्रतीकात्मकता महत्त्वाची असेल, असं
समजून हा सिनेमा पाहिला तर बरंच काही गवसेल. विशेषतः आग आणि पाणी या दोन
पंचमहाभुतांचा केलेला वापर माणसाच्या प्रगतीचं वैयर्थ दाखवणारा आहे.
राजकुमार
राव यानं एकट्यानं हा सिनेमा खाल्ला आहे. फ्लॅटमध्ये अडकल्यानंतरची त्याची
घुसमट आणि नंतर सुटकेसाठी त्यानं प्राण पणाला लावून केलेले प्रयत्न त्यानं
फार खरे खरे दाखवले आहेत. ते अगदी भिडतात. विशेषतः जीवावर बेततं, तेव्हा
आपल्यावरचे मूल्यसंस्कार (उदा. शाकाहारी असणं) किती बेगडी ठरतात, हा
अंतर्विरोध त्यानं छान दाखवलाय. चित्रपटाचं ध्वनिआरेखन (अनिश जॉन) अव्वल
दर्जाचं आहे. फ्लॅटमध्ये अडकल्यानंतर शौर्यला तिथं फक्त फ्लॅटमधल्या थोड्या
फार वस्तूंचा आधार असतो. या वस्तू आणि त्यांचे आवाज त्याचा एकाकीपणा आणखी
गडद करतात. हा बारकावा नीटच ऐकण्यासारखा आहे. या सिनेमाला मध्यंतर नाही.
सलग एक तास ४१ मिनिटांचा हा थरारक अनुभव आहे.
मला
तरी 'ट्रॅप्ड' हा महानगरी जंगलात एकाकी असलेल्या माणसाचा स्वतःशीच असलेला
संघर्ष वाटला. एका सिनेमाचे प्रेक्षकांना अनेक अर्थ वाटू शकणं हे त्याचं
यशच मानायला हवं. नक्की बघा.
दर्जा - चार स्टार
---
रिव्ह्यू दुसरा (वाईट)
---------------------
---------------------
सुटलो एकदाचा...!
------------------------------
------------------------------
विक्रमादित्य
मोटवानीचा 'ट्रॅप्ड' हा नवा हिंदी सिनेमा संपल्यावर माझ्या मनात 'सुटलो
एकदाचा...' ही एकच भावना आली. मुंबईसारख्या महानगरात एक माणूस पस्तिसाव्या
मजल्यावर अडकतो, या जवळपास अशक्य वाटणाऱ्या कथानकावर ही गोष्ट आधारलेली
आहे. विक्रमादित्य आणि राजकुमार राव या दोघांचेही आधीचे अनुभव आश्वासक
आहेत. मात्र, या सिनेमात त्यांनी केलेला हा वेगळा प्रयोग पटकथेत अनेक
त्रुटी असल्यानं केवळ प्रयोगाच्याच पातळीवर राहतो आणि एक चांगला सिनेमा
होता होता राहिला, असं वाटतं.
SPOILER AHEAD
मुंबईत
राहणाऱ्या शौर्य (राजकुमार राव) या तरुणाची ही गोष्ट आहे. प्रेमात
पडलेल्या शौर्यला तातडीनं एक जागा हवी आहे. ती जागा मिळाली, तरच त्याची
प्रेयसी त्याच्यासोबत पळून येऊन लग्न करणार आहे. या गडबडीत शौर्यला एक एजंट
प्रभादेवीतल्या एका एकाकी इमारतीत पस्तिसाव्या मजल्यावर घेऊन जातो. या
इमारतीचं काम अद्याप चालू आहे. तिथं कुणीच राहत नाही. खाली फक्त एक वॉचमन
आहे. अगदी अडलेला असल्यामुळं शौर्य ती जागा घेतो. दुसऱ्या दिवशी घाईघाईत
त्याच्याकडून किल्ली लॅचला राहते आणि मोबाइल आणायला तो फ्लॅटच्या आत गेला
असताना, वाऱ्यानं धाडकन दार बंद होतं. शौर्यकडून आतला नॉबही तुटतो आणि तो
अडकतो. अशा परिस्थितीत पॅनिक होऊन तोे जे काही करायचं ते करतो. पण दार काही
उघडत नाही. त्यातच त्याच्या फोनची बॅटरीही संपते. त्या फ्लॅटमधलं पाणीही
जातं. लाइटही जातात. एजंट निघून गेलेला असतो. शौर्य आधी जिथं राहत असतो,
तिथल्या मुलांना तो गावी जातोय असं सांगून निघालेला असतो. अशा स्थितीत
शौर्य या फ्लॅटमध्ये अन्न-पाण्याविना सात दिवस अडकून पडतो. शेवटी काय होतं,
हे पडद्यावर पाहणं इष्ट असं म्हणणं मस्ट असलं, तरी इथं 'मस्त' मात्र नाही.
याचं कारण म्हणजे दिग्दर्शकाला काहीही करून आपल्या नायकाला त्या
फ्लॅटमध्ये अडकवायचंच आहे. त्यामुळं ही तयार केलेली सिच्युएशनच मुळात पटत
नाही. त्यामुळं त्यावर डोलारा असलेला पुढचा सगळा ड्रामाही कृत्रिम वाटू
लागतो. मुंबईत सहसा वीजपुरवठा खंडित होत नाही. या इमारतीत मात्र सुरुवातीला
नीट असलेला वीजपुरवठा पुढं नायक त्या फ्लॅटमधून बाहेर पडेपर्यंत खंडितच
असलेला दाखवला आहे. हे मुळात पटत नाही. शिवाय सुटकेसाठी तो जे प्रयत्न
करतो, त्यातही बरेच अंतर्विरोध आहेत. एक मोठा टीव्ही तोे खाली फेकतो,
त्याचा आवाज होऊनही वॉचमन लक्ष देत नाही, हे पटत नाही. याच वॉचमनला नंतर
शौर्यनं खाली भिरकावलेलं पोस्टर मिळतं, त्यावरही तो काहीच करत नाही आणि ते
पोस्टर घडी घालून ठेवून देतो, हे अगम्य आहे. नंतर एका शेजारच्या इमारतीच्या
छतावर असलेल्या बाईचं लक्ष वेधून घेण्यासाठी तो गलोलीतून खडे मारतो, असं
दाखवलं आहे. ते अंतर बघता आणि दगडांचा आकार बघता ते त्या इमारतीपर्यंत
पोचणं अवघड वाटतं. सगळ्यांत हाइट म्हणजे, पाण्याची गरज असताना, केवळ
उंदराला घाबरून शौर्य स्वयंपाकघरात जात नाही, हे अजिबात पटत नाही. नंतर तो
जे पक्षी, कीटक मारून खातो, तो सगळा प्रकार किळसवाणा आहे. एकदा तर तो
टेरेसमध्ये मोठी आग लावतो तरीही कुणाच्या लक्षात येत नाही, हेही अजबच
वाटतं. पाऊस येतो आणि त्याला भरपूर पाणी मिळतं, ही म्हटली तर दिग्दर्शकालाच
दिलासा देणारी गोष्ट ठरते. याचं कारण नायकाला पुढचे काही दिवस तगवणार कसं?
शेवटी शौर्य जो उपाय करतो, तोच उपाय मग तो पहिल्या किंवा जास्तीत जास्त
दुसऱ्याच दिवशी का करत नाही? मदतीला आलेली स्त्री मधूनच परत का जाते? आणि
सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे त्याची प्रेयसी त्याचा अजिबात शोध का घेत नाही? त्याच्या टी-शर्टची कंटिन्युइटीही अनेक ठिकाणी बोंबलली आहे.
पटकथेत
अशा अनेक त्रुटी असल्यानं सिनेमात गुंतायला होत नाही. नंतर नंतर तर चुका
काढण्याकडंच आपला कल वाढू लागतो. शौर्य सुटल्यानंतरची त्याची देहबोली आणि
एकूण प्रतिक्रिया मात्र दिग्दर्शकानं छान टिपली आहे. त्याला दाद द्यायला
हवी. सिनेमाचं ध्वनिआरेखनही उत्तम दर्जाचं आहे. असं असलं, तरी एक उत्तम
सिनेमा बनता बनता राहिला, असंच वाटून जातं.
राजकुमार
रावनं अप्रतिम काम केलं आहे. किंबहुना त्याच्यामुळंच आपण हा सिनेमा
शेवटपर्यंत पाहू शकतो. यातला नायक आणि त्याची संकटाची स्थिती राजकुमारच्या
देहबोलीमुळंच आपल्याला पटू शकते. एक वेगळा प्रयोग म्हणून पाहायला हरकत
नाही. पण फार अपेक्षा ठेवल्यास 'सुटकेची वाट' बघत बसावं लागेल.
दर्जा - दोन स्टार---