निसर्गाच्या कुशीत...
-------------------------
वयाच्या, करिअरच्या एका टप्प्यावर कामाचा एक दिवसही मोकळा काढणं अशक्य व्हावं, अशी स्थिती अनेकदा येत असते. यात आपली चूक नसते. आपण कामाला आणि कामानं आपल्याला जुंपून घेतलेलं असतं. अशा वेळी हक्कानं आवाज दिला, की गोळा होतील आणि भटकायला बाहेर पडतील, असे मित्र लाभणं ही काय श्रीमंती असते, हे ती ज्यांना लाभली आहे त्यांना बरोबर समजेल. मंदार, अभिजित आणि योगेश हे माझे तीन मित्र असे आहेत. त्यातल्या त्यात मंदार व अभिजित यांच्याबरोबर अधिक भटकणं, फिरणं, भेटणं होतं, ही गोष्ट खरी आहे. मात्र, सीए असलेला आणि ‘बजाज फिनसर्व्ह’मध्ये मोठ्या पदावर असलेला आमचा चौथा मित्र योगेश जोशी जेव्हा वेळ काढून भेटतो, तेव्हा आम्हाला खरोखर फार मजा येते. आमचा चौघांचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. दिवसेंदिवस त्यावर काही बोलणंही होत नाही. मात्र, मैत्री अशा पातळीवर आहे, की या सगळ्यांची गरजही पडत नाही. मागे एकदा चौघं गप्पा मारत बसलो असताना, माळशेज घाटात एखाद्या पावसाळ्यात फिरायला जाऊ या, असा विषय झाला. नेहमीप्रमाणे तो एक-दोन वर्षं बाजूला पडला. यंदा मी नेहमीप्रमाणे परत आठवण केली, तर चक्क चौघांचं एकमत होऊन २२ ऑगस्टला जाऊ या, असं ठरलंही. मात्र, नेमका दोन दिवस आधी योगेश आजारी पडला. मग तेव्हा ते जाणं स्थगित झालं आणि त्याच वेळी पुढच्या गुरुवारी, म्हणजे २९ ऑगस्टला नक्की जाऊ असं ठरलं.
अखेर सगळं जुळून आलं, रजा वगैरे सगळ्यांना मिळाल्या आणि आम्ही सकाळी निघालो. योगेशकडं ‘टाटा हेक्सा’ ही दणकट गाडी आहे. तेव्हा तीच गाडी घ्यायची हे ठरलं होतं. गंमत म्हणजे आमच्या चौघांपैकी कुणीही यापूर्वी माळशेजला एकदाही गेलं नव्हतं. आम्हाला याचं फार आश्चर्य वाटलं आणि हे कसं काय राहून गेलं, असं आम्ही बोलूनही दाखवलं. कदाचित, हे ठिकाण आधी पाहिलं नसल्यानं आम्हाला ‘ट्रिगर’ मिळाला असावा, हेही खरं. तर, आम्ही ठरल्याप्रमाणे आठ वाजता निघायचं असं म्हणून साडेआठला निघालो. दहा वाजता आम्ही चाकण पार केलं, तेव्हा आमचे ग्रह आज उच्चीचे आहेत आणि ही ट्रिप मस्त पार पडणार, असं फीलिंग आलं. योगेशनं सकाळी काही खाल्लं नव्हतं म्हणून मग भामा नदी पार केल्यावर दोन्ही बाजूंना जी हॉटेलांची रांग आहे, त्यापैकी एका ठिकाणी थांबलो. मिसळ, पोहे, चहा असं सगळं यथासांग झाल्यावर योगेशनं गाडी भरधाव सोडली. पाऊस नव्हता, पण ढगाळ हवा होती. वातावरण उत्तम होतं. पुणे-नाशिक हायवे आता चांगला झाला आहे. बहुतेक गावांना बायपास आहे. त्यामुळं फारच लवकर आळेफाट्याला पोचलो. तिथंही आता बायपास झाला आहे. मग त्या बायपासनं वळून आम्ही नगर-कल्याण महामार्गाला लागलो. इथून पुढं आता दुपदरी रस्ता होता. हा रस्ता कसे असेल अशी आम्हाला धास्ती वाटत होती. मात्र, सुदैवानं रस्ता बरा होता. या रस्त्याला लागल्याबरोबर हवा आणि परिसर दोन्ही एकदम बदलल्याचं जाणवलं. सगळा आसमंत हिरवागार होता. समोर डोंगररांगा दिसू लागल्या होत्या. सह्याद्री दोन्ही हात फैलावून साद घालत होता. रस्त्यावर किती तरी ठिकाणी आता इथंच थांबावं, असं वाटून गेलं. मात्र, आम्हाला गाठायचा होता माळशेज घाट!
थोड्याच वेळात ओतूर आलं. मी खूप पूर्वी या गावात आलो होतो. माझा आतेभाऊ तेव्हा इथं शिकायला होता. आता हे गाव पुष्कळ बदललेलं दिसलं. वाढलं होतं. ओतूर म्हटलं, की आमच्या ‘बाबा’ची (अनिल अवचट) आठवण होणं स्वाभाविकच. हे त्याचं गाव. शिवाय ‘साप्ताहिक सकाळ’चे दिवंगत संपादक सदा डुम्बरे यांचंही हे गाव. या दोघांचंही स्मरण त्या गावातून जात असताना होणं अगदी स्वाभाविक होतं. पुढं गेल्यावर एके ठिकाणी छोट्या खिंडीसारखा भाग ओलांडून आलो आणि समोरचं दृश्य बघून अक्षरश: स्तिमित झालो. उजव्या बाजूला पिंपळगाव जोगे धरणाचा विस्तीर्ण जलाशय पसरलेला दिसला आणि त्यामागे हिरवीगार, उंच डोंगररांग.... खरं तर तिन्ही बाजूंनी डोंगर आणि मधे बशीसारखं पसरलेलं ते धरणातलं पाणी... अहाहा! स्वित्झर्लंडपेक्षा काय कमी सुंदर होतं हे दृश्य, असं किती वेळा मनात येऊन गेलं. त्या भागात हळूहळू रिसॉर्टसारखी बांधकामंही होताना दिसली आणि मन संभ्रमात पडलं. पर्यटनामुळं विकास होणार, हे खरं; पण त्यामुळं इथला निसर्ग आत्ता आहे तसा राहील का, असंही वाटून गेलं. अर्थात फार वेिचार करायला वेळ नव्हता. एखाद्या ‘बायोस्कोप’मध्ये एकापाठोपाठ एक दृश्यांची माळ दिसत राहते, तशी ‘एक से एक’ अप्रतिम दृश्यं निसर्ग आमच्यासमोर पेश करत होता. सह्याद्रीचं हे वैशिष्ट्य आहे. कितीही वेळा तुम्ही एखादा भाग, डोंगर, किल्ला किंवा पायवाट अनुभवा; तुम्हाला कधीच कंटाळा येत नाही. आम्हा चौघांपैकी अभ्या हा जास्त भटका जीव. मी कॉलेज काळात किंवा नंतरही अगदी बॅचलर असेपर्यंत बऱ्यापैकी भटकलेलो. नंतर मात्र, ‘लेजर ट्रिप’ जास्त झाल्या. आमची आजची ट्रिपही तशीच होती. वेळेचं बंधन नव्हतं, अमुक ठिकाण गाठायचंय, अशी घाई नव्हती, की तमुक टिकमार्क गोष्ट केलीच पाहिजे, अशी सक्ती नव्हती. उलट मजेत, गप्पा मारत, आमची आवडती ‘नाइन्टीज’ची गाणी ऐकत मस्त प्रवास सुरू होता. थोड्याच वेळात पुण्याची हद्द संपली (आणि चांगला काँक्रिटचा रस्ताही संपला) आणि ठाणे जिल्ह्याची हद्द सुरू झाली. संपूर्ण माळशेज घाट ठाण्याच्या हद्दीत येतो. मी इकडं पूर्वी कधीही आलो नसल्यानं सर्व गोष्टी माझ्यासाठी नवीनच होत्या. मेंदू आपोआप एकेक नोंदी करत चालला होता. पुढं घाट सुरू होताना उजव्या बाजूला एमटीडीसीचं रिसॉर्ट लागलं. मात्र, मी डाव्या बाजूला बसल्यानं माझ्या ते पटकन लक्षात आलं नाही. एक वळण घेऊन आम्ही पुढं गेलो, तर मोठा धबधबा दिसला. झालं. लगेच आम्ही गाडी थांबवली. तिथं बरीच दुकानं होती. मात्र, आज आठवड्याचा मधलाच दिवस असल्यानं पर्यटक फार नव्हते. (आम्हाला तेच अपेक्षित होतं.) थबधब्यापाशी गेलो. तिथं वर जाण्यासाठी पक्क्या पायऱ्या व रेलिंग केलं होतं. धबधब्याखालून जाताना भिजलोच. मला आणि मंदारला भिजायचं नव्हतं; पण योगेश आणि अभ्यानं मनसोक्त भिजून घेतलं. आम्ही फोटो आणि व्हिडिओ काढायचं काम केलं. इथं फारच झकास वातावरण होतं. समोर घाट आणि त्याखाली पसरलेली दरी दिसत होती. इथं बराच वेळ रेंगाळल्यावर मग खाली उतरलो. तिथल्या एका दुकानदाराला विचारलं, तर त्यानं पुढं आणखी दहा किलोमीटर घाट आहे, असं सांगितलं. एमटीडीसीचं रिसॉर्ट मागेच गेल्याचंही तो म्हणाला. (आम्हाला शक्यतो तिथं जेवायला जायचं होतं.) मग आम्ही घाटातून पुढं निघालो. एका वळणानंतर अचानक तो ‘आयकॉनिक’ बोगदा दिसला. तो ओलांडल्यावर मग व्ही आकाराचं ते लांबलचक वळण दिसलं. ‘माळशेज घाट’ म्हटलं, की जे फोटो दिसतात, ते याच पट्ट्यातले. बोगदा ओलांडल्यावर समोरच्या डोंगरावरून अक्षरश: पंधरा ते सोळा धबधबे कोसळताना दिसले. फार पाऊस नसल्यानं धबधबे खूप मोठे नव्हते, पण वाहत होते, हेही नसे थोडके. मग आम्ही त्या ‘व्ही’च्या टोकाला टर्न मारून पुढं त्याच धबधधब्यांखाली आलो. इथंच तो ‘कार वॉश पॉइंट’ दिसला. अतिशय शार्प अशा कातळांतून रस्ता काढला होता आणि एका ठिकाणी तो धबधबा थेट रस्त्यावर पडत होता. आम्ही गेलो, तर काही पोरं-पोरी त्या पाण्याखाली, ऐन रस्त्यात बसकण मारून बसले होते आणि अर्थात ‘रील्स’ काढत होते. आम्ही मोठमोठ्यानं हॉर्न वाजवून त्यांच्या बाजूनं गाडी पुढं निघाली. पुढच्या वळणावर एक मोठा पॉइंट दिसला. मात्र, आम्ही तिथं थांबलो नाही. आम्हाला तो घाटरस्ता पूर्ण बघायचा होता. एका वळणानंतर समोर एक अतिप्रचंड कातळाची भिंत अगदी अंगावर आली. खरं तर ती तिथून खूप लांब होती. मात्र, तो अवाढव्य आकार छाती दडपवून टाकत होता. तिथल्या वळणानंतर उतार सुरू झाला. मग पुढं आणखी एक पॉइंट दिसला. (त्याचं नाव लाजवंती सनसेट पॉइंट हे नंतर कळलं.) तिथं आधीच एक तरुण-तरुणी येऊन फोटो काढत बसले होते. मग आम्हीही आमचं फोटोसेशन केलं. इथून दोन्ही बाजूंनी सह्याद्रीच्या विशाल रांगा दूरवर दिसत होत्या. एक अंगठ्यासारखा सुळकाही दिसला. (हाच तो प्रसिद्ध ‘नानाचा अंगठा’ असावा का? माहिती नाही...) इथं आजूबाजूला बरेच गड, सुळके, किल्ले असणार. मात्र, आम्हाला त्याची फारशी माहिती नव्हती. त्यामुळं काही कळलं नाही. अर्थात तो निसर्ग डोळ्यांनी पिऊन घेताना मात्र आम्हाला अजिबात कंटाळा येत नव्हता. ऑक्सिजन रिफिलिंगचं काम जोरात सुरू होतं.
आता पोटात कावळे ओरडायला लागले होते. विशेषत: योगेशला खूपच भूक लागली होती. मग आम्ही परतीचा रस्ता धरला. येताना अभ्याच्या लक्षात आलं, की त्याचं जर्किन त्या धबधब्यापाशीच राहिलं आहे. मग ते घ्यायला घाईनं पोचायला हवं, म्हणून येताना त्या मोठ्या पॉइंटपाशी थांबलोच नाही. सुदैवानं धबधब्यापाशी अभिजितचं जर्किन आणि टोपी जशीच्या तशी मिळाली. मग एमटीडीसीच्या रिसॉर्टमध्ये गेलो. तिथं त्यांचं फ्लेमिंगो रेस्टॉरंट आहे. मग तिथं मस्तपैकी जेवलो. जेवण चांगलं होतं. जेवल्यावर मग एमटीडीसीच्या रिसॉर्टवर फेरफटका मारला. डोंगराच्या बाजूनं मोठं माळरान आहे. ते डोंगराच्या बाजूनं कुंपण बांधून बंदिस्त केलंय. तिथं आम्ही जरा फिरलो. फोटो काढले. अभ्यानं रील्स केले. तिथला भन्नाट वारा अगदी झिंग आणणारा होता. निसर्गाचं भव्य रूप चहूबाजूंनी दिसत होतं. उत्तुंग, बेलाग डोंगरकडे आणि त्यावर झेपावणारा सावळ्या मेघांचा महासागर हे रूप पाहून आपल्या खुजेपणाची जाणीव होत होती. पावलं रेंगाळली. मनही तिथंच घुटमळलं... पण आता निघायला हवं होतं. वातावरण असं होतं, की किती वाजले कळत नव्हतं. मगापर्यंत बडबड करणारे आम्ही सगळेच तिथं एकदम शांत, शांत होऊन गेलो होतो. काही बोलू नये, आवाज करू नये... एकमेकांच्या सोबतीनं फक्त तिथं उभं राहावं आणि ती असीम शांतता काळजात भरून घ्यावी!
असा काही वेळ गेल्यावर एका श्वानानं भौतिक अस्तित्वाची जाणीव करून दिली. अगदी जड अंत:करणानं तिथून निघालो. आता जवळपास साडेतीन वाजून गेले होते. आता परतीचे वेध लागले होते. येताना थोडं पुढं आल्यावर जुन्नरकडं जाणारा वेगळा रस्ता दिसला. मग आळेफाट्यावरून न जाता या वेगळ्या रस्त्यानं जाऊ; म्हणजे तोही जरा नवा भाग बघण्यात येईल, असं मी सुचवलं. मग योगेशनं तिकडं गाडी वळवली. जुन्नर हा पर्यटन तालुका जाहीर झाल्यानं इकडं भरपूर निधी आला आहे. अर्थात निधी आला तरी कामं होतातच असं नाही. इथं मात्र अतिशय सुंदर रस्ता तयार केलेला दिसला. साधा दुपदरीच, पण अजिबात खड्डे नसलेला, नवा रस्ता! त्यावर प्रॉपर दुभाजक, दोन्ही बाजूंनी पांढरे पट्टे आखलेले... स्पीड ब्रेकर, फलक सगळं व्यवस्थित असं... या रस्त्यानं पुढं गेल्यावर एक छोटासा घाट लागला. तो तर फारच सुंदर होता. तिथून वर गेल्यावर एक खिंड लागली. तिला ‘गणेश खिंड’ असं नाव आहे, असं तिथल्या फलकावरून कळलं. पुढं जुन्नर अगदी दहा किलोमीटरच होतं. उजवीकडं शिवनेरी किल्ला दिसू लागला. मधली छोटी छोटी गावं चार वाजताच्या कोवळ्या उन्हानं लखलखून दिसत होती. समोर पांढऱ्या अभ्रांचे पुंजके असलेलं निळं-स्वच्छ आकाश आणि खाली हिरवाईचं कोंदण ल्यायलेली धरणी... आपण इंग्लंडच्या कंट्रीसाइडचं खूप कौतुक करतो; पण आम्ही आत्ता बघत असलेला हा भाग त्यापेक्षा कुठंही कमी नव्हता. जुन्नर गावात प्रवेश करताना उजवीकडं ‘नाणेघाट ४३ किमी’ अशी पाटी दिसली. (पुढच्या ट्रिपची खूणगाठ बांधून झाली...) समोर एक भव्य प्रवेशद्वार लागलं. त्याला शहाजीराजांचं नाव होतं. मागे शिवनेरी दुर्ग दिमाखात उभा होता. जुन्नर हे एक टुमदार गाव आहे. गावाच्या मधल्या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे. तिथून डावीकडं वळून बसस्टँडवरून आम्ही गावाबाहेर पडलो. आता नारायणगावकडं निघालो. रस्त्यात ओझर, लेण्याद्री, खोडद खुणावत होते. मात्र, आता उशीर झाला होता. मग आम्ही नारायणगावला येऊन बायपासला चहाला थांबलो.
इथं साधारण पाच वाजले होते. आता पुण्याची वाट खुणावत होती. हा नाशिक-पुणे हायवे असल्यानं इथून पुढं चाकणपर्यंत भन्नाट प्रवास झाला. पुण्यात यायला मात्र साडेसात वाजले. मग पुण्यातच जेवून सहलीची सांगता करायला हवी होती. तशी ती यथासांग, साग्रसंगीत झाली. एका दिवसाची ही नीटनेटकी ट्रिप आता आम्हाला पुढं पुष्कळ दिवस प्राणवायू पुरवत राहील, यात शंका नाही. पुढची सहल कुठं काढू या, अशी चर्चा लगेच सुरू झालीय, हेच मोठं फलित! इति!!
--------
(काही महत्त्वाच्या नोंदी -
- पुणे ते माळशेज घाट अंतर - १३० किलोमीटर
- स्वत:चं वाहन घेऊन जाणे उत्तम
- शक्यतो आठवड्याच्या अधल्या-मधल्या दिवशी जावे. वीकएंडना प्रचंड गर्दी असते. विशेषत: मद्यपान करून धिंगाणा घालणाऱ्या तरुणाईमुळे गेल्या काही वर्षांत माळशेज बदनाम झाले आहे. तरी ‘फॅमिलीवाल्या’ मंडळींनी वीकएंड टाळावाच.
- एमटीडीसीच्या रिसॉर्टवर जेवणाची चांगली सोय
- थोडा वेळ काढून गेल्यास किंवा मुक्काम केल्यास याच ट्रिपमध्ये शिवनेरी, ओझर, लेण्याद्री किंवा खोडद ही ठिकाणेही पाहता येतील.
- पुण्यातून लवकर निघून, सकाळी नऊच्या आत चाकणच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा. चाकणच्या पुढे भामा नदी ओलांडली, की दोन्ही बाजूंना नाश्त्यासाठी बरीच हॉटेल आहेत.)
------