रूपेरी पडद्याचे मानकरी - लता मंगेशकर
-------------------------------------------------
(पुणे आकाशवाणीवर दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्यांच्या जीवनावर आधारित ‘रूपेरी पडद्याचे मानकरी’ ही मालिका सुरू आहे. या मालिकेत मी काही भाग लिहिणार आहे. त्यापैकी सोहराब मोदी यांच्यावर लिहिलेला भाग नुकताच प्रसारित झाला. या भागासाठी लिहिलेली संहिता...)
श्रोते हो, नमस्कार!
पहाटेची वेळ असते... आपण कुठं तरी निसर्गाच्या कुशीत... टेकडीवर... सूर्योदय होतोय... पूर्व दिशा केशरिया रंगानं उजळलीय... अन् आपण एक गाणं सुरू करतो... इअरफोनमधून 'लेकिन'मधल्या 'सुनियो जी...' गाण्यापूर्वीची ती जोरदार तान कर्णपटलातून थेट शरीरातल्या प्रत्येक पेशीपेशीत घुसते... ती ऐकता ऐकताच डोळे घळघळा वाहू लागतात... काही तरी प्रचंड दैवी अनुभूती येते... मन भरून येतं... एकदम पवित्र, सुंदर भावनेनं आपण गद्ग गद् होतो... हे लताचं गाणं...! कित्येकदा ऐकलं, तरी हीच अनुभूती कायम देणारं... काय असेल ही लता मंगेशकर नावाची जादू? काही नावं उच्चारली, की मनात एकदम पवित्र, निर्मळ भाव उमटतात. चेहऱ्यावर हसू उमलतं. लता मंगेशकर हे सात अक्षरी नावही असंच. सप्तसूरच जणू... या नावानं आपल्या जगण्याला अर्थ दिला. आपल्या अस्तित्वाला सार्थकतेचा सूर दिला. आपल्या विरूप, क्षुद्र, क्षुल्लक आयुष्याचा गाभारा स्वरओंकाराच्या निनादानं भारून टाकला...
लता मंगेशकर या नावाच्या ख्यातनाम गायिकेविषयी बोलताना अशा अनेक विशेषणांची खैरात करता येईल. तरीही जे सांगायचंय ते पूर्णांशानं सांगता येईलच असं नाही. कारण सर्वोत्तमालाही व्यापून दशांगुळे उरलेली ही लता नावाची जिवंत दंतकथा आहे. अवकाशाच्या भव्यतेचं वर्णन करता येत नाही, महासागराच्या अथांगतेला लिटरचं माप लावून चालत नाही, सूर्याचं तेज थर्मामीटरनं मोजता येत नाही, तसंच लताच्या गाण्याला कशानं मोजता येत नाही. ही एक अनुभवण्याची गोष्ट आहे.
लता मंगेशकर नावाच्या या सात अक्षरी दंतकथेचा जन्म झाला २८ सप्टेंबर १९२९ रोजी इंदूर शहरात. ख्यातनाम गायक, नाट्यकर्मी, अभिनेते मास्टर दीनानाथ मंगेशकर आणि शुद्धमती उर्फ माई मंगेशकर या दाम्पत्याचं लता हे सर्वांत मोठं अपत्य. त्यानंतर मीना, आशा, उषा व हृदयनाथ ही भावंडं. या पाचही भावंडांनी भारताच्या संगीत अवकाशात स्वत:चं नक्षत्रांसारखं स्थान निर्माण केलं. त्यातही लता मंगेशकरांचं स्थान म्हणजे अढळ ध्रुवताऱ्यासारखं. वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा १९४२ मध्ये पुण्यात मृत्यू झाल्यावर वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी लतावर सर्व मंगेशकर कुटुंबाची जबाबदारी आली. ती तिनं समर्थपणे पेलली. एवढंच नव्हे, तर देवदत्त प्रतिभा आणि स्वत: केलेले अपार कष्ट या जोरावर केवळ भारतातील नव्हे, तर जगातील संगीत क्षेत्रातील विख्यात गायिका म्हणून नावलौकिक मिळवला.
लताचं पाळण्यातलं नाव 'हृदया' असं होतं. मंगेशकर कुटुंबीय मूळचं गोव्यातलं. त्यांचं मूळ आडनाव नवाथे. तिथल्या मंगेशी देवस्थानाचे पुजारी म्हणून दीनानाथांचे पूर्वज काम करत असत. त्यामुळं नंतर त्यांनी मंगेशकर हे आडनाव घेतलं. ज्येष्ठ गायक जितेंद्र अभिषेकी हे लतादीदींचे मावसभाऊ. दीनानाथ मंगेशकर सांगलीत मुक्कामी असताना तिथल्या सरकारी शाळेत लताला दाखल करण्यात आलं. मात्र, एकदा लहानगी आशा रडत असल्यामुळे एक शिक्षक लताला खूप रागावले. याचा लताला अतिशय राग आला. ती आशाला घेऊन घरी आली आणि त्यानंतर शाळेत परत कधीही गेली नाही. नंतर दीनानाथांनी एक शिक्षक घरी शिकवण्यासाठी ठेवले. मात्र, औपचारिक शिक्षण असं फारसं झालंच नाही. लताचा संगीताचा कान मात्र तयार होता. तिला ती वडिलांकडून देणगीच मिळाली होती. एकदा दीनानाथ त्यांच्या एका शिष्याला एक चीज शिकवत होते. तो शिष्य ती चीज गात होता. दीनानाथ तेवढ्यात आतल्या खोलीत गेले. तेव्हा अवघ्या पाच वर्षांच्या लतानं त्या शिष्याला ‘तू चुकीचं गातो आहेस,’ असं सांगितलं आणि ती चीज स्वत: गाऊन दाखवली. तेवढ्यात तिथं आलेल्या दीनानाथांनी लताचं लक्ष नसताना तिला गाताना ऐकलं. त्या क्षणी त्यांना साक्षात्कार झाला, की आपल्या पोटी एका दैवी कलावंताचा जन्म झाला आहे. त्यांनी मग लताला गाणं शिकवायला सुरुवात केली. दीनानाथांची तेव्हा बलवंत नाटक कंपनी होती. ही कंपनी गावोगावी नाटकाचे प्रयोग करत हिंडत असे. एकदा एक कलाकार आला नव्हता, म्हणून लतानं अतिशय लहान वयात त्याची रिप्लेसमेंट म्हणून ऐन वेळी काम केलं. एवढंच नव्हे, तर अनेक वन्समोअरही मिळवले.
मास्टर दीनानाथ गेले, तेव्हा मंगेशकर कुटुंबाचे स्नेही आणि नातेवाइक, नवयुग चित्रपट कंपनीचे मालक मास्टर विनायक यांनी मंगेशकर परिवाराची काळजी घेतली. त्यांनी लतादीदींना गायिका आणि अभिनेत्री म्हणून पहिलं काम मिळवून दिलं. लतानं वसंत जोगळेकरांच्या ‘किती हसाल?’ या १९४२ मध्ये आलेल्या मराठी चित्रपटासाठी ‘नाचू या गडे, खेळू सारी मनी हौस भारी’ हे सदाशिवराव नेवरेकरांनी बसवलेलं गाणं गायलं, पण हे गाणं चित्रपटातून वगळण्यात आलं. मास्टर विनायकांनी लताला नवयुग पिक्चर्सच्या ‘पहिली मंगळागौर’ या १९४२ मधल्याच मराठी चित्रपटात एक छोटी भूमिका दिली. या चित्रपटात लतानं ‘नटली चैत्राची नवलाई…’ हे दादा चांदेकरांनी स्वरबद्ध केलेलं गाणं म्हटलं. नंतर १९४५ मध्ये जेव्हा मास्टर विनायकांच्या कंपनीचं मुंबईला स्थलांतर झालं, तेव्हा लतादीदीही कुटुंबासमवेत मुंबईला आल्या. त्या उस्ताद अमानत अली खाँ भेंडीबाजारवाले यांच्याकडून हिंदुस्थानी शास्त्रोक्त संगीत शिकू लागल्या. त्यांनी वसंत जोगळेकरांच्याच ‘आप की सेवा में’ या १९४६ मध्ये आलेल्या हिंदी चित्रपटासाठी ‘पा लागूं कर जोरी’ हे गाणं गायलं. दत्ता डावजेकरांनी त्या गाण्याला संगीत दिलं होतं. लता आणि आशा यांनी मास्टर विनायकांच्या ‘बडी माँ’ या १९४५ मध्ये आलेल्या पहिल्या हिंदी चित्रपटातही नूरजहाँसोबत छोट्या भूमिका केल्या होत्या. त्या चित्रपटात लतानं ‘माता तेरे चरणों में’ हे भजन गायलं होतं. मास्टर विनायकांच्या ‘सुभद्रा’ या १९४६ मधल्या दुसऱ्या हिंदी चित्रपटाच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळेस लतादीदींची ओळख संगीतकार वसंत देसाई यांच्याशी झाली.
पुढच्या वर्षी देशाला स्वातंत्र्य मिळालं. पण फाळणीही झाली आणि उस्ताद अमानत अली खाँ भेंडीबाजारवाले नवनिर्मित पाकिस्तानमध्ये गेले, तेव्हा लतादीदी अमानत खाँ देवासवाले यांच्याकडे शास्त्रोक्त संगीत शिकायला लागल्या. उस्ताद बडे गुलाम अली खाँ यांचे शिष्य पंडित तुलसीदास शर्मांकडूनही लतादीदींना तालीम मिळाली.
दरम्यान, मास्टर विनायक यांचा १९४८ मध्ये मृत्यू झाला. त्यामुळं लतादीदी आणि कुटुंबाचा मोठाच आधार हरपला. मात्र, आता त्या मुंबईत स्थिरस्थावर होऊ लागल्या होत्या. ज्येष्ठ संगीतकार गुलाम हैदर यानी लताला पुष्कळ मार्गदर्शन केलं. त्या काळात हिंदी चित्रपटांमध्ये नूरजहाँ, शमशाद बेगम आणि जोहराबाई अंबालेवाली अशांसारख्या अनुनासिक आणि जड आवाज असलेल्या गायिका जास्त लोकप्रिय होत्या. त्यामानानं लताचा आवाज अतिशय कोवळा, नाजूक, पण गोड होता. १९४८ मध्ये ग़ुलाम हैदरांनी लताची ओळख तेव्हा ‘शहीद’ या हिंदी चित्रपटावर काम करीत असलेले निर्माते शशिधर मुखर्जींशी करून दिली; पण मुखर्जींनी लताचा आवाज ‘अतिशय बारीक’ म्हणून नाकारला. तेव्हा गुलाम हैदर थोड्याशा रागात उत्तरले होते - येणाऱ्या काळात निर्माते आणि दिग्दर्शक लताचे पाय धरतील आणि आपल्या चित्रपटांसाठी गाण्याची याचना करतील. हैदर यांनीच लतादीदींना त्यांच्या ‘मजबूर’ या १९४८ या वर्षी आलेल्या चित्रपटात ‘दिल मेरा तोडा…’ हे गाणं म्हणण्याची मोठी संधी दिली.
सुरुवातीला लता आपल्या गाण्यात तेव्हा लोकप्रिय असलेल्या नूरजहाँचं अनुकरण करीत असे, पण नंतर लतानं स्वतःच्या गाण्याची एक आगळी शैली तयार केली. अवघ्या विशीच्या आसपास असलेल्या लताचा हा सर्वच संघर्ष अतिशय मोठा होता. त्या काळात हिंदी चित्रपटांतल्या गाण्यांचे गीतकार प्रामुख्याने मुस्लिम धर्मीय असत, त्यामुळे गाण्यांमध्ये भरपूर उर्दू शब्द असत. एकदा प्रसिद्ध अभिनेते दिलीपकुमार यांनी लताच्या हिंदी गाण्यातील मराठी वळणाच्या उच्चारांसाठी ‘इनके गाने से दालचावल की बदबू आती है’ असा तुच्छतादर्शक शेरा मारला. तेव्हा दुखावलेल्या लताने शफ़ी नावाच्या मौलवींकडून उर्दू उच्चारांचे धडे घेतले. त्यानंतर पुन्हा आयुष्यात ना तिच्या गाण्यात कधी उच्चार चुकले, ना कधी कुणाला असे शेरे मारण्याची संधी मिळाली.
१९४९ हे वर्ष लताच्या कारकिर्दीला महत्त्वाचं वळण देणारं वर्ष ठरलं. महल या लोकप्रिय चित्रपटातलं ‘आयेगा आनेवाला’ हे गाणं प्रचंड गाजलं. या गाण्याचे संगीतकार होते खेमचंद प्रकाश होते, तर चित्रपटात गाणे मधुबालावर हे गाणं चित्रित झालं होतं. या गाण्यानं लताचा आवाज घराघरांत पोचला.
पुढं तब्बल सहा दशकं हा आवाज सतत आपल्यासोबत राहिला. लहानपणापासून ते मृत्यू येईपर्यंत जीवनातल्या प्रत्येक टप्प्यावर हा अक्षय लतास्वर आपल्याला साथ देत आलाय. तो ज्यांनी ज्यांनी प्रथम ऐकला, तेव्हाच सगळ्यांना जाणवलं, की हे नेहमीचं साधंसुधं गाणं नाहीय. हे त्यापलीकडं जाणारं काही तरी आहे. काळीज पिळवटून टाकणारी आर्तता त्यात आहे... काही तरी प्युअर, शुद्ध असं त्यात आहे... जे ऐकल्यावर हिंदीत ज्याला 'सुकून मिलना' म्हणतात, तसं काहीसं आपल्याला होतं. आत कुठं तरी शांत वाटतं, खूप आश्वासक वाटतं... अनेकदा अंतःकरण उचंबळून येतं, पोटात कुठं तरी हलतं, अंगावर रोमांच उभे राहतात... डोळे तर अनेकदा पाण्यानं भरतात. असं आपलं शरीर सतत या सूरांना दाद देत असतं. हा अनुभव आपण सर्वांनीच घेतला आहे. काय आहे हे? आपला या स्वराशी असा जैव संबंध कसा जोडला गेला? हीच लताच्या आवाजाची जादू आहे, हे निखालस...
दीदींच्या आवाजाची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील. त्यांचा आवाज ‘पिकोलो’ जातीचा होता. पिकोलो ही एक उंच स्वरात वाजणारी बासरी आहे. ध्वनिक्षेपकावर अचूक तीव्रतेने आदळणारा हा आवाज असतो. दादींचं श्वासावर कमालीचं नियंत्रण होतं. गाताना त्या श्वास कधी घेतात, हे कळतही नाही. त्यांचा आवाज अजिबात बेसूर होत नसे. ‘कंबख्त, ये कभी बेसुरी होतीही नहीं’ हे बडे गुलाम अली खाँसाहेब यांचे उद्गार प्रसिद्ध आहेत. ‘ये ज़िंदगी उसी की है’ हे गाणं ऐकताना त्यांनी हे उद्गार काढले होते. लतादीदींना मिळालेली ही मोठीच दाद म्हणावी लागेल. सुरुवातीच्या काळात अनिल विश्वास, खेमचंद प्रकाश, सज्जाद हुसेन, नौशाद, सी. रामचंद्र, मदनमोहन, एस. डी. बर्मन, हेमंतकुमार, सलील चौधरी आणि शंकर-जयकिशन या संगीतकारांनी लताकडून सर्वोत्तम गाणी म्हणवून घेतली. त्याच काळात मराठीत वसंत प्रभूंनी लताकडून उत्तमोत्तम भावगीतं गाऊन घेतली.
लता मंगेशकर यांच्यावर १९६२ मध्ये विषप्रयोग झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर त्या गाऊ शकतील की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, आपल्या सर्वांच्या सुदैवानं सहा महिन्यांनंतर दीदी गाण्यासाठी उभ्या राहिल्या. ‘कहीं दीप जलें कहीं दिल…’ हे हेमंतकुमार यांनी संगीतबद्ध केलेलं ‘बीस साल बाद’ चित्रपटातलं गीत पहिल्यांदा त्यांनी गायलं.
१९५० ते १९७० ही दोन दशकं लतादीदींच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम दशकं होती, असं अनेक जाणकार मानतात. या काळात त्यांचा आवाज पक्व आणि अधिकाधिक मधुर होत गेला. गायला अतिशय अवघड अशी गाणी त्यांनी या काळात गायिली. लता होती म्हणूनच आम्ही अशी अवघड गाणी तयार करू शकलो, असं अनेक संगीतकार सांगत. ‘रुस्तुम सोहराब’ चित्रपटातलं ‘ऐ दिलरुबा…’ हे सज्जाद हुसेन यांचं गाणं दीदींनी एवढं कमाल गायलंय, की तसं इतर कुठलीही गायिका गाऊ शकली असती, असं वाटत नाही. ‘ये दिल तुमबिन कहीं लगता नहीं’ हे ‘इज्जत’ चित्रपटातलं गाणं ऐकताना त्यांचा आवाज धारदार सुरीसारखा भासतो. या काळात त्यांच्या आवाजातला लवचीकपणा परमोच्च स्थितीत होता. वेगवेगळ्या गायिकांसाठी त्या गात तेव्हा त्या गायिकेनंच ते गाणं गायलंय असं वाटे. ‘उनसे मिली नजर’ हे गाणं ऐकताना सायराबानूच डोळ्यांसमोर येते, तर ‘कांटो से खीच के आँचल’ ऐकताना वहिदाच डोळ्यांसमोर येते. ‘अभिनेत्री’मधलं ‘ओ घटा सांवरी’ ऐकताना अवखळ हेमाच नजरेसमोर येते. या गाण्यात त्यांनी जी थंडी वाजल्यानंतरची आवाजातली शिरशिरी आणली आहे, ती केवळ ऐकावी. लतादीदींच्या एकेका गाण्याचे असे किती तरी बारकावे सांगता येतील. अनेक संगीत तज्ज्ञांनी त्याचा अभ्यास केला आहे. त्यावर पीएचडी केली आहे. ‘ह’ हे एक अक्षर दीदी किती वेगवेगळ्या पद्धतीनं उच्चारतात, याचाही अभ्यास झाला आहे. त्या त्या गाण्याचा भाव, त्या त्या शब्दांचं वजन, अर्थ या सगळ्यांचा अगदी बारकाईनं विचार करून दीदी गात असत. त्यांनी गायिलेल्या ‘ऐ मेरे वतन के लोगों’ या गाण्याने तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यांत पाणी आलं होतं, एवढे ते त्यांनी आर्तपणे गायलं होतं. लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये दीदींनी १९७४ मध्ये संगीत रजनी सादर केली. त्या जगप्रसिद्ध ठिकाणी कार्यक्रम सादर करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय ठरल्या.
लतादीदींनी पहिल्या टप्प्यात शंकर-जयकिशन या जोडीबरोबर भरपूर गाणी गायली. नंतरच्या काळात लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी दीदींकडून सर्वाधिक गाणी गाऊन घेतली. मात्र, त्यांच्याकडून काही अत्यंत खास गाणी गाऊन घेतली ती संगीतकार मदनमोहन यांनी. ‘अदालत’मधील ‘यूं हसरतों के दाग’ असेल, किंवा ‘दिल की राहें’मधलं ‘रस्म-ए-उलफत’सारखी अत्यंत दर्दभरी गज़ल असेल किंवा ‘दस्तक’मधलं ‘माई री’ असेल किंवा दीदींच्या सर्वोत्तम दहा गाण्यांत सहज येऊ शकेल, असं ‘वह कौन थी?’मधलं ‘लग जा गले’ असेल… मदनमोहन यांनी लतादीदींकडून फारच वेगळी अन् उच्च दर्जाची गाणी गाऊन घेतली, यात वाद नाही.
विविध पार्श्वगायकांनी दीदींबरोबर गाणी गायली. त्यात महंमद रफी आणि किशोरकुमार यांची गाणी रसिकांना विशेष आवडतात. हेमंतकुमार, मुकेश, मन्ना डे, महेंद्र कपूर, सुरेश वाडकर, शब्बीरकुमार, उदित नारायण, कुमार सानू ते सोनू निगमपर्यंत अनेक गायकांनी दीदींसमवेत अनेक अजरामर गाणी गायली.
दीदींनी मराठीत केलेलं कामही मोठं आहे. वसंत प्रभू आणि श्रीनिवास खळे वगळले तर दीदींनी मराठीतलं बहुतेक काम त्यांचे धाकटे बंधू पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्यासह केलं. मराठी चित्रपटांत दीदींनी तुलनेनं कमी गाणी गायली असली तरी ‘प्रेमा काय देऊ तुला’पासून ‘चिंब पावसानं रान झालं आबादानी...’पर्यंत जवळपास सर्वच गाणी लोकप्रिय झाली आहेत. त्यातही ‘जानकी’मधलं ‘विसरू नको श्रीरामा मला’, ‘जैत रे जैत’मधलं ‘मी रात टाकली…’ किंवा ‘उंबरठा’मधलं ‘गगन सदन तेजोमय’ ही दीदींची गाणी विशेष लोकप्रिय आहेत. मराठीतलं दीदींचं मोठं काम म्हणजे ‘शिवकल्याण राजा’ आणि ‘अमृताचा घनु’ हे दोन अल्बम. शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाला तीनशे वर्षं झाली, तेव्हा म्हणजे १९७४ मध्ये पं. हृदयनाथ मंगेशकर, बाबासाहेब पुरंदरे व लतादीदींनी ‘शिवकल्याण राजा’ हा शिवरायांना अर्पण केलेल्या गीतांचा अल्बम केला. तो आजही तितकाच लोकप्रिय आहे. यानंतर १९७५ मध्ये संत ज्ञानेश्वरांच्या सातशेव्या जन्मदिनानिमित्त ‘अमृताचा घनु’ हा ज्ञानेश्वरांच्या अभंगांचा, विराण्यांचा अल्बम पं. हृदयनाथांनी तयार केला. त्यातही सर्व गाणी दीदींनी गायली. यातलं ‘मोगरा फुलला’ ही रचना आणि पसायदान आजही मोठ्या प्रमाणात ऐकलं जातं. याशिवाय पंडितजींनी दीदींकडून ‘सुखकर्ता दु:खहर्ता’ ही गणपतीची आरती आणि गणपतीची इतर काही गाणी गाऊन घेतली. यातली काही गाणी शान्ताबाई शेळकेंनी लिहिली होती. ‘गणराज रंगी नाचतो’सारखी त्यांनी लिहिलेली गाणी आजही प्रचंड लोकप्रिय आहेत. ही गाणी आणि दीदींनी गायलेली आरती आजही गणेशोत्सवात सर्वत्र वाजवली जाते. याशिवाय शान्ताबाईंनी लिहिलेली काही कोळीगीतं हृदयनाथांनी संगीतबद्ध केली, तीही खूप गाजली. याशिवाय ‘आजोळची गाणी’ हा दीदींच्या आजोळच्या म्हणजे खानदेशातील लोकगीतांचा समावेश असलेला अल्बमही रसिकांना आवडला. या सर्वांहून वेगळं असं दीदींचं काम म्हणजे 'आनंदघन' हे टोपणनाव घेऊन त्यांनी मराठी चित्रपटांना दिलेलं संगीत. ही बहुतेक सगळी गाणी लोकप्रिय ठरली. दीदींमधला संगीतकार हा गुणही प्रकर्षानं समोर आला.
दीदीचं व्यक्तिमत्त्व चतुरस्र होतं. त्या बुद्धिमान होत्या; मात्र रुक्ष नव्हत्या. त्यांचा स्वभाव खेळकर होता. स्मरणशक्ती विलक्षण होती. अन्याय सहन न करण्याची वृत्ती होती. त्यापायी इंडस्ट्रीत एस डी. बर्मन, महंमद रफी आदींबरोबर त्यांचे काही वादही झाले. अबोला, रुसवेफुगवेही झाले. मात्र, पुढं ते सर्व निवळून त्यांनी एकत्र कामही केलं. पार्श्वगायकांचं नाव ध्वनिमुद्रिकेवर टाकण्याची पद्धत पूर्वी नव्हती. दीदींमुळं सर्व पार्श्वगायकांना हा मान मिळाला. गायकांना पुरेसं मानधन आणि रॉयल्टी मिळाली पाहिजे यासाठी त्या केवळ आग्रही नव्हत्या, तर त्यासाठी त्यांनी ‘एचएमव्ही’सारख्या तेव्हाच्या बड्या कंपनीबरोबर हक्काची लढाई केली आणि जिंकली. दीदींना फोटोग्राफीचा विलक्षण छंद होता. क्रिकेटचा खेळही त्यांनी अतिशय प्रिय होता. लंडनला लॉर्ड्स मैदानावर सामने पाहता यावेत, यासाठी त्यांनी या मैदानासमोरच घर विकत घेतलं, एवढं त्यांचं क्रिकेट प्रेम होतं. १९८३ मध्ये भारतीय संघानं वर्ल्ड कप जिंकला तेव्हा खेळाडूंना फार कमी पैसे मिळाले होते. दीदींनी एक म्युझिकल नाइट करून खेळाडूंना भरपूर पैसे मिळवून दिले. सैन्यासाठी, जवानांसाठी तर त्यांनी कित्येकदा गाजावाजा न करता मोठी मदत केली आहे. उपचारांअभावी वडिलांचं ज्या शहरात निधन झालं, त्या पुण्यात मोठं रुग्णालय बांधायचं दीदींचं स्वप्न होतं. ते त्यांनी २००० मध्ये पूर्ण केलं. त्या रुग्णालयाला वडिलांचं म्हणजेच दीनानाथांचं नाव दिलं. यासाठीचे पैसेही वेगवेगळ्या शहरांत संगीत रजनी आयोजित करून उभारले. दीदींना केंद्र सरकारनं १९८९ मध्ये चित्रपटसृष्टीतला सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरवलं. पुढं २००१ मध्ये केंद्रानं ‘भारतरत्न’ हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन दीदींना सन्मानित केलं.
या सन्मानानंतरही दीदी थांबल्या नाहीत, कारण गाणं हाच त्यांचा श्वास होता. अगदी २०१४ मध्ये वयाच्या ८५ व्या वर्षीही त्यांनी संगीतकार सलील कुलकर्णी यांच्या अल्बमसाठी ‘संधीप्रकाशात’ आणि ‘आता विसाव्याचे क्षण’ ही दोन गाणी गायिली. क्षण अमृताचे या नावानं आलेला हा अल्बम त्यांचा अखेरचा अल्बम ठरला. ही गाणी ऐकताना दीदींनी ही गाणी ८५ व्या वर्षी गायिली आहेत, यावर अजिबात विश्वास बसत नाही, एवढा त्यांचा आवाज सुरेल लागला आहे.
अनेकदा विचार करताना असं वाटतं, की गायक-गायिका तर अनेक आहेत. मग दीदी एवढ्या उंच स्थानी का पोचल्या? किंवा त्यांचं गाणं आपल्या हृदयापर्यंत का पोचतं? असं वाटतं, की संगीत मुळात आपल्या सगळ्यांच्या श्वासातच आहे. लय-ताल आपल्या रोमारोमांत आहे. आपण गाणं आवडणारी, गाणारी, गुणगुणणारी माणसं आहोत. हे सात सूर हीच आपल्या हृदयाची अभिव्यक्ती आहे. आपण हसतो, रडतो, रागावतो, चिडतो, रुसतो सारं काही गाण्यांतून... आपल्या या प्रत्येक भावनेला दीदींनी स्वररूप दिलं. आणि ते एवढं उच्च होतं, की आपल्याला दुसऱ्या कशाची गरजच पडली नाही. दीदींचा आवाज आणि आपलं जगणं... साथ साथ! या स्वरानं आपला सच्चेपणा कधी सोडला नाही. त्यानं आपल्याला कधी फसवलं नाही. न मागता भरभरून दिलं. वर्षानुवर्षं तो स्वर न थकता, न कंटाळता, न चिडता आपल्याला फक्त देत राहिला... आपण घेत राहिलो आणि तृप्त होत राहिलो. आपली झोळी कायमच दुबळी राहिली... एखाद्या उंच पर्वतशिखरावर उभं राहून अजस्र घनांतून सहस्रधारा दोन हातांनी कवेत घेण्याचा प्रयत्न करण्यासारखंच होतं ते. आपण त्या सूराच्या वर्षावात अक्षरशः बुडून जात राहिलो...
एवढं निखळ, नितळ, स्फटिकासारखं पारदर्शक असं या जगात आता खरोखर दुसरं काय आहे? लताचा स्वर मात्र आहे तसाच आहे. त्यामुळं ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’मध्ये नातीच्या वयाच्या काजोललाही ‘मेरे ख्वाबों में जो आए’ म्हणणारा तो स्वर सहज शोभून जातो. आपल्या देशात एवढं वैविध्य आहे... एवढे भेद आहेत... पण सगळ्या भिंती मोडून एकच सूर सर्वांना बांधून ठेवतो - तो म्हणजे लतास्वर. याचं कारण त्या आवाजात अशी काही जादू आहे, की तो थेट तुमच्या हृदयात उतरतो. एकदा म्हणजे एकदाही, अगदी चुकूनही तो बेसूर होत नाही. त्याचा कधी कंटाळा येत नाही... एक वेगळंच आत्मिक समाधान मिळतं ते सूर कानी पडल्यावर!
आपण देव कधी पाहिलेला नाही, पण अनेकांना त्याचं अस्तित्व जाणवतं. दीदींचा आवाज ऐकल्यावर अशीच काहीशी अनुभूती येते. यापेक्षा सर्वोच्च, श्रेष्ठ काही असू शकणार नाही, असं वाटतं.
आपलं भाग्य म्हणून आपण या काळात आहोत. आपण अभिमानानं सांगू शकतो, की आम्ही सरस्वती पाहिली नाही, आम्ही स्वर्ग पाहिला नाही... पण आम्ही लतादीदींना ऐकलंय...
लता मंगेशकर नाव धारण करणारा देह ६ फेब्रुवारी २०२२ रोजी इहलोक सोडून गेला.. पण लता मंगेशकर नावाची स्वरसम्राज्ञी आपल्या मनात कायमच चिरतरुण राहणार आहे... आजन्म...!
-------
(आकाशवाणीवर प्रसारित झालेला, निवेदक प्रसाद कुलकर्णी यांनी सादर केलेला भाग आता यूट्यूबवर ऐका.)
हा भाग ऐकण्यासाठी येथे क्लिक करा...
सोहराब मोदी यांच्यावरील भागाची संहिता वाचण्यासाठीा येथे क्लिक करा...
-------


No comments:
Post a Comment