3 May 2015

परिक्रमा आकाशवाणीची... ३

परिक्रमा ८-१-२०१३
-----------------------


रसिक श्रोते हो, नमस्कार...

मराठी माणसाच्या काही खास आवडी-निवडी आहेत. आपण संगीतात रमतो, आपल्याला इतिहास आवडतो, स्मरणरंजन आवडतं. वेगवेगळ्या कलांमध्ये आपल्याला रुची आहे. पर्यटन करण्यातही आता मराठी माणूस आघाडीवर आहे. या आवडी-निवडींबाबत कदाचित मतभेद होऊ शकतील, पण मराठी माणूस आणि नाटक हे जे काही रसायन जमलंय ना, ते खासच आहे. आपल्या सगळ्यांनाच नाटकं मनापासून आवडतात. पाहायला आणि स्वतः करायलादेखील! मराठीत नाटकांची फारच मोठी आणि थोर परंपरा आहे. विष्णुदास भाव्यांपासून ते आजच्या मोहित टाकळकरपर्यंत अनेक नाटककारांनी या परंपरेत मोठी मोलाची भर घातलीय. मंडळी, याच यादीतलं एक अत्यंत महत्त्वाचं नाव म्हणजे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे. आणि अत्रे म्हटलं, की तो मी नव्हेच हे नाटक आठवणार नाही, असा मराठी माणूस सापडणं अशक्य! तो मी नव्हेच आणि अत्रे हे जसं समीकरण होतं, तसंच तो मी नव्हेच आणि प्रभाकर पणशीकर हेदेखील अजरामर समीकरण म्हणता येईल. या तो मी नव्हेच नाटकाचा सुवर्णमहोत्सव नुकताच पुण्यात साजरा झाला. आचार्य अत्रे प्रतिष्ठाननं यानिमित्त एक कृतज्ञता समारंभ आयोजित केला होता. नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष डॉ. मोहन आगाशे, लेखक-दिग्दर्शक श्रीनिवास भणगे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबूराव कानडे आणि प्रभाकरपंतांच्या पत्नी विजया पणशीकर असं सगळं गणगोत या वेळी हजर होतं. नाटकाचं यश लेखकाचं की दिग्दर्शकाचं यावर नेहमीच चर्चा होते. तो मी नव्हेच नाटक आलं, तेव्हाही अशीच चर्चा झाली. पण प्रभाकर पणशीकर यांच्या मोठ्या योगदानाकडं तेव्हा लक्ष दिलं गेलं नाही. नाटक हे वेगवेगळ्या घटकांपासून तयार झालेल्या पदार्थासारखं असतं. तो मी नव्हेच नाटकात प्रेक्षकांना अशा पद्धतीचा आनंद मिळाल्याचं आगाशे यांनी या वेळी सांगितलं. आचार्य अत्रे यांच्या नावातच थिएटर होतं. थिएटरचं स्पेलिंग नीट वाचलं, तर द अत्रे असंही वाचता येतं. अत्र्यांनी आयुष्यात जे भोगलं, उपभोगलं त्यामुळं त्यांच्या लेखनात परिपक्वता आली, नाटककार म्हणून त्यांनी रसिकांना वेड लावलं, अशा शब्दांत भणगे यांनी अत्र्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
श्रोतेहो, खरंच, एका सत्य घटनेवर आधारित अशा या नाटकाचं यश जसं अत्र्यांच्या लिखाणात आहे, तसंच ते पणशीकरांनी अजरामर केलेल्या लखोबा लोखंडेसह पाच वेगवेगळ्या भूमिकांनाही निश्चितच आहे. लखोबा लोखंडे हा शब्द वाक्प्रचारासारखा पुढं रूढ झाला. फारच थोड्या नाटकांना असं उत्तुंग यश लाभलं. पाहा ना, 'तो मी नव्हेच'ला पाहता पाहता ५० वर्षं होऊन गेली आणि अजूनही त्या नाटकाची मोहिनी कमी झालेली नाही, यात शंकाच नाही.

गाणं - एखादी लोकप्रिय नांदी... किंवा तो मी नव्हेच मधले संवाद...

श्रोतेहो, 'तो मी नव्हेच' म्हणत सर्वांना फसविणारे या जगात काही कमी नाहीत. पण अन्याय, अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी 'तो मीच...' किंवा 'ती मीच...' म्हणत पुढं येणारे फारच थोडे असतात, नाही का! पश्चिम सीमेपलीकडल्या आपल्या शेजाऱ्याशी, अर्थात पाकिस्तानशी आपले संबंध फार काही गोड गोड बोलण्याएवढे नसले, तरी तेथील एका मुलीनं गेल्या काही महिन्यांत आपलंच नव्हे, तर सर्व जगाचं लक्ष आपल्याकडं वेधून घेतलं आहे. मलाला युसूफझाई हे नाव ऐकलं नाही, अशी फार थोडी माणसं आता जगात असतील. पंधरा वर्षांच्या या मुलीनं मुलींच्या शिक्षणाच्या हक्कासाठी पाकिस्तानात आवाज उठवला. स्त्रियांविषयी अतिशय बुरसटलेले, जुनाट विचार अंगीकारलेल्या तालिबानसारख्या संघटनांनी मलालापुढं मोठं आव्हान उभं केलं. मात्र, तरीही ही धीट मुलगी घाबरली नाही. तिनं आपला प्रचार सुरूच ठेवला. विचारांनी सामना करण्याची ताकद संपते, तिथं हातात शस्त्रं घेतली जातात. मलालाच्या बाबतीतही हेच झालं. अवघ्या १५ वर्षांच्या या मुलीवर पाकमधील स्वात खोऱ्यात तालिबान्यांनी नऊ ऑक्टोबर २०१२ रोजी गोळीबार केला. तिला संपवण्याचाच मारेकऱ्यांचा विचार होता. मात्र, सुदैवी मलाला त्यातून बचावली. गंभीर जखमी अवस्थेत तिला पेशावरमधल्या रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथं शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिला रावळपिंडीतल्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्या डोक्यात आणि मानेत गोळ्या घुसल्या होत्या. शस्त्रक्रिया करून त्या काढून टाकण्यात आल्या. तरीही तिची प्रकृती खालावल्यावर तिला पाकिस्तानी सरकारनं बर्मिंगहॅम येथील क्वीन एलिझाबेथ रुग्णालयात हलवलं. आता चांगली बातमी म्हणजे, तिथं काही काळ उपचार घेतल्यानंतर ती आता व्यवस्थित बरी झालीय आणि गेल्या शुक्रवारीच तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मलालावर गोळीबार झाल्यापासून जगभरातील माध्यमांचं तिच्याकडं लक्ष गेलं होतं. सध्याच्या या सोशल नेटवर्किंगच्या जमान्यात देशा-देशांच्या सीमा केव्हाच गळून पडल्या आहेत. त्यामुळं जगभरातून मलालासाठी प्रार्थना करण्यात आल्या. तिच्या प्रकृतीला उतार पडावा, म्हणून अनेकांनी सदिच्छा व्यक्त केल्या. अगदी भारतातूनही मलालाला भरपूर पाठिंबा मिळाला. स्त्रियांविरुद्ध होत असलेल्या दडपशाहीचं, जुलमी रुढी-परंपरांचं जोखड फेकून देण्याच्या लढ्याचं प्रतीक म्हणून आता मलालाकडं सगळं जग पाहतंय. तिच्यावर उपचार करणाऱ्या क्वीन एलिझाबेथ रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डेव्ह रोझर यांनीही मलालाचं कौतुक केलंय. मलाला ही अतिशय कणखर युवती असून, सर्वसामान्य नागरिकांसाठी, स्त्रियांसाठी ती करीत असलेलं काम खूप आश्वासक आहे, अशा शब्दांत रोझर यांनी तिची पाठ थोपटलीय. सध्या तरी मलाला नातेवाइकांसोबत लंडनमध्येच राहणार आहे. लवकरच तिच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया होणार आहे, असं समजतं. त्यासाठी आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा तिच्यासोबत आहेतच... होय ना!

गाणं - शिफारस - मी अशी नाही कधी मिटणार वा मरणार येथे (कविता कृष्णमूर्ती - अस्तित्व)

रसिकहो, माणसातलं जनावर जागं झालं, की तो माणूसपणा सोडून पाशवी कृत्यं करू लागतो आणि त्यांना माणसात आणण्यासाठी मलालासारख्या मुलीला पुढं यावं लागतं. पण जेव्हा वाघासारखं खरंखुरं जनावर नरभक्षक होतं तेव्हा नक्की दोष कुणाचा असतो? सध्या विदर्भात भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत एका नरभक्षक वाघानं असाच धुमाकूळ घातल्याच्या बातम्या येत आहेत. आतापर्यंत पाच माणसांचा जीव या वाघानं घेतला आहे. अगदी मुख्यमंत्र्यांनीही आता गरज पडली, तर या वाघाला गोळी घाला, असा आदेश वन विभागाला दिल्याची बातमी आहे. आता यानुसार यथावकाश कारवाई होईल आणि तो नरभक्षक वाघ मारला जाईलही. पण अशा बातम्या वाचून आपल्याला काही प्रश्न कायम पडतात. एक म्हणजे या परिस्थितीचा खरा गुन्हेगार कोण? आणि त्याची शिक्षा कोण भोगतो? वाघाच्या हल्ल्यात जी माणसं मारली गेली, त्यांच्या जीवाचं मोल नक्कीच आहे. त्यांच्या कुटुंबीयांवर काय परिस्थिती ओढवली असेल, त्याची आपण नक्कीच कल्पना करू शकतो. विशेषतः त्यात कुणी जर कमावता, कर्ता पुरुष मारला गेला असेल, तर त्या कुटुंबावर केवळ आभाळ कोसळलं असेल, हेही आपण समजू शकतो. पण वाघ किंवा कुठलंही जनावर मुळात नरभक्षक कशामुळं होतो, याचा आपण कधी विचार करतो का? वास्तविक विदर्भात जंगलं भरपूर आणि घनदाट. परंतु गेल्या काही काळात तेथेही जंगलांची अवैध आणि अफाट तोड सुरू असून, यामुळं वाघांचा नैसर्गिक अधिवास नष्ट होऊ लागला आहे. वास्तविक ज्या जंगलात वाघ असतो, ते जंगल परिपूर्ण मानलं जातं. कारण तेथील नैसर्गिक अन्नसाखळी अबाधित असते. मात्र, या साखळीतील एखादी कडी जरी तुटली, तरी संपूर्ण जंगलाच्या परिसंस्थेवर त्याचा विपरीत परिणाम होतो, हे आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. जंगलातील गवतावर चरणारे प्राणी हे वाघाचं प्राथमिक भक्ष्य असतं. ते मिळेनासं झालं, की वाघ अन्नाच्या शोधार्थ जंगलाबाहेर पडतात. शिकारीच्या शोधात त्यांचा चुकून माणसाशी सामना होतो आणि एकदा वाघानं माणूस मारला, की त्याच्या लक्षात येतं, की हे पकडायला फारच सोपं भक्ष्य आहे. त्यातून तो वाघ नरभक्षक बनत जातो. अर्थात आपलं प्राधान्य माणसांना असल्यामुळं नरभक्षक वाघाला मारावंच लागणार हे खरं... पण मुळात तो नरभक्षक बनू नये, यासाठी जंगलं टिकविण्याची आपली मूळ जबाबदारी माणसानं विसरता कामा नये, एवढी अपेक्षा गैर नसावी.

गाणं शिफारस - आओ बच्चो, तुम्हे एक कहानी सुनाता हूं (अमिताभ - मि. नटवरलाल)

मंडळी, नव्या वर्षातला पहिला आठवडा काल संपला. नव्या वर्षानिमित्त काही संकल्प केले असतील, तर ते 'सोडण्याचा' हा काळ. नव्याचे नऊ दिवस म्हणतात, तसे हे संकल्प अक्षरशः काही दिवसच टिकतात. परंतु गेल्या वर्षातील, विशेषतः डिसेंबरमधील काही घडामोडी पाहिल्या, तर काही संकल्प आपल्याला कायमस्वरूपी करावे लागतील, असं वाटतं. एक म्हणजे सर्वच स्त्रियांना आदरानं, सन्मानानं वागवणं, समानतेची वागणूक देणं. दुसरं म्हणजे एकूणच समाजजीवनात वावरताना सहिष्णुता बाळगणं, एकमेकांचा किमान आदर राखणं हे सध्या फार गरजेचं झालं आहे. तिसरं म्हणजे दुष्काळाची परिस्थिती पाहता पाण्याची बचत करण्याची सवय आत्तापासूनच लावणं. शिवाय मोठ्या शहरांत रस्त्यांवर वाहन चालवताना काळजीपूर्वक, नियमानं चालवणं इत्यादी इत्यादी. हे सगळे संकल्प केले, तर पुढील काळ कठीण वाटत असला, तरी एकमेकांच्या मदतीनं आपण ही आयुष्याची परिक्रमा हसत-खेळत नक्की पार करू शकू, असा विश्वास वाटतो...

गाणं शिफारस - तेरा साथ है तो मुझे क्या कमी है... (लता)
---

No comments:

Post a Comment