28 Jan 2023

दोन नाटकं - दोन छोटी टिपणं...

१. काजव्यांचा गाव
---------------------

आतून उजळविणारा...
---------------------------


सुदर्शन रंगमंच इथं नाटक पाहायचा फायदा म्हणजे इथं तुम्ही नाटकाचाच एक भाग होऊन जाता. वास्तविक शुभांगीताई (दामले) मला कित्येक दिवस नाटक पाहायला बोलावताहेत. पण मला संध्याकाळची वेळ जमत नसल्यानं ते राहूनच जात होतं. अखेर तो योग आला. खूप दिवसांनी इथं परवा (रविवारी) एक नाटक पाहिलं आणि हा नाटकातलंच होऊन जाण्याचा अनुभव दीर्घ काळानं घेतला. ‘काजव्यांचा गाव’ हे ते नाटक. प्रदीप वैद्य सर्वेसर्वा असलेलं हे नाटक पाहणं म्हणजे एक ‘आतून उजळवून टाकणारा’ अनुभव आहे.
कोकणातल्या एका छोट्या गावात - जिथं २००८ मध्येही अजून लोडशेडिंगमुळं कंदिलांचा वापर करावा लागतो - तिथं राहणाऱ्या दीक्षित यांच्या घरात घडणारी ही गोष्ट आहे. या दीक्षितांच्या घरातली सर्वांत ज्येष्ठ व्यक्ती असलेल्या आजींच्या सहस्रचंद्रदर्शनाचा घाट तिच्या दोन मुलींनी घातला आहे. यातली एक मुलगी पुण्यात असते, तर एक अमेरिकेत ‘निघून’ गेलेली असते. आजींना दोन मुलं आहेत. एक चिपळ‌ुणात राहतो, तर एक आजींसोबत त्या गावातच राहतो व शेती-वाडी करतो. याशिवाय अजून एक अविवाहित मुलगीही तिथंच राहते आहे. आजींची नातवंडंही आहेत. काही तिथंच राहतात, तर एक नात पुण्याहून आली आहे. तिचा मित्रही सोबत आला आहे.
मग नाटकातले प्रसंग उलगडतात जातात तसतसे या वरवर एकसंध, सुखी दिसणाऱ्या कुटुंबातले लहान-मोठे अंधार आपल्याला दिसू लागतात. नाटकात होणाऱ्या फेड-इन, फेड-आउटप्रमाणे आपल्याही मनात या अंधार-प्रकाशाचा खेळ सुरू होतो. नात्यांचं आभासीपण लख्ख दिसू लागतं. कोरड्या हिशेबांसाठीचे रोकडे भाव जाणवू लागतात. एकीकडं लहान मुलांमधला निरागस भाव आणि दुसरीकडं मोठे होऊन व्यावहारिक अन् अलिप्त झालेले सगळे मोठे यांचा हा समांतर प्रवास आपल्यासमोर साकारू लागतो. आपल्या मनाला कधी धडका देत, तर कधी गोंजारत, कधी रागवत, तर कधी मायेनं हे नाटक आपल्या जवळ येतं... जुन्या मित्राशी चांदण्या रात्री हक्कानं गप्पा मारीत बसावं, तसं गुजगोष्टी सांगत बसतं.
मुळात हे नाटक समीपनाट्य या प्रकारातलं आहे. म्हणजे प्रेक्षकांच्या मधेच हे नाटक घडतं. पात्रं आपल्यामधून ये-जा करतात. अशा प्रकारचं नाटक पाहताना एक विलक्षण तद्रूपता लागते. त्यामुळं मोजक्या आणि जाणत्या प्रेक्षकांसमोरच याचे प्रयोग होऊ शकतात. ‘सुदर्शन’ला हे शक्य आहे. तिथल्या रंगमंचाच्या अवकाशाचा योग्य वापर करून घेऊन नाटककार हे नाट्य आपल्या सभोवती रचतो. कलाकारांच्या हालचाली, त्यांच्यातला परस्परांमधला मेळ आणि प्रेक्षकांची भावावस्था यांची उत्कृष्ट एकतानता अशा वेळी अनुभवता येते. कलाकार आपल्या अगदी जवळ येऊन अभिनय करीत असल्यानं त्यांच्या चेहऱ्यावरची रेष अन् रेष, प्रत्येक भाव आपल्याला दिसत राहतात. खरं तर अशा परिस्थितीत अभिनय करणं हे अत्यंत आव्हानात्मक आहे. ते या नाटकातल्या सगळ्याच कलाकारांनी साधलंय, याचं विशेष कौतुक!
विशेष उल्लेख करायचा तो ताई झालेली रूपाली भावे, प्रतिभा झालेली मधुराणी आणि आजी झालेल्या राधिका हंगेकर यांचा. आशिष वझे आणि निखिल मुजुमदारही उत्कृष्ट. रूपाली आणि तिच्या भावाचा एक दीर्घ संवाद खासच! मधुराणीनं ‘प्रतिभा’ खूपच प्रभावीपणे साकारली. शांता झालेल्या सायली सहस्रबुद्धेंनी तिचा त्रागा चांगला दाखविलाय. मुलांमध्ये फिट येणारा गणेश साकारणाऱ्या गंधार साळवेकरनं विशेष दाद मिळविली. श्वेता झालेल्या मुक्ता सोमणकडं भविष्यातली ‘मुक्ता बर्वे’ म्हणून पाहायला हरकत नाही. या मुलीवर लक्ष ठेवायला हवं. कासिम आणि गुरुजी अशी दोन पात्रं साकारणाऱ्या समीर जोशीचा ठसका मस्तच! वसुधा झालेल्या प्रिया नेर्लेकरांचा इंटेन्स अभिनयही भिडला. बाकी सर्व कलाकारांनी पूरक व उत्तम साथ दिली. स्मिता तावरे यांची वेशभूषा व आशिष देशपांडे यांची रंगभूषाही उल्लेखनीय. या सर्वांनाच झी आणि मटा गौरव पुरस्कारांत विविध नामांकनं मिळाली आहेत. त्यामुळं त्यांच्या कर्तृत्वावर जाणकारांचं आधीच शिक्कामोर्तब झालंय.
हे नाटक आहे ते प्रदीप वैद्य यांचं. लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाश व संगीत अशी पंचरंगी कामगिरी त्यांनी यात केलीय. या नाटकावर महेश एलकुंचवारांच्या वाडा नाट्यत्रयीचा प्रभाव जाणवतो. हे ‘वाडा’चं कोकण व्हर्जनही वाटू शकेल. अर्थात त्यानं बिघडत काही नाहीच!
थोडक्यात, एक उत्कट, सच्चा नाट्यानुभव घ्यायचा असेल, तर ‘काजव्यांच्या गावा’ला जाण्याशिवाय पर्याय नाही. नाटकाच्या ‘समीप’ जाण्याची ही एक उत्तम संधी आहे.

(२६ मे २०१९, फेसबुक पोस्ट)

------

२. अडलंय का?
-----------------

हो... अडलंय!
----------------

निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘अडलंय का?’ या नाटकाचे प्रयोग सध्या सुरू आहेत. हे नाटक सर्वांनी आवर्जून बघावं. मराठी रंगभूमीवरचे एक दमदार अभिनेते-दिग्दर्शक, प्रायोगिक नाट्यचळवळीचे आधारस्तंभ अतुल पेठे व त्यांची कन्या पर्ण पेठे हे दोघे यात काम करतात. चार्ल्स लेविन्स्की या नाटककाराच्या ‘दी बेझेटझुंग’ (दी ऑक्युपेशन) या मूळ नाटकाची रंगावृत्ती पेठे पिता-पुत्री आणि निपुणने तयार केली आहे. (भाषांतराचे श्रेय शौनक चांदोरकर यांचे.) सलग दीड ते पावणेदोन तास चालणारा हा दीर्घांकच आहे. एका नाट्य कलावंताचं आणि त्या नाट्यगृहासाठीचं नगरपालिकेचं बजेट कमी करायला आलेल्या एका महिला प्रशासन अधिकाऱ्याचं संभाषण यातूनच हे नाट्य फुलत जातं.
दोनच कलावंत कायम रंगमंचावर असल्यानं प्रेक्षकांना खिळवून ठेवायची सर्व जबाबदारी या दोघांवरच आहे. अतुल पेठे यांनी यातील अभिनेता साकारला आहे, तर महिला अधिकाऱ्याची भूमिका अर्थातच पर्णनं केली आहे. नाटकाचा जवळजवळ पहिला अर्धा भाग अतुल पेठे एक वेगळा, काहीसा कर्कश वाटणारा आवाज लावून बोलतात. (त्यामागचं कारण आपल्याला नंतर कळतं.) पण त्या आवाजात सतत जवळपास एक तास बोलणं हे किती थकवणारं काम आहे! मात्र, पेठे त्यांच्यातल्या अभिनेत्याला पूर्णपणे कामाला लावतात आणि त्याच्याकडून अक्षरश: अंगमेहनत करवून घेतात. दुसऱ्या बाजूनं या अभिनेत्याच्या विविध विक्षेपांनी आधी दचकणारी, घाबरणारी; मात्र एकदा त्याचे हे उद्योग लक्षात आल्यावर ठामपणे त्याला सामोरी जाणारी महिला अधिकारी पर्णनंही तितक्याच तोलामोलानं साकारली आहे.
कलेचं आपल्या (सार्वजनिक) आयुष्यातलं नक्की स्थान काय, या मूलभूत विषयावर नाटकात चिंतन होतं. ते पुष्कळसं सटल आहे. मात्र, तो अंत:प्रवाह आपल्याला सतत जाणवत राहील याची काळजी दिग्दर्शकानं निगुतीनं घेतली आहे. विशेषत: अलीकडच्या दोन वर्षांत करोनाकाळात आपण या कलाप्रकारांना किती प्राधान्याचं स्थान दिलं होतं, हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्या पार्श्वभूमीवर नाट्यगृह राहिलं पाहिजे, चाललं पाहिजे यासाठीचा हा झगडा फारच सूचक वाटतो. नाटक-सिनेमावाचून तुमचं काही अडलंय का? असं विचारणाऱ्यांना ठामपणे ‘हो, अडलंय’ असं सांगणारी ही नाट्यकृती आहे. नाटक-सिनेमाला श्वास मानणाऱ्या आपण सगळ्यांनी ती बघितलीच पाहिजे.

(१७ मे २०२२, फेसबुक पोस्ट)

------

9 Jan 2023

‘नज़र अंदाज़’विषयी...

नजरेपलीकडचे दाखवणारा...
----------------------------------

नुकताच ‘नेटफ्लिक्स’वर ‘नज़र अंदाज़’ हा हिंदी चित्रपट पाहिला. अतिशय आवडला. साध्या माणसांच्या जगण्यातलं साधं-सरळ तत्त्वज्ञान सांगणारा हा चित्रपट प्रत्येकानं आवर्जून पाहावा. कुमुद मिश्रा, दिव्या दत्ता व अभिषेक बॅनर्जी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हे तिन्ही कलाकार अलीकडच्या काळात हिंदी सिनेमांतून काहीशा दुय्यम भूमिकांतून आपल्याला सतत दिसत आले आहेत. मात्र, विशेषत: वेब सीरीज आल्यानंतर त्यांच्यातल्या अभिनयक्षमतेची जाणीव आपल्याला अधिक प्रकर्षानं झाली असं म्हणता येईल. कुमुद मिश्रा हा गुणवान अभिनेता अनेक हिंदी चित्रपट व वेब सीरीजमधून दिसतो. अलीकडे ‘डॉ. अरोरा’ ही त्याची वेब सीरीज बघितली होती व अतिशय आवडली होती. अभिषेक बॅनर्जी हा अभिनेतादेखील अनेक सिनेमांतून व वेब सीरीजमधून दिसला आहे. दिव्या दत्ता या दोघांच्या तुलनेत अधिक सीनिअर आणि जास्त नाव असलेली अभिनेत्री आहे. 
या तिघांना एकत्र आणून ‘नज़र अंदाज़’सारखा वेगळा चित्रपट तयार होईल, असं खरोखर वाटलं नव्हतं. मात्र, दिग्दर्शक विक्रांत देशमुख यानं ही किमया घडवून दाखविली आहे. इथं मला हे सांगितलं पाहिजे, की हा चित्रपट बघताना मला विक्रांतसाठी अतिशय मनापासून आनंद होत होता. याचं कारण म्हणजे हा विक्रांत उर्फ विकी माझा मित्र आहे. पुण्यात ‘सकाळ’मध्ये रुजू झाल्यावर बॅचलर लाइफचा काही काळ मी भाऊमहाराज बोळातील ओक वाड्यात कॉट बेसिसवर राहून काढला आहे. (काळ १९९७ ते २००३ दरम्यान...) विकी तेव्हा तिथंच आमच्यासोबत राहत होता. त्याचे बाबा तेव्हा खोपोलीला नोकरी करत होते आणि विकी शिकण्यासाठी पुण्यात राहत होता. तेव्हापासून मी विकीला बघतो आहे. नंतर तो मुंबईला गेला. चित्रपटसृष्टीत काम करत राहिला. नंतर त्याची प्रगती समजत राहिली, पण मधला काही काळ अजिबात संपर्क नव्हता. मात्र, व्हॉट्सअपमुळे तो पुन्हा संपर्कात आला. ओक वाड्याचा ग्रुप तयार झाला आणि सगळे मित्र पुन्हा भेटले. असो.
सांगायचा मुद्दा, या जवळच्या माणसानं स्वतंत्रपणे दिग्दर्शित केलेला पहिला हिंदी चित्रपट आला, म्हणून अतिशय आनंद झाला. तो मला थिएटरला जाऊनच बघायचा होता. मात्र, तेव्हा काही कारणांनी ते झालं नाही. ‘नेटफ्लिक्स’वर तो सिनेमा आल्यावरही माझ्याकडून लगेच काही बघणं झालं नाही. मात्र, परवाच्या रविवारी अखेर हा सिनेमा बघितला आणि लगेच त्यावर लिहायचं ठरवलं. सिनेमा आवडलाच. मित्रानं केलेला म्हणून थोडा अधिकचा ‘बायस’ असेलही; पण माझ्याआधीच फेसबुकवर काही जाणकारांनी आवर्जून हा सिनेमा बघा, असे चांगले रिव्ह्यू लिहिल्याने मलाच अधिक आनंद झाला. असो.
‘नज़र अंदाज़’ ही आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांच्या साध्या-सोप्या जगण्याची, त्यातल्या साध्या-सोप्याच पेचांची, अडचणींची, दुविधेची कहाणी आहे. परमेश्वर सर्वांच्या पदरात नशिबाचं सारखं माप टाकत नाही. प्रत्येकाचं नशीब वेगळं आणि आयुष्याची वाटचालही भिन्न... अशा तीन भिन्न नशिबांची, भिन्न स्वभावांची तीन माणसं काही कारणपरत्वे एकत्र येतात. आपला नायक सुधीर (कुमुद मिश्रा) अंध आहे. जन्मापासूनच अंध असल्यानं त्यानं हे जग पाहिलेलंच नाही. अर्थात त्याचे बाकीचे ‘सेन्सेस’ अधिक तीव्र असतात. योगायोगाने त्याची गाठ एका भुरट्या चोराशी (अभिषेक बॅनर्जी) पडते. तो त्याला चांगलं वागण्याच्या अटीवर स्वत:च्या बंगल्यात घेऊन येतो. त्याला अली असं नाव देतो. भवानी (दिव्या दत्ता) ही सुधीरकडे काम करणारी त्याची मदतनीस असते. वेगवेगळ्या कारणांनी सुधीरच्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवून असणारे हे दोघं एकमेकांचा अडथळा दूर करायचा प्रयत्न करायला लागतात.
सुधीरचा एक इतिहास आहे. त्याला मृत्युपत्र करायचं आहे. त्याआधी त्याला या दोघांना घेऊन मांडवी या त्याच्या मूळ गावी जायचं आहे. मग हे तिघं साइडकार असलेल्या स्कूटरवरून प्रवासाला निघतात. प्रवासादरम्यान बऱ्याच गमती-जमती होऊन अखेर हे मांडवीला पोचतात. तिथं पोचल्यावर त्यांना सुधीरची एके काळची प्रेयसी भेटते. ती आता त्याच्या मित्राचीच बायको असते. सुधीरला तिला भेटून अतिशय आनंद होतो. आता अली आणि भवानी यांचं सुधीरबद्दलचं मत बदलू लागतं. त्याच्या आयुष्यातील एक त्रुटी दूर करण्यासाठी ते त्याला कच्छच्या रणात घेऊन जातात... त्यानंतर काय होतं हे प्रत्यक्ष चित्रपटात बघणंच योग्य.
दिग्दर्शक विक्रांत देशमुख आणि प्रसिद्ध छायाचित्रकार-दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांची ही कथा आहे. विक्रांतच्या डोक्यात चित्रपटाचा प्रवास अगदी पक्का आहे आणि त्यानं तो फोकस अजिबात हलू दिलेला नाही. कुमुद मिश्राच्या अभिनयक्षमतेला पूर्ण वाव देणारी ही भूमिका आहे आणि या अभिनेत्यानंही तिला पूर्ण न्याय दिला आहे. अंध व्यक्तीच्या सर्व लकबी, हावभाव त्यांनी अगदी बरोबर उचलल्या आहेत. या भूमिकेसाठी त्यांच्या दाताची रचना काहीशी बदलली आहे आणि त्यामुळे त्या काहीशा अवघड अशा तोंडाच्या पोझिशनसह त्यांना संपूर्ण सिनेमाभर वावरावं लागलं आहे. बहुतांश सिनेमांत सुरुवातीला जो माणूस अंध दाखवतात, तो मुळात अंध नसतोच आणि अंध असण्याचं नाटक करत असतो, असा शेवटी (‘धक्कादायक वगैरे’) उलगडा होत असतो. या सिनेमातही तसंच होतं की काय, अशी मला भीती वाटत होती. परंतु विकीच्या ‘नो नॉनसेन्स’ स्वभावावर विश्वासही होता. अखेर तो विश्वास सार्थ ठरला आणि नायकाला शेवटी अचानक डोळेबिळे आले नाहीत. अभिषेक बॅनर्जी हाही ताकदीचा कलाकार आहे. त्याला तुलनेत फार वाव नव्हता. उलट दिव्या दत्ताने भवानीची भूमिका नेहमीच्या ठसक्यात केली आहे. 
चित्रपटातील दोन-तीन प्रसंगांचा विशेष उल्लेख करावा लागेल. मांडवीत सुधीर आपल्या जुन्या घरात जातो आणि त्याला आईची आठवण येते तेव्हाचा प्रसंग आणि संवाद खास आहेत. अगदी डोळ्यांत पाणी आणणारे! दुसरा प्रसंग आहे तो सुधीर आणि त्याची प्रेयसी भेटतात तो... हा प्रसंग अगदी जमून आला आहे. राजेश्वरी सचदेवनं ही छोटीशी भूमिका अगदी लक्षात राहण्यासारखी केली आहे. त्या प्रसंगातला तिचा मुद्राभिनय खास! 
तिसरा प्रसंग आहे तो कच्छच्या रणातला. त्याविषयी इथं फार काही सांगता येत नाही, मात्र तो प्रसंग सिनेमॅटोग्राफर राकेश सिंह यांनी कमालीचा सुंदर टिपला आहे. विशाल मिश्रा यांचं संंगीत आहे. काही काही गाणी जमून आली आहेत. मात्र, त्यांचे शब्द माझ्या तरी लक्षात नाहीत. 
एकूण, हा न चुकता घेण्यासारखा अनुभव आहे. चित्रपटाचा शेवट चटका लावणारा आहे. माणुसकीवरचा आपला विश्वास वाढवणारा... 
माझ्यासाठी, मित्राविषयीचा अभिमान आणखी वाढवणारा...
नक्की बघा.

---

दर्जा : साडेतीन स्टार

---