30 May 2024

महाबळेश्वर ट्रिप २६-२८ मे २०२४

धुक्यातून ‘सुकून’कडे....
------------------------------


महाबळेश्वरला तसं नेहमी जाणं होतं. अगदी महाबळेश्वरपर्यंत गेलो नाही, तर पाचगणी किंवा वाईपर्यंत तर नक्कीच जाणं होतं. दर वेळी तिथं काही तरी नवं गवसल्याचा आनंद मला लाभला आहे. याही वेळी निसर्ग आणि मानवनिर्मित अशा दोन्ही गोष्टींनी मोठं समाधान दिलं. वास्तविक महाबळेश्वर हे महाराष्ट्रातलं ‘अतिपरिचयात् अवज्ञा’ झालेलं पर्यटनस्थळ म्हणायला हवं. यामुळंच ‘महाबळेश्वरला काय जायचं?’ असं नाकं मुरडून विचारणारेही आहेत. 
परवा मी महाबळेश्वरला गेलो, तेव्हाही तो ‘फर्स्ट चॉइस’ नव्हता. उत्तरेकडं सहलीला जायचं (तिथल्या भयंकर तापमानामुळं) रद्द केल्यानंतर महाबळेश्वर हा स्वाभाविक पर्याय होता. मग लगेचच एमटीडीसीचं बुकिंग करून टाकलं. एमटीडीसीचा सरकारी खाक्या नकोसा वाटत असला, तरी त्यांची रिसॉर्ट अतिशय मोक्याच्या व शांत ठिकाणी असल्यानं ते आकर्षण नेहमीच सरकारी खाक्याबद्दलच्या तिरस्कारावर मात करतं आणि शेवटी तिथलंच बुकिंग केलं जातं. वास्तविक ऐन मे महिन्यात महाबळेश्वरच काय, पण कुठल्याही पर्यटनस्थळी जाऊ नये, हे माझं मूळ मत. सगळीकडे असलेल्या पर्यटकांच्या प्रचंड गर्दीचाच एक भाग होऊन हिंदकाळत स्थळदर्शन उरकण्याचा मला भयंकर तिटकारा आहे. यंदा मात्र सर्वांना सोयीचा हाच काळ होता. मग शेवटी निघालो. 
पसरणी घाट चढून पाचगणीच्या हद्दीत आल्यावरच हवेतील बदलानं पहिला सुखद धक्का दिला. हल्ली महाबळेश्वरचं तापमानही पुण्यासारखंच वाढलेलं असतं आणि तिथंही उकडतं, हे मी ऐकून होतो. आम्ही गेलो ते तिन्ही दिवस मात्र हवा अतिशय आल्हाददायक होती आणि कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस होतं. अपेक्षेप्रमाणे पाचगणी, महाबळेश्वर या टप्प्यात प्रचंड गर्दी लागली. ‘बंपर टु बंपर’ ट्रॅफिक होतं. रविवार असल्यानं एका दिवसासाठी महाबळेश्वरमध्ये येणाऱ्यांची गर्दी होती. शिवाय इथं मुंबईहून, गुजरातवरून प्रचंड संख्येनं पर्यटक येत असतात. यंदा ‘एमएच ०१, ०२ ते ०६’ यांच्या जोडीला ‘एमएच ४८’ (वसई-विरार) गाड्यांचीही मोठी गर्दी दिसली. महाबळेश्वरच्या हद्दीत पोचल्यानंतर प्रत्यक्ष एमटीडीसी गाठेपर्यंत आम्हाला दीड तास लागला. (या गडबडीत एंट्री टॅक्स न घेता गाडी सोडली, हाच काय तो दिलासा!) आम्ही सकाळी साडेनऊला निघालो होतो. रिसॉर्टवर येईपर्यंत तीन वाजले होते. जवळपास दीड ते दोन तास उशीर केवळ ट्रॅफिकमुळं झाला होता. आमचा प्रीमियम डीलक्स की लक्झरी (लक्झरी म्हणजे एमटीडीसी देऊ शकेल इतपतच लक्झरी) सूट ताब्यात घेतल्यावर आधी चक्क ताणून दिली. आम्ही रिलॅक्स व्हायलाच आलो होतो. फार काही टाइट, मिनिट टु मिनिट प्रोग्राम ठेवलाच नव्हता. इथं आल्यावर एमटीडीसीनं पहिला धक्का दिला. सूटमध्ये मोबाइलला शून्य रेंज येत होती. दारात आलं की फुल रेंज. इथं फक्त बीएसएनएललाच रेंज येते म्हणे. त्यामुळं आम्ही सूटमध्ये असताना एकदम आदिमानव, तर दारात आलो की लगेच आत्ताची माणसं व्हायचो. असो.
संध्याकाळी सनसेट पॉइंटला गेलो. माझ्याकडं नीलचा २००६ (किंवा ०७) मधला फोटो होता. अरमान नावाच्या घोड्यावर नील व मी बसलो होतो, असा तो फोटो होता. तिथं मला ‘स्मार्टी अरमान’ नावाचा घोडा दिसला. त्याच्या मालकाला (शारूख नाव त्याचं) मी तो जुना फोटो दाखवला. त्याबरोबर तो फारच खूश झाला आणि त्यानं आजूबाजूच्या सर्व घोडेमालकांना आणि पर्यटकांनाही बोलावून बोलावून तो जुना फोटो दाखवला. त्या आनंदात त्यानं नीलला सवलतीत राइड देऊ केली. नीलला खरं तर घोडेस्वारीपेक्षा तिथले फोटो काढण्यात रस होता. पण शारूखचा उत्साह बघून तो तयार झाला. त्याची राइड झाल्यावर घोड्याला दोन पाय उंच करून ‘स्लो मो’मध्ये शूटिंग करण्याचाही कार्यक्रम झाला. एकूण ती संध्याकाळ अतिशय प्रसन्न होती. हवा ढगाळ होती. गार वारं वाहत होतं. आता चहा घेण्याशिवाय पर्याय नव्हता. मस्त मसाला मॅगीही तिथं मिळाली. मग दोन्हीचा आस्वाद घेऊन आम्ही थेट मार्केटमध्ये गेलो. तिथं अपेक्षेप्रमाणे पहिल्या वाहनतळावर जागा नव्हतीच. मला दुसरा रस्ता माहिती होता. मग मी मार्केटच्या त्या टोकाला असलेल्या रस्त्याला जाऊन तिथल्या नव्या वाहनतळावर कार पार्क केली व मग आम्ही चालत मार्केटमध्ये आलो. (या मुख्य रस्त्याला डॉ. साबणे रोड असं नाव आहे.) तिथंच जेवलो. मला सईच्या (तांबे) पोस्टमध्ये लिहिलेल्या ‘स्ट्रॉबेरी विथ क्रीम’वाल्या नझीरभाईंची गाडीही दिसली. पण पोट एवढं भरलं होतं, की दुसऱ्या दिवशी त्यांना न्याय देऊ असं ठरवून परतलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी एमटीडीसीच्या वेण्णा कँटीनमध्ये आम्हाला कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट होता. पोहे, उडीदवडा सांबार, चटणी, ब्रेड-बटर, अंडाभुर्जी आणि चहा-कॉफी असा मेन्यू होता. बुफे लावला होता. सर्व पदार्थ चांगले होते. हे कँटीनही चांगलं वाटलं. ब्रेकफास्ट करून आम्ही बाहेर पडलो. आज श्री क्षेत्र महाबळेश्वर आणि ऑर्थर सीट पॉइंट एवढी दोनच ठिकाणं बघू, असं ठरवलं. श्री क्षेत्र महाबळेश्वरकडं गावातून जाणारा रस्ता दुरुस्तीमुळं बंद होता. त्यामुळं आम्हाला वेण्णा लेक ओलांडून नाकिंदा मार्गे जावं लागलं. इकडंही गर्दी होतीच. वातावरण मात्र फार सुरेख होतं. ढगाळ हवा, अधूनमधून धुकं आणि घनदाट झाडीतून जाणारे रस्ते हे अगदी स्वप्नवत होतं! श्री क्षेत्र महाबळेश्वरला पंचनद्यांच्या संगमाचं दर्शन घेतलं. इथं यापूर्वी अनेकदा आलो असलो, तरी दर वेळी काही तरी बदललेलं दिसतं. या वेळी बाहेरची दुकानं खूप वाढल्याचं दिसलं. गर्दी होतीच. इथं आम्ही यापूर्वी न बघितलेलं कृष्णाई मंदिर पाहायला मिळालं. मुख्य मंदिराच्या समोरूनच इकडं जायला चांगला दगडी रस्ता केला आहे. हे मंदिर पुरातन आहे आणि पुरातत्त्व खात्याकडून संरक्षित स्मारक म्हणून जाहीर केलं आहे. अभिजितनं (थिटे) मला हे मंदिर आवर्जून पाहायला सांगितलं होतं. तिथं गेल्यावर आम्ही त्याला फोन केला आणि त्यानं आणखी बरीच इंटरेस्टिंग माहिती सांगितली. हे मंदिर आणि समोर दिसणाऱ्या दरीतील कृष्णा नदीचं विहंगम दृश्य अगदी अविस्मरणीय होतं. बघितलं नसेल तर अगदी आवर्जून पाहायला जावं, असं हे ठिकाण आहे. या सर्व जागेची उत्तम निगा राखलेली आहे. 

आता जवळपास एक वाजत आला होता. मग तिथंच समोर एका हॉटेलमध्ये जेवलो आणि ऑर्थरसीट पॉइंटकडं निघालो. तिकडं जाताना तर संपूर्ण धुकं होतं. पार्किंग लाइट्स आणि हेडलाइट्स लावूनच गाडी चालवावी लागत होती. अतिशय कमाल वातावरण होतं. इथं ऐन मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आल्याचं सार्थक झालं होतं. ऑर्थर सीट पॉइंटजवळ गाड्यांची लाइन होती. पण मी शेवटपर्यंत गाडी नेली आणि नशिबानं तिथं पार्किंगला जागा मिळाली. मग आम्ही तिथून पॉइंटकडं निघालो. अक्षरश: दहा फुटांपुढचं काही दिसत नव्हतं. दरीच काय, सगळा आसमंत ढगांनी भरला होता. झाडं ओलीचिंब झाली होती. वास्तविक तिथं थंड पेयं विकायला बरेच जण बसले होते. मात्र, आता त्यांच्याकडं चहा-कॉफीची मागणी व्हायला लागली होती.
पुढं टायगर पॉइंटजवळ नीलला तो एक-दोन वर्षांचा असताना, एका दगडावर बसवून फोटो काढला होता. आताही तो दगड तिथं आहे का, याची मला उत्सुकता होती. सुदैवानं तो दगड तिथंच होता. मग नीलला तिथंच, तशाच पोझमध्ये बसवून फोटो काढला. पुढं अगदी ऑर्थर सीट पॉइंटपर्यंत धुक्यातूनच सगळा प्रवास झाला. अगदी त्या शेवटच्या टोकापर्यंत जाऊन, फोटो काढले. तिथं जरा वेळ बसलो. पावसाळी हवेमुळं असेल, पण नेहमीपेक्षा माकडांचा उपद्रव जरा कमी होता. 
येताना चहासाठी एका टपरीवर थांबलो. तिथल्या मुलानं सांगितलं, की हे असं वातावरण आत्ता दोन दिवसांपासून आहे. कुठल्या तरी झाडाकडं बोट दाखवून ‘हे झाड असं ओलं दिसतंय तर यंदा जोरदार पाऊस येणार’ असं भाकीतही त्यानं वर्तवलं. ‘येऊ दे बाबा’ म्हणालो आणि परतीची वाट धरली.
आता इथून परतताना पुन्हा ट्रॅफिक जॅम लागलंच. महाबळेश्वरमध्ये प्रवेश करताना पुन्हा तिथला माणूस पास मागणार, अशी भीती होती. तसंच झालं. मात्र, ‘कालच आलोय इथं, आज क्षेत्र महाबळेश्वरला गेलो होतो,’ असं जोरात सांगितलं. त्याला गाडीत तिथली पावती दिसली. मग लगेच सोडलं. मग थेट रिसॉर्टवर गेलो आणि ताणून दिली. संध्याकाळी तुलनेनं जवळ असलेल्या लॉडविक पॉइंट किंवा हत्तीमाथा पॉइंटला जायचं ठरवलं. मी अनेकदा इथं आलो असलो, तरी हा पॉइंट पाहायचा राहून गेला होता. आमच्या रिसॉर्टपासून हा पॉइंट अगदी दोन-तीन किलोमीटर एवढा जवळ होता. तिथं गेलो. वाहनतळापासून आत चालत जायचं होतं. मग रमत-गमत तिकडं गेलो. तिथंही तोवर पूर्ण धुक्याची चादर पसरली होती. पीटर लॉडविक हा महाबळेश्वरवर पहिलं पाऊल ठेवणारा इंग्रज माणूस. त्याच्या स्मृत्यर्थ इथं एक स्तंभ उभारला आहे. मध्यंतरी तो वीज पडून कोसळला तेव्हा महाबळेश्वर हॉटेल ओनर्स असोसिएशननं वर्गणी काढून तो पुन्हा उभारला आणि त्यावर वीज प्रतिबंधक यंत्रणाही बसवली आहे. इथून पुढं तीनशे मीटरवर हत्तीमाथा पॉइंट होता. मग तिथवर गेलो. मात्र, धुक्यामुळं आजूबाजूचं काहीच दिसत नव्हतं. अर्थात वातावरण भन्नाटच होतं. आता जवळपास साडेसहा वाजून गेले होते. मग माघारी फिरलो.
पुन्हा मार्केटमध्ये गेलो. या वेळी अलीकडच्या वाहनतळावर जागा मिळाली. मग चालत मार्केट फिरलो. आज नझीरभाईंकडं ‘स्ट्रॉबेरी विथ क्रीम’ खायचंच होतं. ते खाऊन झाल्यावर थोडा वेळ परत फिरलो. मग शेजारच्या हॉटेलमध्ये साधंसं जेवलो व रिसॉर्टवर परतलो. आजचा दिवस मस्त भटकंती झाली होती आणि धुक्यामुळं जो काही ‘सुकून’ मिळाला होता, त्याचं वर्णन करणं अशक्य!
सकाळी आणि संध्याकाळी मी आमच्या सूटसमोरच्या रस्त्यावर शतपावली करायचो. वर जाणारा रस्ता ‘राजभवना’कडं जातो. मी पहिल्याच दिवशी तिथपर्यंत चक्कर मारून आलो. इतर सूटमध्ये राहणारे अनेक पर्यटक घोळक्यानं या रस्त्यावर फिरताना दिसायचे. आजूबाजूला माकडं भरपूर. ती आपल्या कारवरदेखील चढून बसतात. त्यामुळं तिथं वावरताना हे भान सतत बाळगावं लागतं. 

तिसऱ्या दिवशी आम्ही चेकआउट करणार होतो. सकाळी उपमा, इडली असा ब्रेकफास्ट झाला. बरोबर दहा वाजता रिसॉर्ट सोडलं. आम्हाला काही घाई नव्हती. येताना थांबत थांबत आम्ही येणार होतो. फक्त वरच्या ‘मॅप्रो’त न थांबता खाली वाईच्या पुढं झालेल्या त्यांच्या फॅक्टरीजवळच्या ‘मॅप्रो’त थांबायचं ठरवलं होतं. वरच्या ‘मॅप्रो’बाहेर फक्त स्ट्रॉबेरी घेतल्या. पुढं मेटगुताड इथं डोंगरावर विनीत केंजळे यांचं ‘व्हिंटेज माइल्स म्युझियम’ बघितलं. इथं सर्व प्रकारच्या दुचाकींचं अप्रतिम कलेक्शन आहे. दोन मोठ्या शेड्स आहेत. तिथं साधारण दोनशे ते तीनशे तरी दुचाकींची मॉडेल ठेवली आहेत. तिथं ‘लक्ष्मी ४८’ गाडी बघून मला फारच आनंद झाला. आमच्या जामखेडच्या घरी काकाकडं ही गाडी होती. लहानपणी या गाडीवरून चक्कर मारायची, हा माझा नेहमीचा कार्यक्रम असायचा. कोल्हापूरच्या घाटगे इंडस्ट्रीजनं ही गाडी काढली होती. तिला दोनच गिअर होते. तिचं वैशिष्ट्य म्हणजे, पायडल उलटं फिरवलं की तिचे ब्रेक लागायचे. ही गाडी ज्याला चालवायला यायची त्याला यायची. बाकी कुणाला ती चालवणं जमायचं नाही. ही गाडी दिसल्यानं मला एकदम लहानपण आठवलं. या प्रदर्शनाच्या तिकिटासाठी दिलेले शंभर रुपये तिथंच वसूल झाले. मग नंतर आमच्याकडं एके काळी असलेल्या लूना, एमटी-८०, बॉक्सर अशा सगळ्या दुचाकी गाड्या नीलला दाखवल्या. या प्रदर्शनात परदेशांतील, आपल्या देशातील विविध राज्यांतील अशा अनेक प्रकारच्या दुचाकी बघायला मिळतात. केंजळे यांना आता हे प्रदर्शन आणखी वाढवायचंय. अजून बघितलं नसेल तर अगदी आवर्जून बघा. या ट्रिपमधलं हे नवं फाइंड!
पुढं चीझ फॅक्टरीला थांबलो. पण ते प्रॉडक्शन नेमकं मंगळवारी बंद असतं म्हणे. मग तिथं जामुन शॉट घेतले. सिरप आदी खरेदी झाली. पुढं पाचगणीला टेबललँडला थांबलो. इथं घोडेवाले अगदी मागं लागले होते. त्यांचा ससेमिरा (की घोडेमिरा?) चुकवत चालत पुढं निघालो. इथं पांडव केव्हज आहेत त्या खाली उतरून कधी बघितल्या नव्हत्या. मग खाली उतरून त्या पाहून आलो. तिथं एक रेस्टॉरंट आहे. अतिशय छान जागा आहे. आत एका अरुंद जागेतून एक चक्कर मारता येते. तिथं शंकराची मूर्ती ठेवली आहे. पंधरा रुपये दरडोई तिकीट ठेवलं आहे. पण तिथंही स्कॅनर वगैरे आहे. सरबत घेतलं तिथंही स्कॅनरनं पैसे दिले. आपलं यूपीआय असं जंगलात, गुहेत पोचलेलं बघून फारच भारी वाटलं. तिथून त्या दगडी पायऱ्या चढून वर आलो. तिथं दोन वृद्ध गृहस्थ दुर्बिणी घेऊन बसले होते. ‘पन्नास रुपयांत पाच पॉइंट दुर्बिणीतून दाखवतो’ असं म्हणाले. मग मी नीलला दाखवा, म्हटलं. त्यांनी जोडीनं आम्हालाही सगळी माहिती दिली. पांढरी दाढी असलेले ते गृहस्थ माहितगार वाटत होते. इथून पुढं टायगर केव्हज नावाचा एक पॉइंट होता. मात्र, तिथं जायचा कंटाळा आला आणि आम्ही परत फिरलो. पाचगणीतून निघालो आणि घाट उतरून वाईत थांबलो. नातू फार्मला अनेकदा थांबून जेवलोय. आताही तिथंच थांबलो आणि मस्त थालीपीठ खाल्लं. मग वाईत जाऊन महागणपतीचं दर्शन घेणं मस्टच. अगदी शांतपणे, छान दर्शन झालं. तिथून मग ‘मॅप्रो फॅक्टरी’त थांबलो. इथं बरेच साहसी खेळ वगैरे आहेत. नीलला तिथं स्काय सायकल चालवायची होती. ती चालवून झाली. मग सँडविचचं पार्सल घेतलं आणि गाडी सुसाट पुण्याच्या दिशेनं सोडली.
येताना फारशी वाहतूक कोंडी लागली नाही. मात्र, सातारा रस्त्यावर अजूनही ठिकठिकाणी उड्डाणपूल, बायपास असली कामं सुरूच आहेत. हा रस्ता संपूर्णपणे एकदम दुरुस्त कधी होणार देव जाणे!
पुण्यात शिरलो आणि गरमागरम हवेनं आमचं स्वागत केलं. धुक्यातला ‘सुकून’ विरला होता आणि उन्हानं सुकून जाणं तेवढं उरलं होतं...

----

(महाबळेश्वरचे फोटो पाहण्यासाठी माझ्या फेसबुक वॉलला भेट द्या.)

-----

अशोक रानडे - कृतज्ञता

आमची ‘रानडे इन्स्टिट्यूट’
--------------------------------


शनिवारी (२५ मे) रोजी दुपारी दीडच्या सुमारास ‘सकाळ मनी’चे संपादक आणि माझे एके काळचे ज्येष्ठ सहकारी मुकुंद लेले यांचा व्हॉट्सअपवर मेसेज आला. ‘अशोक रानडे गेले’ असं त्यात लिहिलं होतं. मला हा धक्काच होता. याचं कारण अगदी एक-दोन महिन्यांपूर्वीच रानडेंची मुलगी अरुंधती आमच्या ऑफिसला आली होती, तेव्हाच रानडेंचा विषय निघाला होता. मी त्यांच्या तब्येतीची चौकशीही केली होती. मात्र, तेव्हा ते काही खूप आजारी वगैरे असे नव्हते. त्यांना दीर्घ काळ मधुमेह होता, ही गोष्ट खरी होती. मात्र, तरीही शनिवारी त्यांच्या जाण्याने अगदीच धक्का बसला. 


दुसऱ्या दिवशी अनेकांनी रानडेंविषयी फेसबुकवर भरभरून लिहिलं. त्यात माझे अनेक सहकारी होते. ते सगळं वाचत असताना माझं मन २६-२७ वर्षं मागं गेलं. 
मी एक सप्टेंबर १९९७ रोजी ‘सकाळ’मध्ये प्रशिक्षणार्थी पत्रकार म्हणून रुजू झालो. त्यापूर्वी अल्प काळ मी ‘लोकसत्ता’त काम केलं होतं. मात्र, ‘सकाळ’मध्ये आल्यानंतर अनेक दिग्गजांची ओळख झाली. ज्यांची नावं आपण लहानपणापासून पेपरमध्ये वाचत आलोय, अशा मंडळींसोबत आता काम करायला मिळणार, हा आनंद काही वेगळाच होता. कुवळेकरसाहेब, पाध्येसाहेब, राजीव साबडे, अशोक रानडे, वरुणराज भिडे, प्रल्हाद सावंत, शशिकांत भागवत, विजय साळुंके, मल्हार अरणकल्ले अशी सर्व मंडळी आम्हाला सीनियर होती. यातील राजीव साबडे सरांकडे आमची बॅच सोपवण्यात आली. एकेक आठवडा एकेका विभागात आम्ही काम करू लागलो. तेव्हा डेस्कवर विजय साळुंके, अशोक रानडे, मुकुंद मोघे, यमाजी मालकर, लक्ष्मण रत्नपारखे, चंद्रशेखर पटवर्धन, अनिल पवार, नवनीत देशपांडे, उदय हर्डीकर, गोपाळ जोशी, मुकुंद लेले, वर्षा कुलकर्णी, स्वाती राजे, स्वाती महाळंक, नयना निर्गुण, मीना संभू आदी मंडळी कामाला असायची. यापैकी रानडेंचा दरारा आम्ही पहिल्याच आठवड्यात ऐकला आणि पाहिला. 
रानडेंना ‘सर’ वगैरे म्हटलेलं आवडायचं नाही. आताही मी त्यांचा उल्लेख ‘रानडे’ असाच करतोय. मात्र, यात अनादर नसून, त्यांनीच घालून दिलेली शिस्त आहे. ऑफिसमध्ये संपादक आणि वृत्तसंपादक हेच दोन साहेब, असं त्यांचं म्हणणं असे. तेव्हा ‘सकाळ’मध्ये ‘सर’ असं कुणी म्हणायचंही नाही. संपादकांना ‘साहेब’ असंच म्हणण्याची पद्धत होती. रानडेंचा अचूकतेचा आग्रह, शब्दांची योग्य निवड करण्याची हातोटी, अनावश्यक अलंकृत भाषा वापरण्याची नावड, शुद्धलेखन वा प्रमाणलेखनाची त्यांची शिस्त याविषयी बहुतेकांनी लिहिलंच आहे. रानडेंची ती ओळखच होती. अगदी साप्ताहिक मीटिंगमध्ये एखाद्या शब्दाविषयी काही वाद निर्माण झाला, तर संपादकही ‘रानडे सांगतील तसं करा’ असं सांगायचे. रानडेंचा शब्द अंतिम असायचा. रानडेंचा दरारा बघून ‘असं का?’ ‘तसंच का?’ हे उलट विचारायची आमची हिंमत नव्हती. ते सांगतील ते आम्ही गुपचूप ऐकत गेलो. अर्थात विचारलं असतं, तरी त्यांच्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरं असतील, याबद्दल सर्वांना खात्री असायची. ‘एव्हरेस्ट सर केलेल्या हृषीकेश चव्हाण यांनी...’ अशा पद्धतीची वाक्यरचना चूक आहे, हे मला पहिल्यांदा रानडेंकडून कळलं. त्यांचं म्हणणं, हृषीकेश चव्हाण हे पुरुष आहेत तर ‘एव्हरेस्ट सर केलेले हृषीकेश चव्हाण यांनी...’ असंच लिहायला हवं. तिथं स्त्री असेल तर उदा. ‘एव्हरेस्ट सर केलेल्या बचेंद्री पाल यांनी...’ ही वाक्यरचना योग्य ठरेल. तुम्हाला अगदी ‘एव्हरेस्ट सर केलेल्या’ असंच लिहायचं असेल तर पुढं ‘हृषीकेश चव्हाण यांनी...’ याऐवजी ‘हृषीकेश चव्हाणांनी’ असे लिहा, असं त्यांनी सांगितलं होतं. थोडक्यात, एखादे वाक्य लिहिताना किती बारकाईने विचार करायचा असतो, हे आम्हाला रानडेंकडून (खरं तर त्यांच्याच सांगण्यानुसार, ‘रानड्यांकडून’) समजलं. तीच गोष्ट निधनाच्या बातमीची. ‘अमुक तमुक यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुले, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर अमुक ठिकाणी अंत्यसंस्कार झाले,’ अशा क्रमाने बातमी लिहिली, की रानडे चिडायचे. ते म्हणायचे, ‘अहो, याचा अर्थ त्यांच्या पत्नी, मुले व नातवंडांवर अंत्यसंस्कार झाले असा होतो. त्यामुळे ते वाक्य संपलं, की पुन्हा अमुक तमुक यांचं नाव लिहून मग त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले, असं लिहायला पाहिजे.’ 
मग वाटायचं, आपण शाळेत नक्की मराठी शिकलो की नाही?
‘सकाळ’मध्ये अनेक वर्षं रात्री ८ ते २ अशी मुख्य उपसंपादकांची ड्युटी असे. रानडे या ड्युटीला येत तेव्हा रात्रपाळीचे आर्टिस्ट आपल्याला घरी जायला तीन वाजणार आहेत, याची खूणगाठ बांधूनच ऑफिसला येत. रानडे पान १ अत्यंत बारकाईने वाचत. एकाही ओळीत, एकाही शब्दात चूक झालेली त्यांना खपत नसे. तेव्हा वेगळ्या पुरवण्या रोज नसायच्या. एक ते १६ पानी सलग ब्लॅक अँड व्हाइट अंक असायचा. प्रिंटिंग सुरू झाल्यावर ताजा ताजा अंक तेथील कर्मचारी वर आणून देत. तो अक्षरश: गरमागरम, ताजा अंक सगळा उलगडून नीट वाचावा लागे. पानांचे नंबर, तारीख-वार, वाढावे (मजकुराचे पुढल्या पानांवर दिलेले कंटिन्युएशन) हे सगळं बरोबर आहे ना, हे तपासून मग त्या अंकावर मुख्य उपसंपादकाला सही करावी लागे. तो सही केलेला अंक मग तो कर्मचारी खाली घेऊन जात असे आणि मग मशिनचा स्पीड धाडधाड वाढून अंक वेगाने छापला जात असे. अशा अंकावर सही करून झाली, की रानडे मंडईत जायला निघत. आम्हीही त्यांच्याबरोबर जायचो. रानडे टिळक रोडला राहायचे. त्यांनी कधीही वाहन वापरलं नाही. मग काही सहकारी त्यांना डबलसीट घेऊन मंडईत येत. तिथं तिखटजाळ सँपल आणि पाव खायचा त्यांचा बेत असे. रात्रपाळी करून पहाटे तीन वाजता सँपल-पाव खाणारे रानडे हे एक अचाट गृहस्थ होते. त्यांच्या अचाटपणाची कथा इथंच संपत नाही. यानंतर आम्ही २०-२२ वर्षांचे ‘तरुण’ थकल्या-भागल्या अवस्थेत कधी रूमवर जाऊन पडतो, अशा बेताला आलेले असताना रानडे मात्र ‘चला, सिंहगडावर जाऊन येऊ’ असं म्हणायचे तेव्हा आमच्या डोळ्यांसमोर अंधारीच यायची. रानडे मात्र खरोखर तिथून चालत सिंहगड वगैरे फिरून येत, अनेकदा ते चालत कोकणात उतरत आणि किनारपट्टी वगैरे भटकून मग दोन-तीन दिवसांनी परत येत. त्यांच्याबरोबर चालायला जायचा योग मला कधी आला नाही. मात्र, ज्यांना आला त्यांच्यासाठी तो कायमचा लक्षात राहणारा अनुभव ठरला असेल यात वाद नाही. ऑफिसमधले रानडे वेगळे होते आणि ऑफिसबाहेरचे रानडे वेगळे होते. कधी तरी एखादाच मिश्कील, पण मार्मिक शेरा ते असा मारायचे, की त्यातूनही त्यांच्या बुद्धिमान स्वभावाची झलक दिसायची. पं. जितेंद्र अभिषेकी गेले, तेव्हा रानडेंनी अग्रलेख लिहिला होता. ‘स्वराभिषेक थांबला...’ असं त्याचं शीर्षक होतं, हे मला आजही आठवतं. साधं-सरळ, पण नेमकं असं शीर्षक. उगाच आलंकारिक, भरजरी शब्दांचा सोस नाही. हा अग्रलेख लिहून झाल्यावर त्यांनी तो मला नजरेखालून घालायला सांगितला होता, तेव्हा ‘परुळेकर पुरस्कार’ मिळाल्याएवढा आनंद मला झाला होता!
रानडे संगीतातील मोठे जाणकार होते. ते स्वत: उत्तम तबला वाजवत. स्वाभाविकच ‘सवाई गंधर्व महोत्सवा’ची बातमी व रसग्रहण (नंतर फक्त रसग्रहण) तेच करणार, ही काळ्या दगडावरची रेघ असायची. तेव्हा सवाई गंधर्व महोत्सव रात्र रात्र चाले. उशिरातील उशिरा झालेल्या गायन वा वादनाची बातमी अंकात घालविण्याचा तेव्हा आमचा अट्टहास असे. रानडे तिथंच पत्रकार कक्षात बसून बातमी लिहीत. तेव्हा कागदावर पेननं बातमी लिहावी लागायची. मग ऑफिसबॉय ती कॉपी न्यायला तिथं यायचे. ती बातमी मग ऑफिसला जाऊन, ऑपरेट होऊन, प्रूफरीडिंग होऊन पानात लागायची आणि तो ताजा अंक पहाटे चार वाजता ‘सवाई मंडपा’त यायचा. अगदी तीन-चार तासांपूर्वी झालेल्या मैफलीची साद्यंत बातमी रसिकांना ती मैफल अजूनही सुरूच असताना वाचायला मिळायची. रानडेंचा कान अगदी तयार होता. अवास्तव, फालतू कौतुक त्यांना आवडत नसे. ‘पंडित’ ही उपाधी कुणामागे लावावी, याविषयी त्यांची ठाम मतं होती. त्यामुळं कुणाच्याही मागे पंडित लिहिताना आजही माझा हात थरथरतो आणि रानडेंची आठवण येते. 
नंतरच्या टप्प्यात रानडेंकडं सातारा आवृत्तीची जबाबदारी आली. ती त्यांनी एवढ्या तळमळीनं निभावली, की खरोखर कमाल वाटते. श्रीकांत कात्रे, चिंचकर, साळुंके, सोळसकर, बापू शिंदे आदी आमचे सर्व सीनियर-ज्युनिअर सहकारी रानडेंच्या करड्या शिस्तीत तावून-सुलाखून तयार झाले. तेव्हा या सर्वांना आम्ही चिडवायचो. ‘रानडेंचा सासुरवास सोसा’ म्हणायचो. मात्र, त्यांची कामातली कमिटमेंटही आम्ही पाहत होतो. जे काम वरिष्ठांनी सोपवलं आहे ते अत्यंत प्रामाणिकपणे, निष्ठेने, सचोटीने करायचं हा एक मोठाच धडा त्यांनी आपल्या वागणुकीतून घालून दिला होता. रानडेंच्या शिस्तीला जुने सहकारीही वचकून असत, तर नव्या सहकाऱ्यांचा प्रश्नच नसायचा. एकेका वाक्यासाठी त्यांनी अर्धा अर्धा तास एखाद्या नव्या मुलाला पिळून काढलेलं आहे. अर्थात ती चूक पुन्हा त्या मुलाकडून आयुष्यात कधीही होत नसे, हे सांगायला नको. भाषांतर करताना एखाद्या शब्दाचा अर्थ विचारला, तर रानडे स्वत: सांगायचे नाहीत. डिक्शनरी बघायला सांगायचे. एखादा संदर्भ विचारला, तर थेट सांगायचे नाहीत. ‘ग्रंथालयात जाऊन शोधा,’ असं म्हणायचे. तेव्हा त्यांचा राग यायचा; पण आज या शिकवणुकीचं मोल कळतं आणि नकळत डोळे पाणावतात. वास्तविक, इतर चार सहकाऱ्यांसारखे तेही ‘आपण बरं की आपलं काम बरं’ अशा पद्धतीने काम करू शकले असते. मात्र, त्यांनी पुढची पिढी घडवली. अक्षरश: मातीच्या गोळ्याला आकार द्यावा, तशी घडवली. आज मी (नेहा लिमयेसोबत) ‘लिहू या बिनचूक मराठी’सारखं पुस्तक लिहायचं धाडस केलं, त्यामागे रानडेंनी आमच्यावर घेतलेल्या त्या निरपेक्ष कष्टांचा वाटा मोठा आहे. हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर त्यांना ते नेऊन द्यावं, अशी माझी फार इच्छा होती. मात्र, एकीकडं धीरही होत नव्हता. या पुस्तकात त्यांनी काही चुका काढल्या तर, अशी भीती वाटायची. अर्थात पुस्तकाच्या निमित्ताने त्यांना भेटायचं आणि आशीर्वाद घ्यायचे, हे नक्की ठरलं होतं. मात्र, ते आता राहूनच गेलं.
मग वाटलं, रानडे शरीरानं फक्त गेले. आपण जोवर मराठी शब्द वापरत राहू तोवर ते आता आपल्या मेंदूत, अंतर्मनात, खोल कुठे तरी असणारच आहेत.
रानडे, तुमच्याविषयी ही कृतज्ञ शब्दांजली! काही चुकलं असल्यास माफ करा...

--------

(शीर्षकाविषयी - पुण्यात विद्यापीठाचा वृत्तपत्रविद्या व संज्ञापन विभाग फर्ग्युसन रोडवर ज्या वास्तूत आहे, ती ‘रानडे इन्स्टिट्यूट’ म्हणून ओळखली जाते. पुण्यातले बहुतेक पत्रकार तिथं शिकलेले असल्यानं सर्वच जण ‘रानडे इन्स्टिट्यूट’चे विद्यार्थी आहेत. आम्ही नव्वदच्या दशकात ‘सकाळ’मध्ये काम करणारे काही सहकारी मात्र अधिक भाग्यवान; कारण आम्हाला अशोक श्री. रानडे यांच्याकडं शिकायला मिळालं. रानडे स्वत: एक इन्स्टिट्यूटच होते. त्यामुळं दोन्ही अर्थ सांगणारं हे शीर्षक...)

-----