नजरेपलीकडचे दाखवणारा...
----------------------------------
या तिघांना एकत्र आणून ‘नज़र अंदाज़’सारखा वेगळा चित्रपट तयार होईल, असं खरोखर वाटलं नव्हतं. मात्र, दिग्दर्शक विक्रांत देशमुख यानं ही किमया घडवून दाखविली आहे. इथं मला हे सांगितलं पाहिजे, की हा चित्रपट बघताना मला विक्रांतसाठी अतिशय मनापासून आनंद होत होता. याचं कारण म्हणजे हा विक्रांत उर्फ विकी माझा मित्र आहे. पुण्यात ‘सकाळ’मध्ये रुजू झाल्यावर बॅचलर लाइफचा काही काळ मी भाऊमहाराज बोळातील ओक वाड्यात कॉट बेसिसवर राहून काढला आहे. (काळ १९९७ ते २००३ दरम्यान...) विकी तेव्हा तिथंच आमच्यासोबत राहत होता. त्याचे बाबा तेव्हा खोपोलीला नोकरी करत होते आणि विकी शिकण्यासाठी पुण्यात राहत होता. तेव्हापासून मी विकीला बघतो आहे. नंतर तो मुंबईला गेला. चित्रपटसृष्टीत काम करत राहिला. नंतर त्याची प्रगती समजत राहिली, पण मधला काही काळ अजिबात संपर्क नव्हता. मात्र, व्हॉट्सअपमुळे तो पुन्हा संपर्कात आला. ओक वाड्याचा ग्रुप तयार झाला आणि सगळे मित्र पुन्हा भेटले. असो.
सांगायचा मुद्दा, या जवळच्या माणसानं स्वतंत्रपणे दिग्दर्शित केलेला पहिला हिंदी चित्रपट आला, म्हणून अतिशय आनंद झाला. तो मला थिएटरला जाऊनच बघायचा होता. मात्र, तेव्हा काही कारणांनी ते झालं नाही. ‘नेटफ्लिक्स’वर तो सिनेमा आल्यावरही माझ्याकडून लगेच काही बघणं झालं नाही. मात्र, परवाच्या रविवारी अखेर हा सिनेमा बघितला आणि लगेच त्यावर लिहायचं ठरवलं. सिनेमा आवडलाच. मित्रानं केलेला म्हणून थोडा अधिकचा ‘बायस’ असेलही; पण माझ्याआधीच फेसबुकवर काही जाणकारांनी आवर्जून हा सिनेमा बघा, असे चांगले रिव्ह्यू लिहिल्याने मलाच अधिक आनंद झाला. असो.
‘नज़र अंदाज़’ ही आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांच्या साध्या-सोप्या जगण्याची, त्यातल्या साध्या-सोप्याच पेचांची, अडचणींची, दुविधेची कहाणी आहे. परमेश्वर सर्वांच्या पदरात नशिबाचं सारखं माप टाकत नाही. प्रत्येकाचं नशीब वेगळं आणि आयुष्याची वाटचालही भिन्न... अशा तीन भिन्न नशिबांची, भिन्न स्वभावांची तीन माणसं काही कारणपरत्वे एकत्र येतात. आपला नायक सुधीर (कुमुद मिश्रा) अंध आहे. जन्मापासूनच अंध असल्यानं त्यानं हे जग पाहिलेलंच नाही. अर्थात त्याचे बाकीचे ‘सेन्सेस’ अधिक तीव्र असतात. योगायोगाने त्याची गाठ एका भुरट्या चोराशी (अभिषेक बॅनर्जी) पडते. तो त्याला चांगलं वागण्याच्या अटीवर स्वत:च्या बंगल्यात घेऊन येतो. त्याला अली असं नाव देतो. भवानी (दिव्या दत्ता) ही सुधीरकडे काम करणारी त्याची मदतनीस असते. वेगवेगळ्या कारणांनी सुधीरच्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवून असणारे हे दोघं एकमेकांचा अडथळा दूर करायचा प्रयत्न करायला लागतात.
सुधीरचा एक इतिहास आहे. त्याला मृत्युपत्र करायचं आहे. त्याआधी त्याला या दोघांना घेऊन मांडवी या त्याच्या मूळ गावी जायचं आहे. मग हे तिघं साइडकार असलेल्या स्कूटरवरून प्रवासाला निघतात. प्रवासादरम्यान बऱ्याच गमती-जमती होऊन अखेर हे मांडवीला पोचतात. तिथं पोचल्यावर त्यांना सुधीरची एके काळची प्रेयसी भेटते. ती आता त्याच्या मित्राचीच बायको असते. सुधीरला तिला भेटून अतिशय आनंद होतो. आता अली आणि भवानी यांचं सुधीरबद्दलचं मत बदलू लागतं. त्याच्या आयुष्यातील एक त्रुटी दूर करण्यासाठी ते त्याला कच्छच्या रणात घेऊन जातात... त्यानंतर काय होतं हे प्रत्यक्ष चित्रपटात बघणंच योग्य.
दिग्दर्शक विक्रांत देशमुख आणि प्रसिद्ध छायाचित्रकार-दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांची ही कथा आहे. विक्रांतच्या डोक्यात चित्रपटाचा प्रवास अगदी पक्का आहे आणि त्यानं तो फोकस अजिबात हलू दिलेला नाही. कुमुद मिश्राच्या अभिनयक्षमतेला पूर्ण वाव देणारी ही भूमिका आहे आणि या अभिनेत्यानंही तिला पूर्ण न्याय दिला आहे. अंध व्यक्तीच्या सर्व लकबी, हावभाव त्यांनी अगदी बरोबर उचलल्या आहेत. या भूमिकेसाठी त्यांच्या दाताची रचना काहीशी बदलली आहे आणि त्यामुळे त्या काहीशा अवघड अशा तोंडाच्या पोझिशनसह त्यांना संपूर्ण सिनेमाभर वावरावं लागलं आहे. बहुतांश सिनेमांत सुरुवातीला जो माणूस अंध दाखवतात, तो मुळात अंध नसतोच आणि अंध असण्याचं नाटक करत असतो, असा शेवटी (‘धक्कादायक वगैरे’) उलगडा होत असतो. या सिनेमातही तसंच होतं की काय, अशी मला भीती वाटत होती. परंतु विकीच्या ‘नो नॉनसेन्स’ स्वभावावर विश्वासही होता. अखेर तो विश्वास सार्थ ठरला आणि नायकाला शेवटी अचानक डोळेबिळे आले नाहीत. अभिषेक बॅनर्जी हाही ताकदीचा कलाकार आहे. त्याला तुलनेत फार वाव नव्हता. उलट दिव्या दत्ताने भवानीची भूमिका नेहमीच्या ठसक्यात केली आहे.
चित्रपटातील दोन-तीन प्रसंगांचा विशेष उल्लेख करावा लागेल. मांडवीत सुधीर आपल्या जुन्या घरात जातो आणि त्याला आईची आठवण येते तेव्हाचा प्रसंग आणि संवाद खास आहेत. अगदी डोळ्यांत पाणी आणणारे! दुसरा प्रसंग आहे तो सुधीर आणि त्याची प्रेयसी भेटतात तो... हा प्रसंग अगदी जमून आला आहे. राजेश्वरी सचदेवनं ही छोटीशी भूमिका अगदी लक्षात राहण्यासारखी केली आहे. त्या प्रसंगातला तिचा मुद्राभिनय खास!
तिसरा प्रसंग आहे तो कच्छच्या रणातला. त्याविषयी इथं फार काही सांगता येत नाही, मात्र तो प्रसंग सिनेमॅटोग्राफर राकेश सिंह यांनी कमालीचा सुंदर टिपला आहे. विशाल मिश्रा यांचं संंगीत आहे. काही काही गाणी जमून आली आहेत. मात्र, त्यांचे शब्द माझ्या तरी लक्षात नाहीत.
एकूण, हा न चुकता घेण्यासारखा अनुभव आहे. चित्रपटाचा शेवट चटका लावणारा आहे. माणुसकीवरचा आपला विश्वास वाढवणारा...
माझ्यासाठी, मित्राविषयीचा अभिमान आणखी वाढवणारा...
नक्की बघा.
---
दर्जा : साडेतीन स्टार
---
आवर्जून पाहू आता ...
ReplyDeleteनक्की पाहा... धन्यवाद!!
Deleteपरीक्षण छान लिहिलय👌👍 ...चित्रपट वेगळा वाटतोय तुमच्या लेखावरून ...पाहण्याची उत्सुकता नक्कीच वाढलीय ...खूप धन्यवाद ..🙏🙏🙏.
ReplyDeleteधन्यवाद वीणाजी... नक्की बघा... तुम्हाला आवडेल...
Delete