‘सांगत्ये ऐका’ ते ‘सैराट’...
----------------------------------
मराठी सिनेमाच्या इतिहासात ‘सैराट’ या चित्रपटानं आता अढळ स्थान मिळवलंय. लवकरच हा सिनेमा शंभर कोटी रुपये उत्पन्नाचं
रेकॉर्ड गाठणार अशी चिन्हं आहेत. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच मराठी सिनेमा ठरेल.
मराठी सिनेमानं मारलेली ही मजल मराठी माणसांसाठी निश्चितच अभिमानास्पद आहे. या सिनेमाची
केवळ भारतात नव्हे, तर जगभर चर्चा झाली. मराठी सिनेमाचा बोलबाला
गेल्या काही वर्षांत वाढला आहेच. तो या निमित्तानं पुन्हा अधोरेखित झाला. यानिमित्तानं
‘मटा’च्या स्थापनेपासून ते आतापर्यंतचा मराठी सिनेमाचा प्रवास जाणून
घेणं रंजक ठरेल.
मुंबईत महाराष्ट्र टाइम्स सुरू झाला १८ जून १९६२ ला. त्याआधी तीन वर्षांपूर्वी
म्हणजे १९५९ मध्ये पडद्यावर आलेला ‘सांगत्ये
ऐका’ हा चित्रपट असाच सैराट धुमाकूळ घालत होता. अनंत माने दिग्दर्शित हा चित्रपट आणि
त्यातलं जयश्री गडकरवर चित्रित झालेलं ‘बुगडी माझी सांडली गं’
हे आशा भोसलेंनी गायलेलं गाणं सर्वतोमुखी झालं होतं. पुण्याला विजयानंद
टॉकीजमध्ये या सिनेमानं तब्बल १३१ आठवडे मुक्काम ठोकला होता. त्या काळात मराठी चित्रपटसृष्टी
प्रामुख्यानं कोल्हापुरातच होती. पुण्यात प्रभात स्टुडिओ बंद पडल्यानंतर कोल्हापूर
हेच मराठी चित्रपटांचं माहेरघर झालं होतं. बाकी इतर काही सिनेमे मुंबईत बनत. तेव्हा
भालजी पेंढारकर, राजा परांजपे, अनंत माने
हे दिग्दर्शक जोरात होते. ‘साधी माणसं’ आणि ‘जगाच्या पाठीवर’
हे दोन्ही सिनेमे १९६५चे. अत्यंत गाजलेले. राज्य सरकारनं मराठी चित्रपटांसाठी पुरस्कार
सुरू केले ते १९६३ मध्ये. प्रपंच हा सिनेमा तेव्हा पहिला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा
ठरला होता. व्ही. शांतारामही चित्रनिर्मितीत अग्रेसर होते. त्यांनी १९७२ मध्ये ‘पिंजरा’ सिनेमा केला.
हा सिनेमा मराठीतला एक माइलस्टोन
सिनेमा मानला जातो. डॉ. श्रीराम लागूंनी साकारलेली मास्तरांची अजरामर भूमिका,
राम कदमांचं बहारदार संगीत, उषा मंगेशकरांनी गायलेल्या
एक से फर्ड्या लावण्या आणि अनंत मानेंची भक्कम पटकथा या जोरावर ‘पिंजरा’ जबरदस्त हिट ठरला. ‘पिंजरा’च्या यशासोबतच आणखी एक नाव मराठी चित्रपटसृष्टीत झळकू लागलं होतं आणि ते म्हणजे
दादा कोंडके. दादांचा ‘सोंगाड्या’ हा पहिला
चित्रपट १९७० मध्ये प्रदर्शित झाला आणि तो प्रचंड गाजला. त्याआधी ‘विच्छा माझी पुरी करा’सारख्या वगनाट्यांतून दादा मराठी
रसिकांना परिचित होते. मात्र, ‘सोंगाड्या’च्या यशानंतर दादांना राजमार्ग सापडला आणि त्यांनी ओळीनं नऊ रौप्यमहोत्सवी
चित्रपट दिले. पुढचं ऐंशीचं पूर्ण दशक दादा मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य करीत होते.
पांडू हवालदार, एकटा जीव सदाशिव, आंधळा
मारतो डोळा, तुमचं-आमचं जमलं, राम राम गंगाराम,
ह्योच नवरा पाहिजे, बोट लावीन तिथं गुदगुल्या असे
एक से एक हिट सिनेमे दादांनी दिले. पुढं दादांच्या सिनेमांचा दर्जा घसरला. ते द्व्यर्थी
संवादांवरच अवलंबून राहू लागले. या जोडीला टिपिकल शहरी, मध्यमवर्गीय
प्रेक्षकांना भावणारे सिनेमे तयार होतच होते. त्यात मुंबईचा जावई, अवघाचि संसार, अपराध, मानिनी,
अरे संसार संसार, धाकटी जाऊ, वहिनीच्या बांगड्या, मुंबईचा फौजदार, देवता अशा सिनेमांचा समावेश होता. अरुण सरनाईक, कुलदीप
पवार, रवींद्र महाजनी, अशोक सराफ हे नायक
जोरात होते. नायिकांमध्ये जयश्री गडकर, रंजना, पद्मा चव्हाण, उषा चव्हाण, उषा
नाईक, आशा काळे ते नव्यानं आलेली अलका कुबल या सगळ्या फॉर्मात
होत्या. ऐंशीच्या दशकात दादांप्रमाणेच सुषमा शिरोमणीनं एकहाती किल्ला लढविला. त्यांनी
काढलेले भिंगरी, फटाकडी, मोसंबी-नारंगी, गुलछडी आदी सिनेमेही जोरात चालले. पुढं १९८०
ते १९८४ हा काळ हिंदी चित्रपटसृष्टीप्रमाणंच मराठीलाही वाईट गेला. याचं कारण व्हीसीआरचा
लागलेला शोध आणि गावोगावी बोकाळेली व्हिडिओ पार्लर.
यामुळं सिनेमांचा धंदा बसायला लागला.
अर्थात याच काळात डॉ. जब्बार पटेल, अमोल पालेकर यांनी मराठी चित्रपटांची
वेगळी वाट तोलून धरली होती. सामना, सिंहासन, जैत रे जैत आणि उंबरठा हे डॉ. पटेलांचे चारही चित्रपट खूप हिट झाले आणि चर्चेत
राहिले. अमोल पालेकरांनी आक्रीत, तर डॉ. लागूंनी झाकोळ या चित्रपटाची
निर्मिती याच काळात केली. शांतारामबापूही ‘चानी’सारखा वेगळा सिनेमा
देत होते. साधारण १९८२-८३ च्या सुमारास आलेले गोंधळात गोंधळ, लेक चालली सासरला हे सिनेमे चांगले चालले होते. राजदत्त आणि कमलाकर तोरणे हे
दिग्दर्शक तेव्हा जोरात होते.
व्हिडिओ पार्लरच्या गर्तेत सापडलेल्या मराठी सिनेमाला परत ऊर्जितावस्था मिळवून
दिली ती दोन सिनेमांनी. हे दोन्ही सिनेमे १९८४ मध्ये झळकले. एक होता महेश कोठारेचा
‘धूमधडाका’ (हा शशी कपूरच्या
‘प्यार किये जा’चा रिमेक होता) आणि दुसरा
होता सचिनचा ‘नवरी मिळे नवऱ्याला...’ हे दोन्ही चित्रपट मराठी
चित्रपटसृष्टीत माइलस्टोन ठरले. पुढं या दोघांनीही अनेक हिट चित्रपट दिले. दोघांचेही
सिनेमे एकाच वेळी येत आणि दोन्ही व्यवसाय करीत.
सचिनचे सिनेमे शहरी तोंडवळा असलेले
असत आणि महेशचे ग्रामीण. गंमत-जंमत, दे दणादण, अशी ही बनवाबनवी, थरथराट, एकापेक्षा
एक, धडाकेबाज, आमच्यासारखे आम्हीच,
झपाटलेला असे अनेक हिट चित्रपट या काळात आले. ‘आत्मविश्वास’सारखा गंभीर सिनेमाही सचिननं दिला. पुढं ‘कुंकू’ सिनेमा केल्यानंतर सचिननं दीर्घकाळ मराठी चित्रनिर्मितीतून संन्यास
घेतला. (पुढं २००५ मध्ये ‘नवरा माझा नवसाचा’द्वारे त्यानं पुन्हा मराठी सिनेमांकडं लक्ष वळवलं.) लक्ष्मीकांत बेर्डे हा
महेशचा हुकमी एक्का होता, तर अशोक सराफ हा सचिनचा. पुढची पाच-सात
वर्षं या दोघांनीही मराठी चित्रपटसृष्टीवर अनिर्बंध राज्य केलं. केवळ लक्ष्या आणि अशोकमामांना
घेऊन अनेक विनोदी चित्रपट तयार झाले. पण या ‘इनोदी’ चित्रपटांमुळं मराठी चित्रपटसृष्टीचं दीर्घकाळ नुकसानच झालं. प्रेक्षकांनी
मराठी सिनेमांकडं पाठ फिरविली.
याच काळात आणखी एक तरुण निर्माती-दिग्दर्शिका धाडसानं मराठी चित्रपटांची निर्मिती
करीत होती. स्मिता तळवलकर तिचं नाव. ‘कळत-नकळत’पासून ते ‘तू तिथं मी’पर्यंत अनेक चित्रपट स्मितानं पुढील
दशकभरात दिले आणि मरत्या मराठी इंडस्ट्रीमध्ये धुगधुगी कायम ठेवली. नव्वदच्या दशकात
पुण्यातून सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर या दिग्दर्शकद्वयीनंही हेच केलं. ‘दोघी’पासून ते ‘वास्तुपुरुष’पर्यंत अनेक
उत्तमोत्तम सिनेमे त्यांनी दिले.
याच काळात सातत्यानं दर्जेदार चित्रपटनिर्मिती करणारं नाव म्हणजे चंद्रकांत कुलकर्णी. त्यांच्या ‘बिनधास्त’ या पहिल्याच सस्पेन्स थ्रिलर चित्रपटानं खळबळ उडवून दिली. यातल्या सर्व प्रमुख भूमिका महिलांनीच केल्या होत्या, हे विशेष. पाठोपाठ भेट, कायद्याचं बोला, कदाचित, संत तुकाराम, आजचा दिवस माझा असे अनेक उत्तमोत्तम सिनेमे त्यांनी या काळात दिले. याच काळातलं आणखी एक नाव म्हणजे गजेंद्र अहिरे. ‘नॉट ओन्ली मिसेस राऊत’ या चित्रपटापासून लक्ष वेधून घेणाऱ्या गजेंद्रनं त्यानंतर अनेक सिनेमे केले. सातत्यानं चित्रपट देण्याची त्याची हातोटी अचंबित करणारी आहे. शिवाय एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या पेलून तो सिनेमे करीत असतो. सिनेमाच्या प्रती विलक्षण पॅशन असल्याशिवाय हे शक्य नाही.
एकविसावं शतक उजाडलं आणि पाठोपाठ मल्टिप्लेक्सचंही
युग सुरू झालं. मल्टिप्लेक्समुळं सिनेमाच्या व्यवसायाचं परिमाणच बदलून गेलं. सिनेमानिर्मितीचं प्रमाण वाढलं. व्यावसायिकता वाढली.
नंतर २००४ मध्ये ‘श्वास’ आला आणि सगळंच चित्र बदललं.
‘श्वास’नंतर मराठी चित्रपटसृष्टीतलं सगळं चित्रच बदललं. अनेक
दर्जेदार चित्रपट आले. तरुण मुलं दिग्दर्शनात आली. सचिन कुंडलकर, उमेश कुलकर्णी, सतीश राजवाडे, गिरीश
मोहिते, सतीश मन्वर, मंगेश हाडवळे,
सुजय डहाके यांनी खूप चांगले सिनेमे देण्याचा प्रयत्न केला. महेश मांजरेकर
यांनी मराठी चित्रपटनिर्मितीत भव्यता आणली. ‘झी टॉकीज’नं मार्केटिंगचं प्रभावी तंत्र
आणलं. जोगवा, नटरंग, बालगंधर्व,
लोकमान्य टिळक, टाइमपास, शाळा ते अगदी अलीकडचा नटसम्राट असे किती तरी सिनेमे जोरात चालले. ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’सारखा सिनेमा सर्वदूर पोचला. रितेश देशमुखनं मराठीत
पदार्पण करून काढलेला ‘लय भारी’ही असाच
कानाकोपऱ्यात पोचला आणि हिट झाला. ग्रामीण भागातून पुढं आलेले भाऊराव कऱ्हाडे,
नागराज मंजुळे हे दिग्दर्शक जोमानं नवनव्या कलाकृती सादर करू लागले.
त्यातून मराठी सिनेमाचा चेहरा बदलत गेला. नवे प्रयोग होत आहेत. आशयदृष्ट्या मराठी
सिनेमा समृद्ध होताच; आता तो तंत्रदृष्ट्याही समृद्ध झाला
आहे. बजेटही वाढलं आहे. आता मराठी चित्रपट नव्या वळणावर आहे. यापुढंही चांगले चांगले
सिनेमे येत राहतील आणि मराठी चित्रपटसृष्टी नव्या उंचीवर जाईल, अशी खात्री वाटते.---
(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, मुंबई आवृत्ती, २५ जून २०१६)
----