22 May 2015

फर्स्ट डे फर्स्ट शो - इंग्लिश-विंग्लिश

लई-वई भारी-वारी...
------------------------

गौरी शिंदे या पुणेकर दिग्दर्शिकेनं 'इंग्लिश-विंग्लिश' या तिच्या पहिल्या-वहिल्या हिंदी चित्रपटात आणि श्रीदेवी नावाच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या पहिल्या-वहिल्या लेडी सुपरस्टारनं आपल्या दीर्घ कालावधीनंतर पुनरागमन करतानाच्या पहिल्या-वहिल्या चित्रपटात एकदमच षटकार ठोकला आहे. एकाच चेंडूवर बारा धावा काढण्याएवढा अशक्यप्राय चमत्कार गौरी-श्री जोडगोळीनं यात करून दाखवला आहे. हा एक लई-वई भारी-वारी सिनेमा असून, तो चुकविल्या-बिकवल्यास पश्चात्ताप-बिश्चात्ताप वगैरे-बिगैरे होण्याची दाट-वाट शक्यता-बिक्यता आहे! शशी गोडबोले नामक एका पुणेकर मध्यमवर्गीय महिलेचा स्वतःलाच नव्याने 'डिस्कव्हर' करण्याचा हा प्रवास केवळ उच्च आहे. एरवी साधी वाटू शकणारी ही इंग्लिश शिकण्याची बाब दिग्दर्शिकेनं कुठल्याही स्त्रीच्या आत्मसन्मानाशी आणि तिच्या स्त्रीत्वाच्या सर्व क्षमतांशी नेऊन भिडवली आहे. यातली शशी गोडबोले ही भूमिका फक्त श्रीदेवीसाठीच जन्माला आली असावी, एवढ्या ताकदीनं तिनं ती पेलली आहे. एवढ्या वर्षांचं अंतर क्षणात पुसून तोच चार्म, तीच ग्रेस आणि तोच स्क्रीनवरचा 'लार्जर दॅन लाइफ' प्रभाव श्रीदेवीनं या पात्रात सहजी ओतलाय. त्यामुळं आणि दिग्दर्शिकेच्या विषयावरील प्रेमानं हा सिनेमा एक प्रेक्षणीय अनुभव ठरतो.
कुठल्याही दिग्दर्शकाचा पहिला सिनेमा खूपच पॅशननं तयार केलेला असतो. त्यात बहुतेकदा त्या दिग्दर्शकानं स्वतः अनुभवलेल्या गोष्टी आणि त्याचा जीवनानुभव प्रतीत होत असतो. गौरीचा 'इंग्लिश-विंग्लिश'ही त्याला अपवाद नाही. अर्थात एखादा विषय आवडणं आणि त्यावर सिनेमा तयार करणं या दोन्ही गोष्टी सर्वांनाच जमतात, असं नाही. त्यामुळंच खूप तयारीनं आणि अनेक बारकाव्यांनिशी तयार केलेला हा सिनेमा पाहताना पडद्यावरच्या श्रीदेवीसह पडद्याआडच्या दिग्दर्शिकेलाही दाद जाते. अगदी आपल्या नायिकेचं 'गोडबोले' हे आडनाव निवडण्यापासून हा बारकावा दिसतो. एका मध्यमवर्गीय महिलेच्या रुटीन आयुष्याचं चित्रण दाखवीत सिनेमा सुरू होतो. घरी आलेल्या एका इंग्रजी आणि एका हिंदी पेपरमधून नायिका हिंदी पेपर उचलते, यातूनच तिचं आणि इंग्लिशचं 'नातं' एस्टॅब्लिश होतं. त्यानंतर मुलीच्या आईविषयीच्या अनादरपूर्वक कमेंट्स आणि एक इंग्लिश शब्द चुकीचा उच्चारल्याबद्दल तिची उडणारी खिल्ली यातून हे 'नातं' आणखी पुढं सरकतं. मुलीच्या शाळेत पेरेंट्स मीटिंगला जायचा प्रसंग तर आपल्या नायिकेचा 'शत्रू' ठळकपणे हायलाइट करतो. अर्थात यासोबत आपली नायिका लाडू बनविण्यात किती एक्स्पर्ट आहे आणि तिचा छोटासा घरगुती व्यवसाय कसा जोरात सुरू आहे, हेही आपल्याला कळतं. त्यानंतर कथा पुढे सरकण्यासाठी आता काही तरी नाट्यमय घडायला हवं. तेव्हा नायिकेला तिच्या बहिणीचं न्यूयॉर्कला बोलावणं येतं. तिच्या मुलीच्या लग्नाच्या तयारीसाठी... शशी एकटी न्यूयॉर्कला जायला निघते, तेव्हा तिची आधीची पार्श्वभूमी ठाऊक असल्यानं तिच्या या प्रवासात होणाऱ्या संभाव्य फजितीसाठी आपण सज्ज होऊ बसतो. पण इथं विमानात तिला एक गमतीशीर सहप्रवासी (अमिताभ बच्चन) भेटतो आणि तिचं टेन्शन दूर पळतं. ('खुदा गवाह'नंतर जवळपास वीस वर्षांनी या जोडीला सर्वस्वी नव्या गेटअपमध्ये पाहणं खूपच सुखद.) आता न्यूयॉर्कमध्येही एक नाट्य घडायला हवं. तर आपली नायिका एका कॉफीशॉपमध्ये जाते तेव्हा ते घडतं आणि नव्या अध्यायाला सुरुवात होते. तिला अचानक 'चार आठवड्यांत इंग्लिश शिका'ची जाहिरात दिसते. कट टू इंग्लिश क्लास...

हा इंग्लिश क्लास म्हणजे एक स्पॅनिश आजीबाई, एक फ्रेंच मध्यमवयीन शेफ, एक दक्षिण भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर, एक आफ्रिकी तरुण, एक पाकिस्तानी टॅक्सी ड्रायव्हर आणि एक चिनी हेअर स्टायलिस्ट मुलगी यांचा अजब मेळा असतो. या सर्वांत शशीच सर्वांत हुशार आणि 'आंत्रप्रेन्युअर' असल्याने सर्वांचा आदर मिळविणारी ठरते. त्यातून इंग्लिश शिकत गेल्यानं तिच्याच हळूहळू मूळचाच असलेला; पण कालपरत्वे कुठं तरी हरवलेला चार्म, आत्मविश्वास परत येऊ लागतो. (अगदी सुरुवातीला फक्त मुलाच्या हौसेसाठी ती घरात पटकन एक 'एमजे'ची स्टेप करते, तो शॉट अफलातून...) ही स्टेप मग न्यूयॉर्कमधल्या शशीमध्ये आता अध्ये-मध्ये अवतरू लागते. नायिकेची ही सर्व क्लासची कसरत बहिणीला आणि घरच्यांना चुकवून सुरू असते. केवळ धाकट्या भाचीला याची कल्पना असते. त्यातच क्लासमधला फ्रेंच शेफ आपल्या नायिकेच्या प्रेमात पडतो...
गौरीनं नायिकेचं हे हळूहळू स्वतःला ओळखत जाणं चढत्या क्रमानं नाट्यमय ठेवलं आहे. या सर्व घटनाक्रमात नायिका मूळची एक हुशार तरुणी आहे आणि केवळ टिपिकल संसारी बाई झाल्यानं (आणि त्यातही इंग्रजी बरं नसल्यानं) तिच्यातली ही हुशारी झाकोळून गेली आहे, याचं भान ती कुठंही सुटू देत नाही. त्यामुळंच नायिकेच्या साध्या-सोप्या वागण्यातूनही तिचा स्मार्टपणा दिसून येतो. उदा. मेट्रो स्टेशनवर कार्ड स्वॅप करून पलीकडं जाण्याचा प्रसंग असो, की क्लासमध्ये शिक्षकाला 'व्हाय इंडिया इज नॉट दी इंडिया आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका इज दी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका?' असा थेट प्रश्न करणं असो; तिचं हे मूळचं चतुर, हुशार असणं आपल्याला कायम जाणवत राहतं. आपल्याकडं केवळ इंग्लिशला दिला जाणारा मान-सन्मान ही बोचणारी गोष्ट असल्यानं, न्यूयॉर्कमध्ये नायिकेला बहुभाषक (पण इंग्रजी येत नसलेला) आंतरराष्ट्रीय मित्रसमुदाय मिळवून देण्यासाठी इंग्लिश क्लासची योजना करणं ही गोष्ट दिग्दर्शिकेची विषयावरची पकड दाखवून देते. त्यातही तिच्यावर प्रेम करणारा शेफ 'फ्रेंच' (इंग्रजी भाषेचे हाडवैरी) असणं, हेही खूपच सूचक. त्या दोघांचं हिंदी-फ्रेंचमधलं संभाषण लाजवाब. पाकिस्तानी ड्रायव्हरचं आपल्या भारतीय मित्रांशी हिंदी-उर्दूतून बोलणं आणि त्याच्या गोऱ्या लोकांबाबतच्या खास 'हिंदुस्थानी' कमेंट दाद देण्याजोग्या.
या लोकांसोबतच सुरुवातीला येणारी नायिकेची फॅमिली खूप महत्त्वाची. विशेषतः शिवांश कोटियाने साकारलेला शशीचा मुलगा सागर खूपच गोड. आणि सासूबाईंच्या भूमिकेतील सुलभा देशपांडे यांच्याविषयी काय बोलणार? कुठलीही भूमिका जगण्याची त्यांची खुबी त्या सिनेमाला वेगळंच परिमाण मिळवून देते.
सरतेशेवटी श्रीदेवी. ही बाई एवढी वर्षं सुपरस्टार का होती, हेच तिनं पुन्हा या सिनेमातून दाखवून दिलं आहे. तिचं सर्व शरीरच बोलतं, अभिनय करतं. आपण तिच्या 'स्क्रीन प्रेझेन्स'नं अवाक होऊन जातो. गेल्या आठवड्यात पन्नाशीत प्रवेश केलेल्या 'श्री'साठी शशी गोडबोले ही करिअरमधील एक माइलस्टोन भूमिका ठरावी.
बाकी भूमिकांत फ्रेंच अभिनेता मेहदी नेब्बाऊ याने साकारलेला अबोल फ्रेंच शेफ झकास. शशीचा पती सतीशच्या भूमिकेत आदिल हुसेन ठीक. पण दुसरा एखादा चार्मिंग अभिनेता चालला असता. (अर्थात श्रीदेवीच्या सिनेमात नायकाला काही काम नसतंच.) असो. अमित त्रिवेदीचं संगीत आणि पार्श्वसंगीत अप्रतिम. टायटल साँग आणि 'गुस्ताख दिल' ही गाणी जमलेली. 'नवराई माझी...' हे मराठी लोकगीत रिमिक्स स्वरूपात ऐकायला मिळणं हा बोनस. तेव्हा यंदाचा हा होऊ घातलेला ब्लॉकबस्टर न चुकवता येण्यासारखाच.

---

निर्मिती : इरॉस इंटरनॅशनल, आर. बाल्की
दिग्दर्शिका : गौरी शिंदे
संगीत : अमित त्रिवेदी
सिनेमॅटोग्राफी : लक्ष्मण उतेकर
प्रमुख भूमिका : श्रीदेवी, मेहदी नेब्बाऊ, आदिल हुसेन, प्रिया आनंद, सुलभा देशपांडे, शिवांश कोटिया, सुजाता कुमार, नीलू सोधी, राजीव रवींद्रनाथन, सुमित व्यास, मारियो रोमानो, रुथ आगुईलार (पाहुणा कलाकार अमिताभ बच्चन) इ.
दर्जा - साडेचार स्टार
---
(पूर्वप्रसिद्धी - ६ ऑक्टोबर २०१२, महाराष्ट्र टाइम्स, पुणे)
---

15 May 2015

बॉम्बे वेल्वेट - रिव्ह्यू

उसवलेली मखमल...
-------------------------
अनुराग कश्यप या नावावर भाळून सिनेमाला जाणं थांबवावं का? तसं नको करायला... कारण हा नव्या पिढीतला एक हुशार, प्रयोगशील दिग्दर्शक आहे. त्याचा बॉम्बे वेल्वेट हा नवा हिंदी चित्रपट हाही एक प्रयोगच आहे. मात्र, प्रेक्षकांच्या दृष्टीनं हा फसलेला प्रयोग आहे. उत्कृष्ट बांधणीची, घट्ट विणीची, मऊसूत मखमल मिळण्याऐवजी आपल्याला या मखमलीचे उसवलेले धागे पाहायला मिळतात. तिची ऊब जाणवण्याऐवजी ती मधूनमधून चांगलीच टोचते. मूळ मखमल चांगली असणार, पण आपल्या विणकरानं तिला चांगल्या पटकथेचं अस्तर न लावल्यानं तिच्या शिलाईचे धागे अस्ताव्यस्त लोंबलेले दिसतात. आणि एकदा का मखमल टोचू लागली, की मग ती मखमल कसली? ती तर जाडीभरडी गोधडीच!
बॉम्बे वेल्वेटचं बाह्यरूप एकदम देखणं आहे. मस्त. शो-रूमच्या बाहेरून पैठणी कशी दिसते ना, अगदी तस्सं! किंबहुना कला दिग्दर्शनाचे पुरस्कारही या चित्रपटाला मिळतील. अनुरागनं यात उभी केलेली साठ व सत्तरच्या दशकातली मुंबई मस्तच आहे. त्या काळातल्या महानगरी होऊ पाहत असलेल्या, ब्रिटिश छाप शहराचं सौंदर्य अनुरागनं नेमकं दर्शवलं आहे. तेव्हाच्या मोटारगाड्या, बंदरं, रस्ते, बड्या लोकांचे दिवाणखाने, खलबतखाने, उंची क्लब, तिथं चालणारं जॅझ नृत्य, गाणी हे सगळं त्यानं ज्या तपशिलानं दाखवलं आहे त्याबद्दल त्याला फुल मार्क्स. पण नेपथ्य चांगलं असलं, तरी ते नेपथ्यच. ते शेवटी पार्श्वभूमीलाच असणार. पृष्ठभूमीवर काय दिसतं हे महत्त्वाचं. इथं पृष्ठभूमीवर आहे जॉनी बलराज (रणबीर कपूर - जबरदस्त) या फाळणीनंतर पाकिस्तानातून मुंबईत आलेल्या भणंग तरुणाची गोष्ट. महानगरी होऊ घातलेल्या या शहरात, मोक्याच्या जागेवर टॉवर्स उभे करून, मुंबईचं मॅनहटन रचण्याचं राजकारण करणाऱ्या बड्या लोकांत आधी प्यादं आणि नंतर वजीर बनून वावरत असलेल्या, आणि शेवटी तर राजाच होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या जॉनी बलराजची ही गोष्ट. त्याच्या रखरखीत आयुष्यातलं एकच वेल्वेट आहे, ती म्हणजे रोझी (अनुष्का शर्मा - सुपर्ब) ही गोव्यातील पळून आलेली तरुणी. कैझाद खंबाटा (करण जोहर - एक नंबर) हा बडा उद्योगपती-कम-राजकारणी, मेयर मेहता (सिद्धार्थ बसू) आणि जिमी मिस्त्री या पत्रकाराचं काम करणारा कलाकार यांच्या राजकारणात जॉनी बलराज कसा अडकत जातो आणि नंतर तोच सगळ्यांवर कशी बाजू उलटवतो, याची ही गोष्ट. पण अनुराग ही गोष्ट तशी सरधोपटपणे सांगत नाही. चित्रपटाचा पूर्वार्ध बराचसा पात्रं एस्टॅब्लिश करण्यातच खर्च होतो. बराच वेळ काय चाललं आहे, याचा मेळ लागत नाही. गोष्टीची सुसंगतता मध्यंतरापर्यंत लक्षात येते. पण तोवर कथेतली स्टीम गेल्याचा फील येतो. जॉनी बलराज आणि कैझादच्या चाली-प्रतिचालींमध्ये उत्तरार्ध रंगतो. हा भाग काहीसा वेगवान आणि सुसह्य आहे. पण बराचसा प्रेडिक्टेबल आणि नेहमीच्या हिंदी सिनेमा पठडीतलाच आहे. तो अनुराग कश्यपचा सिनेमा वाटत नाही आणि हेच त्याचं सर्वांत मोठं अपयश आहे.
हा चित्रपट तयार होताना बराच मोठा म्हणजे साडेतीन-चार तासांचा झाला होता म्हणे. मग तो भयंकर एडिट करून अडीच तासांचा करण्यात आल्याचं कळतं. हे जर खरं असेल, तर मग ती जी काही हानी झालेली आहे, ती पडद्यावर जाणवतेच. आणि असं झालं नसेल, तर मग पटकथेतच भरपूर ढिसाळपणा झाला आहे, हे तरी खरं आहे. चित्रपटात एकात एक बरेच ट्रॅक आहेत. जॉनी बलराज आणि त्याच्या जिम्मन नावाच्या मित्राचा एक ट्रॅक आहे. केके मेनननं साकारलेल्या पोलिस अधिकाऱ्याचा एक ट्रॅक आहे. विवान शाहनं साकारलेल्या टोनीचा एक ट्रॅक आहे. रोझीच्या गोव्यातल्या रहिवासाचा एक छोटा ट्रॅक आहे. एरवी अनुरागच्या सिनेमात हे सर्व प्रवाह बेमालूमपणे एकमेकांत मिसळून जातात. पण या सिनेमात हे सर्व आपल्याला तुटक तुटक असल्याचं जाणवतं. वीण घट्ट नसल्याचा हा परिणाम आहे आणि त्यामुळं उसवलेले हे धागे सारखे टोचत राहतात. सिनेमात रोझी क्लब सिंगर दाखवली आहे. तिच्या गाण्यांचेही प्रसंग असेच. सुरुवातीला ती गात असताना काही तरी नाट्य आहे. पण नंतर तर  गाण्यांचा अतिरेक झाला आहे. रविना टंडनचाही असंच एक गाणं गातानाचा छोटा रोल आहे. तोही मूळ कथानकात मिसळून आल्यासारखा वाटत नाही. असो.
एवढं असलं, तरी एक प्रयोग म्हणून बॉम्बे वेल्वेट एकदा पाहायला हरकत नाही. करण जोहरनं यातला कैझाद झक्कास साकारला आहे. एकदा तो रणबीर कपूरच्या इंग्लिश बोलण्याला घराबाहेर येऊन मनसोक्त हसून जातो तो, आणि नंतर तो रणबीरला रोझीमध्ये असं काय होतं जे माझ्यात नव्हतं, असं विचारतो तो हे दोन्ही प्रसंग हसवून जातात. अनुष्का शर्मानं रोझी मेहनतीनं साकारली आहे. तिच्या लूकवर दिग्दर्शकानं बरीच मेहनत घेतलेली दिसते आणि अनुष्काही या भूमिकेला जागली आहे. रणबीर कपूरनं जॉनी बलराजच्या भूमिकेत जीव ओतला आहे. वास्तविक अशा भूमिकांत त्याला पाहायची आपल्याला सवय नाही. पण त्यानंही त्याचा लूक आणि एकूण भूमिका यावर बरंच काम केल्याचं जाणवतं.
तेव्हा उसवलेली, पण मूळची मुलायम असावी अशी शंका येणारी ही मखमल एकदा स्पर्शून पाहायला हरकत नाही. नाही पाहिली तर काही बिघडणार नाही. साठच्या दशकातली मुंबई दाखवणारे मूळ हिंदी सिनेमे डीव्हीडीवर पाहणे हा जास्त किफायतशीर सौदा ठरू शकेल.

दर्जा - तीन स्टार
---

10 May 2015

माज, खाज अन् लाज...

नागरिकशास्त्र शिकवा... 
---------------------------
स्वतःच्या ग्लॅमरचा, प्रसिद्धीचा अन् पैशांचा माज असलेल्या बॉलिवूडकरांनी सुधारण्याची गरज तर सलमान प्रकरणातून दिसलीच; पण बॉलिवूड काही आकाशातून पडलेलं नाही. त्यामुळं आपणच समाज म्हणून आपण अधिक संवेदनशील होण्याची गरज आहे. त्यासाठी मुळात नागरिकशास्त्र हा शंभर मार्कांचा अन् सक्तीनं पास होण्याचा विषय केला पाहिजे.
-------

रस्त्यावर झोपलेल्या निरपराध माणसांना चिरडल्याबद्दल अभिनेता सलमान खानला मुंबईतील कोर्टाने पाच वर्षं सक्तमजुरीची शिक्षा सुनावल्यानंतर बॉलिवूड नावाची आपली (प्रामुख्यानं) हिंदी चित्रपटसृष्टी दुःखात बुडाली. सलमानला पाठिंबा देण्याच्या भरात अनेकांचा जिभेवरचा ताबा सुटला... अनेकांची बुद्धी गहाण पडली. अनेकांनी बेताल बडबड करून या पेशाला अक्षरश: लाज आणली. अर्थात त्या मंडळींकडून फार काही विवेकबुद्धीची, मर्यादशील वागण्याची अपेक्षा नसतेच; कारण त्यांना लाभलेल्या ग्लॅमरमुळं त्यांचा रथ तसाही दशांगुळे वर चालत असतो; पण सर्वसामान्य माणसांशी रोज संबंध येत नसेल, तर आपण किमान त्यांच्यासाठी असलेल्या माध्यमांतून बडबडू नये, हे भानही या वेळी सुटले. त्यामुळेच या बेतालवीरांचा समाचार घेणे आवश्यक आहे.
चित्रपटसृष्टीतली माणसं स्वतःला इतरांपेक्षा वेगळं समजतात. तसं समजण्याचं वास्तविक काहीही कारण नाही; परंतु त्यांना मिळणारी प्रचंड प्रसिद्धी, डोळे विस्फारतील एवढे मिळणारे पैसे आणि कलाकार म्हणून जात्याच अंगी असलेला एक नादिष्टपणा या तीन बाबींमुळं ते बिथरतात. आपल्याला कायम इतरांपेक्षा वेगळी वागणूक मिळाली पाहिजे; किंबहुना तो आपला हक्क आहे, असं त्यांना वाटतं. सगळेच कलाकार असे आहेत असं नाही. मानेवर डोके नावाचा अवयव असलेले, स्थिर बुद्धीचे, विवेकी कलाकारही आहेत. असे लोक समाजात जसे अल्पसंख्य असतात, तसेच इथेही ते अल्पसंख्य आहेत. त्यामुळे त्यांचा आवाज एक तर क्षीण असतो किंवा नसतोच. सध्या सर्वत्र गर्दी झालीय ती माध्यमांतून कर्कशपणे आपली तथाकथित बौद्धिक मुक्ताफळे उधळणाऱ्या येरूंची.
अभिजित हा गायक तर वेड्यासारखंच बोलला आहे. त्यावर भरपूर चर्चा झाली आहे. आपण काय बोलून गेलो, याचं आकलन त्याला नंतर झालं असेल. त्यामुळं त्यानं नंतर माफी वगैरे मागून सारवासारवी करण्याचा प्रयत्न केला. पण एकदा ‘बूंद से गई सो गई...’ त्याला ऋषी कपूरनं व्यवस्थित सटकावला. तीच अवस्था सलमानप्रेमाचा उमाळा आलेल्या त्या कोणा फराह अली खानची. या बाईंनी तर सलमानची तुलना लोकलच्या मोटरमनशी केली आणि रेल्वेरुळाखाली मरणाऱ्या लोकांच्या मृत्यूबद्दल मोटरमननाही दोष धरलं पाहिजे, असा निकाल त्यांनी दिला. सलमान एकदा कायद्याच्या समोर दोषी ठरल्यानंतर आपण त्याच्या निर्दोषित्वाचा दाखला देणं किंवा समोरच्या पार्टीला दोष देणं म्हणजे एका अर्थानं न्यायव्यवस्थेवरच संशय निर्माण करणं आहे, हेही त्यांच्या लक्षात आलं नाही का? लक्षात येत नसेल तर ते आणून द्यायला हवं. आणि मुद्दाम ते करत असतील तर त्यांनाही न्यायालयासमोर गुन्हेगाराचे साथीदार म्हणून उभं करायला हवं.
चित्रपटसृष्टीचा व्यवहार लक्षात घेता, तिथं असला लाळघोटेपणा करणाऱ्यांची फौज असणार, हे मान्य करायला हवं. कामं मिळवण्यासाठी गुणवत्तेसोबतच कुणाच्या तरी ‘कंपू’त राहणं तिथं आवश्यक मानलं जातं. एरवी हे उद्योग करणारे लोक कुणाच्या नजरेसही येत नाहीत. मग ही सवय रक्तात भिनत जाते; पण या लोकांनी हे उद्योग आपल्या कामापुरतेच मर्यादित ठेवले तर बरे. सलमान खानच्या खटल्यासारखा गंभीर विषय असतो, आणि त्यातही त्याला दोषी ठरवलं जातं त्यानंतर आपण त्याचं समर्थन करू नये, एवढी साधी गोष्ट या लोकांना कळत नसेल, तर त्यांच्या कानाखाली नागरिकशास्त्र काढून शिकवावं लागेल.
बॉलिवूडच्या लोकांना एवढ्या डोक्यावर घेणाऱ्या आणि प्रत्येक गोष्टीत ‘ब्रेकिंग न्यूज’ शोधणाऱ्या माध्यमांची, विशेषतः दृक-श्राव्य माध्यमांचीही यातली जबाबदारी त्यांना टाळता येणार नाही. अलीकडच्या काळात मनोरंजन क्षेत्राचं कॉर्पोरेटायझेशन झाल्यापासून या बातम्यांमधलं ‘रंजनमूल्य’ अचानक वाढलं. त्यामुळं अनेक भटक-भणंगांना अचानक प्रसिद्धीचा मोठाच मार्ग गवसला. अशा सोप्या प्रसिद्धीतून लायकी नसलेलेही अनेक जण मोठे स्टार म्हणून मिरवू लागले. सिनेमांतून मोठमोठा गल्ला गोळा करू लागले. या सगळ्यांचं मूळ काय, ते कुठून आले, कोणत्या पर्यावरणात वाढले, त्यांच्यावर काय संस्कार झाले आहेत याचा विचारही करायची फुरसत कुणाला नव्हती.
एके काळी लोकशिक्षणाचं माध्यम म्हणून वापरल्या गेलेल्या या आपल्या चित्रपटसृष्टीवर ही अवस्था का आली? अर्थात, हे फक्त चित्रपटसृष्टीतच घडलं, असं नाही. स्वातंत्र्योत्तर काळात एकूणच समाजव्यवस्थेत उत्तम शिक्षणाच्या अभावी आणि त्याहीपेक्षा उत्तम नागरिकशास्त्र शिकवण्याच्या अभावी जे फार मोठं स्खलन घडून आलं आहे, त्याचा दोष एकट्या चित्रपट कलावंतांच्या माथी लादता येणार नाही. चित्रपटांत काम करणाऱ्या लोकांची सामाजिक बांधिलकी एके काळी वादातीत होती. गोरगरीब जनतेविषयीची कणव, प्रेम त्यांच्या कलाकृतींमधून दिसत असे. आता त्यांना फूटपाथवर झोपणारी माणसं दोषी वाटू लागली? म्हणजे हा अधोगतीचा प्रवास फारच वेगानं झाला. याचं कारण आपण सर्वच क्षेत्रांत दोन टोकं गाठली. एक अत्त्युत्तमतेचं, तर दुसरं अतिदुर्गुणदोषांचं... खरं तर सर्व समाज या दोन वर्गांत कधीच नसतो. याच्यामधली तिसरीही अवस्था असते. ती सर्वसामान्य माणसांची असते आणि त्यांच्यावरच सगळं रहाटगाडगं सुरू असतं. आपण याच वर्गाकडं दुर्लक्ष केलं. सामाजिक शिस्तीचे धडे आपण कायमच ऑप्शनला टाकले. ज्या देशात नागरिकशास्त्राला केवळ २० मार्क, आणि त्यात पास नाही झालं तरी चालेल ही अवस्था, तिथं सुशिक्षित म्हणवणारेही लाल सिग्नल दिसत असूनही सैरावैरा गाड्या हाकत सुटणार यात आश्चर्य नाही. मग केवळ सिग्नल न पाळण्यापुरतं हे मर्यादित राहत नाही. ‘मी माझे नियम ठरवणार, माझं कोण वाकडं करणार, मी सर्वसामान्य नाही, मी कुणी विशेष आहे,’ असे अनेक (नाही ते) धडे डोक्यात शिरले, की साध्या-सरळ वागण्याचं नागरिकशास्त्र विसरलं जाणारच. मग पुढची पायरी ही प्रत्येक गोष्ट कायदेभंग करून स्वतःला हिरो सिद्ध करण्याची असते. मग मद्य पिऊन गाडी चालवू नये, हेही लक्षात राहत नाही आणि त्या अमलाखाली फूटपाथवर झोपलेले निरपराध नागरिकही दिसत नाहीत.
आपण प्रत्येकानंच स्वतःमध्ये वाकून पाहण्याची, आत्मपरीक्षणाची ही वेळ आहे. बॉलिवूडवाले चुकले तर त्यांचे कान उपटायचेच; पण त्यांच्यासोबत आपणही समाज म्हणून फार काही उच्च पातळीवर वावरतो आहोत, असं समजण्याचं कारण नाही. एक बोट त्यांच्याकडं असेल तर तीन बोटं आपल्याकडंच आहेत, हे लक्षात घेऊ या. या देशात नागरिकशास्त्र हा शंभर मार्कांचा आणि सक्तीने पास होण्याचा विषय केल्याशिवाय ही परिस्थिती सुधारेल असं वाटत नाही.
----
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे - १० मे २०१५ - ‘नागरिकशास्त्र शिकवा’ या शीर्षकाने....)
----

3 May 2015

परिक्रमा आकाशवाणीची... ४

परिक्रमा ९-१-२०१३
-----------------------रसिक श्रोते हो, नमस्कार...

संध्याकाळी निवांत, गावाबाहेर मोकळ्या आकाशाखाली आपण कधी बसलो, तर हळूहळू पडत जाणारा अंधार आणि आकाशात एकेक करून चमकू लागणारे तारे हे दृश्य अगदी खिळवून ठेवणारं असतं. अवकाशाच्या त्या अनंत पोकळीकडं पाहताना माणसाला कायमच आपल्या खुजेपणाची जाणीव होत असते. त्याच वेळी हे ब्रह्मांड कवेत घेण्याची एक जिद्दही त्याच्या मनात कुठं तरी रुजत असते. माणसानं विज्ञानाच्या मदतीनं आजवर अनेक शोध लावले. पण विश्वाच्या या अफाट पसाऱ्यात आपण एक अगदीच छोटासा बिंदू आहोत, ही जाणीव त्याला सतत होत असते. त्यातूनच आपल्यासारखं या विश्वात दुसरं कुणी आहे का, याचा शोध घेण्याची त्याची जिज्ञासा अहोरात्र जागी असते. या जिज्ञासेतून, अगदी बालसुलभ वाटेल अशा कुतूहलातूनच मोठमोठे वैज्ञानिक शोध लागले आहेत. यातूनच माणूस गेल्या शतकात चक्क चंद्रावर पोचला. आता त्याला वेध लागले आहेत ते मंगळाचे. अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेनं 'क्युरिऑसिटी' असं नेमकं नाव असलेलं एक यान मंगळावर पाठवलं आहे, हे आपल्याला माहिती आहेच. या क्युरिऑसिटीचं काम मंगळावर अव्याहत सुरू असून, वेगवेगळे फोटो हे यान पृथ्वीवर पाठवीत असतं. त्यातून अनेक रंजक आणि मंगळाविषयीचं कुतूहल वाढविणाऱ्या बातम्या हाती येत असतात. कालच्याच वृत्तपत्रांमध्ये अशी एक बातमी प्रसिद्ध झालीय. मंगळावर फुलाच्या आकारासारखी काही तरी वस्तू दिसल्याचं क्युरिऑसिटीनं पाठविलेल्या फोटोंमधून स्पष्ट झालंय. मंगळावर जीवसृष्टी असावी किंवा पूर्वी कधी तरी होऊन गेली असावी, असा अनेक शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. त्याला पुष्टी देणारे अनेक पुरावेही मिळाले आहेत. या फुलानंदेखील अशीच आणखी एक आशा जागी केलीय. दगडासारख्या दिसणाऱ्या कठीण पृष्ठभागातून हे 'फूल'सदृश काही तरी वर येत असल्याचं दिसत असल्याचं या बातम्यांमध्ये म्हटलंय. या घटनेविषयी अमेरिकेत गेल्याच आठवड्यात एका परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात सहभागी झालेल्या विज्ञानप्रेमींनी अनेक मतं मांडली. एका अभ्यासकाच्या म्हणण्यानुसार, कठीण पृष्ठभागातून फूल वर आलेलं दिसणं ही फूल उमलण्याची प्राथमिक अवस्था असू शकते. अर्थात सध्या तरी या वस्तूविषयी एवढीच माहिती उपलब्ध आहे. कारण ऑक्टोबर २०११ मध्ये या यानानं असाच एक फोटो पाठविला होता. मात्र, त्यात तो प्लास्टिकचा तुकडा असल्याचं दिसून आलं. या यानातूनच हा तुकडा पडला असावा, असं मानण्यास पूर्ण वाव आहे. असं असलं, तरी 'कुणी तरी आहे तिथं' नावाचं हे माणसाचं कुतूहल आहे ना, ते श्रोतेहो, कधीही कमी होणार नाही. कारण तेच तर आपल्या जिवंतपणाचं लक्षण आहे.

गाणं - शिफारस - रात्रीस खेळ चाले हा गूढ चांदण्यांचा (हा खेळ चांदण्यांचा)
(किंवा) या वाऱ्याच्या बसुनी विमानी सहल करू या गगनाची (गौरी जोशी?)

रसिकहो, अंतराळातलं ते जगणं कदाचित रम्य असेलही... आपल्याला ठाऊक नाही. पण युद्धाच्या कथा या नेहमीच रम्य असतात, हे आपल्याला नक्कीच ठाऊक आहे. 'युद्धस्य कथा रम्या' असं सुभाषितच आहे. युद्ध मुळात होऊच नये, हे खरं असलं, तरी शत्रूच्या हल्ल्यासाठी कायम तय्यार असणं हेदेखील व्यावहारिक शहाणपण असतं. आपल्या विशाल अशा भारत देशात अनेक बाबतींत विभिन्नता असली, मतभेद असले, तरी काही गोष्टी आपण राष्ट्रीय अभिमानाच्या मानल्या आहेत आणि त्याबाबत सर्व देशवासीयांचं एकमत आहे. आपलं लष्कर ही आपल्या सर्वांच्याच अतिशय अभिमानाची बाब आहे. या लष्करानं पुण्यातील शेठ दगडूराम कटारिया हायस्कूलच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त एक प्रदर्शन नुकतंच शाळेत भरवलं होतं. 'नो युअर आर्मी' असं नाव असलेल्या या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला. लष्कराच्या दक्षिण विभागाचं मुख्यालय पुण्यात आहे, हे आपल्याला ठाऊक आहेच. या मुख्यालयातील '२६, मराठा लाइट इन्फंट्री'नं हे प्रदर्शन सादर केलं होतं. लष्करातील जवान वापरत असलेली पिस्तुलं, रायफल, लाइट मशिनगन, रॉकेट लाँचर अशी अनेक शस्त्रं जवळून पाहण्याची, हाताळण्याची संधी विद्यार्थ्यांना या वेळी मिळाली. मशिनगनमध्ये किती गोळ्या असतात, एका मिनिटात आपण किती गोळ्या उडवू शकतो, या गनचं वजन किती असतं असे स्वाभाविक कुतूहलाचे प्रश्न विचारून मुलांनी प्रदर्शनाचा आनंद लुटला. श्रोतेहो, आपले जवान किती टोकाच्या नैसर्गिक परिस्थितीमध्ये आपलं संरक्षण करीत असतात, हे आपल्याला माहिती आहे. पण संगणकावर लुटूपुटूचे व्हिडिओ गेम खेळण्यापेक्षा मुलांना अशा शूर जवानांना थेट भेटण्याची संधी मिळाली आणि त्यांचं खडतर आयुष्य जाणून घेता आलं, तर त्या मुलांच्या मनातही पुढं देशासाठी अशी सेवा करण्याचं बीज रोवलं जाईल, यात शंकाच नाही. या प्रदर्शनाच्या निमित्तानं लष्करातील करिअरची माहिती देणारी पत्रकं देण्यात आली; तसंच त्याबाबतचे व्हिडिओही दाखवण्यात आले. देशासाठी प्राण देण्याची तयारी असणारी तरुण मुलांची फौज जर आपल्याकडं असेल, तर जगातील कोणतीच शक्ती आपल्याकडं वाकडा डोळा करून पाहू शकणार नाही, हे निश्चित.

गाणं - शिफारस - नन्हा मुन्हा राही हूँ देश का सिपाही हूँ (सन ऑफ इंडिया)


मंडळी, आपलं वजन हा आपल्यासाठी फारच संवेदनशील विषय असतो. विशेषतः स्त्रियांसाठी तर फारच. बदलत्या जीवनशैलीमुळं आहार-विहारात झालेला बदल आणि त्या अनुषंगानं येणारा लठ्ठपणा हा काळजीचा विषय असला, तरी सार्वजनिकरीत्या तो नेहमीच चेष्टेचा मुद्दा ठरतो. त्यामुळंच रोज डाएट, धावण्याचा व्यायाम, कॅलरी कॉन्शसनेस असं करीत करीत आपला मुक्काम कधी तरी वजनाच्या काट्यावर येतो. वाढताना किलो-किलोनं वाढणारं वजन कमी होताना मात्र ग्रॅम-ग्रॅमनं कमी होताना दिसतं. वजनाचं परिमाण असलेल्या त्या किलोग्रॅमचा आपल्याला काहीसा रागच येतो. तुझं वजन वाढलं म्हणजे कळेल, असा आपण कधी कधी त्या वजनकाट्याला शापही देतो. पण मंडळी, आता खरी बातमी सांगतो, ती ऐका. अहो, किलोग्रॅमचं वजन खरंच वाढलंय. आता ही वाढ एक दशांश मायक्रोग्रॅमची का असेना. पण किलोग्रॅम नावाच्या वजनाचंच वजन वाढलंय ही वस्तुस्थिती आहे. कालच्याच वृत्तपत्रात आलेली ही बातमी काय सांगते ते पाहा. पॅरिसच्या इंटरनॅशनल ब्यूरो ऑफ वेट्स अँड मेजर्स या संस्थेत ठेवण्यात आलेल्या किलोग्रॅमच्या मूळ प्रतिकृतीचं वजन वाढलं आहे. आणि हे वजन वाढण्याचं कारण आहे वातावरणातील प्रदूषण! ब्रिटनमधल्या न्यू कॅसल युनिव्हर्सिटीनं याबाबत एक अहवाल तयार केलाय. वस्तूचं वजन निर्धारित करण्यासाठी १८७५ मध्ये किलोग्रॅम या एककाची निर्मिती करण्यात आली, हे आपल्या सर्वांना माहितीय. तेव्हापासूनच जगभरात कुठल्याही वस्तूचं वजन करण्यासाठी हे एकक वापरलं जातं. पॅरिसमधील संस्थेत असलेल्या किलोग्रॅमच्या मूळ प्रतिकृतीला इंटरनॅशनल प्रोटोटाइप किलोग्रॅम - म्हणजेच आयपीएके - असं म्हणतात. आयपीके हे सिलिंडरच्या आकारातील प्लॅटिनम आणि इरिडियमचं संयुग आहे. या मूळ प्रतिकृतीच्या जशाच्या तशा ४० अधिकृत प्रतिकृती १८८४ मध्ये तयार करून, विविध देशांना पाठविण्यात आल्या होत्या. सध्या या मूळ प्रतिकृतीचं वजन वाढण्यामागं प्रदूषणामुळं त्यावर जमा झालेला हायड्रोकार्बनचा थर असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. या वाढीव हायड्रोकार्बनची चरबी काढून टाकून, किलोग्रॅमला मूळच्या आकारात 'फिट' करण्यासाठी एक्स-रे फोटोइलेक्ट्रॉन स्पेक्ट्रोस्कोपीचा वापर करण्यात येणार आहे. या पद्धतीत ओझोन आणि अल्ट्राव्हायोलेट लाइटद्वारे प्रतिकृतीवर चढलेले हायड्रोकार्बन काढण्यात येणार आहेत. चला, किलोग्रॅमचं प्रतीक आपलं मूळ वजन परत मिळवीलसुद्धा... तोपर्यंत आपण आपल्या शरीरावर चढलेले चरबीचे कित्येक किलोग्रॅम घटविण्यासाठी धावायला सुरुवात करू या...

गाणं - शिफारस - हारी बाजी को जितना हमे आता है... (जो जिता वही सिकंदर)

श्रोतेहो, खरोखर, आपल्याला सिकंदरसारखं धावणं जमलं तर ठीक. नाही तर सध्या थंडीचा कडाका एवढा वाढला आहे, की अक्षरशः हाडं गोठून जावीत. विशेषतः उत्तर भारतात तर थंडीचा कडाका भयंकर वाढलाय. महाराष्ट्रात या काळात येणारी थंडी हीदेखील उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळेच असते. दिल्लीत दोन दिवसांपूर्वी १.९ अंश सेल्सिअस एवढं तापमान खाली आलं होतं. काश्मीर खोऱ्याचं तर विचारूच नका. द्रास, कारगिल या भागांत उणे २५ अंश सेल्सिअस एवढं तापमान खाली गेलंय. उत्तर प्रदेशात थंडीमुळं मरण पावलेल्यांची संख्या आता पावणेदोनशे एवढी झालीय. यात उघड्यावर झोपणाऱ्या, अंगावर पुरेसं वस्त्र नसलेल्या गोरगरीब जनतेचा प्रामुख्यानं समावेश आहे. श्रीनगरमधलं प्रसिद्ध दल सरोवरही गोठून गेलंय, तर महाराष्ट्रात महाबळेश्वरमध्येही दवबिंदू गोठून त्याचा बर्फ झाल्याचं पाहायला मिळतंय. उत्तर भारतात दाट धुक्याचा प्रादुर्भाव झाल्यानं विमानसेवेवरही विपरीत परिणाम झालाय. तेथून येणाऱ्या शीतलहरींमुळं महाराष्ट्राचाही बराच भाग गारठून गेलाय. विशेषतः मुंबईत, जिथं एरवी कायम उन्हाळा आणि पावसाळा हे दोनच ऋतू अनुभवण्यास मिळतात, तिथंही गुलाबी थंडी जाणवते आहे. मुंबईकरांनी आपापले स्वेटर्स, जर्किन्स अनेक दिवसांनी बाहेर काढले आहेत. श्रोतेहो, निसर्ग आपल्या वर्तणुकीत सर्वांना समान न्याय देतो. तो भेदभाव करीत नाही. त्यामुळं गरिबाला आणि श्रीमंताला सारखीच थंडी वाजत असते. फरक एवढाच असतो, की श्रीमंताकडं त्या थंडीवर मात करायची साधनं असतात आणि गरीब मात्र रस्त्यावर कुडकुडत कसाबसा जीव तगवत असतो. अशी कुणी गरीब माणसं तुम्हाला दिसली, तर त्यांना एखादी गोधडी, रजई पांघरायला द्या... आपण फार काही नाही, तर एवढं तरी करू शकतो. थंडीच्या प्रादुर्भावामुळं आपल्यातली माणुसकीही गोठून गेलेली नाही, हे दाखविण्याची आपल्याला संधी आहे. ऋतू येत असतात, जात असतात... माणुसकीची ही परिक्रमा मात्र आपल्यासोबत अखंड चालत असते... नाही का!

गाणं - शिफारस - देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी (सुधीर फडके)
---

परिक्रमा आकाशवाणीची... ३

परिक्रमा ८-१-२०१३
-----------------------


रसिक श्रोते हो, नमस्कार...

मराठी माणसाच्या काही खास आवडी-निवडी आहेत. आपण संगीतात रमतो, आपल्याला इतिहास आवडतो, स्मरणरंजन आवडतं. वेगवेगळ्या कलांमध्ये आपल्याला रुची आहे. पर्यटन करण्यातही आता मराठी माणूस आघाडीवर आहे. या आवडी-निवडींबाबत कदाचित मतभेद होऊ शकतील, पण मराठी माणूस आणि नाटक हे जे काही रसायन जमलंय ना, ते खासच आहे. आपल्या सगळ्यांनाच नाटकं मनापासून आवडतात. पाहायला आणि स्वतः करायलादेखील! मराठीत नाटकांची फारच मोठी आणि थोर परंपरा आहे. विष्णुदास भाव्यांपासून ते आजच्या मोहित टाकळकरपर्यंत अनेक नाटककारांनी या परंपरेत मोठी मोलाची भर घातलीय. मंडळी, याच यादीतलं एक अत्यंत महत्त्वाचं नाव म्हणजे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे. आणि अत्रे म्हटलं, की तो मी नव्हेच हे नाटक आठवणार नाही, असा मराठी माणूस सापडणं अशक्य! तो मी नव्हेच आणि अत्रे हे जसं समीकरण होतं, तसंच तो मी नव्हेच आणि प्रभाकर पणशीकर हेदेखील अजरामर समीकरण म्हणता येईल. या तो मी नव्हेच नाटकाचा सुवर्णमहोत्सव नुकताच पुण्यात साजरा झाला. आचार्य अत्रे प्रतिष्ठाननं यानिमित्त एक कृतज्ञता समारंभ आयोजित केला होता. नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष डॉ. मोहन आगाशे, लेखक-दिग्दर्शक श्रीनिवास भणगे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबूराव कानडे आणि प्रभाकरपंतांच्या पत्नी विजया पणशीकर असं सगळं गणगोत या वेळी हजर होतं. नाटकाचं यश लेखकाचं की दिग्दर्शकाचं यावर नेहमीच चर्चा होते. तो मी नव्हेच नाटक आलं, तेव्हाही अशीच चर्चा झाली. पण प्रभाकर पणशीकर यांच्या मोठ्या योगदानाकडं तेव्हा लक्ष दिलं गेलं नाही. नाटक हे वेगवेगळ्या घटकांपासून तयार झालेल्या पदार्थासारखं असतं. तो मी नव्हेच नाटकात प्रेक्षकांना अशा पद्धतीचा आनंद मिळाल्याचं आगाशे यांनी या वेळी सांगितलं. आचार्य अत्रे यांच्या नावातच थिएटर होतं. थिएटरचं स्पेलिंग नीट वाचलं, तर द अत्रे असंही वाचता येतं. अत्र्यांनी आयुष्यात जे भोगलं, उपभोगलं त्यामुळं त्यांच्या लेखनात परिपक्वता आली, नाटककार म्हणून त्यांनी रसिकांना वेड लावलं, अशा शब्दांत भणगे यांनी अत्र्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
श्रोतेहो, खरंच, एका सत्य घटनेवर आधारित अशा या नाटकाचं यश जसं अत्र्यांच्या लिखाणात आहे, तसंच ते पणशीकरांनी अजरामर केलेल्या लखोबा लोखंडेसह पाच वेगवेगळ्या भूमिकांनाही निश्चितच आहे. लखोबा लोखंडे हा शब्द वाक्प्रचारासारखा पुढं रूढ झाला. फारच थोड्या नाटकांना असं उत्तुंग यश लाभलं. पाहा ना, 'तो मी नव्हेच'ला पाहता पाहता ५० वर्षं होऊन गेली आणि अजूनही त्या नाटकाची मोहिनी कमी झालेली नाही, यात शंकाच नाही.

गाणं - एखादी लोकप्रिय नांदी... किंवा तो मी नव्हेच मधले संवाद...

श्रोतेहो, 'तो मी नव्हेच' म्हणत सर्वांना फसविणारे या जगात काही कमी नाहीत. पण अन्याय, अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी 'तो मीच...' किंवा 'ती मीच...' म्हणत पुढं येणारे फारच थोडे असतात, नाही का! पश्चिम सीमेपलीकडल्या आपल्या शेजाऱ्याशी, अर्थात पाकिस्तानशी आपले संबंध फार काही गोड गोड बोलण्याएवढे नसले, तरी तेथील एका मुलीनं गेल्या काही महिन्यांत आपलंच नव्हे, तर सर्व जगाचं लक्ष आपल्याकडं वेधून घेतलं आहे. मलाला युसूफझाई हे नाव ऐकलं नाही, अशी फार थोडी माणसं आता जगात असतील. पंधरा वर्षांच्या या मुलीनं मुलींच्या शिक्षणाच्या हक्कासाठी पाकिस्तानात आवाज उठवला. स्त्रियांविषयी अतिशय बुरसटलेले, जुनाट विचार अंगीकारलेल्या तालिबानसारख्या संघटनांनी मलालापुढं मोठं आव्हान उभं केलं. मात्र, तरीही ही धीट मुलगी घाबरली नाही. तिनं आपला प्रचार सुरूच ठेवला. विचारांनी सामना करण्याची ताकद संपते, तिथं हातात शस्त्रं घेतली जातात. मलालाच्या बाबतीतही हेच झालं. अवघ्या १५ वर्षांच्या या मुलीवर पाकमधील स्वात खोऱ्यात तालिबान्यांनी नऊ ऑक्टोबर २०१२ रोजी गोळीबार केला. तिला संपवण्याचाच मारेकऱ्यांचा विचार होता. मात्र, सुदैवी मलाला त्यातून बचावली. गंभीर जखमी अवस्थेत तिला पेशावरमधल्या रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथं शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिला रावळपिंडीतल्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्या डोक्यात आणि मानेत गोळ्या घुसल्या होत्या. शस्त्रक्रिया करून त्या काढून टाकण्यात आल्या. तरीही तिची प्रकृती खालावल्यावर तिला पाकिस्तानी सरकारनं बर्मिंगहॅम येथील क्वीन एलिझाबेथ रुग्णालयात हलवलं. आता चांगली बातमी म्हणजे, तिथं काही काळ उपचार घेतल्यानंतर ती आता व्यवस्थित बरी झालीय आणि गेल्या शुक्रवारीच तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मलालावर गोळीबार झाल्यापासून जगभरातील माध्यमांचं तिच्याकडं लक्ष गेलं होतं. सध्याच्या या सोशल नेटवर्किंगच्या जमान्यात देशा-देशांच्या सीमा केव्हाच गळून पडल्या आहेत. त्यामुळं जगभरातून मलालासाठी प्रार्थना करण्यात आल्या. तिच्या प्रकृतीला उतार पडावा, म्हणून अनेकांनी सदिच्छा व्यक्त केल्या. अगदी भारतातूनही मलालाला भरपूर पाठिंबा मिळाला. स्त्रियांविरुद्ध होत असलेल्या दडपशाहीचं, जुलमी रुढी-परंपरांचं जोखड फेकून देण्याच्या लढ्याचं प्रतीक म्हणून आता मलालाकडं सगळं जग पाहतंय. तिच्यावर उपचार करणाऱ्या क्वीन एलिझाबेथ रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डेव्ह रोझर यांनीही मलालाचं कौतुक केलंय. मलाला ही अतिशय कणखर युवती असून, सर्वसामान्य नागरिकांसाठी, स्त्रियांसाठी ती करीत असलेलं काम खूप आश्वासक आहे, अशा शब्दांत रोझर यांनी तिची पाठ थोपटलीय. सध्या तरी मलाला नातेवाइकांसोबत लंडनमध्येच राहणार आहे. लवकरच तिच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया होणार आहे, असं समजतं. त्यासाठी आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा तिच्यासोबत आहेतच... होय ना!

गाणं - शिफारस - मी अशी नाही कधी मिटणार वा मरणार येथे (कविता कृष्णमूर्ती - अस्तित्व)

रसिकहो, माणसातलं जनावर जागं झालं, की तो माणूसपणा सोडून पाशवी कृत्यं करू लागतो आणि त्यांना माणसात आणण्यासाठी मलालासारख्या मुलीला पुढं यावं लागतं. पण जेव्हा वाघासारखं खरंखुरं जनावर नरभक्षक होतं तेव्हा नक्की दोष कुणाचा असतो? सध्या विदर्भात भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत एका नरभक्षक वाघानं असाच धुमाकूळ घातल्याच्या बातम्या येत आहेत. आतापर्यंत पाच माणसांचा जीव या वाघानं घेतला आहे. अगदी मुख्यमंत्र्यांनीही आता गरज पडली, तर या वाघाला गोळी घाला, असा आदेश वन विभागाला दिल्याची बातमी आहे. आता यानुसार यथावकाश कारवाई होईल आणि तो नरभक्षक वाघ मारला जाईलही. पण अशा बातम्या वाचून आपल्याला काही प्रश्न कायम पडतात. एक म्हणजे या परिस्थितीचा खरा गुन्हेगार कोण? आणि त्याची शिक्षा कोण भोगतो? वाघाच्या हल्ल्यात जी माणसं मारली गेली, त्यांच्या जीवाचं मोल नक्कीच आहे. त्यांच्या कुटुंबीयांवर काय परिस्थिती ओढवली असेल, त्याची आपण नक्कीच कल्पना करू शकतो. विशेषतः त्यात कुणी जर कमावता, कर्ता पुरुष मारला गेला असेल, तर त्या कुटुंबावर केवळ आभाळ कोसळलं असेल, हेही आपण समजू शकतो. पण वाघ किंवा कुठलंही जनावर मुळात नरभक्षक कशामुळं होतो, याचा आपण कधी विचार करतो का? वास्तविक विदर्भात जंगलं भरपूर आणि घनदाट. परंतु गेल्या काही काळात तेथेही जंगलांची अवैध आणि अफाट तोड सुरू असून, यामुळं वाघांचा नैसर्गिक अधिवास नष्ट होऊ लागला आहे. वास्तविक ज्या जंगलात वाघ असतो, ते जंगल परिपूर्ण मानलं जातं. कारण तेथील नैसर्गिक अन्नसाखळी अबाधित असते. मात्र, या साखळीतील एखादी कडी जरी तुटली, तरी संपूर्ण जंगलाच्या परिसंस्थेवर त्याचा विपरीत परिणाम होतो, हे आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. जंगलातील गवतावर चरणारे प्राणी हे वाघाचं प्राथमिक भक्ष्य असतं. ते मिळेनासं झालं, की वाघ अन्नाच्या शोधार्थ जंगलाबाहेर पडतात. शिकारीच्या शोधात त्यांचा चुकून माणसाशी सामना होतो आणि एकदा वाघानं माणूस मारला, की त्याच्या लक्षात येतं, की हे पकडायला फारच सोपं भक्ष्य आहे. त्यातून तो वाघ नरभक्षक बनत जातो. अर्थात आपलं प्राधान्य माणसांना असल्यामुळं नरभक्षक वाघाला मारावंच लागणार हे खरं... पण मुळात तो नरभक्षक बनू नये, यासाठी जंगलं टिकविण्याची आपली मूळ जबाबदारी माणसानं विसरता कामा नये, एवढी अपेक्षा गैर नसावी.

गाणं शिफारस - आओ बच्चो, तुम्हे एक कहानी सुनाता हूं (अमिताभ - मि. नटवरलाल)

मंडळी, नव्या वर्षातला पहिला आठवडा काल संपला. नव्या वर्षानिमित्त काही संकल्प केले असतील, तर ते 'सोडण्याचा' हा काळ. नव्याचे नऊ दिवस म्हणतात, तसे हे संकल्प अक्षरशः काही दिवसच टिकतात. परंतु गेल्या वर्षातील, विशेषतः डिसेंबरमधील काही घडामोडी पाहिल्या, तर काही संकल्प आपल्याला कायमस्वरूपी करावे लागतील, असं वाटतं. एक म्हणजे सर्वच स्त्रियांना आदरानं, सन्मानानं वागवणं, समानतेची वागणूक देणं. दुसरं म्हणजे एकूणच समाजजीवनात वावरताना सहिष्णुता बाळगणं, एकमेकांचा किमान आदर राखणं हे सध्या फार गरजेचं झालं आहे. तिसरं म्हणजे दुष्काळाची परिस्थिती पाहता पाण्याची बचत करण्याची सवय आत्तापासूनच लावणं. शिवाय मोठ्या शहरांत रस्त्यांवर वाहन चालवताना काळजीपूर्वक, नियमानं चालवणं इत्यादी इत्यादी. हे सगळे संकल्प केले, तर पुढील काळ कठीण वाटत असला, तरी एकमेकांच्या मदतीनं आपण ही आयुष्याची परिक्रमा हसत-खेळत नक्की पार करू शकू, असा विश्वास वाटतो...

गाणं शिफारस - तेरा साथ है तो मुझे क्या कमी है... (लता)
---

परिक्रमा आकाशवाणीची... २

परिक्रमा १०-१२-२०१२
-------------------------


दोन-अडीच वर्षांपूर्वी पुणे आकाशवाणीवरचे निर्माते प्रदीप हलसगीकर यांनी परिक्रमा हा अर्ध्या तासाचा कार्यक्रम सुरू केला होता. पुण्यातले आम्ही काही पत्रकार त्यासाठी लेखन करीत होतो आणि आकाशवाणीवरचे आमचे मित्र सिद्धार्थ बेंद्रे, संजय भुजबळ आदी मंडळी ते सादर करीत. आज सहज ते लिखाण सापडलं. आकाशवाणीसाठी मी प्रथमच अशा पद्धतीचं लेखन केलं होतं. मी असे चार भाग लिहिले... त्यातला हा पहिला... (अॅक्चुअली जो आधी पोस्ट केलाय तो दुसरा भाग आहे... दोन्हीची उलटापालट झालीय... असो... आता ब्लॉगवरच्या क्रमानं हा दुसरा...)
---------------------


मंडळी नमस्कार,

डिसेंबरातले हे दिवस म्हणजे एकदम कूल... सर्वार्थानं. म्हणजे एक नेहमीच्या थंड अशा अर्थाने आणि दुसरा अर्थ हल्ली तरुणाई ज्या आवडीच्या गोष्टींना कूल असं म्हणते ना, तशा अर्थाने पण... ठंडी हवाएँ, लहरा के आए... असं गुणगुणायला लावणाऱ्या गुलाबी थंडीचे हे दिवस. अशा हवेत चित्तवृत्ती फुलून आल्या नाहीत, तरच नवल. आणि या छानशा हवेच्या जोडीला एकापेक्षा एक सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असं सध्या पुण्यातलं वातावरण आहे. हां, आता थंडी जरा लपाछपी खेळते आहे. त्यामुळं काही दिवस थंडी, तर काही दिवस चक्क उकाडा असंही वेगळंच वातावरण सध्या अनुभवायला येत आहे. पण हवामान लहरी असलं, तरी पुण्यातल्या सांस्कृतिक मेजवान्यांचं वेळापत्रक अगदी पक्कं असतं, बरं का! या काळात पुण्याच्या परिसरातले किंवा महाराष्ट्रातलेच नव्हे, तर जगभरातले रसिक, वेगवेगळ्या देशांतले पर्यटक पाहुणे म्हणून पुण्यात येत असतात. येथे या काळात सादर होणाऱ्या काव्य-शास्त्र-विनोदाच्या मैफलींना हजेरी लावत असतात. एवढं काय काय सुरू असतं या काळात, की आपल्याला दिवसाचे २४ तास कमी वाटतील... अनेक जण खास या दिवसांची वाटच पाहत असतात. त्यातून मित्रमंडळी ठरवून सुट्ट्या टाकतात, एकत्र येऊन मस्तपैकी सगळे कार्यक्रम एन्जॉय करतात. पुण्यातली प्रेक्षागृहं, नाट्यगृहं, कलादालनं कशी कलासक्त मंडळींनी ओसंडून वाहत असतात. चहा किंवा कॉफीच्या वाफाळत्या कपासोबत त्या त्या कार्यक्रमांविषयी गरमागरम चर्चा सुरू असते, वाद झडत असतात, तर कुठं कौतुकाचा वर्षाव सुरू असतो... तर अशी आपल्या हिवाळ्याची हवा आणि त्यात हा सांस्कृतिक मेवा... रसिकांना तरी आणखी कुठला आनंद हवा...

गाणं - शिफारस - ठंडी हवाएँ, लहरा के आए...

रसिक हो, पुण्यात सध्या सुरू असलेल्या विविध कार्यक्रमांपैकी एक आहे ख्यातनाम जपानी दिग्दर्शक अकिरा कुरोसावा यांच्या चित्रपटांचा महोत्सव. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या थिएटरमध्ये रविवारी या महोत्सवाचं उद्-घाटन झालं. राशोमन हा कुरोसावा यांचा अत्यंत गाजलेला चित्रपट. महोत्सवाच्या उद्-घाटनप्रसंगी हाच चित्रपट दाखविण्यात आला. १९५० मध्ये आलेल्या, कृष्णधवल आणि केवळ दीड तासाच्या या सिनेमानं तेव्हा सिनेमाचं विश्व हलवून टाकलं होतं.
राशोमन आपल्याला एका खुनाची कथा सांगतो. म्हणजे जंगलात एक खून झालेला असतो आणि त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहभागी असलेले चार जण ती घटना चार प्रकारांनी वर्णन करून सांगतात. सत्य म्हणजे नेमकं काय असतं, आपण जे बघतो ते तरी सत्य असतं का, सत्याचं वर्णन करून सांगता येतं का अशा अगदी मूलभूत गोष्टींवर हा सिनेमा चर्चा करतो.
हाय अँड लो हादेखील असाच वेगळा सिनेमा. एका उद्योगपतीच्या मुलाचं अपहरण होतं. त्याला परत आणण्यासाठी तो स्वतःकडचे सगळेच्या सगळे पैसे खंडणी म्हणून द्यायला तयार होतो. मात्र, नंतर कळतं, की त्याच्या मुलाऐवजी त्याच्या ड्रायव्हरच्या मुलाचं अपहरण झालंय. आता त्याच्या नीतिमत्तेची खरी कसोटी असते....
श्रोते हो, कुरोसावा यांचे सगळेच सिनेमे तत्कालीन समाजाच्या आणि माणसांच्या अशा अगदी तळाच्या मुद्द्यांना हात घालणारे होते. कथा सांगण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. पारंपरिक चौकटींना धक्का देण्याचं त्यांचं खास तंत्र होतं. तेव्हा जागतिक सिनेमाचं नेतृत्व ज्यांच्याकडं आपोआप चालत आलं, अशा मोजक्या दिग्दर्शकांमध्ये कुरोसावा हे एक होते. आपले सत्यजित राय हेही अशा दिग्दर्शकांमध्ये होते. कुरोसावा आणि राय यांना एकमेकांविषयी नितांत आदर होता. अशा या दिग्दर्शकाचे गाजलेले सिनेमे येत्या गुरुवारपर्यंत संग्रहालयात पाहता येणार आहेत. रोज दुपारी दीड, साडेतीन आणि साडेपाच वाजता त्यांचे शो होणार आहेत. आपल्या कामातूनच बोलणारा हा थोर दिग्दर्शक अनुभवावा, असाच...

गाणं - शिफारस - ना मैं धर्मी ना ही अधर्मी... (मीरा सूर कबिरा)

खरंच, थोर लोक आपल्या कामातूनच बोलत असतात. किंबहुना ज्ञानपीठ पारितोषिक विजेते ज्येष्ठ नाटककार गिरीश कार्नाड... हो, कार्नाडच. गिरीशजी आपलं आडनाव कार्नाड असं योग्य पद्धतीनं उच्चारलं जावं, यासाठी आग्रही असतात... तर गिरीश कार्नाड यांनी काल पुण्यात झालेल्या तन्वीर सन्मान सोहळ्यातही थोडंसं कमी बोलून कदाचित हेच सूचित केलं असावं.
ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू आणि दीपा लागू त्यांच्या दिवंगत मुलाच्या - तन्वीरच्या - स्मरणार्थ दर वर्षी एका ज्येष्ठ आणि एका उगवत्या रंगधर्मीला हा सन्मान देत असतात. काल तन्वीर सन्मान गिरीश कार्नाड यांना, तर नाट्यधर्मी पुरस्कार प्रदीप वैद्य यांना देण्यात आला. पुण्यातल्या नाट्यक्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी या सोहळ्याला हजर होती. गेल्या काही वर्षांपासून दिला जात असलेला हा सन्मान म्हणजे आता नाट्य क्षेत्रातला एक अतिशय बहुमानाचा, पण काहीसा घरगुती स्नेहाचा, असा एक कौटुंबिक सोहळाच झाला आहे. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्नाड यांच्याविषयीची एक फिल्म दाखविण्यात आली. ती पाहिल्यामुळं प्रत्यक्ष भाषणात कार्नाड यांनी फार अधिक काही बोलणं टाळलं. मात्र, त्या फिल्मच्या शेवटी त्यांनी सांगितलेला एक अनुभव फार बोलका होता. ते म्हणाले, की मी जेव्हा आईच्या पोटात होतो, तेव्हा दोन महिने झाले असताना आई हे मूल नको म्हणून दवाखान्यात गेली होती. मात्र, तेव्हा मधुमालती गुणे म्हणून डॉक्टर होत्या, त्या त्या दिवशी दवाखान्यात आल्याच नाहीत. त्यामुळं माझी आई परत आली आणि नंतर तिचा विचार बदलला. तेव्हा मी सर्वप्रथम गुणे डॉक्टरांचे आभार मानतो. त्यांच्यामुळंच खरं तर मी आज आहे. नंतर माझ्या आईनं जेव्हा मला हा किस्सा सांगितला, तेव्हा मी स्तिमित झालो. जगण्यातली व्यामिश्रता काय प्रकारची असू शकते, आपलं अस्तित्व नक्की कशामुळं आणि का आहे, हे तेव्हा मला कळलं.
श्रोते हो, कार्नाड यांच्या भाषणातून किंवा त्यांच्या मुलाखतीत दर वेळी असं काही ना काही आपल्याला नक्कीच गवसत असतं. आपल्या जगण्याच्या परिक्रमेमध्ये येणारी अशी वळणं पुढच्या खडतर वाटचालीला उमेदच देत असतात...

गाणं - शिफारस - तुझे गीत गाण्यासाठी सूर लागू दे रे (सुधीर फडके)
किंवा जीवना तू तसा मी असा (अरुण दाते)
---------

2 May 2015

दादांचा ब्लॉग (जत्रा)

शू...! बोलायचं नाही...!
---------------------------


मंडळी, नमस्कार. मला त्या ठिकाणी ब्लॉग लिहिण्यास सांगण्यात आलेलं आहे आणि हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. आधी मला ब्लॉक वाटलं. मुंबईत फ्लॅटला ब्लॉक म्हणतात आणि या पदार्थाशी माझा जवळचा संबंध आहे, हे सांगायला नकोच. लहानपणी ब... बाबाचा किंवा फ... फुलाचा म्हणण्याऐवजी मी ब... ब्लॉकचा आणि फ... फ्लॅटचा शिकलो. इंग्रजी अक्षरं अनेक बावळट मुलं त्या ठिकाणी एबीसीडी वगैरे अशी शिकतात, पण मी टीडीआर, एफएसआय अशा योग्य त्या क्रमानंच ती शिकलो. त्यासंबंधानं माझी शालेय प्रगती उत्तमच होती, असं म्हटल्यास त्या ठिकाणी वावगं ठरणार नाही, असं मला वाटतं. पण इथं त्या ब्लॉकचा संबंध नसून, ब्लॉग म्हणजे कम्प्युटरवर लिहायचा लेख आहे, हे कळल्यावर माझं अवसान त्या ठिकाणी गेलंच. पण मी हार जाणाऱ्यातला माणूस नाय. मी लगेच एक ब्लॉगवाला माणूस हायर केला आणि त्याला माझा ब्लॉग लिहायला त्या ठिकाणी सांगितलं. म्हणजे तो फक्त टेक्निकल बघणार.... बाकी हे सगळे विचार माझेच आहेत आणि त्या ठिकाणी माझंच नाव असणार आहे, हे नक्की. (एरवी अनेक ठिकाणी माझं नाव नसतं, पण त्या गोष्टी माझ्या असतात. पण इथं उलटं घडलेलं आहे.) असो.

-----

मला वाटतं, पहिल्या ब्लॉगची सुरुवात माझी त्या ठिकाणी जडणघडण कशी झाली, माझं बालपण कसं गेलं, इथपासून करावी. लहानपणापासूनच मी जरा हाच. म्हणजे उनाड नाही, पण जरासा टग्या. आता त्या ठिकाणी हा शब्द मला चिकटलाच आहे, तेव्हा मी तो गौरवार्थी घेतो. टग्या असणं म्हणजे काही वाईट नाही. अन्याय सहन करायचा नाही, अशी आमच्या मातीची त्या ठिकाणी शिकवण आहे. लहानपणी इयत्ता दुसरीत मला एका मुलाचा बेंच आवडला. तेव्हा मी तो त्याला मला देऊन टाकायला सांगितलं. त्यानं ऐकलं नाही. तेव्हा त्याला चार दणके घालून मला तो बेंच माझ्या नावावर करून घेणं भागच पडलं त्या ठिकाणी. आता याला कुणी टगेगिरी म्हणत असतील, तर म्हणोत. मी हुशार असल्यानं तो नवा बेंच मी माझ्या मित्राच्या नावानं करून घेतला. म्हणजे कर्कटकनं मित्रानं आपलं नाव कोरलं. एपी अशी अक्षरं कोरली. म्हणजे आनंद पुसेगावकर. लोकांना वाटायचं, की माझंच नाव आहे. तेव्हापासून मला त्या ठिकाणी सगळे घाबरायला लागले. वास्तविक मी खूप खेळकर वृत्तीचा माणूस आहे. माझं या मातीवर प्रेम आहे. तिच्यात लोळावं, खेळावं, बागडावं असं मला फार वाटतं. पण लोक माझं हे प्रेम वाईट अर्थानं घेतात. त्या ठिकाणी आपण काही करू शकत नाही. माझ्या शिस्तीकडं कुणी पाहत नाही. लहानपणापासूनच मला स्वच्छता आवडते. माझ्या बेंचवर कुणीही कचरा केलेला मला चालत नसे. तेव्हा माझ्या बेंचवर मी एकटाच बसत असे. माझ्या पेन्शिलींना टोकं काढल्यावर होणारा कचरा दुसऱ्याच्या बेंचवर टाकायचं काम माझे काही निष्ठावान समर्थक तेव्हापासून करत आलेले आहेत. (आपल्या पेन्शिलीला टोक नसलं, तरी दुसऱ्याच्या पेन्शिलीला काढून द्यावं, हे धोरणी धोरण त्यांनी तेव्हापासून जपलं आहे. पुढं माझ्या या मित्रांना मी टेंडरांचा खाऊ देऊन लहानपणीच्या मदतीची त्या ठिकाणी परतफेड केलेली आहे.)

----

शाळेत थोडा मोठा झाल्यावर तर माझ्या शिस्तीचा दरारा फारच वाढू लागला. लोक तंबाखू, मावा, गुटखा खातात, हे मला फार घाण वाटतं. तोंडात त्या ठिकाणी ती घाण ठेवून म्हसाडासारखं चघळत बसावं का, तुम्हीच सांगा. काय पद्धत आहे ही? आमचा एक मास्तर होता बरं का. बरा होता एरवी शिकवायला. वृत्तीनं तर धार्मिक होता, माळकरी होता. पण तोंडात सदैव गायछाप. कायम त्या ठिकाणी बार भरलेला. मग आम्ही काय करावं? तेव्हा शम्मी कपूर एकदम फेमस होता. एके दिवशी मास्तर वर्गात येताच, सगळ्यांनी बार बार देखो, हजार बार देखो हे त्याचं गाणं म्हणायला सुरुवात केली. मास्तर लटके-झटके देत पळालाच. पुन्हा काय त्यानं वर्गात तोबरा भरला नाही. या वेळेपर्यंत मुलांनी मला दादा म्हणायला सुरुवात केली होती. मी दादा असल्यानं वर्गात थोडीफार दादागिरी करणारच ना! तुम्हीच सांगा...
मला दुसऱ्या एका गोष्टीची चीड होती ती म्हणजे पोरींची छेड काढणाऱ्या पोरांची. म्हणजे मला काय मुली आवडत नव्हत्या असं नाही. पण बारीक बारीक खोड्या काढून पळून जाणाऱ्या पोरांची त्या ठिकाणी मला चीड होती. पोरींचा नाद करावा तर मर्दासारखा करावा. त्या स्वतःहून आपल्याकडं आल्या पाहिजेत, या गोष्टीवर त्या ठिकाणी माझा कटाक्ष होता. याच गोष्टीमुळं मला त्या दुसऱ्या बारचीही चीड होती. पण ती गोष्ट नंतर येणार आहे.
लहानपणीच माझ्या शिस्तप्रिय अन् टग्या वृत्तीची पंचक्रोशीत वाहव्वा सुरू झाली होती. आमचे काका म्हणजे एकदम रत्नपारखी माणूस. आता माझ्यासारखं रत्न घरातच गावल्यावर काका काय सोडतात होय... त्यांनी मला त्यांच्या तालमीत घुमवायला सुरुवात केली. एकाच वेळी राजकारणाच्या आणि कुस्तीच्या आखाड्यात शड्डू ठोकू लागलो. पण आखाड्यात माती अंगाला चिकटू लागल्यानं आणि मला त्या ठिकाणी स्वच्छतेची आवड असल्यानं मी लवकरच तो आखाडा सोडला आणि राजकारणाच्या आखाड्यात उडी घेतली. काकांची पावर तेव्हा फुल्ल ऑन होती. त्यांच्यापुढं बाकीचे सगळे डीम लाइट वाटायचे. तेव्हा राजकारणात पुढं जायचं असंल, तर काकांच्या पावलावर पाऊल टाकलं पाहिजे, याच्यासंबंधानं त्या ठिकाणी मनात खूणगाठ बांधली. मग राजकारणातल्या बारीक-सारीक डाव-प्रतिडावांच्या संबंधानं आपलीही भूमिका ठरू लागली. कुठं निकाल घेतला पायजेलाय, कुठं दुरुस्ती करायला पायजेलाय हे सगळं त्या ठिकाणी शिकण्याची वृत्ती बनली.

---

काकांनी आधी दिल्लीला पाठवलं खासदार म्हणून... पण तिथं काय आपलं मन रमलं नाही. सुदैवानं काकाच दोन वर्षांत परतले आणि मी सुटलो. नंतर मी पूर्णपणे राज्यात लक्ष घातलं. मीच काकांचा वारसदार असं लोकं बोलू लागले. माझी कार्यशैली, शिस्त आणि एखादं काम होणार नसेल, तर त्या माणसाला तोंडावर तसं सांगण्याची पद्धत याचा त्या ठिकाणी सर्वत्र बोलबाला झाला. राज्यात आमचा जोडसंसार असल्यानं मला सुरुवातीला फार त्रास झाला. तोंडात बार असताना शिंक आल्यावर माणसाची जशी अवघडलेली अवस्था होते, तशी माझी (बारची सवय नसतानाही) कित्येकदा झाली. मग मी आमच्याच पार्टीच्या मंत्र्यांवर डाफरू लागलो. आता इथं त्या दुसऱ्या बारचा विषय सांगतो. हॉटेलांत पोरी नाचवणं मला त्या ठिकाणी कधीच आवडलं नाही. संतांच्या महाराष्ट्रात हे प्रकार चालणं म्हणजे फार वाईट. बाया नाचवायच्या तर प्रायव्हेटमधी. कधी नाचली, कुठं नाचली, कशी नाचली कुणाला कळता कामा नये. अशा गोष्टी बोभाटा न करता त्या ठिकाणी करायच्या असतात. त्याच्यातच खरी मजा असते. मला विचारा ना! पण जाहीर हॉटेलांत पोरी नाचवायच्या आणि वर त्यांच्यावर नोटा उधळायच्या हे मला बघवत नव्हतं. महाराष्ट्रात आतापर्यंत उधळल्या गेलेल्या या नोटा जपून ठेवल्या असत्या, तर आणखी किती तरी लाख एकर जमीन खरेदी करता आली असती. पण भूखंडाचं हे शास्त्र या बारवाल्या मुखंडांच्या लक्षातच येत नाही. शेवटी मी पुन्हा आमच्या मंत्र्यांना कामाला लावलं आणि या बारांचा बार त्या ठिकाणी पार उखडून काढला.

----

राज्यात अखेर उपमुख्यमंत्री म्हणून काम करायला त्या ठिकाणी संधी मिळाली. मात्र, या पदाला काहीही अर्थ नाही, हे मला ठाऊक आहे. केवळ नावाचं मोठेपण. पण मी हटलो नाही. इथंही शिस्तीनं कामाला लागलो. माझ्या करिअरचा ग्राफ वरवर जात होता आणि मी पुढच्या वेळेला त्या ठिकाणी राज्याचा मुख्यमंत्री होणार, यात काहीच शंका उरली नाही. पण नियतीच्या मनात दुसरंच काय तरी असतं. याच वेळेला राज्यात दुष्काळ पडला आणि माझ्या अकलेचाही त्या ठिकाणी पूर्ण दुष्काळच पडला. एका जाहीर कार्यक्रमात जीभ घसरली आणि धरणात ती विविक्षित क्रिया करून धरण भरू का, असा रोकडा सवाल मी हसत हसत टाकला. उपस्थित मंडळीही जोरदार हसली आणि सर्वांनी माझ्या विनोदबुद्धीला दाद दिली. पण महाराष्ट्राला विनोदाचं वावडं आहे, हे मला माहिती नव्हतं. हा व्हिडिओ सगळीकडं फिरू लागला आणि मला दे माय धरणी (की धरण) ठाय, असं झालं. घाबरून पुन्हा त्या क्रियेला जावं लागलं. त्यानं धरण तर भरलं नाहीच. पण त्या क्रियेच्या संबंधानं शरीरातली साखर बाहेर जाऊन मला मात्र इकडं कापरं भरलं. मला आहे डायबेटिस... उगाच त्या क्रियेच्या संबंधानं त्या ठिकाणी बोलून गेलो, असं झालं. राज्यात सर्वत्र माझी छीःथू होऊ लागली. घरची मंडळीही मला चिडवू लागली. एका नालायक पत्रकारानं तर मी त्याला फोन करू नये, म्हणून स्वतःची रिंगटोन 'पी लूं' या गाण्याची ठेवली. त्या गाण्यात एक तर 'पी' आहे आणि 'लू'सुद्धा... ते ऐकूनसुद्धा मला घाबरून बाथरूम आठवते. ते गाणं मी आमच्या घरात पूर्ण बॅन केलं आहे. एकदम बंद! पण रात्री-बेरात्री कधी तरी कोरडंठाक पडलेलं एखादं धरण स्वप्नात दिसतं आणि त्या ठिकाणी मी एकटाच उभा राहून जोर लावतो आहे, पण धरण काही भरत नाही आणि धरणाच्या भिंतीवर उभे असलेले राज्यातले सगळे लोक, विशेषतः विरोधक, पत्रकार वगैरे माझ्याकडं पाहून खदाखदा हसताहेत असलं काही तरी दिसतं. मला दरदरून घाम फुटतो आणि मी जागा होतो... तेव्हा खरंच लागलेली असते. मग मी मोकळा होऊन येतो आणि पुन्हा गादीवर पडतो... धरण आणि ती क्रिया यांच्यासंबंधानं माझ्या आयुष्यात आता हे जे अद्वैत निर्माण झालेलं आहे त्या ठिकाणी, ते केवळ अलौकिक आहे...
चला, राज्यात दुष्काळाची चिन्हे दिसताहेत आणि मलाही घाईची लागलेली आहे... तेव्हा निघतो. पण शू...शू... हे शूक्रेट - आपलं, शिक्रेट - आहे हं आपलं... कुणी कुठं बोलायचं नाही त्या ठिकाणी...!
---
(पूर्वप्रसिद्धी - जत्रा नियतकालिक, पुणे)
(बहुधा जुलै २०१४)
----

1 May 2015

टाइमपास - २ रिव्ह्यू

मला वेड लागले...
---------------------कुठलाही चित्रपट पाहताना, चांगला टाइमपास झाला पाहिजे, अर्थात वेळ कसा गेला ते कळलं नाही पाहिजे, अशी आपली साधी अपेक्षा असते. मात्र, 'टाइमपास (२)' असंच नाव असलेला चित्रपट पाहताना मात्र ते होत नाही, हा दैवदुर्विलास आहे. (किंवा आपल्या कर्माची फळं आहेत. काहीही म्हणा!) 'टाइमपास'सारखा चित्रपट पाहताना उच्च बौद्धिक दर्जाचा आनंद मिळावा, अशी अपेक्षा कुणीच करणार नाही. मीही केली नव्हती. पण किमान पहिल्या भागासारखं सुसह्य असं काही तरी असेल, हीही अपेक्षा दिग्दर्शक रवी जाधव पूर्ण करू शकलेले नाहीत. अशा चित्रपटांत हुकमी संवाद, खिळवून ठेवणारी प्रसंगमालिका, उत्स्फूर्त अभिनय आणि जोडीला चांगलं संगीत अशी भेळ जमावी लागते. टाइमपास - १ मध्ये ती जमली होती. 'दगडू परब नावाच्या मुलाचं प्राजक्ता लेले नावाच्या मुलगीवर प्रेम जडणं' या वाक्यातच पुरेसं नाट्य भरलेलं होतं. रवी जाधवनं आपल्या हुकमी विनोदी शैलीत ते खेळकर पद्धतीनं मांडलं होतं. 'नया है वह'सारखे गाजलेले संवाद, 'ही पोरी साजूक तुपातली'सारखं हिट गाणं आणि अनेक विनोदी प्रसंग यामुळं तो 'टाइमपास' रंगला होता. टीनएज वयातलं निरागस, पण हुरहुर लावणारं प्रेम (पपी लव्ह) हा त्याचा यूएसपी होता. याचा 'सिक्वल' काढताना दिग्दर्शकानं ही दोन्ही मुलं स्वाभाविकच आता मोठी झालेली दाखवली आहेत. पण मोठी म्हणजे एवढी की नायक आता तीस वर्षांचा झाला आहे. नायिकाही अर्थातच मोठी झाली आहे. इथंच सगळं गाडं फसलं आहे. कारण आता त्यांच्या प्रेमातली ती निरागस, हुरहुरती भावनाच लोप पावली आहे. आता जे काही प्रेम असेल, ते त्यांच्या दृष्टीनं कितीही पवित्र, सखोल वगैरे असलं, तरी प्रेक्षकांना आता ते व्यावहारिक, कॅल्क्युलेटेड प्रेमच वाटणार. तसं ते वाटू नये, यासाठी दिग्दर्शकानं तशी कथा घ्यायला हवी होती किंवा मग एकदम टपोरी फिल्म तरी करायला हवी होती. इथं मोठा झालेला दगडू अजूनही तसाच आहे, असं दिग्दर्शकाचं म्हणणं असलं, तरी प्रत्यक्षात तो संपूर्ण सिनेमाभर आपला मूळ स्वभाव बाजूला ठेवून, भावी सासऱ्यांना पटवण्यासाठी उच्चभ्रू असल्याचं नाटक करीत राहतो. इथंही दिग्दर्शक फसला आहे. कारण मूळ चित्रपटातल्या दगडूच्या आहे त्या रूपावरच प्रेक्षक फिदा होते. त्याचं ते तसं रॉ असणं हीच तर गंमत होती. 'टाइमपास २'मध्ये दिग्दर्शकानं त्याला सभ्यपणाची नाटकं करायला लावून का होईना, पण ती गंमतच घालवली आहे.
रवी जाधवच्या सिनेमात पटकथा ही कधीही फार भक्कम बाजू नव्हती. मात्र, उत्तम अभिनय, अचूक टायमिंग, कडक संवाद आणि वेगवान प्रसंगमालिका यामुळं त्याच्या पटकथेतले दोष झाकले जायचे. इथं मात्र, वरील बाजूही या कृत्रिम आवरणामुळं लंगड्या ठरल्यानं पटकथा उघडी पडली आहे. या सिनेमात असे अनेक प्रसंग आहेत, की ते का आहेत, असा प्रश्न पडावा. उदा. दगडू आणि त्याचे मित्र गावाकडं जातात तेव्हा दशावतारी नाटकात कामं करायचं सोंग करतात. हा प्रसंग मूळ कथानकात अजिबात मिसळून येत नाही. तसंच उत्तरार्धात एकदा प्राजक्ता तंबोरा घेऊन, 'काटा रुते कुणाला...' म्हणत असते, तेव्हा तिचे बाबा माधवराव हळवे होऊन तिच्या खोलीत येतात आणि तेही हे गाणं गुणगुणू लागतात व नंतर दोघंही रडू लागतात. स्वतंत्रपणे पाहिलं, तर प्रिया बापट आणि वैभव मांगले यांनी हा सीन चांगला केला आहे, वादच नाही. पण चित्रपटाच्या प्रकृतीशी तो मुळीच सुसंगत नाही. अगदीच ठिगळ लावल्यासारखा हा प्रसंग येतो आणि अशा प्रसंगाची अपेक्षा नसल्यानं प्रेक्षागृहात शेवटी हशाच पिकतो. मुंबईत माधवराव दगडूला घेऊन प्राजक्ताच्या स्टुडिओत जातात, तो प्रसंग आणि नंतर एकदा तिथं दगडू हाणामारी करतो तो प्रसंग हे तर ऐंशीच्या दशकातील हिंदी चित्रपटात शोभतील असे प्रसंग यात का घेतले आहेत, ते केवळ दिग्दर्शकच जाणे. अशी अनेक उदाहरणं आहेत.
या चित्रपटात पुरेसा मसाला आलेला नाहीय किंवा भेळ जमत नाहीये याची खात्री असल्यानंच की काय, जुन्या चित्रपटाच्या पुण्याईवर दिग्दर्शक अवलंबून राहिला आहे. त्यामुळं यातही लहानपणीचे दगडू आणि प्राजक्ता वारंवार डोकावत राहतात. त्या चित्रपटातील 'फुलपाखरू' किंवा 'मला वेड लागले' यासारख्या गाण्यांची हमिंग यात वापरून दिग्दर्शक आत्ताच्या कथेत जान ओतण्याचा प्रयत्न करतो. अगदी 'नया है वह'चा प्रसंग जसाच्या तसा (पण इथं देवळात) घ्यायचा मोहही दिग्दर्शकाला आवरलेला नाही. पण त्या चित्रपटातील उत्स्फूर्तता यात वाईट रीतीनं लोप पावली आहे, हे नक्की. त्यातली गाणीही चांगली होती. यातलं एकही गाणं लक्षात राहत नाही.

या चित्रपटात एकच रीलिफ आहे आणि तो म्हणजे वैभव मांगले. वैभवनं माधवराव लेलेंच्या भूमिकात कमाल केली आहे. त्याचे संवाद, देहबोली आणि मुद्राभिनय यातून वैभवनं माधवराव पूर्वीपेक्षा टेचात उभे केले आहेत. मुलीच्या प्रेमात हळवा झालेला, पण वरकरणी कठोर फणसासारखा असा बाप वैभव मांगलेनं माधवरावांच्या रूपात जोरदार साकारला आहे, यात शंका नाही. प्रियदर्शन जाधवनं मोठ्या दगडूची भूमिका स्टाइलबाज करण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. पण उत्स्फूर्तता हा या नटाचा सर्वांत मोठा गुणविशेष आणि नेमकं त्यालाच दिग्दर्शकानं इथं बरेचदा अंडरप्ले करायला लावून त्याची माती केली आहे. प्रिया बापट प्राजू म्हणून शोभून दिसली असली, तरी ती कुठे तरी हरवल्यासारखी वाटली या चित्रपटात. बाकी भाऊ कदम नेहमीच्याच टेचात. त्याचंच एक या चित्रपटातलं फर्मास आणि मला आवडलेलं वाक्य सांगून थांबतो... कारण तेच या सिनेमाचं सार आहे... भाऊ दगडूला म्हणतो - 'व्हिस्की आणि ताक एकमेकांत मिसळू नये. दोन्हींची चव जाते...'

यापुढं काहीच सांगायला नको...!!

दर्जा - दोन स्टार
(यातला एक वैभव मांगलेचा...)
----